Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

युवक गंभीर जखमी

0
0

कोल्हापूर: पडळ (ता. पन्हाळा) येथे मोटारसायकल घसरून सचिन रमेश अवघडे (वय २४, रा. तांदूळवाडी, ता. वाळवा) हा युवक गंभीर जखमी झाला. शनिवारी रात्री सचिन आपल्या एमएच १० बीएच ६५७८ सप्लेंडर मोटारसायकलवरुन तांदुळवाडीहून माजनाळकडे निघाला होता. पडळ येथे आल्यानंतर कुत्रे आडवे आल्याने त्याचा मोटारसायकलवरील ताबा सुटला व ती घसरली. त्याचा डोक्याला गंभीर दुखापत झाली असून सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वृद्ध जखमी

0
0

कोल्हापूर : दाभोळकर कॉर्नर येथे मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातात सय्यद शेख (वय ६५,रा. कदमवाडी) हे जखमी झाले. शनिवारी रात्री ही घटना घडली. शेख परीख पुलाकडून सासने ग्राउंडकडे जात असताना सिग्नलजवळ त्यांची मोटारसायकल घसरली. रस्त्यावर जोरात पडल्याने डोक्यातून रक्तस्राव होऊ लागला. त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णायात दाखल करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मेनन’मधून लाखाच्या कॉपरची चोरी

0
0

कोल्हापूर: विक्रमनगर येथील मेनन अँड मेनन कंपनीच्या स्टोअर रुममधून एक लाख दहा किमंतीच्या कॉपर धातू असलेल्या पाच पिशव्या चोरट्यांनी लंपास केल्या. याबाबतची फिर्याद आनंदा रामचंद्र पारळे (वय ५२, रा. आशियाना अपार्टमेंट, ई वॉर्ड माळी कॉलनी) शाहूपुरी पोलिस ठाण्या दिली आहे. फियार्दीनुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रमनगर येथील मेनन अँड मेनन कंपनीच्या स्टोअर रुममध्ये विविध साहित्य ठेवण्यात आले आहे. शुक्रवारी (ता. २७) सायंकाळी सहा ते शनिवारी (ता. २८) सकाळी नऊच्या दरम्यान चोरट्यांनी स्टोअर रुममधील एक लाख दहा हजार किमंतीच्या पाच कॉपर धातू असलेल्या पिशव्या लंपास केल्या. त्यानुसार शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रस्तावाचा तोडगा ठरेना, शिवसेनेचे जमेना

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजप आघाडी व विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून अन्य आघाडीतील सदस्यांच्या जमवाजमवीसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेचे सहा सदस्य रविवारी सहलीवर रवाना झाले. माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या गटाचे तीन सदस्य मात्र सहलीपासून तटस्थ राहिले. दरम्यान, शिवसेनेकडून तीन समित्यांच्या सभापतिपदाबाबत सादर केलेल्या प्रस्तावाबाबत अद्याप दोन्ही काँग्रेसकडून प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे पद विभागणीवरूनन शिवसेनेतही अस्वस्थता निर्माण झाली आहे.

मंत्रिमंडळ विस्तारामुळे दोन्ही काँग्रेसचे नेते काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व आमदार पी. एन. पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ सध्या मुंबईत तळ ठोकून आहेत. सोमवारी मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर ते मंगळवारी (ता.३१) कोल्हापुरात परतण्याची शक्यता आहे. त्यानंतर राजकीय घडामोडी आणखी वेगावतील. शिवाय शिवसेनेने दिलेल्या प्रस्तावासोबत नेते मंडळीसोबत चर्चा होणार आहे.

दरम्यान अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत दगाफटका टाळण्यासाठी दोन्ही आघाड्यांकडून सदस्यांवर लक्ष ठेवण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाचे सदस्य हुबळी येथे सहलीवर आहेत. त्यांच्यासोबत ताराराणी आघाडीचे दोन आणि चंदगड युवक क्रांती आघाडीचा एक सदस्य आहे. युवक क्रांती आघाडीचे सदस्य कल्लाप्पाण्णा भोगण हे भाजप आघाडीसोबत असून ते रविवारी हुबळीकडे रवाना झाले. युवक क्रांती आघाडीच्या सदस्या विद्या पाटील, ताराराणी विकास आघाडीच्या राणी खमलेट्टी हे दोन्ही सदस्य काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात पाटील व खमलेट्टी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तो होऊ शकला नाही.

जिल्हा परिषदेच्या राजकारणात शिवसेनेला महत्त्व आले असून त्यांनी अजून कोणाला पाठिंबा जाहीर केला नाही. खासदार संजय मंडलिक महाविकास आघाडीसाठी प्रयत्नशील आहेत. शिवसेनेच्या नेत्यांनी काँग्रेसकडे अध्यक्ष किंवा तीन समिती सभापतिपदांचा प्रस्ताव दिला आहे. त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. शिवसेनेचे जिल्हा परिषदेत दहा सदस्य असून, त्यापैकी निम्मे सदस्य गोवा येथे सहलीवर गेले आहे. माजी आमदार सत्यजित पाटील गटाचे सदस्य हंबीरराव पाटील, आकांक्षा पाटील, माजी आमदार सुजित मिणचेकर गटाचे सदस्य प्रवीण यादव, माजी आमदार उल्हास पाटील गटाच्या सदस्या स्वाती सासने हे गोवा येथे सहलीवर गेले आहेत. शिवसेनेचा पाठिंबा मिळवण्यासाठी काँग्रेस आणि भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. खासदार मंडलिक आणि आमदार प्रकाश आबिटकर गट गेली अडीच वर्षे दोन्ही काँग्रेससोबत आहे.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीमाप्रश्नी तणाव

0
0

एसटीच्या ५०० हून अधिक फेऱ्या रद्द, येडियुरप्पा यांच्या प्रतिकात्मक पुतळयाचे दहन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सीमाप्रश्नी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून कर्नाटक सरकारच्या विरोधात कोल्हापुरात रविवारी संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. सीमावासियांना पाठिंबा आणि कर्नाटक सरकारचा धिक्कार करत कोल्हापुरात विविध संघटना, संस्था रस्त्यावर उतरल्या. दरम्यान, सीमाभागात तणाव निर्माण झाल्यामुळे एसटीच्या ५०० हून अधिक फेऱ्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकारच्या विरोधात निषेध फेरी काढत मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या प्रतिकात्मक पुतळयाचे दहन केले. यावेळी पोलिस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. तर सायंकाळी मिरजकर तिकटी येथे विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ आंदोलन केले.

