Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

रणधुमाळीमुळे बदलली दिनचर्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधानसभा निवडणुकीचा प्रचार अखरेच्या टप्प्यात आला असून उमेदवारांसह त्यांचे कुटुंबीय पायाला भिंगरी बांधल्याप्रमाणे प्रचारासाठी फिरत आहेत. सकाळी लवकर बाहेर पडून रात्री होणाऱ्या उशीर यामुळे त्यांची संपूर्ण दिनचर्या बदलून गेली आहे. जीम, योगा, फिरणे अशा सर्वच गोष्टीवर प्रचारामुळे बंधने आलेली असताना आहारावरही परिणाम झाला आहे. अपुरी झोप, प्रतिस्पर्धांच्या हालचालींमुळे ताणही आहे.

जिल्ह्यातील अनेक राजकीय नेते नियमितपणे सकाळी किंवा सायंकाळी जीम, योगा, वॉकिंग करत असतात. विशेषत: सकाळच्यावेळी तास-दीड तासाच्या व्यायामानंतर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी अथवा आपल्या संस्थेतून संपर्क साधत असतात. त्यामुळे त्यांचे एक रुटीन ठरलेले असते. मात्र गेल्या दोन आठवड्यापासून सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांसह त्यांच्या कुटुंबांची दिनचर्या बदलून गेली आहे. अर्ज माघार घेतल्यानंतर त्यांचे संपूर्ण रुटीन बदलले आहे. पदयात्रा, रॅली, जाहीर सभा, कोपरा सभा आदीच्या माध्यमातून दिवसदिवसभर उमेदवार मतदारांशी संपर्क साधत आहेत. दिवसभराच्या व्यस्त कार्यक्रमामुळे रात्री एक ते दोन वाजता घरी आगमन होते. दुसऱ्या दिवशीचे नियोजन आदल्या रात्रीच केले जाते.

सकाळी पुन्हा प्रचारासाठी गावोगावी फिरण्यासाठी बाहेर पडत आहेत. त्यामुळे अनेकांचा सकाळचा संपूर्ण व्यायामच बंद झाला आहे. आमदार चंद्रदीप नरके, प्रकाश आबिटकर, उल्हास पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, राजेश क्षीरसागर व्यायामासाठी दररोज एक तासाचा वेळ काढतात. पण गेल्या काही दिवसांत त्यांचा व्यायाम बंद झाला आहे. आमदार हसन मुश्रीफ, सत्यजित पाटील, उल्हास पाटील पहाटे शेतावर फेरफटका मारून येतात. पण त्यांचेही शेतावर जाणे बंद झाले आहे. प्रचाराच्या काळात व्यायामाबरोबर जेवणाच्या वेळाही बदलून गेल्या आहेत. पदयात्रेच्या दरम्यान अनेकांना जेवणालाही वेळ मिळत नाही. त्यावेळी सर्वजण शहाळ्यावर आपली भूक भागवत आहेत. तर काहीजण सकाळी बाहेर पडतानाच जेवणाचा डबा घेवून बाहेर पडतात. कधी गाडीत तर कधी कार्यकर्त्यांसोबत गप्पा मारत डब्यातील जेवणाचा आस्वाद घेतात.

शहाळेच ठरताहेत आधार

कागल मतदारसंघातील उमेदवार समरजित घाटगे डाएट करत असल्याची माहिती मिळाली. तर अनेक उमेदवार पूर्णत: शाकाहारी असल्याचे समोर आले. दिवसभरच्या प्रचारामध्ये शहाळ्यावर अधिक भर दिला जात आहे. तर अनेकजण दुपारचे जेवळ कार्यकर्त्यांसोबत अथवा गाडीत घेत आहेत. सर्व धामधुमीत आमदार पाटील, घाटगे व के. पी., ऋतुराज काही मिनिटे तरी व्यायाम करुन बाहेर पडत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सोलापूर मनपाच्या परिवहन विभागाचा खेळखंडोबा

$
0
0

चौदा महिन्यांच्या थकीत पगारासाठी बारा दिवसांपासून संप

मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सोलापूर महानगर पालिकेचा उपक्रम असलेल्या परिवहन विभागाकडील कर्मचाऱ्यांनी मागील दहा महिन्यांचे आणि चालू चार महिन्यांच्या थकीत वेतनासाठी मागील बारा दिवसांपासून संप पुकारला आहे. या संपामुळे सोलापूर शहर आणि परिसरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली आहे. लोकप्रतिनिधी आणि कामगार नेते विधानसभा निवडणुकीत गुंतल्यामुळे परिवहन संपातील कामगारांकडे पाहण्यासाठी कोणालाही वेळ नाही. ऐन दिवाळीच्या तोंडावर परिवहन कर्मचाऱ्यांचे दिवाळं निघण्याची वेळ आली आहे. मनपा प्रशासनाने केवळ एकाच महिन्याचा पगार देण्याची तयारी दर्शविल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय कामगारांनी घेतला आहे. दहा महिन्यांच्या पगाराचा विषय न्यायालयात गेल्याने अडचणीत आणखी भर पडली आहे.

सोलापूर महानगर पालिकेचा उपक्रम असला तरी महानगर पालिकेकडून परिवहन विभागाला सापत्न वागणूक मिळत आहे. या ना-त्या कारणाने पगारासाठी चाल ढकल करायची आणि संप केल्यास मोडीत काढण्यासाठी कर्मचाऱ्यांवर दबाव आणायचा, अशी खेळी महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून नेहमीच होताना दिसून येते. परिवहन विभागाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिकेकडून कोणत्याही प्रकारचे आर्थिक सहाय्य मिळत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

बसेस १९१, धावतात फक्त ३५

परिवहन विभागाकडे एकूण १९१ बसेस आहेत, त्यापैकी ९९ बसेस चेसी क्रॅक असल्यामुळे धक्क्याला लागल्या आहेत. उर्वरित ९२ पैकी ६ स्क्रॅप असून, १० वाल्वो बसेस दुरुस्ती अभावी बंद आहेत. उर्वरित ७६ पैकी ४१ बसेस किरकोळ दुरुस्ती अभावी बंद आहेत. केवळ ३५ बसेसच फक्त मार्गावर धावत आहेत, अशी अत्यंत वाईट स्थिती महापालिका परिवहन विभागाकडील बसेसची आहे. केवळ ३५ बसेसच मार्गावर धावत असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. ज्या ९९ बसेस धक्क्याला लावून ठेवण्यात आले आहेत, त्या बाबत अशोक लेलँड कंपनीविरोधात सोलापूर जिल्हा न्यायालयात दावा सुरू आहे. त्यामुळे महापालिकेला या बस खरेदीमध्ये कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.

परिवहन दररोज अडीच लाख तोटा

चालक-वाहक, मेकॅनिक आणि कार्यशाळा, असे एकूण ३७० कर्मचारी आहेत. त्यापैकी ५० कर्मचारी प्रतिनियुक्तीवर महापालिकेकडे गेले आहेत. उर्वरित ३२० कर्मचाऱ्यांच्या पगारावर दरमहा ६० लाख रुपये इतका खर्च होतो. महिन्याकाठी परिवहनला सुमारे ४५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते, तर सुमारे १ कोटी ५ लाख रुपये इतका महिन्याचा खर्च होतो. उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ घातला तर परिवहनला दररोज अडीच लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. डिझेलसाठी महिन्याचा खर्च ३५ ते ४० लाख रुपये आहे, तर महिन्यासाठी दुरुस्तीवरचा खर्च पाच लाख रुपये इतका आहे. सेवानिवृत्त सेवकांच्या देय रकमेसाठी दर महिन्याला कोर्टामध्ये पाच लाख रुपये भरावे लागत आहेत. जून २०१९च्या पगारासाठी परिवहनच्या खात्यावर ५३.१२ लाख रुपये तीन ऑक्टोबरला जमा झाले आहेत. मात्र, संप मागे घेतला तरच पगार करणार, असे परिवहन विभागाचे प्रभारी व्यवस्थापक श्रीशैल लिगाडे यांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणुकीनंतर राष्ट्रवादीत मोठी फूट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या अटकेवरुन अजित पवार आणि छगन भुजबळ एकमेकांवर टीका करत आहेत. त्यामुळे पुढील चार दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठ्या घडामोडी होणार असून निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडेल,' असे राजकीय भाकित भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी केले. 'बंडखोरांनी माघार न घेतल्यास त्यांना महायुतीचे दरवाजे कायमचे बंद होतील,' असा इशाराही दिला.

