Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

अण्णांची दिनचर्या चुकली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

परिवर्तनवादी चळवळीतील एक खणखणीत नाणं म्हणजे कॉम्रेड गोविंदराव पानसरे ऊर्फ अण्णा. फेरीवाले, घरेलू मोलकरीण, शेतकरी, शेतमजूर, बँका, संस्थांमधील कामगारांचा आवाज म्हणजे अण्णा. आयुष्यभर संघर्ष करून न्याय आणि सर्वांना आधार देणाऱ्या अण्णांवर सोमवारी काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला. या भ्याड हल्ल्यामुळे अण्णांची दिनचर्या चुकली. सायंकाळी चार ते रात्री साडेआठपर्यंत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात श्रमिकांच्या गराड्यात असणारे अण्णा दोन दिवस कार्यालयात आलेच नाहीत. कार्यालयाबाहेर सायंकाळी नेहमी दिसणाऱ्या लाल रंगाच्या अल्टो कारचे दर्शन झाले नाही. यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्यांसह सर्वांनीच हळहळ व्यक्त केली. परंतु अण्णा लवकरच बरे होऊन पुन्हा नव्या जोमाने चळवळीत सक्रिय सहभागी होतील, असा आशावाद कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.

पेशाने वकील असलेले अण्णा महत्त्वाचे चार-दोन दावे सोडले तर फारसे न्यायालयात जात नाहीत. न्यायालयाची सर्व कामे त्यांनी असिस्टंट अॅड. बाळासाहेब पवार व जमीर शेख यांच्याकडे सोपवलेली. गरज पडेल तेव्हा त्यांना मार्गदर्शन. यामुळे सतत चळवळ आणि देशात घडणाऱ्या सामाजिक, राजकीय स्थितीवर चिंतन आणि मनन. सकाळी एक-दोन तासाचे मॉर्निंग वॉक झाले की, वाचन आणि कार्यकर्त्यांशी फोनवरून संपर्क. श्रमिकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांना सतत मार्गदर्शन. दुपारी थोडावेळ विश्रांती झाली की, अण्णांची एमएच ०९ - ५९२५ लाल रंगाची गाडी आयडियल सोसायटीतून थेट भाकप कार्यालयात दाखल. तेथे नेहमीचे शिलेदार दिलीप पोवार, एस. बी. पाटील, ए. बी. जाधव, नामदेव गावडे त्यांची प्रतीक्षाच करत असायचे. अण्णांच्या भेटीसाठी राज्यभरातून कार्यकर्ते दाखल झालेले असायचे. त्यांची सर्व गाऱ्हाणी ऐकून त्यावर त्वरित उपाय सुचवत आणि लागेल तेव्हा प्रत्यक्ष स्थळावर येण्याचे अभिवचन. कार्यकर्त्यांच्या सततच्या लगबगीमुळे साडेआठपर्यंत भाकप कार्यालयात एकच गर्दी. मात्र, ही गर्दी सोमवारपासून दिसलीच नाही. अण्णांवर झालेल्या हल्ल्यामुळे चिंताग्रस्त कार्यकर्ते कार्यालयात ठाण मांडून बसलेले. तासातासाला रुग्णालयातील कार्यकर्त्यांशी संपर्क साधून प्रकृतीची चौकशी करत असल्याचे दिसत होते. अण्णा रुग्णालयात असले तरी, लवकरच ते पुन्हा चळवळीमध्ये सक्रिय सहभागी होतील असा दृढ विश्वास व्यक्त करत होते. सर्वांना आधारवड असलेले अण्णा पुन्हा जोमाने कामाला लागून प्रतिगामीवाद्यांचा समाचार घेतील, असा विश्वास ए. बी. जाधव यांनी व्यक्त केला.

शंभर व्याख्यानांचा संकल्प

सध्या इतिहासाचे विकृतीकरण सुरू आहे. खरा इतिहास लोकांपर्यंत विशेषतः विद्यार्थ्यांसमोर आणण्यासाठी अण्णांनी शंभर व्याख्यानांचा संकल्प सोडला आहे. त्यांनी राजर्षी शाहू महाराज आणि शिवाजी कोण होता ? या विषयावर विविध शाळा, महाविद्यालयांत ८० व्याख्याने दिली आहेत. वयाच्या ८२ व्या वर्षीही युवकांना लाजवेल असा त्यांचा उत्साह मानावा लागेल.

दाभोलकर, पानसरेंचे हल्लेखोर एकच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'ज्येष्ठ कामगार नेते कॉ. गोविंदराव पानसरे यांच्यावरील हल्ला हा धर्मनिरपेक्ष व समाजवादी विचारांवरचा हल्ला आहे. यापुढे आता धर्मनिरपेक्ष विचारांवरचे हल्ले सहन केले जाणार नाहीत. सर्व समविचारी संघटना एकत्र येऊन या प्रवृत्तीचा मुकाबला करण्यास सज्ज आहेत,' असा इशारा मंगळवारी आम्ही भारतीय लोकआंदोलन व सर्वपक्षीय मोर्चातून विविध पक्षांच्या मान्यवरांकडून देण्यात आला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर त्याचे निषेध सभेत रूपांतर झाले, त्यावेळी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.

महाराष्ट्र पुरोगामी राहिला नाही

डॉ. नरेंद दाभोलकर यांची हत्या होऊन दीड वर्षे झाले असतानाही आरोपी पकडले जात नाहीत. जर दाभोलकरांच्या हत्येतील आरोपी पकडले असते तर कॉ. पानसरेंवर हल्ला झाला नसता. या दोन्ही हल्ल्यातील आरोपी एकच असतील. पानसरे हे कष्टकऱ्यांसाठी लढणारे लढवय्ये आहेत. त्यांनी कुणाचा द्वेष न करता श्रमिकांची चळवळ चालवली आहे. महाराष्ट्र आता पुरोगामी राहिलेला नाही. शाहू, फ‌ुले, आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र पुन्हा उभा करण्यासाठी सर्व विवेकवादी संघटनांनी एकत्र आले पाहिजे. संघटितपणे काम करून आता नवा महाराष्ट्र घडवण्याची वेळ आली आहे. पानसरेंसारख्या निःशस्त्र माणसावर केलेला हा सशस्त्र हल्ला संपूर्ण समाजावर केलेला आघात आहे. - ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील

राज्यघटनेला न मानणाऱ्यांचे कृत्य

देश स्वतंत्र होऊन साठ वर्षांहून अधिक काळ झाला आहे. परंतु या देशात राज्यघटना न माणणाऱ्या शक्ती उघडपणे काम करत आल्या आहेत. या विचारांचेच सरकार आता देशात व राज्यात सत्तास्थानी आहे. त्यामुळेच दूरदर्शनचा वापर एका तथाकथित संघटनेच्या प्रचारासाठी करण्यात आला. धर्मनिरपेक्ष व समाजवाद हे शब्दच आता वगळले जाऊ लागले आहेत. अशा लोकांकडून हे हल्ल्यासारखे कृत्य होऊ शकते. आजचा मोर्चा हा सरकारचा आवाज दडपण्याच्या प्रवृत्तीला दाबण्यासाठी काढण्यात आला आहे. - भालचंद्र कानगो

सरकारची झोप उडवायला हवी

दिवसाढवळ्या हल्ले होत असतानाही सरकार शांतपणे व्यवहार करत आहे. हे हल्ले विचार करणाऱ्या समूहाचे नेतृत्व करणाऱ्यांवर होत आहेत. सर्वसमावेशक विचारांना घाबरून माणसे संपवली जात आहेत. हे हल्ले थांबविण्यासाठी सरकारची झोप उडवायला हवी. - सुभाष लांडे, भाकप कौन्सिल सदस्य

