Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

गद्दाराची हकालपट्टी करा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'आम्ही लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पायाची चाळण केली. हाडाची काडं व रक्ताचं पाणी केले. पण काहींनी स्वार्थ व पैसाच पाहिला. शेवटच्या टप्प्यात शांत राहण्यासाठी शिवसेनेतील काहींनी ८० लाख घेतल्याची जोरदार चर्चा शहरात आहे. त्यांच्यामुळे आमच्यात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. खासदार, विधानसभा संपर्कप्रमुख व त्रयस्थ यंत्रणेने त्यांचा शोध घेऊन अहवाल द्यावा. जो कुणी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शिवसैनिक गद्दार असेल त्याची हकालपट्टीच झाली पाहिजे,' अशी जोरदार मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केली.

शिवसेनेने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र' या प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात केली. त्याबाबत करवीरनिवासिनी सांस्कृतिक भवनमध्ये तालुकाप्रमुख, पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. त्यावेळी पवार बोलत होते. त्यांनी भाषणात कुणाचेही नाव न घेता सामान्य शिवसैनिकांमधील या भावना असल्याचे नमूद केले.

ते पुढे म्हणाले, 'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 'अन्याय करू नका व अन्याय सहनही करू नका' असे सांगितले आहे. आम्ही नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रात्रीचा दिवस करून प्रचार केला. अगदी पहाटेपासून कामाला लागलो. घराघरापर्यंत पोहचलो. पण काही लोकांनी नेहमीप्रमाणे पैसा व स्वार्थच पाहिला. ८० लाख रुपये घेऊन काहींनी प्रचारात शांत राहण्याचा प्रकार केल्याची चर्चा आहे. त्यांच्या या नेहमीच्याच प्रकाराबाबत किती दिवस गप्प बसायचे? हे कुठे तरी थांबले पाहिजे. ज्यांनी भानगडी केल्या, त्यांचा त्यांना जाब विचारला पाहिजे. आम्ही काही केले तर लगेचच आमचा अहवाल मातोश्रीवर जातो. ८० लाखांच्या प्रकरणाची शहरात मोठी चर्चा असताना त्याचा अहवाल का गेलेला नाही? प्रत्येक विधानसभा मतदार संघातील संपर्कप्रमुख, खासदार व त्रयस्थ यंत्रणेने शोध घेऊन त्याचा अहवाल मातोश्रीपर्यंत पोहचवण्याची आवश्यकता आहे. तरच येथील शिवसेना बळकट होईल. आम्ही कायम कामच करायचे व दुसऱ्यांनी फायदे घ्यायचे हे चालणार नाही. माझा लढा कोणत्या व्यक्तिविरोधात नसून प्रवृत्तीविरोधात आहे. ती गाडली जाईपर्यंत माझा लढा सुरू राहणार आहे.

पवार म्हणाले, 'कुणामुळे कुणाचे घर चालत नाही. त्यामुळे सामान्य शिवसैनिकांनी कुणाला घाबरण्याची गरज नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ज्यावेळी या प्रकाराबाबत विचारणा करतील, त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंना मानणारे खरे शिवसैनिक असाल तर खरे बोला. लाचारीने जगण्यापेक्षा एकदिवस वाघासारखे स्वाभिमानाने जगा. केव्हाही ठाकरे कुटुंबीयांना विसरू नका. त्यांचे आशीर्वाद जसे मिळतात, तसेच वाईट काम करणाऱ्यांना त्यांचे शापही मिळतात.'

जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले, 'जिल्ह्यात पक्षसंघटनेचे काम चांगले असल्याचे वरिष्ठांचे मत आहे. आता सभासद नोंदणीचे काम मोठ्या ताकदीने करायचे आहे. विधानसभा निवडणूक असल्याने दररोज एक कार्यक्रम राबवावा लागणार आहे. राज्यात पुन्हा शिवसेना, भाजपचे सरकार सत्तेवर आणायचे आहे. सध्या राष्ट्रवादीतून फुटून चाललेले नेते पाहिल्यानंतर भविष्यात राष्ट्रवादी शिल्लक राहणार नाही, असेच दिसते. यावेळी माजी आमदार सुरेश साळोखे, सुजित चव्हाण, शिवाजी जाधव, महिला संघटक शुभांगी पोवार यांची भाषणे झाली. व्यासपीठावर दुर्गेश लिंग्रस, मेघना पेडणेकर, मंजित माने उपस्थित होते.

तीन लाख सभासदांची भेट देणार

जिल्हाप्रमुख पवार यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातून तीन लाख नवीन सभासद नोंदणीची भेट द्यायची आहे. त्यासाठी ग्रामीण पातळीवरही जोरदार अभियान राबवले जावे. शाखा प्रमुखांचीही नेमणूक करण्यासाठी जोरदार प्रयत्न झाले पाहिजेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सीपीआरला १०० बेड भेट देण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी शिवसैनिकांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे सांगितले. आमचा काय फायदा असा विचार करून पक्षात काम करू नका. काम करत रहा, पद आपोआप चालत येते, असेही पवार यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ईडी, आयकर विभाग मोदी, शहांचे कार्यकर्ते: राजू शेट्टी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'भाजपमध्ये जे कार्यकर्ते येत नाहीत, त्यांना ईडी व आयकर विभागाच्या माध्यमातून त्रास दिला जातो. राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर टाकलेला छापा उपद्रव देण्यासाठी टाकला असून मुश्रीफ मंत्री असताना छापा का टाकला नाही? निवडणुकीच्या तोंडावर छापे का टाकले हे न उलगडणारे कोडे आहे. दोन्ही ‌विभाग पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचे निष्ठावान कार्यकर्ते असल्यासारखे वागत आहेत,' असा गंभीर आरोप स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी केला. यावेळी त्यांनी केंद्रीय कृषीमूल्य आयोग व भाजपचे शेतकरी नेते पाशा पटेल यांच्यावर जोरदार ताशेरे ओढले.

शेट्टी म्हणाले, 'आमदार मुश्रीफ यांनी भाजपमध्ये येण्यास नकार दिल्यानंतर त्यांच्यावर आयकर विभागाने छापा टाकला. मुश्रीफ यांच्यावर टाकलेले छापे उपद्रव देण्यासाठी टाकले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर टाकलेले छापे हे न उलगडणारे कोडे आहे. ईडी आणि आयकर विभाग केंद्र सरकारच्या तालावार नाचत असून मोदी, शहांचे दोन्ही विभाग निष्ठावान कार्यकर्ते असल्याप्रमाणे वागत आहेत.'

