Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कष्टाला मिळाली यशाची 'सिद्धी'

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रिक्षाचालक वडिलांना किडनीचा आजार जडला. उदरनिर्वाहाचे साधनच थांबले. आईला चार घरची धुणीभांडी करण्याशिवाय पर्याय नव्हता. या स्थितीत घरातील काम आटोपून दोन लहान भावंडांचा सांभाळ करीत तिने दहावीचा अभ्यास केला. ९०.४० टक्के गुण मिळवून ती उषाराजे हायस्कूलमध्ये तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. कदमवाडीतील सिद्धी संजू हुंबे या विद्यार्थिनीच्या यशापुढे परिस्थितीही फिकी पडली.

सिद्धी हुंबे ही आई, वडील आणि दोन भावंडांसह कदमवाडी येथील शिवप्रसाद कॉलनीत राहते. रिक्षा चालवून वडील संजू हुंबे कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. अन्य कोणतेही उत्पन्नाचे साधन नसल्याने रिक्षा हाच त्यांच्या घराचा आधार होता. मात्र, गेल्यावर्षी अचानक संजू यांची तब्येत बिघडली. रुग्णालयात जाऊन तपासण्या केल्यानंतर घरात सर्वांना धक्का बसला. त्यांना किडनीचा विकार असल्याचे स्पष्ट झाले. रिक्षा चालवणे थांबले. औषधांचा खर्च वाढत गेल्याने सिद्धीच्या आईने परिसरातील घरांमध्ये धुणीभांडी करून परिस्थितीचा सामना सुरू केला. पतीचा दवाखाना आणि दोन मुलींसह एका मुलाच्या शिक्षणाचा खर्च करताना सिद्धीच्या आईची आजही दमछाक होते. याही स्थितीत सिद्धी डगमगली नाही. दोन्ही भावंडांचा रोजचा अभ्यास घेणे आणि घरातील स्वयंपाकासाठी आईला मदत करून तिने दहावीचा अभ्यास केला.

शिक्षणासह सिद्धीला अभिनयाचीही आवड आहे. 'ती फुलराणी' हा एकपात्री प्रयोग सादर करून तिने शाळेत शिक्षकांची वाहवा मिळवली. जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेत तिच्या एकपात्री प्रयोगाला पहिल्या क्रमांकाचे बक्षीसही मिळाले. विशेष म्हणजे ऐन परीक्षेच्या तोंडावर तिला राज्यस्तरीय स्पर्धेत पुण्यात प्रयोगाचे सादरीकरण करण्यासाठी जावे लागले. यातही तिने उत्तम यश मिळवले. परिस्थितीची तक्रार करण्यापेक्षा परिस्थितीशी दोन हात करून तिने दहावीच्या परीक्षेत ९०.४० टक्के गुण मिळवले. दहावीचा निकाल समजताच डायलेसिसवर असलेल्या तिच्या वडिलांच्या आनंदाला पारावार उरला नाही. इतरांच्या घरात धुणीभांडी करण्यासाठी गेलेल्या आईला लेकीचा निकाल समजताच तिलाही आभाळ ठेंगणे झाले. सिद्धीला विज्ञान विषयाची आ‌वड आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून प्रशासकीय अधिकारी बनण्याचा तिचा निर्धार आहे. विज्ञात विषयातून बारावी पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षण कोणत्या शाखेतून घ्यायचे हे ती ठरवणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


'तिला' सख्ख्या भावाकडून अपत्यप्राप्ती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शाहूवाडी तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी कुमारी माता बनली. सख्ख्या भावाकडूनच माणुसकीला काळिमा फासणारे हे कृत्य घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्याला शाहूवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची रवानगी सुधारगृहात केली आहे. कुमारीमातेला शनिवारी मुलगा झाल्याने तिच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहूवाडी तालुक्यातील एका गावातील शेतकरी कुटुंबात पीडित मुलगी नववीमध्ये शिकते. तिचा मोठा भाऊ सतरा वर्षांचा आहे. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने शेतकरी आई-वडील दिवसभर मोलमजुरीसाठी बाहेर जात असल्याचा फायदा घेऊन भावाने बहिणीलाच शिकार बनवले. दरम्यान, पीडित मुलीला त्याचा त्रास होऊ लागल्याने १२ मार्चला आईने मलकापूर येथील सरकारी रुग्णालयात तपासणी केली असता ती गर्भवती असल्याचे समजले. या प्रकाराने आई-वडिलांच्या पायाखालची वाळू सरकली. मुलीकडे विचारपूस केली असता तिने सख्ख्या भावाकडूनच हा प्रकार घडल्याचे सांगितले. हे ऐकून आईला चक्कर आली. या सर्व प्रकारानंतर आईने मुलीला सीपीआरमध्ये दाखल केल्यानंतर प्रकरण शाहूवाडी पोलिसांत गेले. शनिवारी पीडित मुलीची प्रसूती झाली असून, तिला मुलगा झाला. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गवंड्याच्या लेकीनं दिली भविष्याला भक्कम दिशा

$
0
0

Anuradha.kadam@timesgroup.com

Tweet@anuradhakadamMT

कोल्हापूर : गवंडी काम करणाऱ्या वडिलांना कधी मिळालं तर काम आणि नाहीतर कुठेही मजुरीवर दिवसाकाठी हातात येणारी अवघी शंभराची नोट. मोठ्या बहिणीची शिक्षणासोबत घराला हातभार लावण्यासाठी धडपड. धाकटा भाऊ दिव्यांग असल्याने त्याच्या सेवेत दिवसभर राबणारी आई. दौलतनगरातील एक खोलीच्या भाड्याच्या घरात राहणाऱ्या सोनू गोरल हिच्या कौटुंबिक परिस्थितीची ही चित्तरकहाणी. या गवंड्याच्या लेकीकडे होती फक्त जिद्द. त्या जिद्दीच्या जोरावर सोनूने ९१ टक्के गुण मिळवून प्रशासकीय अधिकारी होण्याच्या स्वप्नाला भक्कम दिशा दिली आहे. उषाराजे हायस्कूलची विद्यार्थिनी असलेल्या सोनू गोरलच्या या यशाने खडतर परिस्थितीलाही नमवण्याची किमया केली आहे.

पोटाची खळगी भरण्यासाठी कर्नाटकातून कोल्हापूरची वाट धरलेल्या गोरल कुटुंबाचं सारं काही हातावरच्या पोटावर. सोनूचे आईवडील अशिक्षित. दोन मुलींच्या पाठीवर झालेल्या मुलाच्या अपंगत्वाने सोनूचे वडील चंद्रकांत यांच्यावर नियतीने अजूनएक आघात केला. पाच जणांच्या कुटुंबाचा भार पेलण्यासाठी गवंडी कामाला सुरूवात केली. बांधकाम सुरू असेल तेथे गवंडी कामासाठी जायचे हेच त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन. जेव्हा काम असेल तेव्हाच पैसे मिळणार असल्याने इतरवेळी पडेल ते काम करून त्यांनी घर चालवले. वडिलांची ही धडपड पाहतच सोनू शालेय प्रवास करत होती. दहावीच्या वर्षी तिने नव्वद टक्के पार करण्याचा चंग बांधला होता. दौलतनगरसारख्या संवेदनशील परिसरात राहणाऱ्या सोनूने केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रीत केले. दिवसभर शाळा, त्याआधी घरी आईला कामात मदत, पुन्हा सायंकाळी घरकाम व त्यानंतर रात्री जागून अभ्यास करत सोनूने ध्येयापर्यंतचा प्रवास सुकर केला आहे. भविष्यात स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून सोनूला प्रशासकीय अधिकारी व्हायचं आहे.

सोनू सांगते, 'घरातील द्रारिद्र्य किती भीषण असू शकते याचा अनुभव आम्हा भावंडांना अनेकदा आला. भाऊ दिव्यांग असल्याने त्याचा सांभाळ करण्याशिवाय पर्याय नाही. अशा परिस्थितीत मी माझी मोठी बहिणच आईवडीलांचा आधार बनू शकतो याची मला जाणीव झाली. वडीलांकडे पैसा नसल्यामुळे खाजगी क्लासची चैन मला परवडणारी नव्हती. शाळेत जे काही शिकवतील त्याच्या आधारेच मी अभ्यास सुरू केला. स्वताच्या नोंदी काढल्या. सरावावर भर दिला. घरी बहिणीशिवाय मार्गदर्शन करण्यासाठी कुणी नव्हतं. अभ्यास करून यश मिळवलं तरच मी कुटुंबाची परिस्थिती बदलू शकेन हा एकमेव विश्वास मला बळ देत होता.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैभववाडी घाटात शोधमोहीम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कणेरीवाडीतील भैरवप्रसाद उर्फ सुनील पाटील याचा खून आर्थिक वादातून झाल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. संशयित आरोपीने मृतदेह फेकलेली जागा दाखवली असून त्याला सोबत घेऊन वैभववाडी घाटात मृतदेहाच्या अवशेषाचा शोध पोलिसांनी दुसऱ्या दिवशीही घेतला.

