Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पूरग्रस्त विद्यार्थिनींसाठी सरसावले ताराराणी विद्यापीठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पूरग्रस्तांच्या मदतकार्यात हातभार लागावा, आपल्याच संस्थेतील प्राथमिक शाळा, हायस्कूल आणि कॉलेजमधील पूरग्रस्त विद्यार्थिनींना मदत आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सहाय्य करण्यासाठी ताराराणी विद्यापीठ सरसावले आहे. संस्थेच्या प्रत्येक कर्मचाऱ्यांनी निधी जमवायला सुरूवात केली आहे. शिवाय सीनिअर कॉलेजमधील विद्यार्थिनी ५० रुपये आणि ज्युनिअर कॉलेज आणि हायस्कूलमधील मुली प्रत्येकी २५ रुपये जमा करत आहेत.

या विद्यापीठातर्फे कमला कॉलेज, डीएड कॉलेज, उषाराजे हायस्कूल आणि प्राथमिक मराठी शाळा या शाखा चालवल्या जातात. महापुरानंतर संस्थेतर्फे पूरग्रस्तांना मदत देण्याचे ठरवले आहे. संस्थेच्या विविध शाखांत शिकत असलेल्या पूरग्रस्त विद्यार्थिनींना प्राधान्याने मदत देण्यात येणार आहे. शिवाय पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे कीट्स तयार करुन देण्याचे नियोजन आहे. यासाठी संस्थेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याने साधारणपणे एक हजार रुपयांची मदत करावी, असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष, प्राचार्य क्रांतिकुमार पाटील यांनी केले.

त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कुणी हजार रुपये, कुणी दीड हजार तर कुणी दोन हजारांची मदत केली. कर्मचाऱ्यांच्या मदतीनिधीतून २०० पूरग्रस्त कुटुबीयांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे कीट्स तयार केली जातील. त्यात पाच किलो तांदूळ, पाच किलो गहू, साखर, चहापूड, तूरडाळ, चटणी, खाद्यतेल एक किलो, साबण आणि पेस्टचा समावेश असेल. संस्थेतील पूरग्रस्त मुलींना मदतीसोबत थेट एखाद्या गावात जाऊन ही मदत पोहचवली जाणार आहे. याव्यतिरिक्त कमला कॉलेजमधील विद्यार्थिनी महासैनिक दरबार येथील सेंट्रल किचनमध्येही विविध वस्तूंच्या पॅकिंगसाठी मदत करत आहेत. शिवाय कॉलेजमधील एनएसएस व एनसीसीच्या विद्यार्थिनींनी कुंभार गल्लीतील स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. प्रभारी प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर, प्रा. अनिल घस्ते, रेखा पंडित, सुजय पाटील, वर्षा साठे यांनी नियोजन केले.

ताराराणी विद्यापीठामार्फत पूरग्रस्तांसाठी वेगवेगळ्या पातळीवर मदतकार्य सुरू आहे. आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण पूर्ण केलेल्या कमला कॉलेजच्या एनएसएसच्या मुली 'आपदा सखी'म्हणून बचावकार्यात सहभागी होत्या. जीवनावश्यक वस्तूंच्या किटस बनविल्या जात आहेत. कॉलेजच्या पूरग्रस्त विद्यार्थिनींना मदत, मुख्यमंत्री सहायता निधीला अर्थसाह्य केले जाईल.

- प्राचार्य क्रांतिकुमार पाटील, कार्याध्यक्ष, ताराराणी विद्यापीठ

वाचले... फोटो आहे...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मूग, मसूर, साबुदाणा महागले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापूर ओसरल्यानंतर किराणा खरेदीकडे ग्राहकांची पावले वळली असून बाजारात मूग, मसूर, साबुदाणा, वेलदोड्याच्या दरात वाढ झाली आहे. वेलदोड्याच्या दरात प्रतिकिलो एक हजार रुपयांनी वाढ झाली असून ६० रुपये तोळा (दहा ग्रॅम) अशी विक्री सुरू आहे.

गेल्या दहा ते बारा दिवसात पावसाने झोडपून काढल्याने शहराला महापुराने वेढले होते. शहरात येणारे सर्व रस्ते बंद झाल्याने भाजीपाल्याची आवक थंडावली होती. त्यामुळे ग्राहकांकडून कडधान्यावर भर होता. पण, महापूर ओसरताच मूग, मसूर या कडधान्यांत वाढ झाली. मूगाच्या दरात प्रतिकिलो ४० रुपयांनी तर बेळगाव मसूरीच्या दरात वीस रुपयांनी वाढ झाली. मूगाचा दर प्रतिकिलो ८८ तर मसूरीचा दर १४० रुपयांवर पोचला आहे.

उपवासाच्या पदार्थांत साबुदाण्याला मोठी मागणी आहे. साबुदाण्याच्या दरात प्रतिकिलो चार रुपयांनी वाढ झाली. रवा आणि आट्याचे दर प्रतिकिलो दोन वाढले आहेत. वेलदोड्याच्या दरात एक हजार रुपयांनी वाढ झाली. प्रतिकिलो सहा हजार रुपये असा

वेलदोड्याचा दर आहे. ६० रुपये तोळा अशी विक्री सुरू आहे. खसखसच्या दरात प्रतिकिलो २०० रुपयांनी वाढ झाली आहे तर सरकी खाद्य तेलाच्या दरात दोन रुपये वाढ झाली आहे.

किराणामालाचे दर (प्रतिकलो रुपयांत)

पोहे : ४४

साखर : ३६

शेंगदाणा : १२०

मैदा : ३४

आटा : ३४

रवा : ३४

गूळ : ५०

साबुदाणा : ८८

वरी : ९२

डाळींचे दर (प्रतिकिलो रु.)

तूरडाळ : ९२,

मूगडाळ :, ९२

उडीद डाळ : ६८

हरभरा डाळ : ६८

मसूर डाळ : ६४

मसूर : ७० ते १४०

चवळी : ८०

हिरवा वाटाणा : ९६

काळा वाटाणा : ६८

मूग ८८

मटकी : १२०

छोले : ९०

धान्याचे दर (प्रतिकिलो रु.)

बार्शी शाळू : ४० ते ५०

गहू : २८ ते ३४

हायब्रीड ज्वारी : ३०

बाजरी : ३२

नाचणी : ३६

तेलाचे दर (प्रतिकलो रु.)

शेंगतेल : १३५

सरकी तेल : ८८

खोबरेल : २४०

सूर्यफूल : ९० ते १०५

मसाले दर (प्रतिकलो रु.)