केंद्रीय कृषीमूल्य आयोग केंद्र सरकारचे बाहुले असल्याचा आरोप करताना शेट्टी म्हणाले, 'दोन वर्षापूर्वी आयोगाने प्रतिटन २०० रुपये वाढ करण्याची शिफारस केली. पण त्याचवेळी रिकव्हरीचा बेस ९.५० वरुन दहा टक्के केला. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात सरासरी १२.५० टक्के उतारा असताना प्रतिटन १८६ रुपयांचा तोटा त्यामुळे सहन करावा लागला. परिणामी केवळ १४ रुपयांची प्रतिटन वाढ येथील उत्पादकांना मिळाली. दोन वर्षात उत्पादन खर्चात वाढ झालेली असताना आयोगाच्या संकेतस्थळावर मात्र वाढ दाखवलेली नाही. रासायनिक खते, मजूर आणि इंधन खर्चात वाढ झालेली असताना कृषीमूल आयोग तडजोड करुन एकप्रकारे सरकारची सोय करत आहे. राज्य कृषीमूल्य आयोगाचा अध्यक्ष शेतकरी नेता झाल्यानंतर शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा होती. पण पाशा पटेल यांनी केंद्रीय आयोगाला शिफारस करताना उसाचा उत्पादन खर्च ३३२ रुपयांनी कमी झाल्याचा जावईशोध लावला आहे. उत्पादन खर्च कमी दाखवून २०२२ पर्यंत कागदावर उत्पादन दुप्पट दाखवण्याच्या केविलवाण्या प्रयत्नातून स्वप्न साकार केले जात आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शाही मराठा’घडविणार उद्योजक

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'मराठा समाजाने इतिहास, संस्कृतीची जपणूक करताना आता आधुनिकतेची कास धरावी. समाजात उद्ममशीलता वाढावी. तरुण पिढीने व्यापार, व्यावसायिक कौशल्ये अंगिकृत करुन स्वत:सह समाजाची उन्नती साधावी यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्याचे व समाजात नव उद्योजक घडविण्यासाठी कटिबद्ध राहू,' असा निर्धार शाही मराठा प्रांत करवीरतर्फे आयोजित 'स्नेह सभे'त करण्यात आला.

येथील नागाळा पार्क येथील जयलक्ष्मी सांस्कृतिक भवन येथे स्नेहसभा झाली. उदयसिंह घोरपडे-कापशीकर यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. 'शाही मराठा'चे संस्थापक रविराज निंबाळकर म्हणाले, 'मराठेशाहीच्या इतिहास प्रसिद्ध घराण्यातील वंशजांचा देशाच्या उभारणीत मोठे योगदान आहे. समाजाने बदलत्या काळाची पावले ओळखून उद्ममशील बनावे. उद्यमशीलतेचा वसा अंगिकारुन समाज व देश उभारणीत योगदान द्यावे. शाही मराठातर्फे समाजात मोठ्या प्रमाणात उद्योजक आणि करिअरप्रेरित तरुण घडविण्यासाठी कार्य केले जाईल. स्वत:ची उन्नती साधताना विकासाच्या प्रक्रियेत सर्व समाजाला सोबत घेऊन वाटचाल करण्याची समाजाची भूमिका आहे.'

विश्वजितसिंह खर्डेकर म्हणाले, 'शाही मराठाही ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा जपणारी व त्याचबरोबर आधुनिकतेची कास असलेली संघटना म्हणून कार्यरत आहे,' याप्रसंगी रामराव इंगळे यांचेही भाषण झाले. नेमराज नाईक निंबाळकर यांनी कृषीक्षेत्रासंबंधी मार्गदर्शन केले. राजेंद्रसिंह घोरपडे यांनी उद्योग, व्यवसायात यश कसे संपादन करावे, यासंबंधी चित्रफितीद्वारे सादरीकरण केले.

प्रारंभी रणजितसिंह चव्हाण यांच्या हस्ते निशाण पूजन व दौलतराव जाधव यांच्या हस्ते शस्त्र पूजन झाले. स्वागत अॅड. संग्रामसिंह नाईक निंबाळकर यांनी केले. कुणालसिंह यड्रावकर यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी शिवराजसिंह गायकवाड, स्वप्निल वाशीकर, अभय रणनवरे, हर्षल बेनाडीकर, मनीष महागावकर, विश्वजित किनवडेकर, विजयसिंह चव्हाण, व्यंकोजी नेसरीकर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाला ग्वाल्हेर, बडोदा, धार, सातारा येथील मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पोस्ट आपल्या दारी’ योजना जिल्ह्यात सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून 'पोस्ट ऑफिस आपल्या दारी' हा उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधीक्षक ईश्वर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. रक्षाबंधनाचे औचित्य साधून व सामाजिक बांधिलकी जपत फक्त एक रुपयात खाते उघडून बहिणीचा विमा उतरवता येणार आहे. या अंतर्गत एक बचत खाते, दोन लाखाचा विमा आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे खाते उघडण्याची संधी मिळणार आहे.

अधीक्षक पाटील म्हणाले, 'शुक्रवारपासून सुरू झालेला हा उपक्रम १५ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. या उपाक्रमांतर्गत प्रत्येक घर, प्रत्येक नागरिकाला पोस्टाशी जोडण्याचा प्रमुख उद्देश आहे. त्याचबरोबर भारत सरकारच्या वित्तीय समावेशन योजनेत सहभागी करुन लाभार्थी करायचे आहेत. रक्षाबंधनचे औचित्य साधून व सामाजिक बांधिलकी जपत फक्त एक रुपयात खाते उघडून बहिणीचा विमा उतरवता येणार आहे. या अंतर्गत एक बचत खाते, दोन लाखाचा विमा आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे खाते उघडण्याची संधी मिळणार आहे.'