करवीरचे सहायक निरीक्षक धनंजय पिंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवंत बँक बालिंगा-आपटेनगर शाखेतील लूटप्रकरणी अटक केलेल्या संशयित राजू नेताजी सातपुते (वय २८, रा. कळंबा), विजय रामचंद्र गौड (३६, रा. निकम गल्ली, कळंबा, ता. करवीर) व तिसरा पसार झालेला संशयित अक्षय ऊर्फ आकाश दाभाडे (३२, रा. कसबा बावडा) यांनी कणेरीवाडीतील भैरवप्रसाद पाटील याचा पाच वर्षांपूर्वी खून केल्याची कबुली दिली आहे. त्याचा मृतदेह वैभववाडी घाटातील खोल दरीत फेकून दिल्याचेही सांगितले. त्यामुळे गेली दोन दिवस पोलिसांचे पथक घाटात मृतदेहाच्या अवशेषाचा शोध घेत आहे. मात्र, अद्यापही त्याच्या हाती काहीही लागलेले नाही. मृत भैरवप्रसादची पत्नी प्रीती पाटील हिच्या संपर्कात संशयित विजय गौड होता. परंतु तिला पतीचा गौड याने खून केल्याची माहिती नव्हती. आर्थिक वादातून हा खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा परिषदेत सत्ताधारी-विरोधकांत जुंपली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या अहवाल वर्षातील खर्चावरून गाजली. स्टेशनरी, समारंभ, पोस्टेज, मिटिंग खर्च, दैनिक भत्ता व किरकोळ खर्च जादा झाल्याचा आक्षेप विरोधकांनी नोंदविला. त्याला सत्ताधाऱ्यांनी संस्थेचा कारभार काटकसरीने सुरू असल्याचे सांगत विरोधकांचा अधिक खर्चाचा आक्षेप फेटाळला. यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये खडाजंगी उडाली आणि सभेत गोंधळ झाला.

संस्थेच्या मुख्यालय इमारतीच्या बांधकाम पूर्णत्वाचा दाखला व भोगवटा प्रमाणपत्रावरून गोंधळ वाढला. त्यावेळी बहुतांश सभासदांनी सर्व विषय मंजूर, मंजूर असा घोषा सुरू केला. मंजुरीच्या या घोषणेतच सत्ताधाऱ्यांनी सभा संपल्याचे जाहीर केले. उपाध्यक्ष शांताराम माने सभेच्या अध्यक्षस्थानी होते. सभेत संस्थेचे सभागृह भाड्याने देण्याचा व ऑनलाइन बुकिंगचा विषयही गाजला. बांबवडे शाखेतील बांधकाम व इतर कामासाठी खर्च केलेल्या १२ लाख रुपयांचा उल्लेख अहवालात का केला नाही? असा मुद्दा उपस्थित झाला.

संचालक एन. डी. पाटील यांनी स्वागत व संचालिका संगीता गुजर यांच्या ठराव वाचनाने सभेला सुरुवात झाली. व्यवस्थापक व्ही. एन. बोरगे यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. यानंतर उपाध्यक्ष माने यांनी सभासदांकडून आलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्यास सुरुवात केली. माने म्हणाले, 'सभासदांना १२.५० टक्के लाभांश व कायम ठेवीवर ११ टक्के व्याज देण्याचा निर्णय झाला आहे. मुख्यालयासह चार शाखा स्वमालकीच्या इमारतीमध्ये आहेत.'

विरोधी गटाचे सचिन जाधव यांनी अहवालाचा आधार घेत स्टेशनरी (७९,१३४ रुपये), समारंभ खर्च (४८,७९७), पोस्टेज खर्च (७१,९०७),किरकोळ खर्च (१,९७,८५५), मिटिंग भत्ता (२,६७,९०००), मिटिंग खर्च (१,२०,४२९), प्रवास खर्चाचा आकडेवारी (२,१७,६०७) मांडत तो जादा असल्याचे निदर्शनास आणले. तसेच अहवालातील मजुरीच्या नावाखाली ४ लाख ७८ हजार रुपयांचा खर्चाकडे लक्ष वेधले. उपाध्यक्ष माने यांनी 'वर्षभरात संचालक मंडळाने काटकसरीने कारभार केला. २००८ मधील तत्कालीन संचालक मंडळाने किरकोळ खर्च दोन लाखांपेक्षा अधिक केला होता, त्यापेक्षा यंदाचा खर्च कमी असल्याचे म्हणताच विरोधकांनी त्यांच्या विधानाला हरकत घेतली.'

'जुने उगाळत बसण्यापेक्षा सद्य:स्थितीवर बोला,' असे सांगत मानसिंग वास्कर, वीरेंद्र काळे, बंडू प्रभावळे, शरद देसाई व्यासपीठासमोर येऊन जाब विचारू लागले. त्यावर सत्ताधारी सदस्यांनी, 'संचालक मंडळाचा कारभार चांगला आहे, कुणी आक्षेप घेण्याची आवश्यकता नाही' असे सांगत सर्व विषय मंजूर, मंजूर अशा घोषणा दिल्या. जवळपास सव्वा तास चाललेल्या सभेत सर्व विषय मंजूर झाले. सभेला संचालक सचिन मगर, राजीव परीट, बजरंग कांबळे, रवींद्र घस्ते, विष्णू तळेकर, रवींद्र घस्ते, सुनील मिसाळ, आदी उपस्थित होते. रणजित पाटील यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहावी निकाल...

$
0
0

शिलादेवी शिंदे हायस्कूलचा निकाल ८०.७४

तपोवन परिसरातील शिलादेवी शिंदे सरकार हायस्कूलचा दहावीचा निकाल ८०.७४ टक्के लागला आहे. १३६ पैकी १०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गौरी रमेश मानेने ८९ टक्के गुण मिळवत शाळेत पहिला क्रमांक मिळवला. सुमित विलास पडळकर (८८.६०), मेधा हरिप्रसाद गुळवणी (८७.२०) गुण मिळवत अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. सोहम संदीप गाडेकर ८५ टक्के व निकिता भगवान फडतारे ८३.८० टक्के गुण मिळवले. त्यांना मुख्याध्यापक भिमराव ज्ञानू गोसावी या इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

देशभूषण हायस्कूलचा निकाल ७५ टक्के

देशभूषण हायस्कूलचा निकाल ७५ टक्के लागला. जुवेरिया रियाज गवंडी हीने ९१ टक्के गुण मिळवत हायस्कूलमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. आयुब शब्बीर काझी (८७.८० टक्के), मल्लिका मन्सूर पठाण (८३.२०) गुणाद्वारे अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. मुख्याध्यापक रवींद्र गाठ, दहावी विभागप्रमुख एस. आर. भेंडे व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

न्यू मॉडेल इंग्लिशचा निकाल ९८.६० टक्के

ताराबाई पार्कातील न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल अँड ज्युनीअर कॉलेजचा दहावीचा निकाल ९८.६० टक्के लागला आहे. १७५ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले. १३० विद्यार्थी प्रथम तर ७७ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी प्राप्त केली आहे. ईशा संतोषकुमार एकता ही ९८.६० टक्के गुण घेत शाळेत प्रथम आली. प्रेम रणजित चिकोडेने ९६ टक्के तर आर्या महेश ढवळेने ९५.६० टक्के गुण मिळवले. त्यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. त्यांना संस्थेच्या सचिव व प्राचार्य शुभांगी गावडे, कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले.

मगदूम हायस्कूलचा निकाल ७३.५८ टक्के

दादासाहेब मगदूम हायस्कूलचा दहावीचा निकाल ७३.५८ टक्के लागला. अनन्या महादेव चव्हाणने ९० टक्के गुण मिळवत हायस्कूलमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. आतिष शेषेराव कांबळेने ८३.६०, मेघा मल्लिकार्जुन मंटूर हिने ७९.६० टक्के गुण मिळवले. या विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन अॅड. के. ए. कापसे, सचिव महावीर देसाई, कमिटी चेअरमन एम. बी. गरगटे, मुख्याध्यापक बसवराज वस्त्रद, विभागप्रमुख योगेश माणगावे यांचे मार्गदर्शन लाभले.

