Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

खड्डे बुजले, प्रतीक्षा डांबरीकरणाची

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

मध्यवर्ती बस स्थानकाच्या समोरील रिक्षा थांब्याच्या पिछाडीस असलेल्या आणि हॉटेल सह्याद्री, चालुक्यसमोरील रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. १५ दिवसांपूर्वी याचे खडीकरण करण्यात आले. मात्र नंतर रस्त्याचे काम ठप्प झाले असून ही खडी उखडत आहे. रस्त्याचे तत्काळ डांबरीकरण झाले नाही तर पावसाळ्यात या रस्त्याची पुन्हा दूरवस्था होईल अशी स्थिती आहे.

मध्यवर्ती बसस्थानकासमोरील आणि रिक्षा स्टॉपच्या पिछाडीस असलेल्या या रस्त्याचा दुचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी सर्वाधिक वापर होतो. तर रत्नागिरीकडे जाणारी खासगी वाहने येथे थांबलेली असतात. हॉटेल सह्याद्री ते महाराजा हॉटेलपर्यंतच्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले होते. रस्त्याचा वापर वाहतुकीसाठी होत नसला तरी पर्यटकांची आणि स्थानिकांची वाहने लावण्यासाठी पार्किंग आहे. गेल्या दहा वर्षात रस्त्याची कोणतीही दुरुस्ती न केल्याने मोठ-मोठे खड्डे पडले होते. परिणामी पार्किंगसाठी येणाऱ्या वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत होती. त्यामुळे वाहनधारक रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी करत होते. मात्र त्यांच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात होते. १५ दिवसांपूर्वी ताराराणी विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली. मोठी खडी, बारीक खडी टाकून रोलर फिरविण्यात आला. मात्र शेवटचा लेअर न टाकल्याने पसरलेली बारीक खडी वाहनांच्या वर्दळीमुळे आजूबाजूला जावून पुन्हा मोठी खडी दिसू लागली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी यावर बारीक खडीचा लेअर न टाकल्यास टाकलेली खडी जावून पुन्हा खड्डे पडण्याची शक्यता आहे. आठ दिवसांत काम पूर्ण करण्याचा दावा केला जात असला तरी दिलेल्या मुदतीत काम न झाल्यास खर्च झालेला निधी वाया जाण्याची शक्यता आहे.

पंधरा दिवसांपूर्वी रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. आठवड्यात रस्त्यावर शेवटचा लेअर टाकण्यात येईल. कोणत्याही स्थितीत रस्त्याचे काम अर्धवट सोडले जाणार नाही.

- हर्षजित घाटगे, उपशहर अभियंता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गणवेशाची प्रतीक्षाच, ‘निधी’ची अनुपलब्धता

$
0
0

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:Appasaheb_MT

कोल्हापूर :

गणवेश खरेदीचा अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला, पण हाती निधीच नाही अशी अवस्था महापालिका आणि जिल्हा परिषद शाळांची बनली आहे. समग्र शिक्षा अभियान अंतर्गत गणवेश खरेदीसाठी आवश्यक ५ कोटी ७६ लाख २८ हजार ८८० रुपयांचा निधी अद्याप उपलब्ध झालेला नाही. निधीच उपलब्ध न झाल्यामुळे पहिल्याच दिवशी नवा गणवेश मिळण्याची शक्यता कमी आहे. नवा गणवेश मिळण्यासाठी महिनाभराचा कालावधी लागणार आहे.

दुसरीकडे सर्व शिक्षा अभियानांतर्गत शिल्लक एक कोटी २० लाख रुपयांचा निधीचे बारा तालुक्यात वितरण केले आहे. प्राथमिक स्वरुपात प्रत्येक तालुक्याला दहा लाख रुपयांचा निधी वितरीत केला आहे, त्या माध्यमातून या महिनाअखेरीस एक गणवेश विद्यार्थ्यांच्या हाती मिळू शकतो. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील पंचायत समितीतील गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्रक काढून उपलब्ध दहा लाख निधीतून गणवेश खरेदीसाठीची प्रक्रिया राबविण्याच्या सूचना केल्या आहेत. पंचायत समितीवरुन हा निधी प्रत्येक शाळेच्या खात्यावर जमा होऊन, गणवेश खरेदी प्रक्रियाची पूर्ण होण्यासाठी जुलै महिना उजाडण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील १ लाख १६ हजार ०४८ विद्यार्थी, विद्यार्थिनी गणवेश खरेदीसाठी पात्र आहेत.

एका शैक्षणिक वर्षासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला दोन गणवेश देण्याची तरतूद आहे. समग्र शिक्षा अभियान अंतर्गत जिल्हा परिषद, महापालिका व नगरपालिका शाळेतील पहिली ते आठवीतील मुली, एससी व एसटी प्रवर्गातील मुले आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील मुला, मुलींना गणवेश दिला जातो. पूर्वी सर्वशिक्षा अभियानमधून गणवेश वाटप व्हायचे. थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जायची. सरकारने यंदा त्यामध्ये बदल करुन गणवेश वाटपाचे अधिकार पुन्हा शाळा व शाळा व्यवस्थापन समितीला दिले. मात्र मुदतीत निधी मिळू न शकल्याने शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. एक गणवेश मिळण्यास जुलै महिना उजाडण्याची चिन्हे आहेत. महिनाभरात समग्र शिक्षा अभियानातून उर्वरित निधी मिळाल्यास दुसरा गणवेश पंधरा ऑगस्टपर्यंत वितरित होऊ शकेल.

........

पहिली ते आठवीतील मुली ९१,७४६

एससी प्रवर्गातील मुले १४,८६१

एसटी प्रवर्गातील मुले ६६१

दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील मुले ८७०

एकूण लाभार्थी १,१६,०४८

एकूण अनुदानाची रक्कम ६,९६,२८,८००

सध्या वितरित केलेले अनुदान १,२०,००,०००

प्राप्त व्हावयाचा निधी ५,७६,२८,८००

...............

कोट

'सर्व शिक्षा अभियान अंतर्गत शिल्लक एक कोटी २० लाख रुपयांचा निधी गणवेश खरेदीसाठी वापरण्याच्या सूचनेनुसार सध्या कार्यवाही सुरू आहे. प्रत्येक तालुक्यासाठी दहा लाख रुपयांचे नियोजन आहे. गटशिक्षणाधिकाऱ्यांना यासंदर्भात सूचना केल्या आहेत. हा निधी संबंधित शाळेकडे वर्ग करुन पहिल्या टप्प्यात लवकरात लवकर एक गणवेश मिळावा यासाठी प्रयत्न आहेत. गणवेश खरेदीची प्रक्रिया शाळा व्यवस्थापन समिती राबविणार आहे.

आशा उबाळे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग

..............

तालुकानिहाय गणवेश वाटप

तालुका विद्यार्थी लाभार्थी प्राप्त व्हावयाचा निधी (रक्कम रुपयांत)

शाहूवाडी ९०८८ ४४,५२,८००

पन्हाळा १०,०६७ ५०,४०,२००

हातकणंगले १९,९२९ १,०९,५७,४००

शिरोळ १२,९८३ ६७,८९,८००

करवीर १७,२७९ ९३,६७,४००

गगनबावडा २,०७४ २,४४,४००

राधानगरी ८९६४ ४३,७८,४००

कागल १०,३०४ ५१,८२,४००

भुदरगड ५,७८२ २४,६९,२००

आजरा ४२२१ १५,३२,६००

गडहिंग्लज ७,४१४ ३४,४८,०००

चंदगड ७९४३ ३७,६५,८००

...........

