Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सहा वर्षानंतर केएमटीला मिळालेअतिरिक्त परिवहन व्यवस्थापक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिका परिवहन उपक्रमाकडे (केएमटी) सहा वर्षानंतर अतिरिक्त परिवहन व्यवस्थापकांची नियुक्ती झाली आहे. राज्य सरकारने त्याबाबत आदेश काढल्यानंतर सोमवारी प्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक सुभाष देसाई यांनी पदाचा कार्यभार स्वीकारला. सहा वर्षानंतर परिवहन विभागातील अधिकारी या पदावर नियुक्त झाले आहेत.

पंडित चव्हाण यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर राज्य परिवहन महामंडळाचे विजय मोहिते यांच्याकडे केएमटीच्या अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक पदाचा पदभार होता. २०१३मध्ये उपप्रादेशिक परिहवन अधिकारी राजेंद्र मदने यांची नियुक्ती केएमटीकडे झाली होती. त्यांची बदली झाल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे व्यवस्थापकपदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला. दोन आठवड्यांपूर्वी कर निर्धारक दिवाकर कारंडे यांची व्यवस्थापकपदी बदली झाली होती. त्यांनी कामकाजाला सुरुवातही केली. तत्पूर्वी या पदासाठी प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकारी देण्यासाठी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी मागणी केली होती. त्यानुसार मोटार वाहन निरीक्षक देसाई यांची नियुक्ती झाली. त्यांनी यापूर्वी सोलापूर महापालिकेच्या परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक म्हणून काम पाहिले आहे. केएमटी प्रशासनाची विस्कटलेली घडी बसविण्याबरोबर कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

सोमवारी सकाळी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी केएमटीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर काही बसथांब्यांना भेट दिली. सायंकाळी बिंदू चौक येथील केएमटीच्या पार्किंगची पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांनी शुल्क आकारणी मशिनची तपासणी केली. पार्किंगमध्ये दररोज किती गाड्या येतात, याची माहिती नियुक्त कर्मचाऱ्यांकडून घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवाजी चौक ते पापाची तिकटी रस्ता वाहतुकीसाठी खुला

$
0
0

फोटो आहे.

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नवीन तंत्रज्ञानाच्या सहायाने बांधण्यात आलेला छत्रपती शिवाजी चौक ते पापाची तिकटी दरम्यानचा रस्ता सोमवारी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. आठ दिवसांत रस्त्याचे डांबरीकरण झाल्यानंतर महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. रोल बिल्डिंग इन्फास्ट्रक्चर (आरबीआय ग्रेड ८१) नुसार शहरात प्रथमच रस्त्याची बांधणी केली आहे.

शिवाजी चौक ते पापाची तिकटीपर्यंतच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली होती. अत्यंत रहदारीच्या रस्ता खराब झाल्यामुळे महापालिकेच्या कारभाराविरोधात नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात होता. चार वर्षांपूर्वी केलेला रस्ता खराब झाल्याने संतापात अधिकच भर पडली होती. ऐन दिवाळी दिवशी रस्त्यावर मेणबत्त्या प्रज्वलित करुन निषेधात्मक आंदोलन केले होते. तर जिल्हा वाहनधारक महासंघाने खर्डा-भाकरी खाऊन प्रशासनाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आणला होता.

आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने नवीन तंत्रज्ञानानुसार अधिक टिकाऊ रस्ता करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेतील 'आरबीआय ग्रेड ८१' तंत्रज्ञानानुसार डांबरीकरण करण्यासाठी संगीता कन्स्ट्रक्शनला ठेका देण्यात आला. त्यांनी नवी दिल्ली येथून दोन अभियंत्यांना पाचारण केले होते. या अभियंत्यांच्या देखरेखेखाली आठ दिवसांत काम पूर्ण करण्यात आले. हा रस्ता आठ वर्षे टिकाऊ असल्याचा दावा केला जात आहे. सकाळपासून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर वाहनधारकांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, प्राथमिक शिक्षण समिती सभापती श्रावण फडतारे, माजी उपमहापौर भूपाल शेटे, इश्वर परमार, नगरसेविका उमा बनछोडे, ठेकेदार गणेश खाडे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोकुळ आम्हाला द्या, केडीसी तुम्ही घ्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गोकुळमध्ये राष्ट्रवादीला दोन संचालकपदे आणि जिल्हा बँकेत सत्ता स्थापन करण्यास मदत करू असा थेट प्रस्ताव गोकुळ दूध संघाच्या संचालकांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना दिला आहे. मुंबईत याबाबत दोन नेत्यांची चर्चा झाल्याचे वृत्त आहे. पालकमंत्रीपदावरून नाराज झालेले मंत्री मुश्रीफ याबाबत काय निर्णय घेणार यावरच पुढील हालचाली अवलंबून राहतील. डोंगळे आणि पाटील या दोन संचालकांच्या बंडामुळे सत्ताधारी आघाडीकडून अधिक सावध खेळी केल्या जातील अशी चिन्हे आहेत. यात आमदार पी. एन. पाटील आघाडीवर असल्याचे समजते.

'गोकुळ'च्या निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक हे एकत्र येऊन पॅनेल करणार हे नक्की आहे. पॅनेलमध्ये ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांचाही समावेश आहे. याशिवाय आमदार पी. एन. पाटील, विनय कोरे, माजी आमदार के. पी. पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, चंद्रदीप नरके यांना आपल्यासोबत घेण्यासाठी दोघांचेही प्रयत्न सुरू होते.

मात्र गेल्या पंधरवड्यात घडलेल्या घटनांनी यात अडथळे येण्याची चिन्हे आहेत. त्याची सुरूवातही झाली आहे. काँग्रेसने मंत्रीपद न दिल्याने नाराज झालेल्या पी. एन. पाटील यांनी मंत्री पाटील यांच्यासोबत जाण्याचे टाळले. माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्याशी असलेली गट्टी त्यांनी कायम ठेवली. आता पालकमंत्रीपद न मिळाल्याने नाराज झालेल्या मुश्रीफ यांना सोबत घेण्यासाठी आमदार पाटील यांची धडपड सुरू झाली आहे.

मुश्रीफ आणि पाटील यांची काही दिवसांपूर्वीच मुंबईत भेट झाल्याचे कळते. त्यानंतर गोकुळमध्ये राष्ट्रवादीला दोन संचालकपदे आणि जिल्हा बँकेत सत्ता स्थापनेस मदत असा प्रस्ताव देण्यात आला. हा प्राथमिक टप्यावरील प्रस्ताव आहे. सतेज पाटील यांची ताकद वाढू नये म्हणून मुश्रीफ यांना किमान गोकुळ निवडणुकीत तरी आपल्यासोबत ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुश्रीफ यांना महाडिक तर पी. एन. यांना मंत्री पाटील यांची संगत नको आहे. त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाडिक आणि पाटील यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार विनय कोरे, प्रकाश आवाडे असण्याची शक्यता आहे. इतर तीन नेत्यांकडे फारसे ठराव नसले तरी ते केवळ नैतिक पाठबळ देणार आहेत.

