Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कोल्हापूरकरांचे प्रेम जिंकू शकले नाहीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'हजारो पोलिसांच्या गराड्यात राहून सत्तेच्या मस्तीत राहणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना कोल्हापुरातील लोकांचे प्रेम जिंकता आले नाही, ' अशी टीका आमदार हसन मुश्रीफ यांनी केली. गेल्या पाच वर्षात आपल्याला सर्वात जास्त त्रास पालकमंत्र्यांनी दिला, असा आरोपही त्यांनी केला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने विधानसभेला निवडून आलेल्या संचालकांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते.

जिल्ह्यात युतीचा दारुण पराभव झाल्यावर पालकमंत्र्यांच्या 'आमचं काय चुकलं?' या वक्तव्याचा समाचार मुश्रीफ यांनी घेतला. ते म्हणाले, 'पालकमंत्री म्हणतात आम्ही टोल रद्द केला. मात्र दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक, दिवंगत कॉ. गोविंद पानसरे आणि प्रा. एन.डी. पाटील यांच्या नेतृत्वाखालील जनआंदोलनामुळे टोल रद्द झाला. एलबीटी रद्दची प्रक्रिया आघाडी सरकारच्या काळात झाली होती. राज्यात मुख्यमंत्र्यांनंतर दोन क्रमांकाचे पद असूनही पालकमंत्री जिल्ह्यासाठी भरीव काम करु शकले नाहीत. यामुळेच जिल्ह्यात जनतेने युतीला नाकारले.'

पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील चळवळी आणि आंदोलन दडपल्याने युतीचा पराभव झाला, असा आरोप करून मुश्रीफ म्हणाले, 'पालकमंत्री त्यांच्याकडे आशेने आलेल्या लोकांचा अपमान करत होते. वेळ घेतल्याशिवाय भेटायला यायचे नाही असे सांगत असल्याने इथल्या जनतेला ते रुचले नाही. लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या असत्या तर जिल्ह्यातील जनता त्यांना डोक्यावर घेऊन नाचली असती. हजारो पोलिसांच्या गराड्यात राहण्यात त्यांनी धन्यता मानली. तसेच कार्यकर्त्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपण्याचे कामही त्यांना करता आले नाही.'

पालकमंत्र्यांनी आपल्याला गेल्या पाच वर्षांत सर्वात जास्त त्रास दिला, असा आरोप मुश्रीफ यांनी केला. ते म्हणाले, 'जिल्हा बँकेवर कलम ८८ ची कारवाई केली. तसेच एक व्यक्ती दहा वर्षे अध्यक्ष होऊ शकत नाही, असा अध्यादेश काढला. त्याविरोधात आम्ही हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळवली. जिल्हा बँकेत माझ्यावर कारवाई होत नाही हे पाहिल्यावर राज्य बँकेवर कलम ८८ च्या कारवाईची घोषणा केली. पण अडीच वर्षे कोणतीच चौकशी झाली नाही. म्हणून पुन्हा विधानसभेत कायदा बदलून चौकशी केली. या कारवाईचा फटका शरद पवारांनाही बसला. राजकारणात मतभेद असले पाहिजेत पण सूडबुद्धीने कारवाई होता कामा नये. जिल्ह्यात युतीला फटका बसल्याने पालकमंत्री आपल्या कार्यशैलीत बदल करतील, अशी आशा वाटते.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘युतीच्या पराभवाची जबादारी स्वीकारतो’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

' जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांत स्थानिक प्रश्न, संदर्भ आणि तेथील राजकारण वेगळे होते. त्यामुळे जिल्ह्यातील भाजप शिवसेना युतीच्या पराभवाची जबाबदारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मी दोघांनी स्वीकारण्याची गरज होती. तरीही जिल्ह्याचा खासदार आणि शिवसेनेचा संपर्क नेता म्हणून युतीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारतो', अशी कबुली शिवसेनेचे खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आमदार हसन मुश्रीफ, राजेंद्र पाटील यड्रावकर आणि राजेश पाटील यांचा सत्कार खासदार मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

खासदार मंडलिक म्हणाले, 'विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांना जिंकण्याची संधी होती. गेल्या वेळी जिल्ह्यात युतीचे आठ आमदार होते. यावेळी मात्र एका जागेवर समाधान मानण्याची वेळ आली. खरेतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि मी अशी आम्ही संयुक्तपणे जबाबदारी घेण्याची गरज होती. पण पालकमंत्र्यांनी पराभवाचे खापर माझ्यावर फोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.'

प्रत्येक विधानसभा मतदारसंघात स्थानिक प्रश्न, संदर्भ आणि तेथील राजकारण वेगळे होते, असे सांगून खासदार मंडलिक म्हणाले,' ज्यांनी संघर्ष केला ते विजयी झाले. निवडून आलेली सर्व मंडळी कर्तृत्ववान आहेत. कोणी कोणाला निवडून आणले, असे कोणताच नेता किंवा कार्यकर्ता सांगण्याचे धाडस करु शकत नाही. जनतेनेच निवडणूक हाती घेतल्याने कार्यकर्ते विजयी झाले. राज्यात युती आणि आघाडीला समान वाटा मतदारांनी दिला आहे. शहरे आणि महानगरातील मतदारांनी युतीच्या बाजूने तर ग्रामीण जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आघाडीच्या बाजूनी मतदारांनी कौल दिला आहे. राजकारणात ऊन पावसाचा खेळ सुरुच राहणार असून विजयी आमदारांनी यापुढे जिल्ह्याच्या विकासाचे काम करावे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गोकुळ’ मध्ये नवी समीकरणे

$
0
0

फाइल फोटो

Satish.ghatage@timesgroup.com

Tweet:satishgMT

कोल्हापूर

लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाडिक गट बॅकफूटला गेला असून सहा महिन्यानंतर होणाऱ्या जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत आमदार पी.एन. पाटील यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. गोकुळच्या निवडणुकीत विजयाची हंडी फोडण्यासाठी पी.एन. पाटील 'गोविंदा' ठरतील असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवला जात आहे.

'गोकुळ'वर आमदार पी.एन. पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांची सत्ता आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सतेज पाटील यांनी सत्ताधारी पॅनेलविरोधात निवडणूक लढवत त्यांना बॅकफूटवर ढकलले होते. पाटील यांच्या पॅनेलमधील अंबरिश घाटगे, चंद्रकांत बोंद्रे विजयी झाले होते. तसेच काही उमेदवार ५० ते १०० मतांच्या फरकांनी पराभूत झाले होते. त्यामुळे या वेळच्या मे २०२० मध्ये होणाऱ्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील पुन्हा एकदा महाडिक यांच्या विरोधात शड्डू मारण्यासाठी सज्ज झाले आहेत.

गेल्या पाच वर्षात जिल्ह्याच्या राजकारणात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. गोकुळवर सत्ता राखण्यासाठी मल्टिस्टेटचा ठराव मांडण्यात आला, असा आरोप विरोधी आघाडीकडून करण्यात आला. या ठरावाला दूध उत्पादकांकडून विरोध झाला. त्याचा फटका महाडिक गटाला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत बसला. लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिक तर विधानसभा निवडणुकीत अमल महाडिक पराभूत झाल्याने महाडिक गटाची ताकद कमी झाली आहे. तर दोन पराभवानंतर विजयश्री खेचून आणणाऱ्या आमदार पी.एन. पाटील यांची ताकद वाढली आहे. त्यामुळे आगामी गोकुळच्या निवडणुकीत पी.एन. यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

गतवेळच्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनेलला आमदार हसन मुश्रीफ, आमदार चंद्रदीप नरके यांनी पाठिंबा दिला होता. पण यंदा जिल्ह्याच्या राजकारणाचा पट बदलला आहे. मल्टिस्टेटला विरोध करणारे सतेज पाटील, मुश्रीफ, नरके एका बाजूला आहेत. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी एकत्रित लढली होती. त्यामुळे जिल्ह्यात आघाडीने षटकार मारला. गोकुळ, जिल्हा बँकेची निवडणूकही आघाडीने लढण्याचा निर्णय घेतला तर पी.एन. पाटील यांना महाडिक यांची साथ सोडावी लागणार आहे. पी.एन यांना मानणारे पाच संचालक आहेत. त्यामुळे विरोधी गटाची ताकद वाढू शकते.

