Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

अंबाबाई मूर्तीवर वज्रलेप लागणार

$
0
0

देवस्थान समिती-श्रीपूजकांत सामंजस्य

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

श्री अंबाबाई मूर्तीवर वज्रलेपाचा मुद्दा सामंजस्याने सोडविण्यात यश आले आहे. तेरा वर्षे हा प्रश्न प्रलंबित होता. मूर्तीची झीज रासायनिक संवर्धन (केमिकल कॉन्झर्व्हेशन) प्रक्रियेव्दारे रोखण्याचा निर्णय जिल्हा वैकल्पिक निवारण केंद्राचे आर. डी. पाटील यांच्यासमोर घेण्यात आला.

श्री महालक्ष्मी वज्रलेप समिती व श्री पूजकांचे प्रतिनिधी प्रफुल्ल मुनीश्वर व गजानन मुनीश्वर यांच्यात या तोडग्यावर शिक्कामोर्तब झाले. जिल्हा प्रशासन व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी विक्रम चव्हाण यावेळी उपस्थित होते. श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

राज्य सरकारने २००२ मध्ये मूर्तीवर वज्रलेप करण्याचा निर्णय घेऊन निवृत्त न्यायाधीश एस.व्ही. नेवगी यांच्या अध्यक्षतेखाली वज्रलेप समिती स्थापना केली होती. वज्रलेपासंदर्भात मतांतरे समिती जाणून घेणार होती. समितीने वज्रलेप करण्याचा निर्णय घेतल्यानंतर विरोध करणारी याचिका प्रफुल्ल मुनीश्वर, गजानन मुनीश्वर यांच्यासह इतरांनी वरिष्ठ दिवाणी न्यायालयात दाखल केली होती. २०१४ मध्ये केदार मुनीश्वर यांनी सुवर्णमध्य काढण्याचा अर्ज कोर्टात दाखल केला होता.


‘डॉल्बी’ने विद्यार्थी हैराण

$
0
0

प्रचंड आवाजाने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम; पोलिसांचे दुर्लक्ष

सतीश घाटगे, कोल्हापूर

सध्या बारावीची परीक्षा सुरू असून, गल्ली-बोळांत विविध कार्यक्रमांसाठी लावण्यात येणाऱ्या डॉल्बी सिस्टीममुळे विद्यार्थीवर्ग हैराण झाला आहे. डॉल्बीला विरोध करण्याचे धाडस विद्यार्थी व पालकांमध्ये नसल्याने तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत विद्यार्थीवर्गाला अभ्यास करावा लागत आहे.

सध्या बारावीची परीक्षा सुरू आहे. दहावी परीक्षा पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. महाविद्यालयीन प​रीक्षाही मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. सकाळी लवकर उठून व रात्री जागवून विद्यार्थी अभ्यास करत आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनात महत्त्वाच्या असताना डॉल्बीच्या त्रासाने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे.

सध्या लग्नांचा सिझन सुरू असून शिवाजी, मंगळवार, जुना बुधवार, शुक्रवार, शनिवार, संभाजीनगरसह शहरातील प्रमुख भागात डॉल्बीच्या तालावर ​वराती सुरू आहेत. डॉल्बीवर वरातीचा दंगा रात्री उशिरापर्यंत सुरू असतो. विवाह प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाचा क्षण असला तरी वरातीला डॉल्बीची जोड मिळत असल्याने त्याचा रात्रीच्यावेळी त्याचा झोपेवर परिणाम होत आहे.

येत्या ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्याच्या तयारीसाठी विद्यमान नगरसेवक, माजी नगरसेवक, इच्छुक उमेदवार विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहेत. त्यामध्ये तालमींचे वाढदिवस, स्वतःचे वाढदिवस अथवा अन्य कार्यक्रमांसाठी साऊंड सिस्टीमचा वापर सुरू आहे. नेत्यांच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी रात्री आतषबाजी व वाढदिवसादिवशी सायंकाळी सहा ते रात्री साडेबारा एक वाजेपर्यंत डॉल्बीच्या तालावर शुभेच्छा स्वीकारल्या जातात. हल्ली मंडळे, तालमी, ग्रुपचे वाढदिवसही डॉल्बीच्या तालावर झोकात केले जात असल्याने त्याचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा आदेशानुसार साउंड सिस्टीम लावून ध्वनिप्रदूषण करण्यास बंदी आहे. पोलिसही यापूर्वी आवाज कमी करायला सांगत, पण गतवर्षीच्या विसर्जन मिरवणुकीत पोलिसांनी डॉल्बीला फ्री हॅन्ड दिल्याने मंडळाचे रान मोकळे झाले आहे. पोलिस ठाणे अथवा कंट्रोल रूमला डॉल्बीविरोधात तक्रार केल्यावर तक्रारदारालाच प्रबोधनाचे डोस दिले जातात. ध्वनिप्रदूषण रोखणे प्रदूषण नियंत्रण कार्यालयाचे काम आहे असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितल्याने स्थानिक पोलिसही लक्ष देत नाहीत.

डॉल्बी लावल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. रात्री उशिरा जागून अभ्यास करणाऱ्यांचे अभ्यासात लक्ष लागत नाही. तर डॉल्बीमुळे झोपमोड होत असल्याने पहाटे लवकर उठता येत नाही. परीक्षेच्या शेवटच्या कालावधीत अभ्यासावर अंतिम हात फिरवायचा असल्याने साऊंड सिस्टीमच्या आवाजाने विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे मात्र खोबरे होत आहे.

अधिकारी पॉश वस्तीत

रात्री डॉल्बी सुरू असताना पोलिस निरीक्षक मात्र पॉश वस्तीतील फ्लॅटमध्ये सुखनिद्रा घेत असतात. डॉल्बीचा त्रास विद्यार्थी, आजारी व वृध्दांना किती होतो हे माहीत नसते. पोलिसांनी कडक अंमलबजावणी केली तर विद्यार्थ्यांची डॉल्बीपासून सुटका होऊ शकते.

त्यांची काळजी घ्या

$
0
0

कोल्हापूर : कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरे यांची प्रकृती जरी सुधारत असली तर त्यांना डोक्याला झालेल्या गंभीर जखमेचा विचार करून पानसरे यांच्या निधनाचे वृत्त सांगण्यात आलेले नाही. त्यांच्याजवळील नातेवाइकांना त्या 'कॉम्रेडांची काळजी घ्या, त्यांच्या जवळ थांबा' असे सांगतात तेव्हा नातेवाइकांना स्वत:ला सावरणे कठीण होऊन बसते. उमा पानसरे यांच्यावर अॅस्टर आधार हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.

पानसरे यांच्या निधनाच्या वृत्ताने उमा यांच्या प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो, हे लक्षात घेत सध्यातरी ही बातमी त्यांना सांगितली जाऊ नये असा निर्णय त्यांचे कुटुंबीय आणि डॉक्टरांनी घेतला आहे. त्यांच्या मुली स्मिता सातपुते आणि मेघा बुट्टे, सून प्रा. मेघा पानसरे आणि काही जवळचे नातेवाईक उमा पानसरे यांच्यासोबत आहेत. आपण असा काय गुन्हा केला की आपल्यावर गोळीबार व्हावा, असा प्रश्न त्या विचारत असतात. उमा पानसरे यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होत आहे, पण गोळीबाराचा घटनाक्रम आठवताना त्यांना मानसिक त्रासातून जावे लागणार हे लक्षात घेऊन पोलिसांना त्यांचा जबाब घेण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. उमा पानसरे तोंडावाटे पाणी, द्रवरूप अन्नपदार्थ घेऊ शकतात. फिजिओथेरपीने त्यांना झालेला पक्षाघात कमी करता येऊ शकेल, असा डॉक्टारांना विश्वास आहे.

