Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

संपांतील शिक्षकांची माहिती मागविली

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्राथमिक शिक्षकांनी पुकारलेल्या सोमवारच्या शाळा बंद आंदोलन आणि त्यामध्ये सहभागी शिक्षकांची माहिती शिक्षण विभागाने मागवली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मालकीच्या १९८० पैकी १४८६ शाळा बंद होत्या. तर जि.प. शाळेतील कार्यरत ७७८५ शिक्षकांपैकी ५८०३ शिक्षकांनी संपात सहभाग घेतला होता. प्राथमिक शिक्षण विभागातर्फे माहिती संकलित करुन शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे सादर केली आहे. त्या कार्यालयाकडून शिक्षण विभागाला माहिती देण्यात आली. जि.प. प्राथमिक शाळेंतर्गत आजरा तालुक्यातील ३९३, भुदरगड २६५, चंदगड ६८५, गगनबावडा १५६, गडहिंग्लज ४७५, कागलमधील २४५ शिक्षक संपात उतरले होते. करवीरमधील ९१८, पन्हाळा ४९५, हातकणंगले ३६१, राधानगरी ७०६, शाहूवाडीतील ४८७ तर शिरोळ येथील ६१७ शिक्षक संपात उतरले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एकादशीमुळे मिळाले अमेरिकेला ‘चांद्र’यश

0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

'एकादशीच्या दिवशी चांद्रयान अंतराळात सोडल्यानेच अमेरिकेची चंद्रमोहीम यशस्वी झाली', असे अजब तर्कट शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी मांडले. या वक्तव्यामुळे भिडेंवर चौफेर टीका होत आहे. नवरात्रीमध्ये शिवप्रतिष्ठानच्या वतीने दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या तयारीसाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला मार्गदर्शन करताना संभाजी भिडे यांनी हा अजब दावा केला.

भिडे म्हणाले, 'ब्रह्मांडातील नक्षत्रांची स्थिती एकादशीला संतुलित असते. त्यामुळेच अमेरिकेने एकादशीच्या दिवशी त्यांचे चांद्रयान अंतराळात सोडल्याने त्यांची मोहीम यशस्वी झाली. भारतीय कालमापण पद्धतीमुळेच हे शक्य झाले. भारतीय कालमापन पद्धतीत एका सेकंदाचा हजारावा भाग मोजण्याची क्षमता आहे. त्यामुळेच चांद्रमोहीम राबविताना अमेरिकेने आपल्या कालमापन पद्धतीचा आधार घेतला. चंद्रावर उपग्रह सोडण्याचे अमेरिकेचे ३८ प्रयत्न अयशस्वी ठरले. त्यानंतर नासाच्या वैज्ञानिकांनी आपल्या कालमापन पद्धतीचा अभ्यास केला आणि एकादशीच्या दिवशी उपग्रह अंतराळात सोडून चांद्रयान मोहीम फत्ते केली.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मोहरम सणातील प्रमुख कत्तल रात्रीदिवशी भाविकांनी शहरातील मानाचे पंजे आणि पिरांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. रात्री खाई फोडण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती तर पहाटेपर्यंत पारंपरिक वाद्याच्या गजरात पंजे भेटीचा कार्यक्रम सुरू होता.

हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मोहरम सण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. यंदा गणेशोत्सव आणि मोहरम सण एकत्र आल्याने अनेक तालमीत गणेश मूर्ती आणि पंजाची प्रतिष्ठापना करण्यात आली. आज सोमवारी कत्तल रात्र हा उत्सवाचा प्रमुख दिवस असल्याने पंजांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. बाबूजमाल तालीम मंडळामधील नाल्या हैदर, शिवाजी चौकातील घुडणपीर, भवानी मंडपातील वाळव्याची स्वारी, बाराईमाम, नंगीवली, अवचितपीर, सरदार तालीम, काळा ईमाम, जुना बुधवार पेठेतील झिमझिम साहेब, ब्रह्मपुरी टेकडीवरील बुऱ्हाणसाहेब, बोडके गल्ली, मंगळवार पेठेतील दावल मलिक, तेली गल्लीतील अप्पा शेवाळ पंजाच्या दर्शनासाठी भाविकांची सकाळपासून गर्दी होती. भाविकांकडून मलिदा, वडी चपाती, आंबिलीचा नैवेद्य दाखवण्यात आला. उद आणि उदबत्तीच्या सुगंधाने परिसर भारुन गेला होता. पीर आणि पंजाबरोबर बाबूजमाल, नंगीवली, बुऱ्हाणबाबा दर्गातही भाविकांनी दर्शन घेतले.

गुरुवार पेठेतील बाबूजमाल तालीम मंडळाच्या नाल्या हैदरचे दर्शन घेण्यासाठी गर्दी झाल्याने सरस्वती टॉकीज परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद करण्यात आले. सायंकाळनंतर पारंपरिक वाद्याच्या गजरात पंजे भेटीस पडले. पारंपरिक वाद्याच्या गजरात आणि लेझर लाईटच्या प्रकाशात मिरवणूका निघाल्या. रात्री दहानंतर बाबूजमाल, मंगळवार पेठ, दिलबहार तालीम मंडळ परिसरात खाई फोडण्याचा कार्यक्रम झाला. शिवाजी चौकातील घुडणपीर, गुजरी, महाद्वार रोड, बाबूजमाल मार्गावर पहाटेपर्यंत पंजांच्या मिरवणूका सुरु होत्या. मंगळवारी (ता.१०) उत्सवाचा अंतिम दिवस असून दुपारनंतर ताबूत विसर्जनाच्या मिरवणुका निघणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापूरच्या महापौरांचेपालकमंत्र्यांविरोधात बंड

0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

'सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना भारतीय जनता पक्षाने सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्यास मी त्यांच्या विरोधात बंडखोरी करून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार आहे,' असा स्पष्ट इशारा सोमवारी सोलापूर महानगरपालिकेच्या सत्ताधारी भाजपच्या महापौर शोभा बनशेट्टी यांनी दिला आहे.

