Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

बेघरांना हक्काची घरे द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बेघर कुटुंबांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेतून हक्काची घरे मिळावी या प्रमुख मागणीसाठी भटका समाज मुक्ती आंदोलनच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडक मोर्चा काढण्यात आला. घोषणाबाजी करत आंदोलकांनी गेटमधून आत घुसण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. दसरा चौकातून मोर्चा व्हिनस कॉर्नरमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. तेथे अर्धा तास आंदोलकांनी रास्तारोको करत सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. यावेळी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सरकारने २०११ मध्ये विमु‌‌क्त जाती भटक्या जमाती घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेची स्थापना केलेली आहे. योजनेतील तरतुदीनुसार चव्हाण मुक्त वसाहत योजनेची स्थापना झाली आहे. योजनेतील तरतुदीनुसार वर्षाला २० कुटुंबांच्या तीन वसाहती याप्रमाणे गेल्या चार वर्षांमध्ये १२ वसाहतीच्या माध्यमातून २४० कुटुंबांना स्वतःच्या हक्कांची घरे मिळाली असतील. मात्र योजनेच्या समाजकल्याण विभागाकडील समितीच्या अकार्यक्षम कार्यप्रणाली व निष्क्रिय आणि बेजबाबदार कार्यपद्धतीमुळे शेकडो गरीब भटक्या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळालेला नसल्याचे साठे यांनी सांगितले. जिल्हा समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राजाराम माने व समितीचे सदस्य सचिव सहायक आयुक्त विजय गायकवाड यांनी याबाबत प्रयत्न करावा अशी मागणी करण्यात आली. मोर्चाचे नेतृत्व संस्थापक अध्यक्ष भिमराव साठे यांनी केले. यावेळी विलास कांबळे, ‌आदिनाथ साठे, सुरेश महापुरे, महिला आदी आंदोलक सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेळकेवाडी करणार लखपती शेती

$
0
0

मोहसीन मुल्ला, कोल्हापूर

भारतीय खेड्यांचे एकेकाळचे वैशिष्ट्ये असलेली स्वयंपूर्णता पुन्हा आकाराला यावी यासाठी श्री क्षेत्र सिद्धगिरी मठाच्यावतीने प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून करवीर तालुक्यातील शेळकेवाडी येथे स्वयंपूर्ण खेड्याचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या प्रयोगात प्रत्येक कुटुंबाने आपल्या शेतीतील काही जागेत घरी नियमित लागणारा भाजीपाला, कडधान्ये, तेलबिया, फळे यांची लागवड करायची आहे. या उपक्रमास गावकऱ्यांनी मान्यता दिली असून येत्या काही दिवसांत या उपक्रमाची सुरुवात होणार आहे. मठाधिपती श्री अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांनी ही माहिती दिली.

श्री क्षेत्र सिद्धगिरी मठावर सेंद्रीय सजीव शेतीचे विविध प्रयोग करण्यात आले आहेत. देशी गायींचे संगोपन, एक एकरात शंभरपेक्षा जास्त पिके, सेंद्रीय शेती, नर्सरी फार्मिंग असे विविध प्रयोग मठावर सुरू आहेत. शेती फायद्याची होत नसल्याने, तसेच उत्पादन खर्चाइतका पैसाही शेतीतून मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी स्वयंपूर्ण व्हा‍वा, शेतीचा उत्पादन खर्च कमी यावा, तसेच शेतीची उत्पादकता वाढावी या उद्देशाने म‍ठावर मार्गदर्शनात्मक प्रकल्प उभारण्यात आले आहेत. त्यात एका एकरात शंभर पिके, घर, प्राण्यांसाठी गोठा, गोबरगॅस असा लखपती शेतीच्या प्रकल्पातून शेतीतून दररोजच्या गरजा भागवून वर्षाला चांगले पैसे कसे हाती पडतील हे दाखवण्यात आले आहे.

या उपक्रमांबाबत श्री अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज म्हणाले, 'मठावर येऊन शेतकऱ्यांनी मार्गदर्शन घ्यावे अशी ही कल्पना आहे. त्याच बरोबरीने प्रत्यक्षात एका गावात थेट शेतकऱ्यांच्या शेतावर लखपती शेतीचा प्रकल्प राबवणेही आवश्यक वाटते. यासाठी शेळकेवाडी येथील ग्रामस्थांशी यासाठी चर्चा झाली असून ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शेळकेवाडीत प्रत्येक शेतकऱ्याने किमान दहा गुंठे जागेत लखपती शेतीचा प्रयोग करायचा असून उर्वरीत शेतीत त्यांना हवी ते पिके घ्यायची आहेत. घरात लागणरा भाजीपाला, कडधान्ये, फळे, तेलबिया यांचे उत्पन्न शेतकरी घेतील.'

शेळकेवाडी हे गाव वाशीपासून जवळ असून गावची लोकसंख्या चारशेच्या आसपास आहे. कुटुंबाची संख्या ७० आहे. गावात यापूर्वीच पशूहत्या बंदी करण्यात आली आहे. गावाला सन २००७ मध्ये निर्मलग्राम तर २००५-०६ या वर्षाचा यशवंत ग्राम पुरस्कार, संत गाडगेबाबा पुरस्कार मिळाला आहे.

संस्कृती उत्सवानंतर ग्रामविकासाचे प्रयत्न

श्री क्षेत्र सिद्धगिरी मठावर जानेवारी महिन्यात भारतीय संस्कृती उत्सव झाला. भारतीय परंपरेतून पर्यायी विकासनिती, पर्यावरणपूरक विकास यांची मांडणी या उत्सवातून करण्यात आली. तसेच स्वयंपूर्णतेतून ग्रामविकासाची संकल्पना मांडण्यात आली. ग्रामविकासाची ही संकल्पना कल्पना प्रत्यक्षात साकारण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प ‌शेळकेवाडीत राबवण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी स्वतः प्रकल्प राबवला तर तो अधिकाधिक शेतकरी स्वीकारतील अशी ही कल्पना यामागे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचरामुक्तीसाठी ‘वुई केअर’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्वच्छ व सुंदर परिसर आणि निरोगी आरोग्य हा प्रत्येकाचा नैसर्गिक अधिकार आहे अशा विचाराने प्रेरित होऊन कोल्हापुरातील देवकर पाणंद येथील काही पर्यावरणप्रेमी नागरिकांनी 'वुई केअर' नावाचा एक ग्रुप स्थापन केला आहे. या गटात शहरातील विविध वयोगटातील, व्यवसायातील पुरुष व महिला सहभागी झाले आहेत. जलाशय, रस्ते, हवा आणि सर्वच परिसर स्वच्छ असावा यासाठी केवळ सरकार, नगरपालिका, महापालिकांवर अवलंबून न राहता एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्याला काय करता येईल यावर विचारांची देवाणघेवाण करून व व्यवहार्य योजना यशस्वीपणे अंमलात आणणे या प्रमुख हेतूने 'वुई केअर' या गटाची स्थापना केल्याची माहिती संजय पाटील व अरुण राजाज्ञा यांनी येथे दिली.

