Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या महाप्रसादाचा लाभ रविवारी २५ हजारांहून अधिक भाविकांनी घेतला. दरवर्षीप्रमाणे कोजागिरी पौर्णिमेला अंबाबाईच्या नवरात्रोत्सवाची सांगता महाप्रसादाने झाली.

नवरात्रकाळात भाविकांकडून अर्पण केलेल्या धान्य व साहित्याचा वापर करून प्रसादाचे वाटप करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व श्री महालक्ष्मी भक्त मंडळ यांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सूत व्यापारी अरुणकुमार गोयंका यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. राजू मेवेकरी, वैभव मेवेकरी, शहाजीराव जगदाळे, शिवाजीराव मोहिते, सचिन झंवर, अभिजित चव्हाण आदी उपस्थित होते. दरम्यान, महाप्रसादासाठी मंदिराच्या आवारात राम मंदिरानजिक मंडप घालण्यात आला होता. कारंजा चौकात महाप्रसादाच्या स्वयंपाकाची तयारी करण्यात आली. घाटी दरवाजामार्गे महाप्रसादासाठी भाविकांना प्रवेश देण्यात येत होता. महापालिकेसह विविध स्वयंसेवी संस्थांनी पाण्याची सोय केली. दुपारी चार वाजेपर्यंत महाप्रसाद सुरू होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कृषिपंपांनाही बोगस बिलाचा झटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यातील वीज महावितरणचे प्रशासन महापुराचा गैरफायदा घेत अंदाजे, मनमानी, बोगस रीडिंग गृहित धरून सरासरी बिलाच्या चौपट, पाचपटपेक्षा अधिक वीज बिल देऊन कृषिपंपधारकांना जबर शॉक देत आहे. विशेष म्हणजे ज्या भागात पूरस्थिती नव्हती, प्रत्यक्षात रीडिंग घेणे शक्य होते, त्या भागातील शेतकऱ्यांनाही अंदाजे बिल देण्यामागचा महावितरणचा हेतू पैसे उकळण्याचा असल्याचा आरोप होत आहे. याशिवाय पूर आणि अतिवृष्टीने खराब होत असलेले ट्रान्स्फॉर्मर बदलण्यासाठी स्थानिक वीज कर्मचारी लाचेची मागणी करीत असल्याच्याही तक्रारी आहेत.

ऑगस्ट महिन्यातील महापुरामुळे पूरबाधित ठिकाणी जाऊन मीटर रीडिंग घेणे शक्य झाले नाही, अशा भागातील कृषिपंप ग्राहकांना अंदाजे बिल देणे अपेक्षित होते. मात्र, जेथे रीडिंग घेणे शक्य होते, त्या परिसरातील कृषिपंपधारकांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्यांची बिले मनमानी पद्धतीने दिली आहेत. रीडिंगप्रमाणे नियमित येणाऱ्या बिलापेक्षा पाचपटहून अधिक बिल महावितरणने दिल्याने शेतकऱ्यांना धक्का बसला आहे. जादा बिलासंबंधी वायरमनकडे विचारणा केल्यानंतर ते उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. वाढीव बिल भरल्याची पावती दाखवा, अन्यथा वीजपुरवठा खंडित करण्याची धमकी त्यांच्याकडून दिली जात आहे. महावितरण प्रशासनाच्या गलथानपणामुळे आलेल्या पोकळ, बोगस बिलांविरोधात शेतकऱ्यांत प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.

दरम्यान, अतिवृष्टी, महापुरामुळे अनेक ठिकाणचे ट्रान्स्फॉर्मर टप्प्याप्प्याने बंद पडत आहेत. अजूनही ट्रान्स्फॉर्मर बंद पडत आहेत. त्या ठिकाणी नवीन ट्रान्स्फॉर्मर बसविण्यासाठी विविध कारणे सांगून शेतकऱ्यांकडून पैसे मागितले जात आहे. गडहिंग्लज तालुक्यातील येणेचवंडी येथील एक ट्रान्स्फॉर्मर गेल्या आठवड्यात बंद पडला होता. तेथील वायरमन त्या ट्रान्स्फॉर्मरला जोडलेल्या वीज ग्राहकांकडून पैसे मागत होता. ग्राहकांनी हा प्रकार वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर तब्बल दहा दिवसांनंतर बंद ट्रान्स्फॉर्मर काढून दुसरा बदलला. मात्र, पैशासाठी बदललेला ट्रान्स्फॉर्मरमरही नादुरुस्त झाल्याचे कारण सांगून तेथील वारमन पुन्हा पैसे उकळण्याचा प्रयत्न करता होता. हे एक प्रकरण चव्हाट्यावर आल्याने वरिष्ठांपर्यंत पोहचले. कमी अधिक प्रमाणात जिल्ह्यात ठिकठिकाणी असेच प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी आहेत.

००००

...अन्यथा वीजपुरवठा खंडित

पोकळ, वाढीव, चुकीची दिलेली वीज बिले तातडीने भरा, अन्यथा वीजपुरवठा खंडित करण्याची धमकी वीज प्रशासनाकडून दिली जात आहे. परिणामी कृषिपंपधारकांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असल्याने लोकप्रतिनिधी प्रचारात आहेत. अशा परिस्थितीत कुणाकडे दाद मागायची, असा शेतकऱ्यांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे.

०००

दुष्काळात तेरावा

महापूर, अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. अशावेळी त्यांनी वापर न केलेल्या विजेचे भरमसाठ बिल दिले जात आहे. त्यांच्या वाट्याला दुष्काळात तेरावा महिना आला आहे. एखाद्या शेतकऱ्याने जादा बिलासंबंधी जाब विचारल्यानंतर कार्यालयात या, दुरुस्त करून देऊ असे सांगितले जात आहे. मात्र, पाच ते दहा किलोमीटर अंतरावरील कार्यालयात जाऊन काहीही दोष नसताना तक्रार करायची, बिल कमी करण्यासाठी विनवणी करण्याची वेळ कृषिपंपधारकांवर येत आहे.

००००

कोट...

रीडिंग न घेता कृषिपंपधारकांना अंदाजे वाढीव बिले देणे चुकीचे आहे. अशी बिले कृषिपंपधारकांनी भरू नये. भरली नाही म्हणून वीजपुरवठा खंडित करण्यासाठी वायरमन आल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी संपर्क साधावा. संबंधित कर्मचाऱ्यास धडा चांगलाच शिकवू. अंदाजे दिलेली बिले वीज प्रशासनाने स्वत:हून दुरूस्त करून द्यावीत. कृषिपंपधारकांना कार्यालयात येण्यास लावू नये.

राजेंद्र गड्ड्यान्नावर, राज्य सचिव, स्वाभिमानी शेतकरी संघटना

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऋतुराजचं प्रचारातही ‘ठरलंय’

$
0
0

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:Appasaheb_MT

कोल्हापूर : विजयाच्या घोषणांनी दुमदुमणारे गल्लीबोळ, हलगीचा कडकडाटामुळे वातावरणात निर्माण होणारी चैतन्याची लहर, कार्यकर्त्यांचा ओसांडून वाहणारा उत्साह आणि चौकाचौकात होणारे नागरिकांकडून होणारे उत्साही स्वागत हे चित्र आहे, कोल्हापूर दक्षिणमधील काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारफेरीतील. रविवारी सुट्टीचा दिवस साधून त्यांनी शहर परिसरातील उपनगरात पदयात्रा काढली. राजाराम रायफल्स विक्रमनगर, टेंबलाईवाडी, प्रगती कॉलनी, समता कॉलनी भागाचा प्रचार दौरा केला. ज्येष्ठांचा आशीर्वाद घेत, समवयस्कांशी मित्रत्वाचे नाते जोडत 'काम करण्याची संधी द्या' अशी साद घालत पदयात्रा पुढे सरकते. प्रचारफेरीत 'आमचं ठरलंय,दक्षिण उरलंय'चा नारा घुमत राहतो. पाटील कुटुंबीयांतील तिसऱ्या पिढीच्या राजकारणातील प्रवेशाविषयी मतदारसंघात उत्सुकता आहे.

