Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

साहित्यिक ल. सि. जाधव यांचे निधन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

ज्येष्ठ कादंबरीकार लक्ष्मण सिद्राम तथा ल. सि. जाधव यांचे बुधवारी सायंकाळी अल्प आजाराने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. जाधव यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

स्टेट बँकेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर वसुंधरा महाविद्यालयात त्यांनी अध्यापन केले. पराकोटीच्या अभावग्रस्त बालपणापासून स्वकर्तृत्वावर मिळवलेल्या सर्व प्रकारच्या समृद्धीपर्यंतचा प्रवास त्यांनी 'होरपळ' या आत्मचरित्रातून मांडला. त्यास राज्य शासनाचा २०१२ चा लक्ष्मीबाई टिळक उत्कृष्ट वाङ्मय आत्मचरित्र पुरस्कार मिळला होता. 'सुंभ आणि पीळ'ला सन २०१४ चा उत्कृष्ट दलित साहित्य लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार, मृत्युंजयकार शिवाजी सावंत पुरस्कार मिळाला होता. 'केकतीची फुले', 'तुमचा खेळ होतो', 'पण..., भारत माझा देश आहे, शूरवीर तहानू' असे बालसाहित्य आहे. काव्यसंग्रह, ललित लेख, कादंबरी लेखन त्यांनी लिहिल्या आहेत. ज्येष्ठ साहित्यिक त्र्यं. वि. सरदेशमुख यांच्या 'डांगोरा एका नगरीचा' या महाकादंबरीची हस्तलिखित प्रत त्यांनी तयार केली होती. गेल्या वर्षी त्यांचा मोठा मुलगा श्रीनंद जाधव यांचे आकस्मिक निधन झाले होते.

विपुल साहित्यसंपदा

होरपळ, सुळकाटा, दाह (हिंदी आत्मकथन), सिंगी (होरपळचा इंग्रजी अनुवाद), हूलपोवणी, दहन, मावळतीची उन्हे, सुंभ आणि पीळ, अश्रूंचे गोंदण, पराभूत धर्म, धर्मवेध, अडगळ, सं गच्छध्वम, शूर जवान, शूरवीर लहानू, तुमचा खेळ होतो, पण..., दी रियल हीरो, प्रकाशाच्या वळचणीत, भारत मााझा देश आहे, गुदमरते शालीन जगणे, पाथेय, परतीचे पक्षी, केकतीची फुले, परतीचे पक्षी.

पुरस्कार

होरपळ : राज्य शासनाचा २०१२ चा लक्ष्मीबाई टिळक उत्कृष्ट वाङ्मय आत्मचरित्र पुरस्कार, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे पुरस्कार, लातूर

सुंभ आणि पीळ : शासनाचा २०१४ चा उत्कृष्ट दलित साहित्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, मृत्युंजयकार शिवाजी सावंत पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद, वा. म. जोशी पुरस्कार, फ्रेंड्स लायब्ररी, मधुश्री पुरस्कार २०१५.

मावळतीची उन्हे : मनोरमा फाउंडेशनचा पुरस्कार -२०१५

डॉ. निर्मलकुमार फडकुले साहित्यसेवा पुरस्कार २०१६

पाथेय : आपटे वाचन मंदिर, इचलकरंजी पुरस्कार -२०१६

दाह (होरपळ) - विद्योत्मा साहित्य भारतीयस्तर पुरस्कार

समग्र साहित्य सेवा : शिवतीर्थ पुरस्कार, सोलापूर

तुमचा खेळ होतो, पण... : दलुबाई जैन, जळगाव बालवाङ्मय पुरस्कार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वातावरण ढगाळ, पावसाची प्रतीक्षा कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना गुरुवारी ढगाळ वातावरणामुळे काहींसा दिलासा मिळाला. सकाळी नऊ वाजेपर्यंत ढगाळ वातावरणामुळे उष्मा कमी झाला. काहीवेळ पावसाचा शिडकावा झाल्याने पल्लवित झालेल्या आशा १० नंतर मावळल्या. गेल्या दोन दिवसांपासून जमा होणाऱ्या ढगांनी हुलकावणी दिल्याने अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे.

ढगाळ वातावरणामुळे हवेतील उष्मा कमी झाला होता. गुरुवारी सकाळपासूनच पावसाचे वातावरण झाले होते. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. काही वेळ पावसाचा हलकासा शिडकावा झाला. ढगांचा गडगडाट झाल्यामुळे पाऊस बरसणार म्हणून नागरिक सुखावले. सकाळी नऊ वाजेपर्यंत पावसाळी वातावरण होते. त्यानंतर स्वच्छ सूर्यप्रकाश पडल्याने पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या साऱ्यांचाच हिरेमोड झाला. कोल्हापुरात यंदा वळीव पावसाने दडी मारली. मे महिन्यात तर कोल्हापुरातील तापमानाचा पारा ४० अंशापर्यंत वाढला. गेले तीन, साडेतीन महिने उन्हाच्या तडाख्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला होता. शिवाय गेल्या तीन चार दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे पावसाची शक्यता होती. यामुळे ग्रामीण भागात शेती मशागतीच्या कामाने वेग घेतला आहे. शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. मृग नक्षत्राला दोन दिवसांचा अवधी उरला आहे. लांबलेल्या पावसाची कारणे सांगताना शिवाजी विद्यापीठ पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. पी. डी. राऊत म्हणाले, 'ग्लोबल वार्मिंग आणि बदलते हवामान हे पाऊस लांबण्यामागील प्रमुख कारणे आहेत. कार्बनडाय ऑक्साईड व इतर वायू वातावरणात वाढल्याने हा बदल झाला आहे. यावर झाडे लावणे आणि त्याचे संगोपन करणे हाच एकमेव उपाय आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पतधोरणामुळे भारतीयअर्थव्यवस्थेस चालना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'रिझर्व्ह बँकेने गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या नेतृत्वाखाली नेमलेल्या पतधोरण समितीने जाहीर केलेल्या पतधोरणामुळे जागतिक अर्थस्पर्धेत भारताला अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळेल,' असे मत ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ किरण कर्नाड यानी 'मटा'शी बोलताना व्यक्त केले. सध्या ते डेटन (न्यू जर्सी, अमेरिका) येथे आहेत.

कर्नाड म्हणाले, 'रिझर्व्ह बँकेने देशाची मध्यवर्ती बँक म्हणून बँकांना देत असलेल्या कर्जावरील व्याजदर ('रेपो रेट') पाव टक्क्याने कमी केला. तो ६ वरून ५.७५ टक्क्यांवर आणला. यामुळे देशातील बँकाही आपल्या कर्जदाराना दिलेल्या कर्जावरील व्याजदर कमी करतील. याचा परिणाम गृहकर्जे आणि इतर बहुतांश कर्जे स्वस्त होऊन महागाई आटोक्यात येईल. रिझर्व्ह बँकेने रिव्हर्स रेपो रेटही .२५ टक्क्याने कमी करून ५.५० टक्क्यांवर आणला. याचा परिणाम बँका रिझर्व्ह बँकेत ठेवत असलेल्या ठेवींवर कमी व्याज देण्यात होईल. परिणामी बँकांच्या ठेवींवरील उत्पन्न कमी होईल. याचाच पुढील परिणाम म्हणून बँकाही आपल्या ठेवींदारांच्या ठेवीवरील व्याजदर कमी करतील. याचा मोठा फटका ज्या ग्राहकांना विशेषतः ज्येष्ठ नागरिकांच्या संसाराचा गाडा केवळ ठेवींवरील व्याजावर चालतो, त्यांना बसण्याची शक्यता आहे.'