आयुक्तांकडून नगरसेवकास समज

$
0
0

आरोग्य अधिकाऱ्यांना शिवीगाळप्रकरणी संतप्त प्रतिक्रिया

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदी आणि रंकाळा तलाव यांसारखे पाण्याचे महत्वाचे स्त्रोत जपण्यासाठी तेथे कपडे, जनावरे धुण्यास बंदी घालण्याचे इशारे महापालिकेने यापूर्वी अनेकदा दिले. मात्र, सोमवारी पंचगंगा नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या नागरिकांना नोटीस बजावण्यासाठी गेलेल्या आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांना स्थानिक नगरसेवक प्रकाश गवंडी यांनी शिवीगाळ करून धमकी देण्याचा प्रकार घडला. या प्रकारानंतर आरोग्याधिकारी डॉ. पाटील यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. दरम्यान, आयुक्त पी. शिवशंकर यांनी याची दखल घेऊन नगरसेवक गवंडी यांना समज दिली.

दरम्यान, मंगळवारी नगरसेवक गवंडी यांनी डॉ. पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क साधून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र डॉ. पाटील हे दिवसभर महापालिकेच्या मुख्य इमारतीकडे फिरकले नाहीत. या प्रकारानंतर पंचगंगा हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेतली. आयुक्तांनी डॉ. पाटील यांचा राजीनामा मंजूर केलेला नाही.

महापालिकेचा आरोग्य विभाग हा संवेदनशील विभाग आहे. ७७ नगरसेवक वेगवेगळ्या ठिकाणच्या तक्रारी मांडतात. त्यांच्या सोडवणुकीसाठी आग्रही असतात. त्यातून कायम कर्मचाऱ्यांशी शिवीगाळ, कधी मारहाणीचे प्रकार होत असतात. त्यातील अनेक प्रकार उघड होत नाहीत. त्यामुळे आरोग्याधिकारी पदावरही अनेकजण येण्यास नाखूश असतात हे यापूर्वी वर्षभर महापालिकने अनुभवले आहे. डॉ. पाटील हे निवृत्त झाल्यानंतरही त्यांच्या कामाचा अनुभव पाहून त्यांची मानधन तत्वावर नियुक्ती झाली आहे. नदी प्रदूषणसारख्या संवेदनशील प्रश्नाची तड लावण्यासाठी ते प्रयत्नशील असताना फक्त आपल्या प्रभागातील काही नागरिकांसाठी शिवीगाळ करण्याचा नगरसेवक गवंडी यांच्याकडून घडलेला प्रकार पुर्णपणे चुकीचा असल्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यातून नगरसेवक गवंडी यांना पंचगंगेचे प्रदूषण वाढावे असेच वाटत असल्याच्या प्रतिक्रीया मंगळवारी व्यक्त झाल्या.

नगरसेवकांची वाढती अरेरावी

यापूर्वी एका नगरसेवकाने सरकारकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्याला मारहाण केली. त्यानंतर ते अधिकारी पुन्हा फिरकले नाहीत. अधिकाऱ्यांचा वाईट पद्धतीने अपमान करणे, अश्लील शिवीगाळ करणे हे प्रकार आता महापालिकेत कायमचे झाले आहेत. अनेक अधिकारी या प्रकाराने त्रस्थ आहेत. आधीच महापालिकेचा गाडा तुटपुंज्या उत्पन्नाने रखडत सुरु आहे. अशा स्थितीत जे असतील ते अधिकारी महापालिकेत टिकले नाहीत तर शहरवासियांना या नगरसेवकांना निवडून देण्याचा नक्कीच पश्चाताप होईल.

महापौर विरुद्ध नगरसेवक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पदाचा राजीनामा देण्यास तृप्ती माळवी या टाळाटाळ करीत असल्याने महापौर आणि नगरसेवकांतील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. बुधवारी (ता. २५) महापालिकेची जनगणनेबाबत विशेष सभा बोलवण्यात आली आहे. या वेळेतच ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या निधनानिमित्त विठ्ठल रामजी शिंदे चौकात शोकसभा होणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापौरांना असहकार्य आंदोलन सुरू असल्याने उद्या काय भूमिका घ्यायची याबाबत मंगळवारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या बैठकीत निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे सभेपूर्वी निर्णय होईल.

महापौर माळवी यांनी राजीनामा न दिल्याने दोन्ही काँग्रेसचे नगरसेवक त्यांना सहकार्य करत नाहीत. या पार्श्वभूमीवर उद्या जनगणनेच्या राष्ट्रीय कामाची माहिती देण्यासाठी विशेष सभा होत आहे. नगरसेवक सभेला अनुपस्थित राहिले आणि कोरमअभावी सभा तहकूब झाली तर महापौर पुन्हा सभा बोलवून विषय मंजूर करू शकतात. त्यासाठी कोरमची आवश्यकता लागत नाही. त्यामुळे नगरसेवकांसमोर पेच आहेत. मात्र याच कालावधीत शोकसभाही होणार असल्याने महापौरांनाही त्यास उपस्थित राहण्याबाबत अडचण निर्माण झाली आहे. सभेवर बहिष्काराची बहूतांश नगरसेवकांची भूमिका आहे. मात्र, याला अपवादही आहेत.

केमिकल कॉन्झर्व्हेशनला येणार गती

$
0
0

अंबाबाई मूर्ती वज्रलेपाबाबतच्या चर्चेला चौदा वर्षांनी विराम

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येत्या सप्टेंबरमध्ये कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराला तीनशे वर्षे पूर्ण होणार आहेत. करवीर निवासिनी आणि साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मानल्या जाणाऱ्या कोल्हापूरला धार्मिक अधिष्ठान देणाऱ्या अंबाबाई मूर्तीची झीज आणि त्यावर वज्रलेपाचे संरक्षण हा मुद्दा गेल्या १४ वर्षांपासून केवळ चर्चेच्या परिघातच होता. देवस्थान व्यवस्थापन आणि हक्कदार श्रीपूजक यांच्यातील मतभेदांमुळे अंबाबाईच्या मूर्तीची झीज आणि त्यावर करण्यात येणाऱ्या वज्रलेपाबाबतचे मतप्रवाह याला आता केमिकल कॉन्झर्व्हेशनचा (रासायनिक संवर्धन) पर्याय पुढे आला आहे.

वज्रलेप समिती व भारतीय पुरातत्व खाते यांच्या समन्वयातून अखेर केमिकल कॉन्झर्वेशनवर मान्यतेची मोहर उमटली असून, ही प्रक्रिया सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. नियोजित वेळेनुसार १५ ऑगस्ट २०१५ ला जर केमिकल कॉन्झर्वेशनची प्रक्रिया पूर्ण झाली तर अंबाबाई मंदिराच्या त्रिशताब्दी वर्षाला अनोखे कोंदण मिळेल.

राज्य पुरातत्व विभागाचा आधार

भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. प्रभू यांच्या अहवालाचा आधार घेऊन श्रीपूजकांनी समितीच्या निर्णयावर आक्षेप घेत याचिका दाखल केली. दरम्यान इर्डियॉस (इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड डेव्हलपमेंट ओरिएंटल स्टडीज) या कंपनीच्या अहवालात नमूद केले होते की १९५५ साली मूर्तीला देण्यात आलेल्या वज्रलेपाच्या अशास्त्रीय पद्धतीमुळे मूर्ती खराब झाली आहे त्यामुळे पुन्हा वज्रलेप करू नये. यावर उपाय म्हणून केमिकल कॉन्झर्व्हेशन करावे, असे सुचवले.