महापालिका शाळेतील मुलांनाही फटका

महापालिका शाळेतील ६५१७ विद्यार्थी गणवेशासाठी पात्र आहेत. गणवेशासाठी ३९ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. सर्वशिक्षा अभियानातील ३० लाख रुपये निधी शिल्लक आहे. उर्वरित नऊ लाख रुपयांच्या निधीची मागणी शिक्षण समितीने केली आहे. तीस लाख रुपयांतून गणवेश खरेदी प्रक्रिया राबवण्यासाठी महिनाभराचा कालावधी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंजिनीअरिंग इंडस्ट्रीची वस्त्रनगरीत आघाडी

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

वस्त्रनगरी अशी ओळख असलेल्या इचलकरंजीत इंजिनीअरिंग इंडस्ट्रीने मोठी आघाडी घेतली आहे. साडेचारशेहून अधिक उद्योगांची वार्षिक उलाढाल २० हजार कोटींवर पोहोचली असून, निर्यातही वाढत आहे. उद्योगांना आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ मिळावे, यासाठी इचलकरंजी इंजिनीअरिंग असोसिएशनने अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना अत्याधुनिक यंत्रांद्वारे प्रशिक्षणाचे धडे देण्यास सुरुवात केली आहे.

अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदव्या घेऊन दरवर्षी हजारो विद्यार्थी बाहेर पडतात. मात्र, या विद्यार्थ्यांकडे आवश्यक व्यावसायिक कौशल्ये नसतात. इंजिनीअरिंग उद्योगातील अत्याधुनिक यंत्रसामग्रींची माहिती नसल्याने विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळत नाहीत. याशिवाय उद्योजकांनाही आवश्यक मनुष्यबळ मिळत नाही. हीच बाब लक्षात घेऊन इचलकरंजी इंजिनीअरिंग असोसिएशनने कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे. पहिल्या टप्प्यात आष्टा येथील अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. यासाठी असोसिएशनला केईहिन या जापनीज कंपनीने सहकार्य केले असून, प्रशिक्षणासाठी अत्याधुनिक सीएनसी मशीन मोफत पुरवले आहे. या मशीनचा वापर कशा पद्धतीने करावा, याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जात आहे. याशिवाय इंजिनीअरिंग क्षेत्रातील अन्य आधुनिक यंत्रसामग्री, उत्पादनांची गुणवत्ता याची माहिती दिली जात आहे.

इचलकरंजी येथील लक्ष्मी, शहापूर, पार्वती आणि कल्लाप्पाणा आ‌वाडे औद्योगिक वसाहतींमध्ये एकूण ४५० इंजिनीअरिंग उद्योग आहेत. या उद्योगांची वार्षिक उलाढाल २० हजार कोटींहून अधिक आहे. सध्या सुमारे २० हजार कर्मचारी या उद्योगात आहेत. फाउंड्री, टेस्टिंग मशीन, आरोग्य क्षेत्रासाठी आवश्यक असलेली यंत्रसामग्री, इंजिनसाठी लागणारे कार्बोरेटर तयार करणाऱ्या अनेक नामांकित कंपन्या इचलकरंजीत आहेत. देशासह परदेशातील मोठ्या कंपन्या इचलकरंजीतील कंपन्यांशी करार करीत आहेत. वाढती मागणी लक्षात घेऊन कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी प्रयत्न सुरू आहेत. सीएनसीसह अन्य क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी असोसिएशन कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महाविद्यालयांसोबत काम करीत आहे. या प्रयत्नांमुळे येणाऱ्या काळात आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होईल. याशिवाय विद्यार्थ्यांना नेमके व्यावसायाभिमुख शिक्षण मिळेल, असा विश्वास इचलकरंजी इंजिनीअरिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

असोसिएशनतर्फे प्रशिक्षण केंद्र

इंजिनीअरिंग असोसिएशनने स्वत:च्या इमारतीत प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. शुक्रवारी अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली. पंधरा दिवस हे प्रशिक्षण सुरू राहणार आहे. यात असोसिएशनमधील उद्योजक, तज्ज्ञ मार्गदर्शकही विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. यानंतर अन्य महाविद्यालयांमधली विद्यार्थ्यांनाही प्रशिक्षित केले जाणार आहे.

विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण मिळावे, असा आमचा दृष्टिकोन आहे. यासाठीच असोसिएशनने स्वखर्चातून प्रशिक्षण केंद्र सुरू केले. अनेक कंपन्या आणि उद्योजक मदतीसाठी पुढे येत आहेत. कुशल मनुष्यबळाचा प्रश्न सोडवण्यासाठी याची मोठी मदत होईल.

- काशीनाथ जगदाळे, अध्यक्ष, इचलकरंजी इंजिनीअरिंग असोसिएशन

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना अॅकॅडमिक शिक्षणासह प्रात्यक्षिकही महत्त्वाचे असते. उद्योगांसाठी आवश्यक शिक्षण मिळाल्यास याचा विद्यार्थ्यांना फायदा होतो. इचलकरंजी इंजिनीअरिंग असोसिएशनच्या मदतीने आमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण मिळत आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांना चांगल्या नोकरीच्या संधी निर्माण करेल.

- प्रा. डॉ. एस. पी. चव्हाण, यांत्रिकी विभागप्रमुख, डांगे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, आष्टा

दृष्टिक्षेपात इचलकरंजीतील उद्योगक्षेत्र

- लक्ष्मी, शहापूर, पार्वती, कल्लाप्पाणा आ‌वाडे औद्योगिक वसाहत

- फाउंड्री, टेस्टिंग मशीन, आरोग्य क्षेत्रासाठीची यंत्रसामग्री, इंजिनसाठीचे कार्बोरेटर निर्मिती करणाऱ्या कंपन्या

- असोसिएशनला केईहिन या जापनीज कंपनीचे सहकार्य

- प्रशिक्षणासाठी अत्याधुनिक सीएनसी मशीन मोफत उपलब्ध

४५०

औद्योगिक वसाहतींतील इंजिनीअरिंग उद्योग

२०००० कोटी

उद्योगांची वार्षिक उलाढाल

२००००

उद्योगांमध्ये कर्मचारी कार्यरत

लोगो : सार्टअप इंडिया

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरः राजर्षी शाहू पुरस्कार अण्णा हजारे यांना जाहीर

$
0
0

कोल्हापूरः

यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जाहीर करण्यात आल्याची घोषणा जिल्हाधिकारी तथा राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बुधवारी केली. ट्रस्टचे विश्वस्त डॉ. जयसिंगराव पवार, महापालिकेचे आयुक्त कलशेट्टी यावेळी उपस्थित होते. १ लाख रुपये, स्मृती चिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट, कोल्हापूर यांच्यावतीने प्रतिवर्षी शाहू जयंतीनिमित्त समाज प्रबोधन, साहित्य, कला, संस्कृती, विज्ञान, संगीत, क्रीडा इत्यादी क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीस अथवा संस्थेस हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