पी.एन., महाडिक यांनी एकत्रित निवडणूक लढवली तर विरोधकांशी कडवा संघर्ष करावा लागणार आहे. गेल्यावेळी पाठिंबा देणारे मुश्रीफ आणि राष्ट्रवादी हे महाडिक गटाच्या विरोधात प्रचारात उतरण्याची शक्यता आहे. महाडिक गटाला मानणाऱ्या संचालकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने 'गोकुळ' भाजपच्या ताब्यात जाऊ नये यासाठी पी.एन. यांना पराकाष्ठा करावी लागणार आहे. सध्या महाडिक यांच्यासह संचालक रणजीत पाटील, दीपक पाटील, रामराजे कुपेकर, अनिल यादव, बाबा देसाई हे भाजपशी संलग्न आहेत. तर अरुण नरके, अनुराधा पाटील, अंबरिश घाटगे शिवसेनेशी जवळीक साधून आहेत. गोकुळ पक्षीय राजकारणापासून दूर ठेवला जातो असे सांगितले जात असले तरी संचालकांची संख्या पाहता भाजप शिवसेनेचा ग्राफ गोकुळमध्ये वाढत असल्याचे चित्र पहायला मिळत आहेत. त्यावर अंकुश ठेवण्यासाठी पी.एन. यांना प्रयत्न करावे लागणार आहेत.

'गोकुळ'मध्ये करवीर, राधानगरी तालुक्यातील सभासद संख्या जास्त असल्याने पी.एन. यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीत जिकडे पी.एन. तिकडे विजय हे समीकरण होण्याची शक्यता आहे.

.......

पाच संचालकांची भूमिका महत्वाची

'गोकुळ' चे अध्यक्ष रविंद्र आपटे, अरुण नरके, विश्वास पाटील, अरुण डोंगळे, रणजीत पाटील यांची भूमिका निवडणुकीत महत्वाची ठरणार आहे. या पाच संचालकांकडे एक हजारहून अधिक मतदानाचे ठराव आहेत. यातील बहुतांशी संचालक महाडिक यांना मानणारे असले तरी विश्वास पाटील, अरुण डोंगळे हे पी.एन. यांच्याकडे झुकण्याची दाट शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साखर उद्योग सावरण्यास प्रयत्न करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'महापूर आणि अतिवृष्टीने ऊस, सोयाबीन, भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साखर उद्योगाची अडवणूक केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर दुर्लक्ष केल्याने त्याचा फटका भाजपला बसला आहे. राज्यातील साखर कारखानदारांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. साखर उद्योगाला सावरण्यासाठी पॅकेज, अनुदानासाठी महायुतीतील खासदार प्रा. संजय मंडलिक, आमदार विनय कोरे, राजेंद्र पाटील-यड्रावकरांनी प्रयत्न करावेत,' असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.

जिल्हा बँकेचे सहा संचालक आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल खासदार मंडलिक यांच्या हस्ते आमदार मुश्रीफ, राजेश पाटील, राजेंद्र पाटील- यड्रावकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, 'राज्यात आमच्या विरोधात कोणीच पैलवान नाही अशी भावना मुख्यमंत्री बोलून दाखवत होते. त्यांनी सर्वांना गृहित धरले होते. पण जनतेने महायुतीला चांगलाच धक्का दिला. आम्ही जनतेचा कौल स्वीकारून विरोधात बसण्याची तयारी केली आहे. दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक, बाबासाहेब कुपेकर, नगरसिंगराव पाटील या तीनही बंडखोर नेतृत्वाचे मला आणि राजेश पाटिल यांना आशीर्वाद मिळाले.'

राष्ट्रवादीच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी आशीर्वाद दिल्याने आमदार झालो, असे म्हणत आमदार राजेश पाटील यांनी जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांचे आभार मानले. धनशक्ती विरोधात जनशक्तीच्या लढ्यात मुश्रीफ, सतेज पाटील, पी.एन. पाटील, राजू शेट्टी, महादेवराव महाडिक, श्रीपतराव शिंदे, हत्तरगी, होसकरे, पताडे यांची मदत झाल्याचे त्यांनी सांगितले.

राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी न मिळाल्याबद्दल खंत व्यक्त केली. ते म्हणाले, 'या निवडणुकीत राष्ट्रवादीने मला अप्रत्यरित्या कोणताही त्रास दिला नाही. तरुण मित्रांनी मला मदत केली. जिल्हा बँकेच्या संचालकांनी मदत केली. पूरग्रस्त आणि अतिवृष्टीमुळे झालेली नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळावी यासाठी प्रयत्न करणार आहे.'

खासदार मंडलिक म्हणाले, 'बँकेचे आमदार असलेले संचालक आमदार, खासदार व्हायचे. पण यावेळी संचालकच खासदार, आमदार झाले. मुश्रीफ यांनी जिल्हा बँकेत पक्षभेद विसरून काम केले. गेल्या साडेचार वर्षांत ठेवी पाच हजार रुपयांच्या पुढे गेल्या असून, राज्यात जिल्हा बँक अग्रगण्य आहे. यापुढेही साखर उद्योग आणि बँकेच्या अडचणी सोडविण्यास कटिबद्ध राहीन.'

संचालक भैय्या माने यांनी प्रास्ताविक केले. मुख्य कार्यकारी अधिकारी ए. बी. माने यांनी आभार मानले. यावेळी संचालक पी. जी. शिंदे, विलास गाताडे, अनिल पाटील, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, संतोष पाटील, रणजितसिंह पाटील, उदयानी साळुंखे, असिफ फरास, आर. के. पोवार, आदी उपस्थित होते.

०००००

यड्रावकरांवर अन्याय

विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपात राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यावर मोठा अन्याय झाला. ते माझा कार्यकर्ता असून, त्यांची जडणघडण आम्ही केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी आमची राज्यात युती झाल्याने आमच्याकडून अन्याय झाला; पण लोकांनी मनात आणल्याने यड्रावकर आमदार झाले, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तांत्रिक सल्लागार नेमणार

$
0
0

कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालय आणि १२ तहसीलदार कार्यालयांमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्स सुविधा स्थापन करण्यात येणार आहे. ही सुविधा स्थापन करण्यासाठी तांत्रिक सल्लागार संस्था नेमण्यात येणार आहेत. इच्छुक तांत्रिक सल्लागार संस्थांनी अर्ज निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या नावे ११ नोव्हेंबरपर्यंत सादर करावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा नोव्हेंबरपर्यंत ‘पदवीधर’ साठी नोंदणी

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

निवडणूक आयोगाने एक नोव्हेंबर २०१९ या दिनांकावर आधारीत पुणे विभागात पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार नोंदणीचा कार्यक्रम घोषित केला आहे. पात्र मतदारांना सहा नोव्हेंबर २०१९ अखेर नोंदणी करता येणार आहे, असे पत्रक जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी प्रसिद्धिस दिले आहे.

पत्रकात म्हटले आहे, जी व्यक्ती एक नोव्हेंबर २०१६ पूर्वी पदवीधर झाली आहे, त्या व्यक्तीला पदवीधर मतदारसंघाच्या यादीमध्ये नाव नोंदणी करता येईल. तर जी व्यक्ती एक नोव्हेंबर २०१९ च्या आधीच्या सहा वर्षांमध्ये किमान तीन वर्षे इतक्या कालावधीकरीता माध्यमिक शाळेत अध्यापन करीत असेल अशी प्रत्येक व्यक्ती शिक्षक मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी पात्र आहे. पदवीधर व‍ शिक्षक मतदारसंघाची मतदार यादी प्रत्येक निवडणुकीपूर्वी नव्याने तयार करणे आवश्यक आहे. त्यामुळे या मतदारसंघातील सध्या अस्तित्वात असलेल्या मतदारयादीत ज्या व्यक्तींची नावे समाविष्ट आहेत, अशा सर्व व्यक्तींनी नव्याने अर्ज सादर करावेत. अर्ज सादर करताना मूळ पदवीची सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेली छायांकीत प्रत आणि शिक्षकांसाठी संस्था प्रमुखाने संबंधित शिक्षक तीन वर्षे अध्यापन करीत असल्याबाबत प्रमाणित प्रत जोडावी. तहसील कार्यालयातील निवडणूक शाखा, शहरातील शिवाजी मार्केट येथील महानगरपालिकेच्या एल. बी. टी शाखेत मतदारांनी आपले अर्ज जमा करावेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरः निपाणीत काळ्या दिनी कडकडीत बंद

$
0
0

म.टा. वृत्तसेवा, निपाणीः १ नोव्हेंबर रोजी काळ्या दिनी निपाणी भागात महाराष्ट्र समिती, शिवसेना आणि मराठी भाषाकातर्फे शुक्रवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळपासूनच बस स्थानक तसेच बाजारपेठेतील सर्व व्यावसायिकांनी आपले व्यवहार बंद ठेवले. त्यामुळे निपाणी बंदला सकाळच्या टप्प्यात चांगला प्रतिसाद मिळाला. तर राज्योत्सव दिनानिमित्त सकाळी आठ वाजल्यापासूनच कर्नाटक सरकारकडून विद्यार्थ्यांना वेठीस धरण्यात आले.

