Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

व्याख्यानमालेसह शोभायात्रेचे आयोजन

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यास ३४६वे वर्ष सुरू होत आहे. याचे औचित्य साधून अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे व्याख्यानमाला, व शोभायात्रेचे आयोजन केले आहे. एक जूनपासून या कार्यक्रमांना सुरुवात होणार असल्याची माहिती महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाध्यक्ष मुळीक म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराजंचा राज्याभिषेक सोहळा ही स्वराज्य निर्मितीमधील अतिशय महत्त्वाची घटना आहे. यंदा या घटनेस ३४५ वर्षे पूर्ण होत आहेत. शिवाजी महाराजांचे चरित्र आणि कार्य सर्वदूर पोहोचवण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. एक जूनपासून व्याख्यानमाला सुरू होणार असून, पहिल्या दिवशी नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात यांचे 'शुन्यातून स्वराज्य व साम्राज्यातून शून्य' या विषयावर व्याख्यान होणार आहे. दोन जून रोजी ज्येष्ठ विचारवंत बाबा भांड यांचे 'सयाजी महाराजांच्या नजरेतून छत्रपती शिवराय' या विषयावर व्याख्यान होणार आहे. तीन जून रोजी इतिहास संशोधक डॉ. नीरज साळुंखे यांचे 'छत्रपती शिवरायांचे साम्राज्य गुजरात ते श्रीलंका' या विषयावर व्याख्यान होईल. सर्व व्याख्याने दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे रोज सायंकाळी साडेपाच वाजता सुरू होणार आहेत.'

पाच जून रोजी शहरासह जिल्ह्यातील विविध शाखांमध्ये वृक्षारोपण होणार आहे. सहा जून रोजी मंगळवार पेठ येथील मराठा महासंघाच्या कार्यालयापासून दुपारी साडेचार वाजता शोभायत्रा सुरू होणार आहे. शोभायात्रेत जिल्ह्यातील शेकडो वारकरी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होणार आहेत. तुकाराम महाराज यांचा जिवंत देखावा, तसेच महिला आघाडीचे लेझिम पथक विशेष आकर्षण असेल. शिवकालीन देखाव्यांसह मर्दानी खेळांचीही प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. बारा बलुतेदारांसह ९० विविध समाजातील लोक या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. शिवप्रेमींनी सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाने केले आहे.

पत्रकार परिषदेला महासंघाच्या जिल्हा महिला अध्यक्षा शैलजा भोसले यांच्यासह शिवप्रसाद झगडे, कादर मलबारी, अवधूत पाटील, शशिकांत पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जयंती नाला स्वच्छतेसाठी यंत्रसामुग्री

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

महापालिकेच्यावतीने जयंती नाल्याची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. दर रविवारी होणाऱ्या मोहिमेमध्ये आमदार अमल महाडिक यांनी दोन पोकलॅन मशिन उपलब्ध करून दिली आहे. मोहीम सुरू असे पर्यंत यंत्रसामुग्री देण्यात येणार आहे.

आमदार महाडिक यांनी दिलेल्या पसिद्धी पत्रकामध्ये स्वच्छता मोहीम राबवल्याबद्दल आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांचे कौतुक करताना म्हटले आहे, 'नमामि पंचगंगा उपक्रमातंर्गत पंचगंगा नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहे. स्वच्छता मोहिमेसाठी आयुक्तांनी आवाहन केल्यानंतर दोन पोकलॅन मशिन उपलब्ध करून दिली आहे. पंचगंगा प्रदूषणास जयंती व गोमंती नाले कारणीभूत ठरत आहेत. या नाल्यांची स्वच्छता करुन प्रदूषण रोखण्यास घेतलेली भूमिका कौतुकास्पद आहे. नागरिकांनी नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी प्लास्टिक, निर्माल्य व प्रदूषणास कारणीभूत असणाऱ्या वस्तू नाला अथवा नदीमध्ये टाकू नये.' असे आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भूसंपादनाअभावी रखडली कामे

$
0
0

सांगली रस्त्याचे तीन वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरण करण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्याची उर्वरित कामे व सुरक्षेचे उपाय तातडीने होतील, असे वाटले होते. पण त्याकडे दुर्लक्षच होत आहे. या मार्गावरील अपघातांची ठिकाणे कमी होण्यापेक्षा अर्धवट कामामुळे त्यात वाढच झाली आहे. गेल्या काही वर्षात सातत्याने अपघात होतच आहेत. काही ठिकाणी तर गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेचा आढावा घेणारी मालिका...

लोगो : धोक्याचा महामार्ग

कोल्हापूर- सांगली महामार्ग बनला धोकादायक

कोल्हापूर टाइम्स टीम

अरुंद पूल, संरक्षक कठड्यांचा अभाव, अर्धवट राहिलेले रस्त्याचे काम, स्पीडब्रेकरचे गायब झालेले पांढरे पट्टे, दिशादर्शक व सूचनांच्या फलकांचा अभाव यांच्यामुळे वाहनांची प्रचंड वर्दळ असलेल्या कोल्हापूर-सांगली महामार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे. हातकणंगलेपर्यंतच्या रस्त्यावर सध्या पॅचवर्क सुरू असले तरी तेथील वाहतूक सुरक्षित ठेवण्यासाठीच्या उपाययोजनांची वाणवा आहे. सात वर्षांच्या कालावधीत उड्डाणपूल, बायपास रस्त्यासाठीचे भूसंपादन अशी या प्रकल्पातील महत्त्वाची कामे प्रलंबित आहेत. त्याबाबत लोकप्रतिनिधी व प्रशासन पातळीवरील उदासीनता कायम आहे.

मृत्यूचा सापळा बनलेला कोल्हापूर सांगली रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम २०१२ साली सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला दिले आहे. १९६ कोटी रुपयांचे काम करण्याबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला. त्यामुळे ४३ किलोमीटर अंतराच्या या रस्त्यावरील धोका कमी होण्याची आशा स्थानिक नागरिक तसेच वाहनधारकांमध्ये निर्माण झाली होती. त्यादृष्टीने कामाला सुरुवात झाली तरी वेळोवेळी आलेल्या अडथळ्यांमध्ये या कामाला गती आलेली दिसलीच नाही. त्यामुळे ठिकठिकाणी अर्धवट राहिलेल्या कामांमुळे हा रस्ता पूर्वीपेक्षाही धोकादायक बनला. टेंडरच्या मुदतीमध्ये कंपनीने काम पूर्ण केलेले नाही. दरम्यानच्या कालावधीत टोल घालवण्यासाठी हा रस्ता केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग करण्यात आला. त्याच दरम्यान हातकणंगले येथील पुलाचे काम थांबवण्यात आले. त्यामुळे रस्त्याच्या मध्यभागी काँक्रीट पिलर उभे करण्यात आले असून त्याच्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. बायपास रस्त्यावरही वाहनांची वर्दळ वाढलेली असली तरी तिथे स्पीडब्रेकरशिवाय फारशा सुविधा दिलेल्या नाहीत. त्यातून स्थानिक ग्रामस्थांना जीव मुठीत धरून रस्त्यावर ये जा करावी लागत आहे.

