Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

देखाव्यांची लगबग सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापुराच्या पार्श्वभूमीवर अनावश्यक खर्च टाळून सार्वजनिक मंडळांकडून देखावे सादर करण्यासाठी नियोजन सुरू केले आहे. घरगुती गणपती विसर्जनानंतर देखावे खुले होणार असले तरी यंदा देखाव्यांची संख्या कमी असण्याची शक्यता आहे. अनेक मंडळांकडून पूरस्थितीवर आधारित देखाव्यांवर भर देण्याचे नियोजन केले आहे.

महापुराचा शहराला मोठा फटका बसल्याने शहरातील तालमी आणि मंडळांनी मदतकार्यात झोकून दिले होते. अनेक मंडळांनी सामाजिक बांधिलकी जपताना उत्सवातील सर्व कार्यक्रम रद्द करून पूरग्रस्तांना मदत जाहीर केली आहे, तर काही मंडळे सामाजिक प्रबोधन करणारे देखावे सादर करणार असून, उत्सवातील शिल्लक रक्कम पूरग्रस्तांना देणार आहेत.

शहरातील बहुतांश मंडळांनी आकर्षक मूर्ती बुक केल्या असल्याने त्यांची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहेत. शनिवार पेठेतील न्यू अमर तरुण मंडळ, ओम ग्रुप, जोशी गल्ली सरंक्षक तरुण मंडळ, गवळी गल्ली कॉर्नर ही मंडळे वेगळ्या रूपातील मूर्तीची प्रतिष्ठापना करणार आहेत. जुना बुधवार पेठेतील डांगे गल्ली तरुण मंडळ 'पूरग्रस्तांना घर बांधून देणारे गणराय' हा देखावा सादर करणार आहेत. मंडळाकडून जमा झालेल्या सभासद वर्गणीतील २५ हजार रुपयांची मदत सांगली व कोल्हापुरातील पूरग्रस्त कुटुंबांना करणार आहेत.

राजगुरू तरुण मंडळाकडून 'शाहूकालीन जलव्यवस्थापन' हा तांत्रिक देखावा सादर केला आहे. दरवर्षी गणेशभक्तांचे आकर्षण असलेल्या सोल्जर्स ग्रुपकडून 'आपत्ती व्यवस्थापन' हा देखावा सादर करणार असून, देखाव्याची मांडणी करण्याचे नियोजन सुरू झाले आहे. नुक्कड तरुण मंडळाच्या वतीने 'महापुराचा शहराला विळखा' या देखाव्याची मांडणी करणार आहेत.

मंगळवार पेठेतील मंडळांनी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करून पूरग्रस्तांना घर बांधून देण्याचा उपक्रम जाहीर केला आहे. शिवाजी पेठेतील मंडळांनी मदतीबरोबर जिवंत देखावे सादर करण्यासाठी विषयाची तयारी सुरू केली आहे. अवचितपीर तालीम मंडळाकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित जिवंत देखावा सादर करणार आहेत. त्यासाठी मंडळाने मंडप उभारला आहे.

तांत्रिक देखाव्याची परंपरा असलेल्या राजारामपुरीतील जय शिवराय तरुण मंडळाच्या वतीने राम-लक्ष्मण यांना खांद्यावर घेऊन युद्धाला जाणाऱ्या हनुमानाचा देखावा सादर केला जाणार आहे. देखाव्यांची मांडणी करण्याचे काम सुरू असून, हनुमानाची भव्य प्रतिकृती पाहण्यासाठी लहान मुलांची गर्दी होऊ लागली आहे.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गावनिहाय होणार मृदा आरोग्य पत्रिका

केंद्रीय पथक आजपासूनपूरग्रस्त भागांच्या दौऱ्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात महापुरामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी आज, गुरूवारपासून दोन दिवस केंद्राचे पथक दाखल होत आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सहसचिव डॉ. व्ही. थिरूपूगझ यांच्या नेतृत्वाखाली हे पथक असेल. गुरूवारी दिवसभर सांगली आणि शुक्रवारी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध पूरग्रस्त भागास ते भेट देणार आहेत.

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात महापूर आला. हजारो लोकांना स्थलांतरित व्हावे लागले होते. यामध्ये घरे आणि शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पूरग्रस्त कुटुंबांना ग्रामीण भागात १० हजार आणि शहरी भागात १५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जात आहे. पशुधन खरेदी, घर बांधकामांसह विविध उपाययोजनांसाठी ६८१३ रूपयांचा प्रस्ताव राज्याकडून केंद्राकडे पाठवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली जाईल. सांगली जिल्ह्यातील दौऱ्यानंतर शुक्रवारी पथक कोल्हापूर जिल्ह्यातील अर्जुनवाड, कुरूंदवाड, इचलकरंजी, आंबेवाडी, चिखली आणि शहरातील विविध ठिकाणी भेट देईल. पथकात कृषी विभागाचे आर. पी. सिंग, ऊर्जा विभागाचे ओमकिशोर, रस्ते वाहतूक व महामार्ग विभागाचे संजय जैसवाल, ग्रामीण विकास विभागाचे व्ही. पी. राजवेदी, जल शक्ती विभागाचे मिलिंद पानपाटील यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार प्रणिती शिंदे अडचणीत; न्यायालयाने काढले वॉरंट

$
0
0

आमदार प्रणिती शिंदे अडचणीत;

न्यायालयाने काढले वॉरंट

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

जिल्हा नियोजन बैठकीच्या वेळेस जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना घेराव घालण्याचा प्रयत्न करताना धक्काबुक्की करून पोलिसाला जखमी केल्याप्रकरणी न्यायालयात दाखल असलेल्या खटल्याच्या तारखेला हजर न राहिल्या प्रकरणी आमदार प्रणिती शिंदे, नगरसेवक चेतन नरोटे यांना मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी जामीनपात्र वॉरंट बजावले आहे. तसेच या प्रकरणात न्यायालयात हजर झालेल्या माजी आमदार प्रकाश यलगुलवार, शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्यासह सात जणांना सत्र न्यायालयाने आणखी दोन दिवस अंतरिम जामीन वाढवून दिला आहे.

जिल्हा नियोजन समितीची २ जानेवारी २0१८ रोजी बैठक होती. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी जात असताना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी औषधोपचारावर झालेली दरवाढ रद्द करा, अशी घोषणाबाजी करीत गाडी अडवून घेराव घालण्याचा प्रयत्न केला. या वेळी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांबरोबर कार्यकर्त्यांनी हमरीतुमरी करून ढकलाढकली केली होती. यात पोलिस कर्मचारी खाली पडून जखमी झाला होता. या प्रकरणी आमदार प्रणिती शिंदे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश वाले, नगरसेवक चेतन नरोटे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्यासह आंदोलकांवर सदर बझार पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून आरोपींविरूद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते.

या प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार माजी आमदार प्रकाश यलगुलवार, काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश वाले, युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास करगुळे, केशव इंगळे, राहुल वर्धा, बशीर शेख, करीम शेख हे सात जण मुख्य न्यायदंडाधिकारी खेडेकर यांच्यासमोर हजर झाले. न्यायदंडाधिकाऱ्यांनी आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला. त्यावर आरोपींच्या वकिलांनी अंतरिम जामिनावर युक्तिवाद करताना आरोपी माजी आमदार, बँकेचे चेअरमन आहेत, असे निदर्शनाला आणले. त्यावर न्यायदंडाधिकाऱ्यांनी आरोपींना २७ ऑगस्टपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला. त्यावर रात्री उशिरा आरोपींना जामिनावर सोडण्यात आले. त्यावर आरोपींनी मंगळवारी अ‍ॅड. प्रवीण शेंडे, अ‍ॅड. अमित आळंगे, अ‍ॅड. भीमाशंकर कत्ते, अ‍ॅड. एस. एस. कालेकर यांच्यामार्फत मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशाविरूद्ध सत्र न्यायाधीश आवाड यांच्या न्यायालयात जामिनाचा अर्ज दाखल करून त्यावर न्यायाधीशांनी सरकारी वकिलांचे म्हणणे दाखल करण्यासाठी २९ ऑगस्टपर्यंत आरोपींना अंतरिम जामीन मंजूर केला. दरम्यान, न्यायालयाच्या वॉरंटनुसार या प्रकरणात जामीन मिळविण्यासाठी लवकरच न्यायालयात अर्ज करणार असल्याचे संबंधितांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक सप्टेंबर रोजीअमित शहा सोलापुरात

