Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘सत्य परमात्म्याची ओळख झाल्याने जीवन उज्ज्वल’

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'सत्य परमात्म्याची ओळख करून जेव्हा आपण निराकार प्रभूशी आपले नाते जोडतो तेव्हा सर्वत्र चैतन्य दिसू लागते. हीच आमची ओळख बनून जाते आणि अवघे जग विश्वबंधुत्वाच्या भावनेने ओतप्रोत दिसू लागते. सत्य परमात्म्याची ओळख व ज्ञानामुळे जीवनात उज्ज्वलता येते आणि जगाशी सद्व्यवहार करू लागतो,' असे मत सद्गुरू सुदिक्षा महाराज यांनी व्यक्त केले.

संत निरंकारी मंडळतर्फे हरियाणा येथील समालखा येथे ७२ व्या वार्षिक निरंकारी संत समागमचे आयोजन केले होते. तीन दिवसीय संत समागममध्ये देश, विदेशातून लाखो भाविकांनी सहभाग घेतला. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून सुमारे एक लाख भाविकांचा सहभाग होता. याप्रसंगी बोलताना सुदिक्षा महाराज म्हणाल्या, 'सुखदुखाच्या पलीकडे जाऊन सहज अवस्थेमध्ये आनंदमय जीवन जगण्याचे नाव भक्ती होय. सत्याचा बोध झाल्यानंतर ईश्वराची जाणीव ठेवून आपले प्रत्येक काम करू लागतो. मनामध्ये ईश्वराच्या प्रति कृतज्ञतेचा भाव बाळगतो.'

संत निरंकारी मिशनच्या ९० वर्षांच्या इतिहासावर प्रकाशझोत टाकताना सद्गुरू सुदिक्षा यांनी 'मिशनच्या प्रारंभी संदेशवाहकांनी भौतिक साधनांचा अभाव आणि विपरित परिस्थितीचा सामना करत मानवकल्याणासाठी संकल्प राहून आपले जीवन समर्पित केले.'असे नमूद केले. संत समागमच्या कार्यक्रमात शोभायात्रा काढण्यात आली. तसेच मुख्य निरंकारी प्रदर्शन, बाल प्रदर्शन, स्वास्थ प्रदर्शन लोकांच्या आकर्षणाचे ठरले. नागरिकांसाठी आरोग्य शिबिर भरविले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अडचणीत आलेला ‘सहकार’ वाचवा

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

गेल्या पाच वर्षांत केंद्र आणि राज्य सरकारकडून सहकार क्षेत्राकडे दुर्लक्ष झाल्याची भावना या क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. आता नव्याने सत्तारुढ झालेल्या महाविकास आघाडीकडून सहकारातील बँका, पतसंस्था, साखर कारखाने, दूध संघ, बाजार समित्यांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. अडचणीत आलेल्या सहकारी संस्थांना नवीन सरकार नक्कीच मदत करेल, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

धोरणांमध्ये लवचिकता आणा

गेली तीन वर्षे साखरेचे दर कोसळल्याने साखर उद्योग प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. महाविकास आघाडीचे नेते शरद पवार हे साखर उद्योगाचे जाणकार आहेत. कारखान्यांना कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी ते प्रयत्न करतील. कर्जांची पुनर्रचना करून कारखान्यांना सवलती देण्याची गरज आहे. गेल्या पाच वर्षांत कारखान्यांवर मोठी बंधने आणली गेली. त्यातून नुकसान झाले. या सरकारकडून धोरणात लवचिकता आणली जाईल, असा विश्वास वाटतो.

- नेताजी पाटील, कार्यकारी संचालक, मंडलिक कारखाना

दूध संघांमध्ये हस्तक्षेप नको

सहकारी दूध संघांत राजकीय हस्तक्षेप होऊ नये असे वाटते. गेल्या दोन वर्षांत दूध भुकटीचे दर उतरल्याने संघांचे मोठे आर्थिक नुकान झाले आहे. महायुती सरकारच्या काळातील यासंदर्भातील अनुदान थकले आहे. हे अनुदान लवकर मिळावे. दुभती जनावरे खरेदीसाठी विशेष घटकांना अनुदान दिले जाते. शिवाय, खुल्या गटातील घटकांना नाबार्डकडूनही अनुदान मिळते. पण ते पुरेसे ठरत नाही. दहा ते वीस गुंठे शेती असलेल्या शेतकऱ्यांना दुभती जनावरे खरेदीसाठी सरकारने अनुदान द्यावे.

- बाळासाहेब खाडे, संचालक गोकुळ

सहकारी बँकिंगला पाठबळ द्या

राष्ट्रीयिकृत बँकांपेक्षा सर्वसामान्य नागरिक आणि ग्राहकांचा सहकारी आणि नागरी बँकावर विश्वास आहे. तरीही सरकारकडून सहकारी बँकांना सापत्नभावाची वागणूक दिली जाते. राष्ट्रीय बँकांवर जसा सवलतीचा वर्षाव होतो, तशा सवलती सहकारी बँकांना मिळाल्या पाहिजेत. सहकारी बँका सर्व प्रकारचे कर भरतात. आयकर भरून सरकारला सहकार्य करीत असतात. पण, केंद्र आणि राज्य सरकाची सहकार बँकांविषयीची अढी कायम असून ती कमी करून बँकांना सवलती देण्यासाठी नवीन सरकारने पुढाकार घ्यावा.

- राजेंद्र डकरे, अध्यक्ष, कमर्शिअल बँक

बाजार समित्यांवर विश्वास ठेवा

शेतकऱ्याने उत्पादित केलेल्या सर्व शेती मालाला सरकारने हमीभाव ठरवून द्यावा. सध्या बाजार समित्यांवर मोठी बंधने आणली जात आहेत. बाजार समिती हा व्यापारी आणि शेतकरी यांच्यातील दुवा आहे. शेतकऱ्याला त्याच्या मालाची योग्य रक्कम मिळावी यासाठी बाजार समिती बांधील असते. त्यामुळे सरकारने बाजार समितीवर विश्वास दाखवून त्यांना मदत केली पाहिजे. सध्या केंद्र सरकारने ई नाम पद्धत सुरू केली आहे. पण त्यासाठी शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन करायला पाहिजे.

- मोहन सालपे, सचिव बाजार समिती

पतसंस्थांतील कर्जांकडेही पहा

राज्य सरकारकडून कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता असून या योजनेमध्ये पतसंस्थांतील कर्जांचाही समावेश व्हायला पाहिजे. पतसंस्थांत ठेवलेल्या एक लाख रुपयांवरील ठेवींवर विमा उतरवला पाहिजे. राज्य सरकारने ठेवीदारांना 'अ' वर्ग सभासद करण्याची अट घातली आहे. त्यामुळे ठेवीदार संस्थांकडे पाठ फिरवण्याची शक्यता आहे. सरकारने ही अट काढून टाकली पाहिजे. बंद पडलेल्या बँकामध्ये पतसंस्थांच्या अडकलेल्या ठेवी परत देण्यासाठी सरकारने पावले उचलली पाहिजेत.

- अनिल पाटील, कार्याध्यक्ष पतसंस्था फेडरेशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटा कल्चर क्लबतर्फे रविवारी सिझलर्स वर्कशॉप

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम महाराष्ट्र टाइम्सच्या कल्चर क्लब आणि हॉटेल केट्री यांच्यावतीने शेफस नॉलेज बँक ग्लोबल वर्ल्ड या उपक्रमांतर्गत रविवारी, ८ डिसेंबर रोजी सिझलर्स वर्कशॉपचे आयोजन केले आहे. शिवाजी पार्क येथील हॉटेल के ट्री येथे दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत हे वर्कशॉप होणार आहे. कोणत्याही हॉटेलच्या मेन्यूकार्डमध्ये सिझलर्सचा एक कॉलम असतो. या चवीची उत्सुकता खवय्यांना नक्कीच असते. अगदी घरच्या घरीही चविष्ट व विविध प्रकारचे सिझलर्स बनवण्याची संधी वर्कशॉपच्या निमित्ताने 'मटा'च्या वाचकांना मिळणार आहे. मेक्सिकॉनसोबत थाई, चायनीज, कॉन्टीनेंटल, इंडियन सिझलर्समध्ये विविध प्रकार आहेत. चटपटीत सिझलर्स लहान मुलांपासून मोठ्यांनाही आवडतात. यामध्ये भरपूर भाज्या, सॉस, भात, नूडल्सचा वापर केला असल्याने एकाच पदार्थातून शरीरात अनेक पदार्थ जातात. हा पदार्थ आरोग्यदायी असल्याने चव आणि आरोग्य हे दोन्ही गुण सिझलर्समध्ये आहेत. हॉटेलमधील शेफकडून सिझलर्सच्या कृती व टिप्स या कार्यशाळेत देण्यात येणार आहेत. या कार्यशाळेत व्हेज पेरीपेरी सिझलर्स, पनीर, व्हेज बार्बेक्यू, व्हेज स्पॅगेटी, व्हेज मेक्सीकॉन या प्रकारातील सिझलर्स शिकवण्यात येणार आहेत. कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी कविता कडेकर (९०११९६९०९९), सुहानी पिसे (९३७१४८५३७१) या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. सरोळे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. लता सरोळे यांची त्रिसदस्यीय समितीकडून चौकशी सुरू असताना त्यांनी वरिष्ठांना कल्पना न देता बाजारभोगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका आरोग्य सेविकेला परस्पर कार्यमुक्त केल्याची तक्रार प्रशासनाकडे आली.

