Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

दोषी ठरल्यास राजकीय संन्यास

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'माझ्यावर झालेल्या आरोपाबाबत मी पोलिस चौकशीत दोषी ठरलो तर शिक्षा भोगण्यास तयार आहे. प्रसंगी आजन्म राजकीय संन्यास घेईन,' असे पत्रक माजी भाजप महानगर अध्यक्ष संदीप देसाई यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

पत्रकात म्हटले आहे की, तीन वर्षे महानगर अध्यक्ष म्हणून काम पाहिल्यानंतर माझ्यावर फसवणुकीचा आरोप होत आहे. राजकारण आणि समाजकारणातील माझी प्रतिष्ठा संपविण्यासाठी कट कारस्थान केले आहे. मी भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता असून, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पदवीधर मतदार निवडणुकीपासून माझी राजकीय व सामाजिक जीवनाची सुरुवात झाली आहे. अहोरात्र झटून पक्षबांधणीत माझा खारीचा वाटा आहे. पालकमंत्र्यांनी एक फॅब्रिकेटर व्यवसाय असलेल्या सामान्य कार्यकर्त्याला जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देऊन माझा सन्मान केल्याबद्दल मी व माझे कुटुंबीय पक्षाचे सदैव ऋणी आहे.

महानगर अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत पक्षाचा हिरीरीने प्रचार केला. या पदाचा गैरफायदा घेऊन कोणत्याही सरकारी कार्यालयात गेलो नाही. मी कोणतेही आमिष दाखवून कोणाचीही फसवणूक केलेली नाही. माझे गुरू पालकमंत्री यांच्याजवळ माझे असलेले अढळस्थान हलविण्यासाठी काही विरोधी शक्तींनी प्रयत्न सुरू केले आहेत.

राजकीय पदाचा वापर करून पैसे मिळवले असते तर माझ्यावर कर्जाचा डोंगर झाला असता का?, तसेच माझे आई-वडील या वयात काबाडकष्ट करून उदरनिर्वाह करत असते का? असा प्रश्न देसाई यांनी पत्रकात केला आहे. संसारात लागणारा खर्च आणि बँक कर्जाच्या हप्त्याची परतफेड करण्यासाठी पन्हाळा रोडवर भावाला भाडेतत्त्वावर हॉटेल चालविण्यास घेतले आहे. माझे घर बांधत असताना एक फ्लॅट व दुकानगाळा बांधकामापूर्वीच विक्री करून त्या पैशातून मी नवीन इमारत बांधली आहे. तरीही माझ्याविरोधात भ्रष्टाचार केल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे आमच्या कुटुंबातील सर्वांची मन:स्थिती बिघडली आहे. माझे राजकीय व सार्वजनिक जीवन स्वच्छ व पारदर्शी आहे. माझ्या पक्षाच्या नावाला कधीच काळिमा लागू देणार नाही, याची दक्षता घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ड्रेनेज लाईनसाठीच्या खड्ड्यात पुन्हा माती

0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कसबा बावड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खानविलकर पेट्रोल पंपाजवळ ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी सुमारे वीस फूट खड्डा खोदला होता. शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे खोदून काढलेली दगडमाती पुन्हा खड्ड्यात पडल्याने कामामध्ये अडथळा निर्माण झाला. परिणामी प्रशासनाची तारांबळ उडाली. रविवारी सकाळी पोकलॅन मशीनच्या सहाय्याने पडलेली माती बाहेर काढण्यात येवून कामाला सुरुवात केली. घटनेची माहिती आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना मिळाल्यानंतर सकाळी त्यांनी भेट देवून कामाची पाहणी करत काम त्वरीत पूर्ण करण्याच्या सूचना केल्या.

भाऊसिंगजी रोड मार्गे कसबा बावडाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खानविलकर पेट्रोल पंपाशेजारी ड्रेनेज लाईनचे काम सुरू आहे. मंगळवार (ता. ११) पासून कामाला सुरुवात झाली. पावसाळ्याला सुरुवात होण्यापूर्वी सुरू केलेल्या कामामुळे प्रशासनाचा गलथान कारभार समोर आला. शहराच्या प्रमुख मार्गावर सुरू असलेल्या कामामुळे येथील वाहतूकही अन्य मार्गाने वळवण्यात आली. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील वाहतूक कोंडी वारंवार होत आहे.

ड्रेनेज लाईनसाठी येथे रस्ते विकास प्रकल्पातंर्गत केलेल्या सिमेंट रस्त्याची सुमारे वीस फूट खोदाई केली. खोदाईमुळे दगडमाती जवळच टाकण्यात आली होती. पण शनिवारी केवळ तासाभराच्या पावसामुळे काढलेली दगडमाती पुन्हा खड्ड्यात पडली. परिणामी या कामात अडथळा निर्माण होण्याची शक्यता अधिक बळवली आहे. गेल्या काही दिवसांत मान्सून पावसाने ओढ दिल्याने कामामध्ये अडचणी निर्माण झाल्या नाहीत. पण गेल्या दोन दिवसांपासून पावसाला सुरुवात झाल्यानंतर कामात अडथळे येवू लागले आहेत, साहजिकच कामात दिरंगाई होण्याची शक्यता आहे.

कामाला सुरुवात झाल्यानंतर कसब बावडा मार्गे येणारी वाहतूक महावीर कॉलेजपासून जिल्हाधिकारी कार्यालयामार्गे वळवण्यात आली. तर भाऊसिंगजी रोड मार्गे बावड्याकडे जाणारी वाहतूक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महावीर कॉलेजकडे वळवण्यात आली आहे. परिणामी महावीर कॉलेज ते पाटील वाड्यापर्यंतच्या अरुंद रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच पावसामुळे ड्रेनेज कामात अडथळे निर्माण होऊ लागले आहेत. महापालिका प्रशासन वीस ते पंचवीस दिवसांत काम पूर्ण होईल, असा दावा करत आहे. तरी चुकीच्या वेळेला कामाला सुरुवात केल्यामुळे वाहनधारकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्षीरसागरांच्या मंत्रिपदात तांत्रिक अडचण काय?

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी मुंबईला गेले होते. मंत्रिपदात तांत्रिक अडचण आल्याने राज्य नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्षपद मिळाल्याचे क्षीरसागर सांगत आहेत. मात्र जिल्ह्यात शिवसेनेचे दोन खासदार, सहा आमदार असताना त्यांना मंत्रिपदासाठी कोणती तांत्रिक अडचण आली, हे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना यांनी स्पष्ट करावे,' अशी टोलेबाजी राष्ट्रवादीचे नेते, आमदार हसन मुश्रीफ यांनी रविवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली. या मुद्यावरून पालकमंत्री पाटील आणि मुश्रीफ यांच्यात काहीकाळ राजकीय कलगीतुरा रंगला. मात्र, पालकमंत्री पाटील यांनीही मुत्सद्दीगीरीने मुश्रीफ यांना 'तुम्हाला शिवसेनेची इतकी का काळजी?' असे विचारत प्रत्युत्तर दिले.