$
0
0

एक सप्टेंबर रोजी

अमित शहा सोलापुरात

सोलापूर :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा समारोप रविवारी (१ सप्टेंबर) सोलापुरात होणार आहे. या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती यात्रा प्रमुख आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी दिली. पार्क मैदानावर जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपने राजकीय व्यभिचाराचा कळस गाठला

$
0
0

भाजपने राजकीय व्यभिचाराचा कळस गाठला

जयंत पाटील यांचा हल्लाबोल; शिवस्वराज्य यात्रा सोलापुरात

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

'भाजपने राज्यात राजकीय व्यभिचाराचा कळस गाठला आहे,' असा जोरदार आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केला. ते पंढरपूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. पत्रकार परिषदेला खा. डॉ. अमोल कोल्हे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, प्रदेश सरचिटणीस अमोल मेटकरी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, 'काही नेते बँक व कारखान्यांच्या कर्जाला घाबरून, तर काहींना आमिष दाखवली जात आहेत. त्यामुळे पक्षांतराचे प्रमाण वाढत आहे. सत्तेचा आश्रय हवा म्हणून ते जात आहेत. राज्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसची ताकद जास्त आहे म्हणूनच राष्ट्रवादीतून नेत्यांना फोडण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, नागरिक लोकसभेत जे केले ते विधानसभेत करतील, असे वाटत नाही. विधानसभेत व विधान परिषदेत प्रभावी भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मांडली आहे. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून आम्ही ताकद दाखवून दिली आहे. शिवसेनेमुळे भाजपला धोका नाही तर शिवसेनेच्या मुळावरच भाजप येणार आहे.'

......

विजयसिंह नक्की कोणाचे?

'विजयसिंह मोहिते-पाटील यांनी अजूनही पक्षाचा राजीनामा दिलेला नाही. ते ज्यासाठी दुसऱ्या पक्षात जायचा विचार करीत आहेत, त्या कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पाबबात जलसंपदामंत्र्यांनी कोर्टात वेगळेच प्रतिज्ञापत्र दिले आहे. त्यामुळे विजयसिंह मोहिते-पाटील यांनी विचार करावा,' असे आवाहन जयंत पाटील यांनी केले आहे. माळशिरस येथे शिवस्वराज्य यात्रेत बोलत होते.

अकलूज येथे नरेंद्र मोदी यांची सभा झाली होती. त्या वेळी विजयसिंह मोहिते-पाटील व्यासपीठावर उपस्थित राहिले होते. खुद्द नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ही विजयसिंह मोहिते-पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला नव्हता. शिवाय रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर ही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राजीनामा दिलेला नाही.

कृष्णा-भीमा स्थिरीकरणाचे कारण पुढे करून त्यांनी पक्ष बदलला होता. मात्र, हा प्रकल्प ही आता लांबणीवर पडला आहे. त्यामुळे विजयसिंह मोहिते-पाटील यांनी विचार करावा, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.

मध्य प्रदेश, छत्तीसगडची

पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार

मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्र्यांनी यात्रा काढली होती, त्या वेळी त्यांची सत्ता गेली आणि तीच पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार आहे, असे स्पष्ट मत जयंत पाटील यांनी पंढरपूरच्या जाहीर सभेत बोलताना मांडले.

आमच्या जामखेडच्या शिवस्वराज्य यात्रेत ३० हजार लोक उपस्थित होते आणि मुख्यमंत्र्यांच्या जामखेड येथील महाजनादेश यात्रेच्या सभेला अवघे ४ हजार लोक उपस्थित होते, हा दोन यात्रांना लोकांनी दिलेला प्रतिसाद आहे.

'पुन्हा मलाच मुख्यमंत्री करा, हे सांगण्यासाठी महाजनादेश यात्रा आहे,' अशी टीका डॉ. अमोल कोल्हे यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काम अपूर्ण मग सोहळा कशाला ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'नर्सरी बागेतील लोकराजा राजर्षी शाहू महाराज छत्रपती समाधीस्थळ सुशोभीकरणाची कामे अद्याप अपुरी आहेत. अपुऱ्या कामाबाबत महापालिका प्रशासन व ठेकेदार यांनी भूमिका मांडली आहे. लोकार्पण सोहळा लोकोत्सव होण्याची आवश्यकता असताना अपुरी कामे असताना सोहळ्याचे नियोजन करु नये,' अशी स्पष्ट भूमिका उपमहापौर भूपाल शेटे यांनी मांडली. नगरसेविका मेहजबीन सुभेदार यांनीही सर्वांना विश्वासात न घेता सोहळ्याची तारीख निश्चित केली कशी, असा संतप्त सवाल उपस्थित केला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर माधवी गवंडी होत्या.

स्थायी समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीप्रसंगी सत्तारुढ काँग्रेस-राष्ट्रवादीमधील मतभेद चव्हाट्यावर आले. उपमहापौर शेटे म्हणाले, 'समाधीस्थळामध्ये अपुरी कामे असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ठेकेदारांनी उर्वरीत कामासाठी आठ सप्टेंबरपर्यंत मुदत आवश्यक असल्याचे सांगितले आहे. जर कामे अपुरी असतील तर लोकार्पण सोहळा घेवू नये. लोकार्पण सोहळा एका पक्षाचा नसून सर्वपक्षीय आहे. हा लोकत्सव होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची वेळ घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.'

नगरसेविका सभेदार म्हणाल्या, 'सोमवारी (ता.२६) झालेल्या पाहणीदरम्यान दहा सप्टेंबरपर्यंत लोकार्पण सोहळा घेण्याचे निश्चित झाले होते. मग सर्वांना विश्वासात न घेता परस्पर कार्यक्रम ठरवला कसा? कामे अपुरी असताना कार्यक्रम घेताच कसा, असाही प्रश्न उपस्थित केला.

माजी नगरसेवक अदिल फरास म्हणाले, 'महापौरांच्या अधिकारात लोकार्पण सोहळा घेण्याचा निर्णय घेतला. महापौरांच्या राजीनाम्यानंतर राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता असल्याने कार्यक्रम निश्चित केले आहे. उर्वरीत कामांसाठी आवश्यक मनुष्यबळ देवू.' आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, 'समाधीस्थळ परिसरातील कामे पूर्ण होण्यास आठ सप्टेंबरपर्यंत वेळ लागेल असे ठेकेदारांनी स्पष्ट केले आहे. तरीही कामाचा निपटारा लवकर करण्यासाठी अधिक मनुष्यबळ लावावे.'

ठेकेदार व्ही. के. पाटील म्हणाले, 'लँडस्केप, विद्युतदिवे, कॅपिंग, लॉन व पेंटिंग करण्यासाठी आणखी दहा दिवसांचा कालावधी लागणार आहे.' इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत म्हणाले, 'लोकार्पण सोहळ्याच्यानिमित्ताने वाद निर्माण होऊ नये. लोकाराजा शाहूंचा कार्यक्रम असल्याने वाद निर्माण झाल्यास चुकीचा संदेश जाईल.'

बैठकीस माजी महापौर सरिता मोरे, हसिना फरास, नगरसेवक अशोक जाधव, जय पटकारे, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, प्रकाश गवंडी, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक आदी उपस्थित होते.

...

चौकट

सर्वच गटनेत्यांची बैठकीकडे पाठ

लोकार्पण सोहळा घेण्याची तारीख निश्चित झाल्याचे सर्वच नगरसेवकांना वृत्तपत्रातील बातम्यांद्वारे समजले. कोणालाही विश्वासात न घेतल्याबद्दल अनेकांनी याबाबतची नाराजी आपआपल्या पातळीवर व्यक्त केली. प्रशासनानेही बुधवारी तातडीने समाधीस्थळाची पाहणी केली. त्यानंतर महापालिकेत महापौरांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली. पण या बैठकीचीही माहिती पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांना दिली नाही. त्यामुळे सर्वच पक्षाच्या गटनेत्यांनी बैठकीकडे पाठ फिरवली.