यंदाचा हा पुरस्कार अण्णा हजारे यांना त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील असामान्य कामगिरीबद्दल आणि राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा कृतीशील वारसा चालू ठेवणाऱ्या एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी समाज प्रबोधनाच्या वाटचालीमध्ये दीर्घकाळ दिलेल्या मौलिक योगदानाचा सन्मान म्हणून देण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला असल्याचेही देसाई यांनी सांगितले. हा पुरस्कार राजर्षी शाहू जयंतीदिनी म्हणजे मंगळवार. २६ जून रोजी सायंकाळी ६ वाजता शाहू स्मारक भवन येथे आयोजित एका कार्यक्रमामध्ये देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विठूरायाच्या चंदन उटी पूजेची सांगता; मोगऱ्याच्या फुलांची सजावट

$
0
0

पंढरपूरः

देशभरात पावसाला सुरुवात झाली असताना विठुरायाच्या चंदन उटी पूजेची सांगता करण्यात आली. गेले ३ महिने उन्हापासून विठुरायाला दिलासा मिळण्यासाठी मंदिर समितीच्यावतीने विठ्ठल रुक्मिणीला चंदनाचा लेप लावला जायचा. आता पावसाळ्याचे आगमन होत असताना वातावरणातील उष्मा कमी झाल्याने देवाला दिला जाणारा हा शीतल चंदनाचा लेप आजपासून बंद करण्यात आला. मंदिराचे व्यवस्थापक बालाजी पुडाळवंड यांच्याहस्ते विठूरायाची सपत्नीक चंदन उटी पूजेने सांगता झाली.

याच दिवसाचे औचित्य साधून पुण्याचे भक्त राम जांभुळकर यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला पांढऱ्या शुभ्र सुवासिक मोगरा व गुलाब फुलांची आरस केली. देवाचा गाभारा, चौखांभी, सोळखांभी सभामंडप मोगऱ्याच्या फुलांनी व सुवासाने दरवाळून निघाला. श्री विठ्ठल चरणी अंथरलेला गुलाब पाकळ्यांचा गालिचा अतिशय सुंदर दिसत होता. उन्हाळ्यातील शेवटच्या चंदन उटी पूजा झाल्यानंतरचे रूप आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शन घेण्यासाठी गर्दी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारामतीचे 'ते' पाणी पुन्हा दुष्काळी भागालाः राज्य सरकारचा निर्णय

$
0
0

पंढरपूरः

सत्तेत असताना कायद्यात बदल करून बारामतीकडे वळवलेले नीरा देवघर धरणाचे पाणी पुन्हा दुष्काळी भागाला देण्याचा आदेश राज्य सरकारने काढला आहे. राज्य सरकारचा सदर आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

माढ्याचे नवनिर्वाचित खासदार रणजित निंबाळकर यांनी निवडून येताच सांगोला येथील दुष्काळी बैठकीत याबाबत आवाज उठवत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचेकडे यासंदर्भात मागणी केली होती. बुधवारी झालेल्या बैठकीत याबाबतचा अध्यादेश काढत बारामतीकडे वळवलेले पाणी पुन्हा उजव्या कालव्यातील दुष्काळी सांगोला, माळशिरस, पंढरपूर फलटणला देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. 'ज्याला जनता राजा म्हणत होती, त्यानेच दहा वर्षे आम्हाला दुष्काळाच्या खाईत लोटले होते. आता मात्र मुख्यमंत्र्यांनी आमच्या मागचा दुष्काळ कायमचा हटवला', अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी दिल्या आहेत.

नीरा देवघर धरणाच्या पाण्याचे वाटप करताना पुणे, बारामती पाणी घेत असलेल्या डाव्या कालव्यात ४३ % तर सांगोला, फलटण, माळशिरस आणि पंढरपूर पाणी घेत असलेल्या उजव्या कालव्याला ५७ % पाणी देण्याचा निर्णय झाला होता. २००९ मध्ये अजित पवार जलसंपदामंत्री झाल्यावर त्यांनी करार बदलत दुष्काळी उजव्या कालव्याचे जवळपास ११ टीएमसी पाणी बारामतीकडे डाव्या कालव्यात वळवले होते. माढ्याचे खासदार रणजित निंबाळकर यांनी यासाठी ताकद पणाला लावून हे पाणी दुष्काळी भागाला आणण्याचे प्रयत्न सुरु केल्यावर खुद्द शरद पवार आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर पाणी पुन्हा बारामतीकडे जाऊ नये, यासाठी सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांनी गळफास आंदोलन केले होते. आता पुन्हा एकदा पूर्वीच्या कायद्यानुसार हे पाणीवाटप करण्याचा मोठा निर्णय भाजप सरकारने घेतल्याने बारामतीला वळवलेले दुष्काळी भागाच्या हक्काचे पाणी पुन्हा या भागाला मिळणार असल्याने या भागातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळून त्यांची तहान भागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजप महानगर अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ

$
0
0

म.टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यशानंतर भाजपच्या स्थानिक महानगर अध्यक्ष, ग्रामीण अध्यक्षांसह सर्व पदाधिकाऱ्यांना विधानसभा निवडणुकीपर्यंत मुदतवाढ मिळण्याचे संकेत मिळाले आहेत. तीन वर्षांचा अनुभव असलेल्या भाजपच्या टीमलाच निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहेत.

तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर भाजपमध्ये पक्षांतर्गत निवडणुका होतात. मात्र तीन वर्षे पूर्ण झालेल्या पदाधिकाऱ्यांना विधानसभा निवडणुकीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय झाला आहे. सलग दोन वेळा प्रत्येकी तीन वर्षांची मुदतवाढ मिळालेल्या महानगर अध्यक्षांच्याऐवजी स्थानिक भाजप आमदारांची नियुक्ती करण्याचा निर्णय झाला आहे. कोल्हापुरात महानगर अध्यक्ष संदीप देसाई आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष हिंदूराव शेळके यांची तीन वर्षांची मुदत संपली आहे. पण देसाई आणि शेळके यांना विधानसभा निवडणुकीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांनीही मुदतवाढ मिळाली आहे. पण काही सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार केला. महानगरपालिकेच्या काही भाजपच्या नगरसेवकांनी लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेतली होती. या संदर्भात काही पदाधिकाऱ्यांना पक्षाने नोटीसही पाठवली आहे. त्यांच्यावर कारवाई होणार का, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर पदाधिकारी बदलाची चर्चा स्थानिक पातळीवर सुरु झाली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे निवडून आल्यावर त्यांना गृहमंत्रीपदी बढती मिळाली. पण त्यांच्याऐवजी नवीन अध्यक्षाची निवड भाजपकडून जाहीर झालेली नाही. राज्य प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची वर्णी मंत्रिमंडळात लागली. त्यांनी केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नवीन प्रदेशाध्यक्ष कोण होणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंधारण मंत्री गिरीश महाजन, आमदार अशिष शेलार, सुरेश हाळवणकर यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. पण दानवेच प्रदेशाध्यपदी राहतील, असे पक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे. राष्ट्रीय आणि राज्यपातळीवरील पदाधिकाऱ्यांत बदल न झाल्याने हीच स्थिती स्थानिक पातळीवर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देविकाचे 'बावनकशी' यश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर आईची सोन्याच्या दागिन्याच्या दुकानात दिवसभर नोकरी तर वडिलांचे हॉटेलमध्ये काम. आई-वडील दिवसभर काबाडकष्ट करत असताना घरची आर्थिक स्थितीही बेताची. क्लासची फी हप्ताहप्त्याने भरली. पण आई-वडिलांचे स्वप्न लेकीने साकार केले. दहावीच्या परीक्षेत ८५ टक्के यश मिळवत देविका मोहन परदेशी हिने मिळवलेल्या बावनकशी यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. लक्ष्मीपुरी कोंडाओळ येथे परेदशी कुटुंबाचे वास्तव्य आहे. राहते घर मालकीचे असले तरी घरची आर्थिक स्थितीशी मुकाबला करताना वडील मोहन आणि आई तेजश्री दोघेही नोकरी करतात. आई तेजश्री या एका सोनेचांदीच्या दागिन्यांच्या शोरुममध्ये सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत नोकरी करतात तर वडील हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम करतात. दोघेही बाहेर असल्याने देविकाने घरकाम सांभाळून अभ्यास केला. छोट्या भावाच्या अभ्यासाकडेही लक्ष दिले. मुलगी हुशार असल्याने तिला चांगल्या क्लासला प्रवेश द्या असा सल्ला अनेकांनी परदेशी कुटुंबाला दिला. पण फी भरायला पैसे नसल्याने परदेशी कुटुंबाला चिंता सतावत होती. शनिवार पेठेतील क्लासच्या एन. एम. निळपणकर यांनी देविकाची गुणवत्ता पाहून तिला फीमध्ये सवलत देत हप्ताने फी भरण्याची मुभा दिली. सकाळी पाच वाजता उठून देविका सहा वाजता सकाळी क्लासला जायची. क्लासहून आठ वाजता घरी आल्यावर आईला मदत करत अभ्यास करायची. एमएलजी हायस्कूलमध्ये वर्गशिक्षिका स्नेहल टोणपे यांच्यासह शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले. शाळेतून घरी आल्यावर भावासह देविका अभ्यासाला बसायची. आई नोकरीहून घरी आल्यावर जेवण करुन पुन्हा अभ्यासाला बसायची. आई-वडिलांचे कष्ट पाहून देविकानेही क्लास आणि शाळेतील अभ्यास सोडून चार ते पाच तास अभ्यासाचे नियोजन केले. विज्ञान, गणितासह संस्कृत विषय स्कोअरिंग असल्याने त्यावर लक्ष दिले. देविकाने संस्कृत विषयात ९६, मराठीत ८६, सामाजिक शास्त्रमध्ये ९० तर इंग्रजी विषयात ७० गुण मिळाले. दहावीनंतर बारावी सायन्सचे देविका शिक्षण घेणार असून एअर होस्टेस म्हणून तिला करिअर करायचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वच्छतेसाठी सरसावले शेकडो हात

$
0
0

फोटो आहेत...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी बुधवारी सकाळी शेकडो हात सरसावले. एकमेकांना साथी हाथ बढानाची साद घालत प्रयाग चिखली येथील नदीपात्रातील प्लास्टिकच्या वस्तू, जुने कपडे, पत्रावळ्या, तुटलेल्या काचा, बाटल्या अशा स्वरूपातील कचरा जमा केला. जवळपास साडेतीन तास चाललेल्या या श्रमदानातून जवळपास चार टन कचरा संकलित केला. जिल्हा परिषद, पंचायत समिती करवीर आणि पन्हाळा येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मिळून २६३ जणांनी सहभाग घेतला.

'नमामि पंचगंगे' उपक्रमाच्या वर्षपूर्तीनिमित्त श्रमदानाचे आयोजन केले होते. पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीचा पुढील टप्पा म्हणून बुधवारी सकाळी प्रयाग चिखलीच्या घाटावर स्वच्छता मोहीम झाली. जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक, महापालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर. पी. शिवदास यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी सातच्या सुमारास स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली. अध्यक्षा महाडिक, सीईओ मित्तल यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी स्वच्छता अभियानात सहभागी होत कचरा उठाव केला तसेच काही भागात साफसफाई केली.

प्रमुख पदाधिकारी, अधिकारी श्रमदानात सहभागी झाल्यामुळे कर्मचारीसुद्धा हिरीरीने उतरले. घाट परिसर आणि नदीपात्रात ठिकठिकाणी विखुरलेला कचरा गोळा करण्यास सुरुवात झाली. प्लास्टिकच्या वस्तू, जुने कपडे, पत्रावळ्या, खरमाती, काचेच्या बाटल्या एकत्रित करून त्यांचा ढीग तयार केला. सकाळी साडेदहापर्यंत ठिकठिकाणी पसरलेला कचरा हटवून जागेची साफसफाई केली. घाट परिसर आणि नदीपात्रातील मिळून चार टन कचरा जमा झाला. करवीर पंचायत समिती सभापती राजेंद्र सूर्यवंशी, गटविकास अधिकारी सचिन घाडगे, जिल्हा परिषद सदस्या प्रियांका करवीर पंचायत समिती सदस्य मोहन पाटील, प्रयाग चिखलीच्या सरपंच उमा पाटील, वरणगेच्या सरपंच अपर्णा पाटील यांनीही श्रमदानात सहभाग घेतला.

००००

पदाधिकारी-सदस्यांची पाठ, अधिकाऱ्यांचा सहभाग

पंचगंगा नदी जिल्ह्याच्या दृष्टीने जिव्हाळ्याचा विषय आहे. नदी प्रदूषणाची विषय सध्या गाजत आहे. या पार्श्वभूमीवर प्रदूषणमुक्तीसाठी जिल्हा परिषदेचे कृतिशील पाऊल म्हणून बुधवारी स्वच्छता अभियान राबविले. पण या अभियानाकडे जिल्हा परिषदेतील विविध समित्यांचे सभापती, बहुतांश सदस्यांनी पाठ फिरवली. करवीर तालुक्यातील अनेक सदस्य अनुपस्थित होते. दरम्यान, ग्रामीण विकास प्रकल्प संचालक अजयकुमार माने, मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय राजमाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ, प्रियदर्शिनी मोरे, राजेंद्र भालेराव, सोमनाथ रसाळ, महिला व बालकल्याण विकास अधिकारी डॉ. एस. एस. शिंदे, जिल्हा कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवशी, जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे यांनी श्रमदानात सहभाग घेतला.

००००

कोट...

'पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्याच्या दृष्टीने सुरू केलेल्या 'नमामि पंचगंगा' उपक्रमाची वर्षपूर्ती होत आहे. आतापर्यंत समाधानकारक कामे झाली असली तरी यापुढेही नदी प्रदूषणासाठी गावागावांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. पंचगंगेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी दर आठवड्याला स्वच्छता मोहीम राबवून युवक आणि युवतींनी सातत्याने आणि दीर्घ काळपर्यंत योगदान देऊन पंचगंगेच्या शुद्धिकरणाची जबाबदारी उचलावी.'

शौमिका महाडिक, अध्यक्षा, जि. प.

