Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

शिपुगडे तालमीकडून २५ हजारांची मदत जाहीर

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

जुना बुधवार पेठेतील जुन्या शिपुगडे तालीम मंडळाने यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. २५ हजार रुपयांची मदत पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय दिला आहे. मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते अमोल डांगे यांनी माहिती दिली.

मंडळाकडून दरवर्षी साडेपाच फूट उंचीची मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. समाज प्रबोधनपर तांत्रिक देखावा सादर केला जातो. यंदा छोट्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार असून देखावा रद्द करण्यात आले. उत्सवातील रक्कम पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे.

शनिवार पेठेतील एस. पी. बॉइज आणि जुना बुधवार पेठ तालमीकडून फक्त मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. आगमन आणि विसर्जन मिरवणूकीला फाटा दिला असून उत्सवातील शिल्लक रक्कम पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे. शनिवार पेठेतील अष्टविनायक ग्रुप, सम्राट चौक तरुण मंडळ, शिवनेरी तरुण मंडळ, रणझुंझार तरुण मंडळ, बजापराव माने तालीम मंडळाकडून फक्त मूर्तीची प्रतिष्ठापना करुन अनावश्यक खर्च टाळून ही रक्कम पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे.

तोरस्कर चौकातील सोल्जर्स ग्रुपच्यावतीने आपत्तीवर देखावा सादर केला जाणार असला तरी पूरग्रस्तांना मदत केली जाणार आहे. जुना बुधवार पेठेतील बहुतांशी मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आंबेवाडी आणि चिखलीतील नागरिकांना पुराच्या काळात मदत केली होती. त्यामुळे मंडळांच्याकडून साधेपणाने उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कुंभारवाड्यांत पुन्हा लगबग

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

कुणी रंगकामात व्यस्त आहे, कोण तयार मूर्ती वाळविण्याच्या कामात आहे. काहीजणांची मूर्ती अन्य शहरात पाठविण्याची धांदल हे चित्र आहे शहर आणि परिसरातील कुंभारवाड्यातील. अतिवृष्टी आणि महापुरामुळे जवळपास दोन आठवडे मूर्तीकाम थंडावले होते. पावसाची उसंत आणि पुराचे पाणी ओसरल्यानंतर पुन्हा एकदा कुंभार समाज मूर्तीकामात नव्या दमाने गुंतला आहे. महापुरामुळे व्यवसायाला बसलेला फटका बाजूला सारत कारागिरी पुन्हा एकदा गणेश उत्सवात रंग भरत आहेत.

बापट कॅम्प, शाहूपुरी कुंभार गल्ली, पापाची तिकटी, गंगावेश परिसरासह शहराच्या विविध भागात हा समाज विखुरला आहे. जवळपास दहा हजार कुटुंबे मूर्तीकामाशी निगडीत आहेत. गणेशमूर्तीसह अन्य प्रकारच्या मूर्ती घडविण्याची वर्षभर लगबग असते. यंदा मात्र त्यांच्या नियोजनावर महापुराने पाणी फेरले. ऑगस्ट महिन्याच्या एक तारखेपासूनच पावसाचे पाणी वाढण्यास सुरुवात झाली आणि कुंभाराची घालमेल वाढत गेली. 'हजारो मूर्ती पाण्याखाली बुडाल्या होत्या. त्या संकटातून बाहेर पडून कुंभार समाज सुरक्षित मूर्तींवर अंतिम हात फिरवत आहे. बापट कॅम्पसह ठिकठिकाणी शेड उभारुन मूर्तीकाम सुरू आहे' असे शिल्पकार किशोर पुरेकर यांनी सांगितले. रंगकामाला गती आली आहे. मूर्तींची साफसफाई, फिनिशिंगचे काम वेगावले आहे. कारखान्यात, गोडावूनमध्ये मूर्ती वाळविण्यासाठी कारगीर प्रयत्नशील आहेत. सार्वजनिक तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांची मदत लाभत आहे.

तीन राज्यांत मूर्ती पाठविण्याचे नियोजन

आकर्षक गणेशमूर्ती, डोळयांची सुबक ठेवण आणि वेगवेगळ्या रुपातील गणेशमूर्ती यामुळे कोल्हापुरातील मूर्तींना सर्वत्र मागणी आहे. घरगुती गणपतीपासून सार्वजनिक तरुण मंडळाच्या मोठ्या गणेशमूर्तींची आगाऊ नोंदणी होते. कोल्हापुरातून सांगली, सातारा, सोलापूर, कराड, कोकण, बेळगाव, बेंगलोर शहरांना मूर्ती पाठविल्या जातात. गोव्यातूनही मूर्तींना मागणी आहे.

कारागिरांना चिंता कर्जफेडीची

बँका, पतसंस्था, सोसायटी, वित्तीय संस्थेकडून अल्पमुदतीसाठी कर्ज घेऊन कारागिरांनी पैसा गुंतवला आहे. जानेवारी महिन्यात कर्ज घ्यायचे आणि उत्सव संपला की त्याची परतफेड करायची हे त्यांचे सूत्र ठरलेले. प्रत्येकजण गरजेनुसार कर्ज घेतो. यावर्षी महापुरात हजारो मूर्ती खराब झाल्या. यामुळे कर्जाची रक्कम फेडायची कशी या विवंचनेत अनेक कारागीर आहेत. कुंभारवाड्यात फेरफटका मारताना कर्जाची परतफेड कशी करायची हा प्रश्न त्यांना पोखरत असल्याचे जाणवले.

यंदाचा महापुराचा फटक्यात कुंभार समाज उद्ध्वस्त झाला आहे. मोठे आर्थिक नुकसान सोसून पुन्हा हा समाज उत्सवाची तयारी करत आहे. उत्सवाला पंधरा दिवसांचा अवधी उरल्याने कारागीर दिवस-रात्र एक करुन मूर्ती साकारत आहेत. अतिवृष्टीमुळे व्यवसायावर तीस ते चाळीस टक्के परिणाम झाला.