...

चौकट

मुश्रीफ - सतेज पाटील आज चर्चा

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची वेळ मिळालेली असताना अपुऱ्या कामाप्रश्नी नगरसेवकांमध्ये मतभिन्नता निर्माण झाली. राजर्षी शाहू महाराज हे कोल्हापूरची अस्मिता असल्याने अनेकांना विरोध करणेही अवघड झाले. पण अपुरी कामे असून लोकार्पण सोहळा कोणाच्या तरी अट्टाहासासाठी घेतला तर टीकेचा धनी होण्याची शक्यता होती. त्याचे पडसाद बैठकीत उमटल्यानंतर बैठकीतील सर्वांनी केडीसीसी बँकेत आमदार हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. संपूर्ण माहिती घेतल्यानंतर पवारांच्या नियोजित दौऱ्याप्रमाणे कार्यक्रम घेण्यासाठी गुरुवारी ते आमदार सतेज पाटील यांची भेट घेणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंभर टक्के कर्जमाफी, घरांची पुनर्बांधणी करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'अतिवृष्टी आणि महापुरामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याची प्रचंड हानी झाली असून, सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी, पडझड झालेल्या घरांची पुनर्बांधणी करून द्यावी,' अशी मागणी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले.

खेडेकर यांच्यासह मराठा सेवा संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष प्राचार्य अर्जुन तनपुरे, जिल्हाध्यक्ष अश्विनकुमार वाघळे, उत्तमराव माने यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंगळवारी व बुधवारी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील पूरबाधित गावांचा दौरा केला. बुधवारी त्यांनी कुरुंदवाड, हेरवाड, सैनिक टाकळी, रांगोळी, जाधववाडी आदी भागाचा दौरा केला.

त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना खेडेकर म्हणाले, 'महापुराच्या कालावधीत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारी यंत्रणा, सामाजिक संस्था संघटनांनी केलेले कार्य कौतुकास्पद होते. दरम्यान, सरकारकडून सध्या पूरग्रस्तांना मिळणारी मदत तुटपुंजी आहे. शेजारील कर्नाटक राज्यात पूरग्रस्तांना तीन लाखांचे अर्थसाह्य मिळाल्याचे सांगितले जाते. तेव्हा महाराष्ट्र सरकारनेही पूरग्रस्तांना भक्कम मदतीचा हात द्यावा. कोणताही भेदाभेद न करता शंभर टक्के कर्जमाफी द्यावी, पडलेल्या घरांची पुनर्बांधणी करावी, हानी टाळण्यासाठी रेडझोनमध्ये होऊ घातलेल्या बांधकामाबाबत निर्णय घ्यावा.'

पत्रकार परिषदेला डॉ. जयश्री चव्हाण, अभिमन्यू पोवार, रूपेश पाटील, अजय शिंदे, संजय काटकर, डॉ. विकास पाटील, सुवर्णलता गोविलकर, चारूशीला पाटील, आदी उपस्थित होत्या.

०००

गृहोपयोगी साहित्यातून मिळेल उभारी

पूरग्रस्त भागातील महिला पूरस्थितीला मोठ्या धैर्याने सामोरे गेल्या. त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्या पूरग्रस्त भागात जाऊन संवाद साधत असल्याचेही खेडेकर यांनी सांगितले. दरम्यान पूरग्रस्त भागात अन्नधान्य व इतर मदत मोठ्या प्रमाणात पोहोचली. मात्र, पूरग्रस्त भागात गृहोपयोगी वस्तूंची आवश्यकता आहे. घरदार वाहून गेल्यामुळे पूरग्रस्तांना नव्याने संसार उभारताना प्रत्येक वस्तूची जुळवाजुळवा करावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साधेपणात उत्सवाचे वैभव जपा

$
0
0

गणराया अॅवार्डप्रसंगी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन, तुकाराम माळी तालीम मंडळाने पटकावले सर्वसाधारण विजेतेपद

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'महापुराच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सव सुरू होत आहे. कुणीही विचार केला नसेल इतका भयानक महापूर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात आला. या संकटावर मात करत कोल्हापुरातील संस्था, संघटना, तरूण, मंडळाचे कार्यकर्ते यांनी महापुरात लाखो पूरग्रस्तांना मदत करण्याचा आदर्श निर्माण केला. आता या आदर्शासोबत गणेशोत्सवातील उत्साहाचे वैभव साधेपणातही जपले जाऊ शकते हा आदर्शही दाखवून देण्याची संधी सार्वजनिक मंडळांना आहे. पडलेली घरे, बुडालेले व्यवसाय उभे करण्यासाठी उत्सवातील आर्थिक बळ पूरग्रस्तांना द्या,' असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

कोल्हापूर जिल्हा पोलिस दलाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या 'गणराया अॅवार्ड २०१८' या पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज होते. विजेत्या मंडळांच्या कार्यकर्त्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. यावेळी व्यासपीठावर खासदार संभाजीराजे छत्रपती, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, ' गणेशोत्सव सामाजिक सण म्हणून साजरा करत असताना एका कुटुंबाला उभं करण्याची जबाबदारी मंडळाने घ्यावी. ज्या व्यापारी, व्यावसायिकांचा व्यवसाय पूरपरिस्थतीनंतर अजूनही सुरू झालेला नाही त्यांच्या मदतीसाठी उत्सवातील डामडौल टाळून मदत करण्याची ही वेळ आहे. '

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, 'नैसर्गिक आपत्तीवर लोकसहभागाने कशी मात करता येऊ शकते हे कोल्हापूरने दाखवले. यामुळे सामाजिक बंध कणखर झाले. संकटाची दाहकता पाहता प्रशासनाची ताकद कमी पडली असती, मात्र कोल्हापूरकरच प्रशासनाची ताकद बनले.' आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, 'पूरकाळात कोल्हापूरकरांनी प्रशासनाला केलेली मदत कौतुकास्पद आहे.'

खासदार संभाजीराजे म्हणाले, 'तरूण मंडळांनी ठरवले तर गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरणपूरक उत्सवाला चालना मिळू शकते. पूरकाळात मंडळांच्या कार्यकर्त्यांनी, संस्था संघटनांनी एक चांगले उदाहरण दिले आहे.'

श्रीमंत शाहू महाराज म्हणाले, 'सामाजिक सलोखा जसा संकटकाळात दिसला तसाच तो उत्सवातही दिसावा, यासाठी मंडळांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.' जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पूरकाळात मदतकार्य केलेल्या सामाजिक संस्था व संघटनांच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला.

...

डॉल्बीमुक्तीच्या आदेशापेक्षा तुमचा निश्चय मोठा

'गणेशोत्सवाला नियमांची चौकट लावणे हा प्रशासनाच्या कामाचा भाग आहे. डॉल्बी लावू नका, असा आदेश प्रशासनाकडून दिला जातो. पण या आदेशाच्या कागदापेक्षा, डॉल्बी लावणार नाही असा मंडळांनी केलेला निर्धार खूप निर्णायक ठरू शकतो. त्यामुळे कारवाईची वेळ येणार नाही याचा विचार करून चुकीच्या गोष्टी उत्सवातून हद्दपार करा. प्रशासन केवळ आदेश देऊ शकते, लोकप्रतिनिधी आवाहन करू शकतात, मात्र अयोग्य गोष्ट करणार नाही हे मंडळांनी ठरवले तर गणेशोत्सव सामाजिक उत्सव होईल,' असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.

...

विजेती मंडळे

शहर विभाग

प्रथम क्रमांक

सर्वोदय मित्र मंडळ, राजाराम रोड, शाहूपुरी युवक मित्र मंडळ , जय शिवराज मित्र मंडळ उद्यमनगर, अर्जुन ग्रुप, जुना बुधवार पेठ

...

द्वितीय क्रमांक

भारतवीर मित्र मंडळ, कसबा बावडा, प्रिन्स क्लब,मंगळवार पेठ, विवेकानंद मित्र मंडळ, राजारामपुरी, डांगे गल्ली तरूण मंडळ, बुधवार पेठ

...