ते पुढे म्हणाले, 'रिझर्व्ह बँकेने आरटीजीएस (रिअल टाइम ग्रास सेटलमेंट) आणि एनईएफटीच्या (नॅशनल इलेक्ट्रोनिक फंड ट्रान्फर) व्यवहारांवर नाममात्र फी वगळण्यासाठी या पतधोरणात सुचविले आहे. याचा परिणाम बँकांचे डिजिटल व्यवहार वाढतील. याशिवाय चेकबुक न वापरल्याने वा रोकडही न उचलल्याने बँकांचे खर्च कमी होण्यात मदत होईल. रिझर्व्ह बँकेने बँकांना एटीएमवरील सेवा शुल्कही कमी करण्याचे संकेत दिल्याने सरकारच्या धोरणानुसार एटीएमचा वापर वाढेल. रिझर्व्ह बँकेने कर्जदारांना त्वरित कर्ज मिळण्यासाठी आता खासगी क्षेत्रातील स्मॉल फायनान्स बँकांना झटपट परवाने देण्याची घोषणा केली, ही बाब ग्राहकांसाठी उपयुक्त असली आणि बँकिंग वाढत असले तरी नागरी सहकारी व राष्ट्रीयीकृत बँकांना तसेच पतसंस्थांसाठी स्पर्धा निर्माण होईल. नव्या नागरी सहकारी बँकांना व शाखांना परवाने देण्याचा प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘माध्यमिक’चे कर्मचारी चंदगड, गडहिंग्लजमध्ये

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील सात कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. सर्वसाधारण सभेत सदस्यांनी 'त्या' कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना विलंब होत असल्याबद्दल प्रशासनाला धारेवर धरले होते. प्रशासनाने, सभेदिवशीच कर्मचाऱ्यांवर बदलीची कारवाई केल्याचे निदर्शनास आणले होते. 'त्या' कर्मचाऱ्यांची चंदगड, गडहिंग्लज आणि शिरोळ तालुक्यांत बदली करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेत गेले आठ-नऊ महिने माध्यमिक शिक्षण विभागाचा कारभार चर्चेत आहे. स्थायी समिती, सर्वसाधारण सभेतही हा विषय गाजला. विभागातील कर्मचाऱ्यांची दुर्गम भागात बदली करावी असा आक्रमक पवित्रा सदस्यांनी घेतला होता. प्रशासनाने, अधीक्षक मदन जाधव, वरिष्ठ सहायक शिवाजी खटागंळे, अजित कणसे, अभिजित बंडगर, राजेंद्र घोटणे, कनिष्ठ सहायक आबासाहेब दिंडे, दाजी पाटील यांची बदली केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नॅशनल स्टुडंट्स रॉकेट लॉंचिंग ऑक्टोबरमध्ये

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'असेंम्बलिंग करणारा देश म्हणून असलेली भारताची ओळख पुसून टाकण्यासाठी संशोधन क्षेत्रात अधिक काम करावे लागणार आहे. यासाठी कोल्हापूरमध्ये १०० एकरांत नॅशनल स्टुडंट्स रॉकेट लॉंचिंग उपक्रम ऑक्टोबर महिन्यात राबविणार आहे' अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी केली. स्पेस डेव्हलपमेंट नेक्सस आणि भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्यावतीने आयोजित 'एसडीएनएक्स इनोव्हेशन लॅब'च्या उद्घाटनप्रसंगी ते जरगनगर येथे बोलत होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, 'विद्यार्थ्यांमध्ये अवकाश संशोधनाविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी उपक्रमाचे आयोजन केलेत आहे. शालेय वयातच विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या संशोधन वृत्तीला चालना मिळावी या हेतूने ३६ तासांचा अभ्यासक्रम प्रात्यक्षिकासहित राबवला जाणार आहे. यामध्ये रॉकेट, ड्रोन्स, स्पेस रोबोटिक्स, ॲस्ट्रॉनॉमी, स्पेस एज्युकेशन, सॅटेलाइट, एरियल रोबोटिक्स, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स मशीन लर्निंग, एरो मॉडेलिंग, रेखांकन, अभ्यास सहली अशा १२ प्रोजेक्टचा यात समावेश आहे.

पालकमंत्री पाटील म्हणाले, 'शालेय वयातच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजणे गरजेचे आहे. यासाठी सहा हजार शाळांच्या माध्यमातून आम्ही विज्ञानाचा जागर करणार आहोत. प्रत्येक शाळेसाठी एक फिरती प्रयोगशाळा देण्याचा संकल्प आहे. विद्यार्थी वैज्ञानिकदृष्ट्या समृद्ध आणि सक्षम झाल्यास देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवर पुढे नेण्यात मोठा हातभार लागेल. अलीकडे अवकाश संशोधनात भारताने मोठी झेप घेतली आहे. इस्त्रोसारख्या संस्थांच्या माध्यमातून नवनवीन गोष्टींचा शोध लागत आहे. सध्या तरुण अवकाश तंत्रज्ञांची गरज देशाला आहे. त्यासाठी शालेय जीवनातच हुशार, चिकित्सक व संशोधक वृत्ती असणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्ञान व योग्य मार्गदर्शन देऊन विज्ञानवादी तरुण घडवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.'

शास्त्रज्ञ डॉ. एम. वराप्रसाद म्हणाले, 'रॉकेटबाबत लहान मुलांना नेहमी कुतूहल असते. भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील भारत उभा करण्यासाठी विद्यार्थ्यांतील क्षमतांचा वापर करावा लागणार आहे. देशाच्या विकासासाठी तरूणाईने विज्ञानवादी मार्ग पत्करावा.'

टी. के. सुंदरमूर्ती म्हणाले, 'चंद्रयान मोहीम ही भारताची अवकाश संशोधनातील मोठी झेप मानली जाते. चंद्रावर पाणी असल्याचे भारताने जगाला पहिल्यांदा सांगितले आहे. दिवसेंदिवस अवकाश संशोधनात भारत अग्रेसर बनतो आहे.'

यूएन स्पेस जनरेशन ॲडव्हायझरी कौन्सिलच्या सदस्य अपूर्वा जाखडी म्हणाल्या, 'या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अवकाश संशोधनाची आवड निर्माण होईल. विद्यार्थ्यांमधील क्षमता, सृजनशीलता या गुणांना वाव देण्यासाठी या उपक्रमाचा भविष्यात निश्चित फायदा होईल. विद्यार्थी व पालकांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासावा.'

पद्मश्री शिवराम भोजे म्हणाले, 'वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज आहे. भारतीय तरुणांमध्ये प्रचंड बुद्धिमत्ता आहे. त्या बुद्धिमत्तेला तांत्रिक क्षमतांची जोड दिल्यास सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करता येईल. शेतीच्या विकासासाठी तंत्रज्ञानाचा वापर व्हावा.'

यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, माजी खासदार धनंजय महाडिक, गोविंद यादव, मिलाप मुखर्जी यांनी मनोगत व्यक्त केले. चिकोडे ग्रंथालयाचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी प्रास्ताविक केले

ल्युकचा मराठीत संवाद

ऑस्ट्रेलियातील संशोधक ल्युकचा नाथन हायस यांनी कोल्हापूरकरांशी मराठीतून संवाद साधला. इंग्रजी भाषेचा उच्चाराचा टोन असलेल्या ल्युक यांनी 'माझा नमस्कार. मी तुमचा आभारी आहे' अशी वाक्य उच्चारताच कोल्हापूरकरांनी त्यांच्या या प्रयत्नाला टाळ्यांनी दाद दिली. अवकाश संशोधनासारख्या वेगळ्या विश्वात कुतूहल असणारे उपस्थित लोक पाहिल्यावर ल्युकला या उपक्रमात सहभागी झाल्याचा आनंद वाटला.

रॉकेट उड्डाणाला विलंब

रॉकेट लॉन्चिंग होणार असल्याने मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी व पालकांनी मैदानावर उपस्थिती दर्शवली. सुरुवातीला मोठे रॉकेट असेल असा कयास असलेल्या अवकाशप्रेमींना छोटे रॉकेट उडवणार असल्याचे कळताच मुलांनी नाराजी व्यक्त केली. वाऱ्याचा झोत मोठ्या प्रमाणात असल्याने रॉकेट उड्डाणात काहीकाळ तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. अखेरीस तंत्रज्ञांच्या मदतीने रॉकेट उड्डाण करण्यात आले.

