Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

महामार्ग ठप्पच

$
0
0

फोटो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला तरी पूरस्थिती कायम आहे. पुराचे पाणी कासगवतीने कमी होत असल्यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक रविवारी सुरू होवू शकली नाही. प्रशासनाने दिवसभरात चार वेळा पाण्याची पाहणी करुन वाहतूक सुरू करण्यासंदर्भात चाचणी केली, मात्र पाण्याच्या वेगामुळे हा प्रयत्न अयशस्वी ठरला. दरम्यान, अत्यावश्यक सेवेंतर्गत आपत्कालीन यंत्रणेसाठी आवश्यक असणारे पेट्रोल, डिझेल व गॅस सिलिंडरचे मिळून १५ टँकर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कोल्हापुरात आणले. पुणे बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर शिरोलीनजीक अजूनही साडेतीन ते चार फूट पाणी आहे. यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे, सोमवारी पुन्हा एकदा महामार्गावरील पाण्याची पाहणी करुन वाहतूक सुरू करायची की नाही, यासंबंधीचा निर्णय होणार आहे. पाण्याचा जोर ओसरल्यास सोमवारी दुपारनंतर अंशत: वाहतूक सुरु होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे शिरोळ येथे पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी बचाव पथके युद्धपातळीवर कार्य करत आहेत. जिल्ह्यातील विविध भागातील पूरबाधित ५०,५९४ कुटुंबातील २,४५,२२९ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही शिरोळचा दौरा करुन पूरस्थितीचा आढावा घेतला. मुंबई येथील २५ डॉक्टरांचे एक पथक उपचारासाठी शिरोळमध्ये दाखल झाले आहे. औषधे घेऊन ट्रक देखील शिरोली येथे पोहचला आहे.

दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग गेले आठवडाभर बंद असल्याने दैनंदिन जीवनावर परिणाम झाला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस, अन्नधान्याची टंचाई जाणवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरू करण्यासाठी रविवारी दिवसभर प्रयत्न केले. जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या उपस्थितीत टँकर आणण्याची चाचणी झाली. अधिकाऱ्यांनी सकाळी सात वाजता पहिल्यांदा पाहणी केली. सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास पाण्याचा टँकर पोकलँनसोबत पुराच्या पाण्यातून सुरक्षितरित्या बाहेर काढता येतील का यासंबंधी पुन्हा चाचणी घेतली. मात्र पुराच्या पाण्याला वेग असल्यामुळे वाहतूक सुरू करण्याचा निर्णय झाला नाही.

दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास विमानतळावर हेलिकॉप्टर्ससाठी आवश्यक २४,००० लिटर इंधन सुरक्षितपणे आणण्यात आले. बोटीतून १५२ सिलिंडर टाक्या आणल्या. सायंकाळी चार ते सहा या दरम्यान पुन्हा एकदा पाण्याची पाहणी आणि वाहतुकीची चाचणी झाली. आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी देसाई, अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या उपस्थितीत पाहणी करुन महामार्गावरुन पेट्रोल, डिझेलच्या टँकरची वाहतूक सुरू केली.

...

सकाळी पाण्याची पाहणी व चाचणी झाल्यानंतर विमान व हेलिकॉप्टर्ससाठी आवश्यक इंधनाचा टँकर आणण्यात आला. त्यानंतर स्वत अप्पर पोलिस अधीक्षक काकडे हे बांबूच्या साहाय्याने पाण्यातून चालत रस्यावरील पाण्याची उंची मोजत शिरोली येथे गेले. त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी महामार्गावर साचलेले दगड बाजूला केले. त्यानंतर सैन्यदलाचे तीन ट्रक सोडण्यात आले.

...

कोट

'अत्यावश्यक इंधन प्रथम पूरग्रस्त नागरिकांसाठी काम करणाऱ्या आपत्ती व्यवस्थापनसाठी वापरले जाईल. वापरुन शिल्लक राहिलेले इंधन शहरातील पेट्रोल पंपांना दिले जाईल. पावसाचा जोर कमी झाल्यास मंगळवारपाहून पुरवठा सुरळीतपणे सुरू होईल.

दौलत देसाई, जिल्हाधिकारी

...

प्रथम कोल्हापूर, कागलपर्यंतच्या वाहतुकीला मुभा

सोमवारी सकाळी पुन्हा एकदा महामार्गावरील पाणी पातळीची पाहणी केली जाईल. सोमवारी अत्यावश्यक सेवेसाठी पेट्रोल, डिझेल, गॅस व जीवनावश्यक वस्तूंच्या गाड्यांना प्राधान्य राहील. पाणी ओसरुन वाहतूक सुरू झाल्यास महामार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून पहिल्यांदा कोल्हापूर आणि कागलपर्यंत प्रवास करणाऱ्या वाहनांना सोडण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तिप्पट दराने भाजीविक्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

श्रावण महिन्यात भाज्यांनी बहरणारी मंडई पुराच्या फटक्यामुळे ओस पडली आहे. रविवारी कोल्हापुरातील लक्ष्मीपुरीतील आठवडी बाजार सुरू राहिला असला तरी भाज्यांचे दर तिप्पट होते. गेले दोन दिवस अनेक ठिकाणी भाज्या अव्वाच्या सव्वा दराने विकत होते.

श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. गेले सात दिवस सलग पडणाऱ्या पावसाने थैमान घातले. जिल्ह्यातील ग्रामीण भागातून शहराकडे येणारे सर्व रस्ते बंद झाल्यामुळे बाजारातील भाजीची आवक पूर्णपणे थंडावली होती. नागरिकांनी गेल्या आठवडाभरा कडधान्ये, बटाटे यावर स्वयंपाक केला. राधानगरीकडे जाणाऱ्या काही गावातून वाहतूक सुरळीत असल्यामुळे शहरात येणारा भाजीपुरवठा सुरू असला तरी त्याचे प्रमाण कमी होते. त्यात आंबेवाडी, चिखली, दोनवडे, कळे, पन्हाळा रोडवरील काही गावांमधील जवळपास एक लाख पूरग्रस्तांना कोल्हापूर शहरात स्थलांतरित करण्यात आले आहे. शहरातील पूरबाधित भागातील नागरीकही स्थलांतरित कॅम्पमध्ये आले आहेत. त्यांच्यासाठी रोज जेवणाची व्यवस्था केली जात असल्याने भाजीला मागणी वाढली आहे. यामुळे कोल्हापुरात भाजीपाल्याचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे.

दरम्यान, रविवारी सकाळी पावसाने काहीशी उघडीप दिल्यामुळे नागरिकांनी भाजीपाल्याच्या खरेदीसाठी बाजारात मोर्चा वळवला. कपिलतीर्थ, लक्ष्मीपुरी येथील भाजीमंडई खुली झाली असली तरी भाज्यांच्या दरात नेहमीपेक्षा तिपटीने वाढ झाली आहे. कोथिंबीर ३० रुपये पेंडी या दराने विक्री होत आहे. दर श्रावण घेवडा, दोडका यांचा दर २०० रुपये किलोच्या घरात गेला आहे. अळू, शेपू, कांदापात, मुळा व करडई यांची आवक वाढल्याने या भाज्या वीस रुपयांपर्यत आहेत. कोबी, फ्लॉवर, सिमला मिरची, वांगी दिडशे रुपये किलो दराने विक्री होत आहेत.

