Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

बँक पथकासमोर कर्जदाराचा आत्महत्याचा प्रयत्न

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

कर्जाच्या वसुलीसाठी आलेल्या बँकेच्या पथकासमोरच सोमवारी कारखानदाराने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अनुप बाळासाहेब कावरे (वय ४८ रा. संग्राम चौक) असे त्याचे नाव आहे. या घटनेची शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

संग्राम चौकातील कारखानदार अनुप कावरे यांनी आदिनाथ सहकारी बँकेतून कर्ज घेतले आहे. त्यातून त्यांनी सहा अ‍ॅटोलूमही खरेदी केले होती. बँकेला कोणतीही कल्पना न देता त्यांनी लूमची परस्पर विक्री केली. त्यामुळे बँकेने त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढवत जिल्हाधिकाऱ्यांकडून कावरे यांचा बंगला ताब्यात घेण्याची मागणीही केली. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिस बंदोबस्तात जप्तीची कारवाई करण्याचे तहसीलदारांना आदेश दिले होते. सोमवारी जप्तीच्या कारवाईसाठी बँकेचे मॅनेजर निलेश बागणे यांच्यासह बँकेचे पथक कावरे यांच्या घरासमोर गेले होते. परंतु बंगल्याच्या मुख्य दरवाज्याला कुलूप असल्याचे पाहून अनुप कावरे यांना निरोप दिला असता त्यांच्याकडून काहीच प्रतिसा मिळाला नाही. कारवाईला विरोध करत त्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या घटनेने सर्वांचीच तारांबळ उडाली. प्रसंगावधान राखत उपस्थितांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


क्रिडा संकुलाच्या कामातराजकीय श्रेयवाद नको

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील विभागीय क्रीडा संकुलातील विकासकामांबाबत राजकीय श्रेयवाद घेण्याच्या प्रकाराला आळा घालावा, यासह विविध मागण्यांचे निवेदन बी वार्ड अन्याय निवारण कृती समितीच्या शिष्टमंडळातर्फे सोमवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी देसाई यांनी मागण्यासंबंधी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

निवेदनात म्हटले आहे, क्रीडा संकुलाचे छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल, संभाजीनगर असे रितसर नामकरण करावे, संकुलातील स्विमिंग पूल, फुटबॉल मैदान, टर्निंग ट्रॅक, बॅडमिंटन कोर्ट, बास्केटबॉल मैदानाची कामे अर्धवट आहेत. या कामांची सध्या दयनीय अवस्था आहे. ती अर्धवट कामे त्वरित पूर्ण करावीत, काही राजकीय मंडळी श्रेय घेण्यासाठी काम पूर्ण होण्याआधीच शिलालेख, भूमीपूजन असे कार्यक्रम घेत आहेत. क्रीडा विकासाकडे लक्ष न देता राजकीय फायद्यासाठी संकुलाचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केल्यास जनआंदोलन उभे केले जाईल.

यावेळी कृती समितीचे किसन कल्याणकर, जयकुमार शिंदे, रामेश्वर पत्की, राहुल चौधरी, धनाजी घोरपडे आदी उपस्थित होते.

.......

चौकट

निकृष्ट कामांची

चौकशी करा

क्रीडा संकुलातील अनेक कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. स्विमिंग पुलाला गळती लागली आहे. बाहेरच्या दूषित पाण्याचा शिरकाव होत आहे. यामुळे निकृष्ट कामांचीही चौकशी करावी, अशी मागणी किशोर घाटगे यांनी यावेळी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेट्टींचा पराभव करणारा कोण?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांचा पराभव करणारे खासदार कोण? हे पाहण्यासाठी दिल्लीतील सेंट्रल भवन आणि महाराष्ट्र सदनात महाराष्ट्रातील खासदारांमध्ये शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांच्याबद्दल उत्सुकता पहायला मिळाली.

दिल्लीमध्ये शेतकऱ्यांची नेते म्हणून खासदार शेट्टी यांची ओळख आहे. सलग दहा वर्षे खासदार असल्याने सर्वक्षीयांमध्ये शेट्टींनी आपली ओळख ठसवली होती. शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात देशभरातील शेतकरी नेत्यांची मोट बांधली होती. त्यामुळे लोकसभा व राज्यसभेतील खासदार, अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये शेट्टीची प्रसिद्धी होती. लोकसभा निवडणूकीत हातकणंगले मतदार संघात शेट्टी यांची हॅटट्रीक रोखण्यात शिवसेनेचे माने यांना यश आले. माने 'जायंट किलर' ठरल्याने दिल्लीत त्यांना पाहण्याबद्दल उत्सुकता होती.