पुणे बेंगळुरू महामार्गापासून सांगलीच्या दिशेने सुरू होणारा हा रस्ता प्रशस्त वाटतो. त्याच्याशेजारील सेवामार्ग आहेत. टोलसाठी उभारण्यात आलेल्या केबिनपर्यंत पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी गटार केल्या आहेत. त्यावर काँक्रीटची झाकणे आहेत. पण अनेक ठिकाणी गटारी उघड्या असून त्याच्या सुरक्षेचे तकलादू उपाय केले आहेत. रात्री तिथे अंधार असल्याने वाहनधारकांबरोबरच पादचारीही गटारींमध्ये पडण्याचा धोका आहे. या टोल केबिनजवळ स्पीडब्रेकरचे पांढरे पट्टे पुसून गेले आहेत. त्यामुळे वेगाने येणाऱ्या वाहनधारकांकडून अचानक ब्रेक लावण्यामुळे छोटे अपघात होत आहेत. हेर्ले ते चोकाक या दरम्यानच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी रस्ता उखडला होता. तिथे पॅचवर्कचे काम केले आहे. चोकाकजवळ मोठ्या वळणावर पॅचवर्क केलेल्या ठिकाणी पांढरे पट्टे मारलेले नाहीत. त्यामुळे रात्री तिथे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.

स्पीडब्रेकरअभावी मृत्यूला निमंत्रण

माले येथे फाट्याजवळ असलेल्या पुलावर संरक्षक कठड्याची लांबी वाढवण्याची गरज आहे. यापूर्वी तिथे जीपचा मोठा अपघात झाला आहे. त्यानंतरही तिथे केवळ फलक लावण्याव्यतिरिक्त काही सुधारणा करण्यात आलेल्या नाहीत. रुकडी फाट्यावर नेहमी दुचाकी, चारचाकी व अवजड वाहनांची वर्दळ असते. पण तिथे मुख्य रस्त्यावर स्पीडब्रेकर नसल्याने अपघाताला आमंत्रण दिले जात आहे. तिथून पुढे गेल्यानंतर अतिग्रे गावाजवळील रस्त्याची रुंदी अगदीच कमी आहे. डांबरीकरणातून बाजूपट्ट्या करण्याची आवश्यकता असताना मुरुम टाकला गेला आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांना मोठा धोका आहे. इचलकरंजी फाट्यावर स्पीडब्रेकर, ब्लिंकरची नितांत आवश्यकता आहे. सायंकाळनंतर तर हा फाटा अपघाताचा सापळा बनतो. पॅचवर्कची कामे सुरू असली तरी दुभाजकावर लावण्यात आलेले लाइट कटर अनेक ठिकाणी मोडले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आनंददायी शाळा’योजनेंतर्गत ‘वीर कक्कया’ला मदत

जीपने दोन पर्यटकांना उडविले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गजबजलेल्या टेंबे रोडवर वन-वे तोडून भरधाव मार्शल जीपने पर्यटक महिलेसह दोघांना उडविले. त्यांना सुमारे पंधरा फूट फरफटत नेल्याने पूजा श्रीनिवास पोटे (वय २८), साईराज कैलास पोटे (२१, दोघे रा. वजप, ता. कर्जत, जि. रायगड) हे दोघे गंभीर जखमी झाले. या अपघातात एक मोपेड चालक महिलाही जखमी झाली असून त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी जीपची तोडफोड करुन चालक प्रदीप पाटील याला बेदम मारहाण केली. दरम्यान, पर्यटक कैलास पोटे यांनीच त्याला नागरिकांच्या तावडीतून सुटका करीत सीपीआरमध्ये दाखल केले. बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेने सुमारे अर्धा तास टेंबे रोडवर थरार सुरु राहिला. वाहतुकीची कोंडी झाल्याने तासभर वाहतूक विस्कळित झाली.

जुना राजवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास पोटे हे बुधवारी अंबाबाई दर्शनासाठी कुटुंबासह कोल्हापुरात आले होते. त्यांनी टेंबे रोडवर आपली कार पार्क केली होती. दर्शन घेऊन ते दुपारी जेवण करुन सिंधूदुर्गला जाण्यासाठी कारकडे येण्यासाठी निघाले. त्यांच्या कुटुंबातील आठ-दहाजण रस्त्याने चालत होते. यावेळी दिलबहार तालीम मंडळ चौकातून टेंब रोडवरुन मिरजकर तिकटीकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांची मोठी वर्दळ होती. दरम्यान, याचवेळी टेंबे रोडवर विरोधी दिशेने आलेली मार्शल जीप शिवाजी स्टेडियमकडे जात होती. ती भरधाव आल्याने वन-वे वरुन जाणाऱ्या वाहनधारकांची आणि पादचाऱ्यांची तारांबळ उडाली. समोरुन आलेली जीप पोटे कुटुंबियांच्या गराड्यात घुसली. यावेळी काहीजण बाजूला फेकले गेले. तर पूजा पोटे व साईराज पोटे जीपखाली सापडले. रस्त्यावरील नागरिक दोघेजण जीपखाली सापडल्याचे इशारा करुन जीपचालकाला सांगत होते. तरीही चालक प्रदीप पाटील याने त्या दोघांना पंधरा फूट फरफटत नेले. हा प्रकार सुरु असताना या मार्गावरुन जाणाऱ्या एका महिलेची मोपेड जीपखाली अडकली. त्यामुळे नागरिकांची मोठी पळापळ झाली. अखेर संतप्त झालेल्या दहा ते वीस नागरिकांनी ही जीप टेंबे रोडवरील शिवाजी स्टेडियमजवळ गाळ्याजवळ थांबविली. फरफटत नेलेल्या पूजा आणि साईराज यांना बाजूला केले. त्यांच्या डोक्याला, हाता-पायाला, पाठीला गंभीर दुखापत झाली होती. नागरिकांनी या दोघांना त्यांच्याच कारमधून सीपीआरमध्ये पाठविले. तसेच चालक पाटील याला बाहेर ओढून बेदम मारहाण केली. अखेर साईराज याचे वडील कैलास पोटे यांनी चालकाची नागरिकांच्या तावडीतून सुटका केली. त्याला आपल्याच कारमधून सीपीआरमध्ये नेले.

...

सोशल मिडीयावरुन घटना व्हायरल

अपघाताच्या ठिकाणाजवळून संभाजी बिग्रेडचे रुपेश पाटील जात होते. त्यांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यासह घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यावेळी घटनास्थळी जुना राजवाडा पोलिस दाखल झाले. ब्रेक फेल झाल्यामुळे की जाणीवपूर्वक अपघात केल्याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दक्षिण’ कोणाची जहागिरी नाही

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महापालिकेच्या प्रभागामध्ये आमदार फंडातून आलेला निधी खर्च करण्यासाठी प्रशासन 'ना हरकत प्रमाणपत्र' देत नाही. प्रशासन सत्तारुढ गटाच्या दबावात काम करत असल्याने शहरविकासाची कामे ठप्प झाली असल्याचा आरोप भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या महासभेत केला. 'दक्षिण' कोणाची जहागिरी नाही या आरोपामुळे सत्तारुढ व विरोधी गटांमध्ये शाब्दीक चकमक होऊन प्रचंड गदारोळ उडाला. गदारोळामध्येच कोरमअभावी सभा तहकूब करत असल्याचा निर्णय सभाध्यक्षा महापौर सरिता मोरे यांनी घेतला.

२७ मे रोजी तहकूब झालेली सभा बुध‌वारी बोलवण्यात आली. सभेची वेळ १२ वाजता असताना सभेला तब्बल दीड तास उशीर झाला. एक-एक नगरसेवक सभागृहात आल्याने कसबसा कोरम पूर्ण झाला. अभिनंदन व श्रद्धाजंलीच्या ठरावांचे वाचन झाल्यानंतर सभेला सुरुवात झाली. श्रमदानातून सुरू केलेल्या जयंती नाला स्वच्छता मोहिमेबाबत आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांचे अभिनंदन करण्यात आले. आयुक्तांनी अभिनंदनाचा स्वीकार करत पदाधिकारी आणि शहरवासियांनी दिलेल्या प्रतिसादामुळे मोहीम यशस्वी होत असून यापुढे कचरा निर्मूलनावर विशेष लक्ष देणार असल्याचे स्पष्ट केले.

