Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

मराठीत कागदपत्र दिल्याने निलंबन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, बेळगाव

कानडीकरणाचा वरवंटा सीमाभागात अधिकच तीव्र होत असून, एका ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्याने ग्रामपंचायतीच्या नोटिसा, पावत्या, पत्रे मराठीत दिल्याबद्दल त्याला तत्काळ निलंबित करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनहळ्ळी यांनी काढला आहे.

कन्नड प्राधिकरणाची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडली. हिंडलगा ग्रामपंचायतीत कन्नडऐवजी मराठीतून व्यवहार सुरू असून, कन्नड भाषा शासकीय कामकाजात वापरण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, अशी तक्रार कन्नड प्राधिकरणाचे सदस्य अनंतकुमार ब्याकुड यांनी केली. कर भरणा पावत्या, नोटिसा तसेच कागदपत्रे मराठीत दिली जातात, असेही ब्याकुड यांनी सांगितले. त्यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा पंचायतीच्या उपसचिवांना हिंडलगा ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा आदेश बजावला.

सर्व व्यापारी आस्थापनांवरील फलक कन्नड भाषेतच लिहिले पाहिजेत. कन्नडबरोबर अन्य भाषेत फलक असेल तर सगळ्यांत मोठ्या आकारात कन्नडमध्ये लिहिले पाहिजे. या नियमाचे कुणी उल्लंघन करत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. निपाणी, चिकोडी भागातही कन्नडमधून सगळे व्यवहार करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करा, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना सांगितले. बैठकीला प्राधिकरण सदस्य, अधिकारी उपस्थित होते.

गेल्या साठ वर्षांपासून हिंडलगा ग्रामपंचायतीत मराठीतून कारभार चालतो. सर्व कारभार मराठीत करण्यासाठी ग्रामपंचायतीने ठरावही केला आहे. सरकारने कन्नड भाषेत व्यवहार करण्यासाठी सक्ती करू नये. सक्ती झाल्यास त्या विरोधात दाद मागू, अशी प्रतिक्रिया हिंडलगा ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र कुद्रेमनीकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आरटीई प्रवेशाचीतिसरी फेरी सुरू

$
0
0

कोल्हापूर : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम अंतर्गत २५ टक्के विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या प्रवेश फेरीस गुरुवारपासून सुरुवात झाली. आजपासून १८ जुलैपर्यंतच्या कालावधीत शाळांमध्ये प्रवेश निश्चित न केल्यास त्यांना पुन्हा संधी दिली जाणार नाही. त्यामुळे पालकांनी शाळा प्रवेशाविषयी काळजी घ्यावी. पालकांनी, मुदतीत शाळा पडताळणी समितीकडून कागदपत्रे तपासून शाळेमध्ये प्रवेश निश्चित करावा असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी केले आहे. आरटीई अंतर्गत प्रवेशाच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांच्याकडून दहा जुलै रोजी तिसरी लॉटरी काढण्यात आली. तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी विद्यार्थी निवड यादी आरटीई पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोटा २ सिंगल पट्टा

$
0
0

जीएसटीवर कार्यशाळा

कोल्हापूर : एम. बी. डी. इन्फोटेकतर्फे 'टॅली व जीएसटी आर नऊ' या विषयावर शनिवारी (ता. १३) कार्यशाळा आयोजित केली आहे. कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशनच्या रामभाई सामाणी हॉल येथे दुपारी चार ते सहा या वेळेत कार्यशाळा होणार आहे. ही कार्यशाळा मोफत असून त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन अभिजित भोसले यांनी केले आहे.

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजारामपुरी जनताबझार चौक पाण्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहर आणि परिसरात गुरुवारी दिवसभर पावसाची संततधार राहिल्याने सखल भागातील रस्ते जलयम झाले. राजारामपुरी जनता बझार चौकात नाल्याचे पाणी रस्त्यावरून वाहत राहिले. यातून वाहने चालविताना चालकांना कसरत करावी लागत होती.

पहाटेपासूनच पावसाच्या जोरदार सरी कोसळत राहिल्या. संततधार पावसामुळे शहरातील सर्व ओढे, गटर्स तुडुंब होऊन वाहू लागले. राजारामपुरीतील प्रमुख रस्ता आणि जनता बझार चौकात मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर आले. या परिसरास ओढ्याचे स्वरूप आले होते. महापालिका प्रशासनाने तेथील नाल्याची सफाई, पाणी निचऱ्याची सुविधा चांगली न केल्याने पाणी रस्त्यावर आल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. कसबा बावड्यातील लाइन बझारमधील सेवा रुग्णालयाजवळील चौकात गटारात पाणी रस्त्यावरून वाहत राहिले.

भूमिगत पाइपलाइनसाठी खोदाई केल्याने लाइन बाजारमधील रायगड कॉलनी, जाधव पार्क आदी परिसरात चिखल निर्माण झाला आहे. नागाळा पार्कमधील कागलकर हाउस परिसरात पाणी तुंबल्याने संरक्षण भिंतीतून ते बाहेर पडले. जिल्हाधिकारी परिसर, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, शिवाजी चौक, ताराबाई पार्क, कदमवाडी यांसह सर्वच उपनगर परिसरातील सखल भागात पाणी तुंबून राहिले.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोकुळ शिरगावमधील खुनाचे धागेदोरे हाती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथील खापरे मळ्यात फेब्रुवारीमध्ये संकपाळ यांच्या घरावर दरोडा टाकून दरोडेखोरांनी मीना विठ्ठल संकपाळ (वय ५५) यांचा खून करून दीड लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलिसांच्या हाती धागेदोरे लागले असून पाच महिन्यांच्या तपासाला यश आल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी संशयित पसार झाले होते. दरोडा टाकलेल्या टोळीला लवकरच अटक केली जाणार आहे.