मागील दोन वर्षांत अनेकदा बनशेट्टी यांनी शहर उत्तरमधून आगामी विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. विविध जाहीर कार्यक्रमांत बोलताना ही त्यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचा मनोदय व्यक्त केला होता. सोमवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा संपल्यानंतर त्यांनी पालकमंत्री देशमुख यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचा पुनरुच्चार केला. 'देशमुख यांनी सध्याच्या कार्यकाळात अपेक्षित लोकोपयोगी कामे केली नाहीत. त्यामुळे आगामी विधानसभेसाठी भाजपने त्यांना उमेदवारी दिल्यास त्यांच्या विरोधात निवडणूक लढवू. याच मतदारसंघातून भाजपकडून अॅड. मिलिंद थोबडे इच्छुक आहेत. पक्षाने त्यांना किंवा अन्य कोणाला उमेदवारी दिल्यास आम्ही पक्षाने दिलेल्या उमेदवाराचे काम करू. मात्र, पुन्हा देशमुख यांना उमेदवारी दिल्यास त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे,' असेही बनशेट्टी म्हणाल्या. दरम्यान, विद्यमान आमदार तथा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सलग तीन वेळा शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत देशमुख विक्रमी मतांनी विजयी झाले होते.

बनशेट्टी मंत्री सुभाष देशमुखांच्या समर्थक…

महापौर शोभा बनशेट्टी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या कट्टर समर्थक आहेत. शिवाय त्यांना अक्कलकोटमधून ही रसद मिळू शकते. त्यामुळे बनशेट्टी यांनी बंडाची घोषणा करण्यामागे पालकमंत्री व सहकारमंत्र्यांमधील 'स्नेहसंबंध' कारणीभूत असल्याचे मत भाजप समर्थक व्यक्त करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणपती विसर्जनासाठी इराणी खणीचा प्रस्ताव

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पुरामुळे पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर जामदार क्लबच्यापुढे आल्याने महानगरपालिका प्रशासनाकडून शहरातील सार्वजनिक मंडळांनी इराणी खणीत विसर्जन करावे, असा प्रस्ताव पुढे आला आहे. पुढील दोन दिवसांत पाणी पात्रात न गेल्यास प्रशासनाकडून इराणी खणीचा पर्याय मंडळापुढे ठेवला जाणार आहे.

धरणक्षेत्रात सुरू असलेली अतिवृष्टी, धरणातून सुरू असलेला विसर्ग यामुळे पंचगंगा नदीला पूर आला आहे. पुराने ३९ फुटाची इशारा पातळी ओलांडली असून राजाराम बंधाऱ्यावर पाणी पातळी ३९ फूट ११ इंचावर आहे. सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरु असून गुरुवारी (ता.१२) अनंत चतुर्दशीदिवशी मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन होणार आहे. कोल्हापुरातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीची सुरूवात मिरजकर तिकटी येथे सुरु होते आणि पंचगंगा नदीवर समाप्त होते. १७ ते १८ फूट उंचीच्या मूर्तींचे इराणी खणीत विसर्जन होते. तसेच शहरातील अनेक मंडळे छोट्या, मोठ्या मूर्तीही इराणी खणीत विसर्जन करतात. पण बहुतांशी मंडळे पंचगंगा नदीत मूर्ती विसर्जित करतात. मंडळांकडून मूर्ती दानही केल्या जातात.

गंगावेश ते शिवाजी पूल या रस्त्यावर पुराचे पाणी जामदार क्लबच्या पुढे आले आहे. त्यामुळे नदीवर विसर्जन करताना अडचणी येणार आहेत. पुराच्या पाण्यातून नदी परिसरात ट्रॅक्टर अथवा अन्य वाहन नेण्याची शक्यता कमी आहे. तराफ्यातून मूर्ती विसर्जनाचा प्रस्ताव असला तरी पाण्याचा वेग जास्त असल्याने ही जोखीम पत्करणे प्रशासनापुढे अवघड झाले आहे. रात्री विसर्जन करण्यात मोठ्या अडचणी येण्याच्या शक्यता आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व मंडळांनी इराणी खणीत मूर्ती विसर्जन करावे, असा प्रस्ताव महानगरपालिकेने पुढे केला आहे. या प्रस्तावाला मंडळाकडून कसा प्रतिसाद मिळणार याबाबत प्रशासन साशंक आहे. पण धोका पत्करुन विसर्जन करणाऱ्या मंडळांवर पोलिस प्रशासनाकडून अटकाव होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुढील दोन दिवसात पाणी उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाणी पात्राजवळ गेले तर विसर्जन होऊ शकते असा अंदाजही व्यक्त केला जात आहे. पाणी ओसरल्यानंतर महानगरपालिकेला युद्धपातळीवर स्वच्छता मोहिम राबवावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आशा कर्मचारी आक्रमक

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

निश्चित मानधनासाठी बेमुदत धरणे आंदोलन पुकारलेल्या आशा कर्मचारी व गटप्रवर्तकांनी सोमवारी पुन्हा रस्त्यावर उतरल्या. अभंग, ओव्या, गाणी म्हणून घोषणा देत सरकारचा निषेध केला. गेले काही दिवस आंदोलन सुरू असूनही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आंदोलनाची दखल घेतली नाही. त्यामुळे मंगळवारी सकाळी ११ वाजता पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

आशा प्रवर्तकांना दरमहा दहा हजार आणि प्रवर्तकांना १५ हजार रुपये इतके मानधन मिळावे, या मागण्यासाठी गेल्या आठवड्यापासून राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. सरकारसोबत चर्चा सुरू आहे. कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेसमोर आंदोलन सुरू आहे. सरकारचा निषेध म्हणून महिला कर्मचाऱ्यांनी काळ्या रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या. तसेच एक आशा कर्मचारी महिलेने न्यायदेवतेची वेशभूषा करून लक्ष वेधून घेतले. आंदोलनाला कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी संघटना, वकील संघटना, शिक्षक संघटनांनी पाठिंबा दिला. दरम्यान 'पालकमंत्री पाटील यांनी आशा कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची साधी दखल घेतली नाही. सरकारला गांभीर्य नाही. सरकारच्या निषेधार्थ मंगळवारी, पालकमंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्यात येणार आहे, 'असे युनियनच्या जिल्हाध्यक्षा नेत्रदीपा पाटील यांनी सांगितले.