भाजीसह अंड्यांचाही तुटवडा

उद्या दुसरा श्रावण सोमवार आहे. त्यामुळे अळू, मेथी यासह भाज्यांना मागणी वाढली आहे. केळीचे पान, फुले यांनाही मागणी आहे. मात्र अद्याप पुराची तीव्रता कमी न झाल्याने रस्ते बंद आहेत. परिणामी भाज्यांची आवक कमी राहणार आहे. भाज्यांचे दर तिप्पट झाल्याने काहीजणांनी श्रावणातही अंडी, चिकन खाण्याचे पर्याय निवडले आहेत. सोमवारी बकरी ईद असल्याने मुस्लिम बांधवांनाही बाजारातील किराणा साहित्याची टंचाई जाणवत आहे. बाजारात भाजीटंचाई असल्याने गेल्या आठवड्यात नागरिकांना मॉलचा पर्याय होता. मात्र आता मॉलमधील पिठे, कडधान्य, डाळीही संपल्याने आवक कमी असल्याने चढ्या दराने नागरिकांना भाज्या खरेदी कराव्या लागत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प. महाराष्ट्रात पुरामुळे ४० जणांचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुण्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू झाला असून दोघेजण बेपत्ता आहेत', अशी माहिती विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी रविवारी पुणे येथे पत्रकार परिषदेत दिली.

म्हैसेकर म्हणाले, 'पुरामुळे सांगलीत १९, कोल्हापुरात ६, सातारा आणि पुण्यात प्रत्येकी ७ आणि सोलापूरमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तर सांगली, कोल्हापूर आणि साताऱ्यात प्रत्येकी एक अशा तीन व्यक्ती बेपत्ता आहेत. तसेच ब्रह्मणाळमध्ये रविवारी पाच मृतदेह सापडले आहेत. कोल्हापुरात २ लाख ४५ हजार २२९ जणांचे स्थलांतर करण्यात आले असून सांगलीत ४ लाख ४१ हजार ८४५ जणांचे स्थलांतर करण्यात आले आहे. सांगलीत पाणी ओसरायला सुरुवात झाली असून सांगलीतील पाण्याची पातळी ५६ फुटांवरून ५३ फुटांवर आली आहे. सांगली आणि कोल्हापूरमधील पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी पाच हजार रुपये रोख दिले जाणार आहेत. उर्वरित रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. पूरग्रस्त कुटुंबांना रक्कम देताना बँकेकडून चेक किंवा बँक पासबुक मागण्यात येणार नाही. केवळ बँकेतील स्लीपवरून पैसे मिळणार आहेत. आधार कार्डवरून ओळख पटवली जाईल. एखाद्याकडे आधार कार्ड नसल्यास संबंधित पूरग्रस्त कुटुंबात या ओळखीच्या व्यक्तीचे आधार कार्ड पाहून रक्कम दिली जाईल.

...

मुकी जनावरेही दगावली

या पुरामुळे सांगली, कोल्हापूर आणि साताऱ्यात एकूण ५० गाई, ४२ म्हशी, २३ वासरे, ५८ शेळ्या ११ हजार १०० कोंबड्यांचा मृत्यू झाला असून एकूण २५ लाख १७ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हेल्पलाइन नंबरही जारी करण्यात आला असून कोल्हापूरसाठी हेल्पलाईन क्रमांक ७८७५७६९१०३ व सांगली जिल्ह्यासाठी ७८७५७६९४४९ हा हेल्पलाइन नंबर सुरू करण्यात आला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात

६ जणांचा मृत्यू

केशव पाटील (रा. इटे, ता. आजरा), जिजाबाई खोत (रा. देवाळेपैकी संकपाळवाडी, ता. भुदरगड), तानाजी पोवार (रा. पन्हाळा), हनुमंत ठोंबरे (रा. शिरोळ) यांचा पुरात वाहून गेल्याने तर जिजाबाई कडूकट (रा. शिरोळ), गंगुबाई सोरटे (रा. केर्ले, ता. करवीर) यांचा मृत्यू झाड अंगावर पडून झाला . तर आवाक्का भोसले (रा. गडहिंग्लज) या वृध्दा पुरातून वाहून गेल्याने बेपत्ता आहेत.

...

रस्ते बंद

सांगली जिल्ह्यामध्ये २९ प्रमुख राज्यमार्ग, ३८ प्रमुख जिल्हामार्ग असे एकूण ६७ रस्ते आणि ३७ पूल बंद ठेवण्यात आले आहेत. तर कोल्हापूरमध्ये २९ राज्यमार्ग आणि ५८ प्रमुख जिल्हामार्ग असे एकूण ८७ रस्ते आणि ३७ पूल पाण्याखाली असल्याने बंद ठेवण्यात आल्याचे म्हैसेकर यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांगलीत १९ जणांचामृत्यू , एकजण बेपत्ता

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापूर आणि अतिवृष्टीमुळे सांगली जिल्ह्यात आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला आहे. एकजण पुरातून वाहून गेल्याने बेपत्ता आहे. मृतांमध्ये सर्वाधिक ब्रह्मनाळ बोट उलटल्याच्या दुर्घटनेतील लोकांचा समावेश आहे.

पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ येथून खटावच्या दिशेने जाणारी बोट ९ ऑगस्ट रोजी उलटली. यामध्ये गंगुबाई सलगर (वय ६०), बाबूराव पाटील (६५), वर्षा पाटील (४०), लक्ष्मी वडेर (६५), कस्तुरी वडेर (३५), राजमती चौगुले (६२), कल्पना कारंडे (३५), सुवर्णा ऊर्फ नंदा गडदे (३५), राजवीर घटनट्टी (४ महिने), सोनाली घटनट्टी (४), सुरेखा नरूटे (४५), रेखा वावरे (४०), सौरव गडदे (८), सुनीता रोगे (उपलब्ध नाही), कोमल नरूटे (२१), मनीषा पाटील (३१), क्षीती पाटील (४, रा. सर्व ब्रह्मनाळ) यांचा मृत्यू झाला. बोटीतून वाहून गेलेले आमलसिद्ध नरुटे वाचल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. सचिन पोळ (३५, रा. कडेगाव), निखिल कुलकर्णी यांचा पुरामुळे मृत्यू झाला. दत्तात्रय सावंत (रा. मिरज) पुराने वाहून गेल्याने बेपत्ता आहेत.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Article 4

पंपिंग स्टेशमनधील पाच तासांचा थरार

$
0
0

Maruti.Patil@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर : नजर जाईल तिकडे दिसणारे पाणी. पुराच्या पाण्यात जरासे अस्तित्व दाखविणारे बालिंगा पंपिंग स्टेशन. चार ते साडेचार फूट पाण्यात बुडालेले विद्युतपंप. पंपिंग स्टेशनपर्यंत जावे लागणारे ४० ते ५० फुटाचे अंतर. अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जिवाची बाजी लावत शनिवारी चारही विद्युतपंप पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर बाहेर काढण्यास यश मिळवले. जिगरबाज १२ कर्मचाऱ्यांनी अशक्यप्राय कामगिरी केली. शहराच्या पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी त्यांनी केलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सलग बारा दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले आहे. महापुराने घातलेल्या थैमानाचा सर्वांनाच तडाखा बसला. इतिहासात नोंद होईल अशा महापुरांने सर्वांचीच भंबेरी उडवली. महापुराच्या विळख्यातून सुटका करण्यासाठी सुरू असलेली धडपड अनेकांनी पाहिली. संपूर्ण शहरालाच बेटाचे स्वरुप आल्याने जीवनावश्यक वस्तूंचा तर प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. पाणीदार जिल्ह्यातील शहराला आठ दिवसांपासून पिण्याच्या पाण्याच्या भिषण टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

सोमवारी (ता. ५) शहराला पाणीपुरवठा करणारे शिंगणापूर, बालिंगा व नागदेववाडी पंपिंग स्टेशन पुराच्या पाण्यात बुडाली. त्याच दिवशी दुपारी महापालिका प्रशासनाने पाणीपुरवठा होणार नसल्याचे जाहीर केले. एरवी किरकोळ कारणावरून पाणीपुरवठा बंद झाल्यानंतर शहर पाणीपुरवठा विभागावर नेहमीच टीकेचे झोड उडते. यावेळी मात्र या परिस्थितीकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले. पिण्याचे पाण्यासाठी महापालिका प्रशासनाने उपाययोजना केल्या, पण त्या सर्व तकलादू ठरल्या. परिस्थितीपुढे सर्वांनीच हात टेकल्याने सर्वत्र हतबलता दिसत होती. शुक्रवार सायंकाळपासून पूर ओसरू लागल्यानंतर काहीसा दिलासा मिळू लागला. पुराची पातळी कमी होत गेल्यानंतर रात्री पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाण्यात बुडालेले विद्युतपंप बाहेर काढण्याचा निर्णय घेतला.