वज्रलेप प्रकरणाची पार्श्वभूमी

अंबाबाई मूर्तीला वज्रलेप करावा की नाही याबाबत देवस्थान समिती व श्रीपूजकांतील वाद २००० पासून कोर्टात आहे. याबाबत राज्य सरकारने वज्रलेप समिती नेमली. मात्र समितीने स्वतःच मूर्तीवर वज्रलेप करण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. प्रभू यांच्या अहवालाचा आधार घेऊन श्रीपूजकांनी आक्षेप घेत याचिका दाखल केली. दरम्यान इर्डियॉस या कंपनीच्या अहवालात १९५५ साली मूर्तीला दिलेल्या वज्रलेपाच्या अशास्त्रीय पद्धतीमुळे मूर्ती खराब झाली आहे. त्यामुळे पुन्हा वज्रलेप करू नये. यावर उपाय म्हणून केमिकल कॉन्झर्व्हेशन करावे, असे सुचवले.

प्रक्रिया अशी होणार?

मूर्ती संवर्धन प्रक्रियेत रासायनिक द्रव्य हे मूर्तीवर लेप स्वरूपात न लावता ते सच्छिद्र असलेल्या मूर्तीमध्ये इंजेक्शनद्वारे सोडले जाते. यामुळे मूर्ती आतूनही भक्कम होते आणि वरच्या बाजूने कोणताही रासायनिक द्रव्याचा लेप न आल्यामुळे मूर्तीचे बाह्यसौंदर्यही लोप पावत नाही. रासायनिक संवर्धन प्रक्रियेला राज्य पुरातत्व खात्याच्या सल्ल्याप्रमाणे केंद्र शासनाचा पुरातत्व सर्व्हेक्षण विभाग रचना तयार करणार आहे. रासायनिक संवर्धनाचा खर्च करण्यास देवस्थान समितीने मान्यता दिली आहे. या उपकमासाठी भाविकांकडून कोणत्याही देणगी व आर्थिक मदतीची मागणी न करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. तसेच संवर्धन प्रक्रियेदरम्यान केल्या जाणाऱ्या ​धार्मिक विधीच्या खर्चाची जबाबदारी हक्कदार श्रीपूजक मंडळाने स्वीकारली आहे. गाभाऱ्यातील मूळ मूर्तीवर संवर्धनाची प्रक्रिया सुरू असताना नित्योपचार उत्सव मूर्तीवर सुरू राहतील. वज्रलेपापेक्षा केमिकल कॉन्झर्वेशन ही प्रक्रिया वेगळी आहे.

महापालिकेच्या आजच्या सभेकडे लक्ष

$
0
0

कोल्हापूरः पदाचा राजीनामा देण्यास तृप्ती माळवी या टाळाटाळ करीत असल्याने महापौर आणि नगरसेवकांतील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. बुधवारी (ता. २५) महापालिकेची जनगणनेबाबत विशेष सभा बोलवण्यात आली आहे.

या वेळेतच ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या निधनानिमित्त विठ्ठल रामजी शिंदे चौकात शोकसभा होणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापौरांना असहकार्य आंदोलन सुरू असल्याने उद्या काय भूमिका घ्यायची याबाबत

मंगळवारी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या बैठकीत निर्णय झाला नाही. त्यामुळे सभेपूर्वी निर्णय होईल.

‘स्वाइन फ्लू’ची धास्ती वाढली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्वाइन फ्लू झालेल्या सौ. प्रमिला अनिल पाटील (वय ४२, रा. यादव कॉलनी, पेठवडगाव) या गर्भवती शिक्षिकेचा मृत्यू झाला. याशिवाय स्वाइन फ्लू झालेला आणखी एक रुग्ण खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असून त्याची प्रकृती गंभीर आहे. जानेवारीपासून आजअखेर जिल्ह्यात २० संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १२ जणांना उपचारानंतर घरी सोडून देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. बी. डी. आरसुळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आरसुळकर म्हणाले, 'प्रमिला पाटील या तळसंदेतील प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या. महिन्यापूर्वी शाळेची सहल घेऊन त्या मुरुड जंजीरा येथे गेल्या होत्या. १५ फेब्रुवारी रोजी सर्दी व तापामुळे त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आले. सुरुवातीच्या उपचारानंतर गुरुवारी (ता. १९ फेब्रुवारी) त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. त्यांना कोल्हापुरातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले होते. सोमवारी (ता. २३) त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, पुण्यातील एनआयव्हीमध्ये स्राव तपासणीनंतर त्यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचा अहवाल मिळाला आहे.'

डॉ. आरसुळकर म्हणाले, 'जानेवारीपासून आठजणांना स्वाइन फ्लू झाल्याचा अहवाल होता. संशयित व स्वाइन फ्लू झालेल्यांवर जिल्ह्यातील वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये

उपचार देऊन १२ जणांना औषधोपचारानंतर घरी पाठविण्यात आले. सात रुग्ण उपचार घेत आहेत. पाचजणांचा अहवाल प्रलंबित आहे. आरोग्य विभागातर्फे जनजागृतीही सुरू आहे.'

* सर्दी झालेल्या मुलांसाठी सूचना

शिक्षकांनी सकाळीच वर्गात विद्यार्थ्यांची तपासणी करावी
सर्दी झालेल्या विद्यार्थ्यांना सात दिवस घरीच ठेवा
मुलगा गैरहजर राहिल्यास त्याच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्राचा आग्रह धरू नये
स्वाइन फ्लूची लक्षणे आढळल्यास त्वरीत संपर्क साधा
शिंकणाऱ्यांनी तोंडासमोर टिश्यू पेपर, रुमाल धरावा
टिश्यू पेपर स्वतंत्र प्लास्टिक बॅगेमध्ये टाका
शाळांनी परिसराची स्वच्छता करावी

* जिल्ह्यात ५ ठिकाणी उपचारांची सोय

स्वतंत्रपणे उपचार कक्ष, व्हेंटिलेटरचीही व्यवस्था
ग​डहिंग्लज उपजिल्हा रुग्णालय
कोडोली उपजिल्हा रुग्णालय
गांधीनगर येथील वसाहत रुग्णालय
कसबा बावडा येथील सेवा रूग्णालय
सीपीआर हॉस्पिटलमध्येही स्वतंत्र व्यवस्था


बजेटमधील दुष्काळ संपणार!

$
0
0

कोल्हापूर परिसरावर 'प्रभू' प्रसन्न होण्याची गरज

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रेल्वेमंत्री महाराष्ट्रातील आणि तेही शेजारच्या रत्नागिरी जिल्ह्यातील झाल्याने कोल्हापूर, सांगली, सातारा परिसरातील रेल्वेच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या छोट्या मागण्यांपासून ते परिसराच्या प्रगतीला मोठा हातभार लावणाऱ्या नव्या योजनांबाबतच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यातील कोकण रेल्वेशी कोल्हापूर परिसर जोडण्याला प्रचंड संधी आहेत. तसेच नवीन गाड्या सुरू करून कोल्हापूरचा कनेक्ट देशातील विविध भागांशी वाढू शकतो. त्यामुळे रेल्वे बजेटमधील या परिसराचा दुष्काळ संपेल, अशा जनता, व्यापारी, उद्योजकांकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत.

आजपर्यंतचा इतिहास पाहता रेल्वेमंत्री ज्या ज्या परिसरातील झाले, त्यांनी आपल्या राज्यात नवीन रेल्वेगाड्या सुरू करण्याबरोबरच सुविधा, प्रकल्प स्थानिक जिल्हा, राज्यात नेण्याचा धडाका लावला. त्यामुळे रेल्वेच्या विविध मागण्यांबाबत महाराष्ट्राला फार स्थान मिळाले नाही. कोल्हापूर व या परिसराला कित्येक वर्षांनी रेल्वे बजेटमध्ये अच्छे दिन येण्याची संधी निर्माण झाली आहे. मंत्र्यांनीही त्यादृष्टीने सूचकपणे जाहीर केले आहे. फक्त रेल्वे बजेटमधून कोल्हापूरकरांबरोबर या परिसराला आवश्यक असणाऱ्या मागण्यांच्या भल्या मोठ्या यादीतून कोणाकोणाला प्राधान्यक्रमाने न्याय दिला जाईल, इतकीच औपचारिकता आता शिल्लक राहिली आहे.