दरम्यान सरोळे यांच्याविषयीच्या तक्रारी विचारात घेऊन जिल्हा परिषद प्रशासनाकडून त्यांची खातेनिहाय चौकशी करावी, तसेच नोकरीतून निलंबित करावे, असा प्रस्ताव आरोग्य विभागाकडे पाठविण्यात येणार आहे.

डॉ. सरोळे यांनी कार्यमुक्त केलेल्या आरोग्य सेविकेला मुंबई येथील आरोग्य सेवा संचालनालय कार्यालयात हजर होण्याचे आदेश दिले आहेत. वास्तविक संबंधित आरोग्य सेविका ही जिल्हा परिषदेची कर्मचारी आहे. मात्र त्यांना कार्यमुक्त करून अन्यत्र हजर होण्याचा निर्णय सरोळे यांना नाही. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. डॉ. सरोळे यांच्या चौकशीसाठी जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. फारुख देसाई यांची नियुक्ती केली आहे. देसाई हे बुधवारी (ता. ४) बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन या प्रकाराची चौकशी करून अहवाल देणार आहेत.

दरम्यान सरोळे यांनी एकाचवेळी दोन आस्थापनांतून पगार घेतल्याची तक्रार काँग्रेसचे कार्यकर्ते संजय पाटील यांनी प्रशासनाकडे केली आहे. त्यांनी माहिती अधिकार कायद्याखाली माहिती उपलब्ध करून हा प्रकार उघडकीस आणला. प्रशासनाने या तक्रारीच्या अनुषंगाने सरोळे यांची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवी शिवदास, मुख्य वित्त व लेखाधिकारी संजय राजमाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे यांची त्रिसदस्यीय समिती नेमली आहे.

सीईओंची अप्पर मुख्य

सचिवांसोबत चर्चा

जिल्हा परिषदेने यापूर्वी सरोळे यांच्यावर एकदा निलंबनाची कारवाई केली होती. त्यांनी मॅटमध्ये आव्हान देऊन कारवाईला स्थगिती मिळवली. सोमवारी सीईओ मित्तल यांनी अप्पर मुख्य सचिव व्यास यांना फोनवरून सगळ्या बाबींची माहिती दिली. दुसरीकडे आरोग्य विभागाकडून दोन दिवसांत खातेनिहाय चौकशीचा प्रस्ताव सीईओंमार्फत राज्याच्या आरोग्य विभागाकडे पाठविला जाणार असल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूजल पातळी ७१ सें.मी.ने वाढली

0
0

Satish.ghatage@timesgroup.com

Tweet:satishgMT

कोल्हापूर : महापूर, अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे यंदा पर्जन्यमानात ५० टक्के वाढ झाली असून जिल्ह्यातील भूजल पातळी ७१ सेंटीमीटरने वाढली आहे. जिल्ह्यात शाहूवाडी तालुक्यात सर्वाधिक भूजल पातळी एक मीटर ८ सें.मी.ने वाढली असून सर्वाधिक जास्त पर्जन्यमान असलेल्या गगनबावडा तालुक्यात सर्वात कमी २८ सें.मी. राहिली आहे.

कोल्हापूर भूवैज्ञानिक विभागाच्यावतीने प्रत्येक वर्षी जिल्ह्यातील पाणी पातळी, पाणी नमुण्यांची तपासणी केली जाते. वर्षातून जानेवारी, मार्च, मे आणि सप्टेंबर महिन्यात अशी चार वेळा सर्व तालुक्यांतील भूजळ पातळी तपासली जाते. त्यासाठी जिल्ह्यात ९९ विहिरी निश्चित केल्या आहेत. त्याचबरोबर या वर्षीपासून विभागाच्यावतीने जिल्ह्यातील १२०६ गावापैकी नवीन ८६५ विहिरीमधील पाणी पातळी तपासण्यात आली. एकूण ९६४ विहिरींमधून भूजल पातळी निश्चित करण्यात आली आहे. पाच वर्षांतील सरासरी स्थिर भूजल पातळी निश्चित करून पाणी पातळी काढली जाते.

यंदा जिल्ह्यात ५० टक्के जादा पाऊस झाला आहे. दरवर्षी सरासरी १७७२.३९ मि.मी. पाऊस पडतो. यंदा २६५४.४६ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे यंदा भूजल पाणी पातळी वाढण्याचा अंदाज बांधला होता. सप्टेंबर महिन्यात पाणी पातळी तपासली असता १२ तालुक्यांत सरासरी ०.७१ सेंटीमीटर म्हणजेच दोन फुटांपेक्षा जास्त पाणी पातळी वाढली आहे. मागील पाच वर्षांत सरासरी स्थिर पातळी दोन मीटर ६६ सेंटीमीटर इतकी होती. यंदा सप्टेंबर महिन्यात सरासरी पातळी एक मीटर, ९५ सेंटिमीटर मोजली गेली असल्याने भूजल पातळीत वाढ झाल्याचे स्पष्ट होते.

जिल्ह्याची भौगलिक रचना वेगवेगळी असल्याने प्रत्येक तालुक्यात पाणी पातळी वेगळी येते, असे भूवैज्ञानिकांनी सांगितले. कोल्हापूरचा डोंगराळ भाग हा बेसॉल्ट खडकांचा बनला असून या प्रदेशात पाणी साठवून ठेवण्याची क्षमता कमी असते. गगनबावडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत असूनही जमिनीची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता कमी आहे. परिणामी येथे सरासरी पाणीपातळी ०.२८ सें.मी. राहिली आहे. हातकणंगले, पन्हाळा, राधानगरी, शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील भूजल पातळी ८० सें.मी.च्या वर राहिली आहे. सप्टेंबर महिन्यानंतरही परतीचा पावसाने जिल्ह्याला झोडपले असून पाणी पातळी वाढली असली तरी त्यांची नोंद जानेवारीच्या पाहणीत होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोल्हापूर जिल्हा पाण्याच्यादृष्टीने समाधानी असल्याने राज्याच्या तुलनेत इथली पाणी पातळी कायम वाढलेली असते. पाण्याचा उपसा आणि वापर वाढल्यानंतर ही पातळी झपाट्याने उतरते, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. मोठ्या प्रमाणात जमीन लागवडी खाली येत असल्याने ऊस पीकांचे क्षेत्र वाढत असल्याने पाणी उपसा जास्त होत असल्याने मार्च ते मे महिन्यात पाणी पातळी कमालीची घटते.

सप्टेंबर महिन्यानंतर दरवर्षी कायम भूजल पातळीत वाढ होते. पण त्यानंतर मात्र जानेवारी ते मे महिन्यापर्यंत पाणी पातळी घटते. डोंगराळ भागातील पाणी उताराच्या दिशेने जाते. त्यामुळे उन्हाळ्यात डोंगराळ तालुक्यातील भागात पाणीटंचाई जाणवते.

ऋ.भि. गोसकी, वरिष्ठ भूवैज्ञानिक, कोल्हापूर विभाग

तालुकानिहाय भूजल पातळीची (मीटरमध्ये)

तालुका निरीक्षण विहिरी सरासरी पाणी पातळी वाढ

आजरा ०८ ०.७२

भूदरगड ११ ०.७४

चंदगड ११ ०.७७

गगनबावडा ०२ ०.२८

गडहिंग्लज ०८ ०.७२

हातकणंगले १२ ०.९६

कागल ०५ ०.४०

करवीर ०९ ०.४२

पन्हाळा १० ०.८३

राधानगरी ०८ ०.८१

शाहूवाडी ०५ १.०८

शिरोळ १० ०.९४

एकूण ९९ ०.७१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजार समितीत पदाधिकारी बदलाच्या हालचाली गतिमान

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शेती उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकारी बदलण्याच्या हालचाली वेगावल्या असून, मंगळवारी आमदार हसन मुश्रीफ, विनय कोरे, सतेज पाटील यांच्यात जिल्हा बँकेत बैठक झाली. बैठकीत पदाधिकारी बदलाबाबत चर्चा झाली असून, लवकरच नेत्यांकडून सभापती आणि उपसभापतींना राजीनामा देण्याचा आदेश होण्याची शक्यता आहे. रविवारी (ता.८) पुन्हा नेतेमंडळींमध्ये बैठक होणार असून, या बैठकीला अन्य पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण दिले जाणार आहे.