खडके हायस्कूलचा निकाल शंभर टक्के

बोरपाडळे येथील शर्विल खडके हायस्कूलचा निकाल सलग तिसऱ्या वर्षी शंभर टक्के लागला. हायस्कूलमधील आश्लेषा शशिकांत मोरे (८२.६०), विरेंद्र वसंत जगताप (७७.००) तर प्रणाली तुकाराम खडके (७०.२०) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. पन्हाळा व्हॅली इंग्लिश मिडीयम स्कूलमधील ओमकार खोपकरने ७५.८०, अक्ष बाजीराव पडवळने ७५.४० तर सत्यजित आनंदा पाटीलने ६८ टक्के गुण मिळवले. संस्थेचे अध्यक्ष अविनाश खडके, प्राचार्या क्रांती खडके, सत्यजित जाधव व शिक्षकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देविकाचे ‘बावनकशी’ यश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आईची सोन्याच्या दागिन्याच्या दुकानात दिवसभर नोकरी तर वडिलांचे हॉटेलमध्ये काम. आई-वडील दिवसभर काबाडकष्ट करत असताना घरची आर्थिक स्थितीही बेताची. क्लासची फी हप्ताहप्त्याने भरली. पण आई-वडिलांचे स्वप्न लेकीने साकार केले. दहावीच्या परीक्षेत ८५ टक्के यश मिळवत देविका मोहन परदेशी हिने मिळवलेल्या बावनकशी यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

लक्ष्मीपुरी कोंडाओळ येथे परेदशी कुटुंबाचे वास्तव्य आहे. राहते घर मालकीचे असले तरी घरची आर्थिक स्थितीशी मुकाबला करताना वडील मोहन आणि आई तेजश्री दोघेही नोकरी करतात. आई तेजश्री या एका सोनेचांदीच्या दागिन्यांच्या शोरुममध्ये सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत नोकरी करतात तर वडील हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम करतात. दोघेही बाहेर असल्याने देविकाने घरकाम सांभाळून अभ्यास केला. छोट्या भावाच्या अभ्यासाकडेही लक्ष दिले. मुलगी हुशार असल्याने तिला चांगल्या क्लासला प्रवेश द्या असा सल्ला अनेकांनी परदेशी कुटुंबाला दिला. पण फी भरायला पैसे नसल्याने परदेशी कुटुंबाला चिंता सतावत होती. शनिवार पेठेतील क्लासच्या एन. एम. निळपणकर यांनी देविकाची गुणवत्ता पाहून तिला फीमध्ये सवलत देत हप्ताने फी भरण्याची मुभा दिली.

सकाळी पाच वाजता उठून देविका सहा वाजता सकाळी क्लासला जायची. क्लासहून आठ वाजता घरी आल्यावर आईला मदत करत अभ्यास करायची. एमएलजी हायस्कूलमध्ये वर्गशिक्षिका स्नेहल टोणपे यांच्यासह शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले. शाळेतून घरी आल्यावर भावासह देविका अभ्यासाला बसायची. आई नोकरीहून घरी आल्यावर जेवण करुन पुन्हा अभ्यासाला बसायची. आई-वडिलांचे कष्ट पाहून देविकानेही क्लास आणि शाळेतील अभ्यास सोडून चार ते पाच तास अभ्यासाचे नियोजन केले. विज्ञान, गणितासह संस्कृत विषय स्कोअरिंग असल्याने त्यावर लक्ष दिले. देविकाने संस्कृत विषयात ९६, मराठीत ८६, सामाजिक शास्त्रमध्ये ९० तर इंग्रजी विषयात ७० गुण मिळाले. दहावीनंतर बारावी सायन्सचे देविका शिक्षण घेणार असून एअर होस्टेस म्हणून तिला करिअर करायचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्र्याच्या शेडमध्ये यशाचा इमला

$
0
0

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:Appasaheb_MT

कोल्हापूर : वडील बांधकाम साइटवर वॉचमन. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी धुणीभांडी करणारी आई, रहायला पत्र्याचे शेड. अभ्यासाला ना गाइड, ना प्रश्नसंच. अशा स्थितीमध्ये आतिश शेषेराव कांबळे या विद्यार्थ्यांने दहावीच्या परीक्षेत ८३.६० टक्के गुण मिळवत यशाचा इमला बांधला. दुसऱ्यांच्या मोबाइलवर गुरुवारी दुपारी निकाल पाहिला आणि मुलाच्या लख्ख कामगिरीने आतिषच्या आई-वडिलांना गगन ठेंगणे झाल्याची अनुभूती आली. एकीकडे मुलाच्या यशाचा आनंद दुसरीकडे परिस्थितीमुळे त्याच्या भवितव्याची चिंता पालकांना सतावत आहे.

कांबळे कुटुंबीय मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील काणेगाव येथील. गावाकडे शेती नाही. हा परिसर कायमस्वरुपी दुष्काळी भागात मोडणारा. पोटापाण्यासाठी पाच वर्षापूर्वी त्यांनी कोल्हापूर गाठले. बांधकाम साइटवर मजूर म्हणून काम स्वीकारले. शेषेराव कांबळे यांचे शिक्षण दहावीपर्यंत तर त्यांची पत्नी लतिका यांनी सातवीपर्यंत शिक्षण घेतलेले. प्रतिकूल परिस्थितीमुळे शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागल्याचे शल्य दोघांच्याही मनात आहे. त्यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. शिक्षणाअभावी जे दु:ख आपल्या वाट्याला आले, ज्या हालअपेष्टा सोसाव्या लागल्या ते मुलांच्या नशिबी येऊ नये म्हणून या दाम्पत्याने मुलांना शिकवायचे ठरविले. आतिषने येथील दादासाहेब मगदूम हायस्कूलमध्ये दहावीचे शिक्षण घेतले.

विवेकांनद कॉलेजसमोरील बांधकाम साइटवर हे कुटुंब पत्र्याच्या शेडमध्ये वास्तव्यास आहे. पत्र्याच्या शेड मारुन दोन खोल्या उभारल्या. दोन खोल्यांतच स्वयंपाकगृह, बेडरुम, अभ्यासिका सगळे काही. इतर मुलांना मिळतात त्या सुविधा त्याच्यापासून कोसो दूर. आर्थिक परिस्थिती अभावी गाइड आणि प्रश्नसंच विकत घेता आले नाहीत. खासगी शिकवणीचा विचारही मनाला शिवला नाही. शाळेतील शिक्षकांची शिकवणी आणि पाठ्युपस्तकाचे वाचन यावर सारा भर होता. शिक्षकांनी सातत्याने प्रोत्साहित केले. शिक्षक योगेश माणगावे, महावीर तेरदाळ यांची मदत झाल्याचे त्याने सांगितले.

'रोज पहाटे चार वाजता उठायचे. सकाळी सात वाजेपर्यंत अभ्यास, दहा ते पाच शाळा आणि रात्री पुन्हा अभ्यास असा दिनक्रम ठरलेला. वाचन, लिखाणावर फोकस ठेवला. दहावीची परीक्षा तोंडावर असताना दोन प्रश्नसंच इतरांनी दिले. दहावीच्या परीक्षेत ८० टक्क्यापर्यंत गुण अपेक्षित होते. ८३ टक्के मिळाले. सायन्स शाखेत प्रवेश घ्यायचे आहे, खूप शिकायचे आहे' असे आतिषने सांगितले. 'मुलांच्या शिक्षणासाठी कष्ट उपसण्याची तयारी आहे. आणखी चार-पाच घरातील धुणीभांडी करू. पण मुलांना शिकवणार' हे त्याच्या आईचे बोल उमेद वाढविणारे आहेत. बांधकाम व्यावसायिक प्रसाद कुलकर्णी, ठेकेदार समाधान भालेराव यांची मदत होत असल्याचे शेषेराव कांबळे यांनी सांगितले.