०००

राजाराम बंधारा येथे महाश्रमदान

कसबा बावडा : राजाराम बंधारा येथे विविध संघटनांच्या वतीने बुधवारी महापौर सरिता मोरे व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कुलशेट्टी आणि डी.वाय. पाटील ग्रुपचे विश्वस्त ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाश्रमदान अभियान राबविण्यात आले. यामध्ये राजाराम बंधारा, त्याचबरोबर शहरातील पंचगंगा नदी घाट परिसर, रंकाळा या ठिकाणी स्वछता मोहीम राबविण्यात आली. राजाराम बंधारा येथे नदीपात्रातील पाणी कमी झाल्याने या भागातील तीन डपंर कचरा काढण्यात आला. राजाराम बंधाऱ्यावरील दक्षिण बाजूला नदीपात्र तसेच दत्त मंदिर घाट परिसरात सकाळी सातपासून साडेदहापर्यंत स्वछता मोहीम राबविण्यात आली. यावेळी नगरसेविका माधुरी लाड, नगरसेवक मोहन सालपे, डॉ. संदीप नेजदार, अशोक जाधव, आदींसह शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता हर्षदीप घाटगे, आदींसह सफाई कर्मचारी यांच्यासह ऋतुराज पाटील फाउंडेशन आणि इतर विविध संस्था, संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो ओळ :

राजाराम बंधारा येथे महाश्रमदान स्वछता मोहीम राबविण्यात आली. यावेळी नदीपात्रात काचेच्या बाटल्यांचे फुटलेले तुकडे उचलताना महापौर सरिता मोरे, आयुक्त मल्लिनाथ कुलशेट्टी, ऋतुराज पाटील, आदी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाबाई तीर्थक्षेत्र कामात राजकीय कुरघोडी

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील कामे काँग्रेस, भाजपमधील कुरघोडीच्या राजकारणात अडकले आहे. परिणामी सात कोटींचा निधी येऊन दोन महिने झाले तरी अजून आराखड्यातील कामांच्या निविदा प्रक्रियेला सुरूवात झालेली नाही. निविदा निघून ठेकेदार निश्चित करणे आणि प्रत्यक्षात कामाला प्रारंभ होण्याला दोन, तीन महिने जातील. त्यानंतर हे काम विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे.

अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा एकूण २५५ कोटींचा आहे. यातील ७९ कोटी ९६ लाखांच्या आराखड्यातील कामांना सरकारने प्रशासकीय मान्यता फेब्रुवारी २०१९ मध्ये दिली आहे. पहिल्या टप्प्यातील कामांसाठी ३१ मार्च २०१९ रोजी ७ कोटींचा निधी सरकारने जिल्हा नियोजन समितीकडे वर्ग केला. लोकसभा निवडणुकीच्या आरसंहितेमध्येच हा निधी आल्याने पुढील कार्यवाहीसाठी महानगरपालिकेकडे वर्ग करण्यात आला नाही. महानगरपालिका आचारसंहिता संपताच निविदा काढण्याची सर्व तयारी करणे अपेक्षित होते. मात्र याकडे दुर्लक्ष झाले.

महानगरपालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादीची सत्ता आहे. तर सरकार भाजपचे आहे. उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवसेनेचे आणि दक्षिणचे आमदार भाजपचे आहेत. सात कोटींची कामे करताना यातील कोणाला श्रेय द्यायचे हा मुद्दा कळीचा ठरला आहे. भाजपच्या लोकप्रतिनिधींना डावलून कामाला प्रारंभ केल्यास सरकारी पातळीवर निधी वितरीत करण्यात अडथळा येईल, अशी भिती काँगेस, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना वाटते आहे. याउलट महानगरपालिकेच्या सहकार्याशिवाय प्रत्यक्षातील काम करता येत नसलयाने भाजपच्या लोकप्रतिनिधींची अडचण झाली आहे. अशा कुरघोडीच्या राजकारणामुळे सात कोटींची निविदा काढण्यास विलंब होत आहे. आता पाऊस सुरू झाला असून काम करण्यात अडचणी येऊ शकतात, असे कारण महानगरपालिका प्रशासन पुढे करत आहे. पाऊस संपल्यानंतर विधानसभेची आचारसंहिता लागू होणार आहे. यामुळे निधी येऊनही आराखड्यातील कामांना नवे सरकार आल्यानंतरच मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे.

...

कोट

'अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील कामासाठी सात कोटींचा निधी मिळाला आहे. त्याची निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. आराखड्यातील प्रत्येक कामांची स्वतंत्र निविदा काढण्यात येईल. ठेकेदार निश्चित झाल्यानंतर कामाला प्रारंभ होईल.

नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता

........

आराखड्यातील प्रमुख कामे आणि निधीची तरतूद

भक्त निवास, पार्किंग इमारत बांधणे : ४२ कोटी १६ लाख, दर्शन मंडपाची इमारत बांधणे : ३ कोटी ८२ लाख, सार्वजनिक स्वच्छतागृह बांधणे : ४५ लाख, सरस्वती टॉकीजजवळ बहुमजली पार्कींग इमारत बांधणे : ७ कोटी ९२ लाख, बिंदू चौकातील बहुमजली पार्किंग इमारत बांधणे : ६ कोटी ५५ लाख, बस थांबे बांधणे : ५६ लाख, पादचारी मार्ग बांधणे : १ कोटी २४ लाख, अश्निशमन व्यवस्था : १ कोटी ६९ लाख, सुरक्षा व्यवस्था : ९२ लाख, दर्शनी मंडप : ५२ लाख, व्हिनस कॉर्नरजवळील भक्त निवास व पार्किंग इमारत : ५९ लाख, सरस्वती टॉकीजजवळ बहुमजली पार्किंग इमारतीमधील विद्युतीकरण करणे : ३ कोटी १४ लाख.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कागदपत्रांची तपासणी, यंत्रणेची धावपळ

$
0
0

फोटो आहे..

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत विभागीय स्तरावरील तपासणीसाठी तपासणी समितीने जिल्हा परिषदेतील विविध विभागांची तपासणी केली. गडहिंग्लज आणि राधानगरी पंचायत समितीला भेट देत विविध योजनांच्या कागदपत्रे तपासली. या तपासणी दौऱ्याच्या निमित्ताने जि.प.तील विविध विभागांत धांदल सुरू होती. समितीला आवश्यक माहिती, कागदपत्रे उपलब्ध करण्यासाठी यंत्रणेची धावपळ सुरू होती.

सामान्य प्रशासन विभागाकडील सभा व प्रशासकीय कामकाज, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडील घरकुल, स्वच्छ भारत मिशनकडील योजना, वित्त विभागाकडील आर्थिक व लेखा परीक्षणाची तपासणी केली. तपासणी पथकात सांगली जिल्हा परिषदेतील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे, गटविकास अधिकारी राहुल रोकडे, सहायक गट विकास अधिकारी संजय शिंदे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अविनाश पाटील, वरिष्ठ सहायक प्रशांत बुचडे, कनिष्ठ सहायक सागर बाबर यांचा समावेश आहे. सकाळी साडेअकराच्या सुमारास समितीचे जिल्हा परिषदेत आगमन झाले.

मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल व अन्य विभागाच्या प्रमुखांनी त्यांचे स्वागत केले. दिवसभराच्या तपासणीत समितीने आरोग्य विभागाकडील राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, शस्त्रक्रिया, अर्भक व माता मृत्यू प्रमाण, जननी सुरक्षा योजनांची माहिती घेतली. कृषी विभागाकडीत खतपुरवठा कार्यक्रम, राष्ट्रीय पेयजल, बांधकाम विभागाकडील रस्ते विकास, अंगणवाडी कामकाजाच्या कागदपत्रांची तपासणी केली. शिक्षण, समाजकल्याण, ग्रामपंचायत, पशुसंवर्धन विभागाच्या योजना जाणून घेतल्या.