चळवळी कधीच मरत नाहीत

हल्लेखोरांना वाटते उत्तुंग माणसं संपवली की, लढे संपवता येतील, परंतु चळवळी कधीच मरत नाहीत, हे त्यांना माहीत नाही. तुमच्या गोळ्या संपतील, परंतु आमच्या छातीचे कोट संपणार नाहीत हे त्यांनी लक्षात ठेवावे. यापुढे अधिक आक्रमक होऊन विचारांची लढाई लढावी लागणार आहे. - उदय नारकर

दाभोलकरांच्या हल्ल्याची फोटोकॉपी

कॉ. पानसरेंवरील हल्ला हा नरेंद्र दाभोलकरांवरील हल्ल्याची फोटोकॉपी आहे. या दोन्ही हल्ल्यांतील मास्टरमाइंड एकच आहेत. ते लोकांना माहीत आहेत. मात्र, लोकांना त्यांच्यावर आरोप करण्याचे धैर्य होत नाही. कदाचित राज्यघटनेने दिलेल्या संकेताच्या हे विरोधात असल्याचे लोकांना वाटत असेल. सरकारही शांतपणे सत्ता व मताचा विचार करून काम करत आहे. - शैला दाभोलकर

धनाजी गुरव व ढोबळेंमध्ये शाब्दिक वाद

माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे भाषणसाठी उभे राहिले असता धनाजी गुरव यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. तुमच्या पक्षाचे भाजपशी काय संबंध आहेत हे पहिल्यांदा जाहीर करा, असे गुरव म्हणताच गोंधळ उडाला. गोंधळात ढोबळे व गुरव यांचे समर्थक एकमेकांसमोर ठाकले. धक्काबुक्कीला सुरुवात झाली असताना ज्येष्ठांनी मध्यस्थी करून वाद थांबवला. यावेळी गुरव यांनी वैयक्तिक मतभेद या व्यासपीठावर आणू नयेत असे सांगत त्यांना बाजूला नेले. यानंतर ढोबळे यांनी भाषण करण्याचे टाळून आंदोलकांसमवेत बसण्याचे पसंत केले.

यावेळी भाकप सचिव अस्लम सलामी, कॉ. दिलीप पवार, चंद्रकांत यादव यांची भाषणे झाली.

गृहमंत्र्याअभावी सुरक्षा गंभीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'दीड वर्षे झाले तरी डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी सापडलेले नाहीत. त्यामुळे अशा प्रवृत्तींचे मनोधैर्य वाढले असून, दाभोलकरांची हत्या करणारी आणि गोविंदराव पानसरे यांच्यावर हल्ला करणारी प्रवृत्ती ही एकच आहे,' असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला.

पानसरे यांची विचारपूस करण्यासाठी विखे-पाटील यांनी मंगळवारी अॅस्टर आधार हॉस्पिटलला दुपारी भेट दिली. पत्रकारांशी बोलताना राज्यात पूर्णवेळ

गृहमंत्री नाही तसेच गेल्या चार महिन्यांत कायदा-व्यवस्थेची स्थिती गंभीर बनल्याचा आरोपही त्यांनी केला.

पोलिस महासंचालक बदला

पोलिस महासंचालकांबद्दल प्रचंड तक्रारी आहेत. कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना कामातून बाजूला काढणे, निष्क्रिय अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देणे असे प्रकार सुरू आहेत. महासंचालकांनी पोलिसांत दुही निर्माण केली आहे.

'दोन्ही हल्ले एकाच प्रवृत्तीकडून'

'डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंदराव पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्यात साम्य आहे. तसेच दाभोलकरांच्या हत्येचा तपास करताना मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे हा हल्ला एकाच प्रवृत्तीच्या लोकांनी केला असावा,' अशी शक्यता असल्याचे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

चव्हाण यांनी आज पानसरे दाम्पत्याची भेट घेतली. त्यानंतर डॉक्टर आणि पोलिसांशी केलेल्या चर्चेनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

चव्हाण म्हणाले, 'पानसरे स्वतंत्र बाण्याचे विचारवंत आहेत. परखडपणे थेट विचार मांडण्याचे धैर्य त्यांच्याकडे आहे. प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. त्याला विरोध म्हणून त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न या हल्ल्याच्या माध्यमातून करण्यात आाला आहे. मात्र, हा हल्ला अत्यंत भ्याड असून, त्याचा मी निषेध करतो.'

'संघाला दहशतवादी घोषित करा'

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ नेते गोविंदराव पानसरे यांच्यावर गोळीबार करणाऱ्या संशयितांना चार दिवसांत पकडा, अन्यथा सर्व पुरोगामी संघटना राज्यभरात निदर्शने करतील, असा इशारा मंगळवारी विराट संख्येने जमलेल्या जनसमुदायाने ‌सरकारला दिला. पानसरे यांच्यावर सोमवारी झालेल्या गोळीबारातील संशयितांना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. भर उन्हात निघालेल्या या मोर्चात प्रचंड संख्यने लोक सहभागी झाले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सनातन प्रभात आदी हिंदुत्ववादी संघटनांना दहशतवादी घोषित करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

पानसरे यां‍च्यावर गोळीबार करणाऱ्यांचा आम्ही कसून शोध घेत आहोत, असे आश्वासन यावेळी जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर दिले. ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील, कम्युनिस्ट नेते भालचंद्र कानगो व आम्ही भारतीय लोक आंदोलनच्या नेतृत्वाखाली बिंदू चौकातून मोर्चाला सुरवात झाली.

'गोळीबार करणाऱ्यांना फाशी द्या,' 'छत्रपती शिवाजी महाराजांचा, वारकऱ्यांचा, संत तुकारामांचा भगवा जिंदाबाद, आरएसएसचा भगवा मुर्दाबाद', 'काल दाभोलकर, आज पानसरे आता उद्या तुम्ही-आम्ही,' अशा घोषणांचे फलक व लाल झेंडे घेतलेले हजारो महिला व पुरुष मोर्चात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. मिरजकर तिकटी, महाव्दार रोड, भाऊसिंगजी रोड, आईसाहेबमहाराज पुतळा, व्हीनस कॉर्नरमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला.

यावेळी शैला दाभोलकर, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, दिलीप पवार, माजी आमदार राजीव आवळे, टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे, मुस्लिम बोर्डींगचे अध्यक्ष गणी आजरेकर, अतुल दिघे, रघुनाथ कांबळे, डॉ. राजन गवस, शाहीर राजू राऊत, सतिशचंद्र कांबळे, सुभाष लांडे, शिवाजी परुळेकर, धनाजी गुरव, डॉ. सुनिल पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर, सुभाष देसाई, नामदेव गावडे, गिरीश फोंडे, युथ काँग्रेस जिल्हाध्यक्ष रुपाली पाटील, स्वप्नजा पाटील, वंदना पाटील यांच्यासह भाकप, राष्ट्रसेवा दल, वारांगणा संघटना, श्रमुद, श्रमिक संघ, ब्लॅक पँथर, 'हिंदी है हम,' आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.