भीमाशंकर पाटीलच्या वादग्रस्त वक्तव्यप्रश्नी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास खासदार धैर्यशील माने, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव आदींच्या नेतृत्वाखाली मध्यवर्ती बसस्थानक चौक ते दाभोळकर चौकापर्यंत निषेध फेरी काढली. दाभोळकर चौकात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक नवनिर्माण सेना, कन्नड रक्षक वेदिका संघटनेच्या धिक्काराच्या घोषणा देऊन कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

या आंदोलनाप्रसंगी पोलिसांनी पुतळा काढून घेण्याचा प्रयत्न केल्यावर कार्यकर्ते व पोलिसांत झटापट झाली. पोलिसांनी अर्धवट जळालेला पुतळा ताब्यात घेतला. याप्रसंगी खासदार माने यांनी महाराष्ट्र एकीकरण समिती व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त विधाने करणाऱ्या कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या भीमाशंकर पाटीलवर कारवाई करावी आणि त्या संघटनेवर बंदी घालावी अशी मागणी केली.

.....

कन्नड सिनेमा बंद, गांधीनगरात फलक हटवले

दाभोळकर चौकातील आंदोलनानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते हर्षल सुर्वे, शशिकांत बीडकर आदींनी मोर्चा अप्सरा टॉकीजकडे वळविला. आंदोलनाची कुणकुण लागताच थिएटर व्यवस्थापनने कन्नड सिनेमाचे फलक काढण्यास सुरुवात केली होती. फलक उतरविल्यानंतर कार्यकर्ते थिएटरमध्ये घुसले. सिनेमाचे प्रदर्शन सुरू असल्याचे लक्षात येताच कार्यकर्ते संतप्त बनले. त्यांनी हा सिनेमा बंद करावयास भाग पाडला. करवीर तालुक्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते राजू यादव, राजू सांगावकर आदींनी गांधीनगर, तावडे हॉटेल परिसरातील काही दुकानावरील कन्नड भाषेतील फलक हटविण्यास दुकानदारांना भाग पाडले. काही फलकांना काळे फासले. आंदोलनाची दखल घेत दुकानदारांनी कन्नड फलक काढून घेतले.

........

तात्पुरता परवाना असलेली वाहने सोडू नयेत

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी कागल हायवे वर जाऊन कर्नाटक सरकारचा तात्पुरता परवाना असलेली वाहने महाराष्ट्राच्या हद्दीत सोडू नयेत, असे आवाहन अधिकाऱ्यांना केले. दरम्यान, अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्यासह अन्य पोलिस अधिकाऱ्यांनी कोगनोळी टोल नाका येथे भेट देऊन स्थितीचा आढावा घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोमवारपासून पुन्हा आंदोलन

0
0

कोल्हापूर: मटण विक्रेते व कृती समितीमधील चर्चेमध्ये मटण प्रतिकिलो ४८० रुपये दराने विक्री करण्याचे ठरले. मात्र शहरातील काही विक्रेत्याकडून जादा दराने मटण विक्री सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. मटण दरवाढ विरोधी कृती समितीची रविवारी सायंकाळी शिवाजी मंदिर येथे बैठक झाली. या बैठकीत मटण विक्रेत्यांनी ४८० रुपये दरानेच मटण विक्री करावी, अन्यथा सोमवारपासून (ता. ३०) पुन्हा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण, अजित राऊत, बाबा इंदूलकर, बाबा पार्टे, दिलीप देसाई, भाऊ साळोखे, किशोर घाटगे आदींच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिरजकर तिकटी परिसरात पुतळा दहन

0
0

मंगळवार पेठेतील विविध संघटना व संस्थेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन रविवारी सायंकाळी मिरजकर तिकटी परिसरात कर्नाटक सरकारच्या विरोधात आंदोलन केले. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांविषयी वादग्रस्त विधाने करणाऱ्या कर्नाटक नवनिर्माण सेनेचे भीमाशंकर पाटील व मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या पुतळ्याचे प्रतिकात्मक दहन केले. समितीपुतळा दहन करताना कार्यकर्ते व पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये झटापट झाली. संयुक्त मंगळवार पेठ कृती समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. पोलिसांनी प्रतिकात्मक पुतळा जाळू नका, फक्त निषेध करा, असे सांगितले. यावरुन कार्यकर्त्यांनी पुतळा दहन करु दिले नाही तर ठिय्या आंदोलन करू असा इशारा दिला. यावेळी कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा व कर्नाटक नवनिर्माण सेनेचे भीमाशंकर पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळयाचे दहन केले. आंदोलनात बाबा पार्टे, जयकुमार शिंदे, किशोर घाटगे, सुनील पाटील, उदय पाटील, संजय भोसले, राजू मंडलिक, किरण भोसले, प्रभाकर पाटील, स्वप्नील पार्टे आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालकांत वाढतोय न्युमोनिया

0
0

Sachin.patil1@timesgroup.com

Tweet@sachinpMT

कोल्हापूर: गेल्या काही वर्षांपासून बालकांना न्युमोनिया आजाराचा सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. बदलते हवामान, वाढत्या प्रदूषणामुळे गेल्या नऊ महिन्यात जिल्ह्यातील शून्य ते पाच वयोगटातील २३० बालकांना न्युमोनिया झाला होता. यामध्ये सर्वाधिक म्हणजे २२५ बालके एकट्या करवीर तालुक्यात आहेत. तर राज्यात १२ हजार, ९८२ मुलांना न्युमोनिया झाला होता. बालकांतील न्यूमोनियाचे वाढते प्रमाण चिंताजनक मानले जात आहे.

पाच वर्षाच्या आतील बालकांमध्ये सातत्याने न्यूमोनिया वाढतो आहे. त्यावर वेळीच उपचार न मिळाल्यास मुलांच्या जीवाला धोका निर्माण होतो. मूल कुपोषित असेल तर हा आजार होण्याचा धोका आणि मृत्यूची शक्यताही वाढते. गेल्या वर्षी राज्यात १३ हजार ९२३ तर जिल्ह्यात २३४ मुलांना न्युमोनिया होता. विविध शासकीय व खासगी रुग्णालयात होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी २१ टक्के मृत्यू न्युमोनियामुळे होतात असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. यासाठी वेळीच उपचार मिळणे गरजेचे आहे. योग्य ती आवश्यक काळजी घेतल्यास हा आजार नियंत्रणात आणता येतो. देशात दर हजार लोकसंख्येमागे लहान व वृद्ध मंडळीत ५ ते ११ जणांमध्ये हा आजार आढळून येतो. गर्भवती महिलेला हा संसर्ग झाल्यास बाळालाही समस्या उद्भवू शकते. यासाठी गर्भवती महिलांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. गरोदरपणात महिलांनी अधिक स्वच्छ वातावरणात राहणे आवश्यक असते. याविषयी बालरोगतज्ज्ञ डॉ. अमित सागरे, यांनी सांगितले पाच वर्षांच्या आतील बालकांना न्युमोनियासून वाचवण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. यासाठी न्युमोकोक्कल लस व एचआयबी लस उपलब्ध असून ही लस जिवाणूजन्य न्यूमोनियाचा प्रतिबंध करते तर तर विषाणूजन्य न्युमोनियावर एच १ एन १ लस फायदेशीर ठरते.

