Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

दसरा, दिवाळीपर्यंत शेअर बाजार ‘जैसे थे’

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जगभरातील आर्थिक मंदीचे परिणाम भारतातही जाणवू लागले असून, गेल्या दीड महिन्यात शेअर बाजारात घसरण सुरू आहे. सातत्याने होत असलेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. बँकांचे विलीनीकरण, व्याजदरात कपात, रिझर्व्ह बँकेने सरकारकडे एक लाख ७० हजार रुपयांचा निधी वर्ग केला असला तरी बाजारपेठेत अनिश्चिततेचे चित्र कायम राहणार असून, दसरा-दिवाळीतही शेअर बाजाराची स्थिती चढ-उताराची राहण्याची शक्यता तज्ज्ञ, शेअर ब्रोकर, संस्थांकडून वर्तवली जात आहे.

अर्थव्यवस्थेला गती देण्यााठी मोठ्या उपायोजनांची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली होती. रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला एक लाख ७० हजार कोटी रुपयांचा निधी दिला आहे. तसेच प्रमुख राष्ट्रीयीकृत बँकांचे विलीनीकरण सुरू आहे. रिझर्व्ह बँकेने व्याजदर कपात केली आहे. गेल्या वर्षभरात बँकांना ७१ हजार ५४२ कोटी रुपयांचा गंडा बसला आहे, पण जीडीपीचा दर सहा टक्क्यांवर आल्याने उद्योगजगतात चिंता व्यक्त केली जात आहे. जीएसटीपासून उत्पन्नही कमी मिळाले आहे. त्याचा परिणाम शेअरबाजारावर होऊ लागला आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेबरोबर जगभरातील आंतरराष्ट्रीय राजकारणाचे पडसादही अर्थव्यवस्थेवर पडले आहेत. अमेरिका आणि चीन यांच्यातील ट्रेड वॉर, अमेरिका- इराक संबंधांमुळे जगभरातील शेअर बाजारावर परिणाम होतो. त्याचे पडसादही शेअर बाजारावर पडले आहेत. तरीही केंद्र सरकारकडून तातडीने उपाययोजना सुरू असल्या तरी दसरा, दिवाळीतही सद्य:स्थिती कायम राहणार असून सोन्याच्या दरातही चांगली वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

शेअर बाजारात चढ-उतार होणार असून सोन्याला सोन्यासारखा दर मिळणार आहे. ऑगस्ट २०२० पर्यंत मंदीची स्थिती कायम राहणार आहे. शेअर बाजाराने उचल खावी यासाठी सरकारकडून सकारात्मक प्रयत्न सुरू आहेत. बँक विलीनीकरणाच्या निर्णयामुळे बँकांची ताकद वाढणार आहे. रिझर्व्ह बँकेकडील राखीव एक लाख ७० हजार कोटी रुपयांचा निधी सरकारला मिळाल्याने हा पैसा परत व्यवहारात येणार आहे. तरीही केंद्र सरकारने शेतीला प्राधान्य द्यायला हवे. तसेच रोजगारवाढीवर विशेष लक्ष द्यावे. शेअरबाजारातील चढ-उताराची सद्य:स्थिती दसरा, दिवाळीपर्यंत राहणार आहे. हा काळ गुंतवणूकदारांचा कसोटीचा ठरणार आहे.

डॉ. विजय ककडे


आंतरराष्ट्रीय पातळीवरील अमेरिका-चीन ट्रेड वॉरचे परिणाम शेअरबाजारावर पडत आहेत. शेअरबाजार कोसळल्याने सोन्याचे दर वाढले. सर्वच देश सोन्यामध्ये गुंतवणूक करत असल्याने शेअरबाजारावर परिणाम होत आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारकडून उद्योगजगतावर लावलेले निर्बंध हळहळू कमी करण्यात येत आहेत. त्याचा परिणाम बाजारावर दिसत आहे. ऑटो सेक्टरला काही प्रमाणात सूट दिली असून, रिझर्व्ह बँकेकडून मिळालेला एक लाख ७० हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे बँका सक्षम होणार असून, उद्योगजगताला वित्तीय पुरवठा होणार आहे. त्यामुळे बाजारपेठ दिवाळीनंतर डिसेंबरपर्यंत सुरळीत होईल.

राजेंद्र शहा, अध्यक्ष, इन्व्हेस्टर असोसिएशन


शेअर मार्केट कोसळल्याने सोन्याचा दर वाढला आहे. सोन्याचे दर जोपर्यंत खाली येत नाहीत तोपर्यंत बाजारपेठ वर येणार नाही. आंतरराष्ट्रीय राजकारणाचे पडसाद उमटू लागल्याने सर्वच देशांत सोन्याची खरेदी सुरू आहे. शेअरबाजार खाली आला असला तरी तो कधी वर जाईल हे सांगता येत नाही. त्यामुळे शेअरबाजाराचा अभ्यास करून गुंतवणूक करावी. म्युचुअल फंडातील गुंतवणूक दीर्घकाळ असल्याने सध्याच्या बाजाराचा त्यावर काहीच परिणाम होणार नाही. दसरा, दिवाळीपर्यंत ही स्थिती राहणार आहे. त्यानंतर मार्केट पुन्हा उभारी घेईल.

मनीष झंवर, संचालक, इन्व्हेस्टर असोसिएशन


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुन्हा महापुराची धास्ती

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

गेले आठवडाभर पावसाने झोडपून काढल्याने पंचगंगा नदीच्या वाढत असलेल्या पाण्याची धास्ती नागरिकांनी घेतली आहे. शहरातील ज्या भागात पुराचे पाणी पहिल्या टप्प्यात घुसते, अशा ठिकाणच्या नागरिकांना घराबाहेर पडण्याच्या सूचना महानगरपालिकेने केल्या आहेत. तसेच पूरग्रस्तांना स्थलांतरीत करण्याची ठिकाणे सज्ज केली आहेत. शहरालगतच्या प्रयाग चिखली गावातील निम्मे नागरिक घराबाहेर पडले असून रविवारी जनावरेही सुरक्षितस्थळी हलविण्यात आली. महिनाभरात दुसऱ्यांदा पुराच्या शक्यतेने नागरिक भयभीत आहेत. आधीच्या महापुराने बसलेल्या फटक्यामुळे पूरग्रस्त भागातील नागरिक कोणताही धोका पत्करण्याच्या मन:स्थितीत नाहीत. शहरातही अनेक भागातील नागरिकांनी साहित्य, वाहने सुरक्षित ठेवण्याची तयारी केली आहे.

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पुराच्या वाढलेल्या पाण्यामुळे नागरिकांना अनेक किमती प्रापंचिक साहित्य, वाहने हलवता आली नाहीत. त्या पुराच्या फटक्यातून नागरिक अजूनही सावरलेले नसताना पुराचे पाणी दुसऱ्यांदा येण्यास सुरुवात झाल्याने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. शहरामध्ये शुक्रवार पेठ परिसरातील जामदार क्लब व करवीर मठाकडे जाणाऱ्या रस्त्याबरोबरच सुतारवाडा, सिता कॉलनी, कदमवाडी ते भोसलेवाडी रस्त्याजवळील नागरी वस्तीत प्रथम पाणी शिरते. सध्या पुराचे पाणी हळूहळू वाढत आहे.

जयंती नाल्यातील पुराचे पाणी पसरण्यास सुरुवात झाली असून सुतारवाड्याजवळ लागले आहे. त्यामुळे तेथील नागरिकांनी धास्तीने साहित्याची आवराआवर सुरू केली आहे. शनिवारी रात्रीपासून कोसळणारा पाऊस, राधानगरीसह सर्व धरणातून होत असलेला विसर्ग यामुळे महापालिका यंत्रणा आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी रविवारी सकाळपासून कामाला लावली आहे.

महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकांनी पूर येणाऱ्या भागात जाऊन तेथील नागरिकांना पंचगंगा नदीच्या पुराने इशारा पातळी ओलांडल्यास तातडीने बाहेर पडण्याची सूचना केली आहे. रविवारी सकाळी पुराची पातळी इशारा पातळीपासून अजून अर्धा फूट खाली होती. रविवारी रात्री स्थलांतरीत होण्यापेक्षा त्यापूर्वीच बाहेर पडण्यासाठी नागरिकांना साहित्य आवरुन ठेवण्यास सांगितले आहे. सुतारवाड्यातील नागरिकांना चित्रदुर्ग मठ व मुस्लिम बोर्डिंगच्या हॉलमध्ये स्थलांतरीत केले जाते. त्यासाठी आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी स्वत: संपर्क साधून ते उपलब्ध करुन देण्यास सांगितले आहे. याशिवाय सिता कॉलनी व शाहूपुरी कुंभार गल्लीतही पाणी शिरते. कुंभार गल्लीत जाऊन अग्निशमन दलाच्या जवानांनी तेथील कुटुंबांना सूचना दिल्या आहेत.

नागाळा पार्क, रमणमळा, कदमवाडीतही धास्ती

शहरातील नागाळा पार्क, रमणमळा, पोलो मैदान, जाधववाडी, भोसलेवाडी परिसरातील नागरिकांनीही पुराच्या पाण्याकडे लक्ष ठेवले आहे. पाऊस किती आहे, पाणी वाढण्याचा वेग किती आहे याचा अंदाज घेऊन रात्रीमध्ये अचानक पाणी वाढले तर धोका नको म्हणून अनेकांनी वाहने सुरक्षितस्थळी हलवली आहेत. तसेच जिथे पाणी जास्त प्रमाणात आले होते, तेथील नागरिकांनी आत्ताच काही साहित्य पहिल्या मजल्यावर नेऊन ठेवण्यास सुरुवात केली आहे. कुंभार गल्लीतील व्यावसायिकांनी जे साहित वाचवता येण्यासारखे आहे ते सुरक्षितस्थळी हलवले आहे. त्यामुळे पुराचा फटका बसलेल्या भागातील नागरिकांचा रविवारचा दिवस तयारीत व पाण्याच्या पातळीकडे लक्ष देण्यात गेला.

चिखलीत रस्त्यावर पाणी

प्रयाग चिखली, आंबेवाडीला बसलेल्या फटक्यामुळे ग्रामस्थ सतर्क झाले आहेत. चिखलीहून पन्हाळ्याकडे जाणाऱ्या एका अंतर्गत रस्त्यावर पाणी आले आहे. मुख्य रस्त्यावर व घरांपर्यंत पोहचण्यास अजून चार ते पाच फूट पातळी वाढण्याची गरज आहे. तरीही शनिवारपासूनच अनेकजण नातेवाईकांकडे तसेच सोनतळी परिसरात स्थलांतरीत होत आहेत. जनावरेही हलवण्यात येत असून रविवारी सकाळपासून वाहने आणून त्यातून जनावरांना बाहेर काढण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चित्रप्रदर्शनाचे दालन खुले

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतनिधी उभारण्यासाठी कोल्हापूर आर्ट फाउंडेशन व कोल्हापूर चित्रकार ग्रुप यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या रंग भावनांचे या अनोख्या चित्रप्रदर्शनाला रविवारपासून प्रारंभ झाला. महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते व फाउंडेशनचे अध्यक्ष सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचे उदघाटन झाले. पहिल्या एका तासात २० कलाकृतींची खरेदी करत रसिकांनी कलाकार व पूरग्रस्त यांच्यातील मदतीचा पूल जोडण्यासाठी हातभार लावला. दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवनाच्या कलादालनात ११ सप्टेंबरपर्यंत प्रदर्शन खुले राहणार आहे.

'ओतूनी रंग भावनांचे... चला बदलूया चित्र कोल्हापूरचे' असे म्हणत कोल्हापुरातील चित्रकारांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला आहे. प्रदर्शनातून मिळणारा निधी कोल्हापुरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात पूरपरिस्थिती दाखवणारे कोल्हापूर, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुराचे थैमान, उध्वस्त झालेले संसार, पूररेषा व विकास अशा संकल्पनांवर चित्रे रेखाटली आहेत.

आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, 'नैसर्गिक आपत्तीमध्ये प्रशासन आणि लोकसहभाग यांची योग्य सांगड झाली तर संकटातून मार्ग काढता येतो याची प्रचिती ऑगस्टमध्ये आलेल्या महापुरात आली. गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पावसाने जोर धरला आहे. पुराचा धोका आहे. यंत्रणा सज्ज ठेवणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे, पण कोल्हापूरने दाखवलेली माणुसकी अत्यंत महत्त्वाची आहे. कोल्हापुरातील कलाकारांनी आपल्या कलेचे योगदान पूरग्रस्तांसाठी देऊन नवा आदर्श निर्माण केला आहे. समाजातील दु:खाने जो कलाकार अस्वस्थ होतो तो खरा कलाकार असतो. या प्रदर्शनाच्या निमित्ताने एकत्र येत आपल्या रंगांना भावनांचा ओलावा देणाऱ्या चित्रकारांची मदत नक्कीच मोलाची आहे.'

प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी मंगेश शिंदे, संजीव संकपाळ, स्वप्नील पाटील, अतुल डाके, जगन्नाथ भोसले, सतीश घारगे, जयंती जाधव, नागेश हंकारे, वैशाली पाटील, प्रीतम चिवटे, राहुल सुतार, अनिल शिंदे, योगेश पाटील, डॉ. अल्पना चौगले, एस. निंबाळकर, मंगेश पाटील, प्रमोद खंजिरे, दीपक कांबळे, विलास बकरे यांच्या चित्रकृतींची विक्री झाली.

संजीव संकपाळ यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत जाधव, विजय टिपुगडे, अजेय दळवी, इनायत शिडवणकर, नागेश हंकारे, सुनील पंडित, अतुल डाके, शिवाजी मस्के, विलास बकरे, बबन माने, सतीश घारगे, स्वप्नील पाटील यांच्यासह कलाकार, चित्रप्रेमी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाज्या आवाक्यात

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारात फळभाज्या, पालेभाज्यासह फळांची मोठी आवक झाली आहे. भाज्यांचे दर आवाक्यात आली असून त्यांचा दर प्रतिकिलो ६० ते ८० रुपये इतका आहे. सफरचंदाची मोठी आवक झाली असून प्रतिकिलो १०० ते १८० रुपये दराने विक्री सुरु आहे. मोसंबी, डाळींबे, पेरू या फळांच्या खरेदीला ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत आहे.

गणेश चतुर्थीपासून दमदार पावसाच्या सरी पडत असतानाही भाजी मंडयांमध्ये ग्राहकांची गर्दी कायम आहे. कांद्याचा दर प्रतिकिलो ३० ते ४० रुपये आहे. कोबीचा दर प्रति गड्डा १० ते २० तर फ्लॉवरचा दर १५ ते ४० रुपये आहे. श्रावण घेवडा, भेंडी, वरणा, दोडका, मटाराचा दर प्रतिकिलो ६० ते ८० रुपये आहे. वाग्यांचा दर प्रतिकिलो ८० रुपयांवर स्थिर आहे. शेपू, मेथी आदी पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात असून प्रति पेंढी १० रुपयांनी विक्री झाली. भोपळी, चवळी आणि शेपूच्या पानांच्या भाजीचे ढीग दहा रुपयाला विकले गेले.

फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो रुपयांत)

वांगी : ६० ते ८०

टोमॅटो : १५ ते २०

भेंडी : ६० ते ८०

ढबू : ४०

गवार : ८०

दोडका : ६०

कारली : ६०

वरणा : ६० ते ८०

हिरवी मिरची : ४० ते ५०

फ्लॉवर : १५ ते ४० (प्रति गड्डा)

कोबी : १० ते २० (प्रति गड्डा)

बटाटा : २० ते २५

लसूण : ८० ते १००

कांदा : ३० ते ४०

आले : १०० ते १२०

पडवळ : १५ ते २० (प्रति नग)

मुळा : १२ ते १५ (प्रति नग)

पालेभाजी दर (पेंढी रुपयांत)

मेथी : १०

कांदा पात : १०

कोथिंबीर : १० ते २०

पालक : १०

शेपू :१०

फळांचे दर (प्रतिकिलो रुपयांत)

सफरंचद : १०० ते १८०

डाळिंब : ६० ते ८०

मोसंबी : ६०

केळी : ३० ते ६० (डझन)

जवारी केळी : २० ते ६० (डझन)

पेरु १० ते २० (नग)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरने जपला मूर्तिदानाचा वसा

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

गेल्या दोन दशकांपासून जल प्रदूषणाबाबत शहरवासियांमध्ये झालेल्या जनजागृतीची फलनिष्पत्ती शनिवारी झालेल्या घरगुती गणेश विसर्जनादरम्यान दिसून आली. शहरातील भाविकांनी प्रदूषण रोखण्याबाबत आपली सजगता दाखवत तब्बल ६७ हजार ५३५ गणेशमूर्ती दान केल्या. तर स्वयंसेवी संस्थांकडे १५० टन निर्माल्य जमा केले. मूर्ती आणि निर्माल्य दान उपक्रमाद्वारे शहरवासियांनी आपला पर्यावरण संवर्धनाचा लौकिक यंदाही कायम राखला.

जलप्रदूषणाला विविध घटक कारणीभूत असले, तरी केमिकलयुक्त रंग आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पाण्यात विसर्जन केल्याने प्रदूषणामध्ये वाढ असल्याचे निदर्शनास आले. परिणामी तलाव, नदीमध्ये मूर्ती व निर्माल्य विसर्जन करू नये, अशी धारणा तयार होऊ लागली. १९८२ मध्ये प्रथम रंकाळा संवर्धन चळवळ सुरू झाली. पण, त्याची व्याप्ती वाढू शकली नाही. १९९०च्या दशकापासून मात्र नागरिकांमध्ये जागृती निर्माण होऊ लागली. २००१पासून पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याकडे भाविकांचा कल वाढू लागला. पंचगंगा नदीसह रंकाळा, कळंबा, कोटितीर्थ, राजाराम या तलावांवर मूर्तिदान व निर्माल्यदान चळवळीला बळ मिळू लागले. महापालिका प्रशासन व सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन मूर्ती व निर्माल्य पाण्यामध्ये विसर्जित करु नये असे भाविकांना आवाहन केले. त्याला काही संस्थांनी विरोध केला. त्यामुळे वादाचेही प्रसंगही उद्भवले. पण भाविकांनी चळवळ आपल्या हातात घेऊन स्वयंस्फूर्तीने मूर्ती व निर्माल्यदान करण्यास सुरुवात केली.

कोल्हापुरात सुरू झालेल्या चळवळीने राज्यात लौकिक मिळवला. हा लौकिक कायम ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाने मूर्ती विसर्जनाची पर्यायी व्यवस्था केली होती. विसर्जनाच्या पारंपरिक ठिकाणांसह अन्य ठिकाणी कृत्रिम कुंडांची निर्मिती केली. पंचगंगा नदीला आलेल्या पुरामुळे महापालिका प्रशासनापुढे प्रश्न निर्माण झाला होता. पण प्रशासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था निर्माण केली. त्यामुळे नदी परिसरात मोठ्या प्रमाणात मूर्ती व निर्माल्य दान उपक्रमाला प्रतिसाद मिळाला. मूर्तिदान उपक्रमाबरोबर भाविकांना शाडूच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनालाही चांगला प्रतिसाद मिळाला.

शहरातील तब्बल १,५०० भाविकांनी शाडूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून या मूर्ती पुन्हा कुंभार बांधवांकडे सुपूर्द केल्या. ग्रामीण भागातील भाविकांनीही मोठ्या प्रमाणात मूर्तिदान उपक्रमात सहभाग घेतला. जिल्ह्यात साडेचार लाख भाविकांनी मूर्तिदान उपक्रमात सहभाग घेतल्याची नोंद झाली आहे. मूर्तिदान, निर्माल्यदान उपक्रमामध्ये जिल्ह्याने राज्यात आपला लौकिक निर्माण केला आहे. यावर्षीही उपक्रमात सहभाग घेऊन आपला लौकिक कायम राखला.

घरगुती गणपती विसर्जनादरम्यान निर्माल्य व मूर्तिदान उपक्रमाला शहरवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्यामधील सजगता दाखवून दिली. प्रबोधनाच्या माध्यमातून जनजागृती झाली. त्याची फलनिष्पत्ती दिसत आहे. प्रशासनासोबत अनेक संस्था, संघटना आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या आवाहनाला भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला.

- डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, आयुक्त

दृष्टिक्षेपात मूर्तिदान

कळंबा : ६,०००

कोटितीर्थ : ३,५००

पंचगंगा नदी : १९,१९७

राजाराम तलाव : २,०००

लक्षतीर्थ, गंगावेश : ६,९०४

पद्माराजे उद्यान, पतौडी घाट : २,८९७

संध्यामठ, तांबट कमान, रंकाळा टॉवर : १२,५२७

राजाराम बंधारा, सासने मैदान, महावीर कॉलेज, बापट कॅम्प : ६,८७४

एकूण : ६७,५३५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकसेवेसाठी तत्पर आम्ही

0
0

लोगो : सुखकर्ता

Maruti.Patil@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर : शहराच्या कोणत्याही विकासाच्या प्रश्नावर लढा देण्यासाठी येथे अनेक संस्था कार्यरत आहेत. राज्यातील कोणत्याही शहरापेक्षा आपल्या शहराचा पारदर्शकपणे विकास करण्यासाठी येथे लोकचळवळ क्षणात तयार होते. त्याचप्रमाणे वर्षभर निराधार लोकांना मदतीचा हात देण्यासाठी अनेक संस्था, व्यक्ती कार्यरत आहेत. 'लोकसेवेसाठी तत्पर आम्ही' या उक्तीप्रमाणे आपल्या संस्थेच्या माध्यमातून मदतीचा हात नेहमीच देत असतात. गरजू विद्यार्थी, निराधार महिला असो अथावा एखादा आरोग्यसेवेचा प्रश्न. सर्वांना मदत करण्यासाठी या संस्थांचा नेहमीच पुढाकार असतो. अशा संस्थांच्या कार्यामुळे निराधारांना आधार मिळतो. संस्थांच्या माध्यमातून त्यांच्या सुरू असलेल्या कार्याला अनेकांची मदत मिळते. ही मदत ते पारदर्शीपणे गरजू लोकांपर्यंत पोहोचवत असतात. अशा संस्थांनी राज्यभरात आपला लौकिक निर्माण केला आहे. नुकत्याच येऊन गेलेल्या महापुरामध्ये या संस्थांच्या कार्यकर्त्यांनी स्वत:ला झोकून देत मदतीचा हात दिला.