कोकण रेल्वेला कोल्हापूर जोडण्यासाठीचे प्रयत्न बऱ्याच वर्षांपासून सुरू आहेत. कराड ते चिपळूण, कोल्हापूर ते राजापूर, कोल्हापूर ते वैभववाडी या मार्गांचा विचार सुरू आहे. कराड ते बेळगाव या नवीन रेल्वेमार्गाबाबतची प्रक्रियाही पाइपलाइनमध्ये आहे. मंत्र्यांनी ठरवल्यास यातील एक प्रकल्पासाठी बजेटमध्ये तरतूद केली जाऊ शकते. पुण्यातून गुजरातला जाणारी वेरावळ एक्स्प्रेस कोल्हापुरातून सुरू करण्यात यावी, अशी मागणी पुढे आली. यामुळे गुजरातकडे जाणाऱ्या कोल्हापूर ते साताऱ्यापर्यंतच्या प्रवाशांना फायदा मिळणार आहे. कोल्हापूर ते अहमदाबाद एक्स्प्रेस दररोज सुरू करावी, अशीही मागणी आहेच.

शिवाय कोल्हापूर ते मुंबई दरम्यान सुपरफास्ट रेल्वे सुरू करण्याची रेल्वे प्रशासनाची तयारी आहे, पण या रेल्वेला कमीत कमी थांबे असल्याने इतर जिल्ह्यांतील खासदारांवर अवलंबून राहावे लागणार आहे. शिर्डीसाठी नवीन रेल्वे सुरू होण्याची शक्यता आहे. सोलापूरसाठी​ जाणारी गाडी दिवसा सुरू व्हावी अशी इच्छा आहे.

स्टेशन विकासाच्या नवीन धोरणाची प्रतीक्षा

मिरज ते पुणे दरम्यानच्या रेल्वे लाइनच्या दुहेरीकरणाबरोबरच विद्युतीकरणाचा फार महत्त्वाचा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. सातत्याने ही मागणी केली जात असूनही त्याचा विचार झालेला नाही. त्याबाबत प्राथमिक टप्प्यावर जरी काही तरतूद झाली तरी दक्षिण महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी हा मोठा निर्णय होईल.कोल्हापूर स्टेशनच्या इमारतीबाबत हेरिटेजचे कारण सांगून विकास झालेला नाही. या प्रश्नाच्या चर्चेवेळी मंत्र्यांनी स्टेशनचा विकास बीओटी तत्त्वावर सुरू करण्याचे धोरण अवलंबण्याचे संकेत दिले होते. बजेटमध्ये हे धोरण अवलंबले गेले तर स्टेशन सर्व सुविधांनी सुसज्ज होऊ शकेल.

तसेच त्यातून महाराष्ट्रातील व पश्चिम महाराष्ट्रातील सहकार चळवळीलाही चालना देता येऊ शकेल, असा दुहेरी विकास साधता येईल.

नवा पादचारी मार्ग, गेटची सुविधा

तत्कालीन रेल्वेमंत्री नितीशकुमार यांनी कोल्हापूर रेल्वे स्टेशन मॉडेल म्हणून विकसित करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, नंतरच्या रेल्वेमंत्र्यांनी या घोषणेची पूर्तता करण्यासाठी निधीची तरतूदच केली नसल्याने, स्टेशनची इमारत 'हेरिटेज'मध्ये येत असल्याने ही घोषणा हवेतच विरून गेली. तरीही येथील रेल्वे प्रवासी संघटना, विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी सतत पाठपुरावा केल्यानंतर व स्टेशनची रचना बदलण्याचे गांभीर्य पटवून दिल्यानंतर प्रशासन आता त्यादृष्टीने विचार करत आहे. त्यादृष्टीने काही बजेटमधून मिळेल का, याची आशा आहे. एक व दोन नंबर प्लॅटफॉर्मवरून तीन क्रमांकावर जाण्यासाठी पादचारी पुलाचा वापर केल्याशिवाय पर्याय नाही. यासाठी हे तिन्ही प्लॅटफॉर्म जोडण्यासाठी गोकुळ हॉटेलच्या पाठीमागील बाजूस एक मोठा पादचारी मार्ग आवश्यक आहे. त्यामुळे शाहूपुरीत जाण्यासाठी गेट तयार करण्याच्या प्रस्तावामुळे शहराच्या दक्षिणेकडील भागाकडे जाणाऱ्या तसेच तिथून येणाऱ्या प्रवाशांचा त्रास कमी होणार आहे.

वेटिंग रूम गरजेची

अनेक रेल्वेगाड्या धावत असल्याने आता स्टेशनवर दिवस व रात्रीही मोठी वर्दळ असते. रात्री बारापर्यंत व पहाटे चारपासून रेल्वेची ये-जा सुरू असते. त्यासाठी स्टेशनवर एका वेटिंग रूमची आवश्यकता निर्माण झाली आहे. वेटिंग रूमअभावी प्रवाशांना सध्या प्लॅटफॉर्मवरच थांबावे लागते. हे चित्र बदलण्यासाठी वेटिंग रूमची आवश्यकता आहे. त्याकरिता स्टेशनची इमारत सुसज्ज बनवायला हवी.

महापालिकेची धर्मशाळा अडगळीत

$
0
0

>> अनुराधा कदम, कोल्हापूर

महापालिकेला हक्काचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या धर्मशाळेच्या इमारतीला अडगळीचे स्वरूप आले आहे. अकरा वर्षांपूर्वी बांधलेल्या या धर्मशाळेला महापालिकेने स्वच्छतेचा मंत्र देणाऱ्या संत गाडगे महाराज यांचे नाव दिले. मात्र गेल्या पाच वर्षांपासून स्क्रॅप साहित्य ठेवून या मध्यवर्ती भागातील एका चांगल्या जागेकडे दुर्लक्ष केले आहे. २४ फेब्रुवारी हा संत गाडगे महाराज यांचा जयंतीदिवस म्हणून साजरा केला जात असताना महापालिकेच्या संत गाडगे महाराज धर्मशाळेला आलेल्या अवकळेकडे मात्र प्रशासनाचे लक्ष नाही. विशेष म्हणजे श्री अंबाबाई मंदिराजवळ सरस्वती चित्रमंदिर ते निवृत्ती चौक या मार्गावर ही धर्मशाळा आहे.

धर्मशाळेत तीन हॉल आणि १६ गाळे आहेत. गाळेधारकांनाही महापालिका प्रशासनाकडून पुरेशा सुविधा मिळत नसल्याची तक्रार आहे. दुसऱ्या मजल्यावरील तीन हॉलचा उपयोग पर्यटक, भाविकांच्या निवासासाठी करावा असा निर्णय झाला होता. पण पहिल्या पाच वर्षानंतर या धर्मशाळेच्या जागेत महापालिकेचे अडगळीचे सामान ठेवले जात आहे.

एकीकडे महापालिका निधी नाही म्हणून विकासकामात खो घालते, तर दुसरीकडे महापालिकेला केवळ यात्री निवास सुविधेसाठी धर्मशाळेचा योग्य वापर केल्यास दरमहा साडेचार लाख रूपयांचे उत्पन्न मिळू शकते. अंबाबाई मंदिर, रंकाळा तलाव या पर्यटनस्थळापासून हाकेच्या अंतरावर असलेली ही धर्मशाळा स्वच्छ करून खुली केली तर महापालिकेच्या उत्पन्नात भर पडेल.