खापरे मळा येथे दोन फेब्रुवारी रोजी पहाटे तीन वाजता दरोडेखोरांनी खिडकीचा दरवाजा कटावणीने उचकटून घरात प्रवेश केला होता. त्या वेळी त्यांना विरोध करणाऱ्या मीना आणि विठ्ठल संकपाळ यांना चोरट्यांनी मारहाण केली होती. आरडाओरडा करणाऱ्या मीना यांच्या डोक्यात लोखंडी कटावणी घातल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. दरोडेखोरांनी कपाटातील ७६ हजारांची रोकड आणि ३० हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र, अंगठी असा सुमारे दीड लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणाचा तपास गोकुळ शिरगाव पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा असा सयुंक्तपणे सुरु आहे. पोलिसांच्या हाती संशयितांची नावे निष्पन्न झाली असल्याचे समजते. करवीर विभागाच्या एका पथकाने गेल्या महिन्यात संशयितांच्या घरावर छापे टाकले होते. मात्र ते पसार झाले होते. गेल्या आठवड्यात या प्रकरणातील मुख्य संशयिताचे नाव निष्पन्न झाले असून त्याच्या घरावर नजर ठेवली आहे. दरम्यान, 'संशयित दरोडेखोरांची माहिती मिळाली असून त्यांचा शोध सुरु केला आहे. त्यासाठी पथके रवाना केली असून लवकरच ते सापडतील. हुलकावणी देऊन पसार झालेल्या संशयितावर एका पथकाची देखरेख आहे,' असे पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अहल्यादेवी अध्यासन सुरू करा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

'पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या नावाने अध्यासन सुरू करण्यास राज्य सरकार निश्चित परवानगी देईल आणि त्यासाठी आवश्यक निधीही देईल. त्याचबरोबर विद्यापीठाच्या विस्तारीकरण आराखड्यालाही टप्प्याटप्याने आवश्यक निधीही दिला जाईल,' असे आश्वान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे दिले. 'मात्र, प्रत्येक विद्यापीठाने विस्तारीकरणाबरोबरच गुणवत्ता विकासाकडेही लक्ष देण्याची गरज आहे,' अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची प्रशासकीय इमारत आणि परीक्षा भवनाच्या इमारतीचा पायाभरणी समारंभ गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. राज्याचे सहकार, मदत व पुनर्वसनमंत्री सुभाष देशमुख, सार्वजनिक आरोग्य, परिवहन व राज्य उत्पादन शुल्क राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस आदी व्यासपीठावर होते.

मुख्यमंत्री म्हणाले, 'सध्या सेवा क्षेत्रात रोजगारसंधी वाढत आहेत. हे क्षेत्र विस्तारत असताना त्यांना लागणारे कुशल मनुष्यबळ विद्यापीठांनी तयार केले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी फाइव्ह ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेची कल्पना मांडली आहे. येत्या पाच वर्षांत त्या दिशेने काम होऊन अधिकाधिक गुंतवणूक देशात होईल, असा विश्वास आहे. शहरांबरोबरच ग्रामीण भागात पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम आता सुरू आहे. विद्यापीठांनी हा बदल ओळखून त्यासाठीचे आवश्यक अभ्यासक्रम समाविष्ट केले पाहिजेत.'

'मूलभूत संशोधन क्षेत्रात अधिक काम करण्याची गरज असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, आपल्या देशातील ज्ञान कधी सुविधांमध्ये अडकले नाही. नालंदा व तक्षशिला सारखी विद्यापीठे त्याकाळी आपल्या देशात होती. शल्यचिकित्सा, खगोलशास्त्र अशा विषयांचा अभ्यास त्याकाळी केला गेल्याचे दिसते. विद्यापीठांनी आता डॉक्टरेट मिळवणाऱ्या संशोधन प्रकल्पांचा खरोखरच किती फायदा विद्यार्थ्यांना होतो, हे तपासले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. त्यामुळेच आता विद्यापीठाची जबाबदारी वाढली आहे,' असेही फडणवीस म्हणाले.

कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी प्रास्ताविकात विद्यापीठामार्फत सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कुलसचिव डॉ. विकास घुटे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालखी १

$
0
0

पंढरपुरात बारा लाख भाविक दाखल

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

आषाढी एकादशीच्या महासोहळ्यासाठी पंढरीत जवळपास बारा लाख भाविक दाखल झाले आहेत. श्री विठ्ठल रूक्मिणीची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरच्या पुढे गेली आहे. शुक्रवारी एकादशी दिवशी पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्रींची महापूजा करणार असून, गुरुवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांचे पंढरीत आगमन झाले आहे. गुरुवारी दशमीदिवशी पंढरी वारकऱ्यांनी फुलून गेली आहे. सर्वत्र हरिनामाचा गजर सुरू आहे. संतांच्या पालख्या वाखरीतून सायंकाळी येथे दाखल झाल्यानंतर शहरात गर्दी आणखी वाढली आहे. सर्व मठ, हॉटेल, धर्मशाळा, हॉल आणि मंदिर परिसरातील घरेही हाऊसफुल्ल झाली आहेत. मोकळ्या जागांवर सर्वत्र वारकऱ्यांच्या राहुट्या आणि तंबू दिसून येत आहेत.

गुरुवारी वाखरी संतभेटीचा कार्यक्रम झाल्यानंतर संतांच्या सर्व पालख्यांनी पंढरीकडे प्रस्थान ठेवले. सायंकाळी पालख्या पंढरीत दाखल झाल्यानंतर पालख्यांच्या स्वागतासाठी इसबावी येथे पंढरपूरकरांनी मोठी गर्दी केली होती. पालख्या व दिंड्यांसमवेत पायी चालत आलेले आणि बस व रेल्वेच्या माध्यमातून लाखो वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत. शुक्रवारी पहाटे दोन वाजता मुख्यमंत्री फडणवीस हे सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा करणार असून, त्यांच्यासमवेत राज्य मंत्रिमंडळातील अनेक सहकारी उपस्थित राहणार आहेत. यंदा महापूजेचा वेळ कमी करण्यात आल्याने एकादशी दिवशी जास्त भाविकांना विठ्ठलाचे दर्शन घेता येणार आहे. मुख्यमंत्र्यांचे गुरुवारी सायंकाळी पंढरीत आगमन झाले असून, त्यांच्या उपस्थितीत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. एकादशीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, सर्वत्र मोठा बंदोबस्त तैनात आहे. 'सीसीटीव्ही'च्या माध्यमातूनही नजर ठेवण्यात येत आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील व अतिरिक्त अधीक्षक अतुल झेंडे हे येथे तळ ठोकून आहेत.

