Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

महापौरांचा राजीनामा लांबणीवर

$
0
0


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लाच घेतल्याप्रकरणी अटक झालेल्या कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी सोमवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत राजीनामा देतील, असे अपेक्षित होते. परंतु, सर्व दबाव झुगारत माळवी यांनी सभागृहात राजीनाम्याचा विषयच काढला नाही. त्यांच्या राजीनाम्यासाठी सर्व नगरसेवकांनी दबाव तंत्राचा अवलंब केला. मात्र, माळवी या दबावाला बळी पडल्या नाहीत. सुमारे दोन तासाच्या चर्चेनंतर १६ तारखेला विशेष सभा बोलावून राजीनामा देऊ, असे महापौरांनी सायंकाळी स्पष्ट केले.

सर्वसाधारण सभेत राजीनामा सादर न करताच ही संपल्यावर महापौरांनी थेट कार्यालय गाठले. पाठोपाठ काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवकही त्यांच्या दालनाकडे धावले. आपल्यावरील लाचखोरीचा डाग पुसला जात नाही, तोपर्यंत राजीनामा देणार नसल्याचे महापौरांनी यावेळी स्पष्ट केले.


प्रशिक्षित हत्तींची प्रतीक्षा

$
0
0

रमेश चव्हाण, आजरा

आजरासह चंदगड तालुक्यात धुमाकूळ घालीत नुकसानसत्र आरंभलेल्या हत्तींच्या कळपाला हुसकावण्यासाठी कोकणातील वनविभागाच्या भूमिकेप्रमाणे येथे कार्यवाही अशक्य आहे. कारण यासाठी सुमारे सत्तर लाखाहून अधिक खर्च आहे. यामुळे कोकणात या उपक्रमाचा नेमके किती यश मिळते, याकडे वनविभागाचे लक्ष असल्याचे आजरा वनविभागाचे वनक्षेत्रपाल राजन देसाई यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' ला सांगितले. यामुळे येत्या काही आठवड्यात तरी आजऱ्यातील टस्कर व चंदगडातील हत्ती कळपाच्या नुकसानसत्रापासून ग्रामस्थांची सुटका अशक्य असल्याचे निश्चित आहे.

गेले काही महिने आजऱ्यातील एका टस्करसह चंदगड तालुक्यातील हत्तींच्या कळपाकडून मोठे नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी वर्ग कमालीचा अस्वस्थ झाला आहे. याबाबत अपेक्षित कार्यवाही करीत येथील हत्तींना पिटाळून लावण्याबाबत आग्रह धरला जात आहे. अशा परिस्थितीत नजिकच्या कोकण परिसरातील हत्तींचा कळप हाकलण्साठी प्रशिक्षित हत्ती आमंत्रित करण्यात येत आहेत. यामागे तेथील वनविभागाची संवेदनक्षमता असल्याची भावना आजरा-चंदगड तालुकावासियांमध्ये बळावली आहे.

दरम्यान, येथील वनविभागाकडून मात्र कोणतीही हालचाल होत नसल्याची स्थिती आहे. गेल्या आठवडाभरात आजरा तालुका परिसरात एका टस्करने मोठा धुमाकूळ घालीत शेतीवाडीत नुकसान करताना ग्रामस्थांसह वनकर्मचाऱ्यांवरही चाल केली आहे. या पार्श्वभूमीवर विचारणा केली असता वनक्षेत्रपाल देसाई यांनी मांडलेला मुद्दा महत्त्वाचा आहे.

कोकणात हत्तींच्या कळपाकडून मोठे नुकसानसत्र सुरू आहे. मात्र याबाबत तेथील ग्रामस्थांच्या अपेक्षेनुसार तेथील वनविभाग कार्यरत झाला आहे. या संकटातून सुटका करण्यासाठी त्यांनी खास प्रशिक्षित हत्तीं निमंत्रित केले आहेत. यासाठी सुमारे सत्तर लाख रूपये खर्च येण्याची अपेक्षा आहे. पण तरीही त्यांनी तो मान्य केला आहे.

मात्र गेले पाच-सहा वर्षे येथे हत्तींचा कळप नित्यनेमाने येत असताना आणि कोट्यवधी रूपयांचे नुकसान केलेले असतानाही येथील वनविभागास याबाबत कोणतीही संवेदनक्षमता नसल्याचेच स्पष्ट होत आहे. या विभागाचे कोकणातील युनिट संवेदनक्षमतेने निर्णय घेते, पण येथील युनिटच्या संवेदना बोथट झाल्या असल्याचेच यानिमित्ताने स्पष्ट होत आहे.

कदाचित कोकणातील उपक्रम यशस्वी ठरल्यास व येथील वनिविभागाने निर्णय घेत प्रशिक्षित हत्तींना बोलाविल्यास त्यांच्या माध्यमातून येथील रानटी टस्कर व हत्ती कळपास तिलारीनजिकच्या परिसरात बंधिस्त करण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. पण तोपर्यंत कोकणातील उपक्रमाकडे लक्ष देत येथील हत्तींची नुकसान सहन करण्याचाच पर्याय आजरा-चंदडगमधील शेतक-यांकडे उपलब्ध असेल.

मयतांमुळे कोकणात निर्णय?

गेल्या काही दिवसांत कोकणातील हत्ती कळपाने केलेले नुकसान व काही ग्रामस्थांवर केलेल्या हल्ल्यांत संबंधित मयत झाल्यामुळे तेथील वनविभागाने अशाप्रकारे प्रशिक्षित हत्ती बोलाविण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. मात्र कोकणाआधी चंदगड तालुक्यातच काही निष्पापांना आपले प्राण गमवावे लागले असून काही हत्तीही गतप्राण झाल्याच्या घटना झाल्या आहेत. अशा स्थितीत कोकणाआधीच अशी कार्यवाही या ठिकाणी करणे आवश्यक होते.

वृद्धाश्रमाला श्रावणबाळाची आस

$
0
0

प्रकाश कारंडे, कागल

कागल तालुक्यातील करनूर येथील मोफत वृद्धाश्रमातील वृद्धांना श्रावणबाळ मिळेनासा झाला आहे. सध्या एका बंद पडलेल्या विना दरवाज्याच्या अंधाऱ्या केमिकलच्या फॅक्टरीत सहा महिला वृद्ध आपले जीवन कठीण परिस्थितीत कंठत आहेत. स्वकीयांनी बाहेर काढल्यानंतर मिळालेल्या आसऱ्यातही सुविधेअभावी वृद्धांची ससेहोलपट थांबलेली नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी रितसर आदेश दिल्यास जागा देण्यास अगोदरच तयार असणाऱ्या ग्रामपंचातीमुळे या वृद्धांचा दुर्दैवाचा फेरा कमी होण्यास मदत होणार आहे.