या उपक्रमांतर्गत बचत खाते उघडणे, टपाल जीवन विमा व त्याचे फायदे लोकांपर्यत पोहचवण्यात येणार आहे. तसेच प्रधानमंत्री सुरक्षा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, अटल पेन्शन योजनेमध्ये जास्तीत-जास्त लोकांना सामावून घेण्याचा उद्देश आहे. सुकन्या समृध्दी योजना घरोघरी पोहचविणे, इंडिया पोस्ट पेमेंटस् बँकेबाबत जनजागृती करून खाती उघडणे, डिजिटल पेमेंटस् स्वीकारण्यासाठी सक्षम बनविणे, मेरा अभिमान सक्षम ग्राम योजनेतंर्गत जास्तीत-जास्त खेडी डिजिटल बनविणे याचा समावेश आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी आधार नोंदणी व अद्ययावतीकरणासाठी शिबीर घेण्यात येणार आहे. यावेळी शाखा व्यवस्थापक अमोल कांबळे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फिश मार्केटची इमारत जीवघेणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जवळपास ४० वर्षापूर्वी बांधलेल्या बिंदू चौकातील फिश मार्केटच्या इमारतीची दुरवस्था वाढत चालली आहे. स्लॅबमधील सळ्या गंजल्याने तुटून बाहेर येत असून त्यामुळे स्लॅबचे पडणारे तुकडे नागरिक तसेच विक्रेत्यांसाठी जीवघेणे ठरत आहेत. नवीन इमारतीसाठी महापालिकेने ४० टक्के निधी देण्यास मान्यता देऊनही ६० टक्के निधी मागणीसाठी दिलेल्या प्रस्तावावर मत्स्यव्यवसाय विभागाच्या राज्याच्या आयुक्तांकडून अजून निर्णय झालेला नाही.

बिंदू चौकातील मटण मार्केटच्या इमारतीपाठीमागे महापालिकेने फिश मार्केट बांधले. ही इमारत दरवाजांनी बंदिस्त केलेली नाही. त्यामध्ये काही गाळेच असल्याने कालांतराने आजूबाजूच्या परिसरात छोटे दुकानगाळेही काढण्यात आले. त्यामुळे या इमारतीमध्ये तसेच परिसरात नेहमी नागरिकांची वर्दळ असते. तसेच मासे विक्रेत्यांचीही मोठी संख्या असते. या इमारतीला जवळपास ४० वर्षे झाली आहेत. स्लॅब व पिलर इतकेच बांधकाम असलेल्या इमारतीचे हे दोन मुख्य भागच खराब झाले आहेत. दोन्हीचे गिलावे तर निघत आहेतच, शिवाय बांधकामाच्या सळ्या गंजल्या असल्याने तुटून बाहेर आल्या आहेत. या गंजलेल्या, तुटलेल्या सळ्यांमुळे स्लॅब कमकुवत झाला आहे. स्लॅबच्या प्रत्येक गाळ्यातील गिलावे निघण्याबरोबरच सळ्या तुटत आहेत. त्यामुळे स्लॅबचे ढपले पडत आहेत. परिणामी विक्रेते व नागरिकांच्या डोक्यावर ही सतत टांगती तलवार आहे. काही विक्रेत्यांनी स्वत: दुरुस्ती करुन घेतली आहे. पण ती काही भागाची असल्याने इतर इमारतीचा भाग खराब होत चालला आहे.

...

चौकट

निर्णय प्रलंबित

नगरसेवक ईश्वर परमार यांनी डिसेंबर २०१८ मध्ये महापालिकेच्या सभेसमोर प्रस्ताव ठेवून नवीन इमारतीसाठी ४० टक्के प्रमाणे ९९ लाख ९९ हजार रुपयांच्या खर्चाला मंजुरी घेतली आहे. तर पुढील निधीसाठी केंद्र सरकारच्या मत्स्यव्यवसाय विभागाकडे नीलक्रांती योजनेंतर्गत दीड कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यामध्ये अडीच कोटी रुपयांच्या निधीतून २५ गाळे बांधण्याचा डीपीआर आहे. मार्चमध्ये येथील सहाय्यक आयुक्तांकडून राज्याच्या आयुक्तांकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला आहे. त्यानंतर महापालिकेकडून पाठपुरावा केला जात असला तरी त्यावर निर्णय झालेला नाही. योग्य प्रस्ताव तसेच महापालिकेकडून आवश्यक निधीचा वाटा देण्याची मंजुरी असतानाही मंजुरी लांबली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘तपोवन हरित प्रभाग करणार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महानगरपालिका व वस्तू सेवा कर विभागाच्यावतीने तपोवन हा प्रभाग हरित प्रभाग करण्यासाठी येत्या रविवारपासून (ता. २८) १५०० झाडे लावण्याच्या उपक्रमाला सुरुवात केली जाणार आहे, असे नगरसेवक विजयसिंह खाडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यामध्ये गार्डन्स क्लब तांत्रिक सहाय्य देणार आहे.

राज्य सरकारने ३३ कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतला असून त्याअंतर्गत या दोन विभागांच्यावतीने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. याबाबत नगरसेवक खाडे म्हणाले, 'खुली जागा मोठ्या प्रमाणावर असल्याने तपोवन हा प्रभाग निवडण्यात आला आहे. यामध्ये चार ते सहा फूट उंचीची देशी झाडे लावण्यात येणार आहेत. या झाडांची जबाबदारी तेथील स्थानिकांवर देण्यात येणार आहे. तसेच झाडांच्या वाढीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. प्रभागात आठ खुल्या जागा असून त्यातील एकावर ऑक्सिजन पार्क तर एकावर औषधी वनस्पतींची लागवड केली जाईल. या उपक्रमात झाडे लावण्यासाठी न्यू कॉलेज ऑफ आर्किटेक्टचे विद्यार्थी, योगदान फाउंडेशनचे स्वयंसेवक, सर्व तरुण मंडळे, ज्येष्ठ नागरिक संघ, महिला बचत गट सहभागी होणार आहेत. २८ जुलै रोजी जागतिक वन संवर्धन दिनानिमित्त सकाळी दहा वाजता आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, उपायुक्त वैशाली काशिद, गार्डन क्लबच्या अध्यक्ष कल्पना सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य विजयसिंह सावंत, प्रा. वंदना पुसाळकर, प्रा. पल्लवी कुलकर्णी, वर्षा कारखानीस, शैला निकम आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ईव्हीएम हटावसाठी लाँगमार्च