प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, 'शिवसेना प्रमुखांना अटक केली होती ही आमची चूक होती अशी कबुली अजित पवार यांनी दिली आहे. त्यांच्या वक्तव्यावर भुजबळ चांगलेच संतापले आहेत. अजित पवारांनी राजीनामा देऊन त्यावर रडण्याचे नाटक केले, अशी टीका भुजबळांनी केली आहे. त्यामुळे चार ते पाच दिवसांत राष्ट्रवादीत वाद झाला तर आश्चर्य वाटू नये. निकालानंतर राष्ट्रवादीत १०० टक्के फूट अटळ आहे. काँग्रेसचे अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात इकडे फिरकले नाहीत. राष्ट्रवादीकडे फक्त शरद पवार, अमोल कोल्हे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे हेच नेते भाषण करत आहेत. गेल्या पाच वर्षांत महायुतीने विकास कामांचा डोंगर उभा केला असल्याने जिल्ह्यात दहाही जागेवर युतीचे उमेदवार विजयी होतील.'

आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले,'कोल्हापूरची स्वाभिमानी जनता काँग्रेसच्या उद्योजक उमेदवाराला स्वीकारणार नाहीत. या उमेदवाराची आर्थिक उलाढाल मोठी असताना त्यांनी सीएसआर फंड गिळंकृत केला आहे.' सभेला खासदार प्रा. संजय मंडलिक, संपर्क नेते अरुण दूधवडकर, मिलिंद नार्वेकर, तेजस ठाकरे, पश्चिम महाराष्ट्र व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव, माजी आमदार सुरेश साळोखे, शहर प्रमुख रविकिरण इंगवले, भाजप महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे, सरचिटणीस अशोक देसाई, विजय जाधव, माजी महापौर शिवाजीराव कदम आदी उपस्थित होते.

कोल्हापूर-शिर्डी विमानसेवा सुरू होणार

कोल्हापूरचा विमानतळ विकसीत झाला असून २७२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. कोल्हापुरातून मुंबई, हैद्राबाद, तिरुपती, बेंगलोर येथे विमानसेवा सुरू झाल्या आहेत. लवकरच कोल्हापूर शिर्डी विमानसेवा सुरू होईल, अशी घोषणाही प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठ नागरिकांची पेन्शनसाठी निदर्शने

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

ई.पी.एस. ९५च्या निवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तवेतनात वाढ करून ती किमान नऊ हजार रुपये करावी, यासह विविध मागण्यांसाठी कोल्हापूर पेन्शनर संघटनेच्यावतीने ताराबाई पार्कमधील भविष्यनिर्वाह निधी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास पाच डिसेंबरला दिल्ली येथे संसदेवर मोर्चा काढण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

ई.पी.एस. ९५ राष्ट्रीय समन्वय समितीतर्फे दिल्ली येथील प्रधान कार्यालयावर व देशभरातील क्षेत्रीय कार्यालयांवर गुरुवारी मोर्चा, निदर्शने करून निवेदने देण्यात आली. जिल्हा पेन्शनर संघटनेच्या वतीने भविष्यनिर्वाह निधीच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. आंदोलनात कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी जिल्हा पेन्शनर संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

मागण्या मान्य होईपर्यंत सनदशीर मार्गाने लढा देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. पेन्शन वाढीसाठी न्यायालयाने निर्णय देऊनदेखील सरकारकडून न्याय मिळत नसेल तर आत्मदहन करू, असा इशाराही देण्यात आला. पाच डिसेबरला दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन होणार असून, त्याच दिवशी संसदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. यामध्ये पेन्शनरांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

निदर्शनानंतर संघटनेचे अध्यक्ष शामराव मोरे यांच्या नेतृत्वाखाली. आयुक्त सौरभ प्रसाद यांना निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात सचिव ए. बी. पाटील, संघटक सुभाष गुरव, राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य शिवाजी देसावळे, शिवाजी सावंत, समन्वयक दिलीप पाटील, ए. सी. दांडेकर, बिद्री साखर कामगार सभेचे अध्यक्ष आनंदराव आबिटकर यांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रविकांत तुपकरांची स्वाभिमानीत 'घरवापसी'

$
0
0

कोल्हापूरः माजी खासदार व शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे खंद्दे समर्थक असलेले रविकांत तुपकर यांनी अवघ्या २० दिवसात स्वाभिमानी पक्षात घरवापसी केली आहे. २० दिवसांपूर्वी त्यांनी शेतकरी संघटनेला सोडचिठ्ठी देत राज्यातील मंत्री सदाभाऊ खोत यांच्या 'रयत क्रांती'मध्ये प्रवेश केला होता. परंतु, ते पुन्हा एकदा राजू शेट्टी यांच्या पक्षात आले आहेत. कोल्हापुरात त्यांनी राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. यामुळे भाजपचे मित्रपक्ष असलेल्या सदाभाऊ खोत यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर रविकांत तुपकर यांनी राजीनामा दिल्यामुळे राजू शेट्टी यांना मोठा धक्का बसला होता. रविकांत तुपकर भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. परंतु एके काळचे सहकारी आणि ‘रयत क्रांती संघटने’च्या सदाभाऊ खोत यांच्याशी त्यांनी संधान बांधले होते. मी गेल्या अनेक वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक सक्रीय कार्यकर्ता म्हणून कार्यरत होतो. माझ्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी होती. पण आज प्रदेशाध्यक्षपदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, तो मंजूर करावा', असे रवीकांत तुपकर यांनी राजीनामा देताना म्हटले होते. बुलडाण्यातील चिखली मतदारसंघातून ते निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे म्हटले जात होते. परंतु ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढवण्याची अट त्यांना घालण्यात आली होती.

स्वाभिमानी संघटनेत अतिशय आक्रमकपणे आंदोलन करत तुपकर कायम चर्चेत राहिले होते. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी ही राजकीय खेळी खेळल्याने अनेकांना धक्का बसला आहे.

जाणून घ्या रविकांत तुपकर यांच्याविषयी...

>> रवीकांत तुपकर हे बुलडाणा जिल्ह्यातील सावळा गावचे
>> माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत चळवळीत काम
>> स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनातील अग्रणी चेहरा
>> बुलडाणा जिल्हाध्यक्ष म्हणून काम, प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली
>> स्वाभिमानीचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते म्हणून ओळख
>> स्वाभिमानी सत्तेतून बाहेर पडल्यानंतर खादी ग्रामोद्योग महामंडळाचा राजीनामा
>> लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते, पण जागा न मिळाल्यामुळे माघार
>> २०१४ च्या विधानसभेला बुलडाण्यातून चिखलीतून इच्छूक, पण माघार
>> २६ सप्टेंबर २०१९ रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपद आणि सदस्यत्वाचा राजीनामा
>> १६ ऑक्टोबर २०१९ रोजी पुन्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेत घरवापसी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गुणवत्तापूर्ण शिक्षणच जागतिक स्पर्धेत टिकेल’

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'आजच्या घडीला ज्ञान मिळवण्याचे स्रोत वाढले आहेत. तंत्रज्ञानामुळे माहिती मिळवणे सोपे झाले आहे. तंत्रज्ञानाने शिक्षणातही क्रांती केली आहे. मात्र शिक्षणाची गुणवत्ता हा अजूनही चिंतेचा विषय आहे. गुणवत्तापूर्ण व संशोधनावर भर असलेले शिक्षणच जागतिक स्पर्धेत तग धरेल' असे प्रतिपादन नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांनी केले. ताराराणी विद्यापीठाच्या अमृत महोत्सव प्रारंभ कार्यक्रमात उच्च शिक्षणासमोरील आव्हाने या विषयावर डॉ. वाघमारे बोलत होते. अध्यक्षस्थानी ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील होते.

डॉ. क्रांतिकुमार पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. संस्थेचे सचिव प्राजक्त पाटील, उपाध्यक्ष डॉ. एस. एन. पोवार, अशोक पर्वते, कांचन पाटील, जयश्री पाटील, डॉ. भारती शेळके उपस्थित होते. एस. डी. चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. वाघमारे यांचा परिचय डॉ. सुजय पाटील यांनी करून दिला. जयसिंगराव सावंत यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सारथी फेलोशिपप्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'आपल्या संशोधनाने एकूण सामाजिक ज्ञानामध्ये नेमकी काय भर टाकली, कोणते योगदान दिले, या बाबीकडे संशोधकांनी गांभीर्यपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे' असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी केले.

शिवाजी विद्यापीठातील ४८ संशोधक विद्यार्थ्यांची महाराष्ट्र सरकारच्या छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेतर्फे (सारथी) विविध फेलोशीपसाठी निवड झाली. विद्यापीठातर्फे या विद्यार्थ्यांसह अन्य विविध योजनांखाली फेलोशीपप्राप्त ५७ विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ राजर्षी शाहू सभागृहात झाला.