नियोजन समितीच्या बैठकीत आमदार मुश्रीफ म्हणाले, या बैठकीला राजेश क्षीरसागर उपस्थित नाहीत. तरीही त्यांना राज्य नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्षपद मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. हे पद भूषवणारे स्वर्गीय बाबा कुपेकर यांच्यानंतर ते जिल्ह्यातील दुसरे आहेत. जिल्ह्यातून शिवसेनेला भरभरून राजकीय यश मिळाले. या पक्षाचे सहा आमदार, दोन खासदार निवडून दिले. त्यामुळे क्षीरसागर यांना मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती. त्यासाठी ते गेले होते. पण तांत्रिक अडचण आल्याने मला मंत्रीपद मिळाले नाही. मंत्रीपदाच्या चर्चेवेळी पालकमंत्री पाटील उपस्थित होते, असे क्षीरसागर यांनी सांगितल्याचे मी ऐकले आहे. त्यामुळे तांत्रिक अडचण काय होती? ते पालकमंत्र्यांनी स्पष्ट करावे. त्याची जिल्ह्याला उत्सुकता लागली आहे. काहीजण मला विचारत आहेत. त्यामुळे मी हा प्रश्न विचारतोय.'

यावर पालकमंत्री पाटील यांनी 'तुम्ही आणि मी एकाच ट्रेनमधून मुंबईला जातो. त्यावेळी तुम्हाला तांत्रिक कारण सांगतो,' असे सांगत वेळ मारून नेली.

तुम्ही पुन्हा निवडून

येणार नाही का ?

१विधानसभेची निवडणूक प्रक्रिया काही दिवसांनी सुरू होईल. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीमधील निधी गतीने खर्च करावा,' अशी सूचना मुश्रीफ यांनी केली. हीच मागणी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनीही केली. यावर पालकमंत्री पाटील हे मुश्रीफ यांच्याकडे पाहून 'हे परत निवडून येणार नाहीत. तुम्हीपण पुन्हा येणार नाही का?' असा प्रश्न डॉ. मिणचेकर यांना विचारला. यावर डॉ. मिणचेकर निरुत्तर झाले. पालकमंत्र्यांच्या प्रश्नाने बैठकीत जोरदार हशा पिकला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेन्शन देता का पेन्शन...!

0
0

विद्यापीठाचा फोटो.....

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठातील सुमारे २५ कर्मचारी गेल्या दोन ते पाच वर्षांपासून निवृत्तिवेतनासाठी संघर्ष करत आहेत. काल्पनिक वेतनवाढीवरून निर्माण झालेल्या पेचावरून सेवानिवृत्तीच्या वेतनाच्या प्रस्तावाला खीळ बसली आहे. वसुलीच्या रकमेसंदर्भात विद्यापीठ प्रशासन हमीपत्र द्यायला तयार नाही आणि शिक्षण सहसंचालक कार्यालय कर्मचाऱ्यांचे व्यक्तिगत हमीपत्र स्वीकारायला तयार नाही. परिणामी संबंधित कर्मचाऱ्यांना 'पेन्शन देता का पेन्शन' म्हणण्याची वेळ आली आहे.

सुखासमाधानाने जीवन जगण्याची स्वप्ने रंगविणाऱ्या कर्मचाऱ्यांना उतारवयात हक्काच्या पेन्शनसाठी सरकारी कार्यालयात हेलपाटे मारण्याची वेळ आली आहे. 'सेवानिवृत्तीचे वेतन न मिळाल्यामुळे कुटुंबांच्या दैनंदिन गरजा, औषधोपचार, मुलांचे शिक्षण व लग्नकार्य समारंभप्रसंगी आर्थिक कोंडी होत आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तेव्हा अधिकाऱ्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून निवृत्तीवेतन व अनुषंगिक लाभ मिळावेत. निवृत्तिवेतनाचे प्रस्ताव तयार करावेत आणि महालेखापाल कार्यालयास सादर करावा यासाठी कर्मचारी पाठपुरावा करत आहेत.

संबंधित कर्मचाऱ्यांनी सात ऑक्टोबर २००९ च्या सूचनेनुसार वेतननिश्चिती करून सेवानिवृत्ती व इतर लाभ मिळावेत. शिवाय पदनाम बदल वेतनप्रकरणी जादा रकमेच्या वसुलीचा निर्णय झाल्यास, सगळी रक्कम एकरकमी भरण्याविषयीचे हमीपत्र संबंधित कर्मचाऱ्यांनी कुलसचिवांच्या शिफारशीसह शिक्षण सहसंचालक कार्यालयाला दिले आहे. त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाने सेवानिवृत्तीचे प्रस्ताव पाठविले आहेत. मात्र शिक्षण सहसंचालक कार्यालयाने जादा वसुलीच्या रकमेची हमी विद्यापीठाने स्वीकारावी असा पवित्रा घेतला. दुसरीकडे विद्यापीठ हमीपत्र द्यायला तयार नाही. दोन कार्यालयांत 'हमीपत्र' जबाबदारीवरून एकमत होत नसल्यामुळे त्याचा फटका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. वास्तविक शिक्षण सहसंचालक कार्यालय आणि विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे हा प्रश्न हाताळला तर सेवानिवृत्तांच्या पेन्शनचा प्रश्न मार्गी लागू शकतो,असे सेवानिवृत्त कर्मचारी रणजित शिंदे यांनी सांगितले.

०००

संघर्षाला पूर्णविराम कधी?

सेवानिवृत्ती वेतनासाठी विद्यापीठातील २५ हून अधिक कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू आहे. यामध्ये निवृत्त अधीक्षक, सहायक अधीक्षक, वरिष्ठ व कनिष्ठ सहायकांचा समावेश आहे. एस. एस. खानविलकर, एस. एस. पोवार, एल. आर. मोहिते, ए. डी. पंडित, आर. आर. राणे, ए. ए. गुप्ता, एस. एम. पाटील, व्ही. आर. पाटील, यू. एम. रायबागकर, यू. जी. करवडे, यू. ए. कदम, एस. बी. कातवरे, बी. एम. मोहिते, एम. एम. नेटके, एस. जी. भोसले, बी. एस. परीट, के. डी. माने, आर. एम. शिंदे, एस. के. मोरे, बी. जी. शेंडे, व्ही. डी. खाडे, एस. आर. मोरे, एन. टी. ढवळे, एस. ए. वड्ड यांचा समावेश आहे. सेवानिवृत्तीच्या वेतनाबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करून न्याय द्यावा, अन्यथा शिक्षण सहसंचालक कार्यालय व विद्यापीठासमोर बेमुदत उपोषण करू. सेवानिवृत्तांच्या संघर्षाला पूर्णविराम कधी मिळणार ? असा कर्मचाऱ्यांचा सवाल आहे. विद्यापीठाचे कुलसचिव विलास नांदवडेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा मोबाइल 'स्वीच ऑफ' होता.