- प्रकाश कुंभार, अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा कुंभार समाज व माजी नगरसेवक

सार्वजनिक तरुण मंडळातर्फे नोंदणी पूर्वी झाली असते. दरवर्षी शेजारील जिल्ह्यासह आंध्रप्रदेश, कर्नाटक, गोवा येथे कोल्हापुरातील मूर्ती पाठविल्या जातात. ऑर्डरप्रमाणे मूर्ती पाठविण्याचे सध्या नियोजन सुरू आहे.

- संभाजी माजगावकर, अध्यक्ष, संत गोरा कुंभार मूर्तीकार संघ, कोल्हापूर शहर

- दहा हजार कुटुंबे मूर्तीकामावर अवलंबून

- बापट कॅम्प, शाहूपुरी, गंगावेश, पापाची तिकटीवर कामे गतीने

- बँका, पतसंस्था, सोसायट्यांकडून अल्पमुदतीवर कर्जाची उचल

- शेजारील जिल्ह्यांसह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेशात मूर्तींना मागणी

- अतिवृष्टी, महापुरामुळे व्यवसायावर चाळीस टक्के परिणाम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेकडून पशुखाद्य वाटप

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पूरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरू असून शिवसेनेच्यावतीने पूरग्रस्त भागात पशुखाद्याचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यासह पर जिल्ह्यातील सामाजिक संस्थाकडून पूरग्रस्तांना सेवा देण्यात येत आहे.

शिवसेनेच्यावतीने शिवसहाय्य पूरग्रस्त केंद्रातून मदत वाटपास सुरुवात केली आहे. पूरग्रस्त भागातील कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. पाळीव जनावरांना पशुखाद्याची चणचण भासत आहे. शिवसेनेच्यावतीने कसबा बावडा आणि कदमवाडी भागातील जनावरांसाठी पाच ट्रक पशुखाद्याचे वाटप करण्यात आले. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली दसरा चौकात पूरग्रस्त सहाय्यता केंद्र सुरू करण्यात आले आहे. जुना बुधवार पेठ येथे आमदार सदा सरवणकर यांच्या उपस्थितीत पूरग्रस्त नागरिकांना चादर, कपडे, बिस्कीट, पिण्याचे पाणी आदी साहित्यांचे वाटप करण्यात आले.

००००

शिर्डी देवस्थानचे वैद्यकीय पथक

कोल्हापूर : शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानाच्यावतीने मुख्यमंत्री निधीला १० कोटी रुपयांची मदत केली आहे. संस्थानाकडे मनोरमाच्या संचालिका अश्विनी दानिगोंड यांनी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासाठी एक कोटी रुपये निधीची मागणी केल्यानंतर त्यांनी निधी देण्याची कार्यवाही सुरु केली आहे. तसेच साथीचे रोग उद्भवू नये म्हणून देवस्थानने २५ जणांचे वैद्यकीय पथक आणि दहा लाख रुपये किंमतीची औषधे जिल्ह्यासाठी उपलब्ध केले आहे. वळीवडे, गांधीनगर, वसगडे, कोयना कॉलनी, भीम नगर, सांगली जिल्ह्यातील बहे, कोळे, नरसिंगपूर बेघर वसाहत या ठिकाणी वैद्यकीय सेवा पुरवण्यात आली. मनोरमाच्या सोनल शिर्के, डॉ. सचिन यांच्या पथकाने पाच हजार लोकांची तपासणी केली.

कुंभार गल्लीत आरोग्य तपासणी

कोल्हापूर : शाहूपुरी कुंभार गल्लीत अनंतशांती बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि जागृती मेडिकल सेंटरच्यावतीने परिसरातील नागरिकांची मोफत वैद्यकीय तपासणी करुन मोफत औषधे देण्यात आली. डॉ. राखी माळकर, डॉ. अश्विनी खोराटे, डॉ. हर्षदा चव्हाण, डॉ. माधुरी खोत, भगवान गुरव यांच्या नेतृत्वाखाली पथकाने वैद्यकीय सेवा पुरवली.

पोलिसांना अल्पोपहार

कोल्हापूर : पुराच्या काळात बंदोबस्तास असलेल्या पोलिसांना भगतसिंग नवणे यांच्या वाढदिवसानिमित्त अल्पोपहार देण्यात आला. व्हिनस कॉर्नर, दसरा चौक, मध्यवर्ती बस स्थानक, पोलिस मुख्यालय परिसरात वाटप करण्यात आले. या उपक्रमात सतीश पाटील, कृष्णा पाटील, सिद्धांत ओडेसर, सुशांत हवालदार, प्रथमेश काजवे यांचा सहभाग होता.

माजी सैनिकांकडून ५१ हजार रुपयांचा निधी

कोल्हापूर : भाजप माजी सैनिक आघाडीच्यावतीने कोल्हापूर डिझास्टर रिलिफ फंडसाठी ५१ हजार रुपयांचा सहाय्यता निधी उप जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना आज देण्यात आला. यावेळी आघाडीचे अध्यक्ष देवदास औताडे, रविंद्र मुतगी, तानाजी सासने, धोंडीराम पाटील, शिवाजी पवार, धनंजय मोरे, रवणसिद्ध सुतार आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छतेसाठी सरसावली प्राचार्य असोसिएशन

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शिवाजी विद्यापीठत प्राचार्य असोसिएशनतर्फे पूरग्रस्त भागात स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय झाला. पूरग्रस्त भागातील स्वच्छता मोहिमेत सर्वच कॉलेजमधील एनएसएस, एनसीसी विभागातील स्वयंसेवक ताकतीनिशी उतरतील अशी ग्वाही प्राचार्यांनी दिली. पूरग्रस्त भागात सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी प्रशासनासोबत काम करतील असेही स्पष्ट केले.

प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली कमला कॉलेजमध्ये असोसिएशनची सहविचार सभा झाली. महापालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी आयुक्त कलशेट्टी म्हणाले, 'महापालिकेतर्फे गेली चार महिने प्रत्येक रविवारी शहर परिसरात स्वच्छता मोहीम सुरू आहे. यामध्ये कॉलेज युवकांचाही सहभाग लक्षणीय आहे. कोल्हापुरातील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. पालिकेतर्फे सार्वजनिक स्वच्छतेला प्राधान्य दिले आहे. कॉलेजतर्फे राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहिमेला पालिका पूर्ण सहकार्य करेल.'