भाजप गटनेते विजय सुर्यवंशी म्हणाले, ''स्वच्छ शहर सुंदर शहर' संकल्पना अंमलात आणण्यासाठी ड्रेनेजलाइनला सांडपाणी वाहून नेणाऱ्या पाइप जोडल्या पाहिजे. तसे अद्याप न झाल्याने सांडपाणी थेट नाल्याद्वारे नदीमध्ये मिसळून प्रदूषणात वाढ होत आहे. शहरातून वाहणाऱ्या दीड किमी जयंती नाल्याचा आर्किटेक्ट असोसिएशनने डीपीआर तयार केला असून त्याची अंमलबजावणी करावी.'

प्रश्नोत्तराला सुरुवात होण्यापूर्वीच नगरसेवक किरण नकाते यांनी आमदार अमल महाडिक यांनी आमदार फंडातून दिलेल्या निधीतून कामे सुरू करण्यासाठी प्रशासन 'ना हरकत प्रमाण' देत नसल्याचा आरोप केला. तसेच शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्याकडे खुलासा करण्याची मागणी केली. त्याला जयश्री चव्हाण, माधुरी लाड या काँग्रेसच्या नगरसेविकांनी जोरदार आक्षेप घेतला. प्रश्नोत्तराला सुरुवात होण्यापूर्वी आणि कोरम नसताना सभा सुरू कशी केली, असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला. कोरम असेल तर अजेंडा देण्याचीही मागणी केली. यावेळी अनेक सदस्य बोलत असल्याने संख्या कमी असूनही सभागृहात प्रचंड गोंधळ उडाला.

शहर अभियंता सरनोबत यांनी प्रभाग क्रमाक ७० मधील सदस्यांनी त्याबाबतचे पत्र दिल्याचे स्पष्ट केले. तर उपशहर अभियंता रमेश मस्कर म्हणाले, 'प्रस्तावित ठिकाणी अमृत योजनेतून ड्रेनेज व पाणीपुरवठा लाइनचे काम सुरू आहे. कराराप्रमाणे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित ठेकेदार रस्त्याचे काम करुन देणार आहे. परिणामी एकाच कामावर दोनवेळा निधी खर्च करता येत नाही,' असे स्पष्ट केले. सुर्यवंशी यांनी विकासकामात राजकारण करणे चुकीचे असल्याचे सांगितले. याचवेळी विलास वास्कर, सत्यजीत कदम, किरण शिराळे यांनी प्रशासनाच्या खुलाशावर जोरदार आक्षेप नोंदवला व सभागृह सोडले.

तौफिक मुल्लाणी यांनी राजलक्ष्मी प्रभागात ड्रेनेज व पाणीपुरवठा पाइपलाइनचे काम सुरू आहे. संबंधित नगरसेवकांची अडचण समजून घ्या. नागरिकांनी दोन्ही कामे पूर्ण झाल्यानंतर रस्ता करा, अशी मागणी केली असून यामध्ये राजकारणाचा संबंध येतोच कोठे,' अशी विचारणा केली. गोंधळातच आयुक्तांनी याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले. सभागृहात गोंधळ सुरू असतानाच उसस्थित असलेले तीन सदस्यही सभागृहाबाहेर पडले. त्यामुळे कोरम पूर्ण होऊ शकला नाही. परिणामी सभाध्यक्षांना सभा तहकूब करत असल्याचे जाहीर केले.

.........

चौकट

आयुक्तांकडून चौकशीचे आदेश

विकासकामांबाबत नगरसेवकांकडून अडवणूक होत असल्याचा आरोप सभागृहात झाल्यानंतर आयुक्तांनी त्याची तातडीने दखल घेतली. प्रशासन शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. परिणामी विकासकामाला आडकाठी विकासाला मारक असून या घटनेची तातडीने चौकशी करण्याचे आदेश देत चौकशी अधिकारी म्हणून अतिरिक्त आयुक्त पाटणकर यांची नियुक्ती करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

.............

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्राह्मण सभेच्यावतीने सावरकरांना अभिवादन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, ब्राह्मण सभा करवीर व सर्व ब्राह्मण संघटनांच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. बिनखांबी गणेश मंदिर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग येथील फलक पूजन अभय मुनीश्वर यांच्या हस्ते करण्यात आले.

उदय सांगवडेकर म्हणाले, 'नरेंद्र मोदी सरकार पूर्ण बहुमताने सत्तेवर आले असून, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदू राष्ट्राचे स्वप्न साकार होण्याची वेळ आली आहे.' यावेळी पांडुरंग यज्ञोपवीत, सुधीर सरदेसाई, केदार पारगावकर, संजय कुलकर्णी, केशव स्वामी, देवीदास सबनीस, ब्राह्मण सभेचे अध्यक्ष श्रीराम धर्माधिकारी, राम पुरोहित, सतीश कुलकर्णी, श्रीकांत लिमये, अवधूत गोरंबेकर, किशोर घाटगे, आदी उपस्थित होते. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष हेमंत आराध्ये यांनी प्रास्ताविक केले. शामराव जोशी यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरः 'ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणारच'

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'जर्मनीत नुकत्याच झालेल्या विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकासह ऑलिम्पिक स्पर्धेचे दार उघडण्यात यश आले. त्यामुळे अथक परिश्रम घेऊन ऑलिम्पिकमध्ये देशासाठी सुवर्णपदक मिळवणारच,' असा विश्वास आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबतने बुधवारी व्यक्त केला.

म्युनिच येथील विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेतील चमकदार कामगिरीनंतर राही पहिल्यांदाच कोल्हापुरात आपल्या घरी आली. सायंकाळी सव्वासहा वाजता तिचे आगमन होताच कुटुंबियांनी तिचे औक्षण करून पेढे भरवून स्वागत केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ती म्हणाली, 'ऑलिम्पिक स्पर्धेतील सहभाग निश्चित करण्यासाठी यापूर्वीही प्रयत्न केला होता. मात्र काही त्रुटी राहत असल्याने यश मिळत नव्हते. यावेळी नियोजनबध्द प्रयत्न केले. स्पर्धेआधीच २५ ते ३० दिवसआधी जर्मनमध्ये कोच मुख्नबयान डोर्जसुरेल यांच्यासह जाऊन राहिले. परिणामी तेथील हवामान, वातावरणाशी जुळवून घेता आले.

पूर्वीच्या स्पर्धेतील कमकुवत गोष्टी टाळता आल्या आणि ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरले. देशातर्फे नेमबाजी स्पर्धेत सहभागाचा कोटा मिळाला. ऑलिम्पिकच्या स्पर्धा प्रत्यक्षात सुरू होण्यास अजून वेळ आहे. त्यामुळे भरपूर सराव करता येणार आहे. कोच प्रचंड अनुभवी आहेत. त्यांनी ऑलिम्पिकची पदके मिळवली आहेत. त्यांच्या अनुभवाचा मला निश्चित फायदा होईल. ऑलिम्पिकसाठीचा माझ्यातील आत्मविश्वास वाढला आहे. त्या स्पर्धेतील सुवर्णपदक मिळवल्याचा क्षण माझ्यासाठी आणि देशासाठी आनंदाचा असेल. त्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.'

