Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

विचित्र अपघात; ७० फुटावरून कोसळूनही तरुणी बचावली!

0
0

करवीर: उजळाईवाडी येथील उड्डाणपूलावरून उलट्या दिशेने शाहू नाक्याकडे जाणाऱ्या दुचाकीला चारचाकी गाडीने समोरासमोर जोरदार धडक दिली. या विचित्र अपघातात दुचाकीच्या पाठीमागे बसलेली तरुणी उड्डाणपूलावरून ६० ते ७० फूट खाली कोसळली. मात्र दैव बलवत्तर म्हणून एवढ्या उंचावरून कोसळूनही ही तरुणी वाचली. या अपघातात तिच्याबरोबर तिच्या भावालाही प्रचंड मार लागला असून दोघांवरही सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.

उजळाईवाडी येथील महालक्ष्मी नगर येथे कोकणातील नर्सिंग कॉलेजच्या मुलींचे वसतिगृह आहे. या वसतिगृहात राहणारी वृषाली प्रकाश गावकर ही तरुणी आई आजारी असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिरवडे येथे जायला निघाली होती. तिच्यासोबत तिचा भाऊ महेशही होता. हे दोघेजण दुचाकीवरून महालक्ष्मी नगरच्या समोरच्या बाजूला असलेल्या उड्डाणपूलावरून उलट्या दिशेने सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शाहू नाक्याकडे जात होते. अचानक शाहू नाक्याकडून आलेल्या चारचाकी वाहनाची दुचाकीला उड्डाणपूलावर जोराची समोरासमोर धडक बसली. यामध्ये दुचाकीच्या पाठीमागे बसलेली युवती उड्डाणपूलावरून ६० ते ७० फूट उंच असलेल्या उड्डाणपूलावरून खाली कोसळली. उड्डाणपुलाखाली मोठ्याप्रमाणावर झाड झुडपं असल्याने दैव बलवंतर म्हणून ती एवढ्या उंचीवरून पडूनही वाचली. या अपघातात तिच्या हातापायाला मुका मार लागला असून तिचा भाऊ महेश याच्या डोक्याला, पायाला मार लागला आहे. या दोघांनाही सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हिरवा वाटाणा, उडीद डाळ महागली

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

डाळी, कडधान्याच्या दराने शंभरी गाठली असताना हिरवा वाटाणा आणि उडीद डाळीच्या दरातही वाढ झाली. हिरवा वाटाण्याच्या दरात दोन ते चार रुपयांनी तर उडीद डाळीच्या दरात चार ते आठ रुपयांनी वाढ झाली. तूरडाळीच्या दरात मात्र चढ-उतार सुरू आहे.

महापूर, अतिवृष्टी आणि परतीचा पाऊस यामुळे डाळी आणि कडधान्याचे उत्पादन कमी होणार असल्याने शेतकऱ्यांकडे शिल्लक असलेल्या धान्य, कडधान्याला बाजारात मोठी मागणी आहे. मागणी जास्त आणि आवक कमी असल्याने दर वाढू लागले आहेत. हिरव्या वाटाण्याचा दर गेल्या आठवड्यात प्रतिकिलो १०० रुपये होता. या आठवड्यात यात दोन ते चार रुपयांची वाढ झाली आहे. मंडयांमध्ये मटारचे आगमन झाल्याने दरवाढीची झळ ग्राहकांना पोहोचणार नाही असे दुकानदारांचे मत आहे. काळ्या वटाण्याच्या दरात वाढ झाली असून दर्जेदार ब्लॅक डायमंड जातीचा वाटाणा प्रतिकिलो १०० रुपये झाला आहे. तूरडाळीच्या दरात चढ-उतार होत आहेत. गेल्या आठवड्यात प्रतिकिलो १०० रुपये असलेल्या तूरडाळीच्या दरात चार रुपयांची घसरण झाली. सध्या तूरडाळीचा दर ९२ ते ९६ रुपये असा आहे.

उडीद डाळीच्या दरातही सातत्याने वाढ होत असून प्रतिकिलो १२० रुपये असलेल्या या डाळीचा दर प्रतिकिलो १२२ ते १२८ रुपयांपर्यंत पोचला आहे. मूगडाळ, छोले, यांचे दर प्रतिकिलो १०० रुपयावर स्थिर आहे.

किराणामालाचे दर (प्रतिकलो रुपयांत)

पोहे : ४४

साखर : ३८

शेंगदाणा : १२०

मैदा : ३२

आटा : ३२

रवा : ३२

गूळ : ५०

साबुदाणा : ८४

वरी : ९२

डाळींचे दर (प्रतिकिलो रु.)

तूरडाळ : ९२ ते ९६

मूगडाळ :,१००

उडीद डाळ : १२२ ते १२८

हरभरा डाळ : ६८

मसूर डाळ : ६४

मसूर : ८० ते १४०

चवळी : ८०

हिरवा वाटाणा : १०२ ते १०४

काळा वाटाणा :८० ते १००

मूग ९२

मटकी : १२०

छोले : १००

धान्याचे दर (प्रतिकिलो रु.)

बार्शी शाळू : ४० ते ५२

गहू : २८ ते ३६

हायब्रीड ज्वारी : ३० ते ३८

बाजरी : ३२

नाचणी : ३६

तेलाचे दर (प्रतिकलो रु.)

शेंगतेल : १३५

सरकी तेल : ९२

खोबरेल : २४०

सूर्यफूल : ९० ते १०५

मसाले दर (प्रतिकलो रु.)

तीळ : १८०

जिरे : २८०

खसखस : १४००

खोबरे : १८०

वेलदोडे : ५०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गोकुळ’च्यावतीने कुरियन यांना अभिवादन

0
0

कोल्हापूर

श्वेतक्रांतीचे जनक दिवंगत डॉ. वर्गीस कुरियन यांच्या जयंतीनिमित्त त्यांना 'गोकुळ'तर्फे अभिवादन करण्यात आले. अध्यक्ष रविंद्र आपटे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 'कुरियन यांनी नेहमीच सहकारातील संस्था मजबुतीकरणावर भर दिला. संस्थेचा आर्थिक पाया भक्कम असल्याशिवाय दूध उत्पादकांना जास्त लाभ न देता येणे शक्य नाही, यासाठी त्यांनी नेहमीच 'गोकुळ'सारख्या संस्थांना मार्गदर्शन केले. त्यांच्या विचाराने चाललेल्या गोकुळची आर्थिक परिस्थिती नेहमीच भक्कम राहिली आहे. डॉ. कुरियन यांचा ग्रामीण दूध उत्पादक शेतकऱ्यांवर प्रचंड विश्वास होता. दूध उत्पादक शेतकरी कधीही कर्ज बुडवणारा नाही याची त्यांना खात्री होती', असे गौरवोद्गार आपटे यांनी यावेळी काढले.

कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, बोर्ड सेक्रेटरी एस. एम. पाटील, व्यवस्थापक डी. के. पाटील, जनसंपर्क अधिकारी संजय दिंडे, आदी यावेळी उपस्थित होते.

