Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कलिकतेनगरात २५० झाडे दत्तक

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

पावसाळा आला की झाडे लावायची, त्याचे फोटो काढून प्रसिद्धी करायची आणि वर्षभर त्या झाडाकडे फिरकायचे नाही. पुढच्या वर्षी त्याच खड्यांत पुन्हा झाड लावायचे, असे चित्र सार्वत्रिक आहे. त्याला छेद देण्याचे काम पुईखडी येथील कलिकतेनगरातील रहिवाशांनी केले आहे. त्यांनी गेल्यावर्षी जून महिन्यात लावलेली २५० झाडे दत्तक घेऊन जगवली. विशेष लक्ष देऊन ही झाडे ते वाढवत आहेत. यंदाही १०० झाडे लावून जगवण्याचे नियोजन केले आहे. अशाप्रकारे पूर्ण कलिकतेनगरच ऑक्सिजन पार्क करण्याचे नियोजन त्यांनी केले आहे.

कलिकतेनगर नव्याने वसत आहे. तेथे सध्या २० ते २५ घरे आहेत. तेथील रहिवाशी एकत्र येत 'वृक्ष लावा, पृथ्वी वाचवा' हे ब्रिद घेऊन ऑक्सिजन पार्क बहुउद्देशीय मंडळाची स्थापना केली. या मंडळातर्फे गेल्या पावसाळ्यात नगरात झाडे लावून जगवण्याचा संकल्प केला. त्यांना नगरसेवक शारंगधर देशमुख यांनी २५० झाडे उपलब्ध करून दिली. मंडळातर्फे ती झाडे नगरातील रस्त्याच्या बाजूने आणि खुल्या जागेत लावली. काही झाडांना गार्ड बसवले. झाडे जगवण्याची जबाबदारी मंडळातील पदाधिकारी आणि रहिवाशांनी उचलली.

प्रत्येक कुटुंबातील रहिवाशाने १० ते २० झाडे दत्तक घेतली आहेत. उन्हाळा सुरू झाल्यापासून त्यांना पाणी घातले जात आहे. झाडे मोठी होत आहेत. तीव्र उन्हातही ती झाडे हिरवीगार आहेत. करंजी, रानआवळा, आपट्याची झाडे असल्याने सावली पसरू लागली आहे. मंडळाचे अध्यक्ष बी. डी. कदम, उपाध्यक्ष ए. आर. पवार यांसह सहकाऱ्यांनी पुढाकार घेऊन ही झाडे वाढवली आहेत. वेळच्या वेळी खतांचा डोसही दिल्याने झाडांची वाढ झपाट्याने होत आहे.

गेल्यावर्षी लावलेली २५० झाडे जगवली आहेत. प्रत्येक झाडाच्या देखभालीची जबाबदारी रहिवशांनी स्वत:हून घेतली आहे. यावर्षी पुन्हा १०० झाडे लावण्याचे नियोजन आहे. संपूर्ण कलिकतेनगरच ऑक्सिजन पार्क व्हावे, असा प्रयत्न करणार आहे.

- ए. आर. पवार, उपाध्यक्ष, ऑक्सिजन पार्क बहुउद्देशिय मंडळ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पर्यटकांमुळे कोल्हापूर हाउसफुल्ल

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

मोठ्या संख्येने पर्यटक उन्हाळी सुट्ट्यांमध्ये पर्यटनासाठी कोल्हापूरला प्राधान्य देतात. सध्या शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या आहेत. शासकीय निमशासकीय कार्यालयांना शनिवार आणि रविवार अशी जोडून सुट्टी असल्याने राज्यभरातून आलेल्या पर्यटकांनी शहरात गर्दी केली. मात्र, मोठ्या संख्येने आलेल्या पर्यटकांना पायाभूत सुविधांसाठी झगडावे लागले. वाहनांसाठी पुरेशी पार्किंग व्यवस्था नसल्याने पर्यटकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.

शनिवारी बुद्ध जयंती व उन्हाळी सुट्टीमुळे अनेक पर्यटक दोन दिवसांचे नियोजन करून कोल्हापूरला आले होते. करवीरनिवासिनी अंबाबाईचे दर्शन, रंकाळा, न्यू पॅलेस, ज्योतिबा, पन्हाळा आणि पुढे कोकण गोव्याला जाण्याचा बेत अनेक पर्यटकांनी केला होता. शनिवारी दिवसभरात अंबाबाई मंदिरामध्ये भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. शहरातील विविध हॉटेल्स, धर्मशाळा, यात्री निवास हाउसफुल झाल्याचे चित्र होते. कोल्हापुरी चप्पल खरेदीसाठी चप्पल लाइन व इतर साहित्य खरेदीसाठी महाद्वार रोड, ताराबाई रोड, जोतिबा रोड परिसरात गर्दी केली. अनेक पर्यटक कुटुंबांसह अंबाबाई दर्शनासाठी आल्याने भवानी मंडप परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.

सुट्टीच्या पार्श्वभूमीवर आलेल्या भाविकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने दर्शन मंडप उभे केले आहेत. तब्बल दीड लाखांहून अधिक पर्यटकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. उन्हाचा चटका असल्याने पर्यटकांनी दुपारनंतर अंबाबाई दर्शनास प्राधान्य दिले. कॉमर्स कॉलेज चौक, देवल क्लब मार्ग व शाहू टॉकीज याठिकाणी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. अधिक संख्येने पर्यटक आल्याने ताराराणी चौक, व्हीनस कॉर्नर, दसरा चौक, बिंदू चौक, रंकाळा परिसर, ताराबाई रोड, भाऊसिंगजी रोड, छत्रपती शिवाजी चौक, लक्ष्मीपुरी आदी भागात मिळेल त्या ठिकाणी पर्यटकांनी गाड्या पार्क करण्यास प्राधान्य दिले. पार्किंगचे योग्य नियोजन नसल्यामुळे वाहतूक कोंडीचे चित्र पाहायला मिळाले. वाहतूक सुरळीत करताना पोलिसांची दमछाक झाली. वाहतूक व्यवस्था सुरळीत पार पाडण्यासाठी शहर वाहतूक शाखेकडून एक सहाय्यक पोलिस निरीक्षक व दोन पोलिस उपनिरीक्षक यांसह इतर कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

पायाभूत सुविधांची वानवा

दरवर्षी कोल्हापूरला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. मात्र, त्या प्रमाणात पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याने पर्यटकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येते. सुरक्षित पार्किंग, सवलतीच्या दरात हॉटेल्स व इतर सुविधा, बस व तत्सम व्यवस्थेची गरज आहे. धार्मिक पर्यटनासह जिल्ह्यातील निसर्ग, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संपन्नता पाहता पर्यटन विकासासाठी जोरकस प्रयत्न होताना दिसत नाहीत. याकामी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने पुढाकार घेण्याची मागणी होत आहे.

