Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

प्राथमिक शिक्षकबदली प्रक्रिया सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्राथमिक शिक्षक बदलीची प्रक्रिया यंदाही सुगम, दुर्गम पद्धतीने ऑनलाइन प्रक्रियेद्वारेच होणार आहे. बदलीपात्र शिक्षकांची यादी तयार करण्याचे काम अंतिम टप्यात आहे. बदलीसाठी २१ मेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन शिक्षण प्रशासनाने केले आहेत. अर्ज केलेले शिक्षक आणि बदली पात्र शिक्षकांची यादी पुढील आठवड्यात प्रसिध्द होणार आहे. यादीवर हरकती घेऊन अंतिम यादी तयार करण्यात येणार आहे. बदलीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी २३ मेनंतर पोर्टल सुरू होणार आहे.

गेल्यावर्षापासून सूगम, दुर्गम निकषानुसार ऑनलाइन बदल्यांची प्रक्रिया राबवली जात आहे. त्यानुसार दहा वर्ष सुगम ठिकाणच्या शाळेत काम केलेल्या शिक्षकास दुर्गम तर सलग तीन वर्षे दुर्गम ठिकाणी कार्यरत असलेल्या शिक्षकाची बदली सुगम ठिकाणच्या शाळेत होणार आहे. या प्रक्रियेस शिक्षक संघटनांनी विरोध केला असला तरीही यंदा ऑनलाइनच प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. गावाजवळ, सुगम भागातील बदलीपात्र शिक्षकांना दुर्गम भागातील शाळेत जावे लागणार आहेत. हे टाळण्यासाठी बहुतांशी शिक्षक संघटना, पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मोर्चेबांधणी करत आहेत. दुसऱ्या बाजूला प्रशासन बदलीपूर्व तयारी करत आहे.

नियुक्त तारखेनुसार झालेली सेवा, दुर्गम, सुगम शाळेतील शिक्षकांची माहिती संकलित केली जात आहे. शिक्षकांकडूनही बदलीसाठी अर्ज घेतले जात आहेत. त्यानंतर प्रशासन यादी प्रसिद्ध करणार आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी बदलीची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी प्रशासनाने मार्च महिन्यात तयारी केली होती. मात्र लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे त्यास ब्रेक लागला. २३ मे रोजी निकाल लागल्यानंतर पुन्हा प्रक्रिया गतिमान होणार आहे. बदलीपात्र शिक्षकांना सरकारच्या पोर्टलवर अचूक अर्ज भरावे लागणार आहे.

२००२

एकूण प्राथमिक शाळा

५ हजार ७६२

शिक्षक

४३८

मुख्याध्यापक

१५७२

पदवीधर शिक्षक

चौकट

रिक्त जागांची

समस्या कायम

अध्यापकाच्या ४२५, मुख्याध्यापक ८०, पदवीधर २३१ जागा रिक्त आहेत. इतक्या मोठ्या संख्येने जागा रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सरकारकडून नवीन शिक्षक भरती नसल्याने जिल्हा शिक्षण प्रशासनासमोर शिक्षक कुठून द्यायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


२० टेबलवर एकाचवेळीमतमोजणीला सुरूवात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी २३ मे रोजी २० टेबलवर होणार आहे. सकाळी सात वाजता सर्व टेबलवर एकाचवेळी मतमोजणीला सुरूवात होणार आहे. एका फेरीसाठी कमीत कमी २० मिनिटे लागतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे. यानुसार सायंकाळी सहापर्यंत अंतिम निकाल जाहीर करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. मात्र दुपारनंतर उमेदवारांच्या विजयाचा कल स्पष्ट होणार आहे.

'हातकणंगले'साठी शिवाजी विद्यापीठासमोरील राजाराम तलावाशेजारी शासकीय गोदामात मतमोजणी होईल. 'कोल्हापूर'मधील सर्वाधिक २२ फेऱ्या राधानगरी विधानसभा मतदारसंघातील तर सर्वात कमी कोल्हापूर उत्तरमध्ये १६ फेऱ्या होतील.'हातकणंगले'मध्ये इचलकरंजी विधनासभा मतदासंघात सर्वात कमी १४ आणि सर्वात अधिक शिराळा, हातकणंगले, शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात १७ फेऱ्या होतील.