...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हत्तींना रोखणार मधमाशा

0
0

udaysing.patil@timesgroup.com

udaysingpatilMT

आजरा, चंदगड तालुक्यात येणाऱ्या जंगली हत्तींना रोखण्यासाठी केलेल्या फटाके, विद्युतभारित तारांचे संरक्षण, मिरचीचा धूर, खंदक खोदण्याच्या प्रयत्नानंतर आता वनविभागाकडून मधमाश्यांचा अवलंब करण्याचे ठरवले आहे. मधमाश्यांच्या आवाजाला हत्ती घाबरत असल्याचे विविध ठिकाणचे दाखले वनविभागाने तपासले असल्याने हत्ती ज्या मार्गावरुन ये-जा करतात, त्या परिसरात काही अंतरावर मधमाश्यांच्या पेट्यांचे कुंपण उभारण्याचे नियोजन केले जात आहे. पहिल्या टप्प्यात आजरा तालुक्यातील हाळोली गावात ४०० मीटरचे कुंपण उभारण्याचा प्रयोग करण्यात येणार आहे. तसेच चंदगडमधील हत्तीच्या मार्गावर मधमाशांचे रेकॉर्ड केलेले आवाज स्पीकरवरुन सुरू ठेवण्याचाही प्रयोग केला जात आहे.

चंदगड, आजरा, गडहिंग्लज या जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरील तालुक्यांमध्ये बऱ्याच वर्षांपासून हत्ती वस्तीमध्ये घुसण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यातून शेतीची अपरिमीत हानी तर होतेच शिवाय जीवितहानीही होत आहे. याबाबत उपाययोजना करण्यासाठी सातत्याने राज्य सरकार तसेच केंद्र सरकारकडे मागणी केली जात आहे. आतापर्यंत वन विभागाकडून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार विविध उपाययोजना राबवण्यात आल्या. अगदी प्रशिक्षित हत्तींद्वारे जंगली हत्तींना बाहेर काढण्याचे नियोजनही केले होते. पण मर्यादांमुळे ते प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. त्यानंतरही सातत्याने हत्तींचे आगमन व त्यांच्याकडून नुकसानसत्र सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर वन विभागाने परदेशात तसेच देशातही काही ठिकाणी केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. त्यामध्ये मधमाशा असलेल्या झाडांजवळ हत्ती फिरकत नाहीत तसेच मधमाशांचा आवाज ऐकू आल्यास त्या ठिकाणाहून दूर जातात, असे दिसून आले. केनियातील काही उदाहरणे तसेच तमिळनाडू, केरळ, उत्तरांचल, कर्नाटक, झारखंड आदी राज्यांमधील काही गावांमध्ये हा मधमाश्यांच्या कुंपणाचा प्रयोग यशस्वी करण्यात आल्याचे वनविभागाला समजले. तसेच कर्नाटकातील दांडेली अभयारण्याजवळ काही गावांनी हा प्रयोग करुन हत्तींना शेतापासून दूर ठेवण्यात आल्याचे समजले.

त्यानंतर आजरा व चंदगड येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी विविध माध्यमातून माहिती घेतली. तसेच मध संचालनालयाकडून मधमाश्यांच्या पेट्या कशा ठेवता येऊ शकतात, त्यांची निगराणी कशी राखली जाते, याची माहितीही घेतली. त्यानंतर मधमाश्यांच्या पेट्यांचे कुंपण उभारण्याचे ठरवण्यात आले आहे. हाळोली हे गाव आजरा तालुक्यात असून येथून येथे सतत हत्तींची ये-जा असते. त्या परिसरातील हत्तींचा मार्ग लक्षात ठेवून चारशे मीटरच्या अंतरावर हे कुंपण उभे केले जात आहे. एखादा धक्का बसल्यास त्या पेट्यांचे दरवाजे कसे एकदम उघडले जातील याचे नियोजन केले जात आहे. प्रत्येक शंभर मीटर अंतरावर किमान दोन ते तीन पेट्या बसवल्या जाऊ शकतील. त्यांच्या आवाजाने त्या मार्गावरुन हत्तींची वर्दळ थांबली की अन्य ठिकाणी त्याचा वापर करता येऊ शकेल. तसेच चंदगडमधून येणाऱ्या मार्गावर मधमाश्यांच्या पेट्या ठेवण्याऐवजी मधमाश्यांचे आवाज रेकॉर्ड करुन ते झाडावर ठेवलेल्या मोठ्या स्पीकरवरुन सुरू ठेवण्यात येत आहेत.

..........

देश, परदेशात तसेच अगदी कोकण आणि कर्नाटकात या हनी बी प्रकल्पाला यश आले आहे. खर्चिक पर्यायांपेक्षा हा पर्याय सोपा व स्वस्त आहे. त्यामुळे आजरा विभागाकडून प्रायोगिक तत्त्वावर कुंपण उभारण्याचे नियोजन सुरू आहे. त्याची यशस्वीता पाहून अन्य ठिकाणीही हा प्रकल्प राबवता येऊ शकेल.

डॉ. सुनील लाड, रिजनल फॉरेस्ट ऑफिसर, आजरा

..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वॉर्डबॉयला वाढदिवस पडला महागात

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमधील वॉर्डबॉय अमोल शंकर खेबुडे याला ऑन ड्युटी साजरा केलेला वाढदिवस चांगलाच महागात पडला. मित्रांसमेवत आवारात वाढदिवसाचे सेलिब्रेशन करून फटाके उडवल्याची गंभीर दखल आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी शनिवारी त्याचे निलंबन केले. या प्रकरणाची द्विसदस्यीय समितीकडून विभागीय चौकशीचे आदेशही देण्यात आले.

कसबा गेट येथील महापालिकेच्या लक्ष्मीबाई जाधव दवाखान्यामध्ये अमोल खेबुडे वॉर्डबॉय म्हणून कार्यरत आहे. गुरुवारी (ता. २१) आपल्या पाच ते सहा मित्रांसमवेत त्याने सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये वाढदिवस साजरा करण्याचा प्रयत्न केला. त्याला अधिकाऱ्यांनी विरोध केला. पण, त्याने हॉस्पिटलच्या आवारात वाढदिवस साजरा करत फटाकेही फोडले.

याबाबतच्या तक्रारीची आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतली. आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी चौकशी करून अहवाल आयुक्तांकडे शुक्रवारी (ता. २२) सादर करत खेबुडेचे वर्तन बेजबाबदार व महापालिकेच्या नावलौकिकास बाधा आणणारे असल्याने निलंबन करण्याची शिफारस केली. त्यानुसार आयुक्तांनी शनिवारी त्याचे निलंबन करताना विभागीय चौकशीचे आदेश दिले. चौकशी अधिकारी म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपाली यादव व किरण गौतम यांची नियुक्ती केली आहे.

चौकशीदरम्यान खेबुडेला मुख्यालय न सोडण्याची सूचना करण्यात आली आहे. शिवाय, दररोज हजेरी देण्याची सक्ती केली आहे. निलंबन काळात कोणताही व्यवसाय अथवा अन्य ठिकाणी नोकरी करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उचगाव नाक्यावरील अतिक्रमण हटवले

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उचगाव नाका परिसरात अ‌वैधरित्या उभारलेल्या झोपड्यांवर शनिवारी सकाळी करवीर तहसिल कार्यालय व महापालिकेने संयुक्त करवाई केली. पथकाने येथील ७० झोपड्या जमिनदोस्त केल्या. झोपडपट्टीधारकांनी कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांचा विरोध मोडीत काढल्यानंतर अवघ्या दोन तासांत पथकाने परिसर मोकळा केला.