भाविकांच्या सोयीसाठी मंदिर समितीतर्फे विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली दर्शन रांगेत शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जात आहे. दशमी, एकादशी व द्वादशी या तीन दिवशी रांगेत चहा, उपवासाचे पदार्थ व अल्पोपहार दिला जात आहे. रांगेत अन्नछत्रही उघडण्यात आले आहे. अन्य संस्थांही यासाठी सहकार्य करीत आहेत.

चंद्रभागा वाळवंटात भाविकांची मोठी गर्दी असून स्नानासाठी झुंबड उडत आहे. येथे भक्त पुंडलिकांच्या दर्शनासाठी ही रांगा लागत आहेत. नदीच्या पैलतिरावर साकारण्यात आलेल्या भक्तिसागर ६५ एकरातील सर्व प्लॉट आता दिंड्यांना देण्यात आले आहेत. येथे किमान दीड लाख भाविक उतरले असावेत असा अंदाज आहे. तीन रस्त्यापर्यंत या भागात व्यापार्‍यांनी दुकाने थाटली आहेत. शहरात ही मोठ्या प्रमाणात परगावचे व्यापारी व्यवसायासाठी आले आहेत. जागा मिळेल तेथे त्यांनी आपली दुकानं थाटली आहेत.

संतांच्या पालख्या विठुरायाच्या नगरीत दाखल

महाराष्ट्रासह इतर राज्यातून लाखो वैष्णवांना घेवून आषाढी वारीस माहेरच्या ओढीने पंढरीस निघालेल्या संत ज्ञानदेव, संत तुकाराम, संत निवृत्तिनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई, संत एकनाथ यांच्यासह सुमारे १०० संतांच्या पालख्या सायंकाळी विसावा पादुका येथील शेवटचा विसावा घेवून रात्री उशिरा पंढरीत दाखल झाल्या. पंढरपूर नगरवासियांच्यावतीने संतांसह आलेल्या वैष्णवांचे मोठ्या उत्साही व भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. संतांच्या पालख्या आज दुपारी भोजनानंतर वाखरीचा निरोप घेवून शेवटच्या पंढरपूर मुक्कामासाठी मार्गस्थ झाल्या. वाखरी तळावर संतांच्या दर्शनासाठी लाखो वैष्णवांनी गर्दी केली होती. प्रत्येकाला विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागली होती. दुपारी १ वाजता श्री संत नामदेव महाराज हे पांडुरंंगाचे निमंत्रण घेवून वाखरीत दाखल झाले. त्यानंतर या मानाच्या पालख्या पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाल्या. वाखरी ते पंढरपूर हा भक्तीमार्ग टाळ, मृदुंगाच्या गजरात व हरिनामाच्या जयघोषात दुमदुमून गेला होता. पंढरपूर हाकेच्या अंतरावर राहिल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साह संचारला होता.

श्री संत सोपानकाकांचा पालखी सोहळा दुपारी दीड वाजता पंढरीकडे मार्गस्थ झाला. सायंकाळी साडे तीन वाजता हा सोहळा विसावा पादुका मंदिराजवळ पोहोचला. त्यानंतर सायंकाळी ३.४५ वाजता निवृत्तीनाथ, सायंकाळी ४ वाजता एकनाथ महाराज, सायंकाळी ४.३० वाजता तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पोहोचला. यावेळी पालखी सोहळ्यातील शेवटचे उभे रिंगण मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात पार पडले. सर्वात शेवटी दुपारी अडीच वाजता वाखरीहून निघालेला श्री संत ज्ञानराजांचा पालखी सोहळा वाखरीचा ओढा पार करून पुरंदरे मळ्याजवळ पोहोचला. येथे माउलींची पालखी मुख्य रथातून उतरवून ती भाटेच्या रथात ठेवण्यात आली. हा रथ ओढण्याचा मान परंपरेप्रमाणे वडार समाजाला असल्याने या समाजातील बांधवांनी हा रथ ओढत इसबावी येथील पादुका मंदिरापर्यंत आणला. सायंकाळी ५.१५ वाजता हा सोहळा इसबावी येथे पोहोचला. यावेळी हजारो भाविकांनी खारीक, बुक्याची मुक्तपणे उधळण करीत माउलींचे दर्शन घेतले. शेकडो किलोमीटर चालून न थकता, न दमता पंढरीच्या सावळ्या विठूरायाला पाहण्यासाठी आसुसलेल्या वारकर्‍यांच्या चेहर्‍यावरचा आनंद पंढरी समीप आल्याने ओसंडून वाहत होता.

इसबावी येथे पंढरपूर नगरपालिकेच्यावतीने सर्व संतांच्या पालखी सोहळ्यांचे मोठ्या उत्साही व भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले. पालखी सोहळ्यातील शेवटचे उभे रिंगण माउली.. माउली नामाच्या जयघोषात पार पडले. हे रिंगण पाहण्यासाठी लाखो भाविकांनी रस्त्याच्या दुतर्ङ्गा गर्दी केली होती. आरतीनंतर श्री ज्ञानराजांच्या पादुका श्रीमंत ऊर्जीतसिंह शितोळे सरकार यांच्या हातात देण्यात आल्या. उजव्या हाताला वासकर तर डाव्या हाताला सोहळ्याचे मालक आरङ्गळकर यांना घेवून शितोळे सरकार श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीकडे मार्गस्थ झाले.