प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील म्हणाले, 'कोल्हापुरातील महापुराची स्थिती भयानक आहे. महापुराचे पाणी ओसरले असले तरी सर्वत्र स्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे. शहर आणि परिसरातील स्वच्छता मोहिमेत सर्व कॉलेज सहभागी होतील.'

प्र-कुलगुरू शिर्के म्हणाले, 'विद्यापीठातर्फे चौदा कॉलेजमधील पथके वेगवेगळ्या भागात पाठविली आहेत. स्वच्छतेचा आराखडा तयार केला आहे. पूरग्रस्तांना आवश्यक मदत करण्यासाठी विद्यापीठ तयार आहे.'

प्राचार्य डॉ. सुरेश गवळी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. डी. के. गायकवाड यांनी आभार मानले. संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्राचार्य प्रवीण चौगुले, प्राचार्य एस. वाय. होनगेकर, प्राचार्य आर. पी. लोखंडे, प्राचार्य पी. आर. शेवाळे, प्राचार्य राजेखान शानेदिवाण, प्राचार्य पी. के. पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेबारा हजार घरांची पडझड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अतिवृष्टी आणि महापुरामुळे जिल्ह्यातील १२ हजार, ५१२ घरांची पडझड झाली. यापैकी ७४७ घरे पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत. परिणामी या घरांतील कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. पहिल्या टप्यात जिल्हा प्रशासनाकडे आलेल्या माहितीनुसार इतक्या घरांचे नुकसान झाले आहे. सध्या गावपातळीवरील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकातर्फे वस्तूनिष्ठ सर्व्हे केला जात आहे. हा अहवाल आल्यानंतर पुन्हा पडझड झालेल्या घरांची संख्या वाढणार आहे.

गेल्या आठवड्यात शहर, परिसर, जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. कच्च्या मातीच्या घरांची पडझड झाली. पावसाशी संपर्क आलेली भिंती पूर्णपणे कोसळल्या आहेत.अनेकांच्या पक्क्या बांधकामांना गळती लागली. करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली, आंबेवाडी, आरे तर शिरोळ, हातकणंगले तातुक्यातील बहुसंख्य गावांत आणि शहरातील शाहूपुरी कुंभार गल्ली, गवत मंडई, जवाहरनगर, लक्ष्मीपुरी सुतारवाडा, पोवार कॉलनी, शुक्रवारपेठ, लक्षतीर्थ वसाहत, उत्तरेश्वर पेठ, गवत मंडई या परिसरातील घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. या घरांची प्राथमिक माहिती महसूल प्रशासनाने घेतली आहे. यानुसार पुणे विभागात सर्वाधिक घरांची पडझड कोल्हापूर जिल्ह्यात आणि त्यापाठोपाठ सातारा जिल्ह्यातील झाल्याचे समोर आले आहे.

पुराच्या पाण्याखाली गेलेली मातीची चांगली घरेही आता ऊन पडल्यानंतर पडत आहेत. तेथे राहणे धोकादायक बनले आहे. अशी घरे पूर्ण: पाडून नव्याने बांधावी लागणार आहे. सिमेंटमध्ये साधे घरे बांधण्यासाठी कमीत कमी पाच लाख रूपये खर्च येणार आहे. मध्यमवर्गीय, हातावर पोट असणारे, मजुरी करणाऱ्या कुटुंबांसमोर घरांसाठी इतके पैसे कुठून उभे करायचे, असा प्रश्न सतावत आहेत. प्रापंचिक साहित्यांपेक्षा त्यांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. त्यासाठी सरकारनेही भरीव अर्थसहाय करावे, अशी मागणी त्यांच्यातून होत आहे. दरम्यान, शहरातील घरांच्या पडझडची वस्तुनिष्ठ पंचनामे तलाठी आणि महानगरपालिका कर्मचारी करत आहेत. गावनिहायही पंचनामे केले जात आहेत. हे काम पूर्ण झाल्यानंतर कुटुंबनिहाय पडझडीचे प्रमाणही किती आहे, त्याचे वास्तव चित्र समोर येणार आहे.

जिल्हा पूर्ण पडलेली घरे अंशत: पडलेली घरे एकूण

कोल्हापूर ७४७ ११७६५ १२५१२

सांगली ६२५ ३२२८ ३८५३

सातारा १३ ४३१८ ४३३१

पुणे ३ ७० ७३

३८७ गोठे पडले

पाऊस आणि पुराच्या पाण्याखाली गेलेल्या जनावरांच्या गोठ्यांचीही पडझड झाली आहे. जिल्ह्यात ३८७, सांगली जिल्ह्यात १०१, सातारा जिल्ह्यातील ५४, पुणे जिल्ह्यातील तीन गोठे पडले आहेत. संबंधित शेतकऱ्यांना जनावरे कुठे बांधायची ही समस्या भेडसावत आहे. ते रात्रीही जनावरे बाहेर बांधत आहेत. त्यांचा परिणाम दुग्ध व्यावसायावर होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१५ हजार वीज मीटर बदलले

चेक बाऊन्सप्रकरणी एकावर गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सोशल मीडियावरील जाहिरात पाहून स्कॉर्पिओ जीप खरेदी करण्यासाठी दिलेला धनादेश वटला नसल्याने संशयित सचिन सापळे (रा. क्रांतीसिंह नाना पाटील नगर) याच्यावर गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी राजाराम श्रीपती पाटील (वय ४९ रा. पार्वती पार्क, तात्यासाहेब मोहिते कॉलनी ज‌वळ) यांनी जुना राजवाडा पोलिसांत शनिवारी फिर्याद दाखल केली. सहा ऑगस्ट रोजी हा प्रकार घडला.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी पाटील यांची स्कॉर्पिओ गाडी ( क्रमांक एम. एच. ०४, एफ. एफ ९८६०) विकायची होती. त्यांनी या गाडीची जाहिरात सोशल मीडियावर केली होती. ती जाहिरात पाहून सापळे याने त्यांच्याशी मोबाइलवरुन संपर्क साधला. त्याने सहा लाख रुपयांचा धनादेश देऊन गाडी ताब्यात घेतली. दोन दिवसांनी त्याने दिलेला धनादेश पाटील यांनी बँकेत भरला. मात्र तो धनादेश रक्कम नसल्याने वटला नाही. त्यांनी सापळे याच्याशी संपर्क साधून धनादेश वटला नसल्याचे सांगितले. त्यावेळी त्याने जीपची रक्कम ऑनलाइन वर्ग केल्याचे सांगितले. मात्र, तीही जमा झाली नसल्याचे लक्षात आल्यानंतर पाटील यांनी फिर्याद दाखल केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॅटऱ्या लंपास

