Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

आयुर्वेद लोकाभुमिख चिकित्सा व्हावी

$
0
0

राष्ट्रीय परिषदेत डॉ. विश्वजीत कदम यांची अपेक्षा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'प्राचीन भारतात आयुर्वेदाला अनन्यसाधारण महत्त्व होते. आयुर्वेदातील संशोधनामुळे अनेक जर्जर रोगांचे समूळ उच्चाटन होत आहे. यामुळे आयुर्वेद काळाजी गरज असून ती अधिकाधिक लोकाभिमुख चिकित्सा व्हावी,' अशी अपेक्षा डॉ. विश्वजीत कदम यांनी व्यक्त केली. व्ही. टी. पाटील सभागृहात महाआयुर्वेद रिसर्च अँड मेडिकल असोसिशन (मर्म) च्यावतीने आयोजित 'वमन' या राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. रामदारस कुटे होते.

'मर्म'चे प्रमुख डॉ. अजित राजिगरे यांनी आयुर्वेदाच्या उन्नतीसाठी संस्था कटीबद्ध असून यापुढेही संस्थेमार्फत विविध लोकविधायक व आरोग्य विषयक उपक्रम राबवण्याची ग्वाही दिली. परिषदेत डॉ. प्रियदर्शनी कडूस, डॉ. रामदास कुटे, डॉ. विजयकुमार दंडवतीमठ, डॉ. अनिल पानसे, डॉ. सुविनय दामले यांनी वैद्य व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

परिषेदस जिल्हा परिषदचे शिक्षण सभापती अभिजीत तायशेटे, डॉ. अरविंद कडूस, अंजनाताई रेडेकर, डॉ. सचिन गणेशवाडी, डॉ. मल्हार कुलकर्णी, डॉ. रणजीत पाटील, डॉ. सिद्धनाथ कदम, डॉ. अश्विनी माळकर, डॉ. अंकुश संघवी, डॉ. प्रशांत चौगुले, डॉ. प्रशांत चव्हाण, डॉ. अर्चना कांदेकर, डॉ. प्राजक्ता गणेशवाडी आदी उपस्थित होते. अमृता लुकतुके, डॉ. प्रसाद गोखले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. पराग कुलकुर्णी, डॉ. प्रसाद सणगर यांनी आभार मानले.


‘घास चिऊचा’ प्रदर्शनाला प्रारंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आसपास चिमण्यांचा चिवचिवाट सुरू असल्याचा आभासी आवाज, चिमण्या वाचवा असा कुठेही शाब्दीक संदेशफलक न लावता कागदाच्या लगद्यापासून बनवण्यात आलेल्या दीड हजार चिमण्यांची कलात्मक सजावट आणि या वातावरणात मांडण्यात आलेल्या कल्पक चित्रशिल्पकलाकृती पाहण्यात रसिक रमून गेले. कलामंदिर महाविद्यालयाच्या २१ वार्षिक चित्रप्रदर्शनाच्या निमित्ताने 'घास चिऊचा' या संकल्पनेवर बेतलेल्या प्रदर्शनाला शनिवारपासून सुरूवात झाली.

पापाची तिकटी येथील कलामंदिर महाविद्यालय येथे चार मार्चपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. उदघाटनप्रसंगी बोलताना माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, 'आजच्या तांत्रिक युगात कलेचे महत्व कमी झालेले नाही. त्यामुळे कलानिर्मितीचा आनंद कोणत्याही तांत्रिक गोष्टीतून मिळणार नाही.' अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष माजी महापौर मारूतराव कातवरे होते. प्राचार्य दयानंद माळी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. योगेश मोरे यांनी आभार मानले.

या प्रदर्शनात १०० पेंटिंग्ज आणि ५० शिल्पाकृती मांडण्यात आल्या आहेत. यावर्षीच्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनात प्रथम पारितोषिक मिळवलेल्या रवींद्र लोहार यांचे व्यक्तिशिल्प आणि राजा मोहिते यांचे मेटलमधील शिल्प लक्षवेधी आहे. फायबर, मेटल, दगड, प्लास्टर या माध्यमातील अतिशय कल्पक कलाकृती प्रदर्शनाचे आकर्षण आहेत.

अवकाळी पावसाचा धुमाकूळ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यात सर्वत्र पहाटेपासून सुरु झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले. गहू, हरभरा, ज्वारी या उभ्या पिकांना फटका बसलाच शिवाय पालेभाज्या, आंबा, स्ट्रॉबेरी आदींनाही मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले.

गडहिंग्लजला आठवडी बाजार ओस

गडहिंग्लज ः अचानक आलेल्या पावसाने रविवारी गडहिंग्लजकरांची भंबेरी उडाली. अवकाळी पावसाचा परिणाम आजच्या आठवडी बाजारावर दिसून आला. दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. दिवसभर असलेल्या ढगाळ वातावरणामुळे हवामानात बदल झाला आहे. काजू, आंबा यांचा मोहर गळाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. वीट उत्पादक, शेतकरी, फिरते विक्रेते व छोटे व्यावसायिकांसह नागरिकांची तारांबळ उडाली. प्लास्टिक कागद व ताडपत्री खरेदीसाठी गर्दी झाली.

महालक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरात काही रस्त्यांचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र अचानक आलेल्या पावसाने या परिसरात चिखल झाला. दिवसभर अधूनमधून वीजपुरवठा खंडित होत होता.

चंदगडला कडधान्यांचे नुकसान

तालुक्यात पहाटे चार वाजल्यापासून सुरु झालेल्या अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. सुमारे दीड तास मुसळधार पाऊस झाला. हा पाऊस जनावारांची वैरण व कडधान्यासाठी नुकसानकारक असला तरी काजूसाठी उपयुक्त ठरला आहे.

रात्रीच्या वेळी पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांची शेतात ठेवलेल्या गवताच्या गंजा भिजल्याने वैरणीचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेले काही दिवस दाट धुके पडत असल्यामुळे काजूचा प्रथम आलेला मोहर अर्धा जळाला आहे. मात्र हा पाऊस झाल्याने जळालेला मोहर पावसाच्या पाण्यामुळे झडून पडला आहे. त्या ठिकाणी नवीन मोहर येणार असल्याने उत्पन्नात वाढ होणार आहे. काजूसाठी हा पाऊस उपयुक्त ठरला आहे.

राधानगरीत वीज गायब

राधानगरी ः तालुक्यात मध्यरात्रीपासून जोरदार अवकाळी पाऊस झाला. यामुळे रब्बी पिके धोक्यात येण्याची शक्यता वाढल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. जोरदार वादळी पावसाने काही ठिकाणी झाडांच्या फांद्या वीज वाहिनीवर तुटून पडल्याने परिसरातील वीज पुरवठा शनिवार रात्रीपासून रविवारी दिवसभरात बंदच होता. यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले असून स्थानिक आठवडा बाजारावरही याचा परिमाण दिसला. राधानगरी,दाजीपूर,सरवडे,परिसरात पावसाच्या हलक्याशा सरी कोसळल्या. मात्र मध्यरात्री एक वाजल्यानंतर तालुक्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडला.या पावसाने रब्बी हंगामातील गव्हाचे पिक पूर्णतः वाया जाण्याबरोबर ऊस तोड थांबल्याने यंदाचा हंगाम लांबण्याची शक्यता वाढलेली आहे. शेतकऱ्यांनी जनावरांसाठी एकत्रित केलेला वाळला चारा व जळण यामुळे भिजून गेले.

भुदरगडला अवकाळीने झोडपले

गारगोटीः शनिवारी रात्री आणि रविवारी दिवसभर पडलेल्या अवकाळी पावसाने चांगलाच धिंगाणा घातला. हिवाळा संपून उन्हाळा सुरू होत असताना पडलेल्या अवकाळी पावसाने रात्रीपासून भुदरगडवासियांना अक्षरश: झोडपून काढले. पाटगाव, कडगाव, वेंगरूळ आदी गावांच्या ठिकाणांना पावसाने झोडपून काढले.

पन्हाळ गड पर्यटकांनी बहरला

ऐन उन्हाळ्यात पावसाळ्यातील वातावरण झाल्याने निसर्ग सौंदर्य न्याहाळण्यासाठी पर्यटकांनी पन्हाळगडावर हजेरी लावली आहे. पावसाच्या हलक्या सरी, गार वारे, दाट धुके आणि मध्येच ऊन अशा वातावरणात पन्हाळगड पर्यटकांनी बहरला आहे. तटबंदीवरून येणारी गार वाऱ्याची झुळुक अंगावर घेत पर्यटक गडावरून दरी-खोऱ्यातील सौंदर्याचा आस्वाद घेत आहेत.