तीळ : १६०

जिरे : २८०

खसखस : १२००

खोबरे : १८० ते २०० १६०

वेलदोडे : ६००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूरग्रस्त व्यापाऱ्यांच्या कर्जाचे व्याज माफ करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पूरग्रस्त व्यापारी, व्यावसायिकांच्या कर्जावरील व्याज सहा महिन्यांसाठी रद्द करावे अशी मागणी शिवसेनेने केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, महापुराने अनेकांचे नुकसान झाले. पूरग्रस्तांत व्यावसायिक, व्यापारी, दुकानदार, उद्योजक, फेरीवाले, कारखानदार, कुंभारांचा समावेश आहे. व्यावसायिकांनी कॅश क्रेडिट आणि मुदतीसाठी कर्ज घेतले आहे. पण, महापुरात तारण दिलेला माल, जंगम व स्थावर मालमत्तेचा नाश झाला आहे. बँकांनी पाच ऑगस्टपासून सहा महिन्यांसाठी कर्ज माफ करावे. सहा महिन्यानंतर पुढील सहा महिन्यांसाठी व्याज अकारणी करुन ती स्वतंत्र लिहून ठेवावी. त्या व्याजावरील दंडव्याज आकारले जाऊ नये. कर्जाच्या हप्त्याची फेररचना करावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. पूरग्रस्त व्यापारी आणि उद्योजकांना पुन्हा उभे करण्यासाठी बँकांनी कर्जावरील सहा महिन्यासाठी रद्द करावी अशी मागणी केली. शिष्टमंडळात सुजीत चव्हाण, शिवाजीराव जाधव, शिवाजीराव पाटील, मंजीत माने, कमलाकर जगदाळे, रणजीत आयरेकर यांच्यासह शिवसैनिकांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ड्रेनेज लाइनची सफाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरावर ओढवलेल्या आपत्कालीन परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी महापालिकेने मुंबई महापालिकेची मदत घेतली. त्यांच्याकडून प्रत्येकी तीन कर्मचाऱ्यांसह पाच जेट मशिन आणण्यात आल्या. त्याद्वारे गेल्या पाच दिवसांत शहरातील ड्रेनेज लाइनची स्वच्छता करून २५ टन गाळ काढण्यात आला. पथकाने गेल्या अनेक दिवसांपासून चोकअप झालेल्या लाइन सुरू करुन दिल्या. पाचपैकी दोन जेट मशिन शनिवारी रात्री मुंबईकडे रवाना झाल्या.

मुसळधार पावसाने शहराला महापुराचा विळखा पडला. पुराच्या पाण्याबरोबर आलेल्या गाळामुळे शहरातील अनेक ओढे, नाले, गटर्ससह ड्रेनेज लाइन चोकअप झाल्या. महापालिकेने रस्त्यावरील स्वच्छतेला सुरुवात करतानाच मुंबई महापालिकेकडे ड्रेनेज लाइनची स्वच्छता करण्यासाठी जेट मशिनची मागणी केली होती. महापालिकेच्या पत्रव्यवहाराला सकारात्मक प्रतिसाद देत पाच जेट मशिनसोबत प्रत्येकी तीन कर्मचाऱ्यांचे पथक पाठविण्यात आले. मंगळवारी (ता. १३) सकाळी या मशिन दाखल झाल्या. याद्वारे शहरातील ड्रेनेज लाइन साफ करण्याची मोहीम हाती घेतली.

दररोज पाच मशिनद्वारे ड्रेनेज लाइन साफ केली जात होती. दररोज पाच टन गाळ बाहेर काढून तो दुधाळी व कसबा बावडा एसटीपी प्लान्टवरील स्लग बेडवर टाकण्यात आला. पाच दिवसांत तब्बल २५ टन गाळ ड्रेनेज लाइनमधून बाहेर काढण्यास या अत्याधुनिक मशिनरीला यश आले. शहरातील बुहतांशी भागातील ड्रेनेज लाइनची सफाई करण्यात आली. किरकोळ प्रमाणात राहिलेल्या स्वच्छतेसाठी तीन मशिन शहरात ठेवल्या असून दोन मशिन शनिवारी रात्री उशीरा मुंबईकडे रवाना झाल्या.

दीड वर्षांपूर्वीची समस्या निर्गत

उमा चित्रपटगृह व सिद्धाळा गार्डन येथील ड्रेनेज लाइन गेल्या दीड वर्षांपासून चोकअप झाल्या होत्या. लाइन चोकअप झाल्याने दोन्ही ठिकाणी सांडपाणी चेंबरमधून बाहेर येऊन दुर्गंधी सुटत होती. सिद्धाळा येथील चोकअप लाइनमुळे एसएम लोहिया हायस्कूल पाठीमागील बाजूस नेहमी सांडपाणी रस्त्यावर येत होते. त्याचा त्रास विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात होत होता. दोन्ही ठिकाणची समस्या या अत्याधुनिक मशिनरीद्वारे दूर करण्यात आली. आपत्कालीन स्थितीत केलेल्या कामामुळे शहरातील ड्रेनेज लाइन पुढील दीड वर्षांत सफाई करावी लागणार नसल्याचा दावा महापालिकेकडून केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कराड जनता बँकेच्या संचालकांवर गुन्हा

$
0
0

कराड जनता बँकेच्या

संचालकांवर गुन्हा

कराड :

बहुचर्चित दि कराड जनता सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने आपसात संगनमत करून बँकेतील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून आठ खातेदारांच्या नावे सुमारे ३१० कोटी रुपयांची बोगस कर्ज प्रकरणे तयार करून बँकेस गंडा घातल्याचे समोर आले आहे. या बाबत राजेंद्र गणपती पाटील (वय ५०, रा. वृंदावन कॉलनी, मलकापूर) यांनी येथील न्यायालयात दिलेल्या फिर्यादीवरून शुक्रवारी कराड शहर पोलिस ठाण्यात संचालकांसह सुमारे ३७ जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बँकेचे सर्व संचालक, काही अधिकारी, कर्मचारी, खातेदार व हा गैरव्यवहार लपविण्यात मदत करणाऱ्या दोन लेखा परीक्षकांचा यात समावेश आहे.

मागील वर्षी बँक दिवाळखोरीत निघाल्यानंतर बँकेला अवसायनात टाकण्यात आले होते. दोनच दिवसांपूर्वी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आल्यानंतर आता संचालक मंडळासह अन्य ३७ जणांविरोधात गुन्हा नोंद झाल्याने बँकेच्या संचालक मंडळाच्या गैरकारभाराचे एक एक कारनामे बाहेर येऊ लागल्याने सभासद, ठेवीदार, खातेदारांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

.................

कराड, पाटणमध्ये

कोट्यवधींचे नुकसान

कराड

पश्चिम घाट परिसरात पावसाने उघडीप दिल्याने शुक्रवारी दुपारपासून कोयना धरणाच्या सहाही व्रक दरवाजांतून पाण्याचा विसर्ग पूर्ण बंद करण्यात आला आहे. केवळ पायथा वीजगृहातून वीज निर्मिती करून दोन हजार क्युसेकने विसर्ग सुरू ठेवण्यात आल्यामुळे कोयना व कृष्णा नदीकाठांवरील पूरस्थिती आटोक्यात आली आहे.