करवीर तहसिल कार्यालयांतर्गत येणाऱ्या उचगाव नाका परिसरात अवैधरित्या झोपड्या उभारल्या गेल्या आहेत. याविरोधात तहसिल कार्यालयाकडे तक्रारी दाखल झाल्या होत्या. परिसर अतिक्रमणमुक्त करून देण्यासाठी तहसिल कार्यालयाने महापालिका आयुक्तांशी पत्रव्यवहार केला. त्यानुसार सकाळी महापालिकेचे पथक महसूल अधिकाऱ्यांसोबत उचगाव नाक्यावर दाखल झाले. चार डंपर, दोन जेसीबी, दोन फायर फायटरसह सुमारे ५० कर्मचारी घटनास्थळी आले. यावेळी प्रचंड पोलिस बंदोबस्त होता.

जेसीबीच्या सहाय्याने झोपड्या पाडून टाकण्यास सुरुवात झाल्यानंतर काहींनी विरोध केला. पथकासोबत वाद घालण्यास सुरुवात झाल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत झोपडपट्टीधारकांना बाजूला केले. विरोध मोडीत निघल्यानंतर पथकाने वेगाने कारवाई करत अवैध झोपडपट्ट्या जमिनदोस्त करण्यास सुरुवात केली. कारवाईदरम्यान अन्य झोपडपट्टीधारकांनी स्वत:हून झोपड्यांतील साहित्य बाहेर काढण्यास सुरुवात केली. त्यामळे कारवाई वेगाने पार पडली. महापालिकेचे प्रभारी शहर अभियंता हर्षजित घाटगे, उपशहर अभियंता आर. के. जाधव, अतिक्रमण विभागप्रमुख पंडित पोवार, तहसिलदार शीतल मुळे-भांबरे, मंडल अधिकारी शिवानंद पाटील, राजारामपुरीचे पोलिस निरीक्षक नवनाथ घोगरे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यातील एचआयव्ही संसर्गितांमध्ये घट

0
0

Sachin.patil1@timesgroup.com

Tweet@sachinpMT

समाजात एचआयव्ही-एड्सच्या धोक्यांबाबत बदल होत असलेल्या जाणीव जागृतीमुळे जिल्ह्यातील एचआयव्ही संसर्गित रुग्ण आढळण्याच्या प्रमाणात घट झाली आहे. गेल्या दहा वर्षांत एचआयव्ही संसर्गितांचे प्रमाण १०.०७ वरून ०.५ टक्क्यांवर पोहोचले आहे. जिल्ह्यात २१ हजार रुग्ण एचआयव्ही संसर्गित आहेत. सरकार, विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून हे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकाचे प्रयत्न सुरू आहेत.

राज्यात सांगली, मुंबईनंतर कोल्हापूर जिल्ह्यात एचआयव्हीचा संसर्ग सर्वाधिक दिसून येतो. मात्र, हे प्रमाण कमी करण्यासाठी सातत्याने सुरू असलेल्या प्रयत्नांना चांगले यश मिळत आहे. जिल्ह्यात एचआयव्हीसह जगणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असण्याला सधनता, स्थलांतरित कामगार, पर्यटकांचे प्रमाण, सीमेलगतची भौगोलिक परिस्थिती व केंद्रित लक्ष्यगट ही कारणे मानली जातात. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, महापालिका, नगरपालिकांच्या दवाखान्यांत एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्रे (आयसीटीसी) येथे मोफत एचआयव्ही समुपदेशन व तपासणी केली जाते. यामध्ये गरोदर माता, क्षयरोग रुग्णांचे चाचणी पूर्व समुपदेशन करण्यात येते. तपासणी पॉझिटिव्ह आल्यास समुपदेशनानंतर पुढील उपचारांची दिशा ठरवली जाते. विशेषतः गरोदर महिला व क्षय रुग्णांकडे अधिक लक्ष दिले जाते. जागतिक आरोग्य संघटनेच्या नवीन ध्येयानुसार एचआयव्ही संसर्गितांना उपचार देण्याबाबत उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. या माध्यमातून एड्स नियंत्रणाचे काम युद्धपातळीवर सुरू झाले असून जिल्ह्यातील सर्व यंत्रणा कार्यरत करण्यात आल्या आहेत.

एचआयव्ही-एड्स नियंत्रणासाठी सरकारकडून स्थानिक पातळीवरील सामाजिक संस्थांना प्रकल्प देण्यात येतात. त्यामाध्यमातून स्थलांतरित कामगार, वारांगना, तृतीयपंथी या लक्ष्य गटासाठी काम केले जात आहे. एचआयव्ही संसर्गित व्यक्ती व लहान मुलांना सेवा सुविधा देण्यासाठी 'विहान' नावाचा प्रकल्प सुरू आहे. या माध्यमातून बाल संगोपन योजना, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, मोफत पौष्टिक आहार पुरवला जातो. एचआयव्ही-एड्स नियंत्रणासाठी माहिती, शिक्षण, संवाद या बाबींचाही प्रभावीपणे वापर केला जात आहे. गेल्या दहा वर्षांत कोल्हापूर जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकाला चांगल्या कामाबद्दल राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

राधानगरी तालुक्याचा पुढाकार

एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्तींना कलंकित समजून त्यांच्याशी भेदभाव करणार नसल्याचा ग्रामसभेचा १०० टक्के ठराव करणारा राधानगरीत हा देशातील एकमेव तालुका आहे. गावातील सर्वांची लग्नापूर्वी स्वेच्छा एचआयव्ही समुपदेशन व चाचणी, सर्व गरोदर स्त्रियांची चाचणी व एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्तींना कलंक व भेदभाव न करणे असे तीन ठराव करण्यात आले होते. याद्वारे इतर तालुक्यांतही याबाबत पुढाकार घेण्याची गरज आहे.

मोफत चाचणी व समुपदेशन

जिल्ह्यात २२ आयसीटीसी केंद्रे कार्यरत असून ३ ग्रामीण रुग्णालय, २ उपजिल्हा रुग्णालय, ७४ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ४१३ उपकेंद्रे व ९२ पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप खाजगी दवाखाने व प्रयोगशाळा यांच्या माध्यमातून मोफत समुपदेशन व चाचणी केली जाते. सर्व यंत्रणेवर जिल्हा एड्स नियंत्रण पथकाद्वारे नियंत्रण ठेवले जाते.

यंदाची जागतिक दिनाची थीम 'आपण बदल घडू शकतो' अशी आहे. समाजाने जनजागृतीत पुढाकार घ्यावा. एचआयव्ही तपासणी करून स्वतःचे एचआयव्हीचे स्टेटस जाणून घ्यावे. यासाठी युवावर्ग, गरोदर महिला, अति जोखमीचे गट व सामान्य जनतेने एकत्र येऊन एचआयव्ही-एड्स निर्मूलनात सहभाग वाढवावा.