००००

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून भविष्यात जादा वेतन वसुलीबाबतचा निर्णय झाला तर त्यासंबंधीची संपूर्ण जबाबदारी विद्यापीठाने घ्यावी. विद्यापीठाने तसे हमीपत्र शिक्षण सहसंचालक कार्यालयाला द्यावे. संबंधित कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक तत्काळ करू.

अजय साळी, शिक्षण सहसंचालक कोल्हापूर विभाग

००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बदली आदेश आज लागू होणार

0
0

कोल्हापूर

जिल्हा परिषदेतर्फे समुपदेशनद्वारे बदल्या केलेल्या ४१९ शिक्षकांना सोमवारी (ता. २४) बदली आदेश लागू होणार आहे. चुकीची माहिती भरल्याप्रकरणी कारवाई केलेल्या १०९ शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. दरम्यान, ११८ पैकी ६८ शिक्षकांनी प्रशासनाच्या कारवाईच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. याप्रश्नी २५ जून रोजी सुनावणी होणार आहे. कोर्टात याचिका दाखल केलेल्या शिक्षकांनी 'आम्ही दोषमुक्त आहोत, गेल्या वर्षी बदली प्रक्रियेत प्रशासनानेच चुकीची माहिती भरली होती,'असा दावा केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऋचा पुजारीची ग्रँडमास्टरच्या दिशने वाटचाल

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

इंडोनिशिया येथे पार पडलेल्या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय बुद्धीबळपटू ऋचा पुजारीने ११ फेऱ्यांमध्ये ७ गुण मिळवून पहिला महिला ग्रॅडमास्टर (डब्लूजीएम) चा नॉर्म प्राप्त केला. निमंत्रितांच्या राऊंड रॉबीन स्पर्धेत तिने हे यश मिळवले. ग्रॅडमास्टरचा नॉर्म मिळवण्यासाठी तीन नॉर्म करणे आवश्यक असते. जागतिक बुद्धीबळ महासंघाच्या मान्यतेने व इंडोनेशियन चेस फेडरशनेच्यावतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत फ्रान्स, जॉर्जिया, रोमानिया, सिंगापूर व व्हिएतनाम या देशातून प्रत्येकी एक व इंडोनेशियातील सहा अशा बारा खेळाडूंना आमंत्रित केले होते. भारतातून एकमेव ऋचाने स्पर्धेत सहभाग घेतला. इंडोनेशियातील योग्यकर्ता या शहरातील ग्रँड इन्ना मॅलिओणेरो या पंचतारांकित हॉटेलमध्ये स्पर्धा पार पडली

बारा खेळाडूंच्या राऊंड रॉबीन स्पर्धेत प्रत्येक खेळाडूला प्रत्येकाबरोबर खेळावे लागते. महिला ग्रॅडमास्टरचा नॉर्म होण्याकरीता ९ फेऱ्यांमध्ये कमीत कमी ६.५ गुण मिळवणे गरजेचे असते. तसेच रेटींग परफॉर्मन्स २ हजार ४०० च्या पुढे असावा लागतो. ऋचाने आठव्या फेरीतच ६.५ गुणांची कमाई करत महिला ग्रॅडमास्टरच्या पहिल्या नॉर्मवर शिक्कामोर्तब केले. पहिल्या फेरीत व्हिएतनामची महिला आंतरराष्ट्रीय मास्टर लुआंगकडून ऋचाला पराभव पत्करावा लागला. त्यानंतर मात्र तिने सलग सहा डावात विजय व एका डावात बरोबरी करत आठ फेऱ्यांत ६.५ गुण पटकावले. तिने फ्रान्स, सिंगापूर व इंडोनिशियातील दिग्गज खेळाडूंचा पराभव केला. या यशामुळे तिने ३४ आंतरराष्ट्रीय गुणांची कमाई केली. तिचे रेटींग २ हजार २६८ झाले आहे. ग्रॅडमास्टरसाठी २ हजार ३०० रेटींग असणे गरजेचे आहे. जुलै महिन्यात चीन व ऑगस्ट महिन्यात आबुधाबी येथे ग्रँडमास्टर्स स्पर्धेत ती सहभागी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सतेज पाटील हेच मुख्यमंत्रिपद चालवायचे

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'काँग्रेस आघाडी सरकारच्या कालावधीत आमदार सतेज पाटील हे राज्यमंत्री असले तरी खऱ्या अर्थाने मुख्यमंत्रिपद तेच चालवायचे. त्यांच्याशिवाय तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे पानही हलत नव्हते,' अशी मिश्किल टिप्पणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

हॉटेल पॅव्हेलियन येथे 'व्हिजन कोल्हापूर २०२५' कार्यक्रमात पालकमंत्र्यांनी, आमदार पाटील यांच्यावर स्तुतिसुमनेही उधळली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या दोघांतील सहज संवादही उपस्थितांत चर्चेचा विषय ठरला.

कोल्हापूरच्या इंडस्ट्रीजच्या विकासासाठी आवश्यक योजनेसंदर्भात बोलताना पाटील म्हणाले, 'आमचे सरकार आल्यावर इंडस्ट्रीजला आवश्यक पाठबळ देऊ. मात्र, या कार्यक्रमात माझ्या बाजूला सतेज पाटील बसले आहेत. त्यामुळे सत्तेत पुन्हा आमचे सरकार येणार असे म्हणणे त्यांना योग्य वाटणार नाही' असा चिमटा काढला. त्यावर आमदार पाटील यांनी 'तुमचं सरकार सत्तेवर आल्यावर तुम्ही करा, आमचे सरकार सत्तेवर आल्यावर आम्ही करू,' असे हसत हसत त्यांनी उत्तर दिले. त्यांच्या या विधानाने कार्यक्रमस्थळी हास्य पिकले.