आयोगाच्या निर्देशानुसार मतमोजणी ठिकाणी मोबाइल बंदी केली आहे. आयोगाकडे संपर्कासाठी नियुक्त अधिकाऱ्यांशिवाय कोणासही मोबाइल वापरता येणार नाही. माध्यमांना माहिती देण्यासाठी स्वतंत्र कक्षही सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक टेबलवर कंट्रोल युनिट मतमोजणीसाठी देताना ते फेरीनिहाय व मतदान केंद्रनिहाय अनुक्रमांने दिले जाईल. 'हातकणंले' मतदारसंघात दोन यंत्रे ठेवण्यात येतील. मतमोजणीवेळी उपस्थित उमेदवारांच्या प्रतिनिधींना बसण्यासाठी खुर्च्यांची रांग असेल. पहिल्या रांगेत राष्ट्रीयकृत पक्षाच्या उमेदवारांचे प्रतिनिधी, त्यामागे राज्यमान्यता आणि शेवटी अपक्ष उमेदवारांच्या प्रतिनिधींना बसावे लागणार आहे.

..........

२३ ला पहाटे

पाच वाजताच ...

२३ मे रोजी सकाळी ७ वाजता मतमोजणीला सुरूवात होणार असली तरी निवडणूक निर्णय अधिकारी आणि निरीक्षक पहाटे ५ वाजता मतमोजणीच्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. मतमोजणीपूर्व तयारी करून उमेदवार, त्यांच्या प्रतिनिधींसमोर सकाळी सात वाजता मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्राँगरूमचे सील फोडण्यात येईल. त्यासाठी उमेदवारांना निमंत्रण पत्रे प्रशासनाकडून पाठवण्यात आली आहेत.

..........

आज अंतिम प्रशिक्षण

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना केशवराव भोसले नाट्यगृहात तर हातकणंगलेसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना राजाराम कॉलेजच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात अंतिम प्रशिक्षण देण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई, अप्पर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी नंदकुमार काटकर हे स्वत: प्रशिक्षण देणार आहेत. मतमोजणी सहायक, शिपाई, संगणक ऑपरेटर, हमालांना शाहू स्मारक भवनात प्रशिक्षण देण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सव्वापाच लाखांची ताडपत्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आपटेनगर येथील पाण्याच्या टाकीची प्रचंड दुरवस्था झाली असून टाकीचा छताचा काही भाग कोसळला आहे. कोसळल्या भागात कबुतरांचे आश्रयस्थान बनले असून त्यांच्या विष्ठेमुळे तीन प्रभागातील नागरिकांना दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होता. याबाबत शिवसेने आवाज उठवल्यानंतर प्रशासनाने टाकीवर ताडपत्री टाकण्यासाठी तयार केली. पण त्यासाठी तब्बल सव्वापाच लाखाची तरतूद केली आहे, असा आरोप शिवसेनेचे दक्षिण मतदारसंघाचे संघटक अवधूत साळोखे यांनी केला.

आपटेनगर पाण्याची टाकीची मोठ्याप्रमाणात दुरवस्था झाली आहे. सर्वात जुन्या अशा टाकीतून परिसरातील तीन प्रभागांना पाणीपुरवठा केला जातो. कोसळलेल्या छतामधून टाकीमध्ये प्रवेश करत कबुतरांनी येथे आपले आश्रयस्थान बनवले आहे. परिणामी टाकीमध्ये कबुतरांची पिसे, विष्ठा पडते आणि दुर्गंधी सुटते. हे दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असताना त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. याच्या निषेधार्थ शिवसेनेने गेल्या आठवड्यात आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना भेट घे‌ऊन निवेदन दिले. टाकीची दुरावस्था झाल्याने अमृत योजनेंतर्गत नवीन पाण्याची टाकी बांधण्याचे काम प्रस्तावित आहे; मात्र या कामास एक ते दीड वर्षाचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात त्यावर ताडपत्री टाकण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात नोटीस दिल्याचे प्रशासनाने सांगितले. त्यावर आयुक्तांनी या टाकीवर ताडपत्री टाकून झाकण्याचे काम तातडीने सुरू करण्याची सूचना दिली.