...........

चौकट

घरात आनंदी वातावरण

राहीच्या स्वागतासाठी घराच्या अंगणात रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. कुटुंबातील सर्व सदस्यांत अभिमान आणि आनंदाचे वातावरण दिसत होते. सायंकाळी सव्वा सहा वाजता घरी दाखल होताच अंगणातच तिचे औक्षण करण्यात आले. आजी वसुंधरा, आई प्रभा, काकी कुंदा, प्रभा, धनश्री यांनी तिचे औक्षण करून पेढे भरवले. वडील जीवन, भाऊ आदित्य यांच्यासह जवळचे नातेवाईक यावेळी उपस्थित होते. माजी खासदार राजू शेट्टी यांनी घरी जाऊन राहीचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


२०३ कोटींचे रस्ते होणार

$
0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे वाशी नाका ते कूर आणि अडकूर ते तिलारीनगरपर्यंतच्या रस्त्याचे काम नव्या हायब्रीड अॅन्युइटी मॉडेलमधून करण्यात येत आहेत. त्यासाठी २०३ कोटी खर्च करण्यात येणार आहेत. यामध्ये जितेंद्रसिंग अँड कंपनी ४० टक्के गुंतवणूक करणार आहे. कंपनीच्यावतीने दोन्ही रस्त्याचे काम करून दहा वर्षे देखभाल, दुरूस्ती आणि दोन्ही बाजूला रोपे लावून ती जगवण्यात येणार आहेत.

वाशी नाका ते कूर (ता. भुदरगड) हा ३६.७३ आणि चंदगड तालुक्यातील अडकूर ते तिलारीनगरपर्यंत ४०.९ किलोमीटर राज्यमार्गाची फेरबांधणी, रूंदीकरकरण करण्यात येत आहे. कांडगाव, देवाळे, हळदी, परिते, ठिकपुर्ली, बिद्री, मुदाळतिट्टा दरम्यानचा काही टप्पा सिमेंटने बांधण्यात येणार आहे. या भागात पाऊस जास्त असल्याने रस्त्यावरील डांबर धुऊन जाऊन खड्डे पडू नयेत, यासाठी तेथील काही अंतराचे काम सिमेंटने करण्यात येणार आहे.

सरकारच्या नव्या अॅन्युइटी मॉडेलमधून रस्त्याचे काम होत आहे. सर्व्हेचे काम होऊन रूंदीकरणात अडथळे ठरणारी झाडे तोडली जात आहेत. दोन्ही रस्त्याच्या बाजूची ६१६ झाडे तोडावी लागणार आहेत. याबदल्यात वाशी नाका ते कूरपर्यंत नव्याने ४ हजार ५८० तर अडकूर ते तिलारीनगरपर्यंत ४ हजार ९५० रोपे दोन्ही बाजूला नव्याने लावण्यात येणार आहेत. ही रोपे लावून दहा वर्षांपर्यंत देखभाल करणे, सांभाळणे आणि वाढवण्याची जबाबदारी गुंतवणूकदार जितेंद्रसिंग कंपनी पार पाडणार आहे. रस्त्याच्या दुरूस्तीची जबाबदारीही कंपनीकडेच असेल. दोन वर्षांत दोन्ही रस्ते पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानंतर कंपनीने गुंतवलेली ४० टक्के रक्कम सरकार टप्प्याटप्याने देणार आहे.

--

हायब्रीड अॅन्युइटी

म्हणजे काय ?

बीओटी आणि टोलच्या रस्त्यांना पर्याय म्हणून एकूण रस्त्याच्या कामासाठी लागणाऱ्या निधीपैकी ६० टक्के सरकार आणि ४० टक्के ठेकेदार विकसक कंपनीने गुंतवायचे. ती रक्कम सरकार पुढील काही वर्षे देणार अशा 'खासगी सार्वजनिक भागीदारी' पद्धतीने केल्या जाणाऱ्या या मॉडेलला हायब्रीड अॅन्युइटी असे म्हटले जाते. ७० किलोमीटरवरील सर्व मोठे राज्य मार्ग याच मॉडेलमधून करण्यात येणार आहे.

-- ---

एक किलोमीटरला

२ कोटी ६७ लाख

हायब्रीड अॅन्युइटी मॉडेलमधून होणाऱ्या ७७ किलोमीटरसाठी २०३ कोटी खर्च होणार आहे. ३३ फूट रूंद रस्ता होणार आहे. ज्या ठिकाणी कठीण खडक नाही त्या ठिकाणी रस्ता उकरून नव्याने केला जाईल. त्यासाठी एका किलोमीटरला २ कोटी ६७ लाख पैसे खर्च होणार आहे. या मॉडेलमधून होत असलेल्या रस्ते रूंदीकरणासाठी नव्याने जमीन संपादन करण्याची गरज नाही. सध्याच्या रस्त्याचे रुंदीकरण, आहे त्या ठिकाणी खोदून नव्याने भराव टाकणे, फेर मुरूम आणि डांबरीकरण करण्यात येणार आहे.

-- -- --

हायब्रीड अॅन्युइटी मॉडेलमधून जिल्ह्यातील दोन राज्य मार्ग केले जात आहेत. हे काम करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूची झाडे तोडावी लागणार आहेत. तोडलेल्या एका झाडाच्या बदल्यात पंधरा रोपे लावून ती जगवण्याची अट ठेकेदार विकसक कंपनीला घातली आहे. या नव्या मॉडेलमध्ये ठेकेदाराची गुंतवणूक असल्याने रस्ते दर्जेदार होतील.

तुषार बुरूड, प्रभारी, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम

- -- - --- --- --

२०३ कोटी

दोन रस्त्यांवर होणारा खर्च

७७

रस्ते किलोमीटर

३९

एकूण पूल बांधकाम

९५३०

नवी रोपे लावणार

------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शरद पवार घेणार पदाधिकाऱ्यांची झाडाझडती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीचे अपयश, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांचा पराभव, दिग्गज नेत्यांनी पक्षाला दिलेली सोडचिठ्ठी यामुळे राज्याच्या राजकारणात बॅकफूटवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची प्रमुख नेतेमंडळी शनिवारी विचारमंथन करणार आहेत. हक्काच्या लोकसभा मतदारसंघातही पक्षाच्या उमेदवाराचा दारुण पराभव नेत्यांच्या जिव्हारी लागला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत शनिवारी (१ जून) बैठक बोलावली आहे. लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्यामुळे पदाधिकाऱ्यांची झाडाझडती होणार असल्याचे वृत्त आहे.

पक्षाचे आजी-माजी खासदार, प्रदेश कार्यकारिणीवरील नेते, आजी-माजी आमदार, जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष, महापालिका स्तरावरील शहराध्यक्ष अशा प्रमुख नेतेमंडळींसोबत सद्य:स्थितीसह आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सल्लामसलत करणार आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि मित्रपक्षांची आघाडी झाल्यामुळे राज्यात आघाडीचे संख्याबळ २५ ते ३० पर्यंत पोहोचेल असा नेतेमंडळींचा कयास होता. राष्ट्रवादीसुद्धा खासदारांची दोनअंकी संख्या ओलांडेल असा विश्वास नेतेमंडळी बाळगून होते.

