Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

शाहू वैद्यकीय प्रवेशाच्या जागा पूर्ववत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'राजर्षी शाहू छत्रपती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील त्रुटींमुळे एमबीबीएसच्या दीडशे जागांपैकी ५० जागा कमी झाल्या होत्या. महाविद्यालयातील बहुतांशी त्रुटी दूर झाल्या असून इंडियन मेडिकल कौन्सिलच्या नियमानुसार आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवेशाच्या कमी झालेल्या ५० जागा पुढील पाच वर्षांसाठी पुन्हा पूर्ववत करण्यात आल्या आहेत,' अशी माहिती सीपीआरचे अधिष्ठाता डॉ. अजित लोकरे यांनी दिली.

वर्गखोल्या, ग्रंथालय व पायाभूत सुविधांची अपूर्णता, निवासी डॉक्टर आणि प्राध्यापकांची अपुरी संख्या यांचा फटका राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला बसला होता. मेडिकल कौन्सिलच्या समितीने मे महिन्यात पाहणी केली असता त्यामध्ये विविध त्रुटी आढळून आल्या होत्या. त्यानुसार महाविद्यालयाची विद्यार्थी प्रवेश क्षमता घटवण्यात आली होती. दरम्यान, त्रुटींच्या पूर्ततेबाबत महाविद्यालयाने म्हणणे सादर केले. संबंधित त्रुटींची पूर्तता केल्यानंतर जागा पूर्ववत करण्यात आल्या आहेत. २००१ साली महाविद्यालयांची प्रवेश क्षमता १०० होती. तर २०१३ मध्ये १५० करण्यात आली. मात्र पायाभूत सुविधांची पूर्तता न झाल्याने २०१५ मध्ये ५० जागा कमी करण्यात आल्या. त्यानंतर २०१६ साली पुन्हा ५० जागा वाढवण्यात आल्या. प्रवेश प्रक्रियेवर मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाचे नियंत्रण असते. समितीच्या तपासणीनंतर त्रुटी आढळल्याने यंदा पन्नास जागा कमी करण्यात आल्या होत्या. अधिष्ठाता डॉ. लोकरे यांनी सातत्याने पाठपुरावा करून संबंधित त्रुटींची पूर्तता केल्याने महाविद्यालयाच्या १५० जागा कायम राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अधिकाऱ्यांची वाहने अडवली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'फिक्स मानधन'च्या मागणीसाठी आशा कर्मचारी व गट प्रवर्तकांनी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी थाळीनाद करत सरकारचा निषेध केला. मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महिलांनी दुपारी दोनच्या सुमारास अचानकपणे जिल्हा परिषदेचे चारही प्रवेशद्वार रोखले. जि.प.मध्ये ये-जा करण्यास मज्जाव केल्यामुळे कर्मचारी व अधिकाऱ्यांची पंचाईत झाली. अधिकाऱ्यांची वाहने रोखल्याने काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

दरम्यान, कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानधन निश्चित करण्यासंदर्भात मोठ्या संख्येने एसएमएसही केले. बुधवारी आशा कर्मचाऱ्यांनी भर पावसात जवळपास चार तास जिल्हा परिषदेसमोर ठिय्या मारला होता.

आशा वर्कर्सच्या राज्यव्यापी संघटनेने ठिकठिकाणी आंदोलन सुरू केले आहे. त्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स व युनियनतर्फे मंगळवारपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास शेकडो महिला जि.प.समोर आल्या. त्यांनी सरकारविरोधी घोषणा देत रस्त्यावर ठिय्या मारला. 'वा रे मोदी तेरा खेल सस्ती दारू महँगा तेल, एक रुपयाचा कडिपत्ता सरकार झालंय बेपत्ता,'अशा घोषणा दिल्या. आशा कर्मचाऱ्यांना १० हजार आणि प्रवर्तकांना १५ हजार इतके मानधन निश्चित करावे ही प्रमुख मागणी आहे. संघटनेच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेऊन निवेदन दिले. जिल्हाध्यक्षा नेत्रदीपा पाटील, उज्ज्वला पाटील, संगीता पाटील, सुप्रिया गुदले, आदींच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे.

०००

अधिकारी, कर्मचाऱ्यांची पंचाईत झाली

आंदोलनात दुसऱ्या दिवशी महिला कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. पावसाच्या सरी अंगावर झेलत त्यांनी जिल्हा परिषदेसमोरील मुख्य प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन सुरू केली. यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद केली. दुपारी दोनच्या सुमारास महिला कर्मचारी आक्रमक झाल्या आणि त्यांनी जोरदार घोषणेबाजी करत जि.प.ची चारही प्रवेशद्वारे रोखली. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची पंचाईत झाली. कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेतून आत बाहेर जाण्यास मज्जाव केला. उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची मोटारही अडविली. आंदोलनाची व्याप्ती वाढल्यानंतर पोलिसांनी जादा कुमक मागवली.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘राधानगरी’चे दोन दरवाजे उघडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. बुधवारी दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. जिल्ह्याच्या पश्चिम भागात व धरणक्षेत्रात दमदार पाऊस झाल्यामुळे राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले. राधानगरीसह तुळशी, वारणा, दूधगंगा, कासारी, कडवी आणि कुंभी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. प्रशासनाने भोगावती, पंचगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा आदेश दिला आहे. राधानगरी धरणातून ४२५६, वारणा ८३०५ व दूधगंगा धरणातून ७९०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग चालू आहे.

दिवसभरात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत दीड फुटांनी वाढ झाली. जिल्ह्यातील सोळा बंधारे पाण्याखाली आहेत. पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथे सकाळी सात वाजण्याच्या सुमारास २२ फूट इतकी पाणी होती. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यामध्ये दीड फुटांनी वाढ झाली. दरम्यान, सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पंचगंगा नदीवरील शिंगणापूर बंधारा पाण्याखाली गेला. सकाळी आठ वाजताच्या नोंदीनुसार जिल्ह्यात २७६ मिली मीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात पावसाची सरासरी २३.०६ मिली मीटर इतकी आहे. बुधवारीही राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा येथे जोरदार पाऊस झाला. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ८४ तर भुदरगडमध्ये ३९, आजऱ्यात २४, शाहूवाडीत २७, राधानगरीत २६ मिली मीटर पावसाची नोंद आहे.

पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाचे दमदार आगमन झाल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. माळरानावरील पिकांना हा पाऊस पोषक ठरणारा आहे. भात, भुईमूग, सोयाबीन, नाचणी, मका या पिकांच्या वाढीसाठी पाऊस उपयुक्त ठरत असल्याने शेतकरी सुखावला आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पंचगंगा नदीवरील राजाराम, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ आणि शिंगणापूर बंधारे पाण्याखाली आहेत. भोगावती नदीवरील राशिवडे, हळदी, सरकारी कोगे, खडक कोगे तर वारणा नदीवरील चिंचोली, माणगांव बंधारे पाण्याखाली आहेत. दुधगंगा नदीवरील दत्तवाड आणि कुंभी नदीवरील सांगशी, कातळी बंधारा पाण्याखाली आहे.

...