$
0
0

कोल्हापूर : नागाळा पार्क येथील दिवंगत नेते दिग्विजय खानविलकर निवासस्थानाच्या कंपाऊंडमध्ये ठेवलेल्या गोल्फ कारच्या इलेक्ट्रिक बॅटऱ्या अज्ञात चोरट्याने लंपास केल्या. १६ ऑगस्ट रोजी रात्री हा प्रकार घडला. या प्रकरणी भगवान भाऊ पाटील (वय ५४ रा. फुलेवाडी) यांनी शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दाखल केली. या बॅटऱ्यांची किंमती सुमारे ३० हजार रुपये आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अभियांत्रिकी प्रवेशासाठी १८ लाखांचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पुणे येथील एमआयटी कॉलेजमध्ये मुलाला मुलाला अभियांत्रिकी पदवीसाठी प्रवेश देण्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्याला १८ लाख रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित संजय शंकरराव वाघ (रा. टेंबलाई फाटक परिसर), जहीर पिराजी, आसिफ सिकंदर मेस्त्री (पूर्ण पत्ता नाही) अशी त्यांची नावे आहेत. फसवणुकीचा हा प्रकार ७ ऑगस्ट २०१० ते ९ ऑगस्ट २०१९ या कालावधीत घडला.

शाहूपुरी पोलिसांनी सांगितले की, मदनलाल सवजीभाई मेदपरा (वय ५३, रा. शिवाजी पार्क) हे होलसेल खडीसाखर विक्रीचे व्यापारी आहेत. त्यांच्या मुलाला पुणे येथील एमआयटी कॉलेजमध्ये अभियांत्रिकी शाखेसाठी प्रवेश घ्यायचा होता. त्यांच्या भावाशी संजय वाघ याच्याशी ओळख होती. संबधित कॉलेजमध्ये ओळख असून तुमच्या मुलाला प्रवेश मिळवून देऊ, असे आमिष दाखवून जहीर पिराजी, आसिफ मेस्त्री यांनी वेळोवेळी १८ लाख रुपये पुणे आणि कोल्हापूर येथे घेतले. पैसे देऊन मुलाला प्रवेश न मिळाल्याने त्यांनी विचारणा केली असता ते टाळाटाळ करु लागले. या प्रकरणी त्यांनी पनवेल पोलिस ठाण्यात तिघांविरोधात तक्रार दिली. हा प्रकार कोल्हापुरात घडल्याने तेथील पोलिसांनी शाहुपूरी पोलिसांकडे तक्रार अर्ज पाठविला. त्यानंतर शनिवारी (ता. १७) गुन्हा दाखल केला. संशयित आसिफ मेस्त्री याने आपले स्वत:च्या बँक खात्यावर पैसे घेतले आहेत. त्याचे चार महिन्यांपूर्वी निधन झाल्याची माहिती फिर्यादी मेदपरा यांनी दिली. अन्य दोघांकडे चौकशी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

७५० टन कचरा, गाळाची उचल

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पूर ओसरलेल्या ठिकाणी महापालिकेच्यावतीने सुरू असलेल्या महास्वच्छता अभियानाअंतर्गत स्वच्छता करण्यात आली. स्वच्छतेसाठी हजारो हात एकवटल्याने रविवारी एक दिवसात तब्बल ७५० टन कचरा व गाळाची उचल करण्यात आली. सकाळी सात वाजल्यापासून सुरू असलेली मोहीम सायंकाळी सहापर्यंत सुरू होती. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांच्यासह अनेक महाविद्यालयांचे विद्यार्थी या मोहिमेत सहभागी झाले होते.

महापुराने शहरात पुराच्या पाण्याबरोबर आलेला गाळ आणि कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पूरबाधित क्षेत्रात अनेक ठिकाणी एक ते दोन फूट गाळ साचला आहे. पूर ओसरल्यानंतर महापालिकेच्यावतीने तातडीने स्वच्छता मोहीम हाती घेतली. स्वच्छतेनंतर औषध व धूर फवारणी करून नागरिकांच्या आरोग्याचीही काळजी घेतली जात आहे. मोहीम अखंड सुरू असताना रविवारी महास्वच्छता अभियानाची जोड दिली.

महापालिकेच्यावतीने मे महिन्यापासून दर रविवारी स्वच्छता केली जाते. सलग १७व्या रविवारी स्वच्छता करताना पूरबाधित क्षेत्राला प्राधान्य देण्यात आले. सकाळी शाहूपुरी भागात श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, पोलिसप्रमुख डॉ. अभिनव देशमुख व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते स्वच्छतेला सुरुवात झाली आणि स्वच्छता करण्यासाठी हजारो हात कामाला लागले. शुक्रवार पेठ, पंचगंगा तालीम रोड, दुधाळी, मस्कुती तलाव, उत्तरेश्वर पेठ, जुना बुधवार पेठ, सिद्धार्थनगर, सीता कॉलनी, करवीर पंचायत समिती कार्यालय, लक्ष्मीपुरी, न्यू पॅलेस, कदमवाडी, जाधववाडी, बापट कँप, नंदवन पार्क, केव्हीज पार्क आदी भागात स्वच्छता करताना स्थानिक नगरसेवकांसह कार्यकर्त्यांनी मोहिमेत सहभाग घेतला.

सफाईनंतर एकत्र केलेल कचरा व गाळ टिप्पर, डंपर, आरसी गाड्या, ट्रॅक्टर ट्रॉली आदी वाहनातून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पावर टाकण्यात आल्या. ३७८ खेपांद्वारे ७५० टन गाळ व कचऱ्याची उचल केली. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, पोलिस कर्मचारी, जय महाराष्ट्र संस्था, सिलिंग मील यवलूज, रिलाएबल पेस्ट कंट्रोल यांच्यासह मुंबई महापालिका व बीव्हीजी ग्रुपचे प्रत्येकी ८० जणांचे पथक सहभागी झाले होते.