दोन्ही काँग्रेस महापौरांत संघर्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापौर तृप्ती माळवी नेत्यांचा आदेश डावलून महापौरपदावर कायम राहिल्याने राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी त्यांच्यासोबत असहकार्य पुकारला आहे. त्यामुळे नव्या संघर्षाला सुरूवात झाली आहे.

बुधवारी महिला व बालकल्याण विभागातर्फे आयोजित आरोग्य शिबिरावेळी महापौर आणि सदस्यातील संघर्ष घडण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे महापौर माळवी यांनी मी महापालिकेच्या कामकाजात सहभागी होणार असून सहकार्य करणे न करणे हा त्यांचा प्रश्न आहे अशी आक्रमक भूमिका घेतली आहे.

महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे बुधवारी मोरे-मानेनगर येथे आरोग्य शिबिराचे उदघाटन होणार आहे. महापौर माळवी या प्रमुख पाहुण्या तर उपमहापौर मोहन गोंजारे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. कार्यक्रमाला दोन्ही काँग्रेसचे पदाधिकारी, गटनेते, सभागृह नेता, प्रभाग समिती सभापतींच्या नावाचा उल्लेख कार्यक्रम पत्रिकेत आहे. दुसरीकडे दोन्ही काँग्रेसच्या गटनेत्यांनी सोमवारी महापालिकेत महापौरांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

बदनामी पक्षाची नव्हे माझी

नगरसेवकांनी असहकार्याची भूमिका घेतल्याबद्दल महापौर माळवी यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या 'सदस्यांनी असहकार्याची भूमिका घेतली असली तर मला काही अडचणी येणार नाहीत. महापालिकेच्या कामकाजात मी सहभागी होत राहणार. महापौर म्हणून जे काम करायचे आहे ते करत राहणार आहे. लाचखोरीच्या प्रकरणात मला गोवले आहे. या साऱ्या प्रकारामुळे राष्ट्रवादीची नव्हे तर, माझी बदनामी झाली आहे. ​मी निर्दोष सिध्द होईपर्यंत महापौर म्हणून काम करत राहणार आहे.'

सहकारमंत्र्यांकडून सुडाचे राजकारण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष सोबत येणार असेल तर पॅनेल करायला तयार असल्याचे सांगत राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी मैत्रीसाठी हात पुढे केला आहे. बँकेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसचीच सत्ता येणार असून भाजप, शिवसेनेला येथे शिरकाव करण्याची संधी नाही. तथापि, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील कुणाच्या तरी सांगण्यावरून राज्य आणि जिल्हा मध्यवर्ती बँक प्रकरणात सुडाचे राजकारण करत आहेत, अशी थेट टीका मुश्रीफ यांनी केली.

कार्यकर्त्यांना संधी

संस्थांच्या थकीत कर्जप्रकरणी जिल्हा बँकेची निवडणूक लढविण्यास अपात्र ठरलो तर कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल. माझा मुलगा अथवा कुटुंबीयांतील अन्य सदस्य उमेदवार असणार नाहीत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नवीन आणि चांगल्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल. बँकिंग क्षेत्रात अनेकजण निःवार्स्थपणे कार्यरत आहेत, त्यांना आमंत्रित करू. गेल्या निवडणुकीवेळी जे आरोप झाले, ते खोडून बँक देशात एक नंबरची बनविण्याच्या उद्देशाने कामकाज केले जाईल, अशी ग्वाही मुश्रीफांनी दिली. जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी माझा, माझ्या मुलाचा ठराव असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कदमांनी कारवाई लावली

माजी खासदार सदाशिवराव मं​डलिक व आपल्यातील वाद आणि मतभेदावरून तत्कालीन सहकारमंत्री पतंगराव कदम यांनी बँकेची चौकशीची कारवाई लावली. ८८ कलमान्वये २००९ मध्ये सुरू झालेल्या चौकशीचा २०१५ मध्ये निर्णय देण्यात आला आहे. चौकशीचे आदेश दिले होते, त्यावेळी ६५ संस्था थकबाकीदार होत्या. गेल्या सहा वर्षांत थकबाकीधारक संस्थांची संख्या २८ आहे. ज्या संस्थेच्या संचालकांनी कर्जे घेतली आहेत, त्यांच्या मालमत्ता आहेत. अशा संस्थांकडून पै अन् पै वसूल होणे गरजेचे आहे. जबाबदारी निश्चित झालेल्या संचालकांकडून वसूलीची प्रक्रिया सुरू आहे याबाबत मुश्रीफ म्हणाले, सहकार खात्याकडून जर वसुली सुरु झाली तर संचालक त्याला सहकार्य करतील.

भाजप सेनेचे ना नुकसान, ना फायदा

जिल्हा बँकेची निवडणूक ही मुख्यतः राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधीलच आहे. या निवडणुकीत भाजप, सेनेला संधीच नाही. कुणाच्या तरी सांगण्यावरून पालकमंत्री पाटील हे संचालकांवरील कारवाईप्रश्नी सुडाचे राजकारण करत आहेत. हायकोर्टात सरकारतर्फे बाजू मांडणाऱ्या वकिलाला कुणीतरी फिडिंग करत असते. ती व्यक्ती भाजपाच्या 'लिगल अॅडव्हायझर सेल'मधील आहे. मुळात निवडणुकीत त्यांचे नुकसान आणि फायदा होण्याचा प्रश्नच नाही.

अखेरच्या दिवशी साडेतीन हजार ठराव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सहकारमंत्र्यांकडे प्रलंबित असलेली सुनावणी, विभागीय सहनिबंधकांनी दिलेले जप्तीचे आदेश या पार्श्वभूमीवर माजी संचालकांना निवडणूक लढवता येणार की नाही याबाबत संभ्रम असूनही कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी अखेरच्या दिवसी तब्बल तीन हजार ६२३ ठराव दाखल झाले. शेवटच्या दिवशी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार शक्तिप्रदर्शन करत स्वतंत्र ठराव दाखल केले. लक्ष्मीपुरी येथील सहकार निबंधक कार्यालयासह जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी यामुळे राजकीय नेत्यांसह त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. शुक्रवारी सर्वाधिक ठराव करवीर तालुक्यातून दाखल झाले.

विनातारण व अल्पतारण कर्ज देऊन बँकेला तोटा होण्यास कारणीभूत असलेल्या माजी संचालकांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश विभागीय सहनिबंधकांनी दिले होते. जप्तीची तात्पुरती कारवाई टळली असली, तरी माजी संचालकांवर निकालाची टांगती तलवार २५ मार्चपर्यंत कायम राहणार आहे. तरीही आज शेवटच्या दिवशी तब्बल तीन हजार ६२३ ठराव दाखल झाले. कार्यकर्त्यांनी लक्ष्मीपुरी येथील सहकारी निबंधक कार्यालयात प्रचंड गर्दी झाली होती. जिल्ह्यातील बाराही तालुक्यात दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी प्रचंड शक्तिप्रदर्शनासह ठराव दाखल केले. एकूण ११ हजार ३७२ संस्था पात्र असून यापैकी आजअखेर आठ हजार ३४१ ठराव दाखल केले आहेत. २१ जागांसाठी मे महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, विभागीय सह निबंधकांनी २७ फेब्रुवारीपर्यंत प्रारूप मतदार यादी तयार करण्याचे आदेश दिले आहेत. २४ फेब्रुवारी रोजी प्रारूप मतदार यादी तयार होणार होती. मात्र, आता प्रारूप यादी तयार झाल्यानंतर १२ मार्चला तयार झालेल्या प्रारूप यादीवर हरकती दाखल करता येणार आहेत.