येथील म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर सकाळी नऊ वाजता मिरवणुकीला प्रारंभ होणार होता. पण तब्बल दीड तासांनी ही मिरवणूक सुरू झाल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांमधून नाराजी व्यक्त करण्यात आली. शिवाय दरवर्षीपेक्षा यंदा शासकीय अधिकारी व कर्मचारी वगळता या कार्यक्रमाला निम्म्यापेक्षा अधिक लोकांनी पाठ फिरवल्याने राज्योत्सव दिनाचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसत होते.

काळा दिनाच्या पार्श्वभूमीवर निदर्शने आणि मूक मोर्चासाठी मराठी भाषिक सकाळी नऊ वाजल्यापासूनच येथील धर्मवीर संभाजी चौकांमध्ये मोठ्या प्रमाणात जमले होते. पण या परिसरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवून मराठी भाषिकांना पांगविण्याचा प्रयत्न करत होते. तरीही मराठी भाषिकांनी दडपशाहीला न जुमानता आपली एकी दाखवून दिली. बंदच्या पार्श्वभूमीवर साखरवाडी, बसस्थानक परिसर, जुना पी रोड, बेळगाव नाका, नेहरु चौक, चाटे मार्केट परिसरात पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. मिरवणुकीच्या मार्गावर बॅरिकेट लावून वाहनधारकांना अडविण्यात येत असल्याने वारंवार वाहतुकीची कोंडी निर्माण होत होती.

येथील बसस्थानक परिसरात असलेल्या व्यवसायीकांनी आपले व्यवहार बंद ठेवल्याने नागरिक व प्रवाशांचा शुकशुकाट दिसत होता. शिवाय स्थानकावरील रिक्षा स्टॉपवरही नीरव शांतता पसरली होती. मात्र, यावेळी काही कन्नड युवकांनी दुचाकीवरून झेंडे मिरवत वाहने सुसाट वेगाने हाकली. याकडे मात्र पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचे चित्र होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंढरपूरः माढ्यात पित्याकडून दोन मुलांची हत्या

$
0
0

पंढरपूरः पित्यानेच आपल्या पोटच्या तीन मुलांना विषारी औषध पाजून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना माढा तालुक्यातील बेंबळे येथे घडली. ही घटना अनैतिक संबंधातून घडल्याचा संशय व्यक्त केला जात असून, तीन मुलांपैकी दोन मुलांचा मृत्यू झाला आहे.

रवी लोखंडे असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर विषारी औषध पाजल्याने अत्यवस्थ असलेल्या आयुष रवी लोखंडे (वय ६) व अजिंक्य रवी लोखंडे ( वय ८) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर मुलगी अनुष्का हीस पुढील उपचाराकरीता सोलापूर येथे पाठवण्यात आले आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, रवी लोखंडे हा पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील वडापूरी गावचा रहिवासी आहे. रवी हा वडापुरी येथे कुटूंबासह राहत होता. माढा तालुक्यातील बेंबळे गावात तो आपला मुलगा आयुष, अजिंक्य व मुलगी अनुष्का यांसह सुनिता कांबळे या मेव्हणीला भेटायला गेला होता. काही कारणाने त्यांच्यात काही वाद झाले. त्यावर रवीने स्वतः आपल्या मुलांना 'थम्सअप'मधून विषारी औषध पाजले व स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली.

रवी लोखंडेचा मुलगा आयुष, अजिंक्य व मुलगी अनुष्का यांना उपचारासाठी इंदापूर येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आयुष रवी लोखंडे वय व अजिंक्य रवी लोखंडे यांचा गुरुवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर मुलगी अनुष्का हीस पुढील उपचाराकरीता सोलापूर येथे हलविण्यात आले आहे. रवी लोखंडे ने आत्महत्त्या करण्यापूर्वी एक हस्तलिखित पत्र स्वतःच्या मोबाईल वरून आपल्या मित्रपरिवारास व नातेवाईकांना पाठवले असून, यात या कृत्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. या घटनेचा अधिक तपास टेंभूर्णी पोलिस करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गळतीने घशाला कोरड

$
0
0

मटा भूमिका

कायमची उपायोजना हवी

शहरवासीयांना शिंगणापूर व बालिंगा उपसा केंद्रातून पाणीपुरवठा केला जातो. अनेकवेळा नियोजनाअभावी पाण्यासाठी नागरिकांना धावाधाव करावी लागते. त्याचबरोबर अनेकदा पाइपलाइनला गळती, विद्युतपुरवठा खंडीत पाणीपुरवठा बंद ठेवला जातो. बंद काळात प्रशासन जाहीर प्रकटन देऊन टँकरद्वारे पाणीपुरवठा करते. पण त्यामध्येही विस्कळीतपणा असतो. शिंगणापूर योजनेतील बटुकेश्वर ते फुलेवाडी नाक्यापर्यंत असलेल्या जलवाहिनीला वारंवार गळती लागत असल्याने पाणीपुरवठ्याचा बट्ट्याबोळ उडतो. सुमारे दीड किमी लांबीची जलवाहिनी बदलण्यासाठी महापालिकेला मोठ्या निधीची आवश्यकता आहे. पण निधी मिळेपर्यंत आठवड्यातून एक दिवस संपूर्ण पाणीपुरवठा बंद ठेऊन दुरुस्तीची कामे करता येऊ शकतात. असा धोरणात्मक निर्णय घेतल्यास पाण्याअभावी शहरवासीयांना सोसावा लागणारा मन:स्ताप कमी होऊ शकतो. त्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी कायमची उपाययोजना करण्याची गरज आहे.

Maruti.Patil

@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर : जलवाहिनीला ठिकठिकाणी लागलेली गळती, विद्युत पंपामध्ये वारंवार होणारा बिघाड, अपुरे व प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा अभाव आणि नियोजनातील त्रुटींमुळे पाणीदार कोल्हापुरात पाणीपुरवठ्याचा दर महिन्याला बट्ट्याबोळ उडत आहे. राधानगरी, काळम्मावाडी यांसारखी मोठी धरणे फुल्ल भरली असताना आणि शहराच्या तिन्ही बाजुंनी पंचगंगा नदी दुथडी भरून वाहत असताना शहरवासियांना महिन्यातून किमान तीन ते चार दिवस पाण्यासाठी टँकरमागे धावाधाव करावी लागते. प्रशासनाचा ढिम्म कारभार आणि लोकप्रतिनिधींची अनास्था कारणीभूत असल्याचे ठळकपणे दिसून येते.

बालिंगा, कसबा बावडा येथून उपसा करुन जलशुद्धीकरण केंद्रामार्फत शहराला पाणीपुरवठा केला जात होता. शहराचा विस्तार आणि पाण्याची मागणी वाढल्यानंतर शिंगणापूर योजना कार्यन्वित केली. योजनेद्वारे 'ई' वॉर्डातील नागरिकांना पाणी देण्याचा निर्णय घेतला. योजनेला सुरुवात झाल्यानंतर काही वर्षे पाणीपुरवठा सुरळीत झाला, पण त्यानंतर पाण्याची पळवापळवी, लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप आणि अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणाबरोबर वितरण व्यवस्थेमध्ये होणाऱ्या वारंवारच्या बिघाडामुळे नवीन योजना कार्यन्वित केल्यानंतरही पाणीपुरवठ्याचा बोजवारा उडत आहे.