तृतीय क्रमांक

शिवाजीराजे तरूण मंडळ, कसबा बावडा, हुजूर गल्ली मंडळ, भाऊसिंगजी रोड, विश्वकर्मा मित्र मंडळ, जवाहरनगर, ऋणमुक्तेश्वर तरूण मंडळ, कुंभार गल्ली

...

करवीर विभाग

प्रथम क्रमांक

सुपरहिट तरूण मंडळ, कणेरीवाडी, अजिंक्य भगतसिंग ग्रुप, आर. के. नगर, साई ग्रुप, शिये, आदर्श स्पोर्टस, निगवे, गणेश तरूण मंडळ, वाडदे

...

द्वितीय क्रमांक

आझाद तरुण मंडळ, उजळाईवाडी ,छत्रपती शिवाजी तरुण मंडळ, भामटे , गणेश तरुण मंडळ टोप, एस. पी. स्पोर्ट्स, गडमुडशिंगी, तिरंगा ग्रुप, वडकशिवाले

...

तृतीय क्रमांक

विघ्नेश्वर मित्र मंडळ, कणेरी, महालक्ष्मी तालीम मंडळ, कळंबा, न्यू गणेश तरुण मंडळ, नागाव, आदर्श तरुण मंडळ ,ब्रह्मनाथ तरुण मंडळ, उचगाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मलकापूर नगरपरिषदेच्या इमारतीसाठी दीड कोटींचा निधी

$
0
0

मलकापूर नगरपरिषदेच्या

इमारतीसाठी दीड कोटींचा निधी

कराड :

मलकापूर नगरपरिषदेने शहरातील मध्यवर्ती ठिकाणी नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सुरू केले आहे. सदर इमारतीचे निम्म्याहून अधिक काम पूर्ण झालेले आहे. या इमारतीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सात कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. तथापि मंजूर निधी कमी पडू लागल्याने या इमारतीसाठी निधीची आवश्यकता असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे इमारतीच्या बांधकामासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी शिफारस करून आणखी निधीची मागणी केली होती. त्या अनुषंगाने १ कोटी ३५ लाखांच्या निधीचा पहिला हप्ता नगरविकास विभागाने मंजूर करून सदर निधी नगर परिषदेकडे वर्गही केला असल्याची माहिती मलकापूर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी बुधवारी दिली.

.........

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साताऱ्याच्या मनालीची 'इस्त्रो'त झेप

$
0
0

सातारा: भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे (इस्रो)मध्ये सातारा जिल्ह्यातील मनाली सपाटे हिची संशोधक शास्त्रज्ञ म्हणून निवड करण्यात आली आहे. मनाली सध्या एमटेकचे उच्च शिक्षण बंगळुरूत घेत असून एमटेकच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या गेट परीक्षेतही तिनं देशात तेरावं स्थान प्राप्त केलं होतं.

खटाव तालूक्यातील राजापूर या खेडेगावातील शाळेत मनालीनं प्राथमिक शिक्षण पूर्ण असून इंजिनिअरींगचं शिक्षण मुंबईत घेतलं. इंजिनिअरींगचं शिक्षण संपल्यानंतर मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीकडून चांगल्या पगाराच्या नोकरीची ऑफर तिनं नाकारून पुढं शिकण्याचा निर्णय घेतला.

मनालीचे वडिल महेंद्र सपाटे हे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागात विस्तारअधिकारी या पदावर असून आई गृहिणी आहे. मनालीच्या या यशाचं सर्वत्र कौतुक होत असून साताऱ्याचा झेंडा आता इस्रोत झळकणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कडकनाथ’ चा कोट्यवधींचा झटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कडकनाथ कोंबडी पालन प्रकल्पाच्या संचालकांनी ८ हजारांहून अधिक शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे समजते. गुंतवणूक केलेल्या शेतकऱ्यांच्या रक्कमा परत देवू शकत नसल्याने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील कार्यालयांना टाळे लावून संचालक पसार झाले आहेत. एका वर्षात ७५ हजाराच्या मोबदल्यात १ लाख रुपये मिळणार असल्याने हजारो गुंतवणूकदार आमिषाला बळी पडले.

कडकनाथ प्रकल्पाच्या इस्लामूपर येथील कार्यालयासह कागल, राधानगरी, भुदरगड तालक्यातील शेतकऱ्यांनी पोलिस ठाण्याकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. गुंतवणूकदारांनी कंपनीच्या इस्लामपूर कार्यालयाला टाळे ठोकले आहे.

कडकनाथ कोंबड्यांचे पालन करुन लाखो रुपयांचे आमिष शेतकऱ्यांना दाखविण्यात आले. त्यांना पद्धतशीरपणे गुंतवणूक करण्यास भाग पाडले. एकाच वेळी इतकी मोठी रक्कम गुंतवणूक करण्यापेक्षा दोन टप्प्यात रक्कम स्वीकारण्याची युक्ती कंपनीने राबविली. प्रकल्प सुरु करण्यासाठी ७५ हजारांची गुंतवणूक करायची. पैकी ४० हजार रुपये पक्षी घेताना आणि उर्वरित ३५ हजार रुपये तीन महिन्यानंतर असे दोन टप्प्यात ७५ हजार रुपये देण्याची योजना राबविली. ही कंपनी रक्कम गुंतवणाऱ्या शेतकऱ्याला कडकनाथ कोंबडीची पिले देत होती. या २०० पिलांसाठी लागणारे खाद्य, औषधे, खाद्याची भांडी आणि लसीकरणाचे साहित्य कंपनीकडून दिले जात होते. तीन महिन्यानंतर कंपनीचे काही लोक शेतकऱ्यांकडे १०० मादी आणि २० नर घेवून ८० मोठे झालेले पक्षी घेवून जात. चार ते पाच महिन्यानंतर अंडी द्यायला सुरुवात झाल्यानंतर पहिली दोन हजार अंडी ५० रुपये प्रति अंडे, दुसरी दोन हजार अंडी ३० रुपये प्रति अंडे आणि त्यानंतरची ३५०० हजार अंडी २० रुपये दराने खरेदी केली जात होती. या सर्व व्यवहारातून एका वर्षांत शेतकऱ्याला सुमारे पावणेदोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची हमी कंपनीने दिली होती. मात्र कोट्यवधी रुपयांची रक्कम गोळा केल्यानंतर कंपनीच्या संचालकांनी सहा महिन्यातच्या कालावधीत कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील काही गुंतवणूकदारांना किरकोळ रक्कम दिली. शेतकऱ्यांना हजारो आणि लाखो रुपयांच्या पावत्याही पावती तिकिटाशिवाय दिल्या. गुंतवणूकदारांचा प्रतिसाद पाहून कंपनीने तीन जिल्ह्यात एजंट नेमून योजनेची व्याप्ती वाढविली. काही ठिकाणी कॉर्पोरेट कार्यालये स्थापन केली. कडकनाथ कोंबडी आरोग्यासाठी चांगली असून तिला फाइव्ह स्टार, सेव्हन स्टार हॉटेलमध्ये मोठी मागणी असल्याचे सांग्ण्यात आले. मात्र गुंतवणूक केलेली रक्कम परत मिळत नसल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले. या योजनेत तीन जिल्ह्यातील सुमारे ५० हजारांहून अधिकजणांनी गुंतवणूक केल्याचे समजते. दरम्यान , या प्रकरणी इस्लामपूरच्या महारयत अॅग्रो कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली आहे. कागल, राधानगरी, भुदरगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी मुरगूड पोलिस ठाण्याला निवेदन देवून कडकनाथ कंपनीच्या बोगस कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, कंपनीत कोणताही गैरव्यवहार नसल्याचा दावा कंपनीचे संस्थापक अध्यक्ष सुधीर मोहिते यांनी केला आहे. त्याबाबतचे प्रसिद्धपत्रक त्यांनी गुंतवणूकादारांना दिले आहे. कंपनीचा सर्व कारभार सुरळीत सुरु असून कोणताही गैरव्यवहार झालेला नाही. पशुखाद्याची समस्या निर्माण झाली आहे, त्यावर लवकरच तोडगा निघेल. कोणत्याही अफवांवर आणि भूलथापांवर विश्वास न ठेवता शेतकऱ्यांनी कंपनीला सहकार्य करावे, असे आवाहन मोहिते यांनी केले आहे.
तर, कोंबड्याची विक्री होत नाही. पहिल्या शेतकऱ्यांच्या कोंबड्या नव्या गुंतवणूकदाराला दिल्या जात आहेत. गुंतवणूक केलेल्या रक्कम दिलेली नाही. अनेकदा कंपनीच्या कार्यालयाकडे हेलपाटे मारुनही संचालक भेट घेत नाहीत. पैसे परत देण्याचा तगादा लावल्याने कार्यालय बंद केले असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.

