Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

दसरा चौक शांत झाला...

$
0
0

पानसरेंचा आवाज घुमणाऱ्या मैदानात गहिवर

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूरचे दसरा चौक मैदान म्हणजे कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या ऊर्जेने नेहमीच चैतन्यमय होणारे ठिकाण. ढिम्म सरकार आणि निद्रिस्त समाजाविरोधात या चौकात पानसरे यांचे शब्द घुमले की, उपेक्षितांना न्याय दिसू लागायचा. चौकाच्या ऐतिहासिक कमानीतून आजवर अण्णांनी जेव्हा-जेव्हा मैदानावर पाऊल टाकले, तेव्हा सभा गाजवूनच ते बाहेर पडले. पानसरे यांच्या भाषणाला नेहमीच टाळ्यांची सलामी मिळाली. पण शनिवारी याच मैदानावर अण्णांचा अचेतन देह पाहून हे मैदान स्तब्ध झाले.

हजारो कोल्हापूरकरांनी सकाळी दहा वाजल्यापासूनच दसरा चौक मैदानावर येण्यास सुरुवात केली. अण्णांचे पार्थिव मुंबईहून कोल्हापूरला कधी येणार या वाटेकडे डोळे लावून बसलेले हजारो करवीरवासी पोरकेपणाने वावरत होते. काही वेळातच भाकपच्या राज्य अधिवेशनासाठी उभारण्यात आलेला येथील मंडप शोकाकूल वातावरणात बुडून गेला. खरे तर या मंडपात अण्णांचा आवाज घुमणार होता आणि मात्र पानसरे यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनाची ही जागा बनली, हा विरोधाभास धक्का देणारा ठरला होता.


पानसरेंना अखेरचा लाल सलाम!

$
0
0



गोविंद पानसरे अनंतात विलीन; शोकाकुल वातावरणात निरोप

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कामगार, कष्टकरी, उपेक्षितांचे नेते आणि महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीचे ऊर्जाकेंद्र असलेल्या कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांना शनिवारी शोकाकूल वातावरणात राज्यभरातील हजारो शोकाकूल अनुयायांनी अखेरचा लाल सलाम केला. कोणत्याही धार्मिक विधीशिवाय पानसरे यांच्यावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मुलगी स्मिता सातपुते, सून मेघा पानसरे, नातू कबीर आणि मल्हार यांनी त्यांच्या पार्थिवास अग्नी दिला.

पानसरे यांच्या निधनाने शनिवारी सकाळपासूनच शहरवासीयांनी उत्स्फूर्तपणे व्यवहार बंद ठेवून आदरांजली वाहिली. शहरातील मुख्य चौकात आणि सार्वजनिक तरुण मंडळांच्या फलकांवर पानसरे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध करून भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. शहरात कडकडीत उत्स्फूर्तपणे बंद पाळला.

कॉम्रेड गोविंदराव पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा यांच्यावर सोमवारी (ता. १६ फेब्रुवारी) अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. पाच दिवस पानसरेंची मृत्यूशी झुंज सुरू राहिली. शुक्रवारी रात्री पावणेअकरा वाजता मुंबईत पानसरेंची प्राणज्योत मालवला. शनिवारी दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी मुंबईतून कोल्हापूर विमानतळावर पानसरे यांचे पार्थिव आणण्यात आले. दुपारी सव्वाच्या सुमारास अंत्यदर्शनासाठी पार्थिव शहरातील मुख्य दसरा चौकात ठेवण्यात आले. नंतर दोन तास येथे राज्यभरातील हजारो लोकांनी तेथे अंत्यदर्शन घेतले. अनेक नेत्यांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. कॉम्रेड सुधाकर रेड्डी, भालचंद्र कानगो यांनी दोन झेंड्याची सलामी देऊन आणि पुष्पचक्र अर्पण करून अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार रामदास आठवले, राजू शेट्टी, धनंजय महाडिक, माजी खासदार जयवंतराव आवळे, आमदार महादेवराव महाडिक, राष्ट्रवादीचे माजी मंत्री छगन भुजबळ, आमदार जितेंद्र आव्हाड, इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार आदींनी अंत्यदर्शन घेतले.

दुपारी तीन वाजता दसरा चौकातून अंत्ययात्रा सुरू झाली. दसरा चौक, बिंदू चौकमार्गे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे रेड फ्लॅग बिल्डिंग हे कार्यालय, शिवाजी पुतळा, सीपीआरमार्गे टाउन हॉल, जुना बुधवार पेठ, तोरस्कर चौकमार्गे अंत्ययात्रा पंचगंगा स्मशानभूमीत आली. तेथे अनेकांनी गोळीबाराच्या प्रकाराबद्दल शोक व्यक्त केला. पानसरे यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याबाबत सरकारने त्वरीत हालचाली कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. रविवारी महाराष्ट्र बंदचाही इशारा देण्यात आला. पंचगंगा स्मशानभूमीत कोणत्याही धार्मिक विधीशिवाय अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कॉम्रेड पानसरे यांचे राहिलेले काम पूर्ण करण्याची जबाबदारी सर्वांची असल्याची भावनिक हाक देत पानसरे यांना अखेरचा लाल सलाम देण्यात आला.

उमा पानसरे हॉस्पिटलमध्येच

गोविंदराव पानसरे यांच्या निधनाचे वृत्त त्यांच्या पत्नी उमा यांना सांगण्यात आलेले नाही. त्यांना शरिरावर उजव्या बाजूवर पक्षाघात झाला आहे. लहान कन्या मेघा बुट्टे या त्यांच्यासमवेत आहेत. त्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित नव्हत्या.

'रेडगार्ड'नी पोलिसांना हटवले

कम्युनिस्ट शिस्तीमध्ये पानसरे यांना अभिवादन करण्यात आले. दसरा चौकात मंचाभोवती लाल टीशर्ट घालून हातात लाल झेंडे घेतलेले 'रेडगार्ड' कार्यकर्ते उभे होते. पार्थिव मंचावर ठेवल्यानंतर पक्षाचा झेंडा अर्ध्यावर आणून सॅल्यूट करण्यात आला. पक्षाच्या परंपरेनुसार पार्थिवावर पक्षाचा ध्वज अर्पण करून अंत्यदर्शन सुरू झाले. तेथे येऊ पहाणाऱ्या पोलिसांना 'रेड गार्डस'नी प्रवेशद्वाराबहेर उभे केले. पोलिस अधीक्षक शर्मा यांनाही कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

आता लढायचं!

कामगार, कष्टकरी, उपेक्षितांच्या क्षीण आवाजाला राज्यशकट हलवण्याची ताकद देणाऱ्या कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांना शनिवारी महाराष्ट्रातील निरनिराळ्या विचारांच्या, पण विवेकी मनाच्या प्रत्येकाने अखेरचा 'लाल सलाम' केला. कोणत्याही धार्मिक विधीशिवाय पानसरे यांच्यावर सायंकाळी कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. अश्रू, त्वेष, संताप अशा भावनांचा कल्लोळ झालेल्या हजारो 'विचार'वंतांनी पानसरे यांच्या पार्थिवाच्या साक्षीनेच पंचगंगा किनारी 'आता लढायचं' अशी शपथ घेतली आणि अण्णांचे विचार अमर असल्याचा संदेश हल्लेखोरी विचारांना दिला.