यात्रीनिवासाचे गणित

सध्या यात्रीनिवासात राहणाऱ्या पर्यटक भाविकांना फक्त आंघोळीसाठी माणसी शंभार रूपये आकारले जातात. तर एका मुक्कामासाठी दोन माणसांसाठी ५०० रूपयांपासून रूम चार्जेस आहेत.

या धर्मशाळेत रूम नसल्याने ५० माणसांसाठी एक हॉल याप्रमाणे तीन हॉल माणसी १०० रूपये आकारून दिल्यास दिवसाला १५ हजार रूपये मिळू शकतात. याप्रमाणे महिन्याचे साडेचार लाख रूपये महापालिकेच्या तिजोरीत जमा होऊ शकतात. ४० टक्के खर्च वजा जाता किमान अडीच लाखाचे उत्पन्न देणारी ही इमारत आहे.
...

धर्मशाळेचे रेडीरेकनरप्रमाणे भाडे दरमहा ३५ हजार रुपये आहे. ही रक्कम जास्त वाटत असल्यामुळे कायमस्वरूपी भाडेतत्त्वावर हॉल घेण्यासाठी कुणी पुढे येत नाही. त्यामुळे या धर्मशाळेची माहिती घेऊन तिचा वापर पर्यटक व भाविकांसाठी कशा पद्धतीने करता येईल यासाठी विचार करू.

- आदिल फरास, सभापती, स्थायी समिती

हिंदीऐवजी उर्दूचा पेपर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कुपवाड

बारावी परीक्षेचा ताण विद्यार्थ्यांवर असतानाच हिंदी पेपर ऐवजी उर्दूचा पेपर समोर आल्यामुळे विद्यार्थ्यांना भयंकर मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील पाच परीक्षा केंद्रावर परीक्षा चाळीस मिनिटे उशीरा सुरू झाली. प्रश्नपत्रिकेत गडबड असल्याचे लक्षात येताच कोल्हापूर बोर्डाचे सचिव शरद गोसावी यांनी संबंधित केंद्रांना परीक्षेच्या तीन तासात दहा मिनिटे जादाचा वेळ देण्याची लेखी सूचना दिली होती. परंतु, तासगाव केंद्रावर प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी वेळ दिला नसल्याची परिक्षार्थींकडून तक्रार आली आहे.

मंगळवारी हिंदीचा पेपर होता, परंतु हिंदीऐवजी उर्दूचा पेपर आल्याने तासगाव, पलूस, आटपाडी, चिखली, कोकरुड आदी पाच केंद्रावर तब्बल चाळीस मिनिटांनी परीक्षा सुरू झाली. काही ठिकाणी प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी दहा मिनिटांचा जादा वेळ दिला नसल्याने विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले.

या प्रकाराबाबत विभागीय सचिव शरद गोसावी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, 'प्रश्नपत्रिका सीलबंद असलेल्या पाकिटावर हिंदी लिहिले होते. पण, मंगळवारी सव्वादहाच्या सुमारास पाकिटात उर्दूची प्रश्नपत्रिका आढळली. पाच केंद्राबाबतच असा प्रकार आढळल्याने तेथे हिंदी प्रश्नपत्रिकांची पूर्तता करण्याचे आदेश दिले. त्यामुळे परीक्षा उशीराने सुरु झाली. नव्या नियमांप्रमाणे दहा मिनिटांचा जादा आणि परीक्षेचा तीन तासाचा वेळ देण्याचे लेखी आदेश संबंधित केंद्र संचालकांना दिले होते. काही ठिकाणी जादाचा वेळ दिला नसल्याच्या तक्रारी आहेत. त्याबाबत अहवाल येताच तो पुढील कारवाईसाठी राज्य परीक्षा मंडळाकडे पाठविला जाईल.'

पानसरे हत्या; नगरसेवकांची चौकशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या हत्येप्रकरणी महापालिकेच्या तीन नगरसेवकांकडेही पोलिसांनी चौकशी केली. राजकीय व व्यावसायिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडेही चौकशी सुरू आहे. कागलजवळ दूधगंगा नदीत सापडलेल्या बेवारस मोटारसायकलच्या मालकाचाही शोध घेण्यात येत आहे.

काही नगरसेवक हे बांधकाम व्यावसायिक व जमीन व्यवहाराची कामे पाहतात. जमिनीच्या व्यवहारासंबंधीचे दावे न्यायालयात दाखल असून अशा दाव्यात पानसरे हे वकील म्हणून काम करत होते. अशा दाव्यात काही नगरसेवक प्रतिवादी

असल्याने त्यांची चौकशी करण्यात येत आहे. काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडे पोलिसांनी स्वतंत्र चौकशी केली आहे.

टोल विरोधी आंदोलनात पानसरे यांच्यासमवेत भिन्न विचारसरणीचे राजकीय पक्ष व संघटनांचे कार्यकर्ते एकत्र होते. विचारसरणी भिन्न व टोकाचे मतभेद असले तरी या आंदोलनात पानसरे यांचे सर्वपक्षीय व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चांगले संबंध होते. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांकडे चौकशी केली असली तरी पोलिसांच्या हाती काहीच लागले नसल्याने जिल्ह्याबाहेरही लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.

अमोल पाटील याला अटक

$
0
0



मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येनंतर 'खूब जमेगा रंग जब मिलेंगे तीन यार, दाभोलकर, पानसरे, खेडेकर'... अशी आक्षेपार्ह पोस्ट फेसबुकवर टाकून खळबळ उडवून देणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. अमोल पाटील असे या तरुणाचे नाव असून त्याला कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

कॉ. पानसरे यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रभरात संतापाचे आणि चिंतेचे वातावरण असताना अमोल पाटील याने संभ्रम निर्माण करणाऱ्या काही पोस्ट फेसबुकवर टाकल्या होत्या. 'खूब जमेगा रंग जब मिलेंगे तीन यार, दाभोलकर, पानसरे, खेडेकर'... 'पानसरेची पण विकेट गेली ८१ वर आऊट... नरेंद्र दाभोलकरांचा विक्रम मोडून पानसरे सर्वात पुढे... असे या पोस्टमध्ये म्हटले होते.



या पोस्ट व्हायरल झाल्यानं पोलीसही चक्रावून गेले होते. त्यानंतर औरंगाबाद पोलिसांच्या सायबर सेलने या पोस्ट टाकणाऱ्या अमोल पाटीलला शोधून काढले. काल रात्री त्याला अटक करून कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. कोल्हापूर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीनंतर अमोलने आपल्या कृत्याची कबुली दिली. यापूर्वीही फेसबुकवर धार्मिक संघटना व अन्य विषयांवर आक्षेपार्ह लिखाण केल्याचे त्याने चौकशीत सांगितले. अमोल हा कोणत्या संघटनेशी संबंधित आहे? त्याचा पानसरे यांच्या हत्येशी काही संबंध आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.

बेनिक्रे येथे तापाची साथ

$
0
0

कागल

बेनिक्रे (ता.कागल) येथे गेले आठ दिवसांपासून तापाची साथ आली असून गावात भीतीचे वातावरण आहे. हा ताप म्हणजे टायफॉइडचे लक्षण असल्याचे स्पष्ट झाल्याने चिखली आरोग्य केंद्राचे वैद्यकिय पथक गावात ठाण मांडून आहे. तर मुरगूड ग्रामीण रुग्णायलयात दररोज रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.सध्या मुरगूडच्या दवाखान्यात पंधराहून अधिक रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर गावात तापाच्या रुग्णांची संख्या पन्नासहून अधिक आहे.