विक्रमनगर, शिवाजी विद्यापीठ कृषी महाविद्यालय या प्रभागात काँग्रेसचे वर्चस्व. महापालिका निवडणुकीत या प्रभागातून अनुक्रमे नगरसेविका शोभा कवाळे व नगरसेवक प्रवीण केसरकर हे विजयी ठरलेले. या प्रभागात आमदार सतेज पाटलांना मानणारा कार्यकर्त्यांचा मोठा गट आहे, याची प्रचिती पदयात्रेदरम्यान आली. विक्रमनगरात कार्यकर्त्यांनी पदयात्रेची तयारी केली होती. नवदुर्गा मंदिर परिसरातील चौक नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी फुललेला. प्रत्येकाच्या गळ्यात पक्षाच्या चिन्हाच्या माळा, डोक्यावर टोपी, रिक्षावरुन पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार यामुळे सगळे वातावरण काँग्रेसमय बनलेले.

सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मोटारीतून ऋतुराज यांचे आगमन होताच 'आमचं ठरलंय, आता दक्षिण उरलंय'च्या घोषणा देत कार्यकर्त्यांची उत्स्फुर्त स्वागत केले. 'काँग्रेस पक्षाचा विजय असो', 'ऋतुराज आगे बढो' च्या घोषात पदयात्रा मार्गस्थ होते. नगरसेवक केसरकर, नगरसेविका कवाळे, शिक्षण समितीचे माजी सभापती रशीद बारगीर, राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षा जहिदा मुजावर, माजी उपमहापौर सुलोचना नाईकवडे आदींच्या सोबत पदयात्रा नवदुर्गा मंदिरापर्यंत पोहचली. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर उत्साही कार्यकर्त्यांकडून ऋतुराज पाटील यांचा कोल्हापुरी फेटा बांधून सत्कार केला. काही महिला औक्षण करण्यासाठी पुढे सरसावल्या.

ज्येष्ठ मंडळीना नमस्कार, तरुणांशी हस्तांदोलन करत पदयात्रा विक्रमनगरमधील विविध गल्लीबोळातून फिरत मुख्य मार्गावर दाखल होते. शाहू कॉलनी, खाटिक चाळ, सिद्धेश्वर शाळा परिसरातून प्रचारफेरी निघते. पारंपारिक वाद्यांच्या गजर, ठिकठिकाणी फटक्यांची आतषबाजी, रस्त्याच्या दोन्ही बाजूला कुतुहूलभरल्या नजरा. प्रत्येक ठिकाणी उत्स्फूर्त स्वागताने उमेदवारासह समर्थकांच्या चेहऱ्यावरही हास्य फुललेले. एव्हाना दुपारचे बारा वाजलेले. उन्हाची तीव्रता वाढलेली. उन्हाची पर्वा न करता पदयात्रा पूर्वीइतक्याच जल्लोषात राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्ष मुजावर यांच्या निवासस्थानासमोर पोहचली. येथे कार्यकर्त्यांकडून पुन्हा कोल्हापुरी फेटा बांधला. महिलांकडून औक्षण झाले. याठिकाणी माजी नगरसेवक राजू डकरे, शेखर घोटणे, संध्या घोटणे सामील झाले. प्रत्येकांशी संवाद साधत, निवडून देण्याची विनंती करत प्रगती कॉलनी, समता कॉलनी, सुदर्शन कॉलनी, त्र्यंबोली कॉलनीत प्रचाराची रंगत वाढत गेली.

दक्षिण मतदारसंघात विकासाचे नवे पर्व सुरू करण्यासाठी निवडणूक लढवित आहे. आमच्या कुटुंबांला सामाजिक, राजकीय, शैक्षणिक कार्याची मोठी परंपरा लाभली आहे. तुमचा नातू, तुमचा मुलगा समजून मला काम करण्याची संधी द्या. निश्चितपणे नवं कोल्हापूर घडवू.

ऋतुराज पाटील, उमेदवार काँग्रेस, कोल्हापूर उत्तर

उच्चभ्रू परिसरात शिस्तीत प्रचार

राजाराम राइफल्स, काटकर माळ, एसटी कॉलनी, मंडलिक पार्क हा सारा परिसर उच्चभ्रू लोकवस्तीचा. बंगलो आणि अपार्टमेंटधारकांची संख्या मोठी. नोकरदार, व्यापारी, व्यावसायिक, कंत्राटदार राहायला. या भागात सकाळी नऊ वाजताच पदयात्रेला सुरुवात केली. फटाक्यांची आतषबाजी नाही, वाद्यांचा गजर नाही. अतिशय शिस्तीत व शांतपणे लोकांच्या गाठीभेटी घेतल्या. नगरसेवक संजय मोहिते, माजी नगरसेवक सुरेश ढोणुक्षे, प्रकाश चौगुले, अनुप पाटील, राहुल पाटील, धैर्यशील पाटील, विनायक सूर्यवंशी, अभिजित जाधव आदीसह अन्य कार्यकर्ते सोबतीला होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छतेला वृक्षारोपण मोहिमेची जोड

$
0
0

फोटो...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सर्वत्र लगबग सुरू असताना रविवारी महापालिकेच्यावतीने राबविलेल्या महास्वच्छता अभियानाला कॉलेजियन्सचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्वच्छतेबरोबर अनेक ठिका‌णी विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण केले. ५६ टन कचरा व प्लास्टिक गोळा करत पंचगंगा घाट व हुतात्मा गार्डन चकाचक करण्यात आले.

विधानसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार अवघ्या सहा दिवसांत संपणार असल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारी प्रचाराचा सुपर संडे साजरा केला. त्यासाठी प्रचाराचे सकाळपासून नियोजन केले होते. मात्र, तरीही महापालिकेच्यावतीने दर रविवारी राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला. विशेषत: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग उल्लेखनीय होता. विवेकानंद, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल, गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निक, केएमसी, गोखले, कॉमर्स, अॅग्रिकल्चर, न्यू कॉलेजसह स्वरा फाउंडेशन, मॉर्निंग वॉक ग्रुप सहभागी झाले होते. उपस्थितांना स्वच्छतेची प्रतिज्ञा देत महिन्यातून एकदा स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले.