प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के म्हणाले, 'संशोधक विद्यार्थ्यांसमवेत त्रैमासिक बैठका घेण्यात येतील. त्यासाठी सिंगल विंडो सदृश काही व्यवस्था निर्माण करता येईल का, या दृष्टीनेही चाचपणी करता येईल.' अरविंद पाटील (भौतिकशास्त्र) व प्रवीण शेंबडे (भूगोल) या संशोधक विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. पी. एस. पाटील यांनी स्वागत केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. धैर्यशील यादव यांनी सूत्रसंचालन केले. उपकुलसचिव संजय कुबल यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालये व विद्यापीठ विभागाने याचे संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फॅशन्स, स्टाइल सजावटही ट्रेंडी

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

दिवाळी हा जसा दिव्यांचा सण तसाच खरेदीचाही सण. आठवड्यावर आलेल्या दिवाळीची चाहूल बाजारपेठेत सजलेल्या दुकानांनी आणि वेगवेगळ्या स्टाइलच्या ड्रेस, सजावटीच्या वस्तू, कलात्मक साहित्यांनी लागली आहे. दरवर्षी दिवाळीमध्ये एक नवा ट्रेंड येत असतो आणि खरेदीच्या निमित्ताने तो व्हायरल होत असतो. यंदाही कपड्यांच्या फॅशन, स्टाइलपासून सजावटीच्या वस्तूंमध्येही हटके ट्रेंड पहायला मिळत आहेत.

मुलींच्या ड्रेसमध्ये लाँग वनपीस हिट

दसरा संपला की दिवाळीच्या कपडे खरेदीला वेग येतो. काहीजण दसऱ्यातच दिवाळीच्या खरेदीचा आनंद पूर्ण करतात. पण दिवाळीचा आदला आठवडा खरेदीसाठी दुकानं, मॉल, शोरूम्स पालथी घालण्यात वेगळीच मजा असते. सध्या हाच माहोल दिसत आहे. मुलींच्या ड्रेसमध्ये दरवर्षी एक कॉमन ट्रेंड येतो. कलरपासून स्टाइलपर्यंत असलेला हा ट्रेंड त्यावर्षीच्या दिवाळीचा फॅशन आयकॉनच ठरतो. यंदा लाँग वनपीस हिट असून त्यामध्ये सेंटरकट इनफॅक्टर आहे. दोन कॉन्ट्रास्ट कलरचा ट्रेंड सध्या फॅशनमंत्रा बनला आहे. नेट, प्युअरसिल्क व पेपरसिल्क या फॅब्रिकमधील वन पीसवर कांजीवरमची हेवीवर्क असलेली ओढणी या स्टाइलला मागणी असून खास पारंपरिक लूकसाठी यंदा हीच स्टाइल दिवाळीत दिसणार आहे. नेट वर्क तसेच स्कर्ट बॉर्डर डिझाइन हा ट्रेंडदेखील यावर्षी दिवाळीतील फॅशनफंडा बनणार असल्याचे बाजारपेठेतील फेरफटका मारल्यावर दिसत आहे. लाँग वन पीससोबत यावर्षी इंडोवेस्टर्न मेळ साधण्यासाठी प्लाझोची स्टाइलदेखील आहे. लाँग ए लाइन टॉपसह प्लाझो सलवार हा लूक अधिक स्टायलीश करण्यासाठी टॉपचे साइडकट लांब ठेवण्यात आले आहेत. यामध्ये रेडियम व ग्लॉसी कलरला मुलींची मागणी वाढत आहे.

कोटा, सिल्क साड्यांचा नूर यंदाही

दिवाळीला खास साडी खरेदी करणाऱ्या महिलांमध्ये यावर्षी सिल्कची क्रेझ असली तरी सिल्क नव्या ढंगातील फॅशन ट्रेंडमध्ये बाजारात आले आहे. प्लेन सिल्कची साडी व त्यावर ब्रोकेड प्रिंट ब्लाऊज हा लूक यावर्षी दिवाळीत सौंदर्य उजळवण्यासाठी तयार आहे. गडद निळा, हिरवा, चॉकलेटी, मॅजेंडा या रंगातील लाइटवेट सिल्क साड्या, तसेच नाजूक बॉर्डर साड्यांची यंदाच्या दिवाळीत चलती आहे.

फोल्डेड स्लीव्हज शर्ट आणि जॅकेट

नटण्यामुरडण्यात मुलींची बाजी असली तरी स्टाइल आयकॉन म्हणून खास खरेदी करण्यात मुलांचीही हौस सुरू आहे. प्रिंटेड शर्ट वुइथ फोल्डेड स्लीव्हज हा ट्रेंड यावर्षी मुलांच्या पसंतीत सर्वाधिक आहे. स्टायलीश जॅकेटची खरेदीही यावर्षी जास्त होत आहे. ट्राउजरमध्ये लाइटवेट कॉटन, जीन मुलांसाठी ऑल टाइम फेव्हरेट आहे. पारंपरिक लूकसाठी मुलांनी संग्रामशर्टचेच मॉडर्न रूप असलेल्या कुर्ता खरेदीला पसंती दिली आहे. साइटकट, नेकपॅक, ट्रँगल शेप फ्रंट ओपन हाफ कुर्ता व सोबत डेकोरेटिव्ह बटन्स ही स्टाइल यावर्षीच्या दिवाळीत हटके दिसणार आहे.

सजावटही कलात्मक

पेहरावातून सजण्यासोबत दिवाळीसाठी घर सजवण्याच्या ट्रेंडमध्येही यंदा खूप पर्याय आले आहेत. मातीच्या पणतीसोबत फुले, मोती, लेस यांच्यापासून सजवण्यात आलेल्या कलात्मक पणत्या, मातीच्या सुगडांची रचना करून सजवले जाणारे अंगण हा ट्रेंड डेकोरेशमध्ये सर्वात पसंतीचा आहे. आकाशकंदीलांमध्ये कागद, कापड, पुठ्ठे यापासून बनवलेल्या आकाशदिव्यांनी बाजारपेठांमध्ये लक्ष वेधून घेतले आहे. वेगवेगळ्या आकारातील इलेक्ट्रीक पणत्यांचा ट्रेंड तसेच यावर्षी कंदीलाच्या आकारातील मिनी आकाश दिव्यांची खास रेंज बाजारात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्ह्यातील दहाही जागा जिंकणार

$
0
0

भूमिका....राहुल चिकोडे

कोल्हापूर टाइम्स टीम

केंद्रात नरेंद्र मोदी यांना देशातील जनतेने दुसऱ्यांदा संधी दिली आहे. देश अखंडित रहावा यासाठी जम्मू काश्मीरसंबधीत ३७० कलम रद्द करण्याचा धाडसी निर्णय भाजप सरकारने घेतला असल्याने मोठा जनतेचा पाठिंबा मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासाचे राजकारण केले आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या सभेने जिल्ह्यातील वातावरण बदलले असून भाजप-शिवसेना मित्र पक्षाची महायुती दहाही जागा जिंकेल, असा विश्वास भाजप महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' शी बोलताना व्यक्त केला.

भाजप हा सिद्धांतावर चालणारा पक्ष असून आमच्या पक्षाला जिल्ह्यात दोन जागा असल्या तरी आम्ही युतीचा प्रमाणिकपणे प्रचार करून शिवसेनेच्या आठ जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करणार, असा निर्धार व्यक्त करत महानगर अध्यक्ष चिकोडे म्हणाले, 'इचलकरंजी मतदार संघात आमदार हाळवणकर यांनी पक्षाची चांगली बांधणी केली आहे. बूथमधील तळातील कार्यकर्त्यांशी त्यांचा परिचय आहे. गेल्या पाच वर्षांत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्यात विकास कामांसाठी मोठा निधी आणला आहे. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघात विनम्र आमदार म्हणून परिचित असलेल्या अमल महाडिक यांनीही विकास कामांचा धडाका लावल्यामुळे यंदाही त्यांचा विजय निश्चित आहे'.

भाजपने गेल्या पाच वर्षात मोठे संघटन केल्याने शिवसेनेला चांगला फायदा होणार आहे, असा दावा करत चिकोडे म्हणाले, 'वन बूथ २४ यूथ या तत्वाप्रमाणे भाजपने बूथचे जाळे विणले आहे. कोल्हापूर उत्तर मतदार संघात ३०९ तर दक्षिण मतदार संघात ३८४ बूथ आहेत. प्रत्येक बूथमध्ये तरुण, महिला, ओबीसी, मागासवर्गीय सदस्य आहेत. त्यामुळे भाजप वगळता शिवसेनेच्या आठ मतदार संघात बूथ प्रमुखांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.

काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाला जनतेचा पाठिंबा मिळत असून हा मुद्दा गेम चेंजर ठरणार आहे. या निर्णयाने एक निशान, एक पंतप्रधान, एक देश झाल्याने भारत अखंड झाला आहे. केंद्र सरकारच्या या धाडसी निर्णयाचे विरोधी पक्षाकडून कौतुक होत आहे. भाजप हा धाडसी निर्णय घेत असून सर्वसामान्यांच्या विकासासाठी अनेक योजना अंमलात आणून त्यांचे लाभ सर्वसामान्यांना मिळाले असल्याने जनता यावेळी महायुतीच्या मागे राहणार आहे. काही मतदारसंघात बंडखोरी झाली असली तरी भाजप युतीच्या पाठीशी राहील. पक्षात काही मिळेल या अपेक्षेने आलेल्यांनी बंडखोरी केली आहे. पण बंडखोरांशा पाठीशी भाजपचे कार्यकर्ते राहणार नाहीत. भाजपच्या कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीनंतर महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या निवडणुकींना सामोरे जावे लागणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून पुढील निवडणुकीसाठी कार्यकर्ते मतदारापर्यंत पोहचत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील दहाही जागा महायुती जिंकेल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चहा विक्रेत्यांच्या कष्टाला सामाजसेवेचा गोडवा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'ते' सगळे चहा विक्रेते आहेत, शिरोली औद्योगिक वसाहतीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कुणाची चहाची टपरी आहे तर कोण चहासोबतच नाष्टा सेंटरही चालवितो. चहा विक्रीचा व्यवसाय करताना दरमहा ते १०० रुपये सामाजिक कामासाठी जमा करतात. जमलेल्या रकमेतून गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, सामाजिक संस्थांना अर्थसहाय करतात.