शहरातील पूरग्रस्त

भागात पावसाची धास्ती

पंधरा दिवसांपूर्वी महापुराची आपत्ती आल्यानंतर शहरातील विविध भागात पाणी शिरले होते. लोकांना ठिकठिकाणी स्थलांतरित केले होते. पंधरा दिवस ते तीन आठवडे स्थलांतरित ठिकाणी राहून जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूरग्रस्त आपआपल्या घरी परतले. अजूनही काही भागात चिखलाचे साम्राज्य आहे. त्या आपत्तीतून सावरत असताना गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर शहरात पावसाला सुरुवात झाली. बुधवारी सकाळी शहर परिसरात दमदार पाऊस झाला. सखल भागात पाणी साचले. पूरग्रस्त भाग सावरत असताना पुन्हा पावसाने जोर धरल्याचे चित्र निर्माण झाल्यामुळे नागरिकांत धास्ती निर्माण झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृक्ष प्राधिकरणच्या बैठकीत सात प्रकरणे निकालात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या चार दिवसांपासून टीकेची धनी बनलेल्या महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची बैठक बुधवारी पार पडली. उद्यान विभागाच्यावतीने सादर करण्यात आलेल्या १२ प्रकरणांपैकी वृक्ष व फांद्या तोडीची सात प्रकरणे निकालात निघाली. दोन प्रकरणे नामंजूर करताना दोन ठिकाणी स्वत: आयुक्त भेट देणार आहेत. याबाबतचा निर्णय सायंकाळच्या बैठकीत घेण्यात आला.

महापालिका क्षेत्रातील विविध कारणासाठी वृक्ष व फांद्या तोडण्यासाठी नागरिकांना वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी लागते. त्यासाठी उद्यान विभागाकडे अर्ज सादर केल्यानंतर समितीच्या बैठकीमध्ये त्याबाबतचा निर्णय होतो. पण गेल्या काही वर्षात समितीतील सदस्य आपल्या पदाचा दुरुपयोग करत असून सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक करत असल्याचे निदर्शनास आले होते. त्याबाबतच्या तक्रारी नगरसेवकांकडे दाखल झाल्या होत्या. तक्रारींची दखल घेत शनिवारी झालेल्या स्थायी समिती बैठकीमध्ये उद्यान विभाग व वृक्ष प्राधिकरण समितीच्या कारभाराचे वाभाडे काढले होते. त्यानंतर समितीकडे आलेले अर्ज निर्गत करण्यासाठी बैठक घेण्यात आली. बैठकीला आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, उपमहापौर भूपाल शेटे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, अपर्णा जाधव आदींच्या उपस्थितीत बैठक झाली.

यावेळी उद्यान विभागाकडून आलेल्या १२ प्रकरणांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये सात प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. तर दोन प्रकरणे नामंजूर केली. दोन ठिकाणी स्वत: आयुक्त पाहणी करुन निर्णय घेणार आहेत. विना परवाना वृक्ष अथवा फांदी तोड केल्यास आकारण्यात येणारा दंड कमी करण्याची मागणी उपमहापौर शेटे यांनी केली. 'शहरातील प्रकरणे प्रलंबित राहू नयेत, त्यासाठी पुन्हा आठ दिवसांत बैठक घेण्यात येणार आहे,' असे उपमहापौर शेटे यांनी सांगितले.

...

चौकट

उदय गायकवाड यांची अनुपस्थिती

विज्ञान प्रबोधिनी संस्थेचे प्रतिनिधी म्हणून उदय गायकवाड समितीचे सदस्य म्हणून काम पाहतात. गायकवाड यांच्या कार्यपद्धतीवर स्थायी समितीमध्ये जोरदार ताशेरे ओढले होते. त्यानंतर उपमहापौर भूपाल शेटे यांनी प्राधिकरण समितीचा संपूर्ण लेखाजोखा मागवला आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी होणाऱ्या समितीच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण या बैठकीला गायकवाड उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे आयुक्त, शहर अभियंता, उपमहापौर व उद्यान अधीक्षक यांच्यासमवेत बैठक पार पडली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक पुरस्कारांवरून जिल्हा परिषदेत मतभेद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांना जिल्हा परिषदेतर्फे दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदा मात्र शिक्षक दिन उजाडला तरी जिल्हा परिषद प्रशासनाला पुरस्कारांची घोषणा करता आली नाही. बुधवारी दिवसभर पुरस्कारासाठी शिक्षकांच्या मुलाखती झाल्या. गुरुवारी (ता.५) आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा होण्याची शक्यता आहे. शिक्षक पुरस्कारासाठी नावावर एकमत होऊ शकले नाही. पदाधिकाऱ्यांत मतभेद झाल्याने अध्यक्षा महाडिक बैठकीतून निघून गेल्याचे समजते.

प्रत्येक तालुक्यासाठी एक आणि संपूर्ण जिल्ह्यासाठी एक विशेष असे मिळून १४ शिक्षकांना आदर्श पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. पहिल्यांदा तालुका पातळीवर शिक्षकांच्या प्रस्तावाची छाननी होते. प्रत्येक तालुक्यातील तीन शिक्षकांचे प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठविले जातात. जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्यासह समिती सभापती व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संबंधित शिक्षकांच्या मुलाखती झाल्या. प्रत्येक तालुक्यातून तीन शिक्षकांनी मुलाखती दिल्या. सायंकाळी उशिरापर्यंत मुलाखती सुरू होत्या. मंगळवारी, सर्वसाधारण सभा होती त्यामुळे शिक्षकांच्या मुलाखती बुधवारी झाल्या. त्यामुळे पुरस्कारांची घोषणा करायला विलंब झाला असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एलईडी दिव्यांबाबत कंपनीवर जोरदार टीका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'शहरात भारत इलेक्ट्रिकल कंपनीकडून (ईईएसएल) एलईडी दिवे बसवण्यात येत आहेत. मात्र कंपनीचे काम समाधानकारक नसल्याने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून दिवे बसवावेत. तसेच त्याचा खर्च कंपनीच्या बिलामधून कपात करावा,' असे आदेश स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी दिले. कामाबाबत कंपनीचे अधिकारी दत्ता बामणे यांना समाधानकारक उत्तरे देता न आल्याने त्यांना बैठकीतून हाकलून लावण्यात आले.

एलईडी दिवे बसवण्याबाबत सुरू असलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी बुधवारी छत्रपती ताराराणी सभागृहात बैठक पार पडली. सहायक अभियंता सारिका शेळके यांनी ३० प्रभागामध्ये दिवे कार्यन्वित करण्यात येत असून उंच पोलवर दिवे बसवण्यासाठी कंपनीकडे उंच बूमची व्यवस्था नसल्याने काम अपूर्ण असल्याचे निदर्शनास आणून दिले. सभापती देशमुख यांनी कंपनीने आवश्यक वॅटच्या दिव्यांचा पुरवठा करताना त्वरीत साहित्य उपलब्ध करुन देण्याची सूचना केली. मात्र यावेळी कंपनीचे दत्ता बामणे यांनी असमाधानकारक उत्तरे दिली. त्यामुळे संतापलेल्या देशमुख यांनी बामणे यांना बैठकीतून हाकलून लावले. यावेळी इतर नगरसेवकांनीही कंपनीच्या कामाकाजाबाबत तीव्र आक्षेप नोंदवले.