विद्यार्थ्यांना दिले जगण्याचे बळ

संकल्प फाउंडेशन : अक्षय शेळके

बालगोपाल तालीम परिसरात दररोज कट्ट्यावर बसणाऱ्या कॉलेज तरुणांनी संकल्प फाउंडेशनची स्थापना केली. फाउंडेशनची स्थापना करताना गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्याचा निर्धार केला. पहिल्याच वर्षी शिक्षकांच्या माध्यमातून २० विद्यार्थ्यांचा शोध घेतला. त्यांना पुस्तके वगळता सर्व शालेय साहित्याचे वाटप केले. सुमारे २५ हजार रुपयांचे साहित्य देताना पॉकेटमनीचा आधार घेत अनेकांना आवाहन केले. प्रथम फारसा प्रतिसाद मिळाला नाही. नंतर त्यांच्या कार्यावर विश्वास निर्माण झाल्यानंतर लोक त्यांच्याकडे मदत सुपूर्द करू लागले. गेल्या चार वर्षांपासून फाउंडेशनने दत्तक योजनेच्या माध्यमातून ८० मुलांना शालेय साहित्य वाटप केले आहे. फ्रेंडशीप डे, युवक दिन साजरा करताना फाउंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम चालवले जातात. पांजरपोळ येथील जनावरांना दरवर्षी चारा देणे हे फाउंडेशनचे वैशिष्ट्य राहिले आहे. २०१५ मध्ये राज्यात पडलेल्या दुष्काळादरम्यान फाउंडेशनच्या सर्वच कार्यकर्त्यांनी सांगली जिल्ह्यातील एका गावात पिण्याचे चार टँकर दिले होते.

आजीबाईंना मिळाला निवारा

संभाजी ब्रिगेड : रुपेश पाटील

संभाजी ब्रिगेडने नेहमीच आंदोलनांच्या माध्यमातून अनेकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी सरकारी यंत्रणेचा रोष पत्करला. पण न्याय मिळवून देण्यासाठी ब्रिगेड कधी मागे हटली नाही. केवळ न्याय देण्यापुरते कार्य सिमीत न ठेवता अनेकांच्या दु:खावर फुंकर घालण्याचे कामही त्यांनी केले. कागल येथील ७० वर्षीय सुशिला पवार यांचे घर आगीत भस्मसात झाले. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू असताना ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मदतीचा हात दिला. पवार यांच्या मागे अन्य कुटुंबीय नसताना त्यांना दहा बाय दहाची खोली बांधून देत संपूर्ण संसारपयोगी साहित्य व सहा महिनेल पुरेल एवढे धान्य दिले. अशीच स्थिती एका सामान्य कामगारावर ओढवली. त्यांची एटीएमद्वारे तब्बल ७८ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. फसवणुकीमुळे नैराश्यात गेलेल्या कामगाराला त्याचे पैसे मिळवून देण्यात ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. जिल्ह्यात महापुराच्या काळात विशेषत: शेतकऱ्यांना मदत देण्यास कार्यकर्त्यांनी अहोरात्र कष्ट घेतले.

जपला आरोग्य सेवेचा मंत्र

वंदेमातरम ऑर्गनायझेशन : अवधूत भाटे

दोन वर्षापूर्वी काही युवकांनी एकत्र येऊन वंदेमातरम ऑर्गनायझेशनची स्थापना केली. सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा देण्याचे महत्त्वपूर्ण काम हाती घेतले. आझाद गल्ली, राजाराम चौक येथे आरोग्य शिबिरे घेण्यास सुरुवात केली. रक्तदान शिबिराच्या माध्यमातून संकलीत झालेले रक्त गरजू लोकांपर्यंत पोहोवले जाते. रुग्णांना उपचारांदरम्यान अनेक चाचण्या कराव्या लागतात. गरीब रुग्णांसाठी या चाचण्या अल्प किंमतीमध्ये करून देण्यासाठी ऑर्गनायझेशनने स्टार हेल्थ लॅबबरोबर करार केला आहे. दोन वर्षात ऑर्गनायझेशनने २५० रुग्णांना निम्म्या खर्चात सर्व चाचण्या करून दिल्या आहेत. त्याचबरोबर सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये रुग्णांना सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आयसीयू व मातृयोजना सुरू झाली. गेल्यावर्षी शहरात डेंगीच्या साथीचा फैलाव झाला. यांदरम्यान ऑर्गनायझेशनच्या मदतीने ५३ रुग्णांवर अल्प खर्चात औषधोपचार करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून आरोग्य आणि शिक्षण असा मेळ घातला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातशे महिलांनी केले अथर्वशीर्ष पठण

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने रविवारी सकाळी बिनखांबी गणेश मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे सातशे महिलांनी यात सहभाग घेतला. मेघा भांबोरीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अथर्वशीर्ष पठण करण्यात आले.

गणेशोत्सवानिमित्त देवस्थान समितीच्यावतीने यंदा प्रथमच या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी सकाळी सात वाजता अथर्वशीर्ष पठणास सुरुवात झाली. यासाठी बिनखांबी गणेश मंदिर ते महालक्ष्मी बँक या मार्गावर मोठा मंडप उभारण्यात आला होता. पावसाची रिपरिप असल्याने सुरक्षितेसाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. अथर्वशीर्ष पठणानंतर भांबोरीकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी देवस्थान समितीच्या सदस्य संगीता खाडे, राजू जाधव, आरती महेश जाधव आणि महिला उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आजी-माजी सैनिकांमध्ये संवादाचा पूल हवा’

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'सैनिक नोकरीच्या काळात देशसेवेचे महान कार्य करत असतो. प्रतिकूल परिस्थितीत एकमेकांच्या सहकार्याने मोठ्या संकटांना सामोरे जाण्याचे बळ मिळते. या स्नेह मेळाव्यामुळे जुन्या आठवणी ताज्या झाल्या' असे मनोगत मेजर जनरल एम. एल. एन श्रवणकुमार यांनी व्यक्त केले. कोल्हापूर जिल्हा आजी-माजी सैनिक संघटना, १८ मैदानी तोफखाना विभाग यांच्यावतीने आयोजित स्नेहमेळाव्यात ते रविवारी बोलत होते. महासैनिक दरबार हॉलमध्ये कार्यक्रम झाला. साडेसातशेहून अधिक आजी-माजी सैनिक सहकुटुंब उपस्थित होते. 'मेळाव्याला उपस्थित आजी-माजी सैनिकांमध्ये संवादाचा पूल तयार झाला तर त्यातून खूप चांगले काम उभे राहील' अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मेजर जनरल श्रवणकुमार म्हणाले, 'निवृत्तीनंतर सैन्यातील सहकाऱ्यांना भेटण्याचा सहसा योग येत नाही. अनेक वर्षापासून कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील निवृत्त सहकाऱ्यांची भेट घेण्याचा मानस होता. मात्र, वेळोवेळी ते शक्य झाले नव्हते. स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने कोल्हापूर भेटीचे माझे स्वप्न पूर्ण झाले. सैन्यातील कारकिर्दीमध्ये अनेक सहकाऱ्यांच्या सोबतीमुळे नोकरीतील प्रवास सुखकर झाला. आणीबाणीच्या प्रसंगात सर्वांनी मिळून धैर्याने संकटांना तोंड दिले आहे. सैन्यदलात मैदानी तोफखाना रेजिमेंटला अत्यंत महत्त्व असते. सेवाकाळात सैन्यातील सहकारी हेच कुटुंब बनते. कित्येक प्रसंगात जीवाची पर्वा न करता आपले सहकारी सोबत करतात. या प्रवासातील अनेक आठवणी तश्याच जपून ठेवल्या आहेत. निवृत्तीनंतर अनेक वर्षे उलटूनही सर्वांची नावे लक्षात आहेत. यानिमित्ताने सहकाऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटत आले. यापुढे देखील कोल्हापूरशी असलेली नाते कायम राहील.'