उमा पानसरेंची सुरक्षा वाढवली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी उमा यांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. उमा यांच्यावर अॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्या प्रत्यक्ष घटनेच्या साक्षीदार असल्याने पोलिस प्रशासनाने बंदोबस्त वाढवला आहे. दरम्यान, सलग सहाव्या दिवशी हल्ल्यातील गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे. पानसरे यांच्या निधनामुळे कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी परिक्षेत्रातील ६०० कर्मचारी कोल्हापुरात दाखल झाले आहेत. दिवसभर पोलिस अधीक्षक मनोजकुमार शर्मा, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अंकित गोयल हे बंदोबस्तात गुंतले असल्याने तपासावर मर्यादा आल्या. २० पथकांकडून तपास सुरू असला तरी मुंबई आणि पुणे क्राइम ब्रॅचच्या पथकांकडे काही जबाबदारी होती. ती पूर्ण झाल्यावर काही कर्मचारी पुन्हा मुंबई व पुण्याकडे परतले.

डाव्यांची महाराष्ट्र बंदची हाक

$
0
0

कोल्हापूर - कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) रविवारी (ता. २२ फेब्रुवारी) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह सर्व डाव्या आणि पुरोगामी संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

भाकपचे राज्य सचिव भालचंद्र कानगो यांनी शनिवारी सकाळी या बंदची घोषणा केली. बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत, त्यात व्यत्यय येऊ नये म्हणून रविवारी बंद पुकारण्यात आला आहे. काँग्रसेच प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांन या बंदला पाठिंबा जाहीर केला. पानसरे यांच्या हत्येच्या निषेधार्थ ११ मार्च रोजी मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहेे.

सीआयडीच्या काही अधिकाऱ्यांनी भाकपचे नेते प्रकाश रेड्डी यांना फोन करून त्याविषयी विचारणा केली. विविध सरकारी विभागांच्यावतीने भरतीसाठीच्या परीक्षा रविवारी (ता. २२) असल्याने हा बंद मागे घ्यावे असे सीआयडीच्यावतीने रेड्डी यांना सांगण्यात आले. त्यावर संतप्त झालेल्या रेड्डी यांनी, 'कोणत्या सरकारी कार्यालयांच्या परीक्षा आहेत, याची माहिती घेत बसण्यापेक्षा पानसरे आणि दाभोलकर यांच्या खुन्यांना पकडण्याचे श्रम घ्या' असे या अधिकाऱ्यांना सुनावले.

मारेकरी सांगा बक्षिस मिळवा

$
0
0

मटा ऑनलाइन वृत्त। कोल्हापूर

कामगार, कष्टकरी, उपेक्षितांचे नेते आणि महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीचे ऊर्जाकेंद्र असलेल्या कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या मारेक-यांचा शोध लावण्यात अद्याप पोलिसांना यश आलेले नाही. पोलिसांनी पानसरेंवर हल्ला करणा-यांची माहिती देणा-यास पाच लाखांचे बक्षिस देण्याची घोषणा केली आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक मनोजकुमार यांनी ही माहिती दिली. यासंदर्भात माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असेही ते म्हणाले. माहिती देण्यासाठी ०९७६४००२२७४ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पोलिसांनी पानसरे यांच्या पत्नी उमा यांची सुरक्षा वाढवली आली आहे. उमा यांच्यावर अॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्या प्रत्यक्ष घटनेच्या साक्षीदार असल्याने पोलिस प्रशासनाने बंदोबस्त वाढवला आहे.

पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा यांच्यावर १६ फेब्रुवारी अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. पाच दिवस पानसरेंची मृत्यूशी झुंज सुरू होती. शुक्रवारी रात्री पावणेअकरा वाजता मुंबईत पानसरेंची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मारेक-यांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी सर्व डाव्या पक्षांसह समाजातील सर्व स्तरातून होत आहे.

‘ज्युनिअर’च्या प्राध्यापकांची लवकरच होणार भरती

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या दोन वर्षांपासून प्राध्यपकांच्या भरतीवरील बंदी उठविण्यात आल्यामुळे यंदा कोल्हापूर विभागातील २७५ ज्युनिअर प्राध्यपकांची नियुक्ती करण्यासाठी प्रस्ताव पुणे आयुक्तालयाकडे पाठविण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून कॉलेजमध्ये रिक्त असलेल्या जागा लवकरच भरल्या जाणार आहेत.

२ मे २०१२ रोजी सरकारने ज्युनिअर कॉलेजमधील भाषेव्यक्तीरिक्त इतर विषयांच्या प्राध्यपकांची नियुक्ती करण्यावर बंदी आणली होती. त्यांनतर ६ सप्टेंबर २०१२ रोजी या निर्णयात बदल करण्यात आला. आणि १९ जुलै २०१४ ला सरकारने या बंदीवरील थोडी शिथिलता आणत भाषा विषयांचे २२५ प्राध्यापकांची नियुक्त करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षामध्ये कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांमधील ज्युनिअर कॉलेजमधील २२५ प्राध्यपकांच्या जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये गणित, इंग्रजी आणि विज्ञान या विषयांचे प्राध्यापक नियुक्त केले जाणार आहेत. ज्या-ज्या कॉलेजमध्ये पदे रिक्त आहेत त्या कॉलेजचा रिक्त पदांबाबत प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविला जातो. ‌तिथून ना हरकत दाखला मिळता या भरती केल्या जातात. मात्र, आजही अनेक कॉलेजमध्ये भाषेशिवाय इतर अभ्यासक्रमांचे प्राध्यापकांची नियुक्ती नसल्यामुळे कॉलेज उसण्या प्राध्यापकांची नियुक्ती करत वेळ निभाविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अनेक कॉलेजच‌ी रिक्त पदांची भरती व्हावी अशी मागणी केली जात आहे.

दोन वर्षांपासून भरती प्रक्रिया रखडलेली

कोल्हापूर विभागातील २२५ पदे भरण्यास परवानगी

२७५ जणांच्या भरतीचा प्रस्ताव पुणे आयुक्तालयात

सरकारने ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यपकांच्या नियुक्तीवरील बंदीवर क्षितिलता आणली असून यावर्षात २२५ प्राध्यपकांची नियुक्ती करण्याची परवानगी दिली आहे. याबाबत २७५ प्राध्यापकांचे प्रस्ताव पुण्याच्या आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. एनओसी मिळताच ही पदे भरली जाणार आहेत.

- संपतराव गायकवाड, सहायक शिक्षण संचालक

उमा पानसरे यांच्या प्रकृतीत सुधारणा

$
0
0



म.टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उमा पानसरे यांची प्रकृती अगदी उत्तम असून रविवारी सायंकाळी त्यांना व्हिलचेअरवर बसून फिरण्यास डॉक्टरांनी परवानगी दिली. व्हिलचेअरवर बसून फेरफटका मारताना त्यांनी आयसीयू बाहेरील नातेवाईक, कार्यकर्त्यांना हात हलवून प्रतिसाद दिला असल्याचे जावई बन्सी सातपुते यांनी सांगितले. उमा पानसरे यांना अजूनही भेटू दिले जात नाही. तसेच त्यांच्यापर्यंत गोविंद पानसरे यांच्या निधनाची माहिती दिलेली नाही.