नगरसेवक राहुल चव्हाण, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, परिवहन विभागाचे अधिकारी राजेंद्र मदने, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, सामाजिक कार्यकर्ते अमर समर्थ आदी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेची मंगळवारी सभा

$
0
0

कोल्हापूर: महापालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी (ता. २०) सकाळी ११.३० वाजता राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात होणार आहे. कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा सातवा वेतन आयोग आणि महापुरात बाधित झालेल्या मिळकतदारांना चालू बिल माफ करण्याबरोबर मीटर बदलून देण्याच्या विषयावर चर्चा होणार आहे. अध्यक्षस्थानी महापौर माधवी गवंडी असतील. महापालिका कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार शुक्रवारी (ता. १६) झालेल्या स्थायी समितीच्या सभेमध्ये ठरावाला मंजुरी देऊन ठराव महासभेकडे पाठवला आहे. महापुरामुळे शहरातील अनेक मिळकतदारांचे पाणी मीटर बंद पडले आहेत. पाणी मीटर बदलून देण्याबरोबर चालू महिन्याचे पाणी बिल माफ करण्यासाठी सदस्य ठराव आला आहे. या ठरावावर सभागृहात चर्चा होणार आहे. तसेच शहरातील पुतळ्यांवर मेघडंबरी बसविण्याबाबतही चर्चा करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२४ लाखांची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बिंदू चौक येथे दुकानगाळे व शंभर चौरसफूट ऑफिस गाळे विक्री करणार असल्याची खोटी जाहिरात प्रसिद्ध करून डॉ. संदीप प्रभाकर गुंडकल्ली-पाटील (वय ४१, रा. बागल चौक) यांची २४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी संशयित दिलीप जोतिराव पाटील, धैर्यशील दिलीप पाटील, धनराज दिलीप पाटील (रा. तिघेही रामानंदनगर), सौरभ सतीश माने (रा. गुरुवार पेठ) या चौघांवर जुना राजवाडा पोलिसांत रविवारी गुन्हा दाखल झाला.

पोलिसांनी सांगितले की, संशयित पाटील पितापुत्रांनी बिंदू चौक येथील १५८२ सी वॉर्ड या ठिकाणी दुकानगाळे आणि ऑफिस गाळे विक्री करणार असल्याची जाहिरात एका वृत्तपत्रात दिली होती. ही जाहिरात पाहून फिर्यादी डॉ. पाटील यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी दुकानगाळ्याची चौकशी करण्यासाठी कागदपत्रे मागितली. त्यावेळी संशयित सौरभ याने जागेवर कोणतेही दुकानगाळे नसताना दुकानागाळ्यांचा आराखडा तयार केला. त्याचे भोगवटा प्रमाणपत्रही दिले. त्यानंतर या चौघांनी संशयितांनी करवीर दुय्यम निबंधक कार्यालयातून २७ नोव्हेंबर, २०१८ मध्ये इमारतीचे खोटे भोगवटा प्रमाणपत्रही खोटे तयार करुन घेतले. ही सर्व खोटी कागदपत्रे डॉ. पाटील यांना दाखविली. त्यांच्याकडून २८ ऑगस्ट ते १७ नोव्हेंबर, २०१८ या कालावधीत रोख आणि चेकद्वारे वेळोवेळी २४ लाख रुपये घेतले. मात्र त्यांना गाळा ताब्यात दिला नाही. अखेर डॉ. पाटील यांनी चौकशी केल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांत फिर्याद दाखल केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ई’ वॉर्डात पाणीपुरवठा सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापुरामुळे तब्बल दोन आठवडे ठप्प झालेला महापालिकेचा शहर पाणीपुरवठा रविवारी काही प्रमाणात सुरू झाला. बालिंगा उपसा केंद्रातून 'सी' व 'डी' वॉर्डात पाणी आल्यानंतर रविवारी सायंकाळी 'ई' वॉर्डातील कसबा बावडा व परिसरातील १८ प्रभागामध्ये १४ दिवसांनंतर पाणीपुरवठा सुरू झाला. मात्र शिंगणापूर योजना पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने उपनगरांमध्ये पाणीटंचाई कायम आहे. रविवारीही टँकरच्या पाण्यासाठी शहरवासीयांच्या टँकरभोवती गराडा पडत होता.

सोमवारपासून (ता.५) शहर पाणीपुरवठा ठप्प झाला होता. मंगळवारपासून (ता.१३) बालिंगा उपसा केंद्रातून पाणीपुरव‌ठा सुरू झाला. त्यामुळे 'सी', 'डी' वॉर्डासह फुलेवाडी, फुलेवाडी रिंगरोड, सानेगुरुजी वसाहत, शाहूपुरी, बागल चौक, लक्ष्मीपुरी, महापालिका परिसर, अंबाबाई मंदिर परिसरात एक दिवस आड पाणीपुरवठा सुरू झाला. त्यामुळे काही भागातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न निकालात निघाला. पण 'ए' व 'ई' वॉर्डासह उपनगरातील नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड हाल झाले. महापालिकेने टँकरद्वारे पाणीपुरवठा केला. पण अनेकांपर्यंत टँकर पोहोचत नसल्याने पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागली.