एनडीएचा नेता निवडण्यासाठी दिल्लीतील बैठकीला शिवसेनेचे सर्व खासदार गेले होते. त्यांचा मुक्काम महाराष्ट्र सदनात होता. तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी माने यांची दखल घेतली. 'शेट्टींना पराभूत करणारे खासदार', अशी ओळख सर्वत्र सांगितली जात होती. सेंट्रल भवन येथे झालेल्या एनडीएच्या बैठकीतही माने यांना अनुभव आला. अनेकांनी शेट्टी यांचा पराभव करुन निवडून आल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

सेंट्रल भवनातील बैठकीपूर्वी भाजप शिवसेना खासदारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीत ठाकरे यांनी माने यांचे विशेष कौतुक केले. मुख्यमंत्र्यांनी तर अभिनंदन करताना 'धैर्यशील तुमची भाषणे यू ट्यूबवर पाहिलीत', असेही सांगितले. शेट्टींना पराभूत करणारा शिवसेनेचा खासदार अशी ओळख दिल्लीत करण्यात धैर्यशील माने पहिल्या टप्प्यात यशस्वी ठरले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संध्यामठ, तांबट कमान परिसरात स्वच्छता मोहीम

$
0
0

फोटो आहे.

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रंकाळा तलाव तांबट कमान व संध्यामठ परिसरात सोमवारी महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्यावतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. पाणी कमी झालेल्या भागातील सात डंपर गाळ आणि प्लास्टिक कचरा श्रमदानातून काढण्यात आला. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली. मंगळवारी (ता. २८) सकाळी रंकाळा परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे.

रविवारी झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये संध्यामठ परिसरात स्वच्छता केली. पाणी कमी झालेल्या भागात गाळ आणि कचरा निदर्शनास आल्यानंतर पुन्हा संध्यामठ व तांबट कमान परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. संध्यामठ ते ब्रिजपर्यंतचा गाळ जेसीबी मशिनच्या मदतीने काढण्यात आला. महापालिकेचे अनेक अधिकारी खोरे, टिकाव घेऊन गाळ काढत होते. आयुक्तांनी स्वत: टिकाव घेऊन गाळाची खोदाई केली. अन्य अधिकाऱ्यांनीही उत्स्फूर्तपणे सहभागी घेत स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. खण परिसरातील मंदिराशेजारी मानवी साखळी करुन कर्मचाऱ्यांनी रंकाळ्यातील गाळ बाहेर काढला. अवघ्या एक-दोन तासात सात डंपर गाळ आणि कचरा काढून टाकण्यात आला.

यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता रमेश मस्कर, परवाना अधिक्षक राम काटकर, असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट इंजिनीअरिंगचे अध्यक्ष अजय कोराणे, पारस ओसवाल, उदय गायकवाड यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. मंगळवारी होणाऱ्या स्वच्छता मोहिमेमध्ये समाजसेवी संस्था, तरुण मंडळे, बचतगट व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचगंगा नदीवरील पर्यायी पुलाबाबत बैठक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदीवरील पर्यायी पुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात पोहचले आहे. या महिनाअखेरीस काम पूर्ण होणार आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहर व जिल्हा सर्वपक्षीय नागरी कृती समितीतर्फे मंगळवारी (ता. २८) दुपारी चार वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत पर्यायी पुलाच्या कामाची सध्यस्थितीविषयी चर्चा होणार आहे.

राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून पुलाच्या उद्घाटनाच्या हालचाली सुरू आहेत. पुलाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. डांबरीकरणाचे काम सुरू आहे. पूल तयार झाल्यामुळे लवकरात लवकर तो वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे. या आठवड्यात पुलाचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कृती समितीने पुलाचे उद्घाटन सामान्य नागरिकाच्या हस्ते करावे, अशी भूमिका घेतली आहे. लोकप्रतिनिधी व नेते यांच्या हस्ते उद्घाटन होऊ नये, असे त्यांचे म्हणणे आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी मंगळवारी समितीची बैठक बोलावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आत्ता तुम्हाला नडणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा शाहूवाडी

'माझ्याबद्दल तुमच्या मनात नाराजी का? कुठे चुकलो असेल तर सांगा?, मला समजायला हवे. गेल्या दोन खेपेस खासदार म्हणून संसदेत निवडून जात असताना शाहूवाडी विभागातील लोकांनीच मला उच्चांकी मते दिली. जनतेचे हे ऋण मी कधीच विसरू शकत नाही,' अशी भावनिक साद घालतानाच 'आत्ता मला जे नडले त्यांना आगामी काळा स्वाभिमानी शेतकरी संघटना नडणार आहे,' अशा शब्दांत माजी खासदार राजू शेट्टी यांनी विरळे (ता. शाहूवाडी) येथे विरोधकांना इशारा दिला. येथील दीपकृष्ण ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. माजी आमदार डॉ. विनय कोरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