आमदार पाटील यांच्या विधानाचा आधार घेत पालकमंत्र्यांनी 'कोल्हापूरचे दोघेही पाटील म्हणजे मी आणि सतेज पाटील हे राज्य मंत्रिमंडळात टॉपला राहिलो. काँग्रेस आघाडीत सतेज राज्यमंत्री असले तरी मुख्यमंत्रिपद तेच चालवायचे,' अशी टिप्पणी केली. त्यानंतर त्या दोघांच्या विधानाचा आधार घेत खासदार संजय मंडलिक यांनी, 'सध्या आम्ही सत्ताधारी पक्षात तर सतेज पाटील विरोधी आघाडीत आहेत. पण कोल्हापूरच्या विकासासाठी 'आमचं ठरलंय. ते तिकडे असू दे की मी इकडे,' असे वक्तव्य करत पुढील राजकारणाची दिशा स्पष्ट केली.

दिल्लीत आणखी एकाला प्रतिनिधित्व

कोल्हापूरच्या विकास योजनेवरून बोलताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मध्येच राजकीय गुगली टाकली. 'नजीकच्या काळात दिल्लीत आणखी एकाला प्रतिनिधित्व दिले जाणार आहे,' असे सांगत राजकीय घडामोडींची उत्कंठा वाढविली. सध्या माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा आहे. महाडिक यांनी पंधरा दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. मात्र, ही भेट साखर कारखान्याच्या सॉफ्ट लोनसाठी असल्याचे महाडिक यांनी सांगितले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापुरात पावसासाठी नमाज

0
0

सोलापुरात पावसासाठी नमाज

सोलापूर

महाराष्ट्रात अद्याप मान्सून म्हणावा तसा सक्रिय झाला नाही. जून महिना संपत आला असला तरी पेरण्या सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे सोलापुरात रविवारी सकाळी मुस्लिम समाजाच्या वतीने सामुदायिक नमाज पठण करण्यात आले. पावसाअभावी शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे सोलापुरातील अहले हदीस रंगभवन ईदगाह येथे विशेष नमाज पठणाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी आठ वाजता शेकडो मुस्लिम बांधवांनी नमाजासाठी हजेरी लावली. मौलाना ताहेर बेग मोहम्मदी यांच्या मार्गदर्शनाखाली ही नमाज अदा करण्यात आली. साश्रू नयनांनी पावसासाठी याचना करण्यात आली.

इस्लाममध्ये रमजान आणि बकरी ईदसाठी मुस्लिम बांधव ईदगाह मैदानावर एकत्रित येत असतात. सामान्यत: मशिदींमध्ये नमाज अदा केली जाते. पावसासाठी आयोजित करण्यात आलेल्या नमाज ईदगाह मैदानावर अदा करण्यात येते. ईदच्या वेळी मुस्लिम बांधव नवीन कपडे, टोपी परिधान करून नमाज अदा करीत असतात. मात्र, या नमाजात पावसामुळे आपली करुण, वाईट अवस्था दाखवण्यासाठी जुने कपडे तसेच टोपी विना नमाज पठण करण्यात येते. तसेच दुआ मागण्यासाठी सामान्यपणे हात वर करून दुआ मागितली जाते, मात्र पावसासाठी करण्याच्या प्रार्थनेत हात खाली करून अल्लाहला पावसासाठी विनंती केली जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोटनिवडणुकीसाठी चुरशीने मतदान

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या पद्माराजे उद्यान आणि सिद्धार्थनगर प्रभागाच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी चुरशीने मतदान झाले. सभागृहाची मुदत संपण्यास केवळ सव्वा वर्षांचा कालावधी असताना झालेल्या या निवडणुकीत प्रचंड ईर्ष्या दिसून आली. सिद्धार्थनगर प्रभागात ६०.९४ तर पद्माराजे उद्यान प्रभागामध्ये ५८.९३ टक्के मतदान झाले. महापालिकेच्या सत्तारुढ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधी ताराराणी आघाडीच्या ज्येष्ठ नगरसेवकांनी मतदान केंद्रावर उपस्थिती लावली.

पक्षातंरबंदी कायद्यामुळे नगरसेवक अजिंक्य चव्हाण व अफजल पिरजादे अपात्र ठरल्याने दोन्ही प्रभागांत पोटनिवडणूक झाली. पद्माराजे उद्यान प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अजित राऊत, शिवसेनेचे पीयूष चव्हाण, शेकापचे स्वप्नील पाटोळे यांच्यासह अपक्ष राजेंद्र चव्हाण, महेश चौगले, शेखर पोवार निवडणूक रिंगणात होते. तर सिद्धार्थनगर प्रभागातून काँग्रेसचे जय पटकारे, ताराराणी आघाडीचे नेपोलियन सोनुले व अपक्ष म्हणून सुशील भांदिगरे निवडणूक लढवत आहेत.

रविवारी सकाळी साडेसात वाजता दोन्ही प्रभागांसाठी एकूण दहा केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगा लावल्या. उमेदवारांच्या समर्थकांनी मतदारांना केंद्रापर्यंत आणण्यासाठी खासगी वाहनाचा वापर केला. पोटनिवडणूक असतानाही प्रचंड चुरस दिसून येत होती. सिद्धार्थ प्रभागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मतदान केंद्रावर काँग्रेसचे नगरसेवक तौफिक मुल्लाणी, मोहन सालपे, दुर्वास कदम, शिक्षण मंडळ सभापती अशोक जाधव तर ताराराणी आघाडीचे महापालिकेतील गटनेते सत्यजित कदम यांनी समर्थकांनी हजेरी लावली. पद्माराजे उद्यान प्रभागातील सावित्रीबाई फुले विद्या मंदिर शाळेच्या केंद्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसेचे नगरसेवक प्रा. जयंत पाटील, महेश सावंत, सचिन पाटील, माजी नगरसेवक विनायक फाळके, शहराध्यक्ष आर. के. पोवार, शिवसेनेचे ऋतुराज क्षीरसागर, शेकापचे जिल्हा सरचिटणीस बाबूराव कदम, संभाजीराव जगदाळे यांनी उपस्थिती लावली होती. सकाळपासून मतदान संपेपर्यंत सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगा लावल्या. पद्माराजे उद्यान प्रभागात ५८.९३ टक्के तर सिद्धार्थ नगर प्रभागात ६० .९४ टक्के मतदानाची नोंद झाली. दोन्ही ठिकाणी मतदान केंद्रांबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त होता.