त्यानंतर एलईडी दिवे कार्यन्वित करण्यासाठी महापालिकेच्या सर्व सुपरवाझर व वायरमन यांची बैठक झाली. त्यांना दिवे बसवण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या. कर्मचाऱ्यांनी त्वरीत काम करुन देण्याची ग्वाही दिली. उपमहापौर भूपाल शेटे यांनी फिलिप्स किंवा ब्रँडेंड कंपनीचे दिवे बसवण्याची सूचना केली.

आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, 'दिव्यांच्या दर्जाबाबत तडजोड करु नये. गणपती विसर्जन मिरवणुकीपूर्वी मिरवणूक मार्गावरील दिवे तत्काळ सुरू करावेत.' 'प्रभागनिहाय दिव्यांची पडताळणी करण्यासाठी वायरमनची नियुक्त करु,' असे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितले.

गटनेता सत्यजित कदम, नगरसेवक सचिन पाटील, नगरसेवक लाला भोसले, नगरसेविका पूजा नाईकनवरे यांनी चर्चेत सहभाग घेतला. माजी नगरसेवक सचिन चव्हाण, कनिष्ठ अभियंता रोहन डावखर, मिलिंद शेटके उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजीवजी गांधी सूतगिरणीकडून एक कोटीची पीएफ रक्कम वसूल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दिंडनेर्ली (ता. करवीर) येथील राजीवजी गांधी सहकारी सूतगिरणीकडे कर्मचाऱ्यांची थकीत असलेली भविष्य निर्वाह निधीची एक कोटी चार लाख ५२ हजारांची रक्कम वसूल केली. विभागीय भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने थकीत रक्कम वसुलीसाठी सूतगिरणीची बँक खाती सील केली. सूतगिरणीतील कायम व रोजंदारी कर्मचाऱ्यांची पीएफ रक्कम भरण्यासाठी वेळोवेळी नोटीस दिली होती. त्यानंतर भविष्य निर्वाह निधी कायदा १९५२ च्या कलम ७ 'अ' अंतर्गत सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान सूतगिरणी व्यवस्थापनाने मे २०११ ते मार्च २०१८ पर्यंत २०० कर्मचाऱ्यांची पीएफची रक्कम न भरल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार व्यवस्थापनाने रक्कम न भरल्याने पीएफ कार्यालयाने बँक खाती सील केली होती. आयुक्त सौरभ प्रसाद यांच्या निर्देशानुसार जयंत जोशी यांनी सूतगिरणी व्यवस्थापनाकडून बँक खाती सील करून कर्मचाऱ्यांची पीएफ रक्कम वसूल केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरमहापालिकेच्या अस्थापनावरील १४

$
0
0

कोल्हापूर

महापालिकेच्या अस्थापनावरील १४ कर्मचाऱ्यांना बुध‌ावारी पदोन्नती मिळाली. याबाबतचे आदेश आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी काढले. फायरमन संवर्गातील वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांना तांडेल पदावर पदोन्नती देताना आदेश निघाल्यापासून त्यांच्या वेतन ग्रेडमध्ये वाढ होणार आहे. अनेक नगरसेवकांनी विभागातील कर्मचाऱ्यांना अद्ययावत साहित्य देण्याबरोबरच त्यांच्या वेतनामध्ये वाढ करण्याची तसेच तात्पुरत्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी केली होती. त्यानुसार अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाली आहे. यामध्ये विलास सातपुते, रमेश जाधव, महादेव भालकर, जयवंत डकरे, धनाजी यादव, शिवाजी नलवडे, संजय माने, राजेंद्र भोसले, भगवंत शिंगाडे, वामन चौरे, पुंडलिक पवार, किसण पवार, सर्जेराव लोहार, बाबूराव सनगर यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विद्यापीठाकडून मागवली पूरग्रस्त विद्यार्थ्यांची माहिती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ऑगस्टमध्ये कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत आलेल्या महापुरामध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना पुराचा फटका बसला अशा विद्यार्थ्यांची माहिती शिवाजी विद्यापीठाने कॉलेज प्रशासनाकडून मागवली आहे. याबाबतचे पत्र विद्यापीठाने प्राचार्यांना पाठवले आहे. कॉलेजनिहाय पूरग्रस्त विद्यार्थ्यांची यादी विद्यापीठाकडे आल्यानंतर विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सवलत व मदतीच्या धोरणाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

महापुरात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील अनेक गावे पाण्याखाली गेली. शेतीसह घरे व जनावरांचे नुकसान झाले. कोल्हापूर शहरातील, शुक्रवार पेठ, कदमवाडी, जाधववाडी, रमणमळा, नागाळा पार्क, शाहूपुरी, सुतारमळा येथील घरांमध्येही पाणी शिरले, तर सांगलीतील हरिपूर, ब्रह्मनाळसह शिरोळ तालुक्यातील औरवाड, कुरूंदवाड, नृसिंहवाडी यासह गावठाणातील रस्त्यांवर पाणी आले. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी शिवाजी विद्यापीठाच्या अखत्यारीत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेतात. या दोन जिल्ह्यांतील कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या कुटुंबांवर महापुरामुळे आर्थिक संकट कोसळले आहे. त्यांची घरे कोसळली आहेत. शेतीचे नुकसान झाले आहे. जनावरे वाहून गेली आहे. या विद्यार्थ्यांना शैक्षणिक पातळीवर आर्थिक दिलासा देता यावा यासाठी शिवाजी विद्यापीठातर्फे पूरग्रस्त विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शिवाजी विद्यापीठाच्या अखत्यारित येणाऱ्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कॉलेजमार्फत पूरग्रस्त विद्यार्थ्यांची नावे, कौटुंबिक माहिती, आर्थिक स्थिती याबाबतची माहिती पाठविण्याचे काम सुरू आहे.

येत्या ऑक्टोबरपासून विद्यापीठाच्या सत्र परीक्षेला सुरुवात होणार आहे. या परीक्षेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जे विद्यार्थी पूरग्रस्त आहेत त्यांच्या परीक्षा फी माफीबाबत सरकारच्या उच्चशिक्षण मंत्रालयाशी चर्चा करण्याचाही विद्यापीठ प्रशासनाचा विचार आहे.

०००

समिती स्थापन

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त कॉलेज विद्यार्थ्यांची माहिती संकलित करून त्याबाबत राज्यस्तरावरून मदतीसाठी पाठपुरावा करण्याबाबत विद्यापीठाच्या वतीने समिती स्थापन केली आहे. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यासाठी स्वतंत्र समितीची रचना करण्यात आली आहे. यामध्ये विद्यापीठ व शिक्षण सहसंचालक विभागीय कार्यालयाचे प्रतिनिधी समाविष्ट आहेत.

०००

कोट...

पूरग्रस्त विद्यार्थ्यांना राज्यस्तरावरून मदतनिधी उभारण्याबाबत किंवा त्यांच्या परीक्षा फी माफीबाबत पुढाकार घेण्यासाठी शिवाजी विद्यापीठातर्फे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातून कॉलेजनिहाय अहवाल मागवला आहे. अद्याप ही माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. येत्या आठवड्यात सर्व माहिती घेऊन एकत्रित अहवाल तयार केला जाणार आहे.