कराड-चिपळूण महामार्गावरील पाटण व कोयना परिसरातील पाणी कमी झाल्याने मार्ग वाहतुकीस सुरू झाला आहे. पुराचे पाणी ओसरल्याने कराड व पाटण तालुक्यांतील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा महापूर मानला जात असून, सातारा जिल्ह्यातील कराड व पाटण तालुक्यांना मोठा फटका बसला असून, कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

हजारो घरांत व दुकानांत पाणी घुसल्याने घरातील टीव्ही, फ्रीज, बेड, कपाटे, लाकडी फर्निचर, इतर साहित्य, किराणामाल, औषधे, स्टेशनरी, धान्यांची पोती पाण्यामुळे भिजून मोठे नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी पुराच्या पाण्यामुळे वाहून आलेला केर, कचरा, पाण्याच्या प्लॅस्टिकच्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या पिशव्या आदींसह भिजलेले साहित्य नागरीक कचरा अथवा घंटागाडीत टाकत आहेत. पूर ओसरल्यानंतर संबंधित पालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायतीही कामाला लागल्या असून, स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.

..............

शॉक लागून तरुणाचा मृत्यू

कराड :

घरामध्ये कपड्यांना इस्त्री करीत असताना शॉक लागून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना रेठरे बुद्रुक येथे गुरुवारी रात्री घडली. विशाल भानुदास इंगळे (वय १९) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. महापुरामुळे बरीच गावे विस्थापित झाली होती. रेठरे बुद्रुकलाही पुराचा मोठा तडाखा बसला होता. पूर ओसरल्यानंतर सर्वजण आपापल्या घरी राहावयास गेले होते. घराच्या भिंती ओल्या झाल्यामुळे विशालला घरातील इस्त्रीचा शॉक लागल्यामुळे तो बेशुद्ध पडला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेत असतानाच वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

..............

युवकाचा खून

कराड :

भाचीबरोबर असलेल्या प्रेमसंबधाच्या कारणावरून चिडून जाऊन दोघांनी भावकीतील युवकाचा लाकडी दांडक्यांने जबरी मारहाण करून निर्घृण खून केल्याची घटना रेठरे कॉलनी येथे बुधवारी सायंकाळी घडली. या बाबतची फिर्याद अभिक्रांत राजेश रसाळ (वय २९, रा. कार्वे, ता. कराड) यांनी ग्रामीण पोलिसात दिली आहे. या प्रकरणी कराड ग्रामीण पोलिसांनी दोघांना अटक केली असून, त्यांना न्यायालयात हजर केले असता, सहा दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अनिकेत राजेश रसाळ (वय २४, रा. कार्वे, ता. कराड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. जयदीप शंकर रसाळ, रविराज शंकर रसाळ (दोघेही मूळ रा. कार्वे, सध्या रा. रेठरे कॉलनी, ता. कराड) असे खूनप्रकरणी पोलिस कोठडी मिळालेल्यांची नावे आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबईतील आणखी एका मटका चालकास अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मटकाकिंग सलीम मुल्ला याच्यासोबत कनेक्शन असलेल्या मुंबईतील मटकाचालक आर. डी. तथा राजेंद्र उर्फ राजु धरमसी दवे-टोपी (वय ४०, रा. बोरीवली पश्चिम मुंबई) याला शनिवारी अटक करण्यात आली. त्याला पुणे विशेष मोक्का कोर्टात हजर केले असता आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. त्याचे मुल्ला गँगशी संबध असून आर्थिक लाभासाठी मटक्याचे कनेक्शन चालवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, ही माहिती पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी दिली.

'मोक्का' कायद्यान्वये कारवाई झालेल्या मुल्ला टोळीचा म्होरक्या सलीम व त्याची पत्नी माजी उपमहापौर शमा मुल्लासह सातजण सध्या कारागृहात आहेत. पोलिस तपासात मुंबई येतील दवे-टोपीचे मुल्ला गँगशी असलेले कनेक्शन उघड झाल्याने त्याला अटक केली. आतापर्यंत या गुन्ह्यात ४२ जणांना अटक केली आहे. मुंबईतील मटकाकिंग प्रकाश सावला गँगचे सलीम मुल्ला, सांगलीचा झाकीर मिरजकर, इचलकरंजीचा राकेश अगरवाल यांच्यासह आठ ते दहा बुकींशी गेल्या १० वर्षांपासून संबंध होते. मुंबईत जयेश शहा, शैलेश मणियार, जितेंद्र ऊर्फ जितू गोसालिया यांच्यावरही मोक्कांतर्गत कारवाई झाली आहे. सावला टोळीवर २००६ मध्ये मोक्कांतर्गत कारवाई झाली होती. त्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी कारवाई केली. दरम्यान, या टोळीतील वीरेल प्रकाश सावला, जयेश चावला या दोघांना अटक केली आहे. प्रकाश सावला हा अद्याप पसार असून तो राजस्थान अथवा गुजरातमध्ये असल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१५ हजार वीज मीटर बदलले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापुराच्या कालावधीत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील हजारो वीज मीटर पाण्याखाली गेले. पाण्यात बुडाल्यामुळे बिघाड होऊन ते बंद पडले आहेत. महावितरण कंपनीने अशा सर्व वीज मीटरची तपासणी सुरू केली आहे. कोल्हापूर शहरातील पाच हजार तर सांगलीतील १० हजारांहून अधिक नवीन मीटरची जोडणी पूर्ण झाली आहे. कंपनीतर्फे, प्रत्येक भागाची तपासणी करुन नवीन मीटर जोडणी सुरू आहे.

ज्या विद्युत वाहिन्यांना पुराचा फटका बसला, त्या वाहिन्यांची उंची वाढविण्यासाठी मोनो टॉवर उभारण्याचे व वीज उपकेंद्रांना उंच भागात नव्याने जागा शोधून नियोजन आराखडा बनविण्याचे आदेश महावितरणच्या कर्मचाऱ्यांना दिले आहेत. महापुरामुळे कोल्हापूर शहर, करवीर, हातकणंगले, शिरोळ तालुक्याला सर्वाधिक फटका बसला. आठ ते दहा दिवस घरे पाण्याखाली होती. वीज मीटर पाण्यात बुडाले. पाणी ओसरल्यानंतर महावितरणने, पूरबाधित भागातील वीज पुरवठा पूर्ववत केला आहे. कोल्हापुरातील दुधाळी, नागाळा पार्क, रमणमळा, जयंती नाला काठावरील भागातील जवळपास ६५०० ग्राहकांचे मीटर खराब झाले आहेत. शुक्रवारअखेर पाच हजार मीटरची जोडणी केल्याचे कोल्हापुरातील अधिकाऱ्यांनी सांगितले. नृसिंहवाडी येथील शनिवारी वीजपुरवठा सुरू झाला. दरम्यान किणी, हालोंडी ग्रामपंचायतीने महावितरणचे महापुराच्या कालावधीतील कामाबद्दल अभिनंदन केले आहे.