तर दुष्काळी भागातील मुलांचे करिअर घडू शकेल

मुलाने, आतिश मोठ्या कष्टाने यश मिळविले. पण गरिबीमुळे त्याच्या शैक्षणिक भवितव्याची चिंता पालकांच्या डोळ्यात आहे. दुष्काळी भागातील, बांधकाम मजूराच्या मुलाला समाजाचे सहकार्य लाभले तर उच्च शिक्षण घेऊन करिअर घडविण्याचे त्याचे स्वप्न साकार होऊ शकते. विज्ञान शाखेतून उच्च शिक्षण घ्यायचे, करिअर घडवायचे आणि कुटुबीयांचा आधारवड बनायचे ही त्याची आंतरिक ईच्छा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अकरावी प्रवेशप्रक्रियेला शुक्रवारपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर शहरातील मान्यताप्राप्त ३३ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये स्थानिक पातळीवर अकरावीसाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेला १४ जूनपासून सुरूवात होणार आहे. कला, वाणिज्य व विज्ञान या तीन शाखांसाठी १४ हजार १४० जागा उपलब्ध आहेत. ऑनलाइन अर्ज भरणे व प्रवेश निश्चिती करणे या दोन टप्प्यात होणाऱ्या प्रक्रियेअंतर्गत विद्यार्थी व पालकांच्या सुविधेसाठी अर्ज संकलन केंद्रांसह तक्रार निवारण केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत अशी माहिती शिक्षण उपसंचालक सुरेश आवारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीच्या कार्यकारिणी बैठकीत शनिवारी हा निर्णय घेण्यात आला.

शनिवारी दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावी प्रवेश प्रक्रियेचे नियोजन करण्यात आले आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी कुणीही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही यासाठी गुणवत्तेनुसार प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.

१४ जूनपासून मूळ गुणपत्रक मिळेपर्यंत विद्यार्थ्यांनी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करायचे आहे. यासाठी www.dydekop.org या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांनी लॉगीन करणे आवश्यक आहे. दहावीचे गुणपत्रक मिळाल्यानंतर पुढच्या पाच दिवसात प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या फेरीला सुरूवात होणार आहे. या फेरीमध्ये ऑनलाइन अर्जाची प्रत आवश्यक त्या कागदपत्रांच्या छायांकित प्रतींसह कोणत्याही ११ संकलन केंद्रापैकी कोणत्याही एका संकलन केंद्रावर प्रत्यक्ष भरणे आवश्यक आहे. यावेळी ८० रुपये शुल्क ऑनलाइन किंवा रोख स्वरुपात भरल्यानंतरच अर्ज दुसऱ्या फेरीत स्वीकारला जाणार आहे. पहिल्या फेरीत कॉलेज पसंती क्रम व गुणवत्ता यादी यानुसार प्रवेश यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी दुसऱ्या फेरीतील प्रक्रिया पूर्ण करून प्रवेश निश्चित करणे बंधनकारक आहे. बदलीधारक अधिकारी, कर्मचारी, सैनिकांचे पाल्य, आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू यांनी आपले ऑनलाइन अर्ज मुख्य केंद्र असलेल्या मेन राजाराम हायस्कूल केंद्रावर जमा करणे आवश्यक आहे.

तक्रार निवारण केंद्र

गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर प्रवेशाबाबत तक्रार व शंका निरसन करण्यासाठी शाखानिहाय तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. कला शाखेसााठी डी. डी. शिंदे सरकार कॉलेज, वाणिज्य शाखेसाठी न्यू कॉलेज तर विज्ञान शाखेसाठी विवेकानंद कॉलेज येथे तक्रार निवारण केंद्र असेल. ज्या विद्यार्थ्यांची तक्रार असेल त्यांनी ऑनलाइन तक्रार केल्यानंतर त्या अर्जाची प्रत तक्रारनिवारण केंद्रामध्ये जमा करायची आहे.

मंगळवापासून उदबोधन वर्ग

अकरावीसाठी केंद्रीय पद्धतीने राबवण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला कशा प्रकारे सामोरे जावे याचे मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्यावतीने उदबोधन वर्गांचे आयोजन केले आहे. मंगळवारपासून (ता. ११) ते गुरूवारपर्यंत (१३ जून) हे वर्ग घेण्यात येणार आहेत. विद्यार्थी, पालकांसह शिक्षक, प्रवेश प्रकियेतील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मंगळवारी रामगणेश गडकरी हॉल, पेटाळा येथे सकाळी साडेदहा ते दुपारी साडेबारा व दुपारी तीन ते पाच यावेळेत पालक व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन वर्ग होईल. बुधवारी (ता. १२) विवेकानंद कॉलेजच्या साळुंखे स्मृतीभवन येथे सकाळी साडेदहा ते दुपारी साडेबारा व दुपारी तीन ते पाच यावेळेत हा वर्ग होणार आहे. गुरुवारी (ता. १३) भवानी मंडप येथील मेन राजाराम हायस्कूल येथे सकाळी साडेदहा ते दुपारी साडेबारा व दुपारी तीन ते पाच यावेळेत मुख्याध्यापक, शिक्षक, संकलन केंद्रातील कर्मचाऱ्यांसाठी उद्बोधन वर्ग होईल.

प्रवेश अर्ज संकलन केंद्रे

कॉलेज संपर्क

मुख्य केंद्र मेन राजाराम हायस्कूल, भवानी मंडप २५४२७५०

महाराष्ट्र हायस्कूल, शिवाजी पेठ २६२६९८२

पद्माराजे हायस्कूल, पेटाळा २६२५४४०

केएमसी कॉलेज, गंगावेश २५४२०८५

गोखले कॉलेज, रविवार पेठ २६४२५४०

शाहू कॉलेज, कदमवाडी २६५४६५८

न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल, ताराबाई पार्क २६५७०६३

एमएलजी हायस्कूल, शाहू मैदान २५४७०६५

कॉमर्स कॉलेज, रविवार पेठ २६४१२२४

शहाजी कॉलेज, दसरा चौक २६४४२०४

शाहू हायस्कूल, जुना बुधवार पेठ २५४२७५०

कमला कॉलेज, राजारामपुरी २५२२२१६

३३

कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या

१४,१४०

प्रवेश क्षमता

३७२०

कला शाखा मराठी माध्यम क्षमता

१२०

कला शाखा इंग्रजी माध्यम प्रवेश क्षमता

३३००

वाणिज्य शाखा मराठी माध्यम प्रवेश क्षमता

१०४०

वाणिज्य शाखा इंग्रजी माध्यम प्रवेश क्षमता

५९६०

विज्ञान शाखा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्योजकाच्या अटकेच्या आश्वासनानंतर मृतदेह ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गृहप्रकल्पातील कामाच्या हिशोबावरून उद्योजकाने मारहाण केल्याने जखमी झालेल्या सिव्हिल इंजिनीअर अतिश रवींद्र गिरीबुवा (वय २४, रा. सावर्डे तर्फे असंडोली, ता. पन्हाळा) याचा उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी एका खासगी दवाखान्यात मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूला कारणीभूत असलेला उद्योजक गिरीष शहा (रा. रुईकर कॉलनी) याला अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी सहा तास मृतदेह ताब्यात घेतला नाही. पोलिसांनी शहा यांना अटकेचे आश्वासन दिल्यानंतर सायंकाळी चार वाजता मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान, उद्योजक शहा फरार आहेत.

जुना राजवाडा पोलिसांनी सांगितले की, गृहप्रकल्पाच्या कामाच्या हिशोबावरुन संशयित शहा याने स्टीकने मारहाण करून विष पिण्यास प्रवृत्त केले होते. याप्रकरणी त्याच्या विरोधात नातेवाईकांनी गुन्हा दाखल केला होता. त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान सकाळी दहा वाजता त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआरच्या शवागृहात आणला. मात्र जोपर्यंत संशयिताला अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. त्यामुळे सुमारे चार तास तणाव निर्माण झाला. अखेर जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव यांनी संशयितावर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला. कामावरील हिशोबात एक लाख रुपयांची तफावत असल्याच्या कारणावरुन शहा याने त्याला ६ जून रोजी बिंदू चौकातील कार्यालयात मारहाण केली होती. आतिश या गृह प्रकल्पावर दोन महिन्यांपासून कामावर होता. शहा यांनी कुटुंबियांना मारण्याची धमकी दिल्याने बॅगेतील तणनाशक प्यायल्याने अत्यवस्थ झाला होता. दरम्यान त्या उद्योजकाच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनाच्या उभारीपुढे अपंगत्वही फिके

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शारीरिक अपंगत्वासारखा नियतीचा आघात पचवून त्यांनी मनाला बळकटी दिली. अपंगत्व शरीराला दहावीच्या परीक्षेत यश मिळवले त्या विद्यार्थ्यांच्या मनाच्या उभारीपुढे अपंगत्वही फिके पडले. शारीरिक अपंग, अध्ययन अक्षम, गतिमंद तसेच अध्ययन स्तर सर्वसामान्य असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशाने अपंग शरीराचे असले तरी मन बळकट असल्याचा मंत्र दिला आहे. उचगाव येथील हेल्पर्स ऑफ दि हँडीकॅप्ड संस्था संचालित समर्थ विद्यालयाचा निकाल ८० टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी लख्खं यश मिळवले आहे.

