Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

हजारो वाहने महामार्गावर थांबून

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

पुणे-बेंगलोर महामार्गावर पुराचे पाणी अद्याप सहा फूट असल्याने महामार्गावरील वाहतूक अजूनही थांबली आहे. वाहतूक सुरू झाल्याची अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विचारणा सुरू झाली, मात्र अद्याप महामार्गावरील पाणी पूर्णपणे ओसरल्याशिवाय वाहतूक सुरू केली जाणार नसल्याचे महामार्ग पोलिस, शिरोली आणि कागल पोलिस ठाण्याने माहिती दिली. वाहतूक सुरू करण्यापूर्वी पुलाची तपासणी करूनच वाहतूक सुरू केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

पावसाचा जोर कायम असल्याने चार ऑगस्टपासून किणीपासून ते कागलपर्यंत सुमारे सहा हजारांहून अधिक मालवाहू ट्रक, अवजड वाहने अडकली आहेत. रविवारी मध्यरात्रीपासून लागलेल्या रांगा अद्याप तशाच आहेत. गुरुवारी रात्री पाणी कमी झाल्याचे काही मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे या वाहनधारकांच्यात संभ्रम निर्माण झाला होता. मात्र पोलिस प्रशासनाने पुणे- बेंगलोर महामार्गावरील शिरोली, कागल ते कोगनोळी टोल नाका दरम्यान आरटीओ चेकपोस्ट, आयबीपी पेट्रोल पंपाजवळ पुराचे पाणी आले आहे. शिरोली येथे पुराचे पाणी आल्याने किणी पासून शिरोलीपर्यंत हायवेवरील पुलाच्या अलिकडे पासून कागलपर्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. यामध्ये दूध, धान्य आणि भाजीपाला वाहतूक करणाऱ्या वाहनांचा समावेश आहे. पंचगंगा नदीचे पाण्यात झपाट्याने वाढ होत असल्याने सांगली फाटा, पंचगंगा नदीवरील पुलावर पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. पाण्याचा जोर वाढल्याने पोलिसांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला बॅरिकेट्स लावून वाहतूक बंद केली.

महामार्गावरील वाहतूक बंद झाल्याने सातारा ते कागल यांदरम्यान रस्त्यावर असलेली सर्व वाहने जागा मिळेल तिथे थांबली. बहुतांश वाहने पेट्रोल पंप, हॉटेल्स आणि लॉजच्या परिसरात थांबवली आहेत. यात सुमारे पाच हजार ट्रकचा समावेश आहे. धान्य, भाजीपाला, सिमेंट, स्टील, इंधन यांसह काही दुधाचे टँकरही महामार्गावर थांबून आहेत. खासगी ट्रॅव्हल्सही अडकल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. काही प्रवाशांनी कणेरी मठात आश्रय घेतला, तर महामार्गावरील सर्वच लॉजमध्ये प्रवाशांची गर्दी आहे. दरम्यान या मार्गावर विविध संस्था, संघटनांनी मदतकार्य सुरू केले आहे. गेले चार दिवस त्यांचा मुक्काम परिसरातील महामार्गालगतच्या काही मंदिरांत आणि सभागृहात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आसऱ्याची माणसं सोडून कशी जाऊ ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'हेल्पलाईनचा फोन लागत नव्हता, पोलिसांचा १०० क्रमांकही लागत नव्हता. दोन दिवस पुरात काढले, दीडशे माणसं घरी होती. अखेर बोट आल्यावर एकेक माणूस बाहेर पडू लागला. 'ताई तुम्ही जा,' असा प्रत्येकजण आग्रह करत होते. पण आसऱ्याला आलेली माणसं सोडून घर कसं सोडायचे जीवावर आले होते. त्यामुळे शेवटचा माणूस घराबाहेर पडल्यानंतरच मी बाहेर पडले', असे सांगणाऱ्या प्रयाग चिखलीच्या चंद्रभागा सुरवसे यांच्या धैर्याला सलामच करायला हवा.

प्रयाग चिखलीत प्रवेश करताना शाहूवाला माळ या रस्त्यावर छोटी मोठी घरे आहेत. प्रत्येक पावसाळ्यात आंबेवाडी, चिखलीत पूर येतोच. पण यंदाचा पूर महाभयानक होता, असे चंद्रभागा सुरवसे सांगत होत्या. गुरुवारी त्यांना एनडीआरएफने पुरातून बाहेर काढल्यावर त्या जुना बुधवार पेठ तालमीच्या सभागृहात पुरग्रस्तांसह राहत आहेत. पुराचे वर्णन करताना त्या म्हणाल्या,' पाच ऑगस्टला श्रावणातील पहिल्या सोमवारचा उपवास सोडल्यानंतर जोरदार पाऊस सुरु झाला. पाऊस थांबायला तयार नव्हता, पाणी वाढत होते. मंगळवारी रात्री पाणी उंबऱ्याजवळ लागले. बुधवारी पहाटे शाहूवाला माळ येथील सर्व घरात पाणी घुसल्यानंतर नागरिक बाहेर पडले. मुलंबाळं ओरडू लागली. जनावारांची दावी सोडण्यात आली आणि सुरक्षितस्थळी नेण्यात आली. आमचे घर दुमजली असले तरी तळमजल्यावर पाणी आल्याने स्वयंपाकघर दुसऱ्या मजल्यावर नेण्यात आले. घर उंचावर असल्याने शाहूवाला माळ परिसरातील सर्व कुटुंबे आमच्या घरी आली.'

सुरवसे पुढे म्हणाल्या, ' पाणी वाढू लागले तसे तरुणांनी हेल्पलाइनच्या १०७७ ला फोन केले. पण हा फोन सतत एंगेज लागत होता. पोलिसांचा १०० क्रमांकही लागत नव्हता. गल्लीतील पोरांनी सोशल मिडियावर मेसेज टाकले, पण मदत पथकाची बोट काय आमच्या माळाकडे फिरकत नव्हती, त्यामुळे सर्व जण घाबरले होते. दोन दिवस लहान मुले, वृध्दांना भात, आमटी खायला घातली. निम्म्याहून अधिक महिलांना उपवास घडला. गुळाचा चहा सर्वांना प्यायला दिला जात होता. गल्लीतील दोन महिला गर्भवती असल्याने प्रत्येकाला काळजी वाटत होती. पाणी झपझप वर चढत होते. पण मदतीला कोणच येत नव्हते. अखेर बुधवारी दुपारी गल्लीतील रवी देवरकर, बक्सर मुल्ला हे रबरी ट्यूबच्या सहाय्याने मुख्य रस्त्यावर गेले. तेथे पुरात बुडलेल्या एका घरावर उभे राहिले. जाताना त्यांनी लाल रंगाचे कापड नेले होते. बोट आल्यावर दोघांनी ओरडण्यास सुरुवात केल्यावर नावेतील जवानांचे लक्ष गेले. त्यानंतर बोट आली. एनडीआरएफने सर्वप्रथम गर्भवती महिला, वृद्ध महिलांना सुरक्षितस्थळी नेले. बुधवारी रात्री मोहिम थांबवण्यात आली. रात्र जागून काढली. गुरुवारी सकाळी परत बोट आली. सर्वजण मला बोटीतून जा, असा आग्रह करत होते. पण जोपर्यंत सर्वजण घरातून बाहेर पडत नाहीत तो पर्यंत जाणार नाही असे सांगितले. अखेर गुरुवारी सकाळी शेवटच्या ट्रीपमधून बोटीतून मी कोल्हापुरात आले.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूरग्रस्तांसाठी ‘जुना बुधवार’ एकवटला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चिखली आणि आंबेवाडीतील पूरग्रस्तांना निवाऱ्यासाठी जुना बुधवार पेठेतील तालमी, मंडळे यांच्या सभागृहात व्यवस्थ करण्यात आली आहे. पूरग्रस्तांना कोणतीही उणीव भासू नये यासाठी परिसरातील कार्यकर्ते, महिला एकवटल्या आहेत.