शहराला दैनंदिन १२० एमएलडी पाणीपुरवठ्याची आवश्यकता असताना १४० एमएलडी पाण्याचा उपसा केला जातो. यामधील तब्बल २० एमएलडी पाणी गळतीवाटे गटारीतून वाहते. परिणामी आवश्यकतेपेक्षा शहराला २० एमएलडी पाणी कमी पडत आहे. महासभेपासून स्थायी समितीच्या प्रत्येक बैठकीत गळती रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनाबाबत चर्चा झडतात. त्यामुळे चार मोठ्या गळती काढण्यात पाणीपुरवठा विभागाला यश आले. शहरात सुमारे ५५० किमी अंतराची वितरण नलिका विस्तारली आहे. त्यामुळे छोट्या गळती काढण्याचे काम वर्षभर सुरू असते. त्याचा पाणीपुरवठ्यावर परिणाम होत नसला, तरी शुद्ध पाण्याचा होणारा अपव्यव रोखण्यास प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. विशेषत: शिंगणापूर योजनेला वारंवार लागणारी गळती आणि बालिंगा पंपिंग स्टेशनमधील बिघडणारा विद्युतपुरवठा ही दोन मुख्य कारणे बनली आहेत. प्रत्येक महिन्याला दुरुस्तीसाठी बंद राहणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. बटुकेश्वर मंदिर ते फुलेवाडी नाका चौकापर्यंत आलेली सुमारे दीड किमी अंतरातील जलवाहिनीला वारंवार गळती लागत आहेत. त्यासाठी ही संपूर्ण जलवाहिनी बदलण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. पण त्यासाठी लागणारा निधी कसा उभा करणार याचे उत्तर कोणत्याच यंत्रणेकडे नाही. त्यामुळे शहवासियांचे या दुष्ट चक्रातून कधी सुटका होणार हा प्रश्न वर्षानुवर्षे अनुत्तरीतच राहत आहे.

दृष्टिक्षेपात पाणीपुरवठा

सुमारे ७ लाख

शहराची एकूण लोकसंख्या

१२० एमएलडी

दैनंदिन लागणारे पाणी

१४० एमएलडी

दैनंदिन उपसा

२० एमएलडी

पाणी गळती

चार उपसा केंद्रांची क्षमता

३८ एमएलडी

बालिंगा

८ एमएलडी

कळंबा फ्लिटर हाऊस

६० एमएलडी

पुईखडी

३६.५ एमएलडी

कसबा बावडा

पाणीपुरवठा खंडीत

१६ जानेवारी: बालिंगा पंपिंग हाऊस व पाटणकर हायस्कूल पाइपलाइन गळती

तीन फेब्रुवारी: शिंगणापूर उपसा केंद्रातील विद्युतपुरवठा खंडीत

१९ फेब्रुवारी: कावळानाका पाइपलाइन दुरुस्ती

२० फेब्रुवारी: शिंगणापूर योजनेचा विद्युतपुरवठा खंडीत

दहा मार्च: आपटेनगर टाकीतील गाळ काढणे व व्हॉल्व्ह दुरुस्ती

१८ मार्च: चंबुखडी टाकीतील गाळ काढणे

तीन एप्रिल: बालिंगा उपसा केंद्रातील विद्युतपुरवठा खंडीत

१७ जून: बालिंगा ते चंबुखडी पाइपलाइन गळती

पाच जुलै: एअर व्हॉल्व्ह दुरुस्ती

१४ जुलै: बालिंगा ट्रान्स्फॉर्मर दुरुस्ती

२९ जुलै: ट्रान्स्फॉर्मर दुरुस्ती

दहा सप्टेंबर: चंबुखडी पाइपलाइन दुरुस्ती

१३ सप्टेंबर : बालिंगा पंपिंग स्टेशनमध्ये बिघाड

९ ऑक्टोबर: बालिंगा विद्युतपंप बिघाड

महापुरात वीस दिवस पाणीपुरवठा

ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर शहराला पाणीपुरवठा करणारी शिंगणापूर व बालिंगा पंपिंग स्टेशन पुराच्या पाण्यात बुडाली. त्यामुळे पाच ते २५ ऑगस्टपर्यंत शहराचा संपूर्ण पाणीपुरवठा ठप्प होता. शहरवासियांनी यावेळी दाखवलेला संयम वाखणण्याजोगा होता. पण दुरुस्तीच्या नावाखाली प्रत्येक महिन्यात तीन ते चार दिवस पाणीपुरवठा खंडीत होत असल्यामुळे त्यांच्यामध्ये प्रचंड रोष दिसून येतो. सणासुदीच्या दरम्यान दुरुस्तीच्या कामामुळे तर लोक रस्त्यावर उतरून संतापाला वाट करून देतात.

पाच महिन्यांपासून रस्ता बंद

अमृत योजनेतंर्गत शहरात अनेक ठिकाणी ड्रेनेज व पिण्याच्या पाइपलाइन बदलण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे अनेक रस्त्यांची मोठ्याप्रमाणात खोदाई केली आहे. खराब झालेले रस्ते आणि खोदाई केल्यामुळे वाहनधारक व पादचाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. नागाळा पार्कातील महावीर कॉलेज ते खानविलकर पेट्रोल पंपाजवळ क्रॉस ड्रेनचे काम सुरू आहे. त्यामुळे गेल्या पाच महिन्यांपासून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. येथील नागरिकांना 'गांधीगिरी' पद्धतीने आंदोलन केल्यानंतरही अद्याप येथील कामाला सुरुवात झालेली नाही.

छोट्या गळती काढण्याचे काम नेहमीच सुरू असते. मोठ्या गळती काढण्यासाठी मात्र वर्कऑर्डर, दुरुस्तीसाठी लागणारा निधीसाठी काहीवेळा थांबावे लागते. विशेषत: शिंगणापूर योजनेतील पाइपलाइनला गळती लागत असल्याने त्याचा परिणाम शहर पाणीपुरवठ्यावर होतो.

सुरेश कुलकर्णी, प्रभारी जलअभियंता, पाणीपुरवठा विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँकांच्या वेळा बदलल्या

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

केंद्र सरकारच्या ईज (ईएएसई) नुसार बँकिंगमधील सुधारणांच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील बँक शाखाच्या वर्गीकरणानुसार शुक्रवारपासून बदलेल्या वेळेनुसार कामकाज सुरू झाले. रहिवाशी क्षेत्रात सकाळी नऊ ते दुपारी चार, व्यापारी क्षेत्रात सकाळी ११ ते सायंकाळी सहा तर व्यापरी आणि रहिवाशी क्षेत्रात सकाळी १० ते सायंकाळी पाचपर्यंत बँका सुरू राहतील.

इंडियन बँक असोसिएशनने ग्राहकांसाठी देशातील राष्ट्रीयीकृत बँक शाखाच्या वेळेत तीन प्रकारे वर्गीकरण केले आहे. त्यानुसार आजपासून बँकांनी कामकाज सुरू केले.

रहिवासी क्षेत्रातील बँकांची वेळ सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत असल्याने उपनगरातील बहुतांशी बँकाचे कामकाज बदलेल्या वेळापत्रकानुसार सुरू झाले. रुईकर कॉलनी, जरगनगर, सानेगुरुजी वसाहत येथील बँकांच्या शाखेत ग्राहकांसाठी दुपारी तीन वाजेपर्यंत सेवा देण्यात आली.

व्यापारी क्षेत्रात बँकांची वेळ सकाळी ११ वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरी या परिसरातील बँकांनी या वेळेनुसार कामकाज सुरू केले. पण ज्या ठिकाणी रहिवासी आणि व्यापारी क्षेत्र आहे या ठिकाणातील बँकांची वेळ सकाळी दहा वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत ठेवली आहे. गंगावेश, महाद्वार रोड, लक्ष्मीपुरी, कसबा बावडा या परिसरातील बँकांनी १० ते ५ या वेळेत बँकेचे कामकाज सुरू होत्या.

बदलेल्या वेळांची माहिती बँकांनी एसएमएसद्वारे ग्राहकांना कळवली आहे. तसेच दर्शनी भागातही बदलेल्या वेळांचे फलक लावण्यात आले आहेत.