डॉ. विलास नांदवडेकर, कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रधानमंत्री मुद्रा बँकयोजनेचा प्रचार करा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'ग्रामीण दुर्गम भागातील गरजू आणि होतकरुपर्यंत प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचा प्रचार करण्यासाठी बँका, सरकारी कार्यालये, ग्रामपंचायती, नगरपंचायतींनी पुढाकार घ्यावा,' अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी दिल्या. प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली.

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, 'नगरपंचायती, नगरपरिषद, ग्रामपंचायत, सर्व शासकीय कार्यालयात मुद्रा बँक योजनेची माहिती देणारे फलक प्रदर्शित करावेत. सर्व बँकांच्या दर्शनी भागात यासंबंधी फलक लावावे. बँकांनी या योजनेच्या लाभार्थ्यांना सविस्तर माहिती द्यावी.'

समितीच्या सचिव सरिता यादव यांनी योजनेच्या प्रचार प्रसिद्धीसाठी २१ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे असे सांगितले. बैठकीला जिल्हा अग्रणी व्यवस्थापक राहुल माने, अशासकीय सदस्य अर्चना रिंगणे, नचिकेत भुर्के, तानाजी ढाले, नामदेव चौगुले, नाथ देसाई आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशोत्सवः देखाव्यातून साकारला उरीतील युद्धप्रसंग

$
0
0

कोल्हापूर : भारतीय सैन्यदलाने उरी येथे केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर आधारीत देखावा मंगळवार पेठेतील साठमारी परिसरात राहणाऱ्या किरण अतिग्रे यांनी साकारला आहे. घरगुती गणेशमूर्तीसोबत त्यांनी हा देखावा केला असून यातून त्यांनी देशभक्तीचा संदेश दिला आहे.

अतिग्रे यांना कलेची आवड असून दरवर्षी ते सामाजिक विषयावर आधारीत देखाव्याची मांडणी करतात. यंदा त्यांनी चार फूट जागेत हा देखावा तयार केला आहे. पाकिस्तान नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय सैनिकांनी पाकिस्तानी अतिरेक्यांचा तळ उध्वस्त केला असा देखावा मांडला आहे. यासाठी माती, कागदी पुठ्ठे, जुन्या खेळण्यांचे पार्ट, जुने कापड यांचा वापर केला आहे. सैनिकाच्या वेशभूषेत असलेला शाडूचा गणपती हे या देखाव्याचे वैशिष्ट्य आहे. या देखाव्यासाठी अतिग्रे यांनी गेल्या दीड महिन्यांपासून तयारी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक नियमांच्या धाकातून पोलिसांची वरकमाई

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

केंद्र सरकाने जाहीर केलेले नवीन वाहतूक नियम पोलिसांसाठी वरकमाईचे आणखी एक साधन बनले आहे. नवीन नियमांच्या अंमलबजावणीत पहिल्याच दिवसी वाहनधारकांना पोलिसांच्या वरकमाईचा सामना करावा लागला. नवीन नियमानुसार दंडाच्या रकमेत पाच ते दहा पट वाढ झाल्याने वाहतुकीचे नवे नियम पोलिसांसाठी आठवा वेतन आयोग असल्याची चर्चा सोशल मीडियात रंगू लागली आहे.

अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, तसेच वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, यासाठी केंद्र सरकारने मोटार वाहन कायदा १९८९ यात अमूलाग्र बदल केला. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास जबर दंडाची तरतूद केल्याने वाहनधारकांच्या खिशाला याचा भुर्दंड लागणार आहे. एक सप्टेंबरपासून याची अंमलबजावणी सुरू होणार होती. मात्र, पहिले दोन दिवस सुट्ट्या आल्याने प्रत्यक्षात मंगळवारपासून याची अंमलबजावणी सुरू झाली. नवीन नियमात ५०० ते २५ हजारांपर्यंत दंडाची तरतूद आहे. अपघात कमी व्हावेत असा सरकारचा उद्देश योग्य असला तरी, याच्या अंमलबजावणीबाबत मात्र विचार झालेला दिसत नाही. ई-चलन यंत्रांवर जुन्याच दंडांची रचना आहे. यामुळे नवीन नियमांची अंमलबजावणी करण्यात अडथळे येत आहेत. येणाऱ्या चार दिवसात सर्व ई-चलन यंत्रे अद्ययावत झाल्यानंतर नवीन नियमांची अंमलबजावणी सुरू होईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली.

नवीन नियमांच्या अंमलबजावणीत तांत्रिक अडचण असली तरी, प्रत्यक्षात रस्त्यावर मात्र पोलिसांकडून या नियमांचा धाक दाखवण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. नवीन नियमांनुसार दंडाची रक्कम जास्त असल्याची भीती घालून वाहनधारकांशी मांडवली केली जात आहे. पावती करण्याऐ‌वजी १००-२०० रुपये घेऊन वाहन सोडण्याचे प्रकार मंगळवारी दिवसभर सुरू होते. पुणे-बेंगलोर महामार्गावर याचा अनुभव अनेक वाहनधारकांना घ्यावा लागला. मोठ्या दंडातून बचावलो, या भावनेने वाहनधारकही १००-२०० रुपये देऊन स्वत:ची सुटका करून घेत होते. याबाबत सोशल मीडियात तीव्र भावना उमटल्या. नवीन वाहतूक नियम हे पोलिसांसाठी आठवा वेतन आयोग असल्याचे उपहासात्मक मेसेज व्हायरल होत आहेत. आरटीओ कार्यालयाकडे अधिकृत परिपत्रक आले नसल्याने नवीन नियमांची अंमलबजावणी करायची की नाही? याबाबत संभ्रमावस्था होती. मात्र, राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये नवीन नियमांची अंमलबजावणी सुरू झाल्याची माहिती मिळताच कोल्हापुरातही याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली.

वाहनधारकांना भुर्दंड

नवीन वाहतूक नियमांनुसार दंडात पाच ते दहा पाट वाढ झाल्याने आता वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे वाहनधारकांसाठी परडणारे नाही. अल्पवयीन मुलाने वाहन चालवले तरी त्याच्या वडिलांना २५ हजारांचा दंड होणार आहे. याशिवाय तीन वर्ष तुरुंगवासाच्या शिक्षेचीही तरतूद आहे. कारमध्ये सिटबेल्ट किंवा दुचाकीवर हेल्मेट नसल्यास एक हजार रुपयांचा दंड होणार आहे. दंडाची रक्कम न भरल्यास वाहनाच्या कागदपत्रांवर दंडाची नोंद होणार आहे. वाहन विक्री किंवा नोंदीचे नूतनीकरण करताना सर्व दंड भरावा लागणार आहे. यामुळे नियमांचे पालन करणेच सोयीचे ठरणार आहे.