एनडीआरएफ, लष्कर आणि नेव्हीने आंबेवाडी आणि चिखलीतील पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढले. शिवाजी पुलावरुन पूरग्रस्तांना थेट जुना बुधवार पेठ तोरस्कर चौकातील कल्याणी मंगल कार्यालयात आणले. कार्यालय भरल्यानंतर जुना बुधवार पेठ तालमीचा हॉल, शुक्रवार पेठेतील जैन मठात ठेवण्यात आले. काही नागरिकांची सोय बुऱ्हाणबाबा दर्गा परिसरातील माजी नगरसेवक अफजल पिरजादे यांनी करुन दिली. तसेच शनिवार पेठेतील मदरसामध्ये सोय करण्यात आली आहे.

ओल्या कपड्यानिशी आलेल्या महिला, लहान मुले, पुरुषांना परिसरातील नागरिकांनी कपडे दिले. त्यानंतर त्यांच्या भोजन व निवासाची सोय करण्यात आली. सध्या या परिसरात वीज आणि पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासत असल्याने इनव्हर्टर, जनरेटरची व्यवस्था करुन विजेची सोय करण्यात आली आहे. तसेच पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यात आले. खर्चासाठी प्लास्टिक बॅरेल भाड्याने आणली आहेत. परिसरातील नागरिकांनी घरातून जेवण दिले असून त्यानंतर सलग दोन दिवस चहा, नाष्टा, भोजनाची व्यवस्था करण्यात आली. नागरिकांकडून धान्य, तेल स्वीकारले जात आहे. परिसरातील गवंडी आणि कागदी मशिदीकडून शुक्रवारी दुपारी जेवणाची सोय करण्यात आली आहे. प्रत्येक ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्ते सकाळी सहा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत काम करत आहेत. भाजपचे संदीप देसाई, माजी उपमहापौर दिगंबर फराकटे, माजी नगरसेवक धनंजय सावंत, सुशील भांदिगिरे, नागेश घोरपडे, तालमीचे अध्यक्ष नंदकुमार पाटील, विद्या घोरपडे यांच्यासह कार्यकर्ते कार्यरत आहेत.

...

जुना बुधवार पेठेत २७ रुग्ण

महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसमधील डॉक्टरांचे पथक प्रत्येक ठिकाणी ठेवण्यात आले आहे. जुना बुधवार पेठेतील हॉलमध्ये २७ रुग्णांना औषधे देण्यात आले असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. ताप, सर्दी, खोकला, डिसेंटरी, उलट्यांचा त्रास होत आहे. लेप्टोपासून बचाव करण्यासाठी टॅबलेट देण्यात येत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात पिण्याच्या पाण्याची गंभीर स्थिती

$
0
0

महापुराचा फटका : संपूर्ण यंत्रणाच कोलमडली

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहराला महापुराने विळखा दिल्याने महापालिकेचा शहर पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. भर पावसात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. वॉटर एटीएम आणि खासगी टँकरभोवती नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. पिण्याचे पाणी देण्यासाठी महापालिकेच्यावतीने टँकरची व्यवस्था केली असली तरी मागणी जास्त असल्याने व्यवस्था तोकडी पडत आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीसह प्रशासन आणि नागरिक हतबल झाले आहेत.

मुसळधार पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणारी तीनही उपसा केंद्रे बंद पडली आहेत. महापालिकेच्या चार आणि खासगी २० अशा २४ टँकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र पाच दिवसांपासून पाणीपुरवठा बंद असल्याने घरातील शिल्लक पाणी संपू लागले आहे. शुक्रवारी पावसाची उघडझाप सुरू होती. मात्र पुराच्या पाण्याची पातळी 'जैसे थे' आहे. घरखर्चाच्या पाण्यासाठी नागरिक छतावरील पाण्याचा वापर करत आहेत. मात्र पिण्याच्या पाण्यासाठी अत्यंत हाल होऊ लागले आहेत.

कळंबा आणि कसबा बावडा फिल्टर हाउस येथून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्याची प्रचंड मागणी असल्याने दुपारी दोनपर्यंत दोन्ही फिल्टर हाउस येथून टँकरच्या ६० फेऱ्या झाल्या. याबरोबरच सामाजिक संस्था आणि पदाधिकारी स्वत:च्या वाहनातून नागरिकांना मोफत पाणी देत आहेत. खासगी टँकरसाठीही मोठी मागणी आहे. पाऊस पडत असल्याने घरखर्चासाठी टेरेस आणि छतावरुन पडणाऱ्या पाण्याचा वापर केला जात आहे. काहींनी पावसाचे पाणी उकळून पिण्याचा पर्याय वापरला आहे. महापूर ओसरल्यानंतरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालात निघणार आहे.

.. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूरस्थितीस राज्य सरकारच जबाबदार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कराड

'राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अलमट्टी धरणातून वेळीच पाणी सोडण्याची सूचना कर्नाटक सरकारला केली असती, तर मोठे नुकसान टळले असते. त्यामुळे पूरस्थितीला राज्य सरकारच जबाबदार असून, ही पूरस्थिती राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी. पूरग्रस्तांचे तातडीने पंचनामे करून त्यांना त्वरित मदत करावी,' अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केली.

अजित पवार यांनी कराड येथे पूरस्थितीची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी आमदार बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, देवराज पाटील, मानसिंगराव जगदाळे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत अजित पवार म्हणाले, 'कर्नाटकमधील कुमारस्वामींचे सरकार पाडण्यासाठी आमदारांना मुंबईमधे ठेवून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात आले. मात्र, पूरस्थिती टाळण्यासाठी कर्नाटकातील त्यांच्याच पक्षाचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना सूचना करून अलमट्टी धरणातून पाणी सोडण्याचे मुख्यमंत्री फडवणीस यांना का सुचले नाही? लोकांना पूरस्थितीतून बाहेर काढण्याची राजकीय इच्छाशक्ती सरकारने दाखवावी. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीबाबत राज्य सरकार गंभीर नाही. त्यांनी प्रशासनाला योग्यरितीने कामाला लावले पाहिजे. अलमट्टी धरणाच्या फुगवट्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. केंद्रात, महाराष्ट्र व कर्नाटकात त्यांचे सरकार असतानाही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना अलमट्टी धरणातून पाणी सोडण्याबाबतच्या सूचना वेळीच झाल्या नाहीत. पूरग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी 'एनडीआरएफ'ची टीम काम करत असली, तरी आणखी टीमची आवश्यकता आहे. वेळ पडल्यास सैन्य दलासही पाचारण करणे गरजेचे आहे.'

'अशा आणीबाणीच्या काळात प्रशासनाला आणखी गतीने कामाला लावण्याची जबाबदारी सरकारची आहे. पूरस्थितीमुळे पेट्रोल, डिझेल, दुध तसेच मुलभूत गरजांचा तुटवडा जाणवत आहे. पूर ओसरल्यानंतर दुर्गंधीमुळे आजार पसरण्याची जास्त शक्यता असते. त्यावर उपाययोजना म्हणून संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून, औषध कंपन्यांकडून उपचारासाठीची प्रभावी यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे. यासाठी आमची राष्ट्रवादी काँग्रेसची डॉक्टर सेलची टीम काम करत आहे. सरकारने सर्व पूरग्रस्त विभागांना बोटी व लाईफ जॅकेट दिली पाहिजेत,' अशी मागणी पवार यांनी केली. तसेच, 'कराड शहरावर पुन्हा पुराचे संकट येऊ नये यासाठी दैत्यनिवारणी मंदिरापासून नवीन पुलापर्यंत गॅबियान ऐवजी आरसीसी संरक्षक भिंतीचे काम व्हावे. कराड उत्तरमधील भैरवगड येथील टाळेवाडीला दरडीचा धोका असल्याने याची तज्ञांकडून पाहून करून त्यांचे पुनर्वसन अथवा सुरक्षेबाबत उपाययोजना राज्य सरकारने करावी,' असेही ते म्हणाले.