सांगली शहर व परिसरातही नवीन मीटर जोडणी वेगाने सुरू आहे. मारुती रोड, गावभाग, खणभाग परिसर, वखार रोड, आमराई परिसर, रतनशीलनगर, कॉलेज कॉर्नर भाग मिळून दहा हजाराहून अधिक नवीन मीटर बसवून वीज पुरवठा सुरळीत केला. पुढील टप्प्यात पूरबाधित ग्रामीण भागात ही सुविधा दिली जाणार आहे. साधारणपणे २५ हजार ग्राहकांचे मीटर नव्याने जोडले जातील अशी माहिती सांगली येथील कार्यकारी अभियंता विनायक इदाते यांनी सांगितले.

वीज बिल भरण्यास मुदतवाढ

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार, संचालक दिनेशचंद्र साबू यांनी कोल्हापूर व सांगली जिल्ह्याचा दौरा केला. कोल्हापुरातील नागाळा पार्क, दुधाळी तर सांगलीतील शेरीनाला, कोल्हापूर रोडला भेट देऊन आढावा घेतला. या दौऱ्यानंतर त्यांनी कोल्हापुरात ९९ टक्के तर सांगलीत ९८ टक्के वीज पुरवठा पूर्ववत केल्याची माहिती दिली. पुरामुळे अनेकांना वीज बिल भरता आले नाही. त्यामुळे पूरग्रस्त भागातील लघुदाब ग्राहकांना बिल भरण्यास एका महिन्याची तर उच्चदाब ग्राहकांना १५ दिवसाची मुदतवाढ देण्याचा महावितरणने घेतला असल्याची माहिती संजीवकुमार यांनी दिली. महावितरणचे कोल्हापूर जिल्ह्यात ४९ कोटी तर सांगली जिल्ह्यात ४७ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

पूरग्रस्तांना मोफत गॅस शेगडी

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील पूरबाधित कुटुबींयांना पेट्रोलियम कंपन्यांच्या मदतीने मोफत गॅस शेगडी, रेग्यूलेटर व पाइप उपलब्ध करुन देण्याची ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. पूरग्रस्त भागातील अनेक कुटुंबातील गॅस शेगड्या नादुरुस्त झाल्या आहेत. त्या कुटुंबांना आधार देण्यासाठी पेट्रोलियम कंपन्यांच्या माध्यमातून साठ हजार गॅस शेगड्यांचे मोफत वितरण होणार आहे. याशिवाय २०० हून अधिक मेकॅनिक पूरभागात घरोघरी जाऊन गॅस शेगडीची दुरुस्ती व सुरक्षिततेची खातरजमा करणार आहेत. पालकमंत्री पाटील यांनी पेट्रोलियम कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठात कायमस्वरुपीआपत्ती निवारण केंद्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'शिवाजी विद्यापीठात कायमस्वरुपी आपत्ती निवारण केंद्र उभारण्यात येईल' अशी घोषणा कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी शनिवारी केली. महापुरामुळे विविध कॉलेजांची झालेली दुरवस्था, वर्गखोल्यांतील चिखलाचा थर, ग्रंथालयाचे नुकसान, खराब फर्निचर पाहून कुलगुरुंना गहिवरुन आले.

कुलगुरू शिंदे, प्रकुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, व्यवस्थापन परिषद सदस्य अॅड. धैर्यशील पाटील, प्राचार्य धनाजी कणसे, डॉ. सी. टी. कारंडे यांच्यासह शनिवारी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरबाधित कॉलेजांची पाहणी केली. सांगली येथील भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम कॉलेज, कस्तुरबाई वालचंद कॉलेज, मथुबाई गरवारे कॉलेज आणि कुरुंदवाड येथील स. का. पाटील कॉलेजला भेट दिली. डॉ. शिंदे हे गेल्या दोन दिवसापासून विविध कॉलेजांची पाहणी करत आहेत.

कुलगुरू शिंदे म्हणाले, 'महापुरामुळे बाधित झालेल्या कॉलेजांना विद्यापीठाकडून कशा स्वरुपाची मदत करता येईल यासंदर्भात व्यवस्थापन परिषदेत चर्चा करुन निर्णय होईल. महापुरामुळे दोन्ही जिल्ह्यांतील दहा कॉलेजांचे नुकसान झाले आहे. या कॉलेजांना मदतीचा हात दिला जाईल. दरम्यान, विद्यापीठात कायमस्वरुपी आपत्ती निवारण केंद्र उभारण्याचा मनोदय आहे. या केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षण, सहाय्य आणि साहित्याची उपलब्धता अशी भूमिका विद्यापीठ पार पाडेल.'

याप्रसंगी सिनेट सदस्य संजय परमणे, विशाल गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक डॉ. डी. के. गायकवाड, डॉ. संजय ठिगळे, प्राचार्य आर. एस. पाटील, डॉ. बी. व्ही. ताम्हणकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


झिप झॅप झूम - कविता

$
0
0

झिप झॅप झूम - कविता

- -

\Bपाऊस

\B- प्रीती कारगांवकर, नाशिक

- -

येरे येरे पावसा

भेट ना रे मला

भेटल्यावर मी

चॉकलेट देईन तुला

पावसात मला

चिंब भिजायचं

कागदाच्या होडी

पाण्यात सोडायचं

थुई थुई करुन

पाण्यात मी नाचेन

हलकेच थेंब तुझे

चेहर्यावर झेलेन

भिजुन घरी जाताच

धावत येईल आई

मायेने पुसेल अंग

देईल दुधात सुंठ

दुध पिऊन मला

लागेल झोप शांत

स्वप्नातही पावसा

येशील कारे निवांत

- -

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारू पाजून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

$
0
0

पंढरपुरातील घटना; पाच आरोपींना कोठडी

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

पंढरपूर शहरातील एका अल्पवयीन मुलीला दारू पाजून तिच्यावर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी आणि शुक्रवारी घडली आहे. पीडितेचे अश्लील चित्रिकरण मोबाइल फोनद्वारे करण्यात आले होते. तिच्या आई-वडिलांना हा व्हिडिओ व्हायरल करू, अशी धमकी देण्यात आली होती. २ लाख रुपये द्या, नाहीतर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू, अशी धमकी देणाऱ्या पाच तरुणांविरुद्ध शुक्रवारी रात्री उशिरा पंढरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शनिवारी सर्वांना अटक करून कोर्टात हजर केले असता, सर्वांना तीन दिवस पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

