Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

लाक्षणिक संप

0
0

कोल्हापूर : फेडरल बँक एम्प्लाईज युनियनच्यावतीने आज कोल्हापूरात एक दिवस लाक्षणिक संप करण्यात आला. बँकेच्या ट्रान्सफर पॉलिसीच्या विरोधात युनियनचे सेक्रेटरी कॉ. सुजीत राजू यांची केरळहून तमिळनाडू राज्यात बदली केल्याच्या निषेधार्थ आज देशभरातील सर्व सभासद संपावर गेले आहेत. कोल्हापूरही बँक युनियनच्या सभासदांनी बँकेच्या शाखेसमोर निदर्शने केली. राजू यांची बदली रद्द न झाल्यास देशभर लढा अधिक तीव्र केला जाईल, असा इशारा देण्यात आला. देशभरातील ४५०० कर्मचारी संपात सहभागी झाले होते. संपाला बँकिंग क्षेत्रातील एआयबीईए संघटनेने पाठिंबा दिला आहे.

आज झालेल्या निदर्शनाचे नेतृत्व कॉ शकील गरगटे, संदीप ढोबळे, राजाराम महाडिक, हेमंत पराडकर, शुभांगी कन्तुर, सुप्रिया पाटील यांनी केले. कोल्हापूर विभागातील ८० कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शाहूवाडीचा अनुशेष भरणार का?

0
0

लोगो : मटा अजेंडा

शाहूवाडी

चंद्रकांत मुदुगडे, शाहूवाडी

शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघाचे सत्ता समीकरण पुन्हा बदलल्याने शिक्षण, आरोग्य, बेरोजगारी, औद्योगिक वसाहत, शेतीसह पिण्याचे पाणी, महिला सबलीकरण या चौफेर भेडसावणाऱ्या समस्या चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत याच मुद्द्यांभोवती चर्चा झाली. डॉ. विनय कोरे हे चौथ्यांदा आमदार झाले. यापूर्वी त्यांनी पन्हाळा-गगनबावडा आणि शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघाचे अनुक्रमे दोनदा आणि एकदा प्रतिनिधित्व केले आहे. साहजिकच 'शाहुवाडी'चे मागासलेपण पुसून तालुकावासीयांचे दरडोई उत्पन्न वाढविण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करणे, त्यासाठी वारणा परिसरापाठोपाठ उर्वरीत मतदारसंघाला विकासाच्या वाटेवर घेऊन जाणे तितकेसे सोपे नाही, हे लक्षात घेऊनच आमदार कोरेंना शर्थीने प्रयत्नशील राहावे लागणार आहे.

शाहुवाडीतील संलग्न १३१ वाड्यावस्त्यांसह व पन्हाळा तालुक्यातील ६९ अशी एकूण दोनशे गावे मिळून 'शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघाची रचना आहे. यामध्ये साधारणपणे ८५ किलोमीटरचा भूभाग व्यापला गेला आहे. गेल्या पाच वर्षात आमदार म्हणून सत्यजित पाटील-सरुडकर यांनी रस्ते, वीज, पाणी अशा मतदारसंघातील मुलभूत समस्यांचे निग्रहाने निराकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी आणलेल्या एक हजार कोटी रुपयांच्या विकासनिधीतून मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केल्याचा दावा त्यांचा होता. सोनुर्ले लघू पाटबंधारे प्रकल्प, कृषीपंप वीज जोडणी अशा प्रलंबित कामांना चालना तसेच प्रकल्पबाधित आणि वन्य प्राण्यांकडून प्रभावित शेतकऱ्यांना वाढीव नुकसान भरपाई, निराधार घटकांना वाढीव मोबदला अशा लक्षवेधी कार्यपुर्तीतून पाटील यांनी कामाचा ठसा उमटवला.

मात्र, शाहूवाडी तालुक्यात औद्योगिकरणाच्या विकासासाठी तीन दशके रखडलेल्या एमआयडीसी प्रकल्पाची उभारणी आवश्यक आहे. पंचवीस वर्षांपूर्वी वारूळ येथे एमआयडीसी प्रकल्पाचा घाट घातला गेला. नंतर काही कारणांनी हा प्रकल्प डोणोलीत तालुक्याच्या सीमावर्ती माळरानावर स्थलांतरित झाला. दरम्यान सरकारच्या बदललेल्या धोरणांतील तीन चतुर्थांश स्थानिकांच्या अनुमतीचा मुद्दा अडचणीचा ठरला. याबाबत आमदार कोरे यांना प्रकल्पाच्या फाइलवर साचलेली धूळ झाडून हालचाली कराव्या लागणार आहेत.

तालुक्यातील सत्तर टक्के विद्यार्थी सातवीनंतरच्या शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे तसेच पनवेल, मुंबई, पुणे अशा शहरांतील हॉटेलमध्ये राबणारी बहुतांश मुले आपल्याच बंधारीतील असल्याचे शल्य व्यक्त करणाऱ्या आमदार कोरेंना त्यासाठी शिक्षण आणि रोजगार निर्मितीची सांगड घालावी लागेल. बॉक्साइट, औषधी वनस्पती व वनउपज पदार्थ आदी विपुल नैसर्गिक साधनसंपत्तीच्या लुटीचा उद्योग थोपवून हीच नैसर्गिक संपत्ती तालुक्याला वरदान ठरण्यासाठी खास कृतिशील पाऊल उचलण्याची गरज आहे.

महिला आणि बाल विकास प्रकल्प विभागाकडील नोंदीनुसार या दुर्गम व डोंगरी तालुक्यातील महिला आणि मुलींच्या आरोग्याचा प्रश्न चिंता करण्यासारखा आहे. कमावते पुरुष कामाच्या शोधात घराबाहेर कोसो दूर राहत असल्याने स्त्रियांच्या जीवनाचे अंतर्गत कंगोरे आणि संघर्ष या गंभीर बाबी आजवर लोकप्रतिनिधींच्या अजेंड्यावर आल्या नाहीत. गटातटात रमलेल्या जनतेची मानसिकताही याला तितकीच कारणीभूत असली तरी स्त्री प्रबोधन आणि संरक्षण हा विषय हाती घेऊन तो तडीस न्यावा लागणार आहे. याप्रश्नी अभ्यासू लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार कोरे अधिक गांभीर्याने लक्ष घालतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

वाढत्या बेरोजगारीने तालुक्याचा कानाकोपरा पोखरला गेला आहे. यातून वाढती व्यसनाधीनता डोकेदुखी ठरली आहे. सत्ता आणि पैसा हे समीकरण येथील व्यसनाधीनतेला खतपाणी घालत असणारी भ्रष्ट साखळी उखडून टाकण्यासाठी कोरे हे 'खाकी'ला वचक दाखवायला लावणार का? हा प्रश्न आहे. 'शाहूवाडी' मतदारसंघाचा निम्मा अधिक भूभाग कोरडवाहू अर्थात पावसाळ्यानंतर पाण्यासाठी टाहो फोडताना दिसतो. यावर टँकरने पाणीपुरवठा हा उपाय ठरू शकत नाही. यासाठी रखडलेले रणवरेवाडी, तळपवाडी, सोनुर्ले यांसारखे व अन्य गरजेच्या ठिकाणी महत्वाकांक्षी लघू पाटबंधारे प्रकल्प गतीने पूर्ण होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. त्यातून पाणीटंचाई मिटेल. शिवाय जल-जमीन समीकरण विकासाकडे सरकू शकेल आणि आपसूक उत्पन्नाचे स्रोत वाढीस मदत होईल. टीकेचे लक्ष्य ठरलेला 'वारणा' उजवा कालवा आणि त्याचा सोक्षमोक्ष लावण्याचे वेगळे आव्हानही आहेच. जलसंधारण मोहिमेला आश्वासक गती द्यावी लागणार आहे.

पर्यटनवृद्धीच्या पातळीवर विशाळगड, पन्हाळगड या ऐतिहासिक वारसास्थळांचे जतन, संवर्धन करण्यासाठी पुरातत्व खात्याशी समन्वय, बांबवडे येथे बहुप्रतिक्षित पोलिस ठाण्याची निर्मिती, आतापर्यंत सुमारे ५० लाखांचा खर्च पोटात घेऊन अपवाद वगळता अद्याप श्रीगणेशा न झालेले तालुका क्रीडा संकुलाचे काम पूर्ण करून युवक कल्याण साधणे, डोंगरी भागातील मोडकळीस आलेल्या शाळा इमारतींचा प्रश्न, विविध सरकारी कार्यालयांतील रिक्त पदांचा घोळ, गिरणी कामगारांचे प्रश्न, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणी, कोकण रेल्वे तसेच कडवे (मलकापूर) ते शित्तूरवारुण (चांदोली) मार्गाचे दिलेले आश्वासन, कोडोली येथे एकाच छताखाली प्रशासकीय सेवाकेंद्र उभारणी, कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय मार्ग, राजापूर-विटा राज्यमार्ग, बोरपाडळे-वाठार अशा प्रमुख मार्गांची प्रभावी निर्मिती, अणुस्कुरा, जुगाई येळवण परिसर, उदगिरी व धोपेश्वर तसेच मसाई पठार आदी ठिकाणचा पर्यटन विकास आणि वृद्धी अशा अनेक दुर्लक्षित बाबी डॉ. कोरेंची मोठी कसोटी पाहणाऱ्या आहेत.