शेट्टी म्हणाले, 'मतदारसंघाची भौगोलिक रचना मोठी असल्याने वाढदिवस, लग्नसमारंभ, बारसे अशा घरगुती कार्यक्रमांना हजेरी लाऊ शकलो नाही, याचे शल्य असेल तर ते बाजूला ठेवा. ऊस आणि दूधदर हे शेतकऱ्यांचे जटील प्रश्न जिवाची पर्वा न करता संघर्षातून तडीस लावले. मतदारसंघातील अनेक गावांत शिफारशींशिवाय विकासनिधी दिला, मात्र त्याची उद्घाटने किंवा जाहिरातीच्या फंद्यात कधी पडलो नाही. कार्यकर्ते किंवा त्रयस्थानेच ही उद्घाटने केलीत. तुमचा खासदार राहिलो नसलो तरी शेतकऱ्यांसाठी 'स्वाभिमानी'चा लढा अखंडपणे चालू राहील. या निवडणुकीत आम्हाला नडले त्यांना आगामी काळात संघटना नडेल.'

डॉ. विनय कोरे म्हणाले, 'गावशिवार ते थेट संसद असा अभिमानास्पद राजकिय प्रवास करणाऱ्या राजू शेट्टींची अस्तित्वासाठी लढणाऱ्यांचा आधार अशी संपूर्ण देशभर ओळख आहे. चिंतन आणि संघर्ष ही त्यांची जमेची बाजू आहे. शाहूवाडी तालुका विकासाच्या बाबतीत अद्यापही दूरच आहे. परिसरातून वारणा नदी दुथडी भरून वाहत असताना तालुक्यात विकासाचे पर्व दिसत नाही. याउलट वारणा नदीमुळेच पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ हे तालुके विकासाच्या प्रक्रियेत आघाडीवर आलेत. अशावेळी शाहुवाडीच्या विकासातच का अडथळे येत आहेत, हेच समजत नाही.'

यावेळी कर्णसिंह गायकवाड, बांधकाम सभापती सर्जेराव पाटील-पेरिडकर, बाजार समिती सभापती बाबासाहेब लाड यांनीही मनोगत व्यक्त केले. पं. स. सदस्य अमरसिंह खोत, बबनराव पाटील, ऑलम्पिकवीर बंडा पाटील-रेठरेकर, मलकापूरचे उपनगराध्यक्ष दिलीप पाटील, केशव पाटील, अशोक पाटील, शिवाजी पाटील, जालिंदर लोहार तसेच कानसा-वारणा परिसरातील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. सरपंच कृष्णा पाटील यांनी आभार मानले.

विधानसभेला आमदार पाटील लक्ष्य

२००९ च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ज्यांना मैत्रीतून आधार देत यंत्रणा सांभाळली तेच महाशय यावेळी मला नडले आणि माझ्या विरोधात जातीचे विषारी राजकारण करून सूड उगवला. अशांना परिणामांची तमा न बाळगता आगामी काळात नेस्तनाभूत करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना नडेल, असा गर्भित इशारा यावेळी आमदार सत्यजित पाटील यांचा नामोल्लेख टाळून शेट्टींनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगारांच्या विरोधामुळे पथक परत

$
0
0

कोल्हापूर

मेनन आणि मेनन कामगार कर्मचारी संघटनेच्यावतीने ५३१ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. आंदोलनासाठी उभारण्यात आलेला मांडव काढण्यासाठी सोमवारी महापालिकेचे पथक आले. पण आंदोलकांनी केलेल्या विरोधामुळे पथकाला परत जावे लागले. महापालिकेच्या या कारवाईमुळे मनपाचे अधिकारी भांडवलदारांच्या सेवेत आहेत का, असा प्रश्न संघटनेचे अध्यक्ष अतुल दिघे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. पत्रकात म्हटले आहे, 'मेनन आणि मेनन व्यवस्थापनाविरोधात कामगारांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. ठिय्या आंदोलनासाठी संघटनेने मांडव मारण्यासाठी परवाना मागितला होता. पण याबाबत कोणताही निर्णय झालेला नसताना कंपनीने महापालिकेकडे तक्रार दाखल केल्यानंतर पथक एक जेसीबी व डंपरसह मांडव काढण्यासाठी आले. पण कामगारांसह स्थानिक कार्यकर्त्यांनी केलेले विरोधामुळे पथकाला परत जावे लागले.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एका प्रभागातील जागेची मागणी करणार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'महापालिकेच्या दोन प्रभागात होणाऱ्या पोटनिवडणुकीला काँग्रेस आघाडी एकत्रित सामोरी जाणार आहे. एकत्रित निवडणुकीला सामोरे जाताना राष्ट्रवादी काँग्रेसकडे सिद्धार्थ नगर किंवा पद्माराजे उद्यान प्रभागापैकी एका प्रभागाची मागणी करणार आहे,' अशी माहिती आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली.