००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक बदलीला लाखमोलाची वळणे

$
0
0

जि.प. लोगो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सोयीच्या बदलीसाठी चुकीची माहिती भरणाऱ्या शिक्षकांवरील कारवाई टाळण्यासाठी जिल्हा परिषदेत लाखमोलाच्या घडामोडी सुरू आहेत. जि.प.तील काही कारभाऱ्यांनी शिक्षकांची बदली रद्द करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यांनी मुंबई दौरा करुन सचिवस्तरावरील अधिकाऱ्यांची भेट घेऊन कारवाई थांबविण्यासाठी हालचाली केल्याचे वृत्त आहे. दोषी शिक्षकांना वाचविण्यासाठी कारभाऱ्यांची यंत्रणा सक्रिय झाल्यावर विरोधी सदस्यांनी सर्वसाधारण सभेतील कारवाईच्या ठरावाची अंमलबजावणी करावी यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांची भेट घेतली. दरम्यान, ठराविक कारभाऱ्यांच्या कामकाजावरुन सत्तारुढ गटातही नाराजीचे सूर उमटत आहेत.

दोषी शिक्षकांवर शिक्षेचा बडगा प्रशासन उगारत असताना, धावपळ मात्र ठराविक कारभाऱ्यांची, या साऱ्या प्रकरणामुळे बदली प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. सर्वसाधारण सभागृहाने ऑनलाइन बदली प्रकरणी चुकीची माहिती भरणाऱ्या ११८ शिक्षकांची कायमस्वरुपी एक वेतनवाढ रोखण्याची आणि अन्यत्र बदलीचा ठराव केला होता. मात्र जि.प.तील सत्तारुढ गटातील काही कारभाऱ्यांनी सभागृहाचा ठराव बाजूला सारत शिक्षकांवरील कारवाई टाळण्यासाठी खटाटोप सुरू केला आहे.

या कारभारी मंडळीत सभागृहातील तीन वरिष्ठ व एका तरुण सदस्यांचा समावेश आहे. या कारभारी मंडळींना प्रशासनातील एका तरुण अधिकाऱ्याची साथ असल्याची चर्चा आहे. सभागृहाचा ठराव बासनात गुंडाळून दोषी शिक्षकांना वाचविण्यासाठी ते पुढे सरसावले आहेत. त्यांनी शिक्षक संघटनेतील काही मंडळींना हाताशी धरुन बदली थांबविण्यासाठी आवश्यक त्या प्रक्रियेच्या वाटाघाटी केल्या. संबंधित शिक्षकांपैकी अनेकांनी बदली होणार नसेल तर वाटेल ती किंमत मोजायची तयारी ठेवली आहे.

दुसरीकडे सभागृहाच्या ठरावानुसार सीईओ मित्तल संबंधित शिक्षकांवरील कारवाईच्या निर्णयावर ठाम राहिले. कारवाई थांबविण्यासाठी प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे. मात्र सीईओंनी बदलीची कारवाई होणारच असा पवित्रा घेतला. यानंतर कारभाऱ्यांनी परस्पर अन्यत्र फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे. सचिवस्तरावरील अधिकाऱ्यांची भेट घेऊन कारवाई थांबविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र त्यांच्या प्रयत्नांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कसलाही प्रतिसाद दिला नाही.

.....

तर तो सभागृहाचा अवमान

जिल्हा परिषदेच्या चार जून रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेने चुकीची माहिती भरुन सोयीचे ठिकाण मिळवणाऱ्या ११८ शिक्षकांवर बदलीची आणि कायमस्वरपी एक वेतनवाढ रोखण्याचा ठराव केला होता. सभेतील ठरावानंतर त्याच्या उलटा निर्णय घेणे म्हणजे सभागृहाचा अवमान असल्याचे निवेदन काँग्रेसचे सदस्य व शिक्षण समिती सदस्य भगवान पाटील, राष्ट्रवादीचे सदस्य सतीश पाटील, विजय बोरगे, करवीर पंचायत समिती सभापती राजेंद्र सुर्यवंशी यांनी बुधवारी सायंकाळी सीईओ मित्तल यांची भेट घेऊन सादर केले. सभागृह हे सर्वोच्च असून त्या ठरावाची अंमलबजावणी करावी, कारवाईपात्र शिक्षकांना सवलत द्यावयाची झाल्यास जि.प.विशेष सर्वसाधारण सभा बोलावावी, असे निवेदनात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ड्रेनेजलाइनच्या कामाचा त्रास

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

पावसाला सुरुवात होत असतानाच महापालिकेने खानविलकर पंपासमोर ड्रेनेजलाइन टाकण्याचे काम सुरू केले आहे. महापालिकेच्या या नियोजनशून्य कारभारामुळे मुख्य भाऊसिंगजी रोडवरून कसबा बावडा, शियेसह राष्ट्रीय महामार्गाकडे होणारी वाहतुकीला याचा फटका बसणार आहे. या रस्त्याला पर्यायी असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालय ते महावीर कॉलेज रस्त्यावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर तुंबते. याच मार्गाने वाहनधारकांना ये-जा करावी लागणार आहे. उन्हाळ्याऐवजी भर पावसाळ्यात कामाला सुरुवात करण्याचा प्रकार म्हणजे जाणीवपूर्वक त्रास असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत.

खानविलकर पंपासमोरील चौकातून ड्रेनेज वाहून नेणारी पाइपलाइन मुख्य रस्त्याखाली आहे. दोन वर्षांपूर्वी ही पाइप खराब झाल्याने तेथील रस्ता खचला होता. ड्रेनेज तुंबण्याचा प्रकार होऊ नये यासाठी पाइपलाइन स्वच्छ केली गेली. नंतर चौकामध्ये काहीच अडचण आली नव्हती. पण पावसाळी वातावरण तयार झाल्यानंतर मंगळवारपासून महापालिकेने येथे रस्त्याची खोदाई केली. चौकातून हरिप्रियानगरपर्यंतचा एकबाजूचा काँक्रीटचा रस्ता खोदण्यात येणार आहे. त्यासाठी गुरुवारपासून खानविलकर पंपाकडून महावीर कॉलेजकडे जाणारा रस्ता बंद करण्यात येणार आहे.

भाऊसिंगजी रोडशी जोडलेल्या या मुख्य रस्त्यावर शहरातून जिल्हा कोर्ट, मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालये, जीएसटी, शिरोली एमआयडीसीकडे जाणाऱ्या वाहनधारकांची मोठी वर्दळ असते. हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाशी जोडला जातो. त्यामुळे सातारा, पुण्याला जाणाऱ्या वाहनांसाठी रस्ता सोयीस्कर आहे. या मार्गावर दररोज सकाळी व संध्याकाळी वाहनांची अक्षरश: रांग लागलेली असते. हा रस्ता बंद करुन कसबा बावड्याकडून शहरात येणाऱ्या व जाणाऱ्या नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालय चौकातून महावीर कॉलेज मार्गावर जावे लागणार आहे.