भौगोलिक स्थितीवर मात करायला हवी

डोंगराळ आणि नैसर्गिक अडचणीच्या भौगोलिक परिस्थितीवर मात करून मतदारसंघाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिलो. यापुढेही माझा हाच प्रयत्न राहील. राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेतील कृषीपंप वीजजोडण्या, वाडी वस्तीवरील नळपाणी, रस्ते, वीज पोहचविणे, निराधार व परित्यक्ता महिलांना आर्थिक आधार, सोनुर्ले प्रकल्प, वन्य प्राण्यांमुळे उद्भवणाऱ्या नुकसान भरपाई अशा अनेक प्रश्नांची तड लावण्यात यश मिळाले. शिवसेना पक्षप्रमुख तसेच सत्तेतील सहकारी मित्रांच्या पाठबळातून विकासकामांची प्रक्रिया यापुढेही सुरूच राहणार आहे. लोकांत मिसळून त्यांच्याकडून समस्या जाणून घेण्याचा स्वभाव माझ्यासाठी ऊर्जा देणारा आहे.

- सत्यजित पाटील, माजी आमदार

सेंट्रल स्कूल उपक्रमाचे ध्येय

संस्कार, संकल्प आणि सिद्धी या त्रिसूत्री विकासाच्या अजेंड्यानुसार आरोग्य, शिक्षण आणि रोजगार हे प्रश्न अग्रक्रमावर आहेत. त्यासाठी रोजगार निर्मितीच्या दृष्टीने हाती घेतलेला पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याचा आराखडा राबविण्यात येईल. कोरडवाहू क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी उपसासिंचन, बंधारे, लपा प्रकल्प पुर्ततेबाबत तसेच एमआयडीसी उभारणीसाठी सरकार दरबारी पाठपुरावा करणार आहे. जिल्ह्याच्या पर्यटन विकासाचा व्यापक दृष्टिकोन समोर ठेवून युवकांना रोजगाराच्या प्रवाहात आणण्याचा मानस आहे. महिलांच्या सबलीकरणाचा भाग म्हणून गृहउद्योग संकल्पना सत्यात उतरवणे, छोट्या वाडी- वस्त्यांच्या ठिकाणी एकत्रित सेंट्रल स्कूल हा अभिनव उपक्रम राबविणार आहे.

- विनय कोरे, आमदार

फोटो ओळी

तालुक्यातील युवकांना क्रीडा कौशल्य आणि शारीरिक जडणघडण विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे परंतु कित्येक वर्षे रखडलेले हे बांबवडेच्या माळावरील तालुका क्रीडा संकुल पूर्ण होणार कधी? असा प्रश्न आहे.

वारणा उजवा कालवा बहुतांश बागायती क्षेत्रातून गेला आहे. प्रारंभीच्या टप्प्यातील गळतीमुळे नापिकीचा अनुभव घेणाऱ्या लगतच्या शेतकऱ्यांना हा कालवा त्रासदायक ठरला. हा प्रश्न निकालात काढण्याचे आव्हान आहे.

दृष्टिक्षेपात शाहूवाडी-पन्हाळा

एकूण मतदार : २,८७,६२९

झालेले मतदान : २,२९,८११

मतदानाची टक्केवारी : ७९.९० टक्के

शाहूवाडीतील गावे : १३१

पन्हाळ्यातील गावे : ६९

एकूण गावे : २००

मतदारसंघाचा विस्तार : ८५ कि.मी.

शाहूवाडीतील प्रलंबीत प्रश्न

- विशाळगड, पन्हाळगड या ऐतिहासिक वारसास्थळांचे जतन

- अणुस्कुरा, जुगाई येळवण, उदगिरी, धोपेश्वर, मसाई पठारचा विकास

- बांबवडे येथे बहुप्रतिक्षित पोलिस ठाण्याची निर्मिती

- तालुका क्रीडा संकुलाचे रेंगाळलेले काम पूर्ण करणे

- मोडकळीस आलेल्या शाळा इमारतींची फेरउभारणी

- सरकारी कार्यालयांतील रिक्त पदांची भरती करणे

- तालुक्यातील मुंबईकर गिरणी कामगारांचे प्रश्न

- मतदारसंघात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारणी

- कोकण रेल्वे, कडवे (मलकापूर) ते शित्तूरवारुण (चांदोली) मार्गाची पूर्तता

- कोडोलीत एकाच छताखाली प्रशासकीय सेवा केंद्र उभारणी

- कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय, राजापूर-विटा राज्य, बोरपाडळे-वाठार प्रमुख मार्ग निर्मिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टरांच्या मानसिक आरोग्यासाठी ई- बुकलेट

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

अपुऱ्या वैद्यकीय सोयीसुविधा, वाढती रुग्णसंख्या डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यामुळे निवासी डॉक्टर व वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मानसिक तणावाला सामोरे जावे लागत आहे. या अनुषंगाने इंडियन मेडिकल असोसिएशनने 'डॉक्टर्स फॉर डॉक्टर्स' नावाचा प्रोजेक्‍ट हाती घेतला आहे. याद्वारे स्वयं फाउंडेशनच्यावतीने निवासी डॉक्टर व वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी खास 'ई-बुकलेट' तयार करण्यात आले आहे. हे पुस्तक मोफत ऑनलाइन उपलब्ध असणार आहे.

गेल्या तीन वर्षांत डॉक्टरांवर होणारे हल्ले वाढत आहेत. शहरात वर्षभरात सहाहुन अधिक डॉक्टरांना मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. रुग्ण आणि डॉक्टरांमध्ये विसंवाद वाढू लागला आहे. कायदा असूनही त्याच्या अंमलबजावणी अभावी डॉक्टरांना पुरेसे संरक्षण मिळत नाही. त्यामुळे बहुतांशी असुरक्षित वातावरणात सेवा देत आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत अपुऱ्या डॉक्टर संख्येचा ताण त्यांच्यावर आहे. वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर हॉस्पिटल उभारणी व इतर बाबींमध्ये येणाऱ्या आर्थिक समस्यांचा ताण येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर दिवसेंदिवस वैद्यकीय शिक्षण महाग होत असून एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना आर्थिक ताणाला सामोरे जावे लागते जावे लागते. यातून आलेल्या नैराश्यामुळे आत्महत्येसारख्या घटना वाढत आहेत. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार ३० टक्के मेडिकल व्यवसायाशी संबंधित लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने पुढाकार घेतला आहे.

आयएमएकडून काढण्यात आलेल्या ई- बुकलेटमध्ये एमबीबीएस विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्यांची मांडणी करण्यात आली आहे. परराज्यातील विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी, त्यांच्यासमोर उद्भवणारे प्रसंग, रॅगिंग, भेदभाव, लैंगिक शोषण आदी गोष्टीना सामोरे जाण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. पुस्तकाच्या माध्यमातून मानसिक आरोग्याचे धडे दिले जाणार आहेत. आहार, योगाबाबत तज्ञांनी लिहिलेले लेख पुस्तकात आहेत. कौशल्य विकास, जीवनशैली, विविध आजार, मानसिक, भावनिक वर्तन, नातेसंबंध, ताणतणावाचे व्यवस्थापन, नोकरीतील वरिष्ठांशी संबंध आदी घटकांवर मार्गदर्शन केले आहे. महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सचावतीने हे ई-बुक एमबीबीएसच्या पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांपर्यंत पोचवले जाणार आहे.

वैद्यकीय शिक्षण घेताना मानसिक ताणतणाव व येणाऱ्या अडचणींवर मात करण्‍यासाठी हे ई-बुक मार्गदर्शक ठरणार आहे. पुस्तक ऑनलाइन उपलब्ध असल्याने वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणांना त्याचा फायदा होईल. यामुळे ताणतणावाचे व्यवस्थापन करणे सोपे जाईल.

- माधवी देशपांडे, विद्यार्थिनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मटा-माधवबाग आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

महाराष्ट्र टाइम्स आणि माधवबाग क्लिनिक यांच्यातर्फे आयोजित आरोग्यविषयक 'मधुमेह तपासणी व हृदय शुद्धीकरण थेरपी' मार्गदर्शन शिबिराला पहिल्या दिवशी, रविवारी चांगला प्रतिसाद मिळाला. ताराबाई पार्कातील धैर्यप्रसाद सांस्कृतिक हॉलसमोरील माधव क्लिनिकसह क्रशर चौक, सानेगुरुजी वसाहत रोड, राजारामपुरी सहावी गल्ली, मंगळवार पेठेतील आहार हॉटेलसमोरील माधवबाग क्लिनिकमध्ये शेकडो नागरिकांची तपासणी करण्यात आली. १४ नोव्हेंबरपर्यंत हे शिबिर सुरू राहणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात दरवर्षी मधुमेही रुग्णांत दहा टक्यांनी वाढ होत आहे. बदलत्या जीवनशैलीने आगामी काळात प्रत्येक कुटुंबात एक मधुमेह असणारा व्यक्ती असेल अशी भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये आरोग्य विषयक जागृती आणि मधुमेह व हृदयरोग टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी यासंबंधी नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. 'सेव्ह माय हार्ट' या संकल्पनेनुसार हा मोफत आरोग्य विषयक उपक्रम होत आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर १४ नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सर्वत्र आरोग्य विषयक उपक्रम, मधुमेह रोगाविरोधात प्रबोधन आणि हृदयरोग टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी या अनुषंगाने आरोग्य कार्यक्रम होतात. त्या अनुषंगाने नागरिकांना आरोग्य विषयक नेमक्या टिप्स मिळाव्यात, त्यांच्या आरोग्य विषयक तक्रारींचे निरसन व्हावे, यासाठी 'मटा' व 'माधवबाग' यांनी 'मैत्री मधुमेहाशी' व 'सेव्ह माय हार्ट' ही संकल्पना राबवली आहे.

