Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘पॉलिटिक्स’मध्ये रंगली नेत्यांची टोलेबाजी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्यातील प्रमुख पक्षांच्या नेते मंडळींची एकाच व्यासपीठावरील उपस्थिती, इनकमिंग आणि आउटगोईंगवरून रंगलेली टोलेबाजी, मंत्रिपद आणि संसदरत्न पुरस्कारावरील कोट्या आणि त्यांच्या प्रत्येक विधानाला मिळणारा टाळ्या आणि हशाचा प्रतिसाद अशा वातावरणात पत्रकार गुरुबाळ माळी लिखित 'पॉलिटिक्स डॉट कॉम' आणि 'कश्मिरी कयामत' या हिंदी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रंगला. सध्याच्या राजकीय परिस्थितीचे प्रतिबिंब 'पॉलिटिक्स डॉट कॉम' या पुस्तकात उमटल्याचे कौतुकोद्गारही मान्यवरांनी काढले.

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेतर्फे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निम्बोरकर यांच्या हस्ते अणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येथील शाहू स्मारक भवनात सोहळा रंगला. 'पत्रकार माळी यांनी 'कश्मिरी कयामत' या पुस्तकाच्या माध्यमातून राष्ट्रीय प्रश्नाला वाचा फोडली आहे. समाज आणि देशहितासाठी पक्षीय मतभेद विसरून सर्व राजकीय कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे,' असे नमूद करून पालकमंत्री पाटील यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींकडे मोर्चा वळवला.

'विधानसभा निवडणुकीनंतर जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील आणि मी तिघांपैकी एकजण मुख्यमंत्री होणार आहे अशी चर्चा आहे. मात्र, माझ्या लेखी त्याला फारसे महत्त्व नाही. संघटना सांगेल ती जबाबदारी पेलत असतो. भाजपमध्ये इनकमिंग करणाऱ्या खूपजणांना भेटायचे आहे. त्यामुळे सुरुवातीला भाषण करून निघत आहे', असे सांगत पालकमंत्री पुढील कार्यक्रमासाठी निघून गेले. जाता जाता त्यांनी 'माझे परममित्र आमदार हसन मुश्रीफ कुठे आहेत, आता होते गेले कुठे?,' अशी विचारणा करताच पुन्हा हास्यस्फोट झाला. पालकमंत्र्यांच्या भाषणापूर्वीच आमदार मुश्रीफ यांनी व्यासपीठ सोडले होते.

'आयुष्यात वेगवेगळे झेंडे बदलणाऱ्या माणसांच्या जीवनात अंतिम क्षणी एकही झेंडा उरत नाही,' असा टोला जयंत पाटील यांनी पक्षांतर करणाऱ्यांना लगावला. ते म्हणाले, 'सध्या पक्षांतर करणारी मंडळी ज्या पक्षात दाखल झाली आहेत तेथील राजकीय व्यवस्था लक्षात आली की एक दिवस ते नक्कीच स्वगृही परत येतील.'

प्राचार्य डॉ. जी. पी. माळी यांनी प्रास्ताविक केले. पत्रकार गुरुबाळ माळी यांनी पुस्तक निर्मितीमागील भावना व्यक्त केली. निनाद काळे यांनी सूत्रसंचालन केले. 'दमसा'चे कार्यवाह कवी गोविंद पाटील यांनी आभार मानले. आमदार डॉ. सुजित मिणचेकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. एन. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांची उपस्थिती होती.

०००

इनकमिंगने धरण फुटण्याची भीती

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या इनकमिंगवर खासदार संजय मंडलिक यांनी थेट भाष्य केले. 'पालकमंत्री आता येथे नाहीत, नाही तर त्यांना विचारले असते, किती इनकमिंग करणार? पाणी साठवणुकीची धरणाची क्षमता असते. इनकमिंग करून करून धरण फुटते की काय अशी भीती वाटू लागलीय. चांगली माणसे म्हणून किती आणि कुणाकुणाला घेणार? असा सवालच त्यांनी केला. कोल्हापूर हा कुठल्याही पक्षाचा नव्हे तर जनतेचा बालेकिल्ला आहे, याची त्यांनी उपस्थितांना जााणीव करून दिली. मला दिल्लीत कसलेही पद नको, संसदरत्न तर नकोच नको, हवे असल्यास धैर्यशील माने यांना द्या,' असे म्हणताच सभागृहात हंशा पिकला. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार धैर्यशील माने यांची भाषणे झाली.

०००

३७० कलम रद्द केल्यास काश्मीर प्रश्न सुटेल

निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निम्बोरकर यांनी काश्मीरमधील अनुभव शेअर केले. काश्मीरमध्ये सध्या धार्मिक अंधानुकरण सुरू आहे. काश्मीरचा प्रश्न कायमस्वरुपी सोडवायचा असेल तर ३७० कलम रद्द करावे. हे विशेष कलम रद्द केल्यास दहा दिवसांत हा प्रश्न सुटू शकेल.'

याप्रसंगी बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनचे अधिक कदम यांचेही भाषण झाले.

०० ०० ० ०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुस्तक प्रकाशन

0
0

फोटो ओळी...

पत्रकार गुरुबाळ माळी लिखित 'पॉलिटिक्स डॉट कॉम' आणि 'कश्मिरी कयामत' या पुस्तकांचे प्रकाशन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झाले. सोबत डावीकडून आमदार सुजित मिणचेकर, खासदार संजय मंडलिक, निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निम्बोरकर, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार हसन मुश्रीफ, प्राचार्य जी. पी. माळी, कवी गोविंद पाटील, आदी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्ज भरताना तांत्रिक समस्या

0
0

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या ऑक्टोबर, नोव्हेंबर २०१९ मधील हिवाळी सत्रातील परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया दोन ऑगस्टपासून सुरू झाली होती. मात्र, शनिवारी दिवसभर परीक्षाविषयक वेबसाइट बंद असल्याने कॉलेजना ऑनलाइन अर्ज भरता आले नाही. विद्यापीठाच्या कारभारामुळे प्रवेश अर्ज भरण्याचा एक दिवस वाया गेला. २२ ऑगस्टपर्यंत नियमित अर्ज भरण्याची मुदत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचगंगा तालमीच्या दारात पाणी

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

रविवारी झालेल्या दमदार पावसामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी वाढल्याने पुराचे पाणी शुक्रवार पेठेतील पंचगंगा तालमीजवळ आले आहे. शंकराचार्य मठाकडे जाणारा मार्ग आणि पोवार बोळात पाणी शिरल्याने नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी जाण्यास सुरुवात केली आहे.

महापुराने पंचगंगा नदीचा परिसर वेढला आहे. गेले पाच दिवस गंगावेश ते पंचगंगा नदी हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. तीन दिवसांपूर्वी जामदार क्लबपर्यंत पाणी आले होते. शनिवारी आणि रविवारी दमदार पावसामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली. परिणामी रविवारी शंकराचार्य मठाकडे जाणारा मार्ग पाण्याखाली गेल्याने तेथील वाहतूकही बंद झाली. परिसरातील राबाडे मळा येथील गोठ्यांतील जनावरे सुरक्षितस्थळी हलविण्यात आली. शंकराचार्य मठ मार्गावरील अपार्टमेंट्सच्या बेसमेंटमध्ये पाणी आले आहे. पोवार बोळातही पाणी आल्याने येथील नागरिकांनी घरांना कुलूपे घालून पाहुण्यांकडे जाण्याचा मार्ग स्वीकारला. सध्या पुराचे पाणी पंचगंगा तालमीजवळ आले आहे. शंकराचार्य मठाजवळील घरांच्या पिछाडीस पाणी आल्याने परिसरातील भीतीचे सावट आहे. पाणी वाढल्याने साप, विंचू आदींची भीती नागरिकांना सतावत आहे.