पंचगंगा घाट, हुतात्मा गार्डन, जंयती नाला पंपिंग स्टेशन, सिद्धार्थ नगर, कोरे हॉस्पिटल, रंकाळा शाहू स्मृती गार्डन परिसराची स्वच्छता केल्यानंतर ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. सुमारे ५६ टन कचरा व प्लास्टिक एकत्र करून कसबा बावडा येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पावर टाकण्यात आले. मोहिमेत सहायक आयुक्त संजय सरनाईक, दिवाकर कारंडे, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, सुरेश कुलकर्णी, आर. के. जाधव, पर्यावरण अभियंता आर. के. पाटील यांच्यासह महापालिकेचे अधिकारी सहभागी झाले होते.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आघाडीचे उमेदवार निवडून आणू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह मित्र पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार जिल्हा काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीत करण्यात आला. जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील आणि प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार पी. एन. पाटील यांची रविवारी बैठक झाली. यावेळी 'गोकुळ'चे काही संचालक ही बैठकीला उपस्थित होते. जिल्ह्यातील नेत्यांनी दहाही मतदारसंघात प्रचार दौरा, एकमेकांच्या भागात सभा घेण्याचे ठरले.

काँग्रेस आघाडीतर्फे जिल्ह्यातील दहाही विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविली जात आहे. काँग्रेस पक्षाकडून कोल्हापूर उत्तरमधून चंद्रकांत जाधव, कोल्हापूर दक्षिणमधून ऋतुराज पाटील, करवीरमधून पी. एन. पाटील, हातकणंगलेतून राजू आवळे आणि इचलकरंजीमध्ये राहुल खंजिरे मतदारसंघ लढवित आहेत. राष्ट्रवादीच्या वाट्याला तीन जागा आहेत. यामध्ये कागलमधून आमदार हसन मुश्रीफ, राधानगरीमधून के. पी.पाटील आणि चंदगड येथे राजेश पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मित्रपक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेला शिरोळ मतदारसंघ सोडला आहे. याठिकाणी अनिल उर्फ सावकार मादनाईक तर शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघातून आघाडीतर्फे भारत पाटील हे उमेदवार आहेत.

दोन्ही काँग्रेसकडून जिल्ह्यातील अधिकाधिक जागा पुन्हा ताब्यात घेण्यासाठी रणनीती आखली जात आहे. शिवाय केंद्रीय काँग्रेस समितीकडून प्रदेश उपाध्यक्ष पाटील व जिल्हाध्यक्ष पाटील यांना आघाडीचे सर्व उमेदवार निवडून आणण्याविषयी सूचना केली आहे. त्या अनुषंगाने या दोन्ही नेत्यांची रविवारी फुलेवाडी येथे एका कार्यकर्त्याच्या निवासस्थानी बैठक झाली. मतदानाला अजून आठवड्याभराचा कालावधी आहे. दहाही मतदारसंघातील उमेदवार निवडून आणण्यासाठी शर्थीने प्रयत्न करायचा निर्धारही बैठकीत झाला. आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शेजारील मतदारसंघात प्रचार दौरा, एकमेकांच्या भागात सभा घेण्याचे ठरले. बैठकीत जिल्ह्यातील प्रचार यंत्रणेचा आढावा घेतला. तसेच प्रचार यंत्रणा गतीमान करण्यासाठी संबंधित उमेदवार व नेत्यांना आवश्यक सूचना केल्या. बैठकीला 'गोकुळ'चे संचालक विश्वास पाटील, बाळासाहेब खाडे, माजी संचालक बाबासाहेब चौगुले, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, सुनील सलगर आदी उपस्थित होते.

संयुक्त सभांचे नियोजन

करवीर मतदारसंघातून पी. एन. आणि कोल्हापूर दक्षिणमधून ऋतुराज पाटील यांना सर्व ताकतीनिशी निवडून आणण्याचे ठरले. त्यासाठी नियोजनाच्या दृष्टीने चर्चा केली. या मतदारसंघात दोन्ही नेत्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. पी. एन. यांच्या सभा कोल्हापूर दक्षिण, उत्तरसह अन्य जिल्हातील मतदारसंघात तसेच जिल्हाध्यक्ष पाटील यांच्या सभा करवीरसह जिल्ह्यातील विविध मतदारसंघात होणार आहेत.

एकोप्याचे दर्शन

गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे लढले होते. शिवाय गेल्या वेळेला दोन्ही काँग्रेसमधील नेत्यांनी एकमेकांना पाडापाडीची भाषा केली होती. काँग्रेस अंतर्गतही काही नेत्यांनी सवतासुभा मांडला होता. यंदा मात्र दोन्ही काँग्रेसमध्ये समझोता झाला आहे. एकोप्याचे दर्शन घडत आहे. प्रत्येक मतदारसंघातील नेत्यांचे मतांचे पॉकेट हे आघाडीच्या उमेदवाराला मिळाले पाहिजे यासाठी नियोजन केले आहे. नेते मंडळी एकत्र येऊन एकमेकांच्या प्रचारार्थ सभा घेण्यास सुरुवात केली आहे. विशेषत, राधानगरीत दोन्ही काँग्रेस एकत्र आहेत. करवीर आणि दक्षिणमध्ये पी. एन. आणि सतेज पाटील गट हातात हात घालून काम करत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रविवार ठरला प्रचारवार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शेवटचा सुटीचा दिवस असल्याने रविवार प्रचारवार ठरला. दिवसभर उमेदवार, समर्थक, कार्यकर्ते अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी धडपडत होते. वैयक्तिक गाठीभेटी, पदयात्रा, प्रचारफेरी, कोपरा सभा, बैठका, जाहीर सभांतून वातावरण निर्मिती करण्यात आली. यावेळी आरोप, प्रत्यारोपांमुळे प्रचाराचे रण चांगलेच तापले. शहरातील दक्षिण, उत्तर विधानसभा मतदारसंघात तुल्यबळ लढत होत असल्याने शहरातील गल्लीबोळातही प्रचाराचा ज्वर शिगेला पोहचला. सुट्टीमुळे शहरातील उच्चभ्रू वस्तीमध्ये थेट घरात जाऊन उमेदवार, समर्थकांनी आवाहन करणे पसंत केले.

जिल्ह्यातील दहा मतदारसंघासाठी २१ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. त्याआधी १९ रोजीच जाहीर प्रचाराची सांगता होणार आहे. जाहीर प्रचारासाठी कमी दिवस राहिले आहेत. यासाठी शेवटचा रविवार असल्याने बहुतांशी उमेदवारांनी पहाटेच घर सोडले. शहरातील दक्षिणमधून रिंगणात असलेले भाजपचे उमेदवार अमल महाडिक आणि काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांचा प्रचार जोरदार राहिला. दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून जाहीरनामा आणि केलेल्या कामांची माहिती पत्रक घराघरात वाटप करण्यात आले. पदयात्रा, रॅली काढून आवाहन करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रचारसभेत दुपारपर्यंत महाडिक व्यस्त राहिले. त्यानंतर ते गाठीभेटी, पदयात्राद्वारे मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला.