निर्णयानुसार शनिवारी सकाळी कर्मचारी पंपिंग स्टेशन परिसरात दाखल झाले. ५० फुटांचे अंतरावरील चार ते साडेचार फूट पाण्यातील पंप काडणे अवघड होते. निर्धार केलेल्या कर्मचारी १२ वाजता पाण्यात उतरले. पंपिंग स्टेशनवर एक कर्मचारी पोहोचल्यानंतर पाठोपाठ अरविंद यादव, अशोक मेंगाणे, पाटलू पाटील, सुनील चौगले दाखल झाले. यांत्रिक विभागाचे उपजलअभियंता रामदास गायकवाड सर्व कर्मचाऱ्यांना सूचना देत होते. तब्बल पाच तास अविश्रांत कामानंतर चारही विद्युतपंप बाहेर काढण्यास त्यांना यश आले. बाहेर काढलेले सर्व पंप भीमराव कांबळे, दिनकर जाधव, राजेंद्र पाटील, निवास माळी, आनंदा पुजारी यांनी हायड्रो क्रेनच्या मदतीने सुरक्षितस्थळी आणल्या. सहायक अभियंता जयेश जाधव व वर्कशॉप विभागाचे चेतन शिंदे यांनीही या मिशनमध्ये मोलाची कामगिरी केली. पंपिंग स्टेशन परिसरातील पूर ओसरल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी या सर्वच कर्मचाऱ्यांनी जिवाची बाजी लावली. रविवारी सकाळी चार स्टार्टर कर्मचाऱ्यांनी बाहेर काढले. पाण्यातून बाहेर काढलेले सर्व पंप गरम केले जात आहेत. ऑइलिंग, ग्रिसिंग करुन सर्व मोटारी सज्ज ठेवल्या जाणार आहेत. त्यासाठी आणखी दोन दिवस लागणार आहेत. पंपिंग परिसरातील पूर ओसरल्यानंतर पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी हे सर्वच कर्मचारी ठाण मांडून बसले आहेत.

००००

चौकट

तीन दिवसांत पाणीपुरवठा होईल

बालिंगा पंपिंग स्टेशनवरून 'सी', 'डी' वॉर्डसह आपटेनगर टाकीवर अवलंबून असलेला भाग आणि रिंगरोड, फुलेवाडी, अंबाई टँक परिसरातील भागाला फायदा होणार आहे. बालिंगा पंपिंग स्टेशनवरून उपसा सुरू झाल्यानंतर किमान निम्म्या शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघेल. त्यामुळे शिंगणापूर उपसा केंद्रावर अवलंबून असलेल्या नागरिकांना टँकरद्वारे मुबलक पाणी पुरवता येईल.

०००

कोट

महापुरामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले आहे. काहीही करून शहरवासीयांना लवकरात लवकर पिण्याचे पाणी देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळेच पुराच्या पाण्यात जा‌ऊन पंप बाहेर काढले. पंपांची दुरुस्ती करुन ठेवल्या जाणार असून पाणीपातळी कमी झाल्यानंतर त्वरित यंत्रणा सुरू करण्याचा मानस आहे.

अरविंद यादव, महापालिका कर्मचारी

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापुरात नेते उतरले मदतीसाठी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापुराच्या आपत्तीच्या कालावधीत विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांनी पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला. कुणी प्रत्यक्ष महापुरात उतरुन पूरग्रस्थांचे स्थलांतरण केले. कुणी कमरेइतके पाण्यात उतरुन लहान मुले, वृद्धांना पुरातुन सुरक्षित बाहेर काढले. काहींनी स्थलांतरित ठिकाणच्या लोकांच्या भोजनाची व्यवस्था केली. अन्नाचे तयार पॅकेटस करुन ते पूरग्रस्तापर्यंत पोहचविले. प्रत्यक्ष नेतेच महापुरात उतरुन मदतीसाठी उतरले अन् कार्यकर्त्यांचा हुरुप वाढला. जीवाची पर्वा न करता गेले सहा दिवस असंख्य हात संकटग्रस्तासाठी हेल्पिंग हँड म्हणून सेवा करत आहेत.

आमदार चंदद्रीप नरके, आमदार अमल महाडिक, आमदार सतेज पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक यांनी शहर आणि परिसरात मदत यंत्रणा सक्रिय केली. आमदार नरके यांनी आंबेवाडी, प्रयाग चिखलीत तळ ठोकून होते. एकीकडे प्रशासनासोबत समन्वय आणि दुसरीकडे कार्यकर्त्यांसोबत पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविणे अशा दोन्ही जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या.

आमदार सतेज पाटील यांनी शहराच्या विविध भागात पाण्यात उतरुन प्रत्यक्ष मदत कार्य राबविले. कसबा बावडा, रमणमळा परिसर, गांधीनगर, चिंचवाड, वळिवडे भागाचा दौरा केला. नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले. पूरग्रस्तांना आवश्यक साहित्याचा पुरवठा केला. अजिंक्यतारा येथे मदत कक्ष उघडून कार्यकर्त्यांना मदतकार्यात सक्रिय केले. ऋतुराज पाटील यांनी पूरग्रस्त भागात मदतकार्य राबविले.

आमदार अमल महाडिक हे, महापुराच्या आपत्तीच्या कालावधीत विविध पातळीवर सक्रिय राहिले. महामार्गावर अडकलेले प्रवासी, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकातील जवान, पूरग्रस्तांसाठी नाश्ता, भोजनाची सोय केली. त्यांच्या निवासाच्या सुविधेकडे लक्ष दिले. शिरोली, कोल्हापूर शहर, वळीवडे, आंबेवाडी, प्रयाग चिखलीसाठी त्यांनी रसद पुरविली. प्रशासनासोबत समन्वय ठेवला.

माजी खासदार धनंजय महाडिक आणि कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला. शहराच्या विविध भागातील पूरग्रस्तांना दिलासा दिला. धनंजय महाडिक युवा शक्तीच्या माध्यमातून फूड पॅकेटसचे वाटप, जीवनावश्यक वस्तूंची मदत केली. पूरग्रस्तांना स्थलांतरित केलेल्या ठिकाणी तयार पाकिटे पोहचवली. भागीरथी महिला संस्थेच्या अरुंधती महाडिक या मदतकार्यात सक्रिय होत्या.

माजी खासदार राजू शेट्टी हेही पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सक्रिय होते. शिरोळ तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांसाठी मदतीची यंत्रणा राबवली. पूरग्रस्तांना जेवणाच्या मदतीसह शेतकऱ्यांना मदतीवर विशेष भर देत जनावरांसाठी पशूखाद्य, वैरणीची मदत केली.