शाहूवाडीत स्ट्रॉबेरीला फटका

शाहूवाडीः तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पालेभाज्यांसह पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आंबा, पावनखिंड, विशाळगड व कोकणात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांचा तर पावसामुळे पूर्ण हिरमोड झाला. पावसाबरोबर हवेत मोठा गारठा राहिल्याने त्याचा जनजीवनावर परिणाम झाला. शनिवारी रात्रीपासून तालुक्याच्या मलकापूर, बांबवडे, आंबा, परळे निनाई, शित्तूर वारुण, विशाळगड, येळवण जुगाई या भागात पाऊस पडत आहे. रविवारी दिवसभर पावसाची संततधार पडत असल्याने स्ट्रोबेरीची फळे फुटण्यास व किडण्यास सुरुवात झाली आहे. मका, कोबी, फ्लॉवर, केळी, पपई, टोमाटो, कलिंगड, वाटाणा, वरणा, मिरची, गहू या साऱ्या पिकांसह पोकळा, मेथी, पालक, मुळा, कोथींबीर या पालेभाज्यांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. आंब्याला आलेला मोहर पूर्णपणे गळून पडल्याने आंबा लागवड केलेला शेतकरी चिंतातूर झाला आहे. या पावसामुळे उसाची चिपाडे भिजून पूर्ण ओली झाली आहेत. तर ऊस क्षेत्रात पाणी साचल्याने येथून ऊस वाहतूक करणे जिकीरीचे असल्याने गुऱ्हाळमालकांना गुऱ्हाळघरेही बंद करण्याशिवाय पर्याय उरला नाही. धोपेश्वर - धनगरवाडी, गिरगाव या भागातून होत असलेली बॉक्साईटची वाहतूक निसरड्या रस्त्यांमुळे ठप्प झाली.

दोन बैलगाड्यांना धडक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

कंटेनर ट्रकने ऊस वाहतूक करणाऱ्या दोन बैलगाड्यांना ठोकरले. अपघातात गाडीवानांसह दोन बैल जखमी झाले. पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कागल येथील लक्ष्मी टेकडीजवळ रविवारी सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघाताची नोंद कागल पोलिसांत बैलगाडीवान सुभाष रघुनाथ पाटील (रा.कणेरी) यांच्याकडून करण्यात आली आहे. कंटेनर तिथेच सोडून चालकाने पलायन केले.

कागलच्या शाहू साखर कारखान्यासाठी कणेरीवाडी (ता. करवीर) येथील उसाची तीन बैलगाड्यातून वाहतूक केली जात होती. सुभाष रघुनाथ पाटील, श्रीकांत शिवाजी पाटील व सुधाकर शामराव यादव हे तीन बैलगाड्या भरुन ऊस नेत होते. बैलगाड्या हायवेवर लक्ष्मी टेकडीजवळ गाड्या आल्या असता, कंटेनरच्या चालकाचा ताबा सुटून ट्रक गाडीला जाऊन ठोकरला. या अपघातात गाडीवान श्रीकांत जखमी झाला. दोन बैलगाड्यांचे दोन बैलही जखमी झाले आहेत.





बाइक रॅली नोंदणीला वाढता प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जागतिक महिला दिनाच्या औचित्याने 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे आयोजित करण्यात आलेल्या विमेन बाइक रॅलीत सहभागी होण्यासाठी महिलांचा उत्साह वाढत आहे. कॉलनी, अपार्टमेंट, सोसायटीतील महिलांसोबत कार्यालयीन ग्रुप, भिशी मेंबर, मुलांच्या पालकांचे ग्रुप एकत्र येऊन या महिला बाइक रॅलीत सहभागी होणार आहेत. 'मटा'च्या नागाळा पार्क येथील कार्यालयात नाव नोंदणी करण्यासाठी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद वाढत असून नोकरदार महिला, कॉलेज तरूणी आणि गृहिणींमध्ये आता फक्त या रॅलीचीच चर्चा सुरू आहे.

आपल्या आवडत्या बाइकसोबत महिला दिन साजरा करण्याची संधी महाराष्ट्र टाइम्सने उपलब्ध करून दिली आहे. 'मटा'च्या वतीने कोल्हापुरात याआधी आयोजित केलेल्या विविध उपक्रमांना जोरदार प्रतिसाद मिळाला. तसाच प्रतिसाद 'महाराष्ट्र टाइम्स वुमन्स बाइक रॅली'लाही मिळत आहे. जागतिक महिलादिनी रविवारी (८ मार्च) महिला बाइक रॅलीच्या माध्यमातून महिला शक्ती आणि एकजुटीचे अनोखे दर्शन कोल्हापूरकरांना होणार आहे. अनेक महिला या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उत्सुक आहेत. रविवारी सकाळी आठ वाजता गांधी मैदान येथून रॅलीला सुरूवात होणार असून राजाराम कॉलेजच्या मैदानावर सांगता होणार आहे. या निमित्ताने महिलांच्या एकजुटीचे दर्शन आणि त्यांच्यातील स्वावलंबनासह आत्मविश्वासाला सलाम करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कर्तृत्वाचे पंख लेवून विविध क्षेत्रांत गगनभरारी घेणाऱ्या महिला शक्तीच्या सन्मानार्थ होणाऱ्या 'महाराष्ट्र टाइम्स' महिला बाइक रॅलीविषयी शहरात प्रचंड उत्सुकता आहे. रॅलीमध्ये शहर आणि परिसरातील विविध कॉलेजच्या विद्यार्थिनी, युवती व महिला संघटना, नोकरी, व्यवसायात कार्यरत असलेल्या महिलाही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आहेत. कॉलेजमधील एनएसएस व एनसीसीमधील विद्यार्थिनी कँडेट्स युनिटच्या वेशभूषेत रॅलीत सहभागी होणार आहेत. महिला शक्तीचा गजर करत रॅली मार्गस्थ होईल. कोल्हापुरात दुचाकी चालविणाऱ्या पहिल्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या, पण तरीही वेळ पडली तर अजूनही बाइक काढू शकणाऱ्या यंग सीनिअर महिलावर्गालाही सलाम करण्यासाठी महिला बाइक रॅलीचे व्यासपीठ 'मटा'तर्फे देण्यात आले आहे.

नाव नोंदणीसाठी

रॅलीत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी ''BikerallyKHP'' टाइप करून हा मेसेज 58888 या नंबरवर पाठवावा किंवा womenbikerally.mtonline.in लॉग ऑन करा.

स्वखर्चाने सीसीटीव्ही कॅमेरे

$
0
0

म. टा. प्र​तिनिधी, कोल्हापूर

शाळा आ​​णि कॉलेजच्या परिसरातील गैरप्रकारांना चाप लावण्यासाठी आणि गांधी मैदानातील मद्यपींचा वावर थांबविण्यासाठी नगरसेवक रविकिरण इंगवले यांनी फिरंगाई प्रभागातील महाराष्ट्र हायस्कूल, न्यू कॉलेज, स. म. लोहिया हायस्कूल आणि रा. ना. सामाणी विद्यालय परिसरात स्वखर्चाने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या पंधरा दिवसांत एकूण १३ कॅमेरे बसविले जाणार आहेत.

फिरंगाई परिसरात शाळा आणि कॉलेजच्या वेळेत शिक्षणाशी संबंध नसलेल्यांचा या वावर वाढला आहे. मुलींचे छेड काढण्याचे प्रकार घडतात. शाळा आणि कॉलेज मार्गावरून मुली ये-जा करताना अश्लिल कॉमेंटस केली जातात. अशा गैरप्रकारामुळे मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुलींना त्रास देणाऱ्या प्रवृत्तींना चाप बसावा, विद्यार्थिनींमध्ये सुरक्षिततेची भावना वाढीस लागावी याकरिता कॅम्पसबाहेरील मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची यंत्रणा बसविली जाणार आहे.