कोल्हापूरच्या सेवा फाऊंडेशनचा करनूर येथे वृद्धसेवा आश्रम आहे. चार जानेवारी २०१२ पासून हा वृद्धाश्रम बाबूराव चौगुले यांच्या घरी नाममात्र भाडे देवून सुरु करण्यात आला. यावेळी सांगली, गडहिंग्लज, संकेश्वर आणि कोल्हापूर येथून आलेल्या वृद्धांची संख्या २५ ते ३० च्या घरात होती. परंतु दीड वर्षापूर्वी चौगुले यांनी घर विकायला काढले आहे, असे सांगत अचानक जागा रिकामी करण्यास सांगितले. त्यानंतर उचगाव येथील एका घरात दुसऱ्या मजल्यावर भाडे देवून वृद्धाश्रम सुरु करण्यात आला. परंतु वृद्धांना होणारा त्रास पहाता पुन्हा करनूरमध्येच वृद्ध रहायला आले. गावच्या दक्षिणेला रामकृष्णनगरात माळावर काही दिवस झोपड्या बांधून हे वृद्ध राहीले. आता त्यांनी याच ठिकाणी बंद पडलेली केमिकल फॅक्टरी राहण्यासाठी निवडली आहे.

गावातीलच आण्णासो इंगळे यांनी स्वत:च्या विहीरीतून मोफत पाणी दिले आहे. आश्रमाच्या अध्यक्षा विमल सुतार (रा.गडहिंग्लज) या स्वत:च वृद्धाश्रम चालवतात. टॉयलेट बाथरुमची अडचण असल्याने व आहे त्याला दरवाजेच नसल्याने पुरुष वृद्ध निघून गेले आहेत. तर सहा महिलाच याठिकाणी सध्या रहात आहेत. २५ मधील दहा वृद्ध मयतही झाले आहेत.परंतु निरोप देवूनही नातेवाईक फिरकले नाहीत. सचिव प्रकाश फाळके यांच्या अॅक्युप्रेशरच्या उपचारातून जमा झालेले पैसे,काही दानशूर यांच्या मदतीतून वृद्धाश्रमाचे कुटुंब चालते. वृद्धांचे जेवण,खाणे,आजारपण सुतार याच करतात. सुळगावचे डॉ.सचिन मगदूम याठिकाणी येवून मोफत उपचार करतात.आजारपण वाढल्यास सीपीआरचा आधार घेतला जातो. आश्रमासाठी जागा मिळाल्यास कर्नाटकातील कोगनोळीतील तीन तरुण मंडळांनी वृद्धाश्रम बांधून देण्याचे वचन दिले आहे.

या आश्रमातील एक वृद्धा म्हणाल्या,'पतीचा व्यसनाने मृत्यू झाला. मुलगीचे लग्न झाल्यानंतर मला दीर आणि पुतण्यांनी या वृद्धाश्रमात आणून सोडले. काही गोष्टींची कमतरता असली तरी आश्रमात आमची खूपच काळजी घेतली जाते.'

औषध टंचाईबद्दल विचारला जाब

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

छत्रपती प्रमिलाराजे सिव्हील हॉस्पिटल (सीपीआर) सर्वसामान्यांसाठी वरदान आहे. मात्र, काही मंडळी सीपीआर मोडण्याचा डाव खेळत आहेत. त्याला हॉस्पिटलचे प्रशासन अप्रत्यक्षपणे सहकार्य करत असल्याचा आरोप सीपीआर बचाव कृती समितीने सोमवारी केला. सीपीआरप्रश्नी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात येईल असे आश्वासन प्रभारी अधिष्ठाता डॉ. रघुजी थोरात यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिले. सीपीआरच्या प्रश्नांबाबत सीपीआर बचाव कृती समितीच्या शिष्टमंडळाने डॉ. थोरात यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी अधिष्ठाता डॉ. कोठुळे अनुपस्थित असल्याबाबत शिष्टमंडळाने त्यांचा निषेध केला.

कृती समितीचे निमंत्रक वसंत मुळीक म्हणाले, 'कोट्यावधी रुपयांच्या औषधांचा नेमका उपयोग कोणाला होतो हे प्रशासनाने स्पष्ट करावे. कोणीही चिठ्ठी दिली की औषधे दिली जातात. त्यामुळे गरजूंना औषधे विकत आणण्यास सांगितले जाते. जिल्हा नियोजन मंडळ सीपीआरला पैसे देण्यास तयार असताना प्रशासन याबाबतच विभागप्रमुख निर्माण करण्यास कुचराई करत आहे. त्यामुळे सीपीआरला पैसे हस्तांतरीत करता आलेले नाहीत. या सगळ्या गोष्टी म्हणजे सीपीआर बंद पाडण्याचाच एक भाग आहेत.'

कॉमन मॅन संघटनेचे बाबा इंदुलकर म्हणाले, 'बालरोग विभागाच्या डॉक्टरांची बढतीमुळे बदली केली गेली. मात्र प्रशासनाने या जाग्यावर पर्यायी डॉक्टरांची नियुक्ती केलेली नाही. त्यामुळे येथे बालकांवर उपचार होत नाहीत. गोरगरिबांना खासगी डॉक्टरांचे महागडे उपचार परवडत नाहीत.'

कॉ. दिलीप पवार म्हणाले, 'प्रशासन जाणूनबूजुन कार्यवाही करण्यास टाळाटाळ करत असेल तर जनता रस्त्यावर उतरेल. त्यातून सर्वांना वठणीवर आणले जाईल हे ध्यानात घ्यावे. सरकारचा लाखो रुपयांचा निधी वैद्यकीय सोयीसुविधा व पगारावर खर्च केला जातो. या जनतेच्या पैशांचा अपव्यय होऊ देणार नाही.'

धनगर समाज संघटनेचे बबन रानगे म्हणाले, 'आम्ही टप्प्याटप्प्याने आंदोलन करत आहोत. प्रशासनाने दुर्लक्ष कायम ठेवले तर आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल.'

डॉ. थोरात म्हणाले, 'सीपीआरच्या प्रत्येक प्रश्नावर दिर्घ चर्चा होऊन यातून मार्ग काढणे आवश्यक आहे. त्यासाठी संपूर्ण एक दिवस प्रशासन व आंदोलकांची बैठक घेण्याबाबत नियोजन केले जाईल. यावेळी अवधूत पाटील, श्रीमंत माने आदी उपस्थित होते.