संभाजीराजेंची धावाधाव, मंडलिक, मानेंचाही दौरा

महापुराने जिल्ह्याला विळखा घातल्यानंतर पूरग्रस्तांची सुटका करण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी संरक्षण खात्यापर्यंत पाठपुरावा केला. लष्कराचे पथक कोल्हापुरात लवकर दाखल होण्यासाठी वरिष्ठ स्तरावर चर्चा केली. स्वत: पथकासोबत पूरग्रस्त भागाचा दौरा करत नागरिकांना दिलासा दिला. खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूरस्थिती गंभीर; शर्थीचे प्रयत्न

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आठ दिवसांपासून जिल्ह्याला असलेला महापुराचा विळखा कायम असून पाणी संथगतीने कमी होत आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचे प्रयत्न सुरू असून नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी नागरिक कमालीची शर्थ करीत आहेत. शहर आणि जिल्ह्याच्या विविध भागांत घर, दुकाने, ऑफिसमध्ये शिरलेले पाणी ओसरल्यानंतर त्या भागाची स्वच्छता करण्यासाठी धडपड सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील पूरस्थिती अजूनही गंभीर आहे. कुरुंदवाड, राजापूर, राजापूरवाडी, खिद्रापूर आदी भागामध्ये हेलिकॉप्टरमधून फूड पॉकेटसचे वाटप झाले.

शिरोळ तालुक्यातील ४३ गावे पुरांनी बाधित झाली असून तब्बल एक लाख ५५ हजार १८६ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतरण केले आहे. कोल्हापूर शहरातील बहुतांश भाग अजूनही पाण्याखाली आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील पूरबाधित क्षेत्रातील जनजीवन अजूनही विस्कळित आहे.

कोल्हापूर शहरात नागरी वस्तीत शिरलेले पाणी संथगतीने उतरत आहे. शाहूपुरी गवत मंडई येथील रस्त्यावरून दुपारपासून वाहतूक सुरू झाली. मात्र शाहूपुरी सहावी गल्ली, कुंभार गल्ली अजूनही पाण्याखाली आहे. विल्सन पुलावरील पाणी ओसरले तरी सहाव्या व पाचव्या गल्लीत आणि व्हीनस कॉर्नर परिसरातील अजूनही पाणी असल्यामुळे वाहतूक बंद ठेवली आहे. कदमवाडी, जाधववाडी, दुधाळी, कसबा बावडा, शाहूपुरी, सुतारवाडा,जयंती नाला काठावरील घरे मोठ्या संख्येने बाधित आहेत.

जिल्ह्यात अजूनही १०७ बंधारे पाण्याखाली आहेत. ८७ प्रमुख जिल्हा मार्ग महापुराने बंद झाल्यामुळे जिल्हातंर्गत वाहतूक ठप्प आहे. तालुक्यातील नऊ गावे पूर्णपणे पाण्यांनी वेढली आहेत. दरम्यान पंचगंगा पाणी पातळी संथगतीने कमी होत आहे. दिवसभरात साधारणपणे एका फुटांनी पाण्याची पातळी खालावली. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास राजाराम बंधाराम येथे पाणीपातळी ५० फूट सहा इंच इतकी होती. दुपारी तीन वाजेपर्यंत केवळ सहा इंचांनी पाणी उतरले. सायंकाळी पाच वाजता पाणी पातळी ४९ फूट १० इंच होती.

दहा हजार जनावरे दगावली

महापुरामुळे जिल्ह्यातील २४९ गावे बाधित झाली आहेत. ग्रामीण भागात पाणी पातळी वाढू लागल्यानंतर नागरिकांनी जनावरे सोडून दिली. आता पुराचे पाणी ओसरु लागल्यानंतर महापुरात अडकून दगावलेली जनावरे नजरेस पडत आहेत. जिल्हा प्रशासनानेच, महापुरामध्ये जिल्ह्यातील सुमारे दहा हजार जनावरे मृत्यूमुखी पडली असावीत, अशी भीती व्यक्त केली आहे. यामध्ये गायी, म्हशी, बैल, वासरे यांचा समावेश आहे. जनावरे मोठ्या संख्येने दगावल्यामुळे रोगराई पसरण्याची भीती आहे. रोगराई पसरू नये यासाठी प्रशासनामार्फत दगावलेल्या जनावरावर केमिकल टाकले जात आहेत. पाणी ओसरल्यानंतर संबंधित जनावरे नष्ट करताना कसोटी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दिवसभरात विमानाच्या २८ फेऱ्या

$
0
0

कोल्हापूर विमानतळावर लष्कर, नौदल आणि भारतीय वायूसेनेची विमाने आणि हेलिकॉप्टर दाखल झाली आहेत. रविवारी सकाळपासून

विमानतळावर २८ फेऱ्या झाल्या. त्यामध्ये पूरग्रस्त भागातील मदतीसाठी वीस फेऱ्या झाल्या. उर्वरित आठ फेऱ्याद्वारे प्रवासी वाहतूक करण्यात आली. त्यामध्ये कोल्हापूर हैदराबाद, तिरुपती, बेंगळुरू या मार्गावर फेऱ्या झाल्या. दरम्यान कोल्हापूर ते मुंबई विमानसेवेचे वेळापत्रक निश्चित नसल्याचे विमानतळाचे संचालक कमलकुमार कटारिया यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

LIVE: कोल्हापूर,सांगलीला महापुराचा विळखा कायम

$
0
0

कोल्हापूर/सांगली/पुणे: आठ दिवसांपासून असलेला महापुराचा विळखा कायम असून पाणी संथगतीने कमी होत आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचे प्रयत्न सुरू असून शहर आणि जिल्ह्याच्या विविध भागांत घर, दुकाने, ऑफिसमध्ये शिरलेले पाणी ओसरल्यानंतर त्या भागाची स्वच्छता करण्यासाठी नागरिक धडपडत आहेत.

जाणून घ्या LIVE अपडेट्स:

>> कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुण्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू

>> कोल्हापुरातील २९ राज्यमार्ग आणि ५८ प्रमुख जिल्हामार्ग बंद

>>सांगलीतील२९ प्रमुख राज्यमार्ग, ३८ प्रमुख जिल्हामार्ग बंद

>> कोल्हापूरमधील पूरस्थिती गंभीर; शर्थीचे प्रयत्न

>> कोल्हापूर: शिरोळमधील तब्बल एक लाख ५५ हजार १८६ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतरण

>> कोल्हापूर: शिरोळ तालुक्यातील ४३ गावे पुरांनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठ दिवसानंतर पुणे-बेंगळुरू हायवेवरील वाहतूक सुरू

$
0
0

कसबा बावडा: पुणे बंगळुरू या राष्ट्रीय महामार्गावर आठ दिवसानंतर, सोमवारी (१२ ऑगस्ट) सकाळी सहा वाजल्यापासून अवजड वाहतूक सुरू करण्यात आली आहे. शिरोलीतून कोल्हापूरमध्ये जाण्यासाठी फक्त अवजड वाहतुकीला हिरवा कंदिल दाखवण्यात आला आहे.

कर्नाटकातून कोल्हापूरच्या दिशेनं येणारी वाहतूक अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. महामार्गाची पाहणी करून दुपारनंतर ही वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे. महामार्गावर अजूनही दीड फूट पाणी आहे.