या आठवड्यात पावसाला सुरुवात होईल, असे वातावरण आहे. एखादा मोठा पाऊस झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, पाटलाचा वाडा परिसरात गुडघाभर पाणी साठते. त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असते. अशा स्थितीत खानविलकर पंपाकडील वाहतूक या मार्गावरुन सुरू झाली तर वाहनधारकांना प्रचंड त्रास होणार आहे.

वाहतूक शाखेकडून परवानगी

महापालिकेने गेल्या काही दिवसांतच हा रस्ता वाहतुकीला बंद करण्याची मागणी शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडे केली. वाहतूक शाखेने या रस्त्यावरील गर्दी पाहता पावसाळ्यानंतर परवानगी द्यायला हवी होती, असे मत नागरिकांचे आहे. ड्रेनेज कामामुळे नागरिकांची फरफट होईल अशी स्थिती आहे.

गेले वर्षभर या रस्त्यावर महापालिकेने काहीही काम केले नाही. आता पावसाला सुरुवात होत असताना अचानक सुरू केलेल्या कामामुळे वाहनधारकांना किती त्रास होईल याचा विचार केलेला नाही. अशा नियोजनशून्य कारभारामुळेच नागरिकांमधून महापालिकेच्या कामांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले जात नाही.

- धीरज चव्हाण, सराफ व्यावसायिक

हा मुख्य रस्ता वर्दळीचा आहे. अशा स्थितीत सर्व विचार करुन महापालिकेने व पोलिस प्रशासनाने निर्णय घेणे अपेक्षित होते. काम मंजूर झाले तरी ते केव्हा करायचे, कोणत्या परिस्थितीत करायचे हे महापालिकेने पहायला हवे. या कामामुळे सामान्य नागरिक तसेच नोकरदारांचा वेळेचा अपव्यय होणार आहे.

- अॅड. विजय ताटे

परिसरात शाळांचे प्रमाण जास्त आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय ते महावीर कॉलेज हा पर्यायी रस्ता पावसाळ्यात फारसा उपयोगी पडणारा नाही. पाणी साचत असल्याने वाहनधारक हा रस्ता बदलून दुसरीकडून जाणे पसंत करतात. काम वेळेत संपविण्याचा प्रयत्न महापालिका करत नाही. या साऱ्याचा फटका रिक्षांसह अन्य वाहतुकीला बसणार आहे.

- चंद्रकांत भोसले, रिक्षा व्यावसायिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंदिरात परंपरागत पुजाऱ्यांचेच अभिषेक

$
0
0

\B \B

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंबाबाई मंदिरातील गरूड मंडपात भाविकांकडून जादा दर आकारून अंबाबाईचा खासगी अभिषेक करणाऱ्या पुजाऱ्यांना बुधवारपासून बंदी घालण्याचा निर्णय देवस्थान समितीच्यावतीने घेण्यात आला होता. गरूड मंडपातील अभिषेक बंद करण्याबाबत भाविकांकडून देवस्थान समितीकडे आलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, बुधवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर खासगी पुजाऱ्यांकडून कोणताही आक्षेप किंवा विरोध करण्यात आला नाही. तर खासगी पुजाऱ्यांकडून गरूड मंडपात होणारे अभिषेक बंद झाल्याने गरूड मंडप रिकामा राहिला.

देवस्थान समितीचे अधिकृत पुजारी व मंदिरातील परंपरागत पुजारी यांची संख्या साधारणपणे ६० इतकी आहे. मात्र मंदिरात सकाळी सहा वाजल्यापासून खासगी पुजाऱ्यांची वर्दळ सुरू असते. सोवळे नेसून हे पुजारी मंदिरात येतात. सहकुटुंब, ग्रुपने येणाऱ्या पर्यटक भाविकांना या पुजाऱ्यांकडून घेरले जाते. देवस्थान समिती व परंपरागत पुजाऱ्यांच्या ज्या अभिषेक वेळा आहेत त्याव्यतिरिक्त सकाळी सहा ते दुपारी बारा यावेळेत खासगी पुजाऱ्यांकडून गरूड मंडपात देवीचा अभिषेक विधी केला जातो. हे काम करणारे दहा ते बारा खासगी पुजारी कार्यरत आहेत. भाविकांकडून खासगी पुजारी एका अभिषेक विधीसाठी अडीच ते पाच हजारांपर्यंत दक्षिणा घेत होते. देवस्थान व परंपरागत पुजाऱ्यांच्या अभिषेक वेळांच्या मधल्यावेळेत किंवा ही वेळ संपल्यानंतर येणाऱ्या पर्यटकांना खासगी पुजाऱ्यांकडून सेवा दिली जात होती. मात्र अनेकदा पर्यटक भाविकांना अन्य पर्यटनस्थळावर लवकर जाणे आवश्यक असल्यामुळे अभिषेकाची अधिकृत वेळ संपल्यानंतर येणारे भाविक जादा दराने खासगी पुजाऱ्यांकडून अभिषेक विधी करून घेत होते. पर्यटकांची आर्थिक लूट थांबावी व पर्यटक, भाविकांना देवस्थान व परंपरागत पुजाऱ्यांकडून अभिषेक विधी सेवा मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

....

नगारखान्याजवळील

लॉटरी सेंटर हटवणार

अंबाबाई मंदिरातील महाद्वारालगत असलेल्या नगारखान्याजवळील लॉटरी सेंटर येत्या आठ दिवसात हटवण्याच्या हालचालीही देवस्थान समितीच्यावतीने सुरू करण्यात आल्या आहेत. मंदिरात लॉटरी सेंटर असू नये, अशी मागणी काही स्थानिक भाविकांनी केली आहे. या तक्रारीची दखल घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाहू व्याख्यानमाला २१ जूनपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त (२६ जून) २१ जूनपासून पाच दिवस राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. शाहू स्मारक भवनात सायंकाळी सहा वाजता व्याखानमालेस सुरुवात होईल

२१ ते २५ जून अखेर चालणाऱ्या व्याख्यानमालेत विविध विचारवंत मार्गदर्शन करतील. २६ रोजी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना शाहू पुरस्कार देण्यात येईल. १९८० नंतर समाज आणि राजकारणात अण्णांचे योगदान मोठे आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धीत त्यांनी ग्रामविकास आणि जलनियोजनाचे आदर्शवत काम केले. त्यांच्या लढ्यामुळे 'माहितीचा आधिकार कायदा' झाला. प्रशासनातील भ्रष्टाचार निर्मूलनासाठी ते कार्यरत आहेत. त्यांच्या लढ्यामुळेच काही महिन्यांपूर्वी भारत सरकारने लोकपालांची नियुक्ती केली. ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते असेही त्यांची देशभर ओळख आहे.