नियमबाह्य परिपत्रक रद्द करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्राध्यापकांच्या कार्यभारासंबधी नियमबाह्य आणि अन्यायी परिपत्रक रद्द करावे, यासह अन्य मागण्यांसाठी शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाने (सुटा) शिक्षण सहसंचालक कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढला. शिक्षण सहसंचालक आर. एम. कांबळे यांच्यासह कोणीही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नसल्याने सुटाने संताप व्यक्त केला. अखेर कार्यालयातील लिपिकाला निवेदन देऊन शिक्षण सहसंचालकांना भावना कळविण्याचा निरोप देण्यात आला.

राजारामपुरी जनता बझार येथून मोर्चाची सुरुवात झाली. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील सुमारे तीनशेहून अधिक प्राध्यापक मोर्चात सहभागी झाले. चाळीस घड्याळी तासांचे परिपत्रक रद्द करा, बेकायदेशीर परिपत्रकाची अंमलबजावणी करणारे शिक्षण सहसंचालक आणि प्राचार्यांचा निषेध असो, अशा घोषणा देत मोर्चाची राजारामपुरी जनता बझार येथून सुरुवात झाली. मोर्चा कार्यालयात आल्यानंतर शिक्षण सहसंचालक परगावी गेल्याचे सांगण्यात आले. त्या वेळी काही प्राध्यापक संतप्त झाले. जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सुटाचे अध्यक्ष प्रा. एन. के. मुल्ला म्हणाले, 'सहसंचालक कार्यालयाने प्राध्यापकांना घड्याळी चाळीस तास उपस्थित राहिल्याचे पत्र प्राचार्यांना दिले आहे. मात्र विद्यापीठ अनुदान आयोगाने प्राध्यापकांच्या कार्यभाराचे स्पष्टपणे तपशील दिला आहे. यात प्राध्यापकांनी किमान पाच तास उपस्थित राहण्याचे आवश्यक आहे. मात्र सहसंचालकांनी ६ तास ४० मिनिटे उपस्थित राहण्याचा नियमबाह्य निर्णय घेतला आहे. प्राध्यापकांचा कार्यभार ही विद्यापीठांच्या अधिकार क्षेत्रातील शैक्षणिक बाब आहे. त्याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा.

शिक्षण सहसंचालकांनी कॉलेजमधील बेकायदेशीर हस्तक्षेप थांबवावा, अशी मागणी करण्यात आली. मोर्चात प्रमुख कार्यवाह डॉ. आर. एच. पाटील, कार्यालय कार्यवाह डॉ. एस. ए. बोजगार, उपाध्यक्ष प्रा. आर. डी. ढमकले, प्रा. यू. ए. वाघमारे, डॉ. एस. एम. पवार, सहकार्यवाह डॉ. आर. जी. कोरबू, सहकार्यवाह प्रा. शिवाजी घोरपडे, सहकार्यवाह डॉ. आर. के. निमट आदी सहभागी झाले.

रंकाळ्यासाठी पालिकेची शोधयात्रा

$
0
0

आप्पासाहेब माळी, कोल्हापूर

कोल्हापूर शहराचे सौंदर्य म्हणजे रंकाळा तलाव अशी उठसूट डांगोरा पिटणाऱ्या महापालिकेकडे तलावाच्या दुरुस्तीसाठी निधीच उपलब्ध नाही. गेल्या वर्षभरात चौथ्यांदा तटबंदीला भगदाड पडूनही त्याची बांधणी करता आली नाही. धक्कादायक बाब म्हणजे महापालिकेने चालू आर्थिक वर्षात तलाव दुरुस्तीसाठी एक पैचीही तरतूद केली नाही. आता पश्चिमेकडील संपूर्ण तटबंदीच कोसळण्याच्या मार्गावर असल्याने दुरुस्तीच्या कामासाठी निधी उभारण्यासाठी महापालिकेला शोधाशोध करावी लागत आहे.

शालिनी पॅलेस समोरील उद्यानाला लागून असलेली तटबंदी सुमारे ९५ मीटर लांबीची तर २० फुट उंचीची आहे. शालिनी पॅलसेसमोरील उद्यानाच्या प्रवेशव्दारापासून बोटिंग क्लबपर्यंतची तटबंदी कमकुवत झाली आहे. नोव्हेंबर २०१३ ते आठ फेब्रुवारी २०१५ पर्यंत तटबंदीला चारवेळी भगदाड पडले. या काळात महापालिका प्रशासनाने भरीव पावले उचलली नाहीत. गेल्या वर्षी मार्च महिन्यात तलावाच्या दुरुस्ताठी ३५ लाखाचा आराखडा तयार केला. सध्या प्रशासनाने ८८ लाखाचा आराखडा तयार केला आहे. ​ परंतु, महापालिकेकडे निधीच नाही.

लोकप्रतिनिधी निधी देणार काय?

तलावाच्या दुरुस्तीसाठी आमदार, खासदार फंडातून निधी उपलब्ध होऊ शकतो. यासाठी लोकप्रतिनिधींनी ईच्छाशक्ती दाखवायला हवी. शहराशी निगडीत दोन आमदार आहेत. आमदार राजेश क्षीरसागर, अमल महाडिक हे सत्तारूढ पक्षाचे आमदार आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील नियोजन समितीचे प्रमुख आहेत. ते निधी उपलब्ध करून देतील का, याची चाचपणी सुरू आहे.

निवृत्त पोलिस कर्मचाऱ्याच्या आत्महत्येच्या धमकीने पोलिस त्रस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'निवृत्त सहायक फौजदार कुंडलिक हरी कांबळे यांच्या आत्महत्या व आत्मदहनाच्या धमकीने पोलिस प्रशासन हैराण झाले आहे. भविष्यात कांबळे यांनी पराकोटीची भूमिका घेतली तर पोलिसांची जबाबदारी राहणार नाही,' असे पत्रक पोलिसांनी प्रसिद्धीस दिले आहे. कांबळे हे निवृत्तीनंतर पूर्ण पेन्शन मिळावी, अशी मागणी करत असून, त्यांनी वारंवार पोलिस प्रशासनाला आत्महत्येची धमकी दिली आहे.