न्यूमोनिया लक्षणे

ताप, खोकला, थकवा, श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत दुखणे, फिट येणे, रक्तदाब कमी होणे, वृद्धांमध्ये बेशुद्धी अशी लक्षणे सामान्यत आढळतात.

असा होतो धोका

फुप्फुसांमध्ये पाणी व पू भरणे, वारंवार अशक्तपणा येणे, श्वास घेताना त्रास होणे, शरीरात संसर्ग होणे, हृदयाला संसर्ग होणे.

ज्या लहान मुलांना वारंवार सर्दी, खोकला होतो, ताप येतो त्यांची विशेष काळजी घ्यावी. कारण सर्दी, ताप यासारखा साधा आजार बळावून पुढे त्या आजाराचे पर्यवसान न्युमोनियात होण्याची शक्यता अधिक असते. लक्षणांमध्ये शंका आढळल्यास त्वरित बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. वेळीच लसीकरणाला महत्त्व द्यावे.

डॉ. स्नेहा मोरे- पाटील, बालरोगतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


युवकाचा मृत्यू

0
0

कोल्हापूर: विषारी औषध प्राशन केलेल्या मनोज सुरेश पवार (वय २१, रा. गवाना, ता. निपाणी) या युवकाचा रविवारी उपचारादरम्यान सीपीआरमध्ये मृत्यू झाला. शुक्रवारी मनोज याने राहत्या घरी विषारी औषध प्रशान केल्याने अत्यवस्थेत आढळून आला होता. त्याला नातेवाईकांनी निपाणी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. त्याची प्रकृती अधिकच खालावत असल्याने त्याला पुढील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना रविवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली असून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जूनपासून ‘कमवा व शिका’ योजना

0
0

मटा कनेक्ट लोगो वापरणे....

०००००

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:Appasaheb_MT

कोल्हापूर : शिकायची इच्छा आहे, पण घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. शहरी भागात शैक्षणिक खर्च परवडत नाही, यामुळे पदव्युत्तर शिक्षण थांबण्याच्या टप्प्यावर असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठाने 'कमवा व शिका' असा मंत्र दिला. या योजनेच्या बळावर गेल्या पाच दशकांत तब्बल पाच हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी विद्यार्थी भवनमध्ये राहून करिअर घडविले. विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या 'कमवा व शिका योजने'चे (विद्यार्थी भवन) यंदाचे वर्षे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. यानिमित्ताने विद्यापीठ प्रशासनाने, येत्या जूनपासून प्रत्येक कॉलेजमध्ये 'कमवा व शिका योजना'सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोल्हापूर, सांगली, सातारा या तीनही जिल्ह्यांतील कॉलेजना या योजनेच्या अंमलबजावणीविषयी कळविले आहे. मे महिन्यात विशेष कार्यशाळा होणार आहे. विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. अप्पासाहेब पवार यांचा ३८ वा स्मृतिदिन आज (३० डिसेंबर) आहे. 'डॉ. आप्पासाहेब पवार कमवा व शिका प्रबोधिनी आणि विद्यापीठातील विद्यार्थी भवन यांच्या संयुक्त विद्यमाने 'कमवा व शिका योजने'च्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा उद्घाटन समारंभ आयोजित केला आहे.

'१५ जून १९६९ रोजी विद्यार्थी भवनची सुरुवात झाली. पहिल्या वर्षी २५ विद्यार्थ्यांचा सहभाग होता. रोज तीन तास शेतातील कामे करायची आणि त्या मोबदल्यात भवनमध्ये निवासाची सोय आणि विद्यापीठात शिकण्याची सुविधा हे त्याचे सूत्र होते. विद्यापीठात भात, ऊस, भुईमूग या पिकांचे उत्पादन होई. शेतीची बहुतांश कामे विद्यार्थी करत. सध्याचा जो गेस्ट हाउस आहे, त्या ठिकाणी ऊसशेती होती. संगीत व नाट्यशास्त्र विभाग आणि तलाव परिसरात भातशेती होती,' अशा शब्दांत योजनेच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी व विद्यापीठातील भूगोल विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. सी. टी. पवार यांनी आठवणी उलगडल्या. १९९४ मध्ये मुलीसाठी 'कमवा व शिका' योजना सुरू झाली. प्रशासनाने कालानुरूप भवनच्या विद्यार्थ्यांच्या कामातही बदल केला आहे.

००००

आजी, माजी विद्यार्थ्यांची प्रबोधिनी

डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन व ज्या संस्थेमुळे आपले करिअर घडले, त्या संस्थेच्या कृतज्ञतेपोटी भवनमधील आजी-माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन २००६ मध्ये 'डॉ. अप्पासाहेब पवार कमवा व शिका प्रबोधिनी'ची स्थापना केली. प्रबोधिनीमार्फत परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्थसाह्य केले जाते. आप्पासाहेब पवारांच्या जयंती व स्मृतिदिनाला वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन केले जाते. गरजू विद्यार्थ्यांना मदत, संशोधनासाठी सहकार्य, प्रबोधनपर व्याख्याने होतात. विद्यापीठ व प्रबोधिनी एकत्र येऊन दरवर्षी एका विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती देण्याचे नियोजन सुरू आहे असे प्रबोधिनीचे कार्याध्यक्ष डॉ. एस. जे. नाईक यांनी सांगितले. विद्यापीठाचे कुलगुरू हे प्रबोधिनीचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. उपाध्यक्षपदी प्रा. टी. के. सरगर, खजिनदारपदी अशोक साबळे आहेत.

०००००

भवनच्या विद्यार्थ्यांची झेप

विद्यार्थी भवनच्या विद्यार्थ्यांनी सर्व क्षेत्रांत नाव कमविले आहे. माजी कामगार आयुक्त अंकुश मोरे, प्राचार्य व्ही. एस. लिपारे, प्राचार्य एस.जी. खामकर, प्राचार्य जी. एम. जर, डॉ. सी. टी. पवार, डॉ. ए. डी. मुळीक हे सगळे पहिल्या बॅचचे, तर उच्च शिक्षण संचालक ते नागपूर विद्यापीठाचे कुलगुरूपद भूषविलेले डॉ. एस. एन. पठाण हे भवनचे दुसऱ्या बॅचचे विद्यार्थी म्हणून ओळख आहे. सेवानिवृत्त विभागीय आयुक्त कल्याण गवळी, पोलिस अधीक्षक चंद्रकांत कुंभार, प्राचार्य बी. एल. पाटील, प्राचार्य भैरव कुंभार, प्राचार्य अर्जुन राजगे, प्राचार्य एस. जे. नाईक, प्राचार्य जी. पी. माळी, प्राचार्य अर्जुन पाटील, प्राचार्य एल. बी. पाटील, प्राचार्य जे. बी. चौगुले, प्राचार्य एस. बी. गायकवाड, प्रो. सी. एच. भोसले, डॉ. अलका पाटील, डॉ. संभाजी शिंदे, शिक्षण सहसंचालक पांडुरंग केचे अशी 'भवन'च्या माजी विद्यार्थ्यांची यादी मोठी आहे. भवनचे पहिले अधीक्षक म्हणून प्रा. चंद्रकुमार नलगे यांनी काम केले आहे.