सोमवारी सकाळी दहा वाजता सासने ग्राऊंड येथील दौलतराव देसाई बॅडमिंटन हॉलमध्ये मतमोजणी होईल. ईव्हीएमद्वारे मतदान प्रक्रिया पार पडली असल्यामुळे ११ वाजेपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

मतदार यादीत घोळ

महापालिकेची पोटनिवडणूक असताना मतदारयादी मात्र नुकत्याच संपलेल्या लोकसभा निवडणुकीची देण्यात आली. परिणामी सिद्धार्थनगर प्रभागातील पाच मतदान केंद्रांतील मतदारांच्या नावामध्ये मोठे फेरबदल झाले. त्यामुळे मतदारांना यादीत नाव शोधताना चांगलीच पायपीट करावी लागली. निवडणूक यंत्रणेने व्होटर स्लीप मतदारांना दिल्या नसल्याने नाव शोधून मतदान करावे लागत होते. पद्माराजे उद्यान प्रभागातही अशीच स्थिती होती. मात्र येथील उमेदवारांनी स्वत:च व्होटर स्लीप वाटल्याने मतदारांना नाव शोधण्यास फारशी कसरत करावी लागली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातारा

0
0

युतीला शह देण्यासाठी

पाच आमदार एकत्र

सातारा :

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर असतानाच पक्षाचे हित समोर ठेवून राष्ट्रवादीचे पाचही आमदार मुंबईत एकत्र आले. विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान या पाचही आमदारांनी आम्ही कोणीही कुठेही जाणार नाही, असा निर्वाळा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला सध्या तरी दिलासा मिळाला आहे.

'हम पाँच साथ साथ है,' असे म्हणत या आमदारांनी बालेकिल्ला सुरक्षित ठेवण्याचा विडा उचलला आहे. विशेष म्हणजे, आमदार मकरंद पाटील यांनी या पाच जणांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेतला होता.

सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडणार, अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यातच रामराजे, उदयनराजे, शिवेंद्रराजे यांच्यात कडाक्याचे भांडण सुरू झाले. तीन राजे तीन दिशेला जाणार, अशा चर्चा रंगल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचा जीव सातारा जिल्ह्यातच आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस खिळखिळी होणार, अशी चर्चा रंगू लागली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारही त्यामुळे अस्वस्थ होते. त्यातच उदयनराजे, रामराजे, शिवेंद्रराजे यांच्यात पत्रक व बाईट युद्ध सुरू झाल्याने पक्षांतर होण्याची शक्यता बळावली.

संभाव्य पडझड लक्षात घेवून मकरंद पाटील यांनी पुढाकार घेतला. आमदार शशिकांत शिंदे, शिवेंद्रराजे, बाळासाहेब पाटील, दीपक चव्हाण यांना मकरंद आबांनी एकत्र बोलावले. विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान हे पाचही आमदार एकत्र बसले. त्यांनी एकमेकांचे रूसवे-फुगवे काढले. शशिकांत शिंदे यांनी शिवेंद्रराजेंचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला.

सातारा जिल्ह्याच्या राजकारणात गेली काही दिवस राष्ट्रवादी अंतर्गत मोठा कलगीतुरा सुरू असल्यामुळे भाजप आणि शिवसेनेच्या काही नेत्यांनी हा वाद आणखी कसा मोठा होईल, याकडे लक्ष केंद्रीत केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात सुरू होती. त्या अनुषंगाने काही कार्यकर्ते कामालाही लागले होते.

फलटण आणि सातारा तालुक्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असणाऱ्यांना भाजपमध्ये आणण्यासाठी दुष्काळी तालुक्यातील एका नेत्याकडे जबाबदारी देण्यात आली असल्याच्याही चर्चा आहेत. या पार्श्‍वभूमीवर आमदारांनी मुंबईत घेतलेली भूमिका पक्षहिताची ठरली आहे.

............

महाबळेश्‍वरात 'एफडीए'ची कारवाई

सातारा : महाबळेश्‍वर आणि पाचगणीतील हॉटेल्सवर अन्न प्रशासनाने बुधवारी छापा टाकला. त्या वेळी काही हॉटेल्सच्या किचनची तपासणी केली असता त्या ठिकाणी फ्रिजमध्ये सडलेले बटाटे, शिळे साठवलेले अन्न, अन्नपदार्थांवर अळ्या व झुरळे, मुदतबाह्य झालेली मसाल्याची पाकिटे सापडली. अधिकाऱ्यांनी संबंधित हॉटेल्सवर अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. काहीजणांचे परवाने निलंबित करण्यात आले.

अन्न व औषध विभागाकडून खाद्य पदार्थ विक्री करणारी हॉटेल्स, रेस्टॉरंटच्या तपासण्या करण्यात येत आहेत. बऱ्याच ठिकाणी अन्न व्यवसायिकांकडून अन्न सुरक्षा मानदे कायद्याचे उल्लंघन होताना दिसून येते. मात्र, ग्राहकांच्या या कायद्याबद्दलच्या अज्ञानाचा गैरफायदा घेवून अन्न व्यवसायिक निकृष्ट अन्न पदार्थाची विक्री करताना दिसत आहेत. महाबळेश्‍वर तसेच पाचगणीत राज्यासह देशभरातून पर्यटक येत असतात. या ठिकाणी पंचतारांकित हॉटेल्स आहेत. मात्र, काही हॉटेल चालकांकडून अन्न पदार्थ बनवताना हलगर्जी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपनगरातील चोऱ्या रोखण्यासाठी गस्त वाढवणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'शहर व उपनगरातील चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांची गस्त वाढविली जाईल', असे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

शहर व उपनगरात चोऱ्या वाढल्या आहेत. चेन स्नॅचरनी डोके वर काढले आहे, याकडे लक्ष वेधले असता पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख म्हणाले, 'चोऱ्यांचा तपास करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहेत. उपनगरात चोरट्यांनी बंद बंगले व घरे लक्ष केली आहेत. त्यामुळे यापुढे शहर व उपनगरातील चोऱ्या रोखण्यासाठी गस्त वाढविली जाईल. नागरिकांनी घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा बळकट करावा, सीसीटीव्ही, अलार्म, भिंतीतील लोखंडी कपाटाचा वापर करावा. ' शहरातील लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा, राजारामपुरी, शाहूपुरीसह करवीर पोलिसांकडून चोरीच्या गुन्ह्याच्या तपासाच्या प्रगतीचा आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेंगी सर्वेक्षण आजपासून

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पावसाळ्यामध्ये उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांना विशेषत: डेंगीला अटकाव करण्यासाठी मंगळवारपासून महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने डेंगी सर्वेक्षण मोहीम हाती घेतली आहे. मोहिमेदरम्यान डेंगी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबरोबर डासांचा प्रार्दुभाव वाढवणारे घटक जप्त करण्याचे आदेशही दिले आहेत.

गेल्या वर्षी पावसाळ्यामध्ये शहरात मोठ्याप्रमाणात डेंगीचे रुग्ण आढळून आले होते. यावर्षीही तशी परीस्थिती उद्भवू नये, यासाठी तपासणी सर्वेक्षण मोहीम सुरु केली आहे. मोहिमेतंर्गत सर्व सॅनिटेशन विभागाकडून त्यांच्या वॉर्ड कार्यक्षेत्रामध्ये डेंगी आळी सर्वेक्षण करुन पाणी साचणाऱ्या ठिकाणी औषध फवारणी करण्याची सूचना केली आहे. खराब टायर, अनावश्यक भंगार साहित्य जप्त करण्याबरोबरच गप्पी मासे सोडण्यात येणार आहेत.