आमदार पाटील म्हणाले, 'महापालिकेच्या सिद्धार्थ नगर व पद्माराजे उद्यान प्रभागाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. पोटनिवडणुकीला काँग्रेस आघाडी एकत्रित सामोरे जाणार आहे. दोन्ही प्रभागापैकी एका प्रभागामधून निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेस पक्ष इच्छूक आहे. त्याबाबतची माहिती आमदार हसन मुश्रीफ यांना देवून त्यांच्याकडे एका जागेची मागणी केली जाईल. स्थायी समितीमधील संख्याबळावर परिणाम होऊ नये, त्यासाठी सत्तारुढ गटाकडून प्रयत्न केले जातील.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मेन राजाराम’वर प्रशासक नेमणार

$
0
0

कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या मालकीच्या मेन राजाराम हायस्कूलचा दर्जा उंचावणे व पटसंख्या वाढीसाठी याठिकाणी प्रशासक नेमण्याचा निर्णय शिक्षण समितीने घेतला. तसेच या शाळेतील शिक्षकांच्या अन्यत्र बदली करण्याचेही ठरले. याशिवाय बोरबेट आणि कोते येथील आश्रमशाळा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चालविण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. राज्य सरकारने पटसंख्येअभावी बोरबेट आणि कोते येथील आश्रमशाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून या दोन्ही शाळा जिल्हा परिषदेमार्फत चालविण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. 'मेन राजाराम'वर प्रशासक नेमण्याची शिफारस प्रशासनाकडे करण्यात येणार आहे. शिवाय शैक्षणिक उपक्रमांची अंमलबजावणी, अध्यापनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या शिक्षकांची बदली करण्याचे ठरले. चर्चेत सदस्य विनय पाटील, भगवान पाटील, वंदना जाधव, स्मिता शेंडुरे, प्रा. अनिता चौगुले, मनीषा कुरणे, रसिका पाटील यांनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बागल पुरस्काराने नवी ऊर्जा

$
0
0

फोटो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'परिवर्तनवादी नेते, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी, समाजसुधारक माधवराव बागल यांचे कार्य व विचारांचे जतन, संवर्धन करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांच्या कार्याला धक्का पोहचेल असे कोणतेही कृत्य करणार नाही. त्यांच्या नावाच्या पुरस्काराने नवी ऊर्जा मिळाली आहे.', असे प्रतिपादन प्रा. आनंद मेणसे यांनी केले.

भाई माधवरावजी बागल विद्यापीठातर्फे दिल्या जाणाऱ्या 'भाई माधवराव पुरस्कार २०१९' स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. विद्यापीठाचे अध्यक्ष अॅड. अशोकराव साळोखे अध्यक्षस्थानी होते. शाहू स्मारक भवनात हा कार्यक्रम झाला. महानगरपालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते प्रा. मेणसे यांना हा पुरस्कार देण्यात आला.

प्रा. मेणसे म्हणाले, 'बागल पुरस्कार यापूर्वी अनेक दिग्गजांना मिळाला आहे. तो पुरस्कार मला मिळाल्याने समाजिक काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे. महात्मा गांधी कोल्हापुरला आल्यानंतर बागल त्यांना भेटले. त्यांच्याकडून माणूस केंद्रित चळवळीचा धडा घेतला. ते सातत्याने समाज परिवर्तनासाठी काम करत राहिले. कोल्हापूर जिल्ह्यावर राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कामगिरीचा प्रभाव आहे. यामुळे कोल्हापूरला स्वतंत्र राज्य मिळावे, अशी मागणी बागल यांनी राज्य पुनर्रचनेवेळी केली. शेतकरी, कामगारांचे राज्य होण्यासाठीची मागणी केली होती. त्यांची मागणी अनेकांना रूचली नाही. तरीही ते सातत्याने परिवर्तनवादी भूमिका मांडत राहिले. राज्य पुनर्रचनेवेळी बेळगावचा सामावेश कर्नाटकात करण्यात आला. त्यावेळी मराठी भाषिकांसाठी स्थापन झालेल्या समितीत बागल सक्रिय होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ते क्रियाशील राहिले. '

आयुक्त कलशेट्टी म्हणाले, 'माधवराव बागल, कणबरकर यांनी समाजाच्या जडणघडणीसाठी मोठे काम केले. त्यांच्या नावाचा पुरस्कार माझ्या हस्ते देण्यात आला, हे माझे भाग्य आहे.'

अॅड. साळोखे म्हणाले, 'सामाजिक परिवर्तनासाठी बागल विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. बागल कृतिशील सुधारक होते. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे कायम राहण्यासाठी पुरस्कार दिला जातो. यापुढील काळात विद्यापीठातर्फे प्रबोधनपर पुस्तके प्रकाशित करून त्यावर चर्चा घडवून आणली जाईल.'

विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. टी. एस. पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले. चंद्रकांत यादव यांनी स्वागत केले. कार्यक्रमास ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार, जितेंद्र कांबळे, रवी जाधव, संभाजीराव जगदाळे, अनिल घाडगे, मेघा पानसरे यांच्यासह बेळगावमधील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विवेकानंद’मध्ये मुलांचीतीनही शाखांत बाजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बारावी परीक्षेत यंदाही विवेकानंद कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. विद्यार्थ्यांनी विज्ञान, वाणिज्य आणि कला या तीनही शाखांमध्ये घवघवीत यश मिळवले. बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल कामगिरी करण्याची २७ वर्षांची परंपरा यंदाही कायम ठेवली.

बारावी विज्ञान ९६.५२ टक्के, वाणिज्य ९५.६७ टक्के तर कला शाखेचा निकाल ८१.९५ टक्के लागला. विज्ञान शाखेत तेजस संजय लिपारे (९३.८६५), यश तानाजी कुंडले (९३.२०), आदित्य धनंजय जांभुळीकर (९३.०८) गुणानुक्रमे आले. वाणिज्यमध्ये श्रुती लीलेश पटेल (९६ टक्के), दर्शनी संतोष तोडकर (९५.७०), आशीष प्रकाश ठक्कर (९३.५३) गुणानुक्रमे आले. कलाशाखेत क्रांती अनिल बेनाडे (९०.९२), गायत्री अनिल तावडे व कार्तिका अनिल माने (दोघीही ८६ टक्के), सायली अर्जुन पाटील (८५.६९) गुणानुक्रमे आले. विद्यार्थ्यांना विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिव प्राचार्या शुभांगी गावडे आणि प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर यांच्यासह अन्य शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

०००

'न्यू मॉडेल'चा निकाल ९७ टक्के

न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा निकाल ९७.१२ टक्के लागला. विज्ञान शाखेतील केदार संजय दळवीने ८४.४६ टक्के मिळवत कॉलेजमध्ये पहिला क्रमांक पटकावला. अर्मिता विनोद नाईक (८२), शेजल सुधीर शिंदे (८०.४६) यांनी गुणानुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. वाणिज्य शाखेत मानसी तरुण शहा (९१.३८), शालोम भूपाल माने (९०) तर दीक्षा नागेशकर (८९.३८) यांनी गुणानुक्रमे यश मिळविले.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरः ७२ व्या वर्षी दिली बारावीची परीक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

साठीनंतरचे आयुष्य म्हणजे निवृत्तीचे वय, मुले-नातंवडासोबत रमण्याचाचा हा कालावधी असा अनेकांचा समज असतो. मात्र लक्ष्मीपुरीतील बांधकाम क्षेत्रांशी निगडीत व्यावसायिक रविंद्र बापू देशिंगे यांनी ७२ व्या वर्षी बारावीची परीक्षा दिली. जवळपास पन्नास वर्षानंतर पुन्हा शिकताना त्यांनी बारावीच्या परीक्षेत तीन विषयात यश मिळवले. उर्वरित तीन विषयासाठी ते येत्या जुलै महिन्यात पुन्हा परीक्षा देणार आहेत.

या वयात शिकण्याच्या जिद्दीविषयी सांगताना देशिंगे म्हणाले, 'मुलीची मुलगी प्राची ही इंजिनीअर झाली. नात इंजिनीअरिंग करु शकते तर आपण पुन्हा का शिकू नये या विचाराने २०१७ मध्ये नाइट कॉलेज ऑफ आर्टस अँड कॉमर्समध्ये अकरावीसाठी प्रवेश घेतला. १९६३ मध्ये दहावीची परीक्षा दिली होती. १९६६ ते १९६८ या कालावधीत अॅटोमोबाइल डिप्लोमा केला. त्यानंतर व्यवसायात प्रवेश केला. जवळपास पन्नास वर्षांनी पुन्हा शिकताना रोज एक तास अभ्यास केला. बारावीची परीक्षा उत्तीर्ण होऊ हा विश्वास होता. मात्र तीन विषयात यश मिळवले, इतर विषयासाठी पुन्हा परीक्षा देणार आहे.' त्यांच्या या जिद्दीचे शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांनी कौतुक केले. त्यांना विभागीय कार्यालयात बोलावून प्रोत्साहित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हाधिकाऱ्यांशी आज चर्चा

$
0
0

कोल्हापूर

नर्सरी बागेत सुरू असलेल्या राजर्षी शाहू समाधी स्मारकाचे बांधकाम संरक्षण भिंतीवरुन बंद पाडण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासोबत बुधवारी (ता.२९) दुपारी चार वाजता राजर्षी शाहू महाराज भक्त समितीच्यावतीने चर्चा करण्यात येणार आहे. स्मारकाच्या भिंत उभारणीला काही लोक आडमुठे धोरण घे‌वून विरोध करत आहेत. राजर्षी शाहूंच्या इच्छेनुसार समाधीस्मारकाचे सुशोभीकरण होत असताना होणारा विरोध चुकीचा असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे समितीच्यावतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेची आज महासभा