याशिवाय माधवबागच्या 'संपूर्ण हृदय शुद्धीकरण थेरपी'चे मोफत मार्गदर्शन देण्यात येत आहे. नागरिकांनी तपासणीसाठी येताना जुने रिपोर्टस व औषधे घेऊन यावेत. शिबिराचा कालावधी रोज सकाळी नऊ ते सायंकाळी सहा असा आहे. शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी ताराबाई पार्क क्लिनिक : ८०५५८४६७७७, क्रशर चौक, साने गुरुजी वसाहत : ९७३०६०७३९१, राजारामपुरी क्लिनिक, ६ वी गल्ली : ९३७१३२४७८०, मंगळवार पेठ क्लिनिक : ८६९८४५५५९९ येथे संपर्क साधावा.

अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टीबाबत मार्गदर्शन

ज्या रुग्णांची यापूर्वी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास झाली असेल किंवा त्यांना करायला सांगितली आहे अशा रुग्णांना शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत मार्गदर्शन व तपासणी करण्यात येणार आहे.

हृदय शुद्धीकरण थेरपी मार्गदर्शनाचे फायदे

- हृदय शस्त्रक्रिया टळू शकते

- मधुमेह व उच्च रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो

- पूर्ण आयुर्वेदिक व विना शस्त्रक्रिया उपचार

- कोणतेही साइड इफेक्ट नाहीत, वेदनाशून्य उपचार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वरकमाईचा दर दहा लाखांवर

0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : 'पैसे द्या अन काम करून घ्या, अन्यथा न्यायासाठी कोर्टात जा,' अशी व्यवस्था येथील माध्यमिक शिक्षण विभागात केल्याने भ्रष्टाचार फोफावतच चालला आहे. एका वैयक्तिक मान्यतेच्या वरकमाईचा आकडा दहा लाखांवर पोहचला आहे. तर 'पे युनिट, दे युनिट' बनले आहे. एक लाखांच्या बिलासाठी आठ ते दहा टक्के द्यावे लागत आहेत, असे शिक्षक सांगतात. हायस्कूल आणि 'माध्यमिक' मधील लिपिक, अधीक्षक ते वरिष्ठ अशी खाबुगिरीची साखळी निर्माण झाली आहे. यामुळे शिक्षकांची आर्थिक लूट होत आहे.

जिल्ह्यात एकूण ९७६ हायस्कूल आहे. यांचे सर्व प्रशासकीय कामकाज 'माध्यमिक'मधून चालते. येथील खाबुगिरीमुळे नेहमी चर्चेत राहिली आहे. येथील अलिकडचे शिक्षणाधिकारी यामुळेच प्रचंड वादग्रस्त ठरले आहेत. यापूर्वीच्या शिक्षणाधिकारी ज्योत्स्ना शिंदे याहीही यांचीही याच कारणांमुळे उचलबांगडी झाली. पुण्यात बदली झाल्यानंतरही त्यांनी मूळ खाबुगिरीचा 'कित्ता' गिरवत राहिल्याने महिन्यांपूर्वी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला.

दरम्यान, त्यांच्या बदलीनंतर किरण लोहार शिक्षणाधिकारी म्हणून रूजू झाले. त्यांच्यावरही गंभीर आरोप झाले. यातूनच चार सदस्यीय समितीतर्फे त्यांच्या प्रशासकीय कामकाजाची चौकशी झाली. चौकशीत लोहार कर्तव्यात कसुरी करतात, दप्तर दिरंगाई करतात, सरकारी नियमांचे उल्लघंन करतात. यामुळे त्यांना जिल्हा परिषद सेवेतून कार्यमुक्त करावे, असा शेरा देण्यात आला. तरीही त्यांच्यावर वरिष्ठांनी अद्याप कारवाई का केली नाही, हा प्रश्न अनुत्तरित राहत आहे.

परिणामी विभागातील कामकाज मागील पानावरून पुढे असाच सुरू आहे. वेळोवेळी ढपल्याचा विषय चव्हाट्यावर येऊनही कामकाजात सुधारणा झालेली नाही. अर्थपूर्ण वाटाघाटी केल्यानंतरच प्रस्तावांना मान्यता दिली जात आहे. हायस्कूलमधील लिपिकांतर्फे कामानिहाय लाचेचे दर निश्चित करून प्रस्तावावर कार्यवाही केली जात आहे. यातून महिन्याला कोट्यांवधीची वरकमाई गोळा केली जात असल्याचे सार्वत्रिक आरोप होत आहेत. कमाईची चटक लागलेले अधिकारी पैशांनी कुणालाही विकत घेऊ शकतो, अशा अविर्भावात वावरत असतात.

१५ लाखांच्या

पिशवीत तक्रार

शिक्षणाधिकारी लोहार यांच्याविरोधात भ्रष्ट, नियमबाह्य कामकाजाविरोधात जि. प. सदस्य राजवर्धन निंबाळकर यांच्यासह अनेक सदस्यांनी तक्रारी केल्या. सुरुवातीला तक्रारदार सदस्यांनाच विविध आमिष दाखवण्याचे प्रयत्न झाले. तरीही निंबाळकर तक्रारींचा ठोस पाठपुरावा करीत राहिले. यामुळे तक्रारींवर कारवाई होऊ नये, यासाठी मंत्रालयस्तराव मॅनेज करण्याचे वाट शोधण्यात आली. तक्रार झाली की १५ लाखांपर्यंत पिशवी पोहच करायची, सगळ्यातून क्लिनचीट मिळवायची असे उद्योग सुरू आहेत. यामुळे संबंधित अधिकारी खासगीत'कितीही तक्रारी होऊ दे, १५ लाखांची पिशवी पोहच केली की काहीही होत नाही,' असे म्हणत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

कक्ष काढून घेतला

जि. प. इमारतीमध्ये माध्यमिक विभाग आहे. 'माध्यमिक'मधील भ्रष्टाचारामुळे जि. प. बदनाम होत आहे. त्यामुळे इमारतीमधून 'माध्यमिक'ला हाकलावे, अशी मागणी अनेकवेळा सदस्यांनी सभेत केली. पैसे तुम्ही घेणार बदनामी जि. प. ची करणार असा आक्षेप घेण्यात आले. म्हणूनच पहिल्या टप्यात त्यांचा एक कक्ष काढून घेऊन ग्रामीण विकास यंत्रणेला देण्यात आला आहे.

माध्यमिक शिक्षण विभागात पैसे दिल्याशिवाय काम होत नाही. पैसे न देणाऱ्यांच्या प्रस्तावात त्रुटी काढून हेलपाटे मारायला लावले जाते. जाणीवपूर्वक कोर्टात प्रस्ताव जाईल, याकडे विशेष लक्ष दिले जाते. यामुळे पैसे द्या नाहीत तर 'माध्यमिक'मध्ये कामासाठी येऊ नये, अशी व्यवस्था निर्माण झाली आहे. यास वरिष्ठ आणि मंत्र्याच्या स्तरावरून अभय मिळत आहे. याचा सर्वाधिक त्रास प्रामाणिक शिक्षकांना होत आहे.

बी. डी. पाटील, सल्लागार, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघ

प्रमुख कामांसाठी लाचेचे दर असे :

वैयक्तिक मान्यता : ५० हजार ते १० लाखांपर्यंत

नविन पदमान्यता : ८ ते १० लाख

पदोन्नती : ५० हजार

बदली मान्यता : १० ते ५० हजारपर्यंत

समायोजन : ५० हजार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छतेसाठी सरसावले खेळाडू

0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्यावतीने रविवारी राबवण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेला शहरातील खेळाडूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेषत: त्यांनी उद्यानातील स्वच्छतेला प्राधान्य दिले. महापालिका आरोग्य कर्मचाऱ्यांनी जयंती नाल्यामध्ये परतीच्या पावसाने आलेला कचरा बाहेर काढला. स्वच्छता मोहिमेद्वारे दहा टन कचऱ्याची उचल करण्यात आली. त्यानंतर ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.