---

राष्ट्रवादीकडून ५० लाखांची मदत

महाराष्ट्रावर पुराचे आलेले नैसर्गिक संकट नसून राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळे आले आहे. तरी पूरग्रस्तांना मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ५० लाखांची आर्थिक मदत जाहीर केली असून, मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे याचा धनादेश दिला जाणार आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले.

.....................................................................................

जिल्हा प्रशासनाकडून मदतीचा हात

कराड : सांगली येथे पूरस्थिती बिकट असल्यामुळे सातारा जिल्हा प्रशासनाकडून सांगलीसाठी दहा बोटी देण्यात आलेल्या आहेत. तसेच, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आणखी पाच बोटी व एक 'एनडीआरएफ'ची टीमसुद्धा सांगलीला पाठविण्यात आलेली आहे. सातारा जिल्हा प्रशासनाकडून आणखी मदत देण्याचा प्रयत्न करू, अशी माहिती जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिली. 'एनडीआरएफ'ची टीम गुजरातहून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आली होती. त्यांचे वाहन बोरगाव पोलिस स्टेशन येथे बंद पडले. त्यांना एसटी बसची सुविधा उपलब्ध करून आपत्ती व्यवस्थापनासाठी जाणाऱ्या सर्व गाड्यांना जिल्हा प्रशासनाने व पोलिस विभागाने सातारा जिल्ह्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग निर्माण करून दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.

-----

मदतीचे आवाहन

सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यांतील पूरग्रस्तांना जिल्हा प्रशासनामार्फत दोन वेळचे जेवण, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व आरोग्य सेवेसाठी वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आहे. या पूरग्रस्तांना जिल्हावासीयांनी ब्लँकेट, धान्य, बिस्किटे यांसह जीवनावश्यक वस्तूंची मदत करावी. ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, पोलिस स्टेशनमध्ये मदत जमा करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केले आहे. तसेच, धनादेश देऊन मदत करावयाचे असल्यास मुख्यमंत्री सहाय्यता निधी (पूर) या नावाने धनादेश द्यावा. या मदतीसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्याशी ०२१६२-२३४८४० या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही सिंघल यांनी सांगितले.

----

तात्पुरत्या निवाऱ्याची सोय

सातारा : सातारा जिल्ह्यात ऑगस्टमध्ये झालेल्या वृष्टीमुळे पूरस्थिती, दरड कोसळणे, घरामध्ये पाणी शिरणे, घर पडणे इत्यादी कारणांमुळे जिल्ह्यातील सातारा, जावली, महाबळेश्वर व पाटण तालुक्यातील सात हजार पूरग्रस्त लोकांचे स्थलांतर करून त्यांची तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या काही अडचणी असतील, तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या ०२१६२-२३२३४९ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच, आरोग्याच्या काही समस्या असल्यास कराड येथील नागरिकांनी ०२१६४-२२२४५९, ९८२२२७४९१५, ९४२१२६६४५४ तसेच पाटण येथील नागरिकांनी ०२३७२-२८३२६८ किंवा ९८२२४६११८८, ७७४१०९०८३७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीकेची झोड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापुरातील पूरग्रस्त परिसराची पाहणी करण्यासाठी आलेले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पूरपर्यटन केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्यांच्यावर चौफेर टीका सुरू झाली आहे. पुराच्या पाण्यात बोटिंग करण्याची हौस भागवून घेणारे महाजन यांनी टीकेनंतर शुक्रवारी सांगलीत पाण्यात उतरून पूरग्रस्तांची भेट घेतली. मात्र, याही ठिकाणी त्यांना पूरग्रस्तांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

महापुराची पाहणी करण्यासाठी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात आले होते. त्यांच्यासोबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हेदेखील होते. पुणे-बेंगळुरू महामार्गावर पुराचे पाणी असल्याने मंत्र्यांना बोटीतून शहरात आणले. यादरम्यान मंत्री महाजन यांच्या सांगण्यावरून एका अधिकाऱ्यांनी व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओमध्ये मंत्री हसत बोटिंगचा आनंद घेत होते. पूरग्रस्तांच्या मदतीला आल्यानंतर बोटिंगचा आनंद घेणारा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने मंत्री महाजनांवर जोरदार टीका झाली. चूक लक्षात आल्यानंतर उपरती झालेल्या महाजनांनी शुक्रवारी सांगलीत जाऊन मदतकार्यात सहभाग घेतला. कार्यकर्त्यांसह ते स्वत: पाण्यात उतरून पूरग्रस्तांपर्यंत पोहोचले. मात्र, याही ठिकाणी त्यांना पूरग्रस्तांच्या रोषाला सामोरे जावे लागले. अखेर नागरिकांचा संताप पाहून त्यांना काढता पाय घ्यावा लागला.

मदत निकषावर संताप

मुख्यमंत्र्यांनी महापुराची पाहणी केल्यानंतर अन्न व पुरवठा विभागाने गुरुवारी मदतीचे निकष जाहीर केले. दोन दिवसांपेक्षा जास्त काळ पुरात अडकलेल्या नागरिकांनाच सरकारकडून अन्नधान्याची मदत मिळेल, असे या विभागाने परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी १० किलो तांदूळ आणि दहा किलो गहू मोफत देण्यात येणार असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे. पाच दिवस पूरस्थिती असूनही मदतीसाठी अजब निकष लावल्याने पूरग्रस्तांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

.. . ...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राधानगरी उपकेंद्र सुरू

$
0
0

कोल्हापूर

अतिवृष्टी झाल्याने भोगावती नदीला आलेल्या पुरात महावितरणच्या राधानगरी उपकेंद्राला येणाऱ्या ३३ वीज वाहिनीचे खांब वाहून गेले. त्यामुळे राधानगरी शहरासह परिसरातील काही गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. धरणातील विसर्ग कमी होताच वीज कर्मचाऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत नवीन चार खांब उभारुन बिद्रीवरुन वीजपुरवठा सुरू करण्यात आला. सोमवारी रात्री राधानगरी धरणाचे आपत्कालीन दरवाजे उघडल्यामुळे पात्रात पाणी पडताच ते जलविद्युत निर्मिती केंद्रात घुसले. तेंव्हा मोठा स्फोट झाला व वीज निर्मिती ठप्प झाली. या ठिकाणी असलेल्या महापारेषणच्या ११० केव्हीचे अतिउच्चदाब उपकेंद्रांमध्ये कंबरेपर्यंत पाणी आल्यामुळे उपकेंद्रातून निघणाऱ्या सर्व वाहिन्याही बंद पडल्या.

पूर नसलेल्या भागात चार खांब उभे करुन नवीन लिंक लाईन टाकली. गुरुवारी दिवसभर काम करुन सायंकाळी राधानगरी शहराच्या काही भागाचा व शिरोली, कुडित्री, पिराळ या तीन गावांचा पूर्णत: वीजपुरवठा सुरू केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टकडून ११ लाख लिटर पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टकडून कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी शंभर ट्रक पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या देण्यात येणार आहेत. एका ट्रकमध्ये दहा हजार यानुसार ११ लाख लिटर शुद्ध पाणी पूरग्रस्तांसाठी दिले जाणार आहे.