कांबळे यांच्याविरोधात सेवेत असताना लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातून उच्च न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. पोलिस कार्यालयाने त्यांचे निवृत्तीविषयक सर्व कार्यवाही केलेली आहे. निर्दोष होण्यापूर्वी त्यांना तात्पुरते निवृत्तिवेतन देण्यात आले आहे. निवृत्तिवेतन कमी दराने मिळाल्याबाबत कांबळे यांनी तक्रार केली होती. या तक्रारीला अनुसरून कोषागार कार्यालयात बैठक होऊन कांबळे यांना दिलेले निवृत्तिवेतन योग्य असल्याचा निर्वाळा कोषागार अधिकाऱ्यांनी दिला आहे. तरीही समाधान न झाल्याने कांबळे यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात स्वतःची वेतननिश्चिती व निवृत्तिवेतनाची परिगणना तपासून घेतली होती. निवृत्तिवेतनाविषयी शंका असेल तर राज्य सरकारकडे अर्ज करावा अशी सूचना केली आहे, पण कांबळे यांनी राज्य सरकारकडे अर्ज केलेला नाही. ते वारंवार पोलिस अधीक्षक कार्यालयात येऊन असभ्य वर्तन करून आत्मदहनाची धमकी देतात. त्यांच्या तक्रारीचा पुनर्विचार करावा अशी विनंतीही पोलिस अधीक्षक कार्यालयाने केली आहे. तरीही पोलिस अधीक्षक, पोलिस महानिरीक्षक यांच्या वाहनाखाली जीव देणार असे सातत्याने कांबळे धमकी देत आहेत. भविष्यात कांबळे यांनी आत्महत्येबाबत पराकोटीची भूमिका घेतली तर पोलिस कार्यालय त्याची जबाबदारी घेणार नाही, असे पोलिस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांनी स्पष्ट केले.

नाइट शेल्टरसाठी ‘एकटी’चा ठिय्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

निराधार महिलांसाठी नाइट शेल्टरची सुविधा कोल्हापुरात सुरू करा या मागणीसाठी एकटी संस्थेच्या नेतृत्वाखाली महिलांनी मंगळवारी महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन करत आपला संसार थाटला. तब्बल सहा तास महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन केल्यानंतर स्थायी समिती सभापती आदिल फरास यांनी शुक्रवारी त्यास सभेत मंजूरी घेऊन जागा देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

सुप्रीम कोर्टाने चार वर्षांपूर्वीच नाइट शेल्टरचा आदेश दिला आहे. एकटी संस्थेने गेल्या तीन वर्षांपासून महापालिकेकडे याची सातत्याने मागणी केली होती. मात्र अद्यापही निराधार महिलांसाठी एकही नाइट शेल्टर कोल्हापुरात दिले गेलेले नाही. एकटी संस्थेने नाइट शेल्टरच्या जागेसाठी महापालिकेकडे तीन वर्षांपासून पाठपुरावा केला आहे. आयुक्तांनी याबाबत बैठका घेतल्या. प्रत्यक्षात काहीच हाती आले नाही. गेल्या सहा महिन्यांत ३५ निराधार महिलांना रात्री ‌‌निवाऱ्याची

आवश्यकता होती.

आजही अनेक महिलांना रात्र निवाऱ्याची आवश्यकता आहे. त्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने महापालिकेने लवकर जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली जात आहे. या संदर्भात पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेण्याचे मान्य केले. आंदोलनाचे नेतृत्व अनुराधा भोसले व शरयू भोसले यांनी केले. महापालिकेने बैठक घेऊन या निराधार महिलांसाठी रिलायन्स मॉलच्या पिछाडीस जागा देण्याचे मान्य केले असून स्थायी समितीच्या सभेत त्याला मंजूरी घेऊन जागा ताब्यात देण्यात येईल असे सभापती फरास यांनी सांगितले.


‘भूलतज्ज्ञांनी कामात परिपूर्णतेचा ध्यास घ्यावा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'भूलतज्ज्ञांचे काम हे अत्यंत निष्णात असते. या शास्त्रामध्ये सातत्याने होत असलेल्या बदलांचा स्वीकार त्यांनी करावा. शस्त्रक्रियेदरम्यान सर्व दक्षता घेऊन परिपूर्णतचा ध्यास घ्यावा' असा सूर 'पीजीकॉन २०१५' या राज्यातील भूलतज्ज्ञांच्या पहिल्या परिषदेत मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आला. भारतीय भूलशास्त्र संघटना आणि डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्यावतीने कदमवाडीतील डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये ही परिषद झाली.

भूलशास्त्र संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. अशोक देशपांडे म्हणाले, 'भूलशास्त्रामध्ये सातत्याने संशोधन होत आहे. त्यामुळे उपचाराच्या पद्धतीत सुधारणा होत आहेत.' डॉ. सफिया शेख म्हणाल्या, 'गरोदरपणी वाढलेला अतीरक्तदाब आणि सिझेरियनच्या शस्त्रक्रियेमध्ये विशेष काळजी तज्ज्ञांनी घ्यावी. रुग्णांच्या रक्तातील विविध वायूंच्या प्रमाणाचा सखोल अभ्यास करावा.' यावेळी डी. वाय पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. एच. पवार, डॉ. विजया पाटील, डॉ. नमाजी, डॉ. गणेश, डॉ. लक्ष्मी, डॉ. दिलीप देसाई आदी उपस्थित होते.

दरम्यान, 'मूत्रपिंडाच्या दीर्घकालीन आजारावर भूलशास्त्र तज्ज्ञांची भूमिका, गरोदरपणी वाढलेला अतिरक्तदाब आणि सिझेरियनची शस्त्रक्रिया, त्यात घेण्यात येणारी अतिदक्षता आणि सुधारलेल्या पद्धतीमुळे मातामृत्यूचे प्रमाण दर लाखांत २२० वरून १९० वर आल्याचे परिषदेमध्ये सांगण्यात आले. भूलशास्त्रामध्ये शिक्षण घेणाऱ्या डॉक्टर विद्यार्थ्यामध्ये परिपूर्णतेचा ध्यास निर्माण करून शस्त्रक्रियेदरम्यान आणि पश्चात कुशलतेने काळजी निर्माण करण्याच्या उद्देशाने परिषद घेण्यात आली. डॉ. शकील मोमिन, डॉ. सफीया शेख, डॉ. विजया पाटील, डॉ. अशोक देशपांडे, डॉ. मिलिंद पोळ, डॉ. आबासाहेब शिर्के, डॉ. शीतल देसाई, डॉ. दिलीप देसाई, डॉ. एस. एच. पवार, डॉ. महेश म्हेतर, डॉ. विनोद बचरानी उपस्थित होते.