कार्यक्रमात शिमला येथून आलेल्या तरुणांनी मल्लखांब प्रात्यक्षिक सादर केले. मेळाव्यात तोफखाना विभागातील अधिकारी, सरदार, साहेबान, जवान व वीरनारी सहभागी झाले होते. कर्नल आर. व्ही, के. सिंह, बी. पी. शर्मा, व्ही. नंदकुमार, विनय वेखंडे आदी उपस्थित होते. सुभेदार मेजर परशुराम तळेकर, सुभेदार तुकाराम जाधव, रमेश पाटील, अजित पाटील, संभाजी निकम यांनी मेळाव्याचे संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निवृत्त अधिकाऱ्यांतर्फे मदत

0
0

कोल्हापूर : निवृत्त विक्रीकर अधिकारी-कर्मचारी संघ कोल्हापूर व रत्नागिरीतर्फे पूरग्रस्तांसाठी एक लाख रुपयांची मदत करण्यात आली. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे रकमेचा धनादेश सुपूर्द केला. या दोन जिल्ह्यातील सेवानिवृत्त विक्रीकर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निधी जमा केला. संघटनेच्या बी. बी. पाटील, बी. आय. पाटील, दिलीप पाटील, सुरेश घोलकर आदींच्या शिष्टमंडळाने धनादेश सुपूर्द केला. त्यांच्यासह या कार्यक्रमासाठी प्रसाद सबनीस, प्रताप दळवी, चंद्रशेखर रामदासी, दत्तात्रय मुंगळे, प्रकाश जमदाडे, यशवंत चौगुले, नरेश कोकणे आदींनी पुढाकार घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेसहा लाख युवा मतदार

0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : पुढील महिन्यात होणाऱ्या १४ व्या विधानसभेसाठी प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीत १८ ते २९ वयोगटातील ६ लाख, ५७ हजार, ९६८ युवा मतदार आहेत. यातील १८ ते १९ वयोगटातील ७३ हजार, २५७ मतदार असून यापैकी १६ हजार, ९५२ मतदार पहिल्यांदाच विधानभेसाठी मतदान करणार आहेत. दहा विधानसभा मतदारसंघात एकूण ३० लाख, ९० हजार, ६६० मतदारांच्या तुलनेत तरुण मतदारांची संख्या पाच टक्क्याहून अधिक असल्याने विजयात तरुण महत्त्वाची भूमिका ठरविणार आहेत.

राज्यात १९६० मध्ये पहिली विधानसभा निवडणूक झाली. त्यानंतर १३ वी विधानसभेची निवडणूक २०१४ मध्ये झाली. १४ व्या निवडणुकीची प्रक्रिया आठवड्यानंतर सुरू होईल. या निवडणुकीसाठी तरुण, तरुणींची मते दखलपात्र असल्याने वेगळे महत्त्व आले आहे. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत युवा मतदारांचा फॅक्टर विजयात मोलाचा ठरला.

लोकसभा निवडणुकीसाठी जानेवारी महिन्यात मतदार नोंदणी आणि यादी शुद्धीकरणाची मोहीम राबवण्यात आली होती. त्यात जिल्ह्यात ३० लाख, ७५ हजार, ७५१ मतदार होते. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी प्रशासनाने विधानसभेसाठी राबवलेल्या मोहिमेत यामध्ये वाढ होऊन एकूण मतदार ३० लाख, ९० हजार, ६६० झाले. यावेळीही प्रशासनाने १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येकाने मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी जागृती केली. नाव, पत्त्यात दुरुस्ती, मयत, दुबारांची नावे वगळणीची प्रक्रिया राबवली. ३१ ऑगस्टला विधानसभेला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली. त्यात लोकसभा निवडणुकीनंतर १८ ते १९ वयोगटातील १६ हजार, ९५२ तर २० ते २९ वर्षे वयोगटातील १८ हजार, ९२७ मतदारांची वाढ झाली आहे.

प्रामुख्याने या वयोगटातील मतदारांची नोंदणी होण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनीही प्रयत्न केले. शहरात इच्छुक उमेदवारांचे प्रतिनिधी घराघरांत जाऊन अर्ज भरून निवडणूक यंत्रणेपर्यंत पोहच केले. त्यामुळे मतदार नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळाला. लोकसभा निवडणुकीतील विजयाच्या गणितामध्ये युवा मतदारांचा कौल महत्त्वाचा ठरला होता. तेच वारे कायम राहिल्यास विधानसभेलाही तरुण मतदारांचा कौल कुणाकडे तिकडे विजयाचे पारडे झुकेल, असा अंदाज बांधूनच राजकीय पक्ष तयारी करत आहेत.

वयोगटनिहाय मतदार असे :

१८ ते १९ : ७३,२५७

२० ते २९ : ५,८४, ७११

३० ते ३९ : ६,५१,६०९

४० ते ४९ : ६,२८,६८०

५० ते ५९ : ५,०१,९८०

६० ते ६९ : ३,४४,२९७

७० ते ७९ : २,०७,६३५

८० ते ८९ : ८०,१०१

९० ते ९९ : १६,८२३

९९ वर्षांवरील: १५६७

२० ते २९ वयोगटात

सर्वाधिक तृतीयपंथी

ऑनलाइन आणि ऑफलाइन मतदार नोंदणी अर्जात तृतीयपंथीसाठी स्वतंत्र कॉलम होता. त्यांची मतदार नोंदणीही यादीत वेगळी आहे. लोकसभेसाठीच्या मतदार यादीत जिल्ह्यात ७४ तृतीयपंथी मतदारांची नोंदणी झाली होती. विधानसभेच्या यादीत त्यात सात मतदारांची वाढ होऊन ८१ झाली आहे. त्यामधील ३१ तृतीयपंथी २० ते २९ वयोगटातील आहेत. १७ तृतीयपंथी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील आहेत.

२ लाख ८३ हजार

युवती मतदार

१८ ते २९ वयोगटातील एकूण ६ लाख, ५७ हजार ९६८ पैकी २ लाख, ८३ हजार ८२९ युवती मतदार आहेत. १८ ते १९ वर्षे वयोगटात २८ हजार, ६६६ आणि २० ते २९ वयोगटात २५ हजार, ५१ हजार ६३ युवती मतदार आहेत. त्यांची संख्याही लक्षणीय असल्याने उमेदवारांना त्यांच्यापर्यंत निवडणुकीचा अजेंडा पोहचवण्यासाठी वेगळे नियोजन करावे लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसवारणा बँकेकडून ११ लाख

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

वारणानगर येथील वारणा सहकारी बँकेच्यावतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ११ लाखांचा धनादेश दिला.