पूरग्रस्त भागात वीज पुरवठा बंद असल्याने पाणीपुरवठाही बंद झाला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून त्यासाठी अनेक समाजसेवी संस्था तसेच नागरिकांनी पाणी उपलब्ध करुन देण्यास सुरुवात केली आहे. ट्रस्टचे अध्यक्ष आमदार आदेश बांदेकर यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी शुद्ध पाण्याच्या बाटल्या देण्याचा निर्णय घेतला. पाण्याच्या बाटल्यांचे शंभर ट्रक पाठवण्यात येणार आहेत. एका ट्रकमध्ये दहा हजार बाटल्या यानुसार ११ लाख लिटर शुद्ध पाणी देण्यात येणार आहे. त्यांच्या वितरणाची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात येणार आहे. हायवेवरील पाणी कमी झाल्यानंतर हे ट्रक पूरग्रस्त भागात दाखल होतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नुकसानीबाबत सकारात्मक निर्णय घेणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'सरकार पूरग्रस्तांच्या पाठीशी ठाम उभे असून आवश्यक ती मदत दिली जाईल. नुकसानीबाबत निश्चितपणे सकारात्मक निर्णय घेतला जाईल', असा दिलासा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी शुक्रवारी दिला.

परिवहन मंत्री रावते यांनी येथील कै. दिलीपराव माने सांस्कृतिक हॉल, भारती विद्यापीठ इंग्लिश मिडीयम स्कूल, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यामंदिर शाळा क्रमांक आणि बापट कॅम्प येथील पूरग्रस्तांच्या शिबिराला भेट देवून त्यांची चौकशी केली.

यावेळी कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे-पाटील, नगरसेविका कविता माने, सुनील मोदी, विजय देवणे, अनिल आवळे, पुरषोत्तम जाधव उपस्थित होते. परिवहन मंत्री रावते म्हणाले, 'आणखी मदत महामार्गावरील पाणी ओसरताच दिली जाणार आहे. घरांची नुकसान भरपाई म्हणून सरकारने प्रत्येकी १५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. मदतीसाठी निश्चितच सकारात्मक निर्णय घेतला जाईल. शिबिरामध्ये सर्व सुविधा पुरवण्यात येत आहेत. पूर ओसरल्यानंतर पुनर्वसनाबाबत योग्य निर्णय घेतला जाईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेलिकॉप्टरव्दारे फूड पॅकेट पोहचवणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'शिरोळ, खिद्रापूर भागातील १४ पूरबाधीत गावांत आज, शनिवारपासून दोन हेलिकॉप्टरव्दारे फुड पॅकेट पोहचवले जाईल. स्वयंसेवी संस्था, संघटनांच्या मदतीने प्रत्येक पूरग्रस्तापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केले जाईल. शहरात गॅस आणि सिलिंडरची टंचाई भासत आहे. राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्याने शिरोलीजवळ गॅसचे १३ टँकर थांबून आहेत. ट्रँकरमधील गॅस सिलिंडर बोटीव्दारे शहरात आणले जाईल', अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, 'पावसाचे प्रमाण कमी असले तरी पूर संथगतीने ओसरत आहे. यामुळे धोकादायक सर्व पूरग्रस्तांना एनडीआरएफ, लष्करी, राज्य आपत्ती प्रतिसाद पथकाकडून सुरक्षितस्थळी हलवले जात आहे. करवीर तालुक्यातील चिखली, आंबेवाडीतील ९९ टक्के पूरग्रस्तांना बाहेर काढले आहे. सुरक्षित ठिकाणचे पूरग्रस्त आपली जनावरे असल्याने ते येण्यास तयार नाहीत. त्यांना एनडीआरएफच्या दोन बोटीव्दारे जीवनावश्यक वस्तू, जेवण पोहच केले जाईल. शहरात सिलिंडरची टंचाई भासू नये, यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे. बोटीव्दारे शहरात आणलेले सिलिंडर पहिल्यांदा पूरग्रस्तांच्या अन्नछत्राना दिले जाईल. शिल्लक सिलिंडर एजन्सीना दिले जाईल. एजन्सी बुकींगनुसार वाटप करतील. पेट्रोल, डिझेल भरून महामार्गावर टँकर थांबले आहेत. महामार्ग सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा त्या टँकरना शहरात सोडले जाईल.'

स्थलांतरित कुटुंबांपर्यंत साहित्य आणि आर्थिक मदतीच्या नियोजनासाठी राज्यातून अतिरिक्त उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांची कुमक येत आहे. शहरातील पूरग्रस्तांना प्रत्येक कुटुंबास १५ हजार आणि ग्रामीण भागातील कुटुंबांना १० हजार रूपये देण्यात येईल. यासाठी सरकारने २५ कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग केला आहे. त्याचे वितरण तातडीने केले जाईल. शहरात ३२ ठिकाणी पूरग्रस्त आहेत. त्यांना प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थेतर्फे आवश्यक ती सर्व मदत केली जात आहे.

...

कर्नाटकातील १००

जणांना वाचवले

नृसिंहवाडी, खिद्रापूरजवळ कर्नाटकातील शंभरजण पुरात अडकून राहिले होते. त्यांना वाचवण्यासाठी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडून विनंती करण्यात आली. त्यानुसार एनडीआरएफच्या दोन पथकांव्दारे त्यांना सुरक्षितस्थळी पोहचवण्यात आल्याचे जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी १५४ कोटींचा मदतनिधी मंजूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारने १५४ कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला असून कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे २५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. या निधीतून ग्रामीण भागातील आपत्तीग्रस्त नागरिकांना प्रतिकुटुंब १० हजार तर शहरी भागातील प्रतिकुटुंब १५ हजार रुपये मदत देण्यात येणार आहे. मदतीचे तातडीने वाटप करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

कोल्हापूरमधील पूरपरिस्थिती सामान्य करण्याचे काम वेगाने सुरु केले असून शिरोळ तालुक्यातील मदतीसाठी पथके पाठवण्यात आली आहेत. नागरिकांच्या मदतीसाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून सर्व मार्गाने प्रयत्न करत असून नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह हे राज्य सरकारच्या संपर्कात असून केंद्रांकडून लागेल ती मदत करण्याची सूचना दिल्या आहेत. बचाव पथकाने आजपर्यंत दोन लाख ५२ हजार ८१३ जणांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील तब्बल दोन लाख ५३ हजार नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. १६० बोटी कार्यरत आहेत. राज्यातील एनडीआरएफच्या ३१ टीमपैकी १६ टीम सांगलीत तर ६ टीम कोल्हापुरात कार्यरत आहेत, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.

....

कोयनेतून ७०० टीएमसी पाण्याचा विसर्ग

मंत्री पाटील म्हणाले,' या भागात मोठा महापूर २००५ साली आला होता. त्यावेळीही मोठा पाऊस झाला होता. त्यावेळी तब्बल २१७ टक्के जादा पाऊस झाल्याने महापूर ओढवला होता. आताही गेल्या चार दिवसात ७५८ टक्के पाऊस पडला आहे. हा चारपट जादा पाऊस झाला आहे. त्यामुळे सात दिवसात कोयना धरणातून तब्बल ७०० टीएमसी पाण्याचा विसर्ग झाला आहे. पावसाचे हे प्रमाण पाहता आता पाऊस थांबण्याची आवश्यकता आहे. तरच परिस्थिती आटोक्यात येईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अडीच लाख पूरग्रस्तांची सुटका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापुराच्या वेढ्यात अडकलेल्या पूरग्रस्तांसाठी मदत आणि बचावकार्य मोहिमेला गती मिळाल्याने जिल्ह्यातील २ लाख ५२ हजार ८१३ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली. बचावकार्यात लष्कर, एनडीआरएफ, एसडीआरएफ, नौदल, आपत्ती व्यवस्थापन यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि सेवाभावी संस्थांच्या कार्यकर्त्यांची पथकेही आहेत. जिल्ह्यातील ५० हजारांवर जनावरे वाचवली आहेत. शहराला बेटाचे स्वरुप आल्याने दूध, भाजीपाला, पेट्रोलसह जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा जाणवू लागला आहे.