- दीपा शिपूरकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुट्टीदिवशीही पॅचवर्क

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम त्वरित पूर्ण करण्यासाठी रविवारी सुट्टी दिवशीही सुरू ठेवण्यात येणार आहे. हाती घेतलेले काम सोमवारी पूर्ण झाल्यानंतर मंगळवारपासून प्रत्येक विभागीय कार्यालयांतर्गत नवीन रस्त्यांच्या कामाला सुरुवात होणार आहे. शॉर्ट टेंडरद्वारे सुमारे दीड कोटींच्या निधीतून सुरू असलेल्या कामांची पाहणी शनिवारी महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर व उपमहापौर संजय मोहिते यांनी केली.

शहर खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिकेने शॉर्ट टेंडर प्रक्रिया राबवली. त्याद्वारे एक कोटी ६० लाखांच्या १६ रस्त्यांच्या कामांची निविदा मंजूर करण्यात आली. त्यानुसार प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली. पेव्हर पद्धतीने डांबरीकरण करण्यात येत आहे. विभागीय कार्यालयांतर्गत देवकर पाणंद ते साळोखेनगर मुख्य रस्ता, बिंदू चौक, हुतात्मा पार्क ते स्टेट बँक, पितळी गणपती ते प्रादेशिक परिवहन कार्यालयापर्यंतचा रस्ता करण्यात येत आहेत. महापालिकेच्यावतीने विवेकानंद कॉलेज, शाहूपुरी ३ री गल्ली, जरगनगर येथे मुख्य रस्त्याचे पॅचवर्क करण्यात येत आहे. ही कामे रविवारीही सुरू ठेवण्यात येणार आहेत.

दरम्यान, शनिवारी महापौर अॅड. लाटकर व उपमहापौर मोहिते यांनी कामाची पाहणी केली. सर्व रस्त्यांची कामे दर्जेदार करण्याची सूचना अधिकारी व ठेकेदारांना केली. प्रभारी शहर अभियंता हर्षजित घाटगे, उपशहर अभियंता रमेश मस्कर, आर. के. जाधव, कनिष्ठ अभियंता मिलिंद पाटील, सुनील भाईक, ठेकेदार संदीप पाटील उपस्थित होते.

०००

(मूळ कॉपी)

सुटीदिवसीही पॅचवर्कचे काम

डांबरीकरणाची महापौरांकडून पाहणी

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम त्वरित पूर्ण करण्यासाठी रविवारी सुटीदिवसीही सुरू ठेवण्यात येणार आहे. सोमवारपर्यंत हाती घेतलेले काम पूर्ण झाल्यानंतर मंगळवारपासून प्रत्येक विभागीय कार्यालयातंर्गत नवीन रस्त्यांच्या कामाला सुरुवात होणार आहे. शॉर्ट टेंडरद्वारे सुमारे दीड कोटीच्या निधीतून सुरू असलेल्या कामाची पाहणी शनिवारी महापौर अॅड. सूरमंजिरी लाटकर व उपमहापौर संजय मोहिते यांनी केली.

शहर खड्डेमूक्त करण्यासाठी महापालिकेने शॉर्ट टेंडर प्रक्रिया राबवली. त्याद्वारे एक कोटी ६० लाखाच्या १६ रस्त्यांच्या कामाची निविदा मंजूर करण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. पेव्हर पद्धतीने डांबरीकरण करण्यात येत आहे. विभागीय कार्यालयातंर्गत देवकर पाणंद ते साळोखेनगर मुख्य रस्ता, बिंदू चौक, हुतात्मा पार्क ते स्टेट बँक, पितळी गणपती ते प्रादेशिक परिवहन कार्यालयपर्यंतचा रस्ता पेव्हर पद्धतीने करण्यात येत आहेत. तसेच महापालिकेच्यावतीने विवेकानंद कॉलेज, शाहूपुरी ३ री गल्ली, जरगनगर मुख्य रस्त्याचे पॅचवर्क करण्यात येत आहे. ही कामे रविवारी सुरू ठेवण्यात येणार आहेत.

दरम्यान शनिवारी महापौर अॅड. लाटकर व उपमहापौर मोहिते यांनी कामाची पाहणी केली. सर्व रस्त्यांची कामे दर्जेदार करण्याची सूचना अधिकारी व ठेकेदारांना त्यांनी केली. यावेळी प्रभारी शहर अभियंता हर्षजित घाटगे, उपशहर अभियंता रमेश मस्कर, आर. के. जाधव, कनिष्ठ अभियंता मिलिंद पाटील, सुनील भाईक, ठेकेदार संदीप पाटील उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फेब्रुवारीत दिल्लीत भारतीय छात्र संसद

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्मेंट आणि पुण्याच्या एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या संयुक्त विद्यमाने २० ते २३ फेब्रुवारी २०२० या कालावधीत नवी दिल्लीतील विज्ञान भवनात 'भारतीय छात्र संसद' होणार आहे. फाऊंडेशनच्या पश्चिम महाराष्ट्र समन्वयक सम्राज्ञी तावरे यांनी ही माहिती दिली. छात्र संसदचे हे दहावे वर्ष आहे. दिल्लीत पहिल्यांदाच छात्र संसद होत असून यासाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे.

या छात्र संसदेचे उद्घाटन २० फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या संसदेत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी, राज्यमंत्री अनुराग ठाकूर, भाकपचे ज्येष्ठ नेते प्रकाश करात, तेलगू अभिनेता पवन कल्याण, माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, पत्रकार शेखर गुप्ता, सामाजिक कार्यकर्ते शिव खेरा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. छात्र संसदमध्ये 'सोशल मीडिया आणि सेलिब्रिटी-आदी समजा मग झुका', 'आपण खरोखर कोठे जात आहोत - जातीवर्गाकडून की वर्गाकडून जातीकडे', 'विद्रोह, दहशतवाद व नक्षलवाद संघर्ष - कारणे व आव्हाने', 'ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था - शक्यता आणि आव्हाने', 'लोकसंख्येची अब्जावधीपर्यंतची वाढ - हम दो हमारे दो यशस्वी झाले का?', 'भारत आणि उगवती जागतिक व्यवस्था', 'स्वातंत्र्योत्तर सात दशकांच्या कालखंडात - भारत स्वतला कसा बघतो'' या विषयांवर चर्चासत्रे होणार आहेत. छात्र संसदसाठी १६ जानेवारीपर्यंत ऑनलाइन नावनोंदणी करायची आहे. अधिक माहिती www.bhartiyachhatrasansad.org आणि http:bhartiyachhatrasansad.org/mitsog.org/mitwpu.edu.in वेबसाइटवर उपलब्ध आहे.'

पत्रकार परिषदेला उन्मेश नायक, विशाल माने, सागर घोरपडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेतन एक तारखेलाच द्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'सहलीच्या जाचक अटी काढा-अन्यथा सहल नको म्हणून सांगा, लिंक भरायच्या ढीगभर-पोरं सुटली वाऱ्यावर, आम्ही इमानाशी जागतोय-वेळेत वेतन मागतोय, आमचा अंत पाहू नका-आम्ही मुलांसोबत राहू, प्रयोग कमी होऊ द्या-मुलांच्यात राहू द्या' या आशयाचे हाती घेतलेले फलक आणि जोरदार घोषणेबाजी करत प्राथमिक शिक्षकांनी जिल्हा परिषदेसमोर जोरदार निदर्शने केली. वेतन एक तारखेलाच मिळावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या नेतृत्वाखाली शनिवारी सायंकाळी आंदोनल झाले. निदर्शने करतानाच शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन केले. प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांना मागण्यांचे निवेदन दिले. शिक्षकांच्या उशिरा होणऱ्या वेतनासह अन्य प्रलंबित प्रश्नासाठी आंदोलन पुकारले होते. शिक्षक समितीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अर्जुन पाटील, जिल्हा सरचिटणीस प्रमोद तौंदकर, उपाध्यक्ष रवळू पाटील,राज्य उपाध्यक्ष जोतिराम पाटील आदींच्या नेतृत्वाखाली सुमारे ३०० हून अधिक शिक्षकांनी आंदोलनात सहभाग घेतला.