००००

विद्यार्थी भवनची ५० वर्षांची वाटचाल विद्यापीठासाठी भूषणावह आहे. पदव्युत्तर स्तरावर कमवा व शिका योजना सुरू करणारे शिवाजी विद्यापीठ हे पहिले विद्यापीठ म्हणून नावलौकिक आहे. भवनमधील विद्यार्थ्यांचा खर्च, शैक्षणिक सुविधेसाठी विद्यापीठ दरवर्षी लाखो रुपयांची तरतूद करते. विविध शैक्षणिक उपक्रमांनी सुवर्ण महोत्सवी वर्षाला आणखी झळाळी मिळणार आहे.

डॉ. डी. टी. शिर्के, प्रकुलगुरू, शिवाजी विद्यापीठ

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवीन वर्षात सुट्यांचे गिफ्ट

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नवीन वर्षात नोकरदार व शाळकरी विद्यार्थ्यांना २४ सुट्ट्या मिळणार आहेत. नवीन वर्ष लीप वर्ष असल्याने कामासाठी एक दिवस जास्त असणार आहे. तर खगोलप्रेमींना सूर्य, चंद्राचे अनोखे दर्शन होईल. कंकणाकृती सूर्यग्रहण, शनी, सुपरमून दर्शन, ब्ल्यू मून योग आहे.

नवीन वर्षात दोन सूर्यग्रहणे आणि चार चंद्रग्रहणे असे एकूण सहा ग्रहणे अनुभवता येणार आहेत. २१ जूनच्या सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती पंजाब, राजस्थान, हरियाणा आणि उत्तराखंड या राज्यातील काही भागातून दिसेल. उर्वरित भारतातून खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल. १४ डिसेंबरला होणारे खग्रास सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. १० जानेवारी व ५ जूनचे छायाकल्प चंद्रग्रहण भारतातून दिसेल, तर ५ जुलै व ३० नोव्हेंबरचे छायाकल्प चंद्रग्रहणे भारतातून दिसणार नाहीत. सोने खरेदी करणाऱ्यांसाठी नवीन वर्षात २ एप्रिल, ३० एप्रिल, २८ मे आणि ३१ डिसेंबर असे चार गुरुपुष्यामृत योग आहेत. नवीन वर्षात एकही अंगारकी संकष्टी चतुर्थी नाही. २०२० मध्ये १८ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर या काळात अधिक अश्विनमास असेल. त्यामुळे गणेशोत्सवाचा भाद्रपद महिना झाल्यानंतर नवरात्र-घटस्थापना एक महिना उशिरा येणार आहे. त्यामुळे दसरा-दिवाळी सणही उशिरा येतील. २०२० हे लीप वर्ष असल्याने फेब्रुवारीत २९ दिवस आल्याने या वर्षात एकूण ३६६ दिवस असतील.

अशा असतील २४ सुट्ट्या

प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी), पारसी नवीन वर्ष (१६ ऑगस्ट), मोहरम (३० ऑगस्ट), विजयादशमी (२५ ऑक्टोबर) या चारच सुट्या रविवारी येतील. इतर २० सुट्यांपैकी बकरी ईद (१ ऑगस्ट), स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट), श्रीगणेश चतुर्थी (२२ ऑगस्ट), दिवाळी लक्ष्मीपूजन (१४ नोव्हेंबर) या सुट्ट्या शनिवारी-रविवारच्या सुट्टीला जोडून येणार आहेत. तसेच श्रीमहावीर जयंती (६ एप्रिल), रमजान ईद (२५ मे), दिवाळी बलिप्रतिपदा (१६ नोव्हेंबर), गुरुनानक जयंती (३० नोव्हेंबर) या सुट्या सोमवार, रविवारला जोडून येतील.

ब्ल्यू मून अनुभवता येणार

७ एप्रिलला रात्री सुपरमूनचे दर्शन होईल. चैत्र पौर्णिमेच्या रात्री चंद्र ३ लक्ष ५६ हजार ९०७ किमी. इतका पृथ्वीजवळ आल्याने १४ टक्के मोठा व जास्त तेजस्वी दिसेल. नवीन वर्षी १ व ३१ ऑक्टोबर अशा दोन पौर्णिमा आल्यामुळे ३१ ऑक्टोबरला 'ब्ल्यू मून' योग आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्रिमंडळ विस्तार: राष्ट्रवादीत नाराजी; समर्थकांचे राजीनामास्त्र

0
0

सातारा: महाविकास आघाडी सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार आज होत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांना मंत्रिमंडळात आपल्या आमदारांना स्थान देताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळ विस्तारावरून धुसफूस सुरू झाली असून मकरंद पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याच्या निषेधार्थ त्यांच्या समर्थकांनी पदाचे राजीनामे दिले आहेत.

राज्यात तीन पक्षांचे सरकार आल्यामुळे प्रत्येक पक्षाच्या वाटेला मोजकीच खाती आली आहेत. त्यातही सरकारमध्ये मंत्रिपदासाठी अनेकजण इच्छुक आहेत. आज होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीचे १३ जण मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यामध्ये वाईचे आमदार मकंरद पाटील यांना स्थान देण्यात आले नाही त्यामुळे वाई, खंडाळा, महाबळेश्वरमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. लोणंद ,वाई, महाबळेश्वर नगरपालिकेच्या नगरसेवकांसह तब्बल आठ जिल्हा परिषद सदस्य आपल्या पदांचा राजीनामा देणार आहेत. तर, सुरुर येथील किसनवीरांच्या पुतळ्यासमोर सर्व जण आत्मक्लेश आंदोलनही करणार आहेत.

मंत्रिमंडळ विस्तार: काँग्रेसची यादी आली; तरुणांना संधी

नाराजीची चर्चा संजय राऊत यांनी फेटाळली!

राष्ट्रवादीचे लोणंद नगरपंचायतचे नगरसेवक आणि गटनेते योगेश क्षीरसागर, भुईंज जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, राष्ट्रवादीचे खंडाळा विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष गणेश धायगुडे पाटील, खंडाळा तालुक्याचे राष्ट्रवादीचे सोशल मीडिया अध्यक्ष मोहसीन लतीफ पठाण यांनी आपल्या पक्षातील पदाचा राजीनामा देत नाराजी व्यक्त केली आहे. सातारा जिल्ह्यात वाईला सापत्न वागणूक देण्यात असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. खासदारकी, मंत्रिपदही कराडकडे देण्यात आले आहे. त्या तुलनेने जिल्ह्यातील इतर भागाकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप नाराज कार्यकर्त्यांनी केला आहे.