बदललेल्या वेळा

रहिवाशी क्षेत्र

सकाळी नऊ ते दुपारी चार

व्यापारी क्षेत्र

सकाळी ११ ते सायंकाळी सहा

व्यापारी व रहिवाशी क्षेत्र

सकाळी १० ते सायंकाळी पाच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सणांच्या सुट्ट्या बुडीतखाती

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

नवीन २०२० या वर्षात गणपती, दसरा, दिवाळी, पारशी दिन, मोहरम, प्रजासत्ताक दिन हे सण शनिवारी आणि रविवारी आल्याने सरकारी नोकरांच्या हक्काच्या सुट्ट्या बुडीत खाती जाणार आहेत. त्याचबरोबर शनिवार, रविवार जोडून सुट्ट्याचे तीन ते चार योग आल्याने पर्यटनाचे नियोजनही करता येणार आहे.

नवीन वर्षात जानेवारी महिन्यात एकही सुट्टी मिळणार नसून प्रजासत्ताक दिन रविवार आल्याने ही हक्काची सुट्टी बुडाली आहे. ऑगस्ट महिन्यात गणेश चतुर्थी (२२ ऑगस्ट) असून या दिवशी चौथा शनिवार आला आहे. दसरा रविवारी (२५ ऑक्टोबर) तर नरक चर्तुदशी आणि दीपावली दुसऱ्या शनिवारी (१४ नोव्हेंबर) तीही सुट्टी बुडाली आहे. ताबूत विसर्जन रविवारी (३० सप्टेंबर), पारशी दिनही रविवारी (१६ ऑगस्ट) आहे.

हक्काच्या सहा सुट्ट्या हुकल्या असल्या तरी एप्रिल महिन्यांत चार सणांच्या सुट्ट्यांचा बोनस मिळणार आहेत. महावीर जयंती (सहा एप्रिल)सोमवारी असून रविवार, सोमवार अशा जोडून सुट्ट्या मिळणार आहेत. गुडफ्रायडेला (१० एप्रिल) जोडून दुसरा शनिवार (११ एप्रिल)आणि रविवार (१२ एप्रिल) आल्याने सलग तीन दिवस सुट्ट्या मिळणार आहेत.

मे महिन्यात कामगार दिन (१मे), बुद्ध पोर्णिमा (७ मे) या दोन सुट्ट्या मिळणार आहे. बुद्ध पौर्णिमा गुरुवारी असून एक दिवस रजा काढल्यानंतर दुसरा शनिवार आणि रविवार अशा जोडून सुट्ट्या घेण्याची संधी मिळणार आहे. मे च्या शेवटी सलग तीन दिवस सुट्टीचा योग आला आहे. २३ मे ला चौथा शनिवार, २४ मे रविवार तर २५ मे ला रमजान ईद अशी सलग तीन दिवस सुट्टीची मेजवाणी मिळणार आहे.

जून आणि जुलै महिन्यात एकही सुट्टी नसली तरी ऑगस्ट महिन्याची सुरुवात सुट्टीने होणार आहे. एक ऑगस्टला बकरी ईद शनिवारी असून दोन ऑगस्टला रविवार आहे. तीन ऑगस्टला रक्षाबंधन हा सण असल्याने सलग तीन दिवस सुट्टी मिळण्याची संधी आहे. १५ ऑगस्ट शनिवारी आणि १६ ऑगस्टला रविवारी पारशी दिन असून सलग दोन दिवस सुट्ट्या आहेत.

नोव्हेंबर महिन्यात नरक चतुर्थशी शनिवारी आहे. तर पुढील तीन दिवस सुट्टीचा योग आला आहे. १४ नोव्हेंबरला दीपावली शनिवारी, रविवार आणि सोमवारी दीपावली पाडवा आणि भाऊबीज अशी सुट्टी मिळणार आहे. याच महिन्याच्या अखेरीस २८ नोव्हेंबरला चौथा शनिवार २९ नोव्हेंबरला रविवार तर ३० तारखेला सोमवारी गुरुनानक जंयतीची सुट्टी असल्याने सलग तीन दिवस सुट्टी मिळणार आहे. डिसेंबर महिन्यातही सलग तीन सुट्ट्याची मेजवाणी आहे. ख्रिसमस (२५ डिसेंबर) शुक्रवारी तर चौथा शनिवार आणि रविवार अशा तीन जोडून सुट्ट्या आल्या आहेत.

वर्षातील सणांच्या सुट्ट्या अशा

सण तारीख वार

प्रजासत्ताकदिन २६ जानेवारी रविवार

शिवजयंती १९ फेब्रुवारी बुधवार

धुलीवंदन १० मार्च मंगळवार

गुढीपाडवा २५ मार्च बुधवार

रामनवमी २ एप्रिल गुरुवार

महावीर जयंती ६ एप्रिल सोमवार

गुडफ्रायडे १० एप्रिल शुक्रवार

आंबेडकर जयंती १४ एप्रिल मंगळवार

कामगार दिन १ मे शुक्रवार

बुद्ध जयंती ७ मे गुरुवार

रमजान ईद २५ मे सोमवार

बकरी ईद १ ऑगस्ट शनिवार

रक्षा बंधन ३ ऑगस्ट सोमवार

स्वातंत्रदिन १५ ऑगस्ट शनिवार

पारशी दिन १६ ऑगस्ट रविवार

गणेश चतुर्थी २२ ऑगस्ट शनिवार

ताबूत विसर्जन ३० ऑगस्ट रविवार

गांधी जयंती २ ऑक्टोबर शुक्रवार

दसरा २५ ऑक्टोबर रविवार

दीपावली १४ नोव्हेंबर शनिवार

दीपावली पाडवा १६ नोव्हेंबर सोमवार

गुरुनानक जयंती ३० नोव्हेंबर सोमवार

ख्रिसमस २५ डिसेंबर शुक्रवार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिंगरोडच्या कामाला मुहूर्त

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

गेल्या पाच ते सहा वर्षांपासून डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या कळंबा (साई मंदिर) ते फुलेवाडी रिंगरोड कामाला अखेर सुरुवात झाली. ४० फूट रुंदीच्या रस्त्याचे दोन टप्प्यांत डांबरीकरण करण्यात येणार आहे. रस्त्याची संपूर्ण दुरुस्ती झाल्यानंतर अवजड वाहतूक शहराबाहेरुन जाण्यास मदत होऊन शहरातील वाहतूक कोंडी काही प्रमाणात निकालात निघणार आहे.

कोल्हापूर-गारगोटी व कोल्हापूर-राधानगरी या राज्य मार्गाला जोडणाऱ्या रिंगरोडचे काम अनेक वर्षांपासून रेंगाळले होते. राज्य नगरोत्थानमधील रस्त्यासाठी चारवेळा निविदा प्रसिद्ध करण्यात आली. एक ठेकेदारांने पलायन केल्यानंतर रस्त्याचे काम घेण्यास कोणताही ठेकदार पुढे येत नव्हता. लोकसभा निवडणुकीपूर्वी निविदा मंजूर होऊन वर्कऑर्डर देण्यात आली. पण निवडणूक आचारसंहिता आणि गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कामाला सुरुवात होऊ शकली नाही. दोन राज्य मार्गाना जोडणारा रस्ता असल्याने येथून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू असते. त्यामुळे रस्त्यावर मोठे खड्डे पडले होते. दोनवेळा मुरुम टाकून खड्डे बुजवण्यात आले. पण त्यामुळे निर्माण होणाऱ्या धुळीचा त्रास स्थानिक रहिवाशांना होत होता.