आता कामचुकारांना लगाम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कार्यालयीन कामकाजाच्या नावाखाली दिवसभर बाहेर फिरणे यांसह 'आओ जाओ घर तुम्हारा' या पद्धतीने वागणाऱ्या अ​धिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वागणुकीला लगाम बसणार आहे. कामचुकार अ​धिकारी व कर्मचाऱ्यांवर आयुक्त पी. शिवशंकर यांनी बडगा सुरुवात केली आहे. अ​धिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपस्थित रहाणे बंधनकारक असल्याचे त्यांनी बजावले आहे. त्यासाठी बायोमेट्रिक यंत्रणेचा अवलंब केला जाणार आहे.

महापालिकेत आरोग्य, पाणी, रस्ते, अतिक्रमण, बांधकाम परवाना, व्यवसाय परवाना अशा विविध कामांसाठी नागरिक दररोज येतात. मात्र अनेकदा अधिकारी आणि कर्मचारी उप​​स्थित नसतात. त्यामुळे नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात. काही अधिकारी आणि कर्मचारी तर वारंवार कार्यालयीन वेळेत अनुपस्थित रहात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. अधिकारी आ​णि कर्मचारी कार्यालयीन वेळेत हजर नसल्यामुळे प्रशासनाला पदाधिकारी व सदस्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

आयुक्त शिवशंकर यांनी याबाबत सक्त सूचना केल्या आहेत. सर्व विभागप्रमुखांना यासंदर्भात पत्र पाठवले आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हजेरीकरिता बायोमेट्रिक यंत्रणेच्या अंमलबजावणी संदर्भात आदेश दिले आहेत. विभागप्रमुखाकडून ज्या-त्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे नाव, पदनाम, कार्यालयीन वेळ यासंबंधीची माहिती गुरुवारपर्यंत (ता. १२) नियंत्रण अधिकाऱ्यांकडे सादर करण्यास सांगितले आहे. यासंबंधीची संपूर्ण जबाबदारी खाते प्रमुखावर असल्याचेही स्पष्ट केले आहे. ज्या विभागप्रमुखांकडून माहिती उपलब्ध होणार नाही त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

नार्को टेस्टची मागणी लबाडीची

$
0
0

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दर्शन शहा खून खटल्यातील मुख्य आरोपी योगेश ऊर्फ चारू आनंदा चांदणे (वय २४) याने केलेली नार्को टेस्ट मागणी चुकीची, लबाडीची असून त्याचा अर्ज फेटाळून लावावा अशी मागणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम न्यायालयात केली. जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. मुळे यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. नार्को टेस्टसंदर्भात बुधवारी निर्णय होणार आहे.

दर्शन शहा खून खटल्याची सोमवारी सुनावणी पुन्हा सुरू झाल्यानंतर आरोपीचे वकील पीटर बारदेसकर यांनी उच्च न्यायालयाने योगेश चांदणे याची नार्कोटेस्ट घेण्यासंदर्भात निर्देश दिले असल्याने सुनावणी पुढे ढकलावी अशी मागणी केली. यासंदर्भात विशेष सरकारी वकील निकम यांनी लेखी म्हणणे मंगळवारी न्यायालयाला सादर केले. नार्को टेस्टची मागणी बेकायदेशीर असून नार्को टेस्टचा निर्णय कायद्याने पुरावा होऊ शकत नाही. नार्को टेस्टच्या निर्णयावर गुन्हेगार दोषी अगर निर्दोष आहे हे कायद्याने ठरविता येत नाही. पोलिस तपासात जेव्हा आरोपी निष्पन्न होत नाही, त्यावेळी तपासाची सुई ज्यावेळी संशयित व्यक्तीवर असते त्यावेळी खात्री करण्यासाठी व तपासाची दिशा ठरवण्यासाठी नार्को टेस्टची मागणी केली जाते. या खटल्यात आरोपीविरूध्द भरपूर पुरावा आहे.

तो न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आरोपीचा जामिन अर्ज हायकोर्टाने फेटाळून लावला आहे. आरोपीविरूध्द असलेला पुरावा स्पष्टपणे त्यानेच गुन्हा केला आहे हे दर्शवत असताना आरोपींने नार्कोटेस्टची मागणी करून निर्दोषत्व सिद्ध होईल हे चुकीचे आहे असा युक्तीवाद त्यांनी केला.

संकुलाच्या श्रेयवादाचे राजकारण

$
0
0

प्रतिकात्मक उद‍्घाटनाची सतेज पाटील यांची घोषणा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आघाडी सरकारच्या काळात राज्यातील अनेक प्रकल्पांचे काम नव्वद टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले होते. निवडणुकीनंतर या प्रकल्पांचे उदघाटन होणार होते. मात्र मतदारांनी विधानसभा निवडणुकीत आघाडी सरकारला नाकारल्यानंतर प्रकल्पांचे उर्वरीत काम करून भाजपप्रणीत सरकारने उदघाटनांचा सपाटा लावला आहे. भाजपच्या या भूमिकेवर आघाडी सरकारकडून जोरदार हल्ला चढवला आहे.

विभागीय क्रीडा संकुलाबाबतही असाच वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. संकुलाचे उर्वरीत काम करून त्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन केले जाईल असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केल्यानंतर माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी, 'सन्मानाने निमंत्रीत न केल्यास संकुलाचे प्रतिकात्मक उदघाटन करू' असा इशारा दिला आहे. यामुळे श्रेयवादाचे राजकारण चांगलेच रंगात येणार आहे.

दक्षिण महाराष्ट्राच्या क्रीडा विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या विभागीय क्रीडा संकुलाचे काम २००९ मध्ये सुरू झाले. पहिल्या टप्प्यातील कामाचे उदघाटन २०११ मध्ये केले जाईल असे नियोजन होते. पण संकुलाचे काम रखडत गेले. माजी गृहराज्यमंत्री पाटील यांनी संकुलाला दोनवेळा प्रत्यक्ष भेट देऊन वाढीव निधीही मंजूर करून आणला. निवडणुकीत सत्ता परिवर्तन झाल्यानंतर पालकमंत्री पाटील यांनी संकुलाला दोनवेळा भेट देऊन काम सुरू करण्याचे कडक इशारा दिला होता. जिल्हाधिकारी व ठेकेदारात समन्वय झाल्यानंतर पाच मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहिल्या टप्प्यातील कामांचे उदघाटन करण्याचे जाहीर केले होते.

मात्र, क्रीडा संकुलाच्या कामात आघाडी सरकारने महत्त्वाची भूमिका बजावली असल्याने कामाचे श्रेय दुसऱ्या पक्षाला मिळणार असल्याने काँग्रस पक्षात अस्वस्थता आहे.