०००

व्याख्याते व व्याख्यानाचा विषय

तारीख व्याख्याते विषय

२१ जून हेमंत देसाई (मुंबई) नव्या सरकारसमोरील आव्हाने

२२ जून डॉ. आनंद मेणसे (बेळगाव) महात्मा गांधी आणि राष्ट्रवाद

२३ जून श्रीराम पवार (कोल्हापूर) काश्मीर व कलम ३७०

२४ जून डॉ. अरुण शिंदे (कोल्हापूर) राजर्षी शाहू आणि सत्यशोधक चळवळ

२५ जून शाहीर बजरंग आंबी (सांगली) शाहूरायांना शाहिरी मुजरा

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘कृषी बंध’च्यासंचालकांना मोक्का लावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कृषिबंध अॅग्रो लिमिटेड कंपनीचे संचालक, सदस्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्याच्या मागणीसाठी ताराराणी महिला आघाडीतर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

कृषी अॅग्रो कंपनीने २०११ पासून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. एजंटांतर्फे गुंतवणूक करून अनेकांचे पैसे गोळा करून संचालक, सदस्य मालामाला झाले आहेत. यामध्ये कोल्हापूरसह सीमाभागातील पाच हजारहून अधिक गुंतवणूकदारांचे सुमारे १२ कोटी रुपये अडकले आहेत. कंपनीचे संचालक बंडोपंत पाटील, सिद्राम गंगाधरे (म्हाकवे, ता. कागल), शशिकांत जाधव, नंदा जाधव (सोनगे, ता. कागल), डॉ. कृष्णात कुंभार (आणूर, ता. कागल), शारदा चौगुले (कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करून मोक्कांतर्गत कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. आंदोलनात श्रद्धा महागावकर, महानंद कांबळे, शमशाद शेख, सुशीला पाटील, प्रभावती कुंभार आदी सहभागी झाले होते.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेकायदा मद्य वाहतूक रोखणार

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'मद्याची मोठ्या प्रमाणात होत असलेली आंतरराज्य तस्करी रोखण्यासाठी पाच भरारी पथके तैनात केली आहेत. त्यांना सीमावर्ती भागात विशेष नजर ठेऊन बेकायदा दारु रोखण्याचे आदेश दिले आहेत' अशी माहिती राज्य उत्पादन शुल्काच्या कोल्हापूर विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी दिली.

बेळगाव, गोवामार्गे कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात मद्याची अवैध वाहतुक मद्यतस्कराकडून सुरू आहे. ही तस्करी रोखण्यासाठी सीमावर्ती आजरा, चंदगड, सिंधुदुर्ग, गोवा, गगनबावडा मार्गे कोल्हापुरात येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. तस्कर गोवा आणि कर्नाटकातून मद्यसाठा घेऊन सीमावर्ती भागातील काही घरातच साठा करतात. त्यासाठी खबऱ्याचे नेटवर्क वाढून संबधित साठा शोधण्याचे आदेश भरारी पथकांना दिले आहेत. एक निरीक्षक, उपनिरीक्षक आणि तीन जवान असे पाच जणांचे एक पथक नियुक्त केले आहे. या पथकाला सीमावर्ती भागातील मद्यचोरीची ठिकाणे आणि मद्यतस्कर शोधून आंतरराज्य सराइत मद्यतस्करांकडे चौकशी सुरू केली आहे असे अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

पावणेतीन लाखांचा मद्यसाठा जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने गोवा येथून बेकायदेशीर मद्याची वाहतुक करणाऱ्या तिघांना पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर तावडे हॉटेल परिसरात गुरुवारी सकाळी कारवाई करुन तिघांना ताब्यात घेतले. नितीन नामदेव गुरव (वय २४, रा. हेब्बाळ-जलद्याळ, ता. गडहिंग्लज), प्रकाश भगवान शिंदे (वय २८, रा. खंडेराजुरी, ता. मिरज), प्रशांत बाळासाहेब पाटील (वय २८, रा. नेसरी, ता. गडहिंग्लज) अशी त्याची नावे आहेत. त्यांच्याकडून पावनेतीन लाख रुपयांचा मद्यसाठा जप्त केला. एका कारमधून मद्याची चोरटी वाहतुक होत असल्याची माहिती पथकाला मिळाली. ही कार तावडे हॉटेल परिसरात आल्यानंतर पथकाने टाकलेल्या छाप्यात तिघांना ताब्यात घेतले. प्रकाश शिंदे हा सराइत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी कारवाई झाली आहे. कारवाईत राज्य उत्पादनचे निरीक्षक संभाजी बरगे यांच्या पथकातील जगन्नाथ पाटील, किशोर नडे, संदीप जानकर, सागर शिंदे, सचिन काळेल, जय शिनगारे आदी सहभागी झाले.

मद्याची आंतरराज्य तस्करी रोखण्यासाठी पथके तैनात केली आहेत. त्यासह नागरिकांना मद्यतस्कर आणि मद्यसाठा करण्याची ठिकाणे माहिती असल्यास माहिती द्यावी. त्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल.

- गणेश पाटील, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचगंगा घाटावर महाआरती

$
0
0

'नमामि पंचगंगे' उपक्रमाच्या वर्षपूर्तीनिमित्ताने बुधवारी सायंकाळी सहा वाजता पंचगंगा नदीघाट येथे महाआरती करण्यात आली. करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती, जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या उपस्थितीत आरती झाली. याप्रसंगी पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीसाठी काम करणाऱ्या राजाभाऊ कुंभार, शालन मुळे, महेश कामत, बाळासाहेब होळकर, स्वप्निल मुळे, शिवाजी पाटील, सतीश वडणगेकर आदींचा मानचिन्ह व ग्रंथ देऊन सत्कार झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषी राज्यमंत्र्यांची भेट

$
0
0

कोल्हापूर : जिल्ह्यातील ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या कामासंदर्भात जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व सदस्यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची बुधवारी भेट घेतली. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, शिक्षण समिती सभापती अंबरीश घाटगे, भाजपचे गटनेते अरुण इंगवले, पक्षप्रतोद विजय भोजे यांचा शिष्टमंडळात समावेश आहे. जिल्ह्यातील अनेक पाणीपुरवठा योजना अर्धवट स्थितीत आहेत. काही ठिकाणी नवीन कामे प्रस्तावित आहेत. जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांसाठी सरकारकडून अर्थसाह्य मिळावे म्हणून प्रयत्न सुरू आहेत. शिवाय जि.प.तर्फे विविध योजनांचा आराखडा सरकारकडे सादर केला आहे. त्या योजनांना मान्यता आणि निधीसंदर्भात चर्चा झाल्याचे वृत्त आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पगारी पुजारी कायद्याची अंमलबजावणी करा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंबाबाई मंदिरात सरकारी पगारी पुजारी नेमण्याच्या कायद्याची त्वरीत अंमलबजावणी करावी, अशी मागणी पुजारी हटाव संघर्ष समितीचे सदस्य शरद तांबट यांनी पत्रकाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.

गेल्यावर्षीच्या एप्रिल महिन्यात पगारी पुजारी नेमण्याबाबत कायद्याचा मसुदा मंजूर झाला असूनही अद्याप प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. नवरात्रोत्सवापूर्वी मंदिरात पगारी पुजारी नेमण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी मुलाखत प्रक्रिया राबवण्यात आली. त्याबाबतही कार्यवाही झालेली नाही, असे या पत्रकात म्हटले आहे. सध्याची मूर्ती अत्यंत प्राचीन असल्याने तिच्यावर अभिषेक विधी केला जात नाही. पर्यटकांकडून देवीच्या मूळ मूर्तीवर अभिषेक करण्यासाठी सातत्याने विचारणा केली जाते. त्यासाठी मूळ मूर्ती विसर्जित करून तिच्याजागी नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी, अशीही मागणी तांबट यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images