गेल्या निवडणुकीत मुश्रीफ सत्तारुढ आघाडीबरोबर होते. रणजित पाटील व विलास कांबळे हे दोन संचालक या गटाचे होते. नंतर पाटील भाजपमध्ये गेले. काँग्रेसचे राजेश पाटील राष्ट्रवादीत गेले. त्यामुळे सध्या राष्ट्रवादीचे दोन संचालक आहेतच. या दोन्ही जागा त्यांच्याकडेच राहतील असा प्रस्ताव देण्यात आला आहे. जिल्हा बँकेवर राष्ट्रवादीची सत्ता आहे. जिल्ह्याच्या राजकारणासाठी बँकेची सत्ता ग्रामविकास मंत्र्यांना हवी आहे. यामुळे गोकुळच्या संचालकांनी दिलेला प्रस्ताव ते स्वीकारणार का? हे लवकरच कळेल. कोल्हापूरचे पालकमंत्री होण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. पण त्यामध्ये सतेज पाटील यांनी बाजी मारली. त्यामुळे मुश्रीफ नाराज आहेत. ही नाराजी गोकुळमध्ये व्यक्त होईल अशी शक्यता आहे.

गोकुळमध्ये राष्ट्रवादीला दोन जागा आणि जिल्हा बँकेत मदत करण्याचा प्रस्ताव आहे. याबाबत ग्रामविकासमंत्र्यांना भेटणार आहे. जिल्ह्यातील चांगली संस्था व्यवस्थित सुरू रहावी यासाठी निवडणूक बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे.

- पी. एन. पाटील, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्थायी, बांधकामासाठी सदस्यांची फिल्डिंग

$
0
0

जिल्हा परिषद लोगो

.......

पदाधिकाऱ्यांसह महाविकास आघाडीतील प्रमुख सदस्यांची आज बैठक

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या विविध समित्यांमधील रिक्त जागेवर आपली वर्णी लागावी यासाठी सदस्याकंडून फिल्डिंग लावली जात आहे. स्थायी आणि बांधकाम समितीवर जाण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. दरम्यान, जि.प.पदाधिकाऱ्यांची व महाविकास आघाडीतील प्रमुख सदस्यांची मंगळवारी यासंदर्भात बैठक होणार आहे. जवळपास २० जागा भरावयाच्या असून सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंकडील सदस्यांनी तयारी सुरू केली आहे. अडीच वर्षात ज्यांना कोणत्याही पदावर संधी मिळाली नाही, त्यांचा प्राधान्यक्रमाने विचार करावा, असा सदस्यांचा सूर आहे.

जिल्हा परिषदेत सत्तांतर होवून नवीन पदाधिकारी निवड झाली. पदाधिकाऱ्यांच्या समितीवरील रिक्त झालेल्या सहा जागा, पंचायत समिती सभापतीसाठीच्या बारा जागा तसेच नूतन सभापती निवडीमुळे ते पूर्वी असलेल्या समितीमधील रिक्त जागेसाठी नव्या सदस्यांची निवड होणार आहे. जिल्हा परिषदेत स्थायी, जलव्यवस्थापन व स्वच्छता, अर्थ, कृषी, शिक्षण, आरोग्य समिती, बांधकाम, पशुसंवर्धन व दुग्ध विकास, समाजकल्याण आणि महिला व बालकल्याण अशा दहा समिती कार्यरत आहेत.

यापैकी पशुसंवर्धन, कृषी समितीतील प्रत्येकी तीन, अर्थ समितीत ५, आरोग्य समितीत दोन, बांधकाम आणि महिला व बालकल्याण समितीमधील एक जागा रिक्त आहे. या पदांवर संधी मिळावी यासाठी महाविकास आघाडीतील सदस्य सक्रिय बनले आहेत. सोमवारी, महाविकास आघाडीतील सदस्यांनी पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. महाविकास आघाडीकडून समिती सदस्य म्हणून कुणाकुणाला संधी द्यायची यासाठी चर्चा करण्यासाठी मंगळवारी पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीला अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतींसह पक्षप्रतोद व गटनेतेही उपस्थित असणार आहेत.

...

नवीन पदाधिकारी, बैठकावर जोर

जिल्हा परिषदेत सत्ता बदल झाल्यामुळे नवीन पदाधिकाऱ्यांनी प्रशासकीय बैठकांवर जोर दिला आहे. बांधकाम समिती सभापती हंबीरराव पाटील, शिक्षण समिती सभापती प्रवीण यादव यांनी सोमवारी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. महिला व बालकल्याण समिती सभापती पद्माराणी पाटील यांनी सोमवारी कार्यालय प्रवेश केला. गेल्या आठवड्यात अध्यक्ष हंबीरराव पाटील यांनी घेतलेली आढावा बैठक चर्चेची ठरली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेतनासाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची जि.प.वर धडक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन, जिल्हा संघटनेतर्फे प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. जिल्ह्यातील विविध भागातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर ठिय्या मारत प्रशासनाचे लक्ष वेधले. मागण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करुनही सोडवणूक न केल्याबद्दल प्रशासन व सरकारचा निषेध केला. कर्मचाऱ्यांनी जि. प. प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर ठिय्या मारल्याने या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाकडे वळवली.

दरम्यान, 'गावातील घरफाळा आणि पाणीपट्टी वसुलीची जबाबदारीची कामे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना करावी लागतात. कर वसुलीची ही जबाबदारी केवळ कर्मचाऱ्यांवर न लादता ग्रामसेवकांवर जबाबदारी निश्चित करावी. सरपंचांनाही याकामी सामावून घ्यावे,' अशा मागणी मोर्चाद्वारे करण्यात आली. महावीर उद्यान येथून कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला. प्रशासन व सरकारच्या विरोधात जोरदार घोषणेबाजी करत त्यांनी मोर्चा मार्ग दणाणून सोडला. विविध मागण्यांच्या मजकुराचे फलक कर्मचाऱ्यांच्या हाती होते. संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील, सुनील भारमल, प्रवीण टेकडी, बबन मोरे, मोहन कांबळे आदींच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.