प्राथमिक शिक्षकांचे वेतन एक तारखेलाच करावे. जि.प.कडील सर्व प्राथमिक शिक्षकांचे वेतन सीएमपी प्रणालीद्वारे करावे या प्रमुख मागण्या करण्यात आल्या. त्यावर शिक्षणाधिकारी उबाळे यांनी शिक्षकांचे वेतन एक तारखेला होत आहे. तसेच सीएमपी प्रणालीबाबत समितीची स्थापना केली आहे. लवकरात लवकर त्याद्वारे वेतनची प्रक्रिया कार्यान्वित होईल अशी ग्वाही दिली.

शिक्षकांच्या शिष्टमंडळाने 'तंबाखू मुक्ती अभियानसह अन्य उपक्रमाच्या अंमलबजावणीची कामे शिक्षकांवर लादू नयेत. शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करावी. शिवाय शिक्षकांसाठीचे उपक्रम व प्रशिक्षण सुट्टीच्या कालावधीत आयोजन करावे. अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या शाळा दुरुस्त कराव्यात अशा मागण्या केल्या. या मागण्या वरिष्ठस्तरांशी निगडीत आहेत. शिक्षकांच्या भावना वरिष्ठांना कळवू असे अधिकाऱ्यांना सांगितले. शिक्षकांनी शाळा स्तरावर एकच शाळा व्यवस्थापन समिती ठेवावी. जि.प.कर्मचाऱ्यांच्या स्पर्धांमध्ये शिक्षकांना सामवून घ्यावे यासंबंधी निवेदन दिले. आंदोलनात सुरेश कोळी, हरिदास वर्णे, शंकरराव मनवाडकर, बाळासाहेब पोवार, राजेंद्र पाटील, सतीश बरगे, संदीप मगदूम, वर्षा केनवडे, दीपाली भोईटे आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कोल्हापुरी’पुढे राजस्थानी चप्पलचे आव्हान

0
0

Uddhav.Godase@timesgroup.com

Tweet @Uddhavg_MT

कोल्हापूर : कोल्हापूरची खासियत असलेल्या कोल्हापुरी चपलांना कर्नाटकसह राजस्थानच्या चपलांशी स्पर्धा करावी लागत आहे. राजस्थानातून येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्समधून रोज हजारावर जास्त जोड कोल्हापुरात येतात. कोल्हापुरी चपलांपेक्षा परराज्यातील चप्पल

स्वस्त असल्याने स्थानिकांच्या व्यवसायावर गंभीर परिणाम झाला आहे.

केंद्र सरकारने गोवंश हत्याबंदी कायदा केल्याचा परिणाम चामडीचे दर वाढण्यात झाला. त्यामुळे कोल्हापुरी चप्पल व्यवसायाला घरघर लागली आहे. त्यातच कर्नाटकातून येणाऱ्या चपलांशी कोल्हापुरी चपलांना स्पर्धा करावी लागली. निपाणी, संकेश्वर परिसरातून रोज चपलाचे रोज सुमारे ५०० जोड येतात. आता राजस्थानातील चपलांनीही स्थानिक मार्केटमध्ये शिरकाव केला आहे. राजस्थान, आग्रा येथे कमी किमतीत चामडे मिळते. यातील टाकाऊ किंवा हलक्या दर्जाच्या चामड्यातून चप्पल तयार केली जाते. वजनाला हलके आणि आकर्षक असल्याने ही चप्पल लक्ष वेधून घेते. शिवाय तुलनेत किंमतही कमी आहे. शहरात येणारे पर्यटक राजस्थानी चपलांना प्राधान्य देतात. त्यामुळे स्थानिकांची विक्री कमालीची घटली आहे. कोल्हापुरी चप्पल निर्मिती व्यवसायातील वार्षिक उलाढाल दीडशे कोटींवरून अवघ्या ५० कोटींवर आल्याचे व्यावसायिक सांगतात.

राजस्थानातील भिलवाडा, जयपूर, जोधपूर येथून रोज खासगी ट्रॅव्हल्स कोल्हापुरात येतात. या ट्रॅव्हल्सना मालवाहतूक परवाना नाही. तरीही अवैध वाहतुकीद्वारे चपलांचे मोठे बॉक्स तावडे हॉटेल येथे उतरवले जातात. यानंतर टेम्पोतून ते एका विक्रेत्याच्या गोडावूनमध्ये पाठवले जातात. मोक्याच्या ठिकाणी असलेल्या चप्पल विक्रीच्या दुकानांमध्ये या चपला पाठवल्या जातात. चप्पल लाइनसह अंबाबाई मंदिराच्या आसपास असलेली दुकाने, स्टेशन रोड, सीबीएस परिसरात मोठ्या प्रमाणात या चपलांची विक्री सुरू आहे. बाहेरून येणाऱ्या पर्यटकांकडून याची मोठ्या प्रमाणात खरेदी होते. परिणामी स्थानिक कोल्हापुरी चपलांना ग्राहक मिळत नाही. याचा परिणाम स्थानिक कोल्हापुरी चप्पल निर्मिती व्यवसायावर झाला आहे. विक्री होत नसल्याने कारागिरांच्या हाताला काम नाही. दहा-बारा वर्षांपूर्वी सुभाषनगरातील घराघरांत चपला तयार करण्याचे काम होत असे. आता मात्र काही मोजकी कुटुंबेच हा व्यवसाय करतात. परराज्यातील चपलांची आवक कायम राहिल्यास कोल्हापुरी चप्पल व्यवसाय पूर्णंत: उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

मूळ कोल्हापुरीबाबत गैरजसमज

दर महिन्याला राजस्थानातून ३० हजार, तर कर्नाटकातून सुमारे १५ हजार चपलांचे जोड कोल्हापुरात येतात. या चपलांचा ग्राहक विशेषत: पर्यटक आहे. मूळ कोल्हापुरी चप्पल आणि परराज्यातील बेगडी चपलांमधील फरक लक्षात येत नसल्याने ग्राहकांची फसवणूक होते. चपला खराब झाल्यानंतर ग्राहकांच्या मनात कोल्हापुरी चपलांबाबत गैरसमज निर्माण होत आहेत. हे रोखण्यासाठी परराज्यातील दर्जाहीन चपलांची आवक रोखण्याची गरज निर्माण झाली आहे.

.. .. .. .