कर्नाटकच्या अलमट्टी धरणातून गुरुवारच्या तुलनेत विसर्ग वाढवण्यात आला आहे. ३,८८००० वरून तो ४,३०,५३२ करण्यात आला आहे. त्यामुळे सांगली आणि शिरोळला काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सांगलीतील पूरस्थिती गंभीर बनल्याने हेलिकॉप्टर, बोटीच्या मदतीने अनेक पथके बचावकार्य करत आहेत.

गुरुवारी दुपारी आंबेवाडीतील सर्व ग्रामस्थांना बाहेर काढल्यानंतर शुक्रवारी दुपारपर्यंत चिखलीतील नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. आंबेवाडी आणि चिखलीतील पूरग्रस्तांना बाहेर काढल्यानंतर येथील रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सहभागी झालेली पथके शिरोळ, हातकणंगले आणि सांगलीकडे हलवण्यात आली. शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक हॉल, विविध संस्थांच्या कार्यालयांमध्ये पूरबाधितांची व्यवस्था केली आहे. त्यांच्या मदतीसाठी हजारो हात पुढे येत आहेत.

शुक्रवारपासून उघडझाप सुरू असल्याने पुराच्या पाणीपातळीत घट होऊ लागली आहे. सकाळी सात वाजता राजाराम बंधाऱ्यावर ५२.११ फूट पाणी होते. सायंकाळी ही पातळी ५२.४ पर्यंत कमी झाली होती. त्यामुळे शहरात आलेले पाणी दोन ते अडीच फुटांनी कमी झाले. लक्ष्मीपुरी कोंडा ओळ ते उमा टॉकिज आणि सिद्धार्थ नगर कमान ते सीपीआर चौकापर्यंतचा रस्ताही खुला झाला. मात्र राष्ट्रीय महामार्गावर अद्याप चार फूट पाणी असल्याने शहरात येणारे गॅस, पेट्रोल, डिझेल, भाजीपाला, दूध आदी जीवनावश्यक वस्तूंचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. भाजीपाल्याचे दर गगनाला भिडू लागले आहेत. इंधन तुटवड्यामुळे जीवनजीवन विस्कळित झाले आहे.

पुन्हा अतिवृष्टीचा इशारा

हवामान खात्याने पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिल्याने आणि महापुराचा विळखा जराही कमी होत नसल्याने लाखो नागरिक अद्यापही भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुन्हा मुसळधार सुरू झाली आहे. त्यामुळे शहरातील पाणी वाढण्याचा धोका आहे. शहरातील मध्यवस्तीपर्यंत आलेले पाणी शुक्रवारी किंचित कमी झाले आहे. अनेक अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी कायम आहे.

.. .. ..

पॉइंटर

जिल्ह्यातील २३९ गावे पूरबाधीत

हेलिकॉप्टरद्वारे फूड पॅकेट्स पुरवणार

महामार्गावरील वाहतूक अद्याप ठप्पच

गॅस सिलिंडर बोटीतून आणणार

चिखली, आंबेवाडीसाठी दोन बोटी

सोमवारपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद

बुधवारी डिप्लोमा इंजिनीरिंग कॅप राउंड थ्री

परीक्षा लांबणीवर

पूरस्थिती परिस्थितीमुळे एमपीएससीची (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) परीक्षा दोन आठवड्यांनी पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच पशुवैद्यकीय अधिकारी परीक्षाही लांबणीवर टाकण्यात आली आहे.

...........

धरणातील विसर्ग

धरण विसर्ग

अलमट्टी ४,३०,५३२

कोयना ७७,३८७

वारणा १५,०००

दूधगंगा २०,०००

राधानगरी २८५६

.. .. . ..

रेस्क्यू ऑपरेशन पथके

२२

एनडीआरएफ

२६

नौदल

लष्कर

एसडीआरएफ

०० ० ०० ०० ०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिण्याच्या पाण्यासाठी धावाधाव

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शहरभर पाणी मात्र पिण्याच्या पाण्यासाठी धावाधाव अशी स्थिती कोल्हापुरात उद्भवली आहे. महापुरामुळे, महापालिकेचा पाणी पुरवठा गेल्या पाच दिवसापासून बंद आहे. यामुळे शहरांतर्गत पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. नागरिकांनी पावसाचे पाणी साठविण्यास सुरुवात केली आहे. साठविलेले पाणी उकळून तहान भागवित आहेत. दरम्यान शिवाजी विद्यापीठ, विविध संस्था, संघटना नागरिकांच्या मदतीसाठी धाव घेतली आहे. वीस लिटरचे जार, पाण्याच्या बाटल्या वितरित करत आहेत.

पालिकेचा पाणी पुरवठा बंद झाल्यामुळे नागरिकांनी पाणी बचतीचे फंडे शोधले. पावसाच्या पाण्याची साठवणूक व त्याचा पिण्यासाठी वापर सुरू केला. साठवलेले पाणी उकळून पिण्यासाठी व स्वयंपाकीसाठी वापरले जात आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची धावपळ घरोघरी पाहावयास मिळत आहे. दरम्यान पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याचे लक्षात येताच काही वॉटर एटीएम सेंटरने अव्वाच्या सव्वा दराने पाणी विक्री सुरू केली. एरव्ही दहा रुपयेला वीस लिटर पाणी मिळायचे. महापुराच्या कालावधीत काही विक्रेत्यांनी दुप्पट दराने पाण्याची विक्री केली. अन्य ठिकाणाहून वाहतूक करुन प्रक्रिया केलेले पाणी नागरिकांच्या दारापर्यंत पोहचविण्याची कामगिरी काही विक्रेत्यांनी पार पाडली.

दरम्यान शहरातील विविध संस्था, सामाजिक संघटनांनी लोकांची गरज ओळखून आपल्याकडील पाणीसाठा खुला केला. शिवाजी विद्यापीठाने, गुरुवारपासून नागरिकांना मोफत पिण्याचे पाणी उपलब्ध करुन दिले. नागरिकांनी येताना कॅन घेऊन यावे असे आवाहन प्रशासनाला विद्यापीठ प्रशासनाने केले. विद्यापीठ परिसरातील नागरिकांची यामुळे सोय झाली. राधानगरी रोड आपटेनगर येथील भिवसे कार वॉश अँड पॉलिशतर्फे पिण्यासाठी मोफत पाणी उपलब्ध करुन दिले.

मार्केट यार्ड येथेही समाजातील विविध घटकांनी एकत्र येऊन पूरग्रस्तांच्या निवासाची, भोजनाची सोय केली आहे. तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध केल्याचे जितू शहा यांनी सांगितले. युवासेनेतर्फे ५०० पिण्याचे बॉक्स नागरिकांना वितरित केले. आंबेवाडी, सीपीआर, विठ्ठल मंदिर उत्तरेश्वर पेठ, वाघाची तालीम येथे पिण्याच्या पाण्याचे बॉक्स वितरीत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहूपुरीतील विद्यालयात १५० पूरग्रस्त

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शाहपुरी कुंभार गल्लीसह दुसरी आणि तिसरी गल्ली तसेच सुतारवाडा परिसरात पुराच्या पाण्यात अडकलेल्यांना शाहूपुरी पहिल्या गल्लीतील तात्यासाहेब मोहिते विद्यालयात (अंबाबाई विद्यालय) १५० जण आश्रय घेत आहेत. लहान मुले, वयस्कर मंडळी, एकत्र कुटुंब असलेल्या मंडळींना येथे आणले आहे. गेले पाच दिवस त्यांचा या केंद्रात मुक्काम आहे.