गतवर्षी अनेक खासगी मिळकतींच्या बेसमेंटमध्ये पाणी साचल्याने डेंगी डासाची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात झाली होती. तसेच अनेक नागरिकांच्या घरातील फ्रीज, पाणी साठवणूक टाक्या, फुलझाडांच्या कुंड्या आदींमध्ये डासांची उत्पत्ती झाल्याचे निदर्शनास आले होते. अशी सर्व ठिकाणांची तपासणी करण्यात येणार आहे. नागरिकांनी डेंगी डासाची उत्पत्ती रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करताना घरामध्ये जास्त दिवस पाण्याची साठवणूक अथवा घराभोवती पाणी साचू देवू नये, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्पेनमध्ये शोधनिबंध

0
0

कोल्हापूर: युरोपमधील युनिव्हर्सिटी ऑफ बर्सिलोना, स्पेनतर्फे व्हेलेनसिया येथे आयोजित जागतिक परिषदेत येथील विवेकानंद कॉलेजमधील जीवशास्त्र विभागातील प्रा. डॉ. अश्विनी बाबूराव पाटील यांनी शोधनिबंध सादर केला. त्यांना विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिव प्राचार्या शुभांगी गावडे, प्राचार्य एस. वाय. होनगेकर, प्रा. डॉ. एस. एस. कांबळे यांचे प्रोत्साहन मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्व उमेदवारांचा खर्च ७० लाखांच्या आतच

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून रिंगणात असलेल्या उमेदवारांनी अंतिम खर्च सोमवारी निवडणूक प्रशासनाकडे दिला. दोन्ही मदारसंघातील सर्व उमेदवारांनी ७० लाखांच्या मर्यादेतच खर्च केल्याची माहिती दिली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी, शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने, प्रा. संजय मंडलिक, राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षाचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी सर्वाधिक खर्च केला आहे. यातील माने, प्रा. मंडलिक यांना प्रत्येकी ४० लाख शिवसेनेने तर महाडिक यांना ६० लाख आणि शेट्टी यांना ३७ लाख रूपये पक्षाने दिल्याचे खर्चाच्या अहवालात म्हटले आहे.

'कोल्हापूर' मतदारसंघातून १५ तर 'हातकणंगले' मतदारसंघातून १७ उमेदवार रिंगणात होते. उमेदवारी अर्ज भरल्यापासून ते निकालापर्यंत प्रत्येक उमेदवारास ७० लाख खर्चाची मर्यादा होती. प्रशासनाकडे प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेदरम्यान तीन टप्प्यात आणि निकाल लागल्यानंतर एक महिन्याच्या आत म्हणजे २३ जूनच्या आत अंतिम खर्च देणे बंधनकारक होते. त्यानुसार सर्वच उमेदवारांनी खर्चाचा तपशील दिला. 'कोल्हापूर'मधून निवडून आलेले प्रा. मंडलिक यांनी ६७ लाख ५१ हजार ३९९ रूपये खर्च केले आहेत. त्यांना पक्षाने ४० लाख आणि देणगीदारांनी १२ हजार ९४ हजार ३०० रूपये दिलेत. पराभूत उमेदवार महाडिक यांनी ६६ लाख ९७ हजार १०७ खर्च केले आहेत. त्यांना पक्षाने ६० लाख रूपये दिले. 'हातकणंगले'तून निवडून आलेले माने यांनी ६६ लाख ८४ हजार ५०८ रूपये खर्च केले. त्यांनाही पक्षाने ४० लाख दिले. तर १२ लाख ८० हजार रूपये देणगी स्वरूपात मिळाले आहेत. शेट्टी यांनी ६९ लाख २ हजार ६०७ रूपये खर्च केले आहेत. त्यांना पक्षाने ३७ लाख रूपये दिले.

.......

उमेदवारनिहाय निवडणुकीतील केलेला खर्च

कोल्हापूर : दुंडाप्पा श्रीकांत : १ लाख २० हजार, संजय मंडलिक : ६७ लाख ५१ हजार, धनंजय महाडिक : ६६ लाख ९७ हजार, अरूणा माळी : ८ लाख १ हजार, किसन काटकर :४९ हजार, सिध्दार्थ नागरत्ना : १ लाख ७१ हजार, दयानंद कांबळे : १ लाख ९२ हजार, बाजीराव नाईक :६४ हजार, संदीप संकपाळ :१ लाख ३० हजार, परेश भोसले : २ लाख ७३ हजार, संदीप कोगले :२२ हजार, युवराज देसाई : १ लाख ३२ हजार, अरविंद माने : १४ हजार, राजेंद्र कोळी :५५ हजार.

......

हातकणंगले : अस्लम सय्यद : १२ लाख ५ हजार, आनंदराव सरनाईक : ३ लाख २७ हजार, संजय अग्रवाल : ९१ हजार, प्रशांत गंगावणे : १७ हजार, किशोर पन्हाळकर : २५ हजार, अजय कुरणे : ५४ हजार, महादेव जगदाळे : ६६ हजार, मदन सरदार :४१ हजार, नितीन भट : ७८ हजार, राजू मुजीकराव शेट्टी :१ लाख १२ हजार, राघुनाथ पाटील : ४ लाख २२ हजार, राजू शेट्टी :६९ लाख २ हजार, संग्रामसिंह गायकवाड : ४३ हजार, विश्वास कांबळे :२३ हजार, विजय चौगुले : ५५ हजार, विद्यासागर ऐतवडे : २५ हजार.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

६३ हजार किंमतीचेविदेशी मद्य पकडले

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य उत्पादन शुल्क विभागाने आजरा सावंतवाडी रोडवर सापळा रचून गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करणारा टेंपो पकडला. पोलसांनी ६२ हजार ४०० रुपयांच्या विदेशी मद्याच्या बाटल्या, ४०७ टेंपो, असा तीन लाख ६२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी वाहन चालक संतोष भगवान शिंदे (वय ३२, रा. खंडेराजुरी,ता. मिरज, जि. सांगली) याला ताब्यात घेतले आहे.