पीडित अल्पवयीन मुलीला फसवून अंबाबाई पटांगण येथील सुलभ शौचालयाच्या बांधकामावर आरोपींनी नेले. त्या ठिकाणी तिला बळजबरीने दारू पाजण्यात आली. त्यावेळेचे मोबाइलमध्ये चित्रिकरण केले. पीडित मुलीवर ऑक्टोबर २०१८, डिसेंबर २०१८ ते १५ ऑगस्ट २०१९च्या दुपारी चार वाजेपर्यंत अंबाबाई पटांगण येथील सुलभ शौचालयाच्या बांधकामाच्या ठिकाणी व विष्णुपद येथील झुडपात लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलीच्या आईला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन दोन लाख रुपयांची मागणी केली. आपल्यावर झालेल्या बलात्काराचा व्हिडिओ शेअर होईल, या भीतीमुळे पीडितेने ही घटना कोणालाही सांगितली नाही. याचाच गैरफायदा घेत तरुणांनी तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला. तिच्याकडे पैशांची मागणी देखील करण्यात आली. काही दिवसांनी पीडित तरुणीच्या वागण्यात फरक जाणवू लागल्यानंतर तिच्या आईने विचारले, असता या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. या प्रकरणी मनोज माने, आरीफ शेख, अक्षय दिलीप कोळी, माऊली तुकाराम अंकुशराव, साहील सुधीर अभंगराव तरुणांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा भादवि कलम ३६३, ३७६ (ड), ३७६(२) (एन), ३८४, ५०६, ३४ सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१३चे कलम ४, ६, ८, १२, १६, २ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फिल्टर हाउसबाहेर टँकरच्या रांगा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापुराच्या तडख्यातून शहरवासियांची अद्याप सुटका झालेली नाही. पूर ओसरून तब्बल आठ दिवस झाले तरी घागरभर पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी त्यांचे प्रचंड हाल सुरू आहेत. नागरिकांना दररोज २०० ते २१० टँकरच्या फेऱ्यांद्वारे पिण्याचे पाणी दिले जात असले तरी त्यावर मर्यादा आहेत. महापालिका, खासगी व काही स्वयंसेवी संघटनांच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून कळंबा फिल्टर हाउसबाहेर दिवसरात्र टँकरच्या रांगाच दिसत आहेत. दरम्यान, खासगी टँकरचालकांकडून त्यांची अक्षरश: लूट सुरू आहे.

शहराला महापुराचा विळखा बसल्यानंतर पाणीपुरवठा करणारी तिन्ही उपसा केंद्रे बुडाली. त्यामुळे पाच ऑगस्टपासून शहराचा पाणीपुरवठा बंद पडला. नागरिकांना पिण्याचे पाणी देण्यासाठी टँकरची सुविधा देण्यात आली. महापालिकेचे टँकर कमी पडू लागल्यानंतर भाडेतत्वावर टँकर घेण्यात आले. अनेक सहकारी, स्वयंसेवी संस्था, व्यक्तींनी महापालिकेला टँकर दिले. कळंबा फिल्टर हाउस, शिवाजी विद्यापीठ, राजाराम कॉलेज येथून टँकर भरुन देण्याची व्यवस्था केली. मात्र मागणी आणि पुरवठ्याचे गणितच जमत नसल्याने पाण्यासाठी नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

सुरुवातीस ठरावीक भागात टँकर पळवले जात असल्याने अन्य भागांवर अन्याय होत होता. प्रशासनाने त्यावर मार्ग काढण्यासाठी दोन प्रभागात एक व नंतर एका प्रभागासाठी एक टँकर दिला. पण नागरिकांची संख्या जास्त असल्याने नियोजन कोलमडले आहे. शहरातील काही भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांनी पुराच्या पाण्यात जावून विद्युतपंप बाहेर काढले. त्यानंतर बालिंगा उपसा केंद्रातून पाणीपुरवठा सुरू झाला. या उपसा केंद्रावर 'सी', 'डी' व फुलेवाडी, रिंगरोड, लक्षथीर्त वसाहत, आपटेनगर, सानेगुरुजी वसाहत, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, बागलचौक, महापालिका परिसर, शिवाजी पेठ व मंगळवार पेठेच्या काही भागाला पाणीपुरवठा सुरू झाला. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला. नागदेववाडी उपसा केंद्रातील विद्युतपंप शनिवारी रात्रीपासून कार्यन्वित करण्यात आले. १५० एचपी दोन पंपाद्वारे उपसा सुरू झाला. त्यामुळे बालिंगा केंद्रातून पूर्ण क्षमतेने उपसा होऊन या भागातील पाणीपुरवठा सुरळीत झाला.

शहराचा बहुतांश भाग शिंगणापूर योजनेवर अवलंबून असल्याने येथून उपसा करण्यासाठी महापालिका कर्मचारी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. शनिवारी दिवसभर ट्रान्स्फार्मर, पॅनल व स्टार्टरची तपासणी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. रात्री उशीरा एक पंप बसवण्यात आला. रविवारी सकाळपासून एका पंपाद्वारे उपसा करुन कसबा बावडा जलशुद्धीकरण केंद्रात पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे बावडा व बावडा परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. रविवारी रात्रीपर्यंत आणखी एक पंप कार्यन्वित करुन पुईखडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी सोडण्यात येणार आहे.

दरम्यान, खासगी टँकरचालकांकडून मात्र नागरिकांची लूट सुरू आहे. ३०० लीटर पाण्यासाठी हजार ते १५०० रुपये घेतले जात आहेत. पिण्यास पाणीच नसल्याने नागरिकही मागेल त्या किंमतीत टँकरची खरेदी करत आहेत.

महापालिकेच्या प्रयत्नांवर पाणी

शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिकेचे २५ अधिकारी, कर्मचारी दिवसरात्र प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे बालिंगा उपसा केंद्रातून पाणीपुरवठा सुरू झाला. शुक्रवारी रात्री नागदेववाडी केंद्रातून उपसा सुरू झाल्यानंतर बालिंगा उपसा केंद्रातील ११००० केव्हीच्या ड्युओ फ्युज उडाल्या. रात्री १२ वाजता फ्यूज दुरुस्त केल्यानंतर शनिवारी दुपारी १२ वाजता पुन्हा फ्युज उडाल्याने पाणीपुरवठा बंद झाला. दुपारी तीन वाजता दुरुस्ती करण्यास यश आले. शुक्रवारी विद्युतपंप घेऊन जाणारा डंपर उटल्यानंतर पुन्हा ड्युओ फ्युज खराब झाल्याने कर्मचारी अक्षरश: वैतागून गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छता मोहिमेला व्यापक स्वरुप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापूर ओसरल्यानंतर महापालिकेच्यावतीने सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेला शनिवारी व्यापक रुप मिळाले. महापालिका कर्मचाऱ्यांसह हजारो स्वयंसेवी सहभागी झाल्याने दिवसाभरात तब्बल १३० टन कचरा, गाळाची उचल करण्यात आली. जेसीबी, ट्रॅक्टर ट्रॉली, डंपर, टिपर यासह अन्य वाहनांतून उचल केलेला कचरा, गाळ कसबा बावड्यातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पावर टाकण्यात आला.

महापुरामुळे शहराच्या अनेक भागात पाण्याबरोबर गाळ व कचरा आला. पूरबाधित क्षेत्राबरोबर अन्य रस्तेही चिखलाने माखले होते. गेल्या आठ दिवसांपासून सफाई मोहीम सुरू आहे. शनिवारी शुक्रवार पेठ येथील पंचगंगा तालीम रोड, दुधाळी, उत्तरेश्वर पेठ, जुना बुध‌वार पेठ, सिद्धार्थनगर, व्हीनस कॉर्नर, शाहूपुरी कुंभार गल्ली, लक्ष्मीपुरी, खानविलकर पेट्रोल पंप यांसह शहराच्या अनेक रस्त्यांवर कर्मचारी व स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते स्वच्छता करताना दिसत होते.