खासदारांना निवेदन,

ऋतुराज पाटील यांचा पाठिंबा

आशा कर्मचाऱ्यांनी सकाळी, खासदार संजय मंडलिकांच्या निवासस्थानी जाऊन मागण्यांचे निवेदन दिले. तसेच जिल्ह्यातील आमदारांची भेट घेतली. सोमवारी, आंदोलनस्थळी ऋतुराज पाटील यांनी भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. शालेय पोषण आहार संघटनेचे कॉम्रेड भगवान पाटील, कॉम्रेड चंद्रकांत यादव, भरमा कांबळे, शिवाजी मगदूम, अॅड. नीता मगदूम, मेहबूब शेख यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

तर मुख्यमंत्र्यांना विरोध

तुटपुंज्या मानधनावर कर्मचारी काम करत आहेत. सरकारने, आशा कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने कोल्हापुरात येणार आहेत. त्यांनी आशा कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला नाही तर त्यांना कोल्हापुरात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा संघटनेने दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेल्फी काढतानादोघे वाहून गेले

0
0

सेल्फी काढताना

दोघे वाहून गेले

पंढरपूर :

गुरसाळे (ता. पंढरपूर) येथील भीमा नदीवरील बंधाऱ्यावर दोन मुले सेल्फी काढत होते. त्याच वेळी ते नदीमध्ये पडून वाहून गेल्याची घटना रविवारी घडली. दोन्ही तरुणांचा शोध सुरू आहे. पंढरपूर नगरपालिकेच्या यांत्रिक बोटीच्या माध्यमातून त्यांचा शोध चालू आहे.

लक्ष्मण सीताराम खंकाळ (वय १९), स्वप्निल सीताराम शिंदे (वय १८, रा. गुरसाळे) हे दोघे बंधाऱ्यावर सेल्फी घेत असताना एक जण नदी पात्रात पडला, त्याला वाचवण्यासाठी दुसऱ्या मित्राने पाण्यात उडी घेतल्याचे सांगितले जाते. त्यामुळे दोघेही वाहून गेले. सध्या उजनी, वीर धरणातून पाणी सोडल्यामुळे भीमा नदीत ४० हजार क्युसेकहून जास्त पाणी सोडले जात आहे. पाण्याच्या प्रवाहाला मोठा वेग आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लक्ष्मीपुरी धान्य व्यापारी मंडळ : आकर्षक

0
0

लक्ष्मीपुरी धान्य व्यापारी मंडळ : आकर्षक गणेशमूर्ती पूलगल्ली तालीम मंडळ : २१ फुटी गणेश मूर्ती श्री स्वयंभू गणेश मित्र मंडळ कोंडाओळ : आकर्षक गणेशमूर्ती शिवशाही मित्र मंडळ कोंडाओळ : आकर्षक गणेश मूर्ती भगवा ग्रुप तरुण मंडळ : आकर्षक गणेशमूर्ती सत्यनारायण मित्र मंडळ : आकर्षक गणेशमूर्ती गाईड मित्र मंडळ : आकर्षक गणेशमूर्ती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाकिस्तानचे अस्तित्व संपेल

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जम्मू आणि काश्मिरबद्दलचे ३७० कलम हटवल्यानंतर पाकिस्तानकडून हल्ल्याची धमकी दिली जात असली तरी अणुयुद्ध झाल्यास दोन्ही देशांचे नुकसान तर होईल, पण पाकिस्तान कायमचाच नामशेष होईल, असे ठाम मत ‘उरी सर्जिकल स्ट्राइक’चे सूत्रधार निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी व्यक्त केले. पाकिस्तानच्या कारवाया वाढण्याचा धोका असून त्याला प्रत्त्युत्तर देण्याची सर्व प्रकारची सज्जता भारताकडे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्याला भारतीय लष्कराने उरी येथे प्रत्युतरादाखल केलेल्या सर्जिकल स्ट्राइकमुळे देशाला फायदाच झाला आहे. यामुळे पाकिस्तानला भारताची लष्करी ताकद कळली,’ असे ते म्हणाले. उरी हल्ल्याची रणनीती आणि नेतृत्व निंभोरकर यांनी केले आहे. दिवंगत भालचंद्र पाचलग यांच्या स्मृतीनिमित्त आयोजित व्याख्यानात राजर्षी शाहू स्मारक येथे ते बोलत होते. यावेळी आमदार सतेज पाटील, नगरसेवक अजित ठाणेकर, प्रा. भरत पाटील उपस्थित होते.