व्हीनस कॉर्नर, शाहूपुरी पहिल्या गल्लीपासून ते सहाव्या गल्लीपर्यंत पाणी पसरले आहे. कुंभार गल्लीचा परिसर पाण्याखाली गेला आहे. सुतारवाडा परिसरातील ४० कुटुंबातील ५० हून अधिक या ठिकाणी आहेत. दरवर्षी पूर येण्याची भीती असलेल्या कुंभार गल्ली, पहिल्या गल्लीसह लक्ष्मीपुरीतील नाल्याचा काही येथे येतो. या भागातील ८० हून अधिक कुटुंबे संसारोपयोगी साहित्य घेऊन याठिकाणी आश्रयाला आले आहे. विद्यालयाच्या पहिल्या तळमजल्यावरील चार खोल्या, पहिल्या मजल्यावरील चार खोल्या आणि समोरील काही भागात पूरग्रस्तांची व्यवस्था केली आहे. एका खोलीत दहा ते बारा लोकांना ठेवले आहे. ५ ऑगस्ट रोजी अंबाबाई विद्यालयात ३५ पूरग्रस्त होते. नंतर दिवसेंदिवस ही संख्या वाढत गेली. गुरुवारी सकाळी येथील एक दहा वर्षांचा मुलगा आजारी पडल्याने कुटुंबाची धावपळ उडाली. महापालिकेच्या वैद्यकीय यंत्रणेने तत्काळ दखल घेऊन त्या मुलावर उपचार केले. दरम्यान या विद्यालयात दोनवेळा विद्युत पुरवठा खंडित झाला. त्याची नोंद घेत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीजपुरवठा कायम ठेवला. शाहूपुरी परिसरातील काही सामाजिक संस्था, संघटनांनी या ठिकाणी मदतकार्य सुरु केले आहे.

शाहुपूरी सहाव्या गल्लीत पाणी आल्याने आम्ही तात्यासाहेब मोहिते विद्यालयात आश्रय घेतला आहे. या ठिकाणी सामाजिक संस्था, स्थानिक तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून मोलाची मदत मिळत आहे. माणुसकीचे दर्शन या ठिकाणी घडत आहे.

- मदन शेलार, पूरग्रस्त

अन्नाची नासाडी नको

येथे नागरिकांना भोजनाची सोय होण्यासाठी समर्थ ग्रुपने रजिस्टर तयार केले आहे. ग्रुपतर्फे त्यांना दररोज नाष्टा आणि भोजन दिले जाते. त्यासह दानशूरांकडून दिली जाणाऱ्या मदत स्वीकारली जाते. अन्न्नाची नासाडी होऊ नये, यासाठी नियोजन केले आहे' असे अमर समर्थ यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूरग्रस्तांसाठी जेवणाची सोय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पुराने साऱ्या कोल्हापूर जिल्ह्याला विळखा घातला आहे. पुरात अडकलेल्या हजारो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी एनडीआरफ, आर्मी पथकासह स्थानिक तरूण, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी मदतकार्य करत आहेत. ज्या पूरग्रस्तांना घरातून बाहेर काढून सुरक्षितस्थळी आणले आहे तेथे त्यांच्यासाठी जेवण, पाणी, ब्लँकेट, कपडे यांची मदत करण्यासाठी कोल्हापूरकांनीही पुढाकार घेतला आहे. मंगल कार्यालये, शाळांचे हॉल पूरग्रस्तांच्या निवाऱ्यासाठी खुले करण्यात आले आहेत. महिला बचत गट, हॉटेल मालक संघटनांनी स्थलांतरीत पूरग्रस्तांना जेवण व्यवस्था केली आहे. जे अजूनही पुरात अडकले आहेत त्यांच्यापर्यंत फूडपॅकेट पोहोचवली जात आहेत. अंगावरच्या कपड्यानिशी आलेल्या पूरग्रस्तांना कपडे, ब्लँकेट देण्यासाठी नागरीकांनी मदतीचा हात दिला आहे. महिलांसाठी सॅनिटरी पॅडची मदत बचत गटाच्या महिलांनी केली आहे.

...

पूरग्रस्तांसाठी जेवणाची सोय

आंबेवाडी व चिखली परिसरातील पूरग्रस्तांना जुना बुधवारपेठ, कल्याण हॉल, खोलखंडोबा, शनिवारपेठेतील मदरसा, जैन मठ याठिकाणी ठेवले आहे. येथे त्यांना तातडीने जेवण व पाण्याची सोय केली जात आहे. राजारामपुरी व ताराबाई पार्क येथील कबाबिया हॉटेल, उचगाव येथील हॉटेल सातबारा यांच्यावतीने पूरग्रस्तांच्या स्थलांतरीत जागेवर मोफत जेवण पोहोच केले जात आहे. स्वयंसिद्धा संस्थेच्यावतीने चपाती भाजीचे पॅकेट पूरग्रस्तांना पोहोचवले जात आहेत. मावळा ग्रुप व रॉबीनहूड आर्मीतर्फे स्थलांतरीत पूरग्रस्त व अद्यापही घरांमध्ये अडकलेल्या पूरग्रस्तांना फूड पॅकेट पोहोचवले जात आहेत.

...

फूड पॅकेट व जेवण

हॉटेल कबाबिया ९८२३३७५६६६

हॉटेल रजत ९८९०२४३४३३

हॉटेल सातबारा ८३०८७१२७१२

स्वयंसिद्धा ०२३१२५२५१२९

अरूण नरके फाउंडेशन ०२३१२६२७५७९

...

पूरग्रस्तांसाठी राहण्याची व्यवस्था

जिल्हा न्यायालय, कसबा बावडा

श्री कृष्ण सरस्वती मंगल कार्यालय, जरग नगर

चौंडेश्वरी मंगल कार्यालय, मंगळवार पेठ

दैवज्ञ बोर्डिंग, मिरजकर तिकटी

रूईकर कॉलनी हॉल

पूरग्रस्तांना राहण्यासाठी येथे संपर्क करा

ब्राम्हणसभा करवीर, मंगलधाम

शाहू विद्यालय न्यू पॅलेस

शाहू दयानंद हायस्कूल

प्रतिभानगर हॉल

सॅनिटरी पॅडच्या मदतीसाठी वृषालीने दिली हाक

पूरग्रस्तांमध्ये महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे. सध्या जेवण, पाणी, कपडे, ब्लँकेट यांच्या मदतीसाठी आवाहन केले जात असताना महिलांसाठी नितांत गरजेच्या असलेल्या सॅनिटरी पॅडच्या मदतीसाठी जवाहरनगर येथील वृषाली खैरमोडे या युवतीने खास आवाहन मोहिम सुरू केली आहे. सोशलमीडियावर वृषालीने महिलांसाठी सॅनिटरी पॅड संकलित करून ते पूरगस्त महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तसेच साडी, ब्लाऊज, परकर, अंतवस्त्रांचीही या काळात महिलांना गरज असल्याने वृषालीने तिच्या फेसबुक ग्रुपवर या मदतीसाठी आवाहन केले आहे. ज्यांना मदत करायची असेल त्यांनी वृषाली यांना ९१६८९२४०२२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

पूरग्रस्त मदत टोल फ्री नंबर : १०७७

कोल्हापूर जिल्हा स्तर नियंत्रण कक्ष ०२३१ २६५९२३२, ०२३१ २६५२९५०

पोलीस नियंत्रण कक्ष - ०२३१ २६६६२३३ - १००

वाहतूक शाखा नियंत्रण कक्ष - ०२३१-२६४१३४४

पाटबंधारे नियंत्रण कक्ष - ०२३१ २६५४७३५/३६

महानगरपालिका कक्ष - टोल फ्री क्रमांक १०१

महावितरण :- ७८७५७६९१०३

रुग्णवाहिका ९७६४४ ९५९९९, ७०३०९ ३४४०१, २६५३२८८ / ८९ / ९०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


LIVE: सलग सहाव्या दिवशी सांगली, कोल्हापुरात पुराचे थैमान

$
0
0

कोल्हापूर/सांगली/पुणे: पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पाचव्या दिवशीही महापुराचा धोका कायम आहे. एनडीआरएफ, लष्कर आणि नौदलाच्या पथकातर्फे पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येत आहे. आवश्यक त्या ठिकाणी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पूरगस्तांना काढण्याची कार्यवाही सुरू आहे.