बाजार समितीवर राष्ट्रवादी, जनसुराज्य, शेतकरी कामगार पक्ष, सतेज पाटील, चंद्रदीप नरके गटाची सत्ता आहे. गेल्या साडेचार वर्षांत सर्व पक्षांनी सामंजस्याने पदाची वाटणी केली होती. विद्यमान सभापती बाबासाहेब लाड जनसुराज्यचे, तर उपसभापती राष्ट्रवादी गटाच्या आहेत. दोघांनाही प्रत्येकी दहा महिने पद देण्याचे निश्चित झाले होते. पण विधानसभा निवडणूक आणि त्यानंतर राज्यातील सत्तास्थापनेत जिल्ह्यातील नेतेमंडळी असल्याने सभापती आणि उपसभापतींच्या राजीनाम्याचा प्रश्न रेंगाळला होता. बाजार समितीतील नोकरभरतीनंतर राजीनामा देण्यात येईल, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतली होती. पण मुदत संपल्याने सभापती आणि उपसभापतींनी राजीनामा द्यावा, यासाठी अन्य सदस्यांकडून नेतेमंडळींकडे आग्रह सुरू होता.

पदाधिकारी निवडीबाबत मंगळवारी मुश्रीफ, कोरे आणि पाटील यांची जिल्हा बँकेत बैठक झाली. यावेळी नवीन पदाधिकारी निवडीवर एकमत झाले. पण बैठकीला माजी आमदार संपतराव पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील उपस्थित नसल्याने पदाधिकारी निवडीबाबत रविवारी बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, सभापती आणि उपसभापतींना राजीनामा देण्याची सूचना नेत्यांनी केल्याची चर्चा आहे, पण पदाधिकाऱ्यांनी अद्याप नेत्यांचा आदेश आला नसल्याचे सांगितले. दरम्यान, पदवाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार यावेळी सभापतिपद सतेज पाटील गटाला मिळणार असल्याने दशरथ माने आणि विलास साठे यांचे नाव आघाडीवर असून, माने यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यानंतर पुढील दहा दिवसांत नवीन पदाधिकारी निवडी होण्याची शक्यता आहे.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहकार खात्याला गोकुळकडून मतदार यादी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून (गोकुळ) सहकार विभागाला पंचवार्षिक निवडणुकीसाठी ३६५९ मतदारांची यादी देण्यात आली आहे. गोकुळची निवडणूक एप्रिल २०२० मध्ये होणार असून मतदानासाठी ठराव गोळा करण्यासाठी नेते, संचालकांकडून फिल्डिंग लावली जात आहे.

विद्यमान संचालक मंडळाची मुदत २३ एप्रिल, २०२० रोजी संपणार असून तत्पुर्वी नवीन संचालक मंडळ अस्तित्वात येणार आहे. त्यासाठी सहकार विभागाच्या निवडणूक प्राधिकरणाने निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. एप्रिल २०१७ पूर्वीची यादी ग्राह्य धरली जाणार असून ३६५९ मतदारांची यादी सहकार विभागाला देण्यात आली आहे. २०१४ मध्ये गोकुळची निवडणूक झाल्यानंतर २०१७ पर्यंत नवीन २०८ दूध संस्थांची नोंदणी झाली आहे. वाढीव सभासद नोंदणीवर जर विरोधकांनी आक्षेप घेतले त्यावर सुनावणी झाल्यानंतर पक्की यादी तयार होणार आहे. ही यादी तयार झाल्यानंतर दूध संस्थाकडून मतदानासाठी एक व्यक्तीच्या नावे ठराव होतो. हा ठराव दूध संस्थेतील संचालक अथवा गोकुळच्या संचालकांच्या नावेही केला जातो. त्यामुळे पुढील दोन महिने आपल्या बाजूच्या व्यक्तीचा ठराव व्हावा, यासाठी संचालक प्रयत्नशील आहेत.

सर्वात जास्त ६४२ मतदार करवीर तालुक्यातील असून त्या खालोखाल राधानगरी तालुक्यात ४५९ मतदार आहेत. करवीर आणि राधानगरी तालुक्यात सात संचालक आहेत. गोकुळमध्ये २१ संचालक असून १६ संचालक सर्वसाधारण गटातील आहेत. गोकुळचे नेतृत्व आमदार पी. एन. पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक करत असून गेल्यावेळच्या निवडणुकीप्रमाणे यावेळीही आमदार सतेज पाटील विरोधी पॅनेल उभारण्यासाठी जुळवाजुळव करत आहेत. त्यांना आमदार हसन मुश्रीफांची साथ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोट्रेटवर 'दळवीज'ची मोहर

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर एखाद्या व्यक्तीची चित्रकाराने हुबेहूब साकारलेली प्रतिमा म्हणजे व्यक्तीचित्रण होय. चित्रकलेच्या विविध माध्यमात व्यक्तीचित्रे रेखाटली जातात. जलरंग, तैलरंग, पेन्सिल अशी अनेकविध माध्यमे चित्रकारांना खुणावत असतात. येथील दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटमधील डिप्लोमाच्या एकाच वर्गातील दोन विद्यार्थ्यांचे पोट्रेट कौतुकास पात्र ठरली आहेत. एकाच्या चित्रकृतीला कर्नाटकातील रॉयल अॅकॅडमी ऑफ आर्ट अँड कल्चर संस्थेचे सुवर्णपदक जाहीर झाले तर दुसऱ्याला मुंबईतील संस्थेकडून दहा हजार रुपयांचे बक्षीस मिळाले. राज इंचनाळकर आणि वैभव पाटील यांच्या कलाकृती दोन वेगवेगळ्या व्यासपीठावर नावाजल्या गेल्या. हे दोघेही दळवीज आर्ट ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये चित्रकलेचे शिक्षण घेणारे. डिप्लोमाच्या अंतिम वर्षाचा अभ्यासक्रम शिकत आहेत. वैभव हा पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले पोर्ले येथील. व्यक्तीचित्रणाची त्याला आवड आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणच्या स्पर्धेत त्याच्या कलाकृती आकर्षण ठरल्या होत्या. भारतीय ग्रामीण पुनर्ररचना संस्थेच्या जे. के. अॅकॅडमी ऑफ आर्ट अँड डिझाइन वडाळा पूर्व मुंबईतर्फे चित्रोत्सवचे आयोजन केले होते. चित्रोत्सव अंतर्गत कला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष व्यक्तीचित्रण, छायाचित्रण व सुलेखनाची राज्यस्तरीय स्पर्धा भरवली. या स्पर्धेत वैभवने रेखाटलेले व्यक्तीचित्र पारितोषिकास पात्र ठरले. स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिकाचा मानकरी ठरलेल्या वैभवला दहा हजार रुपयांच्या रोख रकमेने गौरविले आहे. तर राज इंचनाळकर या विद्यार्थी चित्रकाराने, कर्नाटकातील कलबुर्गी येथील इंडियन रॉयल अॅकॅडमी ऑफ आर्ट अँड कल्चर या संस्थेने आयोजित केलेल्या स्पर्धेत त्याच्या कलाकृतीला सुवर्णपदक घोषित झाले. राज हा मुळचा कागल येथील असून इंडियन रॉयल अॅकॅडमीतर्फे आयोजित स्पर्धेत सहभाग घेतला होता. व्यक्तीचित्रे हा त्याचा आवडता विषय आहे. कारण व्यक्तीचित्रणात प्रयोगशीलतेला संधी आहे. यामुळे व्यक्तीचित्रे रेखाटणे मला आवडते, असे त्याने सांगितले.त्यांना, प्राचार्य अजेय दळवी, संजय गायकवाड, गिरीश उगळे, दीपक कांबळे, अभिजित कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


परीक्षा शुल्कमाफीसाठी कोटी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ४४९ पूरग्रस्त गावातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याच्या प्रक्रिया शिवाजी विद्यापीठाच्यावतीने अंतिम टप्प्यात आली आहे. महाविद्यालयांकडून पूरबाधित विद्यार्थ्यांची यादी मागवण्यात आली असून त्यानुसार ५० हजारांवर विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीचा लाभ होणार आहे. यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या स्वनिधीतून एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

ऑगस्टमध्ये आलेला महापुराचा फटका कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील अनेक गावांना बसला. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ३४५ गावे तर सांगली जिल्ह्यातील २३३ गावे पूरबाधित होती. सांगली जिल्ह्यातील १८ गावांना पुराचा वेढा पडला होता. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ३२ महाविद्यालयांमध्येही पाणी घुसले होते. महापुराच्या फटक्याने पूरग्रस्त गावातील विद्यार्थ्यांचे कौटुंबिक व शैक्षणिक नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठाच्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील अखत्यारित येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या तसेच विद्यापीठाच्या विविध अधिविभागातील पूरबाधित विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्याचे काम सप्टेंबरपासून हाती घेण्यात आले होते. याअंतर्गत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना पूरबाधित विद्यार्थ्यांचे तपशील देण्याचे आवाहन विद्यापीठातर्फे करण्यात आले होते.