‘सर्जिकल स्ट्राइक..उरी द बालाकोट’ या विषयावर बोलताना लेफ्टनंट जनरल निंभोरकर म्हणाले, ‘उरी सर्जिकल स्ट्राइकनंतर भारताच्या लष्करी मोहिमेचे संपूर्ण जगातून स्वागत करण्यात आले. लष्कर काय करू शकते याची प्रचिती देशातील जनतेला आल्यामुळे एक विश्वास निर्माण झाला. ज्याचा परिणाम त्यानंतरच्या पुलवामा स्ट्राइकपर्यंत कायम होता. उरी सर्जिकल स्ट्राइकने पाकिस्तान लष्करालाही त्यांच्या मर्यादा व भारताच्या लष्कराचे सामर्थ्य समजले. १८ सप्टेंबर, २०१६ ला उरी येथे झालेला दहशतवादी हल्ला हा मोठा आघात होता. त्यापूर्वी जून २०१५ मध्ये म्यानमारमध्ये याच प्रकारचा हल्ला झाला होता. क्रिकेट खेळणं बंद करून पाकिस्तान गप्प बसणार नव्हते. उरीवरील हल्ल्याचे प्रत्युत्तर देणे आवश्यक होते. याबाबत जेव्हा सरकारच्या संरक्षण मंत्रालयाशी चर्चा केली तेव्हा यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे, देशाच्या संरक्षण मंत्रालयाने शस्त्रास्त्र खरेदी, वापर यापासून मोहिमेची रचना ठरवण्यापर्यंतचे स्वातंत्र्य दिल्यामुळेच हा हल्ला यशस्वी झाला.’

ते पुढे म्हणाले, ‘या सर्जिकल स्ट्राइकबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. शिवाय असा प्रतिहल्ला होईल अशी पाकिस्तानला कल्पनाही नव्हती. शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यांपासून प्रेरणा घेऊन या मोहिमेतील एकेक कारवाई रचली. केवळ १५ जणांनाच या मोहिमेची कल्पना होती, तर ३५ जणांचाच प्रत्यक्ष सहभाग होता. १२ ते १५ मिनिटांमध्ये हे स्ट्राइक यशस्वी झाले. यावेळी भारताचा एकही सैनिक न गमावता ८२ पाकिस्तानींना मारले.

३७० कलम रद्दप्रकरणी बोलताना निंभोरकर म्हणाले, ‘काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी ३७० कलम रद्द होणे आवश्यक होते. याचे परिणाम दिसण्यासाठी आठ ते नऊ महिने जावे लागतील.’ यावेळी त्यांनी श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना रोखठोक उत्तर दिले. देशावर होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर देशाची सुरक्षाव्यवस्था योग्य आहे का? या प्रश्नावर ते म्हणाले, ‘१९९९ च्या कारगिल युद्धावेळी शस्त्रसाठ्याबाबत काही उणिवा होत्या. मात्र तरीही लष्कराने चांगली कामगिरी केली. आता भारतीय लष्कर परिपूर्ण आहे. मनोहर पर्रीकर यांच्या संरक्षणमंत्रिपदाच्या काळात १५ दिवसांत १७ हजार कोटींचे करार केल्याने लष्कराच्या ताफ्यात संरक्षणाच्या दृष्टीने अद्ययावत शस्त्रे, वाहने दाखल झाली. राफेल या लढाऊ विमानाच्या खरेदीबाबतही काही अफवा पसरवण्यात आल्या. ८४ कंपन्यांमध्ये विभागून राफेलच्या विविध भागांची खरेदी झाली आहे, त्यामुळे एकट्या अंबांनींच्या कंपनीच्या फायद्यासाठी राफेलची खरेदी केल्याची सांगितली जाणारी गोष्ट चुकीची आहे. अशा अफवा लष्कराच्या बाबतीत पसरवणे योग्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विनायक पाचलग यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी वासुदेव पाचलग, यशश्री पाचलग, सुनील पाचलग उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रमोद पाटील यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसंतराव मुळीक ‘उत्तर’मधून लढणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढण्याची घोषणा मंगळवारी केली. मराठा महासंघाच्या माध्यमातून सर्व जातीधर्मांसाठी केलेल्या कामाची पोचपावती नक्की मिळेल, त्यामुळे निवडणूक लढवावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी मेळाव्यात केली. त्यानंतर बोलताना मुळीक यांनी निश्चय जाहीर केला.

यावेळी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, मल्हार सेनेचे बबनराव रानगे, कादर मलबारी यांची प्रमुख उपस्थित होती. राजर्षी शाहू स्मारक भवन येथे झालेल्या मुळीक प्रेमी कार्यकर्त्यांचा मेळावा झाला.

शशिकांत पाटील म्हणाले, 'मुळीक यांनी गेली २० वर्षे राजर्षी शाहू महाराजांचा विचार ठेऊन सामाजिक कार्यालयावर नागरिकांच्या समस्येवर आवाज उठविला. मराठा आरक्षण आंदोलनात जिल्ह्यात सभा घेऊन जनजागृती केली. अंबाबाई मूर्तीसंदर्भात तज्ज्ञांची व्याख्यानमाला, राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळ उभारणीची मागणी, शाहू महोत्सव, शिवराज्याभिषेक सोहळा, शाहू जन्मस्थळासाठी पाठपुरावा केला. सीपीआरमधील समस्येवर आंदोलन करून प्रशासनाला सुधारणा करण्यास भाग पाडले. गेली २० वर्षे कार्यरत असलेल्या मुळीक यांनी निवडणूक लढवावी.'

इतिहास संशोधक इंद्रजित सावंत म्हणाले, 'कोल्हापूर पुरोगामी नगरी असून गेली २० वर्षे कोल्हापुरात प्रतिगामी पक्षाचे उमेदवार निवडून येतात. विधानसभेत शाहू महाराजांच्या विचारावर श्रद्धा ठेवणारा आणि सामान्य कार्यकर्त्याला संधी मिळावी, यासाठी मुळीक यांनी निवडणूक लढवावी. काँग्रेस राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी दिली तर ठीक अन्यथा अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी.'

बबनराव रानगे म्हणाले, 'काँग्रेसने मुळीक यांना उमेदवारी द्यावी. सर्व जाती धर्मांची मोट बांधल्याने त्यांना १२ बलुतेदार आणि अलुतेदारांचा पाठिंबा मिळेल.'

कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यावर वसंतराव मुळीक म्हणाले, 'निवडणूक हे माझे कधीच ध्येय नव्हते. गेली २० वर्षे मराठा समाजाला न्याय देण्यासाठी लढा देताना सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन काम केले आहे. सामाजिक कार्य करताना राजर्षी शाहू महाराजांच्या विचारावर श्रद्धा ठेऊन निरपेक्ष भावनेने काम केले. कार्यकर्त्यांच्या आग्रहानुसार मी निवडणूक लढवणार आहे. राजर्षी शाहू महाराजांचा विचार विधानसभेत पोहोचविण्यासाठी आणि कोल्हापूरच्या विकासासाठी माझी उमेदवारी राहील.'

यावेळी दीपक रावळ, एकनाथ जगदाळे, संदीप देसाई, आनंद म्हाळुंगेकर, भाऊसाहेब काळे, राजू पोवार, अनिल पाटील, अमरसिंह पाटील, उमेश पोवार, यांची भाषणे झाली. यावेळी राजू पोवार, किसन लोहार, फिरोजखान उस्ताद, अशोक माळी, उत्तम कांबळे, अमरसिंह रजपूत आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पारंपरिक वाद्यांचा ‘आवाज’

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

गुरुवारी होणाऱ्या अनंत चतुर्दशी निमित्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये पारंपरिक वाद्यांचा निनाद निघणार आहे. उत्सवावर महापुराचे सावट दिसून आल्याने बहुतांशी मंडळांनी साउंड सिस्टिमला फाटा देण्याचा निर्णय घेतला आहे. ढोल-ताशे, झांज पथके, लेझिम पथके या पारंपरिक वाद्यांसह मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके मिरवणुकीमध्ये दिसून येणार आहेत. मिरवणूक साध्या पद्धतीने काढण्याचा निर्धार मंडळांनी केला आहे.

ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुराची गडद छाया सार्वजनिक गणेशोत्सवावर दिसून आली. अनेक मंडळांनी उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करताना उत्सवासाठी होणारा खर्च पूरग्रस्तांना मदत म्हणून वितरित केला. परिणामी सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुकीपूर्वी सादर होणारे देखावे कमी झाले. अनेक ठिकाणी आकर्षक मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. आता सर्वांना बाप्पांना निरोप देण्याचे वेध लागले आहेत.

मात्र, दरवर्षीप्रमाणे मिरवणुकीचा लवाजमा दिसून येत नाही. दरवर्षी लेटेस्ट तरुण मंडळ, पाटाकडील तालीम मंडळ, तटाकडील मंडळ, वेताळमाळ, हिंदवी तरुण मंडळ, दयावान ग्रुप, सुबराव गवळी तालीम मंडळ, शिवराज फ्रेंड सर्कल, बजापराव माने तालीम मंडळ, माजगावकर तालीम मंडळ, दिलबहार तालीम मंडळ, फिरंगाई तालीम मंडळ अशा बड्या मंडळांची मिरवणूक हे एक वैशिष्ट्य असते. या मंडळांनी मिरवणुकीत वेगळी ओळख निर्माण केली आहे. या मंडळासह इतर मंडळांनी मिरवणूक साधेपणाने काढण्याचा निर्णय घेतला आहे. दिलबहार तालीम मंडळाने पर्यायी मार्ग वापरून टाळ्यांच्या गजरात गणपती बाप्पाला निरोप देणार असल्याचे जाहीर केले आहे. पारंपरिक वाद्यांचा सर्रास वापर केला जाणार आहे. ढोल-ताशे, झांजपथके, लेझिम पथकांचे यापूर्वीच बुकिंग झाले आहे. काही मंडळांनी मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांचेही आयोजन केले आहे. मुख्यत्त्वे साउंड सिस्टिमला फाटा देण्याचा निर्धार आहे. यंदाच्या मिरवणुकीत महिलाही मोठ्या संख्येने सहभागी होतील अशी शक्यता आहे.

प्रमुख मंडळांचे आकर्षण

सुबराव गवळी तालीम, प्रॅक्टिस फुटबॉल क्लब : सहकुटुंब सहभाग, लेझिम पथक, पारंपरिक वाद्य

फिरंगाई तालीम मंडळ : भगवे फेटे परिधान करुन दोन हजार महिला व पुरुष सहभागी

हिंदवी तरुण मंडळ : १५० मुलामुलींचे ढोलपथक

पाटाकडील तालीम मंडळ : ६४ जणांचे नाशिक ढोलपथक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विसर्जनासाठी सज्जता

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

पंचगंगा नदीला दुसऱ्यांदा आलेल्या पुरामुळे घाटावर विसर्जनास अडथळा निर्माण होणार असल्याने सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्ती विसर्जनासाठी महापालिका प्रशासनाने इराणी खण येथे व्यवस्था केली आहे. तराफे, रेस्क्यू बोट, क्रेन, मोबाइल टॉयलेट व अँब्युलन्सची सोय येथे केली आहे. महापालिकेच्यावतीने पवडी, आरोग्य, विद्युत व अग्निशमन विभागाचे सुमारे ५०० अधिकारी, कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहेत. इराणी खणीसह राजाराम तलाव, राजाराम बंधारा येथे मूर्ती विसर्जन करण्याचे आवाहन मंडळांना करण्यात आले आहे. अनंत चतुर्दशीदिवशी, गुरूवारी (ता. १२) सकाळी नऊ वाजता मानाच्या गणपतीने मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.