दुधाळी गवत मंडई परिसरातील दोन कारखान्यांमध्ये पाणी आल्याने येथील नागरिकांनी सुरक्षितस्थळी साहित्य हलविले. परिसरातील घरांच्या पाठीमागील बाजूच्या तळघरात पाणी आल्याने गोठ्यातील जनावरे रस्त्यांवर बांधण्यात आली आहेत. गवत मंडईतून जाणारा शिंगणापूर रोड वाहतुकीसाठी बंद केला आहे.

शाळांमध्ये सोय

सुतारमळा परिसरातील राबाडे मळा, चव्हाण मळा येथील नागरिकांनी स्थलांतर सुरू केले आहे. पूरग्रस्तांसाठी महानगरपालिकेने शुक्रवार पेठेच्या गुणे बोळातील ग. गो. जाधव विद्यालय, उत्तरेश्वर पेठेतील न्यायमूर्ती रानडे विद्यालय, शनिवार पेठेतील आंबेडकर विद्यालयात सोय केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मूर्तीकाम थांबले, नातेवाईकांकडे आसरा

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

रिलायन्स मॉलच्या पिछाडीस असलेल्या शाहूपुरीतील कुंभार गल्लीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पाणी साचून राहिले. पाणी शिरल्यामुळे येथील पंधराहून अधिक घरे, तीन ते चार दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. गेल्या दोन दिवसांपासून या गल्लीतील मूर्तीकाम, व्यवसाय बंद पडले आहेत. अनेकांनी नातेवाईकांकडे आसरा घेतला आहे. दरम्यान तयार गणेशमूर्ती सुरक्षितरित्या बाहेरगावी पाठविल्या जात आहेत. गल्लीतील वीज पुरवठा दोन दिवस खंडीत होता. रविवारी दुपारी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी येथे दुरुस्ती सुरू केली.

शाहूपुरीतील या गल्लीतील अनेक इमारतींच्या बेसमेंटमध्ये पाणी आहे. या भागात गेले दोन महिने मूर्तीकामाची लगबग सुरू होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून संततधार पावसामुळे या कामावर परिणाम झाला आहे. विशेषत रिलायन्स मॉलशेजारील पुलालगत असलेल्या जवळपास वीस घरांत पाणी शिरले आहे. रस्त्यावरही गुडघाभर पाणी आहे. काही इमारतींच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरल्याने मूर्तीकामासाठी आवश्यक साहित्य सुरक्षितस्थळी हलविताना धांदल उडाल्याचे नागरिकांनी सांगितले.

रिलायन्स मॉलच्या पिछाडीला असलेल्या पुलावर बॅरेकड्स लावून शाहूपुरी कुंभार गल्लीकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. पंचमुखी गणेश मंदिरासमोरून रिलायन्स मॉलकडे जाणारा कुंभार गल्लीतील रस्ताही बंद आहे. मूर्तींना कसल्याही प्रकारची इजा पोहचू नये पत्र्याच्या शेडमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. या भागातील नागरिक, मूर्तीकार गोरख कुंभार म्हणाले, 'संपूर्ण गल्लीच पाण्याखाली असल्यासारखी स्थिती आहे. गेले दोन दिवस येथील मूर्तीकाम बंद आहे. तयार मूर्ती काहीजण बाहेरगावी पाठवित आहेत. शिवाय वीज पुरवठाही बंद असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.'

व्हीनस टॉकीजपर्यंत पाणी

पुराचे पाणी व्हीनस टॉकीज, अप्सरा टॉकीजपर्यंत पाणी पसरले आहे. अप्सरा टॉकीजसमोरील रस्त्यावर पाणी आल्यामुळे रस्ते वाहतुकीसाठी बंद केला आहे. अप्सरा टॉकीज ते भारतीय स्टेट बँकेकडे जाणाऱ्या रस्त्यावरही पाणी असल्यामुळे वाहतूक बंद आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजीपाल्याचा उठाव थंडावला

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शेतकऱ्यांकडून मार्केट यार्डमध्ये भाजीपाल्याची मोठी आवक झाली असली तरी मालाला उठाव नसल्याने भाज्या स्वस्त झाल्या आहेत. पावसाने रस्ते बंद झाल्याने कोकणासह जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांनी भाजी खरेदीकडे पाठ फिरवली. त्यामुळे मार्केट यार्डातील आर्थिक उलाढाल थंडावली आहे.

शेती उत्पन्न बाजार समितीतील मार्केट यार्ड येथे जिल्ह्यासह, कर्नाटक, सांगली येथून शेतकरी भाजी विक्रीसाठी कोल्हापुरात येतात. रोज १०० ते १५० वाहनांतून भाज्यांची आवक होते. सध्या राष्ट्रीय महामार्गावरुन कर्नाटकातील बेळगाव, राणीबेन्नूर, दावणगिरी, हावेरी येथून भाज्यांची आवक होत आहे. आज रविवारी कर्नाटक आणि शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी भाजी विक्रीस आणली. पण रस्ते बंद असल्याने कोकणातील कणकवली, बांदा, लांजा, कुडाळ, गोव्यातील व्यापारी न आल्याने भाज्यांची खरेदी झाली नाही. जिल्ह्यातील प्रमुख भाजीमंडई असलेल्या वडगाव, मलकापूर, मूरगूड, राधानगरीसह इतर गावांतील व्यापारीही रस्ते बंद असल्याने फिरकले नाहीत. भाज्यांची आवक होऊनही व्यापाऱ्यांकडून खरेदी झाली नाही. त्यामुळे शहरातील मंडईत भाज्यांची आवक वाढून दर घसरले.

मटार आणि घेवड्याची आवक झाली असली तरी दर प्रतिकिलो ८० रुपये होता. फ्लॉवरचा दर चढाच असून २० ते २५ रुपये गड्डा आहे. कोबी गड्ड्याचा दर १५ ते २० रुपये असून मेथी, पालक, कोथंबीर, शेपू, कांदा पात पेंढीचा दर १० रुपये होता. मुळ्याची १५ रुपयाला दोन नग अशी विक्री झाली.

शिरोळच्या टोमॅटोला गुजरातची मागणी

शिरोळमधील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या टोमॅटोला गुजरातमध्ये मोठी मागणी आहे. दररोज गुजरात, मुंबई, दिल्लीला एक ते दोन ट्रक टोमॅटो जातात असे स्थानिक व्यापाऱ्यांनी सांगितले. शिरोळमधील शेतकऱ्यांनी कर्नाटकातील एकसंबा येथे १०० ते १५० एकरमध्ये टोमॅटोची शेती केली असून या ठिकाणाहून परराज्यांत टोमॅटो विक्रीसाठी पाठविला जातो.

फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो रुपयांत)

वांगी : ४०

टोमॅटो : ४०

भेंडी : ६०

ढबू : ४०

गवार : ८०

दोडका : ५०

कारली : ६०

वरणा : ८०

श्रावण घेवडा : ८०

हिरवी मिरची : ४० ते ५०

फ्लॉवर : २० ते ४० (प्रति गड्डा)

कोबी : १२ ते २० (प्रति गड्डा)

बटाटा : २५

लसूण : ८०

कांदा : २० ते २५

आले : १००

पडवळ : १५ ते २० (प्रति नग)

मुळा : १० (प्रति नग)

पालेभाजी दर (पेंढी रुपयांत)

मेथी : १०

कांदा पात : १०

कोथिंबीर : १०

पालक : १०

शेपू :१०

चाकवत : १०

करडा : १०

फळांचे दर (प्रतिकिलो रुपयांत)

सफरंचद : १०० ते १६०

डाळिंब : ६० ते ८०

अननस : २० (प्रति नग)

केळी : ३० ते ६० (डझन)

जवारी केळी : २० ते ६० (डझन)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जयंती नाल्यातून पाच डंपर कचरा हटवला

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

दमदार पावसामुळे जयंती पूलाजवळ जमा झालेला पाच डंपर कचरा जेसीबी मशिनच्या मदतीने काढण्यात आला. प्लास्टिक, थर्माकोल, बाटल्या असा सर्व प्रकारचा कचरा पुलाच्या कठड्याला अडला होता. नाल्याला फुग येत असल्याने रविवारी महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेअंतर्गत जेसीबी मशिनद्वारे काढून टाकला. भर पावसात शहरवासियांनी १५व्या रविवारीही मोहिमेला प्रतिसाद दिला.