दरम्यान, रविवारी सकाळी पोलिस अधिक्षक मनोजकुमार शर्मा हॉस्पिटलमध्ये जाऊन उमा पानसरे यांचा जबाब घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी घटनास्थळाजवळील काही प्रत्यक्षदर्शीनी सांगितलेल्या माहितीवरुन पोलिसांनी रेखाटलेले रेखाचित्र दाखवण्यात आल्याचे समजते. पानसरे यांना यापूर्वी जी रेखाचित्रे दाखवली. त्याबाबत व सध्याच्या रेखाचित्रबाबतही त्यांची प्रतिक्रिया सारखीच असल्याचे दिसून आले. पोलिसांनी पानसरे यांच्या घरी असलेल्या स्नुषा मेघा यांच्याकडेही यापूर्वीच्या जुन्या काही घटनांची, वादग्रस्त फोनबाबतची माहिती घेतली आहे.

रक्षा सोमवारी जमा करणार

पानसरे यांची रक्षा मिळावी अशी मागणी अनेक कार्यकर्त्यांनी केली होती. त्यामुळे जावई बन्सी सातपुते यांनी कुटुंबिय व कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर प्रत्येक तालुक्याच्या, जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांना रक्षा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. त्यासाठी सकाळी नऊ वाजता पंचगंगा स्मशानभूमी येथे सर्वांच्या सहकार्याने रक्षा जमा करणार आहेत. ती राज्यातील इतर जिल्ह्यात, तालुक्यांमध्ये पाठवून त्याच्या प्रेरणेतून हजारो पानसरे निर्माण व्हावीत, अशी अपेक्षा असल्याचे सातपुते यांनी सांगितले.

घराच्या कानाकोपऱ्यात वावरताना अण्णांचं 'नसणं' असह्य झाल्याने त्यांच्या स्नुषा मेघा आणि नातू कबीर व मल्हार यांनी ​रविवारी दुपारनंतर आधार हॉस्पिटलच गाठले. उमा पानसरे यांना भेटून त्यांच्या सहवासात वेळ घालवून अण्णांच्या वियोगाचे दु:ख हलके करण्याचा प्रयत्न केला. मात्र अण्णांच्या घरातील सन्नाटा अंगावर शहारे आणणारा असल्याची भावना पानसरे कुटुंबीयांनी व्यक्त केली.

कम्युनिस्ट विचारधारेवर हल्ला

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांचा खून हा कम्युनिस्ट विचारधारेवरचा हल्ला आहे. पानसरे यांची लढाई रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत सुरु राहिल,' असे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय सचिव मंडळाचे सदस्य शमीम फैजी यांनी रविवारी येथे केले. भाकपच्या २२ व्या राज्य अधिवेशनाला रविवारी सकाळी सुरुवात झाली. पानसरे यांना श्रद्धांजली वाहून अधिवेशनला सुरुवात झाली. त्यानंतर खुल्या सत्रामध्ये राज्य सचिव भालचंद्र कानगो यांनी पानसरे यांच्या खुनाच्या निषेधार्थ देशातील डाव्या आघाडीच्या सहा पक्षांकडून पुढील आठवड्यात संकल्प दिनाचे नियोजन केले असल्याचे सांगितले.

फैजी म्हणाले, 'देशाच्या आदर्श मूल्यांची लढाई आम्ही लढतो. कम्युनिस्टांना हल्ले नवीन नाहीत. अशा दु:खाना सहन करून नव्या शक्तीसह आम्ही पुन्हा लढाईत दाखल होतो. पानसरेंवर झालेला हा हल्ला कम्युनिस्ट विचारधारेवर झालेला हल्ला आहे. देशातील सामान्य जनता, धर्मनिरपेक्षतताविरोधी शक्तींचा हा हल्ला आहे. '

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उदय शर्मा म्हणाले, 'स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे आव्हान आता निर्माण झाले आहे. लोकशाही आणि विकासाच्या कव्हरमध्ये फॅ‌सिस्ट हिंदू राष्ट्राचा कार्यक्रम पुढे रेटला जात आहे. हिटलरसारखे दोन चेहरे असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी गरीबांच्या विकासाची आणि भ्रष्टाचार मिटवण्याची भाषा बोलतात, पण त्यांचा वास्तविक अजेंडा वेगळा आहे. पानसरे त्यांच्या मुळावरच हल्ला करत होते म्हणून त्यांचा खून करण्यात आला आहे.' जनता दल सेक्युलरचे राज्यसचिव शिवाजीराव परुळेकर, लाल निशाण पक्षाचे सुभाष गुरव यांनी डाव्या पुरोगामी संघटनांची एकजूट उभी केली जाईल, असे मत व्यक्त केले.

किसानसभेचे राज्य सचिव नामदेव गावडे, तानाजी ठोंबरे, प्रतिभा उटाणे, माधुरी क्षीरसागर, प्रकाश नार्वेकर यांच्या अध्यक्षीय मंडळाच्या देखरेखीखाली अधिवेशन सुरू झाले. यावेळी राष्ट्रीय कौन्सिल सदस्य मनोहर देशकर, राज्य सहसचिव तुकाराम भस्मे, राष्ट्रीय काऊन्सिल सदस्य सुभाष लाडे, नामदेव चव्हाण, शिवकुमार गणवीर, मनोहर टाकसाळ आदी उपस्थित होते. उटाणे यांनी शोक ठराव मांडला. सुशील लाड यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हासचिव एस. बी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. शहर सचिव अनिल चव्हाण, शहर सहसचिव सुभाष वाणी यांनी स्वागत केले. रडायचं नाही लढायचं, आम्ही सारे पानसरे

ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या निधनामुळे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या २२ व्या राज्य अधिवेशनाचे उदघाटन रविवारी घेण्यात आले. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन घेऊन कार्यकर्त्यांनी तत्वाशी बांधिलकी व निर्धार स्पष्ट केला. शिवाय पानसरे यांनी दिलेला 'रडायचं नाही लढायचं' हा विचार कार्यकर्त्यांनी पुरेपूर आचरणात आणला. कार्यकर्त्यांनी पानसरेंना आदरांजली वाहिलीच, पण या भ्याड हल्ल्याने खचून जाता पानसरेंची ऊर्जा, विचार हजारो कार्यकर्त्यांमध्ये उतरल्याने त्यांनी अधिवेशनादरम्यान 'आम्ही सारे पानसरे' अशा घोषणा देऊन देशव्यापी संकटाला तोंड देण्याचा निश्चय केला.


महापौर राजीनामा न देण्यावर ठाम

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापौर तृप्ती माळवी यांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नगरसेविकांच्या माध्यमातून केलेला प्रयत्नही फोल ठरला. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सूचनेनुसार पक्षाच्या नगरसेविकांनी रविवारी माळवी यांची भेट घेऊन राजीनाम्यासंदर्भात चर्चा केली. मात्र त्यांनी भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्ट केल्याने महापौरांच्या राजीनाम्यावरून संघर्ष वाढणार आहे.

लाचखोरीच्या प्रकरणामुळे राष्ट्रवादीची बदनामी सुरू असून माळवींनी राजीनामा दिला नाही तर त्यांची पक्षातून हकालपट्टी करू असा इशारा माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी २० फेब्रुवारी रोजी दिला. त्याच दिवशी मुश्रीफ यांनी पक्षाच्या नगरसेवकांसोबत सर्किट हाउसवर चर्चा केली होते. त्यावेळी ठरलेल्या निर्णयानुसार पक्षाच्या नगरसेविकांनी रविवारी दुपारी माळवी यांची भेट घेतली. सुनीता राऊत, ज्योत्स्ना मेढे, शारदा देवणे, वंदना आयरेकर, माधुरी नकाते, रेखा आवळे, रोहिणी काटे, कांदबरी कवाळे यांचा यात सहभाग होता. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवारही उपस्थित होते. यावेळी माळवी यांनी, मी हॉस्पिटलमध्ये असताना कारभारी नगरसेवकांनी ठरावावर सही घेण्याची घाई का केली अशी उलट विचारणा केली. दरम्यान, माळवी यांनी २८ फेब्रुवारीपर्यंत राजीनामा दिला नाही तर पक्ष कारवाई करणार आहे असे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी सांगितले.