'गुढी पाडव्यादिवशी स्थापन झालेल्या या ग्रुपने देवकर पाणंदमधील विविध नागरिकांशी शहर कचरामुक्त कसे होऊ शकते याविषयी चर्चा केली. त्यामधून छोटीशी सुरुवात म्हणून प्लास्टिक व सुका कचरा कोंडाळ्यात न टाकता तो स्वतंत्रपणे गोळा करून त्याची निर्गत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे' असे संजय पाटील यांनी सांगितले.

वाढता कचरा ही मोठ्या मोठ्या शहरांचीसुद्धा डोकेदुखी झाली आहे. कोट्यवधी रुपये खर्चूनही ही समस्या सुटलेली नाही. कचरा साठवण्यासाठी जागा, त्याचा उठाव व वाहतूक करणे यावर नगरपालिका, महापालिका प्रचंड प्रमाणात खर्च करत असतात. एवढे करूनही शहरातील कचऱ्याची समस्या संपत नाही. उलट कचऱ्यामुळे धोकादायक वायू आणि प्रदूषण होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असते.स्वच्छता अभियान व कचरामुक्त परिसरसाठी जगभर वेगवेगळे प्रयोग होत आहेत. आपल्या देशात सोयीचा आणि कमीतकमी खर्चाचा इलाज शोधून नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग करण्यासाठी काही संस्था धडपडत आहेत. या संस्थांपैकी 'अवनि', 'एकटी' आणि 'माझे कोल्हापूर' या तीन संस्था कोल्हापूर शहर हे पूर्णतः कचरामुक्त करण्यासाठी एकत्र आल्या आहेत, अशी माहिती राजाज्ञा यांनी दिली.

उपक्रमाची सुरुवात म्हणून गेल्या रविवारी प्लास्टिक व इतर सुका कचरा (सर्व प्रकारचे कागद, औषधाच्या गोळ्यांचे कव्हर्स, चॉकलेटचे कागद इ.) गोळा करण्याची मोहीम सुरु करण्यात आली. रचनाकार सोसायटीच्या मागील रस्त्यावरील अस्ताव्यस्तपणे पसरलेला कचरा 'एकटी' च्या कचरावेचक महिला आणि आनंदी रेसिडेन्सीचे रहिवाशांनी वर्गीकरण करून स्वच्छ केला. क्रमाक्रमाने सरदार पार्क,रचनाकार सोसायटी, वसंत विश्वास पार्क, आनंदी अपार्टमेंट व निकम पार्क आदी भागात ही मोहीम राबविण्यात येईल, शहरातील सर्व विभागातील नागरिकांनी यात सहभागी व्हावे. या प्रयत्नात साथ द्यावी असे आवाहन 'वुई केअर' ग्रुपचे संस्थापक पाटील व राजाज्ञा यांनी केले आहे. यासाठी ज्या सोसायटी, संस्था भाग घेतील, त्यांच्या

परिसरातूनही कचरा नेण्याची व्यवस्था करण्यात येईल. सर्व पर्यावरणप्रेमींनी यात सूचना, कल्पना व प्रत्यक्ष सहभाग घेऊन हा प्रकल्प यशस्वी करावे. अधिक माहितीसाठी संजय पाटील ९४२३९८०१८१,अरुण राजाज्ञा ९४२३०४०७८० यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

कचरामुक्तीसाठी नागरिकांना फार काही वेगळे कष्ट करावे लागणार नाहीत. फक्त त्यांना सुका कचरा स्वतंत्रपणे ठेवावा लागेल. 'एकटी' संस्थेच्या कचरावेचक महिला हा कचरा नियमितपणे आपल्या दारातून घेऊन जातील व त्याची शास्त्रशुद्ध निर्गत करतील. महानगरपालिकेचा सफाई खर्च वाचेल. त्याचप्रमाणे कचरा वेचणाऱ्या लोकांचे जीवनमान उंचावेल.'

- अरुण राजाज्ञा

गुढी पाडव्यादिवशी कचरामुक्तीच्या उपक्रमासाठी देवकर पाणंद परिसरातील नागरिकांशी चर्चा केली आहे. विविध प्रयत्नांनी शहर कचरामुक्त कसे होऊ शकते. सरदार पार्क,रचनाकार सोसायटी, वसंत विश्वास पार्क, आनंदी अपार्टमेंट व निकम पार्क आदी भागात टप्प्याटप्प्याने ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

- संजय पाटील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन संस्थांच्या अपात्रतेवर शिक्कामोर्तब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गोकुळ दूध संघासाठी दुबार ठराव दाखल केल्याने १३ संस्थांपैकी ८ संस्थांना मतदानाचा हक्क नाकारण्यात आला होता. यापैकी तीन संस्थांनी उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. त्यातील पवनादेवी, असंडोली या संस्थेची याचिका मंजूर करत त्यांना मतदान करण्याचा अधिकार उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे गोकुळच्या एकूण मतदारांमध्ये एका मतदाराची वाढ झाली असून गोकुळसाठी आता ३२६३ संस्था मतदान करणार आहेत.

भैरवनाथ दूध उत्पादक सहकारी संस्था, सुळे (ता. चंदगड), कामधेनू दूध संस्था भादवण (आजरा) आणि पवनादेवी असंडोली दूध उत्पादक संस्था गगनबावडा यांनी मुंबई उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती.

माघारीला थंडा प्रतिसाद

गोकुळ दूध संघासाठी उमेदवार अर्ज दाखल केलेल्या अर्जांची छाननी होऊन आता आठ दिवस झाले. छाननी नंतर अंतिम यादी प्रसिद्ध होते आणि उमेदवारी अर्ज माघारी घेण्यास सुरूवात होते. मात्र, गेल्या आठ दिवसात एकाही उमेदवाराने माघारी घेतलेली नाही. त्यामुळे निवडणूक विभाग केवळ वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. विद्यमान संचालकांच्या मनामध्ये सत्ताधारी पॅनेलमध्ये संधी मिळणार असा विश्वास आहे. दोन्ही पॅनेलचे नेते कोणाला संधी देणार आणि कोणाला नाही हे स्पष्ट करत नाहीत. सत्ताधाऱ्यांमधील अनेकांचा पत्ता कट होऊन नवीन उमेदवारांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

त्यामुळे कोणाचीही उमेदवारी निश्चित मानली जात नाही. यामुळे सर्वच हवालदिल असून आपल्या संधी मिळणार या विश्वासात आहेत. पण, ऐनवेळी संधी मिळाली नाही तर अडचण होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने इतर पॅनेलच्या नेत्यांशीही संपर्क साधण्याचे काम इच्छुक उमेदवारांनी केले आहे. त्यातील काहींना उमेदवारी देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोकुळ, केडीसीसीच लक्ष्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (केडीसीसी) निवडणुकीमुळे कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी कारखान्याच्या निवडणुकीकडे मोठ्या नेत्यांनी दुर्लक्ष केले आहे. माघारी घेण्यासाठी आठ एप्रिलपर्यंत मुदत असल्याने पॅनेल रचनेला फारसा वेग आलेला नाही. तरीही इच्छुकांना उमेदवारी मागे घेण्यासाठी विविध पातळीवर दोन्ही गटाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.

