Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पुण्यात २३ ऑगस्टला राज्यस्तरीय बँकिंग परिषद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बँकिंग क्षेत्रासमोरच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करणे, भविष्यातील बँकिंग धोरणात नवीन कल्पनांचा समावेश करण्यासाठी २३ ऑगस्टला पुणे येथील बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेत राष्ट्रीयीकृत बँकांच्या व्यवस्थापकांची राज्यस्तरीय परिषद आयोजित केली आहे, अशी माहिती राष्ट्रीयीकृत बँकिंग समूहाचे महाप्रबंधक रमेशचंद्र ठाकूर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठाकूर म्हणाले, 'राष्ट्रीयीकृत बँकांसमोर अनेक आव्हाने आहेत. त्यातून मार्ग काढून अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी शाखा पातळीवरून नवीन संकल्पना, सूचना मागून घेतल्या जात आहेत. त्यासाठी १७ आणि १८ ऑगस्टला बँक ऑफ इंडियाच्या ११० शाखांच्या व्यवस्थापकांची बैठक झाली. त्यामध्ये पायाभूत सुविधा, उद्योग, कृषी, मुद्रा, स्टँडअप इंडिया, शिक्षण, निर्यात अशा विविध घटकांसाठी पतपुरवठा आणि डिजिटल बँकिंग करण्यासंबंधी व्यापक चर्चा झाली. याशिवाय आगामी काळात डिजिटल पेमेंट, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील कॉर्पोरेट गव्हर्नन्स, उद्योग, रिटेल, शेती यांना कर्जपुरवठ्याच्या माध्यमातून पाच ट्रिलीयन्स अर्थव्यवस्था उभा करण्यासंबंधी सकारात्मक चर्चा झाली. याच विषयावर सर्व राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा व्यवस्थापकांत चर्चा होण्यासाठी २३ रोजी परिषद होईल.'

बँक ऑफ इंडियाच्या कोल्हापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक नितीन देशपांडे म्हणाले, 'राष्ट्रीयकृत बँकांसमोर वाढणाऱ्या एनपीएच्या प्रमाणाचे मोठे आव्हान आहे. त्यावर मात करून बँका वाटचाल करत आहेत. या विभागात सर्वाधिक एनपीए साखर कारखानदारांचा आहे. तरीही कृषी आणि पूरक उद्योगांना कर्जपुरवठा करून अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.'

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मंदार दिवसेला सात सुवर्णपदके

$
0
0

कोल्हापूर: चीनमधील चेंगडू येथे झालेल्या १८ व्या वर्ल्ड पोलिस आणि फायर गेम्स स्पर्धेत जलतरणपटू मंदार दिवसेने आठ सुवर्ण, एक रौप्य आणि एक ब्राँझ पदकांची कमाई करत देदिप्यमान कामगिरी केली. नऊ ते सात ऑगस्ट या कालावधीत स्पर्धा झाली. सीमा सुरक्षा दलात इन्स्पेक्टर पदावर काम करणाऱ्या मंदारने २०० मीटर आयएम, २०० मीटर, ४०० मीटर, ८००, १५०० मीटर फ्री स्टाईल, दौन मैल ओपन वॉटर स्विमिग, २५.७५ केएम ट्रिथॉन रिले, मिडले रिले प्रकारात सुवर्ण पदकांची कमाई केली. फ्री स्टाईल रिले प्रकारात रौप्य पदक तर मिक्स फ्री स्टाईल रिले प्रकारात ब्राँझ पदक मिळवले. सध्या तो बंगळूरु येथे सराव करत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूरग्रस्तांवर दातृत्वाचा वर्षाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्यभरातून कोल्हापुरातील पूरग्रस्तांवर दातृत्वाचा वर्षाव होत आहे. जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून पोहोच केलेल्या साहित्याचे वाटप केले जात आहे. शहर, परिसर आणि जिल्ह्यातील पूरग्रस्तांना प्रापंचिक आणि दैनंदिन साहित्य वाटपाला वेग आला आहे. शहरात महापालिका प्रशासन आणि खेड्यांत महसूल यंत्रणेच्या पुढाकाराने प्रापंचिक साहित्य आणि पूरग्रस्तांना पाच हजार रुपये अर्थसाह्य दिले जात आहे.

प्रशासनाशी संपर्क साधून दिलेल्या मदतीचे साहित्य ठेवण्यासाठी अंबप फाटा, शिरोली, जिल्हा परिषद कागलकर हाउस येथील गोडाऊनमध्ये उतरून घेतले जात आहे. दैनंदिन वस्तूंच्या पॅकिंगसाठी धैर्यप्रसाद आणि महासैनिक दरबार हॉलमध्ये दिले जात आहे. येथे पॅकिंग केलेले साहित्य पूरग्रस्तांपर्यंत पोहोचविले जात आहे. तालुका पातळीवरून तहसीलदार, तर गावपातळीवर मंडल अधिकारी, तलाठीतर्फे मदतीचे साहित्य पोहोच केले जात आहे. यावर नियंत्रण ठेवण्याचे काम संबंधित तालुक्याचे प्रांताधिकारी करत आहेत.

तांदूळ, गहू, तूर आणि मूग डाळ, साखर, मीठ, टूथ पेस्ट, अंघोळीचा साबण, सॅनिटरी नॅपकीन बॉक्स, टॉवेल, ब्लँकेट, मुलांचे कपडे, महिलांचे कपडे, गोडे तेल, प्लास्टिक खराटे, बिस्किट बॉक्स, फिनेल, फिनेल, हेअर ऑईल, मेणबत्ती, फरसाना, डेटॉल बॉक्स, लेडीज गाऊन, दप्तर किट असे ८८ प्रकारचे साहित्य दानशूरांकडून सरकारी यंत्रणेकडे पोहोच केले जात आहे. ते गरजू पूरग्रस्तांपर्यंत पोहोचले जात आहे. प्रत्यक्ष मदत वाटपावेळी साहित्य पळवापळवीचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे पोलिस बंदोबस्तही ठेवला आहे. याशिवाय मदत केंद्र उतरवून घेतले जात असलेल्या गोडाऊनजवळही पोलिस तैनात आहेत. दरम्यान, पूरग्रस्तांना पाच हजार रुपयांप्रमाणे आतापर्यंत १९ कोटी ७८ लाखांचे अर्थसाह्य आणि ४१४ टन मोफत गहू, तांदूळ वितरित केले आहे.

००००

अधिकाऱ्याची उदासीनता

जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी जिल्हास्तरीय पूरग्रस्त मदत सनियंत्रण कक्ष येथील जिल्हा परिषदेत स्थापन केला आहे. कक्षाकडे सनियंत्रण अधिकारी म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी राणी ताटे, सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांची निवड जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केली आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांचे मोबाइल क्रमांक प्रसिद्धीस देऊन ज्यांना मदत करावयाची आहे, त्यांनी ताटे आणि आडसूळ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे. मात्र, यातील ताटे यांच्या मोबाइलवर संपर्क साधल्यानंतर त्या मोबाईल उचलत नाहीत, अशा तक्रारी आहेत. त्यांच्या उदासीनतेमुळे पूरग्रस्तांसाठी मदत करू इच्छिणाऱ्यांत नाराजी आहे.