उत्तरमधून शिवसेनेतून रिंगणात असलेले राजेश क्षीरसागर आणि काँग्रेस-राष्ट्रवादीकडून रिंगणातील चंद्रकांत जाधव यांनीही व्यापक संपर्क मोहीम राबवून मतदारांना आवाहन केले. रिक्षावर ध्वनिक्षेपक यंत्र लावून प्रचारगीतांची धून छेडली जात आहे. तालीम, मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीवर अधिक भर राहिला. अपार्टमेंटमधील मतदारांना भेटले जात होते. याशिवाय प्रबळ उमेदवारांनी विश्वासू कार्यकर्त्यांवर फोडाफोड करून मतदारांना वळवण्याची जबाबदारी दिली आहे. ते नातेवाईक, मित्रमंडळीतर्फे गठ्ठा मतदान मिळवण्यासाठी कामाला लागले आहेत. यातून अर्थपूर्ण वाटाघाटी होत आहेत. पैशांचे पॅकेज आणि हॉटेलमधील जेवणाचे कुपन घरपोच वाटप केले जात आहे. यामुळे कसबा बावडा, शहरातील पेठा, उपनगरांत दिवसभर प्रचारांचा धडाका राहिला. सर्वच प्रमुख पक्षांचे युवा नेते नवीन मतदारांपर्यंत पोहचून आपला उमेदवार किती चांगला आहे हे पटवून देत राहिले. ग्रामीण भागात सुगीचे दिवस असल्याने उमेदवारांनी थेट शिवार गाठले. तेथे कुटुंबातील सर्व सदस्यासह असलेले शेतकरी आणि पीक काढण्यासाठीच्या मजुरांना भेटून मलाच मतदान करण्याचे आवाहन उमेदवारांनी केले. अनेक ठिकाणी शेताकडे जाण्याआधीच भेटण्यासाठी उमेदवारांनी मतदारांचे सकाळी लवकर घर गाठले. स्वयंपाक खोलीपर्यंत जात ज्येष्ठ महिलांचा नमस्कार करून मतदानाची याचना करण्यात आली.

पहाटेपासूनच सुरुवात

उमेदवारांनी शहरातील अधिकाधिक मॉर्निंग वॉकच्या ठिकाणी जाऊन प्रचार केला. रात्री उशिरा ग्रुपने आयोजित केलेल्या कोजागिरी पौर्णिमेच्या जेवणावळीत हजेरी लावली. अशाप्रकारे उमेदवारांच्या घरातील संपूर्ण कुटुंबच प्रचारात सक्रीय राहून रविवारच्या सुट्टीची संधी घेण्याचा प्रयत्न केला. कसबा बावडा, लक्ष्मीपुरीतील आठवडा बाजाराच्या ठिकाणी प्रचारासाठीचे रिक्षा लावून त्यावरील ध्वनिक्षेपकावरून आवाहन करण्यात आले. व्यापारी, उद्योजकांची थेट भेटून घेऊन फिल्डिंग लावण्यात आली. कामगार मतदारांचे मतदान करून घेण्यासंबंधी विनंती केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुपेकर गटाचा पाठिंबा शिवाजी पाटलांना?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आमदार संध्यादेवी कुपेकर गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची गटाचे अस्तित्व कायम राहण्यासाठी धडपड सुरू आहे. आगामी राजकारणात गटाच्या हिताचा विचार करून विधानसभा निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यावचा, याविषयी कार्यकर्त्यांत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. यामुळे या गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची रविवारी होणारी बैठक झाली नाही. चंदगड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांना पाठिंबा देण्याबाबत निर्णय होऊ शकतो, असे काहींचे म्हणणे आहे. मात्र, त्याबाबत रविवारी अधिकृत घोषणा झाली नाही.

कुपेकर गटाचे चंदगड मतदारसंघातील मतदान निर्णायक ठरणार असल्यामुळे उमेदवारांकडूनही या गटाच्या पाठिंब्यासाठी हालचाली सुरू आहेत. दरम्यान, या गटातील कार्यकर्त्यांमध्ये पाठिंबा देण्यावरून वेगवेगळे विचार आहेत. अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील, राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश पाटील, जनसुराज्यचे अशोक चराटी यांच्यापैकी कोणाला पाठिंबा द्यावा यासंबंधी रविवारपर्यंत एकमत झाले नव्हते. कुपेकर गटाचे जिल्हा परिषदेत कल्लाप्प्पाण्णा भोगण, विद्या विलास पाटील तर चंदगड पंचायत समितीमध्ये रूपा भैरु खांडेकर, नंदिनी नामदेव पाटील हे प्रतिनिधित्व करत आहेत.

शनिवारी कोल्हापुरात या गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली होती. त्यामध्ये रविवारी पाठिंबा देण्याबाबत निर्णय घेण्याविषयी ठरले होते. मात्र, रविवारी कुठलाही निर्णय झाला नाही. सोमवारी (ता.१४) पाटणे फाटा येथे प्रमुख कार्यकर्ते एकत्र येऊन पाठिंब्याबाबतची घोषणा होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेनेचे पदाधिकारी काँग्रेसच्या प्रचारात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पदाधिकारी शिवसेनेचे आणि प्रचार मात्र काँग्रेसच्या उमेदवारांचा असे चित्र कोल्हापूर मतदारसंघात ठिकठिकाणी पाहावयास मिळत आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला अशी कोल्हापूरची ओळख आहे, मात्र पक्षामध्ये विद्यमान आमदार राजेश क्षीरसागर आणि जुने पदाधिकारी अशी विभागणी झाली आहे. प्रचाराच्या ऐन धुमाळीत शिवसेनेत उफाळलेली गटबाजी सध्या शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा याकडे काणाडोळा आणि आमदार क्षीरसागरांनी साधे संपर्कही साधले नसल्याचे नाराज घटकांचे म्हणणे यामुळे शिवसेनेन आलबेल नसल्याचे दिसत आहे.

आमदार राजेश क्षीरसागर यंदा विजयाची हॅटट्रीक साधण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी मर्जीतील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन शहरात प्रचाराला सुरुवात केली आहे. विविध आंदोलनातील सहभाग, युती सरकारच्या योजना, मराठा आरक्षणाचा निर्णय या बाजू मतदारांसमोर मांडत ते विजयाचे आडाखे बांधत आहेत. दुसरीकडे शिवसेनेतील एक गट त्यांच्या कार्यशैलीवर नाराज होऊन काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत जाधव यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. कुणी उघडपणे प्रचारात आहेत तर कोणी पडद्याआड राहून काँग्रेसच्या उमेदवाराला पूरक भूमिका घेत आहेत.

शिवसेनेचे जिल्ह्यातील वरिष्ठ व जुने पदाधिकारी आणि आमदार यांच्यामध्ये सख्य नाही. शहराचे प्रमुखपद भूषविलेले माजी पदाधिकारीही आमदारांसोबत नाहीत. मंगळवार पेठेतील काही पदाधिकाऱ्यांनी स्थानिक उमेदवार म्हणून काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारात आहेत. महापालिका निवडणुकीत नगरसेवकपदाचे तिकीट न मिळाल्याचा राग काही जण आजही आळवत आहेत. ही नाराज मंडळी स्थानिक नेतृत्वावर राग व्यक्त करण्यासाठी काँग्रेसच्या उमेदवाराला पडद्याआड राहून मदत करत आहेत. एरवी शहरात सक्रिय असणारी मंडळी आता ग्रामीण भागातील प्रचारात व्यस्त आहेत.

एकीकडे शिवसेना पक्ष व पक्षप्रमुखांवर आमची निष्ठा आहे, आम्ही पक्षाच्या विरोधात नाही अशी भूमिका मांडायची. पक्षाच्या व्यासपीठावर निष्ठा व्यक्त करायची आणि निवडणुकीच्या कालावधीत पक्षाचा उमेदवार अडचणीत कसा येईल, या पद्धतीने खेळी करायचा असा दुहेरी डाव काही जण खेळत आहेत. या साऱ्या प्रकाराला आमदारांची कार्यपद्धती तितकीच कारणीभूत आहे. गेल्या पाच वर्षांत त्यांनी जुन्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नाही. निवडक कार्यकर्त्यांना घेऊनच व्यक्तीकेंद्रीत राजकारण केले. महापालिका निवडणुकीत सोयीची भूमिका घेतली अशा तक्रारींचा पाढाही नाराज मंडळी वाचतात. निवडणुकीत शिवसेनेतील गटबाजी उघडपणे दिसू लागली आहे.