जिल्ह्यात गोकुळच्या निवडणुकीला चांगलाच ज्वर चढला आहे. गोकुळनंतर जिल्हा बँकेचीही निवडणूक लागणार असल्याने सर्व प्रमुख नेत्यांनी जिल्ह्यातील शिखर संस्थावर लक्ष केंद्रीत केले आहे. यामुळे सुमारे १२ हजार सभासद असलेल्या राजाराम कारखान्याच्या निवडणुकीकडे नेते मंडळीनी कानाडोळा केला आहे. कारखान्याच्या १९ जागांसाठी १७१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी माघार घेण्यासाठी २५ मार्चपासून सुरुवात झाली असली, तरी सोमवारपर्यंत केवळ चार उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. माघारी टप्प्यावर सामसूम दिसत असली, तरी अंतर्गत हालचाली जोरात सुरू आहेत.

कारखान्याचे मार्गदर्शक संचालक महादेवराव महाडिक व माजी मंत्री सतेज पाटील यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कारखाना कार्यक्षेत्रातील समर्थकांना अनेक प्रकारची 'वचने' दिली होती. सर्वच आश्वासने पूर्ण होणार नसली तरी, नेतीमंडळींच्या विश्वासाने आपल्यालाच उमेदवारी मिळणार या आक्षेने अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आमदार महाडिक गोकुळच्या निवडणुकीत व्यस्त असले, तरी कारखान्यासाठीही ते स्वतंत्र यंत्रणा उभी करुन पॅनेल बांधणी करत आहेत. तर माजी मंत्री पाटील यांनी गोकुळसबोतच कारखान्याच्या निवडणुकीकडेही तितकेच लक्ष दिले आहे. पॅनेलमध्ये संधी मिळण्यासाठी इच्छुक नातेवाईक, मित्र परिवारांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत. त्याच प्रमाणे पॅनेल प्रमुखही अशाच यंत्रणेचे वापर करुन अर्ज माघारीसाठी इच्छुकांवर दबाव आणत आहेत. येता तीन चार दिवसांत दोन्ही पॅनेलचे चित्र स्पष्ट होणार असले, तरी पॅनेल प्रमुखांनी गुप्त यादी तयार केली असल्याचे खंदे समर्थक खासगीमध्ये बोलत आहेत.

राजाराम कारखान्याच्या निवडणुकीसाठी पॅनेलमध्ये संधी मिळण्यासाठी अनेक कार्यकर्ते भेट घेत आहेत. कारखाना आणि गोकुळचे निवडणूक एकाचवेळी जाहीर झाली असली, तरी कारखान्यामध्ये पॅनेल करण्यात फारसी अडचण नाही. दोन ते तीन दिवसांत पॅनेलची रचना पूर्ण होईल.

सतेज पाटील, माजी गृहराज्यमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्तारूढ गटाने बँकेला लुटले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्राथमिक शिक्षक बँकेत सत्तारूढ वरूटे व रेपे यांनी गेल्या सहा वर्षात बँक लुटली असून अशी प्रवृत्ती हद्दपार करण्यासाठी समविचारी पॅनेलला मताधिक्यांनी विजयी करण्याचे, आवाहन संघाचे जिल्हानेते विलास पाटील यांनी केले. कसबा वाळवे (ता.राधानगरी) येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ कास्ट्राईब व उर्दू शिक्षक संघटना प्रणित समविचारी पॅनेलच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. पाटील म्हणाले, गेल्या सहा वर्षात बँकेत प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. सत्ताधाऱ्यांना बँकेतून हद्दपार करण्यासाठी पाठ‌िंबा मिळत असल्याने बदल अटळ आहे.

एस. डी. पाटील म्हणाले, संघटनेच्या माध्यामतून मोठी कामे केली असून सत्ताधारी वरूटेना सभासद कंटाळले असून सर्व थरातून पाठींबा मिळत आहे. पुरोगामी शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस रवी ‌शेंडे यांनी आपल्या १५० कार्यकर्त्यांसह व वरूटे गटाचे संभाजी पाटील यांनी आपल्या असंख्य कार्यकत्र्यासह समविचारी आघाडीला पाठींबा जाहीर केला. यावेळी गौतम कांबळे, रवी शेंडे, संभाजी पाटील, रघुनाथ खोत, मीना फराकटे, प्रतिमा माने आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संजय घाटगेंचा ‘रूट’ बंद?

$
0
0

गुरुबाळ माळी, कोल्हापूर

'गोकुळ'ची निवडणूक सोपी जावी म्हणून सत्ताधारी गटाने मुश्रीफ व मंडलिक गटांना संधी देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंडलिक गटातर्फे राजेश पाटील यांचे नाव जवळजवळ निश्चीत करण्यात आले आहे. पण याच गटाच्या संजय घाटगे गटावर मात्र गडांतर येण्याची शक्यता आहे. यामुळे अरूंधती घाटगे अथवा समरजितसिंह घाटगे यांना उमेदवारी न देण्याबाबत हालचाली सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीत घेतलेली भूमिका आता घाटगे यांच्या उमेदवारीला अडचणीची ठरणार आहे. राष्ट्रवादीला सोबत घेण्यासाठी दुसरी जागा देताना रामराजे कुपेकरांना उमेदवारी देण्याची व्युहरचना आखण्यात आली आहे.

गोकुळ निवडणुकीसाठी आता सत्ताधारी गटाने उमेदवारांची नावे निश्च‌ीत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. माजी खासदार मंडलिक गट, माजी मंत्री हसन मुश्रीफ हे दोन्ही गट सोबत रहावे यासाठी हालचाली सुरू आहेत. त्यामुळे मंडलिक गटाचा उमेदवार म्हणून राजेश नरसिंगराव पाटील यांना उमेदवारी निश्चीत करण्यात आली आहे. ते कै. सदाशिवराव मंडलिक यांचे जावई आहेत. मुश्रीफ यांनी चार जागांची मागणी करताना संजय घाटगे यांच्या घरात कोणालाही उमेदवारी देऊ नये, अशी अट घातली आहे. चार ऐवजी सध्या तरी मुश्रीफ गटाला एकच जागा देण्यास सत्ताधारी गट तयार झाल्याचे समजते. त्यामुळे रणजित पाटील यांची उमेदवारी निश्चीत आहे. मुश्रीफ गटाला आणखी एक जागा मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. त्याऐवजी राष्ट्रवादीला दुसरी जागा देताना घाटगे गटाला डावलण्याची त्यांची दुसरी मागणी मान्य होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी खासदार धनंजय महाडिक यांना मदत व्हावी म्हणून संजय घाटगे यांनी काँग्रेसमध्येच रहावे, अशी विनंती आमदार महादेवराव महाडिक व पी. एन. पाटील यांनी केली होती. पण तेव्हा मंडलिकासोबत जाण्याची घाटगेंची भूमिका आता त्यांना अडचणीची ठरण्याची चिन्हे दिसत आहे. अरूंधती व मुलगा समरजितसिंह यांनी अर्ज भरले आहेत. पण या दोघांनाही उमेदवारी मिळण्याची शक्यता दिसत नाही. घाटगे व पी. एन. पाटील यांचे संबंध अतिशय चांगले आहेत. पी. एन. यांनी फारच आग्रह धरला तरच घाटगे गटाला उमेदवारी मिळू शकते. उमेदवारी न मिळाल्यास घाटगे गट काय करणार? हे पुढील आठवडयात स्पष्ट होणार आहे.