गेल्या आठ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे पंचगंगा नदी धोका पातळीवरून वाहत आहे. पुराचे पाणी नगरी वस्तीत शिरले आहे. परिणामी जयंती नाल्याच्या पाण्याचा प्रवाह थांबला असल्याने प्लास्टिक कचरा पुलाच्या कठड्याजवळ येऊन अडकला. सीपीआरकडून खानविलकर पेट्रोल पंपाकडे जाण्याच्या रस्त्यावर अनेकवेळा पावसाच्या हलक्या सरीनंतरही पुलावर पाणी साचते. अशी स्थिती खानविलकर पेट्रोल पंपाकडून दसरा चौकाकडे जाणाऱ्या जुन्या पुलावरही निर्माण झाली. येथे गटर तुंबल्याने रस्त्यावरील पाण्यातून वाहनधारकांना मार्ग काढावा लागत होता.

रविवारी सकाळी स्वच्छता मोहिमेत कठड्यालगतचा सर्व प्लास्टिक कचरा जेसीबीच्या मदतीने काढण्यात आला. पाणी हटविण्यासाठी एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली. मात्र दुपारपर्यंत काम पूर्ण झाले नाही. जयंती नाल्यात अडकलेला कचरा काढण्यासाठी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या रेस्क्यू बोटींचा वापर करून अडकलेले प्लास्टिक, लाकडे काढण्यात आली. विद्यार्थ्यांसह विविध संघटनांनी मोहिमेत सहभाग घेतला. विवेकानंद, न्यू, केआयटी, कॉमर्स या कॉलेजांच्या एनसीसी, एनएसएस विभागाच्या विद्यार्थ्यांसह शिक्षक सहभागी होते. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी रेस्क्यू बोटीतून पुराची पाहणी केली.

स्वच्छता मोहिमेमध्ये स्थायी समिती सभापती शारगंधर देशमुख, नगरसेवक प्रतापसिंह जाधव, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, उपशहर अभियंता रमेश मस्कर, डॉ. विजय पाटील, प्रा. प्रियंका पवार, सायबर कॉलेजचे प्रा. प्रशांत राजपूत आदी सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूर वाढला, भीती वाढली

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

पावसाची संततधार सुरू असल्याने पंचगंगा नदीचे पाणी नागरी वस्तीत मोठ्या प्रमाणात आले आहे. पाणी पातळी दर तासाला वाढत असल्याने महापुराची भीती अधिक गडद झाली. रमणमळा, उलपे मळा, बापट कँम्प, शुक्रवार पेठ या परिसरात पाणी शिरले असून शाहूपुरी कुंभार गल्ली, लक्ष्मीपुरी, व्हीनस कॉर्नर हा भागाही पाण्यात आहे. २००५मध्ये आलेल्या महापुरासारखी स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. राधानगरी धरणातील पाण्याचा विसर्ग वाढल्याने जयंती नाल्याच्या पाण्याला फूग आली आहे.

पंचगंगा नदीचे पाणी रमणमळा येथील पोवार मळा, भोसले मळा आणि वागळे मळ्यात आले. तर जावडेकर रेसिडन्सीजवळ टाकण्यात आलेल्या भरावापर्यंत पुराचा वेढा आहे. कसबा बावड्यातील उलपे मळा, कदमवाडीनजीक बापट कँपमधील पुरात वाढ झाली. त्यामुळे जाधववाडीकडे जाणारा रस्ता बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आला आहे.

जयंती नाल्याला फूग आल्याने शाहूपुरी कुंभार गल्ली, सुतारवाडा, व्हीनस कॉर्नरपर्यंत पुराचे पाणी आले. कुंभार गल्लीत साडेतीन फूट पाणी आहे. व्हीनस कॉर्नर येथे रस्त्यावर दीड फूट पाणी आहे. कुंभार गल्लीत पाणी आल्याने गणेशमूर्तींच्या कामावर परिणाम झाला आहे. येथील कुटुंबांच्या स्थलांतराची तयारी प्रशासनाने केली आहे. जयंती नाल्यावरील पुलाच्या कमानीलगत पाणी आले आहे. यापूर्वी जयंती नाल्याच्या नवीन पुलावर पाणी आले असताना आता पावसाच्या दणक्याने जुन्या पुलावरही पाणी आल्याने नागरिकांत अधिक भीती निर्माण झाली आहे.

पूर पाहण्यास गर्दी

नागरी वस्तीत पाणी आल्याने भीतीचे वातावरण असताना आलेला पूर पाहण्यासाठीही मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहेत. पिकनिक पॉईंट, नवीन व जुना शिवाजी पूल, रंकाळा, कळंबा तलाव येथे नागरिकांनी गर्दी केली होती. राजकपूर पुतळ्याजवळ बांधण्यात आलेल्या रंकाळा तलावातील पुलावरही अनेकजण फोटोशेसन करताना दिसत होते.

वर्दळ थंडावली

रविवारी शहरात पर्यटकांची संख्या नेहमीच लक्षणीय असते. अंबाबाई मंदिर, रंकाळा तलाव, पन्हाळा किल्ला, जोतिबा मंदिरात दर्शनासाठी जिल्ह्याबाहेरुन पर्यटक येतात. पण शहरातील मार्गांवर आलेले पाणी आणि पावसाच्या संततधारेमुळे पर्यटकांची संख्या कमी झाली. शहरात ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्याही कमी राहिली. परिणामी अनेक रस्त्यांवर वाहनांची वर्दळ थंडावल्याचे दिसत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भूस्खलनामुळे हाहाकार

0
0

म. टा. वृत्तसेवा, पन्हाळा

मुसळधार पावसाने यंदा कहर केला असून पन्हाळा किल्ला आणि बांधारी परिसरात झालेल्या भूस्खलनाच्या घटनांमुळे हाहाकार माजला आहे. मसाई पठारला जाणारा मुख्य रस्ता भुस्खलनामुळे तुटून गेला आहे. त्यामुळे पठारावरील एकमेव म्हाळुंगे या गावाचा रस्त्यांशी संपर्क तुटला आहे. मसाई पठारला जायची वाटही बंद झाली आहे. आता पन्हाळा किल्ल्याला जाणाऱ्या मुख्य रस्त्याला मोठ्या भेगा पडल्या आहेत. रस्त्यासाठी बांधलेल्या ब्रिटीशकालिन तटबंदीच्या वरच्या दरडीची माती पाण्याबरोबर रस्त्यावर आली आहे. पन्हाळगडाच्या पूर्व बाजूला सज्जाकोठीजवळचा तटाचा भागही शनिवारी रात्री कोसळला. येथे अगदी तटाला लागून एक खासगी मिळकत आहे. शिवाय तालुक्यात बादेवाडी, जांभळेवाडीसह तीन ठिकाणी भूस्खलन सुरू आहे.