पावसाळ्यात तुंबणाऱ्या खड्ड्यांमुळे वाहनधारक घसरून पडणाच्या घटना वारंवार होत होत्या. रस्ता दुरुस्तीला त्वरित सुरुवात करण्यासाठी माजी आमदार अमल महाडिक यांनी आंदोलनही केले. त्यानंतर प्रशासनाने आचारसंहिता संपल्यानंतर काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्यानुसार रविवारी (ता.२७) आचारसंहिता संपल्यानंतर बुधवारपासून कामाला सुरुवात झाली. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह वाहनधारक समाधान व्यक्त करत आहेत. साई मंदिर व फुलेवाडी चौक अशा दोन्ही बाजुने खडीकरणाचे काम सुरू केले आहे. काम सुरू केल्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होणार आहे. हे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून केली जात आहे. दोन राज्य मार्गाना रिंगरोड जोडला जात आहे. त्यामुळे अवजड वाहनांसाठी रिंगरोडचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. त्यामुळे अवजड वाहनांमुळे शहरात होणारी वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

गळती दूर करण्याची आवश्यकता

फुलेवाडी चौकापासून आपटेनगर पाण्याच्या टाकीकडे जाणारी जलवाहिनी रस्त्याच्या कडेला आहे. जलवाहिनी टाकल्यानंतर गळती काढण्यासाठी वारंवार रिंगरोडची खोदाई करण्यात आली. या गळतीमुळे संपूर्ण रिंगरोडची दुर्दशा झाली. अद्यापही या जलवाहिनीला गळती आहे. रस्त्या करण्यापूर्वी या गळती दूर न केल्यास पुन्हा गळती काढण्यासाठी रस्त्याची खोदाई करण्याची वेळ प्रशासनावर येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्य नाट्यचा पडदा १५ पासून खुला

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ५९ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या कोल्हापूर केंद्रातंर्गत प्राथमिक फेरीला १५ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात १३ डिसेंबरपर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. यावर्षी २९ नाटकांची पर्वणी रसिकांना मिळणार असून स्पर्धा कालावधीतील रविवारी दोन प्रयोग तर अन्य दिवशी रोज एक प्रयोग होणार आहेत.

यावर्षी नाट्य स्पर्धेत सकाळी व सायंकाळी अशा सत्रात रोज दोन प्रयोग करण्याचा नियम लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या सांस्कृतिक संचालनालयाने घेतला होता. एक महिना चालणाऱ्या स्पर्धेसाठी परीक्षकांची वेळ मिळणे अवघड होत असल्यामुळे संयोजकांच्यावतीने रोज दोन प्रयोगाचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले होते. मात्र राज्य नाट्य स्पर्धेत बहुतांशी हौशी कलाकार हे आपली नोकरी, व्यवसाय सांभाळून काम करत असल्याने त्यांच्यासाठी सकाळच्या सत्रातील नाट्यप्रयोग गैरसोयीचा होत असल्याने या निर्णयाला नाट्यसंस्था व रंगकर्मींकडून विरोध झाला होता. अखेर याबाबत तोडगा काढण्यात आला व स्पर्धा कालावधीत रविवारी दोन तर अन्यदिवशी एक प्रयोग सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. या नुसार स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

१५ रोजी लक्ष्मण द्रवीड लिखित 'थिंक पॉइंट' या नाटकाने स्पर्धेचा पडदा उघडणार आहे. कोल्हापूरच्या यशोधरा पंचशील थिएटरतर्फे हे नाटक सादर होणार आहे. तर १३ डिसेंबर रोजी आदर्श स्पोर्टसतर्फे शेखर ताम्हणे लिखित 'सविता दामोदर परांजपे' या नाटकाने स्पर्धेची सांगता होणार आहे.

दिनांक संस्था नाटक वेळ लेखक

१५ नोव्हेंबर यशोधरा थिंक पॉइंट सायं. ७.०० लक्ष्मण द्रवीड

१६ नोव्हेंबर वसुंधरा संस्था नटरंग सायं. ७.०० डॉ. आनंद यादव

१७ नोव्हेंबर वरेरकर नाट्यसंस्था, बेळगाव वृंदावन दु. १२.०० इरफान मुजावर

१७ नोव्हेंबर सुगुण नाट्यकला कोल्हापूर पुरूष सायं. ७.०० जयवंत दळवी

१८ नोव्हेंबर सिद्ध्रेश्वर संस्था, सादळे वारणेचा वाघ सायं. ७.०० हरिश्चंद्र पाटील

१९ नोव्हेंबर साई नाट्यधारा, हलकर्णी खेळ सायं. ७.०० अनिल दांडेकर

२० नोव्हेंबर तुकाराम माळी मंडळ, कोल्हापूर एक होता बांबू काका सायं. ७.०० राजेंद्र पोळ

२१ नोव्हेंबर लक्ष्मी वसाहत मंडळ, कोल्हापूर आपले बुवा असे आहे सायं. ७.०० मनोहर काटदरे

२२ नोव्हेंबर शाहूवाडी शैक्षणिक व्यासपीठ, मलकापूर बॅलन्स शीट सायं. ७.०० विद्यासागर अध्यापक

२३ नोव्हेंबर संस्कार बहुउद्देशीय संस्था, कोल्हापूर लग्न शांतूच्या मेव्हणीचं सायं. ७.०० दशरथ राणे

२४ नोव्हेंबर संगीत नाट्यविभाग, शिवाजी विद्यापीठ तुघलक दुपारी १२.०० विजय तेंडुलकर

२४ नोव्हेंबर सम्राट नागरी पतसंस्था, हातकणंगले बळ सायं. ७.०० प्रा. दिलीप जगताप

२५ नोव्हेंबर रूद्रांश अॅकॅडमी कोल्हापूर मोठ्यांचा शेक्सपिअर सायं. ७.०० सुदर्शन खोत

२६ नोव्हेंबर राष्ट्रीय मोडी प्रबोधिनी, कोल्हापूर संसार टॉम अँड जेरीचा सायं. ७.०० अभिजित सोकांडे

२७ नोव्हेंबर राणी अहिल्याबाई वाचनमंदिर, कागल नातीगोती सायं. ७.०० जयवंत दळवी

२८नोव्हेंबर रंगयात्रा, इचलकरंजी हू इज अफ्रेड ऑफ व्हर्जिनीया वोल्फ सायं. ७.०० वर्धन कामत

२९ नोव्हेंबर प्रज्ञान कला अकादमी, कोल्हापूर हत्ती आला रे सायं. ७.०० अजय कांडर

३० नोव्हेंबर फिनिक्स क्रिएशन, कोल्हापूर ह्येच्या आईचा वग सायं. ७.०० राहुल बेलापूरकर

१ डिसेंबर परिवर्तन कला फाउंडेशन कोल्हापूर मी सारंगी दुपारी १२.०० मेघा पानसरे

१ डिसेंबर निष्पाप कलानिकेतन, इचलकरंजी युद्ध नको मज बुद्ध हवा सायं. ७.०० विष्णू सूर्या वाघ

२ डिसेंबर नाट्यशुभांगी, जयसिंगपूर सूर्याची पिल्ले सायं. ७.०० वसंत कानेटकर

३ डिसेंबर कृषीदूत संस्था, कोल्हापूर नियतीच्या बैलाला सायं. ७.०० विजय तेंडुलकर

४ डिसेंबर हृदयस्पर्श फाउंडेशन, कोल्हापूर भेंद्र्याचा वाघ सायं. ७.०० नीलेश बोरकर

५ डिसेंबर गायनसमाज देवल क्लब देव हरवला सायं. ७.०० राहुल बेलापूरकर

६ डिसेंबर कान्होपात्रा किणीकर रंगमंच ऊन पाऊस सायं. ७.०० राजन जोशी

१० डिसेंबर भारतवीर मित्र मंडळ, कसबा बावडा ऐश्वर्या ब्युटी पार्लर सायं. ७.०० विद्यासागर अध्यापक

११ डिसेंबर भगतसिंगयुवक मंडळ, बेळगाव खर काहीच नसतं सायं. ७.०० पराग घोंगे

१२ डिसेंबर आदित्य हौशी नाट्यसंस्था आर्ट सायं. ७.०० प्रसन्न कुलकर्णी

१३ डिसेंबर आदर्श स्पोर्टस, निगवे सविता दामोदर परांजपे सायं. ७.०० शेखर ताम्हाणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१६७ ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व केले रद्द

$
0
0

\Bम. टा. प्रतिनिधी, वैजापूर

\Bविहित मुदतीत जातीचे प्रमाणपत्र सादर न केल्याबद्दल वैजापूर तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतीमधील १६७ सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे सदस्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या सदस्यांमध्ये ११८ महिला सदस्य व ४९ पुरुष सदस्य असल्याची माहिती निवडणूक विभागातून मिळाली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षित जागांवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निवडून आल्यानंतर सहा महिन्याच्या आत जात प्रमाणपत्र दाखल करणे बंधनकारक आहे. मात्र, यातील अनेक सदस्यांनी हे प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांना नोटीस बजावून उपविभागीय अधिकारी यांच्यासमोर सुनावणीसाठी बोलावण्यात आले. तथापि त्यांनी जातीचे प्रमाणपत्र न सादर करण्याबाबतचा खुलासा किंवा जातीचे प्रमाणत्र दाखल केले नाही. त्यामुळे हा अहवाल जिल्हधिकाऱ्यांना पाठवण्यात आला. त्यानुसार जिल्हधिकाऱ्यांनी सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश काढले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी महापौर भिकशेठ पाटील यांचे निधन

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पुरोगामी विचारांचा वारसा जपणारे कोल्हापूरच्या सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते माजी महापौर भिकशेठ ज्ञानदेव पाटील (वय ७३) यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. आजारी असल्याने गेले काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गेल्या अडीच महिन्यांपासून पाटील हे किडनीच्या विकाराने त्रस्त होते. त्यांच्या रक्तातील पांढऱ्या पेशीही कमी झाल्या होत्या. गेल्या चार दिवसात त्यांची प्रकृती गंभीर बनली होती. शुक्रवारी पहाटे उपचार सुरु असताना त्यांचे खासगी हॉस्पिटलमध्ये निधन झाले.