Live: राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग बंद

कोल्हापूर परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी ५ ऑगस्ट रोजी महामार्गावर पाणी आले होते. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल आठ दिवस या महामार्गावर पाणी असल्याने दोन्ही बाजूस पंचवीस हजाराहून अधिक वाहने अडकून पडली होती. या वाहनधारकांची कोल्हापूरमधील आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी जेवणाची व्यवस्था केली होती. आठ दिवसांनी ही वाहतूक पूर्ववत सुरू झाल्याने वाहनचालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आठवले ५० लाख देणार

$
0
0

कोल्हापूर: सांगली आणि कोल्हापूरमधील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी खासदार निधीतून ५० लाखांची आर्थिक मदत देणार असल्याची घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. आठवले यांनी आज कोल्हापूर आणि सांगलीतील पूरग्रस्त भागांची पाहणी केली. यावेळी दोन्ही जिल्ह्यांतील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी प्रत्येकी २५ लाख रुपये देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

कोल्हापूरमधील रांगोळी, कडोली, इंगळी, आंबेवाडी, जाधववाडी आणि कोल्हापूर शहर आदी भागातील पूरग्रस्तांच्या रामदास आठवले यांनी भेटी घेतल्या. त्याचप्रमाणे सांगली जिल्हयातील ब्रह्मनाळ गाव आणि परिसरातील पूरग्रस्तांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. कोल्हापूर आणि सांगलीमध्ये आलेला महापूर हा महाजलप्रलय होता. त्यातून या पूरग्रस्तांना पुन्हा उभे करण्यासाठी आर्थिक सामाजिक आणि मानसिक पाठिंब्याची; मदतीची गरज आहे. या पूरग्रस्तांच्या पाठिशी आम्ही खंबीर उभे असून सर्वांनी मिळून पूरग्रस्तांच्या पाठिशी उभे राहण्याचे; त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन आठवले यांनी केले.

दरम्यान, कोल्हापूरसह महाराष्ट्रातील कोणत्याही भागात पुन्हा पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी नदीजोड प्रकल्प महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात सुरू करावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पूरग्रस्तांचे पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकूल योजने अंतर्गत पुनर्वसन करता येऊ शकते, या संदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'राज्य सरकारचा कारभार जनरल डायरसारखा'

$
0
0

कोल्हापूर/मुंबई: कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील पूरपरिस्थिती हाताळण्यात सरकार आणि प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. अपयश झाकण्यासाठी आणि सद्य स्थितीत निर्माण झालेल्या लोकांच्या संतापाला सामोरे जाण्याचे धारिष्ट्य नसल्यामुळे सरकारने जमावबंदी आदेश लागू केला. राज्य सरकारचा हा कारभार जालियनवाला बागेत हत्याकांड घडविणाऱ्या जनरल डायरसारखा आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह शहरातील विविध भागांना भेट देऊन पूरस्थितीचा आढावा घेतला. यानंतर सर्किट हाऊस येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी महापुराच्या आपत्तीला प्रशासन आणि सरकारचा ढिसाळ कारभार कारणीभूत असल्याची टीका केली. पाटील म्हणाले की, कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह पुरामुळे बाधित झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विनाअट सगळी कर्जमाफी द्यावी. ऊसाला प्रति एकर एक लाख रुपये आणि सोयाबीन, भात, भुईमुगसह अन्य पिकांना एकरी चाळीस हजार रुपयांची नुकसान भरपाई तत्काळ द्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

दरम्यान, पूरग्रस्त भागातील नागरिकांना वाचवण्याबरोबरच त्यांना मदत देण्यासाठी सरकारच्या मंत्र्यांनी जबाबदारी घेऊन पुराच्या ठिकाणी उभे रहायला हवे होते. पण मदत, पुनर्वसन व सांगलीचे पालकमंत्री पक्षाच्या बैठक घेत फिरत होते. काही रोड शो प्रमाणे वॉटर शो करुन सेल्फी काढून गेले. मंत्री, खासदार, आमदार गायब असल्याने त्यांची विचारणा केल्यानंतर काहींनी नागरिकांनाच गप्प केले. हे सारे अक्षम्य आहे. सरकारने जबाबदारी टाळली असून तातडीने मदत करण्यात कमी पडले, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

पूरग्रस्त कोल्हापुरात बंदी आदेश म्हणजे वैचारिक दिवाळखोरीच!

प्रचंड महापुराने उद्धवस्त झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यात मदतकार्य सुरू असताना बंदी आदेश काढणे ही सरकारची वैचारिक दिवाळखोरी आणि अपयश दडवण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याची टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली.

कोल्हापूर जिल्ह्यात १२ ते २४ ऑगस्ट दरम्यान लागू केलेल्या बंदी आदेशावर संताप व्यक्त करताना ते म्हणाले की, मागील काही तासांपासून जिल्ह्यातील पुराचे पाणी ओसरू लागले आहे. ही मदतकार्याला गती देण्याची वेळ आहे. राज्यभरातून पूरग्रस्त भागांकडे मदतीचा ओघ सुरू झाला असून, गावागावांत लोकांना एकत्रित करून मदतीचे वितरण करण्याची गरज आहे. मात्र नेमके याच वेळेस सणवाराची सबब सांगून काढलेला हा बंदी आदेश आश्चर्यजनक आहे. लोकांना एकत्र येण्यास बंदी घातली जाणार असेल तर मग मदतीचे वितरण कसे करणार? असा प्रश्नही चव्हाण यांनी उपस्थित केला.

कोल्हापूर व सांगली या दोन्ही पूरग्रस्त जिल्ह्यात सरकारच्या नियोजनशून्य कारभाराबद्दल कमालीचा रोष आहे. वेळीच मदत न मिळाल्याबद्दल पूरग्रस्तांनी अनेक मंत्र्यांसमक्षच संताप व्यक्त केला आहे. पुढील काळातही जनतेचा प्रक्षोभ उफाळून येण्याची शक्यता असल्याने सरकारने बंदी आदेश लागू केले आहेत. मात्र, हे आदेश तातडीने मागे घ्यावेत आणि सरकारने लोकांना सामोरे जाऊन गतीमानतेने मदतीचे वितरण करावे, अशी मागणीही माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरातील शाळा १६ ऑगस्टपर्यंत बंदच

$
0
0

कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये पुराचे पाणी वेगाने ओसरत असले तरी जनजीवन अद्याप पूर्णपणे पूर्वपदावर आलेले नाही. त्यामुळेच जिल्ह्यातील शाळा १६ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

पुराचे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली असली तरी अद्याप जिल्ह्यासह शहरातील पूरस्थिती आटोक्यात न आल्याने पूरग्रस्त भागातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना १६ ऑगस्टपर्यंत सुट्टी असल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी अधिकृत पत्रकाद्वारे आज जाहीर केले.

दरम्यान, पावसाने थोडीशी विश्रांती घेतल्याने कोल्हापूर जिल्हा पुराच्या संकटातून हळूहळू सावरत आहे. कोल्हापुरातील पुरामुळे गेले आठ दिवस पुणे-बेंगळुरू महामार्गावरील वाहतूक ठप्प होती. ही वाहतूक आज खुली करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खोपडेवाडीत डोंगरालगत भूस्खलन

$
0
0

म. टा. गगनबावडा

मांडूकली पैकी खोपडेवाडी (ता. गगनबावडा ) येथे गावालगतच्या डोंगराला सुमारे दोनशे मीटर लांबीची भेग पडल्याने भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे गावातील १५ कुंटुंबे भीतीच्या छायेखाली आहेत. या कुटुंबांचे प्रशासनाने वेळीच स्थलांतरण करणे गरजेचे आहे.

कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरून साळवणपासून पाच किलोमीटर अंतरावर कुंभी नदीच्या पलीकडे मांडूकली हे गाव आहे. या गावशी संलग्न असणारी खोपडेवाडी डोंगरालगत वसली आहे. सुमारे २०० लोकवस्ती असणाऱ्या या वाडीत सुमारे ३० घरे आहेत. गेले काही दिवस गगनबावडा तालुक्यात धूवांधर पाऊस पडत आहे. दोन दिवसांपूर्वी गावालगतच्या पश्चिमेकडील डोंगर उतरावरील सुमारे चार एकर जमीनीवर सुमारे २०० मीटर अंतरात उभी भेग पडल्याचे काही ग्रामस्थांच्या निर्दशणास आले. दुसऱ्या दिवशी या भेगत दोन मोठे खड्डे पडून मोठी पोकळी निर्माण झाली. या पोकळीतून पाणी वाहत आहे. पाण्याच्या प्रवाहाने भेग रुंदावून सुमारे चार एकर जमीन खचण्याचा धोका निर्माण झाला आहे.