गुन्ह्याचा प्रकार जुना दंड नवीन दंड

विना सिटबेल्ट ड्रायव्हिंग १०० १०००

विना हेल्मेट दुचाकी चालवणे २०० १०००

विना लायसन ५०० ५०००

वेग मर्यादा उल्लंघन ५०० ५०००

धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे १००० ५०००

विना परमिट वाहन ५००० १००००

विना इन्शुरन्स वाहन १००० २०००

ड्रंक अँड ड्राईव्ह २००० १०००००

अतिरिक्त प्रवासी १०० दोन हजारांपासून पुढे

अत्यावश्यक वाहनांना अडथळा करणे नवीन तरतूद १००००

ओव्हरलोडिंग दोन हजारच्या पुढे २० हजारांपुढे

अल्पवयीन ड्रायव्हिंग नवीन तरतूद २५ हजार दंड, तीन वर्षांचा कारावास

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुग्ध व्यवसायाला २५ कोटींचा फटका

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शेती, उद्योगापाठोपाठ दुग्ध व्यवसायाला महापुराचा सर्वात जास्त फटका बसला आहे. पुरात वाहून गेलेली जनावरे, पूर कालावधीत खरेदी न झालेले दूध, वैरणीचा तुटवडा यामुळे जिल्ह्यात दूध उत्पादकांचे अंदाजे २५ ते ३० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. पुरात मेलेल्या जनावरांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेली मदत अजूनही शेतकऱ्यांच्या पदरी पडलेली नाही तर पूरकाळात खरेदी न झालेल्या दूधामुळे दूध उत्पादकांना हजारो रुपयांचा फटका बसला आहे.

अतिवृष्टी व महापुरामुळे जिल्ह्यात पशूधनाची मोठी हानी झाली. महापुराचे पाणी गावात शिरल्याने शेतकऱ्यांनी दावी तोडून गायी, म्हशी, रेडके, वासरे सोडून दिली. महापुरात १४६ गायी, १६६ म्हशी आणि ६१ लहान वासरे आणि रेडके वाहून गेल्याने मृत्यूमुखी पडली. म्हशीची किंमत अंदाजे ५० ते ६० रुपयापासून एक लाख दहा हजार रुपये असून जातीवंत गायीची किंमत ५० हजार रुपयापासून ९० हजारपर्यंत आहे. गाई, म्हशींची सरासरी ६० हजार रुपये किंमत धरली तर दूध उत्पादकांना सव्वादोन कोटी रुपयांचा फटका बसला आहे. महापुरात बैल, शेळ्या, मेंढ्या आणि कोंबड्या वाहून गेल्या. महापुराचा वेढा पडला असतानाही करवीर तालुक्यातील चिखली, आंबेवाडी, शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी गायी म्हशी वाचवण्यासाठी स्वत:चा जीव पणाला लावून बंगल्याच्या टेरेसवर जनावरे बांधून त्यांचे जीव वाचवल्याचे पहायला मिळाले.

एकीकडे पुरात जनवारे वाहून गेली असताना जिल्ह्यातील सर्व रस्ते, बंधारे पाण्याखाली गेल्याने जिल्ह्यातील गोकुळ, वारणा, शाहू स्वाभिमानी, प्रतिभा यांसह खासगी व सहकारी दूध संघांचे दूध संकलन ठप्प झाले. दोन ते तीन दिवस दूध संकलन बंद ठेवावे लागल्याने उत्पादकांना प्रसंगी दूध ओतून टाकावे लागले. महापुराच्या सात ते आठ दिवसांत उत्पादकांना सरासरी चार हजार ते १० हजार रुपयांचे नुकसान झाले. काही उत्पादकांनी पूरग्रस्तांना दूध वाटप केले. शहरी भागात गोकुळ आणि वारणा दूध संघांनी दूध वितरण करुन तुटवडा भासू दिला नाही. गोकुळच्या उत्पादकांचे महापुराच्या काळात साडेसात ते दहा कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

महापुरात दगावलेल्या जनावरांना सरकाकडून मदत जाहीर केली आहे. त्यामध्ये गायी, म्हशींना ३० हजार रुपये, बैलांना २५ हजार, वासरे, रेडकू याला १६ हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. पण, सरकारकडून मिळणारी मदत तुटपुंजी असल्याचे पशूपालकांचे मत आहे. महापुरानंतर जगलेली जनावरे आजारी पडल्याने उत्पादकांना औषधोपचाराचा खर्च वाढला. महापूर आणि अतिवृष्टीने वैरणीला मोठा फटका बसला. अनेक शेतकऱ्यांची वैरण कुजल्याने मिळेल त्या ठिकाणाहून चढ्या दराने वैरण खरेदी करावे लागत आहे.

महापुरात दगावलेल्या जनावरांना मिळणारी मदत तुटपुंजी आहे. चार ते पाच दिवस दूध संकलनात खंड पडला. तीन दिवस संकलन ठप्प झाल्याने उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. उत्पादकांचे झालेले नुकसान भरून देण्यासाठी दूध संघ आणि सरकारने प्रयत्न करण्याची गरज आहे.

- नवनाथ खोत, चांदेकरवाडी (ता. राधानगरी)

महापुरात मृत्यू पावलेली जनावरे

गाय १४६

म्हैशी १५५

वासरे, रेडके ६१

शेळी मेंढी ११५

इतर १५

कोंबड्या ४३,९२३

एकूण ४४,४१५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महसूल प्रशासन विस्कळित

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यांसह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या कार्यालयांतील ६०० महसूल कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले. त्यामुळे महसूल कामकाज विस्कळित झाले. दिवसभर कार्यालयात शुकशुकाट होता. राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या येथील जिल्हा शाखेच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे.

संघटनेने पूर्वी घोषित केल्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयासह तालुका पातळीवरील सुमारे ६०० महसूल कर्मचारी काम बंद आंदोलनात सहभागी झाले. जिल्हाधिकारी कार्यालयातील आंदोलनातील कर्मचारी नेहमीप्रमाणे सकाळी कामावर आले. मात्र, कर्मचारी कार्यालयात न जाता प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या मंडपात एकत्र आले. तेथे त्यांनी दुपारपर्यंत ठिय्या मारला. करवीर, हातकणंगले या तालुक्यांसह जवळपासचे कर्मचारीही येथील ठिय्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. प्रामुख्याने पदोन्नतीने झालेले नायब तहसीलदार, सर्व अव्वल कारकून, चालक, शिपाई आणि पदोन्नतीने झालेले मंडल अधिकारी आंदोलनात सहभागी झाले. त्यामुळे कामकाजावर परिणाम जाणवला. अनेक विभागांतील कामकाज पूर्णपणे बंद राहिले.

संघटनेचे अध्यक्ष सुनील देसाई, अखिल शेख, संदीप पाटील, नवनाथ डवरी, अश्विनी कारंडे, राणी शिरसाट, स्नेहल जाधव यांच्यासह पदाधिकारी, कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत.