कोल्हापूर व सांगली जिल्ह्याला महापुराचा तडाखा बसल्याने अनेकांचे संसार, व्यवसाय उधवस्त झाले. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हॉटेल अयोद्ध्या पालकमंत्र्यांची भेट घेऊन मदतीचा धनादेश सुपूर्द केला. याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष निपुण कोरे, विश्वेश कोरे, उपाध्यक्ष उत्तमराव पाटील, तज्ज्ञ संचालक नागनाथ बसुदे, जेष्ठ संचालक बसवेश्वर डोईजड, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश सार्दळ यांसह अन्य संचालक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमआयएम जिल्ह्यात चार जागा लढविणार

Article 12

नोकर भरतीवरून गोंधळ

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेत नोकरभरतीवरून प्रचंड गोंधळ झाला. नोकरभरती ही नियमानुसार असल्याचा दावा करणाऱ्या संचालकमंडळासमोर विरोधकांनी 'गली गली मे शोर है, संचालक चोर है' अशा निषेधाच्या घोषणा देत 'नोकरभरती रद्द करा', अशी मागणी केल्याने एकच गदारोळ झाला. संचालकांनी स्वत:ची मुले आणि नातेवाईकांची भरती केली असल्याचा आरोप विरोधकांकडून केला गेला तर ही भरती सहकार कायद्याच्या नियमानुसार त्रयस्थ संस्थेंनी केली असल्याचा दावा करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थांनी बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील होते.

आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलच्या सभागृहात झालेल्या सभेच्या प्रारंभी बँक बचाव कृती समितीच्या सभासदांनी जाब विचारत 'शिक्षकांचा आवाज दाबण्यासाठी संचालक मंडळाने आमच्या विरोधात तक्रार दिल्याने शाहूपुरी पोलिसांनी आम्हाला नोटीस पाठवली आहे,' असा आरोप केला. सभासदांनी नोटिसा दाखवत खुलासा करण्याची मागणी केल्याने काही काळ गोंधळ झाला. बचाव समितीने जो इशारा दिला होता, त्याआधारे पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. तरीही सर्व सभासदांना आपले म्हणणे मांडण्यासाठी संधी दिली जाईल, असा खुलासा अध्यक्ष पाटील यांनी केला. त्यानंतर अध्यक्षांनी सभासदांना १४ टक्के डिव्हिडंड देणार असून कर्जाच्या व्याजाचे दर १२ टक्क्यांवरुन साडेअकरा टक्के करण्याची घोषणा केली. एनपीए कमी करण्यासाठी सभासदांनी वेळेत कर्जाची फेड करावी, असे आवाहन केले. एकीकडे अध्यक्ष पाटील बँकेच्या प्रगतीचा आढावा घेत होते तर बचाव समितीचे सदस्य नोकरभरतीबाबत खुलासा करण्याची सूचना करत होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी अहवाल वाचन केल्यानंतर शिक्षक संघाचे रवीकुमार मलगोंडा पाटील म्हणाले, 'गतवर्षीच्या सभेत दहा प्रश्न विचारले होते, पण त्या प्रश्नांचा इतिवृत्तामध्ये उल्लेख नाही. गतवर्षीच्या सभेत स्टाफिंग पॅटर्ननुसार नोकर भरतीचा प्रश्न नामंजूर झाला असताना इतिवृत्तामध्ये 'मंजूर' असा उल्लेख केला आहे. त्यामुळे मागील वर्षाचे इतिवृत्त खोटे आहे. गतवर्षीच्या सभेचे व्हिडिओ शुटिंग, अहवाल, झेरॉक्स मागितले असतानाही बँकेने उपलब्ध करून दिलेले नाही.' यावर पाटील यांनी 'गतवर्षीच्या सभेत नोकरभरतीचा प्रश्न बहुमताने मंजूर केला आहे,' असा खुलासा करताच विरोधक आक्रमक झाले.

अध्यक्षांनी प्रश्नोत्तरे सुरू केल्यानंतर बचाव कृती समितीने 'गली गली मे शोर है, संचालक चोर है', 'संचालकांचा धिक्कार असो', 'रद्द करा, रद्द करा, नोकरभरती रद्द करा' अशा घोषणा देत सभागृह दणाणून सोडले. शिक्षक समितीचे अर्जुन पाटील, सचिव प्रसाद तोंदकर आणि कृष्णात धनवडे यांच्या नेतृत्वाखाली बचाव समितीचे सभासद पुन्हा स्टेजजवळ आले. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार घोषणाबाजी झाली. या गोंधळात प्रश्नात्तराचा विषय संपल्याचे जाहीर करून अध्यक्षांनी राष्ट्रगीत सुरू केले. त्यानंतर सभा संपल्याचे जाहीर केले.

०००००

गतवर्षीच्या सभेत नोकरभरतीचा ठराव नामंजूर झाला असताना संचालकांनी नोकरभरती केली. संचालक साहेब शेख, अण्णासाहेब शिरगावे, बजरंग लगारे यांनी स्वत:च्या मुलांना नोकरी लावली असून अन्य संचालकांनी आपल्या नातेवाईकांना नोकरी लावली. ही नोकरभरती बेकायदेशीर आहे.

जोतीराम पाटील, पदाधिकारी, शिक्षक समिती

गतवर्षीच्या सभेत स्टाफिंग पॅटर्नला मंजूर दिल्यानंतर सहकार खात्याच्या परिपत्रकानुसार नोकर भरती केली आहे. सहकार खात्याची मान्यता असलेल्या संस्थेकडून नोकरभरती राबवली आहे. भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत संचालकांची मुले उत्तीर्ण झाल्याने त्यांची नोकरभरती झाली आहे.

दिलीप पाटील, अध्यक्ष शिक्षक बँक

अशी झाली नोकर भरती

बँकेत २००३ नंतर बँकेत नोकर भरती झाली नाही. २००३ ते २०१८ या कालावधीत ६१ कर्मचारी सेवानिवृत्त झाले असून पुढील चार वर्षांत १६ कर्मचारी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे सहकार खात्याच्या परिपत्रकानुसार ३० जणांची भरती केली आहे. नोकरीसाठी ५६४ अर्ज आले होते तर ४९१ उमेदवार परीक्षेला बसले होते तर ७३ गैरहजर होते. ९५ उमेदवार पात्र ठरले. त्यापैकी ९२ जणांनी तोंडी परीक्षा दिली त्यातून ३६ जणांनी निवड झाली असून ३० सेवकांची भरती करण्यात आली आहे, अशी माहिती अध्यक्ष पाटील यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विसर्जन मार्गावर २०० सीसीटीव्ही

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक मार्गावर सुमारे २०० सीसीटीव्हीचा वॉच राहणार आहे. विसर्जन शांततेत पार पडण्यासाठी चार हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. सुमारे ३०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. उच्च ध्वनियंत्रणामुक्त गणेशोत्सव होण्यासाठी पोलिसांना आदेश दिल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली.

गुरुवारी (ता. १२) अनंत चतुर्दशीला सार्वजनिक मंडळाच्या श्रींच्या मूर्तीचे विसर्जन होत आहे. या मिरवणुकीवर पोलिसांचा वॉच राहणार आहे. सायबर चौकापासून ते पंचगंगा नदी, इराणी खण यांसह प्रमुख मार्गावर सुमारे २०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील. त्यासह महापालिकेने बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही पाहिले जाणार आहे. मिरवणूक शांततेत पार पडण्यासाठी हुल्लडबाजांवर कारवाई केली जाणार आहे. मिरवणूक रेंगाळण्यास कारणीभूत ठरणारे, विनाकारण वाद घालणाऱ्यांवर वॉच ठेवला जाणार असून त्यांना मिरवणूकीतून बाहेर काढले जाणार आहे. विसर्जन मार्गावर टेहळणी पथके, छेडछाडविरोधी पथके तैनात केली जाणार आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांना स्वयंसेवक नेमण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यांनाही पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, उत्सवाला गालबोट लावणाऱ्या मंडळांच्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.

०००

बंदोबस्त असा...