परतीच्या पावसामुळे जयंतीनाला पुन्हा ओव्हर फ्लो झाला. पावसाच्या पाण्याबरोबर मोठ्याप्रमाणात प्लास्टिक पिशव्या वाहत आल्या होत्या. हुतात्मा गार्डन येथे असलेल्या लोखंडी जाळीमध्ये प्लास्टिक अडकून राहिल्याने पाण्याला अडथळा निर्माण झाला होता. सकाळी स्वच्छतेला सुरुवात झाल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी नाल्यात उतरून अडकलेला सर्व कचरा बाहेर काढला. बाहेर काढलेला सर्व कचरा कसबा बावडा येथील सरवळीमध्ये टाकण्यात आला.

मोहिमेमध्ये सहभागी झालेले ज्येष्ठ नागरिक, सामाजिक संस्था, खेळाडू यांनी उद्याने व सुशोभीत चौकांची स्वच्छता केली. सिद्धार्थनगर, यलम्मा मंदिर परिसर, पंचगंगा नदीघाट परिसर, जयंती नाला परिसरात आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वच्छता केली. महावीर उद्यान, हुतात्मा गार्डन, रंकाळा शाहू स्मृती बाग, दसरा चौक ते खानविलकर पंप, हॉकी स्टेडियम मुख्य रस्ता, पितळी गणपती ते धैर्यप्रसाद हॉल, सायबर चौक ते शेंडा पार्क मुख्य रस्ता, कसबा बावडा कोर्ट ते भगवा चौक मुख्य रस्ता आदी ठिकाणी शहरातील नागरिकांनी स्वच्छता केली. महावीर उद्यान येथे वृक्षप्रेमी व पक्कापाया संस्थेच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी स्वरा फाउंडेशन, पक्कापाया संस्था, प्राथमिक शिक्षण समिती, सहायक उद्यान अधीक्षक अपर्णा जाधव, विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, आरोग्य निरीक्षक अरविंद कांबळे, शिवाजी शिंदे, करण लाटवडे, सुशांत कावडे, मनोज लोट, नंदकुमार पाटील, शुभांगी पोवार, माधवी मसूरकर व शहरवासीय सहभागी झाले होते. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांचे मार्गदर्शनाखाली आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, पर्यावरण अभियंता आर. के. पाटील यांनी नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहिले.

अशी होती यंत्रणा

जेसीबी

१०

डंपर

आरसी गाड्या

पाणीपुरवठा टँकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खराब रस्त्यांवर सेनेचे अनोखे आंदोलन

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची दखल महापालिका प्रशासन घेत नसल्याच्या निषेधार्थ शिवसेना शहर शाखेच्यावतीने अनोख्या पद्धतीने रविवारी आंदोलन केले. शिवाजी पेठ येथील शिवाजी मंदिराजवळ रस्त्यावरील खड्ड्यांचेच लग्न लावले. मंगलाष्टका, रांगोळी आणि गोडधोड अशा अनोख्या वातावरणात प्रशासनाचा निषेध करण्यात आला. सत्तारुढ काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी रस्त्यासाठी निधी देत नसल्याचा आरोप नगरसेविका तेजस्विनी इंगवले यांनी केला.

शहरातील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत गल्लीतील रस्त्यांचीही दयनीय अवस्था झाली आहे. शिवाजी मंदिर ते सरदार तालमीकडे जाणाऱ्या रस्त्याची अशीच अवस्था झाली आहे. विरोधी आघाडीच्या नगरसेविका असल्याने रस्ता दुरुस्तीसाठी निधी दिला जात नसल्याचा आरोप करत शहर प्रमख रविकिरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली अनोखे आंदोलन करण्यात आले.

खड्ड्यांसोभवती रांगोळी घालण्यात आली होती. मंगलाष्टका म्हणत विधीवत पुजाऱ्यांच्या हस्ते खड्ड्यांसोबत प्रशासनाचा निषेधात्मक विवाह घडवून आणला. नगरसेविका इंगवले म्हणाल्या, 'नवीन रस्ता करण्यासाठी १५ लाखांचा निधी आवश्यक आहे. मात्र विरोधी आघाडीची नगरसेविका असल्याने निधी देण्यास विलंब केला जात आहे. प्रशासन व विरोधी आघाडीला जाग आणण्यासाठी हे प्रतिकात्मक आंदोलन केले.' यावेळी तात्या साळोखे, सागर शिपेकर, बाळासाहेब भोसले, उमेश जाधव, मंगेश इंगवले, राजाभाऊ घोरपडे, उदय माने आदी उपस्थित होते.

फोटो : शिवाजी पेठ शिवाजी मंदिर येथील रस्त्यावरील खड्ड्यांचे विवाह करत शिवसेनेच्यावतीने अनोख्या पद्धतीने आंदोलन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर खड्डेमुक्त करा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील नागरी प्रश्नांबाबत आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बोलवण्यात आलेल्या मेळाव्यामध्ये कोल्हापूर शहर खड्डेमुक्त करण्याचा ठराव करण्यात आला. शहरातील सर्व रस्ते दर्जेदार करावे, या मागणीसाठी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना शिष्टमंडळाच्यावतीने निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी चंद्रकांत यादव होते. ठरावानंतर डाव्या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी विविध सूचना मांडल्या.

आरोग्य, रस्ते आदी नागरी समस्या शहरात निर्माण झाल्या आहेत. नागरी समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सर्व डाव्या पक्षांच्यावतीने आंदोलन उभा करण्यात येणार आहे. विशेषत: रस्त्याचा प्रश्न गंभीर बनला आहे, यावर चर्चा करण्यात आली. विविध प्रश्नांवर विचारविनिमय करण्यासाठी टेंबे रोडवरील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात मेळावा झाला. सुरुवातीला सतीशचंद्र कांबळे यांनी कोल्हापूर शहर खड्डेमुक्त करण्याचा ठराव मांडला. त्याला सर्वांनी मंजुरी दिली. मात्र त्यासाठी अनेकांनी सूचनाही मांडल्या.

ज्येष्ठ कामगार नेते बाबा सावंत म्हणाले, 'रस्त्यांच्या दुरावस्थेला सर्वस्वी लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत. रस्त्यांचा दर्जा कायम सुस्थितीत राखण्यासाठी पंचवार्षिक योजना तयार करू. एखाद्या प्रभागामध्ये नवीन रस्ता झाल्यानंतर तो खराब झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित नगरसेवकांवर द्यावी व रस्त्याची दुरुस्ती त्यांच्या मानधनामधून करावी.' शेकापच्या महिला जिल्हाध्यक्षा अॅड. उज्ज्वला कदम म्हणाल्या, 'नागरिकांना मिळणाऱ्या सर्व सुविधा त्यांच्या करातून निर्माण झालेल्या निधीतून दिल्या जातात. निधीचा वापर मात्र योग्यरितीने होत नाही. बजेटचा योग्य वापर होत नसेल, तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो.'

संभाजीराव जगदाळे म्हणाले, 'डाव्या पक्षांनी केलेल्या चळवळी व आंदोलनाच्या माध्यमातून प्रश्नांची उखल झाली आहे. आंदोलनानंतर त्याचे श्रेय मात्र इतरांना मिळते. पक्षांच्या भूमिकेबाबत स्थापन झालेल्या सुकाणू समितीची बैठक घेऊन त्यामध्ये उहापोह करू. पण तत्पुर्वी शहरातील प्रश्नांबाबत आयुक्तांसोबत बैठक घेऊ.'

नामदेव गावडे म्हणाले, 'शहरातील अनेक आंदोलन कधी सुरू होतात, आणि कधी बंद होतात याची माहिती मिळत नाही. पण डाव्या पक्षांनी सुरू केलेले आंदोलन प्रश्नांची सोडवणूक झाल्याशिवाय बंद होत नाही. त्याच पद्धतीने आंदोलनाची दिशा ठरवावी.' अध्यक्षस्थानावरून बोलताना यादव म्हणाले, 'प्रस्थापित राजकीय पक्षांनी डाव्या पक्षांना नेहमीच सापत्न वागणूक दिली. पक्षाने मात्र सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी नेहमीच प्रयत्न केला. या आंदोलनातही सर्वांनी जोमाने सहभागी व्हावे.'