००००

१५ बंधारे पाण्याखाली

पंचगंगा नदीवरील राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ, शिंगणापूर, भोगावती नदीवरील हळदी, सरकारी कोगे, खडक कोगे, तुळशी नदीवरील बीड, कासारी नदीवरील यवलूज, वारणा नदीवरील चिंचोली, दूधगंगा नदीवरील दत्तवाड, सुळकूड बंधारे पाण्याखाली आहेत. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि विशेष प्रकल्प कार्यालयाचे कार्यकारी अभियंत्यांनी बालिंगा पुलाची पाहणी केली. पाहणी पूल सुरक्षित असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी दिली.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीपीआरला हवी आहे मदत

$
0
0

कोल्हापूर

छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाला (सीपीआर) बेड, इतर सामुग्री, वस्तू आणि साहित्याची अत्यंत गरज आहे. रुग्णांवर उपचार करण्यासाठी साहित्याची गरज असल्याने दानशूर व्यक्तींनी सीपीआरला मदत करावी, असे पत्रक राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठात्यांनी पत्रक प्रसिद्ध केले आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी येत आहेत. सद्यपरिस्थितीत रुग्णालयाकडे उपलब्ध असलेला आकस्मिक विभाग (कक्ष) अपुरा पडत असल्याने त्याच्या विस्तारीकरण करण्याची गरज आहे. या विभागाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेले बेड व वैद्यकीय साहित्याची गरज भासत आहे. जिल्ह्यातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्थांनी युनियन बँक ऑफ इंडिया लक्ष्मीपुरी शाखेत कोल्हापूर देणगी समितीच्या खात्यावर रक्कम जमा करावी, असे आवाहन केले आहे. अधिक माहितीकरिता नागरिकांनी ०२३१ २६४१५८३ या क्रमांकाशी संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीच्या रश्मी बागल उद्या शिवबंधन बांधणार

$
0
0

पंढरपूरः विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला धक्के बसणे सुरूच असून, करमाळ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या रश्मी बागल उद्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. रश्मी बागल यांच्या शिवसेना प्रवेशामुळे करमाळ्यातील विद्यमान शिवसेना आमदार नारायण पाटील यांच्या गटात मात्र तीव्र नाराजी पसरली आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत युती वेगळी लाभूनही शिवसेनेला करमाळ्यातून एकमेव आमदार नारायण पाटील यांच्या रूपाने मिळाला होता. मागीलवेळी नारायण पाटील यांनी राष्ट्रवादीच्या रश्मी बागल आणि भाजप पुरस्कृत संजय शिंदे यांचा निसटता पराभव केला होता. यानंतर नारायण पाटील यांनी पायाला भिंगरी लावत शिवसेना घराघरापर्यंत पोचविल्याने शिवसेनेच्या चिन्हावर पंचायत समिती जिंकली. धनगर समाजाचा लढवैय्या नेता अशी प्रतिमा असलेल्या नारायण पाटील यांचा धनगर समाज करमाळा मतदारसंघात नेहमीच निर्णायक भूमिका बजावत आला आहे. कुकडीचे पाणी असो, अथवा दुष्काळी भागाचा पाणीप्रश्न असो, नारायण पाटील यांनी थेट कालव्यावर मुक्काम करीत शेतकऱ्यांना पाणी मिळवून दिले होते.

आपल्याला शिवसेनेतील नेत्यांनी पक्षात येण्याचे निमंत्रण दिल्याने आपण शिवसेनेत जाणार असून, त्यासाठी सोमवारी कार्यकर्त्यांची बैठक घेत हा निर्णय घेतल्याचे रश्मी बागल यांनी सांगितले. रश्मी बागल यांच्याकडे करमाळ्यात आदिनाथ आणि मकाई हे दोन साखर कारखाने असून, या साखर कारखान्याविरोधात शिवसेना गेली अनेक वर्षे आंदोलन करीत आली आहे. रश्मी बागल यांना शिवसेनेत प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्याने विद्यमान शिवसेना आमदार नारायण पाटील नाराज झाले असून, आता शिवसेनेचे तिकीट जर कापले तर, अपक्ष लढविण्याची मानसिकता त्यांच्या गटाने केली आहे. विद्यमान आमदार नारायण पाटील यांची मोहिते पाटील यांच्याशी असलेली जवळीक जलसंधारण मंत्री तानाजी सावंत याना खटकत असल्याचे पाटील यांनी बोलून दाखवले. मात्र, शिवसेना वाढवून माझेच तिकीट कापले जाणार असेल तर, शिवसैनिकांशी चर्चा घेऊन पुढील निर्णय घेऊ, असा इशाराही आमदार नारायण पाटील यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशासनाविरोधात हायकोर्टात याचिका

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील बुडीत गावातील पूरग्रस्तांना कर्नाटक सरकारच्या धर्तीवर वाढीव अनुदान द्यावे, त्याचबरोबर प्रलयंकारी महापुराला प्रशासकीय गलथानपणा तसेच कोयना व अन्य धरणातील पाणीसाठा, पाणी सोडण्यात केंद्रीय जल आयोगाच्या निर्देशाचे उल्लंघन, आलमट्टी धरणातील पाणी नियोजनासंदर्भात कर्नाटक सरकारशी नसलेला समन्वय हेच कारणीभूत आहेत. कृष्णा व पंचगंगा नदीवरील धरणातील पाण्याचे योग्यपद्धतीने परिचालन झाले असते तर ही स्थिती उद्भवलीच नसती, त्यामुळे या महापुराच्या समस्येवर तज्ज्ञ समिती नेमून त्यांच्याकडून पुन्हा पूर परिस्थिती उद्भवणार नाही या संदर्भात शिफारशी मागवून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका सोमवारी हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे.

राष्ट्रीय जनआंदोलन समन्वयाचे सदस्य रावसाहेब आलासे तसेच राजेंद्र पाटील यांनी अ‍ॅड. धैर्यशील सुतार यांच्यामार्फत उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्याची सुनावणी लवकरच उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नांद्राजोग व न्या. श्रीमती भारती डांगरे यांच्यासमोर होणार आहे.

१ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट २०१९ या कालावधीत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात महापुराने हाहाकार उडाला. कृष्णा व पंचगंगा नद्या धोका पातळीच्यासुद्धा वरून वाहत होत्या. महापुरात सुमारे ४० लोकांचे बळी गेले तर लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. शिवाय परिसरातील उद्योगधंद्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. यावर हायकोर्टात पूरग्रस्तांच्यावतीने आलासे व पाटील यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये हा महापूर मानवनिर्मित असून प्रशासकीय गलथानपणा, धरणातील पाणीसाठा ठेवणे व सोडणे यासंबंधी केंद्रीय जल आयोगाच्या निर्देशांचे बेदरकार उल्लंघन महाराष्ट्र शासनाच्या संबंधित खात्याने केले आहे. जुलै अखेरीस कोयना धरण ८५ टक्के, राधानगरी धरण १०० टक्के, धोम धरण ९५ टक्के तसेच वारणा धरण १०० टक्के भरले होते. खरेतर आयोगाच्या निर्देशाप्रमाणे जुलै अखेरीस पाण्याचा साठा हा फक्त ५० टक्के असणे अपेक्षित होते. परंतु ह्या प्रशासकीय गलथानपणामुळे व नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे तसेच रूल कार्व्हच्या उल्लंघनामुळेच महापूर आला असल्याचा आरोप केला आहे. अलमट्टी धरण हे कृष्णा नदीवर सांगली पासून साधारण २६० किलोमीटर अंतरावर आहे. ते धरणही जुलै अखेरीस जवळपास १०० टक्के भरले होते. परंतु महाराष्ट्रातील पाटबंधारे खात्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा अलमट्टी धरणातील अधिकारी वर्गाशी पर्यायाने कर्नाटक सरकारशी योग्य समन्वय नसल्याने त्याचा फटका कोल्हापूर व सांगली जिल्ह्याला बसला असल्याचे याचिकेत म्हटले आहे. नदीपात्रात पूररेषांचे उल्लंघन करून झालेली बांधकामे त्यामुळे पाण्याला प्रवाह न मिळणे तसेच महापालिका, नगरपालिका व दुसऱ्या बाजूला धनदांडगे बिल्डर यांची अभद्र हातमिळवणी असल्याने पूररेषेत बेसुमार बांधकामे झाली असल्यामुळेही पूर परिस्थिती लवकर निवळली नसल्याचेही याचिकेत पाठविले आहे.