फोटो- अर्जुन टाकळकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जागावाटपाचे 'आमचं ठरलंय'!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी,कोल्हापूर

'लोकसभेला जसे कोल्हापुरात ठरले होते, तसे विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचे आमचं ठरलंय', असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पत्रकारांना येथे सांगितले. 'युती हिंदुत्वाच्या मुद्यावर झाली आहे. यामुळे किरकोळ कारणावरून युती तुटणार नाही, ती अधिक मजबूत आहे. विधानसभेवेळी ती आणखी मजबूत होईल,' असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

युतीला लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत यशाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाईच्या दर्शनासाठी ठाकरे १३ खासदारांसह कोल्हापुरात आले होते. यावेळी हॉटेल सयाजी येथे झालेल्या पत्रकार बैठकीत त्यांनी १६ जूनला सर्व खासदारांना घेऊन अयोध्येत जाणार असल्याचेही सांगितले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. ठाकरे म्हणाले, 'कोल्हापुरात भगवा फडकवण्याचे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. ते कोल्हापूरकरांनी साकार केले. दोन जागा निवडून दिल्याने अंबाबाईचरणी नतमस्तक होण्याबरोबरच कोल्हापूरकरांना मानाचा मुजरा करण्यासाठी आलो आहे. आमची जबाबदारी वाढली आहे. कोल्हापूरला मंत्रिपद दिले नाही, पण अजून वेळ आहे, नक्की मिळेल. जरा धीर धरा.'

विधानसभेच्या जागांचा 'फिफ्टी-फिफ्टी'चा फॉर्म्युला ठरला आहे तो मान्य आहे का?, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरात 'आमचं ठरलंय', ही टॅगलाइन गाजली होती. आता 'आमचंही ठरलंय...' काय ठरलंय ते आता सांगणार नाही. पण ठरलंय नक्की, असे सांगत अधिक बोलणे टाळले. केंद्रात किरकोळ खाते दिल्याबद्दल नाराज आहात का? या प्रश्नावर आमच्या चेहऱ्यावर नाराजी दिसते का? असा प्रतिसवाल त्यांनी केला. आमची युती हिंदुत्वाच्या प्रश्नावर झाली आहे. दोन-चार पदांसाठी नाही. लोकसभा उपाध्यक्षपदाबरोबरच आणखी काही पदे मिळतील. आपलीच माणसे आहेत. त्यामुळे आपल्या माणसाकडून मागणार ते हक्काने. आता आमचं चांगलं चाललं आहे. आमच्या युतीची कुणी काळजी करू नये, ती टिकू नये म्हणून प्रयत्न होतात. युती मजबूत आहे आणि ती आणखी मजबूत होईल.

दृश्य-अदृश्य 'हात'

खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्या विजयात आमदार सतेज पाटील यांच्याकडून छुपी रसद मिळाली होती. याविषयी ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले, 'कोल्हापूरची जागा जिंकण्यासाठी जे जे दृश्य-अदृश्य 'हात' मदतीसाठी पुढे आले त्यांना मी दृश्य-अदृश्य धन्यवाद देतो!'

छावण्यांवर अन्नधान्य

केवळ दुष्काळ दौरा करणे चुकीचे आहे, असे सांगून ठाकरे म्हणाले, 'युती सरकार दुष्काळग्रस्तांसाठी चांगले काम करत आहे. पुढील आठवड्यात मी स्वत: आदित्यसह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात जाणार आहे. चारा छावण्या सुरू आहेत तेथील शेतकऱ्यांसाठी अन्नधान्य देणार आहोत.'

उद्धव म्हणाले...

- विधानसभेला कोणताही अजेंडा तयार नाही

- सेनेचे राजकारणातूनही समाजकारण

- राज्यात लवकर पाऊस पडावा, अशी अंबाबाईकडे मागणी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्राहकांनी साधला गुरुपुष्यामृत मुहूर्त

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच आलेल्या गुरूपुष्यामृत योगाच्या मुहूर्तावर गुजरीत ग्राहकांकडून सोन्याच्या खरेदीला चांगला प्रतिसाद लाभला. दुपारनंतर मुहूर्त असल्याने सायंकाळच्या सत्रात महिलावर्गाच्या गर्दीने शो-रुम हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र पहायला मिळाले.

साडेतीन मुहूर्तापैकी दसरा, दिवाळी, गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया या सणांबरोबरच गुरू पुष्यामृत योगाच्या मुहूर्तावर अनेकजण सोने खरेदी करतात. गुरुवारीही गुजरीतील सराफी दुकानांमध्ये सोने खरेदीसाठी गर्दी पहायला मिळाली. सकाळपासून गुजरीसह लक्ष्मीपुरी, व्हीनस कॉर्नर, राजारामपुरी येथील शोरुम्स ग्राहकांच्या स्वागतासाठी सज्ज होता. गुरुपुष्यामृत योगाचा मुहूर्त दुपारी सुरू झाल्यावर ग्राहकांची लगबग वाढली. एक ग्रॅम सोन्याचे वळे, कॉइन खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल होता. अनेक शोरुम, दुकानांत मोठी गर्दी झाली. नवीन फॅशनचे एक ग्रॅमचे दागिने खरेदीकडे महिलांचा कल होता.

बहुतांशी ग्राहकांनी बदलेल्या ट्रेंडनुसार दागिने खरेदी केल्याचे सराफ व्यवसायिकांनी सांगतिले. एप्रिलमध्ये गुढीपाडवा आणि मे महिन्यात अक्षय्य तृतीया आणि आजच्या गुरू पुष्यामृत मुहूर्तावर सलग तीन महिने ग्राहकांकडून चांगली सोने खरेदी झाल्याचे सराफांनी सांगितले. सध्या लग्नसराई सुरू असल्याने अनेकांनी आजचा मुहूर्त साधून दागिने घडविण्यासाठी सोने खरेदी केली.

गुरुपृष्यामृत योग असल्याने दुपारपासून ग्राहकांची वर्दळ वाढली. सायंकाळी ग्राहकांकडून चांगली सोने खरेदी झाली. पारंपरिक दागिन्यांबरोबर नवीन ट्रेंडच्या दागिन्यांचीही चांगली खरेदी झाली.

- भरत ओसवाल, अध्यक्ष, कोल्हापूर सराफ संघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोकुळची गाय दूध दरात वाढ

$
0
0

कोल्हापूर : गोकुळने मुंबई वगळता अन्य शहरांमध्ये गायीच्या दूध विक्री दरात गुरुवारपासून दोन रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यासह बेळगाव येथे आता गायीच्या दुधाचा प्रतिलिटर दर ४२ रुपये तर पुणे, बाारामती, अहमदनगर, औरंगाबाद येथे ४४ रुपये झाला आहे. गोकुळने गायीच्या खरेदी दरात २१ मेपासून प्रति लिटरला दोन रुपयांनी वाढ केली होती. त्यामुळे विक्री दरातही वाढ करण्याचा ठराव ३१ मे रोजीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत केला होता. त्याची अंमलबजावणी गुरुवारपासून सुरू करण्यात आली. मुंबईतील व फुल क्रिम दुधाच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. मात्र, वाशी येथे टोण्ड दुधाचा ४२ रुपये असलेला दर ४४ तर स्टँडर्ड दुधाचा दर ४४ वरुन ४६ रुपये केला आहे. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात गायीच्या दरात ४२ वरुन ४४ रुपये अशी वाढ करण्यात आली आहे. तर तेथील ४१ रुपयांचा दर असलेले टोण्ड दूध ४३ रुपयांना विकले जाणार आहे. गोव्यातही टोण्ड, गाय व स्टँडर्ड दरात प्रत्येकी दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सोलापूर, लातूर तसेच मुधोळ रुटवरही वाढ करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्पर्धा परीक्षांच्या तयारीचा प्रश्न सुटणार

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

सध्या करिअरच्या अनेकविध वाटा खुल्या झाल्या आहेत. यामध्ये स्पर्धा परीक्षेचे आव्हान पेलत प्रशासकीय सेवेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढत आहे. मात्र, यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. हीच बाब ओळखून महाराष्ट्र टाइम्स व द युनिक अॅकॅडमी यांच्या वतीने प्लॅनेट कॅम्पस अंतर्गत स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले आहे. द युनिक अॅकॅडमी येथे शनिवारी (ता. ८) सकाळी ११ वाजता कार्यशाळेस सुरुवात होणार आहे.