...तर कृत्रिम पाऊस!

'राज्यातील अनेक भागात सध्या पावसाने ओढ दिल्याने हवामान खात्याच्या सुचनेनंतर लगेच कृत्रिम पावसाचे प्रयोग केले जातील,' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरात सांगितले. गुरूवारी रात्री विश्रामगृहावर सकल मराठा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांना शिवमुद्रा देवून गौरविण्यात आले. मराठा समाजाला मिळालेले आरक्षण त्यांच्या एकीमुळे मिळाले असून, आपण फक्त कर्तव्य पार पाडल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले. मराठा धनगर समाजासह इतर समाजाचे राहिलेले प्रश्नही सोडविले जातील, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले. पुढच्या वर्षीही मीच पुजेला येणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंदोलनाचा इशारा

$
0
0

कोल्हापूर : राष्ट्रीय स्वंयसेवक संघा समावेश असलेले पुस्तक अभ्यासक्रमातून वगळावे, अन्यथा सरकार विरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ऑल इंडिया स्टुडंटस फेडरेशनतर्फे बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे दिलेल्या निवेदनातून दिला. निवेदनात म्हटले आहे, नागपूर विद्यापीठने बी. ए. च्या अभ्यासक्रमात 'संघाचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान' या प्रकरणाचा समावेश केला आहे. यातून विद्यार्थ्यांसमोर आरएसएसचा खोटा इतिहास जात आहे. हा धडा वगळावा. निवेदन देताना गिरीश फोंडे, प्रशांत आंबी, हरीश कांबळे, आरती रेडेकर, योगेश कसबे, सुनील कोळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उपवासाच्या पदार्थांना महागाईचा तडका

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

आषाढी एकादशीसह उपवासांच्या पदार्थांना महागाईची झळ पोहोचली आहे. शेंगदाणा, शेंगतेल, शाबू, वरीच्या दरात चांगलीच वाढ झाली असून शेगंदाणा दहा रुपयांनी महागला आहे. त्यामुळे भाविकांना साबुदाणा खिचडी, वरीचा भात, शेंगदाणा पिठलं खाण्यासाठी जादा पैसे खर्च करावे लागणार आहेत.

आषाढी एकादशीदिवशी घरोघरी उपवास केला जातो. उपवासाचे साहित्य खरेदीसाठी गुरुवारी ग्राहकांची बाजारात गर्दी होती. शेंगदाण्याच्या दरात प्रतिकिलो दहा रुपयांनी वाढ झाली असून प्रतिकिलो ११० ते १२० दराने शेंगदाण्याची विक्री झाली. गेल्या चार महिन्यांत साबुदाण्याच्या दरात तब्बल ३५ ते ४० रुपयांनी वाढ झाली आहे. साबुदाण्याचा दर प्रतिकिलो ८४ रुपये होता तर वरीच्या दर ९२ रुपये आहे. वरीच्या दरात गेल्या दोन महिन्यांत २० ते २५ रुपयांनी वाढ झाली आहे. ग्राहकांकडून दुकानदारांकडे साबुदाणा, वरी, शेंगदाण्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली.

उपवासाचे पदार्थ शेंगदाणा तेलात तयार केले जातात. शेंगदाणा खाद्यतेलाच्या दरात पाच रुपयांनी वाढ झाली आहे. प्रतिकिलो १३० रुपये दर आहे. राजिगिरा लाडू उपवासाला खाल्ला जातो. प्रतिकिलो १०० रुपये राजगिऱ्याचा दर होता. तयार राजिगिरा लाडू पॅकेटचा दर २० रुपये आहे. तयार वरीच्या पिठाचा दर १२० रुपये असला तरी पावसाळ्यात त्याची खरेदी फारशी होत नाही.

साबुदाणा खिचडी तयार करण्यासाठी बटाटा, मिरची आणि कोथंबिर लागते. कोथंबिरीची आवक कमी असल्याने प्रति पेंडीचा दर २० ते ५० रुपये आहे. तर हिरवी मिरचीचा दर प्रतिकिलो ४० ते ८० रुपये आहे. बटाट्याचा दर प्रतिकिलो २० ते २५ रुपये असल्याने हा दर ग्राहकांच्या आवाक्यात आहे. केळी, डाळींब, तोतापुरी आंब्यालाही मागणी आहे. तयार साबुदाणा खिचडीचा दर प्रति प्लेट ३० ते ६० रुपये इतका आहे. बटाटा वेफर्स, साबुदाणा चकली, बटाटा वेफर्स फिंगर्स चिप्स, कुंदा हे पदार्थ बेकरी व्यावसायिकांकडून उपलब्ध केले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामविकास अधिकारी लाच घेताना जाळ्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

तिळवणे (ता. हातकणंगले) येथील ग्रामविकास अधिकारी आण्णाप्पा बाळू कुंभार व पंटर राजेंद्र पोपट कांबळे (रा. कसबा सांगाव, ता. कागल) यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाली.

याबाबत अधिक माहिती अशी, एका व्यावसायिकाला हायड्रोलिक मशिनरीच्या व्यवसायासाठी लाइट कनेक्शन घ्यायचे होते. लाइट कनेक्शन व प्रदूषणासंदर्भात ग्रामपंचायतीकडून ना हरकत दाखला आवश्यक होता. या दोन्ही दाखल्यांसाठी संबंधित व्यावसायिक पाठपुरावा करत होता. या दोन दाखल्यांसाठी ग्रामविकास अधिकाऱ्याने १५ हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती त्यांनी १२ हजार ५०० रुपयाला दाखले देण्याची तयारी दर्शविली. या प्रकरणी तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. गुरुवारी, अधिकाऱ्यांनी सापळा रचून १२ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना कुंभार व कांबळे यांना रंगेहाथ सापडले. संबंधितांकडून लाचेच्या स्वरुपात स्वीकारलेली रक्कम जप्त करण्यात आली आहे. ग्रामविकास अधिकारी कुंभार हे मूळचे कसबा सांगाव येथील आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूखंडांच्या माध्यमातून भाजपकडे बक्कळ पैसा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'भूखंडांच्या माध्यमातून भाजप नेत्यांनी पैशाचे बक्कळ श्रीखंड मिळवले आहे. या पैशाच्या जोरावर कर्नाटक, गोवा येथे भाजप इतर पक्षांतील आमदारांची फोडाफोडी करत आहे. आमदारांना पक्ष बदलण्यासाठी ५०-५० कोटी रुपयांच्या ऑफर्सची चर्चा आहे. ईव्हीएम मशिन्सची त्यांना साथ आहे,' असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी कुणाचेही नाव न घेता भाजप नेत्यांवर केला.