मतभेदांकडे दुर्लक्ष

क्षीरसागर यांच्या कामकाज पद्धतीमुळे दुखावलेल्या पक्षातील नाराज घटकांची समजूत घालण्यासाठी वरिष्ठ पातळीवरुन हालचाली झाल्या नाहीत. शिवसेनेचे नेते दिवाकर रावते, संपर्क नेते अरुण दुधवडकर यांच्यापर्यंत शहर शिवसेनेतील वाद पोहचला. निवडणुकीच्या काळातही वरिष्ठ नेत्यांनी हा वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केल्याचे नजरेस पडले नाही. शिवाय आमदार क्षीरसागर यांनी सुद्धा नाराज घटकांशी संपर्क साधत समझोत्यासाठी पाऊल उचलले नाहीत, असे संबंधितांचे म्हणणे आहे. पक्ष एक, मतदारसंघ एक पण गटबाजीमुळे पक्षातील हे दोन गट दोन ध्रुवावर असल्यासारखे वागत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खासदार कोल्हेंच्या आज जिल्ह्यात सभा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक खासदार अमोल कोल्हे यांच्या सोमवारी (ता. १४) जिल्ह्यात चार सभा होणार आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश पाटील यांच्या प्रचारार्थ चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथे दुपारी चार वाजता त्यांची सभा होईल. त्यानंतर राधानगरी मतदारसंघातील उमेदवार के. पी. पाटील यांच्या प्रचारासाठी गारगोटी येथील बाजारपेठ येथे सायंकाळी ५.३० वाजता सभा होणार आहे. त्यानंतर कोल्हे हे गडहिंग्लजकडे रवाना होतील. आमदार हसन मुश्रीफ यांच्या प्रचारार्थ रात्री सात वाजता गडहिंग्लजला सभा होईल. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्या प्रचार सभेतही ते सहभागी होणार आहेत. संभाजीनगर बसस्थानक नजीकच्या विजयनगर मैदान येथे रात्री आठ वाजता सभा होणार असल्याचे संयोजकांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शरद पवार, सुप्रिया सुळेंना घुसखोरांची काळजी

$
0
0

शरद पवार, सुप्रिया सुळेंना घुसखोरांची काळजी

कराडच्या सभेत अमित शहा यांचा हल्लाबोल

म. टा. वृत्तसेवा, कराड

'भारतात अवैधरीत्या वास्तव्य करणाऱ्या घुसखोरांची ओळख पटवण्यासाठी केंद्र सरकारने आणलेल्या एनआरसी कायद्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोध करीत आहेत. याचाच अर्थ शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासारख्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना घुसखोरांची काळजी लागून राहत आहे. परंतु, सन २०२४पर्यंत भारतात बेकायदा राहत असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला देशाबाहेर हाकलून लावण्याचा केंद्र सरकारचा निर्धार आहे,' असा इशारा केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिला.

सातारा लोकसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अतुल भोसले यांच्या प्रचारार्थ येथील शिवाजी स्टेडियमवर रविवारी दुपारी आयोजित जाहीर प्रचार सभेत शहा बोलत होते. या वेळी भाजप नेते मकरंद देशपांडे उपस्थित होते.

अमित शहा म्हणाले, 'मोदी सरकारने घटनेतील ३७० कलम हटवून खऱ्या अर्थाने काश्मिरला भारताला अविभाज्य अंग बनवण्याचे काम केले आहे. ७०वर्षांत जे करण्याचे धाडस कोणत्याही सरकारने दाखवले नाही, ते आमच्या सरकारने करून दाखवले आहे. परंतु, राष्ट्रवादीचे नेते सरकारच्या या निर्णयावर टीका करताना या घटनेचा आणि महाराष्ट्रातील निवडणुकीचा काय संबंध? असे विचारत आहेत. काश्मिरसाठी महाराष्ट्रातील हजारो जवानांनी बलिदान दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्र नेहमीच ३७० कलमाशी निगडीत राहणार आहे. भाजप नेत्यांचा नव्हे तर कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आमचा पक्ष वंशवादावर चालत नाही, म्हणूनच पंतप्रधान मोदी किंवा माझ्यासारखे अगदी तळागाळातील कार्यकर्ते आज इथेपर्यंत पोहोचू शकले आहेत. अतुल भोसले यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला कराड दक्षिणमधील मतदारांनी संधी दिल्यास त्यांना निश्चितपणे मोठा नेता बनण्याची संधी मिळू शकेल. भाजप छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे. त्यांचे वंशज उदयनराजे भोसले भाजपच्या व्यासपीठावर पाहून मला खूप आनंद होत आहे. काँग्रेसने दिवंगत नेते यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या महान नेत्यालाही न्याय दिला नाही. त्यामुळे सामान्य जनतेने काँग्रेसकडून काही अपेक्षा करण्यात अर्थच नाही. राज्यातील भाजप-शिवसेना सरकारने गेल्या पाच वर्षांत सातारा जिल्ह्यातील ४८ हजार हेक्टर शेतजमिनीला पाणी देण्याचे काम केले आहे. सातारा जिल्ह्यातील एकूण २६ प्रलंबीत सिंचन योजना मार्गी लावण्याचे काम केले. कृष्णा खोरे अंतर्गत अपुरी असणारी कामेही पुढील काही वर्षांत निश्चितपणे पूर्ण केली जाणार आहेत. चौदाव्या वित्त आयोगांतर्गत महाराष्ट्राला केंद्र सरकारने २ लाख ८६ हजार ३५६ कोटी रुपये दिले आहेत. मुद्रा कर्ज योजना, शहरी दळणवळण, स्मार्ट सिटी, अमृत, उज्वला गॅस, पंतप्रधान आवास योजना आदी योजनांसाठीही केंद्र सरकारने ४ लाख ३८ हजार ७०४ कोटी रुपये दिले आहेत. या उलट राज्यात गेली १५ वर्षे सत्तेत असणाऱ्या काँग्रेस आघाडी सरकारने केवळ भ्रष्टाचाराचे आकडे फुगवण्याचेच काम केले. अजित पवार यांनी राज्यातील जलसिंचनासाठी ७० हजार कोटी रुपये खर्च करुनही सिंचन योजना पूर्ण का होऊ शकल्या नाहीत, याचे उत्तर शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच दिले पाहिजे.' या वेळी लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचे भाषण झाले. प्रारंभी विधानसभेचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांनी प्रास्ताविक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑक्टोबर हिटमुळे लिंबू महागला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कांदा, लसून आणि टोमॅटोपाठोपाठ आता लिंबूही महागला आहे. ऑक्टोबर हिट आणि निवडणूक ज्वरामुळे लिंबवाचा प्रतिनग दर पाच रुपयांवर पोहोचला आहे. दहा रुपयाला मोठ्या आकाराचे दोन लिंबू असा भाजी मंडईंमध्ये दर आहे.