मुलींना त्रास देणारी मंडळी कॅमेऱ्यात बंदिस्त होतील. त्या माध्यमातून पोलिस प्रशासनला अशा आगाऊ मंडळीवर कारवाई करणे सोपे जाणार आहे. कॅमेरा आणि कॉलेज व पोलिस प्रशासनाच्या कारवाईच्या भितीपोटी गैरप्रकार करणाऱ्यांवर वचक बसणार आहे. शिक्षणाशी संबंधित नसणाऱ्या अनेक मुली तोंडावर रूमाल बांधून फिरत असतात. यासंदर्भातही मुलींचे प्रबोधन केले जाणार आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक मनोजकुमार शर्मा यांच्या हस्ते सीसीटीव्ही कॅमेरा यंत्रणेचे उदघाटन होणार आहे. सीसीटीव्हीतून परिसरातील गैरप्रकारांवर आळा घालण्यात येणार आहे.

पत्रकार परिषदेला हंबीरराव चव्हाण, दिलीप नरके, विकी महाडिक, योगेश मोहिते, राहूल इंगवले, कैलास साळोखे आदी उपस्थित होते.

मद्यपींवर 'वॉच'

गांधी मैदानाच्या विकासासाठी ​निधी आणला. चांगले खेळाडू घडावेत यासाठी सुविधा पुरविण्यात येणार आहेत. पण गांधी मैदानात सायंकाळनंतर मद्यपींचा वावर वाढत आहे. मद्यपींवर वॉच ठेवण्यासाठी गांधी मैदानाच्या प्रवेशव्दारासमोर कॅमेरा बसविला जाणार आहे.

भाजपचा आनंदोत्सव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

देशाच्या इतिहासात प्रथमच जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार स्थापन झाल्याबद्दल रविवारी सकाळी बिंदू चौकात भारतीय जनता पार्टीच्यावतीने आनंदोत्सव साजरा केला. फटाक्यांची आतषबाजी करण्याबरोबरच पेढे व साखर वाटून आनंद साजरा केला.

भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य रामभाऊ चव्हाण यांच्या हस्ते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तर नगरसेवक आर. डी. पाटील यांनी मुखर्जी यांच्या बलिदानाच्या महत्वाचे विवेचन केले.

जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी जम्मू काश्मीरमध्ये भाजपचे सरकार स्थापन होणे हा पक्षाच्या इतिहासातील सुवर्णक्षण आहे. भारतीय जनसंघाचे संस्थापक मुखर्जी, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्यासारख्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी देशाच्या अखंडत्वासाठी जीवन समर्पित केले होते. पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आयुष्यातील जास्तीत जास्त वेळ पक्ष व देशासाठी द्यावा असे आवाहन केले. भाजपचे जिल्हा चिटणीस हेमंत आराध्ये यांनी सूत्रसंचालन केले.

या कार्यक्रमास अॅड. संपतराव पवार, सुरेश जरग, अनिल काटकर, संदिप देसाई, गणेश देसाई, डॉ. इंद्रजीत काटकर, अशोक लोहार, दिग्वीजय कालेकर, गोविंद पांड्या, भारती जोशी, सोनाली माने, ​कविता पाटील, किरण कुलकर्णी आदी उपस्थित होते.

पाऊस आला; पाणी गायब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या तिन्ही पाणी उपसा केंद्रातील वीजपुरवठा खंडित झाल्याने मध्यरात्रीपासून पाणी उपसा करण्यात अडचआधीच पाइपलाइन गळतीमुळे विस्कळित झालेल्या शिंगणापूर योजनेच्या पाणीपुरठ्याला शनिवारी मध्यरात्रीपासून कोसळलेल्या अवकाळी पावसाचा फटका बसला. वीजपुरवठा खंडित झाल्याने रविवारी शहरातील पाणी पुरवठा कोलमडला. णी आल्या. त्यामुळे रविवारी शहरातील बहुतांश भागाला पाणी पुरवठा होऊ शकला नाही.

काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा आले. दुपारी बारा वाजल्यानंतर वीज पुरवठा सुरू झाल्याने पाणी उपसा करण्यात आला. मात्र, तो कमी पडल्याने सोमवारीही शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा

होण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने शहरातील विविध भागांमध्ये टँकरने पाणी देण्यात आला.

शिंगणापूर, बालिंग आणि नागदेववाडी पपिंग स्टेशनमधून पाणी उपसा करून शहराला पाणी पुरवठा केला जातो. शिंगणापूर योजनेवरून ई वॉर्ड व बी वॉर्डचा काही भाग, तर बालिंगा व नागदेवावाडी पंपिग स्टेशन येथून सी व डी वॉर्डला पाणी पुरवठा होतो. रविवारी रात्री पावसाला सुरूवात झाल्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाल्यानंतर या तीनही पंपिग स्टेशन येथील पाणी

उपसा ठप्प झाला. पाऊस आणि विद्युत पुरवठ्याची पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे तीनही पंपिग स्टेशन येथील पाणी उपसा होऊ शकले नाही. परिणामी रविवारी सकाळपासूनच शहरातील विविध भागांना पाणी पुरवठा होऊ शकला नाही. बालिंगा आणि नागदेववाडी पंपिंग स्टेशन येथे रविवारी दुपारी १२ वाजल्यानंतर विद्युत पुरवठा सुरळीत झाल्याने त्यानंतर पाणी​ उपसा सुरू झाला. शिंगणापूर पंपिंग स्टेशन येथे दुपारी तीननंतर पाणी उपसा सुरू केला. सायंकाळनंतर अनेक भागात कमी दाबाने पाणी पुरवठा झाला.

गळतीची दुरुस्ती रखडली

शिंगणापूर येथील पाणी पुरवठा पाइपलाइनला गळती लागली आहे. रविवारपासून गळती काढण्याचे काम हाती घेण्यात येणार होते. मात्र अवकाळी पाऊस, खंडीत झालेला विद्युत पुरवठा परिणामी शहराच्या पाणी पुरवठा यंत्रणेवर पडलेला दाब यामुळे पाइपलाइनची गळती काढण्याचे काम पुढे ढकलण्यात आल्याची माहिती उप जल अभियंता प्रभाकर गायकवाड यांनी दिली.


‘रब्बी’ला दणका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शनिवारी रात्रीपासून अवकाळी पावसाने दिलेल्या दणक्यामुळे जिल्ह्यात हजारो हेक्टरवरील रब्बी हंगामाला मोठा फटका बसला आहे. ज्वारी, हरभरा, गहू पिकांबरोबर काजू, आंबा या सारख्या फळांचे मोठे नुकसान झाले आहे. आंब्याचा मोहोरही झडल्याने यंदा आंबा उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती आहे. शेवटच्या टप्प्यात हंगाम आलेल्या गुऱ्हाळघरे, साखर कारखान्यांनाही पावसामुळे धावाधाव करावी लागली.

दरम्यान, रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात ११.४४ मिलीमीटर सरासरी पाऊस झाल्याची नोंद आहे. त्यामध्येही चंदगड,गगनबावडा, कागल, पन्हाळा या तालुक्यांमध्ये १३ ते २० मिलीमीटर पावसाची नोंद आहे. शनिवारपासून वातावरण अचानक बदलले. रविवारी पहाटेपासून ना वीज, ना ढगांचा गडगडाट करत अवकाळी पावसाची सुरुवात झाली आणि वीजपुरवठाही बंद झाला. दिवसभराच्या पावसामुळे हवेत गारवा पसरल्याने शहरातील रस्त्यांवरील बहुतांश वर्दळ कमी झाली होती. दिवसभराच्या पावसाने शहरात ठिकठिकाणी पाणी साचले होते. शहरात अनेक ठिकाणी रस्ते दुरुस्ती आणि नव्याने डांबरीकरणाची कामे आहेत. सोमवारीही पाऊस सुरू राहिल्यास जवळपास आठवडाभर ही कामे बंद राहण्याची शक्यता आहे.

गुऱ्हाळघरांनाही मोठा फटका बसला आहे. पावसामुळे साखर कारखाने व गुऱ्हाळ घरांना लागणाऱ्या ऊस तोडणीवर परिणाम झाला. फक्त करवीर तालुक्यातील जवळपास ३५ गुऱ्हाळ घरांना फटका बसला आहे. हा पाऊस आणखी लांबला तर गुऱ्हाळ घरे बंद करावी लागण्याची शक्यता आहे. तर कारखान्यांनाही कमी प्रमाणात ऊस मिळेल. पावसामुळे कोकण व कोल्हापुरातील आंब्याचा मोहोर पूर्णपणे झडून गेला आहे. जिल्हा कृषी अधिकारी मोहन आटोळे यांनी सर्व तालुक्यात पाऊस झाला आहे. त्यामुळे स्थानिक अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्यास सांगितले असून २४ तासामध्ये त्यांचे अहवाल येण्याची शक्यता आहे, असे सांगितले. हा पाऊस आणखी दोन ते तीन दिवस लांबला तर रब्बीची पिके पूर्णपणे हातातून जाण्याचा धोका आहे. या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे कृषी विभागाच्या वतीने प्रत्येक तालुक्यात पंचनामे सुरू करण्यात येणार आहेत. दरम्यान, आजही (सोमवारी) पाऊस पडण्याची शक्यता मुंबई वेधशाळेने वर्तवली आहे.