दरवर्षी उन्हाळी सुट्टीमध्ये आम्ही अंबाबाईच्या दर्शनासाठी आवर्जून येतो. कोल्हापूरचा सांस्कृतिक, ऐतिहासिक व कलेचा वारसा आम्हाला इकडे खेचून आणतो. मात्र बाहेरून येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्याने पार्किंगची समस्या वारंवार जाणवते. शिस्तबद्ध पार्किंगसाठी प्रशासनाने नियोजन करावे. तसेच चांगल्या निवासाची सोय करण्यासाठी पुढाकार घ्यावा.

- नितीन बिनेकर, नागपूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीएसटी दर ठरवण्याची आज अंतिम मुदत

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

जीएसटी परिषदेने बांधकाम व्यवसायासाठी आणलेल्या नवीन जीएसटी दर रचनेमध्ये बिल्डर्स, प्रमोटर्सना जीएसटी दरांबाबत निर्णय घेण्याची सोमवारपर्यंत (ता. २० मे) अंतिम मुदत आहे. परिषदेने १ एप्रिल रोजी चालू असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांना नवीन जीएसटी दर १ टक्का/५ टक्के किंवा जुना दर ८ टक्के/१२ टक्के यांपैकी एकाचा पर्याय स्वीकारण्यास बिल्डर्सना सूचना केली आहे. मात्र, जुन्या दराचा पर्याय स्वीकारणारेच बिल्डर इनपुट क्रेडिट टॅक्‍स घेण्यासाठी पात्र ठरणार आहेत. नवीन एक टक्का/पाच टक्क्यांचा पर्याय घेतलेल्यांना नवीन नियमांमुळे जीएसटीचा सेटऑफ मिळू शकणार नाही.

जीएसटी परिषदेने बांधकाम क्षेत्रासाठी सुरुवातीस सर्व प्रकारच्या गृहनिर्माण प्रकल्पांना बारा टक्के जीएसटी लागू केला होता. तो नंतर परवडणाऱ्या घरांसाठी ८ टक्के केला. आता एक एप्रिलपासून परवडणाऱ्या घरांच्या व्याख्येत बदल केला असून सहा महानगरांत घराचे चटई क्षेत्र ६० चौरस मीटरच्या आत व इतर ठिकाणी चटई क्षेत्र ९० चौरस मीटरच्या आत व एकूण किंमत ४५ लाख रुपयांच्या आत असलेल्या घरांचा यात समावेश करण्यात आला आहे.

परवडणाऱ्या घरांसाठी एक टक्‍का तसेच इतर रहिवासी वापर व १५ टक्क्यांपेक्षा कमी वाणिज्यिक क्षेत्र असलेल्या निवासी संकुलातील वाणिज्यिक क्षेत्रासाठी पाच टक्के जीएसटी लागू केला आहे. या नव्या कर रचनेमध्ये घरांसाठी एक टक्का/पाच टक्के जीएसटी आकारला असला तरी या व्यवसायासाठी लागणारे एकूण खरेदीतील ८० टक्के खरेदी ही जीएसटी नोंदणीकृत पुरवठादाराकडून घेणे अनिवार्य आहे. एक एप्रिलपासून प्रभावी नवीन अधिसूचनेचा लाभ घेणाऱ्या बिल्डरांना कर रक्कम रोख भरावी लागणार आहे. ही नवीन कर रचना निवडणाऱ्या बिल्डरांना त्यांच्या आवक पुरवठ्यावर भरलेल्या जीएसटीचा परतावा मिळणार नाही. ज्यांना परतावा हवा त्यांना जुनीच आठ टक्के आणि बारा टक्के कराची दर प्रणाली स्वीकारावी लागणार आहे. मात्र, हा पर्याय सध्या सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांसाठी आहे.

नव्या प्रकल्पांना एकच पर्याय

मात्र १ एप्रिलनंतर सुरू होणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांना नवीन जीएसटी दर एक टक्का /पाच टक्के हा एकमेव पर्याय असून बिल्डरांना कर रक्कम रोख भरावी लागणार आहे. त्यांना आवक पुरवठ्यावर भरलेल्या जीएसटीचा परतावा मिळणार नाही.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार....

- चालू निवासी प्रकल्पांमध्ये बांधकाम व्यावसायिकाने ग्राहकांना दिलेल्या सदनिकेची किंमत सर्व करासहित असल्यास, नवीन योजना बिल्डर्ससाठी फायदेशीर ठरू शकते. तथापि, जर ग्राहकांना जर वेगळा कर आकारला असेल तर मात्र जुनी योजना अधिक चांगली असू शकते.

- जर प्रकल्प जवळजवळ ८०-९० टक्के पूर्ण झाला असेल, तर जुन्या योजनेंतर्गत जीएसटी देयता बांधकाम व्यावसायिकांसाठी फायदेशीर ठरेल. कारण या बाबतीत बहुतेक इनपुट किंवा इनपुट सेवा विकत घेतल्या असतात आणि अशा खरेदीवर क्रेडिट मिळविण्यात आले असते. तथापि, जर प्रकल्प निर्माणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात असेल तर तेथे इनपुट किंवा इनपुट सेवांचा मोठा भाग उपलब्ध नसतो. तेव्हा बांधकाम व्यावसायिकास नवीन योजनेची निवड करणे फायदेशीर ठरेल.

- प्रकल्प मोक्याच्या ठिकाणी असल्यास त्यात जमीनमूल्य जास्त असते व बांधकाम खर्च कमी असतो. संबंधित क्रेडिट पुरेसे असत नाही. त्यामुळे नवीन योजनेसाठी जाणे फायदेशीर असू शकते.

- पूर्तता प्रमाणपत्र प्राप्त होण्यापूर्वी अपेक्षित फ्लॅट्स विक्री करणे शक्य नसल्यास नवीन योजना निवडली जाऊ शकते. याचे कारण असे आहे की, जुन्या योजनेतही, न विकलेल्या फ्लॅट्ससाठी घेतले जाणारे क्रेडिट परत देणे आवश्यक असते.