कारवाईत निरीक्षक संभाजी बरगे, दुय्यम निरीक्षक जगन्नाथ पाटील, के.बी. नडे, संदीप जानकर, सचिन काळेल, सागर शिंदे, जय शिनगारे यांनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पेटाळा मैदानाला तळ्याचे स्वरुप

0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रविवारी झालेल्या दमदार पावसामुळे लहान, मोठे गटर्स व चॅनेल तुंबल्याने रस्त्यावरुन पाण्याचे लोट वाहत होते. अनेक रस्त्यांना नाल्याचे स्वरुप प्राप्त झाले होते. पेटाळा मैदानातून जाणारे गटर्स अशाच पद्धतीने तुंबल्याने मैदानाला तळ्याचे स्वरुप प्राप्त झाले असून पाण्यातूनच विद्यार्थी व पालकांना दिवसभर ये-जा करावी लागली. त्यामुळे पहिल्याच दमदार पावसात महापालिकेने नाले व गटर्स सफाईचा केलेला दावा फोल ठरला.

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्यावतीने नाले व गटर्स सफाई केली जाते. यावर्षीच्या सफाई मोहिमेमध्ये मोठे व छोट्या नालेसफाईला अधिक महत्त्व देताना गटर्स व चॅनेल सफाईकडे दुर्लक्ष केल्याचे रविवारी झालेल्या पावसामुळे सिद्ध झाले.

मान्सून सर्व राज्यभर व्यापत असताना रविवारी शहराला जोरदार पावसाने झोडपून काढले. तास ते दीड तासाच्या पावसामुळे सखल भागासह उंचावरील रस्त्यावरुनही पावसाचे पाणी वाहत होते. शहरात सर्वत्रच अशी स्थिती असल्याने एकाच पावसात गटर्स सफाईची पोलखोल झाली. विशेषत: पेटाळा मैदान परिसरात तर महापालिकेचे अपयश ठळकपणे दिसून आले.

सिद्धाळा गार्डनकडून दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या पेटाळा मैदानातून जाणारे मोठे गटर्स महाराष्ट्र हायस्कूलकडील परिसरामध्ये रविवारच्या पावसामुळे तुंबले. पावसाचे पाणी वाहून जाण्यास अटकाव झाल्याने सर्व पाणी मैदानावर जमा झाले. पाण्याला मार्ग करुन देण्यासाठी न्यू हायस्कूलच्या पिछाडीस गटर्स फोडून काढण्यात आले. तरीही पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. दिवसभर पावसाच्या तुरळक सरी पडल्या असल्या तरी मैदानातील पाणी जराही कमी झालेले नव्हते. परिणामी सकाळी शाळेत आलेल्या विद्यार्थी व त्यांना सोडण्यास येणाऱ्या पालकांना या पाण्यातून मार्ग काढावा लागला. सायंकाळपर्यंत मैदानातील पाणी अजिबात कमी झालेले नव्हते.

................

चौकट

पेटाळा मैदानातून मोठे गटर्स जाते. न्यू हायस्कूलच्या पिछाडीस गटर्समध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा अडकून राहिला आहे. या कचऱ्यामध्ये प्लास्टिक बाटल्या मोठ्या प्रमाणात होत्या. सकाळी गटर्सवरील सिमेंट काँक्रिट तोडून हा कचरा बाहेर काढण्यात आला. गटारीतून प्लास्टिक बाटल्यांचा अक्षरश: खच बाहेर काढण्यात आला. तरीही पाण्याचा पूर्ण निचरा होऊ शकला नाही.

..........

पावसाच्या तुरळक सरी

शनिवारी व रविवारी सायंकाळी पावसाने शहरासह जिल्ह्याला झोडपून काढले होते. सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होत होते. दुपारपर्यंत पावसाने हुलकावणी दिली. दुपारी तीनच्या दरम्यान शहराच्या काही भागात पावसाचा तुरळक शिडकावा झाला. त्यानंतर ढगाळ वातावरण होते, मात्र पावसाने हुलकावणी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर जिल्हा परिषदेचा दिल्लीत गौरव

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'स्वच्छ-सुंदर शौचालय रंगवा' स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागात स्वच्छतेविषयक जागर मांडणाऱ्या कोल्हापूर जिल्हा परिषदेचा नवी दिल्लीत गौरव झाला. केंद्र सरकारच्या स्वच्छता व पेयजल मंत्रालयातर्फे आयोजित विशेष समारंभात समारंभात 'स्वच्छ-सुंदर शौचालय रंगवा' स्पर्धेत देशपातळीवर द्वितीय क्रमाकांचा पुरस्कार पटकावल्याबद्दल कोल्हापूरचा सोमवारी सन्मान करण्यात आला. केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते जि.प.अध्यक्षा शौमिका महाडिक व मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

या कार्यक्रमाप्रसंगी केंद्र सरकारने जून ते सप्टेंबरपर्यंत देशपातळीवर स्वच्छता अभियानची घोषणा केली. सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. स्वच्छता व पेयजल विभागाचे सचिव परमेश्वर अय्यर, अतिरिक्त सचिव अरुण बरोका यांच्या प्रमुख उपस्थितीत विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे हा समारंभ झाला. या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्याने देशात द्वितीय व महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. समारंभाप्रसंगी मान्यवरांनी, कोल्हापूर जिल्हा परिषदेने या स्पर्धेला लोकचळवळीचे स्वरुप दिल्याचे कौतुकोद्गार काढले.

स्पर्धेच्या एक ते ३१ जानेवारी या कालावधीत जिल्ह्यातील ४,३१,५८४ इतकी शौचालये रंगविली होती. तसेच सार्वजिनक शाळा व अंगणवाडी येथील मिळून ८,४१९ इतकी शौचालये रंगवण्यात आली.

बक्षीस समारंभाला राज्य सरकारच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपसचिव अभय महाजन, जिल्हा परिषदेच्या स्वच्छता व पाणी पुरवठा विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रिदर्शिनी मोरे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक विजय पाटील, सावर्डे दुमाला येथील सरपंच सुवर्णा कारंडे, पेंढाखळेच्या सरपंच सुनीता पाटील, गडहिंग्लज तालुक्यातील स्वच्छागृही सिद्धाप्पा करगार आणि राधानगरी तालुक्यातील स्वच्छागृही रोहित भंडारी, आदी उपस्थित होते.

...............

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौर निवड २ जुलैला होणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापौर सरिता मोरे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या महापौरपदासाठी मंगळवारी (ता. २ जुलै) निवडणूक होणार आहे. याबाबतची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाच्यावतीने महापालिका प्रशासनाला सोमवारी सायंकाळी दूरध्वनीद्वारे देण्यात आली आहे. निवडणून निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे सीईओ अमन मित्तल यांची नियुक्ती केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ठरलेल्या फॉर्म्युलानुसार महापौर मोरे यांनी बुधवारी झालेल्या महापालिकेच्या महासभेमध्ये राजीनामा दिला. मोरे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी निवड कार्यक्रम जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांना पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयाच्यावतीने दोन जुलै रोजी महापौर निवडीची तारीख देत असल्याचे महापालिका प्रशासनाला दूरध्वनीद्वारे कळवले आहे. सभाध्यक्ष म्हणून सीईओ मित्तल यांची नियुक्ती केल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. दोन जुलै ही निवडीची तारीख निश्चित झाल्यास २७ किंवा २८ जून रोजी महापौरपदासाठी अर्ज दाखल होतील. महापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगरसेविका अॅड. सूरमंजिरी लाटकर आणि माधवी गवंडी यांच्या नावाची चर्चा असून ताराराणी आघाडीकडून स्मिता माने यांचा अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.