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकशाहीवादी देशाची ओळख कायम राखण्यासाठी आपले मत आपण दिलेल्या उमदेवाराला जाते की नाही याची माहिती मिळण्याचा संपूर्ण अधिकार मतदाराला आहे. निवडणूक प्रक्रियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम मशिनमुळे लोकशाहीवादी लोकांमध्ये संभ्रम आणि संशय निर्माण झाला आहे. हा संभ्रम आणि संशय दूर करण्यासाठी देशातील सर्व निवडणुका मतपत्रिकेद्वारे घेतल्या पाहिजे. त्यासाठी 'ईव्हीएम हटाव' राष्ट्रीय आंदोलन हाती घेतले असून आंदोलनाचा भाग म्हणून ऑगस्ट क्रांतीदिनी आझाद मैदान ते चैत्यभूमीदरम्यान लाँगमार्च काढण्यात येणार आहे. शाहू स्मारक भवन येथे ईव्हीएमविरोधी राष्ट्रीय जनआंदोलन यांच्यावतीने 'ईव्हीएमचे सत्य' विषयावर आयोजित चर्चासत्रात हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी होते.

खासदार शेट्टी म्हणाले, 'निवडणुका पारदर्शक वातावरणात होतात का हे पाहण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे. निवडणुकीबाबत लोकांच्यामध्ये शंका असल्यास त्यांचे समाधान करण्याची जबाबदारी आयोगाची असताना आयोगाचे सदस्यच भितीच्या वातावरणात वावरत आहेत. त्यामुळे लोकशाहीवादी देश असे संबोधणे चुकीचे ठरेल. लोकसभा निवडणुकीदरम्यान आयोग दक्ष होता, तर ३७० मतदारसंघात झालेल्या मतांपेक्षा जास्त मतांची मोजणी झाली कशी? त्यामुळेच निकालामध्ये हेराफेरी झाल्याचे समोर येते. तांत्रिक करामती करुन सत्तेवर येणाऱ्या शक्तींना जनताच वठणीवर आणू शकते. त्यासाठी जनआंदोलन उभा करण्याची आवश्यकता आहे.'

राष्ट्रीय जनआंदोलनाचे संयोजक प्रा. धनंजय शिंदे म्हणाले, '२०१४ व १९ च्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड करुन सत्ता मिळवली. अशी सत्ता अनेक राज्ये, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्येही मिळवली आहे. नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांच्या बँकेत जमा झालेल्या पैशाचा वापर निवडणुकांमध्ये केला. निवडणुकीच्या माध्यमातून देशात ७१ वर्षात झालेला हा सर्वात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. कार्पोरेट कंपन्यांना मदतीचे धोरण राबवण्यासाठी यंत्रांचा वापर केला जात आहे. देशातील शेतकरी, मजूर, सर्वसामान्य घटक आणि पर्यावरण वाचवण्यासाठी ईव्हीएम हटवले पाहिजे.'

दिल्ली येथील सामाजिक कार्यकर्ते एम. खालिद म्हणाले, 'देशातील ७० टक्के नागरिक यंत्रांमध्ये छेडछाड होऊ शकते, या मतप्रवाहाचे आहेत. त्यांना विश्वासात घेण्यासाठी पुन्हा मतपत्रिकेद्वारे निवडणूक प्रक्रिया राबवली पाहिजे. लोकशाहीवादी देशात लोकांचा विश्वास बळकट करण्यासाठी पुन्हा मतपत्रिकेचा वापर करण्याची आवश्यकता आहे.'

यावेळी माजी आमदार संपतबापू पवार-पाटील, चंद्रकांत यादव, प्रा. जालंदर पाटील, पीटर चौधरी, दिलीप पोवार, रुपेश पाटील, रवींद्र मोरे, सतीशचंद्र कांबळे, नंदकुमार गोंधळी, पी. जी. भास्कर, बाबूराव कदम आदी उपस्थित होते. संदीप देसाई यांनी सूत्रसंचालन केले. भगवान काटे यांनी आभार मानले.

...

चौकट

ग्रामसभेत ठराव करण्याचे आवाहन

'ईव्हीएम हटाव मोहीम मूठभर आणि पराभूत उमेदवारांची चळवळ आहे, अशी हेटाळणी होऊ द्यायची नसेल तर, त्याला लोकचळवळीचे स्वरुप दिले पाहिजे. निवडणुकीनंतर गल्लीबोळात, कट्ट्यावर ईव्हीएमबाबत चर्चा होत आहे. पण त्याला व्यापक रुप देण्यासाठी १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेत ईव्हीएम हटाव असा ठराव केला पाहिजे. त्यातून लोकशाही वाचवण्यासाठी चळवळ सुरू असल्याचा संदेश जाईल. त्यासाठी सर्व गावांनी ग्रामसभेत ठराव करावा,' असे ‌आवाहन शेट्टी यांनी केले.

...

याविरोधात होणार लढा

५६ लाखांचा मतांचा हिशेब द्या

ईव्हीएमची मशिनची वाहतूक कशी केली?

मायक्रोचीपची माहिती द्या

२० लाख ईव्हीएम गेली कोठे?

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यशवंतराव चव्हाणांचा पुतळा उभारणार

$
0
0

फोटो आहे...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा पूर्णाकृती पुतळा जिल्हा परिषदेच्या परिसरात उभारण्यात येणार आहे. सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर झाल्यानंतर चबुतरा बांधकाम व सजावटीसाठी पाच लाख रुपये मंजूर केले आहेत. जि. प. चे पदाधिकारी, अधिकारी आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांची पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. त्याप्रसंगी पुतळा उभारणीसाठी जागेची पाहणी केली जाईल. दरम्यान पुतळा उभारणीच्या मान्यतेसाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानकडे दहा फूट उंचीचा ब्राँझचा पूर्णाकृती पुतळा तयार आहे. प्रतिष्ठानतर्फे हा पुतळा जिल्हा परिषदेकडे सोपविण्यात येईल. प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विजयसिंह पाटील, सदस्य बळीराम पोवार, सदस्य रमेश पोवार, माणिक मंडलिक, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, संभाजी पाटील यांनी मे महिन्यात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, गटनेते अरुण इंगवले यांची भेट घेऊन चर्चा केली होती. जिल्हा परिषदेच्या परिसरात, यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा उभा करण्यास सभागृहाने मान्यता द्यावी, अशी मागणी केली होती.