मेळाव्यास मधुकर पाटील, रमेश वडणगेकर, शंकरराव कटाळे, बाबुराव कदम, वसंतराव पाटील यांच्यासह डाव्या पक्षातील कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तालीम संघाच्या अध्यक्षपदी व्ही. बी. पाटील

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या अध्यक्षपदी व्ही. बी. पाटील आणि शहराध्यक्षपदी हिंदकेसरी दीनानाथ सिंह यांची निवड झाली. मोतीबाग तालमीत झालेल्या चौवार्षिक सर्वसाधारण सभेत नूतन कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली. जिल्हा कार्यकारिणीत चीफ पेट्रन बाळासाहेब गायकवाड, सरचिटणीस ॲड. महादेवराव आडगुळे, कार्याध्यक्ष संभाजी वरुटे, उपाध्यक्ष हिंदकेसरी विनोद चौगले, संभाजी पाटील, विष्णू जोशीलकर, नामदेव पाटील, अमृता भोसले, आर. के. पवार, बाळासाहेब शेटे, कार्यालयीन सेक्रेटरी यशवंत मुडळे, चिटणीस अशोक पवार, संभाजी पाटील, राजाराम चौगुले, बाजीराव पाटील यांचा समावेश आहे. शहर कार्यकारिणीत कार्याध्यक्ष अशोक माने, उपाध्यक्ष पी. जी. पाटील, रंगराव कळंत्रे, रवींद्र पाटील, विजय साळोखे-सरदार, सर्जेराव पाटील, सचिवपदी प्रकाश खोत, विश्वास हारुगले, बापू लोखंडे, अमित गाठ यांची निवड करण्यात आली. राज्य कुस्तीगीर परिषदेवर जिल्ह्यातून संभाजी वरुटे, अमृता भोसले, बाळासाहेब लांडगे, अशोक माने यांना पाठवण्यात आले. मोतीबाग तालीम वस्तादपदी अशोक माने यांची निवड झाली. बैठकीत महान भारत केसरी दादू चौगले, भिकक्षेठ पाटील, कपिल सनगर, विक्रम मोरे, करण लव्हटे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. बैठकीत तालीम संघाचे अध्यक्ष, रुस्तुम-ए-हिंद पै. दादू चौगले यांच्या स्मृती जपण्यासाठी कोल्हापुरातील एखाद्या क्रीडांगणाला नाव देण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याच्या विषयाला मंजुरी दिली. कोल्हापूरच्या तालीम संघाचे कार्य राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचावे यासाठी तालीम संघाची वेबसाईट तयार करण्याची जबाबदारी अमितकुमार गाट यांच्यावर सोपविण्यात आली. यावेळी नूतन जिल्हाध्यक्ष पाटील व हिंदकेसरी सिंह यांनी मोतीबाग तालमीत दोनशे मल्लांसाठी वसतिगृह उभा करण्याचे आश्वासन दिले. रवींद्र पाटील बानगेकर यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापुरात लक्षवेधी मिरवणूक

0
0

सोलापुरात लक्षवेधी मिरवणूक

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त (ईद-ए-मिलाद) रविवारी जुलूस कमिटीच्या वतीने लक्षवेधी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत हमारे नबी पैदा हुए, नही छोडेंगे, नही छोडेंगे, नबी का दमन, नही छोडेंगे, नारे तकबीर, अल्लाहू अकबर...च्या घोषणांनी विजापूर वेस परिसर दणाणून गेला होता.

ईद-ए-मिलादनिमित्त रविवारी सोलापूर जुलूस कमिटीच्या वतीने मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीची सुरुवात पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून झाली. या वेळी शहर काझी अमजद अली, जुलूस कमिटीचे अध्यक्ष यु. एन. बेरिया, एमआयएमचे नेते फारूक शाब्दी आदी उपस्थित होते. विजापूर वेस येथून सकाळी साडेआठ वाजता मिरवणुकीस प्रारंभ झाला. या मिरवणुकीत मुस्लिम तरुण, लहान मुले डोक्यावर हिरवा फेटा, पांढऱ्या, काळ्या रंगाचे पठाणी वस्त्र परिधान करून आले होते. हातात हिरवा झेंडा, कपाळावर हिरव्या रंगाची पट्टी, गालावर चंद्रकोर कोरले तरुण लक्ष वेधून घेत होते. विविध प्रकारची वेशभूषा परिधान करून मुस्लिम बांधव मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणुकीतील देखावे उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.

..........

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवकाळीचा फटका आठ हजारांवर शेतकऱ्यांना

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहर आणि जिल्ह्यात झालेल्या परतीच्या, अवकाळी पावसामुळे आठ हजार २१४ शेतकऱ्यांचे १६०४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. त्याच्या भरपाईसाठी जिल्हा प्रशासनाने एक कोटी ६९ लाख २१ हजार रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवला आहे.

दरम्यान, अतिवृष्टी, महापुरामुळे ३ लाख ८ हजार शेतकऱ्यांचे ७४ हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. याच्या भरपाईसाठी सरकारकडे १०६ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. अवकाळीच्या नुकसानीसाठी मागितलेले पैसे मिळताच संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाईची रक्कम वर्ग करण्यात येणार आहे.

अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांवर पाणी फिरले. परिणामी संबंधित शेतकरी कोलमडून पडला. त्यांना दिलासा देण्यासाठी नुकसानीचा पंचनामा करण्यात आला. मात्र पंचनामा करताना नुकसानग्रस्त उभ्या पिकांचेच करण्यात आले. काढणी केलेल्या, रब्बी हंगामासाठी उभ्या पिकांवर नांगर फिरवलेले क्षेत्र आताच्या पंचनाम्यात समाविष्ट करण्यात आले नाही. यामुळे अवकाळीच्या नुकसानीचे क्षेत्र कमी दिसते. मात्र अतिवृष्टी, महापूर, अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे.

००००

नुकसानग्रस्त तालुकानिहाय शेतकरी

तालुका शेतकरी संख्या भरपाईसाठी मागितलेली रक्कम

करवीर १४४ ५ लाख ६१ हजार

कागल १२६ ३ लाख ४८ हजार

राधानगरी ३३४ ६ लाख १ हजार

गगनबावडा ० ००

पन्हाळा १५१२ ११ लाख ७५ हजार

शाहूवाडी ११८५ १२ लाख २४ हजार

हातकणंगले ४८० १२ लाख २४ हजार

शिरोळ ७०४ ११ लाख ६५ हजार

गडहिंग्लज १५० ५९ लाख ८९ हजार

आजरा ३४७४ ४७ लाख ९ हजार

चंदगड १०५ ४ लाख ४७८ हजार

भुदरगड ० ००

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोरेगावात सापडलेदहा गावठी बॉम्ब

0
0

कोरेगावात सापडले

दहा गावठी बॉम्ब

सातारा :

कवाडेवाडी (ता. कोरेगाव) येथे दहा गावठी बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली आहे. सातारा पोलिस दलातील बॉम्ब शोधक पथक व श्वान पथकाने (डॉग स्कॉड) हे सर्व बॉम्ब निकामी केले आहेत. हे सर्व गावठी बॉम्ब असून, शिकारीसाठी त्यांचा वापर होत असण्याची शक्यता आहे.

रविवारी सकाळी कवाडेवाडी येथे बॉम्ब असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तत्काळ बॉम्ब शोधक पथकासह डॉग स्कॉड घटनास्थळी दाखल झाले. वाठार पोलिस ठाण्याच्या हद्दीत डोंगरावर पोलिसांची शोध मोहिम सुरू झाली. सकाळी सुरू झालेली शोधमोहिम दुपारपर्यंत सुरू होती. कवाडेवाडी गावच्या हद्दीत बॉम्ब असल्याची माहिती पसरल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले, बघ्यांची गर्दी उसळली होती. चार तासांहून अधिक काळ बॉम्ब शोधण्याची मोहिम राबवली. प्राथमिक माहितीनुसार दहाहून अधिक बॉम्ब पोलिसांना सापडले. सातारा पोलिस दलाने सर्व गावठी बॉम्ब शोधून काढल्यानंतर सुटकेचा नि:श्वास सोडला. पोलिसांचा दुपारपर्यंत घटनास्थळाचा पंचनामा सुरू होता. सर्व घटनेची माहिती घेऊन संशयितांचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू होती.

.......

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डांबरी खडीसाठी प्लास्टिकचा वापर

0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करून डांबरी खडी तयार करण्याचा प्रकल्पाला रविवारपासून सुरुवात झाली. महापालिकेच्यावतीने अवनि संस्थेने तयार केलेल्या डांबरी खडीचा वापर संभाजीनगर येथील पॅचवर्क कामासाठी वापर करण्यात आला. प्लास्टिकवर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पामुळे शहरातील रस्त्यांचा दर्जा सुधारण्याबरोबरच शहर प्लास्टिकमुक्त होण्याकडे वाटचाल सुरू झाली असल्याचे मानले जात आहे.

शहरात दैनंदिन सुमारे १८० टन कचरा संकलित केला जातो. त्यामध्ये सुमारे दहा ते १२ टन प्लास्टिकचा समावेश असतो. प्लास्टिकच्या वापरांमुळे प्रदूषणामध्ये भर पडत आहे. प्लास्टिकमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना प्लास्टिकवर प्रक्रिया करण्याचे अनेक प्रयत्न झाले. त्याचाच एक भाग म्हणून अवनि संस्थेने प्लास्टिकपासून डांबरी खडी तयार करण्याची तयारी दर्शवली होती. त्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी व आयुक्तांना निवेदन देऊन परवानगी मागितली होती. त्यानुसार रविवारपासून प्लास्टिकवर प्रक्रिया करण्यास संस्थेमार्फत सुरुवात झाली.