$
0
0

कोल्हापूर: महापालिकेची १७ मे रोजी तहकूब झालेल्यी सभा बुधवारी (ता. २९) दुपारी १२ वाजता होणार आहे. अध्यक्षस्थानी महापौर सरिता मोरे असतील. तहकूब सभेमध्ये राजर्षी शाहू समाधीस्मारकाचे बंद पाडलेले बांधकाम, उपनगरातील पाणी प्रश्नावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेदरम्यान झालेल्या महासभेमध्ये कोणत्याही विषयावर ठोस निर्णय होऊ शकला नाही. अर्थसंकल्पातील तरतुदीवरुन भाजप व ताराराणी आघाडीने स्वतंत्रपणे सभात्याग केला होता. त्यामुळे अर्थसंकल्पातील विषय पुन्हा चर्चेला येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारावीत मुलीच हुशार...

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत परंपरेप्रमाणे यंदाही मुलींनी बाजी मारली. कोल्हापूर विभागाचा निकाल ८७.१२ टक्के इतका लागला आहे. यामध्ये विद्यार्थिनींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा १३.७५ टक्के अधिक आहे. तर विभागात कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वात जास्त ८८. १५ टक्के निकाल लागला आहे. सांगली जिल्ह्याचा ८६.५५ तर सातारा जिल्ह्याचा ८६.२६ टक्के निकाल लागला.

दरम्यान राज्याच्या निकालात गेली तीन वर्षे द्वितीय स्थानी असलेल्या कोल्हापूर विभागाची यंदा पाचव्या स्थानापर्यंत घसरण झाली. गेल्या वर्षी कोल्हापूर विभागाचा निकाल हा ९१ टक्के होता. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या निकालात ३.८८ टक्के इतकी घट झाली आहे. मंडळातर्फे मंगळवारी दुपारी एक वाजता ऑनलाइन निकाल जाहीर झाला. परीक्षेच्या कालावधीत ३३ विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केल्याचे निष्पण्ण झाले असून त्यांना एका परीक्षेला (जुलै-ऑगस्ट २०१९) बसण्यासाठी प्रतिबंध केला आहे.

'बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च दरम्यान घेतल्या होत्या. यामध्ये कोल्हापूर विभागातील ७९८ ज्युनिअर कॉलेजमधील १५७ परीक्षा केंद्रावर परीक्षा झाली होती. या परीक्षेला विभागातून १ लाख, २५ हजार, ५९३ इतक्या नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख, २५ हजार, ४३३ मुलांनी परीक्षा दिली होती. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या एक लाख ९ हजार, २७९ इतकी असल्याची माहिती मंडळाचे सचिव सुरेश आवारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विद्यार्थिनी हुशार

दरम्यान विभागात मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ७९.३९ टक्के तर मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९३.१४ टक्के आहे. परीक्षा दिलेल्या ७३ हजार ९०५ मुलांपैकी ५८ हजार ६७१ मुले उत्तीर्ण झाली आहेत. यंदा ५५ हजार १८६ मुलींनी परीक्षा दिली होती, त्यापैकी ५१ हजार ४०१ मुली यशस्वी झाल्या आहेत. गेल्या वर्षी मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलापेक्षा दहा टक्के जादा होते. त्यामध्ये वाढ होऊन मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण १३.७५ टक्क्यापर्यंत पोहचले. आकडेवारीवरुन बारावी परीक्षेतील उत्तीर्णतेच्या टक्क्यामध्ये मुलींचा वरचष्मा कायम राहिला. मुलींच्या उत्तीर्णतेच्या अधिक प्रमाणाचे विश्लेषण करताना सचिव आवारी यांनी, 'मुली या आज्ञाधारक व सिन्सीअर असतात. सातत्याने अभ्यासात मग्न असतात. यामुळे यश तुलनेने अधिक आढळते,' असा निष्कर्ष नोंदविला. पत्रकार परिषदेला विभागाचे सहसचिव टी. एल. मोळे, सातारा येथील उपशिक्षणाधिकारी शबनम मुजावर, लेखाधिकारी एस. एल. रेणके, वरिष्ठ अधीक्षक सुधीर हावळ, अरविंद पेंडूरकर, विद्याधर पाटील, बी. आर. स्वामी आदी उपस्थित होते.