कापडी ताडपत्री अच्छादित करणे, पाण्याच्या टाकीत स्टील शिडी बसवणे आणि कायमस्वरूपी फिटिंग करणे अशा कामांसाठी कोटेशन मागवण्यात आले. त्यातील तीन निविदांपैकी सर्वात कमी दराची पाच लाख २५ हजार रुपयांना भरली. जलअभियंता यांच्यापासून स्थायी समितीपर्यंत सर्व स्तरावर तातडीने मंजूरही केली. जे काम प्रस्तावित आहे, त्या कामासाठी दिला जाणारा खर्च अत्यंत जास्त असल्याने याविरोधात आवाज उठवणार असल्याचे साळोखे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्य निरीक्षकांची वेतनवाढ रोखण्याचे आदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्यावतीने सुरू असलेल्या नाला सफाई मोहिमेमध्ये कामात कुचराई केल्याचा ठपका ठेवत विभागीय आरोग्य निरीक्षक जयवंत पोवार व आरोग्य निरीक्षक स्वप्नील उलपे यांची एक वेतनवाढ रोखण्याचे आदेश आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिले. उपायुक्त मंगेश शिंदे व मुख्य लेखापाल संजय सरनाईक यांच्या दोन सदस्यीय समितीची स्थापन करत चौकशी करण्याचे आदेश त्यांनी शुक्रवारी दिले.

महापालिकेच्यावतीने जयंती नाला व उपनाल्याची स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. जेसीबी व पोकलॅन मशिनरीच्या मदतीने गाळ काढण्यास सुरुवात केली आहे. जयंती नाला पंपिंग हाऊस ते रामानंद नगरपर्यंत विविध अधिकाऱ्यांच्याकडे भागनिहाय जबाबदारी दिली आहे. शुक्रवारी प्रत्यक्ष मशिनरीच्या मदतीने गाळ काढण्यास सुरुवात झाल्यानंतर आयुक्तांनी इतर अधिकाऱ्यांसमवेत कामाची पाहणी केली. हॉकी स्टेडियमच्या पिछाडीस असलेल्या नाल्यातील स्वच्छतेदरम्यान विभागीय आरोग्य निरीक्षक पोवार व आरोग्य निरीक्षक उलपे कामात हयगय करत आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्याची तातडीने दखल घेत एक वेतनवाढ रोखण्याचे आदेश दिले. तसेच दोन सदस्यीय समितीची स्थापना करुन चौकशीचे आदेश दिले. पाहणी दरम्यानच त्यांनी आदेश दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. आदेशानुसार उपायुक्त शिंदे व मुख्यलेखापाल सरनाईक चौकशी करुन आपला अहवाल आयुक्तांना सादर करतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोवार, बुचडेंना दिलासा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी काँग्रेसचे नगरसेवक दिलीप पोवार व सुभाष बुचडे यांचे नगरसेवक पद आयुक्तांना रद्द करता येणार नाही. याबाबतचा अभिप्राय ज्येष्ठ विधीज्ञांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे. या अभिप्रायामुळे पोवार व बुचडे यांना दिलासा मिळाला असून पद रद्दसाठी तक्रारदारांना कोर्टाचा दरवाजा ठोठावा लागणार आहे.

शुगर मिल प्रभागाचे नगरसेवक सुभाष बुचडे व कनाननगर प्रभागाचे नगरसेवक दिलीप पोवार यांनी अनधिकृत बांधकाम केल्याची तक्रार दाखल झाली होती. अनधिकृत बांधकाम करताना पदाचा दुरुपयोग केला असल्याने त्यांचे पद रद्द करण्याची मागणीही केली होती. राज्याच्या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांनी महापालिकेला कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्याविरोधात पोवार यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. पोवार यांच्या वकिलांनी अशा स्वरुपाची कारवाई आयुक्तांना करता येणार नाही, असे हायकोर्टाने यापूर्वी दिलेल्या निकालाचा आधार घे‌वून मागणी केली होती. यावर महापालिकेच्या नगरविकास आणि विधी विभागाने गुरुवारी (ता.९) ज्येष्ठ विधीज्ञानाचा अभिप्राय मागवला होता. त्यानुसार शुक्रवारी अभिप्राय प्राप्त झाला असून अनधिकृत बांधकामप्रश्नी नगरसेवकांचे पद रद्द करण्याचे अधिकार आयुक्तांना नसल्याचे स्पष्ट केले आहे. विधीज्ञांनी दिलेल्या अभिप्रायामुळे पोवार व बुचडे यांना दिलासा मिळाला आहे.