दरम्यान, ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या विद्यापीठाच्या सत्रपरीक्षांची फी पूरबाधित विद्यार्थ्यांसाठी माफ करण्याचा निर्णय शिवाजी विद्यापीठातर्फे घेण्यात आला. हा विषय मॅनेजमेंट कौन्सिलच्या बैठकीत मांडून त्याला मंजुरी घेण्यात आली. प्राथमिक अहवालानुसार पूरबाधित विद्यार्थ्यांची संख्या ४० हजार असल्याचे निदर्शनास आले. मात्र महाविद्यालयांकडून पूरग्रस्त विद्यार्थ्यांबाबत येत असलेल्या माहितीनुसार पूरबाधित विद्यार्थ्यांचा आकडा ५० हजारांच्या घरात जाणार असल्याचे दिसून येत आहे. ऑक्टोबरमध्ये सुरू होत असलेल्या परीक्षेचा अर्ज भरण्याची तारीख उलटून जाऊ नये, यासाठी ज्या पूरग्रस्त विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क जमा केले आहे, त्या विद्यार्थ्यांना रकमेचा परतावा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय जाहीर होण्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी फीची रक्कम भरली आहे त्यांनाही या सवलतीचा लाभ मिळणार आहे. यासाठी विद्यापीठाच्या स्वनिधीतील एक कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

यावर्षी अतिवृष्टी व महापुरामुळे ज्या विद्यार्थ्यांचे कौटुंबिक व शैक्षणिक नुकसान झाले त्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय विद्यापीठातर्फे घेण्यात आला. या निर्णयानुसार पूरबाधित विद्यार्थ्यांची माहिती महाविद्यालयांकडून मागवण्यात आली आहे. माफ होणाऱ्या परीक्षा शुल्काची रक्कम एक कोटीपर्यंत जाण्याची शक्यता गृहीत धरून आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या; खासदार संभाजीराजे यांची मागणी

0
0

कोल्हापूर :मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान राज्यात विविध ठिकाणी आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख होऊ नये, यासाठी नामविस्तार करण्याची मागणीही संभाजीराजे यांनी केली आहे.

तसंच कोल्हापुरातील 'शिवाजी' विद्यापीठाचं नाव बदलून ते छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करण्याची मागणी खासदार संभाजीराजे यांनी या पत्राद्वारे केली आहे. सार्वजनिक स्थळांचा नामविस्तार आवश्यक असल्याचंही त्यांनी पत्रात नमूद केलं आहे. तसंच नावांमधील एकेरी उल्लेख टाळण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या आहेत. संभाजीराजे यांच्या ट्विटर अकाऊंटवर त्यांनी हे पत्र शेअर केलं आहे.

वाचा: शहाजीराजांचे स्मारक ११ वर्षांपासून रखडले

मराठा आरक्षणादरम्यान दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणीही संभाजीराजेंनी यावेळी केली. त्यांच्यासोबत आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार धनंजय मुंडे यांनी देखील मराठा आंदोलनादरम्यान आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची विनंती केली होती.

वाचा: रवीशंकर प्रसाद तातडीने माफी मागा : संभाजीराजे


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कोल्हापूर अर्बन’चेसुरेश चौगुले सीईओ

0
0

कोल्हापूर : दि कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी सुरेश महादेव चौगुले यांची नियुक्ती करण्यात आली. बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. चौगुले १९८४ मध्ये अर्बन बँकेत लिपिक म्हणून रुजू झाले. आजपर्यंतच्या ३५ वर्षाच्या सेवा कालावधीत त्यांनी कनिष्ठ अधिकारी, लेखा परिक्षक विभागप्रमुख, मुख्य लेखापाल, सरव्यवस्थापक या पदांवर काम केले आहे. यापूर्वी त्यांनी दोन

वर्षांहून अधिक काळ प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोंदणीकृत विक्रेते ११०, दुकाने ४००

0
0

Uddhav.Godase@timesgroup.com

Tweet@Uddhavg_MT

कोल्हापूर : कोल्हापुरी चप्पल निर्मिती व्यवसायाला अनेक संकटांनी घेरले आहे. यातील प्रमुख संकट बनावट चप्पल विक्रीचे आहे. राज्याबाहेरून येणाऱ्या निकृष्ट कोल्हापुरी चपलांची शहरात राजरोसपणे विक्री केली जाते. फुटवेअर असोसिएशनकडे केवळ ११० विक्रेत्यांची नोंद आहे. प्रत्यक्षात मात्र शहरात ४०० हून अधिक दुकाने थाटली आहेत. यामुळे शहरातील मूळच्या चप्पल विक्रेत्यांचा व्यवसाय धोक्यात आला आहे.

कोल्हापुरी चप्पल विक्रेत्यांची कोल्हापूर फुटवेअर असोसिएशन गेल्या ३० वर्षांपासून कार्यरत आहे. या असोसिएशनकडे ११० विक्रेत्यांची नोंद आहे. प्रत्यक्षात मात्र शहरात चारशेहून अधिक चप्पल विक्रीची दुकाने सुरू आहेत. बहुतांश दुकाने अंबाबाई मंदिर परिसर, चप्पल गल्ली, भवानी मंडप, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, मध्यवर्ती बसस्थानक, स्टेशन रोड या परिसरात आहेत. अलीकडच्या काळात बाहेरच्या विक्रेत्यांनी चप्पल विक्री व्यवसायात घुसखोरी केली आहे. बाहेरच्या राज्यातून येणा-या हलक्या दर्जाच्या चपलांची ते विक्री करतात. कोल्हापुरात येणारा पर्यटक हाच प्रामुख्याने कोल्हापुरी चपलांचा ग्राहक आहे. बहुतांश पर्यटक आणि भाविक हे सकाळच्या वेळेत शहरात येतात. याच दरम्यान विक्रेते मोक्याच्या ठिकाणी आपली दुकाने थाटतात. स्टेशन रोड आणि अंबाबाई मंदिर परिसरातील या दुकानांमध्ये चप्पल खरेदीसाठी मोठी गर्दी असते. सकाळी ११ पर्यंत यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. यानंतर हे अवैध विक्रेते निघून जातात. फुटपाथवरील या दुकानांमुळे शहरातील मूळ विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे.

अवैध दुकाने आणि फुटपाथवरील कोल्हापुरी चपलांच्या विक्रीमुळे बनावटगिरी वाढली आहे. बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या हलक्या दर्जाच्या चपला कमी किमतीत ग्राहकांच्या माथी मारल्या जातात. काही महिन्यातच चपलांच्या दर्जाची पोलखोल झाल्यानंतर ग्राहक चपला तयार करणाऱ्या व्यावसायिकांना दोष देतात. कोल्हापुरी चप्पल कोल्हापुरातच तयार होते, असा पर्यटकांचा समज आहे. प्रत्यक्षात परराज्यातील निकृष्ट चप्पल आपण खरेदी केल्याची कल्पनाही त्यांना नसते. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ग्राहकांच्या मनात कोल्हापुरी चप्पलबाबत गैरसमज निर्माण होतात. यातून कोल्हापुरी चपलांची बदनामी वाढत आहे. हे रोखण्यासाठी तातडीने शहरातील चप्पल विक्रीची अवैध दुकाने आणि फुटपाथवरील चप्पल विक्री थांबवणे अत्यावश्यक बनले आहे. यासाठी महानगरपालिकेसह फुटवेअर असोसिएशन आणि लिडकॉमलाही पुढाकार घ्यावा लागेल. चप्पल व्यावसायिकांच्या काही नेत्यांनी यामध्ये पुढाकार घेणे गरजेचे आहे.

शहरात कोल्हापुरी चपलांच्या निर्मितीत घट झाली असली तरी, परराज्यातून येणाऱ्या चपलांच्या विक्रीतून उलाढाल वाढली आहे. दरवर्षी या व्यवसायातून सुमारे दीडशे कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याचे विक्रेते सांगतात. या उलाढालीचा अपेक्षित फायदा मात्र स्थानिक व्यावसायिकांना आणि विक्रेत्यांना होत नाही. याउलट परराज्यातील व्यावसायिक आणि विक्रेते यातून मोठा लाभ उठवतात. कोल्हापुरी चप्पल व्यवसायातील तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठी अजूनही सरकारी योजना अपुऱ्या पडत आहेत. चप्पल निर्मितीचे भविष्य भक्कम असल्याची खात्री सरकारकडून व्यावसायिकांना मिळाल्यास तरुणांचा सहभाग वाढू शकतो. यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न वाढविण्याची गरज असल्याचे मत फूटवेअर असोसिएशने पदाधिकारी व्यक्त करतात.

चामड्याची कमतरता आहे. पुरेसे कारागीर मिळत नाहीत. यातच आता परराज्यातून येणाऱ्या चपलांशी स्पर्धा करावी लागत आहे. असोसिएशनकडे नोंद असलेल्या विक्रेत्यांपेक्षा चार पट अधिक अवैध विक्रेते वाढले आहेत. यामुळे शहरातील कोल्हापुरी चप्पल निर्मिती आणि विक्रीही धोक्यात आली आहे.

- शिवाजीराव देसाई, अध्यक्ष, कोल्हापूर फुटवेअर असोसिएशन

कच्चा माल आणि आर्थिक पाठबळ नसल्याने कोल्हापुरी चप्पल व्यवसाय अडचणीत सापडला आहे. व्यावसायिक अन्य पर्याय शोधत आहेत. ही स्थिती आणखी पाच-दहा वर्षे कायम राहिल्यास मूळ कोल्हापुरी चप्पलचा व्यवसाय बंद होण्याचा धोका आहे.