महापालिका प्रशासनाने मिरवणूक मार्गावरील खड्डे मुजविण्यास सुरुवात केली असून बुधवारपर्यंत हे काम सुरू राहील. पुरामुळे मोठ्या मूर्तींच्या विसर्जनासाठी इराणी खण, राजाराम तलाव, राजाराम बंधारा येथे विसर्दनाची सुविधा निर्माण केली आहे. इराणी खणीत तीन, पंचगंगा नदी घाटावर दोन, राजाराम बंधारा आणि राजाराम तलावावर प्रत्येकी एका तराफ्याची सोय केली आहे. क्रेन व जेसीबी यंत्रणा कार्यन्वित ठेवण्यात येणार आहे. विसर्जनस्थळी अँम्ब्युलन्स, मोबाइल टॉयलेट, पिण्याच्या पाण्याचे टँकर ठेवण्यात येणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन दलाचे स्वतंत्र पथक रेस्क्यू बोटीसह तैनात ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर व्हाइट आर्मीचे जवान रेस्क्यू बोटीसह विसर्जन मिरवणुकीदरम्यान कार्यरत राहतील.

२४ तासांत मिरवणूक

संपविण्याचे आवाहन

दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची विसर्जन मिरवणूक २४ तासांत संपविण्याचे आव्हान प्रशासनावर असते. साउंड सिस्टिम, डान्स पथके आणि पारंपरिक वाद्यांच्या पथकांमुळे नेहमीच मिरवणूक रेंगाळते. यावर्षी बहूतांश मंडळांनी साउंड सिस्टिमचा वापर न करण्याचा निर्धार केला असला, तरी नदीघाटावरील पुरामुळे मूर्ती विसर्जनात अडथळा निर्माण झाला आहे. तराफ्याची सोय केली असली, तरी लांबवर जाऊन मूर्ती विसर्जित करावी लागणार असल्याने वेळ लागण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुपयाचा कडिपत्ता, पालकमंत्री बेपत्ता

0
0

फोटो...अमित गद्रे

कोल्हापूर टाइम्स टीम

निश्चित मानधनची मागणी करत 'आशा' वर्कर्स व गटप्रवर्तकांनी मंगळवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. शेकडो महिला संभाजीनगर बसस्थानक परिसरातून मोर्चाने पालकमंत्र्यांच्या निवासस्थाकडे निघताच पोलिसांनी त्यांना अडविले. 'एक रुपयाचा कडिपत्ता, पालकमंत्री बेपत्ता, आश्वासन नको निर्णय हवा, लय लय लय अत्याचार, लय लय लय भ्रष्टाचार' अशा घोषणा देत आंदोलकांनी बसस्थानकाच्या आवारात ठिय्या मारला. दरम्यान, पालकमंत्री पाटील यांनी मोबाइलवरुन संघटनेच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. 'आशा कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीबाबत सरकार सकारात्मक आहे. बुधवारी (ता. ११) दुपारी बारा वाजेपर्यंत योग्य तो निर्णय घेऊ' अशी ग्वाही दिली. तर 'सरकारने मानधनवाढीची घोषणा केल्यास विजयोत्सव, सकारात्मक निर्णय न झाल्यास बुधवारी पुन्हा जिल्हा परिषदेसमोर आंदोलन' असा निर्धार आंदोलकांनी केला. दरम्यान, आंदोलकांना पालकमंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी, टिकास्र सोडणारी भाषणे यामुळे जवळपास दोन तास आंदोलन चालले. प्रचंड बंदोबस्तामुळे परिसराला पोलिस छावणीचे स्वरुप आले होते.

'आशा' कर्मचाऱ्यांना दहा हजार आणि गटप्रवर्तकांना १५ हजार रुपये मानधन मिळावे यासाठी राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. मंगळवारी दुपारी बारा वाजता पालकमंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढण्यासाठी विविध भागातील आशा कर्मचारी संभाजीनगर बसस्थानक परिसर जमल्या. यावेळी कॉम्रेड चंद्रकांत यादव, प्रा. सुभाष जाधव, भरमा कांबळे, शिवाजी मगदूम, संघटनेच्या जिल्हाध्यक्षा नेत्रदीपा पाटील यांची भाषणे झाली.

दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शेकडो महिला मोर्चाने पालकमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे निघाल्या. त्या बसस्थानकातून बाहेर पडण्याआधीच पोलिसांनी मोर्चा अडविला. महिला पोलिसांनी आंदोलकांभोवती कडे केले. महिला आंदोलकांनी जोरदार घोषणेबाजी करत सरकारवरचा रोष व्यक्त केला. दरम्यान, पालकमंत्री पाटील यांचे प्रतिनिधी म्हणून भाजप महानगरचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे आंदोलनस्थळी दाखल झाले. चिकोडे यांनी संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. पालकमंत्री पाटील यांच्यासोबत मोबाइलवरून संपर्क साधला. कॉम्रेड यादव यांनी पालकमंत्र्यांना कर्मचाऱ्यांच्या मागण्याची माहिती दिली. यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, 'आशा कर्मचाऱ्यांच्या मानधनप्रश्नी सरकार सकारात्मक आहे. बुधवारी दुपारपर्यंत मानधनवाढीचा योग्य निर्णय होईल.' संघटनेचे पदाधिकारी व चिकोडे यांनी याची माहिती कर्मचाऱ्यांना दिली. तेव्हाही कर्मचाऱ्यांनी 'आश्वासन नको, निर्णय हवा' अशा घोषणा दिल्या.

शंभरहून अधिक पोलिस बंदोबस्तासाठी

'आशा' कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त लावला होता. १०० हून अधिक पोलिस, दहाहून अधिक व्हॅन येथे होत्या. संभाजीनगर पेट्रोल पंप चौक, बसस्थानक परिसर, नाळे कॉलनी येथील पालकमंत्र्यांचे निवासस्थान येथे कडक बंदोबस्त होता.