जाणून घ्या LIVE अपडेट्स:

>>वाचा: पूरग्रस्तांच्या मदतीसाठी १५४ कोटींचा मदतनिधी मंजूर

>>कोल्हापूर : पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पाणीपातळी ५२ फूट २ इंचावर

>> सांगलीतील पूरग्रस्तांसाठी अन्नाची पाकिटे...


>> कोल्हापूर : शिरोळ, खिद्रापूर भागातील १४ पूरबाधीत गावांत दोन हेलिकॉप्टरव्दारे फुड पॅकेट पोहचवणार

>> वाचा: पूरग्रस्तांकडून ‘सिद्धिविनायक’कडून पिण्याचे पाणी

>> कोल्हापूर : शिरोळमधील आलास गावात पुरात अडकले नागरिक; मदत कार्याची गरज

>> लष्कराच्या मदतीनं बचाव कार्यांना वेग

>> कोल्हापूर: महापुरामुळे, महापालिकेचा पाणी पुरवठा गेल्या पाच दिवसापासून बंद

>> पुणेः पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शासकीय अधिकाऱ्यांच्या १०, ११, १२ ऑगस्टच्या सुट्ट्या रद्द

>> सलग सहाव्या दिवशी सांगली, कोल्हापुरात पूरपरिस्थिती कायम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापूर: अन्नधान्याच्या पॅकेटवर मुख्यमंत्र्यांचे फोटो; भाजपवर टीकेची झोड

$
0
0

कोल्हापूर: कोल्हापूर, सांगलीतील महापुरामुळं अवघा महाराष्ट्र हळहळत असताना भाजपचे काही नेते या संकटातही राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न करत आहेत. पूरग्रस्तांना वाटण्यात येणाऱ्या अन्नधान्यांच्या पॅकेट्सवर मुख्यमंत्र्यांचे फोटो लावून पक्षाची जाहिरात केली जात आहे. भाजप नेत्यांच्या या असंवेदनशीलतेवर टीकेची झोड उठली आहे.

सांगली, कोल्हापूर येथील पुरामुळं हजारो संसार पाण्यात गेले आहेत. अनेकांना जीव गमावावा लागला आहे. तर, हजारो लोक अजूनही पुराच्या पाण्यात अडकून पडले आहेत. एनडीआरएफ, नौदल, सरकारी व सामाजिक संस्था, संघटना आपापल्या परीनं संकटात अडकलेल्यांना मदत करत आहेत. पूरग्रस्तांचे हाल पाहून मदत करणारेही हेलावले आहेत. असं असताना सत्ताधारी भाजपचे काही नेते राजकीय लाभासाठी धडपडत आहेत. पूरग्रस्तांना सध्या सरकारकडून १० किलो तांदूळ व १० किलो गहू दिले जात आहेत. या गहू व तांदळाच्या पॅकेटवर स्थानिक भाजप नेते व मुख्यमंत्र्यांची छायाचित्रे दिसत आहेत. त्यावरून संताप व्यक्त होत आहे.

'भाजपच्या नेत्यांना परिस्थितीचे काही गांभीर्य आहे की नाही, असा सवाल केला जात आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी हा प्रकार तात्काळ रोखायला हवा,' अशी मागणीही पूरग्रस्तांनी केली आहे.

संबंधित बातम्या:

पूरग्रस्तांना रोखीनं मदत नाही; सरकारचा नवा GR

'महाराष्ट्रातील जनतेचं मरण तरी गांभीर्याने घ्या'

'गणेशोत्सवातील सजावट टाळा, पूरग्रस्तांना मदत द्या'

दोन दिवस पुराच्या पाण्यात असाल तरच मोफत अन्नधान्य; सरकारचा जीआर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निम्मं सांगली अजूनही पाण्यात, जनजीवन विस्कळीत

$
0
0


सांगली:
अभूतपूर्व पूरपरिस्थितीमुळे सांगलीचे जनजीवन विस्कळित झाले आहे. निम्मी सांगली अजूनही पाण्यात आहे. भाजीपाल्याचे दर कडाडले असून पाणीपुरवठा पूर्णत: बंद असल्याने नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. रोख रकमेअभावीही नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महापुरानंतर पाच दिवसानंतर पहिल्यांदाच हरिपूर भागातील काही नागरिकांची सुटका करण्यात आली आहे.

अजुनही हजारो नागरिक पुरात अडकलेले आहेत. गावभागातही शेकडो नागरिक पाण्याखाली आहेत. त्यांच्यापर्यंत अन्नपदार्थ व पाणी पोहोचवण्यात येत आहे. दुसरीकडे पूरग्रस्त सांगलीकरांसाठी मदतीचा ओघ सुरू झाला आहे. शहरातील नागरिक उत्स्फूर्तपणे मदत करत आहेत. आजुबाजूच्या दुष्काळग्रस्त भागातूनही शक्य ती मदत सांगलीकरांसाठी पाठवली जात आहे. पाण्याच्या बाटल्या, कोरडे खाद्यपदार्थ, चहा, दूधाचे मोफत वाटप केले जात आहे. रिसाला रोड, हिराबाग कॉर्नर परिसरात मदतकार्यासाठी केंद्र उभारण्यात आले आहे.

पाच दिवस पाण्यात अडकलेले वृद्ध, गरोदर महिला व रूग्णांना बाहेर काढण्यास प्राधान्य दिले जात आहे. लष्करी जवान, पोलीस प्रसंगी खांद्यावरून, खुर्चीतून किंवा झोळीतून रूग्ण, ज्येष्ठ नागरिक, बालकांना सुखरूप बाहेर काढत आहेत. दरम्यान, वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालयातर्फे ३८ वैद्यकीय कॅम्प सुरू करण्यात आले आहेत.

बाजारपेठच पाण्यात
सांगलीतील रिसाला रोड,हिराबाग कॉर्नर, सराफ कट्टा अजूनही पाण्याखाली आहे. त्यामुळे गेले पाच दिवस पश्चिम सांगलीतील बाजारपेठ ठप्प आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गहू, तांदळाचं करणार काय? पूरग्रस्त संभ्रमात

$
0
0

कोल्हापूर: गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीमुळं सांगली, सातारा आणि कोल्हापुरात महापुराचं संकट कोसळलं. संसार उघड्यावर आले, घरे उद्ध्वस्त झाली. आभाळ फाटलं असलं तरी, तेच आता काहींचे छप्पर बनलेय. वीज पुरवठा खंडित झालाय. अशात राज्य सरकारकडून गहू, तांदळासकट अन्नधान्याची पाकिटं पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवली जाताहेत. पण संसारच उघड्यावर आहेत. त्यामुळं नुसती पाकिटं घेऊन काय करणार? गहू-तांदळाचं करणार काय? अशा अनेक प्रश्नांनी पूरग्रस्तही चक्रावून गेले आहेत. तर राज्यातील जनताही या मदतीवर अनेक प्रश्न उपस्थित करत आहे.