शहरावर ओढवलेल्या आपत्कालीन काळात खासगी टँकरचालकांनी मात्र नागरिकांची प्रचंड लूट केली. आजूबाजूला सर्वत्र पुराचे पाणी दिसत असताना पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना चांगलीच यातायात करावी लागली. वॉटर एटीएम व जार खरेदी करून नागरिकांनी तहान भागवली. पण खर्चासाठी लागणाऱ्या पाण्याविना त्यांना चांगलाच संघर्ष करावा लागला. बालिंगा व नागदेववाडी उपसा केंद्र सुरू झाल्यानंतर शिंगणापूर योजना कार्यन्वित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पुराच्या पाण्यातून विद्युतपंप बाहेर काढल्यानंतर तातडीने उपसा केंद्रातील ट्रान्स्फार्मर, स्टार्टर व विद्युत वाहिन्या दुरुस्त करण्यात आल्या. गोकुळ शिरगाव येथील उपसा करणाऱ्या चार विद्युतपंपासह स्टँडबाय पंप दुरूस्त करण्यासाठी दिले. यापैकी एक पंप शनिवारी रात्री मिळाल्यानंतर रविवारी ते बसविले. दुपारी उपसा सुरू झाल्यानंतर 'ई' वॉर्डातील १८ प्रभागात तब्बल १४ दिवसांनंतर पाणीपुरवठा सुरू झाला. रविवारी सायंकाळी आणखी एक पंप उपसा केंद्रावर आणला असून सोमवारी सकाळी शिंगणापूर योजनेतील दोन विद्युतपंप सुरू होणार आहेत. या पंपांद्वारे आपटेनगर टाकीमध्ये पाणी टाकून 'ए' वॉर्डातील भागाला सोमवारी सायंकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरू होईल. 'शिंगणापूर येथील उर्वरित दोन उपसा पंप कार्यन्वित केल्यानंतर बुध‌वारी सकाळी किंवा सायंकाळी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा सुरू होईल.' असे पाणीपुरवठा विभागाच्या यांत्रिकी विभागाचे उपजलअभियंता रामदास गायकवाड यांनी सांगितले. शिंगणापूर योजनेतील पंप बसवल्यानंतर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. यावेळी महानगरपालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, नगरसेवक शेखर कुसाळे, दिग्विजय मगदूम, जलअभियंता सुरेश कुलकर्णी उपस्थित होते.

कर्मचाऱ्यांनी केले अहोरात्र काम

शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाल्यानंतर महापालिकेचे २५ कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करत होते. बालिंगा उपसा केंद्र सुरू झाल्यानंतर नागदेवाडी व शिंगणापूर योजना कार्यन्वित करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले. उपजलअभियंता रामदास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अभियंता जयेश जाधव, एमजीपीचे कार्यकारी अभियंता यांत्रिकी पांड्या, उपअभियंता शिवाजी हरेर, मुंबई महापालिकेचे जलाभियंता अनिरुद्ध तम्हाणे, अभियंता जीवन पाटील, महापालिका कर्मचारी अरविंद यादव, अशोक मेंगाणे, स्मॅकचे दीपक परांडेकर, राजेंद्र चौगुले, अभिषेक परांडेकर, प्रमोद पाटील, राहुल पवार, विजय पाटील व देशपांडे लक्ष्मी इलेक्ट्रिकचे मोहन गुरव साईचे मारुती लोहार, रेनबो इलेक्ट्रिकचे अभियंता काशिनाथ शिंदे, हिंदुस्तान इलेक्ट्रिकचे मुशतकी मोमीण, साहील इंडस्ट्रिजचे सत्यजित पाटील, एमएसईबी फुलवाडी शाखेचे शाखाधिकारी मनोहर पोवार प्रयत्न करत होते. नगरसेवक शेखर कुसाळे व प्रतापसिंह जाधव कर्मचाऱ्यांना सुविधा देण्यासाठी त्यांच्यासोबत कायम होते.

एअर व्हॉल्व्हमधून गळती

शिंगणापूर व बालिंगा उपसा केंद्रातून सकाळी उपसा सुरू झाल्यानंतर डी मार्ट येथील एअर व्हॉल्व्हला गळती लागली. व्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचे फवारे उडत होते. दोन ते तीन तास हा प्रकार सुरू होता. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना त्रास होत होता. पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्ती केल्यानंतर पाणी थांबले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूरग्रस्त भागातही आजपासून शाळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अतिवृष्टी आणि महापुरामुळे जवळपास दोन आठवडे बंद राहिलेल्या शाळा सोमवारपासून (ता.१९) पुन्हा सुरू होत आहेत. शिरोळ, हातकणंगले, करवीर तालुक्याला महापुराचा सर्वाधिक फटका बसला असून अनेक शाळा पाण्याखाली गेल्या होत्या. वर्गखोल्यांची नासधूस झाली होती. या साऱ्या कटू प्रसंगांतून वाट काढत पूरबाधित भागातील शाळा पुन्हा भरणार आहेत.

महापुराच्या कालावधीत पूरग्रस्तांची ग्रामीण भागातील प्राथमिक व माध्यमिक शाळेत निवासाची सोय केली होती. या शाळा पूरग्रस्तांच्या स्थलांतरणाची प्रमुख केंद्रे ठरली होती. सोमवारपासून या ठिकाणच्या पूरग्रस्तांची अन्य ठिकाणी निवाऱ्याची सोय करून वर्ग पूर्ववत भरणार आहेत.

अजूनही ज्या शाळा परिसरात पाणी साचले आहे, व ज्या शाळेत मुलांची बैठक व्यवस्था होऊ शकत नाही. त्या मुलांची अन्य ठिकाणी बैठक व्यवस्था करून शाळा सुरू करण्याचे आदेश विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्वच शाळा मुख्याध्यापकांना शाळा सुरू करण्यासंदर्भात सूचना केल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी दिली.

शाळा परिसरात साफसफाई

ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून साफसफाई सुरू आहे. शाळा परिसरातही स्वच्छता केली आहे. ठिकठिकाणच्या वर्गखोल्यातील कचरा, चिखल हटविला आहे. अजूनही ठिकठिकाणी हे काम सुरू आहे. जिल्ह्यातील जवळपास ४०० शाळांना पुराचा फटका बसल्याची प्राथमिक माहिती आहे. १२०० हून अधिक वर्गखोल्यांचे नुकसान झाले आहे. शिरोळ तालुक्यात १२५ हून अधिक शाळा पाण्याखाली होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहीहंडीचे कार्यक्रम रद्द

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गोपाळकाला हा सण दरवर्षी कोल्हापुरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यासाठी जिल्ह्यातून गोविंदा पथकांना हंडी फोडण्यासाठी रोख रकमेचे बक्षीस देण्यात येते. दहीहंडी स्पर्धेचा थरार पाहण्यासाठी कोल्हापुरातील दसरा चौक, गुजरी येथे गर्दीचा महापूर येतो. यंदा मात्र हे चित्र बदलणार आहे. कोल्हापुरात आलेल्या महापुराच्या संकटामुळे दहीहंडी उत्सव रद्द करून बक्षिसाची रक्कम पूरग्रस्तांना मदत स्वरुपात देण्याचा निर्णय शहरातील महत्त्वाच्या दहीहंडी उत्सव आयोजकांनी घेतला आहे.