काही नगरसेविका मला रविवारी दुपारी भेटल्या. मात्र माझी भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली आहे. माझ्यावर जो अन्याय झाला आहे, तो नेत्यांपुढे मांडले आहे. मी यापुढेही काम करत राहणार आहे. त्यामुळे राजीनाम्याचा संबंधच नाही.

- तृप्ती माळवी, महापौर

वृद्ध कलावंताना १ मेपासून पेन्शन

$
0
0



अनुराधा कदम, कोल्हापूर

उमेदीच्या काळात चित्रपट क्षेत्रात पडद्यावर आणि पडद्यामागे काम करणाऱ्यांना त्यांच्या उतारवयात आर्थिक आधार देण्यासाठी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने त्यांना पेन्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महामंडळाच्या वार्षिक निधीतून दरवर्षी २५ लाख रूपयांची तरतूद या पेन्शन वितरणासाठी करण्यात येणार असून येत्या एक मेपासून पहिल्या टप्प्यातील ६० वृद्ध कलावंतांच्या हातात दरमहा ५०० रूपयांचे पेन्शन देण्यात येणार आहे. महामंडळातर्फे सर्व्हेक्षण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे वृद्ध कलावंतांना त्यांच्या ग्रेडनुसार पेन्शन देण्यात येते. त्यासाठी जिल्ह्यातील समाजकल्याण विभागातर्फे प्रस्ताव सांस्कृतिक मंत्रालयाकडे पाठवावा लागतो. मात्र गेल्या सात वर्षापासून कोल्हापुरातील वृद्ध कलावंतांच्या प्रस्तावाच्या फाइल प्रलं​बित होत्या. गेल्या वर्षी चित्रपट महामंडळाच्या पुढाकाराने प्रलंबित प्रस्तावाला गती देण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान चित्रपट महामंडळाकडे दरवर्षी सदस्य नोंदणी, अनुदानाच्या रक्कमेतील टक्केवारी आणि चित्रशारदा या मासिकांच्या विक्रीतून चाळीस ते पन्नास लाखांचा निधी संकलित होतो. या निधीपैकी काही रकमेची तरतूद वृद्ध कलावंतांच्या पेन्शनसाठी राखून ठेवण्याचा विचार पुढे आला.

योग्य लाभार्थींना या पेन्शनचा लाभ मिळावा यासाठी गरजू वृद्ध कलावंतांची माहिती घेण्यात येणार असून यासाठी चित्रपट महामंडळाच्यावतीने एक समिती नेमण्यात येणार आहे. यामध्ये कोल्हापूर, मुंबई आणि पुणे येथील प्रत्येकी १५ तर इतर शहरातील १५ वृद्ध कलावंतांची नावे निश्चित करण्यात येणार आहेत. सध्या दरमहा ५०० रूपये पेन्शन स्वरूपात देण्यात येणार आहेत.

आर्थिक आधार मिळेल

सध्या राज्य सरकारच्यावतीने कलावंतांच्या ग्रेडनुसार एक हजार ते २२०० रूपये पेन्शन मिळते. महामंडळातर्फे देण्यात येणारी पेन्शनची रक्कम जरी कमी असली तरी अनेक वृद्ध कलावंतांना यामुळे आर्थिक आधार मिळणार आहे. ही पेन्शन महामंडळाच्या आर्थिक निधीतून देण्यात येत असल्यामुळे महामंडळावरही अधिक आर्थिक भार न देता कलावंतांच्या मदतीसाठी हे पाऊल उचलले आहे, असे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर सांगितले सांगितले.

काश्मिरी मुलींना शिक्षणाची दिशा

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'मी गेल्या दहा वर्षांपासून काश्मिरमधील बॉर्डलेस वर्ल्ड फाउंडेशनच्या होस्टेलमध्ये रहाते. यापूर्वी माझं जीवन कसं होतं ते माहीत नाही. पण फाउंडेशनचे अध्यक्ष जहुर शेख यांनीच मला लहानाचं मोठं केलं. आज आम्हाला शिक्षणाची दिशा मिळाली. गेल्या पाच दिवसांपासून महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृतीची ओळख झाली' असं काश्मिरची सुमेहेरा सांगते. बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनच्यावतीने गेल्या पाच दिवसांपासून काश्मिरमधील सात अनाथ मुलींना महाराष्ट्राची ओळख होण्यासाठी काही ठिकाणांची सफर घडवण्यात आली.

पन्हाळा, श्री अंबाबाई मंदिर, कणेरी मठ, न्यू पॅलेस परिसर पाहून त्यांनी अनुभव व्यक्त केले. न‌ाशिकमध्ये मराठी शिकण्यासाठी प्रयत्न केला असे या मुलींनी सांगितले. सागर बगाडे यांनी यावेळी पेपर क्विलिंग कला शिकवल्याची आठ‌वणी घेऊन त्यांनी आज परत काश्मिरला जाण्याचा मार्ग धरला.

काश्मीर नेहमीच दहशतीखाली आहे. अनेक कुटूंबे उध्वस्त झाली आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत मुलींचा सांभाळ, संगोपन आणि प्रशिक्षण देण्याचे कार्य फाउंडेशन करत असल्याचे अध्यक्ष जहूर शेख यांनी सांगितले.

अदिक कदम म्हणाले, 'काश्मिरमध्ये महिला व मुलींच्या अनेक अडचणी आहेत. अनाथ मुलींना घरं आणि वेगवेगळ्या व्यवसायचे प्रशिक्षण देऊन उद्योग उभारण्याची दिशा दाखविणार आहे.' यावेळी गणी आजरेकर, मिलींद धोंड,‌असिफ जमादार आदी उपस्थित होते.

वाघाच्या कातड्याची तस्करी

$
0
0



आजऱ्यात कारवाई; पोलिसांकडून टोळी जेरबंद

म. टा. वृत्तसेवा, आजरा

आंतरराष्ट्रीयस्तरावर बहु-जैवविविधतेसाठी सुपरिचित असलेल्या पश्चिम घाट परिसरामध्ये अंतर्भूत होणाऱ्या आणि विशेषत: जेथे काही पट्टेरी वाघांचे अस्तित्व आहे, अशा कोकण परिसरात वावरणाऱ्या पट्टेरी वाघांच्या कातडीची तस्करी करण्यासाठी निघालेल्या एका टोळीस रविवारी दुपारी आजऱ्यातील एका हॉटेलनजिक झालेल्या कारवाईत जेरबंद करण्यात आले. याबाबत सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) तालुक्यातील तीन तर साळगाव (ता.आजरा) येथील दोघांना अटक करण्यात आली. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई केल्याचे आजरा पोलिसांतून सांगण्यात आले. मात्र दुपारी बारा वाजता कारवाई होऊनही रात्री उशीरापर्यंत पोलीस निरिक्षक सी. बी. भालके यांच्याकडून या संदर्भातील माहिती मिळत नव्हती. याबाबत नागरिकांतूनन आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.