- बाळकृष्ण गवळी, चप्पल व्यावसायिक

११०

शहरातील नोंदणीकृत विक्रेते

४००

शहरातील अवैध विक्रेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक

0
0

Sachin.patil1@timesgroup.com

Tweet@sachinpMT

बदलती जीवनशैली, नोकरीपासून व्यवसायापर्यंत सर्वच स्तरावर जीवघेणी स्पर्धा यामुळे सर्वच वयोगटातील व्यक्तींना ताण-तणावांना सामोरे जावे लागते आहे. जिल्ह्यात मानसिक रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. गेल्यावर्षी सीपीआरच्या बाह्यरुग्ण विभागात १५ हजारांहून अधिक रुग्णांनी मानसिक आजाराबद्दल उपचार घेतले. ही संख्या कमी करण्यासाठी जिल्ह्यात मानसिक आरोग्य कार्यक्रम राबविची गरज आहे. आरोग्य विभागाने याकामी पुढाकार घेण्याची गरज आहे.

राज्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागातील जनतेसाठी मानसिक आरोग्यसेवा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम राबवण्यात येतो. मात्र, जिल्ह्यात अशा कार्यक्रमांच्या अंमलबजावणीला दिरंगाई होत आहे. यापाठीमागे आरोग्य विभागाची अनास्था कारणीभूत आहे. हा उपक्रम आरोग्य संचालनालयामार्फत असून त्यासाठी आवश्यक पदे मात्र जिल्हा शल्यचिकित्सकांनी भरावयाची आहेत.

याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक फारसे उत्सुक नसल्याने जिल्ह्याचे मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे. मध्यंतरी या उपक्रमांतर्गत पदासाठी जाहिरात प्रसिद्धी व मुलाखतीचा कार्यक्रम पार पडला. मात्र, यामधील मानसोपचार तज्ज्ञाच्या मुख्य पदासाठी तुटपुंज्या मानधनामुळे काम करायला मानसोपचार तज्ज्ञ तयार होत नाहीत.

इतर जिल्ह्यांत मानसोपचार तज्ज्ञाला ठराविक वेतन निश्चित करण्यात आले. मात्र, जिल्ह्यासाठी रुग्णानुसार मानधन देण्याची भूमिका घेण्यात आल्याने कार्यक्रम रखडला आहे. मानसोपचार तज्ज्ञाच्या मुख्य पदासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या नियमानुसार वेतन दिले जाणार असून हे वेतन एक रुग्ण तपासल्यास शंभर रुपये व रुग्ण अॅडमिट झाल्यास मानसोपचार तज्ज्ञाला एक हजार रुपये मिळणार आहेत.

मात्र अशा निकषांवर कोणीही तज्ज्ञ या पदासाठी काम करायला उत्सुक नाहीत. इतर काही जिल्ह्यात याच पदासाठी प्रतिमाह ठराविक वेतन दिले जाते. मात्र, कोल्हापूर जिल्ह्याला वेगळा न्याय कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यासाठी लागणारी उर्वरित सायकॅट्रिस्ट नर्स, डाटा एन्ट्री ऑपरेटर व इतर पदांना श्रेणीनुसार वेतन मिळणार आहे.

जिल्हा मानसिक आरोग्य उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील पीएससीच्या माध्यमातून मानसोपचार तज्ज्ञ व त्यांचे पथक आठवड्यातून तीन दिवस ग्रामीण भागात उपचार देणार आहेत. तर उर्वरित तीन दिवस हे पथक जिल्ह्याच्या ठिकाणी थांबणार आहे.

ग्रामीण भागात आशा सेविका व आरोग्य सेवकांच्या माध्यमातून घरपोच औषधे पोहोचवली जाणार आहेत. गंभीर रुग्ण आढळल्यास त्याला उपचारासाठी भरती करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांना त्याचा अधिक फायदा होणार आहे.

कोट

विशेषतः तरुणाई मानसिक आजारांना जास्त बळी पडत आहे. मानसिक आजारावर उपचार घेतले जात नाहीत. अलीकडे समुपदेशन करण्यावर भर दिला जातो. सरकारने मानसिक आरोग्याकडे गांभीर्याने पाहायला सुरुवात केली आहे. जिल्ह्यात मानसिक आरोग्य कार्यक्रमाची अंमलबजावणी झाल्यास त्याचा फायदा होईल.

- सायली बेंडके, समुपदेशक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फिरता फिरता वेचला प्लास्टिक कचरा

0
0

फोटो आहे

कोल्हापूर टाइम्स टीम

प्लास्टिक वापराचे दु:ष्परिणाम समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये त्याविषयी जाणीवजागृती होऊ लागली आहे. त्यातूनच पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी अनेकजण पुढे येऊ लागले आहेत. त्याचाच भाग म्हणून महावीर गार्डनमध्ये फिरायला येणारे मार्निंग ग्रुपचे सदस्य दररोज कचरा गोळा करुन डस्टबीनमध्ये टाकत आहेत.

महापालिकेच्यावतीने शहरात गेल्या काही महिन्यांपासून स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. मोहिमेमध्ये शहरवासीयांचा सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषत: प्लास्टिकमुक्तीसाठी नागरिकही पुढे येत आहेत. शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे वर्गीकरण करताना डस्टबीनची सुविधा दिली आहे. त्यामध्ये स्वत:च नागरिक कचरा टाकत आहेत. महावीर गार्डनमध्ये फिरायला येणारे नागरिक दररोज गार्डनमध्ये पडलेला प्लास्टिक कचरा गोळा करतात प्लास्टिक निर्मुलनाला हातभार लावण्यासाठी सर्व मंडळी प्रथम प्लास्टिक, कचरा एकत्र करून नंतर नेहमीप्रमाणे फिरायला सुरुवात करतात. वसुंधरेला प्लास्टिकमुक्त करण्याचा ध्यास घेत हे कार्यकर्ते नित्यनियमाने कचरा डस्टबीनमध्ये टाकत आहेत. यामध्ये शिरीष कुलकर्णी, गजानन पेडणेकर, मामा भुसारी, शाम कागले, डॉ किरण भिंगार्डे यांच्यासह अनेकजण सहभागी होत आहेत.

000

फिरता फिरता वेचला प्लास्टिक कचरा

महावीर गार्डनमधील मॉर्निंग वॉक ग्रुपचा उपक्रम

कोल्हापूर टाइम्स टीम

प्लास्टिक वापराचे दुष्परिणाम समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये सजगता निर्माण होऊ लागली आहे. यातूनच पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी अनेकजण पुढे येवू लागले आहेत. त्याचाच भाग म्हणून महावीर गार्डन येथे फिरायला येणारे मार्निंग ग्रुपचे सदस्य दररोज कचरा गोळा करुन डस्टबीनमध्ये टाकत आहेत.

महापालिकेच्यावतीने गेल्या काही महिन्यापासून स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. मोहिमेमध्ये शहरवासियांचा सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषत: प्लास्टिकमूक्तीसाठी नागरिकही पुढे येत आहेत. शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे वर्गीकरण करताना डस्टबीनची सुविधा दिली आहे. त्यामध्ये स्वत:च नागरिक कचरा टाकत आहेत. यामध्ये महावीर गार्डनमध्ये फिरायला येणारे नागरिक दररोज गार्डनमध्ये पडलेला प्लास्टिक कचरा गोळा करत आहेत. प्लास्टिक निर्मूलनाला हातभार लावण्यासाठी सर्व मंडळी प्रथम प्लास्टिक एकत्र करुन नंतर फिरायला सुरुवात करतात. वसुंधरेला प्लास्टिकमूक्त करण्याचा ध्यास घेत हे कार्यकर्ते नित्यनियमाने कचरा डस्टबीनमध्ये टाकत आहेत. यामध्ये शिरीष कुलकर्णी, गजानन पेडणेकर,मामा भुसारी, शाम कागले, डॉ किरण भिंगार्डे यांच्यासह अनेकजण सहभागी होत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पब्जीचे नको, वास्तववादी ध्येय बाळगा

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'मोबाइल गेम आणि पब्जी खेळ ही आभासी दुनिया आहे. त्याच्या आहारी गेल्यामुळे मानसिक, शारिरिक, सामाजिक समस्या निर्माण होतात. दैनंदिन जीवनातील समतोलपणा बिघडून वर्तणुकीत बदल घडतो. शिवाय अतिरेकी वापरामुळे मानसिक संतुलन हरवते. जो करिअरसाठी, अभ्यासासाठी मारक आहे. तेव्हा मुलांनो, पब्जीच्या फॅन्टसी दुनियेत रमू नका. मोबाइल गेम खेळण्यात वेळ वाया न घालविता वास्तववादी जीवनातील ध्येयपूर्तीसाठी जगा. आयुष्यात पब्जीचे ध्येय नको तर खरोखरच्या जीवनातील ध्येय निश्चित करा. आणि सामाजिक दूत म्हणून समाजापर्यंत हा संदेश पोहोचवा' अशा शब्दांत 'जुगाड' समुपदेशन संस्थेच्या प्रमुख डॉ. कल्याणी कुलकर्णी यांनी शालेय विद्यार्थ्यांना जाणीव जागृतीचा मंत्र दिला.