महापुरात सध्या घर पडल्यावर सरकारने एक लाख रुपये व अंशतः पडले असल्यास ३० हजार रुपयांची मदत रक्कम अतिशय तुटपुंजी असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारने घोषित केल्याप्रमाणे घर पडल्यास पाच लाख व अंशत: पडल्यास एक लाख व घर बांधून होईपर्यंत महिना पाच हजार रुपये भाडे देण्याचे आदेश राज्य सरकार द्यावे, अशीही मागणी याचिकेत केली आहे. लोक पुरात अडकले असताना आपत्कालीन कक्ष कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांमध्ये कोठेही अस्तित्वात असल्याचे दिसून आले नाही. भीतीच्या छायेत अन्न, पिण्याचे पाणी, वीज नसणे संपर्क तुटणे अशा अवस्थेत काढावे लागले. पुराच्या पाण्यासंदर्भात कोणतीही सूचना अथवा अलर्ट दिला गेला नसल्यामुळे सर्व यंत्रणा कुचकामी ठरली होती. जी काही तुटपुंजी मदत आली व रेस्क्यू टीम आल्या त्या खूप विलंबाने व अपुऱ्या होत्या. त्यामुळे आपत्कालीन कक्ष सक्षम करण्याची गरज याचिकेत व्यक्त केली आहे. जेणेकरून अशा आपत्कालीन परीस्थितीत नागरिकांना योग्य सूचना व खबरदारीचे उपाय योजता येतील असेही नमूद केले आहे. याचिकेमध्ये केंद्र सरकार, राज्य शासनाचा जलसंधारण, महसूल, पुनर्वसन व मदत विभागाला प्रतिवादी करण्यात आले आहे

जनहित याचिकेत प्रमुख मागण्या

तज्ज्ञ समिती नेमावी व महापुराची कारणे शोधावीत व परत पूरस्थिती उद्भवू नयेज्यासाठी प्रभावी शिफारसी मागवाव्यात तसेच संबंधित कर्तव्य करण्यास कसूर केलेल्या घटकांवर कायदेशीर कारवाई करावी, पूरग्रस्तांना कर्नाटक च्या धर्तीवर वाढीव रक्कम व इतर नुकसान भरपाई तसेच इथून पुढे धरणातील पाण्याचे व्यवस्थापन काटेकोर नियमाप्रमाणे करावे जेणेकरून पूर परिस्थिती पुन्हा उद्भवणार नाही याची खबरदारी घेणेचे आदेश द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे.

हा महापूर मानवनिर्मित असून प्रशासकीय गलथानपणा व धरण पाणी साठ्याचे योग्य व्यवस्थापन नसणे हीच कारणे महापूरास कारणीभूत आहेत. जर राज्य सरकारने नियमांचे काटेकोरपालन केले असते तर फक्त पूर आला असता महापूर आला नसता. सर्व यंत्रणा गलितगात्र झाल्याने हायकोर्टाचा दरवाजा ठोठावण्याची गरज पूरग्रस्तांना पडली आहे.

अ‍ॅड. धैर्यशील सुतार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूरबाधित क्षेत्रातील बांधकाम परवाने स्थगित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारकडून महापालिका क्षेत्रातील पंचगंगा नदीच्या पूररेषा निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सध्या पुरामुळे नागरी वस्तीमध्ये निर्माण झालेली परिस्थिती पाहता पूररेषा निश्चित होईपर्यंत पूरबाधित क्षेत्रात नव्याने बांधकाम परवानगी देऊ नका, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी नगररचना विभागाला दिले आहेत. या क्षेत्रात सध्या बांधकामे सुरू आहेत. त्यांनाही रेषा निश्चित होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत.

गेल्या दोन आठवड्यांत पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे शहरातील नागरी वस्तीत मोठ्या प्रमाणावर पाणी घुसले. त्याची पातळीही तब्बल पहिल्या मजल्यावर गेली. त्यामुळे पुन्हा एकदा 'रेडझोन' चर्चेत आला. या महापुरापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बैठक घेऊन नवीन पूररेषा निश्चित करण्यास सांगितले होते. त्यानंतर आलेल्या जलप्रलयामुळे पूरबाधित परिसरातील बांधकामे पाण्याखाली गेली. तसेच बांधकामांबाबतचे नियम पाळले गेले नसल्याने इतर भागातील पाणीपातळीही वाढली. परिणामी शेकडो कुटुंबीयांचे संसार बुडाले. ही परिस्थिती पाहिल्यानंतर नगररचना विभागाला आदेश देऊन पूरग्रस्त भागात नवीन बांधकाम परवाने थांबवण्याचे आदेश आयुक्त कलशेट्टी यांनी दिले. त्याबाबतच्या स्पष्ट सूचना नागरिकांच्या माहितीसाठी नगररचना विभागाच्या कार्यालयाबाहेर लावली आहे.

याबाबत आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, 'राज्य सरकारच्या नगर विकास विभागाच्या निर्देशानुसार जलसंपदा विभागामार्फत पंचगंगा नदीची शहरातील रेड आणि ब्ल्यू लाइन निश्चित करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी १९८९, २००५ या सालांमध्ये आलेल्या पुराची महत्तम रेषा संदर्भाला घेतली जात आहे. त्याबरोबरच सध्याच्या महापुराने कुठेपर्यंत पातळी गाठली त्याचा आधार घेऊन नवी पूररेषा तयार केली जात आहे. महापालिका प्रशासनानेही ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले आहे. सरकार याबाबत लवकरच निर्णय घेणार आहे. जोपर्यंत ही पूररेषा निश्चित होत नाही, तोपर्यंत पूरबाधित क्षेत्रात महापालिका कुणालाही बांधकाम परवानगी देणार नाही. पूर्वी परवानगी घेतलेल्या बांधकामांनाही हा आदेश लागू केला आहे.'

महापुराने झालेल्या नुकसानीचा सर्व्हे महापालिकेने सुरु केल्याचे सांगून आयुक्त म्हणाले, 'यासाठी अभियंत्यांसह विविध अधिकाऱ्यांची २० पथके नेमली आहेत. महसूल विभागाकडून पंचनामे सुरू आहेत. त्यानंतर सरकारकडून मदत दिली जाईल. पण भविष्यातील धोरण ठरवण्यासाठी या सर्वेक्षणाचा उपयोग महापालिकेला होईल. दोन दिवसांपासून त्याचे काम सुरू असून चार दिवसांत सर्व्हे पूर्ण होईल.'

... .. ... ..

सरकारकडे मदत मागणार

महापुरामुळे जनतेचे जसे नुकसान झाले आहे, तसेच महापालिकेचेही मोठे नुकसान झाले आहे. इमारती, शाळा, अंगणवाडी, पाणीपुरवठा संस्था आणि रस्ते यांचा त्यात समावेश आहे. या सर्व नुकसानीचा आराखडा तयार करण्यात येत असून जनतेला सुविधा देण्यासाठी राज्य सरकारकडे निधीची मागणी केली जाणार आहे, असेही आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी सांगितले.

.. . ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूरग्रस्त भागात मोफत रॉकेल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यातील पूरग्रस्तांना प्रती कुटुंब ५ लिटर रॉकेल मोफत वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण ३४ टँकर रॉकेल वितरणास मंजुरी दिली आहे. घाऊक वितरकांनी त्वरीत किरकोळ वितरकांना रॉकेल उपलब्ध करून द्यावे. यामध्ये दिरंगाई झाल्यास करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी देसाई यांनी प्रसिध्दी पत्रकातून दिला आहे.

पत्रकात म्हटले आहे, कागल, राधानगरी, गडहिंग्लज, आजरा, चंदगड, गगनबावडा, करवीर, भुदरगड, शाहूवाडी, पन्हाळा, करवीर येथे रॉकेल पुरवठा करण्यासाठी दोन ते तीन तालुक्यासाठी एक टँकर मिळेल. शिरोळ तालुक्यासाठी ५ हातकणंगले, इचलकरंजीसाठी ३, कोल्हापूर शहरासाठी ५ टँकर रॉकेल वितरणास मंजुरी मिळाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने उघडलेल्या कोल्हापूर डिझास्टर रिलिफ फंड या खात्यामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीमधून स्वयंसेवी संघटनांतर्फे जे साहित्य पूरग्रस्तांना वितरीत करण्यात येणार आहे, त्याच्या वाहतुकीच्या इंधनावर खर्च करण्यात येणार आहे. याशिवाय मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी खर्च करण्यात येणार आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी निधी देण्यासाठी कोल्हापूर डिझास्टर रिलिफ फंड या नावाने बँक ऑफ इंडियाच्या शाहूपुरी शाखेत खाते उघडण्यात आले आहे. त्याचा खाते क्रमांक ०९०११०११००१८७३० असा आहे. त्याचबरोबर आयएफएससी कोड बीकेआयडी ००००९०१ असा आहे. दानशूर व्यक्ती, संस्थांनी यावर आर्थिक मदत करावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पूरग्रस्तांचा घरफाळा माफ करण्याची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील पूरग्रस्तांचा घरफाळा आणि उद्योजक, व्यापाऱ्यांची परवाना फी तीन वर्षांसाठी माफ करावी, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली. जिल्हाप्रमुख आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महानगरपालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांची भेट घेऊन निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे , महापुराने कोल्हापूर शहराचे अतोनात नुकसान झाले आहे. महानगरपालिकेने या काळात नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी चांगले काम केले . शहरातील छोटे मोठे व्यापारी, उद्योजक आणि रहिवाशी दरवर्षी सर्वप्रकारचे कर देतात. पण महापुराने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या सर्व घटकांना पुन्हा उभारी देण्यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा. नैसर्गिक आपत्ती आल्यास घरफाळा माफ करण्याचा महानगरपालिकेला अधिकार आहे. महानगरपालिकेने तीन वर्षांसाठी घरफाळा माफ करावा. तसेच पूरग्रस्त व्यापारी, उद्योजकांचा परवाना फी देखील तीन वर्षांसाठी माफ करावी. पूरग्रस्त भागामध्ये ज्यांच्या घराचे नुकसान झाले आहे, त्यांच्यासाठी परवानगी आणि दुरुस्तीसाठी एक खिडकी योजना सुरु करुन आठ दिवसात परवानगी देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली. शिष्टमंडळात सुजीत चव्हाण, माजी नगरसेवक दत्ता टिपुगडे, हर्षल सुर्वे, मंजित माने, राजू यादव, शशी बिडकर, राजेंद्र जाधव, अवधूत साळोखे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वझरे डोंगरातील भेग धोकादायक नाही

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

तालुक्यातील वझरे आणि पेरणोली दरम्यानच्या डोंगर भागात पडलेल्या भेगा धोकादायक नाहीत. या भेगा भूस्खलनाच्या नसून अतिपावसामुळे पडल्या आहेत, असा निर्वाळा या परिसराची पाहणी करण्यासाठी आलेल्या भूगर्भ तज्ज्ञांच्या पथकाने नुकताच दिला आहे. यामुळे प्रचंड घबरटीखाली दबलेल्या येथील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

तालुक्यातील वझरे आणि पेरणोली दरम्यानच्या सडा नावाच्या डोंगर परिसरात आठवड्यापूर्वी ही घटना घडली. या डोंगरातील जंगलात शेळ्या-मेंढ्या व जनावरे चारण्यासाठी गेलेल्या काही धनगर बांधवांना हा प्रकार दिसला. सुमारे दीड किलोमीटरहून अधिक लांबीच्या आणि सहजासहजी पार करत येणार नाहीत, अशा भेगाच भेगा या परिसतात पाहणीसाठी गेलेल्या इतर ग्रामस्थांना आढळून आल्याने घबराट पसरली. विशेषतः या जंगल परिसरानजीक वसलेल्या वझरेपैकी खोतवाडी व पेरणोलीपैकी धनगरवाडीतील ग्रामस्थ भीतीच्या छायेत होते.

या पार्श्वभूमीवर, आजरा तहसील प्रशासनाकडून भूगर्भ तज्ज्ञांना पाचारण केले. भूजल सर्वेक्षण विभागातील जेष्ठ भूगर्भ शास्त्रज्ञ ऋषीराज गोसकी, मंडल अधिकारी, तलाठ्यांच्या पथकाने या संपूर्ण परिसराची पाहणी केली आणि ही बाब धोकादायक नसल्याचे सांगितले आहे. या परिसरात अतिवृष्टीजन्य पाऊस सलग आठवडाभर पडत होता. त्यामुळे या परिसरातून उगम पावलेल्या अंबेओहोळच्या पात्रातून या परिसरात पाणी मोठ्या प्रमाणात मुरले. या भागात मोठ्या प्रमाणात उत्खनन झाले आहे. परिणामी येथील जमिनीचा वरचा थर कमकुवत बनला आहे. त्यामुळे भेगा पडण्याची व झाडे उन्मळून पडण्याची क्रिया झाली आहे. मात्र ती नैसर्गिक क्रिया असून यामुळे येथील जमिनीच्या पोटात कोणत्याही हालचाली म्हणजेच भूस्खलनाचा प्रकार घडलेला नाही. ही बाब अतिपावसाने घडलेली तात्कालिक स्वरुपाची आहे.

वझरे व पेरणोली दरम्यानच्या डोंगरात भेगा पडल्यामुळे या डोंगराच्या उतारावरील जमीन खचली आहे. पण त्यामुळे गावांना कोणताही धोका नाही. अतिवृष्टीमुळे हा नैसर्गिक परिणाम असल्याने घाबरण्याचे कोणतेही कारण नाही.

ऋषीराज गोसकी, भूगर्भतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुरासंबंधी बैठकीत सूचनांचा पाऊस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

गडहिंग्लज, चंदगड तालुक्यात पूरस्थितीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. धान्य, वस्तू व कपड्यांच्या रूपात मोठ्या प्रमाणात मदत आली. ही मदत थांबवून विस्थापितांना स्थिरावण्यासाठी किमान एका गावात 'एक घर एक शौचालय' बांधूया या संकल्पनेतून प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी बोलावलेल्या लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांच्या बैठकीत केवळ सूचनांचाच पाऊस पडला.