समर्थ विद्यालयातून यावर्षी ४६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यातील २५ जण प्रथम श्रेणीत आणि त्यातील १३ विद्यार्थी विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. तसेच २७ विद्यार्थी अध्ययनात अडचणी असणारे होते. मात्र आपल्या परिश्रमाने आणि शाळेने उपलब्ध करून दिलेल्या उपचारात्मक मार्गदर्शनाच्या सहाय्याने या विद्यार्थ्यांपैकी १८ विद्यार्थ्यांनी यश मिळवले.

विद्यालयाच्या आदित्य माळी याने ८९ टक्के गुण मिळवले आहेत. खेळातही अव्वल असलेल्या आदित्यला एअरफोर्समध्ये करिअर करायचे आहे. शाळेतील आदर्श विद्यार्थिनी ठरलेल्या निकिता शिंदे हिने ८५ टक्के गुण मिळवले असून तिला नर्स व्हायचे आहे. अध्ययनात अक्षम असलेल्या साक्षी मगदूम हिने सकारात्मकपणे उपचारांना साथ देत ८४ टक्के गुण मिळवले आहेत. शारीरीक व बौद्धीक अपंग असलेल्या विश्वजित पाटील याने लेखनिकाच्या सहकार्याने ७७ टक्के गुण मिळवले आहेत. त्याला लेखन क्षेत्रात करिअर करायचे आहे. पॅराप्लेजिक असल्यामुळे चाकाच्या खुर्चीतूनच आयुष्य जगणाऱ्या सागर कातळे याने ६९ टक्के गुण मिळवले. सागरने संस्थेसाठी इलेक्ट्रीक डोअर बेल बनवली असून त्याला बँकिंग क्षेत्रात करिअर करायचे आहे. सेरेब्रल पाल्सी असलेल्या इंद्रजित भातमारे याने ६२ टक्के गुण मिळवले असून त्याला व्यवस्थापन क्षेत्रात व्यावसायिक म्हणून भविष्य घडवण्याची इच्छा आहे. संस्थेच्या वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या ९ अपंग विद्यार्थ्यांनीही लख्खं यश मिळवले आहे.

सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका, शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेच्या अध्यक्षा डॉ. नसीमा हुरजूक व विश्वस्त तथा शाळा प्रमुख सुचित्रा मोर्डेकर, पी. डी. देशपांडे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देविकाचे 'बावनकशी' यश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर आईची सोन्याच्या दागिन्याच्या दुकानात दिवसभर नोकरी तर वडिलांचे हॉटेलमध्ये काम. आई-वडील दिवसभर काबाडकष्ट करत असताना घरची आर्थिक स्थितीही बेताची. क्लासची फी हप्ताहप्त्याने भरली. पण आई-वडिलांचे स्वप्न लेकीने साकार केले. दहावीच्या परीक्षेत ८५ टक्के यश मिळवत देविका मोहन परदेशी हिने मिळवलेल्या बावनकशी यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. लक्ष्मीपुरी कोंडाओळ येथे परेदशी कुटुंबाचे वास्तव्य आहे. राहते घर मालकीचे असले तरी घरची आर्थिक स्थितीशी मुकाबला करताना वडील मोहन आणि आई तेजश्री दोघेही नोकरी करतात. आई तेजश्री या एका सोनेचांदीच्या दागिन्यांच्या शोरुममध्ये सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत नोकरी करतात तर वडील हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम करतात. दोघेही बाहेर असल्याने देविकाने घरकाम सांभाळून अभ्यास केला. छोट्या भावाच्या अभ्यासाकडेही लक्ष दिले. मुलगी हुशार असल्याने तिला चांगल्या क्लासला प्रवेश द्या असा सल्ला अनेकांनी परदेशी कुटुंबाला दिला. पण फी भरायला पैसे नसल्याने परदेशी कुटुंबाला चिंता सतावत होती. शनिवार पेठेतील क्लासच्या एन. एम. निळपणकर यांनी देविकाची गुणवत्ता पाहून तिला फीमध्ये सवलत देत हप्ताने फी भरण्याची मुभा दिली. सकाळी पाच वाजता उठून देविका सहा वाजता सकाळी क्लासला जायची. क्लासहून आठ वाजता घरी आल्यावर आईला मदत करत अभ्यास करायची. एमएलजी हायस्कूलमध्ये वर्गशिक्षिका स्नेहल टोणपे यांच्यासह शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले. शाळेतून घरी आल्यावर भावासह देविका अभ्यासाला बसायची. आई नोकरीहून घरी आल्यावर जेवण करुन पुन्हा अभ्यासाला बसायची. आई-वडिलांचे कष्ट पाहून देविकानेही क्लास आणि शाळेतील अभ्यास सोडून चार ते पाच तास अभ्यासाचे नियोजन केले. विज्ञान, गणितासह संस्कृत विषय स्कोअरिंग असल्याने त्यावर लक्ष दिले. देविकाने संस्कृत विषयात ९६, मराठीत ८६, सामाजिक शास्त्रमध्ये ९० तर इंग्रजी विषयात ७० गुण मिळाले. दहावीनंतर बारावी सायन्सचे देविका शिक्षण घेणार असून एअर होस्टेस म्हणून तिला करिअर करायचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यशाच्या आनंदाला जल्लोषाचे तेज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ऑनलाइन निकाल उपलब्ध होण्यापर्यंत दुपारी एक वाजेपर्यंतची हुरहूर, निकालपत्र मिळाल्यानंतर पास झालेल्या विद्यार्थ्यांचा आनंदोत्सव तर नापास किंवा अपेक्षाभंग झालेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील नाराजीच्या छटा अशा संमिश्र वातावरणात दहावीच्या निकालाचा दिवस ढळला. यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी कुटुंबीय, मित्रपरिवार व नातेवाईकांसोबत जल्लोष करत आनंद साजरा केला. शहरात दिवसभर अनेक ठिकाणी फटाक्याची आतषबाजी करत आनंदोत्सव सुरू होता. यशस्वी विद्यार्थ्यांवर दिवसभर फोन, मेसेज व प्रत्यक्ष भेटीतून अभिनंदनाचा वर्षाव झाला तर अपयशी विद्यार्थ्यांना धीराचा आधार दिला.

दहावीचा निकाल शनिवारी दुपारी जाहीर होणार असल्याचे एसएससी बोर्डाने शुक्रवारी जाहीर केल्यापासूनच दहावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी व पालकांमध्ये निकालाबाबत उत्सुकता होती. सकाळपासून शहरात दहावीच्या निकालाची चर्चा सुरू होती. दुपारी एक वाजता निकाल ऑनलाइन उपलब्ध झाल्यानंतर मोबाइल फोनद्वारे मेसेजवर निकाल पाहण्यात आला. मात्र निकालाची प्रिंट काढण्यासाठी सायबर कॅफेवर विद्यार्थ्यांनी गर्दी केली. त्यामुळे शहरातील विविध परिसरातील कॅफे, कॉम्प्युटर सेंटर विद्यार्थ्यांच्या गर्दीने गजबजून गेले. निकाल घेतल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी शाळेत एकत्र येत आनंद साजरा केला. शिक्षकांना भेटण्यासाठीही विद्यार्थ्यांनी शाळा गाठली. निकालादिवशी दुसरा शनिवार असल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचे पालक नोकरीमध्ये आहेत त्यांना सुटी होती. निकालानंतर घराघरात कौटुंबिक वातावरणात हा आनंद साजरा करण्यात सेकंड सॅटर्डे मूडने आणखी रंगत आणली. नातेवाईक, मित्रपरिवार, शेजारी यांच्याकडून यशस्वी विद्यार्थ्यांचे दिवसभर अभिनंदन होत होते.

नापासांना धीराचे बोल

जे विद्यार्थी नापास झाले किंवा ज्यांना अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले अशा विद्यार्थ्यांची नाराजी दूर करण्यासाठी अनेक नातेवाईक, कुटुंबीयांनी धीराची भूमिका बजावली. अपयशी विद्यार्थ्यांना मानसिक धीर देणारे वातावरणही अनेक घरी दिसून आले. काही शिक्षकांनी नापास विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना पुन्हा प्रयत्न करण्याचा सल्ला देत आधार दिला.