या प्रकरणामध्ये कोकणातील किरण सखाराम सावंत ( वय ३७, रा. कलमबिस्त-गणशेरवाडी, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग ), अशोक वासुदेव राऊळ ( वय ५४, रा. कलमबिस्त-दुर्गमवाडी, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग ), पुंडलिक तुकाराम कदम ( वय ४४, रा. वेर्ले-हरीजनवाडी, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग ) यांच्यासह प्रल्हाद बाळासाहेब पाटील (वय ३२) व बाळकृष्ण सदाशिव देवलकर ( वय ३८, दोघेही रा. साळगाव, ता. आजरा, जि. कोल्हापूर ) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

आजरा शहराकडून गडहिंग्लजकडे जाणाऱ्या मार्गावरील सुशांत पेट्रोल पंपानजिकच्या अजिंक्यतारा हॉटेलनजिकच्या बोळामध्ये ही कारवाई करण्यात आली. यामध्ये हे आरोपी इनोव्हा मोटारीमधून आल्याचे सांगण्यात आले. त्यांच्याजवळ एका पट्टेरी (ढाण्या) वाघाचे कातडे आढळून आले. याबाबतचा व्यवहार पाच लाखांना करण्यात येणार होता. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये या कातड्याची किंमत साधरणत: पंचवीस लाखाहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

$
0
0



म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नरेंद्र दाभोलकर यांच्या हल्लेखोरांचा शोध लावण्यात अपयश आल्याबद्दल तत्कालिन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता गोविंद पानसरे यांच्या हल्लेखोरांचे सात दिवसानंतर धागेदोरेही मिळत नसल्याने त्याच्या अपयशाची जबाबदारी स्वीकारत फडणवीस यांनी राजीनामा द्यावा व पूर्वी स्वतः केलेल्या मागणीची अंमलबजावणी करावी, अशी जोरदार मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या २२ व्या राज्य अधिवेशनात रविवारी करण्यात आली. तसेच जातीचे व धर्माचे विषारी राजकारण करणाऱ्या संघटनांवर बंदी घालण्याची मागणीही अधिवेशनात करण्यात आल्याचे राज्य सरचिटणीस भालचंद्र कानगो यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

अधिवेशनातील ठरावाची माहिती देताना कानगो म्हणाले, 'पक्षाच्या अधिवेशनामध्ये पानसरे यांच्या हत्येचा निषेध करणारा ठराव तर मांडलाच. पण त्याच्या मास्टर माईंडला पकडून कडक शिक्षा व्हावी असा ठराव करण्यात आला. तपास करण्यात दिरंगाई केली तर उग्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल, अशी सरकारला जाणीव करुन द्यावी, अशीही मागणी करण्यात आली. सरकारला कृती करण्यास भाग पाडण्याबरोबर कार्यकर्ता पातळीवर कृती कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यात २ मार्चला या मागणीसाठी जिल्ह्याच्या व तालुक्याच्या ठिकाणी निदर्शने करण्यात येणार आहेत.

११ मार्च रोजी मुंबईत आयोजीत केलेल्या सामाजिक अत्याचार विरोधी चळवळीच्या मोर्चात भाकपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. तर सहा डाव्या पक्षांनी देश पातळीवर संकल्प दिन म्हणून आयोजन करण्याचे ठरवले असल्याचे आयोजीत केला आहे. तसेच पानसरे यांनी लिहिलेल्या शिवाजी कोण होता?, मुस्लिमांचे लाड, राजर्षी शाहू वसा आणि वारसा, मार्क्सवादाची तोंडओळख, द्विवर्ण शिक्षण पद्धती अशा पाच पुस्तिकांच्या प्रत्येक दहा हजार प्रती छापून येत्या चार महिन्यात ते खपवण्याचा संकल्पही अधिवेशनात करण्यात आला.' तसेच शनिवारी व रविवारी जनतेने उत्स्फूर्तपणे व्यवहार बंद ठेवल्याने जनतेच्या संतापाचे भान सरकारला यावे अशी परिस्थिती आहे. त्याचबरोबर पानसरे यांनी पक्षापलिकडे जाऊन केलेल्या कार्याची ही सलामीच आहे. त्यामुळेच पानसरे यांनाच हल्ल्यासाठी का निवडले याचा खुलासाही होत असल्याचे कानगो यांनी सांगितले.

...तर मुख्यमंत्र्यांना जाब विचारू

मुंबई येथील पक्षाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटण्यास गेले होते. त्यावेळी झालेल्या चर्चेत आमदार कपिल पाटील यांनी आयबीच्या इशाऱ्याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली होती, असे अखिलेश गौड यांनी दिलेली माहिती खरी असेल तर गंभीर आहे, असे कानगो यांनी सांगितले. त्यानुसार कारवाई का झाली नाही, याचा जाब मुख्यमंत्र्यांना विचारावा लागेल. जर कारवाई केली असेल तर काय परिणाम झाला याचीही माहिती जनतेसमोर ठेवावी.

बक्षिसाच्या आवाहनावरून तपासात अपयश

पोलिसांच्यावतीने करण्यात आलेल्या आवाहनावरुन तपासात त्यांच्या हाती काही लागलेले नाहीत असे स्पष्ट दिसत असल्याचे भालचंद्र कानगो यांनी पत्रकारांना सांगितले. नरेंद्र दाभोलकर यांच्या हल्लेखोरांची माहिती देण्यासाठी आघाडीच्या सरकारने दहा लाखांचे बक्षिस जाहीर केले होते. तेव्हाही काही झाले नाही, असेही कानगो म्हणाले.

अपंगांना ‘गुरुदत्त’चा आधार

$
0
0


म. टा. वृत्तसेवा,जयसिंगपूर

'अहंकार संपतो तेंव्हाच माणसाच्या जीवनाची खरी सुरूवात होते. मनातील चांगला विचार माणसाची प्रगती साधतो. शेतकरी शेतातील तण काढतो त्याप्रमाणे प्रत्येकाने वाईट विचार सोडून मनाची मशागत केली पाहिजे. ध्येय निश्चित करून वाटचाल केल्यास यश निश्चित मिळते,' असे प्रतिपादन बिहारचे माजी राज्यपाल डॉ.डी.वाय पाटील यांनी केले.

शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी येथे गुरूदत्त शुगर्स, ज्ञानेश्वर मुळे एज्युकेशन सोसायटी व भगवान महावीर विकलांग सहायता समिती जयपूर यांच्यावतीने अपंगांना कृत्रिम पाय देण्यात आले. यावेळी डॉ.पाटील बोलत होते. याप्रसंगी न्यूयॉर्कचे कॉन्सुलेट जनरल ज्ञानेश्वर मुळे, गुरूदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे, आमदार उल्हास पाटील, नारायण व्यास प्रमुख उपस्थित होते.

यावेळी बोलताना माधवराव घाटगे म्हणाले, 'अल्पावधीत प्रगती करणाऱ्या गुरूदत्त शुगर्सने महापुराच्या काळात पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला तसेच सामाजिक बांधीलकी जपली. प्रत्येक वर्षी पंढरपूरच्या वारीत गुरूदत्त कारखान्याच्यावतीने वारकऱ्यांना मोफत औषधोपचार दिले जातात. सध्या या साखर कारखान्याचा रिकव्हरीत देशात दुसरा क्रमांक आहे.'