पोलिस अधीक्षक : १

अपर पोलिस अधीक्षक २

पोलिस उपअधीक्षक ८

पोलिस निरीक्षक ४५

पोलिस उपनिरीक्षक, एपीआय १०२

पोलिस कॉन्स्टेबल २५०

होमगार्ड १२००

स्वयंसेवक ३००

राज्य राखीव दल ३ तुकड्या

बॉम्ब शोधक पथक २

००००

विसर्जन मिरवणुकीवर सीसीटीव्हीचा वॉच

जिल्ह्यात ३०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

चार हजार पोलिसांचा बंदोबस्त

छेडछाड, टेहळणी पथके तैनात

००००

हद्दपारीचे प्रस्ताव तयार

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातून १०० हून अधिक जणांना तात्पुरत्या स्वरूपात हद्दपार केले जाणार आहे. त्यासाठी प्रस्ताव तयार केले जात आहेत. सुमारे ३०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असून, त्यामध्ये कोल्हापुरातील ८२, इचलकरंजीतील ७० जणांचा समावेश असल्याचेही अधीक्षक देशमुख यांनी सांगितले.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


३६ टन निर्माल्य जमा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्यावतीने महास्वच्छता अभियानांतर्गत रविवारी गणपती विसर्जन केलेल्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. केएमसी, डी. डी. शिंदे व राजर्षी छत्रपती शाहू कृषी महाविद्यालयाच्या एनएनएसच्या तब्बल ८५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विविध ठिकाणांहून ३६ टन निर्माल्य व प्लास्टिक संकलित करण्यात आले. सकाळी पावसाची संततधार सुरू असताना स्वच्छता मोहिमेला विद्यार्थी व स्वंयसेवी संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शनिवारी घरगुती गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी महापालिकेच्या वतीने पारंपरिक पाणवठ्यांसह विविध ठिकाणी कृत्रिम कुंडांची व्यवस्था करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी मूर्तिदान व निर्माल्यदान उपक्रमात व्यस्त होते. सकाळी पुन्हा सर्व अधिकारी, कर्मचारी विद्यार्थ्यांसह स्वच्छता मोहिमेत सहभागी होते. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या उपस्थितीत स्वच्छतेला सुरुवात झाली.

विशेषत: घरगुती गणपती विसर्जन केलेल्या ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. विविध कॉलेजच्या एनएनएसचे विद्यार्थी व महापालिका कर्मचाऱ्यांनी ३६ टन निर्माल्य गोळा केले. दसरा चौक, पंचगंगा नदी गायकवाड पुतळा, राजाराम बंधारा, कसबा बावडा दत्त मंदीर, प्रायव्हेट हायस्कूल, स्वामी समर्थ मंदिर, नारायणदास मठ, कोटीतीर्थ, राजाराम तलाव, सायबर चौक व राजाराम गार्डन, नर्सरी उद्यान रुईकर कॉलनी, बापट कँप नदी परिसर, मसुटे मळा, महावीर गार्डन, रंकाळा, तांबट कमान, इराणी खण परिसरात स्वच्छता केली. स्वच्छतेनंतर येथे तातडीने धूर व औषध फवारणी करण्यात आली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, सहायक आयुक्त संजय सरनाईक, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, पर्यावरण अभियंता समीर व्याघ्रांबरे यांनी नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहिले. शाखा अभियंता आर. के. पाटील, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, विभागीय आरोग्य निरिक्षक राहुल राजगोळकर, निखिल पाडळकर, आर्किटेक्ट अँड इंजिनीअर असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराण, डी. डी. शिंदे सरकार कॉलेजचे प्राचार्य पी. आर. शेवाळे आदी उपस्थित होते.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपची महाजनादेश यात्रा १६ रोजी कोल्हापुरात

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा सोमवारी (ता. १६) कोल्हापूर जिल्ह्यात येणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता त्यांची इचलकरंजी येथे जाहीर सभा होणार असून त्या दिवशी कोल्हापुरात त्यांचा मुक्काम असेल. महाजनादेश यात्रेचे जंगी स्वागत करून शक्तिप्रदर्शन करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी तयारी सुरू केली आहे.

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा २९ ऑगस्टला कोल्हापुरात येणार होती. पण महापुरामुळे ती रद्द करण्यात आली होती. यात्रेचा शेवटचा टप्पा शिल्लक असून अनंत चतुर्दशीनंतर पुन्हा यात्रेस प्रारंभ होणार आहे. त्यानुसार सांगली जिल्ह्यातून १६ सप्टेंबर रोजी कोल्हापूर जिल्ह्यात महाजनादेश यात्रा येणार आहे. इचलकरंजी येथील शिवाजी पुतळ्याजवळून सभा मंडपापर्यंत दोन हजार कार्यकर्त्यांची भव्य रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर साडेसहा वाजता सभा होणार आहे. सभेला मुख्यमंत्र्यासह पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. ही सभा आटोपून मुख्यमंत्री कोल्हापूरकडे रवाना होणार आहेत. रात्री नऊ वाजता त्यांचे ताराराणी चौकात स्वागत होणार आहे. येथे मुख्यमंत्र्यांची छोटी सभा होणार आहे. मंगळवारी (१७) सकाळी पत्रकार परिषद होणार आहे.

महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने रविवारी सरकारी विश्रामगृहात आमदार सुरेश हाळवणकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे, 'गोकुळ'चे संचालक बाबा देसाई यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत महाजनादेश यात्रेचे जंगी स्वागत करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडे कामाचे वाटप करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भक्तिभावात पंजे भेटीस सुरुवात

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पारंपरिक वाद्यांच्या गजरात धार्मिक वातावरणात पीर पंजे भेटीस सुरुवात झाली. शहरात अनेक मंडळे व तालमींनी पंजे भेटीस काढले. सोमवारी (ता.९) मोहरमच्या सणातील कत्तलरात्र प्रमुख दिवस असून, मंगळवारी (ता.१०) ताबूत विसर्जन होणार आहे.

गणेशचतुर्थीच्या आदल्या दिवशी एक सप्टेंबरला पीर आणि पंजांची स्थापना झाली. हिंदू मुस्लिमांचे श्रद्धास्थान असलेल्या बाबूजमाल तालमीत नाल्या हैदर, शिवाजी चौकात घुडणपीर, भवानी मंडपात वाळव्याची स्वारी, मंगळवार पेठ पाण्याच्या खजिन्याजवळ नंगीवली, बाराईमाम, सरदार तालमीत चाँदसाहेब पंजा, तेली गल्लीत आप्पा शेवाळे, अवचितपीर, जुना बुधवार पेठ तालमीत झिमझिम साहेब, ब्रह्मपुरी टेकडीवर बुऱ्हाणसाहेब येथे पंजांची स्थापना केली असून, भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे. अनेक तालमींमध्ये एकत्रित गणपती आणि पंजांची स्थापना केली आहे.