पर्यटनासोबत यशाचा आनंद

अहमदनगर येथून कोल्हापूरच्या पर्यटनासाठी आलेल्या श्रेणिक सोनटक्के याने कोल्हापुरातील एका सेंटरवर दहावीच्या निकालाची प्रत घेतली. त्याला ९३ टक्के मार्क मिळाल्याचे समजताच त्याच्या कुटुंबीयांनी पर्यटनासोबत मुलाच्या यशाचा आनंद साजरा केला. शुक्रवारी श्रेणिकने अंबाबाईचे दर्शन घेतले होते तर शनिवारी तो कुटुंबासोबत पन्हाळा येथे जात असताना निकालाची प्रत घेतली. निकाल पाहून आनंदित झालेल्या श्रेणिकने कुटुंबीयांसोबत पुन्हा अंबाबाईचे दर्शन घेतले व त्यानंतर तो पन्हाळ्याला गेला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्यूशनशिवाय श्रीतेजचे लखलखीत यश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जुना बुधवार पेठेत दोन छोट्या खोल्या. वडिलांची सरकारी नोकरी असली तरी कर्जाच्या विळख्यामुळे आर्थिक परिस्थिती आवासून उभी रहायची. आई विनाअनुदान तत्त्वावरील शाळेत शिक्षिका. पण, श्रीतेज चंद्रकांत सूर्यवंशीची जिद्द मोठी. अनेकांनी ट्यूशन लावण्याचा सल्ला डावलून त्याने शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार वर्षभर अभ्यासाचे नियोजन केले. दहावीच्या परीक्षेत ९६ टक्के गुण मिळवत संघर्षमय यशावर मोहोर चढवली. सर्व विषयात नव्वदी पार करणाऱ्या श्रीतेजला कम्प्युटर सायन्समध्ये करिअर करायचे आहे.

श्रीतेजचे वडील एनसीसी कार्यालयात नोकरी करतात. पण घर खरेदी करण्यासाठी काढलेल्या कर्जाच्या विळख्यात सापडले. आई आशा तोरस्कर चौकातील दीपक साळुंखे विद्यामंदिरात विनाअनुदान तत्त्वावरील शाळेत नोकरी करतात. रोस्टर प्रॉब्लेममुळे कायम नोकरी न मिळाल्याचे दु:ख न

मानता संघर्ष करत मुलांना शिकवण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे. सूर्यवंशी यांना दोन मुले. श्रीतेजने घरची परिस्थिती बेताची असूनही लख्ख यश मिळवले.

दीपकने स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या राजर्षी शाहू हायस्कूलमध्ये प्रथम क्रमांक पटकावत ९६ टक्के गुण मिळवले. संस्कृत विषयात शंभर गुण मिळाले. पण बाकीच्या सर्व विषयात नव्वदच्या पुढे गुण मिळवले. मराठीत ९१, इंग्रजीत ९३, गणितात ९४, सायन्समध्ये ९४, सोशल सायन्समध्ये ९६ गुण मिळवले. दहावीमध्ये आई-वडिलांनी श्रीतेजला ट्यूशन लावण्याबाबत विचारणा केली. पण स्वत:वर विश्वास असल्याने त्याने ट्यूशन न लावता अभ्यास केला. गेल्यावर्षी शाळा झाल्यावर वर्षभरातील अभ्यासाचे वेळापत्रक घरच्या भिंतीवर लावले. शाळेत शिकताना एकादा विषय समजला नाही तर शिक्षकांच्या घरी जाऊन शंका समाधान करुन घेत असे. अभ्यासाची सातत्याने उजळणी करुन घेतली. नवीन अभ्यासक्रम असल्याने कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात याचाही अंदाज घेतला. घरी छोटी लहान खोली असल्याने शाळेत व मित्रांच्या घरी अभ्यास केला. त्याची गुणवत्ता लक्षात घेऊन शाळेनेही मदत केली. शिक्षकांनी पुस्तके, वह्या विकत घेऊन दिल्या. प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी उत्तर पत्रिकेचे संच एस. एस. कवठेकर यांनी खरेदी करुन दिल्या. परीक्षा सुरू होण्यापूर्वी शेवटच्या महिन्यात प्रश्नपत्रिका सोडवण्यावर भर दिला. एकही गुण जाता कामा नये याचे तंतोतंत नियोजन करण्याचा प्रयत्न केला. सेल्फ स्टडीमुळे श्रीतेजला दणदणीत यश मिळाले.

श्रीतेज विज्ञात शाखेत प्रवेश घेणार असून जेईईवर लक्ष केंद्रीत करणार आहे. त्याला आयआयटीमध्ये प्रवेश घेऊन कम्प्युटर सायन्समध्ये इंजिनीअरींगची पदवी घ्यायची आहे. दहावीच्या यशावर समाधान न मानता बारावीत यश मिळावायचे यासाठी त्यांनी अभ्यासाचे नियोजनही सुरू केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूर विभाग राज्यात दुसरा

$
0
0

दहावीचा निकाल ८६.५८ टक्के

गेल्यावर्षीपेक्षा ७ टक्क्यांनी घट

यंदाही मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा ८ टक्क्यांनी अधिक

सोमवारपासून गुणपडताळणी सुरू

.. .. . .. .. .. .. . ..

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. कोल्हापूर विभागाचा निकाल ८६.५८ टक्के लागला. राज्यात कोल्हापूर विभागाने द्वितीय स्थान पटकावले. गतवर्षीपेक्षा यंदा कोल्हापूर विभागाच्या निकालात ७.३० टक्क्यांनी घट झाली असून, गेल्यावर्षी निकालाची टक्केवारी ९३.८८ इतकी होती. दरम्यान यंदाही कोल्हापूर विभागात मुलींनीच बाजी मारली. विभागात कोल्हापूरसह सांगली व सातारा या जिल्ह्यांचा समावेश आहे.

राज्यात कोकण विभागाचा सर्वाधिक ८८.३८ टक्के, तर सर्वांत कमी नागपूर विभागाचा ६७.२७ टक्के निकाल लागल्याची माहिती कोल्हापूर विभागीय मंडळाचे सचिव एस. एम. आवारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार हा पहिला निकाल आहे. जिल्ह्यातून ४९ हजार ६९, सांगली जिल्ह्यातून ३४ हजार १४६ तर सातारा जिल्ह्यातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३६ हजार ७६१ आहे. यंदाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मुलांची टक्केवारी टक्के ८२.६७ तर मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण ९१.२५ टक्के आहे. यावर्षी मुलांपेक्षा मुली ८.५८ टक्के अधिक उत्तीर्ण झाल्या आहेत.

सोमवारपासून विद्यार्थ्यांना गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी अर्ज करता येईल. अर्जाचा नमुना www.maharesult.nic.in या संकेतस्थळावर आहे. गुणपडताळणीसाठी व छायांकित प्रतीसाठी १९ जूनपर्यंत अर्ज करता येईल. उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनाच्या अर्जासोबत उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत घेणे बंधनकारक आहे. ही प्रत मिळाल्यानंतर पाच दिवसांत विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करावा, असे आवारी यांनी सांगितले.

०० ०० ०० ००

सोमवारपासून गुणपडताळणी

गुणपडताळणीसाठी १० ते १९ जूनपर्यंत तर छायाप्रतीसाठी १० ते २९ जूनपर्यंत अर्ज करता येईल. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची श्रेणी सुधारण्यासाठी गुण सुधार योजनेंतर्गत पुढील दोनच परीक्षांमध्ये पुन्हा परीक्षेस बसता येईल. उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करायचे असेल त्यांनी शाळा किंवा विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्ट मध्ये घेण्यात येणार आहे.

०० ०० ०० ००

अकरावी प्रवेश प्रक्रिया शुक्रवारपासून

शहरातील मान्यताप्राप्त ३३ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये स्थानिक पातळीवर अकरावीसाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेला १४ जूनपासून सुरूवात होणार आहे. कला, वाणिज्य व विज्ञान या तीन शाखांसाठी १४ हजार १४० जागा उपलब्ध आहेत. ऑनलाइन अर्ज भरणे व प्रवेश निश्चिती करणे या दोन टप्प्यात होणाऱ्या प्रक्रियेअंतर्गत विद्यार्थी व पालकांच्या सुविधेसाठी अर्ज संकलन केंद्रांसह तक्रार निवारण केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत.