कोल्हापूरवर ओढवलेली अभूतपूर्व पुराची आपत्ती पाहता धनंजय महाडिक युवा शक्तीच्यावतीने दरवर्षी आयोजित केला जाणारा दहीहंडी सोहळा यंदा रद्द करण्यात आला आहे. तसेच दहीहंडीसाठी पथकांना देण्यात येणारी बक्षिसाची रक्कम आणि इतर खर्च होणारी रक्कम,पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आणि मदतीसाठी वापरण्यात येणार आहे. दरवर्षी युवा शक्तीच्या दहीहंडीमध्ये शिरोळ तालुक्यातील अनेक गोविंदा पथके सहभागी होतात. मात्र, यावर्षी महापुरामुळे शिरोळ तालुक्याला सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे दहीहंडी उत्सवावार होणारा खर्च पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याबाबत नियोजन सुरू करण्यात आले आहे.

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ)तर्फे साजरी करण्यात येणारी दहीहंडी स्पर्धाही यावर्षी रद्द करण्यात आली आहे. दरवर्षी गोकुळतर्फे घेण्यात येणाऱ्या दहीहंडी स्पर्धेतील विजेत्या संघांना बक्षीस स्वरुपात देण्यात येणारी रक्कम ५० लाख रुपये असते. यंदा कोल्हापूर व सांगली शहरासह जिल्ह्यातील गावांना पुराचा फटका बसला आहे. कित्येक पूरग्रस्तांची घरे पडली आहेत. त्यामुळे पूरग्रस्तांच्या गरजांचा पाहणी करून दहीहंडी स्पर्धेच्या बक्षीसाची रक्कम पूरग्रस्तांसाठी मदतनिधी म्हणून देण्याचा निर्णय गोकुळतर्फे घेण्यात आला आहे अशी माहिती गोकुळचे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी दिली.

गुजरी कॉर्नर येथे मोठ्या प्रमाणात होणारा दहीहंडी उत्सव व स्पर्धाही यंदा होणार नाही, असा निर्णय नगरसेवक व उत्सवाचे मुख्य संयोजक किरण नकाते यांनी घेतला आहे. गुजरी कॉर्नरतर्फे या दरवर्षी दहीहंडीसाठी आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते. तसेच सेलिब्रिटी कलाकारांना निमंत्रित केले जाते. गोविंदा पथकांसाठी हंडी फोडण्याची स्पर्धा आयोजित करून आकर्षक रोख बक्षीस दिले जाते. मात्र यावर्षी पूरपरिस्थितीने कोल्हापूरवर बिकट संकट ओढवले असल्यामुळे दहीहंडीचा उत्सव रद्द करून त्या रकमेतून पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मदतनिधी उभारण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बँकांत आधुनिकतंत्रज्ञानाचा वापर वाढवा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बँकांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा, कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी आदी मागण्या ऑल इंडिया बँक ऑफिसर फेडरेशनचे कोल्हापूर विभागाचे उपसचिव परेश हटकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून केल्या. २३ ऑगस्ट रोजी पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बँकिंग परिषदेच्या माध्यमातून अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहचवाव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

पत्रकात म्हटले आहे, खासगीच्या तुलनेत राष्ट्रीयीकृत बँकांच्या सर्वच शाखांत कर्मचारी, अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे. त्याचा फटका ग्राहकांना बसत आहे. त्यांना तत्पर सुविधा देता येत नसल्याचे चित्र आहे. सरकारी बँकांत कुशल कर्मचारी वर्गाचा अभाव आहे. प्रशिक्षण देऊन त्यांना कुशल करावे, सरकारच्या विविध योजना बँकांतर्फे लोकांपर्यंत पोहोचवल्या जातात. त्यावेळी काही राजकीय पार्श्वभूमीचे लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या बँक प्रशासनात हस्तक्षेप करून योजनांचा दुरुपयोग करत आहेत. काही ठिकाणी आंदोलनावेळी बँकांच्या कर्मचाऱ्यांवर हल्ले झाले आहेत. यामुळे बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळावे. बँक अधिकाऱ्यांचे दैनंदिन कामकाज पाच वर्षांत आठ तासांवरून १२ तासांवर गेले आहे. सुट्टीच्या दिवशीही काम करावे लागत आहे. यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर ताण येत आहे. कर्मचाऱ्यांचा वेतन करार नोव्हेंबर २०१७ पासून प्रलंबित आहे. सरकारने हा करार लवकर मार्गी लावावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरांच्या नुकसानीची माहिती अॅपद्वारे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अतिवृष्टी व महापुरामुळे बेघर झालेल्या कुटुंबांना नवीन घर बांधकामासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून दीड लाख रुपयांचे अर्थसहाय मिळणार आहे. यासाठी २० ऑगस्ट ते पाच सप्टेंबर या कालावधीत अॅपद्वारे सर्व्हे होणार आहे. सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर पूरग्रस्तांच्या घरकुलासाठी तत्काळ अनुदान मिळणार आहे. शिवाय जिल्हा परिषदेच्या मालमत्तेचे सर्व्हेक्षण करून सरकारकडे अहवाल सादर करावा, दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही ग्रामविकास विभागाचे सचिव असीमकुमार गुप्ता यांनी दिली.

गुप्ता यांनी रविवारी जिल्हा परिषदेत आढावा बैठक घेतली. तसेच जिल्हा परिषदेतर्फे पूरबाधित क्षेत्रासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. महापुरामुळे नुकसान झालेल्या घरांना आर्थिक मदत करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पडझड झालेल्या घरांच्या नवीन बांधकामासाठी अर्थसहाय करण्याची सरकारची भूमिका आहे. गुप्ता यांनी दोन दिवसाच्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरबाधित क्षेत्रातील नुकसानीची माहिती घेतली. दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी प्रशासनामार्फत राबविलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. पूरग्रस्त भागात वैद्यकीय सुविधा, पशुधनासाठी सुविधा, ग्रामीण भागात स्वच्छता मोहीमेची माहिती दिली.