- ग्राहकांसाठी, मात्र सदनिकांचे दर न वाढवून कराचे दर कमी होत असल्यास नवीन योजना बूस्टर असल्याचे दिसते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑर्गेनिक वेस्ट, सांडपाण्यावर निर्बंध आणा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'शहर परिसरात स्वच्छता मोहीम राबताना प्लास्टिकचा बेसुमार वापर आणि मोठ्या प्रमाणात सांडपाणी निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुसार कमीतकमी पाण्याचा वापर करुन सांडपाण्यावर निर्बंध आणा आणि ऑर्गेनिक वेस्ट व्यवस्थापनचा वापर करा,' असे आवाहन महापालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले. हॉटेल ऍट्रिया येथे झालेल्या हॉटेल मालक संघाच्या बैठकीत ते बोलत होते. संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

महापालिकेच्यावतीने शहरात स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी हॉटेल मालक संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी बोलताना आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, 'शहरातील कचऱ्याची समस्या कमी करण्यासाठी प्लास्टिकबंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्याबरोबरच ऑर्गेनिक वेस्टचे व्यवस्थापन करण्याची गरज आहे. शहरात दैनंदिन ९५ एमएलडी सांडपाणी निर्माण होते. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेला मोठ्याप्रमाणात खर्च करावा लागतो. हा खर्च कमी करण्यासाठी दहा एमएलडी सांडपाणी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून त्यासाठी हॉटेल व्यावसायिकांनी कमीतकमी पाण्याचा वापर करावा.'

यावेळी पर्यावरणवादी कार्यकर्ते उदय गायकवाड व 'निसर्गमित्र' चे अनिल चौगले यांनी मार्गदर्शन केले. बैठकीस आरोग्यधिकारी दिलीप पाटील, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, हॉटेल मालक संघाचे सिद्धार्थ लाटकर, शंतनू पै, शेखर काळे, श्रीकांत पुरेकर, राजू माळकर, नकुल पाटणकर, अरुण भोसले, ऊमेश राऊत, अरुण भोसले व आरोग्य निरीक्षक उपस्थित होते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जयंतीनिमित्त गौतम बुद्धांना अभिवादन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भगवान गौतम बुद्ध जयंती शनिवारी शहरात विविध कार्यक्रमांनी साजरी झाली. महापालिकेच्यावतीने गौतम बुद्धाच्या प्रतिमेस महापौर सरिता मोरे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. धम्म ध्वजारोहन, त्रिशरण व पंचशील ग्रहण कार्यक्रमांचे ठिकठिकाणी आयोजन केले होते.

महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात गौतम बुद्धांच्या पुतळ्यास महापौर मोरे यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी उपायुक्त मंगेश शिंदे, प्रभारी जनसंपर्क अधिकारी विजय वणकुद्रे उपस्थित होते. बहुजन ऐक्य समितीच्यावतीने शिवाजी पेठ येथील प्रसाद गार्डन येथे फुले वाहण्यात आली. यावेळी अॅड. पंडितराव सडोलीकर, अक्षय साळवी, अमोल कांबळे, राज कुरणे, जगन्नाथ कुरणे, विक्रम कांबळे आदी उपस्थित होते.

जिल्हा बहुजन माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्थेच्यावतीने गौतम बुद्धांची जयंती उत्साहात साजरी केली. संस्थेचे अध्यक्ष रंगराव मांगोलीकर यांनी गौतम बुद्धांच्या मूर्तीचे पूजन केले. याप्रसंगी रघुनाथ मांडरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपाध्यक्षा कल्पना भोसले, संचालक प्रकाश पोवार, राहुल माणगांवकर, नंदकुमार कांबळे, रवींद्र मोरे, रामचंद्र गडकर आदी उपस्थित होते.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाच्यावतीने कुशिरे-पोहाळे येथील बौद्ध लेणी स्थळावर गौतम बुद्धांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रा. शहाजी कांबळे, संजय जिरगे, शिल्पेश कांबळे, सुरेश कुरणे, अंकित कांबळे, रुपेश कांबळे, सचिन कांबळे आदी उपस्थित होते.

कोल्हापूर बौध्द अवशेष व विचार संवर्धन समितीच्या वतीने मसाई पठार पांडवदरा येथे बुध्द जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी टी.एस. कांबळे होते. येथील बौध्द लेण्यांचे पर्यटन स्थळात रूपांतर करावे, त्याचे संवर्धन करावे अशी मागणी यावेळी पुरातत्व खात्याकडे करण्यात आली. यावेळी सर्जेराव थोरात, बापूसाहेब कांबळे, अजित कांबळे आदि उपस्थित होते. यावेळी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रवीण कांबळे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छतेचा ‘संकल्प’

$
0
0

कोल्हापूर

संकल्प फाउंडेशनच्यावतीने जयंती नाला येथे शनिवारी स्वच्छता मोहीम राबवली. महापालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केलेल्या आवाहनानुसार फाउंडेशनच्यावतीने स्वच्छता करण्यात आली. खानविलकर पेट्रोल पंपाजवळ सकाळी सात ते ११ पर्यंत स्वच्छता करण्यात आली. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष अक्षय शेळके, सुशांत चव्हाण, यश शिर्के, सागर तांबे, प्रशांत मंडलिक, आशिष माने, पार्थ मुंडे, आशुतोष मगरे, अक्षय जाधव, संकेत जोशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाल्यातील गाळ सरवळीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्यावतीने गेल्या तीन आठवड्यांपासून नाल्यांतील गाळ काढण्याची मोहीम सुरू आहे. नाल्यांतून काढलेला गाळ कसबा बावड्यातील राजाराम साखर कारखाना येथील सरवळीमध्ये टाकण्यात येणार होता. मात्र, गाळ ओला असल्याने उचल करण्यात अडचणी येत असल्याने जयंती नाला व उपनाल्यातून काढलेला गाळ सुकल्यानंतर उचल केला जाणार आहे. पात्रालगत टाकण्यात आलेला गाळ पुन्हा नाल्यात येणार नाही, याची प्रशासनाला खबरदारी घ्यावी लागेल.