नगरपरिषद व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी मिळावी, निवृत्तीवेतन चालू करावे, किमान वेतन राहणीमान भत्ता मिळावा, कर्मचाऱ्यांवर लावलेली कर वसुलीची अट रद्द करावी, आकृतीबंधात सुधारणा करावी , आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंदोलनात दत्ता धावरे, धनाजी धनगर, अभिजित पाटील, संजय परीट, लिंगाप्पा कांबळे, महादेव कांबळे, युवराज गुरव, प्रफुल्ल नारकर आदींनी सहभाग घेतला. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल व ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांना निवेदन देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सैन्यदलाची फसवणूक करणारा अटकेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एन.सी.सी.चे बनावट प्रमाणपत्र सादर करून सैन्य दलात नोकरी मिळवलेल्या तरुणास राजारामपुरी पोलिसांनी सोमवारी (ता. २०) अटक केली. देवानंद केरबा पाटील (वय २१, रा. मुदाळ, ता. भुदरगड) असे अटकेतील संसयिताचे नाव आहे.

सैन्यात नोकरी मिळविण्यासाठी भरतीदरम्यान त्याने २७ डिसेंबर २०१९ रोजी एन.सी.सी.चे बनावट प्रमाणपत्र सादर केले होते. कागदपत्रांची तपासणी करताना हा प्रकार कर्नल अनुराग सक्सेना यांच्या लक्षात आला. त्यांनी रविवारी (ता. १९) राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीनुसार पोलिसांनी संशयित पाटील याला मुदाळ येथून अटक केली. पाटील याने बनावट प्रमाणपत्र कोणाकडून मिळवले? या प्रमाणपत्राची छपाई कुठे झाली? प्रमाणपत्र कोणी तयार केले? याची चौकशी सुरू आहे. बनावट कागदपत्रे देऊन तरुणांची फसवणूक करणाऱ्या शाहूवाडी तालुक्यातील टोळीशी पाटील याचा संबंध आहे काय? याचीही चौकशी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महानगरपालिकेसमोर नगरसेविकेचे उपोषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'बुद्ध गार्डन प्रभागात भूषण गांधी यांनी अनधिकृत खड्डा खणला आहे. हा खड्डा तत्काळ बुजवून त्यांच्यावर कारवाई करा' या मागणीसाठी नगरसेविका वहिदा सौदागर यांच्यासह कार्यकर्त्यांनी सोमवारी महापालिकेसमोरच एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. दरम्यान, गांधी यांनी केलेल्या तक्रारीमुळे महापालिकेच्या सात अधिकाऱ्यांना अटक वॉरंट काढण्यात आले होते.

जवाहरनगरमध्ये डीपी रोडचे आरक्षण असलेल्या जागेवर काही अतिक्रमणे होती. अतिक्रमणांच्या जागेशेजारी गांधी यांनी बांधकामाच्या परवानगीसाठी आराखडा सादर केला. तात्पुरती मंजुरी मिळाल्यानंतर त्यांनी बांधकामासाठी २०१७ मध्ये खोदाई केली. मात्र नंतर त्यांची मंजुरी रद्द केली गेली. त्यानंतर हा खड्डा तसाच राहिला. त्यामुळे खड्ड्यात सांडपाणी साचल्याने डासांची उत्पत्ती होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथे नेहमीच लहान मुले खेळत असतात. एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. गांधी यांनी खड्डा मुजविण्यासाठी अनेकवेळा संपर्क साधला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी नगरसेविका सौदागर यांनी निवेदनाद्वारे केली.

या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारी लाक्षणिक उपोषण केले. फिरोज सौदागर, बाबासाहेब सरकवास, अस्लम मुल्ला, आसिफ मुजावर, मोहसीन फरास, किशोर कदम, सौरभ कदम यांच्यासह भागातील नागरिक, महिला सहभागी झाल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जलवाहिनीची गळती दूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला सोमवारी फुलेवाडी चौक ते जुन्या आपटेनगर पंपिंग स्टेशनकडे जाणाऱ्या जलवाहिनीला लागलेली गळती काढण्यास यश आले. सायंकाळी गळती काढण्याचे काम संपल्यानंतर रात्री उशीरा पाणीउपसा सुरू झाला. त्यामुळे मंगळवारी सकाळपासून पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. दुरुस्तीमुळे ज्या भागात पाणी आले नाही, तेथे कळंबा आणि कसबा बावडा फिल्टर हाऊस येथून १४ टँकरच्या फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला.

जुन्या आपटेनगर पंपिंग स्टेशनकडे जाणाऱ्या ६०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला फुलेवाडी चौकात गळती लागली. दुरुस्तीसाठी १३ जानेवारी रोजी पाणी उपसा बंद ठेवण्यात आला. मात्र गळतीचे ठिकाण न समजल्याने दुरुस्तीचे काम अर्धवट सोडावे लागले होते. आज दुरुस्ती पूर्ण करण्यात कर्मचाऱ्यांना यश आले. सकाळी नऊ वाजता सुरू झालेले काम सायंकाळी साडेसहा वाजता पूर्ण झाले. नंतर रात्री उशीरा पाणी उपशाला सुरुवात झाली.

दुरुस्तीमुळे शहरातील 'ए' व 'बी' वॉर्डासह संलग्न ग्रामीण भाग व उपनगरातील पाणीपुरवठा दिवसभर बंद राहिला. येथील नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. कळंबा व बावडा फिल्टर हाऊसमधून प्रत्येकी सात टँकरच्या फेऱ्या झाला. सानेगुरुजी वसाहत, आपटेनगर, सुलोचना पार्क, म्हाडा कॉलनी, पोद्दार हायस्कूलनजिकचा परिसर, नंदनवन पार्क, जीवबा नाना पार्क येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


परीक्षा नियंत्रक नियुक्ती प्रकिया कासवगतीने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकपदासाठी अर्ज दाखल होऊन ६ महिने उलटल्यानंतरही छाननी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. ६ फेब्रुवारी रोजी होणारा पदवीदान समारंभ, नॅक मूल्यांकनाच्या पार्श्वभूमीवर कायमस्वरूपी परीक्षा नियंत्रकपदाची निवड प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, छाननी समितीचा अहवाल मंजूर न झाल्याने पदनियुक्ती प्रक्रिया तांत्रिक टप्प्यावरच अडकली आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या प्रभारी संचालकपदी सध्या गजानन पळसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संचालक महेश काकडे यांची मुदत संपल्यानंतर जून २०१९ मध्ये पळसे यांच्याकडे प्रभारी कार्यभार सोपविण्यात आला. दरम्यान, जूनअखेरीस संचालक पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली. पदासाठी १६ अर्ज दाखल झाले. अर्ज दाखल झाल्यानंतर छाननी गतीने होणे आवश्यक होते. मात्र सहा महिने झाल्यानंतरही छाननी समितीने दिलेल्या अहवालाला विद्यापीठ प्रशासनाने मंजुरी दिल्याचे जाहीर केलेले नाही. छाननी प्रक्रियाच रखडल्याने संचालक नियुक्ती कासवगतीने सुरू आहे.