सरकारी नोकरीच्या संधी मिळवण्यासाठी स्पर्धा परीक्षा हा एकमेव व सर्वोत्तम मार्ग आहे. अलिकडे हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देतात. मात्र, नेमके मार्गदर्शन मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळत नाही. वर्षानुवर्षे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हाती निराशा आल्याने नकारात्मक मानसिकता तयार होते. योग्य वेळेत अभ्यासाची सुरुवात करणे, योग्य संदर्भग्रंथांचा अभ्यास, सराव परीक्षा, परीक्षांचे तंत्र यांची माहिती असेल तरच विद्यार्थ्यांना यश मिळते. परीक्षांचे स्वरुप आणि विद्यार्थ्यांची मानसिकता ओळखून त्यांना नेमके मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र टाइम्स द युनिक अॅकॅडमीने संयुक्तपणे कार्यशाळेचे आयोजन केले आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी या विषयावरील कार्यशाळेत विद्यार्थ्यांना युनिक अॅकॅडमीचे संचालक शशिकांत बोराळकर हे मार्गदर्शन करणार आहेत.

'प्लॅनेट कॅम्पस' अंतर्गत ही कार्यशाळा खासबाग येथील द युनिक अॅकॅडमी येथे शनिवारी सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचे स्वरुप समजावून सांगितले जाईल. आपली क्षमता कशी ओळखावी, पदांनुसार संबंधित परीक्षांचा अभ्यास कसा करावा, कोणत्या घटकांवर भर द्यावा याबद्दल मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रवेशासाठी इच्छुकांनी युनिक अॅकॅडमीच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्धव ठाकरेंनी घेतले अंबाबाईचे दर्शन

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

हालगी-घुमके, तुतारीच्या निनादात, उत्साही शिवसैनिकांच्या साक्षीने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह विजयी खासदारांनी गुरुवारी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन लोकसभा निवडणुकीचे नवस फेडले. यावेळी स्थानिक आमदार, पदाधिकारी व शिवसैनिकांची उपस्थिती होतीच. शिवाय ठाकरे येणार म्हणून अंबाबाईच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून आलेल्या भाविकांच्या गर्दीमुळे मंदिराचा आवार गर्दीने फुलून गेला होता.

लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील प्रचार प्रारंभावेळी ठाकरे यांनी अंबाबाईचे दर्शन घेऊन विजय मिळवून देण्यासाठी साकडे घातले होते. त्यानुसार राज्यात १८ खासदार निवडून आल्यानंतर कोल्हापूरचे खासदार, पदाधिकारी ठाकरे यांच्या भेटीसाठी 'मातोश्री'वर गेले होते. त्यावेळी सर्व खासदारांना घेऊन अंबाबाईच्या दर्शनासाठी येणार असल्याचे सांगितले होते.

त्यानुसार गुरुवारी सकाळी ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे व शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर मुंबईहून निघाले. पण ढगाळ वातावरणामुळे त्यांचे कोल्हापुरात तासभर उशिरा आगमन झाले. सव्वाबाराच्या सुमारास कोल्हापूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, खासदार प्रा. संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने यांच्यासह अन्य महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. तेथून सर्वजण दर्शनासाठी थेट मंदिरात आले. हलगी, घुमके, तुतारीच्या निनादात स्वागत करण्यात आले.

मंदिरातील गरुड मंडपामध्ये सर्वांसाठी बैठक व्यवस्था केली होती. साडेदहाच्या सुमारास ज्येष्ठ खासदार गजानन किर्तीकर, श्रीरंग बारणे यांना भवानी मंडपातून आमदार राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत वाजत-गाजत अंबाबाई मंदिरात आणण्यात आले. त्यापाठोपाठ केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांचे आगमन झाले. मंत्री असले तरी अतिशय साधेपणा राखत सावंत सपत्नीक गरुड मंडपात दाखल झाले. त्यानंतर एक-एक करत खासदार एकत्र आले. अनेक खासदार सहकुटुंब दर्शनासाठी आले होते. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सदस्य संगिता खाडे यांच्या हस्ते खासदार व त्यांच्या पत्नींचा भगवे फेटे, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

ठाकरे गरुड मंडपात आल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आगमन झाले. त्यानंतर ठाकरे कुटुंबीयांनी पालकमंत्री पाटील व केंद्रीय मंत्री अरविंद सावंत, खासदार विनायक राऊत, गजानन किर्तीकर, श्रीरंग बारणे, प्रा. संजय मंडलिक, धैर्यशील माने, राजन विचारे, राहुल शेवाळे, ओमराजे निंबाळकर, सदाशिव लोखंडे, हेमंत पाटील, कृपाल तुमाणे, प्रतापराव जाधव तसेच जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, आमदार राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, उल्हास पाटील, प्रकाश आबीटकर, डॉ. सुजीत मिणचेकर, सत्यजीत पाटील सरुडकर यांना सोबत घेत अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर मातृलिंग, साक्षी विनायक, श्रीयंत्राचे दर्शन घेतले. जवळपास चाळीस मिनिटे ठाकरे अंबाबाई मंदिरात होते.

दर्शन घेतल्यानंतर भाविकांच्या भेटीगाठी घेत दुपारी पावणेदोनच्या सुमारास ते दक्षिण दरवाजातून बाहेर पडले. यावेळी वैशाली क्षीरसागर, शिवाजी जाधव, सुजीत चव्हाण, दत्ताजी टिपुगडे, हर्षल सुर्वे, शिवाजीराव पाटील, मंगल साळोखे आदी उपस्थित होते.

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासाठी प्रतिक्षा

उद्धव ठाकरे यांचे एक वाजता गरुड मंडपात आगमन झाले होते. तेथे आल्यानंतर त्यांनी सचिव मिलिंद नार्वेकर यांना महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. 'राज्याच्या प्रचाराचा प्रारंभ पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत केला असल्याने त्यांना सोबत घेऊन दर्शन घेऊ,' असा विचार मांडला. त्यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी फोन केल्यानंतर तातडीने, सात मिनिटांत पालकमंत्री गरुड मंडपात आले. त्यांनी ठाकरे यांची भेट घेतली. नंतर सर्वजण दर्शनासाठी बाहेर पडले. यात जवळपास वीस मिनिटांचा अवधी गेला.

सीमाभाग केंद्रशासित करण्याची मागणी

महाराष्ट्र-कर्नाटकाच्या सीमाप्रश्नात नेहमीच शिवसेना सीमावासीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर उद्धव ठाकरे हे अंबाबाईच्या दर्शनासाठी येणार असल्याने महाराष्ट्र एकीकरण समितीचे शिष्टमंडळ खास भेटण्यासाठी बेळगावहून मंदिरात आले होते. त्यावेळी शिष्टमंडळाने ठाकरे यांची मंदिराच्या आवारात भेट घेतली. 'लवकरच संसदेचे अधिवेशन सुरू होत आहे. त्यामध्ये शिवसेनच्या खासदारांनी सीमाभाग केंद्रशासित प्रदेश करावा अशी मागणी करावी,' अशी विनंती शिष्टमंडळाने केली. त्यावेळी ठाकरे यांनी 'खासदारांना याबाबत सूचना देऊ' असे आश्वासन दिले. शिष्टमंडळात माजी आमदार दिगंबर पाटील, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, पंढरी परब, किरण गावडे, राजू बिर्जे, मनोहर हलगेकर, विजय भोसले, मोहन भांदुर्गे, सुधा भातखांडे, मुरलीधर पाटील, जयराम देसाई यांचा समावेश होता.