मंत्रिमंडळाच्या विस्तारात पुण्यातून कोणाची वर्णी?

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुश्रीफांच्या मंत्रीपदामुळे कार्यकर्त्यांना बळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अगोदर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील दिग्गज नेते मंडळींनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा सपाटा लावला होता. त्यांच्यामध्ये जणू भाजपवासी होण्याची चढाओढ लागली होती. कोल्हापूर जिल्हाही त्याला अपवाद नव्हता. जिल्ह्यातील पक्षाचा प्रभावशाली नेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमदार हसन मुश्रीफ यांना तत्कालिक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपात प्रवेश करण्याची खुली ऑफर दिली. मुश्रीफांनी कणखर बाणा दाखवत 'पवार एके पवार'चा नारा दिला. पक्षनेत्यावरील निष्ठा, पक्षवाढीसाठी अहोरात्र संघर्ष करण्याची तयारी, संघटन कौशल्य आणि कार्यकर्त्यांच्या मदतीला धावून जाण्याची वृत्ती यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा त्यांना मंत्रिपदाची संधी दिली. त्यांच्या मंत्रिपदामुळे कार्यकर्त्यांना बळ लाभताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठीही ताकद मिळणार आहे.

कोल्हापूर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. मात्र गेल्या काही वर्षात पक्षातील अनेकांनी भाजपची वाट धरली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी जिल्ह्यात राष्ट्रवादीचे दोन आमदार होते. विरोधक चेष्टेने, जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 'अडीच घराचा पक्ष'म्हणून हिणवायचे. कागल, चंदगड आणि राधानगरीपुरता हा पक्ष मर्यादित असल्याची टीका व्हायची. माजी खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांच्यासह अनेकांनी वेगळी वाट पकडल्यामुळे पक्षाची अवस्था दयनीय बनली होती. मात्र मुश्रीफांनी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना ताकद दिली. संधी मिळेल त्या ठिकाणी पदे मिळवून दिली. महापालिका, पंचायत समिती, कारखाने, नगरपालिकेत कार्यकर्त्यांना पदाधिकारी केले.

भाजप सरकारने गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत मुश्रीफांना नेस्तनाबूत करण्याची एकही संधी दवडली नाही. मुश्रीफांच्या विरोधात सक्षम उमेदवार म्हणून शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजित घाटगे यांना भाजपने रसद पुरविली. पुणे म्हाडा विभागाचे अध्यक्षपद दिले. विधानसभा निवडणुकीत मुश्रीफांना पराभूत करण्यासाठी भाजपने चंग बांधला. मात्र मुश्रीफांनी भाजपचे सगळे डाव उधळून लावत पुन्हा एकदा विजय मिळवला. कागल मतदारसंघातील विजयी परंपरा कायम राखताना त्यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार राजेश पाटील यांच्या विजयासाठी प्रयत्न केले. राधानगरीत के. पी. पाटलांना मदत केली.

आतापर्यंत मुश्रीफांनी तीन विविध खात्याच्या मंत्रीपदाची जबाबदारी समर्थपणे पेलली. त्यामध्ये विधी व न्याय खात्याच्या माध्यमातून त्यांनी केलेला सुधारित पब्लिक ट्रस्ट अॅक्ट तर महाराष्ट्रातील गोरगरीब रुग्णांना नवसंजीवनी देणाराच ठरला आहे. खाते कोणतेही असो मुश्रीफ त्याला न्याय देतात इतका विश्वास त्यांच्याविषयी कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे. मंत्रिपद मिळाल्यामुळे मुश्रीफांसमोर आता पक्षविस्ताराचे आव्हान आहे.

..........

प्रवेशाला नकार अन् आयकरची धाड

कागल विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा विजयी झालेल्या आमदार मुश्रीफ यांनी आई वडिलांची आठवण करीत मंत्रिपदाची शपथ घेतली. बरोबर एका वर्षापूर्वी ११ जानेवारी २०१९ रोजी त्यांच्या आई श्रीमती सकीनाबी यांचे निधन झाले. मुश्रीफ यांना कार्यकर्त्यांच्या गराड्यात राहायला आवडते. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सकाळी सहा ते ११ वाजेपर्यंत भरणारा 'जनता दरबार'हा अनेकांसाठी आधार केंद्र ठरल्याची भावना आहे. दरम्यान, गेल्या पाच वर्षात राष्ट्रवादीच्या या प्रभावशाली नेत्याचे खच्चीकरण करण्यासाठी विरोधकांनी अनेक प्रयत्न केले. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर भाजप प्रवेशास त्यांनी नकार दिला. त्यानंतर काही दिवसांनी मुश्रीफ यांच्या निवासस्थानावर आयकर विभागाची धाड पडली. तत्पूर्वी त्यांच्या नेतृत्वाखालील कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर कलम ८८ नुसार कारवाई केली. तसेच ते संचालक असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवर कलम ८८ ची कारवाई केली. या दोन्ही संस्थामधून त्यांना दहा, दहा वर्षे अपात्र करण्याचा अध्यादेश काढला. नंतर सर्वोच्च न्यायालय आणि हायकोर्टाने त्याला स्थगिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हातकणंगले नगरपंचायत त्रिशंकू

0
0

म. टा. वृतसेवा, हातकणंगले

हातकणंगले नगरपंचायतीसाठी पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेला सात, भाजपला पाच, काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसला दोन आणि अपक्षांना तीन जागांवर यश मिळाले. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. नगराध्यक्ष निवडीत मात्र, काँग्रेसच्या अरुण जानवेकर यांनी २९२२ मते घेत विजय मिळविला. त्यांनी भाजपच्या विजय चौगुले यांचा ४४४ मतांनी पराभव केला.

हातकणंगले नगरपरिषदेसाठी गेले दोन आठवडे प्रचाराची रणधुमाळी चालू होती. या निवडणुकीत हातकणंगले नगरपंचायत स्थापना करण्यासाठी भाजपाचे माजी आमदार सुरेश हाळवणकर, जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले यांनी प्रयत्न केल्यामुळे प्रथमच होणाऱ्या निवडणुकीसाठी सत्तेच्या चाव्या घेण्यासाठी धडपड चालू केली होती. काँग्रेसचे आमदार राजू आवळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला बरोबर आघाडी केली होती. रविवारी मोठ्या चुरशीने ८८.४१ टक्के मतदान झाले होते.