पन्हाळागडाकडे जाणारा रस्ता खचला

पन्हाळा किल्ल्याला जाणारा मुख्य रस्ता बुधवार पेठेपासून पाचशे मीटरवर खचायला सुरूवात झाली आहे. गेल्यावर्षी नेबापूरमधील सपाटीकरणानंतर सुरू झालेले भूस्खलन तेथून वर अंदाजे ५०० मीटरवरील पन्हाळ्याच्या मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचले आहे. या ठिकाणी रस्त्याला मधोमध मोठी भेग गेली आहे. जोतिबा घाटरस्त्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्यास या ठिकाणी असलेले हॉटेल ग्रीनपार्क, काही खासगी बंगले आणि काही रहिवाशांच्या घरांना धोका पोहोचू शकतो. याच ठिकाणी विरुद्ध बाजूस असलेल्या रेडेघाट परिसरातही काल भुस्खलन सुरू झाले. पन्हाळा किल्ल्याच्या पूर्व बाजूला सज्जाकोठीलगत तटाचा काही भाग रात्री कोसळला. या तटबंदीलगत एक खासगी मिळकत आहे. मुख्य रस्त्याला मोठी भेग पडल्याने भूगर्भ शास्त्रज्ञांना बोलावून या परिसराची पाहणी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. येथील परिस्थितीवर शासकीय यंत्रणा लक्ष ठेवून आहे.

बादेवाडीत १४ घरांना तडे

पन्हाळा बांधारीच्या बादेवाडी गावाच्या वरच्या बाजूच्या डोंगरात भूस्खलन झाल्याने या रस्त्याच्या वरच्या बाजूची १४ घरे बाधित झाली आहेत. घराच्या भिंतीना आणि जमिनीलाही तडे गेल्यामुळे ही घरे कधीही पडण्याच्या स्थितीत आहेक. तहसीलदार रमेश शेंडगे यांच्यासह पन्हाळा पंचायत समितीचे सभापती अनिल कंदूरकर यांनी येथील ग्रामस्थांना अन्य ठिकाणी तसेच नातेवाईकांकडे स्थलांतरीत करण्यासाठी अक्षरश: विनवणी केली. या कुटुंबांना बाधित घरातून बाहेर काढण्यात आले आहे. दरम्यान आज सकाळीही येथे भूस्खलन सुरूच आहे. वेखंडवाडीच्या अलिकडे चिले खुरीच्या खालच्या बाजूस रस्त्यावर पुन्हा जमीन खचत आहे. येथे २००१ मध्ये पहिल्यांदा पक्का रस्ता तयार करण्यात आला. त्यावेळी भूस्खलन झाल्यामुळे धक्का बांधण्यात आला होता.

मसाई पठारचा रस्ताच खचला

बुधवारपेठ-बादेवाडी रस्त्यावर पन्हाळा किल्ल्याचा परिसर संपला की लगेच तुरुकवाडी गाव येते. तुरकवाडीच्या पुढच्या बाजूस मसाई पठार सुरू होते. पठारावरील जेऊरपैकी म्हाळुंगे हे गाव आणि नव्यानेच या ठिकाणी सुरू करण्यात आलेले व्हर्टिकल अॅडव्हेंचर पार्कला जाण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे. या रस्त्यावरच्या पहिल्या वळणावर काल दुपारी मोठी भेग पडली. आज सकाळी ही भेग वाढून रस्त्याला मोठे भगदाड पडले. त्यामुळे हा रस्ता पूर्णपणे बंद झाला. हा परिसर चहाची मळी यानावाने ओळखला जातो. चहाची मळी वनखात्याच्या ताब्यात आहे. मात्र आजूबाजूला खालच्या बाजूस खासगी क्षेत्रात सपाटीकरण करून, डोंगर फोडून रस्ते काढण्यात आले आहेत. शिवाय काही बांधकामेही झाली आहेत. भूस्खलन चहाची मळीच्या जंगल क्षेत्रातून डोंगराला समांतर अर्ध्या किलोमीटरपेक्षा जास्त जागेत आहे. त्याचा तळ कुठे आहे, याचा अद्याप पत्ता लागलेला नाही. शाहूवाडी-पन्हाळा विभागाचे उपविभागीय अधिकारी अमित माळी यांनी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

जांभळेवाडीत सात एकर डोंगर घसरला

जांभळेवाडी येथे यापूर्वी भेगा पडलेला सात ते आठ एकर डोंगराचा भाग शनिवारी पूर्णपणे खाली घसरला. आणि डोंगराच्या वरच्या भागात पुन्हा मोठ्या भेगा पडल्या आहेत. पावासाचा जोर कायम असल्याने अजून डोंगर घसरण्याची भीती आहे. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.

२००७ ची पुनरावृत्ती

२००७ मध्ये बांधारी परीसरात जांभळेवाडी, बादेवाडी आणि मराठवाडी या ठिकाणी एकाचवेळी भूस्खलन झाले होते. कालही पन्हाळा किल्ल्याच्या बाजूला दोन ठिकाणी आणि बांधारीला तीन ठिकाणी एकाचवेळी भूस्खलन झाले. त्यामुळे ही संपूर्ण जमीन अस्थिर असून भूस्खलनाच्या घटना परस्पर संबंधित असाव्यात असा स्थानिकांचा अंदाज आहे.

भूस्खलन नैसर्गिक की मानवनिर्मित?

पन्हाळा किल्ला आणि बांधारी परिसरात सुरू झालेले भूस्खलन अतिवृष्टीमुळे झाले असे दिसत असले तरी या परिसरात जांभ्या खडकालगत वर्षानुवर्षे घसरलेली खोल माती आहे. मसाई पठार आणि पन्हाळ्याचा मधला खडक कठीण असला तरी दोन्हा बाजूच्या बांधारी केवळ मातीपासून बनलेली आहे. वर्षानुवर्षे निर्माण झालेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होत होता. आता त्यामध्ये सपाटीकरणासारखे मोठे हस्तक्षेप झाल्याने पाणी खाली वाहून जाण्याऐवजी मातीत मुरते. हे अनावश्यक पाणी जमिनीला जड करते. खालील भागातून चिखल, दगड-गोटे बाहेर पडायला सुरुवात करते. त्यामुळे त्यावर आधारलेला वरच्या भागातला सगळा डोलारा हळूहळू कोसळतो. यााचा विचार करून या भागातील मानवी हस्तक्षेपाबाबत नियमावली करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येडेनिपाणीच्या पाझर तलावास पाण्याचे तोरण !

0
0

म. टा. वृत्तसेवा, इस्लामपूर

वाळवे तालुक्यातील येडेनिपाणीतील जुना पाझर तलाव दुरुस्ती आणि खोलीकरणाचे काम दोन वर्षांपूर्वी करण्यात आले होते. ग्रामस्थांनी केलेल्या श्रमदानाने अनेकांचे हात या सार्वजनिक कामास लागले. यंदा सलगच्या पावसाने प्रथमच हा तलाव ओसंडून वाहात असून या भागात पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरवण्यात यश आले असून जमिनीतील पाण्याची पातळी सुधारण्यास मदत होणार आहे.

गेल्या दोन वर्षांपासून परिसरात अल्प पाऊस पडल्याने या तलावाची क्षमता असूनदेखील फारसे पाणी साठले नव्हते. गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे हा तलाव भरल्याचे पाहून समाधान व्यक्त होत आहे. गावाच्या पश्चिम आणि दक्षिण भागातील म्हणजे जोतीबाच्या पायथ्यापासून येणाऱ्या ओढ्यातील पाण्यामुळे आज हा तलाव ओसंडून वाहू लागलाय. जुना पाझर तलाव दुरुस्ती आणि खोलीकरणाचे काम पंचायत समिती सदस्य आदरणीय आनंदराव पाटील यांनी हाती घेतले होते. जि. प. सदस्य सत्यजित देशमुख आणि राजश्री एटम यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषद स्वनिधीतून या तलावाचे दगडी पिचिंगचे काम झाले. कृषीमंत्री सदाभाऊ खोत, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सत्यजित देशमुख आदींनी कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले आहे.