दरम्यान, विद्यापीठ विकास आघाडीच्या सदस्यांनी गेल्या आठवड्यात परीक्षा नियंत्रक नियुक्तीला दिरंगाई होत असल्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. बैठकीत प्रशासनाने तांत्रिक अडचणींमुळे छाननी प्रक्रिया संथ झाल्याचे सांगितले. सहा महिन्यांपासून विविध कारणांमुळे रखडलेल्या या नियुक्तीला पूर्णत्व कधी येणार याबाबत संबंधित घटकांकडून विचारणा होत आहे. मंगळवारी विद्यापीठात सायन्स अँड टेक्नॉलॉजी, मानव्यशास्त्र व इंटर डिसिप्लीनरी या विभागाच्या अधिष्ठातापदासाठी मुलाखत होत आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक नियुक्तीचा निकाल कधी? याचीही चर्चा सुरू आहे.

नियमांत अडकली प्रक्रिया

अर्ज दाखल झाल्यानंतर कोल्हापुरातील महापुरामुळे प्रक्रिया रखडली. त्यानंतर विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या पहिल्या सत्रातील परीक्षांना सुरूवात झाली. दरम्यान विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता सुरू झाल्याने ही प्रक्रिया नियमावलीमध्ये अडकली.

कोट

परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक नियुक्तीची प्रक्रिया अर्ज छाननीच्या अंतिम टप्प्यात आहे. प्रक्रियेला दिरंगाई होण्यासाठी काही तांत्रिक कारणे आहेत. याबाबत वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार सुरू आहे. प्रशासन पाठपुरावाही करत आहे. पदाची नियुक्ती न झाल्यामुळे पदवीदान समारंभ व नॅक मूल्यांकन कामकाजावर परिणाम होणार नाही.

- डॉ. विलास नांदवडेकर, कुलसचिव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाडिकांच्या भूमिकेचा सत्ताधारी आघाडीला फटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'गोकुळ'मध्ये सत्तारुढ आघाडीचे नेते, माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी घेतलेल्या भूमिकामुळे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे नाराज झाल्याने सत्ताधारी आघाडीला मोठा फटका बसला आहे. त्यांच्यासह चुयेकर कुटुंबीयांनी बंड केल्याने 'डॅमेज कंट्रोल' करण्यासाठी नेते आणि संचालकांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.

'गोकुळ'च्या सर्वसाधारण सभेत मल्टिस्टेटचा ठराव मंजूर करताना मोठा वादंग झाला होता. मल्टिस्टेटचा ठराव विश्वास पाटील यांनी मांडला होता. 'मल्टिस्टेट'ची बाजू पाटील यांनी मांडल्याने त्यांना अध्यक्षपदी मुदतवाढ हवी होती. महाडिक यांनी त्यांना मुदतवाढ दिली नाही. नंतर पाटील यांनी राजीनामा देण्यास सांगितले. मात्र त्यांनी टाळाटाळ केली. त्यावेळी महाडिक यांनी पाटील यांना कडक शब्दात समज दिल्याने गेली दोन वर्षे ते नाराज होते.

डोंगळे यांनी 'मल्टिस्टेट'ला सर्वप्रथम विरोध केला. त्यावेळी महाडिक यांनी 'डोंगळेंनी विधानसभा नजरेसमोर ठेवून मल्टिस्टेटला विरोध केला आहे. त्यांना दहा हजार मतेही पडणार नाहीत' अशी टीका केली होती. डोंगळेंचा निवडणूकीत पराभव झाला. मात्र महाडिक गटाकडून त्यांना पाठबळ न मिळाल्याने ते गटासोबत राहूनही नाराज होते. त्याचे प्रतिबिंब आजच्या घडामोडींमध्ये पहायला मिळाले.

गोकुळचे संस्थापक, दिवंगत आनंदराव पाटील-चुयेकर यांचा मुलगा शशिकांत यांची संचालकपदाची इच्छा आहे. मात्र दहा वर्षांपूर्वी महाडिक यांनी जयश्री पाटील यांना संधी दिल्याने ते नाराज होते. गेल्या निवडणुकीतही शशिकांत यांनी फॉर्म भरला. मात्र त्याकडे महाडिकांनी दुर्लक्ष केले. जयश्री पाटील यांनी राजकारणातून निवृत्ती स्वीकारत शशिकांत यांच्या नावाची घोषणा केली. तरीही महाडिक गटाकडून जयश्री यांनीच फॉर्म भरावा यासाठी हालचाली सुरू केल्या. त्या नाराजीतून शशिकांत यांनी महाडिक यांच्याविरोधात पाऊल उचलले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिंदू चौक पार्किंगसाठी एकमेव निविदा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केएमटीचे बिंदू चौकातील पार्किंग चालविण्यास देण्यासाठी एकमेव निविदा दाखल झाली आहे. तीनवेळा मुदतवाढ दिल्याने तांत्रिक बाजू तपासून निविदा अंतिम करण्यात येणार आहे. या प्रक्रियेमुळे पार्किंगमध्ये संगनमताने सुरू असलेला गैरव्यवहार संपुष्टात येण्यास बळकटी मिळणार आहे.

गेल्या दोन वर्षांपासून बिंदू चौक येथील पार्किंग शुल्क केएमटीच्यावतीने वसूल केले जात आहे. ठेका देण्यासाठी विविध कारणांनी तीनवेळा निविदा प्रक्रिया गुंडाळून ठेवण्यात आली. याचा फायदा घेऊन संगमनमताने पार्किंग वसुलीत डल्ला मारला जात होता. याबाबतचे वृत्त 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर पुन्हा निविदा प्रक्रियेने वेग घेतला. शनिवारी (ता. १८) याबाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. ठेक्यासाठी एकमेव निविदा दाखल झाली आहे. त्याला अंतिम मंजुरी देण्यासाठी ठेकेदाराची आर्थिक स्थिती, बँक गॅरंटी, ठेकेदारास अनुभव आहे का? याबाबतच्या सर्व तांत्रिक बाजू तपासण्यात येणार आहेत. त्यानंतर दोन दिवसांत निविदेला अंतिम मंजुरी देण्यात येणार आहे, असे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळाच्या विकासाला मिळणार चालना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर विमानतळाचा विकास करून कोल्हापुरातून दिल्ली आणि अमदाबाद या शहरांसाठी तातडीने विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या शिष्टमंडळाने केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांच्याकडे यांच्याकडे केली. शिष्टमंडळाने सोमवारी दिल्लीत मंत्री पुरी यांची भेट घेतली. या भेटीमुळे कोल्हापूर विमानतळाच्या विकासाला चालना मिळणार अससल्याचा विश्वास चेंबरच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या हवाई वाहतूक समितीने नवी दिल्ली येथे सोमवारी केंद्रीय नागरी उड्डान मंत्री पुरी आणि एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियाचे चेअरमन अरविंद सिंग यांची भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्रातील विमानतळांच्या समस्या मांडल्या. विशेषत: कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, जळगाव, सोलापूर, शिर्डी आणि सिंधुदुर्ग येथील विमानतळांचा पूर्ण क्षमतेने वापर करण्याची गरज व्यक्त केली. कोल्हापूर ते मुंबई विमानसेवेसाठी सकाळ संध्याकाळची वेळ मिळावी, तसेच कोल्हापूर-दिल्ली आणि कोल्हापूर-अहमदाबाद या दोन नवीन सेवांचा उडान योजनेतून प्रारंभ करावा, अशी मागणी केली. या बैठकीत केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालय आणि विमानतळ प्राधिकरणचे अधिकारी उपस्थित होते. विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने नियोजन विभागाचे सदस्य ए. के. पाठक यांनी बैठकीत कोल्हापूर विमानतळाच्या प्रगतीचा आढावा सादर केला. कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी ३०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहितीही दिली.