विधानसभेला मोठा पराक्रम घडवू

केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, 'कोल्हापूरचा खासदार शिवसेनेचा व्हावा असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. ठाकरे आता असते तर त्यांना किती आनंद झाला असता हे शब्दात सांगता येणार नाही. आगामी विधानसभा निवडणुकीतही पक्षाची ताकद वाढावी हेच ध्येय असेल. लोकसभा निवडणुकीत जनतेने ज्या पद्धतीने शिवसेनेला विजयी केले आहे, हे पाहता विधानसभेत त्यापेक्षाही मोठा पराक्रम होईल.'

फोटो : अर्जुन टाकळकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुने थकले, नव्यांचा थांगपत्ता

$
0
0

Appasaheb.mali @timesgroup.com Tweet : Appasaheb_MT कोल्हापूर : तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या (सीएचबी) नियुक्तीची नियमावली म्हणजे 'आगीतून उठून फुफाट्यात' असा प्रकार बनला आहे. सरकारने मानधनात वाढ केली, पण सीएचबी प्राध्यापकांना एकाच कॉलेजवर शिकवणे बंधनकारक केले. पूर्वी एका रिक्त जागेसाठी तीन सीएचबी प्राध्यापक नियुक्त केले जायचे, सरकारने त्यावर मर्यादा आणून आता दोन जागा भरण्याचे आदेश दिले आहेत. एकीकडे मानधन वाढले, पण दुसरीकडे एकाची नोकरी घटली याकडे सीएचबी प्राध्यापक लक्ष वेधत आहेत. सरकारचा सीएचबी प्राध्यापकांसोबत 'ताटातील वाटीत आणि वाटीतील ताटात' असा खेळ सुरू असल्याच्या भावना उमटत आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील सीएचबी प्राध्यापकांची संख्या २२२५ आहे. सरकारी कॉलेजमधील प्राध्यापक वगळता अन्य कॉलेजमधील सीएचबी प्राध्यापकांना नोव्हेंबर २०१८ पासून मानधन मिळालेले नाही. राज्य सरकारने नोव्हेंबर २०१८ पासून त्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे मानधन जुन्या पद्धतीने काढायचे की नव्या आदेशानुसार, या संभ्रमात सरकारी यंत्रणा गुरफटल्याने गेले सहा महिने त्यांना मानधन मिळालेले नाही. यामुळे अनेकांसमोर आर्थिक समस्या उद्भवत आहेत. दुसरीकडे सरकारने एका रिक्त जागेसाठी दोन सीएचबी प्राध्यापक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फटका नव्याने पीएचडी व नेट-सेटप्राप्त प्राध्यापकांना बसणार आहे. परिणामी अनेकांची तासिका तत्त्वावरील नोकरीही हिरावणार असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. दरम्यान, कॉलेजकडून सीएचबी प्राध्यापकांचा ज्या-त्या महिन्याच्या कामाचा अहवाल शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडे सादर केला जातो. शिक्षण सहसंचालक कार्यालय त्या अहवालाच्या आधारे सीएचबी प्राध्यापकांचे मानधन कॉलेजकडे जमा करते. मात्र, सरकारच्या शिक्षण खात्याकडून सीएचबी प्राध्यापकांचे दरमहा वेतन काढले जात नाही. यासंदर्भात कोल्हापूर विभागीय शिक्षण सहसंचालक अजय साळी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तो होऊ शकला नाही. दरम्यान, विद्यापीठ कायद्यामध्ये सीएचबी प्राध्यापक नियुक्तीला मान्यतेची तरतूद नाही याकडेही काहीजण लक्ष वेधत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जि.प.कर्मचारी सोसायटीला दोन कोटी ५९ लाखाचा नफा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीला दोन कोटी ५० लाख रुपयांचा नफा झाला आहे. २०१८ १९ या वर्षासाठी सभासदांना १२.५० टक्के लाभांश वाटप निर्णय झाला. एक जुलैपासून कर्जावरील व्याजदर ११ टक्क्यांपर्यंत कमी केला जाणार येणार आहे. भविष्यात कर्जावरील व्याजदर आणखी कमी करणार आहे' अशी माहिती संस्थेचे व्हाइस चेअरमन शांताराम माने यांनी पत्रकार परिषदेत दिली. संस्थेची सर्वसाधारण सभा शनिवारी (ता. ८) दुपारी एक वाजता संस्थेचे मुख्य कार्यालय श्री महालक्ष्मी सांस्कृतिक भवन येथे होणार आहे.

संस्थेच्या आर्थिक स्थितीची माहिती देताना व्हाइस चेअरमन माने म्हणाले, '३४०७ सभासद असलेल्या संस्थेकडे मार्चअखेर ११ कोटी २० लाख रुपयांचे भागभांडवल आहे. संस्थेकडे ८३ कोटी २८ लाख रुपयांच्या ठेवी तर ९१ कोटी ४४ लाख रुपयांची कर्जे वितरीत केली आहेत.१२० कोटी २६ लाख रुपये खेळते भांडवल असलेल्या संस्थेची वार्षिक उलाढाल २४६ कोटी ३० लाख रुपयांची आहे. संस्थेने १८ कोटी ३० लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे.'

माने म्हणाले, 'संस्थेतर्फे सभासदांना कायम ठेवीवर ११ टक्के व्याज मिळणार आहे. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या सभासदांना नियमित कर्जावर २०१८१९ वर्षासाठी ०.५० टक्के व्याज रिबेट देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. सभासदांना पगाराच्या पटीत २५ लाखापर्यत कर्जपुरवठा करण्यासाठी दुरुस्ती सुचविली आहे. मुख्यालय इमारतीमधून १५ लाख २८ हजार ४३५ रुपयांचे वार्षिक उत्पन्न मिळते. संस्थेच्या गडहिंग्लज, हातकणंगले, मुधाळतिट्टा येथील शाखा स्वमालकीच्या इमारतीत कार्यरत आहेत.'

पत्रकार परिषदेला संचालक एम. आर. पाटील, महावीर सोळांकुरे, कृष्णात किरुळकर, विजय टिपुगडे, श्रीकांत वरुटे, रंजना आडके, गौरी पाटील, संगीता गुजर, सुकाणू समितीतील राजाराम वरुटे आदी उपस्थित होते.

बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न करणार

सुकाणू समितीचे निमंत्रक एम. एम. पाटील म्हणाले 'पारदर्शी कारभार, सभासदांचा विश्वास यामुळे संस्थेची वाटचाल उत्तमरित्या सुरू आहे. संस्थेच्या संचालक मंडळासाठी आगामी काळात निवडणूक होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. निवडणूक बिनविरोध झाली तर ते संस्थेच्या हिताचे ठरणार आहे. या चर्चेसाठी आम्ही चार पावले पुढे यायला तयार आहोत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भोंदूबाबांनी घातला अनेकांना गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पुत्रप्राप्ती, उद्योग व्यवसायात भरभराट होण्याचे आमिष दाखवून गंडेदोरे, अंगारा देऊन ५० हून अधिक जणांची आर्थिक फसवणूक करुन संशयित किसन गंगाराम जोशी (वय ६५) व दिगंबर उत्तम जोशी (वय ४०,रा. दोघे मुंडखेडा, ता. जामनेर, जि. जळगाव) या दोघा भोंदूंनी लाखो रुपयांचा गंडा घातल्याची माहिती तपासात पुढे येत आहे. यामध्ये कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील नागरिक बळी पडले आहेत. दरम्यान या दोघांना गुरुवारी कोर्टासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

समस्या सोडविण्यासाठी गंडेदोरे आणि अंगारा देऊन गंगाराम जोशी आणि दिगंबर जोशी हे नागरिकांची फसवणूक करत असल्याच्या तक्रारी अंधश्रद्धा निमूर्लन समितीच्या गीता हसूरकर, सीमा पाटील, विश्वास कोरी, रमेश वाडकर यांच्याकडे आल्या होत्या. त्यांनी हा प्रकार शाहूपुरी पोलिसांना सांगितला होता. भोंदूबाबा ३० मे ते ८ जून या कालावधीसाठी एका हॉटेलमध्ये थांबले होते. ५ जून रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दोघेही मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून त्यांना अटक केली. तपास अधिकारी शहाजी निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबधित दोघा भोंदूबाबांनी स्थानिक वृत्तपत्रात जाहिराती करून समस्या असलेल्यांनी संबधित हॉटेलमध्ये भेटण्यास सांगत होते. वैद्यकीय उपचार करून थकलेल्यांनी गंडेदोरे बांधल्यास सर्व समस्या सुटतील, असा विश्वास भेटीसाठी आलेल्यांना देत होते. आर्थिक आणि मानसिक समस्या सोडविण्यासाठी धार्मिक विधी करावा लागेल. त्यासाठी दोन ते पाच हजार रुपयेही काहींकडून घेतले. त्यांच्यावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम २०१३ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या दोघांसोबत एक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. त्याची रवानगी सुधारगृहात केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुने थकले, नव्यांचा थांगपत्ता लागेना