शहरातील रस्त्यांचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. शहरवासियांना खड्डेमय रस्त्यांतून दिलासा देण्यासाठी पॅचवर्कचे काम हाती घेतले आहे. महापालिकेचा डांबरी प्लांट पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने त्यावर मर्यादा येत आहेत. यावर उपाय म्हणून प्लास्टिकपासून डांबर खडी तयार करण्याचे प्रयत्न सुरू होते. कोकणातील रस्ते याच पद्धतीने तयार केले जात असल्याने त्याच पद्धतीचे शहरातील रस्ते तयार करण्याचा प्रयत्न सुरू होते. त्यासाठी अवनि संस्थेने पुढाकार घेतला. महापालिकेने सुमारे अडीच लाख किंमतीचे प्लास्टिक श्रेडिंग मशीन खरेदी करून अवनि संस्थेस दिले. संस्थेने या मशिनच्या माध्यमातून शिरोली नाका येथे प्रक्रिया करण्यास सुरुवात केली. मशिनमध्ये प्लास्टिकचे मिलीमिटरमध्ये तुकडे केले जात आहेत. आठ मि.मी.चे तयार झालेले तुकडे डांबरी खडी करण्यासाठी वापरले जात आहेत. पहिल्याच दिवशी प्रक्रिया केलेली खडी संभाजीनगर येथील पॅचवर्कच्या कामासाठी वापरण्यात आली. पहिल्या दिवशी ४० किलो प्लास्टिकचा वापर खडी करण्यासाठी केला.

१८० टन

दैनंदिन कचरा संकलन

१३० टन

ओला कचरा

सुमारे १० टन

प्लास्टिक कचरा

५०० कि.

डांबरी खडीसाठी जमा होणारे प्लास्टिक

अवनि संस्था काही ठराविक भागातील कचरा संकलित करत आहे. त्यामधील प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी संस्थेला श्रेडिंग मशीन देण्यात आले आहे. श्रेडिंगमधून तयार प्लास्टिकच्या तुकड्यांचा वापर डांबरी खडी तयार करण्यासाठी होत आहे.

नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीपीआर ब्लड बँकेत रक्ताचा तुटवडा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यात डेंगी रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सीपीआरमध्ये गर्दी होत आहे. त्यामुळे रक्ताला मागणी वाढल्याने सीपीआरच्या ब्लड बँकेत तुटवडा निर्माण झाला आहे. सामाजिक संस्था, महाविद्यालये आणि विविध संघटनेतील सदस्यांनी सामुहिक व वैयक्तिक रक्तदान करावे, असे आवाहन सीपीआर हॉस्पिटल प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

सीपीआरमध्ये उपचारासाठी जिल्ह्यासह सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कर्नाटक भागातील गोरगरीब मध्यमवर्गीय रुग्ण मोठ्या संख्येने येतात. सध्या डेंगीच्या साथीने थैमान घातले असून रुग्णाला मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासते. सीपीआरमध्ये साधारणत: दररोज दीड हजार रुग्ण उपचारासाठी येतात. रुग्णालयातील हृदयशस्त्रक्रिया व डायलिसिस सेंटरसाठी मोठ्या प्रमाणात रक्ताचा पुरवठा आवश्यक असतो. प्रसुतिगृहात गुंतागुंतीच्या प्रसूतीवेळी रक्ताची मागणी वाढते. थॅलेसिमिया, हिमोफिलिया, कॅन्सर रुग्णांना सातत्याने रक्त द्यावे लागते. सध्या दात्याकडून रक्त मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे. त्यामुळे वाढदिवस, स्मृतिदिन व इतर सामाजिक व राजकीय संस्थांनी पुढाकार घेऊन रक्तदान करण्याचे आवाहन सीपीआर प्रशासनाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातारा शिल्लक

0
0

शॉर्टसर्किटमुळे आग;

ऊस जळून खाक

सातारा :

सोमंथळी (ता. फलटण) येथील शेतात महावितरणच्या पोलवरील शॉर्टसर्किटमुळे आग लागून ऊस जळून खाक झाला. वीज वितरण कंपनीच्या अनगोदी कारभारामुळे शॉर्टसर्किट झाल्याची तक्रार नुकसानग्रस्त शेतकऱ्याने केली आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार साधू आप्पा शिंदे यांच्या शेतात बारा वाजण्याच्या सुमारास महावितरणच्या वीजेच्या खांबावर जोरदार आवाज होऊन शॉर्ट सर्किट झाल्याने उसाने पेट घेतला. क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आग आटोक्यात आल्यामुळे मोठे नुकसान टळले, अन्यथा शेजारचे उसाचे क्षेत्र वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले. साधू आप्पा शिंदे यांचे ऊस क्षेत्र जळाले असून. लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. महावितरण शाखा अभियंता निकम यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. वरिष्ठ कार्यालयास अहवाल सादर केला जाणार आहे.

..........

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

सातारा :

लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर वारंवार अत्याचार करणाऱ्या एकासह त्या युवतीला शिवीगाळ करणाऱ्या त्याच्या पत्नी विरुद्ध सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा शहर परिसरातील एक २४ वर्षीय युवतीची ओळख विजय राजाराम शिंदे (रा. आसनगाव, ता. कोरेगाव) या विवाहित व्यक्तीशी झाली. त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. विजय शिंदे याने २२ जुलै ते ऑक्टोंबर २०१९पर्यंत संबंधित युवतीला लग्नाचे आमिष दाखवून विजय शिंदे याने संगम माहुली येथील आपल्या मित्राच्या फ्लॅटवर आणि वाढे फाटा परिसरातील एका लॉजवर नेऊन वारंवार अत्याचार केला. संबंधीत मुलीने विजय शिंदे याच्याकडे लग्नाचा तगादा लावताच त्याने तिला मारहाण करून धमकी दिली. दरम्यान, विजय शिंदे यांची पत्नी अर्चना विजय शिंदे (रा. सदर बाझार, सातारा) हिने आपल्या पतीच्या मोबाइलवरून संबंधीत युवतीला माझ्या पतीशी संबंध ठेऊ नकोस, त्यांना फोन करू नको, असे म्हणत शिवीगाळ केल्याची तक्रार संबंधीत युवतीने सातारा शहर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. दरम्यान, या घटनेतील दोघेही पती-पत्नी फरार झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रोजगार निर्मितीला चालना हवी

0
0

संपत पाटील, चंदगड

चंदगड विधानसभा मतदारसंघात चंदगड तालुका, गडहिंग्लज तालुक्याचे चार व आजऱ्यातील एक जिल्हा परिषद मतदारसंघाचा समावेश आहे. गेल्या पाच वर्षात मतदारसंघात विकासाचा प्रयत्न केला गेला. मात्र, अजूनही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. चंदगड तालुका हा निसर्गसौदर्याने नटला आहे. येथे गावोगावी शिक्षणाची सोय झाल्याने अनेक तरुण उच्चशिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत. मात्र, त्यांच्या हाताला काम नसल्यामुळे बेकारांची जणू फौजच निर्माण होत असल्याचे चित्र आहे. हजारो बेरोजगार युवक व्यसनाधीन बनत चालल्याचे चित्र आहे. मतदारसंघात पुरेसा रोजगार नसल्यामुळे अनेक तरुण रोजगारासाठी बाहेर आहेत. मतदारसंघातील औद्योगिक वसाहतींत तरुणांच्या हाताला काम मिळेल, एवढे मोठे उद्योग अद्याप उभारले गेलेले नाहीत. त्यामुळे कितीही शिकले तरी कामासाठी बाहेर गेल्याशिवाय पर्याय रहात नाही. यासाठी नेत्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे.

चंदगड तालुक्यामधील हलकर्णीत औद्योगिक वसाहत आहे. मात्र, या ठिकाणी बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल असा एकही मोठा उद्योग नाही. रस्ते, वीज व मुबलक पाणी यांसारख्या सुविधा असूनही उद्योजक का फिरकत नाहीत? याबाबत विचार होणे गरजेचे आहे. शिकून हाताला काम नसल्याने नैराश्यातून तरुण व्यसनाच्या आहारी जात आहेत. चार-पाच वर्षांपूर्वी एव्हीएच प्रकल्प आला. मात्र, प्रदुषणाच्या मुद्यावर त्यालाही कडाडून विरोध झाला. हा प्रकल्प अन्यत्र हलविण्यात आला. त्यानंतर येथे एकही मोठा प्रकल्प आला नाही. तालुक्यातील दौलत कारखान्यामुळे हजारो लोकांच्या हाताला काम मिळाले होते. मात्र कारखाना राजकारणाचा बळी ठरल्याने अनेक लोक बेरोजगार झाले आहेत.

तालुक्याचा भौगोलिक विस्तार मोठा असल्याने हवामानानुसार तालुक्याचे दोन भाग पडतात. पूर्व कर्यात भागातील मृदा काळी व पाणी धरुन ठेवणारी आहे. तर पश्चिम भागातील मृदा तांबूस रंगाची आहे. या मातीला जास्त पाण्याची गरज असते. तालुक्यात ३ मध्यम प्रकल्प तर १५ लघु पाटबंधारे प्रकल्प आहेत. त्यामुळे येथील शेतीला बारमाही पाणी मिळते. या पाण्यावर शेतकरी ऊस, रताळी, भुईमुग, बटाटे, मिरची, बिनीस, वांगी, चवळी, मसूर, मका यांसारखी बारमाही पिके घेतात. या शेतीमालावर आधारित प्रक्रिया करणारे उद्योग उभारण्याची गरज आहे.