कोल्हापुरी चप्पल निर्मितीच्या पारंपरिक व्यवसायाला राज्याबाहेरून येणाऱ्या चपलांशी स्पर्धा करावी लागत आहे. आम्ही स्पर्धेला घाबरत नाही, पण टाकाऊ कच्च्या मालापासून तयार होणाऱ्या राजस्थानी चपला खूपच कमी किमतीत विकल्या जात आहेत. यातून ग्राहकांची फसवणूक होते. यामुळे परराज्यातील चपलांच्या विक्रीबाबत ठोस निर्णय घ्यावा लागणार आहे.

शिवाजीराव पोवार, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा फूटवेअर असोसिएशन

.. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपमध्ये जिल्हाध्यक्षपदासाठी चुरस

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भारतीय जनता पक्षामध्ये पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया सुरू होणार असून जिल्हाध्यक्षपदासाठी प्रभारी अध्यक्ष राहुल चिकोडे, माजी नगरसेवक आर. डी. पाटील, अशोक देसाई, सरचिटणीस विजय जाधव, तुषार देसाई यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे. जिल्हाध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार नसली तरी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांची पसंती महत्त्वाची आहे. त्यांच्या शिफारशीने अध्यक्षपदाची घोषणा होणार असल्याने इच्छुकांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.

सहा महिन्यांपूर्वी जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांनी राजीनामा दिल्यानंतर राहुल चिकोडे यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. विधानसभा निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव आणि जिल्हाध्यक्ष चिकोडे यांनी प्रचारात आघाडी घेतली. मात्र जिल्ह्यातील भाजपकडील दोन्ही जागांवरील उमेदवारांचा पराभव झाला. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील पक्षांतर्गत निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्हाध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे.

कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रात ४७६ बूथ असून त्यांच्या प्रमुखांची निवडणूक पहिल्या टप्प्यात होणार आहे. एका बूथमध्य किमान २५ कार्यकर्त्यांची निवड होणार आहे. बूथप्रमुखांची निवड झाल्यानंतर मंडल प्रमुखांची निवड होणार आहे. शहरात उत्तरेश्वर, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, शाहूपुरी, राजारामपुरी, कसबा बावडा हे मंडल आहे. यामधील मंडल प्रमुखांची निवड झाल्यानंतर प्रत्येक मंडलात ६० पदाधिकाऱ्यांची निवड होणार आहे. मंडलातील सदस्य निवडीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हाध्यक्षांची निवड होणार आहे.

अध्यक्षपदासाठी प्रभारी अध्यक्ष चिकोडे, माजी नगरसेवक पाटील, सरचिटणीस जाधव, अशोक आणि तुषार देसाई यांची नावे आघाडीवर आहेत. चिकोडे हे प्रदेशाध्यक्ष पाटील यांचे स्वीय सहाय्यक असून त्यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. माजी नगरसेवक पाटील हे गेली २५ वर्षे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते असून नगरसेवकही आहेत. त्यांनीही अध्यक्षपदासाठी इच्छा व्यक्त केली आहे. ज्येष्ठ पदाधिकारी असल्याने संधी मिळावी अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे.

सरचिटणीस विजय जाधव हेही अध्यक्षपदासाठी इच्छूक आहेत. आजअखेर जिल्हाध्यक्षपद जुन्या पेठांतील कार्यकर्त्यांना मिळाले असल्याने यंदा शाहूपुरी, राजारामपुरीला अध्यक्षपदाची संधी मिळावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. अशोक देसाई यांचे नाव आघाडीवर असले तरी त्यांचा सात वर्षांपूर्वी पक्षात प्रवेश झाला असल्याचे कारण सांगितले जात आहे. तुषार देसाई यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अध्यक्षपदासाठी पाठिंबा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार नसून प्रदेशाध्यक्ष पाटील हे अध्यक्षाचे नाव जाहीर करणार आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष आपले मत कुणाच्या पारड्यात टाकणार याकडे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कुमरी’ शेतकऱ्यांना वनजमिनीवर कायमस्वरुपी हक्क

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कुमरी' पद्धतीने शेती करणाऱ्या वन निवासींना जमिनी कायमस्वरुपी वहिवाटीस देऊन त्यांची नावे सातबारा उताऱ्यावरील इतर हक्कांत घेण्यात यावेत, असा आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला. या निर्णयामुळे सुमारे शंभर वर्षांपासून असणारी वहिवाटीच्या हक्काची मागणी आता पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील चंदगड, राधानगरी, पन्हाळा, भुदरगड, आजरा, शाहूवाडी आणि करवीरमधील ४१.२९ हेक्टर शेतजमीन आणि २० हजार चौरस मीटर रहिवासी क्षेत्राचा लाभ एक हजार ७२० लोकसंख्येला मिळणार आहे.

जिल्ह्यात १९२७ व त्यापूर्वीपासून वननिवासी शेतकरी कुमरी पध्दतीने १६ वर्षांच्या फेरपालटाने नागली, वरी ही पिके घेत होती. जंगलातील छोटी झाडे साफ करुन शेतकरी जमीन कसत होते. या परिसरातील नागरिकांचा नवीन क्षेत्र निर्माण करण्याकडे कल होता. त्‍यामुळे जंगलाची हानी होत होती. वनविभागाकडून कुमरी पध्दतीने शेतीसाठी केलेल्या जमिनीचे भाडे दरवर्षी वसूल करुन त्याच्या भाडेपावत्याही दिल्या जात होत्या. गेल्या १०० वर्षापासून या शेतीच्या वहिवाटीचे हक्क कायमस्वरुपी मिळावेत अशी मागणी वननिवासी शेतकऱ्यांकडून केली जात होती

केंद्र सरकारने अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी, वन हक्काची मान्यता अधिनियम २००६ आणि नियम २००८ हा कायदा पारित केल्याने वहिवाटीचे हक्क कायमस्वरुपी मिळण्यास कुमरी धारक शेतकरी पात्र झाले आहेत. या शेतकऱ्यांकडे पुरावे असूनही उपविभागीय अधिकारी स्तरावरील समितीने त्याचा हक्क नाकारला होता.

आज शनिवारी याबाबत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखालील समितीसमोर आज झालेल्या सुनावणीत एकूण १०३ अपील आणि २४१ दाव्यांवर सुनावणी झाली. त्यांचे सर्व दावे मान्य करून या शेतकऱ्यांना वनजमिनी कायमस्वरुपी वहिवाटीस देऊन त्यांची नावे सातबारा उताऱ्याच्या इतर हक्कांत घेण्याबाबत आदेश देण्यात आले. यावेळी सदस्य सचिव प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर, सहाय्यक उपवनसंरक्षक सुनील निकम आदीसह पक्षकार उपस्थित होते. जिल्हास्तरीय वन हक्क समितीचे समन्वयक, निवृत्त उपजिल्हाधिकारी डी. के. शिंदे हे २००९ पासून काम पाहत आहेत.