मात्र, राष्ट्रवादीला कोल्हापूर, माढा, नाशिक, हातकणंगले, बीड, मावळ मतदारसंघांत नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला. मागील सभागृहात कोल्हापूर आणि माढा या दोन्ही मतदारसंघांवर राष्ट्रवादीचे खासदार प्रतिनिधित्व करत होते. हातकणंगले मतदारसंघ मित्रपक्ष स्वाभिमानी संघटनेला सोडला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीत पक्षाला पराभव सहन करावा लागला. काही ठिकाणी पक्षांतर्गत कुरघोडी, पक्षाच्या उमेदवाराविरोधात नाराजी अशी कारणे सामोर आली आहेत. कोल्हापूर, माढा येथे पक्षातील काही जणांनी पक्षविरोधी काम केल्याचे निवडणुकीत पाहावयास मिळाले. या पार्श्वभूमीवर पवारांनी पक्षाच्या नेतेमंडळींची बैठक बोलावली आहे.

जिल्ह्याचा अहवाल अर्ध्यावर

प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला ३१ मेपर्यंत लोकसभा निवडणुकीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. तालुकाध्यक्ष, विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष, नगरपालिका कार्यक्षेत्र अध्यक्ष, राज्य कार्यकारिणीवरील सदस्य, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी निवडणुकीत पक्षाच्या कामगिरीचा अहवाल द्यावयाचा आहे. भुदरगड, राधानगरी, चंदगड, गडहिंग्लज, शिरोळ, कागल, करवीर, कोल्हापूर दक्षिण मतदारसंघांचा अहवाल तयार झाला आहे. यापैकी काही मतदारसंघांचा अहवाल पूर्ण झाला आहे, तर काही मतदारसंघांतील अहवालाला अंतिम स्वरूप द्यायचे आहे. हातकणंगले, शाहूवाडी, इचलकरंजी, पन्हाळा, आजरा येथील अहवाल अजून तयार झाला नाही. माजी खासदार धनंजय महाडिक यांनी पक्षाकडे केलेले दुर्लक्ष, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांना साथ न देणे, आणि लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्व दिले नसल्यामुळे पक्षाला पराभव पत्करावा लागला असे अहवालात नमूद केल्याचे वृत्त आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंबाबाई मंदिरात अद्ययावत ध्वनीव्यवस्था

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात अद्ययावत ध्वनीव्यवस्था बसविण्यात येणार आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने यासाठी दीड कोटींचा निधी मंजूर केला आहे. मंदिराच्या सुरक्षेसाठी उपयुक्त ठरणारी ही सुविधा लवकरच कार्यान्वित होणार आहे, अशी माहिती खासदार संभाजीराजे यांनी बुधवारी भवानी मंडप येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव उपस्थित होते.

खासदार संभजीराजे म्हणाले, 'देशातील अन्य मंदिरांप्रमाणे अंबाबाई मंदिरातही भाविकांना उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकारकडून मंदिरांसाठी मिळणा-या सुविधांबाबत चौकशी केली असता, सांस्कृतिक मंत्रालयाकडून निधी मिळत असल्याची माहिती मिळाली. अंबाबाई मंदिरासह पंढरपूरचे विठ्ठल मंदिर आणि तुळजापूरच्या भवानी मंदिरातील सुविधांसाठी तीन प्रस्ताव पाठवले होते. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने तातडीने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्याने सांस्कृतिक मंत्रालयाने दीड कोटी रुपये मंजूर केले आहेत. ही रक्कम देवस्थान समितीला प्राप्त झाली असून, यातून मंदिरासह परिसरात अद्ययावत ध्वनियंत्रण बसवली जाणार आहे.'

देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, 'पहिल्यांदाच केंद्र सरकारकडून अंबाबाई मंदिराच्या विकासासाठी निधी मिळाला आहे. यासाठी खासदार संभाजीराजे यांनी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. लवकरच टेंडर प्रकिया सुरू होणार आहे. या रकमेतून मंदिराच्या चारही दरवाजांसह मंदिरात अद्ययावत ध्वनियंत्रणा बसवली जाईल. याचा उपयोग सुरक्षेसह भाविकांना सूचना देणे, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी होणार आहे.'

अध्यक्ष जाधव म्हणाले, 'समितीतर्फे अन्नछत्र आणि भक्तनिवास सुरू केले जाणार आहे. पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी व्हिनस कॉर्नर, सरस्वती टॉकीज आणि बिंदू चौक येथे बहुमजली पार्किंग इमारतींचे बांधकाम केले जाणार आहे .तिन्ही इमारतींमध्ये ११ मजले पार्किंगसाठी मिळणार आहेत. यातून पार्किंगची समस्या सुटेल.

स्वच्छतेसाठी इंदौर दौरा

'मध्यप्रदेशातील इंदोर हे शहर सर्वाधिक स्वच्छ व सुंदर आहे. महापालिकेकडून सुरू असलेली स्वच्छता मोहीम अधिक प्रभावी करण्यासाठी आयुक्तांसह एका पथकाला इंदोर दौरा घडविण्याचे नियोजन आहे' असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले. इंदोरमधील स्वच्छतेचे उपक्रम आणि योजनांची माहिती घेऊन याचे अनुकरण कोल्हापुरातही केले जाणार आहे असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंकुर संमेलनात ‘अद्वितीय’ पुरस्कृत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंकुर साहित्य संघाचे ५७ वे दोनदिवसीय अखिल भारतीय अंकुर मराठी साहित्य संमेलन मुक्ताईनगर (जि. जळगाव) येथे ६ व ७ जून २०१९ रोजी आयोजित केले आहे. संमेलनात नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या कन्या ज्येष्ठ लेखिका जयश्री दानवे यांच्या 'अद्वितीय'(वादक-नर्तक) या पुस्तकाला पुरस्कृत करण्यात येणार आहे. पुस्तकात भारतीय वादक आणि नर्तक पंडित रविशंकर, बिरजू महाराज, उस्ताद झाकीर हुसेन, उस्ताद अमजद अली खाँ, रोहिणी भाटे, बिस्मिल्ला खाँ, पंडित हरिप्रसाद चौरसिया, आदी २८ कलाकारांची सांगीतिक ओळख आहे. संमेलनाचे उद्घाटन माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या हस्ते होणार असून, प्रसिद्ध गीतकार प्रवीण दवणे, कवी ज्ञानेश वाकुडकर, आदी उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘माध्यमिक’मधील बदलीवरून मतमतांतरे

$
0
0

जि.प.चा लोगो वापरावा...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागातील आठ कर्मचाऱ्यांच्या बदलीवरून मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल व सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांच्यात मतमतांतरे निर्माण झाली. याप्रश्नी अखेर मित्तल यांनी स्वत:च्या अधिकारात चार कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या.

माध्यमिक शिक्षण विभागाच्या गैर कामकाजावरून 'त्या' आठ कर्मचाऱ्यांवर कारवाईसाठी सदस्य आक्रमक आहेत. मंगळवारी झालेल्या स्थायी समिती सभेत, त्या कर्मचाऱ्यांची मुख्यालयाबाहेर बदली करण्याची ग्वाही प्रशासनाने दिली होती. जिल्हा परिषदेत बुधवारपासून समुपदेशनद्वारे बदल्यांच्या प्रक्रियेला बुधवारी सुरुवात झाली. यामध्ये माध्यमिक विभागाचा समावेश होता.

याप्रसंगी सामान्य प्रशासन विभागाने समुपदेशनद्वारे या कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्यास नवा वाद निर्माण होऊ शकेल. शिवाय एखाद्या कर्मचाऱ्याविषयी तक्रार असल्यास, त्याची चौकशी करुन विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव सादर करायचा असतो. त्यादरम्यान सीईओंनी विभागीय अध्यक्षांची बदलीसाठी पूर्वमान्यता घेणे आवश्यक असल्याची तरतूद असल्याचे निदर्शनास आणले.