.. .. . .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वडाचे झाड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत

0
0

वडाचे झाड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत

सातारा

सातारा-लोणंद या रहदारीच्या रस्त्यावर रविवारी रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसात अंबवडे गावानजीक असलेले जुनाट वडाचे झाड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक सोमवारी सकाळी दोन तासांपेक्षा जास्त वेळ विस्कळीत झाली होती.

सकाळी उशिरा रस्त्यावरील झाड काढण्याचे काम सुरू झाल्यावर दुपारनंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. रविवारी या भागात मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली, त्यामुळे या परिसरातील अनेक गावांतील छोटे-मोठे बंधारे भरले आहेत. वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडली असली तरी सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही; मात्र सकाळपासून अवजड वाहतूक रखडली होती. रस्त्यावर पडलेले झाड काढेपर्यंत लोणंदकडे जाणारी वाहतूक व्यवस्था रेवडी, पळशी, देऊरमार्गे तसेच वडूथ, सातारारोड, देऊरमार्गे वळविण्यात आली होती.

.............

भांबवलीचा वजराई धबधबा सुरू

सातारा

कास पुष्प पठारापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेला भांबवली वजराई धबधब्याला पर्यटनस्थळ घोषित केले असून, या पर्यटन स्थळाला 'क' दर्जा प्राप्त झाला आहे. सुमारे १८४० फूट उंचीवरून तीन टप्प्यात कोसळणारा भांबवलीचा वजराई धबधबा गेल्या काही वर्षांपासून प्रकाशझोत आला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून पुरेशा दळवळणाच्या सुविधांअभावी दुर्लक्षित राहिलेला आणि चोहीकडून गर्द जंगलाने व्यापलेला भांबलीचा वजराई धबधबा पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरू लागला आहे. परंतु, या धबधब्यापर्यंत पोहचण्याचा मार्ग हा घनदाट जंगलातून, घसरड्या पायवाटामधून जातो. त्यामुळे धबधब्यापर्यंत पोहचण्याचा मार्ग अतिशय धोकादायक होता. वजराई धबधब्याला पर्यटनस्थळ घोषित केल्यामुळे वन विभागाच्या पुढाकाराने या धबधब्याच्या पर्यटन विकासासाठी प्रयत्नांना यश आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला

0
0

कराड :

नवीन कोयना पुलाखाली दक्षिण बाजूला अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला. ही घटना सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने मृतदेहाची ओळख पटलेली नाही. राहुल काटकर (रा. अबईचीवाडी) यांनी पोलिसात खबर दिली आहे. पोलिसांनी याची नोंद आकस्मित मयत अशी केली असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.

.........

म. टा. वृत्तसेवा, कराड

कराड शहरात सोमवारी दुपारी मुसळधार पाऊस झाला. दुपारी तीनच्या सुमारास सुरू झालेला पाऊस सायंकाळी पाचवाजेपर्यंत अखंड कोसळत होता. शहरातील दत्त चौक, विजय दिवस चौक, एसटी. स्टॅन्ड परिसर, पोपटभाई पेट्रोल पंप आदी चौकामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. कराड बसस्थानकामध्ये पावसाचे पाणी जास्त प्रमाणात साठल्यामुळे प्रवाशांना व बस चालकांना मोठी कसरत करावी लागली. पोपटभाई पेट्रोल पंपानजीकच्या सर्व कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये पावसाचे पाणी घुसले होते. या ठिकाणी दुकानात घुसलेले पाणी बाहेर काढण्यासाठी व्यापाऱ्यांची तारांबळ उडत होती. कराड तालुक्यातील सर्वच मंडलामध्ये सोमवारी पावसाची नोंद झाली. जमिनीतील जलस्त्रोत वाढण्यासाठी आणखी तीन ते चार दिवस पाऊस पडावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

........

चार ग्रामपंचायत पोट निवडणुक निकाल जाहीर

म.टा. वृत्तसेवा,कराड: कºहाड तालुक्यातील सवादे, करवडी, शिरगाव व पेरले या चार ग्रामपंचायतीच्या नऊजागेसाठी पोटनिवडणूकीची आज मतमोजणी करण्यात आली. यावेळी सवादे ग्रामपंचायत सदस्यपदी मोहन कुंभार, गणेश बांदेकर, विनायक थोरात, दिपाली थोरात, मोनाली सुतार, सुनंदा थोरात हे सहा सदस्य निवडून आले. तर शिरगाव ग्रामपंचायती सदस्यपदी विद्या महाडीक, पेरलेच्या सदस्यपदी प्रविण चव्हाण निवडून आले. करवडी ग्रामपंचायती सदस्यपदी कुणाल पिसाळ हे निवडून आले.

चार ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी एकूण एकोणीस सदस्य निवडणूक रिंगणात उतरले होते. या ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान पार पडले. यावेळी दिवसभरात तब्बल ६१.४१ टक्के मतदान झाले. तालुक्यातील सवादे ग्रामपंचायतीतील एकूण तीन वॉर्ड मधून सहा सदस्य निवडून आले. यात वॉर्ड क्रमांक एक मधून नागरिकांचा मागास प्रवर्गातून मोहन कुंभार, सर्वसाधारण वर्गातून गणेश बांदेकर, वार्ड क्रमांक दोन मधून सर्वसाधारण वर्गातून विनायक थोरात तर सर्वसाधारण स्त्री राखीवमधून दिपाली थोरात, वॉर्ड क्रमांक तीनमधून नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री राखीवमधून मोनाली सुतार, सर्वसाधारण स्त्री राखीवमधून सुनंदा थोरात हे उमेदवार निवडून आले. शिरगाव येथे सर्वसाधारण स्त्रीवर्ग जागेसाठी विद्या महाडीक या उमेदवार निवडून आल्या. पेरलेत सर्वसाधारण पुरूष जागेसाठी प्रविण चव्हाण हे ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून आले. तर सर्वाधिक कमी मतदार झालेल्या करवडीत हनुमान वॉर्ड क्रमांक एकमधून सर्वसाधारण जागेसाठी उभे राहिलेल्या उमेदवारांपैकी कुणाल पिसाळ हे ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images