डोंगर उतारापासून सुमारे ३० मीटर अंतरावर खोपडेवाडीतील सुमारे १५ घरे आहेत. पावसामुळे जमीन खचून ही घरेच गाडण्याची भीती आहे. येथील ग्रामस्थ भीतीच्या छायेत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने डोंगरालगतच्या चार घरांतील ग्रामस्थांना गावातील सांस्कृतिक हॉलमध्ये ठेवले आहे. सध्या जिल्ह्यात पाऊसाचा जोर कमी झाला असला तरी गगनबावडयात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे पडलेली भेग ही धोक्याचा इशारा समजून वाडीतील सर्वच ग्रामस्थांचे स्थलांतरण करणे गरजेचे आहे. दरम्यान, घटनास्थळी तहसीलदार संगमेश कोडे यांनी पाहणी करून ग्रामस्थांचे स्थलांतरण करण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर जि. प. सदस्य भगवान पाटील, उपसभापती पांडुरंग भोसले, भाजपा तालुकाध्यक्ष संदीप पाटील, विनायक सणगर, सर्जेराव खाडे यांनी भेट देऊन पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिरोळमध्ये २४ गावे पाण्याखालीच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

शिरोळ तालुक्यात कृष्णा, पंचगंगा, वारणा, दूधगंगा या चारही नद्यांचा पूर ओसरू लागल्याने पूरग्रस्तांना दिलासा मिळाला आहे. शिरोळमध्ये अजूनही २४ गावांना महपुराचा विळखा आहे. सोमवारी बकरी ईद निमित्त मुस्लिम समाज बांधवांनी शिरोळ येथे पद्माराजे विद्यालयात पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला. तालुक्यात कृष्णा व पंचगंगा नदी अद्याप धोका पातळीवरून वाहत असून कोल्हापूर-सांगली तसेच जयसिंगपूर-नृसिंहवाडी या मार्गावर पाणी असल्याने वाहतूक ठप्प आहे.

तालुक्यातील ५५ पैकी ४५ गावे पूरबाधीत आहेत. २४ गावांना महापुराने विळखा दिला आहे. ८१ छावण्यांमध्ये ३४ हजार ६३१ पूरग्रस्त स्थलांतरित झाले आहेत. तसेच अनेक पूरग्रस्त नातेवाईकांकडे स्थलांतरित झाले आहेत. एनडीआरएफ, लष्कर, नौदल तसेच वायुदलाचे पथक पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कार्यरत आहे. टाकळीवाडी येथील श्री गुरूदत्त शुगर्स च्या कार्यस्थळावर गेल्या आठ दिवसापासून चार हजारहून अधिक पूरग्रस्त वास्तव्यास आहेत. येथे ८०० जनावरांसाठी कारखान्याच्यावतीने छावणी सुरू आहे. येथे पूरग्रस्तांना प्रशासन तसेच स्वंयसेवी संस्थांनी मदतीचा हात दिला आहे. येथून टाकळीवाडी, अकिवाट, दत्तवाड, मजरेवाडी, तेरवाड, हेरवाड, पाचमैल पूरग्रस्त छावण्यांना मदत केली जात आहे. एनडीआरएफचे टीम कमांडर डी. के. सिंग यांच्या नेतृत्वाखालील २७ जणांच्या पथकाने सुमारे एक हजारहून अधिक पूरग्रस्तांना गुरुदत्त शुगर्सच्या छावणीत स्थलांतरित करण्यात आले आहे. स्थलांतरित होण्यास नकार देणाऱ्या पूरग्रस्तांना फूड पॅकेट तसेच जनावरांचे खाद्य पोहोचवण्याचे काम पथकामार्फत केले जात आहे.

संसार उभा करण्याची चिंता

दरम्यान पुराच्या पाण्यामुळे पशुधनाचे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी जनावरे मृत झाली आहेत. महापुराच्या फटक्याने शेतीचे तसेच प्रापंचिक साहित्याचे मोठे नुकसान झाले असून उद्ध्वस्त झालेला संसार पूर ओसरल्यानंतर कसा उभारणार या चिंतेत पूरग्रस्त कुटुंब आहेत.

पशुधनाच्या देखभालीची चिंता

महापुराने दिलेल्या वेढ्यातही पशुधनाच्या देखभालीसाठी कुरुंदवाड, राजापूर, खिद्रापूर, अर्जुनवाड, घालवाड, कनवाड, कुटवाड परिसरात अनेक ग्रामस्थ आहेत. त्यांना यांत्रिकी बोटीद्वारे पिण्याचे पाणी, फूड पॅकेट दिले जात होते. या मदतीबरोबरच आता जनावरांना चारा पाठवण्याची मोहीम सुरू झाली आहे. मौजे आगर, जयसिंगपूर, शिरोळ, अर्जुनवाड या परिसरातील सेवाभावी संस्था जनावरांना चारा उपलब्ध करून देत आहेत.

विळखा सैल

सोमवारी तालुक्यात पावसाने उघडीप दिली. धरणातील पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने महापुराचा विळखा सैल होऊ लागला आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत दोन फुटांनी घट झाली. कोल्हापूर सांगली मार्गावर उदगाव येथे कृष्णा नदीच्या पुराचे पाणी अद्याप कायम आहे. अंकली पुलाजवळ सकाळी कृष्णा नदी धोका पातळीपेक्षा अधिक सहा फुटाने वाहत होती. येथे पाणी पातळी ५६.४ फूट होती. राजापूर बंधाऱ्याजवळ पाणी पातळी ५९.८ फूट होती. तेरवाड बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदी ७९.७ फूट पातळीवर वाहत होती.

जनजीवन ठप्प

शिरोळ तालुक्यातील ५५ पैकी ४५ गावे पूरबाधीत आहेत. कोल्हापूर-सांगली, जयसिंगपूर-नृसिंहवाडी या मुख्य रस्त्यांसह तालुक्यातील बहुतांशी रस्ते पाण्याखाली आहेत. यामुळे तालुक्यातील जनजीवन गेल्या आठ दिवसापासून ठप्प आहे.

सुटकेचा निःश्वास

कृष्णा, पंचगंगा या नद्यांच्या पुराचा विळखा सैल होऊ लागल्याने पूरग्रस्त भागात अडकलेल्या ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. खिद्रापूर, राजापूर, राजापूरवाडी, बस्तवाड, अर्जुनवाड, धरणगुत्ती यासह अन्य गावात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. नद्यांचे पाणी संथपणे ओसरत असल्याने रस्ते वाहतूक सुरू होण्यास वेळ लागणार आहे. यामुळे या गावामध्ये पशुखाद्य पोहोचण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ईदची खुशी पूरग्रस्तांसाठी

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

ईद याचा इस्लाम भाषेतील अर्थच खुशी असा आहे. दरवर्षी मुस्लिम समाज मोठ्या आनंदात ईद साजरी करतो. कोल्हापुरातील मुस्लिम बांधव एकमेकांना दावत देतात. अन्य समाजातील मित्रपरिवारांसाठी जेवणाचे डबे दिले जातात. यंदा मात्र कोल्हापूर शहर व जिल्ह्यात ईद साजरी करताना मुस्लिम बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद नव्हे तर दु:ख आहे. लाखो पूरग्रस्त बेघर झाले असताना आपण कुर्बानीवर खर्च करायचा हे न पटल्याने शहरातील मुस्लिम कुटुंबीयांनी हा खर्च कमी करून सोमवारी पूरग्रस्तांसाठी जेवण व जीवनावश्यक साहित्य पुरवले.