पंचगंगा नदीमध्ये थेट सांडपाणी मिसळून होणारे पाणी प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने रविवारपासून (ता. ५) गाळ काढण्यास सरुवात केली आहे. महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेला श्रमदानाची जोड मिळत आहे. परिणामी जयंती नाला व उपनाल्यातून आतापर्यंत सुमारे १७० डंपर गाळ व कचरा काढला आहे. पोकलॅन व जेसीबी मशिनरीच्या सहायाने काढलेला गाळ नाल्याच्या पात्रालगत टाकला आहे. हा गाळ राजाराम साखर कारखाना येथील सरवळ येथे डंपरमधून टाकण्यास सुरुवात झाली. मात्र, काढलेला गाळ ओला असल्याने डंपरमधून वाहतूक करताना पाणी व माती रस्त्यावर पडू लागली. त्यामुळे या मार्गावरील मोटारसायकल घसरण्याच्या घटना घडू लागल्या. परिणामी वाहतूक थांबवावी लागली. तापर्यंत केवळ ३० डंपर गाळाची वाहतूक झाली असून पात्रालगत सुमारे १४० डंपर गाळ पडून आहे. काढलेला गाळ नाल्याच्या पात्राजवळ असल्याने तो पुन्हा पात्रातच जाण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने लवकरच मान्सून दाखल होण्याचा अंदाज वर्तवला असून अंदाजाप्रमाणे मान्सूनला सुरुवात झाल्यास काढलेला गाळ पुन्हा नाल्यात मिसळण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रशासनाला खबरदारी घ्यावी लागणार आहे.

वैद्यकीय कचरा थेट नाल्यात

जैव वैद्यकीय कचरा संकलीत करण्यासाठी महापालिकेतर्फे स्वतंत्र यंत्रणा उभा केली असून या कचऱ्यावर प्रक्रियाही केली जाते. हा प्लान्ट प्रशासन स्वत:च चालवत आहे. पण स्वच्छता मोहिमेदरम्यान हुतात्मा पार्क ते रेणुका मंदिर आणि आयसोलेशन हॉस्पिटलच्या नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात वैद्यकीय कचरा टाकला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्यानंतर नाल्यातील पाणी नदीत जाऊन प्रदूषणाचा विळखा अधिक घट्ट होतो. पण अशा घटनांकडे दुर्लक्ष करुन वैद्यकीय कचरा टाकला जात असल्याने संबंधीतांवर कायदेशीर कारवाईची मागणी होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी पुलाचे काम अंतिम टप्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलाला पर्यायी बांधण्यात येत असलेल्या नव्या पुलाचे काम अंतिम आले आहे. पुलाला जोडणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण केले जात आहे. महिन्याअखेर काम पूर्ण करण्याचे नियोजन ठेकेदार कंपनीने केले आहे.

शिवाजी पुलाचे आयुर्मान संपले आहे. त्यामुळे नविन पूल मंजूर करण्यात आला. या पुलाचे ७० टक्के कामही पूर्ण झाले. दरम्यान, पुरातत्त्व विभागाची परवानगी न मिळाल्याने काम दीर्घकाळ रेंगाळले. जनरेट्यामुळे काम पुन्हा सुरू झाले. अंतिम टप्यातील काम सुरू असतानाही पुरातत्व विभागाच्या परवानगीचा मुद्दा समोर आला. अशा अनेक अडचणींवर मात करत पुलाचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. सध्या पुलाचा सुरक्षा कठडा, रेलिंग, मुख्य रस्त्याचे जोडकाम, डांबरीकरण केले जात आहेत.

दोन दिवसापासून कोल्हापूरकडील बाजूला पुलाच्या जोडकामासाठी भरावा टाकण्यात येत आहे. पाऊस सुरू होण्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन आसमास कंपनीचे येथील प्रतिनिधी एन. डी. लाड यांनी केले आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक भोसले यांनी कामाच्या ठिकाणी भेट देऊन काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. काम पूर्ण झाल्यानंतर अधिकृतपणे उदघाटन कार्यक्रमाचे आयोजन महामार्ग विभाग करणार आहे. केंद्र सरकारशी पत्रव्यवहार करून हा कार्यक्रम होणार आहे. परिणामी त्यास विलंब लागण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घराणेदार गायकीचे सुश्राव्य दर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आकारयुक्त आवाजाचा निकोप लगाव, रागाची शिस्तबद्ध बढत, चपळ व गुंतागुंतीची तानक्रिया ही जयपूर घराण्याची गुणवैशिष्ट्ये जपत मुंबई येथील गायिका डॉ. मनीषा कुलकर्णी यांनी घराणेदार गायकीचे सुश्राव्य दर्शन घडविले.

गायन समाज देवल क्लबतर्फे पंडित आनंदराव लिमये यांच्या स्मृतिपित्यर्थ सायंकालीन संगीत सभेचे आयोजन केले होते. संस्थेच्या अच्युतराव भांडारकर कलादालन येथे कार्यक्रम झाला. डॉ. कुलकर्णी यांनी मैफलीची सुरुवात जयपूर घराण्याची खासियत असलेल्या प्रियतमा सया या त्रितालातील बंदिशीने केली. यानंतर त्यांनी 'खेल ना आये' या द्रुत त्रितालातील रचना सादर करत रसिकांची वाहवा मिळवली.

रंगलेल्या मैफलीत एक निषाद बिहागडा या रागातील 'रैन बैरनसे' ही झपतालातील व 'पायल बाजे' ही द्रूत रचना सादर केली. नायकी कानडी रागातील मैरो पिया या बंदिशीने मैफलीची सांगता केली. त्यांना,तबला व हार्मोनियम साथ प्रदीप कुलकर्णी, संतदीप तावरे यांनी केली. दरम्यान डॉ. वासंती ठेंबे, मीना वझे, अजित कुलकर्णी, उमा नामजोशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. 'गोकुळ'चे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार झाला. कार्यक्रम समिती प्रमुख श्रीकांत डिग्रजकर यांनी स्वागत केले. याप्रसंगी डॉ. ज. ल. नागावकर, सुश्रृत हर्डीकर, सुभाष नागेशकर, एस. यू. कुलकर्णी, शिवपाल बनछोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रायगड ‘वर्ल्ड हेरिटेज’ बनविणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'किल्ले रायगड येथे साजरा होणारा शिवराज्याभिषेक दिन सोहळा हा लोकोत्सव बनला आहे. हा सोहळा विश्ववंदनीय करण्यासाठी शिवभक्तांनी तो अतिशय देखण्या स्वरुपात व शिस्तीत पार पाडावा. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तबगारीची जगभर ओळख निर्माण होण्यासाठी रायगडला 'वर्ल्ड हेरिटेज स्टेशन' बनवू,' असा संकल्प अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे मार्गदर्शक व रायगड प्राधिकरणचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे पाच व सहा जून रोजी रायगडवर आयोजित शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याच्या पूर्व नियोजनासाठी बैठक झाली. भवानी मंडप येथील तुळजाभवानी मंदिरात आयोजित बैठकीला शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती.

खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, 'शिवराज्याभिषेक सोहळा हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा होण्यासाठी प्रयत्नशील आहे. यंदा सोहळ्यासाठी ग्रीस, पोलंड आणि बल्गेरिया देशाचे राजदूत विशेष पाहुणे आहेत. तसेच लोकसभा व राज्यसभेच्या सर्व खासदारांना आमंत्रित केले आहे. रायगडाचे रात्रीही दर्शन घेता यावे म्हणून फसाड लायटिंग बसविण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर पहिल्यांदा महादरवाजा व खूब लढो बुरुज या ठिकाणी या विशेष विद्युत रोषणाई यंत्रणा बसविण्यात येईल'

दरम्यान रायगड प्रशासनाकडून पाच व सहा जून रोजी रायगड जिल्ह्यात दारुबंदीची घोषणा केल्याची माहिती समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांनी दिली. कार्याध्यक्ष हेमंत साळोखे यांनी पालखी सोहळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. सर्वांनी पारंपरिक वेशभूषेत सोहळ्यात सामील होण्याची सूचना केली. शाहीर आझाद नायकवडी यांनी पाच व सहा जूनला शाहिरी पोवाड्यांचा कार्यक्रम होणार असल्याचे सांगितले. शस्त्रसंग्राहक गिरीश जाधव यांनी 'जागर शिवकालीन युद्धकलेचा' याविषयी मार्गदर्शन केले. गणी आजरेकर, अमर पाटील, आशुतोष बेडेकर, शाहीर शहाजी माळी, अनिल घाटगे, फिरोज खान, धनाजी खोत, प्रतिक दिंडे, सत्यजित आवटे, अनिल घाटगे, विजय ससे, प्रवीण कारंडे, रमेश कदम यांनी सहभाग घेतला. याप्रसंगी युवराज शहाजीराजे छत्रपती उपस्थित होते.

बैठकीतील निर्णय

पाच व सहा जून रोजी रायगड जिल्ह्यात दारुबंदी

ज्येष्ठ नागरिक, वृद्ध महिलांनीच रोपवेचा वापर करावा

उर्वरित सगळयांनी गड पायी चढावा व उतरावा

किल्ल्यावर २० ठिकाणी पाचशे लिटर पाण्याच्या टाक्या

स्वच्छतागृहांची सुविधा, महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे

नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी ३५ डॉक्टरांची टीम

मेडिकल असोसिएशनकडून पुरेशी औषधे

१०० मीटर अंतरावर कचरापेटी

गडावर उत्खनन सुरू असलेल्या ठिकाणी जाण्याचे टाळावे

सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी ४० कमिट्या

गडावर दोन दिवस नियंत्रण कक्ष

कोल्हापूरसाठी लवकरच सरप्राइज पॅकेज


खासदार संभाजीराजे यांनी कोल्हापूरच्या विकासासाठी लवकरच सरपाइज पॅकेज मिळणार आहे. आचारसंहिता संपल्यानंतर त्याची अधिकृत घोषणा करू, असे सांगितले. दरम्यान शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी राजेंद्र कोंढरे यांच्याकडून ५१ हजार, नगरसेवक महेश सावंत यांच्याकडून २५ हजार, केमिस्ट असोसिएशनने २० हजार, राहुल टकले यांनी दहा हजार रुपयांची देणगी दिली. नगरसेवक सावंत यांनी मित्र परिवारातर्फे आणखी ७५ हजार रुपयांचे अर्थसहाय करण्यात येणार असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरोड्याचा प्रयत्न उधळला

$
0
0

तीन लाखांचा मुद्देमाल जप्त\B

\B

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गुजरी येथे सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीवर पोलिसांनी रविवारी मध्यरात्री रेल्वे स्टेशन परिसरात छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच चोरटे साहित्य टाकून पळून गेले. पोलिसांनी दोन कारसह एक पिस्तुल, सहा काडतुसे, सत्तूर असा जवळपास तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. शाहूपुरी पोलिसांनी मकरंद जोंधळे (रा कदमवाडी),सुशांत संजय पोवार (मंगळवार पेठ) व अमित कांबळे (मुक्तसैनिक वसाहत) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून संशयित शहरातील एका गुन्हेगारी टोळीचे सदस्य असल्याची माहिती पुढे आली आहे.

शहरातील एका गुन्हेगारी टोळीतील गुंड गुजरी परिसरात सशस्त्र दरोडा टाकणार असल्याची माहिती शाहूपुरी पोलिस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल बजरंग हेब्बाळकर यांना मिळाली. मध्यरात्री दोनच्या सुमारास ही टोळी दोन वाहनातून जाणार होती. त्यानुसार पोलिसांनी दोन ते तीन ठिकाणी सापळे लावले होते. रात्री दोनच्या सुमारास रेल्वे स्टेशनच्या इन गेट समोर दोन कार थांबल्या. कार तपासण्यासाठी पोलिस येत असल्याचे पाहताच चोरटे कार सोडून पळून गेले. पोलिसांनी दोन्ही कारची झडती घेतली असता त्यामध्ये एक पिस्तुल, सहा काडतुसे, सत्तूर व १२ हजार रुपयांची रोकड मिळून आली. पोलिसांनी दोन्ही कारसह

साहित्य असा जवळपास तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतमोजणी तयारीचा आढावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणीसंबंधित सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. कोणत्याही प्रकारच्या त्रुटी ठेवू नयेत', अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सोमवारी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, 'मतमोजणीचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे.' यावेळी वैद्यकीय मदत, खानपान व्यवस्था, मतमोजणी केंद्र परिसर स्वच्छतागृह, साफसफाई, सुरक्षा व्यवस्था, पोलिस व्यवस्था, दूरध्वनी इंटरनेट, फॅक्स कनेक्टीव्हीटी, सार्वजनिक उदघोषणा व्यवस्थापन, मिडीया व्यवस्थापन कक्षाचा आढावा घेण्यात आला. बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) सतिश धुमाळ आदी उपस्थित होते.

............