प्रमुख मागण्या

नायब तहसीलदार पदावरील सरळसेवा निवडीचे प्रमाण ३३ टक्क्यांवरून २० टक्के करावे, विभागांतर्गत बदलीचे अधिकार विभागीय आयुक्तांना द्यावेत, प्रत्येक तालुक्यात खनिकर्म निरीक्षक म्हणून अव्वल कारकुनांची नियुक्ती करावी, महसूल कर्मचाऱ्यांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा द्याव्यात, शिपाई संवर्गातून तलाठी संवर्गात पदोन्नती मिळावी, नवीन योजना राबवताना त्यासाठी स्वतंत्र कर्मचारी द्यावेत, वयाच्या ५३ वर्षानंतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या पसंतीनुसार बदलीचे ठिकाण मिळावे, महसूल लिपिकांचे पदनाम बदलावे या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

पूरग्रस्तांच्या मदत वाटपात अडथळा

कोल्हापूर जिल्ह्याला ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात महापुराचा तखाडा बसला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मालमत्ता आणि शेतीची हानी झाली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीबाबत नुकसानभरपाईचे वाटप, पंचनाम्याचे काम सुरू असतानाच कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्याने महसूल प्रशासनात शिथिलता आली आहे. पूगग्रस्तांना जिल्या जाणाऱ्या मदत वाटपातही अडथळा आला आहे. महसूल विभागांतील कामानिमित्त कार्यालयात आलेल्या सामान्य लोकांनाही रिकाम्या हातांनी परत जावे लागले. त्यांचा वेळ आणि पैसाही वाया गेला.

जिल्हा परिषदेत काळ्या फिती लावून काम

राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाच्या आंदोलनाला जिल्हा परिषदेतील लिपिकवर्गीय संघटनेने पाठिंबा देताना गुरुवारी काळ्या फिती लावून कामकाज केले. यामध्ये मुख्यालयातील ५५० हून अधिक कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. जिल्हा परिषदेतील विविध संघटनेच्या प्रतिनिधींची बुधवारी सायंकाळी बैठक झाली होती. बैठकीत आंदोलनाची रुपरेषा ठरविली. त्यानुसार गुरुवारी जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेसह अन्य संघटनाही त्यामध्ये सहभागी झाल्या. तालुका व गावपातळीवरील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत गुरुवारी काळ्या फिती लावून निषेध नोंदविला. महसूल कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी लिपिकवर्गीय कर्मचारी नऊ सप्टेंबर रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप करणार आहेत. यांदरम्यान सरकारने मागण्यांची दखल घेतली नाही तर ११ सप्टेंबरपासून जिल्हा परिषदेचे कर्मचारी बेमुदत संपावर जातील असा इशारा संघटनेने दिला.

महसूल कर्मचारी संघटनेतर्फे गेल्या दीड महिन्यांपासून विविध टप्यांवर आंदोलन केले जात आहे. तरीही सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे गांभिर्याने पाहिले नाही. बुधवारी बैठक घेऊन संघटनेच्या राज्य पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. चर्चेत मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देऊन सरकारने आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र यापूर्वी सरकारने कर्मचाऱ्यांसंबंधी दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. हा अनुभव लक्षात घेऊन बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनास तलाठी संघटनेने पाठिंबा दिला आहे.

- सुनील देसाई, जिल्हा अध्यक्ष, महसूल कर्मचारी संघटना

चालकाअभावी अडचण

जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासह उपजिल्हाधिकाऱ्यांच्या सरकारी वाहनांवरील चालकही आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी देसाई यांना राष्ट्रीय महामार्ग विभागाकडील चालकाला बोलावून घेऊन कार्यालयात यावे लागले. नेहमीचे शिपाई, चालकही आंदोलनात सहभागी झाल्याने अधिकाऱ्यांचीही गैरसोय झाली. काही उपजिल्हाधिकारी स्वत:चे वाहन घेऊन कार्यालयात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आली गौराई अंगणी

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'आलीस का गौराई... कशाच्या पायी... भाजी भाकरीच्या पायी... आंबिल घुगऱ्यांच्या पायी... धनधान्याच्या पायी... सुखशांतीच्या पायी' असे म्हणूत गुरुवारी सकाळी घराघरात गंगा-गौरीचे उत्साहात आगमन झाले. पावसाच्या सरी झेलत पंचगंगा नदीघाट, रंकाळा तलाव येथून महिला व मुलींनी वाजत गाजत गौरीचे डहाळे आणले. भरजरी साड्या नेसून गौरी आवाहनासाठी आलेल्या महिलांनी पंचगंगा घाट, तलावाच्या काठावरच झिम्मा-फुगडीचे फेर धरले. दुपारनंतर गौरी उभारण्यात आल्या.

गणेशोत्सवात गणपतीपाठोपाठ येणाऱ्या गंगा गौरीच्या आगमनाचीही उत्सुकता असते. गुरूवारी ही उत्सुकता संपली आणि पारंपरिक पद्धतीने गौरी घेण्यात आल्या. सकाळपासूनच पावसाने सुरुवात केली तरी पाणवठ्यावरून गौरी आणण्यासाठी महिला व मुली एकत्र जमल्या. हलगी, ढोल ताशांच्या गजरात व गौरीच्या गाण्यांच्या ठेक्यावर मोठ्या उत्साहात गौरी वनस्पतीचे पूजन करण्यात आले. तांब्याच्या कळशीची पूजा करण्यात आली. त्यानंतर गौरीच्या वनस्पतीचे पूजन करून पारंपरिक वाद्याच्या गजरात गौरी आवाहन करण्यात आले. लहान मुलींपासून मोठ्या महिलांपर्यंत उत्साहाच्या सरी यावेळी बरसल्या. सकाळच्या टप्प्यात गौरी आवाहन झाल्यानंतर घराघरात तांदळाची भाकरी, आल्यापाल्याची भाजी व पाटवडीचा नैवेद्य दाखवण्यात आला. परंपरेनुसार गौरीची भाजी-भाकरी शिदोरी म्हणून शेजाऱ्यांना वाटण्यात आली. दुपारनंतर गौरी सजवण्याची लगबग सुरू झाली. स्टँडवर गौरीचे मुखवटे लावून साडी, दागिन्यांनी गौरीच्या मूर्ती मढवण्यात आल्या. गुरुवारी गौरी आल्यामुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शुक्रवारी गौरीचे वसा पूजन होणार आहे.

पाणवठे गजबले

गौरी आवाहनावेळी रंगलेल्या झिम्मा फुगडीच्या गाण्यांनी शहरातील पाणवठे गजबजले. पावसाची उसंत मिळेल तेव्हा महिला व मुली फेर धरत होत्या. पंचगंगा नदीघाटावर पाण्याने भरलेल्या कळशी ठेवून त्याभोवती महिलांचा झिम्मा रंगला. मराठमोळ्या वेशभूषेत आलेल्या महिलांनी नदीचे पूजन केले. पंचगंगा नदीघाट, रंकाळा तलाव, कोटीतीर्थ तलाव, लक्षतीर्थ तलाव येथेही गौरी आवाहनासाठी गर्दी झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पर्यावरणपूरक विसर्जनासाठी जय्यत तयारी

$
0
0

जिल्हा परिषदेचे गाव पातळीवर नियोजन

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने गावपातळीवर नियोजन केले आहे. मूर्ती दान व निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना केल्या आहेत. मूर्ती दान उपक्रमासाठी काहिलींची व्यवस्था व जमलेले निर्माल्य जमा करण्यासाठी वाहनांची सोय केली जाणार आहे. यासाठी गावपातळीवर संपर्क प्रमुखांच्या नेमणुका केल्या आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाने नुकतीच गटविकास अधिकाऱ्यांची बैठक घेतली. जलस्त्रोत दूषित होणार नाहीत, पर्यावरणाची हानी होणार नाही यासंदर्भात मार्गदर्शन केले आहे. मूर्ती विसर्जन, संकलित निर्माल्याची वाहतूक, प्रबोधन फलक लावण्यात येणार आहेत. पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी गावागावात काहिलींची व्यवस्था असणार आहे.