पुरोगामी विचारांचे पाईक असलेल्या भिकशेठ पाटील यांनी महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यात आपले आयुष्य वेचले. १९८५ ते १९९५ या कालावधीत दोन टर्ममध्ये सलग दहा वर्षे नगरसेवक म्हणून कार्य केले. १९९० च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांनी शिवाजीराव चव्हाण यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष होते. पाटील यांनी घरोघरी चार ते पाच निवडक कार्यकर्त्यांसह प्रचार करुन या निवडणुकीत विजयश्री खेचून आणली. १९९० मध्ये त्यांनी कोल्हापूरचे महापौरपद भूषवले.

शिवाजी पेठेतील मरगाई गल्लीत राहणाऱ्या पाटील यांनी सुरवातीच्या काळात पत्रकार म्हणूनही काम केले. प्रिटिंग प्रेस, पुस्तक प्रकाशन व्यवसायातही लक्ष घातले होते. 'कोल्हापूरची मोठी माणसं', 'समतेचे धारकरी', 'लोकराजा शाहू छत्रपती' ही पुस्तके त्यांनी लिहून प्रकाशित केली. 'कोल्हापूरची मोठी माणसं' या पुस्तकाला माजी उपपंतप्रधान स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची प्रस्तावना होती. 'लोकराजा राजर्षी शाहू' ही दूरदर्शन मालिका व चित्रपट निर्मिती करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. शिवाजी तरुण मंडळासह अनेक संस्थांवर ते कार्यरत होते. बालकल्याण संकुलाचे मानद सचिव म्हणून त्यांनी बरीच वर्षे काम केले. राजर्षी शाहू कृतज्ञता प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष, राष्ट्रीय तालीम संघाच्या सरचिटणीसपदीही त्यांनी काम केले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

....

कोट

'सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या भिकशेठ पाटील यांना सामाजिक कार्याची आवड होती. १९९० च्या निवडणुकीत शिवाजी पेठेने त्यांना डोक्यावर घेतले. महापौरपद भूषवूनही त्यांनी साधी राहणी कधीच सोडली नाही. राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित मालिका दूरदर्शनवर सादर व्हावी यासाठी त्यांनी परिश्रम घेतले. बालकल्याण संकुलातील त्यांचे काम वाखाणण्यासारखे होते. एक चांगला माणूस आपल्यातून निघून गेला आहे.

अॅड. महादेवराव आडगुळे, माजी महापौर

...

'अण्णा म्हणजे साधा, निगर्वी माणूस होते. एखाद्या व्यक्तीला मदत करण्यासाठी ते तनमनाने काम करायचे. त्यांच्या महापौरापदाचा कार्यकाळही अतिशय चांगला होता. बालकल्याण संकुलात मानद सचिव म्हणून काम करताना त्यांनी संस्थेवर लोकांचा विश्वास वाढवला. त्यांच्या प्रेरणेने आम्ही सर्वजण काम करत आहोत.

पद्मजा तिवले, मानद सचिव, बालसंकुल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हेल्मेट सक्तीचा पहिल्याच दिवशी वाहनचालक गोंधळले

$
0
0

हेल्मेट सक्तीचा पहिल्याच दिवशी वाहनचालक गोंधळले

२५३ हेल्मेटच्या, ३४ सीट बेल्ट न लावणाऱ्या वाहनांवर कारवाई; ६६ वाहने ताब्यात

सोलापूर : सोलापूर शहर वाहतूक शाखा आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने शुक्रवारी, एक नोव्हेंबरपासून सोलापुरात हेल्मेट न घालणाऱ्यांवर, सीटबेल्ट न लावणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात केली आहे. शुक्रवारी पहिल्या दिवशी शहरातील विविध चार ठिकाणी झालेल्या कारवाईमध्ये हेल्मेट न वापरलेल्या २५३ वाहनचालकांवर तर सीट बेल्ट न लावलेल्या ३४ चारचाकी चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. ६६ वाहने ताब्यात घेण्यात आली असल्याची माहिती पोलिस उपायुक्त डॉक्टर वैशाली कडूकर यांनी दिली.

हेल्मेटची सक्तीला शहरवासीयांनी कडाडून विरोध केला आहे. सोलापूर छोटे शहर असल्यामुळे शहरात हेल्मेटची सक्ती न करता शहराच्या बाहेर राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेटची सक्ती करण्यात यावी, असा सूर सोलापूरकरांचा होता. हेल्मेट सक्तीच्या विरोधात सोलापूर शहरातील सामाजिक संघटनांनी आवाज उठविला होता, परंतु पोलिस व आरटीओने आपली कारवाई सुरू ठेवली होती. सोलापूरकरांच्या मते मार्चअखेर आल्यानंतर आणि कोणत्याही प्रकारचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी पोलिस व आरटीओकडून हेल्मेट सक्ती करून कारवाईचा बडगा उचलला जातो आणि टार्गेट पूर्ण झाल्यानंतर कारवाई थंड पडते. सोलापूरकरांनी अनेकदा या कारवाईचा अनुभव घेतलेला आहे. हेल्मेट सक्ती सुरू होणार म्हटल्यानंतर हेल्मेट विक्रीची दुकाने रस्त्यांवर थाटली गेली आहेत. मानांकन नसलेली, कमी दर्जाची हेल्मेट डोक्यावर घालून हेल्मेट सक्तीपासून बचाव केला जात आहे.

शहरातील तुळजापूर नाका येथील पर्ल गार्डन परिसर, शिवाजी चौक, कन्ना चौक, रेल्वे स्टेशन परिसर अशा चार ठिकाणी पोलिसांनी हेल्मेट व सीटबेल्ट न वापरणाऱ्या वाहनचालकांना बाजूला घेऊन दंड ठोठावला. वाहन परवाना आणि इन्शुरन्ससह अन्य कागदपत्रे नसल्यामुळे ६६ वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खाते बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पूरग्रस्तांच्या खात्यावर सानुग्रह अनुदान वर्ग करण्यास असमर्थता दाखविणाऱ्या शिरोळ येथील स्टेट बँक ऑफ इंडियामधील खाते बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी दिले. सरकारी योजनांचे लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यास हलगर्जीपणा करणाऱ्या बँकांमधील सर्व शासकीय खाती बंद करण्यात येतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी देसाई यांनी शुक्रवारी शिरोळ तहसील कार्यालयात पूरग्रस्तबाधितांच्या मदत वाटपाचा आढावा घेतला. त्यावेळी शिरोळ येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत खात्यावरुन पूरबाधित कुटुंबांना विविध प्रकारचे सानुग्रह अनुदान बल्क ट्रान्स्‍फरद्वारे संबंधिताच्या खात्यावर वर्ग करण्यास असमर्थता दर्शविल्याचे निदर्शनास आले. पूरग्रस्तांना मदत म्हणून दिलेल्या सर्व रक्कमा बाधित कुटुंबांच्या खात्यावर जमा झाल्याबाबत ताळमेळ घेवून बँक शाखेतील खाते बंद करण्याचे आदेश दिले. पूरबाधित कुटुंबांना तात्काळ अनुदान मिळण्यासाठी सद्यस्थितीमध्ये नैसर्गिक आपत्ती निवारणार्थ मिळालेले सर्व अनुदान जयसिंगपूर येथील बँक ऑफ इंडिया शाखा येथे खाते उघडण्यास परवानगी दिली. याबाबत परवानगीचे पत्र निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी तत्काळ शिरोळ तहसीलदारांना पाठवले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इच्छुकांचे ‘मिशन महापालिका’

$
0
0

महापालिका ... लोगो

Maruti.Patil

@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर

विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी आमदारांच्या अभिनंदनाचे डिजीटल फलक शहराच्या गल्लीबोळात झळकू लागले आहेत. फलकांमधून विजयोत्सव साजरा करताना सोबत 'मिशन महापालिका' अशी जोड दिली जात आहे. महापालिका निवडणुकीला अद्याप एक वर्षाचा कालावधी असला, तरी फलक उभारणीतून इच्छुक असल्याचा संदेश पक्षनेतृत्वाबरोबर प्रभागातील मतदारांपर्यंत खुबीने पोहोचवला जात आहे. त्यामुळे प्रभागा-प्रभागामध्ये ईर्ष्येचे वातावरण आतापासून तयार होऊ लागले आहे.