दरम्यान जून महिन्यात झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत हा ठराव मंजूर झाला. ठरावाला सदस्य हंबीरराव पाटील हे सूचक तर सदस्य प्रसाद खोबरे हे अनुमोदक आहेत. बांधकाम समिती व स्थायी समितीने असा ठराव मंजूर केला आहे. प्रतिष्ठानचे सदस्य अशोक पोवार म्हणाले, 'जि. प. ने पुतळा उभारणीचा ठराव मंजूर केला आहे. तसेच पुतळयासाठी चबुतरा व सजावटीसाठी पाच लाख रुपयांची तरतूद केली आहे. आठवडाभरात जिल्हा परिषदेत बैठक होणार आहे. त्यावेळी जागेची पाहणी करण्यात येईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘माध्यमिक’ ची खुर्ची अनेकांना सोडवेना

$
0
0

जिल्हा परिषद

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील माध्यमिक शिक्षण अधिकारी किरण लोहार यांच्या गैरकारभारात मदत केल्याच्या तक्रारी झाल्याने सहा कर्मचाऱ्यांची महिन्यापूर्वी बदली करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अमन मित्तल यांनी बदली आदेशावर सही केली. त्यानंतर २९ जून रोजी बदलीच्या ठिकाणी रूजू होण्याच्या कार्यवाहीचा आदेश सामान्य प्रशासन विभागाने 'माध्यमिक'मध्ये पाठवला. ते आदेशही दोन महिन्यांपासून तेथेच पडून आहेत. यामुळे सीईओ मित्तल यांच्या आदेशास केराची टोपली दाखवल्याचे स्पष्ट झाले आहे.

निमयबाह्य कामकाज, कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन करण्याचा आरोप असल्याने सहाजणांची बदली जिल्हा परिषद मुख्यालय सोडून करावी, असा ठराव गेल्या स्थायी समिती सभेत करण्यात आला. त्यानुसार सीईओ मित्तल यांनी त्यांच्या बदलीचा आदेश काढला. बदलीच्या ठिकाणी ते रूजू होत नसल्याने उलटसुलट चर्चा वेगावली आहे. 'माध्यमिक'च्या कामकाजाच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या समितीमधील एका सदस्यानेही या सहाजणांची बदली करू नये, असे प्रशासनास पत्र दिले आहे. यामुळे ही बदल्या थांबल्याची चर्चा आहे. बदली रद्द करण्यासाठी एका वरिष्ठ सहायकाने थेट डोंगरी भागातील आमदाराकडे धाव घेतला. त्या आमदारांनी जि. प. मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून बदली रद्द करण्यासंबंधी गळ घातली. उर्वरित पाच कर्मचारी शिक्षण संस्थांशी प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे संबंध असलेल्या जि. प. सदस्यांना हाताशी धरून दबाव आणत आहेत. परिणामी बदलीच्या आदेशावर सीईओ मित्तल यांनी सही करून दोन महिने झाले तरी एकाही कर्मचाऱ्याने माध्यमिक विभाग सोडलेला नाही.

...

बदलीचे ठिकाण असे

'माध्यमिक'मध्ये सध्या कार्यरत असलेल्या सहा कर्मचाऱ्यांची नावे व कंसात बदलीचे ठिकाण असे : कनिष्ठ सहायक दाजी पाटील, वरिष्ठ सहायक राजेंद्र घोटणे (पंचायत समिती, शिरोळ), वरिष्ठ सहायक अजित कणसे (पंचायत समिती, गगनबावडा), वरिष्ठ सहायक शिवाजी खटागंळेकर (पंचायत समिती, चंदगड), वरिष्ठ सहायक अभिजित बंडगर (पंचायत समिती, भुदरगड), आबासाहेब दिंडे (पंचायत समिती, शाहूवाडी).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारखानदारांना अडचणीतआणून भाजप प्रवेश : सुशीलकुमार शिंदे

$
0
0

कारखानदारांना अडचणीत

आणून भाजप प्रवेश : शिंदे

सोलापूर : 'साखर कारखान्यांच्या कर्जासाठी आर्थिक अडचणी निर्माण करून राजकीय नेत्यांना भाजपमध्ये घेतले जात आहे. त्यामुळे त्यांचा प्रवेश फार काळ टिकणार नाही,' अशी टीका माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केली आहे.

शिंदे सोलापूर दौऱ्यावर आहेत. काँग्रेस भवनात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार भाजपमध्ये येणार आहेत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्या बाबत बोलताना शिंदे म्हणाले, 'साखर कारखानदारांची अडचण केली जात आहे़. त्यांची कर्जे नियमित करण्याची आशा दाखवून त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जात आहे. अडचणीमुळे काहीजण पक्षांतर करीत आहेत, पण ते फार काळ टिकणार नाही, ज्यांनी प्रवेश केला त्यांच्या अडचणी सोडविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे भाजप प्रवेश करून पुन्हा अडचणीत आल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार राजीनामा देतील, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले होते. मात्र, आठवडाभरात एकाही आमदाराने राजीनामा दिला नाही, त्यामुळे त्यांच्या दाव्यात तथ्य नाही.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूमिपुत्रांना ७५ टक्के आरक्षण देऊ: पवार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

'आगामी विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आघाडी सरकार सत्तेत आल्यास स्थानिक तरुणांना नोकरीत ७५ टक्के आरक्षण देण्यात येईल,' अशी घोषणा राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. पवार शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर होते. विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले.

'गेल्या ३० वर्षांचा अनुभव पाहता आघाडीच्या १७५ जागा निवडून आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी सोबत जाण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा प्रयत्न आहे. वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी समंजस भूमिका घ्यावी,' असे आवाहनही पवार यांनी केले.

अजित पवार म्हणाले, 'अनेक ठिकाणी नोकरीसाठी जागा रिक्त असताना भरतीच्या बाबतीत जाणीवपूर्वक चालढकल करण्यात येत आहे. आताच नगरपरिषद, नगरपालिका आणि नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला आहे. पाच वर्षे या सरकारला कोणी थांबविले होते. निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून कॅबिनेटमध्ये असे निर्णय घेण्यात येत आहेत. राज्य सरकारकडून मते मिळविण्यासाठी अशा प्रकारचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. आज शेती आणि पाण्याचे नियोजन बिघडले आहे, त्याला सरकार आणि त्या विभागाचे अपयश कारणीभूत आहे.'