ग्रामसेवक संपावर, जबाबदारी इतरांवर

प्रशासनाने, पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी ग्रामपंचायतींना सूचना केल्या आहेत. ग्रामपंचायतीमधील कामकाज व्यवस्थापनात ग्रामसेवक हा महत्वाचा घटक आहे. सध्या ग्रामसेवक संपावर असल्यामुळे प्रशासनाने सुचविलेल्या उपाययोजनांच्या अंमलबजावणी गावपातळीवर कुणी करायची असा प्रश्न आहे. दरम्यान यासंदर्भात अन्य अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत असे सांगण्यात आले.

बंदोबस्ताला पाचशेहून अधिक पोलिस

घरगुती गणपती विसर्जनासाठी चोख बंदोबस्ताची तयारी पोलिस प्रशासनाने केली आहे. त्यासाठी पंचगंगा नदीघाट, दत्तोबा तांबट कमान, राजाराम तलाव, रंकाळा, कोटितीर्थसह, कळंबा तलाव आदी ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी ठिकठिकाणी नियुक्त केले आहेत. जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, करवीर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विसर्जन करणाऱ्या ठिकाणी बंदोबस्त नेमला आहे. गर्दीचा फायदा घेऊन होणारे धोके लक्षात घेऊन महिलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र पथकाची स्थापना केली आहे. हुल्लडबाज तरुणांकडून गर्दीच्या ठिकाणी महिला तसेच तरुणींची छेडछाड होण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी चोख नियोजन केले आहे. पथकात साध्या वेशातील पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश केला जाणार आहे. विसर्जनाच्या ठिकाणी पोलिस मित्र, परिसरातील मंडळाच्या स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे. विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना शहर पोलिस उपअधीक्षक कार्यालयाने सूचना केल्या आहेत. निर्भया पथकाने दिवसरात्र गस्त सुरू केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेदगंगेचे पाणी पात्र

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी

गारगोटीसह भुदरगड तालुक्यात आज दिवसभर पावसाची संततधार सुरूच असून तालुक्याच्या पश्चिमेकडील कडगाव पाटगाव परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. गेल्या २४ तासांत पाटगाव परिसरात तब्बल १५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातून सुमारे १७०० क्युसेक व पॉवर हाऊसमधून ३०० क्युसेक असे एकूण दोन हजार क्युसेक वेगाने पाणी वेदगंगा नदी पात्रात येत असल्याने पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे पाणी पात्राबाहेर आले आहे.

नुकत्याच आलेल्या महापुरामुळे जनजीवन सावरतेय तोपर्यंत पुन्हा मुसळधार पावसाने सुरुवात झाल्याने नदीकाठच्या लोकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पाटगाव, वेसर्डे, कोंडुशी व डेळे या डोंगराकाटच्या परिसरात मुसळधार पाऊस होत आहे. या परिसरात धुक्याची दाट छाया निर्माण झाली आहे. या परिसरातील कोंडुशी तलावाच्या सांडव्यावरून तीन ते चार फूट पाण्याचा विसर्ग सुरू असून कोंडुशी डोंगरावरील 'सडा' नावाच्या पठारावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा ओघ वाढत आहे.

पाटगाव धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार अतिवृष्टी होत आहे. या विभागातील आडे, तळी, मळी, भटवाडी व मानोपे या पश्चिम घाट माथ्यावरील गावात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. पाटगाव धरणात शंभर टक्के पाणी साठा झाला आहे.

आजच्या दिवसापर्यंत एकूण ६२०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे या परिसरातील पाटगाव, सुख्याचीवाडी, तांबाळे आदी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या काठोकाठ पाणी आहे. पावसाचा ओघ असाच राहिल्यास या बंधाऱ्यांवर पाणी येण्याची शक्यता आहे. वेदगंगेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने नदी काठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कागदोपत्री पंचनामे, नुकसान मोठे

$
0
0

मिलिंद पांगिरेकर, गारगोटी

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अति अतिवृष्टी आणि महापुरामुळे भुदरगड तालुक्यातील २३ घरे पुर्णतः पडली तर ११३२ घरांची अंशतः पडझड झाली. या पावसाचा कूर व शेणगाव या ठिकाणी पुराचा सर्वाधिक फटका बसला येथील अधिक घरे पडली आहेत. घराच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून तालुक्यातील १४७ पूरबाधित कुटुंबांना पाच हजार रुपये रोख व उर्वरित रक्कम खात्यावर असे १४ लाख ७० हजार रुपयाचे सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले आहे. सरकारी पातळीवर पंचनामे दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात नुकसानीचा आकडा मोठा आहे.

पावसामुळे तालुक्यात ऊस पिकाचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील पिकेही पाण्याखाली गेल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. पण बऱ्याच गावात वर्षानुवर्ष देवस्थान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना त्या जमिनीचे पंचनामे होत नसल्याने नुकसान भरपाई मिळणार नाही, तसेच विहिरींच्या नुकसानीचे पंचनामे होत नसल्याने त्यामुळेही शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे.

ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टी व त्यामुळे आलेला महापूर याचा परिणाम मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वेदगंगा नदी काठावरील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. पूर्णतः घरे पडलेल्या काही कुटुंबांच्या राहण्याची व्यवस्था नातेवाईकांकडे तर काहींना भाड्याच्या घरात रहावे लागत आहे. १४७ पूरबाधित कुटुंबांना निर्वाह भत्ता एक लाख, ६९ हजार, १८५ रुपये देण्यात आला आहे. तालुक्यातील ९८८४ शेतकऱ्यांच्या सुमारे १३३३ हेक्टर जमिनीतील पिके पाण्याखाली जाऊन कोट्यवधीचे नुकसान झाले. वेदगंगा नदीच्या महापुराचे पाणी ऊस पिकात १० ते १२ दिवसांपेक्षा जास्त काळ राहिल्यामुळे ऊसाचे प्रचंड नुकसान झाले आहे. महापुराचे पाणी अधिक काळ ऊस पिकात राहिल्यामुळे ऊस पिकाचे अस्तित्व शोधण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. नदी-नाल्याकाठीचे ऊस पीक तर भुईसपाटच झाले आहे. उसाच्या सुरळीत चिखल गेल्याने ऊस फार काळ तग धरणार नाही. त्यामुळे ऊस पिकाचे सुमारे ७० ते ८० हजार टनांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे.