मंत्री पुरी यांनी बैठकीत कोल्हापुरातून दिल्ली आणि अहमदाबाद या शहरांसाठी सेवा सुरू करण्यास तत्वत: मान्यता दिली. याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीनंतर शिष्टमंडळाने राजीव गांधी भवन येथील विमानतळ प्राधिकरणच्या मुख्यालयात चेअरमन अरविंद सिंग यांची भेट घेतली. कोल्हापूर विमानतळावरील नाईट लँडिंगची सुविधा आणि धावपट्टी विस्तारीकरणाचे काम लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्राधिकरणाचे चेअरमन अरविंद सिंग म्हणाले, 'मी पूर्वी कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होतो. कोल्हापूरशी माझे जुने संबंध असल्याने मला विशेष आत्मियता आहे. कोल्हापूर विमानतळाची सर्व कामे तातडीने पूर्ण करण्यास प्राधान्य दिले जात आहे.'

यावेळी झालेल्या चर्चेत शिष्टमंडळातील ए. व्ही. कोळी, बिपिन कुमार, जे. के. जैन, प्राधिकरणाचे अधिकारी ए. के. पाठक यांनी सहभाग घेतला. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या हवाई वाहतूक समितीने तयार केलेला विमानतळांच्या विकासाचा अहवाल ललित गांधी यांनी अरविंद सिंग यांच्याकडे सादर केला.

अडथळ्यांचा सर्व्हे अंतिम टप्प्यात

दरम्यान, कोल्हापूर विमानतळावर नाइट लँडिंग सुरू करण्यासाठी परिसरातील अडथळ्यांचा सर्व्हे सुरू आहे. सर्व्हेचे काम अंतिम टप्प्यात आले असून, चार दिवसात अडथळ्यांचा अहवाल तयार होणार आहे, अशी माहिती विमानतळ प्राधिकरण संचालक कमल कटारिया यांनी दिली.

- विमानतळ विकासासाठी ३०० कोटी

- प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांचीही घेतली भेट

- कोल्हापुरातून दिल्ली, अहमदाबाद विमानसेवेस तत्वत: मान्यता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कौटुंबिक वादातून पोलिसाची पत्नीला मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील एका पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस कॉन्स्टेबलने कौटुंबिक वादातून पत्नीला बेदम मारहाण केल्याची तक्रार रविवारी (ता. १९) रात्री उशिरा जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दाखल झाली. मारहाणीचा प्रकार रविवारी सायंकाळी घडला. कॉन्स्टेबलच्या विवाहबाह्य संबंधांमुळे कुटुंबात वाद झाल्याची चर्चा सोमवारी दिवसभर पोलिस दलात सुरू होती.

जुना राजवाडा पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका कॉन्स्टेबलची त्याच विभागात काम करणाऱ्या एका महिला कॉन्स्टेबलशी जवळीक होती. या प्रकाराची माहिती मिळाल्यापासून कॉन्स्टेबलची पत्नी माहेरी राहत आहे. यानंतर कॉन्स्टेबलने पत्नीला वकिलांकरवी नोटीसही पाठवली. रविवारी सायंकाळी घरात पती त्याच्या सहकारी मैत्रिणीसह असल्याची माहिती मिळताच पोलिसाच्या पत्नीने नातेवाईकांसह घरात धाव घेतली. मैत्रिणीसोबत काय करतोस? असा जाब विचारल्याने पतीने मारहाण केली, अशी तक्रार महिलेने दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूरग्रस्त शेकऱ्यांची कर्जमाफी लटकली

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet@bhimgondaMT

कोल्हापूर : अतिवृष्टी, महापुरामुळे पन्नास टक्क्यांपर्यंत नुकसान झालेल्या ९२ हजार ७३० शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याबाबतचा २९५ कोटींचा प्रस्ताव सरकारी पातळीवर लटकला आहे. नवे सरकार आल्यानंतर याआधीच्या भाजप सरकारने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी लांबल्याचा फटका पूरबाधीत शेतकऱ्यांना बसला आहे.

पूरग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफीबाबत २९ ऑगस्ट २०१९चा सरकारचा आदेश असूनही दुर्लक्ष झाल्याने शेतकरी हवालदिल बनला आहे.

ऑगस्ट २०१९ मध्ये महापूर, अतिवृष्टीमुळे नदीकाठावरील करवीर, शिरोळ, हातकणगंले या तालुक्यांतील उसासह इतर पिके आठ दिवसांहून अधिक काळ पाण्याखाली राहिली. अतिवृष्टीमुळे उर्वरित तालुक्यांतील पिकेही वाया गेली. त्यामुळे तत्कालीन भाजप, शिवसेना सरकारने ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी निर्णय घेतला. त्यात नुकसान झालेल्या १ हेक्टरपर्यंत नुकसानग्रस्तांचे पीककर्ज माफ करणे, या निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना नियमितऐवजी तिप्पट नुकसान भरपाई देण्यासंबंधी आदेश सरकारने काढला.

त्यानुसार महसूल, सहकार विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या निश्चित केली. त्यात तिप्पट भरपाईसाठी सरकारकडून आलेल्या आर्थिक मदतीचे वाटप केले जात आहे. आतापर्यंत १५ कोटींच्या रक्कमेचे वाटप झाले आहे. तर एक हेक्टरपर्यंत पीककर्ज माफीसाठी सरकारकडे मागितलेल्या २९५ कोटींचा प्रस्ताव धूळखात पडून आहे. तो मंजूर न झाल्याने जिल्हा प्रशासनाकडे पैसे उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे ९२ हजारांवर शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. हे शेतकरी नव्या सरकारने घेतलेल्या महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेच्या निकषात बसत नाहीत. ही योजना थकीत कर्जदार शेतकऱ्यांसाठी आहेत. तर पूरग्रस्त शेतकरी नियमित परतफेड करणारे आहेत.