रविवार पेठेत राहणारे मिरजकर कुटुंबीय. सौंदर्यप्रसाधन विक्रीचा त्यांचा व्यवसाय आहे. दोन मुलं, पत्नी आणि आईवडील यांच्यासोबत राहणारे रसूल मिरजकर यांनी केवळ कुटुंबीयांपुरते मांसाहारी जेवण बनवले. सकाळी दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंगमध्ये नमाज पठण करून दरवर्षी जो खर्च ईदसाठी येतो ती सारी रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मदतकेंद्रात दिली. व्हेंटिलेटर मशीन दुरूस्तीचा व्यवसाय करणारा इरफान कुरणे हा तरूण गेल्या आठवड्यापासून मुस्लिम बोर्डिंग येथील स्थलांतरीक कँपमध्ये राहणाऱ्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रात्रंदिवस झटत आहे. सोमवारी सकाळी त्याने घरात बकरी ईदच्या कुर्बानीवर येणाऱ्या खर्चाला फाटा दिला. केवळ धार्मिक शास्त्रानुसार ईद साजरी करून त्याने पूरग्रस्तांसाठी डाळखिचडी वाटप करण्यात पुढाकार घेतला.

समाजाने दिली हाक

पुराने घातलेल्या थैमानानंतर कोल्हापुरात गेले आठवडाभर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्वच कोल्हापूरकरांनी पुढाकार घेतला आहे. यामध्ये मुस्लिम बोर्डिंग, द मोहामेडन एज्युकेशन सोसायटी यासारख्या महत्त्वाच्या संस्था व संघटनांनी मुस्लिम समाजाला ईद साधेपणाने साजरी करून त्यासाठी येणारा खर्च मदतनिधीमध्ये द्यावा असे आवाहन केले होते. कोल्हापुरातील बहुतांशी मुस्लिम कुटुंबीयांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला आहे. ईदच्या कुर्बानीसाठी मोठ्या रकमेचे बकरे खरेदी न करता एक ते दीड हजार रूपयांचे बकरे कुर्बानीसाठी वापरून उर्वरीत दहा ते पंधरा हजार रूपये पूरग्रस्त निधीसाठी देण्याचा मानस केला आहे.

सोमवारी सकाळपासून अनेकजण ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी फोन व मेसेज करत आहेत. त्यांना पूरग्रस्तांसाठी वस्तू स्वरूपात मदतीची विनंती केली जात आहे. यामुळे सोमवारी सकाळपासून महिलांसाठी कपड्यांची मदत मोठ्या प्रमाणात ईदच्या शुभेच्छांऐवजी मिळाली आहे. धार्मिक कर्तव्य म्हणून कमीत कमी बकऱ्याची कुर्बानी देऊन उरलेली रक्कम मुस्लिम बोर्डिंगतर्फे पूरग्रस्तांच्या मदतनिधीसाठी संकलित करण्यात येणार आहे.

- गणी आजरेकर, अध्यक्ष, मुस्लिम बोर्डिंग

बाराईमाम परिसरातील मुस्लिम समाजातील सर्व कुटुंबीयांना ईदसाठी कुर्बानीचा खर्च टाळून निराधार पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. यानुसार या भागातील सर्व नागरिकांनी दोन हजार रूपयांत कुर्बानी करून प्रत्येकी एका कुटुंबीयांने १५ हजार रुपयांमधून जे एकटे, व निराधार पूरगस्त आहेत अशा २० विधवा, एकट्या महिला, पुरुषांना घर उभारून देण्यासाठी पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

- आदिल फरास, उपाध्यक्ष, मुस्लिम बोर्डिंग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूरस्थितीतील बंदी आदेश वादग्रस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पूरस्थिती, बकरी ईद, स्वातंत्रदिन, दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने १२ ते २४ ऑगस्टअखेर जमाव बंदी आदेश लागू केला आहे. यामुळे विविध मागण्यांसाठी आंदोलने, जमाव करण्यावर निर्बंध आले आहेत. पूरपरिस्थिती असताना बंदी आदेश लादून प्रशासनाने मुस्कटदाबी केल्याची सार्वत्रिक टीका होत आहे. पूरग्रस्तांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. पेट्रोल, डिझेल, पाण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. यामुळे जमावबंदी आदेशाची अंमलबजावणी कशी केली जाणार, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे जमावबंदीचा आदेश वादग्रस्त ठरला आहे.

अपर जिल्हादंडाधिकारी संजय शिंदे यांनी काढलेल्या बंदी आदेशात म्हटले आहे, पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे महापुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. परिणामी पूरग्रस्त व नागरिक गोंधळून जाण्याची शक्यता आहे. मुस्लिम बांधवांनी सोमवारी बकरी ईद सण साजरा केला. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्रदिन आहे तर २४ ऑगस्टला दहीहंडी आहे. या दरम्यान विविध मागण्यांसाठी उपोषण, आंदोलन होण्याची शक्यता आहे. अशावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहर आणि जिल्ह्यात १२ ते २४ ऑगस्टअखेर बंदी आदेश जारी करण्यात आला आहे.

बंदी कालावधीत बंदुका, काठी, तलवारी, भाले, सुऱ्या, काठी जवळ ठेवता येणार नाही. ज्वालाग्राही पदार्थ वाहून नेणे, व्यक्तीचे दहन करणे, सार्वजनिक ठिकाणी घोषणाबाजी करणे, वाद्य वाजवणे, असभ्य हावभाव करणे, पाच अगर त्याहून अधिक लोक एकत्र येणे, जमाव करणे, मिरवणुका काढणे, सभा घेणे यावर बंदी घलण्यात आली आहे. मात्र विविध जातीधर्मांचे सण, उत्सव, जयंती, यात्रा, लग्न, धार्मिक कार्यक्रम, प्रेतयात्रा, पूरग्रस्त भागातील मदत कार्य करता येणार आहे. बंदीआदेश यासाठी लागू होणार नाही.

...

चौकट

बंदी आदेश मागे

घेण्याची मागणी

पूरग्रस्तांना मदत देण्याच्या कालावधीतच १३ दिवस जमावबंदी आदेश करण्यात आला आहे. सरकारचे अपयश लपवण्यासाठी प्रशासनाने असा आदेश लागू केला आहे. मदत व वितरणात या आदेशाची अडचण येणार आहे. त्यामुळे तो आदेश त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्टिटरवरून केली आहे.

----

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१०० तासात मदतीचे ८५० कॉल

$
0
0

फोटो आहे.

Maruti.Patil

@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर :

महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानांनी शर्थीने प्रयत्न करून शंभर तासात ८५० कॉल स्वीकारत तब्बल ८,३४६ पूरग्रस्तांना सुखरुप बाहेर काढले. अहोरात्र चाललेल्या स्थलांतर प्रक्रियेमुळे अनेकांच्या पायाला जखमा झाल्या. पण आपले कर्तव्य बजावताना त्यांनी कोणतीही कसूर सोडली नाही. जवानांच्या या कामगिरीला स्वयंसेवी संस्था आणि कार्यकर्त्यांचीही चांगली साथ मिळाली. त्यामुळे शहरात एकही जीवतहानीची घटना घडली नाही.

जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पडणाऱ्या पावसाने शेवटच्या आठवड्यात दमदार हजेरी लावली. गुरुवारपासून (ता.१) तर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अवघ्या तीन दिवसांत पावसाने चांगलेच रौद्ररुप धारण केले आणि रविवारी (ता.४) रात्री जयंती नाला पाण्याखाली गेला. सुतारवाडा, व्हिनस कॉर्नर, शाहूपुरी कुंभार गल्ली अशा नेहमी येणाऱ्या पुराच्या पाण्यासह न्यू पॅलेस, रमणमळा, जाधववाडी, भालजी पेंढारकर कलादालनापर्यंतच्या भागाला पुराच्या पाण्याने वेढा दिला आणि मदतीसाठी नागरिक आर्त विनवणी करु लागले. शहराच्या मध्यवस्तीपर्यंत पुराचे पाणी शिरु लागल्यानंतर तर त्याची दाहकता अधिकच वाढत गेली. पावसाची मुसळधार बरसात सुरू असताना आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी नागरिकांना सुरक्षित बाहेर येण्याचे आवाहन करत होते. त्याचवेळी आपत्ती व्यवस्थापन पथकातील जवान मदतीसाठी धावून जात होते.