पुणे येथील भूखंड प्रकरणावरुन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर राष्ट्रवादीने हल्लाबोल सुरू केला आहे. दरम्यान, सर्किट हाऊस येथे पत्रकारांशी बोलताना मुश्रीफ यांनी थेट कुणाचेही नाव न घेता भाजपच्या नेत्यांवर निशाणा साधाला. तर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी, भाजपचा कारभार हा लोकशाही जिवंत ठेवायची नाही अशा पद्धतीने सुरू असल्याची टीका केली.

'गोकुळ' मधील काही संचालक मल्टीस्टेटच्या विरोधात भूमिका घेत आहेत, त्या संदर्भात संचालक मंडळाची बैठक होत आहे या प्रश्नावर बोलताना मुश्रीफ म्हणाले, 'मल्टीस्टेटच्या विरोधात 'गोकुळ'वर काढलेल्या मोर्चात मी देखील सहभागी होतो. काँग्रेसचे नेते पी. एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी मल्टिस्टेटच्या निर्णयाबाबत फेरविचार करावा. मल्टिस्टेटचे प्रकरण दिसतेय तसे नाही, काही तरी वेगळे आहे, असे आवाहन केले होते. पण त्यांनी तो मानला नाही. दुध उत्पादकांना मल्टीस्टेटचा निर्णय मान्य नाही. संचालकांतही नाराजी असल्याचे वाचनात येत आहे. संचालकांनी मल्टिस्टेच्या निर्णयाला विरोध केला तर त्याचे स्वागतच आहे. 'देर आये दुरुस्त आये' असेच म्हणावे लागेल. आमची भूमिका ही दुध उत्पादकांच्या हितासाठी आहे.'

...

तर लढा सुरुच राहील

आमदार सतेज पाटील म्हणाले, 'मल्टीस्टेटच्या निर्णयाला बहुसंख्य दुध उत्पादकांचा विरोध आहे. दुध उत्पादकांच्या हितासाठी मल्टिस्टेटविरोधात लढा सुरू केला आहे. गोकुळ मल्टीस्टेट करण्याचा निर्णय मागे घेतला नाही तर आमचा लढा सुरुच राहील. गोकुळ संघ हा दुध उत्पादकांच्या मालकीचाच राहिला पाहिजे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्र्यांकडून अधिकारावर गदा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'राज्यात कुठल्याही जिल्हा परिषदेत समाजकल्याण विभागाचा निधी भारतीय जनता पक्षाच्या तालुकाध्यक्षांना दिला जात नाही. मग कोल्हापुरात पालकमंत्री चंद्रकांत पाटील चुकीचे पायंडे पाडत आहेत. समाजकल्याणचा निधी, भाजप तालुकाध्यक्षांना देण्याचा त्यांचा निर्णय घटनाबाह्य आणि लोकप्रतिनिधींच्या अधिकारावर गदा आणणार आहे. हा प्रकार खपवून घेणार नाही,' असा इशारा आमदार हसन मुश्रीफ आणि काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी दिला.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षातर्फे आज, शुक्रवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना निवेदन देण्यात येणार आहे. पालकमंत्र्यांनी निश्चित केलेल्या समाजकल्याण निधी वाटपाच्या फॉर्म्युल्यात बदल करावा, अशी मागणी करणारे निवेदन त्यांना देण्यात येईल. समाजकल्याण निधी वाटपाच्या फॉर्म्युलात बदल न केल्यास दोन्ही काँग्रेस व मित्रपक्षांचे सदस्य जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू करतील, असा इशाराही पाटील व मुश्रीफ यांनी दिला. काँग्रेस आघाडीतर्फे, गुरुवारी दुपारी चार वाजता, यासंदर्भातील निवेदन सीईओ मित्तल यांना देण्यात येणार होते. मात्र मित्तल पंढरपूर येथील पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी गेले आहेत. यामुळे शुक्रवारी जिल्हा परिषदेत जाऊन भूमिका मांडू, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

मुश्रीफ म्हणाले, 'पालकमंत्र्यांचा निर्णय हा चुकीचा आहे. समाजकल्याण समिती सभापती आणि सदस्यांच्या हक्कावर गदा आणण्याचा हा प्रकार आहे. पालकमंत्र्यांनी निधी वाटपावरुन समाजकल्याण समिती सभापती विशांत महापुरे यांना ज्या पद्धतीने बोलले ते योग्य नाही. महापुरे मागासवर्गीय समाजाचे प्रतिनिधीत्व करतात. लोकप्रतिनिधींना चुकीच्या पद्धतीने वागणूक देणे गैर आहे. या प्रकरणी दोन्ही काँग्रेसचे सदस्य हे महापुरे यांच्यासोबत आहेत. समाजकल्याण निधी वाटपातील बदलावरुन दोन दिवसांपूर्वी माझे पालकमंत्री पाटील यांच्याशी बोलणे झाले. मात्र त्यावर पालकमंत्र्यांनी, तुम्ही न्यायालयात जा, असे उत्तर दिले.'