आता सरकार नियमित पिककर्ज परतफेड करणाऱ्यांसाठी प्रोत्साहनपर रक्कम देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. यासंबंधीचा निर्णय झाला तरी त्यांना फायदा होणार नाही. त्यामुळे २९५ कोटींची वेगळी तरतूद केल्यास पूर, अतिवृष्टीबाधीत शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात मिळेल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. मदत मिळणारे सर्वाधिक शेतकरी शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील आहेत. या दोन तालुक्यांतील खासदार, आमदार, मंत्र्यांनी सरकारी पातळीवर राजकीय प्रतिष्ठा लावावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

२९ ऑगस्ट २०१९च्या सरकारच्या निर्णयानुसार पूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्यासाठी प्रस्ताव तयार करून सरकारकडे पाठवण्यात आला आहे. या शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी पाठपुरावा केला जात आहे.

- अमर शिंदे, जिल्हा उपनिबंधक

दमडीचीही मदत नाही.

महापुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. उत्पादन नसल्याने पीक लागवडीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी, असा प्रश्न संबंधीत शेतकऱ्यांसमोर आहे. त्याचा विचार करून महापूर आणि अतिवृष्टीने नुकसान झालेल्या दोन हेक्टरपर्यंतची पीक कर्जमाफी करण्याचा निर्णय आधीच्या सरकारने घेतले. मात्र पूर ओसरून पाच महिने झाले तरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफीची दमडीही मिळालेली नाही.

९२,७२०

कर्जमाफीस पात्र पूरग्रस्त शेतकरी

८०५२९

जिल्हा बँकेकडील कर्ज घेतलेले पात्र शेतकरी

१२२०१

राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज घेतलेले पात्र शेतकरी

२९५ कोटी ४८ लाख

माफीसाठी सरकारकडून अपेक्षीत रक्कम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजाराम कारखान्याच्या २००० सभासदांना नोटिसा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाने राजाराम सहकारी साखर कारखान्यांच्या दोन हजार सभासदांना सभासदपद रद्द करण्याच्या नोटिसा पाठवल्याने खळबळ उडाली आहे. या सभासदांची आज सोमवारपासून सहसंचालक कार्यालयात सुनावणीस सुरुवात झाली.

राजाराम कारखान्यांच्या निवडणूक कार्यक्रमास सुरूवात झाली असून मतदारयादी तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. सभासदत्वाच्या अटी पाळल्या जात नसल्याच्या तक्रारीवरुन प्रादेशिक साखर संचालक कार्यालयाने २००० सभासद शेतकऱ्यांना नोटिसा पाठविल्या आहेत. कार्यक्षेत्राच्या बाहेर वास्तव्य करणे, जमीन नसणे, कारखान्याला ऊस न पाठविणे अशा तक्रारी आहेत. या नोटिसींनंतर आज सभासद शेतकऱ्यांनी कार्यालयात सुनावणीस उपस्थित राहून पुरावे सादर केले. राजकारणातून तक्रारी झाल्याचा आरोप संतप्त शेतकऱ्यांनी यावेळी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सत्ताधाऱ्यांचा २२४० ठरावांचा दावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीसाठी तीन विद्यमान संचालक आणि संस्थापक अध्यक्षांच्या मुलाने बंड केल्यानंतरही सत्ताधारी संचालक मंडळाने २२४० ठराव जमा झाल्याचा दावा केला आहे. पण प्रत्यक्षात सहनिबंधक दुग्ध विभागात अंदाजे १६०० ठराव दाखल झाले आहेत. विरोधी गटाकडून मंगळवारी ठराव गोळा करण्यात येणार आहेत. बुधवारी (ता.२२) ठराव दाखल करुन घेण्याची अंतिम मुदत आहे.

सत्ताधारी संचालक मंडळाकडून सोमवारी आमदार पी.एन. पाटील आणि माजी आमदार महादेराव महाडिक यांच्याकडे 'गोकुळ'च्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात ठराव दाखल करण्याची घोषणा केली होती. पण प्रत्यक्षात सकाळी साडेनऊच्या सुमारास माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, आमदार राजेश पाटील, संस्थापक अध्यक्ष दिवंगत आनंदराव पाटील चुयेकर यांचे चिरंजीव शशिकांत पाटील यांनी वेगळी चूल मांडत सहनिबंधक डॉ. गजेंद्र देशमुख यांच्याकडे ठराव जमा केले. पाटील यांनी २९३ तर डोंगळे यांनी २०६ ठराव दाखल केले. तसेच १०० ठराव पुढील दोन दिवसांत दाखल करण्याची घोषणा केली. गोकुळच्या हितासाठी आम्ही एकत्रित झालो असून आमच्यापुढे सर्व पर्याय खुले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. आमदार राजेश पाटील यांनीही सवतासुभा मांडत ११० ठराव दाखल केले. आपण मुंबईत असून आपल्या कार्यकर्त्यांनी ठराव दाखल केले असल्याचे त्यांनी सांगितले.

तिघांच्या बंडामुळे सत्ताधारी गटात खळबळ उडाली असून पी.एन. आणि महाडिक यांनी अन्य संचालकांशी संपर्क साधत २२४० ठराव गोळा केल्याचा दावा केला आहे. पण प्रत्यक्षात सोमवारी निवडणूक कार्यालयात १६०० ठराव दाखल झाले आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी सोमवारी किती ठराव दाखल केले याबाबत सांशकता निर्माण झाली आहे. मंगळवारी आणि बुधवारी ठराव दाखल करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, विरोधकांनी कंबर कसली असून मंगळवारी पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून ठराव गोळा केले जाणार आहेत. हे ठराव रमणमळा वॉटरपार्क येथे जमा केले जाणार आहेत.

...

एकच ठराव अनेक संचालकांकडे

नेत्यांचा मान राखण्यासाठी ठरावधारक संस्थांनी एकाच ठरावाच्या झेरॉक्स काढून नेत्यांना दिल्या आहेत. त्यामुळे सहनिबंधक दुग्ध विभाग चक्रावला आहे. सोमवारी अनेक संस्थांनी दोन ते चार ठराव जमा केले आहेत. ठरावाचा फॉर्म हिरव्या रंगाचा असून ठरावधारकांनी कलर झेरॉक्स काढून संचालकांना ठराव दिले आहेत. या ठरावांची खातरजमा करुन मतदारयादी तयार केली जाणार आहे. एकाच संस्थेने दोन वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे ठराव दिला असेल तर त्याची सहाय्यक दुग्ध निबंधक खातरजमा करणार आहेत. ठरावाबाबत एकमत झाले नाही तर मतदानाचा हक्क रद्द होणार आहे, असे विभागीय निबंधक सुनील शिरापूरकर यांनी सांगितले.

....