चौकशी टाळण्यासाठी पक्षांतर
'महाराष्ट्रात १५ आणि केंद्रात १० वर्षे आघाडीचे सरकार होते. मात्र जाणीवपूर्वक कोणाला ही सरकारने त्रास दिला नाही. मात्र, भाजप सरकार ठरवून विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी खेळी करीत आहे. काहींच्या चौकशा सुरू आहेत. काहींना साखर कारखान्यांसाठी पैसे हवे आहेत. काहींच्या पतसंस्था अडचणीत आहेत. काहींच्या कुकुटपालन संस्थेत गडबड आहे. एफआरपी दिलेली नाही. दूध संस्थांमध्ये गडबड आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षात राहिल्यास चौकशी करण्याचे धाडस अधिकारी करीत नाहीत. आता पक्षनिष्ठेला महत्त्व राहिले नाही,' असेही पवार म्हणाले.

शिवसेनेला टोला
'भाजप-सेनेची युती सत्तेत आहे, मात्र सतत ते एकमेकांना ढुसणी देत आहेत. ते एकमेकांविरोधात मोर्चे काढत आहेत. सरकारमध्ये असताना शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे मिळायला पाहिजेत असे म्हणायचे आणि ते मिळत नाहीत म्हणून मोर्चे काढायचे. सरकारमध्ये असणाऱ्यांनी मोर्चा काढायचा नसतो, अंमलबजावणी करायची असते. सरकारवर दबाव टाकून शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी आदेश दिला पाहिजे,' असेही अजित पवार म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोयनेत पावसाचे दमदार पुनरागमन

$
0
0

कोयनेत पावसाचे दमदार पुनरागमन

म. टा. वृत्तसेवा, कराड

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू झाला आहे. जलाशयात येणाऱ्या पाण्याची आवक १४ हजार २२४ क्युसेकने वाढली आहे. त्यामुळे सध्या धरणामध्ये ५४ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. धरण ५१ टक्के भरले आहे. दरम्यान, पाटण तालुक्यात सर्वदूर पाऊस सुरू आहे. जोरदार वारे आणि पाऊसामुळे हवेत गारठा निर्माण झाला आहे.

पाटण तालुक्यासह कोयना पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने दमदार सुरुवात केली आहे. विभागात पडणाऱ्या संततधार पावसामुळे घरातून बाहेर पडणे अवघड झाले असून, जनजीवन विस्कळित झाले आहे. गेल्या चोवीस तासांत कोयनानगर येथे ४७, नवजा ९४, महाबळेश्वर ७१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पाटण परिसरात पडत असलेल्या जोरदार पावसामुळे कोयना, केरा, मोरणा, वांग, काजळी, काफना या नद्यांसह ओढे तुडूंब भरून वाहू लागले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जैविक कचरा उघड्यावर टाकल्यास कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील चिकन व मटण विक्रेते जैविक कचरा उघड्यावर टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. यापुढे उघड्यावर जैविक कचरा टाकल्यास प्रशासकीय कारवाई करण्याचा इशारा महापालिका प्रशासनाने शुक्रवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला. पत्रकात म्हटले आहे, 'शहरातील मांस विक्रेते मांसविक्रीनंतर निर्माण होणारा जैविक कचरा उघड्यावर रस्त्यावर टाकतात. त्यामुळे दुर्गंधी निर्माण होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. यापुढे मांस विक्रीनंतर निर्माण होणाऱ्या जैविक कचऱ्याची साठवणूक करुन तो महापालिकेच्या वाहनांमध्ये टाकावा. हा कचरा वाहनात न टाकता अन्यप्रकारे विल्हेवाट लावल्यास महापालिका अधिनियमान्वये प्रशासकीय कारवाई करण्यात येईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबोलीला वाहिले पहिले पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

डफ आणि पिपाणीच्या गजर आणि गुलालाच्या उधळणीत शहरातील गल्ली बोळातून निघालेल्या आषाढ महिन्यातील त्र्यंबोली यात्रेच्या मिरवणुकीत पावसाने साज चढवला. टेंबलाई देवीला पहिले पाणी वाहण्यासाठी दिवसभर भाविक व कार्यकर्त्यांची गर्दी होती. टेंबलाई मंदिर परिसरात जत्रा भरली होती.

नदीच्या पाण्याची यात्रा, आषाढी यात्रा अशी ओळख असलेली त्र्यंबोली यात्रा शहरातील तालमी आणि मंडळाच्यावतीने सार्वजनिकरित्या साजरी केली जाते. आषाढ महिन्यातील मंगळवारी आणि शुक्रवारी यात्रेचे आयोजन केले जाते. आज शुक्रवारी शहरातील बहुतांशी मंडळांनी यात्रांचे नियोजन केले होते. मध्यरात्रीपासून यात्रेची तयारी सुरू होती. सकाळी सात वाजल्यापासून पिपाणी व डफाच्या वाद्यात नदीचे पाणी कळश्या आणि घागरीतून आणण्यासाठी गर्दी होती. डोक्यावर कळशी घेतलेल्या कुमारिकांची पारंपरिक वाद्याच्या गजरात गल्ली बोळात मिरवणुका काढण्यात आल्या. अंगावर पाऊस झेलत, गुलालाची उधळन करून तरुणाई यात्रेत रंगून गेली होती. अनेक मंडळांनी कावड, हातगाडी, कारमधून पाणी नेण्यात आले. तालमी आणि मंडळाच्या परिसरातील देवदेवतांना नदीच्या पाण्याचा जलाभिषेक करण्यात आला.

सकाळी दहा वाजल्यापासून बेंजो, बँन्डच्या तालावर मिरवणुका काढण्यात आल्या. शहरातील काही मंडळांनी नारळ्याच्या झावळ्यांनी सजवलेल्या बैलगाड्या आणल्या होत्या. काही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मर्दानी खेळही सादर केले. दिवसभर टेंबलाई मंदिराच्या मार्गावर गल्लीबोळातून आलेल्या मिरवणूकांमुळे काही काळ वाहतुकीची कोंडीही झाली होती.