महापौरांचा राजीनाम्याला नकारच

$
0
0

राष्ट्रवादी काय भूमिका घेणार याबाबत उत्सुकता

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापौरपदाचा राजीनामा देण्यासाठी राष्ट्रवादीच्यावतीने जिल्ह्यातील नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी दिलेल्या शनिवारपर्यंतच्या मुदतीलाही महापौर तृप्ती माळवी यांनी जुमानले नाही. माळवी यांनी राजीनाम्याबाबत काहीच प्रतिसाद न दिल्याने पक्ष आता कोणती भूमिका घेतो हे रविवारी स्पष्ट होईल. पण पक्षाने काहीही भूमिका घेतली तरी त्यांच्या महापौरपदावर काही टाच येईल, असे वाटत नाही. त्यामुळे पक्षाकडून होणाऱ्या कारवाईचे महत्व पक्षापुरतेच राहणार आहे.

महापौरांनी राजीनामा द्यावा म्हणून प्रथम पक्षाचे शहराध्यक्ष आर. के. पोवार व स्थायी सभापती आदिल फरास व राजू लाटकर यांनी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना दाद दिली नसल्याने आमदार मुश्रीफ यांनी माळवी यांना महापौरपद देण्यासाठी प्रयत्न केलेल्या उद्योजकांची भेट घेतली. त्यामध्ये महापौरांना राजीनामा देण्यास सांगण्याचे आवाहन केले होते. पण उद्योजकांनी पक्षांतर्गत बाबींचा व माझा संबंध नाही, असे सांगत या प्रकरणातून हात वर केले. ज्यांनी पदासाठी प्रयत्न केले, त्यांनीच हात वर केल्याने राजीनामा होणार नाही असेच स्पष्ट झाले होते. तशात या सर्व प्रकरणात दक्षिण विधानसभा मतदारसंघातील राजकारण असल्याची चर्चा सुरु झाली.

माळवी यांच्या पतींचा मित्रपरिवार मोठा असला तरी राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांना आव्हान देणे हा त्याच राजकारणाचा भाग असल्याचे दिसून येत होते. राजीनामा न देण्यासाठी सतेज पाटील यांच्या विरोधकांनी कंबर कसली असल्याने तांत्रिक बाबींमधूनही महापौर कशा सहीसलामत सुटतील याचे पुरेपूर मार्गदर्शन केले जात आहे.

यामुळे पक्षाच्यावतीने मुश्रीफ यांनी महापौरांना राजीनामा सादर करण्याविषयी शनिवार (२८ फेब्रुवारी) पर्यंतची मुदत दिली होती. शनिवारीही याबाबत माळवी यांच्याकडून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे काहीच प्रतिसाद मिळाला नाही.

याबाबत शहर अध्यक्ष आर. के. पोवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, 'पक्षाने त्यांना मुदत दिली होती. तोपर्यंत काही प्रतिसाद न मिळाल्यास त्यांच्याबाबत काय करायचे याचा पक्ष निर्णय घेणार आहे. त्यानुसार पक्षाची नेमकी भूमिका रविवारी स्पष्ट केली जाईल.'

पदावर गंडांतर नाही ...

महापौरांना असहकार्य करण्याची भूमिका काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी घेतली आहे. पण शुक्रवारी झालेल्या सभेमध्ये त्यानंतरही काही नगरसेवक उपस्थित होते. त्यावरुन महाडिक गट या सर्वापाठीमागे आहे हे पुन्हा स्पष्ट झाले. मुळात पक्षाने त्यांची हकालपट्टी केली तरी त्यांच्या पदावर काही गंडांतर येईल, असे दिसत नाही. तसेच माळवी यांनाही पक्षाबाबत काही सहानुभूती आहे असे यापूर्वीच्या वक्तव्यांवरुनही जाणवत नाही. त्यामुळे त्या राजीनामा देणार नाहीत, असेच दिसते.


महिला शक्तीचे होणार अनोखे दर्शन

$
0
0

'मटा' च्या बाइक रॅलीसाठी नाव नोंदणीला उत्स्फूर्त ​प्रतिसाद

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जागतिक महिला दिनाच्या औचित्याने महाराष्ट्र टाइम्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या महिला बाइक रॅलीत सहभागी होण्यासाठी महिलांचा उत्साह वाढत आहे. 'मटा'च्या नागाळा पार्क येथील कार्यालयात नाव नोंदणी करण्यासाठी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद वाढत असून नोकरदार महिला, कॉलेज तरूणी आणि गृहिणी आपल्या बाईकसोबत या रॅलीत सहभागी होणार आहेत.

आपल्या आवडत्या बाइकसोबत महिला दिन साजरा करण्याची संधी महाराष्ट्र टाइम्सने उपलब्ध करून दिली आहे. 'मटा'च्यावतीने कोल्हापुरात याआधी आयोजित केलेल्या विविध उपक्रमांना जोरदार प्रतिसाद मिळाला. तसाच प्रतिसाद 'महाराष्ट्र टाइम्स वुमन्स बाइक रॅली'लाही मिळत आहे. जागतिक महिलादिनी येत्या ८ मार्चला महिला बाइक रॅलीच्या माध्यमातून महिला शक्ती आणि एकजुटीचे अनोखे दर्शन कोल्हापूरकरांना होणार आहे. अनेक महिला या उपक्रमात सहभागी होण्यासाठी उत्सुक आहेत. रविवारी ८ मार्च रोजी सकाळी आठ वाजता गांधी मैदान येथून रॅलीला सुरूवात होणार असून राजाराम कॉलेजच्या मैदानावर सांगता होणार आहे. यानिमित्ताने महिलांच्या एकजुटीचे दर्शन आणि त्यांच्यातील स्वावलंबनासह आत्मविश्वासाला सलाम करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कर्तृत्वाचे पंख लेवून विविध क्षेत्रांत गगनभरारी घेणाऱ्या महिला शक्तीच्या सन्मानार्थ होणाऱ्या 'महाराष्ट्र टाइम्स महिला बाइक रॅली'विषयी शहरात प्रचंड उत्सुकता आहे. कोल्हापुरात गेल्यावर्षी पहिल्यांदाच महाराष्ट्र टाइम्सतर्फे महिला बाइक रॅली आयोजित केली होती. या रॅलीला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे यावर्षीही बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रॅलीमध्ये शहर आणि परिसरातील विविध कॉलेजच्या विद्यार्थिनी, युवती व महिला संघटना, नोकरी, व्यवसायात कार्यरत असलेल्या महिलाही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत आहेत. कॉलेजमधील एनएसएस व एनसीसीमधील विद्यार्थिनी कँडेटस युनिटच्या वेशभूषेत रॅलीत सहभागी होणार आहेत. महिला शक्तीचा गजर करत रॅली मार्गस्थ होईल. एका अर्थाने हा स्त्रीशक्तीला आपणच केलेला सलाम आहे. कोल्हापुरात दुचाकी चालविणाऱ्या पहिल्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या, पण तरीही वेळ पडली तर अजूनही बाइक काढू शकणाऱ्या यंग सीनिअर महिलावर्गालाही सलाम करण्यासाठी महिला बाइक रॅलीचे व्यासपीठ 'मटा'तर्फे देण्यात आले आहे.

बाइक रॅलीच्यानिमित्ताने महिलांची सामूहिक शक्ती एकवटलेली दिसेल. महिलांची ही सामूहिक शक्ती जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा उपक्रमांमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढतो. 'चूल आणि मूल' या संकल्पनेत अडकलेली स्त्री आता बाहेर पडून नोकरी, व्यवसाय करत आहे. अशा सामूहिक उपक्रमातून महिलांना बळ मिळेल. आज महिला विविध क्षेत्रांच्या माध्यमातून बाहेर पडत आहेत. त्यातून महिलांची एकजूट होऊ शकते. रॅलीच्या माध्यमातून महिलांची ताकद दिसून येईल. ...