के. पी. पाटील यांचे १५५ ठराव दाखल

गारगोटी ः भुदरगड तालुक्यातून के. पी. पाटील यांनी एकूण २०५ पैकी १५५ ठराव उपनिबंधक कार्यालयात सहायक निबंधक पुष्पलता पोवार यांच्याकडे दाखल केले. गारगोटी येथील इंजुबाई मंदिरात ठरावधारकांनी एकत्र येत शक्तिप्रदर्शन केले. पाटील यांनी दाखल १५५ ठरावांसह परस्पर दाखल केलेले ठराव धरून १५८ ठराव राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे असल्याचे सांगितले. ठरावाची संख्या पाहता विरोधी आमदार आबिटकर व दिनकरराव जाधव कशी टक्कर देणार याची तालुक्यात उत्सुकता आहे.

राधानगरी राष्ट्रवादीतर्फे १४५ ठराव

राधानगरी ः राधानगरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी शेवटच्या दिवशी दुपारी आपले १४५ ठराव सहायक निबंधक नारायण परजणे यांच्याकडे शक्तिप्रदर्शनाने दाखल केले. येथील अंबाबाई मंदिराच्या पटांगणात झालेल्या सभेत ए. वाय. पाटील यांनी सर्वाधिक ठराव आपल्याकडे असल्याचा दावा केला. तर सहकार कायद्यातील नव्या नियमामुळे आपल्या उमेदवारीस काही अडचण आल्यास पत्नी अर्चना पाटील यांची उमेदवारी जाहीर करणार असल्याचे सांगितले.

असे असणार संचालक मंडळ

गट १ -

विकास सेवा संस्था - १२

गट २ -

कृषी पणन व शेतीमाल प्रक्रिया - २

गट ३ -

बँक व पतसंस्था - १

गट ४ -

दूध, पाणीपुरवठा, ग्रामोद्योग - १

महिला प्रतिनिधी - २

अनुसूचित जाती व जमाती - १

इतर मागासवर्गीय - १

भटक्या विमुक्त गट - १

१२ तालुक्यांतून शुक्रवारी दाखल झालेले ठराव

करवीर १५६१, कागल १०६१, हातगणंगले, १०१२, पन्हाळा ९४३, राधानगरी ७९७, गडहिंग्लज ७०६, भुदरगड ६४८, शिरोळ, ६८३, चंदगड ४५६, शाहूवाडी २२८, आजरा २९७, गगनबावडा १४९.

माळवींना सत्तेचा हव्यास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लाच घेतल्याचा आरोप होऊनही राजीनामा देण्यास नकार देत पक्षाविरोधात बंडखोरी केलेल्या महापौर तृप्ती माळवी यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आक्रमक धोरण स्वीकारले आहे. सदस्यांच्या बहिष्कार सत्रापाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते, आमदार हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी माळवी यांच्यावर थेट टीका केली. मुश्रीफ यांना पंधरा दिवसांतच आपली भूमिका बदलत महापौरांवर टीका करावी लागली.

मी जनतेची माफी मागतो

शुक्रवारी सर्किट हाउसवर पक्षाचे पदाधिकारी आणि नगरसेवकांसोबत महापौरांच्या राजीनाम्याप्रश्नी बैठक झाली. तत्पूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत मुश्रीफ यांनी लाचखोरी प्रकरणावरून माळवी यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, 'लाचखोरीच्या प्रकरणात सापडलेल्या माळवी यांना सत्तेचा हव्यास आहे. सत्तेसाठीच त्या महापौरपदाचा राजीनामा देत नाहीत. राष्ट्रवादीचा जबाबदार कार्यकर्ता म्हणून त्यांना महापौर करण्यात मी पुढाकार घेतला होता. मात्र त्यांच्या लाचखोरीच्या कृत्यामुळे कोल्हापूरच्या जनतेची मान शरमेने खाली गेली आहे. याबद्दल मी कोल्हापूरच्या जनतेची माफी मागतो. त्याचबरोबर माळवी यांनी २८ फेब्रुवारीपर्यंत राजीनामा दिला नाही तर पक्षातून हकालपट्टी करू.' 'माळवी यांच्या राजीनाम्याशी खासदार धनंजय महाडिक यांचा संबंध नाही. महाडिक यांचा त्यांना पाठिंबा नाही,' असेही मुश्रीफ म्हणाले.

राष्ट्रवादी हतबल

महापालिकेतील आघाडीच्या सूत्रानुसार महापौरपद काँग्रेसकडे जाणार होते. मात्र, माळवी यांनी राजीनाम्याला ठाम नकार दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची प्रचंड कोंडी झाली आहे. काँग्रेसला दिलेला शब्द पाळता येत नाही आणि महापौर राजीनामाही देत नाहीत अशा स्थितीत राष्ट्रवादी हतबल बनल्याचे चित्र आहे.

पंधरा दिवसांत बदलली भूमिका

महापौर माळवी यांच्यावर कारवाई झाल्यानंतर आठवडाभरांनी माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी सहा फेब्रुवारी रोजी सर्किट हाउसवर पत्रकारांशी बोलताना माळवी यांची पाठराखण केली होती. त्यावेळी मुश्रीफ

म्हणाले होते, 'महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. महापौर माळवी यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या बदनामीची मोहीम सुरू आहे. 'अँन्टी करप्शनचे अधिकारी हे पोलिसच आहेत, ते काही महापुरूष नाहीत. महापौरांना या प्रकरणात नाहक गोवले गेले आहे. चौकशीअंती दूध का दूध आणि पानी का पानी होईल.'

‘गोकुळ’मध्ये महाडिक यांच्यासोबतच

$
0
0

म. टा. प्र​तिनिधी, कोल्हापूर

माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील हे माझे चांगले मित्र आहेत. महापालिकेत त्यांच्यासोबत आघाडी आहे. महापालिकेत त्यांच्यासोबत राहू. मात्र 'गोकुळ'मधील काही संचालक विधानसभा निवडणुकीत आमच्यासोबत आहेत. एका अर्थाने हा आमचा वीकपॉईंट आहे. गोकुळची निवडणूक जाहीर झाली की आमदार महादेवराव महाडिक यांच्याशी चर्चा करू' अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी गोकुळच्या निवडणुकीत पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

माजी मंत्री सतेज पाटील हे गोकुळमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात पॅनेल उभारण्याच्या हालचाली करतआहेत. या संदर्भात विचारले असता मुश्रीफ म्हणाले, 'गोकुळच्या दोन निवडणुकीत चांगली टक्कर दिली होती. मते ही चांगली मिळाली होती. सध्या काँग्रेसमध्ये मतभेद आहेत. पण विधानसभा निवडणुकीत कागलमध्ये गोकुळचे संचालक रणजित पाटील यांनी मला, तर राधानगरीमध्ये बजरंग देसाई, अरूण डोंगळे यांनी के. पी. पाटील यांना मदत केली होती. गोकुळ निवडणुकीच्याबाबतीत हे आमचे वीक पाँईट आहेत. निवडणूक जाहीर झाली की, महाडिक यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. मी आजारी असताना सतेज पाटील यांनी प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतली होती', हेही मुश्रीफ यांनी सांगितले.