.. . . . .

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सहा महिन्यांपूर्वी पत्नी आंबुताई हिने अशाच

$
0
0

सहा महिन्यांपूर्वी पत्नी आंबुताई हिने अशाच प्रकारे चहात विष घालून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो फसल्याने पुन्हा शनिवारी मध्यरात्री अन्नात विष कालवून पत्नीने पतीसह आपली जीवनयात्रा संपविली. अजनाळे येथील संदिपान मारुती खांडेकर पत्नी आंबुताईसह येथील खांडेकर येड्रावकर वस्ती येथे राहतात. त्यांना एक मुलगा व एक मुलगी असून, दोघेही विवाहित आहेत. घरची शेतजमीन नसल्याने मुलगा मुंबई येथे पिठाची गिरणी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितो. दरम्यान आंबुताई हिने रात्री नऊच्या सुमारास जेवण बनविताना भाजीत विषारी औषध कालवून पती संदिपान खांडेकर यांच्यासह स्वतः जेवण केले मध्यरात्रीच्या सुमारास दोघांनाही उलट्यांचा त्रास सुरू झाला म्हणून सुट्टीनिमित्त आजी-आजोबांकडे आलेली नात गुड्डी विष्णू माने हिने शेजारील चुलत मामा सुदाम विठ्ठल खांडेकर यांना हा प्रकार सांगितला. सुदाम खांडेकर यांनी तत्काळ खासगी वाहनातून पती-पत्नींना उपचाराकरिता सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन आले असता उपचारापूर्वीच आंबुताई हिचा मृत्यू झाला तर पती संदिपान खांडेकर यांची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना सोलापूरला घेऊन जाण्यास सांगितले, मात्र उपचारापूर्वीच संदिपान खांडेकर यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. पत्नी आंबुताई हिचे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केले असून, संदिपान यांचे सोलापूर येथील सरकारी रुग्णालयात शवविच्छेदन करून दोघांचेही मृतदेह अजनाळे गावी नेण्यात आले. रात्री उशिरा शोकाकूल वातावरणात दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या बाबत प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. पूजा साळे यांनी पोलिसात खबर दिली आहे. म्हणून नातीचे वाचले प्राण अंबुताईने आमटीत विषारी औषध कालविल्याने जेवणापूर्वी नात गुड्डीला दमदाटी व मारहाण करून जेवण करण्यापासून रोखले होते, म्हणून रागाने आजीवर रुसून गुड्डी उपाशीपोटीच झोपली होती. विषारी औषध असलेली आमटी खाण्यापासून रोखल्याने नात गुड्डी हिचे प्राण वाचले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्रिपद कसं मिळवायचं ते माझ्याकडून शिका: आठवले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सत्ता कशी मिळवायची, मंत्री कसे बनायचे हे विरोधकांनी माझ्याकडून शिकावे, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. मी ना पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलो ना अमित शहा यांना भेटायला गेलो, तरी मला मंत्रिपद मिळाले, त्यामुळे ते कसे मिळवायचे ते माझ्याकडून शिका असं ते म्हणाले. रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने लोकसभा निवडणुकीत कोणतीही जागा लढवली नाही, तरी त्यांना एक मंत्रिपद मिळाले आहे.

'काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला भवितव्य उरलेले नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालाने राज्यात पवार यांची पॉवरही कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. काँग्रेसची अवस्था बिकट आहे. या परिस्थितीत पवारांना देशाचे कल्याण व्हावे असे वाटत असेल तर त्यांनी 'एनडीए'मध्ये सहभागी होऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम करावे', असे आवाहन आठवले यांनी केले. केंद्र सरकारने सवर्ण समाजाला दहा टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला असून, त्याचा विविध समाजघटकांना शिक्षण आणि नोकरीत फायदा होईल, असा दावाही त्यांनी केला.

सर्किट हाउस येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी वंचित आघाडीमुळे आम्हाला कसलाही फटका नाही. 'किंचित' परिणाम झाला. नागरिक, कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. वंचित आघाडीचा सत्तेपर्यंत पोहचण्याचा मार्ग खडतर आहे. प्रकाश आंबेडकर यांनीही 'एनडीए'त सामील व्हावे. सरकार आणि इव्हीएम मशिनचा काही संबंध नाही. इव्हीएमबद्दल आक्षेप असतील तर विरोधकांनी निवडणूक आयोगाला भेटावे. त्यांच्या आरोपात काही तथ्य नाही. निवडणूक आयोगाने मतपत्रिकांच्या आधारे निवडणूक घ्यायचा निर्णय घेतल्यास तशा निवडणुका घेण्यसाची आमची तयारी आहे,' असे ते म्हणाले. राहुल गांधी यांनी उलटसुलट बोलून मते घालवली, अशी टिप्पणीही आठवलेंनी केली.

रिपाइंला वीस जागा मागणार

'राज्यात भाजप-शिवसेना आणि काँग्रेस, राष्ट्रवादी अशा दोन आघाड्या आहेत. 'वंचित'सारख्या तिसऱ्या आघाडीला महाराष्ट्रात स्थान नाही. रिपाइं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडे वीस जागा मागणार आहे. या जागा भाजपच्या कमळ चिन्हावर नव्हे तर, आरपीआयच्या (आठवले गट) चिन्हावर लढणार आहोत, असेही आठवले म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कसबा बावडा रस्त्यावर नियोजनाअभावी कोंडी

$
0
0

राहुल मगदूम, कसबा बावडा

जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयत ते भगवा चौक या मार्गावर विविध सरकारी कार्यालये आहेत. या कार्यालयांत येणाऱ्या नागरिकांनी रस्त्यावर लावलेल्या गाड्यांमुळे तसेच या रस्त्यावरून जाणाऱ्या लहान-मोठ्या वाहनांचा पादचाऱ्यांना त्रास होत आहे. एस. पी. ऑफिस आणि चार नंबर गेटसमोर काही ठराविक वेळी आणि मोठ्या वाहनांमुळे कोंडी होऊ लागली आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातून जिल्ह्याचा पोलिस यंत्रणेचा कारभार चालतो. त्यालगत जिल्हाधिकाऱ्यांचे निवासस्थान आहे. तेथेच राज्य राखीव पोलिस दलाचे कार्यालय आहे. शेजारी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत असून येथे पंचवीसहून अधिक सरकारी कार्यालये आहेत. तेथेच विक्रीकर भवन आहे. या कार्यालयातून जिल्ह्याचा जीएसटीचा कारभार चालतो. पुढे जिल्हा न्यायालयाची मोठी इमारत असून येथे पन्नासहून अधिक न्यायालये आहेत. न्यायालयाची इमारत संपताच कसबा बावड्याचा रहिवासी परिसर सुरू होतो. भगव्या चौकात डाव्या बाजूस राजर्षी शाहू जन्मस्थान तसेच जुन्या एसआरपी खात्याची इमारत आणि त्यासमोर कृषी खात्याचे कार्यालय आहे.

या परिसरातच दररोज हजारो नागरिक कार्यालयीन कामकाजासाठी येतात. येथील कर्मचारी व नागरिकांची चारचाकी वाहने व दुचाकी हजारो वाहने या परिसरात ये-जा करीत असतात. राष्ट्रीय महामार्गावरून शियेपासून थेट भवानी मंडप तसेच शहरातील आजुबाजूच्या भागात जाण्यासाठी हा मुख्य रस्ता आहे. केएमटी बस व टोप, शिरोली भागातून येणारे डंपर या रस्त्यावरून जातात. हा भाग कार्यालयीन वेळेत कायम मोठ्या वर्दळीचा आहे.

रिक्षास्टॉपमुळे कोंडी

चार नंबर गेट चौकातील महापालिकेच्या महागावकर विद्यामंदिरसमोरील रिक्षा स्टॉप अनधिकृत आहे. येथे थांबलेल्या रिक्षांमुळे मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयातून बाहेर पडणाऱ्या वाहनधारकांना वळून शहरात जाण्यास अडचणी निर्माण होतात. या भागात दोन्ही बाजूस दोन बस स्टॉप व रिक्षा स्टॉप आहेत. या रस्त्यावर होणारी कोंडी त्रासदायक ठरत आहे. न्यायाधीशांच्या निवासस्थानासमोर दररोज सकाळी वाहतूक पोलिसही काही काळ नियोजनासाठी उपस्थित असतात. मात्र, हा अर्ध्या तासांचा काळ वगळला तर इतर गर्दीच्या वेळी वाहनधारकांना अडचणींना समोरे जावे लागते.