टेंबलाई मंदिर परिसरात यात्रा भरली होती. शहरातील भाविकांनी घुगऱ्या, आंबिल, भाजी, भाकरी, वडीचा नैवेद्य देवीला दाखवला. नैवेद्य देण्यासाठी रांगा लागल्या होत्या. अनेक कुटुंबानी पावसापासून आडोसा शोधता आंबिल, घुगऱ्याचा आस्वाद घेतला. खेळण्यामध्ये बसण्यासाठी लहान मुलासह तरुण, तरुणींची गर्दी झाली होती. गरमागरम खाद्य पदार्थावर अनेकजणांनी ताव मारला. यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राजारामपुरी पोलिसांचा बंदोबस्त होता.

सायंकाळीही अनेक मंडळांनी जंगी मिरवणुका काढल्या. मिरवणुकीत गुलाल आणि पिवडीची उधळण करण्यात आली. रात्री उशिरार्यंत टेंबलाई परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. रात्री शहरातील निम्म्याहून अधिक भागात मासांहारी भोजणाचे बेत आखले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात संततधार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यात अनेक दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने शुक्रवारी जोरदार पुनरागमन केले. दिवसभर संततधार सुरू राहिल्याने हवेत प्रचंड गारवा निर्माण झाला. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार सुरू असल्याने धरणे आणि तलावातील पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. राधानगरी धरण ८२ टक्के भरले आहे.

दिवसभर सुरू असलेल्या संततधारने शहरातील जनजीवनावर परिणाम झाला. रस्त्यांवरील खड्डे, विकासकामासाठी जागोजागी केलेल्या खोदाईमुळे वाहनधारक आणि पादचाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. गेले आठ दिवस ऊन पावसाचा खेळ सुरू होती. पण शुक्रवारी सकाळपासून दमदार पावसाला सुरुवात झाली. दिवसभर पावसाच्या सरीसर सरी कोसळत होत्या. संततधारेमुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. विद्यार्थी आणि नोकरदार मंडळींनी घराबाहेर पडताना रेनकोट आणि छत्रीचा आधार घेतला होता. अनेकांनी चारचाकी बाहेर काढल्याने रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

शहरात महानगरपालिकेने जागोजागी ड्रेनेज लाइन, गटर, चेंबरची बांधकामे सुरू केली आहे. त्याचा फटका वाहतुकीला चांगला बसला. कसबा बावडा रोडवर खानविलकर पेट्रोल पंप ते महावीर कॉलेज हा रस्ता वाहतुकीसाठी बंद असल्याने महावीर कॉलेज ते जिल्हाधिकारी कार्यालय रस्त्यावर मोठा ताण पडला होता. त्यातच या रस्त्यावर गटारी बुजवल्याने पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यातून वाहने चालवताना वाहनचालकांना कसरत करावी लागत होती.

पावसाने नदीतील पाण्याची पातळी वाढली असून कसबा बावडा ते निगवे मार्गावरील राजाराम बंधारा दुसऱ्यांदा बंद झाला. जिल्ह्यातील एकूण आठ बंधारे पाण्याखाली असून पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली आहे. संततधारेमुळे धरणात मोठा पाणीसाठा होत असून, राधानगरी धरण काही दिवसांत धरण भरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोदे लघुप्रकल्प आणि जांबरे मध्यम प्रकल्प यापूर्वीच भरले आहेत.

धरणातील साठा

धरणाचे नाव टीमसी

कोयना ५३.५४

वारणा २२.३६

दूधगंगा १२.३४

राधानगरी ६.८६

तुळशी २.१९

०० ०० ००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लोकशाही पुरस्काराने एसपी देशमुख सन्मानित

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य निवडणूक आयोगातर्फे देण्यात येणारा पहिला 'लोकशाही पुरस्कार' कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते शनिवारी मुंबईत प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख उपस्थित होते.

मुंबईतील हॉटेल आयटीसी मराठामध्ये झालेल्या शानदार सोहळ्यात उपराष्ट्रपती नायडू यांच्या हस्ते डॉ. देशमुख यांना 'लोकशाही पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांनी गडचिरोली येथे कार्यरत असताना मुक्त व निर्भय वातावरणात निवडणुका पार पाडल्याबद्दल त्यांचा हा गौरव झाला. त्यांनी या भागात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न केले होते. डॉ. देशमुख यांनी यापूर्वी ठाणे, भंडारा, सातारा, पुणे, गडचिरोली येथे काम पाहिले आहे. पोलिसांसाठी विविध उपक्रम राबविले असून, दरोडेखोरांच्या टोळ्या, संघटित गुन्हेगारी मोडून काढण्यात त्यांचा हातखंडा आहे. एप्रिल २०१८ ला गडचिरोली येथे झालेल्या नक्षलवादीविरोधी कारवाया त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्या. त्यांनी आजपर्यंत अनेक गुंतागुंतीच्या गुन्ह्यांची उकल केली आहे. महाराष्ट्र आणि गोवा येथील मटका बुकीचालकांची पाळेमुळे उखडली आहेत. कोल्हापुरातील ४० पेक्षा जास्त सराईत गुन्हेगारी टोळ्यांना त्यांनी मोक्का लावला आहे. त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन सरकारने त्यांना यापूर्वी पोलिस महासंचालक यांचे पदक प्रदान केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भिक नको, त्यागाचे मोल द्या

$
0
0

फोटो आहे...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

माजी नगरसेवकांनी आयुष्यातील काही वर्षांचा त्याग करुन समाजसेवा केली. त्यांनी केलेल्या त्यागाची भरपाई निवृत्तिवेतनातून करावी. त्यातून त्यांचा चरितार्थ चालणार नसला, तरी सन्मान मिळेल. त्यांना भीक नको, तर सन्मान हवा, अशी भावना व्यक्त करत निवृत्तिवेतन मिळण्यासाठी राज्य सरकारकडे ठराव पाठविण्याचा ठराव मेळाव्यात केला. शनिवारी माजी नगरसेवकांचा शाहू स्मारक भवन येथे मेळावा झाला. अध्यक्षस्थानी माजी महापौर अॅड. महादेवराव आडगुळे होते.