द्राक्ष बागा, बेदाण्याला फटका

कुपवाड : सांगली जिल्ह्यात रविवारी पहाटेपासून सर्वत्र अवकाळी पावसाने थैमान घातले. सोसाट्याच्या वाऱ्याने अनेक ठिकाणी द्राक्ष बागा कोसळल्या आहेत. निर्यातक्षम द्राक्षे आणि बेदाणा उत्पादनाला जबरदस्त फटका बसणार आहे. रब्बीची उभी गहू, हरभरा, शाळू, करडई, आदी पिके धोक्यात आली.

पाणीच पाणी; पण डोळ्यांत

सोलापूर : सोलापूर परिसरात शनिवारी दुपारपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने बागायतदारांचे कंबरडे मोडले आहे. केळी, द्राक्ष, डाळींब बागांना सर्वाधिक फटका बसला आहे. तर ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनाही अवकाळी पाऊस मारक ठरला आहे. पावसाने बागायतदारांच्या डोळ्यांत पाणी आणले आहे.

ऊस, हळद, गहू यांचे नुकसान

सातारा : सातारा जिल्ह्यात शनिवारी सायंकाळपासूनच जोर धरलेल्या अवकाळी पावसाने जनजीवन विस्कळित झाले. जिल्ह्यातील दुष्काळी भागात खंडाळा, कोरेगाव, फलटण, खटाव, माणमध्येही पाऊस झाला. कराड शहर व परिसरात ऊस, हळद या बागायती पिकांसह ज्वारी, गहू, हरभरा, खपली, कांदा व लसूण ही रब्बी पिके घेणारा शेतकरी पुरता अडचणीत सापडला आहे.

बागायतदारांचे कंबरडे मोडले

पंढरपूर : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. हाताशी आलेल्या फळबागांची नासाडी झाली आहे. द्राक्षे, डाळिंब, केळींसह बेदाणा शेडवर टाकलेली द्राक्षे भिजल्यामुळे बेदाण्याला मातीमोल किंमत येणार आहे.

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची प्राथमिक माहिती गोळा करण्याचे काम सुरू असून प्रत्येक विभागातून तपशीलवार माहिती जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

- विकास देशमुख, कृषी आयुक्त

दक्षिण महाराष्ट्राला ७७ कोटी

$
0
0

उदयसिंग पाटील, कोल्हापूर

रेल्वे बजेटमध्ये पुण्यापासून कोल्हापूर परिसरापर्यंत दोन मोठे प्रकल्प दिले असले तरी भुयारी मार्ग, रेल्वे मार्गांचे नुतनीकरण तसेच पायाभूत सुविधेसाठीही जवळपास ७७ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली आहे. पुणे ते कोल्हापूर दरम्यानच्या ३२८ किलोमीटरपैकी १३९ किलोमीटर रेल्वे मार्गाचे नुतनीकरण केले जाणार आहे. यासाठी तब्बल ५३ कोटी ५१ लाखाची तरतूद केली आहे. मात्र कोल्हापूर ते राजापूर व कोल्हापूर ते वैभववाडी या दोन्ही मार्गांच्या मंजुरीचा प्रवास अधिकच खडतर झाला आहे. मात्र, वि‌िवध विकासकामांसाठी रेल्वे बजेटमध्ये झालेल्या तरतुदीमुळे पुण्यापर्यंतच्या मार्गावरील रेल्वेची गती वाढणार आहे.

कोल्हापूर व कोकण रेल्वे जोडले गेल्यास कोकणच्या प्रगतीबरोबर कोल्हापूरचीही प्रगतीला चालना मिळणार आहे. त्यादृष्टीने वेळोवेळी झालेल्या सर्व्हेमुळे कोल्हापूर कधी ना कधी जोडले जाईल, अशी आशा होती. त्यासाठी सातत्याने विविध संघटना, पक्ष, व्यापारी संघटना, समाजांकडून मागणी केली जात होती. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू झाल्यानंतर राजापूरबाबत ते खास विचार करतील, अशी दाट शक्यता होती. जिल्ह्याचे ठिकाण, मोठे उद्योग, तीन एमआयडीसी, साखर कारखान्यांचे जाळे या साऱ्यांमुळे मंत्री त्याचाच निर्णय घेतील अशी लोकप्रतिनिधींपासून रेल्वेतील अधिकाऱ्यांची आशा होती. प्रत्यक्षात बजेटमध्ये कराड मार्गासाठी १२०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले. गोवा, कर्नाटक व तळकोकणच्या भागासाठी कोल्हापूर जिल्हा जवळपास मध्यवर्ती ठरू शकतो. तरीही केवळ राज्य सरकारच्यावतीने कराड मार्गासाठी निम्म्या खर्चाची जबाबदारी उचलली असल्याने रेल्वेमंत्र्यांनी या मार्गाला झुकते माप दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे पुन्हा कोल्हापूर थेट कोकणला जोडण्यासाठी राज्य सरकारपासून केंद्र सरकारपर्यंत मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागणार असल्याने संघर्ष संपलेला नाही.

एखाद्या नवीन मार्गामुळे तिथे होणाऱ्या व्यवसायातून रेल्वेला किती परतावा म्हणजे रेट ऑफ रिटर्न (आरओआर) मिळतो याचा अभ्यास केला जातो. ज्यावेळी निगेटिव्ह टक्केवारीमध्ये हा अभ्यास असतो, त्यावेळी त्या प्रकल्पाबाबत रेल्वे प्रशासन राजी नसते, असे सूत्रांचे मत आहे. त्यादृष्टीने पाहिले तर कराड ते चिपळूण या मार्गाला राज्य सरकारने पन्नास टक्के निधी देण्याची जबाबदारी घेऊनही त्याचा आरओआर -३.१७ टक्के इतका आहे. राजापूरच्या मार्गाचा मात्र राज्याच्या मदतीशिवाय +४.२८ टक्के आहे. राजापूर प्रकल्पासाठी ३१६८ कोटींचा खर्च अपेक्षित होता. तर कराडसाठी ९२८ कोटीचा खर्च प्रस्तावित केला होता. फक्त कमी खर्च व राज्याची मदत हेच कराड मार्गासाठी सहाय्यभूत ठरले असल्याचे समजते.

कोकणला कोल्हापूर जोडण्याबाबत सातत्याने मागणी करणाऱ्या शिवनाथ बियाणी यांनीही कराडचा मार्ग मंजूर करण्यासाठी तिथे काय इंडस्ट्रिज आहे की जिल्ह्याचे ठिकाण आहे? असा सवाल उपस्थित केला आहे. कोल्हापूर हे कर्नाटक, गोवा व कोकणसाठी मध्यवर्ती ठरत असल्याने कोकण रेल्वेला कोल्हापूर जोडले गेल्यास या सर्व भागांना फायदा होऊ शकतो. त्याचा अजूनही राज्य सरकारने विचार करण्याची गरज आहे, असेही बियाणी यांनी सांगितले.

भविकाकडून विठ्ठलपूजा

$
0
0

दर्शन रांगेतील दाम्पत्याला रोज मिळणार मान

मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

विठ्ठल दर्शनाच्या ओढीने पंढरपूर गाठणाऱ्या भाविकांना आता त्याच्या चरणी माथा टेकण्याबरोबरच रोजच्या पूजाअर्चनेचा मानही मिळणार आहे. मंदिर समितीने विठ्ठलाची रोज होणारी पूजा दर्शन रांगेतील पहिल्या भाविक दाम्पत्याच्या हस्ते करण्याचा निर्णय रविवारी घेतला आहे. मंदिर समितीच्या या निर्णयामुळे आता सर्वसामान्य भाविकाला देवाची नित्यपूजा करता येणार आहे. येत्या पाच मार्चपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

विठ्ठलमूर्तीची झीज रोखण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून देवाची महापूजा बंद झाली होती. शिवाय सामान्य भाविकाला देवाची महापूजा करण्याची इच्छा स्वप्नच ठरली होती. मात्र, आता दर्शन रांगेत असणाऱ्या पहिल्या भाविक दाम्पत्याला रोज होणारी नित्यपूजा करता येणार आहे. देवाची पूजा करता यावी, चरण स्पर्श करता यावा, अशी वारकऱ्यांची भावना असते. त्यामुळे मंदिर समितीच्या या निर्णयामुळे वारकरी संप्रदायात आनंदाचे वातावरण आहे.