२२ चहा विक्रेत्यांनी एकत्र येऊन जय महाराष्ट्र सेवा मंडळाची स्थापना केली आहे.

गेली अनेक वर्षे हे सगळे शिरोली एमआयडीसीमध्ये चहाचा व्यवसाय करतात. नागाव, शिये, टोप, भुये, शिरोली अशा विविध भागात ते स्थायिक झाले आहेत. कुटुंबांचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी एमआयडीसी परिसरात चहा विक्री सुरू केली. सुरुवातीच्या कालावधीत एक किलो मीटरच्या अंतरावर एक चहाची टपरी होती. एमआयडीसीतील कारखाने आणि कामगारांना चहाचा पुरवठा करताना या साऱ्या चहा विक्रेत्यांनी आपआपल्या परीने सामाजिक कार्यासाठी हातभार लावण्याचा निर्णय घेतला.

चहा विक्रेत्यांनी स्थापन केलेल्या सेवा मंडळाचे अध्यक्षपद सुर्यकांत वायदंडे तर सचिवपदी पांडूरंग करंडे आहेत. चहा व्यवसाय करणाऱ्या या मंडळीत सुनील मिश्रा, राजू कांबळे, भगवान शिंदे, वत्सला लोंढे, लक्ष्मी कदम, लक्ष्मी खोपकर, संगीता बनसोडे, रंजना चव्हाण, सुभाष पुजारी, सुभाष गावडे आदींचा समावेश आहे. हे सगळेजण दरमहा शंभर रुपये जमा करतात. जमलेल्या निधीचा विनियोग समाजोपयोगी कामासाठी खर्ची झाला पाहिजे ही त्यांची धारणा आहे. काही वर्षापूर्वी त्यांनी अवनि संस्थेच्या मदतीसाठी 'एक व्यक्ती एक रुपया'असा उपक्रम राबविला होता.

'जय महाराष्ट्र सेवा मंडळाकडे जमलेला निधी, चांगभल सेवा मंडळ आणि लोकवर्गणी या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांना ५१ हजार रुपयांचा निधी दिला. दरवर्षी जोतिबा यात्रेत दहा हजार लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली जाते. उन्हाळ्यात ठिकठिकाणी पाणपोई, दरवर्षी गरीब मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप होते.'असे मंडळाचे अध्यक्ष वायंदडे व सचिव करंडे यांनी सांगितले. यावर्षी महापुराच्या आपत्तीचा फटका एमआयडीसीतील दोघा चहा विक्रेत्यांनाही बसला. त्यांनाही या चहा विक्रेत्यांनी मदतीचा हातभार लावला. मंडळाच्या या कामात भिमराव कोरे, मुन्ना राजबर, जीता राजबर, नगिना राजबर, सागर गडकरी, प्रशांत कोळी, रंगराव मुळीक, संतोष भिलवडीकर, आनंदा कदम यांचाही सहभाग आहे.

................

एक व्यक्ती...एक रुपयातून मदत

शिरोली एमआयडीसीमध्ये अवनि संस्थेच्या मदतीसाठी जवळपास चार वर्षे 'एक व्यक्ती...एक रुपया'असा उपक्रम राबविला. प्रत्येक चहा विक्रेत्याच्या ठिकाणी 'एक व्यक्ती... एक रुपया'उपक्रमांतर्गत बॉक्स ठेवला होता. चहा पिण्यासाठी आलेली व्यक्ती त्या बॉक्समध्ये एक रुपया जमा करायचे. चहा विक्रेतेही त्यामध्ये आपल्याकडील काही पैसे जमा करी. महिन्यातून एकदा संबंधित रक्कम 'अवनि'कडे सुपूर्द होई.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चर्चा तर होणारच

$
0
0

\Bराजकारण करू सोयीने...\B

एरव्ही पक्षनिष्ठेच्या बाता मारायच्या, नेत्यांच्या शिकवणीचे गोडवे गायचे. व्यासपीठावर पक्षाची विचारधारा, पक्ष नेतृत्वावरील दाखले द्यायचे आणि व्यासपीठावरुन खाली उतरले की नेमकी उलटी कृती! सध्याच्या विधानसभा निवडणुकीत हे चित्र पाहावयास मिळत आहे. जिल्ह्यातील दहापैकी एक दोन मतदारसंघ वगळता प्रत्येक ठिकाणी सगळ्याच पक्षातील ठराविक मंडळी पक्षीय नव्हे तर सोयीचे राजकारण करत आहेत.

युती आणि आघाडीधर्माला फाटा दिला आहे. 'पहिल्यांदा स्वार्थ नंतर पक्षीय राजकारण'या नीतीचा अवलंब करत आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी यंदा भाजप, शिवसेनेसह मित्रपक्षाची महायुती झाली आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आघाडी एकत्रित सामोरी जात आहे. दरम्यान कोल्हापूर उत्तर, दक्षिण, कागल, चंदगड, हातकणंगले, शिरोळ या मतदारसंघात अनेकजण सोयीचे राजकारण करत आहेत. शिस्तबद्ध पक्ष अशी टिमकी वाजविणाऱ्या भाजपालाही बंडखोरीचे ग्रहण लागले आहे.

पालकमंत्र्यांनी माघारीचे आवाहन करूनही ठिकठिकाणी बंडखोरांनी आपली उमेदवारी कायम ठेवली. शिवसेनेत पदाधिकारी असो की नेता, त्यांच्यासाठी पक्ष नेतृत्वाचा आदेश हा अंतिम समजला जाई. मुंबईवरून एकदा फर्मान निघाले की स्थानिक पातळीवर कितीही कुरबुऱ्या असू देत त्याला निवडणुकीपुरते मूठमाती दिली जायची. पदाधिकारी, कार्यकर्ते एक दिलाने विरोधंकाशी सामना करायचे. यंदा मात्र कोल्हापूर उत्तरमध्ये उलटेच चित्र आहे. जिल्ह्यातील वरिष्ठ पदाधिकारी, यापूर्वी विविध पदे भूषविलेले खुले आम विरोधी उमेदवारांच्या प्रचाारात आहेत. एकीकडे आमची पक्षावर निष्ठा आहे म्हणायचे आणि दुसरीकडे पक्षाच्या उमेदवाराविरोधात काम करायचे असा उलटा फंडा हे सोयीच्या राजकारणाचेच लक्षण आहे.

पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने या प्रकारची दखल घेत काहींना घरचा रस्ता दाखविला. भाजपनेही कोल्हापूर शहरात एका माजी पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली. जुजुबीदाखल ही उदाहरणे सोडली तर अन्य ठिकाणी बंडोबांचे राजकारण सुरूच आहे. सोयीचे राजकारण केवळ कार्यकर्ते लहानसहान पदाधिकारीच करतात असे नव्हे तर पक्षाचे जिल्ह्यातील प्रमुख नेते मंडळी, लोकप्रतिनिधीही करतात. काँग्रेस असो की राष्ट्रवादी, शिवसेना असो वा भाजप यातील ठराविक मंडळींचे राजकारण हे नेहमीच व्यक्तीकेंद्रित राहिले आहे. प्रत्येक मतदारसंघनिहाय काही मंडळी भूमिका बदलत आहेत. तर काही जण प्रचारापासून अलिप्त राहत राजकारण करत आहेत.

विधानसभेसाठी युती आणि आघाडी झाली. पण जिल्ह्यातील चंदगड, शिरोळ, राधानगरी, हातकणंगले या मतदारसंघात कुठे युतीधर्म तर कुठे आघाडीधर्म बासनात गुंडाळून ठेवला आहे. राधानगरी, हातकणंगले व चंदगडमध्ये सेनेच्या उमेदवारासमोर भाजप बंडखोराचे, शिरोळमध्ये स्वाभिमानीच्या उमेदवारासमोर राष्ट्रवादीतील बंडखोराचे आव्हान आहे. मुळात निवडणुका स्वतंत्र लढवायाच्या म्हणून शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने प्रत्येक मतदारसंघात इनकमिंग केले. मतदारसंघ कुणाकडे आहे याचा विचार न करता प्रत्येकाचा पक्ष प्रवेश केला. काँग्रेस, राष्ट्रवादीतील मंडळीही कसलाही विचार न करता धडाधड अन्य पक्षात उड्या मारल्या. विधानसभेची उमेदवारी मिळणार, उमेदवारी न मिळाल्यास विधानपरिषदेवर वर्णी लागेल, कोणत्यातरी महामंडळावर हमखास वर्णी लागणार या अपेक्षेने पक्षांतर झाले.