सोमवारी हातकणंगले प्रशासकीय इमारतीत सकाळी १० वाजता मतमोजणीस सुरुवात झाली मोजणीसाठी निवडणूक विभागाने सहा टेबलांची मांडणी केली होती. अवघ्या काही तासांत मतमोजणी पूर्ण झाली. शिवसेनेने सर्वात जास्त जागा मिळवित मोठा पक्ष होण्याचा मान मिळविला. हाळवणकर आणि इंगवले यांच्या हातमिळवणीला अपयश आल्याचे मतमोजणीनंतर लक्षात आले. भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजय चौगुले यांचा ४४४ मतांनी पराभव झाला तर नगरसेवकपदाच्या केवळ पाच जागांवर समाधान मानावे लागले. आमदार राजू आवळे यांच्या आघाडीलाही सपशेल पराभव पत्करावा लागला.

तहसीलदार प्रदीप उबाळे, नायब तहसीलदार दिगंबर सानप आदींनी मतमोजणीची नियोजनबद्ध यंत्रणा राबवली.

विजयी उमेदवारी व मते

नगराध्यक्ष : अरुण जानवेकर (२९२२)

प्रभागवार विजयी उमेदवार,कंसात मिळालेली मते व पक्ष -

प्रभाग

१. रोहिनी खोत (अपक्ष, १६२

२. राजू इंगवले (भाजपा, २५७

३. पूजा उर्फ शुभदा स्वामी (शिवसेना, १५९)

४. केतन कांबळे (शिवसेना,२७३)

५. रणजित धनगर (शिवसेना, ३७५)

६. मयूर कोळी (भाजपा, १६७)

७. रमजान मुजावर (भाजपा, १४५

८. अरुंधती सूर्यवंशी (भाजपा, ११८)

९. छाया पाटील (अपक्ष, २३१)

१०. फरिदा मुजावर (काँग्रेस, २७३)

११. दीनानाथ मोरे (भाजपा, २८३)

१२. प्राजक्ता उपाध्ये (शिवसेना , १५३)

१३. अभिजित लुगडे (अपक्ष,१८२)

१४. अलका कांबळे (शिवसेना, १२६)

१५. कविता हातकणंगलेकर (शिवसेना, १७७)

१६. सोनाबाई इरकर (शिवसेना,१४८)

१७. विजय खोत (राष्ट्रवादी, १६३)

सहायक निरीक्षक सूर्यवंशी यांची अरेरावी

रविवारी मतदानावेळी हातकणंगले पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक स्वाती सूर्यवंशी यांच्याबरोबर अनेक कार्यकर्त्यांची वादावादी झाली होती. आज पुन्हा मतमोजणीच्या वेळी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे स्ट्रॉग रूम ओपन करण्यासाठी उमेदवार प्रतिनिधींना वेळेत येण्यासाठी स्पिकर वरून वारंवार सांगण्यात येत होते. मात्र सूर्यवंशी यांनी उमेदवार प्रतिनिधीना आत जाऊ दिले नाही. त्यामुळे सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.

नगरपंचायतीसाठी

झटणारे बाहेरच

हातकणंगले येथे नगरपंचायत होण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. मतमोजणीचा कल लक्षात आल्यानंतर नाराज उमेदवार घरी परतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अप्पासाहेब शिक्षणक्षेत्रातील पितामह

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांच्यामुळेच तळागाळातील, बहुजन समाजातील मुलांना उच्चशिक्षणाच्या प्रवाहात स्थान लाभले. त्यांनी बजावलेल्या पितामह स्वरुपाच्या कामगिरीमुळेच शिवाजी विद्यापीठाचा लौकिक वाढला,असे प्रतिपादन साहित्यिक प्रा. किसनराव कुराडे यांनी केले. 'विद्यापीठ परिसरात त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणीचे काम सहा महिन्यात पूर्ण करावे,'अशी मागणी त्यांनी केली.

शिवाजी विद्यापीठातील 'डॉ. आप्पासाहेब पवार विद्यार्थी भवन कमवा व शिका योजना आणि डॉ. आप्पासाहेब पवार कमवा व शिका प्रबोधिनी' यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. पवार यांचा ३८ वा स्मृतिदिन व विद्यार्थी भवनच्या सुवर्ममहोत्सवाचा उद्घाटन समारंभ सोमवारी झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. कुराडे बोलत होते. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला.

प्रा. कुराडे म्हणाले, 'यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई हे अप्पासाहेबांचे विद्यार्थी. कोल्हापुरात उच्चशिक्षणाची गंगा प्रवाहित करण्यासाठी त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांचे सहाय्य घेतले. शिवाय अतिशय निष्ठेपूर्वक विद्यापीठ उभारणीसाठी योगदान दिले.'

कुलगुरू शिंदे म्हणाले म्हणाले, 'अप्पासाहेब पवार हे विद्यापीठासाठी दीपस्तंभ आहेत. भवनच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त कमवा व शिका योजनेतील मुलींसाठी वसतिगृह उभारण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद करू. तसेच भवनच्या माजी विद्यार्थ्यांनी कृतज्ञता निधी उभारुन विविध उपक्रम राबवावेत.'

प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉ. सी. टी. पवार, प्रा. जी.एस. हिरेमठ, प्रा. सुदाम पाटील, निवृत्त विभागीय आयुक्त अंकुश मोरे, भवनचे अधीक्षक डॉ. संभाजी शिंदे आदींनी मनोगते व्यक्त केली. प्रबोधिनीचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. एस. जे. नाईक यांनी स्वागत केले. प्राचार्य जी. पी. माळी यांनी परिचय करून दिला. योगेश घाडेकर व सुप्रिया सोहोनी यांनी सूत्रसंचालन केले. प्रबोधिनीचे सचिव प्रा. टी. के. सरगर यांनी आभार मानले.

तत्पूर्वी विद्यार्थी भवन परिसरात वृक्षारोपण व सुवर्णमहोत्सवी फलकाचे अनावरण झाले. आप्पासाहेब पवारांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक गजानन पळसे, प्राचार्य मानसिंग जगताप, प्रा. अशोक जगताप, अधिष्ठाता डॉ. ए.एम. गुरव यांच्यासह अनेक शिक्षक, प्रशासकीय सेवक व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चार महिन्यात पुतळा उभारू

कुलसचिव डॉ. नांदवडेकर म्हणाले,'डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या चरित्रातून चांगल्या गोष्टींसाठी आग्रही राहण्याचा आदर्श मिळतो. विद्यार्थी भवनने अनेक गुरूवर्य घडविले, म्हणून तळागाळातील विद्यार्थी शिक्षण घेऊ शकले. डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम येत्या चार महिन्यांत पूर्ण केले जाईल असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सेनेत संभ्रमावस्था कायम

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आता जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी हालचाली वेगावणार आहेत. तीन दिवसांवर निवडणूक येऊन ठेपल्यामुळे मंगळवारी व बुधवारी या दोन दिवसांत सत्तास्थापनेच्या घडामोडीला मूर्त रुप मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या चार पदांच्या प्रस्तावाला काँग्रेसकडून थंडा प्रतिसाद आहे. यामुळे महाविकास आघाडीत शिवसेनेचे दहापैकी किती सदस्य सहभागी होणार याविषयी संभ्रमावस्था कायम आहे.