हे व्हायला हवे

- वाहतूक कोंडी फोडण्यासाठी जिल्हा पोलिसप्रमुख कार्यालयाच्या दारातील बसस्टॉप हा मध्यवर्ती कार्यालयाच्या इमारतीसमोर नेणे. जिल्हा पोलिस प्रमुखांच्या कार्यालयाची प्रवेशद्वाराची रचना बदलणे, आत येणारी वाहने उत्तर प्रवेशद्वाराने आणि दक्षिण प्रवेशद्वारातून बाहेर जाणारी वाहने अशी रचना आवश्यक आहे. तरच ती थेट चौकातून बाहेर उजवीकडे अथवा डावीकडे जातील अशा उपाययोजनांची गरज आहे.

- मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील पहिल्या प्रवेशद्वाराचा उपयोग आतमधे येण्यासाठी तसेच जीएसटी भवनच्या बाजूकडील प्रवेशद्वाराकडून बाहेर जाण्यासाठी वापर करणे तसेच जिल्हा न्यायालयात जाण्यासाठी उत्तर बाजूच्या, बावड्याकडील प्रवेशद्वारातून प्रवेश आणि दक्षिण बाजूच्या चौकातून जाणाऱ्या बाजूने बाहेर जाण्यासाठी प्रवेशद्वाराचा वापर करण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जगण्याची उमेद वाढवणारेप्रथमेशचे चित्रप्रदर्शन

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

अवघ्या सातव्या वर्षी, खेळण्या-बागडण्याच्या वयात त्याला मस्क्यूलर डिसऑनर या दुर्धर आजाराने गाठले. या आजाराशी संघर्ष करत सांगलीच्या प्रथमेश आंबेकरने आपल्या कुंचल्यातून शेकडो चित्रे रंगवली. आजाराने त्याचे जगणे हिरावले मात्र, चित्रांच्या माध्यमातून तो आजही जिवंत आहे. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल आणि आंबेकर कुटुंबीयीांच्यावतीने प्रथमेशच्या 'ऊर्जा निसर्गाची' या चित्रांचे प्रदर्शन राजर्षी शाहू स्मारक भवन येथे सुरू आहे. उद्योजक संग्राम पाटील, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. प्रदर्शन शनिवारपर्यंत (ता. १५) सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत कला रसिकांसाठी खुले राहणार आहे.

प्रथमेशची चित्रे पाहताना 'मरावे परी कीर्तिरुपे उरावे' या ओळींची प्रकर्षाने आठवण होते. माणसाचं निसर्गाशी असलेलं उत्कट नातं चित्रांच्या माध्यमातून त्याने समर्थपणे मांडले आहे. निसर्ग माणसाच्या जगण्याला आणखीन समृद्ध करतो. माणसाच्या मनातील द्वेष विसरून अधिक प्रेम करण्याचा संदेश निसर्ग देतो. प्रथमेशची चित्रे निसर्गाच्या उत्कट भावमुद्रा स्पष्टपणे मांडतात. दोन्ही हात, पाय सक्षम नसतानादेखील केवळ दोन बोटांनी चारशेहून अधिक निसर्गचित्रे त्याने रंगवली. शरीरावर मर्यादा असतानाही निसर्गातील बारीकसारीक बारकावे त्यातील वैविध्यपूर्ण छटा, पक्ष्यांची विलोभनीय चित्रे त्याने मोठ्या उत्कटतेने कॅनव्हासवर रेखाटली आहेत. त्या चित्रांमध्ये निसर्गाच्या वेगवेगळ्या रूपाबरोबरच मावळती संध्याकाळ, ग्रामीण जीवनाचा साज आणि बाज प्रत्यक्ष अनुभवता येतो. अगदी निखळपणे वाहणारा झरा, झाडावर बसणाऱ्या पक्षांचा समूहभाव अशा कितीतरी गोष्टींचे प्रचिती प्रथमेशची चित्रे पाहताना येते. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष आर. वाय. पाटील, प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पाटील, दादासाहेब पाटील, अनिकेत खाडे, मोहनराव पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणांनी जमवली ५४ हजार पुस्तके

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

वाचनाच्या वेडाने झपाटलेल्या तरुणांनी वाचन संस्कृती रुजवण्यासाठी गेल्या दोन वर्षात तब्बल ५४ हजार पुस्तके जमवली. या पुस्तकांचा वाचकांना लाभ व्हावा, यासाठी शहरासह जिल्ह्यातील दुर्गम भागात १८ वाचनालये सुरू करण्याचा निर्धार तरुणांनी केला आहे. विधायक उपक्रमांनी सुरू झालेली पुस्तक चळवळ दिवसेंदिवस व्यापक रुप धारण करीत आहे.

ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनमधील पुस्तकवेड्या तरुणांच्या मनात दोन वर्षांपूर्वी वाचनालय सुरू करण्याची कल्पना आली. २३ जून २०१७ मध्ये त्यांनी वाचनालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्याकडे वाचनालयाची कल्पना बोलून दाखवताच त्यांनी स्वत:कडील काही पुस्तके देऊन पाठबळ दिले. अनेकांकडे बरीच पुस्तके पडून असतात. वाचकांअभावी धूळ खात पडलेल्या पुस्तकांना वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तरुणांनी सोशल मीडियाचा आधार घेतला. पुस्तके जमवण्याच्या उपक्रमाला विधायकतेची जोड दिली. 'एक घर-एक पुस्तक', 'रद्दीतून वाचनालय२, 'सेल्फी विथ बुक', 'समारंभातून सामाजिक बांधिलकी', 'टाकाऊतून टिकाऊ', 'एक घर-एक लग्न-एक पुस्तक' अशा विधायक उपक्रमांमुळे पुस्तकांचा ओघ वाढला.

गेल्या दोन वर्षात तब्बल ५४ हजार ३६८ पुस्तके जमा झाली आहेत. एवढी पुस्तके ठेवायची कुठे? असा प्रश्न या तरुणांना पडला. यानंतर त्यांनी रद्दीची विक्री करून जमवलेल्या १८ ते २० हजार रुपयांमधून सहा जुनी कपाटे खरेदी केली. मुक्त सैनिक वसाहत येथे सुरू केलेल्या पहिल्या वाचनालयाचे उद्घाटन त्यांनी भाकपचा तरुण नेता कन्हय्याकुमार यांच्या हस्ते केले. या वाचनालयात दहा हजारांहून अधिक पुस्तके आहेत. परिसरातील नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांनाही याचा लाभ होत आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार स्पर्धा परीक्षांची पुस्तकेही उपलब्ध केली जात आहेत. येणाऱ्या दोन महिन्यात बिंदू चौक आणि राजेंद्रनगर येथील वाचनालये सुरू केली जाणार आहेत.

यानंतर शाहूवाडी तालुक्यातील उखळू, पन्हाळा तालुक्यातील बांबरवाडी, शहरातील क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथील वाचनालये सुरू होणार आहेत. वाचनालयांसाठी जागा आणि इमारतींचीही गरज आहे. यासाठी इच्छुकांनी बांधकाम साहित्य द्यावे असेही आवाहन तरुणांनी केले आहे. प्रशांत आंबी, आरती रेडेकर, कृष्णा पानसे, नितीन ढाले, दिलदार मुजावर, मुकुंद कदम, धीरज कठारे, अमोल देवडेकर, शक्ती कांबळे आदी तरुण या कामात सक्रीय आहेत.

कुरिअरनेही येतात पुस्तके

सोशल मीडियामुळे वाचनालयांचा उपक्रम देश-विदेशात पोहोचला आहे. कोल्हापूरसह आसपासच्या जिल्ह्यातील लोकांनी उत्स्फुर्तपणे आपल्याकडील जुनी-नवी पुस्तके वाचनालयासाठी स्वत: आणून दिली. दूरच्या लोकांनी कुरिअरद्वारे पुस्तके पाठवली आहेत. रशियातील एका व्यक्तीनेही कोल्हापुरातील तरुणांना पुस्तके देऊन वाचन चळवळीचा उत्साह वाढवला.

विधायक उपक्रमांमधून केवळ पुस्तके जमा केली जात नाहीत, तर त्यांचा योग्य विनियोग व्हावा याचीही दक्षता घेतली जाते. वर्षभरात जिल्ह्यात १८ ठिकाणी वाचनालये सुरू करण्याचा आमचा निर्धार आहे.

- प्रशांत आंबी, पुस्तक संग्राहक


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images