मोबाइल गेम, इंटरनेटचा अनावश्यक गोष्टीसाठी वापर, पब्जी खेळाच्या आहारी गेल्यामुळे निर्माण झालेली सामाजिक समस्या या साऱ्या पार्श्वभूमीवर पौगंडावस्थेतील मुलांमध्ये प्रबोधन आणि जाणीवजागृती करण्यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स', आणि जुगाड समुपदेशन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. न्यू एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्याने बुधवारी दुपारी हा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या समारोपाला राम गणेश गडकरी सभागृहात जमलेल्या शेकडो मुलांनी, 'मी मोबाइलवर गेम खेळण्यासाठी वेळ वाया घालवणार नाही' अशी शपथ घेताच संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या गजराने दुमदुमले. कार्यक्रमात न्यू हायस्कूल, विमला गोयंका इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

'जुगाड' संस्थेच्या प्रमुख डॉ. कल्याणी कुलकर्णी यांनी 'इंटरनेट अॅडिक्शन व पब्जी खेळाचा धोका' या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व्याख्यानादरम्यान स्लाइड शोचा वापर आणि थेट विद्यार्थ्यांमध्ये मिसळून संवाद साधण्याची शैलीमुळे कार्यक्रम खिळवून ठेवणारा ठरला. कुलकर्णी यांनी प्रारंभीच भावनिक असाक्षरतेमुळे अशा समस्या निर्माण होत असल्याचे नमूद केले. 'पब्जी खेळाची दुनिया ही आभासी आहे. त्यापासून वास्तव जीवनात काही मिळत नाही. त्या खेळातील बोनस पॉईंटचा व्यावहारिक जीवनात काही फायदा नाही' हे त्यांनी मुलांना पटवून दिले. इंटरनेटचे फायदे समजावून सांगितले. अॅडिशनविषयी बोलताना त्या म्हणाल्या, 'अपायकारक वस्तूंवर अवलंबून राहण्याची किंवा वागण्याची क्रिया म्हणजे व्यसनाधीनता होय. व्यसनाधिनतेमुळे मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक समस्या आकाराला येतात. विद्यार्थ्यांनी वेळीच सावध होऊन शैक्षणिक प्रवाहात अडथळे ठरू शकतील अशा गोष्टी बाजूला साराव्यात.' सुखदा आठले यांनी सूत्रसंचालन केले.

विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

समुपदेशनानंतर मुलांना मोबाइल गेमचे दुष्परिणाम, पब्जीच्या आहारी गेल्यामुळे आयुष्याचे कसे नुकसान होते हे लक्षात आले. समारोपावेळी मुलांना शपथ देण्यात आली. मुलांनी हात उंचावून 'मी माझा अमूल्य वेळ मोबाइलवर कोणताही गेम खेळण्यासाठी वाया घालवणार नाही. मी माझ्या मित्रमैत्रिणींना मोबाइल गेम खेळण्यापासून परावृत्त करेन. आणि या वेळेचा उपयोग माझ्या व देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी करेन' अशी शपथ घेतली.

नाटिकेतून जागृती

घरोघरी मोबाइलच्या आहारी गेलेल्या मुलांची समस्या निर्माण होत आहे. अनावश्यक गोष्टींसाठी इंटरनेटच्या वापरामुळे सामाजिक, मानसिक समस्या उद्भवत आहेत. कौटुंबिक स्वास्थ हरवत आहे. या समस्येवर आधारित नाटिकेने मुलांना जागृत केले. आई, वडील, दोन मुली अशा चौकोनी कुटुंबावर ही नाटिका बेतलेली. आई गृहिणी, वडील नोकरीनिमित्त बाहेरगावी, मोठी बहीण डॉक्टर आणि लाडाने वाढलेली छोटी बहीण ही मोबाइलच्या आहारी गेलेली. त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या, चिडचिडेपणा आणि कौटुंबिक स्वास्थ्यावर भाष्य करणारी नाटिका 'जुगाड'ने सादर केली. सुरेश खांडेकर यांनी लेखन केले आहे. गीता हसूरकर, डॉ. शैलजा कळेकर, सीमा कवठेकर आणि मंगल नियोगी यांनी वेगवेगळ्या भूमिका वठवल्या.

मोबाइल, गेमिंगच्या अतिरेकाचे दु:ष्परिणाम

- शारीरिक व मानसिक समस्यांचा आढळ

- दैनंदिन जीवनातील समतोलपणा बिघडतो

- एकाग्रता कमी होते, झोप लागत नाही

- डोळ्यापासून मेंदूपर्यंत आजार निर्माण होतात

- चिंता, ताणतणाव, चिडचिडेपणा, रागीटपणा वाढतो

- वर्तणुकीत बदल घडतो, क्रियाशीलता थांबते

'महाराष्ट्र टाइम्स' व 'जुगाड' संस्थेने वास्तववादी प्रश्नाचा विचार करुन मुलांमध्ये जाणीव जागृती निर्माण करण्याठी आयोजित हा स्त्युत्य कार्यक्रम आहे. मोबाइल गेममुळे मुलांचे होणारे नुकसान ही सार्वत्रिक समस्या बनली आहे. या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम मुलांमध्ये प्रबोधन करणारा आहे. प्रत्येक शाळेत असे कार्यक्रम झाले तर उगवत्या पिढीला नेमकी दिशा मिळेल. वेळेचा सदुपयोग कसा करावा याविषयी भान निर्माण होईल.

- प्रभाकर हेरवाडे, सचिव, न्यू एज्युकेशन सोसायटी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्लास्टिकमुक्तीने बनवले ४० हजार महिलांना सक्षम

0
0

लोगो : पृथ्वीरक्षक

Anuradha.kadam@timesgroup.com

Tweet@anuradhakadamMT

कोल्हापूर : पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या, जनावरांना घातक ठरणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापराला बंदी घालण्याच्या निर्णयाने एकप्रकारे महिला सक्षमीकरणाला चालना दिली. प्लास्टिक मुक्तीमुळे कापडी व कागदी पिशव्यांची वाढत्या मागणीतून जिल्ह्यातील महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार संधी निर्माण झाली आहे. आज जिल्ह्यातील विविध महिला संस्था, संघटना व बचतगटांतील सुमारे ४० हजार महिला कापडी, कागदी पिशव्या बनवण्याच्या कामातून सक्षम झाल्या असून यातून मोठी आर्थिक उलाढाल होत आहे.

दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर अतोनात वाढल्यामुळे वापरून झालेल्या पिशव्यांचे कचऱ्यातील प्रमाण वाढले होते. प्लास्टिक पिशवी नष्ट होत नसल्याने त्यातून पर्यावरणाला धोका निर्माण होत होता. प्लास्टिकपासून बनवलेल्या यूज अँड थ्रो ग्लास, कप, डीश, ताट यांचाही वापर गेल्या काही वर्षात वाढला होता. याचा एकत्रित परिणाम पर्यावरणाच्या प्रदूषणावर होत होता. प्लास्टिकमुक्तीसाठी सरकारी स्तरावरून प्रयत्न सुरू झाल्यानंतर दुकाने, मॉल्स येथून प्लास्टिकच्या पिशव्या व वस्तू हटवण्याची मोहीम राबवण्यात आली. प्लास्टिकच्या पिशव्यांसह अन्य वस्तूंच्या उत्पादनावरही बंदी घालण्यात आली. प्लास्टिकमुक्तीसाठी चळवळ उभी राहत असताना व्यापारी, व्यावसायिकांकडून कापडी व कागदी पिशव्या, फोल्डर्स, बॅगची मागणी वाढली. त्यातून महिलांसमोर रोजगाराचे नवे साधन उभे राहिले. गेल्या वर्षभरात कापडी, कागदी पिशव्या, कागदी फोल्डर्स, बॅग बनवण्याच्या उत्पादनक्षेत्रात ४० हजार महिलांचे आर्थिक सक्षमीकरण झाले आहे.

उडान फाउंडेशनच्यावतीने गेल्या दहा महिन्यांपासून प्रकल्प सुरू आहे. फाउंडेशनकडे सध्या १२०० महिला कापडी पिशव्या, कागदी बॅग बनवण्याचे काम करून देतात. यासाठी फाउंडेशनने काही व्यावसायिक, मॉल्सशी संपर्क साधून त्यांच्या मागणीनुसार काम गरजू महिलांना दिले आहे. कापड, दोरा हे साहित्य दिल्यानंतर महिलांनी केवळ पिशव्या शिवून द्यायच्या असल्याने गरजू महिलांना कमी भांडवलात दिवसाला ३०० ते ५०० रुपयांची कमाई होते. गरीबीमुळे आर्थिक लढाई करणाऱ्या महिलांना प्लास्टिकमुक्तीच्या निर्णयाने अर्थार्जनाचे साधन मिळाले आहे.

'अवनि'ची मोहीम

'अवनि' या संस्थेतर्फे कचरा वेचक महिलांचा बचतगट कार्यरत आहे. सकाळी कचरा वेचण्याचे काम झाल्यानंतर दिवसभर या महिला कापडी पिशव्यांचे उत्पादन करत आहेत. महिलांनी बनवलेल्या पिशव्या विकत घेण्यासाठी संस्थेने मेडिकल असोसिएशन, केमिस्ट असोसिएशन आदींशी संपर्क साधून एक आर्थिक प्रगतीचा मार्ग खुला केला आहे. सध्या अवनी संस्थेच्या १५० महिला कापडी पिशव्यांच्या उत्पादनातून प्लास्टिक मुक्तीतून पर्यावरण संदेशाला एक पर्यायी व्यवस्था उभी करत घरातील आर्थिक प्रश्नही सन्मानाने सोडवत आहेत.