ज्ञानेश्वर मुळे म्हणाले, 'माणसाला पाय नसतो तेंव्हा पायाची खरी किंमत कळते. यामुळेच अपंगांना कृत्रिम पाय देण्याचा निर्णय घेतला. टाकळीवाडीच्या माळरानावर नंदनवन फुलविणाऱ्या माधवराव घाटगे यांनी समाजाला नेहमीच मदतीचा हात दिला. आता गुरूदत्त शुगर्स हे सामाजिक उपक्रमाचे केंद्र बनावे. जिल्ह्याच्या विकासासाठी सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, बुध्दीजिवी संस्थांचे संशोधन केंद्र व्हावे. यासाठी आपण सर्वतोपरी मदत करू.'

यावेळी भगवान महावीर विकलांग सहायता समिती जयपूरचे नारायण व्यास यांनी उपक्रमाची माहिती दिली. आमदार उल्हास पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. लक्ष्मी मटाले, बाबाजी यादव, गुंडू व्होसकल्ले, बाळासो लाटकर, राज पाटील या अपंगांना जयपूर फूट देण्यात आले. शेतकरी कै.आण्णाप्पा चौगुला, कै.बाळू नरूटे, ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार कै.कोमल पाळवदे या मृतांच्या कुटुंबियांना तसेच अपघातग्रस्त कर्मचारी मच्छिंद्रनाथ डवरी यांना विम्याचा धनादेश देण्यात आला.

दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरूवात झाली. माजी उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील, कॉम्रेड गोविंद पानसरे यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. आभार संचालक बबन चौगुले यांनी मानले. याप्रसंगी गुरूदत्तचे एक्झीक्यूटीव्ह डायरेक्टर राहुल घाटगे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक निंबाळकर, अनिल यादव, अशोकराव माने, धनाजीराव जगदाळे, धीरज घाटगे, तहसीलदार सचिन गिरी आदी उपस्थित होते.

तीन जिल्ह्यातील अपंगांना मदत

कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील ३०० हून अधिक अपंगांनी कृत्रिम पाय मिळविण्यासाठी नोंदणी केली आहे. त्यांच्या पायाच्या आकारानुसार कृत्रिम पाय तयार करून देण्यात येणार असल्याचे गुरूदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे यांनी सांगितले.

‘गोकुळ’च्या हरकतींवर सुनावणी सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत दुबार ठराव केलेल्या आणि मृत सभासद, नावातील चूक असलेल्या सभासदांबाबत हरकती घेण्यात आल्या होत्या. या सर्व हरकतींवर सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे. हरकती घेतलेल्या सुमारे १३२ संस्थांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. यातील तब्बल ८८ हरकती या माजी मंत्री सतेज पाटील यांच्या गटाने घेतल्या आहेत.

गोकुळ दूध संघासाठी गावातील राजकारण अधिकाऱ्यांच्या केबिनपर्यंत पोहचत आहे. त्यामुळे गावातील वादांना अधिकऱ्यांच्या कार्यालयात पुन्हा तोंड फुटते. या सर्व प्रकारामुळे अधिकारी त्रस्त झाले असून आता चुकीचे काम केलेल्या सर्वांनाच नोटीसा काढण्यात येत आहेत. त्यातच दुबार ठराव केलेल्या संस्था दोषी आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या संस्थांबाबतचा निकाल दोन दिवसात देण्यात येणार आहे. संस्थांसाठी घेण्यात आलेल्या हरकतींमध्ये कार्यक्षेत्राबाहेरील व हयात नसलेल्या मतदारांबाबतच्या हरकतींचा समावेश आहे. याशिवाय मतदारांच्या नावात छपाईतील तसेच इतर किरकोळ चूक असल्याबाबतच्या ३५ हरकती आहेत तर याशिवायही अन्य कारणांसाठीच्या २६ हरकती आहेत. सर्व प्रकारच्या १४९ हरकती दाखल झाल्या असून त्यांच्यावर २ मार्चपूर्वी निर्णय घ्यायचा आहे. तसेच दुबार ठरावांवरील २२ हरकतींवरील सुनावणी पूर्ण झाली आहे.

गोकुळ दूध संघासाठी अंतिम यादी ७ मार्चपर्यंत प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यापूर्वी सुनावणी आणि हरकती निकालात काढण्यात येणार आहेत. हरकती घेण्यात आलेल्या संस्थांची सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यासाठी संस्थाना २५, २६ आणि २७ फेब्रुवारी अशी वेळ देण्यात आली आहे. या वेळेत संस्थांना आपले म्हणणे स्वतः किंवा वकीलांच्या माध्यमातून मांडावे लागणार आहे. संस्थांनी आपले म्हणणे न मांडल्यास त्यावर निवडणूक अधिकारी निर्णय घेऊन ती संस्था निवडणुकीस अपात्र देखील ठरवू शकतात.

संस्थांच्या हरकती घेताना अत्यंत किरकोळ बाबींची सुद्धा तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांचे काम वाढले असले तरी संस्थांना अत्यंत काटेकोरपणे नियमांची अंमलबजावणी करून काम करावे लागत आहे. गावातील राजकारणामुळे या तक्रारी करण्यात आल्या आहेत. यामुळे संस्थांची डोकेदुखी वाढली असली तरी आपले नाणे वाजवून घ्यावे लागणार आहे.


‘एव्हीएच’प्रश्नी पुन्हा मोडतोड

$
0
0

चंदगडमधील कृती समितीची प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांशी खडाजंगी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एव्हीएच कंपनीने सुरू केलेल्या उत्पादनाला स्थगिती द्यावी, या मागणीसाठी चंदगड एव्हीएच विरोधी जनआंदोलन कृती समितीने सोमवारी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. अधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यात तासभर खडाजंगी झाली. शाब्दिक बाचाबाची आणि शिवीगाळही करण्यात आली. आंदोलकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ प्र्रादेशिक अधिकारी एस. एस. डोके यांनाही कार्यालयाबाहेर उचलून नेण्याचा प्रयत्न केला. प्रकल्पाला स्थगिती दिल्याचा लेखी आदेश मिळत नसल्याच्या निषेधार्थ संतप्त झालेल्या आंदोलकांनी उद्योग भवन कार्यालया समाेर जाळपोळ केली. उद्योग भवनाचे गेटही तोडून गेटची एक भिंतही पाडण्याचा प्रयत्न केला. सरकारच्या निषेधार्थ घोषणा देत सुमारे दोन तास परिसरातील वातावरण तंग झाले. प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. सुमारे दीड हजार आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडले.

दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास चंदगडच्या ए. व्ही. एच विरोधी जनआंदोलन कृती समितीचे कार्यकर्ते टाळ मृदुंगाच्या गजरात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयासमोर जमले. प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी एस. एस. डोके यांच्यासमवेत शिष्टमंडळाने चर्चा केली. कृती समितीच्या डॉ. नंदिनी बाभुळकर म्हणाल्या, एव्हीएच प्रकल्पाला स्थगिती आदेश दिल्याचे पत्र तुम्हाला मंत्रीमहोदयांनी दिले आहे. त्यामुळे प्रकल्पाला स्थगितीचा लेखी आदेश दिल्या शिवाय आंदोलक येथून जाणार नाहीत. आमदार संध्यादेवी कुपेकर म्हणाल्या, तुम्ही रहिवाशांची हित पाहणार आहे, की कंपनीच्या अधिकाऱ्यांना पाठबळ देणार आहे. त्या वेळी अधिकारी डोके म्हणाले, प्रकल्पाला स्थगिती दिल्याचे कोणाचेही पत्र नाही. त्यामुळे मी प्रकल्प स्थगित केल्याचा लेखी आदेश देऊ शकत नाही, असे सांगितल्याने आंदोलक आणखीनच संतप्त झाले. या वेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनीही प्रकल्प बेकायदेशीर असल्याचा आरोप करुन आंदोलकांना पाठिंबा दिला. मात्र अधिकारी डोके यांनी स्थगिती आदेश देण्याचा निर्णय घेऊ शकत नसल्याचे सांगितल्याने कार्यकर्ते अधिकच संतप्त झाले. अधिकारी डोके यांना धक्काबुक्की आणि कार्यालयाबाहेर ओढून नेण्याचा प्रयत्न केला.कार्यालयातील काही वस्तूंची तोडफोड करण्याचा प्रयत्न करीत, घोषणाबजी करीतच आंदोलक उद्योग भवनाच्या गेट समोर आले.