त्यावर सीईओंनी त्या कर्मचाऱ्यांची अन्यत्र बदली करून चौकशी करता येते, असे सांगत 'माध्यमिक'च्या कर्मचाऱ्यांच्या बदलीचा निर्णय घेता येऊ शकतो, अशी सूचना केली. संबंधित कर्मचाऱ्यांच्या बदल्या कधी करायच्या यावरून मित्तल व आडसूळ यांच्यात मतमतांतरे निर्माण झाली. सीईओंनी त्यांच्या अधिकाराचा वापर करून चार कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या. उर्वरित चार कर्मचाऱ्यांच निर्णय अद्याप शिल्लक आहे.

०००

समुपदेशनद्वारे ७७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

पहिल्या दिवशी सामान्य प्रशासन, शिक्षण, ग्रामपंचायत आणि कृषी विभागातील वर्ग तीनमधील ७७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या. प्रशासकीय, विनंती व आपसी बदलीचा समावेश आहे. यानिमित्ताने जि.प.मधील समिती सभागृह गजबजले. सामान्य प्रशासन विभागातील कक्ष अधिकारी, अधीक्षक, वरिष्ठ सहायक, कनिष्ठ सहायक मिळून ५२ कर्मचाऱ्यांची बदली झाली. प्राथमिक शिक्षण विभागाकडील दोन विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत विभागाकडील १७ कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या. कृषी विभागातील सहा अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, समाजकल्याण समिती सभापती विशांत महापुरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे, जिल्हा कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत बदली प्रक्रिया पार पडली. गुरुवारी (ता.३०) आरोग्य, पशुसंवर्धन, वित्त व बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बळ लाभले, यश उंचावले

$
0
0

'मटा हेल्पलाइन'ने मिळाली नवऊर्जा, बारावी परीक्षेत लख्ख यश

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत दहावीच्या परीक्षेत चमकदार यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना दोन वर्षापूर्वी पुढील शिक्षणासाठी 'मटा हेल्पलाइन'चा आधार मिळाला. 'बळ द्या पंखांना'उपक्रमाद्वारे शिक्षणासाठी नवऊर्जा लाभलेल्या या विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत लख्ख यश मिळवलं आहे. 'मटा हेल्पलाइन'च्या माध्यमातून वाचकांनी केलेली मदत, दिलेली शाबासकीची थाप ही करिअरसाठी सदोदित प्रोत्साहित करणारी असल्याच्या भावना संबंधित विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.

................

वैद्यकीय क्षेत्रात करिअरचे स्वप्न

फुलेवाडी रिंगरोड, जिल्हा परिषद कॉलनी परिसरातील साक्षी अमर चव्हाण ही सामान्य कुटुंबातील मुलगी असून वडील रिक्षा व्यावसायिक आहेत. दहावीच्या परीक्षेत तिला ९२.८२ टक्के गुण मिळाले होते. 'मटा हेल्पलाइन'मुळे तिला शिक्षणासाठी आधार मिळाला. तिने, न्यू कॉलेजमधून अकरावी, बारावीचे शिक्षण घेतले. बारावीच्या परीक्षेत ८२ टक्के गुण मिळवले. तिला वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचे आहे. या अभ्यासक्रमासाठी आवश्यक प्रवेश परीक्षा दिली आहे. प्रवेश परीक्षेच्या निकालाच्या प्रतिक्षेत आहे. 'मटा हेल्पलाइन'हा शिक्षणासाठी पाठबळ देणारा उपक्रम आहे.

.......................

सौरभला व्हायचंय इंजिनीअर

सौरभ शशिकांत देवडकर हा एस. एम. लोहिया हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधून बारावी उत्तीर्ण झाला. मंगळवार पेठेत डाकवे गल्ली येथे भाड्याच्या घरात तो आई वडीलांसोबत राहतो. वडील ट्रक ड्रायव्हर तर आई गृहिणी आहे. घरची परिस्थिती बेताची आहे. दहावीच्या परीक्षेत त्याने ९५ टक्के गुण मिळवले होते. 'मटा हेल्पलाइन'मुळे पुढील शिक्षणाला योग्य दिशा मिळाल्याची कुटुंबीयांची भावना आहे. बारावीच्या परीक्षेत त्याला ८७ टक्के गुण मिळाले. पुढे त्याला इंजिनीअर व्हायचे आहे. शिक्षणाच्या महत्वाच्या टप्प्यावर आर्थिक आधार महत्वाचा ठरला.

.............

शेतकरी दाम्पत्याच्या मुलीला करायचेयं बीई

शुभांगी सुरेश शेटके ही गरीब कुटुंबातील विद्यार्थिनी आहे. आई आणि वडील दोघेही शेतीकाम करतात. शेटके कुटुंबीय चिकोडी तालुक्यातील हदनाळ येथील आहे. शुभांगीला दहावीच्या परीक्षेत ९५ टक्के गुण मिळाले होते. मुरगूड विद्यालयात तिने अकरावी, बारावीचे शिक्षण घेतले. बारावीच्या परीक्षेत तिला ७६ टक्के गुण मिळाले आहेत. आई, वडिलांना मदत करत ती शिक्षण घेत आहे. बारावीनंतर बीई अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा आहे. उच्च शिक्षण घेऊन करिअर करायचे स्वप्नं तिने उराशी बाळगले आहे.

.............................

एरोनॅटिकल इंजिनिअरींग अभ्यासक्रम शिकणार

करवीर तालुक्यातील आमशी येथील शितल कृष्णात पाटील या विद्यार्थिनीने विज्ञान शाखेतून ६७ टक्के गुण मिळवले आहेत. श्रीराम हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज कुडित्रे येथे अकरावी, बारावीचे शिक्षण घेतले. तिला एरोनॅटिकल इंजिनिअरींग अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू आहे. विमानासाठी पार्ट बनविणाऱ्या कंपनीत करिअर करायची इच्छा आहे. शितलचे आई, वडील दोघेही शेती करतात. 'मटा हेल्पलाइन'मुळे शिकण्याची नवी जिद्द निर्माण झाली. शिकण्यासाठी समाजाचा पाठिंबा ही भावना खूप प्रेरणादायी ठरते. शितलला दहावीच्या परीक्षेत ९० टक्के गुण मिळाले होते.

.....................................

वृत्तपत्र विक्रेत्याच्या मुलाचे यश

वडील वृत्तपत्र विक्रेते तर आई गृहिणी, घरची परिस्थिती तशी सामान्य. कुटुंबांचा गाडा ओढणाऱ्या वडिलांना मदत म्हणून तो ही सकाळी घरोघरी वृत्तपत्र टाकायचा. त्यानंतर कॉलेज आणि सायंकाळी अभ्यास करत शिवम संतोष चव्हाणने बारावीच्या परीक्षेत यश मिळवले. चव्हाण कुटुंबीय हे बुधवार पेठेत राहायला आहे. शिवमने, डी.डी. शिंदे सरकार कॉलेजमधून इंग्रजी माध्यमातून वाणिज्य शाखेतून बारावी उत्तीर्ण झाला आहे. बारावीत ६४ टक्के गुण मिळाले. वर्षभर खासगी शिकवणी लावली नाही. आई, वडिलांना हातभार लावत कष्टातून तो शिक्षण घेत आहे.

..................