कोल्हापूर सुपरफास्ट?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर रेल्वे स्थानकाच्या इमारतीपासून विविध ठिकाणच्या वेगवान कनेक्टिव्हीटीबाबतच्या मागण्यांना येत्या रेल्वे बजेटमध्ये अच्छे दिन येण्याचे संकेत मिळत आहेत. कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडून या मागण्यांबाबत प्रशासनस्तरावर दिलेल्या आदेशांमुळे काही प्रश्न मार्गी लागतील असे दिसते. नवीन रेल्वे सुरू करण्याबरोबरच स्थानकाची इमारत, परिसरातील नवीन रेल्वेमार्गाच्या मागण्यांबाबत कोल्हापूरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

कोकण रेल्वेला कोल्हापूर जोडण्यासाठीचे प्रयत्न बऱ्याच पातळीवर सुरू आहेत. कराड ते चिपळूण, कोल्हापूर ते राजापूर, कोल्हापूर ते वैभववाडी या मार्गांचा विचार सुरू आहे. त्यातील चिपळूण व राजापूर या मार्गांचा सर्व्हे झाला आहे. राजापूरचा प्रस्ताव तर रेल्वे बोर्डासमोर गेला आहे. या प्रकल्पानंतर आर्थिक परतावाही सकारात्मक दर्शवला आहे. यामध्ये सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्रभू यांचा पूर्वाश्रमीचा मतदारसंघ राजापूर आहे. त्यामुळे त्यांच्याकडून या प्रस्तावाबाबत पाठबळ मिळण्याची शक्यता आहे. याबरोबरच कराड ते बेळगाव या नवीन रेल्वेमार्गाबाबतही निर्णय होऊ शकतो. या मार्गाबाबत मंत्री जर सकारात्मक असल्यास बजेटमध्ये तरतूद केली जाऊ शकते. ती तरतूदही केवळ बजेटमध्ये समावेश करण्याच्यादृष्टीने की प्रकल्प मार्गी लावण्याच्यादृष्टीने हे त्यावेळी स्पष्ट होऊ शकते. कोल्हापुरातून मुंबईसाठी फास्ट रेल्वे सुरू करण्याबरोबरच अन्य ठिकाणीही नव्या रेल्वे सुरू करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. पुण्यातून ​सुटणाऱ्या रेल्वे कोल्हापूरपासून सोडण्यासाठीही चर्चा आहे. केवळ बजेटमध्ये त्याची घोषणा होईल, असे सांगितले जात आहे.

​मिरज ते पुणेदरम्यानच्या रेल्वे लाइनच्या दुहेरीकरणाबरोबरच विद्युतीकरणामुळे या परिसरातील रेल्वे वाहतूक वेगवान होऊ शकते. याबाबतचा सर्व्हे झाला आहे. त्यावर बजेटमध्ये तरतूद होईल की आणखी काही पर्याय सुचवले जातील हे मात्र बजेटनंतर स्पष्ट होणार आहे. कोल्हापूर स्थानकाच्या इमारतीबाबतही वेगवेगळी चर्चा सुरू आहे. इमारत हेरिटेजमध्ये आहे, असे सांगून त्याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तयार झालेला नाही. त्यामुळे स्थानकावर सुविधांबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. रेल्वे स्टेशन विकासाचा मार्ग रिकामा होईल, असे दिसते.

हल्लेखोर मराठी भाषिक?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हल्लेखोरांनी उमा पानसरे यांच्याशी बोलताना मराठीतूनच पत्ता विचारला होता. त्यामुळे हल्लेखोर मराठी भाषिकच आहेत, अशी माहिती चौकशीत पुढे आली आहे. त्यामुळे पोलिसांनी स्थानिक पातळीवर तपास वाढवला आहे. ज्येष्ठ नेते कॉ. गोविंदराव पानसरे व उमा पानसरे यांच्यावर हल्ला करण्यापूर्वी हल्लेखोरांनी अर्धा तास आधी उमा पानसरे यांच्याकडे 'मोरे कुठे राहतात?' असे अस्खलित मराठीतच विचारले होते, असे एका पोलिस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

उमा पानसरे या पूर्ण शुध्दीवर आल्या असून पोलिसांनी त्यांचा रितसर जबाब घेतला नसली तरी वरिष्ठ अधिकारी त्यांच्याकडे डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर माहिती घेत आहेत. हल्लेखोर मराठी बोलत असल्याने ते स्थानिक असावेत, असा प्राथमिक निष्कर्ष काढून पोलिसांनी स्थानिक पातळीवर लक्ष केंद्रित केले आहे. संशयितांनी मराठी भाषा वापरल्याने परिक्षेत्रातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची चौकशी सुरू केली आहे. ग्रामीण भागातील संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगारांना चौकशीस ताब्यात घेण्यात येत आहे. एका हल्लेखोराने गुलाबी रंगाचा शर्ट घातला होता. पोलिसांनी काढलेल्या रेखाचित्रांचा पडताळा करण्यात येत आहे.

कार्यकर्त्यांना संरक्षण

कोल्हापूर परिक्षेत्रात चळवळीतील कार्यकर्त्यांना पोलिस बंदोबस्त देण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत, अशी माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक रितेशकुमार यांनी दिली. जे कार्यकर्ते बंदोबस्त मागतील त्यांना तातडीने बंदोबस्त पुरवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दाभोलकर-पानसरे हल्ल्यात साधर्म्य नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ज्येष्ठ विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर व ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या हल्ल्यात 'मॉर्निंग वॉक' वगळता कसलेच साधर्म्य नाही, असे अतिरिक्त पोलिस महासंचालक के. एल. बिष्णोई यांनी पत्रकार परिषदेत बोलतान स्पष्ट केले. शिवाय पानसरेंवरील हल्ल्यावरील तपासात प्रगती नसून त्याबाबत समाधानी नसल्याचेही त्यांनी सांगितले. हा हल्ला कौटुंबिक किंवा मालमत्तेच्या वादावरून झालेला नाही. त्यामागे सामाजिक वा राजकीय कारण असू शकते, हा मुद्दा सध्या तरी तपासाच्या केंद्रस्थानी असल्याचे बिष्णोई यांनी स्पष्ट केले.

बिष्णोई यांनी शुक्रवारी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक रितेशकुमार यांच्या कार्यालयात बैठक घेतली. पोलिस अधीक्षक मनोजकुमार शर्मा, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अंकित गोयल, एम. एम. मकानदार, एस. चैतन्य यांच्यासह तपास अधिकाऱ्यांसोबत पाच तास बैठक घेतली. त्यानंतर तपासाबाबत माहिती दिली.

ते म्हणाले, 'नरेंद्र दाभोलकर व गो​विंदराव पानसरे यांचे काम दोन भिन्न पातळ्यांवर सुरू होते. दाभोलकर अंधश्रध्दा निर्मूलन चळवळीत असल्याने त्यांना धार्मिक प्रश्नावर अवडंबर माजवणाऱ्यांचा विरोध होता. पानसरे राजकीय, सामाजिक आणि कामगार प्रश्नांवर काम करतात. दोघांच्या हल्ल्यात केवळ मॉर्निंग वॉक एवढेच साधर्म्य आहे. उमा पानसरे शुध्दीवर आल्या असल्या तरी ठोस पुरावा मिळालेला नाही. दोघांची प्रकृती ठीक झाल्यावर ठोस पुरावा मिळेल. सध्या आठ ते दहा मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करुन तपास सुरू आहे, पण त्यात प्रगती नाही. हल्लेखोरांची रेखाचित्रे प्रसिध्द करण्याबाबत तपास अधिकारीच निर्णय घेतील.'