पोलिस प्रशासन, नानासाहेब धर्माधिकरी प्रतिष्ठान, महिला बचत गट, महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यासह स्वयंसेवी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. विविध वाहनांच्या २८८ फेऱ्यांद्वारे १३० टन गाळ, कचऱ्याची उचल करण्यात आली. स्वच्छतेनंतर परिसरात साथीच्या रोगांचा फैलाव होऊ नये यासाठी त्वरीत औषध, धूर फवारणी केली जात होती. ब्लिचिंग पावडर टाकण्यात आली. मोहिमेदरम्यान अल्ट्राटेक सिमेंट कंपनीने कर्मचाऱ्यांना प्रत्येकी २० गमबूट, हँडग्लोज व टोप्या दिल्या. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झाले होते.

धर्माधिकारी प्रतिष्ठानची स्वच्छता मोहीम

रायगड (रेवदंडा) येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी शहर व ग्रामीण भागात स्वच्छता मोहीम राबवली. प्रतिष्ठानचे ११७१ स्वयंसेवक सहभागी झाले होते. शहरासह आंबेवाडी, वडगणेग, हळदी व आरे येथे स्वयंसेवकांनी स्वच्छता केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठ देशाच्या राजदुतांची संभाजीराजेंसोबत चर्चा

$
0
0

कोल्हापूर : कोल्हापूर, सांगलीतील महापुराच्या आपत्तीची आठ देशांच्या राजदुतांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून माहिती घेतली. खासदार संभाजीराजेंच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठक झाली. जर्मनी, कॅनडा, ब्राझील, पोलंड, बल्गेरिया, स्पेन, नॉर्वे, ट्युनेशिया या देशांच्या राजदुतांनी महापुराची आणि बचावकार्याची माहिती घेतली. 'या सर्व देशाच्या राजदुतांनी पूरग्रस्तांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दिल्लीत चांगले आंतरराष्ट्रीय संबंध निर्माण झाले आहेत. त्याचा आगामी काळात राज्याला फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न राहील' असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छतेच्या कामासाठी दोन कोटी रुपये

$
0
0

कोल्हापूर : जिल्ह्यातील पूरबाधित गावातील स्वच्छता, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी दोन कोटी ८९ लाख रुपयांची निधीची तरतूद केल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी दिली. एक हजार लोकसंख्या असलेल्या गावांना ५० हजार आणि एक हजारपेक्षा जादा लोकसंख्येच्या गावांना एक लाख रुपयांची मदत विशेष बाब म्हणून निधी प्राप्त झाला आहे. हा निधी ३१० गावांना मिळणार आहे. या निधीच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावरील स्वच्छतेसाठी जादा मनुष्यबळाची उपलब्धता, सार्वजनिक स्वच्छतेसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी, घनकचरा आणि सांडपाण्याचे व्यवस्थापन अशी कामे करावयाची आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मदतीची व्याप्ती वाढवली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीची व्याप्ती वाढवण्यात आली असून, पहिल्या मजल्यापर्यंत पाणी आलेल्या इमारतीतील सर्व कुटुंबे सरकारी मदतीसाठी पात्र ठरणार असल्याची माहिती पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. पूरग्रस्त भागात आरोग्य, पाणी, स्वच्छता आणि वीज पुरवठ्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. सरकारी आर्थिक मदत देण्यासाठी राज्य सरकारने कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासाठी प्रत्येकी दहा कोटींची मदत वाढवली आहे. दोन्ही जिल्ह्यांसाठी यापूर्वीच २५ कोटींची मदत देण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पूरग्रस्त ग्रामीण भागात दहा हजार तर शहरी भागात १५ हजारांची मदत देण्यात येत असल्याचे सांगून म्हैसेकर म्हणाले, 'सुरवातीला पाच हजारांचे वाटप झाले असून जिल्ह्यात आजअखेर १७ कोटी २६ लाखांचा निधी वितरित झाला आहे. पूरग्रस्त भागातील पंचनामे वेगाने होण्यासाठी परजिल्ह्यातील ५० तलाठी आणि ३० सार्वजनिक बांधकाम विभागातील इंजिनीअर उपलब्ध केले आहेत. २५ ऑगस्टपर्यंत सर्व पंचनामे पूर्ण केले जाणार आहेत. जिल्ह्यात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे पंचनामे सोमवारपासून (ता.१९) कृषी विभागाकडून सुरु करण्यात येणार आहे. आठ आणि नऊ ऑगस्ट रोजीची जिल्ह्यातील पुराची सॅटेलाइट इमेज प्रशासनाला मिळाली आहे. या इमेजचा वापर नुकसान भरपाईवेळी होणार आहे. प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी दहा किलो तांदूळ आणि गव्हाचे वाटप केले आहे. आजअखेर जिल्ह्यात २१० टन धान्यवाटप करण्यात आले आहे.'

पुरामुळे ग्रामीण भागातील १७६ पाणी योजना बंद पडल्या आहेत. त्या चार दिवसांत सुरु करण्याबाबत जिल्हा परिषदेचे सीइओ अमन मित्तल यांना सूचना दिल्या आहेत. ग्रामीण भागात ३७ टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे तर शहरात ६२ टँकरने पुरवठा सुरु असल्याचे म्हैसेकर म्हणाले.

ते म्हणाले, 'बँकिंग सेवा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु असून जिल्ह्यातील ६४६ एटीएमपैकी ४४२ एटीएम सुरू करण्यात आली आहेत. बंद एटीएम सुरु करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यातील ३१ मार्गापैकी सुरू झालेल्या २६ मार्गांवरुन एसटीची वाहतूक सुरळीत झाली आहे. पुलांची पाहणी केल्यानंतर वाहतूक सुरु करण्यात येणार आहे.

पुस्तके, शैक्षणिक साहित्य देणार

पूरग्रस्त भागातील सर्व विद्यार्थ्यांची पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य भिजले आहे. या विद्यार्थ्यांना बालभारतीच्यावतीने पुस्तके देण्यात येणार आहेत. तसेच जि. प. च्यावतीने शैक्षणिक साहित्य मोफत देण्यात येणार आहे.