साडेतीन-चार वर्षे त्यांनी नव्या पक्षासाठी काम केले. तिकिट मिळणार म्हणून मतदारसंघ पिंजून काढला, पैसा खर्च केला. प्रचारदौरे काढले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर युती झाली आणि अनेकांचे सारेच मनसुबे उधळले. मोठ्या अपेक्षेने भाजप, सेनेत दाखल झालेल्या मंडळींना तालुक्यातील गटातटाचे राजकारण आणि अस्तित्व टिकवण्यासाठी लढण्याशिवाय पर्याय उरला नाही. काहींनी अपक्ष, तर कुणी वंचितचा आधार घेतला. भाजपमधून उमेदवारी मिळणार म्हणून स्वप्ने रंगविलेल्या मंडळींना 'जनसुराज्य'च्या चिन्हावर लढावे लागले. तीच गत राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील काही जुन्या कार्यकर्त्यांची झाली. पक्षामध्ये वर्षानुवर्षे काम करूनही आघाडीमुळे सहकारी पक्षाला जागा गेली. यामुळे बंडखोराचा बाणा दाखवत निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघातील राजकारण नागरिक ओळखून आहेत. कोण सोयीचे राजकारण करतोय, कोण शेतकऱ्यांच्या हितासाठी लढतोय. नेत्यांनी, उमेदवारांनी कितीही काहीही झाले तरी शेवटी निकाल हा लोकांच्या हाती आहे. कारण 'पब्लिक सब जानती है'

-आप्पासाहेब माळी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नागरी सुविधांसाठी मतदारांचे निवडणुकीवर बहिष्कारास्त्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहराचा विस्तार वाढत गेल्यानंतर अनेक उपनगरांची निर्मिती झाली. उपनगरे किंवा कॉलनी विकसित करताना पायाभूत सुविधा देण्याची जबाबदारी संबंधित विकासकांची असते. विकासकांसह लोकप्रतिनिधी आणि महापालिकेकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळे नागरिकांनी पायाभूत सुविधांसाठी मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिल्यानंतर महापालिका यंत्रणा तातडीने कामाला लागली. मतदारांनी ऐन निवडणुकीमध्ये बहिष्काराचे शस्त्र हाती घेतल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात का असेना त्यांना सुविधा देण्यात आल्या.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सर्वत्र धामधूम सुरू आहे. प्रचारादरम्यान उमेदवारांकडून आश्वासनांची खैरात केली जात आहे. पण शहराजवळील अशी अनेक उपनगरे आहेत की, तेथे लाइट, पाणी व रस्त्यांची सुविधा दिलेली नाही. अनेकदा नागरिकांनी महापालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधींकडे पाठपुरवा केला, पण त्यामध्ये फारसा बदल झालेला नाही. उपनगरे किंवा कॉलन्या वसविताना तेथील पायाभूत सुविधा देण्याची जबाबदारी संबंधित विकासकाची आहे, पण त्याकडेच दुर्लक्ष केल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. वर्षांनुवर्षे पाठपुरावा करूनही सुविधा मिळत नसल्याने नागरिकांनी मतदानावरच बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.

गेल्या आठवड्यात कळंबा रिंगरोडजवळील नंदनव पार्कमधील नागरिकांनी प्रथम बहिष्काराचे शस्त्र उगारले. त्यानंतर विचारेमाळ येथेही असाच प्रकार घडला. तर एका खासगी अपार्टमेंटमधील रहिवाशांनी थेट आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे तक्रार करत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला. त्यामुळे खडबडून जाग्या झालेल्या महापालिका यंत्रणेने नंदनवन पार्क येथील रस्ते व स्ट्रीट लाइटचा प्रश्न निकालात काढला. विचारेमाळ येथील आंदोलन ऐनवेळी कोणाच्या सांगण्यावरून स्थगित केले हे गुलदस्त्यातच राहिले. मात्र, एका खासगी अपार्टमेंटधारकाविरोधात आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीची दखल त्वरित घेण्यात आली. नगररचना विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित भेट घेऊन महापालिकेत विकासक आणि अपार्टमेंटधारकांची बैठक घेण्याचे आश्वासन दिले. त्याचा निर्णयही लवकरच लागेल. मात्र, पायाभूत सुविधांसाठी नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या घेतलेल्या निर्णयाची शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे. पण यामुळे महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींचे अपयशही यानिमित्ताने दिसून आले.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहा माजी आमदार पुन्हा रिंगणात

$
0
0

Satish.ghatage@timesgroup.com

Tweet:satishgMT

कोल्हापूर : विधानसभेच्या निवडणुकीत सहा माजी आमदार रिंगणात उतरले असून त्यांना तुल्यबळ विद्यमान आमदाराविरोधात टक्कर द्यावी लागली आहे. माजी मंत्री प्रकाश आवाडे, विनय कोरे, माजी आमदार के. पी. पाटील, पी. एन पाटील, राजीव आवळे, संजय घाटगे यांनी विजयासाठी अस्तित्व पणाला लावले आहे.

इचलकरंजी मतदार संघातून सलग आठव्यांदा प्रकाश आवाडे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सातवेळा काँग्रेस पक्षाकडून लढणाऱ्या आवाडेंनी यंदा काँग्रेस जिल्हाध्यक्षदाचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. आवाडे यांच्या ४५ व्या वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत त्यांना तीनवेळा पराभव पत्करावा लागला असून चार वेळा ते विजयी झाले आहेत.

१९९५ पासून निवडणूक लढवणारे काँग्रेसचे माजी जिल्ह्याध्यक्ष पी.एन. पाटील यांनी २००४ मध्ये फक्त एकदाच निवडणूक जिंकली. पण तत्पुर्वी झालेल्या दोन निवडणुकीत त्यांना शेकापचे संपतराव पवार यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे खंदे समर्थक आणि काँग्रेसनिष्ठ असलेल्या पाटील यांचा २००९ आणि २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या चंद्रदीप नरके यांनी पराभव केला. गतवेळच्या निवडणुकीत अवघ्या ७१० मतांनी पराभव झालेल्या पी.एन. यांनी नरके यांची हॅटट्रीक रोखण्यासाठी यावेळी कंबर कसली आहे.

१९९९ मध्ये रिंगणात उतरलेल्या विनय कोरे यांनी पहिलीच निवडणूक जिंकली. त्यानंतर विलासराव देशमुख यांचे सरकार पाडणाऱ्या बंडखोरांना मिळाले. २००४ मध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाची स्थापना करत जिल्ह्यात तीन जागा जिंकल्याने त्यांना अपारंपारिक उर्जामंत्री मिळाले. पण २००९ च्या निवडणुकीत जनसुराज्यच्या जागा कमी झाल्याने जिल्ह्यातील स्वत:ची जागा वाचवण्यात यश आले. २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या सत्यजित पाटील यांच्याकडून ३८८ मतांनी पराभव झाला.

१९९९ मध्ये काँग्रेसचे आमदार बजरंग देसाई यांच्याकडून पराभूत झालेल्या के. पी. पाटील यांनी २००४ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभेत प्रवेश केला. मतदार संघाच्या पुनर्रचनेनंतर २००९ राधानगरी मतदार संघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. याही निवडणुकीत के.पी.ने बाजी मारली. २०१४ मध्ये हॅटट्रीकसाठी सज्ज असलेल्या के.पीं.ना शिवसेनेच्या प्रकाश आबिटकर यांनी पराभूत केले. यंदाच्या निवडणुकीत आबिटकरासमोर पुन्हा आव्हान निर्माण केले आहे.

२००४ मध्ये जनसुराज्यकडून हातकणंगले मतदार संघातून राजीव आवळे विजयी झाले. पण त्यानंतर २००९ आणि २०१४ मध्ये झालेल्या निवडणूकीत पराभव पत्करावा लागला. यंदा त्यांना जनसुराज्यनेउमेदवारी नाकारली असली तरी अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत.

\Bसंजय घाटगे पुन्हा मैदानात

\B१९९७ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत आमदारकीचा राजीनामा देऊन उतरलेल्या सदाशिवराव मंडलिक खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर कागल विधानसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेकडून संजय घाटगे निवडून आले. त्यांनी हसन मुश्रीफांचा पराभव केला. त्यानंतर झालेल्या सर्व चारही निवडणुकीत घाटगे यांचा मुश्रीफांनी पराभव केला. घाटगे यांनी १९९९ मध्ये काँग्रेसकडून २००४ मध्ये शिवसेनेकडून २००९ मध्ये स्वाभिमानीकडून तर २०१४ मध्ये परत शिवसेनेकडून निवडणूक लढवली. पण त्यांना यश आले नाही. यंदाही ते सेनेकडून लढत असून त्यांना मुश्रीफासह समरजित घाटगे यांचे आव्हान मोडून काढावे लागणार आहे.