२०१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने उल्लेखनीय यश मिळवले. नरेंद्र मोदींच्या झंझावतामुळे अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षांची धूळधाण उडाली. मोदींचा करिष्मा राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही दिसून आला. पण त्याला केवळ कोल्हापूर महापालिका अपवाद ठरली. २०१५ झालेल्या पंचवार्षिक निवडणूक काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांनी स्वतंत्रपणे तर भाजप व माजी आमदार महादेवराव महाडिक यांची ताराराणी आघाडी एकत्रपणे लढली. भाजप-ताराराणीला रोखण्यासाठी पडद्यामागे अनेक घडामोडी झाल्या. त्याद्वारे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील व राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी विजय मिळवला. राज्यातील एकमेव महापालिका काँग्रेस आघाडीकडे राहिल्याचे शल्य अनेकवेळा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवले. त्यांनी सातत्याने चमत्काराची अपेक्षा व्यक्त केली. त्यांना स्थायी समिती सभापतीच्या माध्यमातून एकदा यश मिळाले. तरी महापौरपद हस्तगत करता आले नाही.

गेल्या चार वर्षात जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलली असली, तरी महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी विरुद्ध भाजप-सेना अशी लढत होईल. ताराराणी आघाडीने स्वतंत्र अस्तित्व ठेवल्यास तेही काँग्रेस आघाडी विरुद्ध मैदानात दंड थोपटतील. निवडणुकीला वर्षभराचा अवधी असला, तरी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये उत्तर व दक्षिण मतदारसंघात महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांनी झोकून देवून प्रचार केला. प्रत्येक प्रभागात दोन्ही गटातील सुमारे डझनभर कार्यकर्ते पायाला भिंगरी लावून प्रचारामध्ये सहभागी झाले होते. सर्व पक्षांच्या नेत्यांना अनेकांना महापालिका निवडणुकीचा शब्द दिला आहे. त्यामुळे विजयी उमेदवारांचे अभिनंदनाचे फलक लावताना जोडीला 'मिशन महापालिका' असा स्लोगन देताना ठळकपणे महापालिकेचा लोगोही डिजीटल फलकावर झळकत आहे. नेत्यांसाठी विधानसभा निवडणुकीमध्ये केलेल्या पळापळीचा हिशोब उमेदवारी मिळवताना मांडला जाणार आहे. केवळ विजयी उमेदवारांचेच नव्हे, तर पराभूत उमेदवारांच्या समर्थकांनीही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आरक्षण सोडतीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट होईल, त्यावेळी विधानसभा निवडणुकीदरम्यान अनेकांना दिलेला शब्द खरा करण्यासाठी इच्छुकांच्या नाकदुऱ्याही पक्षनेतृत्वाला काढाव्या लागणार आहेत. त्यामुळे एका पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यास क्षणात पक्षांतराच्या घटना घडण्याच्या शक्यताही आतापासून वर्तवल्या जावू लागल्या आहेत. निवडणुकीला अद्याप वर्षाचा कालावधी असला, तरी इच्छुकांनी आतापासून तयारी सुरू केल्याने शहरात चर्चेला उधाण आले आहे.

.....

चौकट

पॅनेल पद्धतीने होणार निवडणूक

राज्यातील महापालिकांची निवडणूक पॅनेल पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सांगली महापालिकेची निवडणूक पार पडली. सुमारे १५ ते २० हजार मतदारसंघासाठी एक प्रभाग तयार करण्यात येणार आहे. एक प्रभागामधून तीन उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठीची आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. तत्पूर्वी महापौरपदाची आरक्षण सोडत निघेल. संपूर्ण प्रक्रिया जून २०२० मध्ये पार पडेल. त्यानंतर खऱ्या अर्थाने राजकीय मोर्चेबांधणीला सुरुवात होईल.

......

महापौर निवड ठरेल निमित्त

काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार किमान दोन ते तीन महापौर निवडीचे सोपस्कर होण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस वगळता महापालिकेतील अनेक नगरसेवकांनी पक्षनिष्ठा बासनात बांधून ठेवली होती. परिणामी अनेक नगरसेवकांवर पक्ष नेतृत्वाचा रोष आहे. तसाच रोष नगरसेवकही नेतृत्वावर व्यक्त करत आहेत. त्यामुळे आगामी महापौर निवडीमध्ये कोण-कोणाशी संधान बांधणार यावरही पुढील निवडणुकीचे आडाखे बांधले जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू

$
0
0

ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू

सोलापूर :

दिवाळीसाठी आलेल्या विवाहित महिलेचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास गुरू नानक चौकात घडली. शुभांगी बनकर (वय ३०, रा. सोलापूर) असे मृत महिलेचे नाव आहे.

शुभांगी आपल्या वडिलांसोबत दुचाकीवर बसून घराकडे जात असताना गुरू नानक चौकात विजयपूरहून हैद्राबादकडे जाणाऱ्या माल ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत शुभांगी यांना जबर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. दुचाकी चालविणारे वडील गंभीर जखमी झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलांना विष पाजून पित्याची आत्महत्या

$
0
0

मुलांना विष पाजून पित्याची आत्महत्या

दोन मुलांचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

वडिलांनी तीन मुलांना विष पाजून स्वत: गळफास लावून घेऊन केली. विष पाजलेल्या तीन मुलांपैकी दोघांचा मृत्यू झाला असून, एक मुलगी गंभीर अवस्थेत आहे. ही घटना माढा तालुक्यातील बेंबळे येथे गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. ही घटना अनैतिक संबंधातून घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

रवी लोखंडे, असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या पित्याचे नाव असून, विष पाजल्याने अत्यवस्थ असलेल्या आयुष रवी लोखंडे (वय ६) व अजिंक्य रवी लोखंडे (वय ८) यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, तर मुलगी अनुष्काला पुढील उपचाराकरीता सोलापूर येथे पाठवण्यात आले आहे.

मृत रवी लोखंडे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील वडापुरी गावचा रहिवासी आहे. रवी हा वडापुरी येथे कुटुंबासह राहत होता. माढा तालुक्यातील बेंबळे गावात तो आपला मुलगा आयुष, अजिंक्य व मुलगी अनुष्का यांच्यासह आपल्या मेव्हणीला भेटायला गेला होता. काही कारणाने त्यांच्यात वाद झाले. त्यानंतर रवीने स्वतः आपल्या मुलांना शीतपेयातून विषारी औषध पाजले व स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. रवी लोखंडे यांने माढा तालुक्यातील बेंबळे गावच्या परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, तत्पूर्वी त्याने आपल्या दोन मुले व एक मुलीला विषारी औषध पाजले होते. मुलगा आयुष, अजिंक्य व मुलगी अनुष्का यांना उपचारासाठी इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आयुष व अजिंक्य यांचा गुरुवारी रात्री उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मुलगी अनुष्काला पुढील उपचाराकरीता सोलापूर येथे हलविण्यात आले आहे. रवी लोखंडे याने आत्महत्या करण्यापूर्वी एक पत्र स्वतःच्या मोबाइलवरून आपल्या मित्रांना व नातेवाईकांना पाठवले असून, त्यात हे टोकाचे पाऊल का उचलले, याचा खुलासा केला आहे. या घटनेचा अधिक तपास टेंभूर्णी पोलिस करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images