दरवर्षीपेक्षा यंदा दुप्पट-तिप्पट पाऊस पडला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. या कठीण परिस्थितीत प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी हजारो हात पुढे आले. आता सारेच सुरळीत होत आहे. पण ज्यांची घरं पूर्ण उद्ध्वस्त झाली, त्यांना मदत करताना सरकारलाही मर्यादा आहेत. त्यामुळे आर्थिक स्वरुपात निधी उभा करू, अथवा ज्यांना शक्य आहे त्यांनी 'एक घर एक शौचालय' उभारण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन करीत प्रांताधिकारी पांगारकर यांनी स्वस्त घर कसं उभा राहू शकेल, याच्या मॉडेलचेही सादरीकरण केले.

आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत कुपेकर यांनी अतिवृष्टी आणि पुरामुळे जी कुटुंबे विस्थापित झाली त्यांना सरकारने तत्काळ घरे बांधून द्यावीत, त्यांच्या निवाऱ्याचे काम पूर्ण होईपर्यंत सहा महिने भाड्यापोटी रक्कम उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली. शंभर कुटुंबांना प्रत्येकी पाच हजार रुपये, पूरग्रस्त निराधार महिलांना ११ हजार रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली.

गडहिंग्लज शहरातील पूरग्रस्ताबाबत नगराध्यक्ष स्वाती कोरी यांनी माहिती दिली. नगराध्यक्ष फंडात दोन लाखांचा निधी जमा झाल्याचे जाहीर केले.

पूरग्रस्त बाधित क्षेत्रात एकही कृषी खात्याचा कर्मचारी फिरकला नसल्याची तक्रार सरपंच दिग्विजय कुराडे यांनी केली. बाळेश नाईक, संग्राम कुपेकर, सरपंच संघटनेचे उदय चव्हाण, राष्ट्रीय काँग्रेसचे बसवराज आजरी यांनी पंचनामा करताना पारदर्शकता ठेवा, अन्यथा गरीबावर अन्याय होईल, अशा सूचना केल्या. पूर ओसरल्यानंतर अनेक घरांचे पंचनामे केले नसल्याचेही निदर्शनास आणले.

नुकसान झालेल्या पिकांचा त्वरित पंचनामा करून शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्या. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, अशी मागणी माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांनी केली.

प्रांताधिकारी पांगारकर यांनी, केवळ सूचना आणि तक्रारीसाठी या बैठकीचे प्रयोजन नाही असे स्पष्ट करून, धान्य, वस्तू मदतीचा आता महापूर थांबवला पाहिजे. हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांना दत्तक घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. शासन स्तरावर केवळ फुटपट्टी लावून काम करणार नाही. सरकारकडून जे शक्य आहे ते पुरवले जाईल, असेही आश्वासन दिले.

यावेळी डॉ. नंदिनी बाभूळकर, प्रा. सुनील शिंत्रे, उदय जोशी, सभापती विजय पाटील, उपसभापती विद्याधर गुरबे, नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व कर्मचारी उपस्थित होते. तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी आभार मानले.

हिरण्यकेशी फाउंडेशन देणार घर

प्रांताधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत हिरण्यकेशी फाउंडेशनच्या कावेरी चौगुले, सुनील चौगुले यांनी पूरग्रस्तांसाठी एक घर बांधून देण्याचे जाहीर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुनीता पाटील कुडित्रे : शिरोली दुमाला (ता

$
0
0

सुनीता पाटील

कुडित्रे : शिरोली दुमाला (ता.करवीर) येथील कुंभी कासारी साखर कारखान्याच्या माजी संचालिका श्रीमती सुनीता आनंदराव पाटील (वय ७३) यांचे निधन झाले. त्या कुंभी कारखान्याचे माजी व्हाइस चेअरमन दिवंगत आनंदराव पाटील यांच्या पत्नी तर कुंभी कारखान्याचे विद्यमान संचालक किशोर पाटील यांच्या आई होत. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. २१) शिरोली दुमाला येथे आहे.

गणपती पाटील

राधानगरी: कौलव (ता. राधानगरी) येथील प्रतिष्ठीत नागरिक, प्रगतशील शेतकरी गणपती बाळा पाटील (वय १०४) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात, दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शंकरराव पाटील-कौलवकर यांचे ज्येष्ठ बंधू होत. तर काँग्रेस पक्षाचे राधानगरी तालुका समन्वयक सुशील पाटील-कौलवकर यांचे चुलते होत. गणपती पाटील यांनी फेजिवडे, वाकीघोल या परिसरा ऊसशेती यशस्वी केली होती.

केरबा पाटील

कुडित्रे: महे (ता. करवीर) येथील यशवंत बँकेचे संस्थापक संचालक, माजी सरपंच, माजी पोलिस पाटील केरबा महादेव पाटील ( वय ९३) यांचे निधन झाले. ते यशवंत बँकेचे विद्यमान संचालक पांडुरंग पाटील व यशवंत बँकेच्या कसबा बीड शाखेचे शाखाधिकारी प्रकाश पाटील यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन गुरुवारि (ता. २२) आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आपत्तीत धावल्या ‘आपदा सखी’

$
0
0

युवामुद्राचा लोगो वापरावा

..........

फोटो आहे

.........

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:Appasaheb_MT

कोल्हापूर

महापुराने सर्वत्र थैमान घातलेले... पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रत्येकजण आपआपल्या परीने प्रयत्नशील... कधी पाण्यात उतरुन तर कधी पुरात पोहत अनेक युवती पूरग्रस्तांना मदतीचा हात देत होत्या. आर्मी आणि एनडीआरएफच्या जवानांसोबत पूरभागात सक्रिय होत्या. शहर आणि जिल्ह्यात पूरग्रस्तांसाठी त्या 'आपदा सखी'म्हणून बचावासाठी धावल्या. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणमार्फत जिल्ह्यात ९३ मुली महापुराच्या आपत्तीला धैर्याने सामोरे जात संकटग्रस्तांना आधार दिला.

या सगळ्या युवती वेगवेगळ्या कॉलेजच्या विद्यार्थिनी आहेत. काही युवती ज्युनिअर कॉलेज तर काहीजणी सिनीअर कॉलेजमध्ये शिकत आहेत. 'पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही संकटसमयी उभे राहिलो. पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला. एनसीसी कॅडेट म्हणून देशसेवा तसेच समाजसेवेतही आमचा सहभाग राहिला, हा आमच्यासाठी खूप मोठा ठेवा आहे. एनसीसी कॅडेट म्हणून देशसेवा तसेच समाजसेवेतही आमचा सहभाग राहिला, हा आमच्या जीवनातील अनमोल आणि अविस्मरणीय प्रसंग आहेत,'अशा भावना या युवतींनी व्यक्त केल्या.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणमार्फत मे महिन्यात या युवतींना खास प्रशिक्षण दिले. पंधरा दिवसाच्या शिबिरात आपत्तकालीन स्थितीवर कशा पद्धतीने मात करायची, लोकांना सुरक्षितपणे अन्यत्र कसे पोहचवायचे, प्राथमिक उपचार पद्धती अशा विविध बाबींचे त्यांना प्रशिक्षण दिले. 'आपदा सखी'बनलेल्या सगळ्या मुली या कॉलेज शिक्षण घेणाऱ्या आहेत. कोल्हापुरातील कमला कॉलेज, न्यू कॉलेज, प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, महाराष्ट्र हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधील युवतींचा 'आपदा सखी'मध्ये सहभागी आहे.

कमला कॉलेजमधील शुभांगी मधुकर घराळे (एमए), वैष्णवी सुनील कांबळे (बीए प्रथम वर्ष), श्रद्धा कुमार पाटील (बीए द्वितीय वर्ष), अश्विनी अनंत काताळे (बीए द्वितीय वर्ष), निहारिका महादेव राऊत (बीए द्वितीय वर्ष) व प्रिन्सेस पद्माराजे ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी सानिका चंद्रकांत शिंदे ही बारावीत शिकत आहे. तर शामल संजय कांबळे ही न्यू कॉलेजमध्ये बीए करत आहे.