$
0
0

Appasaheb.mali@timesgroup.com

Tweet:Appasaheb_MT

कोल्हापूर : तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या (सीएचबी) नियुक्तीची नियमावली म्हणजे 'आगीतून उठून फुफाट्यात' असा प्रकार बनला आहे. सरकारने मानधनात वाढ केली, पण सीएचबी प्राध्यापकांना एकाच कॉलेजवर शिकवणे बंधनकारक केले. पूर्वी एका रिक्त जागेसाठी तीन सीएचबी प्राध्यापक नियुक्त केले जायचे, सरकारने त्यावर मर्यादा आणून आता दोन जागा भरण्याचे आदेश दिले आहेत. एकीकडे मानधन वाढले, पण दुसरीकडे एकाची नोकरी घटली याकडे सीएचबी प्राध्यापक लक्ष वेधत आहेत. सरकारचा सीएचबी प्राध्यापकांसोबत 'ताटातील वाटीत आणि वाटीतील ताटात' असा खेळ सुरू असल्याच्या भावना उमटत आहेत.

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील सीएचबी प्राध्यापकांची संख्या २२२५ आहे. सरकारी कॉलेजमधील प्राध्यापक वगळता अन्य कॉलेजमधील सीएचबी प्राध्यापकांना नोव्हेंबर २०१८ पासून मानधन मिळालेले नाही. राज्य सरकारने नोव्हेंबर २०१८ पासून त्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे मानधन जुन्या पद्धतीने काढायचे की नव्या आदेशानुसार, या संभ्रमात सरकारी यंत्रणा गुरफटल्याने गेले सहा महिने त्यांना मानधन मिळालेले नाही. यामुळे अनेकांसमोर आर्थिक समस्या उद्भवत आहेत.

दुसरीकडे सरकारने एका रिक्त जागेसाठी दोन सीएचबी प्राध्यापक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा फटका नव्याने पीएचडी व नेट-सेटप्राप्त प्राध्यापकांना बसणार आहे. परिणामी अनेकांची तासिका तत्त्वावरील नोकरीही हिरावणार असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. दरम्यान, कॉलेजकडून सीएचबी प्राध्यापकांचा ज्या-त्या महिन्याच्या कामाचा अहवाल शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडे सादर केला जातो. शिक्षण सहसंचालक कार्यालय त्या अहवालाच्या आधारे सीएचबी प्राध्यापकांचे मानधन कॉलेजकडे जमा करते. मात्र, सरकारच्या शिक्षण खात्याकडून सीएचबी प्राध्यापकांचे दरमहा वेतन काढले जात नाही. यासंदर्भात कोल्हापूर विभागीय शिक्षण सहसंचालक अजय साळी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तो होऊ शकला नाही. दरम्यान, विद्यापीठ कायद्यामध्ये सीएचबी प्राध्यापक नियुक्तीला मान्यतेची तरतूद नाही याकडेही काहीजण लक्ष वेधत आहेत.

००००

तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना मुळात मानधन कमी आहे. शिवाय 'एकाच ठिकाणी लेक्चररशिप' या नव्या आदेशामुळे त्यांना अन्यत्र काम करता येणार नाही. यामुळे सीएचबी प्राध्यापकांचे आर्थिक नुकसान होणार आहे. सीएचबीधारकांनी एकाच कॉलेजवर नोकरी करायची, या आदेशाबाबत सरकारने फेरविचार करावा.

प्रा. डॉ. दिनकर कबीर

००००

तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना हमीपत्रविषयक घातलेली अट सरकारने रद्द करावी. पूर्वीप्रमाणे दोन कॉलेजमध्ये काम करण्यास मुभा असावी. थकीत मानधन सुधारित आदेशाप्रमाणे मिळावे, तसेच ते दर महिन्याला व्हावे. त्यामुळे आर्थिक विवंचना भासणार नाही.

प्रा. डॉ. किशोर खिलारे

००००

सरकारी कॉलेजमधील प्राध्यापकांना फटका

राज्यात सात सरकारी कॉलेज आहेत. या कॉलेजमधील तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची संख्या ७०० पर्यंत आहे. येथील राजाराम कॉलेजमधील सीएचबी प्राध्यापकांची संख्या ९० आहे. मात्र, सरकारने नोव्हेंबर २०१८ मध्ये वाढीव मानधनाचा आदेश काढला, पण या आदेशातून सरकारी कॉलेजमधील प्राध्यापकांना वगळले आहे. यामुळे वाढीव मानधनापासून ते वंचित राहणार आहेत.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपूर्व उत्साहात रायगडावर शिवराज्याभिषेक दिन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नजर जाईल तेथे फडकणाऱ्या भगव्या झेंड्याची पताका, फेटे बांधून शिवरायांच्या राज्याभिषेक दिन सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आलेले हजारो शिवप्रेमी, शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमून गेलेली रायगडाकडे जाणारी वाट आणि फुलांनी सजवलेली पालखी व शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीसह छत्रपतींचे राजबिंडे रूप अशा भारावलेल्या वातावरणात अपूर्व उत्साहात रायगडावर गुरुवारी शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आला. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे या सोहळ्याचे आयोजन केले होते. चीनचे राजदूत लियू बिंग, बल्गेरियाच्या राजदूत इलिनोरा डिमिट्रोव्हा, पोलंडचे कौन्सिल जनरल डॅमियन इरझॅक हे या सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थित होते.

सकाळी शेतकरी दांपत्याच्या हस्ते रायगडावरील मेघडंबरीतील शिवरायांच्या पुतळ्यावर सुवर्ण मोहरांचा अभिषेक करण्यात आला. लाडक्या राजाचा राज्याभिषेक सोहळा झाला तो दिवस साजरा करण्यासाठी हजारोंच्या संख्येने आलेल्या शिवप्रेमींनी केलेल्या शिवरायांच्या नामगजराने रायगडाच्या पायथ्यापासून शिखरापर्यंतचा कानाकोपरा निनादून गेला.

'सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा', संकल्पनेखाली काढलेल्या पालखी मिरवणुकीत मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. पालखीवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली.

दरबारातून पालखी होळीचा माळ, बाजारपेठ, जगदीश्वर मंदिर मार्गे रवाना झाली. पालखीवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी झाली. पारंपरिक वेशभूषेत महिला, शिवभक्त, मुली सोहळ्यात सहभागी‌ झाल्या होत्या. लेझीमच्या प्रात्यक्षिकांत पालखी जगदीश्वर मंदिराकडे रवाना झाली. शिवछत्रपतींच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर पालखी मिरवणुकीची सांगता झाली.

दरम्यान तत्पूर्वी, जिल्हा परिषदेच्या शेडमधून शिवछत्रपतींची पालखी ढोल ताशाच्या ठेक्यात शिरकाई देवीच्या मंदिराकडे मार्गस्थ झाली. हलगी घुमके आणि कैताळाच्या तालात पालखी राजसदरेकडे रवाना झाली. त्यानंतर खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती व युवराज शहाजीराजे छत्रपती राजसदरेवर आले. पोलिस बँडने त्यांचे स्वागत केले. शाहीर राजेंद्र कांबळे यांनी 'रयतेचा हा राजा झाला संभाजीराजा', हे स्वागतगीत गायले. पोलंडच्या तिसऱ्या सचिव इव्हा स्टॅनकिव्हिसिक, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी, प्रांत विठ्ठल इनामदार, जिल्हा पोलिस अधीक्षक अनिल पारसकर, समितीचे कार्याध्यक्ष हेमंत साळोखे उपस्थित होते. समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांनी प्रास्ताविक केले.