चौकट

जिल्ह्यात मतमोजणीदिवशी बंदी आदेश

२३ मे रोजी मतमोजणीदिवशी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे या दिवशी सकाळी ७ ते मतमोजणी संपेपर्यंत शहर, जिल्ह्यात बंदी आदेश लागू करण्यात आला आहे, अशी माहिती निवडणूक प्रशासनाने प्रसिध्दी पत्रकातून दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक पोलिसांच्या अंगावर दुचाकी घातली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दाभोळकर कॉर्नर चौकात दुचाकी चालवताना मोबाईलवर बोलत जाणाऱ्या तरुणास शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्याने थांबवण्याचा प्रयत्न करताच वाहनचालकाने त्याच्या अंगावर गाडी घातली. यामध्ये पोलिस कॉन्स्टेबल राजेंद्र महादेव माने (वय ४५, रा. मोरेवाडी) हे जखमी झाले. सोमवारी दुपारी १२ वाजता हा प्रकार घडला. दुचाकीस्वार प्रमोद माळी (वय २८, रा. शिरोली) याच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी , वाहतूक शाखेचे पोलिस राजेंद्र माने हे सोमवारी सकाळी स्टेशन रोडवरील दाभोळकर कॉर्नरला येथे वाहतूक नियंत्रण करीत होते. ताराराणी चौकाकडून स्टेशन रोडकडे प्रमोद माळी हा दुचाकी चालवताना मोबाइलवर बोलत होता. पोलिस कर्मचारी माने यांनी त्याला थांबण्याचा इशारा दिला. पण भांबावलेल्या माळी याने थेट माने यांच्या अंगावर दुचाकी घातली. धडक बसल्याने माने रस्त्यावर कोसळले. त्यांच्या पायास दुखापत झाली आहे.

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी माळी याला पकडून ठेवले. त्याची पडलेली दुचाकी रस्त्याच्या कडेला घेण्यात आली. या घटनेची माहिती कळताच शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक अनिल गुजर यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी माने यांना सीपीआरमध्ये उपचारास दाखल केले. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. संशयित माळी याच्यावर गुन्हा दाखल केला असून मंगळवारी (ता. २१) त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकसभा निकालाचे पडसाद महापौर निवडीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राष्ट्रवादीच्या महापौर सरिता मोरे यांचा कार्यकाळ दहा जून रोजी संपुष्टात येणार असला, तरी नव्या महापौर निवडीसाठी लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतरच रंगत येणार आहे. या निवडणुकीचे पडसाद महापौर निवडीमध्ये निश्चितपणे दिसून येणार आहेत. लोकसभा निवडणूक प्रचारापासून भाजप-ताराराणीमध्ये निर्माण झालेले वितुष्ट निकालानंतर कायम राहिल्यास त्याचा फायदा मात्र सत्तारुढ गटाला होईल.

महापालिकेच्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील सत्तेच्या फार्म्युलानुसार महापौर पदाचा एक वर्षाचा कालावधी राष्ट्रवादीच्या काँग्रेसला मिळाला आहे. वर्षात पक्षाचे दोन महापौर करण्याचे नेत्यांनी निश्चित केल्यानंतर प्रथम मोरे यांना संधी मिळाली. प्रचंड शहकटशहाच्या राजकीय खेळीत मोरे यांनी बाजी मारली. पक्षाने मोरे यांना प्रथम संधी दिल्यानंतर नगरसेविका अॅड. सुरमंजिरी लाटकर व माधवी गवंडी यांना पक्षनेतृत्वाने महापौरपदाचे आश्वासन दिले आहे. मोरे यांचा सहा महिन्याचा कालावधी दहा जून रोजी संपणार असल्याने महापालिका वर्तुळात महापौर निवडीची चर्चा होऊ लागली असली, तरी मतमोजणीनंतरच महापौर निवडीला रंगत येईल.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान खासदार धनंजय महाडिक यांनी पक्षविरोधी घेतलेल्या भूमिकेमुळे नगरसेवकांमध्ये प्रचंड नाराजी होती. या नाराजीतून अनेकांनी पडद्याआडून शिवसेनेचा भगवा हाती घेतला. अशीच स्थितीत भाजप-ताराराणी आघाडीमध्ये दिसून आली. ताराराणी आघाडी महादेवराव महाडिक यांची म्हणून ओळख असली, तरी भाजपमधील काही नगरसेवक राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार महाडिक यांच्या प्रचारात सक्रिय दिसले. परिणामी त्यांच्यावर कारवाईच्या नोटिसाही दिल्या. या घटनेपासून भाजप-ताराराणीमध्ये वितुष्ट निर्माण झाले आहे. महासभेपूर्वी एकत्र होणाऱ्या पार्टी मिटिंग स्वतंत्रपणे होऊ लागल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालात खासदार महाडिक यांना दगाफटका झाल्यास त्याचे पडसाद महापौर निवडीदरम्यान निश्चितपणे उमटतील.

महापौर मोरे यांनी राजीनामा दिल्यास निवड प्रक्रिया पूर्ण होण्यास जुलैअखेरपर्यंत उजडेल. परिणामी आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि मिळणाऱ्या अपुऱ्या कालावधीमुळे नव्या महापौरांना फारशी कामाची संधी मिळणार नाही. परिणामी महापौर मोरेंचा पक्षनेतृत्व राजीनामा घेणार की कालावधी वाढवून देणार याबाबत कमालीची उत्सुकता असेल. मागील महापौर निवडीवेळी मोरे यांच्यासह त्यांच्यासाठी अनेकांनी निवडीसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. महापौरपदासाठी नाव निश्चित करण्यासाठी पक्षांतर्गत जोरदार लॉबिंग करण्यात आले होते. मात्र सद्य:स्थितीत महापौरपदासाठी कोणाचे नाव पुढे येणार यावर निवडीची समीकरणे ठरणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घिसाड गल्लीत ट्रक घुरात घुसला

$
0
0

फोटो आहे...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

माल वाहतूक करणारा विनावाहक टेंपो सोमवार पेठेतील घिसाड गल्लीत घुसल्याने परिसरातील नागरिकांचा थरकाप उडाला. दैव बलवत्तर म्हणूनच कोणतीही हानी झाली नाही. सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

महाराणा प्रताप चौकातील केएमटी टर्मिनसजवळील मोमीन ग्लास हाऊसच्या गोडाऊनमध्ये टेंपोतून सोमवारी दुपारी काचेचे साहित्य उतरण्याचे काम सुरु होते. टेंपो बंद करुन चालक बाहेर काही कामानिमित्त गेला होता. दरम्यान, माल उतरत असताना टेंपोला हॅन्डब्रेक लावला नसल्याने तसेच तो गिअरमध्ये नसल्याने टेंपो उतारावरुन वेगाने घिसाड गल्लीकडे जाऊ लागला. हा प्रकार पाहताच बालाजी रेसिडन्सीचा वॉचमन विलास पोवार याने जोरजोराने ओरडण्यास सुरुवात करुन विवाहाच्या मुहुर्तमेढनिमित्त उभारलेल्या मंडपातील महिला, लहान मुले व पुरुषांना सावध केले.