उमेदवाराचे नाव एकूण निवडणूका जय पराभव

हसन मुश्रीफ ५ ४ १

प्रकाश आवाडे ८ ५ ३

के. पी. पाटील ५ २ ३

संजय घाटगे ५ १ ४

पी. एन. पाटील ५ १ ४

विनय कोरे ४ ३ १

राजीव आवळे ३ १ २

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रचार झाला यूथफूल

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

मतांची गणित जुळवण्यासाठी महिला, ज्येष्ठ, युवा अशी विभागणी करत प्रचाराची आखणी केली जात आहे. युवा मतदारांची लक्षणीय संख्या पाहता रिंगणात उतलेल्या पक्ष व उमेदवारांकडून होणारा प्रचारही यूथफूल बनला आहे. युवकांच्या प्रश्नांवर जोर देत, युवकांच्या गरजपूर्तीचे आश्वासन देत व त्यांच्यासाठी सुविधांचा अजेंडा सादर करत प्रचाराला तरूण चेहरा देण्यासाठी युवा कार्यकर्त्यांची मोटही बांधली आहे. शिक्षण, रोजगार, सवलती, योजना, नोकरीच्या संधी या तरुणांच्या मागण्यांवर भर देत प्रचाराला रंगत आली असून युवकांपर्यंत पोहोचण्याचे प्रभावी माध्यम असलेल्या सोशल मीडियातून युवकांशी संवाद साधण्याचे कल्पक प्रयोग होत आहेत.

शैक्षणिक फी, शैक्षणिक धोरण, नोकरीच्या संधी, मंदीच्याकाळात नोकरीवर येणारी गदा व त्यातून निर्माण होणारे प्रश्न या युवकांच्या प्रश्नावर काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांकडून सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका करत प्रचार केला जात आहे. काँग्रेसचे दक्षिणचे उमेदवार ऋतुराज पाटील हे सर्वात तरुण उमेदवार असल्याने त्यांनी प्रचारातील बहुतांशी भर हा युवकांसाठी काय करणार यावर दिला आहे. युवकांना नेमके काय हवे आहे या धाग्यावर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व उमेदवार प्रचाराचे नियोजन करत आहेत. युवकांची साथ मिळवण्यासाठी त्यांच्या मनातील विकास जाणून घेणारी संपर्कयंत्रणाही महाआघाडी व युतीच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी कामाला लावली आहे.

राजकीय पक्षांच्या युवा संघटना सक्रिय

कोल्हापुरात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी व भाजप शिवसेना युती यांच्या उमेदवारांमध्ये प्रचाराचीही स्पर्धा सुरू झाली आहे. भाजपची मदार असलेल्या सोशल मीडियावरील जाहीरातीच्या हातखंड्यावर यंदा काँग्रेसच्या उमेदवारांनीही चांगलीच टक्कर दिली आहे. युवा मतदारांच्या मताचा कौल मिळवण्यासाठी राजकीय पक्षांच्या युवा संघटना सक्रीय झाल्या आहेत. यामध्ये युवकांचे मेळावे, संवाद, कट्टा अशा कार्यक्रमातून उमेदवाराचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. तरुणांच्या अभिव्यक्तीचे माध्यम असलेल्या फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉटसअॅपवर प्रचार जोरात सुरू आहे. युवा संघटनांची स्वतंत्र टीम प्रत्येक पक्ष व उमेदवाराने नेमली आहे.

परीक्षांमुळे युवा कार्यकर्त्यांची संख्या घटली

महाविद्यालय व विद्यापीठाच्या सत्रपरीक्षा सुरू असल्याने प्रचारदौऱ्यात युवा कार्यकर्त्यांची संख्या यंदा घटली आहे. पक्षाच्या युवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मतदारसंघातील तालीम, सार्वजनिक मंडळे यांच्याशी संपर्क साधून युवकांपर्यंत उमेदवाराचा आवाज पोहोचवला आहे. अधिकाधिक युवकांनी मतदार नोंदणी करावी व मतदान करावे यासाठी जागृती मोहीमेच्या माध्यमातूनही उमेदवारांनी प्रचार केला आहे. परीक्षेच्या तोंडावरच निवडणूक आल्यामुळे प्रचारात मात्र युवकांचा सहभाग कमी आहे.

प्रचारासाठी युवकांना आकर्षित करतील अशा गाण्यांचा समावेश

फेसबुक पेज तयार करून त्यावर रोजचे अपडेट

इन्स्टाग्रामवरही स्टोरीज, व्हिडिओ अपलोड

नोकरी संधी व शिक्षण सुविधांवर भर

युवकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांची उकल करण्याचे आश्वासन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार्यकर्त्यांत ईर्ष्या, नागरिकांत चर्चा

$
0
0

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:Appasaheb_MT

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघ पाटील आणि महाडिक गटाच्या राजकीय प्रतिष्ठेचा केंद्रबिंदू बनला आहे. मतदारसंघात समाविष्ट प्रभागांत फेरफटका मारताच दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमधील कमालीची ईर्ष्या नजरेस पडते. शहरांशी संलग्न सानेगुरुजी वसाहत, देवकर पाणंद, साळोखेनगर, जरगनगर, रामानंदनगर, आर. के. नगर परिसरात प्रचार वेगावला आहे. गल्लीबोळात फिरणाऱ्या रिक्षा, उमेदवारांच्या पदयात्रा, फेरी आणि नेत्यांच्या प्रचारासाठी प्रभागाचा दौरा करणारे नगरसेवक हे चित्र मंगळवारी पाहावयास मिळाले.

सानेगुरुजी परिसर विशेषत: नोकरदार वर्गाची वस्ती. मोठे बंगले, आणि रस्त्याला खेटून उभ्या राहिलेल्या अपार्टमेंट्स. काशीद कॉलनी, देवणे गल्ली, सानेगुरुजी सांस्कृतिक क्रीडा व सांस्कृतिक मंडळ परिसरासह साने गुरुजी विद्यालय परिसरात शांतता. रस्त्यावरही वाहतूक तुरळक.

सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास नवीन बसस्टॉप परिसरात भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ रिक्षा फिरत होती. 'दक्षिणेत कमळ पुन्हा, अमल महाडिक पुन्हा'चा घोष सुरू होता. चौकात २५ ते ३० कार्यकर्ते, प्रत्येकाच्या हाती मोबाइल. भाजप, ताराराणी आघाडीच्या नगरसेविकांनी पुढाकार घेत भागात प्रचार फेरीचे नियोजन केलेले. प्रचारफेरीत नगरसेविका मनीषा कुंभार, अर्चना पागर, कविता माने, सीमा कदम, उमा इंगळे, भाग्यश्री शेटके, नगरसेवक आशिष ढवळे यांच्या पत्नी अनिता, कमलाकर भोपळे यांच्या पत्नी ज्योती, शेखर कुसाळे यांच्या पत्नी शैलजा, माजी नगरसेविका पल्लवी देसाई, माधुरी नकाते यांनी सहभाग घेतला. सानेगुरुजी वसाहत, राजोपाध्येनगर, काशीद कॉलनी, बाबा ग्रुप परिसरात प्रचारफेरी काढली. भाजपचे उमेदवार महाडिक यांना निवडून द्या असे आवाहन करत प्रचार फेरी विविध भागात निघाली.

सानेगुरुजी वसाहतीच्या मुख्य मार्गावर अधून-मधून प्रचाराच्या इतर रिक्षाही फिरत होत्या. रावजी मंगल कार्यालयासमोरील बहुजन मुक्ती पार्टीच्या उमेदवाराची रिक्षा. पुढे देवकर पाणंद, निकम पार्क, विश्वकर्मा पार्क परिसरात प्रचाराची फारशी धामधूम दिसली नाही. संभाजीनगर बसस्थानक परिसरातील तरुण कार्यकर्त्यांमध्ये खासदार अमोल कोल्हे यांच्या कालच्या प्रचारसभेची चर्चा रंगली होती.

रामानंदनगर, जरगनगर परिसरात साधारणपणे आठ हजार मतदान. सारा परिसर सुशिक्षित. मतदारसंघावर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची नजर. रामानंदनगर मुख्य रस्त्यावर एका ठिकाणी दोन्ही काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते थांबलेले. काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या पत्नी प्रतिमा यांनी जरगनगर, रामानंदगर परिसरात घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटीचे नियोजन केले होते. ११.३० वाजण्याच्या सुमारास प्रतिमा पाटील यांनी जाधव पार्कातून प्रचाराला सुरुवात केली. सोबत महिला कार्यकर्त्या वैभवी जरग होत्या. दोन्ही काँग्रेसचे कार्यकर्ते संदीप कदम, संजय पाटील, संतोष जरग, संजय वाडकर, सतीश भाले, वैभव देसाई, प्रमोद भोपळे, रणजित पाटील आदी नियोजनात व्यस्त. महिलांच्या गाठीभेटी घेऊन'ऋतुराज पाटलांना निवडून द्या' असे आवाहन करत प्रतिमा पाटील भागाचा संपर्क दौरा पूर्ण केला.