... .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टंचाईग्रस्त भागात तत्काळ टँकर

$
0
0

पंचगंगा, वारणा खोऱ्यात उपसाबंदी लागू

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता पाटबंधारे विभागाने शुक्रवारपासून (ता.७) पंचगंगा आणि वारणा खोऱ्यात उपसाबंदी लागू केली आहे. तसेच पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या बैठकीत जिल्ह्यातील धरणांमध्ये नऊ टीएमसी पाणी शिल्लक असल्याने दीड महिने पाणी पुरेल, असा विश्वास व्यक्त विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. तसेच टंचाई असलेल्या गावांत ३६ तासांत टँकर उपलब्ध करुन दिला जाईल तसेच कुपनलिका खोदाई कराव्यात अशा सूचना दिल्या.

भोगावती, पंचगंगा आणि कुंभी नदी क्षेत्रात दहा तारखेपर्यंत नदीतून शेतीला पाणी उपसा करण्याचे पाटबंधारे विभागाने निश्चित केले होते. पण पावसाने राधानगरी, काळम्मावाडी, तुळशी या मोठ्या तर कुंभी, कासारी, कडवी या मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाल्याने पिण्यासाठी पाणी देण्यासाठी शुक्रवारपासून उपसा बंदी जाहीर केली आहे. भोगावती ते शिराळा बंधारा, कुंभी ते सांगरुळ, कासारी ते यवलूज पोर्ले बंधाऱ्यापर्यंत ही उपसाबंदी राहणार आहे. वारणा नदीपासून हरिपूर संगमापर्यंत शुक्रवारपासून आणि रविवारपासून (ता.९) उपसाबंदी जाहीर करण्यात आली.

दरम्यान आज जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पाणी टंचाईसंदर्भात बैठक आयोजित केली होती. बैठकीला खासदार धैर्यशील माने, आमदार हसन मुश्रीफ, सुरेश हाळवणकर, संध्यादेवी कुपेकर, सत्यजित पाटील, डॉ. सुजित मिणचेकर, प्रकाश आबिटकर, सांगली पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता हेमंत गुणाले उपस्थित होते.

कोल्हापूर विभागाचे पाटबंधारे बंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र संकपाळ यांनी जिल्ह्यातील पाणीसाठ्याची माहिती दिली. जिल्ह्यातील सर्व धरणात ८७ टीएमसी पाणीसाठा होता. ७८ पाणी टीएमसीचे वाटप झाले असून नऊ टीएमसी पाणी शिल्लक आहे. राधानगरी, वारणा, दूधगंगा धरणातून शेतीसाठी शेवटचे पाण्याचे आवर्तन सोडले असून हे पाणी नदीवरील केटीवेअरमध्ये अडवण्यात आले आहे. १० दिवस हा पाणीसाठा पुरणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार मुश्रीफ यांनी नऊ टीएमसी पाण्याचे नियोजन सांगण्याची विनंती केल्यावर पालकमंत्री पाटील यांनी पावसास विलंब झाला तरी दीड महिना इतके पाणी पिण्यासाठी शिल्लक असल्याचा दावा केला.

आमदार सत्यजित पाटील म्हणाले, नदीकाठच्या गावांना पिण्याचे पाणी मिळणार असले तरी वाड्या वस्त्यांवर पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. याबाबत काय उपायोजना करणार अशी विचारणा केली. सध्या राधानगरी तालुक्यातील केळोशीपैकी शिंदेवाडी, चांदेपैकी पाल या दोन गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू असल्याचे माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. पण सर्व आमदारांनी आमच्या विधानसभा मतदार संघात वाड्या, वस्त्यांवर पाणी टंचाई जाणवत आहे, असे निदर्शनास आणून देताच ३६ तासात तहसीलदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अहवाल पाठवताच टँकर सुरू जाईल, अशी घोषणा पालकमंत्र्यांनी केली. ४९ ठिकाणी बोअर मारण्याचे काम पूर्ण झाले आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पण बोअर मारणाऱ्या दोन वाहनांपैकी एक वाहन बंद आहेत, याकडे आमदार आबिटकरांनी लक्ष वेधले. जिल्ह्यातील सर्व केटीवेअर बंधारे दुरुस्त केले जातील, असे त्यांनी सांगितले. या संदर्भात डॉ. मिणचेकर, मुश्रीफ, कुपेकर यांनी प्रश्न उपस्थित केले.

कर्नाटकला पाणी सोडल्याचा मुश्रीफांचा आरोप

पाटबंधारे विभागाने यावर्षी कर्नाटकला जास्त पाणी सोडल्याचा आरोप आमदार मुश्रीफ यांनी केला. दरवर्षी गैबी बोगद्यातून पंचगंगा नदीत सहा ते सव्वा टीएमसी पाणी सोडले जाते. यावर्षी ७.१ टीएमसी पाणी सोडल्याची कबुली पाटबंधारे विभागाने दिली. दूधगंगा नदीतून पाणी सोडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगताच 'वेदगंगेत पाणी का सोडले नाही. वेदगंगा हा दूधगंगा धरणाचा एक भाग आहे. गेले महिनाभर नदी कोरडी आहे. तुम्ही पाणी कर्नाटकला का सोडता?' असा प्रश्न उपस्थित केला. मुरगूडच्या सर पिराजीराव तलावाचे पाणी पिण्यास सोडले नसल्याने तेथली जनता टाहो फोडत आहे, असेही मुश्रीफ म्हणाले.

०००

वाढीव खर्च सरकारने उचलावा

वारणा नदीतून इचलकरंजीसाठी थेट पाइपलाइनचा वाढीव खर्च राज्य सरकारने मंजूर करावा, अशी मागणी आमदार हाळवणकर यांनी केली. तीन वर्षे कामास सुरुवात न झाल्याने डीएसआरमध्ये वाढ करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

जिल्ह्यातील प्रमुख धरणातील शिल्लक पाणीसाठा (टीमसीमध्ये)

प्रकल्प पाणीसाठा

राधानगरी ०.७५

तुळशी ०.७७

वारणा २.१२

दूधगंगा ०.८८

कासारी ०.४२

कडवी ०.९०

कुंभी ०.६५

पाटगाव ०.६९

चिकोत्रा ०.४९

चित्री ०.२४

जंगमहट्टी ०.१२

घटप्रभा ०.४७

जांबरे ०.०२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिरवणुकीत अवतरले शिवराज्य

$
0
0

फोटो आहे...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिन सोहळ्याच्या औचित्याने गुरुवारी दिवसभर आयोजित केलेल्या विविध उपक्रमांनी शिवराज्याची अनुभूती कोल्हापूरकरांनी घेतली. शिवरायांच्या शौर्याची गाथा मांडणाऱ्या पोवाड्यांपासून, भगव्या झेंड्यांनी सजलेले चौक, पुष्पहारांनी अभिवादन केलेल्या शिवप्रतिमा अशा वातावरणात राज्याभिषेक सोहळा साजरा झाला.

सायंकाळी अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शिवकाळातील विविध प्रसंगांचे सजीव देखावे, कोल्हापुरातील सामाजिक समस्यांकडे लक्ष वेधणारे फलक आणि शिवाजी महाराजांसह जिजाऊ, शहाजीराजे, बालशिवाजी, मावळे, अष्टप्रधानमंडळ यांच्या वेशभूषेतील शिवप्रेमी सहभागी झाले. शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या या मिरवणुकीने रात्री साडेआठ वाजता शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याची सांगता झाली.