एका दगडात दोन पक्षी

घाटगे यांना वगळल्यास राष्ट्रवादीतर्फे रामराजे कुपेकरांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. यामुळे एका दगडात दोन पक्षी मारण्याची संधी महाडिक यांना मिळणार आहे. राष्ट्रवादीला दुसरी जागा मिळाल्याचे समाधान मुश्रीफांना तर कुपेकर गटाला संधी दिल्याचे समाधान महाडिकांना मिळणार आहे. रामराजे हे धनंजय महाडिक यांचे मेव्हणे असल्याने त्यांना संधी दिल्यास खासदार महाडिक खूष होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर निश्चिंत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुबलक पाणी साठ्यामुळे समृद्ध असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांमध्ये यंदाही मुबलक पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील चार मोठे, आठ मध्यम व ५३ लघु प्रकल्पांमध्ये मार्चअखेर सरासरी ६० टक्के साठा आहे. पाऊस जूनपर्यंत लांबला तरी हा पाणीसाठा पुरेसा असणार आहे. सर्वांत जास्त ७१ टक्के पाणीसाठा चिकोत्रा मध्यम प्रकल्पात आहे. मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी ६३ टक्के तर मोठे व लघु प्रकल्पात ५९ टक्के पाणीसाठा आहे. कोल्हापूर, इचलकरंजीसह शिरोळपर्यंतच्या गावांसाठी महत्त्वाचा स्रोत असलेल्या राधानगरी धरणात ५४ टक्के साठा आहे.

सह्याद्री डोंगररांगांवर पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश नद्यांना मुबलक पाणी असते. हेच पाणी मोठ्या चार प्रकल्पांबरोबर मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पांमधून अडवण्यात आले. चार मोठ्या प्रकल्पांमध्ये वारणा, दूधगंगा, राधानगरी व तुळशी धरणांचा समावेश आहे. यातील दूधगंगा व राधानगरीतील सध्याचा पाणीसाठा ५० टक्क्यांवर तर तुळशी व वारणेचा पाणीसाठा ६० टक्क्यांवर आहे. यातील राधानगरीतील पाणी कोल्हापूर, इचलकरंजी या मोठ्या शहरांबरोबर पंचगंगा नदीकाठावरील १०० हून अधिक गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी वापरले जाते. तुळशीतून सोडल्या जाणाऱ्या पाण्याचाही या सर्वांना फायदा होतो. या चार मोठ्या प्रकल्पांमध्ये सध्या सरासरी ५९ टक्के पाणीसाठा आहे.

याशिवाय आठ मध्यम प्रकल्पांमध्ये सर्वांत जास्त ७१ टक्के इतका साठा घटप्रभा प्र्रकल्पात आहे. सर्व प्रकल्पांची सरासरी टक्केवारी पाहिल्यास ६३ टक्के पाणीसाठा आहे. याशिवाय लघु पाटबंधारे प्रकल्पात ५९ टक्के पाणीसाठा आहे. या सर्वांमधील पाण्याचा काठावरील गावांबरोबर विविध ठिकाणच्या गावांच्या पिण्यासाठी व शेतीसाठी उपयोग होतो. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाला प्रारंभ होतो. त्यामुळे आगामी दोन महिन्यासाठी हा पाणीसाठा मुबलक असल्याचे उपकार्यकारी अभियंता व्ही. एन. पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दागिने लूटप्रकरणी तिघे अटकेत

$
0
0

कुपवाड : भरधाव वाहनांवरुन येवून धूम स्टाईलने महिलांच्या गळ्यातील दागिने पळविणारे तीन चोरटे सांगलीच्या शहर पोलिसांनी गजाआड केले. त्यामधील दोघे जयसिंगपूरच्या जे जे मगदूम इंजिनीअरींग कॉलेजमधील विद्यार्थी असल्याचे समोर आले आहे. तिघांकडून साडे सहा तोळ्याचे दागिने पोलिसांनी जप्त केल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजू मोरे यांनी मंगळवारी दिली.

कवठेमहांकाळमधील राजारामबापूनगरमध्ये राहणारा आणि सध्या जे जे मध्ये मेकॅनिकल डिफ्लोमा करणारा शितल मारुती मिरजे (वय २३) याने सांगलीत १७ जून रोजी श्रद्धा पाचोरे यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे गंठण हिसडा मारून पळविले होते. तर जे जे चाच विद्यार्थी असलेला शुभम ऊर्फ गुरू राजेंद्र साळुंखे (वय १९, रा. नरसिंहवाडी) आणि धीरज गोरखनाथ ताफेकर (वय २४, रा. सोनाळी, ता. कागल) या दोघांनी १० सप्टेंबरला सांगलीत सुजाता हिगाणे या महिलेच्या गळ्यातील साडेचार तोळ्याचा राणीहार पळविला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रामराजेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

मागील काही दिवसांपासून खासदार उदयनराजे व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यात सुरू असलेल्या कलगी-तुऱ्याने मंगळवारी साताऱ्यात हिंसक वळण घेतले. उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांनी दुपारी रामराजेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केल्यानंतर सातारा शहरात तणाव वाढला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी उदयनराजे यांनी फलटणमध्ये जाऊन पाणीप्रश्नावरुन रामराजेंचे टीका केली होती. विधान परिषदेचे सभापतीपद मिळवल्यानंतर फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारात रामराजे यांनी उदयनराजेंवर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन शाब्दिक हल्ला चढवला होता.

मंगळवारी उदयनराजे दिल्लीहून साताऱ्यात आल्यानंतर रामराजेंच्या थिल्लर वक्तव्यांचा निषेध केला. त्यांनी कार्यकर्त्यांना संयम बाळगण्याच्या सूचना केल्या. परंतु, कार्यकर्ते विश्रामगृहावरुन दुपारी साडे चारच्या सुमारास थेट पोवई नाक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जमले. या वेळी कार्यकर्त्यांनी रामराजेंसह त्यांच्या दोघा बंधूंवर पोलिसांसमोरच जहरी टीका केली. कार्यकर्ते या ठिकाणी रामराजेंचा पुतळा दहन करणार म्हणून, या ठिकाणी शेकडो पोलिस बंदोबस्तासाठी आले होते. पण, काही कार्यकर्त्यानी गनिमी काव्याने अजिंक्य कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर रामराजेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. या घटनेमुळे पोलिसही चांगलेच गांगरुन गेले, त्यांनी धरपकड करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी पुतळा दहनप्रकरणी अकरा जणांना ताब्यात घेऊन जामिनावर सोडून दिले. उदयनराजे यांनी बुधवारी सकाळी पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. दरम्यान, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकरणी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी लक्ष्य घालावे, अशी मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शॉटसर्किटमुळे तीन घरे जळाली

$
0
0

सातारा : आसनी तळ (ता. जावली) येथे सोमवारी रात्री पावसाने झालेल्या शॉटसर्किटमुळे तीन रहात्या घरांना आग लागून ५ लाख ६९ हजार ४०० रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये कोणतीही जीवीत हानी झाली नाही. मोठे नुकसान झाल्याने तीन कुटुंबे उघड्यावर आली आहेत.