मंडलिक, शेट्टी, आवाडे, आबिटकरांशी चर्चा

'पालकमंत्री पाटील यांचा निर्णय हा सदस्यांच्या हक्कावर गदा आणणारा प्रकार आहे. त्यांनी लोकशाहीची थट्टा चालविली आहे,', असा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला. शुक्रवारी, सीईओंना देण्यात येणाऱ्या निवेदनावेळी मोठ्या संख्येने जाण्याचा निर्णय घेतला. खासदार संजय मंडलिक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अध्यक्ष प्रकाश आवाडे, आमदार प्रकाश आबिटकर यांच्याशी आमदार पाटील यांनी फोनवरुन चर्चा केली आणि शुक्रवारी उपस्थित राहण्याचे आवाहन केले. जि. प. च्या सत्तेच्या राजकारणात सध्या आवाडे गट आणि स्वाभिमानी संघटना भाजपसोबत आहेत. दरम्यान, आवाडे यांनी आवाडे गटाच्या दोन्ही सदस्यांना, शुक्रवारच्या शिष्टमंडळात सामील होण्याच्या सूचना दिल्या आहेत.

.....

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवडणूक प्रशासकीय खर्चाचा हिशोब द्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीसाठी सरकारकडून आलेल्या २० कोटींच्या निधीच्या खर्चाचा हिशोब तातडीने देण्याचे आदेश गुरूवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी सतीश धुमाळ यांना दिले. यावेळी निवडणूक प्रक्रियेदरम्यान खासगी वाहने, जेवण, मंडप अशा विविध कामांची देय बिले मंगळवारपर्यंत द्यावीत, बिलासाठी एकही तक्रार येऊ नये, त्याची खबरदारी घ्यावी. तसेच तहसील प्रशासनाकडून वाढीव बिले आली असल्यास त्याची फेरपडताळणी करून घ्यावी, अशा सक्त सूचनाही त्यांनी दिल्या.

निवडणुकीचा प्रशासकीय खर्च बेहिशेबी कसा आहे, दिलेल्या बिलांवर कशी उधळपट्टी केली आहे, यासंबंधीचे वृत्त 'महाराष्ट्र टाइम्स'ने प्रसिध्द केले होते. त्यानंतर निवडणुकीच्या विविध कामांसाठी साहित्य, वाहने पुरवली आहेत. मात्र बिले प्रलंबित आहेत. यासंबंधी मोठ्या प्रमाणात तक्रारींचा ओघ निवडणूक प्रशासनाकडे वाढला. त्याची गंभीर दखल जिल्हाधिकारी देसाई यांनी घेतली. धुमाळ यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊन दोन दिवसात निवडणूक निधीचा हिशेब देण्याच्या सूचना दिल्या. इव्हीएम आणि इतर निवडणूक साहित्य मतदान केंद्रावर पोहचण्यासाठी घेतले ट्रक, इतर भाड्याने घेतलेली वाहने, मतमोजणी दिवशी आणि त्या आधीच्या विविध प्रशिक्षणासाठी आलेले अधिकारी, कर्मचाऱ्यांना चहा, नाष्टा, जेवण पुरवण्याच्या काम केलेल्यांची प्रलंबित बिलेही द्यावीत, असेही त्यांनी सांगितले.

बिले वेळेत सादर न करणे, तहसील प्रशासनाचा दिरंगाईपणा आणि जिल्हा निवडणूक कार्यालयातील विस्कळीपणामुळे संबंधितांस बिले मिळण्यास विलंब झाल्याचेही यावेळी समोर आले. निवडणूक उपजिल्हाधिकारी धुमाळ यांच्याकडून निवडणूक खर्चाची किती बिले अदा केली, किती देय आहेत, बिले किती आली आहेत, कोषागार कार्यालयात प्रलंबित किती बिले आहेत, त्याचा सविस्तर आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. जी बिले संशयास्पद वाटतात, ती बाजूला ठेवून उर्वरित बिले तातडीने मार्गी लावण्याचे आदेश देसाई यांनी दिले.

...

लिपिकाच्या बदलीचा प्रस्ताव

निवडणूक विभागात बिलासंबंधी कामाची जबाबदारी असलेल्या लिपिकाने काही बिले गहाळ केली आहेत. त्यांचे कामही समाधानकारक नसल्याचे धुमाळ यांनी निदर्शनास आणून दिले. यावेळी जिल्हाधिकारी देसाई यांनी त्या लिपिकाच्या बदलीचा प्रस्ताव त्वरित द्यावा, अशी सूचना केली.

...

तीन बिले

मतमोजणीच्या ठिकाणी पिण्याचे पाण्याचे जग देण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. त्यांनीही ते जग पुरवठा केले. मात्र प्रत्यक्षात तेथे पाण्याचे जग दिल्याची तीन जणांकडून बिले सादर केल्याचे धुमाळ यांनी सांगितले. यावर अधिकृतपणे निवडणूक प्रशासनाने आदेश दिलेल्यांनाच बिले द्याव्यात, त्रयस्तपणे तोंडी आदेश दिलेली बिले देऊ नयेत. ज्यांनी तोंडी आदेश दिले, त्यांच्यावरच जबाबदारी निश्चित करा, असा आदेश देसाई यांनी धुमाळ यांना दिला.

...

कोट

'लोकसभा निवडणूक खर्चाचा हिशोब देण्याचे आदेश धुमाळ यांना दिले आहेत. याशिवाय देय बिले संबंधितास मंगळवारपर्यंत देण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. मी स्वत: रोज देय बिले किती अदा केली, त्याचा आढावा घेणार आहे. त्यामुळे ज्यांची बिले देय आहेत, त्यांना ती दोन दिवसांत मिळतील. ज्यांनी बिले फुगवून दिली आहेत, त्या बिलांची फेरपडताळणी होईल.