क्रीडा संकुलाच्या उभारणीत आघाडी सरकारने भरघोस निधी दिला आहे. रेंगाळलेले काम पूर्ण करण्यासाठी चोवीस कोटींचा वाढीव निधी आणला. त्यामुळे उदघाटनाचा हक्कदार काँग्रेस पक्ष आहे. सन्मानाने उदघाटनाचे निमंत्रण न मिळाल्यास चार मार्च रोजी संकुलाचे प्रतिकात्मक उदघाटन करू.

- सतेज पाटील, माजी गृहराज्यमंत्री

पहिल्या टप्प्यातील कामे

फुटबॉल, कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉल, अॅथलेटिक ट्रॅक, स्वीमिंग टँक, टेनिस कोर्ट, शुटिंग रेंज उदघाटनाच्या प्रतीक्षेत.

रंकाळ्याच्या संवर्धनासाठी निधी

$
0
0

५० लाखांच्या निधीची पालकमंत्र्यांची ग्वाही

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रंकाळा तलावाच्या संवर्धनासाठी जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण योजनेतंर्गत ५० लाख रुपयांचा निधी देण्याचे पालकमंत्र्यांनी जाहीर केले आहे. आमदार अमल महाडिक यांनी मंगळवारी सकाळी रंकाळा तलावाची पाहणी करून पालकमंत्र्यांना वस्तुस्थिती सांगितली. तलावाच्या दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असल्याची मागणी केली.

रंकाळा तलावाच्या पश्चिम बाजूकडील तटबंदीला ३५ फूट लांबीची भगदाड पडली आहे. गेल्या वर्षभरात या तटबंदीला चार वेळेला भगदाड पडल्यामुळे पश्चिम बाजूची संपूर्ण तटबंदीच कोसळण्याच्या मार्गावर आहे. तथापि महापालिकेकडे निधीची कमतरता आहे. निधी अभावी दुरुस्ती तटबंदीची दुरुस्ती रखडल्याची वस्तुस्थिती 'महाराष्ट्र टाइम्स'ने मंगळवारच्या (ता.१०) अंकातून निदर्शनास आणली होती. तलावाच्या दुरुस्तीसाठी आमदार, खासदार फंडातून निधी उपलब्ध होऊ शकतो याकडे लक्ष वेधले होते. आमदार महाडिक यांनी मंगळवारी सकाळी रंकाळा तलावाची पाहणी केली. नंतर महाडिक यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधला.

रंकाळ्याच्या तटबंदीची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे असल्याचे निदर्शनास आणले. यावेळी पाटील यांनी रंकाळा तलावाच्या संवर्धनाबाबत राज्य सरकार ठोस पावले उचलेल अशी ग्वाही दिली. तसेच जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण योजनेतंर्गत ५० लाख रुपयांचा निधी देण्याचे जाहीर केल्याचे आमदार महाडिक यांनी सांगितले. खासदार धनंजय महाडिक यांनी तटबंदीच्या डागडुजीसाठी दहा लाख रुपयांचा निधी देण्याचे जाहीर केले आहे.

नवव्या दिवशीही आंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी बहुजन परिवर्तन पार्टीच्या वतीने नवव्या दिवशीही आंदोलन सुरू आहे.

आंदोलनाच्या ठिकाणी सुरू असलेल्या धगधगत्या चूल, महिला आणि लहान मुलांचे हाल, कडाक्याची थंडी, रात्रीचा निवारा रोडवरच अशा स्थितीत कुटुंबाचे आंदोलन सुरू आहे. प्रशासनाने ठोस कारवाई केली नसल्याच्या निषेधार्थ आंदोलनाची धग अजूनही जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसरात आहे. लक्षतीर्थ वसाहत, दांडगाईवाडी येथील पाच एकर जागा १९६० पासून मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी आरक्षित केली आहे. या जागेवर अतिक्रमण झाले आहे. सायबर कॉलेजजवळच्या डवरी वसाहतीतील पाच एकर जागा यशवंत गृहनिर्माण संस्थेला दिली. ही पाच एकर जागा विविध कारणांनी काढून घेतल्याने केवळ अठरा गुंठे जागा शिल्लक आहे. या जागेवरही अतिक्रमण झाले आहे. या जागा अतिक्रमण मुक्त करावी, या मागणीसाठी आंदोलन सुरु आहे. लहान मुले आणि महिलांचे मात्र आंदोलनस्थळी हाल सुरू आहेत.

कैलाश खेर खेचणार नादखुळा गर्दी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुळात सूफी गाण्यातच दर्द आहे. हा दर्द जेव्हा प्रेमगीतात, विरहाच्या सुरात येतो तेव्हा ते गाणे गाणे उरत नाही, तर ती तरूणाईच्या ओठावरची भाषा होते. आजच्या तरूणाईला 'असणं'ही हवे आहे आणि 'दिसणं'ही. त्यासाठी स्वतःला प्रेझेंट करण्यासाठीही तरूणाईची धडपड सुरु असते. परफॉर्मन्समधून मिळणारा आत्मविश्वास यूथला खुणावत असतो आणि त्यासाठी पॉप स्टाइल गाण्यातील ग्लॅमरही तरुणाई जगत असते. सूफी गाण्यातील दर्द आ​णि पॉपमधले ग्लॅमर अशा दोन्ही स्वरांवर राज्य करणारा गायक कैलाश खेर म्हणूनच तरुणाईच्या मनात रूंजी घालत आहे. शुक्रवारी कैलाश खेरची जादू काय आहे आणि त्यावर अवघी तरुणाई कशी फिदा आहे हे दिसणार आहे. कैलाश खेर त्यांची खास गाणी सादर करत शुक्रवारच्या सायंकाळी प्रेमाची मैफल रंगवणार आहेत.

महाराष्ट्र टाइम्सतर्फे आयोजित 'सेलि​ब्रेट कोल्हापूर' या उपक्रमांतर्गत शुक्रवारी कैलाश खेर नाइटसची उत्सुकता आता चांगलीच टिपेला पोहोचली आहे. महेंद्र ज्वेलर्स प्रायोजक असून श्राइन ऑटो सहप्रायोजक आहेत. हॉटेल कृष्णा इन् यांनी हॉस्पिटॅलिटी प्रायोजक म्हणून तर आउटडोअर प्रायोजक म्हणून संदीप अॅडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग, रेडिओ मिर्ची यांनी सहकार्य केले आहे.