सीए होण्यासाठी शिवराज प्रयत्नशील

शिवराज भरत कवठेकरने बारावीच्या परीक्षेत ८६.४० टक्के गुण मिळवले आहेत. विवेकानंद कॉलेजमधून तो उत्तीर्ण झाला आहे. त्याला सीए व्हायचे आहे. सीएच्या परीक्षेच्या तयारीसाठी खासगी संस्थेत प्रवेश घेतला आहे. शिवराजचे वडील रिक्षा व्यावसायिक आहेत. राजर्षी शाहू कॉलनी, कसबा बावडा येथे राहावयास आहेत. 'मटा हेल्पलाइन'मुळे अकरावी, बारावीच्या शिक्षणाची सोय झाली. सीए होण्यासाठी लाखमोलाची मदत मिळाली. त्या पाठबळावर निश्चितच ध्येय साध्य करु असा विश्वास शिवराजने व्यक्त केला. त्याला दहावीच्या परीक्षेत ९१ टक्के गुण मिळाले होते.

............

सोनालीचे स्वप्न इंजिनीअर व्हायचे

वडील गवंडीकाम करणारे आणि आई घरकाम, मात्र सोनाली शिवाजी भोसले या मुलीची शिकण्याची जिद्द मोठी आहे. बारावीच्या परीक्षेत तिला ६८ टक्के गुण मिळाले आहेत. शरद सायन्स अँड कॉमर्स कॉलेज यड्राव येथे तिने अकरावी, बारावीचे शिक्षण घेतले. भोसले कुटुंब हे हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील आहेत. सोनालीला इंजिनीअर व्हायचे आहे. दहावीला तिला ९३.४० टक्के गुण मिळाले होते. 'मटा हेल्पलाइन'मुळे शिक्षण घेणे सुलभ बनले. योग्य वेळी शिक्षणासाठी बळ मिळाल्याने शिकण्याचा हुरुप वाढला अशा भावना तिने व्यक्त केल्या.

............

सोहमने मिळवले डिप्लोमात विशेष प्राविण्य

सोहम मिलिंद चौगुले हा शुक्रवार पेठेत राहणारा विद्यार्थी, दहावीच्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळाले होते. वडील खासगी नोकरी करतात. सोहमने दहावीनंतर संजय घोडावत इन्स्टिट्यूट अतिग्रे येथे मेकॅनिकल डिप्लोमासाठी प्रवेश घेतला आहे. पहिल्या वर्षीच्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत त्याने विशेष प्राविण्य मिळवले आहे. 'मटा हेल्पलाइन'मुळे चांगल्या शैक्षणिक संस्थेत शिकण्याची संधी मिळाली. योग्य वेळी आर्थिक मदत मिळाली, त्यामुळे शिक्षणाला दिशा मिळाली. डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर एरोनॉटिकल इंजिनीअरिंग हा अभ्यासक्रम पूर्ण करणार आहे.

........................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तर लोकप्रतिनिधींना काळे झेंडे दाखवणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदीवरील पर्यायी शिवाजी पुलाचे काम जनरेट्यामुळे पूर्ण होत आहे. त्याचे उदघाटन सामान्य व्यक्तीच्या हस्तेच झाले पाहिजे. बळाचा वापर करून लोकप्रतिनिधींच्या हस्ते उदघाटनाचा कार्यक्रम झाल्यास काळे झेंडे दाखवू ,असा इशारा बुधवारी सर्व पक्षीय कृती समितीच्या शिष्टमंडळातर्फे देण्यात आला. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक भोसले यांच्या दालनात झालेल्या बैठकीत हा इशारा देण्यात आला.

नव्या पुलाचे उदघाटन कुणाच्या हस्ते करायचे, यावरून वाद निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर समितीच्या शिष्टमंडळाने भोसले यांची भेट घेऊन चर्चा केली. पुलाचे काम मार्गी लागावे, यासाठी समितीतर्फे आंदोलनाचा इशारा दिला. त्यावेळी लोकप्रतिनिधींनी हेटाळणी केली. तेच आता श्रेय घेण्यासाठी धडपत आहेत. त्यास आमचा विरोध आहे, असे समितीचे सदस्य अशोक पोवार यांनी स्पष्ट केले. समितीचे निमंत्रक आर. के. पोवार लोकप्रतिनिधींच्या बाजूने बोलण्याचा प्रयत्न करत होते, त्यावेळी शिष्टमंडळातील बहुतांशी सदस्य लोकप्रतिनिधींना विरोध करण्याच्या भूमिकेवर ठाम राहिले. यावेळी रमेश पोवार, संभाजीराव जगदाळे, बाबा पार्टे, किसनराव कल्याणकर, जयकुमार शिंदे आदी उपस्थित होते. दरम्यान, खासदार संभाजीराजे छत्रपती, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महानगरपालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, कार्यकारी अभियंता अशोक भोसले यांनी भेट देऊन कामाची पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हेल्पलाइन.... पान २ साठी

$
0
0

जिल्हा परिषद...

शिक्षण विभाग (प्राथमिक) : २६५०७८१

शिक्षण विभाग (माध्यमिक) : २५४०४६८

ग्रामपंचायत विभाग : २६६८२२९

जिल्हा आरोग्य अधिकारी : २६५२३२७

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी : २६५२३३१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरः 'उद्योगवाढीतून रोजगार निर्मिती करावी'

$
0
0

कोल्हापूरः

मुंबई-कोल्हापूर विमानसेवा नसल्यामुळे गेल्या काही वर्षात नव्या उद्योगांची निर्मिती झाली नाही. परिणामी जिल्ह्यातील रोजगाराचे प्रमाण कमी राहिले. सद्य:स्थितीत असलेले उद्योग मंदीमधून मार्गक्रमण करत आहेत. त्यांना उभारी देताना 'मेक इन इंडिया'च्या माध्यमातून नव्या उद्योगांची उभारणी करावी. प्रलंबित प्रकल्प मार्गी लावण्याबरोबरच आयटी इंडस्ट्रिला प्राधान्य द्यावे. तसेच आयआरबी कंपनीने बांधलेल्या रस्त्यांची डागडुजी करण्यासाठी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पातून विशेष तरतूद करुन निधी आणावा, अशी अपेक्षा माजी नगरसेवकांनी व्यक्त केली.

आयटी इंडस्ट्रीसाठी प्रयत्न व्हावेत

शहरासह जिल्ह्यातील युवा पिढी शिक्षणातून समृद्ध बनली आहे. अशा युवकांना स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण करण्यासाठी आयटी इंडस्ट्री सुरू होण्यासाठी प्रयत्न करावेत. माजी खासदारांनी रेल्वे, विमानसेवेसाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद करुन घेतली आहे. अर्थसंकल्पातील निधी मिळवून हे प्रकल्प मार्गी लावावेत. बास्केट ब्रिजचा प्रश्न सोडवताना विमानसेवा अधिक सक्षम करावी. तसेच मुलभूत सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न करावेत.- पल्लवी देसाई

नदी प्रदूषण रोखण्यासाठी निधी आणावा

शहरात अनेक प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. विशेषत: शहरवासियांच्या दृष्टीने काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजना पूर्ण होणे अत्यंत गरजेचे आहे. उद्योगवाढीसाठी विमानसेवा सक्षम करण्याची आवश्यकता आहे. पाणी प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत नसल्या, तरी आहे ते पाणी उच्च दर्जाचे राखण्याची गरज आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी केंद्रपातळीवरुन निधी आणावा. - प्रकाश पाटील