दौलत देसाई, जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गृह पोलिस उपअधीक्षपदी महानुमी

$
0
0

कोल्हापूर

पोलिस मुख्यालयात गृहपोलिस उपअधीक्षकपदी बाबूराव भाऊसाहेब महामुनी यांची नियुक्ती करण्यात आली. तर गडहिंग्जलजच्या उपअधीक्षपदी अंगद रामभाऊ जाधवर यांची नियुक्ती झाली. गृह विभागाने राज्यातील १०१ पोलिस उपअधीक्षक आणि सहायक पोलिस आयुक्त यांच्या बदलीचे आदेश गुरुवारी जारी केले.

महामुनी हे बुलढाणा उपविभागीय पोलिस अधिकारीपदी कार्यरत होते. तर जाधवर हे पाटण उपविभाग (जि. सातारा) येथील उपविभागीय पोलिस अधिकारीपदी कार्यरत होते. गृहपोलिस उपअधीक्षक सतीश माने दोन महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाल्यानंतर हे पद रिक्त होते. त्यांच्या जागी महामुनी यांची नियुक्ती झाली. शाहूवाडीचे उपअधीक्षक आर. आर. पाटील यांची पिंपरी चिंचवडच्या सहायक पोलिस आयुक्तपदी बदली झाल्याने हे पद रिक्त झाले आहे. मात्र त्यांच्या जागा अद्याप कोणाची नियुक्ती केलेली नाही. सांगली येथे आर्थिक गुन्हे शाखेच्या उपविभागीय पोलिस अधिकारीपदी नितीन कटेकर यांची नियुक्ती झाली. गडहिंग्लजचे उपअधीक्षक अनिल कदम यांची बदली झाली असली तरी त्यांच्या नव्या नियुक्तीचे ठिकाण दिलेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंकाळ्यात बुडून वृद्धाचा मृत्यू

$
0
0

कोल्हापूर

रंकाळा तलावात हातपाय धुण्यासाठी उतरलेल्या शामराव गोविंद दळवी (वय ६५, रा. खंडोबा तालीमजवळ, शिवाजी पेठ) यांचा तोल जाऊन पाण्यात पडल्याने बुडून मृत्यू झाला. सायंकाळी सहा वाजता ही घटना घडली. दळवी हे दररोज रंकाळा तलाव परिसरात फिरण्यासाठी जातात. गुरुवारी सायंकाळी तलावात हातपाय धुण्यासाठी गेले असता तोल जाऊन पाण्यात पडले. त्यांना पोहता येत नसल्याने काही वेळातच पाण्यात बुडाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बा विठ्ठला, दुष्काळमुक्तीच्या प्रयत्नांना निसर्गाची साथ लाभू दे!; मुख्यमंत्र्यांचं साकडं

$
0
0

पंढरपूर:

'राज्य सरकारच्या दुष्काळमुक्तीच्या प्रयत्नांना निसर्गाची साथ लाभू दे! बळीराजाला तुझा आशीर्वाद मिळू दे आणि माझा महाराष्ट्राला सुजलाम्, सुफलाम् व संपन्न होऊ दे...' असं साकडं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंढरपूरच्या विठुरायाला घातलं.

आषाढी एकादशीच्या निमित्तानं आज पहाटे पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक श्री विठ्ठल-रुख्मिणीची शासकीय महापूजा केली. मुख्यमंत्र्यांसोबत लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील सांगवी सुनेवाडी तांडा या गावचे वारकरी विठ्ठल चव्हाण व प्रयाग चव्हाण या दाम्पत्याला पूजेचा मान मिळाला. सुमारे दीड तास मंत्रोच्चारांच्या साक्षीनं हा पूजा विधी पार पडला.

महापूजेनंतर मंदिर समिती व मराठा समाजाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील आशा-आकांक्षा पूर्ण कर, असं साकडं आपण विठ्ठलाला घातल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांना मागील आषाढी एकादशीला पंढरपूरला येता आलं नव्हतं. याची आठवणही मुख्यमंत्र्यांनी दिली. तेव्हा विठ्ठलाचाच तसा आदेश होता. तो आदेश मानून 'वर्षा' बंगल्यावरच पूजा केली. आताही त्याच्याच आशीर्वादानंच पंढरपुरात आलो. त्याच्या आशीर्वादानं चांगलं काम करू शकलो. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो, असं ते म्हणाले. मराठा समाजानं केलेल्या सत्काराबद्दलही त्यांनी आभार मानले. 'खरंतर या सत्काराची गरज नव्हती. राज्यकर्ता म्हणून मी माझं कर्तव्य केलं. जनभावनेचा आदर राखून मराठा समाजाला आरक्षण दिलं. ते करताना इतर समाजावर अन्याय होऊ दिला नाही,' असं ते म्हणाले. 'विठ्ठलरूपी जनतेची पाच वर्षे पूजा करण्याची संधी मिळणं हे माझं भाग्य आहे. ती संधी पुन्हा मिळेल,' अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘रिंगण’चा संत सावता माळी विशेषांक मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशित

$
0
0

पंढरपूरः

संत परंपरेचा सामाजिक, सांस्कृतिक मागोवा घेणारा वार्षिक आषाढी विशेषांक “रिंगण”चे प्रकाशन आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात झालेल्या या कार्यक्रमात रिंगणच्या‘संत सावता माळी’विशेषांकाचं प्रकाशन झालं. रिंगणचे हे सातवे वर्ष आहे.

संत नामदेव, संत चोखामेळा, संत जनाबाई, संत निवृत्तीनाथ, संत विसोबा खेचर, संत गोरा कुंभार हे अंक आतापर्यंत प्रकाशित झाले आहेत. या अंकांना वाचक, वारकरी आणि अभ्यासकांकडून मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. त्यामुळे संत सावता माळी विशेषांकाची उत्सुकता सर्वांना लागली होती.