चौकात चर्चा, परिसरात शांतता

राधाकृष्ण कॉलनी, देसाईनगर परिसरात प्रचाराची शांतता होती. आर. के. नगर भागही उच्चभ्रू लोकवस्तीचा. या भागात प्रचाराचे वाहनच नजरेस पडले नाही. रिक्षांतील लाउडस्पीकरचा आवाज कानी पडत नव्हता. मात्र आर. के. नगर जकात नाक्याजवळील चौकात मात्र गजबजाट. विविध दुकाने, चहाच्या टपऱ्या, रिक्षा स्टॉपवर राजकारणाची चर्चा. मात्र, विजयी कोण होणार, कुणाचे पारडे जड आहे असे विचारताच 'दक्षिणमधील अंदाज शेवटपर्यंत लागत नाही' असे नागरिकांनी सांगितले.

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासासाठी ऋतुराज पाटील यांच्यासारख्या नेतृत्वाची आवश्यकता आहे. त्यांच्या माध्यमातून तरुण आणि आश्वासक चेहरा लाभला आहे. उद्योगाला चालना, पर्यटन विकास आणि रोजगार निर्मिती आवश्यक आहे.

- संदीप कदम, रामानंद नगर

आमदार अमल महाडिक यांनी गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत मतदारसंघ वउपनगराच्या विकासासाठी भरपूर निधी उपलब्ध करुन आणला. सरकारच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजना सामान्यापर्यंत पोहचविल्या. त्यांच्यासारख्या शांत व विकासाभिमुख नेतृत्वाची मतदारसंघाला गरज आहे.

- अविनाश कुंभार, सानेगुरुजी वसाहत

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रविकांत तुपकर यांची घरवापसी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रदेश अध्यक्षपदाचा राजीनामा देवून रयत क्रांती संघटनेत प्रवेश केलेले रविकांत तुपकर बुधवारी १९ व्या दिवशी स्वगृही परतले. संघटनेंतर्गत काही सहकाऱ्यांशी मतभेद निर्माण झाल्याने 'स्वाभिमानी'तून बाहेर पडलो होतो. त्या मतभेदांवर संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी पडदा टाकला. त्यामुळे मी पुन्हा स्वाभिमीनी शेतकरी संघटनेत प्रवेश करीत असल्याची माहिती तुपकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. येथील एका हॉटेलमधील छोट्याशा कार्यक्रमात संघटनेचा बिल्ला लावून शेट्टी यांनी त्यांचे स्वागत केले. त्यांनी पुन्हा संघटनेत प्रवेश केल्याने भाजपचा मित्रपक्ष असलेली रयत संघटना आणि मंत्री खोत यांना धक्का बसला आहे.

शेट्टी यांचे तुपकर खंदे समर्थक. त्यांनी २६ सप्टेंबरला अचानक संघटनेला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी मुंबईत मंत्री खोत यांच्या उपस्थितीत 'रयत' मध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यानच त्यांनी संघटना सोडल्याने संघटनेला धक्का बसला होता. मात्र ते अल्पकाळातच 'रयत'ला रामराम ठोकून संघटनेत परतले. विधानसभेचे मतदान पाच दिवसांवर असताना ते पुन्हा संघटनेत आल्याने शेट्टी यांना दिलासा मिळाला आहे.

प्रवेशानंतर तुपकर म्हणाले, 'संघटनेंतर्गत कुरघोडी वाढल्या होत्या. त्या रागातून मी संघटना सोडण्याचा निर्णय घेतला. पूर्वीचे सहकारी असल्याने सदाभाऊ खोत यांच्या रयत संघटनेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरही माझा शेट्टी यांच्याशी संवाद कायम राहिला. राज्यभरातून अनेक शेतकरी, कार्यकर्ते यांनी संघटनेतून गेल्याबद्दल दु:ख व्यक्त केले. माझ्याशी संपर्क साधून आणि भेटून तुमच्यासारखे कार्यकर्ते चळवळीत हवेत, असे सांगितले. यातून मी प्रचंड अस्वस्थ होतो. दरम्यानच्या काळात संघटनेतील मतभेदाचे मुद्दे चर्चेतून संपवण्यात आले. यामुळे संघटनेत येण्याचा निर्णय घेतला. मात्र संघटना सोडण्याची आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली. अशी चूक यापुढे करणार नाही. केलेल्या चुकीबद्दल चळवळीतील कार्यकर्ते, शेतकऱ्यांची माफी मागतो.'

राजू शेट्टी म्हणाले, 'संघटनेतील सर्वच कार्यकर्ते वाघ आहेत. त्यांचे पंजे एकमेकांना लागल्याने अंतर्गंत कुरबुरी वाढल्या होत्या. त्यातून तुपकरांनी संघटना सोडली. चळवळीत किती दिवस काम करायचे हा प्रत्येकाचा स्वत:चा निर्णय असतो. यामुळे संघटना सोडल्यानंतरही त्यांना मी शुभेच्छा दिल्या होत्या. आठवडाभरात संघटनेंतर्गत कुरबुरी संपवल्या. यामुळे ते पुन्हा कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता संघटनेत आले आहेत.'

...

चौकट

भगवान काटे यांचा राजीनामा नाही

संघटनेचे जिल्हा अध्यक्ष भगवान काटे यांनी आठवड्यापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला, याबाबत बोलताना शेट्टी म्हणाले, 'काटे वैयक्तिक कारणासाठी दूर गेले तरी त्यांनी अजून माझ्याकडे जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही. त्यांचेही मन वळवू, समजूत काढू. पुन्हा तेही संघटनेत परततील. भाजप 'स्वाभिमानी'ला ईडीची नोटीस पाठवू शकत नाहीत. यामुळे पोलिसांना हाताशी धरून कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. विविध माध्यमातून दबाव टाकून भाजपमध्ये येण्यास भाग पाडत आहेत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भटक्या कुत्र्यांच्या मनपाकडून बंदोबस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्वतंत्र पथकाची स्थापना केली आहे. १० जणांचे पथक दररोज १५ कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण करत आहे. महापालिकेच्या या मोहिमेमुळे भटक्या कुत्र्यांच्या त्रस्त असलेल्या नागरिकांची काही प्रमाणात सुटका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शहरात भटक्या कुत्र्यांनी अक्षरश: उच्छाद मांडला आहे. झुंडीने फिरणाऱ्या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांचा बंदोबस्त करण्यास महापालिका यंत्रणेला अपयश आले आहे. त्यामुळे कुत्र्यांनी चावा घेऊन जखमी केल्याच्या घटना वारंवार होत आहेत. अशा घटनांना अटकाव करण्याची मागणी केली होती. सामाजिक कार्यकर्ते नाथाजी पवार व सुनील केंबळे यांच्यासह अन्य काहीजणांनी अॅड. अरविंद शहा यांच्यावतीने आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना समक्ष भेटून ३० सप्टेंबर रोजी नोटीस दिली होती. एक महिन्याच्या आत कळपाने फिरणाऱ्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याबरोबरच त्यांना जंगलात सोडण्याची मागणी त्यांनी नोटिशीद्वारे केली होती.

त्यानुसार महापालिकेने दहा कर्मचाऱ्यांचे एक स्वतंत्र पथक तयार केले आहे. सहायक आरोग्य निरीक्षक विनोद नाईक यांच्या अखत्यारित असणाऱ्या या पथकातील पाच कर्मचारी भटक्या जनावरांना प्रतिबंध करण्यासाठी नियुक्त केले आहे. तर पाच कर्मचारी भटकी कुत्री पकडण्याचे काम करत आहेत. प्रतिदिन किमान १५ कुत्र्यांना पकडून आयसोलेशन हॉस्पिटल येथील कक्षात दाखल केले जाते. तिथे त्यांचे निर्बिजीकरण करून देखभाल केली जाते. त्यानंतर त्यांना पकडून आणलेल्या ठिकाणी परत सोडले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर टिकविण्यासाठी 'फ्रायडे फॉर फ्यूचर'