यापूर्वी ही नित्यपूजा बडवे समजाकडून केली जात होती. यानंतर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मंदिर समितीचे कर्मचारी ही पूजा करीत होते. आषाढी आणि कार्तिकी यात्रेच्या सरकारी महापूजेत यापूर्वी वारकरी दाम्पत्याला पूजेत सहभागी होण्याचा मान मिळत होता. मात्र, आता समितीच्या निर्णयामुळे दररोजच एका वारकरी दाम्पत्याला विठ्ठल पूजेचा करण्याचा मान मिळणार आहे.

देणगी योजनेला प्रतिसाद नाही

विठ्ठलाच्या नित्यपूजेसाठी ५१ हजार रुपये देणगी देणाऱ्या भाविकाला पूजेत सहभागी करून घेण्याचा निर्णय यापूर्वीच मंदिर समितीने घेतला होता. मात्र, त्यास प्रतिसाद मिळत नसल्याने मंदिर समितीने भाविकांनाच मान देण्याचा निर्णय घेतला आहे.

फडणवीस सरकारही नेभळट

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सातारा

'जलसंपदा खात्यात हजारो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप होऊनसुद्धा त्याची सखोल चौकशी होत नाही. सरकार बदलूनही कोट्यवधीची संपदा गोळा केलेले अद्याप मोकाट आहेत. त्यामुळे हे सरकारही नेभळट आहे,' असेच म्हणावे लागेल,' असा हल्लाबोल खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे.

'जलसंपदातील सर्व बेकायदा बाबींची चौकशी केली, तर खातेच बंद करावे लागेल, अशी कबुली जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. पूर्वीपासून जलसंपदामध्ये मोठा भ्रष्टाचार चालला आहे, हम करेसो कायदा, या वृत्तीने जलसंपदाचा पोतडी भरून घेणारा कारभार सुरू आहे, असे आम्ही ठामपणे सांगत होतो. भू-माता दिंडी, भू-माता मोहिमेच्या माध्यमातूनही या प्रकाराविरोधात आम्ही जातीने आवाज उठवला. मात्र, त्याचा काहीच परिणाम झाला नाही. वेळीच सिंचन प्रकल्प पूर्ण झाले असते, तर शेतकऱ्यांच्या जमिनीला आणि दुष्काळग्रस्तांना पाणी मिळाले असते. मात्र, वेड पांघरून पेडगावला जाणाऱ्या नतद्रष्ट राज्यकर्त्यांना त्याचे कोणतेच सोयरसुतक राहिले नव्हते. सरकारने आणि जलसंपदामंत्री महाजन यांनी फार बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करून जबाबदार टग्या व्यक्तींना जबर शिक्षा होईल, अशी कारवाई करण्याची धमक दाखवावी. अन्यथा सरकार विश्वासार्हता गमावून बसेलच. शिवाय, त्यांना जनता माफ करणार नाही,' असेही राजेंनी म्हटले आहे.

खटावच्या पूर्व भागात टंचाई

गतवर्षी तालुका प्रशानाकडून सुमारे २२ टँकरने ३५ गावांतील लोकांना दिवसाकाठी ६२ खेपांद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. सद्य:स्थितीत आवळे-पठार (गारुडी) येथे जानेवारीपासून टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. निमसोड गावठाणातून टँकरच्या चार खेपांची व गारुडी येथून दोन खेपांची मागणी आहे. नजीकच्या काळात तालुक्यातील पूर्व भागातील पाणीपातळी खालावून अनेक गावांतून टँकर मागणी व विहिरी किवा कूपनलिकांच्या अधिग्रहणाचे प्रस्ताव दाखल होणार आहेत.

भ्रष्टाचार उघड करणार

भ्रष्टाचार झाला आहे, हे मान्य करणारे व सत्ता येण्यापूर्वी त्याविरुद्ध रान उठवणारे कारवाई करायला का? घाबरत आहेत. हे न उलगडणारे कोडे आहे. एखादी चूक करणाऱ्यावर लगेच कारवाई आणि हजारो कोटी हडपणाऱ्यांवर कारवाई नाही, ही सोयीस्कर वृत्ती योग्य नाही. पुढील आठवड्यात कृष्णा खोऱ्याच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणार आहे, असा इशाराही खासदार उदयनराजे यांनी दिला आहे.

उद‍्घाटनासाठी क्रीडासंकुल सज्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्रात मोलाची भर घालणाऱ्या विभागीय क्रीडासंकुलाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. गुरुवारी (ता.५) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्याहस्ते उदघाटन होण्याची शक्यता आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती असेल.

विभागीय क्रीडा संकुलाच्या कामाला २००९ मध्ये सुरुवात झाली. विविध कारणाने संकुलाचे काम रखडत गेले. संकुलाचा खर्चही वाढत गेला. यानंतर संकुलाचे काम दोन टप्प्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतरही संकुलाचे काम रखडत गेले. २ फेब्रुवारीला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन काम पूर्णत्वाकडे नेण्याबाबत कडक सूचना दिल्या. त्यानंतर पहिल्या टप्प्यातील फुटबॉल मैदान, अॅथलेटिक्स ट्रॅक, कबड्डी, खो-खो, बास्केट बॉल, व्हॉलीबॉल ग्राउंड व अंतर्गत रस्त्याची कामे ९८ टक्के पूर्ण झाली आहेत. गेल्या महिन्यापासून १५० मजुरांसह ट्रॅक्टर आणि पोकलॅनच्या मदतीने कामे पूर्ण करण्यात आली. सुंकालाच्या पूर्ण झालेल्या प्रेक्षा गॅलरी व कार्यालयाची रंगरंगोटी केली आहे.

पालकमंत्री पाटील यांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे ३१ मार्चपर्यंत शूटिंग रेंजचे व ३१ मेपर्यंत जलतरण तलावाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. संकुलाचे काम सचिन मुळे यांच्या श्री हरी असोसिएट कंपनीकडे असले तरी, प्रकल्पाचे आर्किटेक्ट वरिष्ठ इंजिनीअर सुनील मोटे, महेश पवार, दीपक हजारे यांच्यासह पीडब्ल्यूडीचे वरिष्ठ अभियंता सी. ए. आयरेकर, कनिष्ठ अभियंता आर. एस. जाधव, सी. एस. बांबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे. ‍

पावसाचा अडथळा

रविवारी पहाटेपासून रात्री पडलेल्या पावसामुळे संकुलाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या रस्त्याच्या डांबरीकरणावर परिणाम झाला. सर्वत्र खडीकरण पूर्ण झाले असून दोन दिवसांत रस्ता आणि टेनिस कोर्टच्या डेकोटर्फचे काम पूर्णत्वाकडे जाईल.

मोबाइल आॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लग्नाआधीच घटस्फोट

$
0
0

कौन्सेलिंगसाठी माझ्या ऑफिसमध्ये आपल्या मुलींसोबत आलेले ते गृहस्थ त्यांना दिलेल्या वेळेच्या अगोदरच येऊन थांबले होते. त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांची अस्वस्थता जाणवत होती. फोनवर झालेल्या बोलण्यातून त्यांना त्यांच्या मुलीच्या संदर्भात असलेल्या समस्येबाबत भेटायला यायचे असल्याचे त्यांनी मला सांगितले होते. समोर बसल्यावर त्यांची जी समस्या सांगितली ती अशी ः

उच्चशिक्षित असलेल्या त्यांच्या मुलीचे लग्न तिच्या व घरातल्यांच्या पसंतीने व संमतीने एका उच्चशिक्षित सुस्थापित मुलाशी ठरले होते. परस्परांनी एकमेकांना पसंती कळवली व रितीप्रमाणे त्यांचा साखरपुडा करण्याचे ठरले. बऱ्याच वर्षांनी लग्नाचा सोहळा त्यांच्याय घरात होणार होता त्यामुळे मुलीकडील सगळी घरची मंडळी मोठ्या उत्साहात व आनंदात होती. मुलीच्या वडिलांनी साखरपुड्यासाठी हॉल बुक केला व नातेवाईक, मित्रमंडळींच्या साक्षीने एका शुभ दिवशी साखरपुडा पार पडला. साखरपुड्याचा खर्च लाखाच्या घरात गेला. देण्या-घेण्याच्या याद्या झाल्या. साखरपुडा झाल्याच्या दुसऱ्या दिवशी मुलाच्या आईवडिलांनी त्यांच्यामते साखरपुड्यात मुलांकडील लोकांकडून राहिलेल्या कांही उणिवा मुलीच्या वडिलांना बोलावून सांगितल्या व आपल्या मुलाचाही आपले अपेक्षेप्रमाणे मानपान झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. अत्यंत सालस सज्जन मध्यमवर्गीय मुलीच्या वडीलांनी नम्रपणे त्यासाठी मुलाच्या आईवडिलांसाठी माफी मागितली व लग्नात या गोष्टींची काळजी घेऊ, असा शब्द दिला.