आशा कर्मचारी, लसीकरणसह आरोग्य सेवेविषयक ७३ प्रकारची कामे करतात. मानधन वाढीसाठी आंदोलन आहे. मात्र पालकमंत्र्यांनी आंदोलनाची दखल घेतली नाही. आम्हाला सन्मानजनक मानधन मिळावे, सरकारी सेवेत सामावून घ्यावे अशी अपेक्षा आहे.

- नेत्रदीपा पाटील, जिल्हाध्यक्षा, आशा वर्कर्स

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

३६ टन निर्माल्य जमा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्यावतीने महास्वच्छता अभियानांतर्गत रविवारी गणपती विसर्जन केलेल्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. केएमसी, डी. डी. शिंदे व राजर्षी छत्रपती शाहू कृषी महाविद्यालयाच्या एनएनएसच्या तब्बल ८५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विविध ठिकाणांहून ३६ टन निर्माल्य व प्लास्टिक संकलित करण्यात आले. सकाळी पावसाची संततधार सुरू असताना स्वच्छता मोहिमेला विद्यार्थी व स्वंयसेवी संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शनिवारी घरगुती गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी महापालिकेच्या वतीने पारंपरिक पाणवठ्यांसह विविध ठिकाणी कृत्रिम कुंडांची व्यवस्था करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी मूर्तिदान व निर्माल्यदान उपक्रमात व्यस्त होते. सकाळी पुन्हा सर्व अधिकारी, कर्मचारी विद्यार्थ्यांसह स्वच्छता मोहिमेत सहभागी होते. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या उपस्थितीत स्वच्छतेला सुरुवात झाली.

विशेषत: घरगुती गणपती विसर्जन केलेल्या ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. विविध कॉलेजच्या एनएनएसचे विद्यार्थी व महापालिका कर्मचाऱ्यांनी ३६ टन निर्माल्य गोळा केले. दसरा चौक, पंचगंगा नदी गायकवाड पुतळा, राजाराम बंधारा, कसबा बावडा दत्त मंदीर, प्रायव्हेट हायस्कूल, स्वामी समर्थ मंदिर, नारायणदास मठ, कोटीतीर्थ, राजाराम तलाव, सायबर चौक व राजाराम गार्डन, नर्सरी उद्यान रुईकर कॉलनी, बापट कँप नदी परिसर, मसुटे मळा, महावीर गार्डन, रंकाळा, तांबट कमान, इराणी खण परिसरात स्वच्छता केली. स्वच्छतेनंतर येथे तातडीने धूर व औषध फवारणी करण्यात आली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, सहायक आयुक्त संजय सरनाईक, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, पर्यावरण अभियंता समीर व्याघ्रांबरे यांनी नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहिले. शाखा अभियंता आर. के. पाटील, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, विभागीय आरोग्य निरिक्षक राहुल राजगोळकर, निखिल पाडळकर, आर्किटेक्ट अँड इंजिनीअर असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराण, डी. डी. शिंदे सरकार कॉलेजचे प्राचार्य पी. आर. शेवाळे आदी उपस्थित होते.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे४३ ट्रक साहित्य वाटप

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्या आवाहनानुसार पक्षातर्फे पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्य, कपडे वाटप करण्यात आले. पक्षातर्फे, आतापर्यंत ट्रक आणि टेंपो मिळून ४३ वाहने भरुन साहित्य जिल्ह्यातील पूरग्रस्तांना वाटप केले. पक्षातर्फे साहित्य वाटपाची जबाबदारी जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांच्यावर सोपवली. त्यांच्यासह कुटुंबीय मदतकार्यात सक्रिय होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विविध भागातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून मदत करण्यात आली. त्यामध्ये जीवनावश्यक वस्तू, कपडे व इतर साहित्य मोठ्या प्रमाणात आहे. पक्षातर्फे, जमा होणारे साहित्य वाटपाची जबाबदारी साळोखे यांच्यावर सोपवली. जमलेल्या साहित्याची वर्गवारी, कीट्स बनविणे यासाठी पक्षाचे निवडक कार्यकर्ते आणि साळोखे कुटुंबीयांनी काम केले. त्यांच्या पत्नी शशिकला, मुले निलेश, निलिमा, गायत्री, भाऊ सुनील आदींनी नियोजन केले. जमलेले साहित्य पॅकिंग करून कार्यकर्त्यांमार्फत पूरग्रस्त भागात पोहोच केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्लास्टिक विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बंदी आदेश झुगारून महापालिका हद्दीत प्लास्टिक विक्री व साठवणूक केल्याप्रकरणी मंगळवारी महापालिकेने सहा दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली. प्रत्येकी पाच हजारांचा दंड करत आरोग्य विभागाच्या पथकाने त्यांच्याकडून प्लास्टिक जप्त केले. बाजार गेट, संभाजीनगर, लक्ष्मीपुरी परिसरात कारवाई करताना ३० हजाराचा दंड वसूल केला.

राज्य सरकारने जून २०१८ रोजी राज्यात प्लास्टिक व थर्माकोलवर बंदी केली आहे. प्लास्टिक उत्पादन व विक्रीवर बंदी असताना अनेक शहरामध्ये खुलेआम प्लास्टिकची विक्री केली जात आहे. तसेच अनेकठिकाणी उत्पादनही घेतले जात आहे. गणेशोत्सवापूर्वी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने ठिकठिकाणी दंडात्मक कारवाई केली होती. तसेच सजावटीसाठी पर्यायी वस्तूचा वापर करण्याचे आवाहन केले होते. मात्र तरीही प्लास्टिकची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पथकाने दंडात्मक कारवाई केली. मदन चौधरी संभाजीनगर, समीर गुबळे, विजय वादवानी बाजारगेट, स्पाईस व चायना डाइन या दुकान मालकांना प्रत्येकी पाच हजाराचा दंड केला. आरोग्य निरीक्षक निखिल पाडळकर, मुनीर फरास, सुशांत कावडे, स्वप्निल उलपे, सुशांत शेवाळे, विनोद नाईक, सौरभ घावरी, शुभांगी पवार, शिवाजी शिंदे, नंदकुमार पाटील पथकाने कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंबुखडीजवळ पाइपलाइनला गळती