महापुराने जिल्ह्याला विळखा घातल्यानंतर लष्कर व एनडीआरएफच्या जवानांना पाचारण केले. तत्पूर्वीच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत 'आपदा सखी'आंबेवाडी, चिखली भागातील मदत कार्यात सक्रिय होत्या. शहरातील 'आपदा सखीं'नी आंबेवाडी, प्रयाग चिखली, केर्ली, शिरोली, बालिंगा, आंबेवाडी, तावडे हॉटेल, गांधीनगर, दोनवडे फाटा, व्हन्नूर, सांगली फाटा या भागात प्रत्यक्ष मदत कार्य केले. पूरग्रस्तांना बोटीत बसविणे, सुरक्षितस्थळी पोहचविणे, लहान मुले, महिलांची विशेष काळजी घेत त्यांना पुरातून बाहेर काढणे अशा विविध पातळीवर काम केले. बोटीतून गॅस सिलिंडर पोहचविले.

...

कोट

'आपत्तीच्या काळात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून 'आपदा सखीं'नी काम केले. या कालावधीत धीरोदात्तपणे कसे काम करावे याचा अनुभव मिळाला. पूरग्रस्तांना मदत पोहचवू शकलो याचे समाधान आहे.

शुभांगी घराळे, सहभागी विद्यार्थिनी

...

'महापुराच्या आपत्तीत आपदा सखींचा मोठा फायदा झाला. जिल्ह्याच्या विविध भागात त्या कार्यरत होत्या. विविध पातळीवर त्या बचावकार्यात सक्रिय होत्या. 'आपदा सखी' मध्ये युवतींची संख्या जितकी वाढविता येईल तितकी उपयुक्त ठरणार आहे.

प्रसाद संकपाळ, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

...

अन्य संस्थांतील युवतीही बचावकार्यात

आधार रेस्क्यू फोर्स, इचलकरंजी

स्वराज्य फाऊंडेशन, कागल

जीवनज्योत व जीवन आधार संस्था

व्हाइट आर्मीची युवतींची फौज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोयनेच्या पायथा वीजगृहातूनहोणार विसर्ग बंद

$
0
0

कोयनेच्या पायथा वीजगृहातून

होणार विसर्ग बंद

कराड :

कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने सोमवारी धरणाच्या पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्गही पूर्ण बंद करण्यात आला आहे. सोमवारी सकाळपासूनच कराडसह परिसरात उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवू लागल्याने शेतकऱ्यांनी आपल्या आंतरमशागतीच्या कामांना सुरूवात केली आहे. तसेच पावसाचे पाणी साचलेल्या शेतातील पाण्याचा निचरा होऊन शेत सुकण्यास मदत होणार असल्यामुळे शेतकरी सुखावला आहे.

धरणाच्या पाणलोट क्षेत्रांर्गत येणाऱ्या विभागातील छोट्या-मोठ्या नद्या, नाले, ओढे, धबधबे यातून सरासरी ९ हजार ८७७ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. सध्या धरणात येणारे पाणी साठविण्यात येणार आहे. धरणात आता एकूण १००.१६ टीएमसी पाणीसाठा झाला असून, त्यापैकी उपयुक्त साठा ९५.१६ टीएमसी आहे.

...........

सौम्य भूकंपाचा धक्का

कोयना धरण परिसराला सोमवारी सकाळी ११.१४ वाजता सौम्य भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता २.३ रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून नैऋत्य दिशेला २५.६ किलोमीटर अंतरावर वारणा खोऱ्यातील टाकळी गावच्या पूर्वेला ९ कि. मी. अंतरावर भूगर्भात १७ कि.मी. खोलीवर असल्याची माहिती कोयना भूकंप मापन केंद्राने दिली आहे. सौम्य तीव्रता असल्यामुळे कोणत्याही स्वरूपाची जीवित वा वित्तहानी झाली नसल्याची माहिती महसूल विभागातून देण्यात आली आहे.

..............

पूरग्रस्तांना पुन्हा सक्षम करणार

म. टा. वृत्तसेवा, कराड

'सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असून, या अतिृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पिकांचे शंभर टक्के पंचनामे करण्यात येणार असून, शेतकऱ्यांना योग्य ती मदत देऊन त्यांच्या पायावर त्यांना सक्षपणे उभे करणार आहोत,' असे प्रतिपादन कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केली.

कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी सोमवारी कराड तालुक्यातील मालखेड येथे शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधांवरती जाऊन पिकांची पाहणी केली. या वेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. डॉ. अनिल बोंडे म्हणाले, 'पूरस्थिती व अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. या पिकांचे शंभर टक्के पंचनामे करण्यात येणार आहे. सरकार संवेदनशील असून, शेतकऱ्यांना सर्व ती मदत देऊन पुन्हा स्वत:च्या पायावर उभे करणार आहे. अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे विद्युत पंप, ठिबक संच तसेच ट्रॅक्टरांसह शेतीची अवजारे यांचे ही मोठे नुकसान झाले आहे. याचेही पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. पुरामुळे विद्युत खांब, मीटर यांचेही नुकसान झाले आहे. त्याची दुरुस्ती वीज वितरण कंपनीकडून दुरुस्ती करण्यात येणार आहे. जनावरांचे तसेच गोठ्याचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत दिली जाईल.'

.............

भाजपचे पदाधिकारी व अतुल भोसले युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. कराड येथील शुक्रवार पेठेतील कोयनेश्वर मंदिर परिसरातही स्वच्छता करण्यात आली.

राम जगताप

......

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदार संभाजीराजेंची विनोद तावडेंवर टीका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर आणि सांगलीच्या पूरग्रस्तांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी मुंबईत भीक मागून मदत गोळा करण्याच्या कृतीविरोधात खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी निषेध व्यक्त केला आहे.'स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कोणाच्याही भिकेची गरज नाही', अशा कडक शब्दांत त्यांनी टीका केली.

गेले दहा दिवस संभाजीराजे दोन्ही जिल्ह्यांतील पूरग्रस्त भागांना भेटी देऊन दिलासा देण्याबरोबर मदत देण्यासाठी कार्यरत होते. मंत्री तावडे हे हातात डबा घेऊन पूरग्रस्तांसाठी मदत मागत असल्याचा व्हिडिओ सोमवारी त्यांच्या निदर्शनास आला. तावडे यांचा मदत गोळा करण्याचा व्हिडिओ संभाजीराजे यांनी व्टिटरवर शेअर केला. या व्हिडिओवर त्यांनी 'स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कोणाच्या भिकेची गरज नाही. महाराष्ट्राच्या मंत्र्याला भीक मागण्याची वेळ यावी?' अशा शब्दांत संताप व्यक्त केला आहे. 'इथे भीक स्वीकारली जाणार नाही. पूरग्रस्तांची क्रूर चेष्टा सहन केली जाणार नाही', अशा शब्दात त्यांनी निषेध व्यक्त केला आहे.