या निर्णयामुळे संबंधित तालुक्यांतील रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबून कायमस्वरुपी रोजगाराचा प्रश्न मिटण्याची शक्यता आहे. चंदगड तालुक्यातील वाघोत्रे, कोदाळी, जांबरे, उमगाव, नागरगाव कोदाळी, गुळंब, कानूर खुर्द, पिळणी, बुझवडे, आजरा तालुक्यातील आवंढी, खानापूर, करवीर तालुक्यातील धोंडेवाडी, पन्हाळा तालुक्यातील वाघवे, गोठे, पोर्ले तर्फ ठाणे, निवडे, उत्रे, शाहूवाडी तालुक्यातील पेरीड पैकी गाडेवाडी, भेडसगाव, राधानगरी तालुक्यातील रामनवाडी, बनाचीवाडी, मांडरेवाडी, भुदरगड तालुक्यातील पेठ शिवापूर या गावांतील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तपासणीपूर्वीच पुन्हा केबिन लावण्याच्या हालचाली

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रंकाळा तलावानजिक अंबाई टँक परिसरातील शुक्रवारी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने ८५ केबिन्स काढल्या. इस्टेट विभागाकडून कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर केबिन बसवण्यात येणार होत्या. मात्र तपासणीपूर्वीच पुन्हा केबिन्स लावण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान, शनिवारी सायंकाळी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख व अतिक्रमण विभागप्रमुख पंडित पोवार यांनी कारवाई केलेल्या ठिकाणांची पाहणी केली.

बुधवारी केबिनधारकांवर झालेल्या हल्ल्यानंतर शुक्रवारी अतिक्रमण विभागाच्या पथकाने पोलिस बंदोबस्तात ८५ केबिन्स हटवल्या. कारवाईदरम्यान काहींनी बायोमेट्रिक कार्ड दाखवत पथकाला केबिन अधिकृत असल्याचे निदर्शनास आणून दिले. सर्वांनी इस्टेट विभागाकडे कागदपत्रे दाखवल्यानंतर केबिन बसवण्यास परवानगी देणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. अधिकाऱ्यांच्या या भुमिकेमुळे राजारामपुरीच्या खाऊ गल्लीप्रमाणे अंबाई टँक परिसरातील केबिन्स कमी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, रविवारी रंकाळ्यावर नेहमीपेक्षा जास्त होणारी गर्दी व व्यवसाय लक्षात घेऊन काही केबिनधारकांनी पुन्हा केबिन उभारणीचा घाट घातला आहे.

अंबाई टँक ते इराणी खणीपर्यंतच्या रस्त्यावर अधिकृत २५ केबिन असल्याची महापालिका दप्तरी नोंद आहे. पण, कारवाई करताना तब्बल ८५ केबिन हटवल्यामुळे हे केबिनधारक कोणाच्या आशीर्वादाने स्थायिक झाले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या रहदारीच्या रस्त्यावरील ५० केबिन कमी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. प्रत्यक्षात कागदपत्र तपासणीपूर्वी केबिन उभारण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. दरम्यान सायंकाळी अतिक्रमणमुक्त झालेल्या ठिकाणी स्थायी सभापती देशमुख व अतिक्रमण विभागप्रमुख पोवार यांनी पाहणी केली. देशमुख यांनी सोमवारी येथे पट्टे मारुन देण्याची सूचना केली. एक बाजू वाहतुकीसाठी खुली ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लास्टिक बाळगणाऱ्या चार व्यापाऱ्यांना दंड

0
0

कोल्हापूर : प्लास्टिक बंदी झुगारुन वापर व वितरण केल्याप्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागाने शनिवारी चार व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. प्रत्येकी पाच हजारप्रमाणे वीस हजारांचा दंड वसूल केला. लक्ष्मी रोडवरील भांबुरे इंटिरिअर, रमेश दुलानी व रुईकर कॉलनी येथील एम. बी. बेकरी, बिकानेर बेकरी व्यवस्थापनावर आरोग्य विभागाने कारवाई केली. विभागीय आरोग्य निरीक्षक निखिल पाडळकर, आरोग्य निरीक्षक शिवाजी शिंदे, ऋषिकेश सरनाईक, मुनिर फरास, नंदकुमार पाटील, करण लाटवडे, सुशांत शेवाळे, सुशांत कावडे, श्रीराज होळकर यांच्या पथकाने कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दोन प्रकरणांच्या चौकशीसाठी जि. प.मध्ये समित्या नियुक्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेतील दोन वेगवेगळ्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी चौकशी अधिकारी नेमले आहेत. या चौकशी अधिकाऱ्यांना संबंधित प्रकारणांची येत्या आठ दिवसांत चौकशी करुन अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. चौकशी अधिकारी म्हणून त्यांना नियुक्तीची पत्रे दिली.

ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या सुषमा देसाई व कनिष्ठ सहाय्यक शिल्पा माने यांच्यातील वादाची चौकशी करण्यासाठी ग्रामीण विकास प्रकल्पाचे संचालक अजयकुमार माने करणार आहेत. पन्हाळा तालुक्यातील बाजार भोगावमधील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी लता सरोळे यांनी एकाच वेळी दोन सरकारी संस्थांतून पगार घेतल्याची तक्रार आहे. या प्रकाराची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवी शिवदास, मुख्य वित्त व लेखा अधिकारी संजय राजमाने व उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे या त्रिसदस्यीय सदस्यांची समिती नेमली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

६८५ मिळकतदारांना नोटिसा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेचे आर्थिक वर्ष संपण्यास चार महिन्यांचा कालावधी असताना सर्वच विभागांची कर वसुली असमाधानकारक आहे. वसुली वाढविण्यासाठी सर्व विभागांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच भाग म्हणून घरफाळा विभागाने एक लाखापेक्षा जास्त घरफाळा थकीत असलेल्या ६८५ मिळकतदारांना पोस्टाद्वारे नोटिसा पाठविल्या आहेत. शनिवारी दिवसभर विभागाने ११ लाख २२ हजार ८७० रुपयांचा घरफाळा वसूल केला.

महापालिकेत घरफाळा, पाणीपुरवठा, इस्टेट, नगररचना या विभागांच्या कर वसुलीचा आढावा नुकताच घेण्यात आला. बैठकीत सर्व विभागांची वसुली ३० टक्क्यांपर्यंत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी वसुली मोहीम तीव्र करण्याची सूचना सर्व विभागाप्रमुखांनी केली. कर लागू न झालेल्या मिळकती आढळून आल्यास कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता.

आयुक्तांच्या इशाऱ्यांनंतर महापालिकेची यंत्रणा गतिमान झाली. गेल्या आठवड्यांपासून पाणीपुरवठा विभागाने थकीत पाणीपट्टी प्रश्नी कनेक्शन तोडल्यानंतर घरफाळा विभागानेही वसुलीचा धडाका लावाला आहे. शनिवारी दिवसभर ताराराणी मार्केट विभागीय कार्यालयाने ८ लाख ४९ हजार १५१ तर गांधी मैदान विभागीय कार्यालयाने २ लाख ७३ हजार ७१९ असे एकूण ११ लाख २२ हजार ८७० रुपयांचा घरफाळा वसूल केला. ताराराणी विभागीय कार्यालयाने प्रभाग क्रमांक एक व तीनमधील मिळकतदारांना कराची रक्कम जमा करण्यासाठी पुढील आठवड्यात विशेष कँपचे आयोजन केले आहे.

दरम्यान एक लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या ६८५ मिळकतदारांना नोटिसा पाठवल्या आहेत. मुदतीत रक्कम जमा न केल्यास महापालिकेच्या अधिनियमातील तरतुदीनुसार वर्षाला २४ टक्के दंड आकारण्याबरोबर मिळकतीवर बोजा नोंद करण्याची सूचना आयुक्तांनी घरफाळा विभागाला केली आहे.