येथे करा नोंदणी

या रॅलीत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी ''''BikerallyKHP'''' टाइप करुन हा मेसेज 58888 या नंबरवर पाठवावा. किंवा womenbikerally.mtonline.in लॉग ऑन करा.

वास्तववादी आणि पथदर्शी अर्थसंकल्प

$
0
0

डॉ. केदार मारूलकर

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाची सुरूवातच शेरोशायरीने झाली. फुलं खिलाने है मगर का काँटे पुराने है अशी सुरूवात करत एक वास्तवदर्शी अर्थसंकल्पाचे सूतोवाच केले. दीर्घकालीन विचार करून, वास्तवाचे भान ठेऊन लोकप्रिय व सवंग घोषणा पूर्णतः बाजूला ठेवून एक पथदर्शी अर्थसंकल्प थंड डोक्याने सादर केल्याबद्दल अर्थमंत्र्यांचे अभिनंदन केले पाहिजे.

तात्कालिक प्रतिक्रिया म्हणून शेअर बाजाराची घसरण, विरोधी पक्षांची टीका असे स्वाभाविक परिणाम दिसून येतीलच परंतु सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अति श्रीमंतांवर अधिक कर, अनुदानांचे सुसूत्रीकरण यासारख्या बाबीवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. एका बाजूला कंपनी कर पाच वर्षामध्ये ३० टक्क्यावरून २५ टक्क्यापर्यंत खाली आणून कार्पोरेट क्षेत्राला फुले दिली असली तरी विविध सवलती काढून घेत 'काँटे' सुद्धा दिले आहेत. पायाभूत सुविधांच्या विकासासाठी व या क्षेत्रात गुंतवणूक आणण्यासाठी खासगी गुंतवणुकीस चालना देण्याबरोबरच करमुक्त बाँडस आणण्याची घोषणा केलेली आहे.

फॉर्वर्ड मार्केट कमिशन व सेबी यांचे विलीनीकरण करून सट्टेबाजारावर अधिक नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. संपत्ती कर रद्द झाला हे एका अर्थी बरेच झाले. कर गोळा करण्यात येणारा खर्च व महसूल अतिश्रीमंतावर सरचार्ज लावून महसूल राखण्यातही अर्थमंत्री यशस्वी होत आहेत. लघु व मध्यम उद्योगासाठी मुद्रा बँकेच्या माध्यमातून मोठी तरतूद करण्यात आलेली आहे. 'मेक इन इंडिया' साठी मात्र फारसा उल्लेख या १०० मिनिटांच्या भाषणात दिसत नाही. 'मेक इन इंडिया' ही नव्या सरकारची आश्वासक योजना असूनही अर्थसंकल्पात मात्र फारशी दखल घेण्यात आलेली नाही. मोठ्या पूरक व लघु उद्योगांची साखळी निर्माण करून ​अधिक आश्वासक निर्माण करणे शक्य होते.

वैयक्तिक करदात्याला आयकर कलम ८० सीच्या उप कलमामधून अधिकची वजावट मिळणार असल्याने थोडीफार खुशी असली तरी अपेक्षित असलेली एकूण वजावट मात्र मिळालेली नाही. अडीच लाखांची सवलत आणखी वाढेल ही अपेक्षा फोल ठरली आहे. त्यामुळे कर सवलतींमध्ये वैयक्तिक कर दात्यांच्या दृष्टीने काहीच फरक पडलेला नाही. जीएसटी (वस्तू व सेवाकर) एक एप्रिल २०१६ पासून लागू करण्याची घोषणा असली तरी प्रत्यक्ष कर संहिता (डीटीसी) मात्र लागू करण्याबद्दल कोणतीही घोषणा नाही. सेवा कर मात्र १२.२६ टक्क्यावरून १४ टक्क्यावर नेल्यामुळे फोनसारख्या आवश्यक तसेच हॉटेलसारख्या लक्झरी सेवा महाग होणार आहेत. शेती क्षेत्राबाबत फारशी उत्साहवर्धक घोषणा करण्यात आलेली नसली, नाबार्डसाठी केलेली तरतूद साडे आठ लाख कोटी रूपयांची कृषी क्षेत्रासाठी कर्जाची तरतूद, सिंचनासाठी अधिक तरतूद, ग्रामीण पायाभूत विकास फंड अशा काही आश्वासक योजनांचीही पखरण अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. सामाजिक सुरक्षिततेच्या विविध योजना हे या अर्थसंकल्पाचे ठळक वैशिष्ट्य आहे. अल्पसंख्याक युवकांसाठी नई मंझिल योजना 'प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी कार्यक्रम' या बरोबरच पेन्शन स्कीममध्ये गुंतवणुकीस करवजावट, अटल पेन्शन योजना, आरोग्य विम्यासाठी तरतूद यामुळे सामाजिक सुरक्षितता व सर्वसमावेशकता या मुद्द्यावर लक्ष दिल्याचे जाणवते.

कोणत्या राज्याला काय दिले, निवडणुकांचे निकाल व येत्या काळातील निवडणुका समोर ठेवून अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, भारतीय प्रबंधन संस्था, भारतीय तंत्रज्ञान संस्था, संशोधन संस्था याबाबत बरीच चर्चा होत राहील. कारण अर्थशास्त्र हे राज्य शास्त्राशिवाय पुढे जाऊ शकत नाही. परंतु साकल्याने विचार करता दीर्घकालीन विचार करता पथदर्शी म्हणता येईल, असा अर्थसंकल्प सादर केलेला आहे, असे म्हणता येईल. प्राथमिक शाळांची व्याप्ती व पोस्टाला वित्तीय सेवामध्ये समाविष्ट करण्यात आल्याने सार्वत्रिक विकासाला चालना देऊ शकेल असा अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे. वास्तवाचे भान ठेवून लोकप्रियतेपासून अलिप्त राहत एक संतुलित अर्थसंकल्प सादर करण्याचे श्रेय अर्थमंत्र्यांना आणि त्यांच्या टीमला देता येईल.

इएसआयसीचे हॉस्पिटल सुरू करण्याच्या हालचाली

$
0
0



दिल्लीतील अधिकाऱ्यांनी भेट देऊन केली पाहणी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जवळपास १८ वर्षे बंद स्थितीत असलेले येथील इएसआयसीचे हॉस्पिटल सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. इएसआयसीच्या दिल्ली कार्यालयातील दोन इंजिनीअरनी शनिवारी हॉस्पिटलला भेट देवून पाहणी केली. हॉस्पिटल सुरू करण्यासाठी पुन्हा काही सुधारणा नव्याने कराव्या लागणार आहेत, त्याचा अहवाल बनवण्यात येणार आहे.

काही दिवसांपूर्वी इएसआयसीचे पुण्यातील संचालक दीपक जोशी यांनी कोल्हापुरात भेट देवून पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी दिल्लीतून काही अधिकारी पाठवण्याचे आश्वासन ‌दिले होते. त्यानुसार सिव्हिल विभागाचे सहायक इंजिनीअर‌ विनय बाकडे आणि इलेक्ट्रिक विभागाचे सहायक इंजिनीअर एन. सी. तनेजा, पुणे कार्यालयाचे सहायक संचालक ए. के. शर्मा यांनी हॉस्पिटलची पाहणी केली. यावेळी बाकडे म्हणाले, 'हॉस्पिटलचे सध्याची मानके बदलली आहेत, ते लक्षात घेवून इमारतीत काही नव्याने सुधारणा कराव्या लागतील. त्याचा अहवाल आम्ही सादर करू.'
'नव्याने सुधारणा केल्यानंतर महापालिकेचे भोगवटा प्रमाणपत्र, हॉस्पिटलच्या अनुषंगाने फायर, लिफ्ट इत्यादींचे ना हरकत प्रमाणपत्र अशी कागदपत्रे घ्यावी लागतील. त्यानंतर हॉस्पिटल चालवण्यासाठी राज्य इएसआयसीकडे हस्तांतरीत केले जाईल. राज्य इएसआयसीकडे हॉस्पिटल हस्तांतरीत होवून ते सुरळीत चालण्यासाठी आवश्यक असा स्टाफ भरण्याची प्रक्रिया राज्य पातळीवर सुरू होणे आवश्यक आहे,' असे कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशनचे सचिव प्रदीप व्हरांबळे यांनी सांगितले.