नियमित विद्यार्थी निकाल

जिल्हा नोंदणी विद्यार्थी प्रविष्ठ विद्यार्थी उत्तीर्ण विद्यार्थी टक्केवारी

कोल्हापूर ५१७६६ ५१७१७ ४५५८८ ८८.१५

सांगली ३५५८६ ३५५१८ ३०७४० ८६.५५

सातारा ३८२४१ ३८१९८ ३२९५१ ८६.२६

एकूण १,२५,५९३ १,२५,४३३ १,०९,२७९ ८७.१२

१२ जूनला गुणपत्रिका मिळणार

विद्यार्थ्यांना बारावी परीक्षेच्या गुणपत्रिका व इतर साहित्याचे वाटप बारा जून रोजी होणार आहे. मंडळातर्फे त्यादिवशी ११ वाजता ज्युनिअर कॉलेजना गुणपत्रिका वाटप केल्या जातील. संबंधित कॉलेजनी त्याच दिवशी दुपारी तीन वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करावे, अशी मंडळाने सूचना केली. दरम्यान गुण पडताळणीसाठी बुधवार (ता.२९) ते सात जूनपर्यंत विभागीय मंडळाकडे अर्ज करता येणार आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार त्यांच्या उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत उपलब्ध करून दिली जाईल. तयासाठी विद्यार्थ्यांनी संबंधित कॉलेज अथवा मंडळाच्या वेबसाइटवर अर्ज करावयाचा आहे. उत्तरपत्रिकेच्या छायाकिंत प्रतीसाठी प्रतिविषय ४०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. अर्जदार विद्यार्थ्यास छायाकिंत प्रत घेऊन जाण्यासंदर्भात फोन आणि एसएमएसद्वारे कळविले जाईल.

पुनपर्रीक्षार्थीचा निकाल २१.६८ टक्के

कोल्हापूर विभागातील पुनपर्रीक्षार्थी विद्यार्थ्यांचा निकाल २१.६८ टक्के इतका लागला आहे. पुनपर्रीक्षार्थींसाठी ३६६७ इतक्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ३६५८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ७९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याची टक्केवारी २३.६४, सांगलीची टक्केवारी २१.८९ तर सातारा जिल्ह्यातील उत्तीर्णतेची टक्केवारी १९.१३ इतकी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘एसएम लोहिया’चा ९७.४३ टक्के निकाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

एसएम लोहिया ज्युनिअर कॉलेजचा विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेचा मिळून ९७.४३ टक्के निकाल लागला. विज्ञान शाखेचा ९८.४३ टक्के निकाल लागला असून, मधुरा अकोळकरने ९१.६९ टक्के गुणांसह कॉलेजमध्ये प्रथम क्रमाक मिळवला. सौरभ देवडकर (८६.९२) व ओंकार शिंदे (८३.८४) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमाक पटकावला. वाणिज्य शाखेमध्ये आरती कुंभारने ८३.३८ टक्के गुणांसह प्रथम, वैष्णवी वाळवेकर (८३.०७) व ओंकार पताडे (८२.३०) यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळवला. कलाशाखेत ७७.२३ टक्के गुणांसह ऋतुजा भोपळेने पहिला, तर योगशे गोटम (७३.८४) व आलिशा कोतेकर (७२.९२) यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमाक मिळवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंकाळाकाठी प्लास्टिकचा खच

$
0
0

फोटो आहे....

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गेल्या तीन दिवसांपासून महापालिकेच्या वतीने श्रमदानातून रंकाळा तलावाची स्वच्छता सुरू आहे. संध्यामठ, तांबट कमान व खण परिसरात पाणी कमी झालेल्या भागातील गाळ व कचरा काढला. तीन दिवस राबविलेल्या या मोहिमेमध्ये प्लास्टिक कचरा मोठ्याप्रमाणात आढळून आला. मंगळवारी तर क्रशर चौक व पक्षीनिरीक्षण केंद्राकडील बाजूचा तब्बल एक डंपर प्लास्टिक कचरा काढून टाकण्यात आला. रंकाळ्यात मोठ्याप्रमाणत प्लास्टिक कचरा पडत असल्याने प्रशासनासह पर्यावरणप्रेमींनी यावेळी नाराजी व्यक्त केली.

महापालिकेच्या वतीने पंचगंगा व रंकाळ्याचे प्रदूषण रोखण्यासाठी नदीमध्ये येणारे सांडपाणी रोखण्याबरोबरच रंकाळ्याचीही स्वच्छता करण्यात येत आहे. दर रविवारी राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेत जयंती व उपनाल्यामध्ये प्लास्टिक कचऱ्याचे ढीग काढण्यात आले. अशीच स्थिती रंकाळ्यामध्ये दिसून आली. ऐतिहासिक आणि शहरवासीयांची अस्मिता म्हणून रंकाळ्याचा उल्लेख केला जातो. पण या तलावाच्या संवर्धनाकडे सर्वच घटकांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच रंकाळ्यामध्ये मोठ्याप्रमाणात प्लास्टिक कचरा आढळून आला.