शिवसेनेने अधिकृतपणे भूमिका जाहीर केली नसली तरी शिवसेनेचे सहा सदस्य एका बाजूला आणि चार सदस्य एका बाजूला असे चित्र पाहावयास मिळत आहे. दुसरीकडे दोन्ही काँग्रेसकडून सातत्याने बहुमताचा दावा केला जात असून सदस्य संख्या ४० पर्यंत पोहचल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान ताराराणी विकास आघाडीने जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सदस्यांना व्हीप लागू केला आहे. ताराराणी आघाडीचे तीन सदस्य आहेत. तीनपैकी सदस्या सुनीता रेडेकर, रेखा हत्तरकी या भाजप आघाडीसोबत आहेत तर अन्य एक सदस्या राणी खमलेट्टी या काँग्रेस आघाडीच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाचे सहा सदस्य व माजी आमदार चंद्रदीप नरके गटाचे तीन सदस्य सहलीवर गेले नाहीत. शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे कोल्हापुरात आहेत.

माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी शिवसेनेचे दहा सदस्य असल्यामुळे पक्षाला अध्यक्षपद, दोन समिती सभापती व करवीर पंचायत समितीत एक पद मिळावे, अशी मागणी केली होती. त्यानंतर शिवसेनेने दोन्ही काँग्रेसकडे रीतसर प्रस्ताव दिला. मात्र काँग्रेसने फारसा प्रतिसाद दिला नाही. अध्यक्षपद नसेल तर चार समिती सभापतिपद शिवसेनेला मिळावे, असा प्रस्ताव पुढे आला. त्याबद्दल काही घडले नाही. शिवसेनेच्या दहापैकी सहा सदस्य सध्या सहलीवर आहेत. नेते मंडळी सांगतील त्या आघाडीसोबत असे त्यांचे म्हणणे आहे. नरके गटाचा अजून निर्णय झाला नाही. भारतीय जनता पक्ष व मित्र पक्ष आघाडीकडून बहुमतासाठी आवश्यक सदस्य संख्येसाठी जुळवाजुळव सुरू आहे.

मंत्र्यांची प्रतिष्ठा अन् प्रदेशाध्यक्षाची कसोटी

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील व राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे त्यांच्यासाठी जि. प. मधील पदाधिकारी निवडणूक ही प्रतिष्ठेची ठरणार आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासमोर सत्ता कायम राखण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेसाठी दोन्ही काँग्रेस व शिवसेना नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा मटण दुकाने बंद

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मटण विक्रेत्यांनी विनापरवाना बकरी कापून मटण विक्री केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने दहा दुकाने बंद केली. तर वजनमापे अधिकाऱ्यांनी वजनकाटे प्रमाणिकरण केले नसल्याने आठ दुकानांचे वजनकाटे जप्त केले. मटण दरवाढविरोधी कृती समितीने दोन्ही विभागांची भेट घेतल्यानंतर विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.

शहरात मटणदरवाढीविरोधात आंदोलन सुरू झाल्यानंतर मटणविक्री दरामध्ये तडजोड करण्यात आली. मात्र तडजोडीनंतर नित्कृष्ट दर्जाच्या मटणाची विक्री होत असल्याची तक्रार दाखल करण्यासाठी मटणदरवाढ विरोधी कृती समितीने सोमवारी अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांची भेट घेतली. भेटीदरम्यान अधिकाऱ्यांनी कत्तलखान्यामध्ये मटणाची तपासणी होत असल्याचे सांगितले. कार्यकर्त्यांनी मटण दुकानांची तपासणी करण्याची सूचना केली. तपासणीमध्ये दहा दुकानांमध्ये अवैधरित्या मटण विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले. फूड इन्स्पेक्टर आर. डी. पाटील यांनी सर्वांना तत्काळ नोटिसा देवून दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले.

त्यानंतर शिष्टमंडळाने मार्केट यार्ड येथील वजनमापे विभागात भेट दिली. वजनमापे निरीक्षकांना, मटण विक्रेत्यांनी वजनकाटे प्रमाणिकरण केले आहेत का? अशी विचारणी केली. गेल्या दहा वर्षात मटण विक्रेत्यांनी वजनकाटे प्रमाणिकरण केले नसल्याचे निदर्शनास येताच त्यांनी वजनकाटे जप्त करण्याची मागणी केली. त्यानुसार आठ दुकानांचे वजनकाटे वजनमाप अधिकाऱ्यांनी जप्त केले.

आंदोलनात कृती समितीचे नगरसेवक अजित राऊत, दिलीप देसाई, अॅड. बाबा इंदुलकर, दुर्गेश लिंग्रस, सुजीत चव्हाण, बाबा पार्टे, किशोर घाटगे, प्रसाद जाधव आदी सहभागी झाले.

.........

या दुकानांवर झाली कारवाई

सुलतान खाटीक (रेल्वे फाटक), महादेव मटण शॉप, जय किसान, फेमस, सुरेश मटण शॉप (सर्व राजारामपुरी), जनताश्रय, डिलक्स, करवीर मटण शॉप (नंगीवली तालीम), मिजान (सुभाषनगर), नॅशनल मटण शॉप (न्यू शाहूपुरी).

वजनकाटे जप्त झालेली दुकाने : स्टार चिकन सेंटर, बारस्कर चिकन, सहकार फीश अँड चिकन, महेश प्रकाश घोटणे, शुभम बेंद्रे, साया चिकन, दीपक चिकन व सुरेश चिकन सेंटर.

...................

आठ तासात सूचनेमध्ये बदल

'कृती समितीने अन्न व औषध प्रशासनाची भेट घेतल्यानंतर महापालिकेचा बापट कँप येथील कत्तलखाना विनापरवाना सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यावर आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी कत्तलखाना बंद करण्याची सूचना केली असल्याचे आंदोलक दिलीप देसाई यांनी सांगितले. मात्र रात्री न‌ऊ वाजता कत्तलखाना सुरू राहणार असल्याचे महापालिकेच्यावतीने सांगण्यात आले. त्यामुळे अवघ्या आठ तासांत आयुक्तांच्या सूचनेमध्ये बदल झाल्याची चर्चा आंदोलकांमध्ये होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरविकासाला गती मिळण्याची चिन्हे

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्यात भाजपची सत्ता असताना कोल्हापूर महापालिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असल्याने निधीबाबत सापत्नभावाची वागणूक दिल्याची नेहमीच टीका होत आली. त्यामुळे शहराचे अनेक विकासाभिमुख प्रकल्प रखडले. महापालिकेत सत्तारुढांचे नेतृत्व करणाऱ्या आमदार हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यामुळे शहरविकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा शहरवासियांकडून व्यक्त होत आहे.