कैलाश यांच्या कैलासा, कैलासा झूमो रे, या रब्बा, साउंड ऑफ सायलेन्स, तेरी दिवानी आणि सैय्या या अल्बम्सनी अक्षरशः धूम माजवली आहे. तर 'अल्लाह के बंदे हस दे...,' या गाण्यावर कैलाश हजारोंचा मॉब डोलवतात. कोल्हापुरात प्रथमच कैलाश खेर यांचे गाणे प्रत्यक्ष ऐकण्याची पर्वणी कोल्हापूरकरांना मिळत असल्यामुळे कॉलेजीयन्सपासून ते संगीतप्रेमींपर्यंत प्रत्येकालाच आता कैलाश खेर यांच्या लाइव्ह कॉन्सर्टचे वेध लागले आहेत.

कैलाश खेर यांच्याविषयी

मेरठ (उत्तर प्रदेश) येथील काश्मीरी पंडित कुटुंबात जन्मलेल्या कैलाश खेर यांच्या गळ्यात सुरांचाही जन्म झाला तो बालपणापासूनच. गाण्याची आवड आणि गळ्यात सूर असूनही कैलाश यांनी संगीताच्या क्षेत्रात पाऊल टाकण्यासाठी २४ वर्षे संघर्ष केला. पहिले काम मिळाले ते एका जाहिरातीच्या जिंगल्सचे. कैलाश यांना संधी मिळाली तरी त्यांच्यातील गाण्याच्या कौशल्याचे चीज होत नव्हते. नुसरत फतेह अली खाँ आणि पंडित कुमार गंधर्व यांच्या गायकीचा प्रभाव असला तरी कैलाश यांनी सूफीला स्वतःची शैली दिली. ​​प्रेमविरहाचे सूर पोहोचवण्यासाठी कैलाशच्या आवाजाची ताकद​ दिसली ती अंदाज सिनेमातील 'रब्बा इश्क न होवे' या गाण्यात. कार्पोरेट या सिनेमातील 'ओ सिकंदर' या गाण्यातील फ्लेवरही कैलाशच्या स्वरांनी अचूक हेरला. जे गाणं कैलाशच्या गळ्यातून बाहेर येते ते थेट ऐकणाऱ्याच्या मनात पोहोचते हे समीकरणच झाले. 'कैलासा' या कैलाशच्या अल्बममधील सैय्या, आणि तेरी दिवानी या गाण्यांनी कैलाश स्टार झाला.


माळवींमुळे राष्ट्रवादी तोंडघशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापौर तृप्ती माळवी यांनी सर्वसाधारण सभेत राजीनामा सादर न केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तोंडघशी पडले आहेत. माळवी यांनी सोळा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत राजीनामा सादर करण्याची घोषणा केली आहे. मात्र, त्या राजीनामा देतील का याबाबत सांशकता आहे. माळवी यांच्या भूमिकेमुळे महापौरपदासाठी इच्छुक काँग्रेसच्या सदस्यांची आणि नेत्यांचीही घालमेल वाढली आहे. राजीनामाप्रकरणी पदाधिकाऱ्यांपासून नगरसेवकांपर्यंत सर्वांनी 'वेट अँड वॉच' अशी भूमिका घेतली आहे. याउलट सोळा फेब्रुवारीच्या सभेला महापौर अनुपस्थित रहातील अशीही अटकळ आहे.

महापौरांच्या आदेशानुसार सोळा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सभेची नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. रंकाळा तलाव संवर्धनाच्या आराखड्यासंदर्भात ही विशेष सभा बोलाविण्यात आली आहे. महापौरांनी सभा बोलावली असली तरी सभेत त्या राजीनामा देतील का? याबाबत सारेच साशंक आहेत. कारभाऱ्यांनी सोमवारी महापौरांकडून राजीनामा लिहून घेतल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे. मात्र महापौरांनी सभागृहात उपस्थित राहून राजीनामा सादर करावा लागतो. त्या सभागृहात अनुपस्थित राहिल्या आणि अन्य सदस्यांनी राजीनामा पत्राचे वाचन केले तर त्याला आक्षेप घेतला जाऊ शकतो असाही एक सूर आहे.

दरम्यान, माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या कामकाजावरून नगरसेवकांचा एक गट दुखावला आहे. विधानसभा निवडणुकीपासून गटातटाच्या राजकारणाला वेग आला आहे. त्या गटाचाही महापौरांना पाठिंबा असल्याची चर्चा आहे. महापालिकेत पक्षीय राजवट असली तर प्रत्येक पक्षात नेत्यांचे गट स्वतंत्र कार्यरत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महाडिक गटाला मानणारे नगरसेवक आहेत. महापौरांनी राजीनामा देऊ नये यासाठी ते पडद्याआड कार्यरत असल्याची चर्चा आहे. आघाडीच्या पॅटर्ननुसार महापौरपद काँग्रेसकडे येणार आहे. मात्र जिल्हा परिषदेत अध्यक्षपद अमल महाडिक यांना मिळू नये यासाठी माजी मंत्री पाटील यांनी विरोध केला होता. त्यामुळे महापालिकेत त्यांची अडवणूक सुरू असल्याचे बोलले जाते.

आघाडीधर्म पाळतील

काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आघाडीधर्माचे पालन होईल अशी अपेक्षा सोमवारी व्यक्त केली.

एक कोटी रुपयांचे उत्पन्न पाण्यात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

प्रवासी भाड्यात द्याव्या लागणाऱ्या विविध सवलतींमुळे एसटीच्या सांगली विभागाला महिन्याला एक कोटी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत आहे. ही थकित रक्कम सरकारकडून मिळत नसल्याने दिवसेंदिवस एसटीचा तोटा वाढत आहे.

एसटी महामंडळ विविध सामाजिक घटकांना २६ प्रकारच्या सवलती देते. सांगली विभागात अहिल्याबाई होळकर योजनेचा लाभ घेणाऱ्या ४१० विद्यार्थिनी आहेत. मासिक पासची सवलत घेणारे, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या १०, ७९९ आहे. शिवाय, अंध, अपंग, तांत्रिक शिक्षण, व्यावसायिक या प्रकारचे लाभार्थी ६७७ आहेत. त्यांचे प्रत्यक्ष भाडे ६ लाख रुपयांहून अधिक होते.

ज्येष्ठ नागरिकांसाठीची सवलत घेणारे ६६,७४८ प्रवासी आहेत. त्यातील सुमारे ५० टक्के सवलतींचा लाभ घेतात. ही सवलत मोठी आहे. या सर्वच सवलतींचे आकडे लाखांत आहेत. टोलसाठीही मोठ्या प्रमाणावर रक्कम द्यावी लागते, त्यामुळेही उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

गार्डनिंगचा ‘ग्रीन फेस्ट’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाचा लोकविकास केंद्र आणि गोपाळ कृष्ण गोखले कॉलेजच्या सुयंक्त विद्यमाने आजी-माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा झाला. गाडर्निंगच्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा ग्रीन फेस्टला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी फुलविलेली टेरेस शेती, विविध प्रकारची फुलशेतीची किमया प्रदर्शनातून मांडली.