सोमवारी रात्री आठच्या सुमारास अचानक पडलेल्या पावसाने शार्टसर्किटने आग लागली. तत्काळ आगीने भीषण रूप धारण केले. एकमेकांना चिकटून असलेल्या तीन घरांना आगीने व्यापले. आगीत कांताबाई विजय धनावडे यांचे येथे किराणा मालाचे दुकान नारायण काशिनाथ भिलारे आणिर नंदा लक्ष्मण भिलारे यांचे घर जळाले. परिसरातील ग्रामस्थ, युवकांनी कोणतीही पर्वा न करता. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सरपंच विष्णू धनावडे यांनी मोठ्या धाडसाने गॅस सिलिंडर बाहेर काढल्याने व आनंदा शेलार यांनी तातडीने वीज प्रवाह बंद केल्याने मोठा अनर्थ टळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक दिवसात हजारावर बिले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आर्थिक वर्षातील मंजूर निधीच्या खर्चाची बिले सादर करण्यासाठी शेवटच्या दिवशी जिल्हा कोषागार कार्यालयात रात्री उशिरापर्यंत गर्दी होती. मंगळवारी एका दिवसात विविध सरकारी कार्यालयांतील एक हजारहून अधिक बिले सादर करण्यात आली. त्यामुळे पहिल्यांदा सायंकाळी सातपर्यंत बिले स्वीकारण्याची जाहीर केलेली मुदत रात्री दहा वाजेपर्यंत वाढविण्यात आली होती. याशिवाय काही सरकारी कार्यालयांमध्ये शेवटच्या टप्प्यात आलेला निधी खर्च टाकण्याकरिता बिले तयार करण्याचीही गडबड सुरू होती. शेवटच्या टप्प्यात एक कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंडळाकडे वर्ग झाला.

२०१४-१५ या आर्थिक वर्षातील ३१ मार्च या शेवटच्या दिवसापर्यंत बिले देण्यासाठी कोषागारमध्ये गर्दी झाली होती. राज्य पातळीवर काही खात्यांमध्ये शेवटच्या दिवशी निधी वर्ग होतो. हा निधी २०१५ मध्येच खर्च पडण्याची आवश्यकता असल्याने त्यादिवशी बिले कोषागार कार्यालयात सादर करून त्यांच्याकडून हा निधी खर्च केला जाणे आवश्यक असते. त्यानुसार दिवसभर विविध खात्यांतील बिले सादर करण्यासाठी कोषागार कार्यालयात गर्दी झाली होती. ​शहरात वेगवेगळ्या सरकारी कार्यालयांतील २२७ अधिकाऱ्यांना निधी खर्च करण्याचे अधिकार आहेत. ती बिले ३१ मार्चच्या आत कोषागार कार्यालयात जमा करणे आवश्यक असते. त्यानुसार मंगळवारी सायंकाळपर्यंत एक हजारहून जास्त बिले सादर झाली होती.

शेवटच्या दिवशी गर्दी होण्याच्या शक्यतेने जिल्हा​धिकाऱ्यांनी बिले स्वीकारण्यास सायंकाळी सातपर्यंतची मुदत दिली होती. त्यानंतर हीच मुदत रात्री दहापर्यंत वाढविण्यात आली. बिले सादर झाल्यानंतर तो निधी संबंधित खात्यावर वर्ग करण्याची आवश्यकता असल्याने स्टेट बँकेच्या ट्रेझरी शाखेला रात्री अकरापर्यंत कामकाज सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते. राज्य सरकारकडून अनेक खात्यांकडे शेवटच्या दिवशी काही निधी वर्ग होतो. हा निधी त्या दिवशीच खर्च पडण्यासाठी यावेळी बिलधारकांना धनादेश देण्यास परवानगी मिळाली होती. त्यानुसार हे धनादेश ३१ मार्चलाच खर्च टाकण्यासाठी बँकेत जमा करण्यात येत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकींना शुक्रवारी डोंगरावर बंदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जोतिबा यात्रेला भाविकांची गर्दी व पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी जोतिबा डोंगरावर शुक्रवारी (ता.३) सर्व दुचाकी वाहनांना डोंगरावर बंदी घालण्यात आली आहे. दानेवाडी क्रॉसिंगजवळ दुचाकी अडवण्यात येणार असून भाविकांसाठी केएमटी बसेसची सोय केली आहे.

यात्रेदिवशी सर्व मोटार वाहने केर्ली व कुशिरे फाट्यामार्गे जोतिबा डोंगरावर जातील. जोतिबा डोंगरावरून वाहने दानेवाडी फाट्यावरून वाघबीळ, गिरोली मार्गे कोल्हापूर व इतर मार्गावर जातील. वाघबीळ व शाहूवाडीकडून येणारी वाहनेही केर्ली मार्गेच येतील असे शहर वाहतूक पोलिस शाखेने स्पष्ट केले आहे. एक एप्रिलपासून कोल्हापूर ते बोरपाडळे मार्गावर जड व अवजड वाहने, मालवाहतूक करणारे ट्रॅक्टर या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. रत्नागिरीकडून येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांनी बोरपाडळे फाटा, कोडोली, वाठार व राष्ट्रीय महामार्गाचा वापर करावा.

पार्किंग व्यवस्था अशी

१) यमाई मंदिराजवळ दोन्ही बाजूस चारचाकी वाहने. २) मेन पार्किंगः लक्झरी, मिनी बस व ट्रक. ३) ग्रामपंचायत पार्किंगः चारचाकी. ४) ट्रक पार्किंग. ५) नवीन एसटी स्टॅडसमोर व परिसरः चारचाकी. ६) यात्री निवास समोरः राखीव. ७) यात्री निवास आतील परिसरः दुचाकी. ८) तळ्याच्या सभोवतालचा परिसरः चारचाकी. ९) नवीन एसटी स्टॅडसमोर व मागील पठारः चारचाकी. १०) दानेवाडी क्रॉसिंग (जुने अंब्याचे झाड परिसर) दुचाकी. ११) शेवताई मंदिर परिसरः चारचाकी. १२) गिरोली फाटा ते दानेवाडी रोड परिसरः दुचाकी/चारचाकी व इतर सर्व प्रकारची वाहने.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुविधांची आबाळ संपता संपेना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

टिंबर मार्केट परिसरातील व्यावसायिकांकडून महापालिकेला दरमहा कोट्यवधी रुपयांच्या कराचा भरणा होतो. मात्र या परिसरात पायाभूत सुविधांची वानवा आहे. रस्ते आणि गटर्सची देखील सोय नाही. खराब रस्त्यामुळे या भागातून वाहने चालविताना व्यावसायिक आणि ग्राहकांचे कंबरडेच मोडत आहे. गटर्स व्यवस्थित नसल्यामुळे सांडपाण्याचा निचरा होत नाही. पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचते. टिंबर मार्केट व्यावसायिकांनी येथील पायाभूत सुविधांसाठी महापालिकेचे उंबरठे झिजवले, पण प्रशासनाने सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हात आखडता घेतला आहे.