0
0

कोल्हापूर: शहरा पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला चंबुखडी येथील मातोश्री वृद्धाश्रमाजवळ गळती लागली आहे. सोमवारपासून जलवाहिनीतून हजारो लिटर पाणी रस्त्यावरुन वाहत आहे. मात्र याकडे महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले असल्याने अद्यापही दुरुस्ती झालेली नाही. चंबुखडी परिसरातील गणेश कॉलनी ते म्हसोबा मंदिर दरम्यान पाण्याची टाकी आहे. टाकीमध्ये पाणी साठवण्यासाठी जमिनीखालून पाइपलाइन टाकली आहे. सोमवारी सकाळी पाइपला गळती सुरू झाली. रस्त्यावरुन पाण्याचे लोट वाहत असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला दिली. पण मंगळवारी सायंकाळपर्यंत गळती दूर न झाल्याने हाजारो लिटर पाणी वाहून जात होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जि.प.ची आज सभा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा बुधवारी (ता.११) होत आहे. चुकीच्या पद्धतीने वॉटर एटीएम मशिन्सची खरेदी, शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या बदल्या, कर्मचाऱ्यांची उद्धट वर्तणूक अशा विविध विषयांवरून सभा गाजण्याची चिन्हे आहेत. माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी दोन दिवसांपूर्वी वॉटर एटीएम मशिन्सची खरेदी प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने झाल्याचा आरोप केला आहे. त्यांनी या प्रकरणी जि.प.तील कारभाऱ्यांवर निशाणा साधला. सभेत विरोधी सदस्य हा विषय मांडणार आहेत. यावरून सत्ताधारी भाजप आघाडी आणि विरोधी काँग्रेस आघाडी आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वंचित आघाडी २८८ जागा लढविणार

0
0

कराड :

'विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसबरोबर आघाडी आघाडीची बोलणी सुरू होती. २८८ पैकी १४४ जागेचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला होता. मात्र, काँग्रेस नेत्यांच्या मागे चौकशीचे सत्र सुरू असल्याने त्यांनी आमच्या प्रस्तावावर उत्तर दिले नाही. त्यामुळे वंचित आघाडीच्या बैठकीत काँग्रेस सोबत न जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वंचित आघाडी विधानसभेच्या सर्व २८८ जागा लढविणार आहे,' अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी कराड येथे पत्रकार परिषदेत दिली.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, 'जे आपल्या सोबत येणार नाहीत किंवा सरकार विरोधात बोलतील त्यांच्यामागे भाजप सरकारने चौकशी लावली आहे. केंद्रात बहुमत असल्याने सर्व तपास यंत्रणेमार्फत विरोधकांवर चौकशीची टांगती तलवार आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीमधील नेते पक्षांतर करीत आहेत. नेत्यांना समाजाच्या स्वातंत्र्यापेक्षा व्यक्ती स्वातंत्र्य टिकवायचे आहे.'

.........

आनंदराव पाटील भाजपच्या वाटेवर

कराड :

'युवक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून सुरुवात करून १९७८पासून मी सातारा जिल्ह्यात पक्ष बांधणीचे काम प्रामाणिकपणे केले. बदल्यात पक्षानेही मला भरपूर काही दिले आहे. परंतु, गेल्या दीड-दोन वर्षांपासून काँग्रेसमधीलच काही लोकांना मी नकोसा झालो आहे. मला संघटनेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे,' असा आरोप आमदार आनंदराव पाटील यांनी केला.

पाटील काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, अशी चर्चा सुरू आहे. या बाबत बोलताना पाटील म्हणाले, 'प्रेमलाताई चव्हाण यांच्या काळापासून मी काँग्रेससोबत आहे. माझ्या नेतृत्वाखाली काँग्रेसने कराड नगरपालिका तसेच पंचायत समितीमध्ये विजय मिळवले होते. परंतु सध्या माझ्यामुळे पक्षाचे नुकसान होत आहे, अशी माहिती वरिष्ठ नेत्यांना दिली जात आहे. तरीही मी माझी नाराजी व्यक्त केली नव्हती. या सर्व गोष्टींचा विचार करून आगामी राजकीय वाटचालीची दिशा ठरवण्यासाठी शुक्रवारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्यात कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील दिशा ठरविणार आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सवास १९ पासून प्रारंभ

0
0

किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट

महोत्सवास १९ पासून प्रारंभ

सोलापूर :

अकराव्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास १९ सप्टेंबरपासून प्रारंभ होणार असून, २२ सप्टेंबर रोजी या महोत्सवाचा समारोप केला जाणार असल्याची माहिती वसुंधरा उत्सव समितीचे सदस्य तथा किर्लोस्कर कंपनीचे मनुष्यबळ व्यवस्थापक ऋषिकेश कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यंदा 'प्लास्टिकला नकार वसुंधरेला होकार' ही या महोत्सवाची थिम असून, १९ रोजी सकाळी दहा वाजता डब्ल्यूआयटी महाविद्यालयात यून कॉन्फरन्स-अल्टरनेट टू प्लास्टिक-पीपीटी कॉम्पिटिशन परिसंवाद वीरेंद्र चित्राव यांच्या उपस्थितीत होणार आहे. याच दिवशी दुपारी अडीच वाजता सोलापूर विद्यापीठ येथे महोत्सवाचे उद्घाटन होणार असून, या प्रसंगी विनोद बोधनकर यांचे व्याख्यान व पर्यावरण लघु चित्रपट, बक्षीस वितरण समारंभ व वसुंधरा सन्मान पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images