००००००

लघु प्रकल्पाची उंची कमी करणार

कोल्हापूर जिल्ह्यातील सहा तर सांगली जिल्ह्यातील चार लघु पाटबंधारे प्रकल्पाची उंची कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व धरणे सुरक्षित असल्याचे विभागीय आयुक्त म्हैसेकर यांनी सांगितले. जिल्ह्यातील पूररेषा यापूर्वी २००५ आणि २०१७ मध्ये झाले आहेत. ब्लू आणि रेड लाईन निश्चित करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाच्या अभिप्रायानंतर राज्य सरकार करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

०००००००

कोल्हापूर, सांगलीसाठी आणखी दहा कोटींची मदत

शेती नुकसानीचे पंचनामे उद्यापासून

२५ ऑगस्टपर्यंत पंचनामे पूर्ण करणार

१७६ ग्रामीण पाणी पुरवठा योजना चार दिवसांत सुरू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोल्हापूर : कोल्हापूर, सांगलीतील महापुराच्या

$
0
0

कोल्हापूर : कोल्हापूर, सांगलीतील महापुराच्या आपत्तीची आठ देशांच्या राजदुतांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून माहिती घेतली. खासदार संभाजीराजेंच्या दिल्लीतील निवासस्थानी बैठक झाली. जर्मनी, कॅनडा, ब्राझील, पोलंड, बल्गेरिया, स्पेन, नॉर्वे, ट्युनेशिया या देशांच्या राजदुतांनी महापुराची आणि बचावकार्याची माहिती घेतली. 'या सर्व देशाच्या राजदुतांनी पूरग्रस्तांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दिल्लीत चांगले आंतरराष्ट्रीय संबंध निर्माण झाले आहेत. त्याचा आगामी काळात राज्याला फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न राहील' असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरः पूरग्रस्तांसाठी पोलिस राबले अहोरात्र

$
0
0

Sachin.Yadav@timesgroup.com
Tweet : sachinyadavMT
कोल्हापूर : भारतीय वायू सेना, नौदल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक (एनडीआरएफ), राज्य आपत्ती प्रतिसाद पथक (एसडीआरएफ) येण्यापूर्वी कोल्हापूर आणि सांगली पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजाविली. १० हजारांहून अधिक पोलिस, होमगार्ड, राज्य रा‌खीव दलाचे कर्मचाऱ्यांनी दिवस रात्र केलेल्या सेवेमुळे कोल्हापूर आणि सांगलीच्या महापुरात जीवितहानी रोखता आल्याचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी सांगितले.

राधानगरी आणि कोयना धरणाचे दरवाजे खुले झाल्यानंतर पंचगंगा आणि कृष्णा नदीला मोठ्या प्रमाणात पूर येण्याची शक्यता गृहीत धरून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. कोल्हापूरचे जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. अभिनव देशमुख आणि सांगलीचे जिल्हा पोलिस प्रमुख सुहेल शर्मा यांना सातत्याने पुरस्थितीचा आढावा घेण्याचे आदेश दिले. कोल्हापुरात पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर तत्काळ पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्याचे आदेश देण्यात आले. राज्य आणि जिल्हा मार्गावरही ठिकठिकाणी पाणी आल्याने जिल्ह्यात वाहतूक व्यवस्था कोलमडली. जिल्ह्यातील प्रत्येक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षकांना पूरस्थितीवर काटेकोरपणे लक्ष ठेवून प्रत्येक तासाला आढावा देण्याच्या सूचना केल्या. त्यासाठी स्वतंत्र व्हॉटस् ग्रुप तयार केला. विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालय आणि जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात कंट्रोल रुम मधून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरस्थितीवर लक्ष केंद्रित करण्यात आले. सोशल मीडियावरुन मिळत असलेली माहितीनुसार गरज असेल त्या ठिकाणी पूरग्रस्तांना वाचविण्यासाठी पोलिसांना आदेश देण्यात आले. महामार्गावर दीडशेहून अधिक पोलिस तैनात केले. किणी टोल नाका, शिरोली, सांगली फाटा, तावडे हॉटेल, कोगनोळी नाका या परिसरात पोलिस तैनात करण्यात आले. या पुरस्थितीच्या काळात हायवेवर सुमारे ५० हजारांहून अधिक ट्रक थांबले होते. सातारा ते निपाणीपर्यंत सर्व प्रकारची मालवाहू वाहने रस्त्यावर थांबली होती. ४ ऑगस्टपासूनच वाहतुकीचे नियोजन करण्यात आले. पूरस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात आल्यानंतर महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गे वळविण्यात आली. पुणे, सोलापूर, हैदराबाद, बेंगलोरमार्गे ही वाहतूक महामार्गावर सुरू राहिली. महामार्गावर थांबलेल्या सर्व ट्रक, बस, मालवाहतुकीची वाहने, खासगी वाहनांतील प्रवाशांची व्यवस्था परिसरातील मंदिरे, सांस्कृतिक सभागृहात निवासाची व्यवस्था केली. त्यांना चहा, नाष्टा, जेवणाची सोय केली. त्यासह औषध पुरविण्यात आली. महामार्गावरील वाहनांना पर्यायी मार्ग सुचविण्यात आले. त्यासाठी त्या मार्गावरील पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना पूरग्रस्तांना मदत करण्याच्या सूचना केल्या. पुराच्या पाण्यातून विमानतळासाठी लागणारा इंधन पुरवठा, काही ट्रक मोठ्या पोलिस बंदोबस्तात आणले. महापुराचे पाणी पसरणारे जिल्ह्यातील सर्व रोड बंद करण्याचे आदेश दिले. त्यामुळे एकही वाहन किंवा व्यक्ती वाहून गेल्याचे प्रकार घडले नाहीत. केवळ हायवेवरील काही नागरिकांनी पुराच्या पाण्यातून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही पोलिस आणि अन्य यंत्रणेने सुखरुप बाहेर काढले. पुरस्थिती गंभीर झाल्यानंतर वायु सेना, नौदल आणि एनडीआरएफ, एसडीआरएफ यांच्या पथकासोबत पोलिस कर्मचारी तैनात केले होते.

अफवा रोखल्या

आठवडाभर झालेल्या पुरस्थितीत अनेकदा सोशल मीडियावरून अफवा पसरविणाऱ्या जाण्याची शक्यता होती. हायवे बंद असतानाही वाहतूक सुरू झाली आहे. या क्रमांकावर संपर्क साधा, तत्काळ मदत दिली जाईल, असेही काही व्हॉटस् अपवर व्हायरल झाले होते. कंट्रोल रुम आणि सायबर शाखेकडून यासर्व हालचालीवर लक्ष ठेवण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीची घरघर थांबेना; सोपल सेनेच्या वाटेवर

$
0
0

बार्शी:
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक मोठा झटका बसणार आहे. सोलापूरातील बार्शी तालुक्याचे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दिलीप सोपल शिवसेनेच्या वाटेवर जाण्याची शक्यता आहे. भाजप-शिवसेना युतीच्या जागावाटपानुसार बार्शी विधानसभेची जागा शिवसेनेकडे येते. त्यामुळेच सोपल लवकरच 'शिवबंधन' बांधणार असल्याची चर्चा आहे.

मुंबईत होत असलेल्या उमेदवार निवड प्रक्रियेच्या मुलाखतीला दांडी मारल्याने सोपल यांचा सेनाप्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे. बार्शीत त्यांनी कार्यकर्ता मेळावा घेऊनही सोपल यांनी तसे संकेत दिले. सोपल यांचे कट्टर विरोधक असलेले माजी आमदार राजेंद्र राऊत शिवसेनेतून भाजपात गेले असल्याने सोपल यांचा शिवसेनाप्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगलीतील घरांमध्ये आढळले तब्बल २५० साप!