संध्यामठ, तांबट कमान येथे स्वच्छता केल्यानंतर तलावाच्या पूर्वेकडील क्रशर चौक, पक्षीनिरीक्षण केंद्राकडे सकाळी स्वच्छता मोहीम राबविली. शहरवासीयांसह महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मोहिमेत सहभाग घेतला. जेसीबी मशिनच्या सहाय्याने सहा डंपर गाळ व एक डंपर प्लास्टिक कचरा काढून टाकण्यात आला. रंकाळा टॉवर, शालिनी पॅलेस ते रंकाळा पदपथ उद्यानाकडील बाजूला खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले जातात. पण गेल्या काही दिवसांपासून संध्यामठपासून खणीकडील भागापर्यंत खाद्य पदार्थ्यांच्या स्टॉलची संख्या वाढू लागली आहे. त्याचाच परिणाम रंकाळ्याकाठी प्लास्टिक कचरा दिसू लागला आहे.

मोहिमेदरम्यान आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी तलावात टाकण्यात येत असलेल्या प्लास्टिक कचऱ्याबाबत नागराजी व्यक्त करून अशा घटकांवर कारवाई करण्याच्या सूचना केल्या. तसेच पदपथ उद्यानामध्ये सुरू असलेल्या कामाची पाहणी करून वृक्षारोपणाची माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

यावेळी सहायक आयुक्त संजय सरनाईक, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता रमेश मस्कर, पर्यावरण अभियंता समीर व्याघ्रांबरे, वर्कशॉपप्रमुख सचिन जाधव, आर्किटेक्ट इंजिनीअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे यांच्यासह रंकाळाप्रेमींनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.

००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्ल्स: जिल्हाधिकारी कार्यालयावर १० जूनला मोर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पर्ल्स गुंतवणूकदारांची रक्कम परत मिळण्यामध्ये निर्माण झालेले अडथळे दूर करावेत, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय गुंतवणूकदारांच्या मेळाव्यात झाला. १० जूनला सकाळी अकरा वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे. टाउन हॉल येथे मंगळवारी झालेल्या गुंतवणूकदारांच्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कॉम्रेड शंकरराव पुजारी होते.

सुप्रीम कोर्टाने देशातील सहा कोटी गुंतवणूकदारांची ६० कोटी रुपये रक्कम परत करा, असा आदेश दिला आहे; पण त्याची अंमलबजावणी भाजप सरकारने गेल्या तीन वर्षांपासून अद्याप केलेली नाही. 'सेबी'ने गुंतवणूकदारांची रक्कम परत देण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविले आहेत; पण अर्ज भरताना तांत्रिक अडचणी येत आहेत. अनेक गुंतवणूकदारांकडे पॅन कार्ड नाहीत. तसेच पर्ल्स कंपनीने २०१४ मध्ये गुंतवणुकीची मूळ कागदपत्रे जमा करून घेतली आहे. मूळ कागदपत्रे नसल्याने ऑनलाइन अर्ज स्वीकारले जात नाहीत, या अडचणींवर बैठकीत चर्चा झाली. पर्ल्स कंपनीने गुंतवणूकदारांची मूळ कागदपत्रे देण्यासाठी कार्यालय उघडावे, या मागणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. 'सेबी'कडे रक्कम परत मिळावी यासाठी व्यक्तिगत अर्ज दाखल केले आहेत. त्यांना त्वरित रक्कम मिळावी, अशी मागणीही करण्यात आली. बैठकीला नरेंद्र कांबळे, शंकरराव आमने, सुभाष जगदाळे यांनी मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झिप झॅप - चित्र

विद्यापीठ हायस्कूल अँड ज्युनि. कॉलेजचा ८५.१५ टक्के

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विद्यापीठ हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा ८५.१५ टक्के निकाल लागला. विज्ञान शाखेचा ९४.०२ टक्के निकाल लागला असून, किशोरी देसाई ७३.२३ टक्के गुणांसह कॉलेजमध्ये अव्वल ठरली. अनिकेत जाधव (७०) व रिकिता पाडकर (६९.२३) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. वाणिज्य शाखेचा ९८.८२ टक्के निकाल लागला. ऋतुजा मगदूमने ७७.३८ गुणांसह प्रथम, तर सायली लोखंडे (७६.६१) व अमृता सासने (७६.४६) यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमाक पटकावला. कलाशाखेत प्रतीक चिलेने ८२.७६ टक्क्यांसह कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. आतरी कोपार्डेकर (७८.७६) व अक्षता हिरेमठ (७५.५३) यांनी अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमाक मि‌ळवला.

००००

डी. डी. शिंदे सरकार कॉलेज

इंग्रजी माध्यमाच्या डी. डी. शिंदे सरकार कॉलेजचा बारावीचा निकाल ९८.९२ टक्के लागला. वाणिज्य शाखेचा ९९.४९ टक्के निकाल लागला. मुक्ता जैन (९०.४६), धनवंतरी खाडे (८८) व तिथिक्षा उपाध्ये (८६.९२) यांनी गुणानुक्रमे क्रमांक पटकावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>