वेदगंगा नदी मार्गावरील गावात महापुराचा सर्वाधिक फटका बसला. तालुक्यातील ११३२ घरांची पडझड झाली. आपत्तीच्या काळात प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी, तहसीलदार अमोल कदम यांनी स्वयंसेवकांसारखी भूमिका बजावत प्रत्यक्ष मदतकार्य केले. त्यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी चांगलीच कामगिरी करत सरकारी यंत्रणा गतिमान केली होती. डॉ. खिलारी यांच्या पुढाकारानेच तालुकास्तरावरील सर्व पक्ष, संघटनांना एकत्रित करून पूरग्रस्त निधी संकलन झाले. महापुरानंतर महसूल विभागाने पंचनाम्याचे काम हाती घेऊन प्रत्येक गावातील पडझड झालेल्या घरांसह पिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले. मात्र सरकारी पंचनाम्यापेक्षा प्रत्यक्ष नुकसानीची आकडेवारी कितीतरी अधिक आहे.

तालुक्यात पडझड झालेल्या घरांची गाव निहाय संख्या : गारगोटी (३९), हणबरवाडी (१७), शिंदेवाडी (१), खानापूर (४०), आंबवणे (६), कलनाकवाडी (११), मडिलगे बुद्रुक (२८), गंगापूर (२९), पळशिवणे (२२), पुष्पनगर (४९), फणसवाडी (२६), सालपेवाडी (१६), करडवाडी (२५), निष्णप (१०), पारदेवाडी (२५), कुंभारवाडी (३), शेणगाव (३६), आकुर्डे (१७), दोनवडे (९), नितवडे (८), खेडगे (१), एरंडपे (५), गिरगाव (३), फये (१०), देवकेवाडी (१), म्हसवे (२१), महालवाडी (२), मोरेवाडी (८), कोळवण (१३), हेदवडे (११), पाळेवाडी (१), सोनारवाडी (२०), मुडूर (१६), पेठशिवापूर (२), कडगाव (२५), तिरवडे (२६), पाटगाव (१३), मठगाव (७), कोंडोशी (११), वासनोली (४), दासेवाडी (५), अनफ बुद्रूक (३), चांदमवाडी (१), कुडतरवाडी (३), करंबळी (१), भालेकरवाडी (३), थळ्याचीवाडी (४), तांबाळे (२), अंतुर्ली (३), शिवडाव (६), अनफ खुर्द (३), पाळ्याचाहुडा (५), डेळे (२), अंतिवडे (१), उकिरभाटले (१), वेसर्डे (८), कारिवाडे (९), देऊळवाडी (१२), देवर्डे (५), नवले (११), मेघोली (२), सोनुर्ली (५), ममदापूर (५), शेळोली (८), पडखंबे (१३), न्हाव्याचीवाडी (८), वेंगरूळ (१६), पिंपळगाव (२९), बामणे (१४), पाल (९), नांगरगाव (२९), भेंडवडे (१०), बारवे (११), पांगिरे (४५), हेळेवाडी (१२), नागणवाडी (१२), दिंडेवाडी (१०), मानवळे (२२), मुरूक्टे (२), आरळगुंडी (९), बेगवडे (५), बेडीव (३), कूर (५५), कोनवडे (२७), वाघापूर (१८), व्हनगुती (५), मुदाळ (१८), आदमापूर (१८), नाधवडे (२७), टिक्केवाडी (१८), निळपण (१७), दारवाड (१५), पाचवडे (१३), मिणचे बुद्रूक (२५), लोटेवाडी (९), बसरेवाडी (१०), भाटिवडे (१९), नवरसवाडी (८), पंडिवरे (८).

पुर्णतः पडलेल्या घरांची गाव निहाय संख्या :

फणसवाडी (१), सालपेवाडी (३), मोरेवाडी (१), शेणगाव (७), कूर (१०), नाधवडे (१) तालुक्यात घरांच्या पडझडी बरोबरच पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

तालुक्यातील १४६ पूरबाधित कुटुंबांना सानुग्रह अनुदान, निर्वाह भत्ता वाटप करण्यात आले आहे. सुमारे ९८८४ शेतकऱ्यांच्या १३३३ हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाईसाठी आवश्यक अनुदानाची मागणी करणेत आली आहे.

अमोल कदम, तहसीलदार भुदरगड

मुसळधार पावसाने आम्हाला बेघर केले. प्रशासनाने सानुग्रह अनुदान तत्काळ दिले. पण गावातील सर्व अबालवृद्धांनी एकदिलाने आम्हा कुटुंबीयांना लागेल ती सर्व मदत केली. त्यांचे ऋण मी कधी विसरू शकणार नाही. सरकारने कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी सहकार्य करावे.

- अनिल कोरगावकर, पूरग्रस्त शेणगाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माध्यमिक शिक्षक संघटनेचे आंदोलन स्थगित

$
0
0

कोल्हापूर : माध्यमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांच्या सोडवणुकीसाठी आठवडाभरात बैठक घेण्याची ग्वाही मिळाल्यामुळे कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. करवीरचे तहसिलदार सचिन गिरी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक होणार असल्याचे सांगितले. यामुळे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचे संघटनेने म्हटले आहे. शिक्षक दिनीच शिक्षकांनी आत्मक्लेश आंदोलन जाहीर केल्यामुळे ते थांबविण्यासाठी अधिकाऱ्यांच्या पातळीवर धावपळ सुरू होती. सरकारकडे अनेक वर्षे पाठपुरावा करुनही माध्यमिक शिक्षकांचे प्रश्न सोडविले नाहीत. सरकारच्या या भूमिकेच्या निषेधार्थ माध्यमिक शिक्षक संघातर्फे गुरुवारी, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कावळा नाका येथील कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन जाहीर केले होते. त्यानुसार दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शिक्षक कार्यालयासमोर थांबले. याप्रसंगी पोलिसांनी मध्यस्थी केली आणि अधिकाऱ्यांशी चर्चा घडवून आणली.

तहसिलदार गिरी व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. विविध मागण्यासंदर्भात आठवडाभरात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार असल्याचे सांगितले. आंदोलनात बी. डी. पाटील, बी. एस. खामकर, अनिल चव्हाण, सुरेश खोत, पी आर. पाटील, तिलोत्तमा सोनवणे आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गायीच्या खरेदी दूध दरवाढप्रश्नी बैठक आज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी दूध संघांच्या प्रतिनिधींची गायीच्या खरेदी दूध दरवाढीवर निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी (ता. ६) दुपारी चार वाजता ताराबाई पार्क येथील 'गोकुळ'च्या कार्यालयात बैठक होणार आहे. या बैठकीत गायीच्या खरेदी दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष व राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे.

पुण्यातील दूध संघांनी गायीच्या खरेदी दूध दरात प्रतिलिटर तीन रुपयांनी वाढ केली असून प्रतिलिटर २८ रुपये दर देण्याची अंमलबजावणी एक सप्टेंबरपासून सुरु केली. बाजारात दूध पावडर आणि लोण्याच्या दरात वाढ झाल्याने गायीच्या दुधाला मागणी वाढली आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील दूध उत्पादक संघांनी दूध दरवाढीबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. दूध उत्पादकांकडून दरवाढीची मागणी होऊ लागल्याने शुक्रवारी बैठक होत आहे. या बैठकीला कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील गोकुळ, वारणा, शाहू, स्वाभिमानी, प्रतिभा, कृष्णासह सहकारी व खासगी दूध संघांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत गायीच्या खरेदी दूधदरात वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images