$
0
0

सांगली/पुणेः सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यांमधील पूरपरिस्थिती नियंत्रणात आली असून, निवारा केंद्रातील नागरिक हळूहळू आपल्या घरी परतत आहेत. मात्र, घरी गेल्यानंतर त्यांना वेगळ्याच संकटाचा सामना करावा लागत आहे. सांगलीतील घरांमध्ये तब्बल २५० साप आढळून आल्याची माहिती मिळाली आहे. सर्पमित्रांच्या मदतीने त्यांना पकडून त्यांच्या अधिवासात सुरक्षित सोडले जात आहे.

सांगलीत मोठ्या प्रमाणावर जैव विविधता आढळून येते. मगरींपासून ते विविध प्रकारच्या पक्षांपर्यंत अनेकविध प्राणी आढळून येतात. सांगलीत आलेल्या प्रलयकारी पुरामुळे जनावरे, प्राण्यांचीही ससेहोलपट झाली. अशातच पुरासोबत आलेले अनेक साप बुडालेल्या घरांमध्ये दडून बसले. सर्पमित्रांच्या मदतीने सापांना बाहेर काढून त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या अधिवासात सोडले जात आहे.

दरम्यान, कोल्हापूर व सांगलीमध्ये पुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ५६ झाली असून, दोन जण अद्याप बेपत्ता आहेत. दोन्ही जिल्ह्यांतील नद्यांची पाणी पातळी ही धोक्याच्या पातळीच्या खाली गेली असून, सर्व गावांचा संपर्क पूर्ववत झाला आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पुण्यात दिली.

> सांगली आणि कोल्हापूरमधील पुराने बाधित सरकारी इमारती, शाळा, समाज मंदिरे आणि पूल यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार; शाळा सुरू करून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य उपलब्ध करून दिले जाणार

> स्वच्छता, आरोग्य, मदत व पुनर्वसनाचे काम वेगाने सुरू असून, ६३ हजार ६९७ पूरग्रस्त कुटुंबांना ३२ कोटी ८४ लाख ८५ हजार रुपयांच्या रोख रकमेचे वाटप; नुकसान झालेल्या घरांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू असून, एक हजार ५१९ घरांचे पूर्णत:, तर १९ हजार ७८० घरांचे अंशत: अशा २१ हजार २९९ घरांचे नुकसान

> सांगली जिल्ह्यातील चार तालुक्यांतील १०४ गावांमधील ८७ हजार ९३९ कुटुंबे बाधित; त्यापैकी ४५ हजार २९३ ग्रामीण, तर ४२ हजार ६४६ शहरी कुटुंबांचा समावेश, निवारा केंद्रांमध्ये शहरी भागातील एक हजार ७६० जण, तर ग्रामीण भागातील एक हजार ३९४ नागरिकांचा समावेश

> कोल्हापूर जिल्ह्यामधील १२ तालुक्यांतील ३७५ गावांमधील एक लाख दोन हजार ५५७ कुटुंबे बाधित; त्यापैकी शहरी भागातील १८ हजार १९८ व्यक्ती, तर ग्रामीण भागातील २७ हजार ४३६ व्यक्ती निवारा केंद्रात

> सांगली जिल्ह्यामध्ये २३८, कोल्हापूरमध्ये ३१४, सातारा जिल्ह्यात ७२ अशी ६२४ वैद्यकीय पथके कार्यरत; मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात आतापर्यंत व्यक्ती व संस्थांकडून सहा लाख ६१ हजार ३११ रुपयांचे धनादेश जमा

> कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू; कोल्हापूरमध्ये महावितरणची पुणे, बारामती आणि सातारा येथील ४८ पथके, तर सांगलीत १२ पथके कार्यरत, सांगली जिल्ह्यात तीन हजार २३८ ग्राहकांचा, तर कोल्हापूरमध्ये १२ हजार ८२२ ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित

> सांगली जिल्ह्यातील ४७ बंद रस्त्यांपैकी ४१, तर कोल्हापूर जिल्ह्यातील ८८ बंद रस्त्यांपैकी ७५ रस्ते सुरू

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोडका, घेवडा १२० रुपये किलो

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

महापुराने बंद झालेले रस्ते खुले झाल्याने भाज्यांची आवक सुरू झाली आहे. मात्र दर चढेच असल्याचे चित्र भाजी मंडयांत पहायला मिळाले. दोडका, घेवड्याचा दर प्रतिकिलो १२० रुपये तर हिरवी मिरचीचा दर ८० ते १०० रुपये होता.

गेल्या आठवड्यात महापुराने भाज्यांची आवक कमी झाल्याने दर गगनाला भिडले होते. श्रावण घेवड्याचा दर प्रतिकिलो २०० रुपये तर टोमॅटोचा दर १२० रुपयांपर्यंत गेला होता. वांगी १२० रुपये तर कोबीचा दर १०० रुपये किलो होता. पण पुराचे पाणी ओसरू लागल्यानंतर आवक वाढल्याने भाज्यांचे दर कमी आलेत. आज मंडईत श्रावण घेवड्याचा दर १२० रुपये होता. टोमॅटोचा दर प्रतिकिलो २० रुपयांपर्यंत कमी झाला. गवार, वांगी, वरणा, भेंडीची प्रतिकिलो ८० रुपयांनी विक्री झाली. मटारची आवक वाढली असून दर घसरले आहेत. प्रतिकिलो २० ते ४० रुपयांनी विक्री झाली. पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात असले तरी मेथी पेंढीचा दर १५ ते २० रुपये होता. कांदा पात १० ते १५ रुपयांना विकली गेली. मुळ्याचा दर प्रतिनग १० ते १५ रुपये होता. कोथंबिर पेंढीचा दर ३० ते ४० रुपये होता. कोबी गड्ड्याचा दर १० ते १५ रुपये असला तरी फ्लॉवर गड्ड्याचा दर ४० ते ५० रुपयांवर पोहोचला.

फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो रुपयांत)

वांगी : ८०

टोमॅटो : २०

भेंडी : ८०

ढबू : ६०

गवार : ८०

दोडका : १२०

कारली : ६०

वरणा : ८०

हिरवी मिरची : ८० ते १००

फ्लॉवर : ३० ते ५० (प्रति गड्डा)

कोबी : १० ते १५(प्रति गड्डा)

बटाटा : ३५ ते ४०

लसूण : ८०

कांदा : २५ ते ३०

आले : ८०

पडवळ : १५ ते २० (प्रति नग)

मुळा : १० ते १५ (प्रति नग)

पालेभाजी दर (पेंढी रुपयांत)

मेथी : १५ ते २०

कांदा पात : १५

कोथिंबीर : ३० ते ४०

पालक : १५

शेपू :१५

फळांचे दर (प्रतिकिलो रुपयांत)

सफरंचद : ५० ते १६०

डाळिंब : ६० ते ८०

केळी : ३० ते ६० (डझन)

जवारी केळी : ३० ते ६० (डझन)

सिताफळ : १००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images