या कामाची सुरुवात करताना एक आशादायी चित्र डोळ्यासमोर होते. गाव पाण्याने समृद्ध व्हावे हीच यापाठीमागील भूमिका होती. शासकीय पातळीवरील त्या काळातील अनेक अधिकारी, गावातील सर्व पदाधिकारी आणि ट्रॅक्टर मालक, जेसीबी मालक यांच्या सहकार्याने हे काम पूर्णत्वास आले. एक दिवस तर संपूर्ण गांव श्रमदानासाठी या कामावर आले. यातून एक गोष्ट जाणवते की निस्वार्थ भूमिकेतून केलेल्या कामाची पूर्तता होते त्यावेळी होणारा आनंद पराकोटीचा असतो, अशी भावना आनंदराव पाटील यांनी व्यक्त केली.

फोटो : पाझर तलावाच्या कामाची पाहणी करताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आनंदराव पाटील आणि कार्यकर्ते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतन कायद्यातील तरतुदीच्या विरोधात कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, जिल्हा मुख्याध्यापक संघाच्यावतीने आज शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांनी निदर्शने केली. शिक्षकांच्या पगारावरील गंडातर खपवून घेणार नाही, असा इशाराही देण्यात आला.

शिक्षकांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. व्यासपीठाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात असे म्हटले आहे की राज्य सरकारने चार जुलै रोजी अधिसूचना काढली आहे. या अधिसूचनेनुसार शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मिळणारा पगार यापुढे राज्य सरकार ठरवणार आहे. सरकारचा निर्णय अन्यायकारक आहे. सेवाशर्तीतील तरतुदीनुसार राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व भत्ते बंधनकारक आहे. त्यामुळे राज्य सरकारने अधिसूचना रद्द करावी. विना अनुदानित शिक्षकांचे नाव पुढे करुन सरकार अनुदानित शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेत्तरांचा पगार ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. अनुदानित शाळेतील शिक्षकांना मिळणारे वेतनाचे सर्व लाभ विना अनुदानित शाळेतील शिक्षकांना मिळतील, अशी तरतूद कायद्यात करायला हवी, असे निवेदनात म्हटले आहे.

आंदोलनात मुख्याध्यापक संघाचे चेअरमन सुरेश संकपाळ, सचिव दत्ता पाटील, वा.ज. देशमुख, जयंत आसगांवकर, दादा लाड, बाबा पाटील, विलास साठे, भरत रसाळे, राजेश वरक, सुधाकर सावंत, वर्षा केनवडे आदी उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘श्रावणक्वीन’ची प्राथमिक फेरी गुरुवारी

0
0

'श्रावणक्वीन'ची प्राथमिक फेरी गुरुवारी

कोल्हापूर टाइम्स टीम

गायन, वादन, नृत्य, अभिनय या कला आणि मॉडेलिंगमध्ये तुम्ही 'स्टार' आहात असे वाटत असल्यास 'श्रावणक्वीन'चे व्यासपीठ तुमची वाट पाहतेय. या व्यासपीठावर स्वत:मधल्या कलाकाराला सिद्ध करून ग्लॅमर जगतात स्वत:ची ओळख निर्माण करण्याची संधी आहे. ही प्राथमिक फेरी ८ ऑगस्ट रोजी, गुरुवारी कोल्हापुरात होणार आहे. न्यू शाहूपुरी येथील हॉटेल रेडियन्ट येथे सकाळी दहा वाजता ही फेरी होईल.

नामवंत परीक्षकांच्या परीक्षणाखाली या स्पर्धेची प्राथमिक फेरी पार पडणार असून, यातील विजेत्यांची अंतिम फेरीसाठी निवड होईल. प्राथमिक फेरीसाठी नावनोंदणीसाठी अंतिम टप्प्यात आली आहे, त्यामुळे तारीख जवळ येत असून, लवकरच तुमचे नाव निश्चित करा. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या वतीने दरवर्षी 'श्रावणक्वीन' या पर्सनॅलिटी काँटेस्टचे आयोजन करण्यात येते. यामधून आत्तापर्यंत मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्राला बरेच चेहरे मिळाले आहेत. निसर्गाला साज चढवणाऱ्या श्रावणाप्रमाणे साजेशा व्यक्तिमत्त्वाला श्रावणक्वीनच्या निमित्ताने दाद मिळते. त्यामुळे ही स्पर्धा दरवर्षी ऑगस्टमध्ये आयोजित केली जाते. प्राथमिक फेरीमध्ये तीन राउंड होणार आहेत. पहिला इंट्रोडंक्शन, दुसरा टॅलेंट आणि तिसरा क्यू अँड ए... यामधून स्वत:ची प्रतिभा दाखवा आणि अंतिम फेरीमध्ये स्वत:ची जागा निश्चित करा. या फेरीसाठी सिनेमा, नाटक, मालिकेमधील नामांकित परीक्षक परीक्षण करणार आहेत. टॅलेंट राउंडमध्ये तुमच्यातील नृत्य, गायन, अभिनय असे कोणतेही कलागुण सादर करण्याची मुभा आहे. सोबत बुद्धीमत्ता, व्यक्तिमत्त्व, तर्कबुद्धी यालाही गुण आहेत.

अंतिम फेरीमधील विजेत्यांना महाअंतिम फेरीचीही पायरी चढण्याची संधी मिळते, अर्थात प्रसिद्ध ग्रुमिंग एक्सपर्टच्या मार्गदर्शनाखाली. अभिनयासोबतच फॅशन रॅम्पवरही झळकण्यासाठी ही स्पर्धा आदर्श प्रवेशद्वार ठरत असल्याचे सिद्ध होते आहे. फक्त यासाठी तुमच्यामध्ये हवी योग्य प्रतिभा.

नावनोंदणीसाठी...

या स्पर्धेच्या नावनोंदणीसाठी mtshravanqueen.com या वेबसाइटवर लॉगइन करा. नावनोंदणीसाठी २९९ रुपयांचे प्रवेशशुल्क असून, त्यासोबत 'महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब'चे सदस्यत्त्व मोफत मिळणार आहे. या 'कल्चर क्लब'अंतर्गत आम्ही विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करत असतो, त्यामुळे त्याचीही पर्वणी मिळेल.

स्पर्धेच्या अटी आणि नियम

- १८ ते २५ वयोगटांतील अविवाहित तरुणींनाच नोंदणी करता येईल.

- नोंदणी केलेल्यांपैकी निवडक स्पर्धकांना प्राथमिक फेरीसाठी बोलाविले जाईल. ही निवड आमचे ज्युरी सदस्य करणार आहेत.

- नावनोंदणी करताना मेकअप नसलेला किमान एक फोटो अपलोड करणे अपेक्षित आहे.

- फेरीचे राउंड एकापाठोपाठ होणार असून, मेकअप, टचअप, ड्रेपरी चेंजसाठी वे‌ळ मिळणार नाही.