२०१४ च्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारलेली असताना २०१५ मध्ये झालेल्या महापालिकेच्या पंचवार्षिक निडणुकीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली. त्यामुळे राज्यात एका पक्षाचे सरकार आणि महापालिकेत विरोधी पक्षाचे सरकार असे त्रांगडे निर्माण झाले. परिणामी निधी वितरणामध्ये जाणीवपूर्वक डावलले जात असल्याचा आरोप होऊ लागला. चंद्रकांत पाटील यांच्याकडे राज्यातील महत्वाच्या खात्यांची जबाबदारी असतानाही निधी मिळत नसल्याच्या तक्रारी महासभेत वारंवार सत्तारुढ गटांनी केल्या. निधी देण्यासाठी वारंवार निवेदनेही दिली. पण निवेदनाची दखल घेतली गेली नसल्याचाही आरोप करण्यात आला. परिणामी अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा, काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजनेवर गंभीर परिणाम झाला. तसेच शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधीचा ठणठणाट दिसून आला.

पाच वर्षानंतर मात्र स्थिती बदलली असून राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस असे तीन पक्षांचे सरकार सत्तेवर आले आहे. सरकारमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार हसन मुश्रीफ यांची कॅबिनेट तर काँग्रेसकडून राज्यमंत्री म्हणून आमदार सतेज पाटील यांचा समावेश झाला आहे. या दोन्ही नेत्यांची महापालिकेत सत्ता असल्याने विशेषत: रस्ते दुरुस्तीसाठी निधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी प्रयत्न होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरमध्ये महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. निवडणुकीपूर्वी शहरातील सर्व विकासकामे मार्गी लावून निवडणुकीला हे दोन्ही नेते सामोरे जाण्यासाठी निधीसाठी पाठपुरावा करतील, अशी अपेक्षा शहरवासियांकडून व्यक्त केली जात आहे.

.....

हे प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता

अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना

काळम्मावाडी थेट पाइपलाइन

राजर्षी शाहू आंतरराष्ट्रीय स्मारक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्थगितीनंतरही बांधकाम सुरुच

0
0

कोल्हापूर

'जुना बुध‌वार पेठे येथील पोलिस निवासस्थान बांधकामाला मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिली. पण स्थगितीनंतरही बांधकाम सुरूच आहे. तसेच बांधकाम क्षेत्रात येणाऱ्या जुन्या झाडांबाबत हरकती देण्याबाबत महापालिका प्रशासनाने मखलाशी केली आहे,' असा आरोप करत पर्यावरणप्रेमींनी सोमवारी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांची भेट घेतली. 'पोलिस निवासस्थानासाठी सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पामध्ये सुमारे ८० वर्षापूर्वीची दोन झाडे येत आहेत. ही दोन्ही झाडे तोडून टाकण्याचा विचार सुरू झाडे तोडण्यास पर्यावरण प्रेमींनी विरोध केला. त्यानंतर काम थांबवण्यात आले. तसेच आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी खोदाईमुळे उघड्यावर आलेल्या झाडांच्या झाकूण ठेवण्याचे आदेश पोलिसांना दिले. पण महिन्यानंतरही मुळ्या झाकूण ठेवलेल्या नाहीत. त्यामुळे झाडे एका बाजूने सुकू लागली आहेत. प्रक्रियेनुसार झाडे तोडण्यासाठी प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे. अर्जानंतर प्रशासनाने हरकती मागवल्या असून झाडावर नोटीस चिकटवण्यात आली आहे. नोटिसीवर २३ तारखेचा उल्लेख असताना प्रत्यक्षात शनिवारी (ता. २८) लावण्यात आली आहे. तसेच बांधकाम बंदिस्त असल्याने नोटिसच दिसत नाही,' असा आरोप करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठाकरे 'त्यांचे' गुलाम झाले असतील तर त्यांना सलाम: आठवले

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

‘शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्याने भाजपने भूमिकेत बदल करायला हवा होता. पण उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्यातील वादामुळे युती सत्तेपासून दूर गेली’, असे मत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. तसेच बांगलादेशींना हाकलून लावा म्हणणाऱ्या शिवसेनेच्या भूमिकेत बदल झाल्याने ठाकरे हे दोन्ही काँग्रेसचे गुलाम झाले असतील तर त्यांना सलाम करतो, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.

सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मंत्री आठवले यांची सर्किट हाऊसवर पत्रकार परिषद झाली. त्यावेळी त्यांनी विविध मागासवर्गीय महामंडळातील कर्जे पूर्ण माफ करावी, यासाठी ६ जानेवारी रोजी आरपीआयच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाने आंदोलन करण्यात येणार आहे, असे सांगितले.

आठवले यांनी ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना सांगितले की, ‘शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे सातत्याने बांगलादेशी नागरिकांना हाकलून लावा, असे मांडत होते. पण आघाडीचे सरकार बनवले जात असताना तीच शिवसेना आता दोन्ही काँग्रेसची गुलाम झाली का, असा प्रश्न पडत आहे. ठाकरे जर त्या काँग्रेसचे गुलाम झाले असतील तर त्यांना सलाम करतो. राज्यात सरकार स्थापन केले जात असताना शिवसेनेच्या मदतीशिवाय ते पूर्ण होणार नाही हे समजल्यानंतर भाजपने भूमिका बदलायला हवी होती. युतीचे सरकार बनावे यासाठी अमित शहांनाही भेटलो. अजित पवार यांच्या पाठिंब्याबाबतची माहिती त्यांच्याकडे असल्याने त्यांनी ते फारसे मनावर घेतले नाही. ठाकरे व फडणवीस हे दोघेही माझे चांगले मित्र आहेत. त्यांच्यातील वादामुळे राज्यातील चित्र बदलले व युती सत्तेपासून दूर गेली. सध्याचे सरकार किती काळ टिकेल हे सांगता येणार नाही. मात्र शिवसेनेची भूमिका लवचिक झाली आहे.’

कोरेगाव भीमा प्रकरणाबाबत आठवले म्हणाले, ‘नक्षलवादी नसलेल्यांनाही पकडणार का हा शरद पवारांचा सवाल योग्यच आहे. नक्षलवाद्यांनी आंबेडकरवादाकडे वळावे. मुख्य प्रवाहात येऊन सत्ता मिळवावी. त्यातूनच त्यांना हवे ते निर्णय करु शकतात.’ ‘भारत हा हिंदूंचा देश आहे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले वक्तव्य आम्ही सारे एक आहोत अशा भावनेतून केले असावे. त्यामुळे त्याबाबत इतके गंभीर होण्याचा प्रश्न नाही. ज्या भारतीयांनी वेगवेगळे धर्म स्वीकारले आहेत, ते सर्व पुन्हा हिंदू धर्म स्वीकारु शकत नाहीत’, असेही आठवले यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images