शाहू मार्केट यार्डमध्ये फळांची आवक वाढली असून, लिंबू आवक कमी झाली आहे. शनिवारी मार्केट यार्डमध्ये ४९५ छोट्या पोत्यांतून (चुमडे) लिंबू विक्रीस आला. लिलावामध्ये लिंबवाच्या पोत्याचा दर कमीत २००, तर जास्तीत जास्त १२०० रुपये होता. रविवारीही लिंबवाची आवक घटली. फक्त ३० छोटी पोती विक्रीस आली. तरीही लिंबवाचा पोत्याचा दर कमीत कमी १०० रुपये, तर जास्तीत जास्त १००० हजार रुपये होता. लिंबूच्या आकारावरून दर ठरतो. छोट्या पोत्यात ५०० ते ६०० लिंबू असतात.

सध्या ऑक्टोबर हिटमुळे लिंबवाला मागणी वाढली आहे. तसेच निवडणुकीचा ज्वर वाढला असून हॉटेल व्यावसायिकांकडूनही लिंबवाला मागणी वाढली आहे. छोट्या आकाराचे लिंबू दहा रुपयाला तीन, तर मोठे लिंबू दहा रुपयाला दोन नग असा आहे. कांद्याचा दर प्रतिकिलो ४० ते ५० रुपयांवर स्थिर असून टोमॅटोचा दर प्रतिकिलो ४० रुपये आहे. कांदा, टोमॅटो, लिंबूचे दर वाढल्याने हॉटेलमध्ये सॅलड डिशवरही मर्यादा आली आहे.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहांनी घेतला जाधवयांच्याकडून आढावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूरचा दौरा आटोपून हेलिकॉप्टरमधून कऱ्हाडकडे जाताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्याकडून जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांचा आढावा घेतला. शहा यांची तपोवन मैदानातील सभा संपवून ते अंबाबाईच्या दर्शनासाठी गेले. देवीचे दर्शन घेतल्यानंतर मोटारीने उजळाईवाडी विमानतळावर गेले. त्यांच्यासमवेत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, देवस्थान समितीचे अध्यक्ष जाधव होते. हेलिकॉप्टरमधून कऱ्हाडकडे जाताना जाधव यांना कऱ्हाडला येण्याबाबत सूचना केली. प्रवासात त्यांनी जिल्ह्यातील शिवसेनेच्या आठ आणि भाजपच्या दोन जागांचा आढावा घेतला. शिवसेनेशी युती झाल्याने कोल्हापूरला जागा वाढवून देता आल्या नाहीत, असेही शहा यांनी जाधव यांच्याकडे स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकासाला विरोध करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल

$
0
0

विकासाला विरोध करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल

आदित्य ठाकरेंचा रहिमतपूर येथील सभेत

सातारा :

'बेरोजगारी, कर्जबाजारीपणा, दुष्काळ आदी प्रश्न दहातोंडी रावणासारखे राज्यापुढे उभे आहेत. या रावणाचा वध करायचा असेल तर धनुष्यबाणाशिवाय पर्याय नाही. राज्यातील जनता उद्याच्या २१ तारखेला धनुष्यबाणाच्या शस्त्राने राज्याच्या विकासाच्या प्रक्रियेत आड येणाऱ्या दहातोंडी रावणाचा वध करेल. विकासाच्या प्रक्रियेत आडवे येणाऱ्यांना जनता त्यांची जागा दाखवेल. राज्यात पुन्हा युतीचे सरकार सत्तेवर येईल,' असा विश्वास युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. दरम्यान, उदयनराजे भोसले आणि धैर्यशील कदम यांच्या विजयाची आता केवळ औपचारिकताच बाकी आहे, असेही ते म्हणाले.

महायुतीचे लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्या प्रचारार्थ रहिमतपूर येथे झालेल्या सभेत ठाकरे बोलत होते. ठाकरे म्हणाले, 'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारणाचा मूलमंत्र दिला. या कार्यासाठी लोकांचे आशीर्वाद घायचे असतात, असे त्यांनी सांगितले होते. जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आज रहिमतपूर येथे आलो आहे. तुमचे मत महायुतीच्या उमेदवारांना मिळणार आहे, म्हणजेच जनतेचे आशीर्वाद मला लाभणार आहेत. मी येथे केवळ मत मागायला नव्हे तर नवमहाराष्ट्र घडविण्याचे स्वप्न घेऊन आलो आहे. महाराष्ट्र उपाशीपोटी नाही रहायला पाहिजे. त्या करिता राज्यात ठिकठिकाणी हजार भोजनालये सुरू करायची व अवघ्या दहा रुपयांमध्ये जनतेला जेवण देण्याची आमची योजना आहे. त्यामुळे भुकेलेल्याला अन्न मिळण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही होणार आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा करीता अडीच हजार बस करणार आहोत. शेतकऱ्यांकरिता कर्जमाफी नव्हे तर शंभर टक्के कर्जमुक्त करण्याचे अभिवचन मी देतो.'

...............

कुत्रे चावले तरी, उमेदवाराचा प्रचार चालूच

सातारा :

राजकारण व प्रेमात सर्व काही क्षम्य असते, असे म्हटले जाते. निवडणुकीत उमेदवार बेभान झालेले असतात. काहीही झाले तरी ते मागेपुढे पाहात नाहीत. निवडणुकीत कोणत्याही पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळो अथवा अपक्ष लढणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला आपणच जिंकणार, असा प्रचंड आत्मविश्‍वास असतो. त्यामुळे प्रत्येकजण जीव तोडून प्रचार करीत असतो. असाच एक उमेदवार वडूज येथे व्यक्तीगत प्रचार करीत असताना त्यास अचानक कुत्र्याने चावा घेतला. तरी त्या उमेदवाराने न डगमगता आपला प्रचार सुरूच ठेवला आहे.

माण तालुक्यातील शिंदी खुर्द येथील संदीप खरात हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्याकडे वाहन, गाड्या, घोडे, कार्यकर्ते असा कसलाही लवाजमा नाही. ते स्वत: व त्यांचा मुलगा दोघेच रस्त्यावरील नागरिकांना भेटून आपली भूमिका समजावून सांगत आहेत. वडूज येथील छत्रपती शिवाजी चौकातील वि. का. स. सोसायटीचे संचालक धनंजय मारुती राऊत यांच्या कार्यालयासमोर ते आपली भूमिका मांडत होते. पथनाट्याच्या ढंगात ते आपल्या भूमिकेचे सादरीकरण करीत असताना अचानक एक कुत्रे पाठीमागून आले व त्याने काही क्षणाच्या आत खरात यांच्या ऊजव्या पायाचा चावा घेतला. तरीही खरात यांनी आपला प्रचार थांबविला नाही. शेवटी त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्यांनी प्रचार थांबवून रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोजागरी फोटो ओळ

$
0
0

चंद्राचा शीतल प्रकाश, अंगभर लपेटून राहणारी वाऱ्याची मंद झुळूक अशा आल्हाददायी वातावरणात शहरातील गार्डन, टेरेस येथे कोजागरी पौर्णिमेनिमित्त बेत रंगला. नागरिकांनी केशरमिश्रित दुधाचा आस्वाद घेत कोजागरी साजरी केली.

फोटो : अर्जुन टाकळकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीपीआरमध्ये दोन दिवसांच्या बाळाच्या हृदयावर शस्त्रक्रिया

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सीपीआरमधील हृदयरोग विभाग अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असून अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यात विभागाने यश मिळवले आहे. हृदयरोग विभागात शनिवारी केवळ दोन दिवसांच्या बाळाच्या हृदयावर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याला जीवनदान देण्यात आले. बाळ सुखरूप असल्याची माहिती हृदयरोग विभागाचे प्रमुख डॉ. अक्षय बाफना यांनी दिली.