मंत्री तावडे यांनी बोरवली विधानसभा मतदारसंघात पूरग्रस्तांसाठी मदत फेरीचे आयोजन केले होते. पूरग्रस्तांसाठी निधी संकलन करण्यासाठी ११० डबे तयार केले होते. या डब्यांत जमा झालेला निधी मुख्यमंत्री निधीत जमा केला आहे. स्थानिक नागरिक, दुकानदार, रिक्षाचालक, टॅक्सीचालक, फेरीवाले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि बेस्ट कर्मचाऱ्यांनी तावडे यांच्याकडे मदत जमा केली होती. तावडे यांच्या कृतीबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बाजारभोगावात व्यापाऱ्यांचा बंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गगनबावडा

महापुरात संपूर्ण बाजारपेठतील दुकाने पाण्याखाली गेली असतानाही अद्याप तातडीची शासकीय मदत न मिळाल्याच्या निषेधार्थ बाजारभोगाव (ता. पन्हाळा) येथील व्यापाऱ्यांनी आज कडकडीत बंद पाळला. व्यापाऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी अमित माळी व तहसीलदार रमेश शेंडगे यांनी स्वीकारले.

कासारी नदीला आलेल्या महापुरात बाजारभोगाव व्यापार पेठेत पाणी शिरले होते. दुकाने बुडल्याने त्यातील मालाची नासाडी होऊन विक्रेत्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. सरकारतर्फे पूरग्रस्त कुंटूबांना रोख पाच हजारांचे सानुग्रह अनुदानाचे वाटप सुरू आहे. मात्र लाखो रुपयांचे नुकसान झालेल्या व्यापारी, दुकानदार व छोट्या व्यावसायिकांच्या मदतीसाठी सरकारने धोरण ठरविलेले नाही. याचा निषेध करण्यासाठी व तत्काळ मदत मिळावी या मागणीसाठी सरपंच नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली १८२ व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेऊन सरकारचा निषेध केला. बंदमुळे जनतेची मोठी गैरसोय झाली. सरकारला जाग आणण्याकरिता यापुढे रास्ता रोको, साखळी व आमरण उपोषण करण्याचा निर्धारही व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, खासदार संजय मंडलिक यांनी व्यापाऱ्यांची भेट घेऊन नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. जि.प. सदस्य राहुल पाटील, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे यांनीही बंदला पाठिंबा देत व्यापाऱ्यांना नुकसान भरपाईच्या मागणीकरिता पी.एन. पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्याचा इशारा दिला. त्याचबरोबर जि.प. उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, पं. स. सदस्य प्रकाश पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयसिंगराव हिर्डेकर, प्रकाश पाटील, कुंडलिक पाटील-आमशीकर, युवराज बेलेकर आदींनी व्यापाऱ्यांची भेट घेऊन बंदला पाठिंबा दिला. खंडू बने, फिरोज गडकरी, अनिल पानारी, सर्जेराव पानारी, अभिजित गांधी, तात्या म्हेतर, धर्मा खोत आदींनी सहभाग घेतला.

फोटो ओळ : पूरग्रस्त व्यापाऱ्यांना मदत मिळावी या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी अमित माळी व पन्हाळा तहसीलदार रमेश शेंडगे यांना देताना सरपंच नितीन पाटील आणि व्यापारी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळा सुरू झाल्यानंतर मदतीचा हात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

महापुराने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे बंद ठेवण्यात आलेल्या शाळांमध्ये १५ दिवसांनंतर पुन्हा किलबिलाट सुरू झाला आहे. सोमवारपासून परिसरातील शाळा, महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. पूरग्रस्त भागातील विद्यार्थी-विद्यार्थीनींचे शैक्षणिक साहित्य पुरात खराब झाल्याने त्यांना आवश्यक ते साहित्य पुरविण्यासाठी मदतीचे हात पुढे येत आहेत.

गत पंधरवड्यात शहर परिसरासह पाणलोट क्षेत्रातील दमदार पाऊस आणि धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने पंचगंगा नदी धोका पातळीपेक्षा १० फुटांवरुन वाहू लागली होती. त्यामुळे अनेक नागरी वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने वस्त्यांमधील सर्व घरे पाण्याखाली गेली होती. त्यामुळे हजारो नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले होते. स्थलांतरित नागरिकांना नगरपरिषदांच्या प्राथमिक शाळांसह सांस्कृतिक भवन, खासगी शाळा, महाविद्यालयातील छावण्यांमध्ये ठेवण्यात आले होते. या कठीण परिस्थितीमुळे शहर आणि परिसरातील शाळा, महाविद्यालयांना जिल्हा प्रशासनाकडून परिस्थितीनुरुप सुट्ट्या जाहीर केल्या जात होत्या. महापुरामुळे जवळपास १५ दिवस सर्व शाळा, महाविद्यालये पूर्णत: बंद होती.

महापूर ओसरल्याने ज्या शाळा-महाविद्यालयात पूरग्रस्त छावण्या उभारण्यात आल्या होत्या तेथील नागरिक घरी परतले आहेत. त्यामुळे छावण्यांची साफसफाई, स्वच्छता करून घेण्यात आल्यानंतर सोमवारपासून शाळा, महाविद्यालये पूर्ववत सुरू करण्यात आली आहेत. सर्वच पूरग्रस्त भागातील सर्वच विद्यार्थी-विद्यार्थीनींचे शैक्षणिक साहित्य पुरात बुडाल्यामुळे ते खराब झाले आहे. अशा गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना विविध सामाजिक, सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्ती यांच्याकडून आवश्यक ते शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन दिले जात आहे.

मदतनिधी वाटपाचे काम गतीने

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

सरकारकडून पूरग्रस्त क्षेत्रात मदतनिधी वाटपाचे काम गतीने सुरू आहे. लवकरात लवकर हा निधी पूरग्रस्तांना मिळावा, यासाठी आणखी पथके कार्यान्वित करण्यात येत आहेत. तसेच ज्यांची घरे पूर्णत: पडली आहेत त्यांचे सर्व्हेक्षणाचे काम मंगळवारपासून सुरू करण्यात येत आहे. आजअखेर १७३२ पूरग्रस्त कुटुंबांना ७६ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती मंडल अधिकारी प्रणाम भगले यांनी दिली.

शहर आणि परिसरात गत पंधरवड्यात महापुरामुळे १८ हजार नागरिकांना स्थलांतरित व्हावे लागले. गत चार दिवसांपासून पूराचे पाणी ओसरले असून शासनाकडून पूरग्रस्तांना प्रतिकुटुंब १५ हजार रुपये मदत निधी देण्यात येत असून पाच हजार रोखीने तर उर्वरित रक्कम बँक खात्यात जमा केली जात आहे. मदतनिधी पूरग्रस्तांच्या थेट घरात जाऊन देण्यासाठी पथके नेमण्यात आली आहेत. या पथकांद्वारे भागाभागात जावून मदतनिधीचे वाटप केले जात आहे. आजअखेर १७ पथकांद्वारे हे काम सुरू होते. त्यामध्ये आणखी तीन पथके वाढविण्यात आली असून २० पथकांद्वारे हे काम सुरु करण्यात येणार आहे.