लग्नासाठी अॅडव्हान्स देऊन मुलीच्या वडीलांनी एक महागडा हॉल बुक केला, पत्रिका छापल्या, बाहेरगावच्या नातेवाईकांना लग्नाचे आमंत्रण वेळेवर पोहचावे म्हणून पत्रिका पाठवून झाल्या, स्थानिक लोकांना प्रत्यक्ष जाऊन लग्नाचे आमंत्रण देऊन झाले, लग्नाची इतर तयारी चोख पार पाडली व कोणतीही उणिव राहू नयेत याची खबरदारी घेतली. लग्नाला अवघे दोन आठवडे राहिले. त्या सुमारास मुलाच्या वडीलांनी फोन करून मुलीच्या वडीलांना तंबीवजा सूचना दिली कि लग्नात त्यांच्या मताप्रमाणे त्यांचा मानपान झाला नाही, असे त्यांना वाटले तर ते आल्यापावली परतणार व होणाऱ्या परिणामांना ते जबाबदार असणार नाहीत. त्यांच्या मुलासाठी बड्याबड्या लोकांच्या मुलींची स्थळे सांगून आल्याचे त्यांनी कारण नसताना सांगितले. मुलीच्याय आईवडीलांना आता मात्र त्यांच्या मुलीच्या भावी आयुष्याबाबत काळजी लागली. काही वेळा घरची माणसे अशी अनावश्यक लुडबूड करतात पण लग्नाचा मुलगा किंवा मुलगी चांगली असतात व त्यांना या घडणाऱ्या गोष्टींची कल्पना नसते. त्यामुळे आता मुलीचे होणाऱ्या नवऱ्याबाबत काय मत आहे हे जाणणे मला आवश्यक वाटले. मुलीने सांगितले की, तो मुलगा नोकरीसाठी परगावी असल्यामुळे साखरपुड्यानंतर प्रत्यक्ष फारसे भेटता आले नसले तरी तो तिला वरचेवर फोन करत असे. एखाद्या वेळेस तिने फोन घेतला नाही तर पुढच्या संभाषणात नको-नको ते प्रश्न विचारून तिच्यावर संशय घेत असे. त्याच्या बोलण्यात तिला अतिप्रौढी व आत्मस्तुती जाणवत असे. समोरच्याला तुच्छ लेखण्याचा त्याचा स्वभाव होता. फारशी शैक्षणिक पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबात हा एकटाच इतका शिकलेला असल्यामुळे त्याच्या व त्याच्या आईवडीलांच्या बोलण्यातून त्याबद्दल असलेला अनाठायी गर्व जाणवत असे. आपण या मुलासोबत सुखी राहू का याबद्दल तिला शंकाच होती. ती एका विचित्र दडपणाखाली दिसत होती.

लग्न मोडावे तर मुलींवर विनाकारण ठपका येणार व लग्न करावं तर मुलगी सुखी होण्याची शाश्वती कमीच दिसत होती. अर्थात हा निर्णय मुलीनेच घ्यायचा होता व खूप विचार केल्यानंतर नियोजित लग्न मोडण्याचा निर्णय मुलीकडील लोकांनी घेतला व आपला निर्णय मुलाकडील लोकांना कळविला. मी त्यांना नियोजित लग्न रद्द झाल्याचा करार करून दिला व त्यावर मुला-मुलींच्या व दोन साक्षीदारांच्या सह्या घ्यायला सांगितले. मुलाने मुलीला दिलेल्या गिफ्टस् परत करण्याची मागणी केली व लग्न मोडल्याची त्याला कुठेच खंत दिसली नाही. आढेवेढे घेत एकदाचा येऊन त्याने करारावर सही केली. झालेल्या दगदगीपेक्षा व खर्चापेक्षा एका मोठ्या संकटातून आपली मुलगी वाचल्याचे समाधान नक्कीच जास्त होते. लग्नानंतर घटस्फोट झाल्याचे नवीन नाही पण बदललेल्या आजच्या समाजव्यवस्थेत लग्नाअगोदरच घटस्फोट होण्याचा हा प्रकार म्हणावा लागेल.

-अॅड. सुलभा चिपडे

मोबाइल आॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘NCP’ उंडाळकरांना बरोबर घेणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

नाबार्डसह देश व राज्य पातळीवरील सहकार क्षेत्रातील विविध पुरस्कार पटकावून आदर्शवत ठरलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेत आणि कराड दक्षिणचे माजी आमदार आणि जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक विलासराव पाटील-उंडाळकर यांना सोबत घेत निवडणूकपूर्व 'आघाडी' करण्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसने दिले आहेत. त्यामुळे आगामी निवडणूक चांगलीच गाजणार आहे.

गेली अनेक वर्षे माजी आमदार विलासकाका पाटील-उंडाळकर यांचे या बँकेवर निर्विवाद वर्चस्व होते. मात्र, बँकेच्या संचालक मंडळाच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेसने उडी घेत निवडणूक प्रतिष्ठेची करीत बँक विलासकाका पाटील-उंडाळकर यांच्या ताब्यातून काढून घेण्यात यश मिळविले होते. त्यामुळे गेली पाच वर्षे या बँकेवर राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व आहे. मात्र, राज्यातील व केंद्रातील सत्तेची समिकरणे बदलल्याच्या पार्श्वभूमीवर बँकेच्या निवडणुकीचे वारे जोमाने वाहू लागले आहे. त्यासाठी कमराबंद चर्चा, पडद्यामागील हालचालीही वाढल्या आहेत.

नाराजीचा राजकीय वापर

विधानसभा निवडणुकीत उंडाळकरांना काँग्रेसने उमेदवारी नाकारून तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिली होती. त्यावेळी उंडाळकर पक्षाशी एकनिष्ठ राहूनही पक्षाने त्यांच्याशी प्रतारणा केल्याची भावना येथे निर्माण झाली होती. त्यामुळे बँकेच्या निवडणुकीत पक्षाला धडा शिकविण्याची आलेली नामी संधी उंडाळकर दवडणार नाहीत, या विश्वासाने राष्ट्रवादीकडून काकांना चुचकारण्याच्या राजकीय 'खेळी'ला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. या बाबत राष्ट्रवादीच्याही नेतेमंडळींनीही उंडाळकरांशी जवळीक साधण्याच्या 'खेळी'ला दुजोरा दिला आहे.

उंडाळकरांचे सहकारी संस्थावर वर्चस्व

जिल्हा बँकेवर वर्चस्व मिळवायचे असल्यास त्यासाठी जिल्ह्यातील सेवा सोसायट्या, दूध संघ, पाणीपुरवठा संस्था अशा सर्वच प्रकारच्या सहकारी संस्थांवर वर्चस्व असावे लागते आणि नेमके असेच वर्चस्व विलासकाका पाटील-उंडाळकर यांचे येथील विविध सहकारी संस्थांवर आहे. त्यामुळे विद्यमान सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादीला 'काकां'ना घेतल्याशिवाय पुढील सत्तेचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवता येणार नाही, याची स्पष्ट कल्पना असल्यानेच त्यांनी आता त्यांना चुचकारणे सुरू ठेवले असल्याचे चित्र दिसत आहे.