संत सावता माळी यांनी दिलेले विचार आजही महत्त्वाचे आहेत. हे विचार तरूण आहेत, बंडखोर आहेत. आणि आजच्या काळालादेखील नवं वळण देणारे आहेत, असं रिंगणचे संपादक सचिन परब यांनी सांगितलं. या अंकात डॉ. सदानंद मोरे, हरी नरके, डॉ. रणधीर शिंदे, श्यामसुंदर मीरजकर आदी अभ्यासकांसोबतच अनेक पत्रकारांनी रिपोर्ताज लिहिले आहेत. संत सावता माळी यांचं तत्त्वज्ञान, यांचं व्यक्तिमत्व याचबरोबर यांच्या प्रभावाच्या आजपर्यंतच्या खुणादेखील यात मांडण्यात आलेल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनजागृती फेरी

$
0
0

कोल्हापूर: जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे गुरुवारी जनजागृती फेरी काढण्यात आली. लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम दर्शविणारे फलक फेरीच्या अग्रभागी होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांच्या हस्ते फेरीचे उद्घाटन झाले. फेरीमध्ये आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, विविध शाळेच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी फारुख देसाई, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी उत्तम मदने आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१३ पदांची भरती

$
0
0

कोल्हापूर: जिल्हा परिषदेकडील सरळ सेवा भरती अंतर्गत सन २०१४ मध्ये शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास (ईएसबीसी) प्रवर्गामधील पदाची भरती केली. यामध्ये सामान्य प्रशासन विभागाकडील परिचरपदाच्या सहा जागा, ग्रामसेवकांच्या तीन जागा, आरोग्य सेविकेच्या दोन जागा, आणि सहायक स्थापत्य अभियांत्रिकीच्या दोन जागांच्या पद भरतीसाठी भरती प्रक्रिया राबवली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वृक्ष प्राधिकरण समिती सदस्याविना

$
0
0

कोल्हापूर टाईम्स टीम

तज्ज्ञ म्हणून मांडलेले विचार आणि संकल्पनांची अंमलबजावणी केली जात नसल्याने महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीचा निसर्ग मित्र संस्थेचे सदस्य असलेले वनस्पतीतज्ज्ञ प्रा. मधुकर बाचूलकर व अनिल चौगले यांनी वर्षापूर्वी राजीनामा दिला. समितीसह प्रा. बाचुळकर यांनी जैवविविधता व स्वच्छता अभियानाचा ब्रॅड अॅम्बॅसिडर पदाचाही त्याग केला. राजीनामा दिल्याने रिक्त पदावर कोणाचीही नेमणूक झालेली नसून समितीचा कारभार वर्षभरापासून दोन सदस्यांविना सुरू आहे.

शहरातील पर्यावरण संवर्धनासाठी महापालिकेच्या अनेक समित्या आहेत. समितीमध्ये लोकप्रतिनिधी, महापालिका अधिकारी काही शहरातील पर्यावरण तज्ज्ञांचाही समावेश आहे. त्यापैकी वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये निसर्ग मित्र संस्थेचा समावेश होता. संस्थेचे सदस्य प्रा. बाचूळकर व चौगले यांचा समावेश होता. तसेच प्रा. बाचूळकर जैवविविधता समितीवर कार्यरत होते. शहरात राबवण्यात येणाऱ्या स्वच्छता अभियानाचे ब्रॅड अॅम्बॅसिडर म्हणूनही त्यांची नियुक्ती केली होती. वनस्पती तज्ज्ञ असलेल्या प्रा. बाचूळकर यांनी केलेल्या सूचनाकडे दुर्लक्ष वारंवार केले जात होते. केवळ सूचना करण्यासाठी नियुक्ती असून अंमलबजावणी करण्याचा सर्वस्वी अधिकार प्रशासनाचे असल्याचेही त्यांना सांगण्यात येत होते. अशा कटू प्रसंगामुळे त्यांच्यासह चौगले यांनी ऑगस्ट २०१८ मध्ये राजीनामा दिला. राजीनामा देऊन वर्षभराचा कालावधी झालेला असला, तरी अद्याप त्यांच्या राजीनाम्यावर प्रशासनाने कोणताही निर्णय घेतला नाही. तसेच याबाबत त्यांच्याशी कोणताही पत्रव्यवहार केलेला नाही. त्यामुळे वर्षभरापासून समितीच्या बैठका दोन सदस्याविना होत आहेत.

समितीच्या पदसिद्ध अध्यक्षपद आयुक्तांकडे असते. सध्याचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून कचरा संकलन मोहिमेसह वृक्षारोपणाचा धडाका लावला आहे. तसेच अमृत योजनेतंर्गत मोठ्याप्रमाणात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. अशावेळी प्रा. बाचूळकर यांच्यासारख्या वनस्पती तज्ज्ञाची आवश्यकता असताना प्रशासन मात्र त्यांना किंवा त्यांच्याऐवजी इतर व्यक्तीची नियुक्ती करण्यास चालढकल करत आहे. यामागचे गूढ मात्र पर्यावरणप्रेमींना खटकत आहे.

पात्र व्यक्ती सापडेना...

वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये सात सदस्यांचा समावेश असतो. आयुक्तांकडे पदसिद्ध अध्यक्षपद तर सामाजिक वनीकरण, वन विभाग, शहर अभियंता व अन्य चार तज्ज्ञ सदस्यांचा समावेश असतो. सदस्यपदी नियुक्ती होण्यासाठी सामाजिक वनीकरणच्या पॅनेलवर सलग दहा वर्षे काम करणे आवश्यक आहे. असा पात्रताधारक व्यक्ती नसल्याने सदस्यपदाची नियुक्ती रखडली आहे.

समिती सदस्यांनी सुचवलेल्या सूचनांकडे तत्कालीन आयुक्त दर्लक्ष करत होते. दिलेल्या सूचनांवर अंमलबजावणी होत नसल्याने राजीनामा दिला. त्यानंतर प्रशासनाने अद्याप संपर्क साधलेला नाही. त्यामुळे राजीनामा स्वीकारला की नाकारला याबाबतची माहिती नाही.

प्रा. मधुकर बाचूळकर, वनस्पतीतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images