राज्यमंत्री सदाभाऊ खोत
यांच्याशी संबधित संस्था

याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले,‘ कडकनाथ कोंबडी पालन करणारी संस्था ही कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याशी संबधित आहे. सांगलीतील ज्या कंपनीने ही फसवणूक केली आहे, त्याचा मालक हा राज्यमंत्री खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या युवा संघटनेचा अध्यक्ष होता. कंपनीचे नावही ‘रयत’ या नावावरुन दिले आहे. संबधित कंपनीच्या मोहिते नावाच्या मालकाचा विवाह खोत यांच्या पुतणीशी झाला आहे. यावरुन ही कंपनी खोत यांच्याशी संबधित आहे. कृषी विभागाकडून या व्यवसायावर ५० टक्के अनुदान देण्याच्या आमिषाने फसवणूक झाली आहे.’

अन्यथा शेट्टींनी
राजकारण सोडावे

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले,‘ माझ्या जावयाने फसवणूक केली असे म्हणत असतील, तर तो माझा जावई आहे हे सिद्ध करुन दाखवावे, आपण राजकारण सोडतो. जर तो माझा जावई नसेल तर शेट्टी हे राजकारण सोडणार का, हे त्यांनी जाहीर करावे.’ याप्रकरणी शेट्टींवर अब्रुनुकसानाची दावा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला. खोत म्हणाले, ‘शेट्टी ज्या समाजात जन्माला आले. त्या समाजातील सर्व मुलींचे नवरे हे त्यांचे जावई आहेत का? शेट्टी हे कार्यकर्त्यांना कधीच जीवाभावाने ओळखू शकले नाहीत. माझ्या घरच्या सगळ्या लग्नात शेट्टी उपस्थित होते. त्यामुळे त्यांनी अभ्यास करायला हवा होता.’

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खराब अन्नधान्य केले नष्ट

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

महापुरात खराब झालेल्या अन्नधान्याची पुन्हा विक्री होऊ नये, यासाठी खराब झालेले सुमारे पाच कोटी रुपयांचे अन्नधान्य आणि खाद्यपदार्थ नष्ट करण्यात आले. पुरात बुडालेली औषधेही नष्ट करण्याच्या सूचना अन्न व औषध प्रशासनाने केमिस्ट असोसिएशनला दिल्या आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिठाईची तपासणी सुरू झाली आहे. शिरोळ तालुक्यात ३३ ठिकाणी तपासण्या करण्यात आल्या.

महापुरामुळे कोल्हापूर शहरातील सुमारे अडीचशे दुकानांचे नुकसान झाले. दुकानांमधील अन्नधान्य आणि खाद्यपदार्थही खराब झाले. दुग्धजन्य पदार्थ, मिठाई, फरसान, केक, पुरात भिजलेल्या डाळी, पीठ यांची पुन्हा विक्री होऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने दक्षता घेतली आहे. पूर ओसरताच सात पथकांद्वारे पूरबाधित परिसरात विक्रेते, व्यावसायिकांचे प्रबोधन केले जात आहे. पुराने खराब झालेले सर्व खाद्यपदार्थ कुठेही उघड्यावर टाकू नयेत, अशा सूचना विक्रेत्यांना दिल्या आहेत. खराब मालामुळे विषबाधा होऊ नये, यासाठी सुमारे पाच कोटी रुपयांचे अन्नधान्य आणि खाद्यपदार्थ नष्ट करण्यात आले. यात मोठ्या प्रमाणात मिठाई आणि बेकरीतील खाद्यपदार्थांचा समावेश होता. कोल्हापूर शहर, इचलकरंजी, नृसिंहवाडी, शिरोळ येथे खराब माल नष्ट करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आल्याचे अन्न व औषध प्रशासन अधिकारी मोहन केंबळकर यांनी सांगितले.

पुराच्या पाण्यात बुडालेल्या औषधांचा पुनर्वापरही धोकादायक ठरतो, यामुळे पूरबाधित क्षेत्रातील सर्व मेडिकल व्यावसायिकांना खराब औषधांचा साठा शास्त्रीय दृष्ट्या नष्ट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुरानंतर खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या व्यावसायिकांवर अन्न व औषध प्रशासनाची विशेष नजर आहे. पुरात खराब झालेल्या मालाचा वापर होऊ नये, यासाठी नियमित तपासण्या सुरू आहेत. शिरोळ तालुक्यात ३३ ठिकाणी तपासण्या केल्या आहेत. तपासणीसाठी घेतलेले पदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले आहेत. दोषी विक्रेते आणि व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, गुजरात येथून येणारा खवा, तयार मिठाई यांची तपासणी होणार आहे. मिठाईची छुपी वाहतूक रोखण्यासाठीही पथके तैनात केली आहेत.

मोहन केंबळकर, अन्न व औषध प्रशासन अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गॅस पुरवठा विस्कळितच

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

महापुरानंतर शहरात हिंदूस्थान पेट्रोलियम कंपनी लिमीटेडच्या (एचपी) वितरण केंद्राकडून गॅस सिलिंडर पुरवठ्यातील विस्कळिपणा कायम आहे. शहरात या कंपनीच्या वितरण केंद्रांवर दररोज लांबलचक रांगा दिसत आहेत. याउलट कंपनीकडून जिल्हा पुरवठा प्रशासनास गॅस वितरण सुरळीत आहे, अशी दिशाभूल करणारी माहिती देऊन बोळवण केली जात असल्याचेही पुढे आले आहे.

महापुरामुळे पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक एका आठवडा विस्कळित झाली होती. त्याचा परिणाम इंधन आणि गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यावर झाला. पूर ओसरून दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ उलटला तरी अद्याप एचपीचे गॅस मिळवण्यासाठी ग्राहकांना तास न् तास रांगेत थांबावे लागत आहे. ऑनलाइन बुकिंग करून दोन आठवड्यानंतरही गॅस मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. ऑनलाइन बुकिंग केल्यानंतर क्रमपाळीनुसार सिलिंडर घरपोहोच करणे बंधनकारक आहे. मात्र हा नियमच धाब्यावर बसवला जात आहे.

वितरकांच्या कार्यालयासमोर रांगेत थांबतील त्या ग्राहकांनाच सिलिंडर दिले जात आहे. त्यामुळे ग्राहकांना पहाटे लवकर वितरकांच्या कार्यालयासमोर सिलिंडर घेऊन रांगेत थांबावे लागत आहे. नोकरी, व्यवसाय, मोलमजुरी करणाऱ्यांची यामुळे अडचण होत आहे. त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात सिलिंडर वितरणात विस्कळितपणा असताना पुरवठा विभागाकडे एचपी कंपनीचे अधिकारी मात्रसर्व सुरळीत असल्याचा रिपोर्ट देत आहेत. पुरवठा विभागाचे जबाबदार अधिकारीही कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून मिळत असलेल्या रिपोर्टची पडताळणी करण्याची तसदी घेत नाहीत. वरिष्ठ अधिकारी अचानक शहरातील वितरण केंद्रांना भेट देऊन वस्तूस्थिती जाणून घेत नाहीत. त्यामुळेच एचपी कंपनीकडून सिलिंडरचा पुरवठा सुरळीत झालेला नाही.

शहरात १६ ठिकाणी वितरक

शहरात एचपी कंपनीचे १६ वितरक आहेत. अपवाद वगळता बहुतांश केंद्रांसमोर ग्राहकांना अगतिक होऊन सिलिंडरसाठी रांगेत थांबावे लागत आहे. वितरकांकडे कधीपासून सिलिंडर घरपोच मिळणार, अशी विचारणा केल्यानंतर ग्राहकास समाधानकारक उत्तर मिळत नाही. रांगेतून सिलिंडर मिळवताना ग्राहकांमध्येही वादावादीचे प्रकार घडत आहेत. याचा त्रास शहरातील हजारो ग्राहकांना होत आहे.