मोबाइल आॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सरकारी मराठी भाषा दळभद्री

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

'संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील नेत्यांना संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर सरकार आणि न्यायव्यवस्था मराठीतून होईल आणि लोकांपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा होती. परंतु, ते आजपर्यंत झालेले नाही. सरकारी मराठी भाषा इतकी दळभद्री आहे की, त्याबद्दल कोणीच काही बोलत नाही. मराठी राज्याच्या संकल्पनेला सरकारी मराठी भाषेने पूर्णपणे हरताळ फासला आहे. सरकारमध्ये सुबोध मराठी वापरात येईल, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असून, त्यासाठी चळवळ आवश्यक आहे,' असे मत ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी व्यक्त केले.

शाहू कलामंदिर येथे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखा आणि सातारा नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा होणाऱ्या मराठी भाषा पंधरवड्यात ते बोलत होते. या वेळी विजय पाध्ये, डॉ. मधुकर बाचूळकर, किशोर बेडकिहाळ, अॅड. बाळासाहेब बाबर, विनोद कुलकर्णी, डॉ. उमेश करंबळेकर, रवींद्र झुटिंग, भाग्यवंत कुंभार, सुरेश पांढरपट्टे उपस्थित होते.

गाडगीळ म्हणाले, 'सरकारमध्ये वापरात येणारी मराठी बघून वाईट वाटते. या वेळी त्यांनी २००६ च्या वनाधिकार कायद्याचे उदाहरण दिले. सरकारच्या वतीने करण्यात आलेले मराठी भाषांतर वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांना समजते नव्हते. त्यातील अनेक गोष्टींचा अर्थ लागत नव्हता. ते भाषांतर म्हणजे एकप्रकारे मराठीची विटंबनाच होती. त्यानंतर कष्टकरी संघटनेने त्या कायद्याचे भाषांतर करून पुस्तिका केली त्यावेळेस ते समजेल. संयुक्त महाराष्ट्रातील नेत्यांच्या अपेक्षांना पूर्णपणे हरताळ फासला जात आहे. त्यामुळे पहिल्यांदा सरकारी मराठी सुधारणे आवश्यक आहे. त्यासाठी नेटाने प्रयत्न करणे गरजेचे असून, सरकारवर दबाव आणला पाहिजे. लोकांना समजेल, असे मराठी सरकारी वापरात यावे.'

मुंग्या आणि माणसांच्या जीवनशैलीतील साम्य शोधणाऱ्या 'अॅन्टहिल' पुस्तकाचा अनुवाद असलेले 'वारुळपुराण' यामध्ये माधव गाडगीळ यांनी मुंगी आणि माणसांतला दुवा उलगडून दाखवला आहे. त्याबद्दल बोलताना ते म्हणाले, 'हार्वर्ड विद्यापीठातील एडवर्ड विल्सन या प्रतिभाशाली वैज्ञानिकांचे मुंग्यांवरचे काम जगमान्य आहे. वयाच्या ७९व्या वर्षी त्यांनी अॅन्टहिल अर्थात वारुळ पुराण पुस्तक लिहिले आहे. जीवन म्हणजे एक संघर्ष आहे. बळी तो कान पिळी हा तर जगाचा नैसर्गिक न्याय आहे. उत्क्रांतीचा परिपाक आहे, अशी एक विचारधारा आहे. विल्सन याच विचारधारेचे पुरस्कर्ते आहेत. पण, त्यांना निसर्गसंरक्षणाचीही ओढ आहे. वारुळ पुराणाच्या कथानकात मानवाच्या निसर्ग नासाडीचा प्रश्न धनदांडग्याच्या स्वार्थाला चुचकारत चुचकारत योग्य दिशेने वळवून सोडवला जातो.'

मोबाइल आॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोख अनुदान नको, रेशन धान्यच द्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

रास्तभाव दुकानातून दरमहा ३५ किलो धान्य देण्यात यावे, रोख अनुदान नको धान्यच द्या, यांसह विविध मागण्यांसाठी सोमवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने (मार्क्सवादी) येथे प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दोन आठवड्यांत धान्य न मिळाल्यास जेलभरो आंदोलन करू, असा इशारा यावेळी मोर्चाच्यावतीने देण्यात आला.

कॉ. दत्ता माने, माजी प्राचार्य ए. बी. पाटील, आनंदा चव्हाण, सदा मलाबादे यांच्या नेतृत्त्वाखाली थोरात चौकातून मोर्चाला प्रारंभ झाला. प्रमुख मार्गावरून फिरून मोर्चा प्रांत कार्यालयावर आला असता त्याठिकाणी जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने करण्यात आली. पण निवेदन स्वीकारण्यास प्रांताधिकारी उपस्थित नसल्याने आंदोलकांनी प्रांत कार्यालयाच्या आवारातच ठिय्या मारला. अखेरीस तहसीलदार दीपक शिंदे यांनी येऊन निवेदन स्वीकारले.

यावेळी केशरी शिधापत्रिकाधारकांनाही धान्य मिळाले पाहिजे. त्याचबरोबर रास्तभावात रॉकेल आणि साखर योग्य प्रमाणात मिळावी, अशी मागणीही करण्यात आली. येत्या दोन आठवड्यांत धान्य न मिळाल्यास जेलभरो आंदोलन करू, असा इशाराही कॉ. माने यांनी दिला.

मोबाइल आॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सेरेब्रल पाल्सी’चा विळखा घट्ट

$
0
0

जान्हवी सराटे, कोल्हापूर

सेरेब्रल पाल्सी बहुविकलांगता आणि मेंदूचा पक्षाघात हा समाजातीलच नव्हे तर कुटुंबातही दुर्लक्षित झालेला आजार आहे. याबाबत समाजात मोठे अज्ञान आहे. बहुविकलांगांच्या संख्येचा विचार करता हजारामागे एक असे भीषण प्रमाण आहे. त्यांच्या पुनर्वसन व प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रात बोटावर मोजण्याइतपत शाळा आहेत. अशा बालकांवर वेळीच निदान व उपचार झाल्यास त्यांच्यातही बदल होऊ शकतात. अशा रुग्णांसाठी कोल्हापुरातील रोटरी लोककल्याण मंडळाचे एकमेव केंद्र आहे.

दैनंदिन आयुष्य सुरळीत सुरू राहण्यासाठी पुनर्वसनाची भूमिका सेरेब्रल पाल्सीग्रस्तांच्या आयुष्यात महत्त्वाची ठरते. लक्षणांनुसार पुनर्वसनाच्या कार्यक्रमाची रचना प्रत्येक रुग्णासाठी वेगळी करता येते. भौतिकोपचार, व्यवसायोपचार, स्पीच थेरपी आणि मानसिक समुपदेशन सेरेब्रल पाल्सीग्रस्तांसाठी महत्त्वाचे ठरतात. भौतिकोपचार व व्यवसायोपचाराच्या एकत्रितपणामुळे चलनवलन वाढून स्नायूंची शक्ती वाढते. अवयवांच्या हालचाली सुकर होऊन स्नायू ताठर होण्यापासून रोखतात. यातील काही व्यायामांच्या मदतीने रुग्णाला बसण्यास, तोल सांभाळण्यात आणि चालण्यात मदत होते. स्पीच थेरपीमुळे घास गिळणे, खाणे, ऐकणे व संवाद साधण्यात मदत होते.

अपंग क्षेत्रामध्ये अस्थिव्यंग, कर्णबधिर, अंध आणि मतिमंद असे प्रमुख चार प्रवर्ग आहेत. यामध्ये मतिमंद हा विषय अवघड, दुर्लक्षित असलेला घटक आहे. मतिमंद या प्रवर्गाचे वर्गीकरण करताना यामध्ये मतिमंद, बहुविकलांग, मेंदूचा पक्षाघात आणि आत्ममग्नता असे चार घटक येतात.

सेरेब्रल पाल्सी कशामुळे होतो?

सेरेब्रल पाल्सी ही मेंदूच्या कार्याशी संबंधित जन्मजात अवस्था आहे. प्रसूतीवेळी नवजात बालकाच्या मेंदूला झालेली इजा, प्राणवायूचा अपुरा पुरवठा अशी त्याची प्रमुख कारणे आहेत. मेंदूच्या विविध पेशींची कायमस्वरूपी हानी झाल्यामुळे ऐच्छिक हालचाली, वैचारिक क्षमता, संभाषण, स्पर्शाची जाणीव, अभिव्यक्ती अशा सर्वच कार्याविषयी उणेपण अनुभवास येते. अशा बालकांचे संगोपन करणे अवघड काम असते.

कसे ओळखाल सेरेब्रल पाल्सी रुग्ण?