बास्केट ब्रीजसाठी प्रयत्न करावेत

गेल्या अनेक वर्षापासून कोकण रेल्वेची फक्त चर्चाच होत राहिली. कोल्हापूरची कोकणाशी कनेक्टिव्हीटी वाढवण्यासाठी हा प्रश्न तातडीने सोडवावा. त्याचबरोबर बास्केट ब्रीज होण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. माजी खासदारांनी प्रचारामध्ये आठ हजार कोटींचा निधी विविध प्रकल्पामध्ये मंजूर केला असल्याचे सांगितले आहे. मंजूर निधी आणून जिल्ह्यातील प्रलंबित प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. सरकार आणि खासदार युतीचे असल्याने निधीसाठी विशेष प्रयत्न करावेत. - सर्जेराव पाटील

पर्यटनाला अधिक चालना देण्याची गरज

अंबाबाई मंदिर किंवा जोतीबा दर्शन एवढ्यापुरते पर्यटन मर्यादित असू नये. शहरासह जिल्ह्यात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. त्यांचा विकास करुन पर्यटनाला अधिक चालना देवून रोजगार निर्मिती करावी. रस्ते विकास प्रकल्पातून आयआरबी कंपनीने रस्ते बांधणी केली. या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये खास तरतूद करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. जे प्रलंबित प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आंदोलने केली , मतदानावरही बहिष्कार घातला, असे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी ठोस उपाय योजले पाहिजेत. - निशीकांत मेथे

क्लस्टर योजना मार्गी लावावी

कोल्हापुरी चप्पलने खास ओळख निर्माण केली आहे. या उद्योगाला उभारी देण्यासाठी क्लस्टर योजना मार्गी लावली पाहिजे. औद्योगिक वसाहत स्थापन झाल्यापासून विकास झालेला नाही. परिणामी जिल्ह्यातील रोजगार निर्मिती ठप्प झाली आहे. त्याला चालना देण्यासाठी नवीन उद्योग निर्मितीसाठी 'मेक इन इंडिया'च्या माध्यमातून प्रयत्न झाला पाहिजे. त्यासाठी विमानसेवा गतिमान करण्याची आवश्यकता आहे. शहरातील वाहतूक समस्या दूर करण्यासाठी पार्किंग स्लॉट निर्माण करण्याची गरज आहे. - जयश्री सोनवणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जयंतीनिमित्त गौतम बुद्धांना अभिवादन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भगवान गौतम बुद्ध जयंती शनिवारी शहरात विविध कार्यक्रमांनी साजरी झाली. महापालिकेच्यावतीने गौतम बुद्धाच्या प्रतिमेस महापौर सरिता मोरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. धम्म ध्वजारोहन, त्रिशरण व पंचशील ग्रहण कार्यक्रमांचे ठिकठिकाणी आयोजन केले होते.

महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात गौतम बुद्धांच्या पुतळ्यास महापौर मोरे यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी उपायुक्त मंगेश शिंदे, प्रभारी जनसंपर्क अधिकारी विजय वणकुद्रे उपस्थित होते. बहुजन ऐक्य समितीच्यावतीने शिवाजी पेठ येथील प्रसाद गार्डन येथे फुले वाहण्यात आली. यावेळी अॅड. पंडितराव सडोलीकर, अक्षय साळवी, अमोल कांबळे, राज कुरणे, जगन्नाथ कुरणे, विक्रम कांबळे आदी उपस्थित होते.

जिल्हा बहुजन माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्थेच्यावतीने गौतम बुद्धांची जयंती उत्साहात साजरी केली. संस्थेचे अध्यक्ष रंगराव मांगोलीकर यांनी गौतम बुद्धांच्या मूर्तीचे पूजन केले. याप्रसंगी रघुनाथ मांडरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपाध्यक्षा कल्पना भोसले, संचालक प्रकाश पोवार, राहुल माणगांवकर, नंदकुमार कांबळे, रवींद्र मोरे, रामचंद्र गडकर आदी उपस्थित होते.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाच्यावतीने कुशिरे-पोहाळे येथील बौद्ध लेणी स्थळावर गौतम बुद्धांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रा. शहाजी कांबळे, संजय जिरगे, शिल्पेश कांबळे, सुरेश कुरणे, अंकित कांबळे, रुपेश कांबळे, सचिन कांबळे आदी उपस्थित होते.

कोल्हापूर बौध्द अवशेष व विचार संवर्धन समितीच्या वतीने मसाई पठार पांडवदरा येथे बुध्द जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी टी.एस. कांबळे होते. येथील बौध्द लेण्यांचे पर्यटन स्थळात रूपांतर करावे, त्याचे संवर्धन करावे अशी मागणी यावेळी पुरातत्व खात्याकडे करण्यात आली. यावेळी सर्जेराव थोरात, बापूसाहेब कांबळे, अजित कांबळे आदि उपस्थित होते. यावेळी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रवीण कांबळे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एलईडी स्ट्रीट लाइट बसवण्यास सुरुवात

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

राज्य सरकारच्यावतीने शहरात एलईडी स्ट्रीट लाइट बसवण्याची मोहीम हाती घेतली आहे. यानुसार रविवारी कावळा नाका ते शाहू नाका परिसरात स्ट्रीट लाइट कार्यन्वित करण्यात आली असून त्याचे उद्घाटन महापौर सरिता मोरे यांच्या हस्ते झाले. उद्घाटन समारंभास आमदार हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

विजेची बचत आणि पर्यावरण संवर्धनासाठी राज्य सरकारने सर्व शहरात एलईडी स्ट्रीट लाइट बसवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. सायंकाळी शिवाजी विद्यापीठ येथील केएसबीपी उद्यानाजवळ महापौर मोरे यांच्या हस्ते उद्घाटन केले.

शहरातील स्ट्रीट लाइटवर महापालिकेचे वर्षाला आठ कोटीचे बिल येते. अशा सर्व ठिकाणी एलईडी दिवे बसवण्यात येणार असल्याने विज बिलामध्ये चार कोटीची बजत होणार असल्याचा दावा महापालिका प्रशासनाच्यावतीने केला जात आहे. उद्घाटन समारंभास उपमहापौर भूपाल शेटे, स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, नगरसेवक प्रवीण केसरकर, संदीप कवाळे, संजय मोहिते, माजी नगरसेवक राजू साबळे, इंद्रजित बोंद्रे, अदिल फरास, विक्रम जरग आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात रविवारी महास्वच्छता मोहीम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जयंती नाला, रंकाळा तसेच शहराच्या प्रत्येक प्रभागात रविवारी (२ जून) महास्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याबाबत बुधवारी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन सूचना केल्या.

आयक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, 'शहरात स्वच्छता मोहीम राबविताना नागरिकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून सफाईबाबत सूचनाही प्राप्त होत आहेत. त्यांची मोहिमेदरम्यान अंमलबजावणी करण्यात यावी. आरोग्य विभागाने प्रतिदिन नाल्यातून काढलेला गाळ व कचऱ्याच्या नोंदी ठेवाव्यात. तसेच मोहिमेदिवशी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी सकाळी सात वाजता उपस्थित राहावे. प्रत्येक प्रभागातील खुल्या जागा डेव्हलप करणे, ग्रीन झोन ठिकाणी स्वच्छता करणे आणि वृक्षारोपणाचे नियोजन करावे. तसेच प्रभागातील नगरसेवकांनी सुचवलेल्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवा.'

यावेळी उपायुक्त मंगेश शिंदे, आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, सहायक संचालक नगररचना रामचंद्र महाजन, मुख्य आरोग्य निरिक्षक डॉ. विजय पाटील व सर्व नियंत्रण अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images