घटनास्थळी मिळालेल्या पुंगळ्यावरून हल्लेखोरांनी पिस्तूल वापरले असावे असा प्राथमिक अंदाज असल्याचे सांगून बिष्णोई म्हणाले, फॉरेन्सिक लॅबचा अहवाल दोन ते तीन दिवसांत मिळेल. पानसरे कामगारांशी संबंधित असल्याने 'गोकुळ' व केडीसी बँकेतील कर्मचाऱ्यांच्या वादाचीही माहिती घेतली जात आहे. कोल्हापूर परिक्षेत्रातील अधिकाऱ्यांबरोबरच ज्यांनी पूर्वी कोल्हापुरात काम केले आहे अशा अधिकाऱ्यांनाही तपासासाठी पाचारण केले आहे. कर्नाटक राज्यातील पोलिसांशी संपर्क साधून आहोत.'

पुरोगामित्वाचे ढोल बडवू नका

$
0
0

प्रा. एन. डी. पाटील

उभी हयात ज्यांनी श्रमिकांच्या हक्कांसाठी, त्यांना अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी घालवली, अशा कॉम्रेड गोविंदराव पानसरे या लढवय्या नेत्याला, अशा पद्धतीने मरण यावे हे दुर्दैवी आहे. तळागाळात जगणारे जितके घटक आहेत, त्या सर्व घटकांचे नेतृत्व करून त्यांना न्याय देण्यासाठी पानसरेंनी राज्यकर्त्यांची सिंहासने सतत डळमळीत करून त्यांना जमिनीवर आणण्याचे काम केले. हे राज्य फुले, शाहू, आंबेडकरांचेच आहे का, असा सवाल पानसरे यांच्या प्रत्येक कृतीतून राज्यकर्त्यांना परखडपणे विचारला जात होता. जिवाचे रान करून प्रामाणिकपणे गरिबांची लढाई लढणाऱ्या या निःशस्त्र माणसावर हल्ला करणाऱ्यांनी कसले शौर्य गाजवले हे त्यांनाच माहीत. ते मला नेहमी म्हणायचे, मी रोज मृत्यू उराशी कवटाळून फिरतो. त्यांचा आत्मविश्वास हा समोरच्याला चैतन्यदायी बनवायला पुरेसा असे.

हा महाराष्ट्र पुरोगामी आहे, असे म्हणण्याची आता शरम वाटायला हवी. कुठे राहिला आहे पुरोगामी महाराष्ट्र? नरेंद्र दाभोळकरांनंतर आता गोविंदराव पानसरेंचा बळी घेतला आहे. पुरोगामी विचारांची पालखी समर्थपणे पुढे नेणाऱ्या अशा उत्तुंग माणसांना दिवसाढवळ्या गोळ्या घातल्या जातात. महाराष्ट्र खरोखर पुरोगामी असता तर असे घडले असते का? पुरोगामी या शब्दाला आपण केव्हाच तिलांजली दिली आहे. उगीच पुरोगामीपणाचे ढोल बडवत स्वत:चीच फसवणूक आता कोणी करून घेऊ नये. राज्यकर्त्यांना राज्यघटनेचा विसर पडत चालला आहे. म्हणून आता राज्यकर्त्यांनीही अंतर्मुख होऊन विचार करावा.

पानसरे हा विचारमंच

पानसरेंसारख्या व्यक्ती निर्माण व्हायला मोठा काळ जावा लागतो. 'गरिबांचा कैवारी' हा शब्द त्यांनाच सार्थ होतो. त्यांनी कधीच राजकीय द्वेषातून काम केले नाही. वैयक्तिक द्वेष व राग, लोभ त्यांना कधी शिवलेला नव्हता. ते एक विचार घेऊन हयातभर लढत राहिले. पानसरे हे सर्वव्यापी होते. ते शोषितांच्या चळवळीचे प्रमुख होते. एक अभ्यासू राजकीय नेते होते. समाजाचा उत्कर्ष साधणारे ते सुधारणावादी लेखक होते. ज्यांच्याकडे बळ नाही, अशांचे ते वकील होते. त्यांनी साठ वर्षे गोरगरिबांसाठी आयुष्य झोकून दिले होते. त्यांची भाषणे लोकांना विचार करायला भाग पाडत होती. एक सच्चा कार्यकर्ता कसा असावा याची पूर्ण व्याख्या त्यांच्या व्यक्तिमत्वाने नव्याने निर्माण केली. आम्ही अनेक आंदोलने खांद्याला खांदा लावून लढलो.

मी सातारला दाभोळकराच्या अंत्यदर्शनासाठी गेलो असताना स्मशानभूमीत म्हणालो होतो की, दाभोळकरांना सुधारणावादी विचारांसाठी आहुती द्यावी लागली. परंतु त्यांना मारणाऱ्या शक्तींना तत्काळ आळा घातला नाही, तर या प्रवृत्ती चेकाळतील. त्यामुळे या प्रवृत्तींना वेळीच पायबंद घातला पाहिजे. पानसरे यां‍च्यावरील हल्ल्यावरून अशा प्रवृत्ती चेकाळल्या आहेत, हे स्पष्ट झाले आहे. आता या मोकाट सुटलेल्या शक्तींबाबत राज्यकर्ते काय करणार आहेत, याचे उत्तर मिळायला हवे.

दाभोळकर प्रकरणात सरकारला फार रस आहे, असे मला वाटत नाही. हा सरकारचा भेकडपणा आहे. आता पानसरेंच्या प्रकरणावरून तरी झोपलेल्या साऱ्या सरकारी यंत्रणांनी जागे होण्याची तसदी घ्यावी. पानसरेंना संपवून टाकणाऱ्यांना पानसरे कळले नाहीत, असे मला वाटते. कारण पानसरे हे विचारमंच होते. त्यांच्या विचारांनी प्रेरित हजारो लोक काम करत आहेत हे लक्षात घ्यावे. त्यामुळे पानसरेंचे विचार हे असेच तळपत राहतील. पुरोगामी आवाज बंद करण्याच्या प्रवृत्ती इतिहासापासून आहेत. त्यांनी यापूर्वीही सुधारणवाद्यांना संपवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र माणसे संपवून विचार संपत नाहीत, हे त्यांना अजूनही ध्यानी आलेले नाही. अशा भेकड प्रवृत्तींना राज्यकर्त्यांनी मुळासकट उखडून टाकले पाहिजे. ठार मारण्याच्या धमक्या येतात, म्हणून पानसरे कधी संरक्षण मागायला गेले नाहीत. असल्या धमक्यांना ते भीक घालत नसत. पण म्हणून एका सच्चा कार्यकर्त्याला दिवसाढवळ्या गोळ्या घालून मारले जाते हे कशाचे द्योतक आहे? अजूनही दलितांवर अत्याचार सुरू आहेत. लिंगभेदावरून भ्रूणहत्या सर्वात जास्त महाराष्ट्रात होत आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार होणार आहे की हे असेच चालणार आहे?