वैभववाडी येथील २२ वर्षीय प्रेरणा कदम या गरोदरपणातील उपचार सीपीआरमध्ये घेत होत्या. ३२ आठवड्यांनंतर त्यांची सोनोग्राफी केल्यानंतर बाळाच्या हृदयातील डाव्या बाजूच्या धमनीतून हृदयाला नीट रक्तपुरवठा होत नसल्याचे निदान झाले. त्यावर डॉक्टरांनी उपचार सुरू ठेवले. प्रेरणा प्रसूतीसाठी सीपीआरमध्ये दाखल झाल्यानंतर डॉक्टरांनी नैसर्गिक प्रसूती व्हावी यासाठी प्रयत्न केला. मात्र, बाळाची परिस्थिती गंभीर असल्याने सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर अर्भकाच्या हृदयाचा इको करण्यात आला. तपासणीत अर्भकाच्या डाव्या बाजूला हृदयाला रक्तपुरवठा करणारी धमनी केवळ चाळीस ते पन्नास टक्के काम करत असल्याचे निदर्शनास आले. डॉक्टरांनी तातडीने बाळाच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. कोणतीही चिरफाड न करता अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया डॉक्टरांनी यशस्वीरीत्या केली. यामध्ये डॉ. रोहित श्रीवास्तव, भूलतज्ज्ञ डॉ. उल्हास मिसाळ, नवजात शिशुतज्ज्ञ सुधीर सरोदे, संगीता कुंभोजकर, डॉ. रवी एम यांनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शास्त्रीय गायन

$
0
0

कोल्हापूर : गायन समाज देवल क्लब, झंकार आणि माजिद भाई नईम सतार मेकर यांच्या संयुक्त विद्यमाने रईस बालेखान आणि अमेरिकास्थित मनू श्रीवास्तव यांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम १९ ऑक्टोबर रोजी आयोजित केला आहे. संस्थेच्या अच्युतराव भांडारकर कलादालन येथे सायंकाळी सहा वाजता कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रम सर्वांसाठी मुक्त प्रवेश आहे. संगीतप्रेमींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रम समिती प्रमुख श्रीकांत डिग्रजकर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जि.प.च्या सात जणांचा मंत्रालयासाठी शड्डू

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

जिल्ह्यातील विविध मतदारसंघातून मंत्रालयात प्रतिनिधीत्व करण्यासाठी यावर्षी जिल्हा परिषदेतील सात आजी माजी सदस्य विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्यापैकी कोणी शिवसेना तर कुणाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून अधिकृतपणे उमेदवारी मिळाली आहे. आघाडी आणि युतीमुळे काही जणांची उमेदवारी हुकली, मात्र त्यांनी विधानसभा लढवायची म्हणून जनसुराज्य, वंचित आघाडीचा झेंडा हाती घेतला आहे. काहींनी 'एकला चलो रे'चा नारा दिला आहे.पक्ष आणि आघाडीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात उमेदवारी दाखल करत बंडाचे निशाण फडकाविले आहे. जि. प. तील माजी पदाधिकारीही ताकतिनिशी मैदानात उतरले आहेत.

आमदारकीसाठी भाजपचे शिरोळ येथील जि. प. सदस्य अशोकराव माने यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यात्वासोबतच जि. प. सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ते हातकणंगलेमधून जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार आहेत. भुदरगड तालुक्यातील शेणगाव-आकुर्डी मतदारसंघातील राष्ट्रवादीचे सदस्य जीवन पाटील यांनी राधानगरी मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आमदार के. पी. पाटील उमेदवार आहेत.

बांधकाम समितीचे माजी सभापती संग्रामसिंह कुपेकर शिवसेनेकडून चंदगड मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. गेल्या वेळी त्यांना २५८४४ मते मिळाली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सावकार मादनाईक हे दुसऱ्यांदा शिरोळमधून निवडणूक लढवित आहेत. मादनाईक यांनी बांधकाम समिती सभापती म्हणून यापूर्वी काम केले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना तिसऱ्या ४८५११ मते घेतली होती. शिक्षण समितीचे माजी सभापती महेश पाटील हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश पाटील यांचे ते बंधू आहेत. या मतदारसंघात भावाभावात विधानसभेसाठी लढाई असे चित्र निर्माण झाले आहे.

समाजकल्याण समितीचे माजी सभापती किरण कांबळे हे हातकणंगले मतदारसंघात ताराराणी पक्षाचे उमेदवार आहेत. जिल्हा परिषदेच्या गेल्या सभागृहात ते सदस्य होते. अडीच वर्षे त्यांनी सभापतिपदी काम केले आहे. गारगोटी येथील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल देसाई यांनी राधानगरी मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवार अर्ज भरला आहे. त्यांनी विधानसभा लढवायची म्हणून भाजपात प्रवेश केला. युतीमध्ये ही जागा शिवसेनेला मिळाली आहे. या ठिकाणी देसाई यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून ताकत आजमावत आहेत. त्यांच्या पत्नी रश्मी या काँग्रेसच्या चिन्हावर जि. प. सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत. युतीमध्ये ही जागा शिवसेनेला मिळाली आहे.

आजरा येथील उद्योजक रमेश रेडेकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी कायम ठेवली आहे. रेडेकर यांच्या पत्नी सुनीता या भाजपच्या जि. प. सदस्या आहेत. युतीमध्ये ही जागा शिवसेनेकडे आहे. राधानगरी मतदारसंघातून माजी आमदार दिनकरराव जाधव यांचे पुत्र सत्यजित अपक्ष म्हणून लढत आहेत. सत्यजित यांच्या पत्नी स्वरुपाराणी या जिल्हा परिषद सदस्या आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत जाधव गटाने आमदार प्रकाश आबिटकर यांना पाठिंबा दिला होता. यावर्षी त्यांची उमेदवारी असल्याने विद्यमान आमदार आबिटकर यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत.

यांनी घेतली माघार

शिरोळ मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे, राजवर्धन निंबाळकर, चंदगडमधून गडहिंग्लज भाजप तालुकाध्यक्ष, जि.प. सदस्य हेमंत कोलेकर यांच्या नावाची चर्चा होती. त्यांनी पक्षाकडे मुलाखती दिल्या. दोन्ही जागा मित्रपक्षाला गेल्यामुळे त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. चंदगडमधील सदस्य विद्या पाटील यांचे पती विलास यांनीही उमेदवारी मागे घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘घरांची रचना करताना पर्यावरण संवर्धन आवश्यक’

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर आर्किटेक्टनी इमारतीची रचना करताना भरपूर सुर्यप्रकाश, खेळती हवा असणारी व सामान्य लोकांना परवडणाऱ्या घरांची रचना करावी. शहरांमध्ये उंच घरांची रचना करताना पर्यावरण संवर्धनाचा विचार करावा. डिझाइनमध्ये व्हर्टिकल गार्डनचा समावेश करावा' असे मत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी व्यक्त केले. असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस अँड इंजिनीअर्स व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स कोल्हापूर सेंटरतर्फे 'वर्ल्ड आर्किटेक्चर व इंजिनीअर्स डे' साजरा झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी देसाई बोलत होते.