'टिंबर मार्केट परिसरात १५० व्यावसायिक आहेत. सॉ मिल, लाकूड विक्री, प्लायवूड असे बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्यांची विक्री होते. येथील व्यावसायिक घरफाळा, व्यवसाय परवाना, एलबीटी अशा विविध स्वरुपातील मिळून दरवर्षी अंदाजे पाच कोटी रुपयांचा महसूल भरतात. सॉ मिल, टिंबर असे दोन प्रकारचा व्यवसाय परवाना फी भरतात. मात्र गेल्या चाळीस वर्षात या भागातील रस्तेच संपूर्णता तयार केले नाहीत' असे छत्रपती राजाराम टिंबर मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष वसंतराव देशमुख यांनी सांगितले.

प्रशासनाने भागातील रस्ते आणि गटर्सची सोय करावी यासाठी असोसिएशनचे पदाधिकारी व स्थानिक नगरसेविका यशोदा मोहिते यांनी अतिरिक्त आयुक्त यांची भेट घेतली. त्यांना भागातील समस्या सांगितल्या. सुविधा न दिल्यास महापालिकेकडे कराचा भरणा करणार नाही, त्याच रक्कमेत सुविधा करून घेऊ असे असोसिएशनच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्तांना सांगितले. शिष्टमंडळाने स्थायी समिती सभापती आदिल फरास यांची भेट घेतली. ​शिष्टमंडळात असोसिएशनचे अध्यक्ष देशमुख, हरिभाई पटेल, किसन पटेल, जयंती पटेल आदींचा समावेश होता.

कचऱ्याची दुर्गंधी

राजाराम चौकातून राजकपूर पुतळ्याकडे जाणाऱ्या मार्गावर राजाराम चौकातील रस्त्यालगच लहान मुले उघड्यावर शौचास बसतात. कचरा टाकण्यासाठी येथे कोंडाळा आहे, पण कचरा उठाव नियमितपणे केला जात नाही. परिणामी कचरा रस्त्यावर पसरलेला असतो.

टिंबर मार्केट परिसरात रस्ते, गटर्सच्या उपलब्धतेसाठी साठ लाख रुपये निधी मिळावा अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे. गेल्या वर्षी २५ लाखाची तरतूद करूनही निधी मंजूर झाला नाही. गतवर्षीचे २५ लाख आणि यावर्षी ३५ लाख रुपयांचा एक​त्रित निधी मागितला आहे.

- यशोदा मोहिते, नगरसेविका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापुरात लवकरच टपाल खात्याचे ‘ATM’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

टपाल खात्याच्या बचत बँकांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या खातेदारांसाठी रेल्वे स्टेशन येथील मुख्य टपाल कार्यालयाच्या आवारात लवकरच एटीएम सेंटर सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठीची इमारतही बांधून पूर्ण झाली आहे. त्यामुळे टपाल खात्याच्या ग्राहकांना आता पैसे काढण्यासाठी रांगेत न उभारता एटीएममधून तत्काळ पैसे काढणे सोपे जाणार आहे.

खासगी बँकांकडून नागरिकांना सुविधा पुरविण्यात येत असल्यामुळे टपाल खात्याकडे असलेले खातेदार खासगी बँकांकडे वळू लागल्यामुळे टपाल खात्याच्या आर्थिक उलाढालीवर थेट परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे बँकांबरोबर स्पर्धा करण्याच्या अनुशंगाने टपाल खात्याने एटीएम सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरातील टपाल कार्यालयांना तसे आदेश देण्यात आले असून, त्यानुसार मुख्य टपाल कार्यालयाच्या परिसरातील जागेत एटीएम सुरू करण्यासाठी परिपूर्ण इमारत बांधून तयार ठेवण्यात आली आहे.

१६ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सुरक्षा

गळकी इमारत, रंगाचा झालेला बेरंग, जुन्या कौलारुच्या इमारती, ठिकठिकाणी लागलेल्या जाळ्या, असे काहीसे चित्र सोलापुरातील टपाल कार्यालयाचे होते. परंतु, टपाल खात्याने आता कात टाकली असून, कार्पोरेट लूक आला आहे. कार्यालयात १६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. टपाल कार्यालय कात टाकत असले तरी कामकाजासाठी पुरेशा कर्मचाऱ्यांची गरज असते. जवळपास ६० कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. तसेच एक मोटार बंद पडली आहे.

असा होईल उपयोग

एटीएम सेंटरचा वापर बचत खाते, रिकरिंग खाते, पीपीएफ आणि मुदत ठेवींच्या बचत योजनांसाठी खातेदारांना करता येणार आहे. या खात्यांमधील रक्कम एटीएम सेंटरमधून काढण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. अन्य खात्यांसाठी एटीएम सेंटरचा वापर करता येणार नाही. एटीएम सेंटर सुरू झाल्यानंतरच खातेदारांना एटीएम कार्ड देण्यात येणार असून, वरिष्ठ पातळीवरुन आदेश येताच त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सरकारने सुप्रीम कोर्टात जावे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

चंद्रभागा वाळवंटात राहुट्या टाकण्यास वारकरी संप्रदायाला मुंबई हायकोर्टाने मज्जाव केल्याच्या विरोधात वारकरी संप्रदायाने मंगळवारी आंदोलनाचे हत्यार उपसले. चैत्री एकादशीच्या दिवशीच प्रशासनाच्या विरोधात मोठा मोर्चा काढून वारकऱ्यांनी आंदोलनास सुरुवात केली. एकादशी दिवशी दिंड्या विविध ठिकाणांहून विठ्ठल मंदिराकडे येतात. मंगळवारी मात्र उलटे झाले, विठ्ठल मंदिरापासून निघालेल्या वारकऱ्यांच्या भव्य मोर्चाने थेट उपजिल्हाधिकारी कार्यालयावरच धडक मारली.

विठ्ठल मंदिराच्या पश्चिमद्वारापासून सुरू झालेल्या मोर्चात अनेक वारकरी नेते, फडकरी, दिंडीकरी सामील झाले होते. वर्षातून किमान १५ दिवस तरी वारकरी संप्रदायाला आपल्या शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या रूढी, परंपरा जतन करण्यासाठी वाळवंटात राहुट्या टाकण्यास परवानगी मिळावी आणि यासाठी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात वारकऱ्यांची बाजू मांडवी, अशी मागणी वारकऱ्यांची आहे. मुख्यमंत्र्यांना यापूर्वीच तसे निवेदन दिल्याचेही वारकरी नेत्यांनी सांगितले. मंगळवारी दुपारी दोन वाजता ४१ अंशसेल्शिअस तापमान होते. इतके कडक्याचे ऊन असतानाही हजारो वारकरी पश्चिम दरवाजाजवळ जमले होते. येथून हरिनामाचा गजर करीत हा मोर्चा चौफाळा, शिवाजी चौक, स्टेशन रोडमार्गे उपजिल्हाधिकारी कार्यालयावर पोचला. येथे काही काळ वारकऱ्यांनी भजने म्हणून हा परिसर दणाणून सोडला.