लहान मुलांची वाढ होत असताना मान धरणे, रांगणे, बसणे या क्रिया वेळेवर होऊ शकत नाही. ती वाढ सावकाश होते. सामान्यतः मूल सातव्या-आठव्या महिन्यात रांगायला, बसायला लागते, पण अशा बाळाला या क्रिया स्वतंत्रपणे करण्यास कधी कधी दीड ते दोन वर्षेही लागू शकतात. कोणतीही हालचाल करताना त्रासाचे जाते. शरीराचा तोल सांभाळणे कठीण जाते.

सेरेब्रल पाल्सी रुग्णांसाठी मंडळातील सुविधा

व्हेस्टिब्युलेटर्स थेरपी, बॉल्स वुईथ थ्री, डिफ्रंट साईज सी.पी. चेअर्स कट आउटटेबल, वुईथ फोर चेअर, थेरपी मॅट, इव्हॅल्यूएशन प्लिंथ कम एक्सरसायझर टेबल, गेट ट्रेनिंग वॉल मीरर, स्टॉलबार, प्रोन स्टॅडर, स्टँडिंग फेमस नील स्टँडर स्टेप अॅण्ड रॅम्प सेट, सेट ऑफ ट्रेनिंग स्टुल्स, बॅलन्स बीम, वॉकर्स, काउलर्स कॉर्नर सीट्स, एच शेपड स्टुल्स, कॉयर अॅण्ड कूशन्स, मल्टिपर्पज डायअॅडेक्टिव्हज् अॅण्ड टॉइज, मे‌डिसीन बॉल्स एक्सरसाइज, बायसीकल पेडोसायकल, वेट सेट पॅरलल बार, क्वाड्रीसेटस एक्सरसाइजर, युनिव्हर्सल स्लिंग ए‌क्सरसाइजर अॅपरट्स, एक्सरसाइज बॉल, स्पीच थेरपी युनिट, वुई कॅम्प्युटर अॅण्ड स्पेशल सॉप्टवेअर हॅण्ड एक्सरसाइजर, हॉट अॅण्ड कोल्ड थेरपी क्वीपमेंटस, प्रिहेन्शन बोर्ड.

सेरेब्रल पाल्सी रुग्णांची संख्या कोल्हापुरात लक्षणीय असेल. योग्य निदान लवकर केले तर ह्या रुग्णांचे ‌रिपोर्ट चांगले येऊ शकतात. पुणे ते बेंगळुरूपर्यंतच्या टप्प्यात सर्व उपचाराची सुविधा असलेले कोल्हापुरातील 'रोटरी लोककल्याण'चे एकमेव केंद्र आहे.

- डॉ. प्रकाश संघवी, बाल व अर्भक रोगतज्ज्ञ

मोबाइल आॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भाकप’चे जेलभरो

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या खुन्यांना तत्काळ अटक व्हावी या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने सोमवारी जेलभरो आंदोलन करण्यात आले. दोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी जामीन न घेण्याची भूमिका घेतल्याने पोलिसांची अडचण झाली. पानसरे यांच्या खुन्यांना अटक होईपर्यंत दररोज विविध संघटना विविध प्रकारे आंदोलन करणार आहेत.

पक्षाने सोमवारी राज्यपातळीवर सत्याग्रहाचा निर्णय घेतला होता. कोल्हापुरात सकाळी बिंदू चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चा जिल्हाधिकरी कार्यालयावर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी निर्दशने केली. पानसरे यांच्या मारेकऱ्यांना त्वरीत अटक करा, अशी मागणी कार्यकर्ते करत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचे नियोजन करूनच कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. तीन वेगवेगळ्या गटांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. काही कार्यकर्ते जिल्हाधिकारी माने यांच्या केबिनपर्यंतही पोहोचले.

पोलिसांनी १०० वर कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी अलंकार हॉलमध्ये केली. पोलिसांनी तेथे वैयक्तिक जातमुचलक्यावर कार्यकर्त्यांना सोडण्यात येईल असे सांगितले. मात्र कार्यकर्त्यांनी आम्हाला अटक करा, पानसरे यांच्या खुन्यांना जोपर्यंत पकडले जात नाही, तोपर्यंत आम्ही तुरुंगातच राहू अशी भूमिका घेतली. पोलिसांनी कार्यकर्त्यांना सोडून दिले. नामदेव गावडे, दिलीप पवार, एस. बी. पाटील, रघुनाथ कांबळे, स‌तीशचंद्र कांबळे, सुशिला यादव, मिलिंद यादव, सुशिला यादव, शिवाजी माळी, आशा कुकडे, दिलादार मुजावर, प्रशांत आंबी, विक्रम कदम, बाळासाहेब पवार यांनी नेतृत्व केले.

मोबाइल आॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरांविरोधात काँग्रेस आक्रमक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापौर तृप्ती माळवी यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा एक भाग म्हणून काँग्रेसचे नगरसेवक मंगळवारी महापालिकेसमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहेत. दुसरीकडे महापौर माळवी यांच्यावर कारवाईवरून राष्ट्रवादी काँग्रेस पेचात अडकली आहे.

पक्षाने, माळवी यांना राजीनाम्यासाठी दिलेली डेडलाइन संपून दोन दिवस उलटले तरी कारवाई झालेली नाही. उलट बुधवारी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची याप्रश्नी बैठक बोलावली आहे. त्यात कारवाईचा निर्णय होईल. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील एक गट माळवी यांच्या पाठीशी आहे. त्यांच्याकडून राजीनामा लांबवण्याची खेळी सुरू असल्याची उघड टीका काँग्रेसचे नगरसेवक करत आहेत.

जनता दरबारावर काँग्रेसचा हल्लाबोल

नागरिकांची, महापालिकेशी निगडीत प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या उद्देशाने महापौर माळवी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जनता दरबार भरवितात. त्यानुसार मंगळवारी (ता.३) सकाळी ११ वाजता महापालिकेत जनता दरबार होत आहे.

महापौरांच्या जनता दरबारावर काँग्रेसने प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. जनतेच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठीच माळवी यांनी लाच घेतल्याने त्यांची पोलिस चौकशी करण्यात आली. आहे. त्यामुळे आता त्यांना या पदावर राहण्याचा नैतिक अधिकारही नाही. माळवी यांना जनता दरबार भरविण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी राजीनामा द्यावा यासाठी उद्या उपोषण करणार असल्याची माहिती उपमहापौर मोहन गोंजारे, सभागृह नेते चंद्रकांत घाटगे यांनी दिली.

काँग्रेसच्या बैठकीला चौघे गैरहजर

माजी मंत्री सतेज पाटील यांनी काँग्रेसच्या नगरसेवकांची सोमवारी सायंकाळी बैठक घेतली. वीज मंडळाच्या ​​रेस्ट हाऊसवर झालेल्या बैठकीला चार नगरसेवक गैरहजर होते. यामध्ये सतीश घोरपडे, किरण ​शिराळे, सत्यजित कदम, रविकिरण इंगवले यांचा समावेश आहे. चौघेही महाडिक गटाचे म्हणून ओळखले जातात. दरम्यान, काँग्रेसच्या आंदोलनात राष्ट्रवादीचे नगरसेवकही सहभागी होणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांना सांगितले असल्याची माहिती उपमहापौर गोंजारे यांनी पत्रकारांना दिली. त्यामुळे महापौरांना विरोध तीव्र होणार अशी स्थिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची उद्या बैठक

महापौर माळवी यांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची बुधवारी (ता. ४) सकाळी ११ वाजता महापालिकेत बैठक बोलावली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे गटनेते राजू लाटकर यांनी दिली. या बैठकीत महापौरांवरील कारवाई संदर्भात निर्णय होणार आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार बैठकीला उपस्थित राहणार आहेत. माळवी यांच्यावर काय कारवाई करायची असा प्रश्न राष्ट्रवादीला पडला आहे. पक्षातून काढून टाकले तरी, माळवी यांचे महापौरपद कायम राहणार आहे. यामुळे कारवाईला फारसा अर्थ उरणार नाही. त्यामुळे पक्षातून काढून न टाकता त्यांच्या राजीनाम्यासाठी दबाव तंत्राचा अवलंब करावा असा एक मतप्रवाह आहे. मात्र, राष्ट्रवादीकडून कारवाईस टाळाटाळ सुरू असल्याची भावना व्यक्त होत आहे.

मोबाइल आॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images