गडहिंग्लज तालुक्यातील औद्योगिक वसाहतींमधील सर्व प्लाट कागदोपत्री विकले गेले आहेत. मात्र या जाग्यावर प्रकल्प उभारले गेले नसल्याने अद्यापही जागा मोकळ्याच पडून आहेत. या ठिकाणीही मोठे प्रकल्प उभारल्यास तरुणांच्या रोजीरोटीचा प्रश्न निकालात निघेल.

निवडणुकीत दिलेली आश्वासने

नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आश्वासनांची खैरात झाली. त्यामध्ये दिव्यांगांना शासकीय सवलती, पाटणे फाटा येथे अत्याधुनिक ट्राम केअर सेंटर, शेतीमालाला बाजारपेठ निर्माण करणार, शेती विकास संशोधनाला प्रोत्साहन देणार, शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणार, पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करुन बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी प्रयत्न करणार असे सांगितले गेले. शेतीमालाला हमीभाव, शेतकऱ्यांना बांधापर्यंत जाण्यासाठी पाणंद रस्ते करणार, ग्राहक उपयोगी मॉल उभारुन रोजगार निर्मिती, खेळ व व्यायामासाठी मैदान, चंदगड, आजरा, गडहिंग्लज येथील शेतीमाल व रानमेव्याला बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासह प्रत्येक तालुक्यासाठी माहीती व तंत्रज्ञान केंद्र उभारणी, बचत गटाच्या माध्यमातून उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यापर्यंत विविध विषय निवडणुकीत चर्चेला आले. त्यांच्यावर काम करण्याची गरज आहे.

या कामांना हवे प्राधान्य

गेल्या पाच वर्षात रस्ते तयार केले गेले. मात्र, अलिकडच्या काळातील तीन वर्षांत रस्त्यांवर केवळ मुरुम टाकण्यापलिकडे कोणतेही काम झाले नाही. त्यामुळे रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. यावर्षीच्या महापुरामुळे उरलेल्या रस्त्यांचीही दुरावस्था झाल्याने सध्या प्रवाशांना धक्के खात या रस्त्यांवरुन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे प्रथमत: रस्ते दुरुस्तीच्या कामांना प्रथम प्राधान्य देणे आवश्यक आहे. विकासकामांत चंदगड-बेळगाव राज्यमार्गाच्या चौपदरीकरणाला प्राधान्य हवे. सावंतवाडी-बेळगाव रेल्वेमार्ग झाल्यास चंदगड तालुक्याच्या विकासाला गती मिळेल. त्याचबरोबर बेळगाव व सावंतवाडीशी चंदगडकरांना जलदगतीने दळणवळणाची सोय उपलब्ध होईल. तिन्ही तालुक्यांत मोठ्या प्रमाणात पिके घेतली जातात. या पिकांवर आधारीत शेतीपूरक प्रक्रिया उद्योग उभारल्यास शेतकऱ्यांना उत्पन्नात भर पडेल. चंदगड तालुक्यातील वर्ग दोनच्या जमिनीमुळे शेतकऱ्यांना कर्ज काढण्यापासून अनेक व्यवहारांत अडचणी येतात. त्या जमिनी वर्ग एकमध्ये बदल करण्याची गरज आहे.

मतदारसंघात जे प्रश्न प्रलंबित आहेत, त्यांच्या सोडवणुकीसाठी प्राधान्य देणार आहे. महापुरामुळे मतदारसंघातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. त्यांच्या दुरुस्तीसाठी प्राधान्य देऊ. शेतीला लागणारे पाणी व पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आमच्या अजेंड्यावर आहेत. चंदगड व आजरा तालुक्यातील विविध स्थळे इको टुरीझमच्या माध्यमातून विकसित करणे शक्य आहे. मतदारसंघात उत्पादित होणाऱ्या काजू, फणस यांसारख्या फळांना व्यापारी बाजरपेठ उपलब्ध करुन देण्याचा विचार आहे. मतदारसंघात वन्य प्राण्यांचा होणारा त्रास टाळण्यासाठी वरिष्ठांची मदत घेऊन हा प्रश्न सोडविला जाईल.

- राजेश पाटील, आमदार

मतदारसंघामध्ये तरुणांच्या हाताला रोजगार, पक्के रस्ते, शेतीमालावर प्रक्रिया उद्योग, आरोग्य व शैक्षणिक सुविधा पुरविणे या बाबींवर आगामी पाच वर्षांत या गोष्टीवर काम करण्याची गरज आहे. मतदारसंघातील निसर्गसौंदर्य पाहता येथे पर्यटनाला चांगली संधी आहे. सिमेंटच्या जंगलातून लोक शांततेच्या शोधासाठी निसर्गाच्या सानिध्यात येतात. पर्यटनांच्या माध्यमातून मतदारसंघात रोजगारी निर्मितीला वाव मिळू शकतो. त्यावरही येत्या काळात काम होणे आवश्यक आहे. माझे मूळ गाव तालुक्यातील इनाम सावर्डे आहे. मी सद्या ठाण्यात वास्तव्याला असलो तरी तालुक्यातील लोकांशी मी नेहमी संपर्कात असतो. तालुक्यात महापुर आल्याने येथील नागरिकांचे दु:ख हलके करण्यासाठी मी गावी परतलो. तालुक्याचा दौरा करुन शक्य तितकी वैयक्तिक पातळीवर मदत केली. यावेळी लोकांच्या भावना पाहून आपण यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे या उद्देशाने प्रेरीत होऊन निवडणुकीला उभे राहिलो. निवडणुकीमध्ये माझ्यावर पन्नास हजाराहून अधिक लोकांनी विश्वास दाखविला आहे. त्यांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मतदारसंघातील लोकांच्यासाठी काम करत राहणार आहे.

- शिवाजीराव पाटील, अपक्ष उमेदवार

फोटो : हलकर्णी (ता. चंदगड) येथील औद्योगिक वसाहत एव्हीएच प्रकल्प प्रकल्पानंतर मोठे उद्योग आले नसल्याने जणू ओस पडली आहे.

मतदारसंघातील प्रमुख प्रश्न

- रस्त्याच्या दुरावस्थेमुळे प्रवास त्रासदायक

- पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न

- शेतीला चोवीस तास वीचेजी गरज

- पर्यटनाला वाव, पण प्रयत्न आवश्यक

- रोजगाराअभावी अनेक तरुण व्यसनाधीन

- अपुऱ्या आरोग्य सेवेमुळे अनेकजण गमावताहेत प्राण

- शैक्षणिक सुविधांचा अभाव

- वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी देशोधडीला

- चंदगड-बेळगाव राज्यमार्गाच्या चौपदरीकरणाला प्राधान्य हवे

- शेतीपूरक प्रक्रिया उद्योग उभारणी हवी

दृष्टिक्षेपात चंदगड

एकूण मतदार ३१८९१३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळांचा परिसर तंबाखूमुक्त करणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'शहर आणि जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये तसेच उच्चशिक्षण संस्थेच्या शंभर यार्ड परीघात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास कायद्यान्वये बंदी आहे. याची विक्री करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करावी', अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्या. तंबाखू नियंत्रण कायदा २००३ नुसार जिल्हास्तरीय तंबाखू सनियंत्रण समितीच्या बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक झाली.

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, 'पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या शाळा तंबाखूमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. दुसऱ्या टप्प्यात माध्यमिक आणि इतर खासगी शाळा तंबाखू मुक्त करण्यात येतील. आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या १९८० शाळांपैकी आतापर्यंत ९६६ शाळा तंबाखूमुक्त झाल्या आहेत. उर्वरित शाळा येत्या २५ नोव्हेंबरपर्यंत तंबाखूमुक्त करण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे. सर्व शिक्षण संस्था प्रमुख, प्राचार्य, मुख्याध्यापकांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. शाळा, महाविद्यालय परिसरात विशेष जनजागृतीपर फलक लावावेत. अल्पवयीन व्यक्तीतर्फे तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणे दंडात्मक गुन्हा आहे. म्हणून '१८ वर्षांखालील व्यक्तीस तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ‍ विक्री करणे हा गुन्हा आहे' असे फलक सर्वच दुकानावर लावणे विक्रेत्यांवर बंधनकारक आहे. याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी विक्रेत्यांची आहे. तंबाखू नियंत्रण कायद्याची जिल्ह्यात प्रभावी आणि परिणामकारक अंमलबजावणी करण्याबरोबरच गावागावात जनजागृती, प्रबोधनावर भर द्यावा. जागृतीसाठी जिल्हा, तालुकास्तरावर विशेष कार्यशाळेचे आयोजन करावे. यासाठी गटशिक्षणांधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा.'

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विलास देशमुख यांनी स्वागत केले. समुपदेशक चारुशीला कणसे यांनी तंबाखू नियंत्रण कायाद्यातंर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. अन्न, औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त मोहन केंबळकर, महापालिका प्रशासन अधिकारी एस.के.यादव, रवी कांबळे यांच्यासह सर्व गटशिक्षण अधिकारी तसेच सदस्य आणि सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. क्रांती शिंदे यांनी आभार मानले.