०००

(मूळ कॉपी)

६८५ मिळकतदारांना नोटिसा

११ लाख २२ हजारांचा घरफाळा वसूल

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेचे आर्थिक वर्ष संपण्यास चार महिन्याचा कालावधी असताना सर्वच विभागाचा वसूल असमाधानकारक आहे. वसुली वाढवण्यासाठी सर्व विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच भाग म्हणून घरफाळा विभागाने एक लाखापेक्षा जास्त घरफाळा थकीत असलेल्या ६८५ मिळकतदारांना पोस्टाद्वारे नोटिसा पाठवल्या आहेत. शनिवारी दिवसभर विभागाने ११,२२,८७० रुपयांचा घरफाळा वसूल केला.

घरफाळा, पाणीपुरवठा, इस्टेट, नगररचना विभागाच्या वसुलीचा आढावा नुकताच घेण्यात आला. बैठकीत सर्व विभागाची वसूल ३० टक्क्यापर्यंत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी वसूल मोहीम तीव्र करण्याची सूचना सर्व विभागाप्रमुखांनी केली होती. तसेच कराबाहेर मिळकती आढळून आल्यास कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. त्यांच्या इशाऱ्यांनंतर महापालिकची यंत्रणा गतीमान झाली. गेल्या आठवड्यांपासून पाणीपुरवठा विभागाने थकीत पाणीपट्टी प्रश्नी पाणी कनेक्शन तोडल्यानंतर घरफाळा विभागानेही वसुलीचा धडाका लावाला आहे.

शनिवारी दिवसभर ताराराणी मार्केट विभागीय कार्यालयाच्यावतीने ८,४९,१५१ तर गांधी मैदान विभागीय कार्यालयाच्यावतीने २,७३,७१९ अशी एकूण ११,२२,८७० रुपयांचा घरफाळा वसूल करण्यात आला. तसेच ताराराणी विभागीय कार्यालयाच्यावतीने प्रभाग क्रमांक एक व तीन मधील मिळकतदारांना कराची रक्कम जमा करण्यासाठी पुढील आठवड्यात विशेष कँपचे आयोजन केले आहे. दरम्यान एक लाखापेक्षा जास्त थकीत रक्कम असलेल्या ६८५ मिळकतदारांना नोटिसा पाठवल्या आहेत. मुदतीत रक्कम जमा न केल्यास महापालिकेच्या अधिनियमातील तरतुदीनुसार वर्षाला २४ टक्के दंड आकारण्याबरोबर मिळकतीवर बोजा नोंद करण्याची सूचना आयुक्तांनी घरफाळा विभागाला केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जामदार क्लब रस्ता दुरुस्तीसाठी आंदोलन

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गंगावेश ते शिवाजी पूल जामदार क्लब रस्त्यासाठी टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याचा निर्णय शुक्रवारी रात्री झालेल्या बैठकीत घेण्यात आला. रस्ता दुरुस्तीसाठी स्थापन केलेल्या आखरी रास्ता कृती समितीच्यावतीने आंदोलन करण्यात येणार आहे. बैठकीस शुक्रवार पेठ, बुधवार पेठ, गंगावेश परिसरातील तरुण मंडळे व संस्थाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

गंगावेश ते शिवाजी पुलापर्यंतच्या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. पंचगंगा स्मशानभूमीकडे जाणारा प्रमुख मार्ग असल्याने खराब रस्त्यामुळे मृतदेहाची हेळसांड होत आहे. वारंवार होणारे प्रकार टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाविरोधात आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला. प्रथम आयुक्तांना निवेदन देऊन आठ दिवसांची मुदत देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. त्यानंतर आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय बैठकीत घेतला. यावेळी संयोजक राकेश पाटील, किशोर घाटगे, राकेश पोवार, राजू पाटील, सुरेश कदम, सनी अतिग्रे, अनिल काटकर, नंदू सुतार, सचिन काटकर, महेश महाजन यांनी आंदोलनासंबंधी सूचना केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजकारण गोकुळचे, प्रस्ता अडवला झेडपीमध्ये

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'राजकारण गोकुळमधील आणि विकास कामांचा प्रस्ताव अडविला जिल्हा परिषदेत' या प्रकाराची चर्चा गेले दोन दिवस रंगली आहे. करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला गावातील रस्ता डांबरीकरणाच्या ३० लाख रुपयांच्या कामाच्या प्रस्तावाची फाइल अडविण्यात आली आहे. या प्रस्तावावर जिल्हा परिषदेतील एका पदाधिकाऱ्याने सही केली नसल्यामुळे फाइलचा प्रवास थांबला आहे.

गोकुळमधील अध्यक्षपदाच्या निवडीवरून एका संचालकाचे आणि गोकुळचे नेतृत्व करणाऱ्या एका नेत्याशी बिनसले. गोकुळमधील या वादाचा आणि जिल्हा परिषदेचा तसा थेट संबंध नाही. मात्र, शिरोली दुमाला येथील रस्त्याच्या कामाच्या प्रस्तावावर गेले अनेक दिवस एका पदाधिकाऱ्यांनी सही केली नाही. यामागील गौडबंगाल काय, याची चर्चा रंगली आहे. काही सदस्यांच्या म्हणण्यानुसार यामागे गोकुळचे राजकारण आडवे आले आहे. तर काही सदस्यांनी दोन्ही संस्था वेगवेगळ्या असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे फाइल अडविण्यामागे राजकारण नाही. मात्र संबंधित विभागाने प्रस्ताव मान्य केला, प्रशासकीय बाबी पूर्ण झाल्या, मग प्रस्तावावर स्वाक्षरी करायला विलंब का? असा प्रश्न कायम आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'गोकुळ'च्यावतीने कुरियन यांना अभिवादन

0
0

कोल्हापूर श्वेतक्रांतीचे जनक दिवंगत डॉ. वर्गीस कुरियन यांच्या जयंतीनिमित्त त्यांना 'गोकुळ'तर्फे अभिवादन करण्यात आले. अध्यक्ष रविंद्र आपटे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 'कुरियन यांनी नेहमीच सहकारातील संस्था मजबुतीकरणावर भर दिला. संस्थेचा आर्थिक पाया भक्कम असल्याशिवाय दूध उत्पादकांना जास्त लाभ न देता येणे शक्य नाही, यासाठी त्यांनी नेहमीच 'गोकुळ'सारख्या संस्थांना मार्गदर्शन केले. त्यांच्या विचाराने चाललेल्या गोकुळची आर्थिक परिस्थिती नेहमीच भक्कम राहिली आहे. डॉ. कुरियन यांचा ग्रामीण दूध उत्पादक शेतकऱ्यांवर प्रचंड विश्वास होता. दूध उत्पादक शेतकरी कधीही कर्ज बुडवणारा नाही याची त्यांना खात्री होती', असे गौरवोद्गार आपटे यांनी यावेळी काढले. कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, बोर्ड सेक्रेटरी एस. एम. पाटील, व्यवस्थापक डी. के. पाटील, जनसंपर्क अधिकारी संजय दिंडे, आदी यावेळी उपस्थित होते. ...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images