कंपनीकडूनच वितरणात गोंधळ

'महाराष्ट्र टाइम्स'ने एचपी गॅस वितरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधून वस्तूस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी 'अजूनही मागणीइतके सिलिंडर कंपनीकडून त्वरित उपलब्ध होत नाही. त्यामुळे बुकिंगप्रमाणे सिलिंडर देणे काही वितरकांना शक्य होत नाही', असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, प्रतिक्रियेमध्ये नाव छापू नये अशी विनंतीही केली. एकूणच एचपी कंपनीच्या वितरण प्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

हॉकी स्टेडियम रोडवर मोठी गर्दी

हॉकी स्टेडियमसमोरील आणि मंडलिक वसहतीजवळील वितरण केंद्रावर सलग दोन आठवडे सिलिंडर मिळविण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. सिलिंडरसाठी मोठी रांग लागल्याचेही दिसते. याकडे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे. एचपी गॅस कंपनी आणि पुरवठा प्रशासनाच्या संगनमतानेच पूर ओसरल्यानंतरही गॅसपुरवठा सुरळीत होत नसल्याचा आरोप ग्राहकांकडून होत आहे.

शहरात अजूनही गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत झालेला नाही. काही वितरक कृत्रिम टंचाई निर्माण करून ग्राहकांना लुटत आहेत. यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेले जिल्हा पुरवठा अधिकारी राणी ताटे दिल्लीला गेल्याचे सांगितले जात आहे. पुरवठा प्रशासनाचा वितरकांवर वचक राहिलेला नाही. त्याचा फटका सामान्य ग्राहकांना बसत आहे.

- किरण पडवळ, ग्राहक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाप्पांच्या स्वारीसाठी सज्जता

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

मोठ्या आकर्षक गणेशमूर्तींचे होत असलेले आगमन, मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून मंडप उभारणीला आलेला वेग, सजावटीच्या साहित्याने सजलेली बाजारपेठ, कुंभार गल्लींमध्ये गणेशमूर्तींवर अखेरचा हात फिरवण्याची सुरू असलेल्या लगबगीमुळे सर्वत्र गणेशोत्सवाचे उत्साही वातावरण तयार झाले आहे. वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर विघ्नहर्त्याचे होत असलेले आगमन सर्वांसाठीच सुखकारक करण्याच्यादृष्टीने घराघरांमधून तयारी सुरू असल्याने विविध प्रकारच्या साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये गर्दी होत आहे. आगामी तीन दिवसात खरेदीसाठी बाजारपेठ फुलल्याचे चित्र पहायला मिळणार आहे.

तरुण मंडळांची तयारी

तीन दिवसांवर गणेशाचे आगमन होणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गेल्या आठवड्यापासूनच मंडप उभारणी सुरू केली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या वातावरणाला सुरुवात झाली. त्यांच्या जोडीला मुंबईहून तसेच विविध भागातून तयार झालेल्या मंडळांच्या मोठ्या आकर्षक गणेशमूर्तींचे आगमन शहरात सुरू झाली. विद्युत रोषणाई, वाद्यांच्या गजरात शहरातील प्रमुख मार्गावरुन त्या मूर्ती मंडळांमध्ये नेण्यात येत वातावरणात एक चैतन्याची लहर अनुभवायला येऊ लागली. गेल्या आठवड्यापर्यंत केवळ खांब व पत्रे असलेल्या मंडपांमध्ये सजावट करण्यात येत आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मंडळांच्या ठिकाणी दररोज साफसफाईची मोहीम राबवण्यात येत असल्याने परिसर चकाचक होत आहेत. मंडळांसमोर प्रकाशझोतची व्यवस्था करण्यात आल्याने उजळून निघाल्याचा भास होत आहे. उत्सवाच्या नियोजनासाठी मंडळांच्या परिसरात दररोज सायंकाळी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी होत असल्याने शहरात सर्वत्र गणेशोत्सवाचे वातावरण जाणवू लागले आहे.

सजावटीच्या साहित्याची खरेदी

मंडळांच्या सजावटीसाठी लागणारे आकर्षक कापड, प्लास्टिकच्या फुलांच्या माळा, सजावटीचे अन्य साहित्य, घरगुती गणेशोत्सवासाठी लागणारी आरास, लाइटच्या माळा, विविध प्रकारचे प्रकाशझोत अशा साहित्यांनी बाजारपेठ सजली आहे. पापाची तिकटी, पान लाइन, लक्ष्मीपुरी, टेंबे रोड या प्रमुख ठिकाणी गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी नागरिकांची, मंडळांच्या कार्यकर्त्यांची गर्दी होताना दिसत आहे. घराबरोबरच मंडळांमध्ये विद्युत रोषणाईसाठी आवश्यक असलेल्या विविध प्रकारच्या लाइटच्या माळांमुळे बाजारपेठेत गणेशोत्सवाची आरास पहायला मिळत आहे. थर्माकॉलवर बंदी असल्याने पान लाइनच्या रस्त्यावर नव्या प्रकारचे मखर पहायला मिळत आहेत. त्याकडे नागरिकांचा ओढा वाढल्याचे दिसत आहे. सोमवारी गणेशाचे आगमन होत असल्याने घरामधील तयारीसाठी रविवारी सुटीचा दिवस मिळणार आहे. पण त्यादिवशी बाजारात होणारी गर्दी लक्षात घेता दररोज सायंकाळनंतर नागरिक थोडा थोडा बाजार करुन ठेवत असल्याने बाजारपेठेतील हालचाल वाढली आहे.

बाजारपेठेत उलाढाल

गणेशोत्सवाच्यानिमित्ताने बाजारपेठेतील उलाढालीला चालना मिळत असते. त्यानुसार व्यावसायिकांनी तयारी करुन ठेवली आहे. उत्सवाच्या कालावधीत पेढे, बर्फी यासारख्या गोड पदार्थांबरोबरच फळांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असते. सध्या बाजारात सफरचंदाची आवक मोठ्या प्रमाणावर झाली आहे. तसेच अनेक स्वीट मार्टमधून नागरिकांना आकर्षित करण्यासाठी सजावट केली जात आहे. याबरोबरच अनेक मंडळांकडून महाप्रसादाचे आयोजन केले जाते. त्यासाठी धान्य व इतर मसाल्याच्या पदार्थांची आवश्यकत असते. लक्ष्मीपुरी तसेच अन्य ठिकाणच्या बाजारपेठा सर्व प्रकारच्या वस्तुंची सज्ज झाल्या आहेत. याशिवाय पूजेसाठी व उत्सवासाठी लागणाऱ्या छोट्या वस्तूंच्या विक्रीची दुकाने थाटली जात आहेत. पापाची तिकटी, शाहूपुरी तसेच बापट कॅम्प येथील कुंभार गल्लीच्या आवारात त्यांची संख्या जास्त असते.

कुंभारवाड्यात रात्री जागू लागल्या

कुंभार गल्लीमध्ये गणेशमूर्तींवर अखेरचा हात फिरवण्यासाठी कारागिरांच्या रात्री जागू लागल्या आहेत. छोट्या घरगुती गणेशमूर्तींपासून मंडळांच्या मोठ्या मूर्ती तयार करण्यास रात्रदिवस एक केला जात आहे. जास्तीत जास्त मूर्ती तयार करण्याचा प्रयत्न कुंभार व्यावसायिक करत असल्याने रात्रीही कुंभारगल्लीत मोठी वर्दळ दिसत आहे. शेवटचे दोन दिवस हातात असल्याने जास्तीत जास्त कारागिरांकडून काम पूर्ण करुन घेतले जात आहे. पावसामुळे त्यामध्ये काही व्यत्यय येऊ नये याची खबरदारी घेतली जात आहे.

मध्यंतरीच्या पावसामुळे कुंभार व्यावसायिकांचे दहा ते पंधरा दिवस गेले. त्यामुळे आता जास्तीत जास्त मूर्ती तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. साहित्याच्या दरात दरवर्षी होत असलेल्या वाढीप्रमाणे यंदाही १५ टक्क्यापर्यंत मूर्तींच्या किमतीत वाढ झाली आहे. वातावरणामुळे यंदा शाडूच्या मूर्तींची कमतरता जाणवेल.