....

तंबाखूमुक्त झालेल्या शाळा

आजरा : ६९, भूदरगड : ८३, चंदगड : १०६, गडहिंग्लज :११९, गगनबावडा :११, हातकणंगले :१४५, कागल :६९, करवीर :७६, पन्हाळा : ५६, राधानगरी : ३०, शाहूवाडी :१३८, शिरोळ :६३.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महालक्ष्मी’बँकेच्या सभासदांचा गौरव

0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शतक महोत्सवाकडे वाटचाल करत असलेल्या महालक्ष्मी सहकारी बँकेचा वर्धापनदिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. कार्यक्रमात बँकेचे ज्येष्ठ सभासदांचा गौरव करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते सभासदांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी भारतीय भाषा आणि साहित्य विश्वकोष समितीचे प्रा. अविनाश सप्रे होते.

डॉ. ढेरे म्हणाल्या, 'रामायण व महाभारत ही कोणत्याही एका धर्माची महाकाव्ये नसून संपूर्ण भारतीय समाजाची महाकाव्ये आहेत. महाकाव्यातील अनेक संदर्भ सद्य:स्थितीला लागू होत आहेत. बँक गेल्या ८५ वर्षांपासून आर्थिक व्यवहार करत आहे. आर्थिक व्यवहार करताना बँकेकडून समाजभान जपले गेले आहे.' अध्यक्षीय भाषणात प्रा. सप्रे म्हणाले, 'सांस्कृतिक विकासासाठी बँकेचा विकास होणे महत्वाचे आहे. बँकेने ग्राहक व सभासदांचा विश्वास संपादन केला असल्याचे बँकेच्या आर्थिक उलाढालीवरुन दिसून येते.' याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ४८ ज्येष्ठ सभासदांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास उपाध्यक्ष उदय महेकर, संचालक अॅड. राजेंद्र किंकर, विनोद डिग्रजकर, केदार हसबनीस, श्रीकांत हेर्लेकर, पद्मजा आपटे, मेघा जोशी आदी उपस्थित होते. संचालक महेश धर्माधिकारी यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष संदीप कुलकर्णी यांनी स्वागत केले. नितीन डोईफोडे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तावडे हॉटेल परिसर मृत्यूचा सापळाच

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वीस वर्षांपूर्वी तावडे हॉटेल आलं की कोल्हापूर आलं अशी ओळख रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे व्हायची. त्यानंतर महानगरपालिकेने २००७मध्ये राबविलेल्या एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पातून तावडे हॉटेल ते सीपीआर चौक हा रस्ता विकसीत करण्यात आला. कोल्हापूरचे प्रवेशद्वार सिमेंटच्या रस्त्याने चकाचक झाले. पण गेल्या पाच वर्षांत देखभालीअभावी रस्ता खचला असून तावडे हॉटेल ते शिरोली टोल नाका हा रस्ता मृत्यूचा सापळा झाला आहे.

तावडे हॉटेलजवळील स्वागत कमानीतून शिरोली नाक्याकडे जाणाऱ्या दोन्ही बाजूंचे रस्ते खचले आहेत. शिरोली नाक्यावरुन तावडे हॉटेलकडे जाणारा रस्ता वेड्यावाकड्या पद्धतीने खचल्याने वेगाने येणाऱ्या वाहनांचा अपघात हमखास होणार असा 'डेंजर स्पॉट' तयार झाला आहे. रात्रीच्यावेळी खचलेल्या रस्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने किरकोळ अपघात होत आहेत. हा स्पॉट मृत्यूचा सापळा बनला आहे.

शिरोली टोलनाका बंद असल्याने या परिसराची आबाळ झाली आहे. स्पीडब्रेकरचे रबरी स्टड खराब झाल्याने लोखंडी खिळे वर आले आहेत. पाणीपुरवठा आणि ड्रेनेज लाइनसाठी सिमेंटच्या रस्त्याच्यामध्ये खोदाईच्यादृष्टीने दहा ते वीस फूटांचे डांबरी रस्ते बांधले आहेत. डांबरी रस्ते खराब झाल्याने सिमेंट आणि डांबरी रस्ते जिथे जोडले, तिथे मोठ्या खाचा पडल्या आहेत. प्रकल्पात निम्मा रस्ता सिमेंटचा आणि निम्मा डांबरी असा बनवला आहे. सातत्याने होणाऱ्या वाहतुकीने डांबरी रस्ते खराब होऊ लागले आहेत. देखभाल न झाल्यास पुढील दोन वर्षांत या रस्त्यांवर खड्ड्याचे साम्राज्य पहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ताराराणी चौक ते व्हीनस चौक या रस्त्यांवरील छोटे मोठे खड्डे पडले आहेत. स्टेशन रोड ते व्हीनस चौक या रस्त्यांवर खड्ड्यांची संख्या जास्त आहे. काही ठिकाणी पॅचवर्क केले असले तरी त्याचा दर्जा ढिसाळ आहे. व्हीनस चौक, दसरा चौक ते सीपीआर चौक या परिसरातील रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेले फुटपाथ काही ठिकाणी गायब झाले आहेत. रस्ते विकास प्रकल्प सुरू असताना शाहूपुरी पोलिस ठाण्याची इमारत प्रकल्पात अडथळा ठरत होती. त्यामुळे हा रस्ता अरुंद झाला. सध्या पोलिस ठाण्याची इमारत पाडली असली तरी रस्ता रुंदीकरण झालेले नाही.

फुलेवाडी रस्त्यांवरही खड्डे

फुलेवाडी रिंगरोड ते रंकाळा टॉवर या रस्त्यांवर दोन ठिकाणी खराब रस्त्यांचे मोठे पॅच आहे. फुलेवाडी अग्निशमन स्टेशनजवळील रस्त्यांवर मोठा खड्डा पडला आहे. प्रकल्प सुरू असताना रंकाळा डी मार्ट रस्त्यांचे काम रखडल्याने तिथला रस्ता खराब सुरु झाला आहे. टोल रद्द झाल्यानंतर महानगरपालिकेकडून रस्ता देखभालीचे प्रयत्न झाले नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरकरांना थंडीची चाहूल

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानात घट होऊ लागल्याने कोल्हापूरकरांना गारव्याची अनुभूती येत आहे. पहाटे धुके, दव यामुळे तापमानात घसरण होऊ लागली आहे. गेल्या २४ तासांत शहराच्या तापमानाचा पारा १९ अंशाच्या आसपास होता.

पावसाळा संपूनही परतीच्या पावसाचा मुक्काम वाढल्याने थंडी लांबली होती. दिवाळीनंतर लागोपाठ आलेल्या चक्रीवादळांमुळे पावसाचा मुक्काम वाढला. शनिवारनंतर राज्यात सर्वत्र पावसाने विश्रांती घेतली आहे. पावसाने निरोप घेतल्याने शहर परिसरात थंडीने बाळसे धरले आहे. हवामान कोरडे असल्याने थंडीत चढउतार होत आहे. सकाळी व सायंकाळी सहानंतर हवेत चांगला गारवा होत असून मध्यरात्रीनंतर त्याची तीव्रता वाढत आहे. मोठ्या कालावधीनंतर निरभ्र आकाश अनुभवायला मिळत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत किमान पारा घसरू लागला आहे. सकाळी सूर्याची कोवळी किरणे अनुभवण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. दिवसभर आकाश निरभ्र असल्याने काहीसा उन्हाचा चटका जाणवत आहे. शहर परिसरात पहाटेच्या वेळात धुके पसरत असून त्यात अधिक भर पडण्याची शक्यता आहे. गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. वातावरणातील बदलामुळे नागरिकांनी विशेषत: गर्भवती महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांनी प्रकृतीकडे अधिक लक्ष द्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

राज्यातील प्रमुख शहरांमधील किमान तापमान (अंश सेल्सिअस)

मुंबई (कुलाबा) २३.५, सांताक्रूझ २३.०, अलिबाग २२.३, रत्नागिरी २१.६, पणजी (गोवा) २२.४, डहाणू २३.८, पुणे १६.४, अहमदनगर १४.६, जळगाव १९.६, कोल्हापूर १९.२, महाबळेश्वर १५.५, मालेगाव २०.२, नाशिक १८.०, सांगली १८.४, सातारा १६.१, सोलापूर २०.७, उस्मानाबाद - औरंगाबाद १७.३, परभणी १९.६, नांदेड १९.५, बीड १९.६, अकोला १९.०, अमरावती १८.८, बुलढाणा १८.७, ब्रह्मपुरी १७.९, चंद्रपूर १९.६, गोंदिया १७.०, नागपूर १७.२, वाशिम २१.८, वर्धा १८.२, यवतमाळ १७.४.

वातावरणात होणाऱ्या बदलांना सामोरे जाण्याची तयारी नागरिकांनी करावी. विशेषतः या काळात सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आढळण्याची शक्यता असते. किरकोळ लक्षणे दिसताच तत्काळ उपचार घ्यावेत. आहारात पालेभाज्या व कडधान्यांचा वापर करावा. या दिवसांत अतिव्यायाम टाळावा.

डॉ. विकास बनसोडे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images