उद्यान विद्या आणि रोपवाटिका अभ्यासक्रमाच्या दीडशेहून अधिक विद्यार्थ्यांनी मेळाव्यात सहभाग घेतला.

मेळावा पाहण्यासाठी आलेल्यांना दहा प्रकारच्या बियांचे मोफत वाटप करण्यात आले. निसर्गाची आवड आणि घरी भाजीपाला पिकविण्याचा तंत्र आणि मंत्र विद्यार्थ्यांना या केंद्राच्या विविध अभ्यासक्रमातून मिळाला. अभ्यासक्रम पूर्ण करुन काही ठिकाणी सेवेत असलेले आणि टेरेस गार्डन फुलविलेल्या विद्यार्थ्यांचे ग्रीन फेस्ट भरविण्यात आले. प्र-कुलगुरु डॉ. अशोक भोईटे, गोपाळ कृष्ण गोखले कॉलेजचे प्राचार्य डॉ. जे. बी. पिष्टे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी डॉ. भोईटे म्हणाले, 'निसर्गाची आवड प्रत्येक घरात निर्माण होण्याची गरज आहे. लोकविकास केंद्रातर्फे विविध अभ्यासक्रमातून रोजगार उपलब्ध करुन देण्याची संधी मिळते. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी जागृतीसह रोपांची लागवड प्रत्येकाने केली पाहिजे.'

प्राचार्य जे. बी. पिष्टे म्हणाले, 'घरी छोटी जागा असली तरीही बागेची आवड असल्यास निसर्गावर प्रेम करता येते. केंद्राच्या वतीने गोपाळ कृष्ण गोखले कॉलेजमध्ये बॉटनी विभागातर्फे विविध अभ्यासक्रम सुरु आहेत. हे अभ्यासक्रम रोजगार मिळवून देणारे आहेत.' लोकविकास केंद्राच्या दहा वर्षांतील दोनशे विद्यार्थ्यांसाठी हा स्नेहमेळावा झाला. कोल्हापूर कम्युनिटी गार्डनिंग सेल्फ हेल्प ग्रुपची स्थापना करण्यात आली. या दोनशे विद्यार्थ्यांसाठी बेवसाइट तयार करणार असल्याचे लोकविकास केंद्राच्या समन्वयक डॉ. मंजुषा देशपांडे यांनी सांगितले. अनिता काळे यांनी प्रास्ताविक केले. जयश्री पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

गुऱ्हाळ अन् लाटांपासून वीजनिर्मिती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

विज्ञान प्रदर्शन म्हटले की, डोळ्यासमोर तालुका अथवा जिल्हाच उभा राहतो. परंतु कागल तालुक्यातील म्हाकवे येथील हायस्कूलने शाळांतर्गतच अनोखे विज्ञान प्रदर्शन भरवले. म्हाकवे इंग्लिश स्कूलच्या या शाळेतीलच तब्बल ८३ विद्यार्थ्यांनी आपली उपकरणे मांडली आणि हे अनोखे विज्ञान प्रदर्शन पहाण्यासाठी परिसरातील आणि सीमाभागातील कर्नाटकातूनही काही शाळांच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी हजेरी लावली.

प्रदर्शनाचे आयोजन शाळेच्याच सी.व्ही.रमण विज्ञान मंडळामार्फत करण्यात आले होते. यामध्ये बहुउद्देशीय गुऱ्हाळ, समुद्राच्या लाटांपासून वीजनिर्मिती, समुद्राच्या पाण्यावर साचलेले तेल गोळा करणारे यंत्र, सौरउर्जेवर चालणारा औषध फवारणी पंप, हवा प्रदुषणमुक्त शहर, सौर टोपी, हवेचा वेग व दिशा ठरवणे, मनोरंजक गणित अशी उत्कृष्ट उपकरणे मांडली होती.

प्रदर्शनाचे उद्घाटन निवृत्त शिक्षक आर.एस.पाटील यांनी केले. स्वागत मुख्याध्यापक व्ही.बी.पाटील यांनी केले. मुख्याध्यापक व्ही.बी.पाटील म्हणाले, ' देशाला जागतिक महासत्ता बनवायचे असेल तर विद्यार्थीदशेतच मुलांच्या अंगी असणारी कला, सृजनशीलता आणि विज्ञाननिष्ठता वाढवली पाहीजे.' विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी लहान आणि मोठा गट अशी विभागणी करुन मळगे हायस्कूलच्या विज्ञान शिक्षक ए.एम.पाटील यांच्याकडून परीक्षण करुन अनुक्रमे तीन -तीन क्रमांक काढण्यात आले.शाळा व्यवस्थापन अध्यक्ष दिलीप पवार, अशोक चौगले, रामचंद्र डावरे, अरविंद शेवाळे, सुभाष डांगरे,संजय हवालदार राहुल पाटील,शीला जोशी,सुवर्णा कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते. युवराज पाटील यांनी सूत्रसंचालन केले. तानाजी देसाई यांनी आभार मानले.

विवाहितेचा मुलासह मृतदेह आढळला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, शाहूवाडी

आवळी ( ता. पन्हाळा ) येथील सौ. अनिता दीपक कदम (वय ३०) या विवाहितेचा व तिचा दोन वर्षाचा मुलगा विघ्नेश या दोघांचा मृतदेह डोणोली ( ता. शाहूवाडी ) हद्दीतील गावच्या सार्वजनिक विहिरीत आढळला.

अनिता हिचे माहेर शाहूवाडी तालुक्यातील सुपात्रे येथील असून चार वर्षापूर्वी आवळी यथील दीपक कदम यांच्याशी तिचा विवाह झाला होता. तिचा पती दीपक हा कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमालीचे काम करतो. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास डोणोली ग्रामपंचायतीचा कर्मचारी विद्युत पंप चालू करण्यासाठी गाव विहिरीवरती गेला असता त्याला विहिरीमध्ये एक महिला व लहान मूल मृतावस्थेत पाण्यावर तरंगताना आढळले. त्याने त्याची माहिती ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना सांगितली. यानंतर पोलिस पाटील शहाजी जानकर यांनी याबाबतची फिर्याद बांबवडे पोलिसात दिली.

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images