त्याचबरोबर महापूरात पडलेल्या घरांची तसेच अंशत: पडझड झालेल्या घरांचे मंगळवारपासून सर्व्हेक्षणाचे काम हाती घेण्यात येत आहे. दहा पथकांद्वारे हे सर्व्हेक्षण केले जाणार असून त्यामध्ये एक नगरअभियंता व एक तलाठी यांचा समावेश असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूरग्रस्तांसह जिल्हाधिकारीकार्यालयावर मोर्चाचा इशारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, पूरबाधित लोकांची सरसकट कर्जमाफी करावी यासह विविध मागण्यांचे निवेदन खासदार धैर्यशील माने, आमदार सत्यजित पाटील, आमदार डॉ. सुजीत मिणचेकर यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना सोमवारी दिले. पाच सप्टेंबरपूर्वी मागण्या मान्य न झाल्यास पूरग्रस्तांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, पूरबाधित उद्योजक, व्यावसायिकांना आर्थिक अनुदान द्यावे, पूरबाधितांना तात्पुरत्या स्वरूपात निवारा शेड बांधावे, शेतमजुरांना अन्नधान्य वाटप करावे, त्यांना १५ दिवसांची मजुरी द्यावी, मृत जनावरांसाठी अर्थसहाय वाढवावे, पूरबाधित कुटुंबाचे आणि उद्योजकांचे वीज बील माफ करावे, पुराने वेढा पडलेल्या सर्व ग्रामस्थांना आर्थिक मदत करावी, पूरबाधित क्षेत्रातील घरांमधील दुसऱ्या, तिसऱ्या मजल्यावरील लोकांनाही मदत मिळावी, नदीकाठावरील प्रत्येक गावास बोट द्यावी, इचलकरंजीतील यंत्रमागधारकांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, नावाड्यांच्या मुलांना सरकारी नोकरीत आरक्षण द्यावे, पूरक्षेत्रातील गावात ग्रामपंचायतीमध्ये आरओ प्लांट उभारावा.

दरम्यान, निवेदन स्वीकारल्यानंतर चर्चा करताना खासदार माने म्हणाले, 'पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शक्य तितकी अधिक मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळावी. अॅपव्दारे केल्या जात असलेल्या घराच्या नुकसानीत पुरात बुडाल्याने पुढील काही दिवसात पडणाऱ्या घरांचीही नोंद घ्यावी.'

आमदार डॉ. मिणचेकर म्हणाले, 'घर पडलेल्या पूरग्रस्तांना तात्पुरत्या स्वरूपात राहण्यासाठी निवारा तयार करावा, रेशनकार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड अशी महत्वाची कागदपत्रे पुरात खराब झाली आहेत. त्यांना कागदपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने मदत करावी.' यावेळी जिल्हाधिकारी देसाई यांनी जिल्हा प्रशासनाच्या पातळीवरच्या मागण्या पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन दिले.

...

तलाठ्यांवर कारवाई करा

आमदार सत्यजित पाटील म्हणाले, 'पूरग्रस्त नसलेल्या कुटुंबांनाही पाच हजारांची मदत वाटली जात आहेत. माझ्या सरूड गावातच असा प्रकार झाला आहे. खोट्या पूरग्रस्तांना लाभ देणाऱ्या तलाठ्यांवर कारवाई करावी. शाहूवाडी, राधानगरी तालुक्यातील गाव, तालुका पातळीवरील महसूल यंत्रणा सुस्तावली आहे, ती गतिमान करावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकसभेसाठीची इव्हीएम,व्हीव्हीपॅट महापूरातून वाचली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी वापरण्यात आलेली इव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्रे पुराच्या पाण्यातून थोडक्यात वाचली. ही यंत्रे ठेवलेल्या रमणमळा येथील सरकारी गोडाऊनच्या पायऱ्यांवर पंचगंगा नदीचे पाणी आले. दरम्यान, पूर ओसरल्याने ही यंत्रणे वाचली. यामुळे इव्हीएम विरोधातील सुप्रीम कोर्टातील याचिकेसाठी आवश्यक पुरावेही सुस्थितीत राहिले.

दोन महिन्यांपूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या. 'कोल्हापूर'साठी वापरण्यात आलेली यंत्रे रमणमळा येथील सरकारी गोडाऊनमध्ये तर 'हातकणंगले'साठी वापरण्यात आलेली यंत्रे शिवाजी विद्यापीठासमोरील राजाराम तलावासमोरील गोडाऊनमध्ये ठेवण्यात आली आहेत. निकालानंतर वंचित बहुजन आघाडीसह अनेक विरोधी पक्षांनी इव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा मुद्दा पुढे करून निवडणूक प्रशासनाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली. निवडणुकीत वापरलेली यंत्रे त्या याचिकेवरील निकाल लागेपर्यंत पुरावा म्हणून सुरक्षित ठेवावी लागणार आहेत. यासाठी दोन्ही लोकसभा मतदारसंघातील यंत्रे सुरक्षित ठेवण्यात आली आहेत.

दरम्यान, ६ ऑगस्टनंतर जोरदार पाऊस झाला. पंचगंगेला महापूर आला. त्या पाण्याचा फुगवटा रमणमळ्यापर्यंत आला. गोडाऊनपर्यंत पाणी येऊन पोहचले. ज्या गोडाऊनमध्ये यंत्रे ठेवण्यात आली होती, त्या इमारतीला पुराचे पाणी लागले. पाणी वाढल्यास यंत्रे पाण्यात बुडणार असल्याची चर्चा निवडणूक प्रशासनाच्या पातळीवर सुरू झाली. त्वरित यंत्रे हलवणेही शक्य नसल्याने प्रशासनही हतबल होते. पाऊस कमी झाल्याने पूर कमी झाला. यंत्रे पाण्यात बुडाली नाहीत. यामुळे निवडणूक प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिरोळची सरसकट कर्जमाफी न केल्यास आंदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा,जयसिंगपूर

शिरोळ तालुक्यातील बहुतांशी गावांना महापुराने विळखा दिला. शेतकरी अडचणीत असतानाच आता अतिवृष्टी व महापुराचा तडाखा त्याला बसला आहे. पुरामुळे सर्वच घटक उद्ध्वस्त झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे सर्व कर माफ करण्याबरोबरच शिरोळ तालुक्याची १०० टक्के कर्जमाफी करावी, रस्त्यांच्या पुर्नबांधणीसाठी तालुक्यास १०० कोटीचा निधी द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी पत्रकार बैठकीत केली. सरकारने येत्या दहा दिवसांत याबाबत निर्णय न घेतल्यास राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष तसेच सेवाभावी संस्था, पूरग्रस्त जनता तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

यड्रावकर म्हणाले, 'शिरोळ तालुक्यातील ८० टक्के गावांना पुराच्या पाण्याने वेढा दिला. हजारो लोक विस्थापीत झाले. या कुटुंबांना १० हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळायला हवे. छोट्या व्यावसायिकांनाही सरकारने नुकसान भरपाई दिली पाहिजे. महापुरात पशुधन वाहून गेले असून शेतकऱ्यांना प्रति जनावर ७० हजार रुपये तर लहान जनावरास २५ हजार रुपयांची मदत मिळायला हवी.

शेतकऱ्यांच्या पाणी योजनांचे मोठे नुकसान झाले असून याचे पंचनामे करून भरपाई द्यावी. शेतमजुरांना किमान दोन महिन्यांचा पगार व धान्य द्यावे. घरे कोसळलेल्या पूरग्रस्तांच्या निवाऱ्याची सोय करावी. पुर्ण घर कोसळलेल्या पूरग्रस्तांना पाच लाख तर अंशता घर कोसळलेल्या पूरग्रस्तांना सरकारने एक लाखाची मदत द्यावी.

अतिवृष्टी व महापुराने शेतकऱ्यांबरोबरच समाजातील सर्वच घटकांचे कंबरडे मोडले आहे. यामुळे तालुक्यात १०० टक्के कर्जमाफी झाली पाहिजे. गावोगावच्या पाणी योजना महापुरामुळे बंद पडल्या असून त्या येत्या दोन दिवसात दुरूस्त झाल्या पाहिजेत. पूरग्रस्त गावातील विद्यार्थ्यांची फी माफी झाली पाहिजे. त्यांना नवे शैक्षणिक साहित्य सरकारने द्यावे. यासह अन्य मागण्या यड्रावकर यांनी केल्या.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, सुभाषसिंग रजपूत, जयसिंगपूरचे उपनगराध्यक्ष संजय पाटील, संजय नांदणे यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images