पाण्याची पातळी वाढत जाऊ लागली तसा कावळा नाका येथील मुख्य केंद्रातील फोन वारंवार खणखणू लागला. सर्वच बाजूंनी मदतीसाठी फोन येत असल्याने कर्मचाऱ्यांचीही चांगलीच तारांबळ उडाली. तर काही नागरिक थेट आयुक्तांनाच फोन करत होते. येणारे सर्व फोन मदत करणाऱ्या पथकांपर्यंत पोहोचले जात होते आणि पथक घटनास्थळी तातडीने दाखल होत होते. पथकातील कर्मचारी जीवाची बाजी लावून गळ्याऐवढ्या पाण्यात जावून नागरिकांना रेस्क्यू बोट, टायर ट्यूब, जेसीबी, डंपर आदी साहित्यांचा वापर करुन बाहेर काढत होते. सोमवारी पहाटे शाहूपुरी कुंभार गल्लीतून महमद लाटकर यांचा २० ते २५ नागरिक अडकल्याचा फोन खणाणला आणि काही मिनिटाच्या आत आपत्ती व्यवस्थापनच्या टीमने तेथे पोहोचून सर्वांना सुखरुप बाहेर काढले. अशीच स्थिती लक्षतीर्थ वसाहत येथील घाटगे मळ्यात घडली. सुहानी शिवाजी घाटगे यांनी रात्री १२ वाजता पथकाला ११ नागरिक अडकल्याची माहिती देत मदत करण्याची विनंती केली. त्याची माहिती दुधाळी परिसरात रेस्क्यू करत असलेल्या पथकाला दिली आणि या पथकाने ११ नागरिकांना सुखरुप ठिकाणी हलवले. अशा असंख्य मदतीचा फोनच्या माध्यमातून सर्वांची सुखरुप सुटका केली. चार दिवस १२५ कर्मचाऱ्यांनी अहोरात्र सेवा बजावत तब्बल ८,३४६ नागरिकांना सुखरुप बाहेर काढले. सलग ४८ तास पाण्यात उभे राहून ड्युटी केल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या पायांना जखमा झाल्या आहेत. पूर ओसरु लागल्यानंतर अनेक कुटुंबीय निवासस्थानी जात असताना जीव वाचवण्यासाठी मदत करणाऱ्या जवानांना मनापासून धन्यवाद देत आहेत.

...

चौकट

अन् मंदार मदतीला धावला

अग्निशमन दलात कार्यरत असलेल्या मंदार बाळासाहेब कांदळकरच्या वडिलांचे शुक्रवारी (ता.२) निधन झाले. कांदळकर कुटुंबीय दु:खात असताना शहरात पुराचे पाणी वेगाने शिरु लागले. त्यामध्ये बसंत-बहार रोडवरील मंदार यांचे घरही पुराच्या पाण्यात वेढले गेले. अन्य कुटुंबीय नातेवाईकांकडे गेले असताना तो मात्र सेवा बजावण्यास रुजू झाला. आपले दु:ख बाजूला सारत अनेकांचे जीव वाचवण्यास मदत केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारचा कारभार ‘जनरल डायर’सारखा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील पूरपरिस्थिती हाताळण्यात सरकार आणि प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले आहे. हे अपयश झाकण्यासाठी आणि सद्यस्थितीत निर्माण झालेल्या लोकांच्या संतापाला सामोरे जाण्याचे धारिष्ट्य नसल्यामुळे सरकारने बंदी आदेश लागू केला. यावरुन राज्य सरकारच्या बुद्धीची कीव करावी वाटते. बंदी आदेश लागू करणाऱ्या सरकारचा कारभार हा जालियनवाला बागेत हत्याकांड घडविणाऱ्या जनरल डायरच्या निर्णयासारखा आहे,'असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत केला.

प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह शहरातील विविध भागांना भेट देऊन पूरस्थितीचा आढावा घेतला. यानंतर सर्किट हाऊस येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी महापुराच्या आपत्तीला प्रशासन आणि सरकारचा ढिसाळ कारभार कारणीभूत असल्याची टीका केली. पाटील म्हणाले, 'महापुरामुळे साडेतीन लाख हेक्टर शेतीला फटका बसला असून ऊस व नगदी पिके बुडाली आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह पुरामुळे बाधित झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विनाअट सगळी कर्जमाफी द्यावी. उसाला प्रति एकर एक लाख रुपये आणि सोयाबीन, भात, भुईमुगसह अन्य पिकांना एकरी चाळीस हजार रुपयांची नुकसान भरपाई तत्काळ द्यावी.'

पाटील म्हणाले, 'महापुराचे राजकारण करण्याची इच्छा नाही. २००५ मधील महापुरापेक्षा आताची आपत्ती मोठी आहे. पण सरकारने पूरपरिस्थतीकडे वेळीच लक्षच दिले नाही. मदतकार्याला विलंब लावला. विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना कुठेही विश्वासात घेतले नाही. मुळात अतिवृष्टीचा अंदाज, पूरस्थिती या बाबी विचारात घेऊन ताबडतोब कार्यवाही करण्यात सरकार आणि प्रशासन कुचकामी ठरले. अलमट्टी धरणाचा विसर्ग हा जाहीर झाल्यापेक्षा कमी होत आहे. परिणामी लोकांना फार मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. सरकारने आता तत्काळ पूरग्रस्त भागाचा पंचनामा करुन पुनर्निमाणासाठी सहकार्य करावे. लहानमोठ्या व्यावसायिकांना अर्थसहाय करावे. शेतमजुरांना तत्काळ रोजगार उपलब्ध करुन द्यावा. त्यांना प्रत्येकी दहा किलो तांदूळ व गहू, तेलाचे वितरण करावे. पूरग्रस्तांना अन्नधान्याचे वाटप करावे. कुंभार समाजाला मोठा फटका बसला असून नुकसान भरपाई दिली पाहिजे. सध्या सरकारकडून पूरग्रस्तांना दिली जाणारी दहा व पंधरा हजार रुपयांची मदत तोकडी आहे. पुराच्या कालावधीत प्रशासकीय यंत्रणेची छाप कुठेच दिसली नाही.'

...

पालकमंत्र्यांना टोला

'संकटसमयी नागरिक वेगवेगळी गाऱ्हाणी घेऊन राज्यकर्त्यांना भेटत असताता. त्यांच्या तक्रारी शांतपणे ऐकून निर्णय घ्यायचा असतो. दमदाटी करुन गप्प बसवायचे नसते. कोल्हापूरची जनता ही स्वाभिमानी आहे. दमदाटी करुन नागरिकांचा आवाज दाबण्याचा प्रकार हा हुकूमशाहीसारखा असल्याचा टोला जयंत पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला.

.....

विद्या प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांसाठी ५० लाख

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पुराने बाधित विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी विद्या प्रतिष्ठानतर्फे ५० लाख रुपयांचे अर्थसहाय्य केले. दोन्ही जिल्ह्यासाठी प्रत्येक २५ लाख दिले असून कोल्हापूर जिल्ह्यासाठीचा २५ लाखाचा धनादेश पाटील यांनी आमदार हसन मुश्रीफ यांच्याकडे दिला.

.........

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images