'भागीरथी'चे प्रयत्न

भागीरथी महिला संस्थेच्या पाच हजारांहून अधिक महिलांनी कापडी पिशव्यांच्या उत्पादनाचे काम सुरू केले आहे. यामध्ये भाजीसाठी पॉकेट बॅग तसेच कागदी फोल्डर्स, ज्वेलरी बॅग शिवण्याचे काम जिल्ह्यातील महिला बचतगटाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उभे राहिले आहे. महिला बचतगटांची एक टीम पिशव्या शिवण्याचे तर दुसरी टीम पिशव्यांची गरज असलेल्या विविध क्षेत्रातील व्यावसायिकांना भेटून ऑर्डर्स मिळवण्याचे काम करते. स्वयंसिद्धा संस्थेच्या तीन हजारांहून अधिक महिला कापडी पिशव्यांचे विविध प्रकार बनवून आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्या आहेत. स्वयंसिद्धा संस्थेतर्फे भरवण्यात येणारी विविध प्रदर्शने, शॉपी तसेच एकमेकींच्या संपर्कातून पिशव्यांची मार्केंटिंग इंडस्ट्रीही स्वयंसिद्धा संस्थेने उभी केली आहे.

गरजेनुसार उत्पादनात महिलांची कल्पकता

प्लास्टिक पिशव्यांना पर्याय देत असताना महिलांनी कल्पकतेने विचार केल्याचे दिसून येत आहे. नोकरदार महिलांना त्यांच्या पर्समध्ये किंवा गाडीच्या डिकीत सहजपणे ठेवता येईल अशी हलक्या वजनाच्या कापडाची पिशवी तयार केली आहे. वेगवेगळ्या भाज्या पिशवीत एकत्र होऊ नयेत यासाठी पॉकेट पिशवीची तयार झाली आहे. बंद केली तर हातातील पाऊच आणि उघडल्यावर पिशवी अशा 'टू इन वन' बॅगची संकल्पनाही महिलांनी तयार केली आहे.

प्लास्टिकमुक्तीचा निर्णय झाला तेव्हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता तो यासाठीच्या पर्यायाचा. दुकाने, मॉल्स, शोरूम्समधून कापडी, कागदी पिशव्या, बॅगना मागणी वाढत होती. मागणीनुसार पुरवठा करताना महिलांना रोजगार देणारी संधी लक्षात घेऊन फाउंडेशनतर्फे महिलांसाठी ऑर्डर्स घेतल्या. महिलांनी शिवलेल्या पिशव्यांचे पैसे थेट त्यांनाच मिळतात.

- भूषण लाड, उडान फाउंडेशन

सध्या रेडिमेड कपड्यांना मागणी असल्याने शिवणकामातून फारशी कमाई होत नव्हती. शिलाई मशीन असूनही त्याचा उपयोग आर्थिक कमाईसाठी होत नव्हता. मात्र, गेल्या वर्षभरात कापडी पिशव्या शिवून मी महिन्याला १६ हजार रुपये मिळवते. यातून मी आर्थिक सक्षम झाले असून यातून पर्यावरणाच्या चळवळीत योगदान दिल्याचेही समाधान आहे.

- कविता शिखरे, सहभागी महिला

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनापरवाना लॉजना अभय

0
0

Maruti.Patil

@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर : शहरात येणाऱ्या पर्यटकांच्या निवासाची सोय करून उदरनिर्वाह करण्यासाठी गल्लीबोळात लॉज व यात्री निवासांची उभारणी करण्यात आली. पण यातील १७२ लॉज विनापरवाना असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये केवळ अंबाबाई मंदिर परिसरात २९ लॉजचा समावेश आहे. परवाना नसल्याने एकीकडे महापालिकेला आर्थिक फटका बसत असतानाच परवाना आणि विनापरवाना लॉजमध्ये पार्किंगची सुविधा नसल्याने वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. तसेच विनापरवाना लॉज गैरप्रकारांना उत्तेजन देत असल्याचे धक्कादायक प्रकार घडत आहेत.

शहरात कोणत्याही प्रकारची इमारतीचे बांधकाम करताना महापालिकेच्या नगररचना विभागाचा (टीपी) परवाना आणि त्यानंतर बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र दिले जाते. प्रमाणपत्र देताना पार्किंगसाठी आवश्यक जागा सोडली आहे का? याची पाहणी केली जाते. त्याचबरोबर शहरात कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करताना महापालिकेच्या परवाना विभागाचा परवाना घेणे आणि दरवर्षी नुतनीकरण करणे बंधनकारक आहे. पण दोन्ही विभागामध्ये समन्वय नसल्याने विनापरवाना लॉजची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. अशा लॉजची स्वतंत्र पार्किंग व्यवस्था नसल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

अंबाबाई मंदिर पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन येथील गल्लीबोळात अनेक लॉज व यात्री निवासांचे पेव फुटले आहे. यापैकी अनेक लॉज आणि यात्री निवासांचा परवाना नाही. व्यवसायाचा परवाना नसल्याने एकीकडे महापालिकेच्या उत्पन्न बुडत असतानाच परवाना आणि विनापरवानाधारकांनी पार्किंगची कोणतीही व्यवस्था केलेली नाही. परवानाधारकांनी प्रथम स्वत:चे पार्किंग दाखवले पण सद्य:स्थितीत अशा ठिकाणी हॉटेल, मेडिकल व अन्य प्रकारचे व्यवसाय सुरू केले आहेत. तर ज्यांचे पार्किंग नाही, त्यांना महापालिका ठराविक शुल्क आकारत आहे. पर्यटकांना वाहने लावण्यास जागा उपलब्ध नसल्याने त्यांची सर्व वाहने रस्त्यावर उभी केली जातात. महाद्वार, गुजरी, ताराबाई रोड या व्यापारपेठा, अतिक्रमणधारकांचा रस्त्यावरील ठिय्या आणि अरुंद रस्त्यामुळे या परिसरातील वाहतूक कोंडीचा दररोज बोजवारा उडत आहे. त्याचा त्रास मात्र शहरवासियांना सोसावा लागत आहे. त्याचबरोबर या लॉजमधून पर्यटन हंगामाव्यतिरिक्त गैरप्रकाराला उत्तेजन मिळत आहे. अशा घटनांना अटकाव करण्यासाठी महापालिकेसह पोलिस प्रशासनाने एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे.

गैरप्रकारला खतपाणी

पर्यटन हंगामात शहरातील बुहतांशी लॉज हाऊसफुल्ल असतात. पण ज्यावेळी पर्यटकांची संख्या रोडवलेली असते. अशावेळी या लॉजमध्ये गैरप्रकार घडत असल्याचा आरोप होत आहे. अनेक अल्पवयीन मुले-मुली या परिसरात घुटमळत असतात. त्याचा त्रास स्थानिक रहिवाशांना होतो. असे गैरप्रकारांना अटकाव करण्यासाठी प्रथम विनापरवाना लॉजचा शोध घेऊन महापालिका आणि पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई केली पाहिजे. अन्यथा यातून गंभीर घटना घडण्याची भीती स्थानिक रहिवाशी व्यक्त करत आहेत.

अंबाबाई मंदिर परिसरात तब्बल २९ विनापरवाना लॉज आहेत. परवाना आणि पार्किंग नसलेल्या लॉजची तपासणी करून कारवाई करण्याची अनेकवेळा मागणी केली. पण प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. सर्व लॉजना परवाना बंधनकारक केल्यानंतर महापालिकेच्या उत्पन्नातही वाढ होईल.

अजित ठाणेकर, नगरसेवक

जुन्या शहरात यात्री निवास किंवा लॉजला परवाना देताना नऊ मीटर रस्त्याची अट लागू होते. पार्किंग नसलेल्या लॉज चालवकांवर कारवाई केली आहे. काहीजणांना नोटिसा पाठवल्या आहेत.

राम काटकर, परवाना अधीक्षक

४००

शहरातील लॉज

२२८

नोंदणीकृत लॉज

१७२

विनापरवाना लॉज

२९

मंदिर परिसरातील विनापरवाना लॉज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अडचणीत आलेला ‘सहकार’ वाचवा

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

गेल्या पाच वर्षांत केंद्र आणि राज्य सरकारकडून सहकार क्षेत्राकडे दुर्लक्ष झाल्याची भावना या क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. आता नव्याने सत्तारुढ झालेल्या महाविकास आघाडीकडून सहकारातील बँका, पतसंस्था, साखर कारखाने, दूध संघ, बाजार समित्यांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. अडचणीत आलेल्या सहकारी संस्थांना नवीन सरकार नक्कीच मदत करेल, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

धोरणांमध्ये लवचिकता आणा

गेली तीन वर्षे साखरेचे दर कोसळल्याने साखर उद्योग प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. महाविकास आघाडीचे नेते शरद पवार हे साखर उद्योगाचे जाणकार आहेत. कारखान्यांना कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी ते प्रयत्न करतील. कर्जांची पुनर्रचना करून कारखान्यांना सवलती देण्याची गरज आहे. गेल्या पाच वर्षांत कारखान्यांवर मोठी बंधने आणली गेली. त्यातून नुकसान झाले. या सरकारकडून धोरणात लवचिकता आणली जाईल, असा विश्वास वाटतो.