घिसाड गल्लीत बाळासाहेब दगडोबा पोवार यांच्या घरी निरंजन पोवार यांच्या विवाहानिमित्त मुहुर्तमेढचा कार्यक्रम होता. त्यासाठी रस्त्यावर मंडप उभारण्यात आला होता. तसेच नरेंद्र पोवार यांच्या शेडमध्ये जेवण तयार करण्याच्या कामानिमित्त शेडमधील दुकानातील काम बंद होते. पोवार यांच्या ओरडण्यामुळे मंडपात बसलेल्या महिला व पुरुष उठून बाजूला गेले. टेंपो मंडपात न जाता थेट नरेंद्र पोवार यांच्या शेडमध्ये घुसला व ऐरणीला जाऊन तटला. या धावपळीत वरुण पोवार (वय ३) आणि मानव शेलार (५) ही मुले घाबरुन पळताना रस्त्यांवर पडल्याने किरकोळ जखमी झाली. टेंपो पोवार यांच्या शेडमध्ये तटल्याने पुढील अनर्थ टळला. मंडपात टेंपोत घुसला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. घटनास्थळी माजी महापौर आर.के. पोवार यांच्यासह परिसरातील कार्यकर्त्यांनी धाव घेतली. लक्ष्मीपुरी पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी टेंपो घटनास्थळावरून हलवून लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात नेला. रात्री उशिरापर्यंत टेंपो चालकावर गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


झुंड कादंबरीला राज्यस्तरीय पुरस्कार

$
0
0

गारगोटी: गव्यांच्या वास्तव जीवनावर आधारित असलेल्या जंगल संशोधक दत्ता मोरसे यांच्या झुंड कादंबरीला जळगाव येथील उज्जैनकर फाउंडेशन साहित्य प्रतिष्ठानचा 'तापी पुर्णा' हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला. या अगोदर त्यांच्या या कादंबरीला दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, तुकोबा माणदेशी पुरस्कार, करवीर नगर वाचन साहित्य मंडळ, डी. डी. आसगांवकर सांस्कृतिक ट्रस्ट, कविवर्य ए. पां. रेंदाळकर साहित्य पुरस्कार अशा विविध सर्वोत्कृष्ट पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. मोरसे यांचे १६ वर्षे जंगलात गवा आणि अरण्य भाषा यावर त्याचे काम सुरू आहे. सध्या महाष्ट्रातील प्रसिद्ध युवा जंगल अभ्यास म्हणून त्यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांच्या घोलमोड व झुंड या कादंबऱ्या पर्यावरण वादी निसर्ग साहित्य म्हणून प्रसिद्ध आहेत. निसर्ग संवर्धनाची चळवळ अधिक बळकट करण्याचे कार्य या कादंबऱ्यातून वाचकासमोर आणल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतमोजणीच्या ठिकाणापासून२०० मीटर परिसरात प्रवेशबंदी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी रमणमळ्यातील शासकीय गोदामात आणि 'हातकणंगले'साठी शिवाजी विद्यापीठासमोरील राजाराम तलावाशेजारी शासकीय गोदामात २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणापासून २०० मीटर अंतरावर प्रवेश बंदी असल्याचे सोमवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जाहीर केले. या परिसरात मतमोजणी प्रक्रियेतील अधिकारी, कर्मचारी व्यतिरिक्त इतरांना येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात चुरशीने मतदान झाले. परिणामी निकालाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. यातून निकाल ऐकण्यासाठी २३ रोजी उमेदवारांच्या समर्थकांची मोठी गर्दी होणार आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मतमोजणी परिसरातील २०० मीटर अंतरावर संचार करण्यास निर्बंध घातले आहेत. मोबाईल, कॉडलेस फोन, वायरलेस सेट, इलेक्ट्रॉनिक साहित्य जवळ ठेवता येणार नाही. वाहतूकही पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. परिसरात मतमोजणीदरम्यान आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा लाऊड स्पिकर पोलिसांच्या पूर्वपरवानगीविना लावण्यास मनाई घालण्यात आली आहे. आदर्श आचारसंहितेचा भंग होईल अशा प्रकारची भाषणे करणे, नक्कल करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा आणि पोलिस प्रशासनाने प्रमुख उमेदवारांच्या समर्थकांना थांबण्यासाठी मतमोजणीच्या ठिकाणाजवळ जागा निश्चित केल्या आहेत. भाजप, शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या समर्थकांना पोवार मळा भगवा चौक, राष्ट्रवादी, काँग्रेसचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या समर्थकांना कसबा बावडा पोष्ट ऑफीस, मेरी वेदर मैदान तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या समर्थकांसाठी पितळी गणपती चौक परिसरात थांबण्याचे आवाहन केले आहे.

भाजप, शिवसेना युतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या समर्थकांसाठी केएसबीपी उद्यान, शिवाजी विद्यापीठ चौक, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी, काँग्रेस युतीचे उमेदवार राजू शेट्टी यांच्या समर्थकांसाठी पाटील मळा, सरनोबतवाडी येथे थांबण्याची व्यवस्था केली आहे.

.......

शस्त्र बाळगल्यास कारवाई

मतमोजणी परिसरात पोलिस वगळता इतर व्यक्तींनी शस्त्रे जवळ ठेवल्याचे आढळल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल होणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी मतमोजणी अधिकारी, इतर कर्मचाऱ्यांना मोबाईल वापरणे, फोटो काढणे, चित्रीकरण करण्यास परवानगी नसल्याचेही जिल्हाधिकारी देसाई यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वातावरणात प्रचंड उष्मा

$
0
0

पारा ४० अंशाच्या वर

फोटो आहे.

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अंदमानमध्ये मान्सून पावसाचे आगमन झाले असले, तरी कोल्हापूर शहरातील तापमानाचा पारा वाढतच आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून उन्हाचे चटके बसत असतानाच उष्माही वाढल्याने शरीरातून घामाच्या धारा वाहत आहेत. उष्म्याचा त्रास कमी करण्यासाठी नागरिकांचा ओढा शरीराला गारवा देणाऱ्या पदार्थांकडे मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सोमवारीही पारा ४० अंशाच्या वर पोहोचल्याने महिनाअखेरीस त्यामध्ये आणखी भर पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

यंदा मार्च महिन्यापासूनच उन्हाचे चटके जाणवू लागले. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला तर उष्म्यामध्ये वाढ झाल्यानंतर वळीव पावसाची शक्यता वर्तवली जात होती. पण नंतर झालेल्या अल निनो वादळांमुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला. मात्र मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पुन्हा तापमानामध्ये वाढ होऊ लागली. शहराचे तापमान सरासरी ३८ अंशावर स्थिर राहत असताना सद्य:स्थितीत तापमान चाळीस पार करु लागले आहे.