अॅड. आडगुळे म्हणाले, 'खासदार-आमदारांना मिळणाऱ्या निवृत्तिवेतनास आमचा विरोध नाही. मात्र, त्यांना मिळत असले, तर नगरसेवकांना का नाही? महापालिका अधिनियम १९४९ नुसार आयुक्तांना सर्वाधिकार मिळाले आहेत. महापौर किंवा स्थायी समितीला कोणतेही अधिकार नाहीत. त्यामुळे अधिनियमामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे.'

माजी नगरसेवक संघटनेचे अध्यक्ष अनिल कदम म्हणाले, 'माजी नगरसेवकांना निवृत्तिवेतन देण्यासाठी २०१४ मध्ये महासभेत ठराव झाला. त्यानंतर राज्यातील २६ महापालिकांमध्ये अशाच प्रकारचा ठराव केला. पण राज्य सरकारने त्याची दखल घेतली नाही. खासदार-आमदारांना ज्याप्रमाणे निवृत्तिवेतन व वैद्यकीय सेवा दिल्या जातात. त्याच सुविधा नगरसेवकांना मिळाल्या पाहिजेत.'

यावेळी माजी महापौर सुलोचना नाईकवाडे, माजी नगरसेवक अशोक भंडारी, प्राथर्ना समर्थ, माणिक मंडलिक यांनी मनोगत व्यक्त केले. विलासराव सासने यांनी ठरावाचे वाचन केले. महापालिका सभागृहात केलेल्या ठरावाची माहिती घेण्यासाठी सोमवारी (ता. २९) महापौर माधवी गवंडी यांची शिष्टमंडळ भेट घेणार आहे.

मेळाव्यास माजी महापौर मारुतराव कातवरे, आर. के. पोवार, शिरीष कणेरकर, चंद्रकांत सांगवाकर, संभाजी देवणे, उदय पोवार, चंद्रकांत साळोखे, सुरेश सुतार, सुजय पोतदार, शेखर जुगळे, हिराचंद ओसवाल,

००००

चौकट

आम्हाला नाही, तर कोणालाच नाही

'माजी नगरसेवक एकसंध नसल्याचा फटका बसला आहे. त्यांना निवृत्तिवेतन देण्यासाठी यापूर्वी सभागृहात ठराव झाले, पण नोकरशाहीने ठरावाची अंमलबजावणी केली नाही. खासदार, आमदारांना निवृत्तिवेतन मिळत असेल तर माजी नगरसेवकांना का नाही? आम्हाला नाही, तर कोणालाच नाही.' असा पवित्रा माजी नगरसेवक दिलीप शेटे यांनी घेतला.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तर कागलमध्ये ६४ हून अधिक उमेदवार रिंगणात

$
0
0

कागलमध्ये ६४ हून अधिक उमेदवार रिंगणात

ईव्हीएमविरोधात सर्व पक्ष एकवटत आहेत. ईव्हीएम घोळाविरोधात मुंबईत मोर्चा निघणार आहे. आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात ही मागणी आहे. एका मतदारसंघात ६४पेक्षा अधिक उमेदवार असतील तर तेथील निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याचा नियम आहे. त्या नियमावलीचा अभ्यास सुरू आहे. कागलमधील निवडणूक बॅलेट पेपवरवर झाली पाहिजे यासाठी ६४ हून अधिक उमेदवार रिंगणात उतरविण्याची आमची तयारी आहे.

- आमदार हसन मुश्रीफ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी आमदार भरमू पाटील आज भाजपमध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत चंदगडचे माजी आमदार भरमू सुबराव पाटील आज, रविवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील माजी नगरसेवक, डॉक्टर, वकील, सीएसह ५०० कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात सकाळी दहा वाजता प्रवेश सोहळ्याचा कार्यक्रम होणार आहे.

माजी आमदार पाटील हे सध्या काँग्रेसमधून असून भाजप-शिवसेना युती सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते. पाटील यांच्यासमवेत त्यांचे चिरंजीव गोकुळचे संचालक दीपक पाटील, स्नूषा माजी जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती ज्योती पाटील प्रवेश करणार आहेत. त्यांच्या गटाचे चंदगड पंचायत समितीचे सभापती बबनराव देसाई, उपसभापती विठाबाई मुरुक्टे, जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ यांच्यासह कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत. कोल्हापुरातील माजी नगरसेवक अजिंक्य चव्हाण, दिवंगत रामभाऊ चव्हाण यांचे चिरंजीव, म्हाडाचे सदस्य अजित चव्हाण, तटाकडील तालमीचे राजेंद्र जाधव, विराज चिखलीकर यांच्यासह ५०० कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस महासंचालकांच्या पथकाकडून तपासणी

$
0
0

तीन पोलिस ठाण्यांसह मुख्यालयाच्या कामकाजाचे मूल्यांकन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्याचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल यांच्या मुंबईतील सहाजणांच्या पथकाने कोल्हापूर पोलिसांच्या कामकाजाची तपासणी केली. गेले दोन दिवस तळ ठोकून असलेल्या पथकाने जुना राजवाडा, पन्हाळा, शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यांसह मुख्यालयास भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. हा तपासणी अहवाल त्यांनी महासंचालक जायस्वाल यांना सादर केला.

पोलिस महासंचालकपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर जायस्वाल प्रथमच १७ जुलैला कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार होते. मात्र, काही कारणास्तव त्यांचा दौरा रद्द झाला. दरम्यान, जायस्वाल यांचे सहाजणांचे पथक दोन दिवसांपूर्वी मुंबईहून कोल्हापुरात दाखल झाले. पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांची भेट घेऊन त्यांनी पहिल्यांदाच जुना राजवाडा पोलिस ठाण्यास भेट देऊन येथील गुन्ह्यांच्या रेकॉर्डची माहिती घेतली. त्यानंतर पन्हाळा, शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यास भेट देऊन रेकॉर्ड तपासले. पोलिस मुख्यालयातील सर्व विभागांच्या प्रमुखांकडून माहिती घेत फायलींची तपासणी केली. या पथकाने पोलिस ठाण्यांतर्गत कामकाजाचे मूल्यांकन केले. दोन दिवस तपासणी झाल्यानंतर पथक मुंबईला परतले. त्यांनी तपासणी अहवाल जायस्वाल यांना सादर केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images