कोल्हापूर, सांगली, सातारामधील अनेक गावे, वाड्या-वस्त्या पुराच्या पाण्याखाली गेल्यात. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळं संपर्क तुटलाय. दळणवळणाची सोय नाही. घरांमध्ये पाणी शिरल्यानं प्रचंड नुकसान झालंय. वीज पुरवठा खंडित झालाय. घरे वाहून गेली. अनेकांचे जीव गेले. संसार उघड्यावर पडले. घरातील अन्नधान्याचं नुकसान झालंय. काही जणांनी तर फाटलेल्या आभाळाखालीच रात्र-रात्र जागून काढलीय. राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री, मंत्र्यांनी दौरे काढले. पूरस्थितीचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी लागलीच मदत जाहीर केली. मुख्यमंत्री, आमदारांचे फोटो असलेली अन्नधान्याची पाकिटे पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवण्यात येत आहेत. अन्नधान्याच्या पाकिटांत मिळालेले गहू-तांदूळ घेऊन करणार काय? घरांमध्ये काहीच शिल्लक राहिलं नाही, मग या सगळ्याचं करणार काय? ते कुठं शिजवणार? दिलेले गहू दळणार कुठे? असे अनेक प्रश्न पूरग्रस्तांसमोर आहेत.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूरस्थितीत राजकारण नको, उणिवा दाखवा: मुख्यमंत्री

$
0
0

सांगली: पूरस्थितीत कुणीही राजकारण करू नये. सर्वांनी एकत्र येऊन लोकांना मदत करायला हवी, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना केलं. सांगलीतील पूरस्थिती, मदत आणि बचावकार्याचा आढावा घेतल्यानंतर आज सांगलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पूरग्रस्तांना जाहीर झालेल्या आर्थिक मदतीतही वाढ करून सरकारनं पूरग्रस्तांना दिलासा दिला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज सांगलीतील पूर परिस्थितीचा आढावा घेतला. तसंच पूरग्रस्तांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी मदत आणि बचावकार्याचाही आढावा घेतला. यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. पूरग्रस्तांना सरकारने दिलेल्या मदतीवरून विरोधकांनी केलेल्या टीकेलाही मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. पूरस्थितीवरून कुणीही राजकारण करण्याची गरज नाही. सर्वांनी एकत्रित येऊन लोकांना मदत करण्याची आवश्यकता आहे. सरकारच्या उणिवा विरोधकांनी दाखवाव्यात. पण राजकारण करू नये, असं आवाहन त्यांनी केलं. अन्नधान्याच्या पाकिटावर मुख्यमंत्री आणि आमदार किंवा पक्षाच्या नेत्यांचे फोटो वापरू नयेत. खरे तर अन्नधान्याच्या पाकिटांवर कुणाचेच फोटो नकोत. मदत म्हणून दिलेल्या अन्नधान्याच्या पाकिटावर 'महाराष्ट्र शासन' एवढाच उल्लेख असावा, अशा सूचना मी दिल्या आहेत, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

>> यंदा प्रचंड पाऊस पडला आहे. सांगलीत २००५ रोजी पूर आला, तेव्हा ३१ दिवसांत २१७ टक्के पाऊस, यंदा ९ दिवसांत ७५८ टक्के पाऊस

>> कोल्हापुरात २००५मध्ये ३१ दिवसांत १५९ टक्के पाऊस, २०१९मध्ये ९ दिवसांत ४८० टक्के

>> कोयना धरणात १०० टीएमसी पाणी असतं. ९ दिवसांत ५० टीएमसी पाणी भरलं आहे. त्यामुळे विसर्ग मोठ्या प्रमाणात झाला.

>> कृष्णा, पंचगंगा, कोयनामधून एकत्रित विसर्गामुळे ही परिस्थिती

>> ओरिसा, पंजाब, गुजरात, गोवा अशा अनेक राज्यातून बचाव पथकांना पाचारण केलं.

>> नौदलाची १५ पथके विशाखापट्टणम येथून येत आहेत.

>> केंद्र सरकारची पूर्ण मदत मिळते आहे. जितक्या टीम मागितल्या जात आहेत, तितक्या टीम येत आहेत.

>> सांगलीत सुमारे ९५ बोटी कार्यरत, सांगलीत १०१ गावांतील २८, ५३७ कुटुंबे विस्थापित

>> ३५ हजार जनावरे सुद्धा विविध शिबिरांमध्ये

>> ब्रम्हनाळच्या घटनेत १२ जणांचा मृत्यू, आठ बेपत्ता, दोन जखमी

>> या व्यतिरिक्त कुठेही जिवितहानीचे वृत्त नाही

>> पाहणीनुसार, २७, ४६८ हेक्टर जमीन बाधित.

>> पाणी ओसरल्यावर नेमकी माहिती हाती येईल.

>> ४८४ किमीचे रस्ते बाधित, २६१५ रोहित्रांचे अंशत: वा पूर्णत: नुकसान,

>> ७ टन अन्नधान्य आणि पाणी कालपर्यंत पोहोचविण्यात आले.

>> आता बोटीने सुद्धा अन्नधान्य पोहोचविण्यात येत आहे.

>> काही लोक बाहेर निघायला तयार नाहीत, त्यांनाही विनंती करण्यात येत आहे.

>> कोल्हापूर आणि सांगली मिळून तीन लाख अठ्ठ्याहत्तर हजार लोकांना बाहेर काढले.

>> दोन जिल्हे मिळून ३०६ छावण्यांमध्ये निवारा

>> २५०० ते ५००० रुपये अशी मदत पूर्वी दिली जायची, आता दहा ते पंधरा हजार रुपये मदत देण्यात येत आहे.

>> ज्यांना रोखीने मदत देण्याची गरज आहे, त्यांना रोखीने मदत देण्याचा निर्णय कालच घेण्यात आला असून, तसे निर्देश मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत.

>> रोखीने मदत दिल्यास कॅग आक्षेप घेते. पण, अशा प्रसंगात कॅगचे आक्षेप सुद्धा सहन केले पाहिजेत.

>> मृतांना पूर्वी दीड लाखाची मदत दिली जायची, ती आता ५ लाख रूपये करण्यात आली आहे.

>> अपंगत्त्व आल्यास पूर्वी ४३ हजार रूपये मदत दिली जायची, ती आता २ लाख रूपये करण्यात आली आहे.

>> उपचारासाठी सुद्धा आर्थिक मदत दिली जात आहे.

>> घर पडले तर पूर्वी ६० हजार रूपये दिले जायचे, ते आता १ लाख रूपये करण्यात आले आहे.

>> जनावरांचे नुकसान : ३० हजार रूपये मदत

>> दोन्ही जिल्ह्यात प्रत्येकी डॉक्टरांची १०० पथके तैनात करण्यात आली आहेत.

>> सफाईसाठी अतिरिक्त मनुष्यबळ लावण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.

>> शेतीतील गाळ काढण्यासाठी १३ हजार रूपये हेक्टरी मदत, खरडून गेलेल्या जमीनींसाठी ३८ हजार रूपये मदत

>> उद्योगांचे नुकसान झाले, तेथेही मदत करण्याचा निर्णय

>> पाणीपुरवठा योजना, वीज इत्यादींच्या दुरुस्तीला अग्रक्रम देण्यात आला आहे.

>> आर्ट ऑफ लिव्हींग, पंढरपूर देवस्थान, सिद्धीविनायक अशा अनेक संस्था आर्थिक मदतीसाठी पुढे आल्या आहेत.

>> घाबरून जाऊ नका, घाबरण्यासारखे काहीही नाही. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.

>> कर्नाटकमधून पाण्याचा विसर्ग सुद्धा होतो आहे.

>> अधिकारी कुठे चुकले, त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार


गिरीश महाजनांनी सेल्फी काढला नाही, त्यांनी फक्त हात दाखवला

कोल्हापुरात पूरग्रस्त भागाची पाहणी करताना राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी बोटीत बसून सेल्फी काढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. त्यावरही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं. महाजनांनी सेल्फी काढला नाही. बोटीत सोडण्यासाठी आलेल्या लोकांना त्यांनी हात दाखवला. उलट लोक जिथे पोहोचू शकत नाहीत, तिथे महाजन पोहोचले हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलं. महाजनांना पाहून लोकांना दिलासा मिळाला, असं त्यांनी सांगितलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images