अशा आहेत मागण्या

आमच्या प्रथा परंपरा जपण्यासाठी आम्हाला वाळवंटात ऊन-पावसापासून संरक्षणासाठी राहुट्यांची गरज असते. आमच्या पालख्या आणि पादुकांना निवारा करणे गरजेचे असते. मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाऊन आमची बाजू योग्य रीतीने मांडावी. वर्षात किमान १५ दिवस तरी वाळवंटात राहुट्या बांधण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठरावाआधीच मंत्रालयवारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लाचखोरीच्या प्रकरणात सापडलेल्या महापौर तृप्ती माळवी यांचे नगरसेवक रद्द करावे यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनसुराज्य शक्ती पक्षाच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. महापालिका सभागृहाने महापौर माळवी यांच्यावर कारवाई करावी असा ठराव बहुमताने मंजूर केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या सरकारने भ्रष्टाचार मुक्तीचा नारा दिला आहे. भ्रष्टाचार प्रकरणी पोलिस कारवाई झालेल्या महापौर माळवी यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची कार्यवाही सरकारने करावी अशी मागणी नगरसेवकांनी केली. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक मुख्यमंत्र्यांना भेटले. दरम्यान, ठराव अद्याप महापौरांच्या कार्यालयात स्वाक्षरीच्या प्रतीक्षेत आहे.

शिष्टमंडळात पदाधिकारी आणि कारभारी महापौरांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस आघाडी प्रयत्नशील आहे. महापौरांनी राजीनाम्यास नकार दिल्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर प्रकियेतंर्गत कारवाई व्हावी याकरिता आघाडीने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिले. शिष्टमंडळात उपमहापौर मोहन गोंजारे, स्थायी समिती सभापती आदिल फरास, शिक्षण समिती सभापती संजय मोहिते, परिवहन समिती सभापती अजित पोवार, विरोधी पक्ष नेता मुरलीधर जाधव, सभागृह नेता चंद्रकांत घाटगे, गटनेते शारंगधर देशमुख, राजू लाटकर, सचिन चव्हाण, प्रा. जयंत पाटील आदींचा समावेश होता. मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात महापालिकेतील पदाधिकारी आणि कारभाऱ्यांचा समावेश होता.

ठराव अद्याप स्वाक्षरीसाठी महापौर कार्यालयातच

नैतिक अध:पतनच्या कारणाखाली महापौर माळवी यांचे नगरसेवक पद रद्द करावे आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी शिफारस करणारा सदस्य ठराव महापालिका सभागृहाने बहुमताने मंजूर केला आहे. सभागृहाने मंजूर केलेला सदस्य ठराव महापौर माळवी यांच्याकडे सहीसाठी पाठविण्यात आला आहे. महापौरांची सही झाल्यानंतर आयुक्त कार्यालयाकडे ठराव सादर होतो. त्यानंतर प्रशासनाकडून राज्य सरकारकडे शिफारस करणारा ठराव सादर केला जातो. दरम्यान सभागृहाने मंजूर केलेल्या सदस्य ठरावावर अद्याप महापौरांनी सही केली नाही.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील अनुपस्थित

काँग्रेसच्या नगरसेवकांनी गेल्या महिन्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली होती. पालकमंत्र्यांनी नगरसेवकांना मुंबईला येण्याचे व मुख्यमंत्र्याची भेट घडवून आणण्याची ग्वाही दिली होती. मात्र नगरसेवक मुख्यमंत्र्यांच्या भेटीस गेले त्यावेळी पालकमंत्री त्यांच्यासोबत गेले नाहीत. आमदार महादेवराव महाडिक समर्थक नगरसेवक महापौरांच्या पाठीशी आहेत. महापौरांनी राजीनामा देऊ नये याकरिता महाडिकांचे कारभारी पडद्याआड राहून सूत्रे हलवित आहेत. महाडिक आणि पालकमंत्री पाटील यांचे सख्य आहे. यामुळे मुख्यमंत्री भेटीवेळी पालकमंत्री गैरहजर राहिल्याची चर्चा नगरसेवकांत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फिरती स्वच्छतागृहे हवीतच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

महालक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर दर शुक्रवारी तहसील कार्यालयात आढावा बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे, मुख्याधिकारी तानाजी नरळे, पोलिस निरीक्षक रामदास इंगवले व यात्रा कमिटी अध्यक्ष रमेश रिंगणे उपस्थित होते. तहसीलदार हनुमंतराव पाटील अध्यक्षस्थानी होते.

बैठकीत महालक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी नरळे यांनी प्राणी संघटनांसह संबंधित सर्व घटकांना विश्वासात घेऊन शहरातील मोकाट कुत्री व भटक्या जनावरांचा बंदोबस्त करणार असल्याचे सांगितले. राजेंद्र तारळे यांनी त्यांना जंगल परिसरात सोडावे अशी सूचना केली.

तहसीलदार पाटील म्हणाले, 'यात्रेच्या निमित्ताने बळी देण्याची प्रथा असून मोठ्या संख्येने बोकडाची कत्तल होणार आहे. सरसकट प्राण्यांची तपासणी करणे व्यावहारीकदृष्ट्या शक्य नसल्याची जाणीव नागरिकांनी प्रशासनाला करून दिली. या सर्व प्रकारामध्ये नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही याची खबरदारी नागरिकांनी घेण्याची आहे. मात्र कत्तलखाना असलेल्या ठिकाणी आरोग्य निरीक्षकाच्या उपस्थितीत कत्तल व्हावी व प्रमाणित मटण मिळावे अशी सूचना जगदीश पाटील यांनी केली. त्याची अंमलबजावणी करण्याचे प्रशासनाने मान्य केले.

नगरपालिकेकडे काम करणारे स्थानिक कर्मचारी यात्रा कालावधीत सुटीवर असतील. त्यामुळे यात्रा कालावधीत नागरिकांची गैरसोय होऊ नये यादृष्टीने पालिका प्रशासनाने ठेका पध्दतीने बाहेरून मागविलेल्या नवीन कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. १५ एप्रिलपासून नवीन कर्मचारी हजर होणार असून शहरात एकूण सात बीट करण्यात आले आहेत अशी माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

शहरात सुमारे २७९ सार्वजनिक प्रसाधनगृहे उपलब्ध आहेत. मात्र भाविकांची गर्दी लक्षात घेता वैयक्तिक व सार्वजनिक प्रसाधनगृहांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे फिरत्या स्वच्छतागृहांची व्यवस्था करावी अशी सूचना नागरिकांतर्फे करण्यात आली.