एका निःशस्त्र माणसावर सशस्त्र हल्ला करून काय साधले आहे? पानसरे हे केवळ व्यक्ती नव्हते, तर ते विचारमंच होते. त्यांना मारून त्यांचे विचार संपणार नाहीत. भविष्यात अशा प्रवृत्तींना नष्ट केल्याशिवाय समाज घडणार नाही. ज्या कारणांसाठी पानसरे धारतीर्थी पडले, ते बलिदान आम्ही वाया जावू देणार नाही. पानसरेंच्या हौतात्म्यातून प्रेरणादायी तरुण पिढी घडवण्यासाठी सर्व विवेक संघटनांनी आता एकत्र आले पाहिजे. महाराष्ट्र हा पुरोगामीच आहे, असे पुन्हा ठणकावणारे सुरक्षित वातावरण तयार करण्याची जबाबदारी तुम्हा-आम्हा सर्वांवर आहे. महाराष्ट्राच्या भविष्यासाठी जागे होऊन संघर्ष केला पाहिजे. नव्या विचारांचा शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र घडवण्याची जबाबदारी आता सर्वांवर येऊन पडली आहे.

दसरा चौक शांत झाला...

$
0
0

पानसरेंचा आवाज घुमणाऱ्या मैदानात गहिवर

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूरचे दसरा चौक मैदान म्हणजे कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या ऊर्जेने नेहमीच चैतन्यमय होणारे ठिकाण. ढिम्म सरकार आणि निद्रिस्त समाजाविरोधात या चौकात पानसरे यांचे शब्द घुमले की, उपेक्षितांना न्याय दिसू लागायचा. चौकाच्या ऐतिहासिक कमानीतून आजवर अण्णांनी जेव्हा-जेव्हा मैदानावर पाऊल टाकले, तेव्हा सभा गाजवूनच ते बाहेर पडले. पानसरे यांच्या भाषणाला नेहमीच टाळ्यांची सलामी मिळाली. पण शनिवारी याच मैदानावर अण्णांचा अचेतन देह पाहून हे मैदान स्तब्ध झाले.

हजारो कोल्हापूरकरांनी सकाळी दहा वाजल्यापासूनच दसरा चौक मैदानावर येण्यास सुरुवात केली. अण्णांचे पार्थिव मुंबईहून कोल्हापूरला कधी येणार या वाटेकडे डोळे लावून बसलेले हजारो करवीरवासी पोरकेपणाने वावरत होते. काही वेळातच भाकपच्या राज्य अधिवेशनासाठी उभारण्यात आलेला येथील मंडप शोकाकूल वातावरणात बुडून गेला. खरे तर या मंडपात अण्णांचा आवाज घुमणार होता आणि मात्र पानसरे यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनाची ही जागा बनली, हा विरोधाभास धक्का देणारा ठरला होता.

पानसरेंना अखेरचा लाल सलाम!

$
0
0

गोविंद पानसरे अनंतात विलीन; शोकाकुल वातावरणात निरोप

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कामगार, कष्टकरी, उपेक्षितांचे नेते आणि महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीचे ऊर्जाकेंद्र असलेल्या कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांना शनिवारी शोकाकूल वातावरणात राज्यभरातील हजारो शोकाकूल अनुयायांनी अखेरचा लाल सलाम केला. कोणत्याही धार्मिक विधीशिवाय पानसरे यांच्यावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मुलगी स्मिता सातपुते, सून मेघा पानसरे, नातू कबीर आणि मल्हार यांनी त्यांच्या पार्थिवास अग्नी दिला.

पानसरे यांच्या निधनाने शनिवारी सकाळपासूनच शहरवासीयांनी उत्स्फूर्तपणे व्यवहार बंद ठेवून आदरांजली वाहिली. शहरातील मुख्य चौकात आणि सार्वजनिक तरुण मंडळांच्या फलकांवर पानसरे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध करून भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. शहरात कडकडीत उत्स्फूर्तपणे बंद पाळला.

कॉम्रेड गोविंदराव पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा यांच्यावर सोमवारी (ता. १६ फेब्रुवारी) अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. पाच दिवस पानसरेंची मृत्यूशी झुंज सुरू राहिली. शुक्रवारी रात्री पावणेअकरा वाजता मुंबईत पानसरेंची प्राणज्योत मालवला. शनिवारी दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी मुंबईतून कोल्हापूर विमानतळावर पानसरे यांचे पार्थिव आणण्यात आले. दुपारी सव्वाच्या सुमारास अंत्यदर्शनासाठी पार्थिव शहरातील मुख्य दसरा चौकात ठेवण्यात आले. नंतर दोन तास येथे राज्यभरातील हजारो लोकांनी तेथे अंत्यदर्शन घेतले. अनेक नेत्यांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. कॉम्रेड सुधाकर रेड्डी, भालचंद्र कानगो यांनी दोन झेंड्याची सलामी देऊन आणि पुष्पचक्र अर्पण करून अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार रामदास आठवले, राजू शेट्टी, धनंजय महाडिक, माजी खासदार जयवंतराव आवळे, आमदार महादेवराव महाडिक, राष्ट्रवादीचे माजी मंत्री छगन भुजबळ, आमदार जितेंद्र आव्हाड, इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार आदींनी अंत्यदर्शन घेतले.

दुपारी तीन वाजता दसरा चौकातून अंत्ययात्रा सुरू झाली. दसरा चौक, बिंदू चौकमार्गे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे रेड फ्लॅग बिल्डिंग हे कार्यालय, शिवाजी पुतळा, सीपीआरमार्गे टाउन हॉल, जुना बुधवार पेठ, तोरस्कर चौकमार्गे अंत्ययात्रा पंचगंगा स्मशानभूमीत आली. तेथे अनेकांनी गोळीबाराच्या प्रकाराबद्दल शोक व्यक्त केला. पानसरे यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याबाबत सरकारने त्वरीत हालचाली कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. रविवारी महाराष्ट्र बंदचाही इशारा देण्यात आला. पंचगंगा स्मशानभूमीत कोणत्याही धार्मिक विधीशिवाय अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कॉम्रेड पानसरे यांचे राहिलेले काम पूर्ण करण्याची जबाबदारी सर्वांची असल्याची भावनिक हाक देत पानसरे यांना अखेरचा लाल सलाम देण्यात आला.

उमा पानसरे हॉस्पिटलमध्येच

गोविंदराव पानसरे यांच्या निधनाचे वृत्त त्यांच्या पत्नी उमा यांना सांगण्यात आलेले नाही. त्यांना शरिरावर उजव्या बाजूवर पक्षाघात झाला आहे. लहान कन्या मेघा बुट्टे या त्यांच्यासमवेत आहेत. त्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित नव्हत्या.

'रेडगार्ड'नी पोलिसांना हटवले

कम्युनिस्ट शिस्तीमध्ये पानसरे यांना अभिवादन करण्यात आले. दसरा चौकात मंचाभोवती लाल टीशर्ट घालून हातात लाल झेंडे घेतलेले 'रेडगार्ड' कार्यकर्ते उभे होते. पार्थिव मंचावर ठेवल्यानंतर पक्षाचा झेंडा अर्ध्यावर आणून सॅल्यूट करण्यात आला. पक्षाच्या परंपरेनुसार पार्थिवावर पक्षाचा ध्वज अर्पण करून अंत्यदर्शन सुरू झाले. तेथे येऊ पहाणाऱ्या पोलिसांना 'रेड गार्डस'नी प्रवेशद्वाराबहेर उभे केले. पोलिस अधीक्षक शर्मा यांनाही कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

आता लढायचं!