मंडळाने काहीच निर्णय न दिल्याने संतप्त झालेले आंदोलक उद्योग भवनाच्या मुख्य गेटजवळच आले. त्यांनी गेटची मोडतोड करुन संरक्षक भिंतही पाडण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस आणि कार्यकर्त्यांच्यात बाचाबाची झाली. काही आंदोलकांनी शिवीगाळ केल्याने वातावरण संतप्त झाले. प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. या वेळी आंदोलकांची धरपकड करण्यात आली. कृती समितीचे संग्रामसिंह कुपेकर, रामराजे कुपेकर, विष्णू गावडे, पांडुरंग बेनके, प्रा. एन. एस. पाटील, अॅड. संतोष मळगीकर आदींच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. कृष्णराव रेंगडे, शिवाजीराव तुषारे, देवाप्पा बोकडे, अशोक कांबळे, शामराव मुरकटे यांच्या सह सुमारे पन्नास गावांतील समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले.


प्रशासनाकडून काम सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यानुसार आम्ही कायद्यानुसार काम सुरू केले आहे. कोणातीही आदेश धाब्यावर बसविलेला नाही. काम थांबविण्याचे, स्थगितीचा आदेश मिळालेला नाही

- आनंद कामोजी, एव्हीएच सहाय्यक सरव्यवस्थापक

एव्हीएच प्रकल्पाच्या उत्पादन सुरू करण्याच्या दिलेल्या आदेशाला स्थगिती देऊन प्रकल्पाची पुनर्तपासणी करावी, जनसुनावणी घेण्याचे आदेश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिले. मात्र आदेश असूनही पर्यावरण विभागाच्या मुख्य सचिवांनी अद्याप स्थगितीचे आदेश काढले नाहीत.

- डॉ. नंदिनी बाभूळकर, एव्हीएच विरोधी जनआंदोलन कृती समिती

धार्मिक दहशतवाद देशासाठी धोकादायक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'निकोप समाजनिर्मितीसाठी सर्वच जाती-धर्मांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. धर्म आणि जातीच्या भिंतीपलीकडे जात नसल्याने वाढलेला धार्मिक दहशतवाद देशासाठी धोक्याचा आहे,' असे प्रतिपादन डॉ. सुधीर गव्हाणे यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक वंचितता आणि समावेशक धोरण अभ्यास केंद्रातर्फे आयोजित परिसंवादाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे होते.

'सामाजिक भेदभाव आणि सद्यःस्थितीतील भारतीय माध्यमे' या विषयावर परिसंवादाची सुरुवात सोमवारपासून झाली. यावेळी डॉ. सुधीर गव्हाणे म्हणाले, 'देश अजूनही एकसंध नाही. जाती, धर्म, लिंग आधारित भेदभाव आहे. महिला आणि दुर्बल घटकांवर अन्याय वाढला आहे. धर्म आणि जातीय वाद अजूनही आहे. जातीपातीच्या पलीकडे जाऊन काम केले जात नाही. या जातीच्या भिंती पाडण्याची आज गरज आहे. आंतरजातीय आणि आतंरधर्मीय विवाहाला प्राधान्य देण्याची गरज आहे.'

कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे म्हणाले, 'वंचित समाजाचा आवाज समाजव्यवस्थेत दाबला जात आहे. हा आवाज माध्यमांनी ऐकून न्याय मिळवून द्यावा.' ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर म्हणाले, 'सामाजिक जाणीव जागृत असलेल्या लोकांनी प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचले पाहिजे.' प्रा. रमेश दांडगे यांनी प्रास्ताविक केले. अविनाश भाले यांनी सूत्रसंचालन केले. नीलिशा देसाई यांनी आभार मानले.

आग लगी है सीने में...

$
0
0

दुःखावेग विसरून पानसरे कुटुंबीयांची अधिवेशनाला उपस्थिती

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य अधिवेशनाचा सोमवारचा शेवटचा दिवस कॉम्रेड्सच्या धैर्याची परीक्षा घेणारा ठरला. कॉ. गोविंदराव पानसरे यांनी घालून देलेल्या कर्तव्याच्या वाटेवर चालत त्यांची कन्या कॉ. स्मिता सातपुते आणि सून प्रा. मेघा पानसरे दुःखावेग विसरून अधिवेशनाला उपस्थित राहिल्या. एका कम्युनिस्ट कुटुंबाचे धैर्य किती उत्तुंग असू शकते याच्या प्रचितीने कॉम्रेड्स गलबलून गेले.

गोविंदराव पानसरे यांचे जावई अॅड. बन्सी सातपुते किसान सभेचे पदाधिकारी आहेत. पानसरेंच्या हत्येचे दु:ख खांद्यावर घेऊन ते अधिवेशनात कार्यरत होते. प्रा. मेघा पानसरे आणि स्मिता सातपुते याही पक्षाचे काम करतात. त्यांना वैयक्तिकरीत्या भेटून सांत्वनाचे चार शब्द बोलावेत अशी विनंती राज्यभरातून आलेल्या कॉम्रेड्सनी केली, पण या दोघींनीही स्वत:च अधिवेशानाला हजर राहून उपस्थित कॉम्रेड्सना भेटण्याची इच्छा व्यक्त केली.

दुपारी एकच्या सुमारास बन्सी सातपुते, प्रा. मेघा पानसरे आणि स्मिता सातपुते शाहू स्मारक भवनात आले. तिघे मंचावर आल्यानंतर कॉ. अमरजित बाहेती यांनी गीत सादर केले.

ये भगतसिंग तू जिंदा है, हर लहू के कतरेमे...अब याद है भगत तेरी आती

अब याद है अण्णा तुम्हारी आती...अब याद है कॉम्रेड तेरी आती आग लगी है सीने में...

पानसरेंच्या खुनानंतर कॉम्रेड्सच्या काळजातील घालमेल, वेदना सांगणारे हे गीत 'अंधेरे का ये तख्त हमे ताकदसे ठुकराना है' असा संघर्षाचा नाराही देत होते. याचवेळी पानसरे यांचे अस्थिकलश वितरणासाठी मंचावर आणण्यात आले. वज्रमूठ आवळून 'लाल सलाम'च्या नाऱ्यात सहभागी होत स्मिता सातपुते आणि मेघा पानसरे अस्थिकलश जिल्हा सचिवांकडे सुपूर्द करत होत्या. अस्थिकलश स्वीकारण्याचा शेवटचा क्रम होता कोल्हापूर जिल्हा सचिव एस. बी. पाटील यांचा. पानसरे कुटुंबाला मंचावर पाहूनच एस. बी. पाटील यांना अश्रू आवरणे कठीण झाले. त्यांच्या हातात पानसरे यांच्या अस्थींचा कलश आल्यानंतर त्यांच्या अश्रूंनी सभागृह गलबलून गेले. एस. बी. पाटील यांना बन्सी सातपुतेंनी सावरले.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या गीताने अधिवेशनाचा समारोप झाला. त्यानंतर झेंड्याला मानवंदना देण्याच्या कार्यक्रमालाही प्रा. मेघा पानसरे आणि स्मिता सातपुते उपस्थित होत्या.