वेस्टबॅग वाटप करणार

शहर आणि परिसरात कीटकांचा त्रास होऊ नये यासाठी औषध फवारणी तसेच कचऱ्याची विल्हेवाट योग्यरीतीने व्हावी यासाठी पालिकेमार्फत 'वेस्टबॅग' वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्याधिकारी नरळे यांनी दिली. यावेळी विजेचा अपव्यय टाळावा यासाठी यात्रा कालावधीत घराला लायटिंग करू नये असे आवाहन पालिकेमार्फत करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळा चुकवून पाहिला पन्हाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एकमेकांच्या घराशेजारी राहणारे ते दोघे मंगळवारी सकाळी शाळेला जायला बाहेर पडले. मुलग्याकडे दहा रुपये तर मुलीकडे १५ रुपये होते. दोघांनी शाळेत न जाता पन्हाळा किल्ला पहायचे ठरवले. शाळेच्या दप्तरासह ते रेल्वे स्टेशनजवळील बस स्थानकाजवळ गेले. अर्धे तिकीट काढून ते पन्हाळ्याकडे जाणाऱ्या बसमध्ये बसले. पन्हाळ्यावर या दोघांना पर्यटन सुरु केले, परंतु पन्हाळ्यावर आलेल्या एका अन्य सहलीतील शिक्षकांना ही मुले आपली नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांकरवी या मुलांच्या शाळेत माहिती कळवली.

पालकांनाही जेव्हा आपले मुले शाळेत नाहीत असे समजले तेव्हा त्यांच्याही काळजाचा ठोका चुकला. गेले काही दिवस शहरात बालके अपहरणाच्या घटना ऐकून हादरलेल्या या पालकांच्या मनात पाल चुकचुकली. परंतु मुले सुरक्षित असल्याचे समजले तेव्हा त्यांचा जीव भांड्यात पडला.

घटनेची हकीकत अशी की, शाहूपुरीतील एका गल्लीत सहावीत शिकणारा मुलगा आणि मुलगी शेजारी राहतात. शेजारच्या शाळेत ते शिकतात. मंगळवारी दोघांनी शाळा न पाहता पन्हाळा पाहायचे ठरवले. एसटीने त्यांनी पन्हाळा गाठला. पन्हाळ्यात एका शाळेची सहल आली होती. त्या सहलीत दोघे सहभागी झाले. सहलीसमवेत त्यांनी निम्मा गड पाहिला.

दरम्यान या सहलीतील शिक्षकाचे लक्ष या मुलांकडे गेले. त्यांनी दोघांकडे चौकशी केली, पण दोघेही काहीही बोलले नाहीत. शिक्षकांना अपहरणाची शंका आल्याने त्यांनी पन्हाळा पोलिसांशी संपर्क साधून त्यांना ताब्यात दिले. पोलिसांनाही त्यांनी काही सांगितले नाही. दप्तर तपासल्यावर दोघांच्या शाळेचा व पालकांचा पत्ता मिळाला. पोलिसांनी पालक व शाळेशी संपर्क साधून विद्यार्थ्यांची माहिती दिल्यावर शाळेत व पालकांत खळबळ उडाली. तोपर्यंत मुलांच्या अपहरणाची अफवा उठली.

या प्रकारामुळे संतप्त झालेल्या पालक व त्यांच्या नातेवाईकांनी शाळा प्रशासनाला धारेवर धरले. पन्हाळा पोलिसांनी दोघांना शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. अखेर पोलिस व पालकांनी मुलगा व मुलीला विश्वासात घेऊन माहिती घेतल्यावर अपहरण झाले नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सर्वांनी सुस्कारा सोडला. दरम्यान, शाळांमध्ये याबाबत अधिक दक्षता घेण्याची गरज आहे.

गैरहजर विद्यार्थ्यांबाबत संपर्क साधणे आवश्यक

अनेक शाळांमध्ये गैरहजर पालकांशी संपर्क साधून विद्यार्थी शाळेत का आला नाही याची कारणे विचारली जातात. पण अनेक शाळेत दुर्लक्ष केले जाते. शाळेतील वर्गशिक्षकांकडे विद्यार्थ्यांचे मोबाइल क्रमांक असतात. दरदिवशी एक किंवा दोन विद्यार्थी गैरहजर असतात. अपहरणाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शाळांनी गैरहजर विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर RTO कॅशलेसच्या दिशेने

$
0
0

उदयसिंग पाटील, कोल्हापूर

प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) येऊन शुल्क भरण्याची प्रक्रिया लवकरच बंद होणार आहे. त्याऐवजी एक जूनपासून बँकेचे चलन किंवा ई पेमेंटची पद्धत अवलंबण्यात येणार आहे. नव्या पद्धतीनुसार ३०० रुपयांपर्यंतचे शुल्क कार्यालयात रोखीने स्वीकारण्यात येणार आहे. उर्वरित शुल्क स्वीकारण्यासाठी बँक आणि इतर पर्यायांचा विचार सुरू आहे.

आरटीओ कार्यालयामध्ये शिकाउ परवान्यापासून विविध प्रकारच्या कामांसाठी शुल्क आकारले जाते. ते स्वीकारण्यासाठी स्वतंत्र विभाग आहे. वाहनांच्या रजिस्ट्रेशनवेळी टॅक्स भरण्याची आवश्यकता असल्याने ते शुल्क कंपन्यांचे डीलर भरतात. कोट्यवधी रुपयांचे शुल्क आरटीओ कार्यालयात जमा होत असते. त्याची सुरक्षितता, बनावट नोटांची काळजी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ठरावीक वेळेतच शुल्क भरून घेतले जात असल्याने लांबलचक रांगेत उभे राहण्याचा होणारा त्रास यामुळे शुल्क भरण्याची पद्धत त्रासदायक आहे. हा बोजा कमी करण्यासाठी परिवहन विभागाने रोख पैसे घेण्यापेक्षा ई पेमेंटवर भर द्यायला सुरुवात केली आहे. डीलरकडून जमा होणारे शुल्क ई पेमेंटमधून करण्याचे आदेश आरटीओ कार्यालयांना देण्यात आले आहेत.

राज्यातील अनेक कार्यालयांमध्ये अजूनही ई पेमेंट पद्धतीचा अवलंब केला जात नाही. सध्या पहिल्या टप्प्यात एकूण महसुलापैकी किमान ४५ टक्के तरी महसूल ई पेमेंटद्वारे व्हावा, असे आदेश देण्यात आले आहेत. कोल्हापुरात गव्हर्न्मेंट रिसीट अकाउंटिंग सिस्टमचा (ग्रास) अवलंब यापूर्वी केला असल्याने जवळपास ५० टक्के महसूल ई पेमेंट पद्धतीने जमा झालेला आहे.

राष्ट्रीयीकृत बँकेशी सहयोग

ई पेमेंटद्वारे शुल्साक वसुलीसाठी राष्ट्रीयीकृत बँकेसोबत चर्चा सुरू आहे. त्यासाठी तिथे काही स्वतंत्र यंत्रणा उभी करता येईल का याची चर्चा सुरू आहे. आरटीओमध्ये कॅशलेस कामकाज सुरू झाल्यानंतर तेथील गर्दीचे प्रमाणही कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीनेही ते फायदेशीर होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images