कामगार, कष्टकरी, उपेक्षितांच्या क्षीण आवाजाला राज्यशकट हलवण्याची ताकद देणाऱ्या कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांना शनिवारी महाराष्ट्रातील निरनिराळ्या विचारांच्या, पण विवेकी मनाच्या प्रत्येकाने अखेरचा 'लाल सलाम' केला. कोणत्याही धार्मिक विधीशिवाय पानसरे यांच्यावर सायंकाळी कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. अश्रू, त्वेष, संताप अशा भावनांचा कल्लोळ झालेल्या हजारो 'विचार'वंतांनी पानसरे यांच्या पार्थिवाच्या साक्षीनेच पंचगंगा किनारी 'आता लढायचं' अशी शपथ घेतली आणि अण्णांचे विचार अमर असल्याचा संदेश हल्लेखोरी विचारांना दिला.

‘गोकुळ’मध्ये महाडिक यांच्यासोबतच

$
0
0

म. टा. प्र​तिनिधी, कोल्हापूर

माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील हे माझे चांगले मित्र आहेत. महापालिकेत त्यांच्यासोबत आघाडी आहे. महापालिकेत त्यांच्यासोबत राहू. मात्र 'गोकुळ'मधील काही संचालक विधानसभा निवडणुकीत आमच्यासोबत आहेत. एका अर्थाने हा आमचा वीकपॉईंट आहे. गोकुळची निवडणूक जाहीर झाली की आमदार महादेवराव महाडिक यांच्याशी चर्चा करू' अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी गोकुळच्या निवडणुकीत पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

माजी मंत्री सतेज पाटील हे गोकुळमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात पॅनेल उभारण्याच्या हालचाली करतआहेत. या संदर्भात विचारले असता मुश्रीफ म्हणाले, 'गोकुळच्या दोन निवडणुकीत चांगली टक्कर दिली होती. मते ही चांगली मिळाली होती. सध्या काँग्रेसमध्ये मतभेद आहेत. पण विधानसभा निवडणुकीत कागलमध्ये गोकुळचे संचालक रणजित पाटील यांनी मला, तर राधानगरीमध्ये बजरंग देसाई, अरूण डोंगळे यांनी के. पी. पाटील यांना मदत केली होती. गोकुळ निवडणुकीच्याबाबतीत हे आमचे वीक पाँईट आहेत. निवडणूक जाहीर झाली की, महाडिक यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. मी आजारी असताना सतेज पाटील यांनी प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतली होती', हेही मुश्रीफ यांनी सांगितले.

कोल्हापूर सुपरफास्ट?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर रेल्वे स्थानकाच्या इमारतीपासून विविध ठिकाणच्या वेगवान कनेक्टिव्हीटीबाबतच्या मागण्यांना येत्या रेल्वे बजेटमध्ये अच्छे दिन येण्याचे संकेत मिळत आहेत. कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडून या मागण्यांबाबत प्रशासनस्तरावर दिलेल्या आदेशांमुळे काही प्रश्न मार्गी लागतील असे दिसते. नवीन रेल्वे सुरू करण्याबरोबरच स्थानकाची इमारत, परिसरातील नवीन रेल्वेमार्गाच्या मागण्यांबाबत कोल्हापूरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

कोकण रेल्वेला कोल्हापूर जोडण्यासाठीचे प्रयत्न बऱ्याच पातळीवर सुरू आहेत. कराड ते चिपळूण, कोल्हापूर ते राजापूर, कोल्हापूर ते वैभववाडी या मार्गांचा विचार सुरू आहे. त्यातील चिपळूण व राजापूर या मार्गांचा सर्व्हे झाला आहे. राजापूरचा प्रस्ताव तर रेल्वे बोर्डासमोर गेला आहे. या प्रकल्पानंतर आर्थिक परतावाही सकारात्मक दर्शवला आहे. यामध्ये सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्रभू यांचा पूर्वाश्रमीचा मतदारसंघ राजापूर आहे. त्यामुळे त्यांच्याकडून या प्रस्तावाबाबत पाठबळ मिळण्याची शक्यता आहे. याबरोबरच कराड ते बेळगाव या नवीन रेल्वेमार्गाबाबतही निर्णय होऊ शकतो. या मार्गाबाबत मंत्री जर सकारात्मक असल्यास बजेटमध्ये तरतूद केली जाऊ शकते. ती तरतूदही केवळ बजेटमध्ये समावेश करण्याच्यादृष्टीने की प्रकल्प मार्गी लावण्याच्यादृष्टीने हे त्यावेळी स्पष्ट होऊ शकते. कोल्हापुरातून मुंबईसाठी फास्ट रेल्वे सुरू करण्याबरोबरच अन्य ठिकाणीही नव्या रेल्वे सुरू करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. पुण्यातून ​सुटणाऱ्या रेल्वे कोल्हापूरपासून सोडण्यासाठीही चर्चा आहे. केवळ बजेटमध्ये त्याची घोषणा होईल, असे सांगितले जात आहे.

​मिरज ते पुणेदरम्यानच्या रेल्वे लाइनच्या दुहेरीकरणाबरोबरच विद्युतीकरणामुळे या परिसरातील रेल्वे वाहतूक वेगवान होऊ शकते. याबाबतचा सर्व्हे झाला आहे. त्यावर बजेटमध्ये तरतूद होईल की आणखी काही पर्याय सुचवले जातील हे मात्र बजेटनंतर स्पष्ट होणार आहे. कोल्हापूर स्थानकाच्या इमारतीबाबतही वेगवेगळी चर्चा सुरू आहे. इमारत हेरिटेजमध्ये आहे, असे सांगून त्याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तयार झालेला नाही. त्यामुळे स्थानकावर सुविधांबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. रेल्वे स्टेशन विकासाचा मार्ग रिकामा होईल, असे दिसते.

हल्लेखोर मराठी भाषिक?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हल्लेखोरांनी उमा पानसरे यांच्याशी बोलताना मराठीतूनच पत्ता विचारला होता. त्यामुळे हल्लेखोर मराठी भाषिकच आहेत, अशी माहिती चौकशीत पुढे आली आहे. त्यामुळे पोलिसांनी स्थानिक पातळीवर तपास वाढवला आहे. ज्येष्ठ नेते कॉ. गोविंदराव पानसरे व उमा पानसरे यांच्यावर हल्ला करण्यापूर्वी हल्लेखोरांनी अर्धा तास आधी उमा पानसरे यांच्याकडे 'मोरे कुठे राहतात?' असे अस्खलित मराठीतच विचारले होते, असे एका पोलिस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

उमा पानसरे या पूर्ण शुध्दीवर आल्या असून पोलिसांनी त्यांचा रितसर जबाब घेतला नसली तरी वरिष्ठ अधिकारी त्यांच्याकडे डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर माहिती घेत आहेत. हल्लेखोर मराठी बोलत असल्याने ते स्थानिक असावेत, असा प्राथमिक निष्कर्ष काढून पोलिसांनी स्थानिक पातळीवर लक्ष केंद्रित केले आहे. संशयितांनी मराठी भाषा वापरल्याने परिक्षेत्रातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची चौकशी सुरू केली आहे. ग्रामीण भागातील संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगारांना चौकशीस ताब्यात घेण्यात येत आहे. एका हल्लेखोराने गुलाबी रंगाचा शर्ट घातला होता. पोलिसांनी काढलेल्या रेखाचित्रांचा पडताळा करण्यात येत आहे.

कार्यकर्त्यांना संरक्षण

कोल्हापूर परिक्षेत्रात चळवळीतील कार्यकर्त्यांना पोलिस बंदोबस्त देण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत, अशी माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक रितेशकुमार यांनी दिली. जे कार्यकर्ते बंदोबस्त मागतील त्यांना तातडीने बंदोबस्त पुरवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हल्ल्यात साधर्म्य नाही

Latest Images