आठव्या दिवशी पंजे भेटीस सुरुवात झाली असून, रविवारी दिवसभर पारंपरिक वाद्यांच्या गजरात पंजे भेटीस बाहेर पडले. रात्री उशिरापर्यंत बाबूजमाल, घुडणपीर, बुऱ्हाणबाबा, बाराईमाम येथे पंजे भेटीस आले होते. सोमवारीही कत्तलरात्रीच्या दिवशी पंजे भेटीचा कार्यक्रम होणार आहे. बिंदू चौक, शिवाजी चौक, गुजरी, महाद्वार रोड मार्गे बाबूजमाल दर्गा असा पंजे मिरवणुकीचा मार्ग राहणार आहे. हा मार्ग सोमवारी रात्री वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुतारवाड्यातील नऊ कुटुंबांचे स्थलांतर

0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या काही दिवसांपासून पावसाने पुन्हा जोर पकडल्याने पूरसदृश स्थिती निर्माण होऊ लागली आहे. पंचगंगा नदी इशारापातळीकडून धोकापातळीकडे इंचाइंचाने सरकू लागल्याने महापालिका यंत्रणा पूरस्थितीसाठी सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे. सहा रेस्क्यू बोट, लाइफ जॅकेट, इनरसह तीन पथके गस्त घालण्यासाठी तैनात केली आहेत. रविवारी रात्री पाणीपातळी वाढल्याने सुतारवाड्यातील नऊ कुटुंबातील २८ नागरिकांचे मुस्लिम बोर्डिंगमध्ये स्थलांतर करण्यात आले. त्याचबरोबर सिद्धार्थनगर, शाहूपुरी कुंभार गल्लीतील रहिवाशांना माइकद्वारे महापालिकेच्यावतीने स्थलांतराचे आवाहन केले जात आहे.

ऑगस्ट महिन्यामध्ये आलेल्या पुराने शहरवासियांची पुरती दैना उडली होती. काही दिवसांची उसंत घेतल्यानंतर गेल्या सहा दिवसांपासून पावसाने पुन्हा जोर पकडला आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी वाढल्याने पुन्हा एकदा भीती निर्माण होऊ लागली आहे. रविवारी सकाळी महापालिकेच्या गस्ती पथकांने सतर्कतेचा इशारा दिल्यानंतर भीती अधिकच वाढली.

धोका पातळी (४३ फूट) ओलंडण्यास अद्याप चार फूट पाणी कमी असले, तरी महापालिका प्रशासन सज्ज झाले आहे. सकाळी सुतार वाडा, सिद्धार्थ नगर, शाहूपुरी कुंभार गल्ली येथे सतर्क राहण्याच्या सूचना गस्ती पथक फिरत होते. पाणीपातळी वाढल्यास नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी महापालिकेच्या चार व व्हाइट आर्मीच्या दोन अशा सहा रेस्क्यू बोट, लाइफ जॅकेट व ट्यूबसह तीन पथके तैनात ठेवली आहेत. गरज पडल्यास आणखी एक पथक तयार करण्यात येणार आहे. नागरिकांचे स्थलांतर केल्यास त्यांची व्यवस्था करण्यासाठी मुस्लिम बोर्डिंग व चित्रदुर्ग मठ व्यवस्थापनाबरोबर महापालिका प्रशासनाने चर्चा केली आहे. त्याचबरोबर शाळा व सामाजिक हॉलमध्ये व्यवस्था केली आहे. नागरिकांनी पुराचे पाणी वाढत असल्याने स्थलांतर होण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाच्यावतीने केले आहे. दरम्यान सकाळी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह अग्निशमन दलाच्या जवानानी पुराचे पाणी येणाऱ्या ठिकाणी भेट दिली. रात्री सुतारवाड्यातील काही घरांजवळ पाणी आल्यानंतर नऊ कुटुंबातील २८ नागरिकांचे महापालिकेच्यावतीने स्थलांतर करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांना कोल्हापुरातून शूज, बेल्ट

0
0

फोटो आहे...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कोल्हापुरी चप्पल उद्योगाला चालना देण्यासह राज्यातील पोलिस दलासाठी आवश्यक बेल्ट व शूजचे उत्पादन कोल्हापुरातील 'लिडकॉम'च्या उत्पादन केंद्रातून केले जाईल. तसेच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात संत रोहिदास महाराज यांचे स्मारक उभे करण्यासाठी प्रत्येकी ११ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे. हे स्मारक म्हणजे रोहिदास महाराज यांच्या कार्याचे दर्शन, केंद्रीय व राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन केंद्र, उद्योग व्यवसायाला बूस्ट देणारे सेंटर ठरेल,' अशी घोषणा सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळातर्फे (लिडकॉम) सुभाषनगर येथे चर्मोद्योग शिक्षण व प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन व इमारतीच्या नकाशाचे अनावरण डॉ. खाडे यांच्या हस्ते झाले. 'कोल्हापुरात जवळपास एक एकर जागेवर साडेपाच कोटी रुपये खर्चून चर्मोद्योग शिक्षण व प्रशिक्षण केंद्र होणार आहे. येत्या वर्षभरात केंद्राच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होईल. राज्यातील हा पहिलाच प्रकल्प आहे, त्याची उभारणी आदर्शवत पद्धतीने होईल. प्रशिक्षणार्थी मुलांच्या निवासाची सोय असेल, असे खाडे यांनी नमूद केले.

याप्रसंगी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव, लिडकॉमचे संचालक व माजी आमदार बाबूराव माने, दुर्वास कदम यांनी मनोगत व्यक्त केले. 'लिडकॉम'चे व्यवस्थापकीय संचालक राजेश ढाबरे यांनी प्रास्ताविक केले. वित्तीय सल्लागार हणमंत कांबळे यांनी आभार मानले. याप्रसंगी संचालक राजेश खाडे, विजय गोवळकर, दत्तात्रय गोतीसे, पुणे विभागीय अधिकारी अमोल शिंदे, जिल्हा व्यवस्थापक एन. एम. पवार, नगरसेविका सविता घोरपडे, माजी नगरसेवक सुभाष रामुगडे, व्यावसायिक अरुण सातपुते आदी प्रमुख उपस्थित होते.

००००

साठ वर्षे वाऱ्यावर, आता नाही

खाडे म्हणाले, 'काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादीच्या कालावधीत चर्मोद्योग व्यावसायिक, नवउद्योजक वाऱ्यावर होते. सध्याच्या सरकारने उद्योग, व्यवसायाला चालना देण्यासाठी विविध योजना आणल्या. कोल्हापूरचा चर्मोद्योग वाढला पाहिजे यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचा सामाजिक न्याय विभाग नेहमीच पाठीशी राहील. या उद्योगात आता मारवाडी, ब्राह्मण समाजही मोठ्या प्रमाणात उतरला आहे. तेव्हा चर्मकार समाजातील तरुणांनी प्रशिक्षणानंतर उद्योग व्यवसायासाठी दोन पावले पुढे आले पाहिजे. सरकार अशा नवउद्योजकांसाठी चार पावले पुढे टाकून उद्योगासाठी अर्थसाह्य करेल. कोल्हापुरी चप्पलची ख्याती मोठी आहे. या व्यवसायासाठी चर्मोद्योग शिक्षण व प्रशिक्षण उपयुक्त ठरेल. कोल्हापुरी चप्पल वापरण्यात एक आनंद आहे. हे चप्पल शरीरातील उष्णता शोषून घेते.'

०००

सामाजिक न्यायमंत्र्यांनी केलेल्या घोषणा....

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त प्रत्येक तालुक्यात शंभर मुला-मुलींसाठी निवासी होस्टेल

लोकशाही अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रत्येक जिल्ह्यात स्मारक

स्मारकाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची सोय

मॅट्रिकेत्तर शिष्यवृत्तीअंतर्गत केंद्रातर्फे ५०० कोटी रुपयांस मान्यता

केंद्राकडून आतापर्यंत १२७६ कोटी रुपयांस मंजुरी

सुगम्य भारत योजनेंतर्गत दिव्यांगांसाठी १५ कोटी

आंतरजातीय विवाह अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत ४९ कोटी थकीत रकमेची उपलब्धता

राज्यातील १३ हजार गटई कामगारांसाठी स्टॉलची उपलब्धता करणार

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images