- नेताजी पाटील, कार्यकारी संचालक, मंडलिक कारखाना

दूध संघांमध्ये हस्तक्षेप नको

सहकारी दूध संघांत राजकीय हस्तक्षेप होऊ नये असे वाटते. गेल्या दोन वर्षांत दूध भुकटीचे दर उतरल्याने संघांचे मोठे आर्थिक नुकान झाले आहे. महायुती सरकारच्या काळातील यासंदर्भातील अनुदान थकले आहे. हे अनुदान लवकर मिळावे. दुभती जनावरे खरेदीसाठी विशेष घटकांना अनुदान दिले जाते. शिवाय, खुल्या गटातील घटकांना नाबार्डकडूनही अनुदान मिळते. पण ते पुरेसे ठरत नाही. दहा ते वीस गुंठे शेती असलेल्या शेतकऱ्यांना दुभती जनावरे खरेदीसाठी सरकारने अनुदान द्यावे.

- बाळासाहेब खाडे, संचालक गोकुळ

सहकारी बँकिंगला पाठबळ द्या

राष्ट्रीयिकृत बँकांपेक्षा सर्वसामान्य नागरिक आणि ग्राहकांचा सहकारी आणि नागरी बँकावर विश्वास आहे. तरीही सरकारकडून सहकारी बँकांना सापत्नभावाची वागणूक दिली जाते. राष्ट्रीय बँकांवर जसा सवलतीचा वर्षाव होतो, तशा सवलती सहकारी बँकांना मिळाल्या पाहिजेत. सहकारी बँका सर्व प्रकारचे कर भरतात. आयकर भरून सरकारला सहकार्य करीत असतात. पण, केंद्र आणि राज्य सरकाची सहकार बँकांविषयीची अढी कायम असून ती कमी करून बँकांना सवलती देण्यासाठी नवीन सरकारने पुढाकार घ्यावा.

- राजेंद्र डकरे, अध्यक्ष, कमर्शिअल बँक

बाजार समित्यांवर विश्वास ठेवा

शेतकऱ्याने उत्पादित केलेल्या सर्व शेती मालाला सरकारने हमीभाव ठरवून द्यावा. सध्या बाजार समित्यांवर मोठी बंधने आणली जात आहेत. बाजार समिती हा व्यापारी आणि शेतकरी यांच्यातील दुवा आहे. शेतकऱ्याला त्याच्या मालाची योग्य रक्कम मिळावी यासाठी बाजार समिती बांधील असते. त्यामुळे सरकारने बाजार समितीवर विश्वास दाखवून त्यांना मदत केली पाहिजे. सध्या केंद्र सरकारने ई नाम पद्धत सुरू केली आहे. पण त्यासाठी शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन करायला पाहिजे.

- मोहन सालपे, सचिव बाजार समिती

पतसंस्थांतील कर्जांकडेही पहा

राज्य सरकारकडून कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता असून या योजनेमध्ये पतसंस्थांतील कर्जांचाही समावेश व्हायला पाहिजे. पतसंस्थांत ठेवलेल्या एक लाख रुपयांवरील ठेवींवर विमा उतरवला पाहिजे. राज्य सरकारने ठेवीदारांना 'अ' वर्ग सभासद करण्याची अट घातली आहे. त्यामुळे ठेवीदार संस्थांकडे पाठ फिरवण्याची शक्यता आहे. सरकारने ही अट काढून टाकली पाहिजे. बंद पडलेल्या बँकामध्ये पतसंस्थांच्या अडकलेल्या ठेवी परत देण्यासाठी सरकारने पावले उचलली पाहिजेत.

- अनिल पाटील, कार्याध्यक्ष पतसंस्था फेडरेशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोट्रेटवर 'दळवीज'ची मोहर

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर एखाद्या व्यक्तीची चित्रकाराने हुबेहूब साकारलेली प्रतिमा म्हणजे व्यक्तीचित्रण होय. चित्रकलेच्या विविध माध्यमात व्यक्तीचित्रे रेखाटली जातात. जलरंग, तैलरंग, पेन्सिल अशी अनेकविध माध्यमे चित्रकारांना खुणावत असतात. येथील दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटमधील डिप्लोमाच्या एकाच वर्गातील दोन विद्यार्थ्यांचे पोट्रेट कौतुकास पात्र ठरली आहेत. एकाच्या चित्रकृतीला कर्नाटकातील रॉयल अॅकॅडमी ऑफ आर्ट अँड कल्चर संस्थेचे सुवर्णपदक जाहीर झाले तर दुसऱ्याला मुंबईतील संस्थेकडून दहा हजार रुपयांचे बक्षीस मिळाले. राज इंचनाळकर आणि वैभव पाटील यांच्या कलाकृती दोन वेगवेगळ्या व्यासपीठावर नावाजल्या गेल्या. हे दोघेही दळवीज आर्ट ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये चित्रकलेचे शिक्षण घेणारे. डिप्लोमाच्या अंतिम वर्षाचा अभ्यासक्रम शिकत आहेत. वैभव हा पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले पोर्ले येथील. व्यक्तीचित्रणाची त्याला आवड आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणच्या स्पर्धेत त्याच्या कलाकृती आकर्षण ठरल्या होत्या. भारतीय ग्रामीण पुनर्ररचना संस्थेच्या जे. के. अॅकॅडमी ऑफ आर्ट अँड डिझाइन वडाळा पूर्व मुंबईतर्फे चित्रोत्सवचे आयोजन केले होते. चित्रोत्सव अंतर्गत कला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष व्यक्तीचित्रण, छायाचित्रण व सुलेखनाची राज्यस्तरीय स्पर्धा भरवली. या स्पर्धेत वैभवने रेखाटलेले व्यक्तीचित्र पारितोषिकास पात्र ठरले. स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिकाचा मानकरी ठरलेल्या वैभवला दहा हजार रुपयांच्या रोख रकमेने गौरविले आहे. तर राज इंचनाळकर या विद्यार्थी चित्रकाराने, कर्नाटकातील कलबुर्गी येथील इंडियन रॉयल अॅकॅडमी ऑफ आर्ट अँड कल्चर या संस्थेने आयोजित केलेल्या स्पर्धेत त्याच्या कलाकृतीला सुवर्णपदक घोषित झाले. राज हा मुळचा कागल येथील असून इंडियन रॉयल अॅकॅडमीतर्फे आयोजित स्पर्धेत सहभाग घेतला होता. व्यक्तीचित्रे हा त्याचा आवडता विषय आहे. कारण व्यक्तीचित्रणात प्रयोगशीलतेला संधी आहे. यामुळे व्यक्तीचित्रे रेखाटणे मला आवडते, असे त्याने सांगितले.त्यांना, प्राचार्य अजेय दळवी, संजय गायकवाड, गिरीश उगळे, दीपक कांबळे, अभिजित कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटा कल्चर क्लबतर्फे रविवारी सिझलर्स वर्कशॉप

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम महाराष्ट्र टाइम्सच्या कल्चर क्लब आणि हॉटेल केट्री यांच्यावतीने शेफस नॉलेज बँक ग्लोबल वर्ल्ड या उपक्रमांतर्गत रविवारी, ८ डिसेंबर रोजी सिझलर्स वर्कशॉपचे आयोजन केले आहे. शिवाजी पार्क येथील हॉटेल के ट्री येथे दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत हे वर्कशॉप होणार आहे. कोणत्याही हॉटेलच्या मेन्यूकार्डमध्ये सिझलर्सचा एक कॉलम असतो. या चवीची उत्सुकता खवय्यांना नक्कीच असते. अगदी घरच्या घरीही चविष्ट व विविध प्रकारचे सिझलर्स बनवण्याची संधी वर्कशॉपच्या निमित्ताने 'मटा'च्या वाचकांना मिळणार आहे. मेक्सिकॉनसोबत थाई, चायनीज, कॉन्टीनेंटल, इंडियन सिझलर्समध्ये विविध प्रकार आहेत. चटपटीत सिझलर्स लहान मुलांपासून मोठ्यांनाही आवडतात. यामध्ये भरपूर भाज्या, सॉस, भात, नूडल्सचा वापर केला असल्याने एकाच पदार्थातून शरीरात अनेक पदार्थ जातात. हा पदार्थ आरोग्यदायी असल्याने चव आणि आरोग्य हे दोन्ही गुण सिझलर्समध्ये आहेत. हॉटेलमधील शेफकडून सिझलर्सच्या कृती व टिप्स या कार्यशाळेत देण्यात येणार आहेत. या कार्यशाळेत व्हेज पेरीपेरी सिझलर्स, पनीर, व्हेज बार्बेक्यू, व्हेज स्पॅगेटी, व्हेज मेक्सीकॉन या प्रकारातील सिझलर्स शिकवण्यात येणार आहेत. कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी कविता कडेकर (९०११९६९०९९), सुहानी पिसे (९३७१४८५३७१) या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images