- कमलाकर आरेकर, मूर्तीकार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापुराने कोलमडले कोल्हापूरचे अर्थकारण

$
0
0

Uddhav.Godase@timesgroup.com

Tweet @Uddhavg_MT

कोल्हापूर : महापुराने दहा ते बारा दिवस संपूर्ण जिल्हा ठप्प होता. सुमारे १४ हजार घरांची पडझड झाली, तर अडीच हजारांहून अधिक दुकानांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने अन्नधान्य आणि वस्तू खराब झाल्या. शेतीसह पूरक उद्योगांनाही फटका बसल्याने सुमारे दहा हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. महापुराने अर्थिक घडी विस्कटल्याने वर्षभर याचे परिणाम जाणवणार आहेत.

राज्यातील सर्वाधिक सधन जिल्ह्यांपैकी कोल्हापूर हा एक महत्त्वाचा जिल्हा आहे. आठ-दहा वर्षांपूर्वी दरडोई उत्पन्नात देशात पहिल्या क्रमांकावर गेलेल्या कोल्हापूरचा राज्याच्या अर्थव्यवस्थेत मोलाचा वाटा आहे. शेती, शेतीपूरक व्यवसाय, उद्योग, दुग्धोत्पादन यासह पर्यटनातून मोठा महसूल जमा होतो. मुंबई, पुणे या मोठ्या शहरांना दूध आणि भाजीपाल्यांचा पुरवठा करण्यातही कोल्हापूरचा मोठा वाटा आहे. याशिवाय गूळ, साखर, औद्योगिक यंत्रसामग्री, कापड यांची निर्यात कोल्हापुरातून होते. कोकणात जाणारे अन्नधान्य, बांधकाम साहित्य, औषधे यांचा पुरवठाही कोल्हापुरातूनच होतो. दरवर्षी राज्याला कोट्यवधींचा कर देणाऱ्या कोल्हापूरला यंदा महापुराचा फटका बसला. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात जिल्ह्यातील बहुतांश रस्ते पाण्याखाली होते. चार ते १२ ऑगस्टदरम्यान पुणे-बेंगलोर महामार्गावरही पुराचे पाणी आल्याने कोल्हापूरचा राज्याशी संपर्क तुटला होता. सर्वच महत्त्वाचे रस्ते पाण्याखाली गेल्याने एसटी, रेल्वे, खासगी वाहतूक ठप्प झाली. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडरची वाहनेही शहरात येऊ शकली नाहीत. याशिवाय दूध, भाजीपालाही बाहेर जाऊ शकला नाही. रस्ते बंद असल्याने आठ ते दहा दिवस उद्योग ठप्प राहिले. यामुळे सुमारे एक हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. शहरासह जिल्ह्यातील सुमारे अडीच हजार दुकानांमध्ये पुराचे पाणी गेले. शाहूपुरी, लक्ष्मीपुरी येथील व्यापारी पेठा अक्षरक्ष: कोलमडून पडल्या. शाहूपुरी, बापट कॅम्प येथील कुंभार गल्ली, फर्निचर विक्री, हॉटेल्स यासह रुग्णालयांनाही पुराच्या पाण्याने वेढले. दुकानांसह घरांमधील अन्नधान्य, खाद्यपदार्थ, फर्निचर, कपडे यांचे मोठे नुकसान झाले. भिजलेले धान्य लोकांना रस्त्यावर ओतून द्यावे लागले. पुरातील सर्व विक्रेते, व्यावसायिक, रुग्णालयांना सावरण्यासाठी आणखी १५ दिवसांचा कालावधी लागू शकतो. वाहन खरेदी, नवीन घर बांधणी, हॉटेलिंग, पर्यटन या सर्वच घटकांवर पुराचा परिणाम जाणवणार आहे.

जिल्ह्यातील ३७५ गावांना पुराचा फटका बसला. एक लाख दोन हजार ५६८ कुटुंबांमधील चार लाख सात हजार ५७८ लोकांना स्थलांतर करावे लागले. पुराच्या पाण्यामुळे जिल्ह्यातील चार हजार घरे जमीनदोस्त झाली, तर सुमारे दहा हजार घरांची अंशत: पडझड झाली आहे. जिल्ह्यात दहा हजारांहून अधिक वाहने पुराच्या पाण्यात बुडाल्याने सुमारे १०० कोटी रुपयांचे नुकसान झाले. अतिवृष्टी आणि नद्यांना आलेल्या माहपुराने जिल्ह्यातील एक लाख आठ हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली. भात, सोयाबिन, भाजीपाला या पिकांचा हंगामच वाया गेला. सर्वाधिक नुकसान उसाचे झाल्याने साखर कारखान्यांच्या गळीत हंगामावरही याचा विपरित परिणाम होणार आहे. सुमारे पाचशेहून अधिक जनावरे पुरात वाहून गेल्याने शेतकऱ्यांना फटका बसला. जिल्ह्यात ११ लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे आहे. रस्ते, पूल यासह सरकारी इमारतींचेही पुरामुळे नुकसान झाले. शेतीपासून उद्योगांपर्यंत आणि घरांपासून सार्वजनिक मालमत्तेपर्यंत सर्वच घटकांना पुराचा फटका बसल्याने नुकसानीचा आकडा दहा हजार कोटींवर पोहोचला आहे. यातून सावरण्याचे आ‌व्हान संपूर्ण जिल्ह्यासमोर आहे.

महापुरामुळे जिल्ह्याची प्रचंड हानी झाली. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष नुकसानीचे आकडे मोठे असतील. शेती आणि उद्योगांचे नुकसान भरून काढण्यासाठी खुप वेळ लागेल. या कठीण स्थितीत सरकारने मदतीचा हात देणे गरजेचे आहे.

- प्रदीप व्हरांबळे - सचिव, कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशन

शेतकऱ्यांचे वर्षभराचे पीक वाया गेले. शेतीवर अवलंबून असेलल्या सर्वच पूरक उद्योगांना याचा फटका बसला. सरकारच्या कर वसुलीवरही महापुराचा परिणाम जाणवणार आहे. संपूर्ण अर्थकारण कोलमडल्याने सावरण्यासाठी वेळ लागेल.

- भगवान काटे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

पुरामुळे झालेले नुकसान

१००० कोटी

उद्योग

१००० कोटी

व्यापारी दुकाने

२०० कोटी

घरांची पडझड

१०० कोटी

जनावरे

५००० कोटी

शेती

१०० कोटी

वाहने

१००० कोटी

रस्ते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गव्हर्नमेंट सर्व्हंट्स बँकेला एक कोटी ९७ लाखांचा नफा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शतक महोत्सवी राजर्षी शाहू गव्हमेंट सर्व्हटस् को-ऑपरेटिव्ह बँकेला एक कोटी ९७ लाख रुपयांचा नफा झाला आहे. बँकेच्या १०२ सर्वसाधारण सभेत अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी सभासदांना नऊ टक्के लाभांश जाहीर केला आहे. सागरमाळ येथील प्रतिभानगर हौसिंग सोसायटी हॉलमध्ये झालेल्या सभा उत्साहात झाली.

बँकेचे अध्यक्ष पाटील यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, 'पारदर्शक कारभाराद्वारे बँकेने ठेवींचा चढता आलेख कायम ठेवलेला असून, बँकेने सलग नऊ वर्षे शून्य टक्के एनपीए ठेवून एक कोटी ९७ लाख नफा मिळविला आहे. बँकेस 'अ' वर्ग तसेच रिझर्व्ह बँकेचे 'ग्रेड - वन' मानांकन मिळाले आहे. कर्जावरील व्याजदर ११ टक्के इतका आकारणेत येत असून सर्व सहकारी बँकांमध्ये सर्वात कमी व्याजदर आकारणारी आपली बँक आहे.'

मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे यांनी अहवाल वाचन केले. बँकेने चालू आर्थिक वर्षामध्ये विक्रमी नफा मिळविल्याबद्दल प्रकाश आमते आणि अरुण शिंदे यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. संचालक अतुल जाधव यांनी शिरोळ येथे पुरपरिस्थितीमध्ये आपत्ती निवारण पथकामार्फत सलग आठ दिवस अहोरात्र बचावकार्य केलेबद्दल आणि संचालक विलासराव कुरणे यांनी बचावकार्यात सहभाग घेतलेबद्दल टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करण्यात आले.