सत्ताधाऱ्यांकडे जमा झालेले ठराव

तालुका एकूण सभासद जमा ठराव

आजरा २३३ १७८

भुदरगड ३७५ १९५

गडहिंग्लज २७३ २००

चंदगड ३४७ २०६

गगनबावडा ७६ ३९

हातकणंगले ९६ ७४

कागल ३८३ २७३

करवीर ६४२ ३१८

पन्हाळा ३५४ २२०

राधानगरी ४५९ २४०

शाहूवाडी २८७ २०२

शिरोळ १३४ ९५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरपदासाठी इच्छुकांची मांदियाळी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या विद्यमान सभागृहाचा दहा महिन्यानंतर कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. उर्वरित काळात महापौरपद मिळवण्यासाठी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. या कालावधीत दोघांना संधी मिळण्याची शक्यता असल्याने पहिली संधी साधण्यासाठी नगरसेविका इंदुमती माने, जयश्री चव्हाण, उमा बनछोडे व दीपा मगदूम यांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. इच्छुकांच्या मांदीयाळीत एकाला संधी देताना पक्ष नेतृत्वाची चांगलीच कसोटी लागणार आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या फॉर्म्युल्यानुसार २०२०मध्ये काँग्रेसकडे महापौरपद राहणार आहे. मात्र अॅड. सूरंजिरी लाटकर यांना एक महिन्याचा कालावधी जादा दिल्याने त्यांच्याकडे केवळ दहा महिन्यांचा कालावधी राहिला. त्यातही निवडणूक आचारसंहिता लागू होणार असल्याने तत्पूर्वी पद मिळवण्यासाठी काँग्रेस पक्षांतर्गत हालचाली गतिमान झाल्या आहेत. गुरुवारी लाटकर यांच्या राजीनाम्यानंतर हालचाली अधिकच वेगावतील. त्यासाठी नगरसेविका माने, चव्हाण, बनछोडे, आजरेकर व मगदूम यांनी पक्ष नेतृत्वापर्यंत आपले नाव पोहोचवण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे.

या इच्छुकांपैकी एकालाही गेल्या चार वर्षात महत्त्वाचे पद मिळालेले नाही. हा मुद्दा सर्वचजण ठासून मांडत आपली दावेदारी प्रबळ करीत आहेत. नगरसेविका माने यांचा मुलगा, नगरसेवक राहुल माने हे पालकमंत्री सतेज पाटील यांचे विश्वासू मानले जातात. दक्षिण मतदारसंघात त्यांनी आमदार ऋतुराज पाटील यांच्या विजयासाठी केलेले प्रयत्न आणि गेल्या चार वर्षात दोघांनाही कोणतेही पद न मिळाल्याने त्यांनी चांगलीच मोर्चेबांधणी केली आहे. बनछोडे यांना यापूर्वी एकदा महापौरपदाने हुलकावणी दिली. पुढीलवेळी पद देण्याचे आश्वासन त्याचवेळी दिले असल्याची आठवण करून देत त्यांनीही आपली दावेदारी मजबूत केली आहे.

कॉमर्स कॉलेज प्रभागातून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या निलोफर आजरेकर यांनी सर्वात प्रथम सभागृहात काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला. तेव्हापासून त्या पक्षासोबत आहेत. या निष्ठेमुळे महापौरपदावर त्यांनी दावा केला आहे. नगरसेविका जयश्री चव्हाण व दीपा मगदूम यांना महिला व बालकल्याण व स्थायी समितीचे सदस्यत्व मिळाले. मात्र त्यांनी कोणत्याही समितीचे सभापतिपद घेतले नाही. महापौरपदासाठी त्यांनी अन्य पदांना महत्व दिले नाही. त्यामुळे त्यांनीही पदासाठी इच्छुक असल्याचे सांगण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसमधील इच्छुकांची संख्या पाहता पक्षनेतृत्वाला त्यांची समजूत काढताना दमछाक होणार आहे.

महापौरांचा उद्या राजीनामा शक्य

दरम्यान, बुधवारी (ता. २२) महापालिकेची महासभा राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात सकाळी ११.३० वाजता होणार आहे. सभेत एलइडी प्रोजक्टचा ठेका रद्द करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या शिफारशीने चर्चेला येणार आहे. त्याचबरोबर मुदतवाढ दिलेल्या महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर यांचा कार्यकाळ संपल्याने त्या राजीनामा सादर करण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या कालावधीमध्ये अत्यंत समाधानी आहे. त्यामुळे वाढीव कालावधीची मागणी करणार नाही. नेत्यांनी पदाचा कार्यकाळ वाढवून दिल्यास, त्याचा विचार करू. मात्र ठरल्याप्रमाणे पक्षाच्या आदेशाचे पालन केले जाईल.

- अॅड. सूरमंजिरी लाटकर, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज दरवाढ मागे घ्या, अन्यथा जनआंदोलन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'महावितरण कंपनीने प्रस्तावित वीज दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा जनआंदोलन उभारू असा इशारा कोल्हापूर शहर सर्वपक्षीय वीज दरवाढ विरोधी कृती समितीने दिला. दिल्ली राज्याप्रमाणे शून्य ते २०० युनिटपर्यंत कमी दराने वीजपुरवठा करावा,' अशी मागणी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शहर विभागाचे कार्यकारी अभियंता नामदेव गांधले यांच्याकडे केली.

कोल्हापुरात वीजबिलांच्या वसुलीचे प्रमाण चांगले आणि वीज गळतीचे प्रमाण कमी आहे. महावितरणने याबाबीचा विचार करून कोल्हापूरसाठी अत्यल्प दरात वीजपुरवठा करावा, जेणेकरुन इतर जिल्हेही कोल्हापूरचा आदर्श घेऊन वीजबिलाचा भरणा करतील असा पर्यायही समितीने सुचविला. समितीचे निमंत्रक बाबा इंदूलकर यांनी 'महावितरण कंपनीने २०१७-१८ ते २०१९-२० या कालावधीमध्ये ८७४० कोटी रुपये तूट कशी आली हे नागरिकांसमोर जाहीर करावे. वीजदराचा पहिला स्लॅब हा शून्य ते १००वरुन २०० युनीटपर्यंत वाढवावा' अशी मागणी केली.

माजी महापौर आर. के. पोवार म्हणाले, 'महावितरणमधील अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभाराचा बोजा सामांन्य ग्राहकांवर लादण्याचा प्रयत्न केल्यास ते सहन केले जाणार नाही.'

बाबा पार्टे यांनी, 'अधिकाऱ्यांच्या केबिनची सजावट, इमारतीची रंगरंगोटीवर होणारा खर्च थांबवावा' असे सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये दिल्लीमध्ये सामान्य ग्राहकांसाठी शून्य ते २०० युनिटपर्यंतचा वीज दर प्रति युनिट तीन रुपये आहे. तर महाराष्ट्रात शून्य ते १०० युनिटसाठीसाठी प्रतियुनीट दर तीन रुपये पाच पैसे आहे. वीज दरवाढीच्या प्रस्तावात हा दर तीन रुपये तीस पैसे केल्याचे पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणले.