ते म्हणाले, 'इएसआयसीचे हॉस्पिटल नसल्याने कामगारांचे फार मोठे नुकसान होत आहे. शहरातील कामगारांसाठी ही योजना आहे. जवळपास ४० हजार कामगार आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या दोन लाख नागरिकांची मोठी गैरसोय होते. दर महिन्याला इएसआयसीची ४ कोटी रक्कम भरली जाते, पण त्याचा योग्य तो लाभ मिळत नाही. त्यामुळे आतातरी तातडीने प्रकिया राबवून हॉस्पिटल सुरू करावे.' यावेळी बांधकाम काँट्रॅक्टरांचे प्रतिनिधी सुग्रीव रावण आणि आर्किटेक्टचे प्रतिनिधी कुंदन साळोखे उपस्थित होते.

विचार मारण्याच्या प्रवृत्तीचा धिक्कार

$
0
0

कॉ. पानसरेंच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

संत तुकारामांपासून कॉ. गोविंदराव पानसरे यांच्यापर्यंत झालेल्या घटनांमधून विचार मारण्याची प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रवृत्तीच्या निषेधाबरोबरच पानसरे यांच्या हल्लेखोरांना तत्काळ अटक करुन फाशी देण्याची मागणी करत कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील खासगी, महापालिका शिक्षक व शिक्षकेतर संघटना कृती समितीच्यावतीने शनिवारी मोर्चा काढला. केशवराव भोसले नाट्यगृहापासून शिवाजी पुतळ्यापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.

मोर्चादरम्यान पानसरे अमर रहे, पानसरेंना लाल सलाम, भ्याड हल्लेखोरांच्या निषेधाच्या घोषणांबरोबर धर्मांध शक्तीचा धिक्कार करण्यात आला. शिवाजी पुतळा येथे मोर्चा आल्यानंतर आदरांजलीची तसेच कारवाई करण्याची मागणी करणारी भाषणे झाली. यावेळी विविध वक्त्यांनी कॉ.पानसरे यांच्या कार्याचा गौरव केला. महापालिकेकडील शिक्षकांचे विविध प्रश्न सोडवण्याबरोबर असंघटित खासगी प्राथमिक शिक्षकांची चळवळ निर्माण करुन न्याय मिळवून दिला. तसेच शिक्षक व सेवकांचे न्यायालयीन खटले कोणताही मोबादला न घेता चालवले होते. त्यांच्या निधनाने वैचारिक मार्गदर्शनाची मोठी पोकळी निर्माण झाल्याचे सांगितले.

हल्ला होऊन दोन आठवडे होत आले तरी अजून तपासात काहीच प्रगती नसल्याबद्दल महाराष्ट सरकारचाही निषेध करण्यात आला. हल्लेखोरांना तत्काळ अटक न झाल्यास कृती समितीच्यावतीने उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी दिला. ज्येष्ठ शिक्षक नेते प्रभाकर आरडे, बाबासाहेब चव्हाण, भरत रसाळे, कुमार दाभाडे, सुधाकर सावंत, राजेंद्र कोरे, संतोष आयरे, उमेश देसाई, पी. एस. घाटगे, विलास पिगळे, द्रोणाचार्य पाटील, सुनील गणबावले, मनोहर सरगर, संजय पाटील यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.

शूट मी, इफ ....

दाभोलकर यांच्यानंतर पानसरे यांच्यावर धर्मांध शक्तींनी हल्ला केल्याचा जाहीर आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पुरोगामी चळवळीच्यावतीने विचार संपवण्यासाठी आणखी किती जणांना गोळ्या घालणार असा सवाल उपस्थित करत शक्य असेल तर मलाही मारा असे आव्हान दिले जात आहे. त्यानुसार या मोर्चामध्येही अनेक शिक्षकांनी 'शूट मी, इफ यू कॅन' असे फलक लावले होते.

तपासासाठी पथके वाढविणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते कॉ. गोविंदराव पानसरे यांच्या हल्लेखोरांचा छडा लावण्यासाठी तेरा दिवसांपासून पोलिस जंग जंग पछाडत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासह कर्नाटक व गोवा या तीन राज्यांमध्ये सुरु असलेल्या तपासासाठी पोलिसांची नेमलेली २३ पथकेही अपुरी पडत असल्याने दोन दिवसात आणखी दोन पथके वाढवण्यात येणार आहेत. तसेच आतापर्यंत नेमलेल्या सर्व पथकांच्या तपासाचा दररोजचा आढावा घेतला जात असला तरी रविवारी सर्वांची एकत्रित आढावा बैठक होत आहे.

दरम्यान, उपचार घेत असलेल्या उमा पानसरे यांचा जबाब घेण्याचा प्रयत्न सुरु असून जोपर्यंत डॉक्टर त्यांची प्रकृती जबाब देण्यासाठी योग्य असल्याचे सांगत नाहीत, तोपर्यंत जबाबाचे काम पूर्ण होणार नाही. त्यांना अजून कॉ.पानसरे यांच्या निधनाची माहिती दिली गेलेली नाही असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

राज्याचे क्षेत्र प्रचंड असल्याने पोलिसांची २३ पथके नेमूनही अनेक विभागात पोहचण्यासाठी दमछाक होत होती. शिवाय शेजारील कर्नाटक व गोवा या दोन राज्यांमध्येही तपास सुरु असल्याने आणखी पथकांची आवश्यकता भासत होती. त्यामुळे प्रशासनाने दोन​ दिवसात आणखी दोन नवीन पथके वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रचंड क्षमतेने ही पथके दिवस रात्र शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी जाहीर केलेल्या फोन क्रमांकावर अनेकजण सूचना देत असतात किंवा एखाद्या व्यक्तीच्या दिशेने इशारावजा माहिती देत असतात. त्यामुळे अशा प्रकारच्या व्यक्तींकडून चौकशी करुन काही धागेदोरे हाती लागतात का हे तपासत आहेत. विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांचीही त्या काळातील वा त्यापूर्वीच्या काळातील हालचालींची माहिती घेऊन त्यांचीही कसून चौकशी केली जात आहे.

प्रत्येक पथकाचा दररोज आढावा

हल्ला झालेल्या दिवशी तीन व नंतर कागलजवळ नदीमध्ये एक अशा चार मोटारसायकल सापडल्या. त्यांचाही तपास केला जात आहे. या मोटारसायकल चोरीच्या असल्याने त्यांच्या चेस नंबरवरुन त्यांचा कुणी कुणी वापर केला याच्या खोलात पोलिस जात आहेत. प्रत्येक पथकाच्या दररोजच्या प्रगतीचा आढावा घेतला जातोच. पण २३ पथकांच्या आतापर्यंतच्या एकूण टप्प्यापर्यंतच्या तपासाची माहिती घेण्यासाठी रविवारी आढावा बैठक घेतली जाणार आहे. त्यातून पुढील तपासाच्यादृष्टीनेही मार्गदर्शन केले जाईल.

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images