$
0
0

पर्यावरणपूरक कोल्हापूरसाठी लोकचळवळ 'फ्रायडे फॉर फ्यूचर' मोहिमेतून एकवटले पर्यावरणप्रेमी नागरिक पर्यावरणप्रेमींसह शाळा, कॉलेजांतून वाढला उपक्रमांना प्रतिसाद Mahesh.patil@timesgroup.com Tweet@:MaheshpMT कोल्हापूर : स्वीडनमधील संसदेसमोर ग्रेटा थनबर्ग या अवघ्या १५ वर्षांच्या मुलीने ऑगस्ट २०१८ पासून सुरू केलेल्या पर्यावरण विषयक जनजागरण मोहिमेला सजग कोल्हापूरकरांकडूनही बळ मिळू लागले आहे. शाळा, कॉलेजांसह विविध संस्था, संघटनांपर्यंत जाऊन पर्यावरण रक्षणासाठीची जनजागृती करण्यात येत आहे. मुलांनी सुरू केलेली ही जागतिक लोकचळवळ येथे रुजू लागली आहे. ग्लोबल वार्मिंग अर्थात पर्यावरण बदल यातूनच जगभरात दर आठवड्याला एक मोठ्या संकटांची मालिका सुरू झाली हे सिद्ध झाले आहे. ही स्थिती बदलण्यासाठी, उपाययोजना करण्यासाठी मानवाच्या हातात फक्त पाच वर्षे आहेत असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. त्यामुळे स्वीडनमधील ग्रेटा थनबर्ग या १५ वर्षाच्या मुलीने पर्यावरण विषयक जनजागरण मोहीम सुरू केली. गेल्यावर्षी ऑगस्ट २०१८ मध्ये ती सलग ३ आठवडे एकटीच स्वीडन संसदेसमोर जाऊन बसत होती. पर्यावरण समस्येवर ठोस काहीच उपाय केले जात नाहीत यामुळे अस्वस्थ झालेल्या ग्रेटाने खासदारांना निवेदने दिली. नंतर दर शुक्रवारी तिने शाळाबंद आंदोलन सुरू केले. या आंदोलनात केवळ ११ महिन्यांत १३१ देशांतील २० लाखांहून अधिक मुले सहभागी झाली. ऑर्गनिक फार्मिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या येथील नितीन डोईफोडे यांनी एप्रिल २०१९ मध्ये ग्रेटाच्या प्रयत्नांची माहिती वाचल्यानंतर तेही अस्वस्थ झाले. मानवी विकासाचा वेग अधिक असला तरी नजरेआड घडणाऱ्या अनेक घटनांमध्ये पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होते. त्याबद्दल जनजागृती मोहीम सुरू करण्याचे त्यांनी ठरवले. फ्रायडे फॉर फ्यूचर - कोल्हापूर (FFF) व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे त्यांनी पर्यावरणासाठी सजग असलेल्या व्यक्ती जोडल्या. सर्वांच्या सहकार्याने पर्यावरणाची नेमकी हानी कशा पद्धतीने होत आहे, त्यासाठी काय केले पाहिजे? उपाययोजना काय आहेत यांची माहिती देणारी पोस्टर्स, छोटे माहितीपर लेख त्यांनी तयार करून ते लोकांपर्यंत पोहोचविण्यास सुरूवात केली. यासाठी व्हॉट्सअॅप ग्रुप, फेसबुक पेज असा सोशल मीडिया उपयुक्त ठरला. व्हॉट्सॅपवरील दोन ग्रुपनंतर प्रत्यक्ष उपक्रमांचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी त्यांनी ९० जणांची स्वतंत्र टीम तयार केली आहे. शहर-जिल्ह्यातील शाळांमध्ये जाऊन त्यांनी जनजागृती केली. पर्यावरणाबदल्लच्या समस्या आणि उपाय याबाबत ऑडिओ-व्हिज्युअल माहिती शाळा, कॉलेज, कंपन्या, सोसायट्यांसह सर्व संस्थांमध्ये पोहोचविण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे २० सप्टेंबर रोजी आयोजित मानवी साखळीलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक शाळकरी मुले, पालकांनी यात सहभागी होत पर्यावरणपूरक जीवनाबाबतची माहिती देणारी पोस्टर्स बनवली. माहितीपत्रके आणि अन्य गोष्टींच्या माध्यमातून ते याच्याशी जोडले जात आहेत. आता माणूस वाचविण्यासाठी पर्यावरण वाचविणे आवश्यक असल्याचा संदेश सर्वत्र दिला जात आहे. आपण सर्वजण एकत्र आलो, काही उपाययोजना केल्या तरच पर्यावरण टिकवता येईल. या मोहिमेमध्ये प्रत्येकजण उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहे. लोक एकत्र आले की मोठा बदल घडून येईल. कोल्हापुरात 'पर्यावरण बदल' हा विषय सर्वांना समजावून सांगून, जनजागरण करणे, प्रत्येक नागरिकाचा कार्बन फूटप्रिंट कमी करण्याची लोकचळवळ उभी करणे, पर्यावरणपूरक विकास, पर्यावरणपूरक जीवनशैलीसाठी मूलभूत सिस्टीम बदलाचा आग्रह धरणे हे ध्येय ठेवण्यात आले आहे. - नितीन डोईफोडे, फ्रायडे फॉर फ्यूचर-कोल्हापूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशांत गायकवाड यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल

$
0
0

पारनेर : पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या १३ संचालकांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत हा अविश्वास ठराव दाखल करण्यात आला असल्याने पारनेर तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशानुसार सहाय्यक निबंधक एस. डी. सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली २५ ऑक्टोबरला विशेष सभेचे आयोजन केले आहे. पारनेर पंचायत समितीचे सभापती राहुल झावरे यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांच्यावरही त्याच दिवशी अविश्‍वास ठराव दाखल झाल्याने पारनेरचे राजकीय वातावरण चांगले गरम झाले आहे.

प्रशांत गायकवाड यांच्यावर शिवसेनेचे संचालक काशिनाथ दाते, अशोक कटारिया, युवराज पाटील यांच्यासह उपसभापती विलास झावरे, राष्ट्रवादीचे संचालक अरुण ठाणगे, राहुल जाधव, गंगाराम बेलकर, राजेश भंडारी यांच्या सह्या आहेत तर प्रशांत गायकवाड यांच्या बाजूने संचालक शिवाजी बेलकर, अण्णासाहेब बढे, संगीता कावरे, राजश्री शिंदे हे चार संचालक असून विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेच २५ ऑक्टोबरला विशेष सभा होणार असल्याने याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबई माथाडी नेत्यांचा अतुल भोसलेंसाठी प्रचार

$
0
0

मुंबई माथाडी नेत्यांचा अतुल भोसलेंसाठी प्रचार

कराड :

'डॉ. अतुल भोसले उच्चशिक्षित आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व असून, आमदार नसतानाही त्यांनी कराड दक्षिणमध्ये भाजप सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी आणला आहे. फक्त कराड दक्षिण नव्हे तर पंढरपुरातही त्यांनी आमूलाग्र बदल आणि विकासकामे करून दाखवली आहेत. मुख्यमंत्र्यांपासून अनेक मंत्र्यांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. त्यांनी शब्द टाकल्यामुळेच मुंबईतील व्यापाऱ्यांच्या मार्केटचा प्रश्न मार्गी लागला आहे. असे नेतृत्व कराड दक्षिणला मिळाल्यास या भागाचे नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कराड दक्षिणला भोसले यांच्या सारख्या आमदाराची गरज आहे,' असे प्रतिपादन मुंबईतील माथाडी कामगार नेते बळवंतराव पवार यांनी केले. मतदार संघातील येणपे, घोगाव, येळगाव, म्हारुगडेवाडी, जिंती, घारेवाडी, कोळेवाडी, बामणवाडी, तारुख या गावांमध्ये मंगळवारी घरभेटी, बैठका आणि जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी मुंबई फ्रेश फिश मार्केट व्यापारी असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.

नाभिक समाज मंडळाचा पाठिंबा

महायुतीचे उमेदवार भोसले यांना नाभिक समाज मंडळाने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. समाजाने मंगळवारी आयोजित केलेल्या मेळाव्यात समाज बांधवांनी हा निर्णय घेतला आहे. या वेळी कराड शहराध्यक्ष संभाजी काशीद, भाजप ओबीसी आघाडीचे तालुकाध्यक्ष मनोज शिंदे उपस्थित होते.

दरम्यान, धोंडेवाडी (ता. कराड) येथील राजहंस मंगल कार्यालयामध्ये भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ मंगळवारी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला उत्तरा भोसले, लक्ष्मी मोहिते आदी आदी महिला उपस्थित होत्या.

कार्वे नाका परिसरात पदयात्रा

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजप-सेना महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांनी कार्वे नाका परिसरात पदयात्रा काढली. प्रचारयात्रेचा प्रारंभ कार्वे नाका येथील श्री गणेश मंदिरातून झाला. कार्वे नाका येथील ऑलिंपिकवीर स्व. खाशाबा जाधव चौक, उदय कॉलनी, भगवानराव जाधव कॉलनी, सुमंगल नगर, त्रिमूर्ती कॉलनी, श्रीरामनगर या परिसरामध्ये पदयात्रा काढण्यात आली होती. या वेळी मुस्लिम बांधवांकडून भोसले यांचे स्वागत करण्यात आले. कराड शहराला स्मार्ट सिटी बनविण्याचा माझा संकल्प असून, शहरालगत असणाऱ्या कार्वे नाका परिसराच्या विकासाकडे विशेष लक्ष देणार असल्याची ग्वाही भोसले यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images