मराठा महासंघाच्या मंगळवार पेठ येथील कार्यालयापासून सायंकाळी साडेपाच वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते व आमदार सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरवणुकीचे उद्घाटन झाले. उद्घाटनानंतर चंद्रकांत पाटील व सतेज पाटील यांनी लेझीमच्या ठेक्यावर नृत्य करत मिरवणुकीची जोशात सुरुवात केली. मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांनी मिरवणुकीत थरार आणला. यावेळी मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष अॅड. गुलाबराव घोरपडे, माजी महापौर हसीना फरास, नगरसेवक विजय खाडे, जयेश ओसवाल, डॉ. संदीप पाटील, चंद्रकांत चिले, संदीप देसाई, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य एस. आर. पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर व नागरिक उपस्थित होते. शाहू बँक चौकातून सुरू झालेली मिरवणूक मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका चौकमार्गे शिवाजी चौक येथे सांगता झाली.

हलगी तुतारीचा अखंड निनाद, शिवकालीन मर्दानी खेळ व युद्धकलांची श्वास रोखायला लावणारी प्रात्यक्षिके, घुमकं-कैताळाच्या ठेक्यावर ताल धरलेल्या महिला, युवती, शिवरायांच्या जीवनातील प्रसंग दर्शविणारे सजीव देखावे आणि मिरवणूक मार्गावर अविरत सुरू असलेला शिवरायांचा नामगजर अशा वातावरणाने राज्याभिषेक दिनानिमित्त काढलेल्या मिरवणुकीने शिवमाहोल तयार केला. विठ्ठलाचा नामगजर आणि डोक्यावर तुळशीवृंदावन व हातात टाळ-मृदुंग घेऊन मिरवणुकीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी लक्ष वेधून घेतले. तर महिलांनी पारंपरिक वेशभूषा करून लेझीमनृत्य सादर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खरीप पीक कर्ज वितरणात कोल्हापूर अग्रेसर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

खरीप हंगाम पीक कर्ज वितरणामध्ये आजअखेर पुणे महसूल विभागामध्ये कोल्हापूर जिल्हा अग्रेसर राहिला आहे. जिल्ह्यात ५८९ कोटी रुपयांचे कर्ज वितरण झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. सर्वाधिक ५०४ कोटी ७७ लाख २४ हजार रुपयांचे कर्ज वाटप कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने करून बाजी मारली आहे.

जिल्ह्याने आजअखेर ४८ टक्के कर्ज वाटप केले. ६३ हजार ९०६ खातेदारांना कर्ज दिले. सन २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्याला १२१५ कोटी रूपयाचे पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट दिले होते. खरीप हंगामासाठी पुणे विभागात पुणे जिल्ह्याला २२७४ कोटी ४६ लाख रुपये, सोलापूर जिल्ह्याला १४११ कोटी ३६ लाख ९७ हजार, सांगली जिल्ह्याला १३७७ कोटी ९५ लाख तर सातारा जिल्ह्याला १९२० कोटी रुपयांचे कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. गरजेच्यावेळी खते, बी बियाणे खरेदीसाठी रक्कम उपलब्ध होणार आहे. जूनअखेर कर्ज वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे आदेश यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना दिले आहे.

जिल्ह्यात खरीपासाठी १२१५ कोटी तीन लाख ९५ हजाराचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. खरीप हंगामासाठी ४२ हजार, ५५ हेक्टर क्षेत्रावर ६३ हजार, ८३७ खातेदारांना ५८९ कोटी हजार रुपये कर्जाचे वाटप केले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेने ५५ हजार, ३६३ खातेदारांना ५०४ कोटी, ७७ लाख २४ हजार रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. बँकेने ७९ टक्के कर्ज वितरण केले. तर राष्ट्रीयीकृत बँकांनी ७१७६ खातेदारांनी ६४ कोटी, १४ लाख रुपयांचे वाटप केले आहे. खाजगी बँकांनी ११९४ खातेदारांना १७ कोटी, ३१ लाख रुपयांचे तर ग्रामीण बँकांनी एक कोटी ५५ लाख रुपयांचे वाटप केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खोटे गुन्हे मागे घ्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

क्रिकेटच्या सामन्याच्या वादानंतर महाराणा प्रताप चौक परिसरातील साळी गल्लीत लहान मुलांच्या क्रिकेटच्या खेळाच्या कारणावरून दोन गटाकडून दगडफेक आणि हाणामारीत काहीं जणांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी अकबर मोहल्ला येथील रहिवाशांनी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर ठाण मांडले. खोटे गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे सुमारे दोनशे जणांच्या शिष्टमंडळाने केली.

महाराणा प्रताप चौक परिसरात चार जून रोजी रात्री दोन गटांत झालेल्या दगडफेकप्रकरणी बुधवारी पोलिसांनी सहा हुल्लडबाजांना अटक करून दोन्ही गटाच्या १०० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर खूनाचा प्रयत्न आणि पोलिसांवर हल्ला केल्याचा आरोप ठेवला आहे. मात्र या प्रकरणाशी काहीही संबध नसलेल्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. घटना घडली त्यावेळी काहीजण याठिकाणी हजर नव्हते. लहान मुलांच्या खेळाच्या वादातून हा प्रकार घडला आहे. ईदच्या खरेदीसाठी काही मुस्लिम बांधव मॉल आणि महाद्वार रोडवर खरेदीसाठी गेले होते. त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी अकबर मोहल्ला येथील नागरिकांच्या शिष्टमंडळाने केली. दरम्यान सुमारे दोनशे नागरिकांचा जमाव जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर जमल्याने पोलिसांनी याठिकाणी बंदोबस्त वाढविला. जिल्हा पोलिस अधीक्षक कामानिमित्त परगावी गेल्याने शिष्टमंडळाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांना निवेदन दिले. त्यांनी याप्रकरणी वरिष्ठ अधिकारी योग्य तो निर्णय घेतील, असे आश्वासन दिले. शिष्टमंडळात मनपाचे माजी स्थायी समिती सभापती आदिल फरास, रियाज गवंडी, रियाज सुभेदार, कादर मलबारी, हमजेखान सिंदी, मेहजबीन सुभेदार, शकील नगारजी, राजूभाई नांदणीकर आदींचा समावेश होता.

नगरसेविकेवर गुन्हा

एका महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार नगरसेविका मेहजुबीन सुभेदार यांच्यासह त्यांचे पती रियाज सुभेदारासह नऊ जणांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. नियाज सुभेदार, इम्रान गवंडी, पप्पू पेठारी, इम्तियाज खलिफा, सैफुद्दीन शेख, मंटू गुलोब झारी, गुल्फात शेख यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी दोन्ही गटाच्या लोकांसोबत शांतता बैठक घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारामती पाणीः सांगोल्यात शेतकऱ्यांचे गळफास आंदोलन

$
0
0

पंढरपूरः

निरा देवधर धरणाचे बारामती, इंदापूर तालुक्यासाठी दिलेले नियमबाह्य पाणी बंद करून ते लाभ क्षेत्रातील सांगोला, माळशिरस, फलटण, भोर, पंढरपूर या दुष्काळी भागासाठी पाणी द्यावे, या मागणीसाठी सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्यावतीने गळफास आंदोलन करण्यात आले.

निरा देवधर धरणातून निरा डाव्या कालव्यातून बारामतीला अतिरिक्त पाणी देण्याचा ठराव तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांच्या काळात घेण्यात आला होता. त्याची मुदत सन २०१७ मध्ये संपूनही नियमबाह्यपणे पाणी सुरूच होते. या विषयी भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी बेकायेशीर पाणी बंद करून ते दुष्काळी भागाला देण्याची मागणी जलसंपदामंत्री गिरिश महाजन यांच्याकडे केली होती. त्यावर मंत्री महाजन यांनी बारामतीचे पाणी बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

माढा लोकसभा मतदार संघातदेखील पाणी प्रश्न चांगलाच पेटला आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी थेट राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांनाच आव्हान दिले आहे. यानंतर आज शरद पवार आणि अजित पवार हे याप्रश्नी मुख्यमंत्री देवेद फडणवीस यांची भेट घेऊन पाणी बंद करून नये, अशी मागणी करणार असल्याची माहिती मिळताच दुष्काळी भागातील शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. त्यातून आमच्या हक्काचे पाणी बारामतीला देऊ नये, या मागणीसाठी येथील शेतकऱ्यांनी गळफास आंदोलन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images