शिष्टमंडळात दिलीप देसाई, किशोर घाटगे, अमर निंबाळकर, अजित सासने, अशोक भंडारी, सुनील देसाई, अमित अतिग्रे, निरंजन कदम आदींचा समावेश होता.

श्रीमंत घटकांना वगळल्याचा आरोप

'१०० ते ३०० युनिटपर्यंतचा विजेचा दर प्रतियुनीट सहा रुपये ९५ पैशांवरून सात रुपये ३० पैसे प्रस्तावित आहे. ३०० ते ५०० युनीटपर्यंतचा दर वाढविला नाही. म्हणजेच ३०० ते ५०० युनीट वापरणारे आर्थिकदृष्ट्या सक्षम म्हणजेच श्रीमंतांना वीज दरवाढीचा फटका बसणार नाही. याचप्रमाणे उच्च दाब व लघूदाब औद्योगिक ग्राहकांसाठीसुद्धा वीज दरवाढ सुचविली आहे. कृषी पंपासाठी मीटरनुसार आकारणी करण्यात आली असली तरी या घटकांसाठीही प्रस्तावात दरवाढ मागितली आहे' हे शिष्टमंडळाने निदर्शनास आणले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरातील जैवविविधतेची प्राथमिक यादी तयार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील जैवविविधतेबाबत संकलीत केलेल्या प्राथमिक यादीला जैवविविधता समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. झाडे, वेली, रोपे, शोभेच्या वनस्पती, औषधी वनस्पती, फळझाडे, पक्षी, फुलपाखरे, सरपटणारे प्राणी, मासे, सस्तन प्राणी अशी विविध ८०६ प्रजातींची नोंद तज्ज्ञांनी केली आहे. महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये यादीला मान्यता दिली. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी उपस्थित होते.

निसर्गमित्र संस्थेचे अध्यक्ष तथा वनस्पतीतज्ज्ञ डॉ. मधूळकर बाचूळकर, सचिव अनिल चौगुले, विज्ञान प्रबोधनी संस्थेचे उदय गायकवाड, मच्छीमार संस्थेचे प्रतिनिधी अमर जाधव यांसह वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली जैवविविधता यादी तयार केली आहे. शहरातील जैवविविधतेची माहिती संकलीत करण्याचे काम सुरू होते. दोन महिन्यांनंतर प्राथमिक स्तरावर यादी तयार करण्यात आली आहे. नोंदवहीमध्ये झाडे, वेली, रोपे, शोभेच्या वनस्पती, औषधी वनस्पती, फळझाडे, पक्षी, फुलपाखरे, सरपटणाऱ्या व सस्तन प्राण्यांचा सामवेश आहे. बैठकीत महापालिकेच्या ५४ उद्यानापैकी एका उद्यानामध्ये वनौषधी उद्यान व महावीर उद्यानातील मत्स्यालयामध्ये विविध जातींचे मासे नव्याने उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पर्यटन वाढीसाठी या बाबी विचारात घेण्याची विनंती समितीने केली. पुढील आर्थिक वर्षामध्ये यासाठी जादा आर्थिक तरतूद करण्याची मागणी केली. समितीमधील रिक्तपदी शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाच्या प्रा. डॉ. आसावरी जाधव यांच्या नियुक्तीला मान्यता देण्यात आली.

यावेळी पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, मत्स्य विभागाचे सुदर्शन पावसे, कृषी महाविद्यालयाचे डॉ. ए. जी. भोईटे, उद्यान अधीक्षक अनिकेत जाधव, अपर्णा जाधव आदी उपस्थित होते.

४६६

औषधी वनस्पती, फळझाडे

२३१

पक्षी

३५

फुलपाखरे

२५

सरपटणारे प्राणी

२६

मासे

२३

सस्तन प्राणी

८०६

एकूण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैचारिक प्रदूषण रोखण्याची गरज

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, वारणानगर

'वैचारिक प्रदूषण रोखण्यासाठी येशूचे विचार प्रेरणादायी ठरतील' असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यानी केले. कोडोली (ता. पन्हाळा) येथील कोडोली ख्रिश्चन प्रेस्बिटेरियन चर्चच्या शताब्दी महोत्सव कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे बोलत होते. आमदार विनय कोरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, खासदार धैर्यशील माने, अमर पाटील, विशांत महापुरे, पन्हाळा पंचायत समितीच्या सभापती गीतादेवी पाटील, सरपंच शंकर पाटील, माजी सरपंच नितीन कापरे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते शताब्दी महोत्सवाच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

मंत्री पाटील म्हणाले, 'आर्थिक अडचणी, बेरोजगारीसह अनेक प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. मात्र गेल्या सहा वर्षांत देशात व राज्यात वैचारिक प्रदूषण मोठ्या प्रमाणात झाले आहे. ते रोखण्यासाठी व चांगले विचार जोपासण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तासह सर्व धर्मग्रंथ, संताचे विचार यांचा प्रभावी वापर करण्याची गरज आहे.'

यावेळी त्यांनी चर्चच्या आवारात कम्युनिटी हॉल, स्मशान कंपाऊंड यांसह कोडोलीच्या पाणी पुरवठा योजनेच्या नळांना मीटर बसवण्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली.

खासदार धैर्यशील माने म्हणाले, 'मी दिवंगत खासदार बाळासाहेब माने यांचा नातू, सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांचे नातू आमदार विनय कोरे, पालकमंत्री सतेज पाटील हे कोडोलीचे नातू अशा तिसऱ्या पिढीतील तीन नातवांच्या हस्ते होणारा हा शताब्दी सोहळा नव्या पिढीला प्रेरणा देणारा आहे. येशूच्या प्रार्थनेत व विचारात जातीपातीच्या पलीकडे जाऊन सर्व समाज एकसंघ ठेवण्याची ताकद आहे.'

आमदार विनय कोरे म्हणाले, 'कोडोलीतील चर्चच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य सेवेबरोबरच चांगल्या विचारांच्या सुवार्ता समाजात रुजवण्याचे काम केले आहे.'

श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले, 'समाज हा विचारावर चालतो. वेगवेगळ्या विचारांचे पक्षदेखील या राज्यात विकासाच्या मुद्यावर एकत्र आले, हा नवा प्रयोगदेखील चांगल्या विचाराचे प्रतिक मानावे लागेल. देशातील अनेक प्रश्नांवर जातीयता पसरू लागली आहे. महाराष्ट्रात अशा जातीयतेला कायमच विरोध झाला आहे.'

समारंभास माजी खासदार राजू शेट्टी, शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक, रेव्ह. एस. आर. रणभिसे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images