बँकेचे उपाध्यक्ष भरत पाटील, संचालक रविंद्र पंदारे, मधुकर पाटील, शशिकांत तिवले,राजेंद्र चव्हाण, राजेंद्र पाटील, रमेश घाटगे, संचालिका हेमा पाटील, नेहा कापरे, संजय सुतार, जयदीप कांबळे, बाळासाहेब घुणकीकर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे, मुख्य लेखापाल रुपेश पाटोळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेयजल योजनेप्रश्नी ठेकेदारांना नोटीस

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

महापुरामुळे शेती आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारकडून मिळणाऱ्या नुकसान भरपाईत वाढ करुन बाजारभावाप्रमाणे भरपाई द्यावी असा ठराव जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत केला. तसेच राष्ट्रीय पेयजल योजनेची कामे मुदतीत पूर्ण न केलेल्या ठेकेदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेशही दिले. अध्यक्षा शौमिका महाडिक अध्यक्षस्थानी होत्या.

सरकारकडून कोरडवाहू शेतीसाठी हेक्टरी ६८०० रुपये तर बागायती शेतीला हेक्टरी १३५०० रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. महापुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पीके वाहून गेली आहेत. सरकारकडून मिळणारा निधी कमी त्यामध्ये वाढ करावी असा ठराव जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत झाला. उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, बांधकाम समिती सभापती सर्जेराव पाटील पेरीडकर, सदस्य प्रा. शिवाजी मोरे, हेमंत कोलेकर, विद्या पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला. अध्यक्षा महाडिक यांच्यासह समितीच्या सर्वच सदस्यांनी महापुरातील नुकसानीचा आढावा घेतला.

राष्ट्रीय पेयजल योजनेवरही चर्चा झाली. या योजनेतील, जिल्ह्यातील प्रकल्प संख्या ४५० हून अधिक आहे. २२५ हून अधिक योजना ग्रामपंचायत स्तरावर आहेत. दरम्यान विविध ठिकाणची कामे अपुरी आहेत. योजना अर्धवट स्थितीत आहे. ठेकेदारांनी मुदतीत कामे पूर्ण केली नाहीत अशा तक्रारी वाढल्या आहेत. ठेकेदारांच्या दुर्लक्षामुळे योजनेवर परिणाम झाला आहे. अशा ठेकेदारांना तत्काळ कारणे दाखवा नोटीस काढण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४५० शिक्षकांची वेतनापोटी केली चेष्टा

$
0
0

पॉइंटर

जिल्ह्यातील ४५० शिक्षकांचे वेतन दहा हजारांच्या आत

११६ शाळा शंभर टक्के अनुदानास पात्र

४२ शाळांची २० टक्के अनुदानासाठी निकषपूर्ती

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचीही आर्थिक परवड

६४ शाळांवर केवळ २० टक्के टप्पा अनुदान वाढ करून अन्याय

............

म.टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शंभर टक्के अनुदानासाठी पात्र जिल्ह्यातील विनाअनुदानित शाळांना टप्पा अनुदान वाढ देताना सरसकट सर्वच शाळांना २० टक्के अनुदान वाढ दिल्यामुळे ११६ शाळांमधील साडेचारशे शिक्षकांची वेतनापोटी सरकारने चेष्टा केली आहे. गेल्या २४ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनानंतरही प्रचलित नियमानुसार अनुदानाची टप्पा वाढ न करता २० टक्के वाढ केल्यामुळे शिक्षकांना मिळणारे वेतन दहा हजारांच्या आत तर कर्मचाऱ्यांचे वेतन पाच हजारांवरच थांबले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे गेल्या तीन वर्षात दीडशेहून अधिक आंदोलने करून न्याय्या मागण्यांसाठी लढा देणाऱ्या साडेचारशे शिक्षकांची यापुढेही आर्थिक परवड होणार आहे.

&x1f525;महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदान शाळा कृती समितीच्यावतीने विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू करण्यात आले होते. प्रचलित नियमानुसार वेतन अनुदान द्यावे, शिक्षकांना सेवा संरक्षण द्यावे, ज्या शाळा १०० टक्के अनुदानासाठी पात्र आहेत अशा शाळा घोषित कराव्यात या प्रमुख मागण्यांसाठी गेल्या ५ ऑगस्टपासून राज्यभरातील विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले आहेत. गेल्या तीन वर्षापासून विनाअनुदानित शाळांमध्ये तुटपुंज्या वेतनावर काम करणारे शिक्षक आंदोलन करत आहेत. तसेच गेल्या २० वर्षात या मागणीसाठी १५६ आंदोलने करण्यात आली आहेत. दरम्यान बुधवारी अनुदानाच्या टप्पा वाढीबाबत राज्य मंत्रीमंडळाची बैठक होती. या बैठकीकडे सर्व शिक्षकांचे लक्ष लागले होते. मात्र प्रचलित नियमानुसार वेतन अनुदान देण्याच्या निर्णयाला खोडा घालत सरसकट सर्वच शाळांना २० टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील साडेचारशे शिक्षकांची निराशा केली आहे.

...

कोट

' गेल्या २४ दिवसांपासून मुंडण आंदोलन, थाळीनाद आंदोलन, टाळा ठोक आंदोलन, सहकुटुंब आक्रोश मोर्चा आंदोलन, आमरण उपोषण, भजन आंदोलन, गोंधळ आंदोलन, सत्यनारायण पूजा आंदोलन, मूक आंदोलन, घंटानाद आंदोलन विद्यार्थी-पालक व शिक्षक यांनी मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तरीही सरकारकडे प्रचलित नियमाची मागणी डावलून शिक्षंकाच्या तोंडाला पाने पुसली आहेत.

खंडेराव जगदाळे, राज्य उपाध्यक्ष, विनाअनुदानित शाळा कृती समिती

...

कोट

'काही मागण्या मान्य झाल्या, पण पात्र शाळांना शंभर टक्के वेतन अनुदान देण्याची जी मागणी महत्वाची होती त्यालाच सरकारने हुलकावणी दिली. गेल्या चार वर्षांपासून २० टक्के अनुदान दिले जाते. नियमाप्रमाणे प्रत्येक वर्षी अनुदानाच्या रकमेत २० टक्के वाढ होणे अपेक्षित होते. त्यामुळे यापुढेही आंदोलन सुरूच राहणार आहे.

सुनील कल्याणी, कोल्हापूर विभागीय अध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरसकट पूरबाधितांना अनुदान द्या

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

जिल्ह्यातील पूरबाधित नागरिकांना सरकारी आदेशाप्रमाणे सरसकट सानुग्रह अनुदान व इतर मदत द्यावी, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पत्रकात म्हटले आहे की, कोल्हापूर शहरासह जिल्ह्यावर यावर्षी अस्मानी संकट कोसळले आहे. पूरग्रस्त नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सरकारकडून या पूरग्रस्त नागरिकांना तातडीची मदत जाहीर करून त्याचे वाटप करण्याचे काम जलदगतीने सुरू आहे. कोल्हापूर सह सांगली, सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागामध्ये काही इमारती पुराच्या पाण्याने वेढल्या गेल्या होत्या. पुरात इमारतीचे काही मजले पूर्णपणे पाण्यात बुडालेले होते. पण काही इमारतीचे मजले पाण्याखाली बुडले नव्हते पण इमारत पूर्णपणे पुराच्या पाण्यात वेढली गेली आहे अशा सर्व मजल्यांवरील कुटुंबियांना मदत देण्याबाबत पुणे विभागीय आयुक्त कार्यालय पुरग्रस्त भागातील जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहे. पण, अनुदानाचे प्रत्यक्ष वाटप होत असताना मजले न बुडलेल्या आणि इमारत पूर्णपणे पुराच्या पाण्यात वेढली गेली आहे अशा पूर बाधित नागरिकांना वगळून मदत वाटण्यात येत आहे. त्यामुळे पूरबाधित नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुराने वेढलेल्या इमारतीतील कुटुंबियांना मदत करुन सरकारने सहकार्य करावे, अशी मागणी क्षीरसागर यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images