रविवारी तापमानाचा पारा ४१.२ अंशांवर गेल्यानंतर शहरातील वर्दळीचे रस्ते ओस पडल्याचे दिसत होते. सोमवारी पुन्हा तापमान ४० अंशाच्या वर होते. रविवारपेक्षा पारा एक अंशाने कमी झाला असला, तरी वातावरणात चांगलाच उष्मा होता. सकाळी नऊ वाजल्यापासून सायंकाळी साडेपाचपर्यंत कमालीचा उष्मा जाणवत होता. त्यामुळे नागरिकांच्या अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. वाढत्या उष्माने त्रस्त झालेले नागरिक शीतपेयांचा आस्वाद घेत होते. तापमानात उष्मा असल्याने राज्याच्या काही भागात वळीव पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दहा दिवसांत २६ प्रभाग साफ करण्याचे आव्हान

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेने 'स्वच्छ कोल्हापूर, सुंदर कोल्हापूर' संकल्पनेनुसार नाला स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. मोहिमेला श्रमदानाची साथ मिळत असतानाच प्रशासनानेही नाले, गटर्स व चॅनेल्स सफाई मोहीम मार्चपासून हाती घेतली आहे. मार्चपासून सुरू असलेली सफाई मोहिमेतून ८१ प्रभागांपैकी ५५ प्रभागातील ३३३ नाले, गटर्स व चॅनेलची सफाई केली. मात्र उर्वरीत दहा दिवसांत २६ प्रभागातील १४३ नाले, गटर्स व चॅनेलची सफाई करण्याचे आव्हान महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना पेलावे लागणार आहे.

वळीव किंवा नियमित पावसाळ्यामध्ये पाणी पाणी साचून राहू नये, यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने शहरातील नालेसफाईचे काम हाती घेतले जाते. लहान-मोठ्या नाल्यांसह अनेक मोठे गटर्स व चॅनेल कर्मचारी अथवा जेसीबी मशीनच्या मदतीने साफ केले जातात. यावर्षी पावसाळ्यामध्ये पाणी तुंबण्याच्या घटना होऊ नयेत, यासाठी मार्च महिन्यापासून सफाई मोहीम हाती घेतली आहे. कर्मचाऱ्यांच्यावतीने आतापर्यंत ८१ प्रभागापैकी ५५ प्रभागातील सफाई पूर्ण झाली आहे. एकीकडे प्रशासनाच्यावतीने सफाई सुरू असताना श्रमदानातून जयंती नाला व उपनाल्याची स्वच्छता श्रमदानातून सुरू असली, तरी उर्वरीत २६ प्रभागातील स्वच्छता करण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.

नालेसफाईला सुरुवात होण्यापूर्वीच गेल्या वर्षी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात वळीव पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर गटारी व चॅनेल्स चोकअप् झाले होते. परिमाण शहराच्या अनेक रस्त्यांवर पाणी येवून काहींच्या घरातही पाणी घुसले होते. विशेषत: जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अशी परिस्थीती उद्भवली होती. यावर्षी मात्र महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने मार्च महिन्यापासूनच नालेसफाईला सुरुवात झाली आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने प्रत्येकी ३० कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली दोन पथके तैनात केली आहेत. अडीच महिन्यात कर्मचाऱ्यांनी ५५ प्रभागातील ३३३ नाले, गटर्स व चॅनेलची सफाई केली आहे. ३१ मेअखेर सफाई मोहीम पूर्ण करण्याची अंतिम तारीख आहे. परिणामी उर्वरीत दहा दिवसांत आरोग्य कर्मचाऱ्यांना २६ प्रभागातील १४३ नाले, गटर्स व चॅनेलची सफाई करावी लागणार आहे. त्यासाठीचे नियोजनही प्रशासकीय पातळीवर सुरू आहे.

..................

चौकट

चरी खोदण्यास सुरुवात

शहरात नालेसफाईला सुरुवात झाल्यानंतर प्रमुख १२ नाल्यांतील गाळ काढण्यासाठी जेसीबी व पोकलॅन मशिनरीची आवश्यकता भासणार होती. आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी स्वच्छता मोहीम सुरू केल्यानंतर ही सर्व मशिनरी सफाईसाठी कार्यन्वित झाली आहे. तसेच ज्या उपनगरांमध्ये पावसाचे पाणी साचून राहते तेथे चर खोदण्यास सुरुवात केली आहे. या चरीतून येणारे पावसाचे पाणी मोठ्या गटर्स अथवा नाल्याकडे वळवण्यात येणार आहेत.

..............

चौकट

८१

एकूण प्रभाग

५५

प्रभागातील नालेसफाई पूर्ण

४७६

एकूण नाले

३३३

सफाई झालेले नाले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतमोजणीसाठी महापालिकेचे ५० अधिकारी, कर्मचारी

$
0
0

आरोग्य सेवाही तैनात

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी महापालिकेच्या ५० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. तसेच जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दोन वैद्यकीय पथके मोबाइल टॉयलेट सुविधा देणार आहेत.

कोल्हापूर लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक शाखेकडे महापालिकेच्या एक हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. त्याचप्रमाणे गुरुवारी (ता. २३) होणाऱ्या मतमोजणीसाठी ५० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये दहा वरिष्ठ अधिकारी, १५ लिपिक, २५ चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मतमोजणी पूर्ण होऊपर्यंत सर्व कर्मचारी आपली जबाबदारी पार पाडतील.

त्याचबरोबर मतमोजणीसाठी आरोग्येसवा पुरवण्याचे पत्र निवडणूक शाखेने महापालिका प्रशासनाला दिले होते. त्यानुसार सकाळी सहा ते सायंकाळी चार आणि सायंकाळी चार ते मतमोजणी पूर्ण होईपर्यंत प्रत्येकी एक वैद्यकीय पथक तैनात ठेवण्यात येणार आहे. पथकांमध्ये दोन डॉक्टर, दोन मदतीन, दोन परिचारीका, वॉर्ड बॉय यांचा समावेश असेल. त्याचबरोबर एक अॅब्युलन्स आणि मोबाइल टॉयलेट सुविधा महापालिकेच्यावतीने उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images