याप्रसंगी अहमदाबाद येथील आर्किटेक्ट स्नेहल शाह यांच्या 'फूट प्रिंटस ऑफ विश्वकर्मा' या पुस्तकाचे प्रकाशन झाले. शाह यांनी ग्रीक, रोमन, युरोपियन देशातील आर्किटेक्चरपासून सुरू झालेला प्रवास आजअखेर कसा चालू आहे यासंबंधीची माहिती दिली. महापुराच्या कालावधीत मदतकार्यातील सहभागाबद्दल असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस अँड इंजिनीअर्सचा सत्कार करण्यात आला. असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे व कार्यकारी मंडळाने हा सत्कार स्वीकारला. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टसच्या वर्किंग कमिटीचे चेअरमन आर्किटेक्ट विजय कोराणे यांनी स्वागत केले. इंजिनीअर विजय चोपदार यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला आर्किटेक्ट शिरीष बेरी, सूरज जाधव, जीवन बोडके, संजय आवटे, अमरजा निंबाळकर, मोहन वायचळ, प्रमोद बेरी, इंजिनीअर बलराम महाजन, संदीप घाटगे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. चव्हाण यांना ‘हिंदी सेवा सन्मान’

$
0
0

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे प्रा. डॉ. अर्जुन चव्हाण यांना दिल्लीत झालेल्या आंतरराष्ट्रीय हिंदी संमेलनामध्ये

केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांच्या हस्ते 'हिंदी सेवा सन्मान' पुरस्कार प्रदान करण्यात आला. विश्व हिंदी परिषदेचे महासचिव डॉ. विपिन कुमार, संयोजक प्रा. डॉ. माला मिश्र, राजभाषा विभाग आणि दिल्ली महानगरपालिकेच्या आयुक्त रश्मी सिंह आदी उपस्थित होते.

महात्मा गांधीजींच्या १५०व्या जयंतीच्या निमित्ताने विश्व हिंदी परिषद व सरकारच्या राजभाषा विभागाच्यावतीने नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय हिंदी संमेलन झाले. संमेलनाचे उदघाटन प्रसिद्ध हिंदी लेखिका व गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या हस्ते झाले. संमेलनात हिंदी साहित्यात केलेले भरीव लेखन व हिंदीच्या प्रचार-प्रसारासाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल विविध देशांसह भारतातील निवडक हिंदी साहित्यिकांचा हिंदी सेवा सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यात डॉ. चव्हाण यांचा समावेश होता. डॉ. चव्हाण यांना संमेलनात 'गांधी और राष्ट्रभाषा हिंदी' या विषयाचे विवेचन करण्यासाठी 'विशेष अतिथी' म्हणून निमंत्रित केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साखर कारखानदारांची झुंज

$
0
0

Satsih.ghatage@timesgroup.com

Tweet:satishgMT

कोल्हापूर : विधानसभा निवडणूकीसाठी अर्ज भरण्याची मुदत संपली असून जिल्ह्यातील नऊ कारखान्याचे अध्यक्ष निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. कागल आणि करवीर या दोन्ही मतदारसंघात साखर कारखानदार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. निवडणूक काटाजोड लढत होणार असल्याने कारखानदार असलेल्या उमेदवारांची 'शुगर' चांगलीच वाढणार आहे.

जिल्ह्याच्या राजकारणावर सुरुवातीपासून सहकाराचा मोठा पगडा आहे. ज्यांच्याकडे कारखाना, त्यांची सत्ता असे गणित असल्याने काँग्रेसने त्यावर आधीपासून जोर दिला. मात्र नंतर सहकारात कारकीर्द करणाऱ्यांनी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळत नसल्याने भाजप-शिवसेनेकडून उमेदवारी स्वीकारली. २००९ च्या निवडणूकीत एनएसयूआयकडून राजकीय कारकीर्द सुरू करणाऱ्या चंद्रदीप नरके यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेकडून निवडणूक लढवत यश मिळवले. नरके कुंभी साखर कारखान्याचे अध्यक्ष असल्याने २०१४च्या निवडणूकीत त्यांना यश मिळाले. यंदा हॅटट्रिक साजरी करण्यासाठी नरके सज्ज असले तरी त्यांना काँग्रेसचे उमेदवार, माजी आमदार पी. एन. पाटील यांचे आव्हान आहे. पाटील यांनीही भोगावती साखर कारखाना ताब्यात घेतल्याने करवीर मतदारसंघात नरके आणि पाटील या दोन साखर सम्राटांमध्ये लढाई रंगली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार हसन मुश्रीफ कागलमध्ये चौथ्यांदा कागलचे प्रतिनिधीत्व करीत आहेतच. त्यांचे राजकीय गुरु दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांच्याशी बिनसल्याने ते हमिदवाडा साखर कारखान्यातून त्यांना बाहेर पडावे लागले. कारखानदारीचे महत्त्व लक्षात घेऊन मुश्रीफ यांनी सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याची उभारणी केली. मुश्रीफ यांना शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष, समरजीत घाटगे यांनी आव्हान दिले आहे. ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने घाटगे यांनी अपक्ष म्हणून मुश्रीफ यांच्याविरोधात शड्डू ठोकल्याने कागलच्या राजकीय विद्यापीठात दोन कारखानदारांत काटाजोड लढाई आहे.

राजकारणात कमबॅक करण्यासाठी दूधगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील निवडणूकीच्या रिंगणात आहेत. पाटील यांच्याप्रमाणेच वारणा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विनय कोरे यांनी स्वत:च्या जनसुराज्य शक्ती पक्षाच्या माध्यमातून गेल्या निवडणुकीतील पराभव पुसण्यासाठी मतदारसंघात मोठी बांधणी केली आहे. जिल्ह्यातील काही मतदारसंघांत त्यांनी जनसुराज्यचे उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.

जवाहर कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश आवाडे हे काँग्रेस जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन अपक्ष म्हणून इचलकरंजी मतदारसंघात रिंगणात उतरले आहेत. सलग दोन वेळा निवडून आलेल्या भाजपच्या सुरेश हाळवणकर यांच्याशी त्यांना टक्कर द्यावी लागणार आहे. शिरोळ मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वाटणीला गेल्याने राष्ट्रवादीच्या राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी बंडखोरी केली आहे. ते शरद सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. त्यांनाही पराभवाचा शिक्का पुसायचा आहे. गेल्यावेळी, २०१४च्या निवडणूकीत त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मत घेतली होती. आजरा कारखान्याचे अध्यक्ष अशोक चराटी यांनीही भाजपमधून बंडखोरी करत जुनसराज्यचा नारळ हातात घेतला आहे. कोल्हापूर दक्षिणमधील भाजपचे आमदार अमल महाडिक हेही राजाराम साखर कारखान्याचे संचालक आहेत.

साखर कारखानदाराच्या लढती

करवीर : चंद्रदीप नरके वि. पी.एन. पाटील

कागल : हसन मुश्रीफ वि. समरजीत घाटगे

००००

इचलकरंजी : प्रकाश आवाडे (अपक्ष)

राधानगरी : के. पी. पाटील (राष्ट्रवादी)

शाहूवाडी : विनय कोरे (जनसुराज्य)

चंदगड : अशोक चराटी (जनसुराज्य)

शिरोळ : राजेंद्र पाटील यड्रावकर (अपक्ष)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images