जिल्हा परिषदेच्या मालकीच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा, अंगणवाडी व इमारतींचे महापुरात नुकसान झाले आहे. त्या नुकसानीचा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही गुप्ता यांनी दिल्या. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवी शिवदास, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अजय माने, कार्यकारी अभियंता विजय कांडगावे, मनीष पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, रवीकांत आडसूळ, प्रियदर्शिनी मोरे, शिक्षणाधिकारी आशा उबाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेचे विभागनिहाय नुकसान ७४० कोटीवर

जिल्हा परिषदेने प्राथमिक टप्प्यात विभागनिहाय नुकसानीचा आकडा निश्चित केला आहे. सरकारकडे हा प्रस्ताव पाठवून निधीची मागणी करण्यात येणार आहे. यामध्ये बांधकाम विभाग ६४८ कोटी ९२ लाख, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग २० कोटी ७१ लाख, टँकरद्वारे पाणी पुरवठा ४० लाख, लघुपाटबंधारे विभागासाठी १० कोटी, ग्रामपंचायत विभाग चार कोटी ११ लाख, आरोग्य विभागासाठी ३२ कोटी ३२ लाख, पशुसंवर्धन विभाग एक कोटी २३ लाख, प्राथमिक शिक्षण विभाग १६ कोटी ६९ लाख, आणि महिला व बालकल्याण विभागासाठी सात कोटी ६४ लाख रुपये इतका निधी प्रस्तावित केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेवानिवृत्त प्राचार्य संघटनेतर्फे २ लाखांचा निधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सेवानिवृत्त प्राचार्य व प्राध्यापक असोसिएशनच्यावतीने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दोन लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुपूर्द करण्यात आला. राज्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. एम. ए. वाहूळ यांच्या हस्ते संघटनेच्या जिल्हाअध्यक्षांच्या उपस्थितीत निधी देण्यात आला.

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील गावे व शहराचा काही भाग येथे महापुराचा फटका बसला आहे. अनेकांची घरे कोसळली आहेत. सांसारिक साहित्य वाहून गेल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी पूरग्रस्त भागात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवृत्त प्राचार्य व प्राध्यापक संघटनेच्या राज्यभरातील नऊ जिल्हा विभागांतर्फे मदतीचा धनादेश देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

महापुराने कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कटून गेले आहे. अनेक पूरग्रस्तांचा सारा संसार वाहून गेला आहे. त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी समाजाने मदतीचा हात देण्याची नितांत गरज होती. त्यामुळेच संघटनेच्यावतीने धनादेश देण्यात आला आहे.

डॉ. एम. ए. वाहूळ, अध्यक्ष, राज्य निवृत्त प्राचार्य संघटना

निवृत्तीवेतन देण्याचे आवाहन

संघटनेने दोन लाखांचा निधी देण्यात आला असला तरी अजून निधी संकलित व्हावा या हेतूने संघटनेच्या जिल्हा विभागातर्फे सर्व सदस्यांनी एक दिवसाचे निवृत्त वेतन पूरग्रस्तांच्या मदतनिधीसाठी द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. राज्य संघटनेच्या नऊ विभागातील जिल्हापातळीवर प्रत्येकी ३०० सभासद आहेत. या सभासदांनी दिलेला मदत निधी एकत्र करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२० रोजी मेळावा

$
0
0

कोल्हापूर: आयटक कामगार केंद्राच्या शताब्दीवर्षानिमित्त मंगळवार (ता.२०) रोजी आयटक कामगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. दुपारी १२ ते ३ या वेळेत दसरा चौक येथील शाहू स्मारक भवन येथे हा मेळावा होणार आहे. यावेळी जिल्ह्यातील कामागर संघटनेचे नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान यंदा केंद्राचे शताब्दी वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेचा देशव्यापी कार्यक्रम मुंबई येथे ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या बैठकीत जाहीर करण्यात येणार आहे. तसेच यावेळी राष्ट्रीय काउन्सिलचीही बैठक होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूरग्रस्त पक्षकराचे वकील करणार मोफत काम

$
0
0

पूरग्रस्त पक्षकराचे वकील करणार मोफत काम

कराड :

मागील पंधरा दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे कराड तालुक्यातील अनेक गावांमधे पुराचे पाणी शिरून शेतीचे, घरांचे, मिळकतींचे मोठे नुकसान झालेले आहे. अनेक लोकांचे व शेतकरी यांचे आर्थिक नुकसान झालेले आहे. अशा पूरग्रस्त लोकांचे कराड येथील तालुका व जिल्हा कोर्टातील केसस मोफत चालविण्याचा निर्णय कराड वकील संघटनेच्या वतीने घेण्यात आला आहे.

कराड वकील संघटनेची बैठक शनिवारी झाली. या बैठकीमधे पूरग्रस्त गावांना आर्थिक मदत करण्याचा निर्णयही घेण्यात आला. ज्या पूरग्रस्त पक्षकरांना कायदेशीर मदतीची गरज आहे. त्यानी कराड कराड वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन पाटील, उपाध्यक्ष अ‍ॅड. अमित जाधव व सचिन अ‍ॅड. प्रतीभा माने यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

...........

मठाच्या विश्वस्तांविरोधात गुन्हा

कराड :श्री मारुतीबुवा मठ कराडकर येथे असणाऱ्या महिलेस शिवीगाळ, दमदाटी करून तिचा विनयभंग केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली होती. या बाबतची फिर्याद महिलेने कराड शहर पोलिसात दिली असून, या प्रकरणी तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मोहन नानासो चव्हाण (रा. वारूंजी, ता. कराड), अशोक शिंगण (पूर्ण नाव समजू शकले नाही. रा. शुक्रवार पेठ, कराड), मोहन पंडितराव जाधव (रा. कापील, ता. कराड) अशी गुन्हा नोंद झालेल्यांची नावे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images