अधिक माहितीसाठी संपर्क -

ई-मेल आयडी -

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाचा हाहाकार किंवा कोल्हापूर जलमय

0
0

फोटो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने सर्व नद्यांनी रौद्ररुप धारण केले आहे. नद्या धोकापातळीपेक्षा जास्त क्षमतेने वाहत असल्याने ९३ बंधारे पाण्याखाली गेले असून जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. रेल्वे, एसटी आणि दूध संकलनावर पावसाचा गंभीर परिणाम झाला. शहरातील नागरी वस्तीत पाणी वाढत असल्याने दिवसभरात २६ कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले. नागरी वस्तीत पुराचे पाणी वेगाने शिरत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्ह्यात आणि धरणक्षेत्रात दमदार पाऊस पडत असल्याने नद्या धोकापातळी ओलांडून वाहत आहेत. राधानगरी धरणासह चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा, कोदे लघप्रुकल्प व जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला आहे. परिणामी जिल्ह्यातील ९३ बंधारे पाण्याखाली गेले. १७ राज्य व जिल्हा मार्गावरील एसटी तर केएमटीच्या सहा फेऱ्या बंद झाल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. राधानगरी धरणातून ७,१२१ विसर्ग सुरू असल्याने राजाराम बंधाऱ्यांने सायंकाळी साडेसहा वाजता ४५.६ फूट पाणीपातळी गाठली.

पावसामुळे गुजरी व रविवार पेठ दिलबहार तालीम परिसरात घराची भिंत पडली. गुजरी येथे भिंत पडल्याने घरातील व्यक्तींची अग्निशमन विभागाच्या जवानांनी सुटका केली. तर पाच ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. महावीर कॉलेजच्यामागे दोन मोटारसायकलींवर झाड पडून आर्थिक नुकसान झाले. ताराबाई पार्क आयकर कार्यालय, कदमवाडी, साळोखेनगर, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, न्यू पॅलेस परिसरात झाडे उन्मळून पडून वाहतूक कोंडी झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पडलेले झाड बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

...

येथे बसला पुराचा फटका

पंचगंगा नदीची पाणीपातळी वाढत असल्याने शुक्रवार पेठ पंचगंगा तालीम मंडळ, शंकराचार्य मठ, बापट कँप, न्यू पॅलेस, दुधाळी एसटीपी प्लांट, रमणमळा, उलपे मळा, जाधववाडी, न्यू पॅलेस, विन्स हॉस्पिटल परिसर, सुतारवाडा, शाहूपुरी कुंभार गल्ली, फोर्ड कॉर्नर, गाडी अड्डा, व्हिनस कॉर्नर, नष्टे इस्टेट परिसरात पाणी आले.

......

शहरातील ४१ कुटुंबांचे स्थलांतर

पुराच्या पाण्याचा फटका बसल्याने रविवारी २६ तर चार दिवसांत ४१ कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले. बापट कँपमधील एका कुटुंबांचे कँपच्या हॉलमध्ये स्थलांतर करण्यात आले. सुतारवाड्यातील २४ कुटुंबांपैकी १६ कुटुंबांचे चित्रदुर्ग मठात तर आठ कुटुंबांचे मुस्लिम बोर्डिंगमध्ये स्थलांतर केले. शुक्रवार पेठेतील एका कुटुंबाचे पंचगंगा तालीममध्ये स्थलांतर केले. न्यू पॅलेस परिसरातील अनेक अपार्टमेंट परिसरात पाणी आल्याने येथील रहिवासी स्वत:हून स्थलांतर करत आहेत.

...

पॉइंटर

९५८ कुटुंबांतील ३,९३० व्यक्तींचे स्थलांतर

जिल्ह्यातील ९३ बंधारे पाण्याखाली

दूध संकलन घटले

आज शहरात पाणीपुरवठ्यावर परिणाम

बालिंगा पुलावर जमावबंदी

शहरात पाच झाडे उन्मळून पडली

दोन घरांच्या भिंती कोसळल्या

महामार्गावरील सर्व्हिसरोडवर पाणी

महामार्गावर वाहतूक कोंडी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेगाड्या मिरजेपर्यंतच

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जोरदार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पुराचे पाणी रुकडी (ता. हातकणंगले) येथील रेल्वेपुलाजवळ आल्याने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून रविवारी कोल्हापुरातून मिरजेकडे जाणारी रेल्वेची वाहतूक थांबविण्यात आली. कोल्हापुरातून अन्य ठिकाणी जाणाऱ्या काही रेल्वेगाड्या मिरज रेल्वे स्थानकातून सोडण्यात आल्या. पुणे ते मुंबई मार्गावरील वाहतूकही पूर्णपणे कोलमडली असल्याने त्याचा फटका कोल्हापुरातील प्रवाशांना बसला.

गेले चार दिवस जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पात्रात झपाट्याने वाढ झाली आहे. रविवारी सकाळी रुकडी येथील रेल्वेपुलाजवळ पुराचे पाणी आले. पुराच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचे एक विशेष पथक पुरस्थितीची पाहणी करत आहे. रुकडी पुलाजवळ पाणी आल्याने याची माहिती पथकाने अधिकाऱ्यांनी दिली. रेल्वे अधिकाऱ्यांनी ही माहिती मध्य रेल्वेच्या पुणे प्रादेशिक विभागाला दिली. त्याची तत्काळ दखल घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टीने कोल्हापुरातून मिरजेकडे आणि मिरजेहून कोल्हापूरकडे येणारी रेल्वेची सर्व वाहतूक बंद करण्यात आली. सकाळी साडेआठ वाजता सातारा-कोल्हापूर पॅसेंजर गाडी कोल्हापुरात आल्यानंतर सर्व गाड्या थांबविण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून येथील रेल्वे प्रशासनाला देण्यात आल्या. त्यामुळे चनम्मा एक्सप्रेस, महाराष्ट्र एक्सप्रेस या गाड्यांची वाहतूक रद्द करण्यात आली. हरिप्रिया एक्सप्रेस मिरज येथे थांबवून ठेवण्यात आली. तेथूनच ती परतीच्या मार्गावर सोडण्यात आली. मिरजेतून निघणारी कोल्हापूर पॅसेंजर रद्द करण्यात आली. सह्याद्री गाडी रद्द करण्यात आली. मुंबईहून येणारी महालक्ष्मी एक्सप्रेस तीन ऑगस्ट रोजी कल्याण, मनमाड, दौंड, कुर्डूवाडी, पंढरपूरमार्गे निघालेली रेल्वे रात्री उशीरापर्यंत मिरज स्थानकात पोहोचलेली नव्हती. दरम्यान कोल्हापुरातून धावणाऱ्या रेल्वे रद्द झाल्याने प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली. काहींनी मिरज रेल्वेस्थानकात धाव घेतली. कोल्हापुरातील गाड्या मिरजेहून सुटणार असल्याने आगाऊ नोंदणी केलेल्या प्रवाशांना एस. टी. चा आधार घ्यावा लागला.

जादा एसटी बस

कोल्हापूर रेल्वेस्थानकातून मिरजपर्यंत धावणाऱ्या रेल्वे रद्द करण्यात आल्या. त्यामुळे काही प्रवाशांनी मिरजपर्यंत पोहोचण्यासाठी एसटीचा आधार घेतला. मध्यवर्ती बसस्थानकातून मिरजसाठी चार एसटी सोडण्यात आल्या. पुणे आणि मुंबई मार्गावरही कोल्हापूर आगाराच्या सहा एसटी बसेस सोडण्यात आल्या. सुमारे ३०० प्रवाशांनी एसटीचा पर्यायी मार्ग स्वीकारला. काही प्रवासी खासगी आराम बसने पुणे आणि मुंबईकडे मार्गस्थ झाले. रात्री उशीरापर्यंत पुणे, मुंबई मार्गावर एसटीची व्यवस्था केल्याचे कोल्हापूर आगाराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पैसे परत देण्याची व्यवस्था

कोल्हापूरहून नोंदणी केलेल्या प्रवाशांना रद्द झालेल्या तिकीटाचे पैसे देण्याची व्यवस्था रेल्वेच्या काउंटरवर करण्यात आली. काहींनी मिरज येथून पुढील प्रवासासाठी पसंती दिली. तर पुणे आणि मुंबई मार्गावरील रेल्वे रद्द झाल्याने प्रवाशांना पैसे परत देण्यासाठी काउंटर खुले करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एक हजारांवर पोलिस तैनात

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाल्याने सुरक्षेसाठी आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिस यंत्रणा पूरग्रस्त भागात सज्ज झाली आहे. धरणे, नद्या, तलाव, राष्ट्रीय, राज्य आणि प्रमुख जिल्हा मार्गावरील पूल आणि दरड कोसळणाऱ्या ठिकाणी ३१ पोलिस ठाण्यातील सुमारे एक हजारांहून अधिक पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. पूरस्थिती पाहूनच प्रवास करावा, असे आवाहन जिल्हा पोलिस प्रशासनाने केले आहे.

जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर ते रत्नागिरी, कोल्हापूर गगनबावडा, कोल्हापूर राधानगरी, भुदरगड मार्ग बंद झाले आहेत. राज्य मार्ग, जिल्हा मार्गावर विविध ठिकाणी पूल आणि बंधाऱ्यावर पाणी आल्याने रस्ते बंद झाले आहेत. घाटरस्ते, डोंगर उतारावरील रस्त्यावर दरड कोसळली आहे. केर्ली ते जोतिबा या रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. या पार्श्वभूमीवर अत्यंत गरजेच्या कामाशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये. घरातून बाहेर पडताना पूरपरिस्थितीची आणि रस्ता सुरू असल्याची खात्री करावी. धबधबे, पूल, बंधारे आदी ठिकाणी पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये. पुराच्या पाण्यातून उडी मारण्याचे धाडस करू नये. खात्री केल्याशिवाय प्रवास करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

बालिंगा पुलावर जमाव बंदी

नदीला आलेल्या पूर पाहण्यासाठी बालिंगा ते दोनवडे गावाजवळ भोगावती नदीवरील बालिंगा पुलावर नागरिकांची गर्दी होत आहे. संभाव्य जीवित हानीचा धोका टाळण्यासाठी आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी करवीर तहसीलदारांनी पुलाच्या दोन्ही मार्गाच्या १०० मीटर परिसरात जमावबंदी आदेश लागू केले. पुलाच्या दोन्ही मार्गाच्या १०० मीटर परिसरात दोनपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्रित जमण्यास बंदी घातली आहे. ही बंदी चार ऑगस्टपासून ते पूर ओसरेपर्यंत लागू राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कार दरीत वाहून गेली

0
0

कार दरी वाहून गेली

दोघांचा मृत्यू, दोघे बेपत्ता; कोयनानगरमधील घटना

म. टा. वृत्तसेवा, कराड

कोयना धरणाच्या परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने परिसरातील ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहत आहेत. शनिवारी रात्री अकरा वाजता सुमारास 'आय-२०' कार हुंबरळी जवळील पाबळ नाल्यातून वाहून जाऊन दोनशे फूट खोल दरीत कोसळली. या कारमध्ये चौघे होते, यातील दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, गाडीतील अन्य दोन जण बेपत्ता आहेत.

नितिन शशिकांत शेलार (३६, मूळ रा. सातारा, सध्या रा. पुणे) व वैशाख शशिधरण नमडीयार (३६, रा. वडगाव शेरी, पुणे) अशी मृत पर्यटकांची नावे आहेत, तर अन्य दोघे बेपत्ता असून, बचाव पथकाच्या मदतीने प्रशासकीय यंत्रणा त्यांचा शोध घेत आहेत.

शेलार व नमडीयार आपल्या अन्य दोन सहकाऱ्यांसह आपल्या आय-२० कारमधून शनिवारी सायंकाळी सहा वाजता कोयनानगर येथे पर्यटनासाठी आले होते. त्या नंतर ते नितीन शेलार यांची सासुरवाडी असलेल्या कामरगावला गेले होते. रात्री सासुरवाडीत जेवण करून ते रात्री दहाच्या सुमारास रिसॉर्टवर मुक्कामासाठी जात असताना हुंबरळी (ता. पाटण) येथील पाबळ नाल्याच्या पाण्याचा अंदाज आला नाही. पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे कार ओढ्याच्या मध्यभागी गेल्यानंतर उलटली व वाहून धबधब्याच्या प्रवाहाबरोबर दोनशे फूट खोल दरीत कोसळली. या घटनेत नितीन शेलार व वैशाख शशिधरण नमडीयार यांचा मृत्यू झाला, गाडीतील अन्य दोघे प्रवाहाबरोबर वाहून गेल्याचे सांगण्यात येत आहे. शेलार यांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र वैशाख नमडीयार यांचा मृतदेह सापडला नाही. रविवारी सातारा येथील ट्रेकर्स आणि रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले असून, घटनास्थळी मृतदेहाचा कसून शोध घेण्यात येत आहे. मुसळधार पाऊस सुरू असल्याने मृतदेह शोधण्यात पावसाचा अडथळा निर्माण होत आहे. सायंकाळी उशिरापर्यंत ही शोध मोहीम युद्धपातळीवर सुरू होती.

फोटो ओ‌ळ :

धबधब्याच्या प्रवाहात कोसळलेली कार.

...............

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोयनेतून ६७ हजार क्युसेक विसर्ग

0
0

कोयनेतून ६७ हजार क्युसेक विसर्ग

म. टा. वृत्तसेवा, कराड

मागील आठ दिवसांपासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार वाऱ्यासह मुसळधार आणि संततधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. त्यामुळे कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयातील पाणीसाठ्यात मोठी वाढ होत आहे. मागील चोवीस तासांत धरणात ९६.७५ टीएमसी पाणीसाठा झाल्याने कोयनेचे सहा दरवाजे ११ फुटांवर उचलल्याने धरणातून ६७ हजार ९१३ क्युसेसने विसर्ग सुरू आहे. पाऊस वाढल्यास दरवाजे आणखी उचलले जाणार असल्याची माहिती कोयना धरणाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी दिली. मोठ्या विसर्गामुळे कोयना व कराडपासून कृष्णा नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे.

कोयना धरणातील पाणीसाठा रविवारी पाच वाजता ९६.७५ टीएमसी झाला होता. धरणात पाण्याची आवक ८६ हजार ०१० क्युसेकने होत आहे.

भिंत कोसळल्याने दुचाकींचे नुकसान

कराड शहरातील कन्या शाळेची पाठीमागील भिंत कोसळल्याने भिंतीकडेला पार्क केलेल्या दुचाकींचे मोठे नुकसान झाले. कराड तालुक्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली असून, ठिकठिकाणी पाणी साचून राहिल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली. येथील कृष्णा कॅनॉल ते गजानन हौसिंग सोसायटी परिसरातील गुहागर-विजापूर राष्ट्रीय मार्गावरती पाच फूट पाणी साचल्याने हा रस्ता लहान वाहनांसाठी बंद करण्यात आला. परिणामी वाहनधारकांना चौंडेश्वरी तसेच पार्ले बनवडी मार्गाचा वापर करावा लागत आहे.

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या पश्चिमेला असलेल्या मालखेड फाटा ते कालवडे फाटा दरम्यानचा सर्विस रोड पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. वाठार येथील स्मशानभूमी पाण्यात बुडाली असून, किमान पाच ते सहा फूट पाणी स्मशानभूमीत साचले आहे. गेल्या आठ दिवसापासून सुरू असलेल्या पावसाचा जोर शनिवारी ही कायम होता. मुसळधार पावसाने ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. कराड शहरात लाहोटी प्लाझा, पाटण कॉलनी, कन्या शाळेसमोर रस्त्यावरील पाणी दुकानगळ्यात व घरांमध्ये शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. शहरातील कन्याशाळेची पाठीमागील भिंतीचा काही भाग कोसळल्याने भिंतीकडेला पार्किंगमध्ये लावण्यात आलेल्या वाहनांचे मोठे नुकसान झाले. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली.