पानसरे यांच्या खुनानंतर अधिवेशन घेण्याचा वज्रनिर्णय पक्षाने घेतला होता. पानसरे यांच्या शोकसभेने सुरू झालेले अधिवेशन त्यांच्या अस्थींच्या निरोपाने झाले.

धर्मांध संघटनांवर बंदी घाला

$
0
0

भाकप अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी विविध ठराव मंजूर

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या खुन्यांचा तपास वेळेवर न लागल्यास उग्र आंदोलन छेडणे, त्यासाठी दोन मार्चला सत्याग्रह करणे, ११ मार्चला मुंबईतील महामोर्चात प्रचंड संख्येने सहभागी होणे यांसह केंद्र सरकारच्या भूसंपादनाच्या अध्यादेशास विरोध करणे, कामगार कायद्यातील बदलांना तीव्र विरोध करणे, असे ठराव भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य अधिवेशनाच्या समारोप समारंभात मंजूर करण्यात आले. जातीचे आणि धर्माचे विषारी राजकारण करणाऱ्या संघटनांवर बंदी घालण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

दरम्यान, परिषदेत पक्षाचे ७५ जणांचे कौन्सिल निवडण्यात आले, तर डॉ. भालचंद्र कानगो यांची राज्य सचिव म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात आली. कानगो तिसऱ्यांदा पक्षाचे राज्य सचिव झाले आहेत. राज्य कौन्सिलवर कोल्हापुरातून नामदेव गावडे, एस. बी. पाटील, दिलीप पवार, सुशीला यादव, दिनकर सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली.

परिषदेच्या समारोपानंतर पत्रकार परिषदेत बोलताना कानगो म्हणाले, 'जात्यांध आणि धर्मांध शक्तींनी ठरवून पानसरे यांचा खून केला, पण त्यांचा लढा आपणास पुढे न्यायचा आहे, त्यासाठी आम्ही कार्यक्रम आखला आहे, पण पानसरे यांची उणीव कायमच जाणवणार आहे. केंद्र सरकारने भूसंपादन कायदा २०१३ मध्ये अध्यादेश काढून बदल केले आहेत. नव्या बदलानुसार या जमिनी कोणाला देण्यात येणार हे स्पष्टच दिसते. १० मार्चला सर्व जिल्ह्यांत या अध्यादेशाची होळी करण्यात येणार आहे. १०० स्मार्ट सिटी, शेकडो कॉरिडॉर, मेक इन इंडिया, श्रम मेव जयते अशा आकर्षक योजना आखून कॉर्पोरेट आणि परदेशी कंपन्यांना जमिनी देण्याचा डाव आहे.'

कामगार कायद्यात कामगारविरोधी बदलांना विरोध, असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा, सहकार क्षेत्राला उभारी देण्यासाठी नवीन कायद्याची मागणी, व्यापक आणि मजबूत अन्नसुरक्षा कायदा करण्यात यावा तसेच कॅश सबसिडी बंद करावी, ‌दलित आणि आदिवासी अत्याचार रोखण्यासाठी संघर्ष उभा करणे, असे ठराव मांडण्यात आले. कोल्हापुरातील टोलविरोधी आंदोलनात पक्षाचा सक्रिय सहभाग असेल, असे ठरावही यावेळी मांडण्यात आले.

यावेळी दिलीप पवार, नामदेव गावडे, मनोहर देशकर, तुकाराम भिसे, अनिल चव्हाण, सुभाष लांडे, एस. बी. पाटील, आदी उपस्थित होते.

क्रांतीचा विचार दशदिशांना

$
0
0

पानसरेंचे अस्थिकलश शंभर ठिकाणी रवाना; अस्थी वृक्षारोपणासाठी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'बाबा विज्ञानवादी, पर्यावरणवादी होते, त्यांच्या अस्थीही त्यांच्या बलिदानाची, संघर्षाची आठवण करून देतील. त्यांच्या देहाचा शेवटचा कणसुद्धा आपल्याला विचारांनुसार कृती करण्याचे बळ देईल. बाबांच्या बलिदानातून अनेक पानसरे निर्माण होतील. आपण सर्वजण पानसरे होऊन संघर्ष टोकदार करूया,' असे भावनिक आवाहन स्वर्गीय कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या कन्या स्मिता सातपुते यांनी केले. अण्णांच्या अस्थीचा वापर वृक्षारोपणासाठी करण्याचा निर्णय घेत आणखी एक पुरोगामी पाऊल यावेळी टाकण्यात आले.

सोमवारी पानसरे यांच्या रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम झाला. मात्र, सर्व धार्मिक विधींना फाटा देण्यात आला. कार्यकर्त्यांनी सकाळी शंभरावर कलशांमध्ये अस्थी भरण्यात आल्या. ते कलश लाल कापडात बांधण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा 'गोविंदराव पानसरे लाल सलाम' अशा घोषणा देत सामाजिक समतेची लढाई सुरूच ठेवण्याचा पुनरुच्चार केला.

अस्थिकलश सर्व जिल्ह्यांत पाठविण्यात आले. त्यांचा वृक्षारोपणासाठी उपयोग करण्यात येणार आहे. दुपारी शाहू स्मारक भवन येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य अधिवेशनाच्या निमित्ताने प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या कार्यकर्त्यांकडे कलश देण्यात आले. यावेळी पानसरे यांचे जावई बन्सी सातपुते, कन्या मेघा बुट्टे, पक्षाचे राज्य सचिव भालचंद्र कानगो, दिलीप पवार, मुकंद कदम, मिलिंद कदम, व्ही. बी. पाटील, के. डी. खुर्द, रघुनाथ कांबळे, नामदेव गावडे, अनिल चव्हाण, सुशीला यादव, डॉ. मीनल जाधव आदी उपस्थित होते.

आक्षेपार्ह पोस्टवर कारवाई नाही

गोविंदराव पानसरे आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या संदर्भातील आक्षेपार्ह फेसबुक पोस्टवर कारवाई केलेली नाही. तसेच मराठा सेवा संघाचे नेते पुरुषोत्तम खेडेकर यांनाही यात धमकी दिली आहे, तरीही कारवाई होत नाही,' असे पानसरे यांचे जावई बन्सी सातपुते यांनी सांगितले.

प्रतिगामी शक्तीच पानसरेंच्या मारेकरी

पानसरेंवर गोळीबार झाल्याच्या घटनेला आठवडा उलटूनही कुणालाही अटक करता आलेली नाही. याबद्दल कार्यकर्त्यांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. कानगो यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली, तर सतीशचंद्र कांबळे यांनी सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करत पानसरे यांचे मारेकरी प्रतिगामी शक्तीच असल्याचे मत व्यक्त केले.


तपासात प्रगती नाही

हल्लेखोरांच्या तपासासाठी गोवा, कर्नाटककडे पथके पाठविण्यात आली. पानसरे यांचे शेजारी मोरे कुटुंबीयांकडे पोलिसांनी चौकशी केली असून कागलजवळ दूधगंगा नदीत सापडलेल्या बेवारस दुचाकीबाबत तपास सुरू आहे.

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images