शाळांना आज सुट्टी

आपत्कालीन व पूरसदृश्य स्थिती लक्षात घेऊन आज, सोमवारी सातारा जिल्ह्यातील माण तालुका सोडून सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा, तसेच उच्च माध्यमिक व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. चार दिवसांपासून काले, औंड, उंडाळे परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे तेथील विहिरी भरून वाहू लागल्या आहेत. परिसरामधील डोंगर, शेतशिवारातील पाण्यामुळे ओढे, नाले ही ओसांडून वाहत आहेत. दक्षिण मांड नदीला महापूर आला आहे. या पुरामुळे काले-संजयनगरचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एनडीआरएफ येणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहर आणि जिल्ह्यात पूरपरिस्थिती गंभीर होत असल्याने जिल्हा प्रशासनाने रविवारी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद सेनेच्या (एनडीआरएफ) पथकास पाचारण केले. यासंबंधीचे पत्र त्यांनी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन संचालकांना पाठवले. पथक उपलब्ध होणार की नाही, झाले तर कधी दाखल होणार यासंबंधीची माहिती आज, सोमवारी कळेल, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी सांगितले.

सलग आठ दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा, कृष्णा, दूधगंगा, वारणा, भोगावती, कुंभी, कासारी, दूधगंगा, कडवी नद्यांना पूर आला आहे. नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडल्याने काठावरील १२९ गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. धोकादायक गावांतील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी विविध स्वयंसेवी संस्थांचे ५०० हून अधिक स्वयंसेवक सक्रिय आहेत. शिरोळ तालुक्यासाठी वजीर, पास रेस्क्यू फोर्सचे १००, हातकणंगलेसाठी आधार रेस्क्यू फोर्स, जीवन ज्योती संस्थेचे १५०, करवीरसाठी जीवन आधार, जीवन मुक्ती, जीवन ज्योत संस्थेचे २५०, भुदरगड, कागलसाठी १२५ इतके स्वयंसेवक कार्यरत आहेत. या संस्थांचे संपर्क क्रमांक तहसील कार्यालय आणि संबंधित पोलिस ठाण्यात आहेत. तेथे मदतीसाठी फोन आल्यानंतर त्वरित स्वयंसेवक धावून जात आहेत. चोवीस तास स्वयंसेवक अलर्ट आहेत. याशिवाय खबरदारी म्हणून रविवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी एनडीआरएफचे पथक पाठवण्यासंबंधी पत्र पाठवले. सन २००५ नंतर पहिल्यादांच या पथकास बोलवण्याची वेळ येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सोमवारी (ता. ५ ) शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसाचा जोर कायम असल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थी पुरामुळे शाळेत येऊ शकत नाहीत. तसेच अतिवृष्टीमुळे शाळांच्या बस, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षा, व्हॅनही बंद आहेत. शहरात महानगरपालिकेच्या ५९ तर ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या १९८० शाळांसह खासगी शाळा आहेत. यापैकी बहुतांश शाळांच्या परिसरात पाणी आले आहे.

शाळा पूरग्रस्तांसाठी खुल्या

पुराच्या पाण्याखाली गेलेल्या घरातील कुटुंबाचे स्थलांतर करण्याचे काम चालू आहे. त्यामुळे वेळप्रसंगी गरज पडल्यास महापालिकेच्या शाळा पूरग्रस्तांसाठी खुल्या आहेत, अशी माहिती महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी शंकर यादव यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुराचा वेढा, स्थलांतर सुरू

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहराला पुराचा विळखा घट्ट होऊ लागला असल्याने दिवसभरात पूरबाधित क्षेत्रातील तब्बल ३७ कुटुंबांचे स्थलांतर केले. तर बापट कँप येथील पाच कुटुंबांनी आपल्या पाहुण्यांकडे आसरा घेतला. रात्री राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे उघडल्याने पूरस्थिती अधिकच गंभीर झाली. अद्यापही पावसांची संततधार सुरू असल्याने नागरी वस्तीत पुराचे पाणी वेगाने परसरत असल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

संततधार पावसांमुळे शहर जलमय बनले आहे. राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे उघडल्याने ११ हजार ४०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पंचगंगा नदी धोकापातळीवरून वाहू लागली. परिणामी शहरातील अनेक नागरी वस्त्यांत पाणी शिरले असून चार ते पाच फुटापर्यंत पाणी आले. त्यामुळे पाणी आलेल्या भागातून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर करण्यात येऊ लागले आहे.

शाहूपुरी कुंभार गल्ली, सीता कॉलनी, सुतारवाडा, बापट कँप, व्हीनस कॉर्नर, शुक्रवार पेठ पंचगंगा तालीम येथे पुराचे पाणी आल्याने दिवसभरात परिसरातील ३७ कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले. जामदार क्लब दोन, सीता कॉलनी व बापट कँप येथील प्रत्येकी एक तर सुतारवाड्यातील ३३ कुटुंबांचे चित्रदुर्ग मठ, ग. गो. जाधव विद्यामंदिर व बापट कँपच्या सोसायटीच्या हॉलमध्ये स्थलांतर केले. तर बापट कँपमधील सहा कुटुंबियांनी पाहुण्यांकडे जाणे पसंत केले.

शहरात आजही दमदार पाऊस असल्याने रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यातून वाट काढताना वाहनधारकांची त्रेधातिरपीट उडत होती. उद्योग भवन, महावीर कॉलेज रोड, न्यू कॉलेज, न्यू महाद्वार रोड, परीख पूल, बिंदू चौक व राजारामपुरीतील रस्त्यावरुन पाण्याचे लोट वाहत होते. अशीच स्थिती जयंती नाल्याच्या नव्या व जुन्या पुलावर निर्माण झाली होती. नाल्यातील पाण्याला मोठी फूग आल्याने कोणत्याही क्षणी जयंती पुलावर पाणी येण्याची शक्यता आहे. शहरात पूरस्थिती गंभीर बनल्याने महापालिकेचे आपत्ती निवारण पथक व अग्निशमन दलाचे जवान परिसराची सातत्याने पाहणी करत होते.

शिवाजी पूलावर गर्दी न करण्याचे आवाहन

जिल्ह्यात धुवांधार पावसाने सर्वच नद्यांना पूर आला आहे. नवीन व जुन्या शिवाजी पुलावरुन पूर पाहण्यासाठी नागरिक कुटुंबासह गर्दी करत आहेत. रविवारच्या सुट्टीमुळे तर पाण्याबरोबर गर्दीचाही पूर आला. वाहनांसह पूर पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांमुळे सीपीआर चौकापर्यंत वाहतूक कोंडी निर्माण झाली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत पुलावरील बघ्यांची गर्दी कमी केली. तसेच पूरस्थिती गंभीर झाल्याने नवीन व जुन्या पुलावर नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा पोलिस प्रशासनाच्यावतीने केले.

धरण पाणीसाठा(टीएमसी) विसर्ग

कोयना ९४.१९ ६५,०५३

अलमट्टी ९१.१०५ ३,०३,५२५

राधानगरी ८.३० ११,४००

तुळशी ३.१८ ०

वारणा ३३.२० २०,४७२

दुधगंगा १९.७८ ०

कासारी २.४७ १,३९०

कडवी २.५१ ३,५६२

कुंभी २.५८ ३५०

पाटगाव ३.३४ १८०

चिकोत्रा १.१९ ०

चित्री १.८८ १,१७३

जंगमहट्टी १.२२ १,१७२

घटप्रभा १.५६ ५,४१८

झांबरे ०.८२ ३,९२०

कोदे ०.२१ ७४३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images