त्यानुसार प्रशासन राज्याच्या नगरविकास विभागाला आपला अहवाल पाठवणार आहे. परिणामी आयुक्त नगरसेवक पद रद्द करणार नसल्याने तक्रारदारांना पुन्हा कोर्टात धाव घ्यावी लागणार आहे. कोर्टाचा निर्णय येईपर्यंत सभागृहाची मुदत संपण्याची शक्यता असल्याने संख्या बळावर त्याचा परिणाम होईल का, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध

$
0
0

कोल्हापूर

महापालिकेच्या सिद्धार्थनगर व पद्माराजे उद्यान प्रभागातील पोटनिवडणुकीसाठी शुक्रवारी प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली. मंगळवारपर्यंत (ता. २१) हरकती व सूचनांचा विचार करुन २७ मे रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अंतिम मतदारयादी महापालिकेचे मुख्य व प्रभाग समिती कार्यालय आणि संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१२० डंपर गाळाची उचल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सलग दोन आठवड्यात श्रमदानातून जयंती नाला आणि उपनाल्यांची स्वच्छता केल्यानंतर शुक्रवारी महापालिकेच्यावतीने नाल्यातून गाळ काढण्यास सुरुवात झाली. पोकलॅन, जेसीबी मशिनरीच्या मदतीने दिवसभरात १२० डंपर गाळाची उचल केली. नाल्याचे पात्र रुंदीकरणाबरोबरच खोलीही गाळ काढताना वाढवण्यात आली. जयंती नाला पंप हाऊस ते आयर्विन पुलापर्यंतचा गाळ आणि कचरा मोठ्या मशिनरीच्या मदतीने काढून टाकण्यात आला.

'स्वच्छ कोल्हापूर, सुंदर कोल्हापूर' या अभियानातंर्गत महापालिकेने स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. उद्याने आणि जयंती नाला व उपनाल्याची श्रमदानातून स्वच्छता केल्यानंतर नाल्यातील गाळ काढण्यास सुरुवात केली. जयंती नाला पंप हाऊसपासून आयर्विन पुलापर्यंत मशिनरीच्या मदतीने गाळ व कचरा काढण्यात आला. एक पोकलॅन, दोन जेसीबी मशिनच्या मदतीने गाळ काढण्यात आला.

पात्रातील गाळ काढताना नाल्याची खोली व रुंदी वाढवण्याकडे अधिक भर दिला. त्यामुळे दिवसभरात १२० डंपर गाळाची उचल करण्यात आली. जयंती नाल्याचे पात्र उथळ बनल्याने बंधारा ओव्हरफ्लो होऊन सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळण्याच्या घटना कायम होत असतात. त्याचबरोबर नाल्यातील कचऱ्यामुळे पावसाच्या पाण्याचा प्रवाह थांबत असल्याने नागरी वस्तीत पाणी शिरण्याच्या घटनाही घडतात. अशा घटना घडू नयेत, यासाठी गाळ काढताना नाल्याचे पात्र रुंद व खोलही करण्यात आले. परिणामी नाल्यातून बंधाऱ्यापर्यंत येणारे सांडपाणी अधिक प्रमाणात अडवले जाणार आहे. तसेच येथून एसटीपी प्रकल्पाकडे उपसा करण्यास सोपे जाणार आहे. त्यामुळे बंधाऱ्यावरुन वाहणाऱ्या सांडपाण्याला अटकाव केल्याने पंचगंगा नदीतील पाणी प्रदूषणा कमी होण्यास मदत होणार आहे. जयंती नाल्यातील गाळ काढल्यानंतर इतर उपनाल्यातील गाळ काढण्यास सुरुवात होणार आहे.

शुक्रवारी सकाळी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी कामास भेट दिली. यावेळी उपआयुक्त मंगेश शिंदे, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, जलअभियंता सुरेश कुलकर्णी, शाखा अभियंता आर. के. पाटील, उदय गायकवाड, दिलीप देसाई आदी उपस्थित होते.

................

चौकट

वृक्षारोपणाचीही तयारी

जरगनगर, रामानंदनगर व आयसोलेशन हॉस्पिटल येथे सुरू असलेल्या नाला सफाई कामाची पाहणी आयुक्तांनी केली. हॉकी स्टेडियम येथील नाल्याची स्वच्छता करताना मोकळी जागा असल्याने या जागेचे सपाटीकरण करुन वृक्षारोपण करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. मोहिमेसाठी आवश्यक खड्डे खोदाई त्वरीत सुरू करा, असेही त्यांनी उद्यान विभागाच्या अधीक्षकांना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुप्पट काम करण्याची शिक्षा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'शिक्षक संघटनेचे नेते राजमोहन पाटील यांना मारहाण करणाऱ्या हातकणंगले पंचायत समिती शिक्षण विभागातील कर्मचारी शिवाजी येळे यांना दुप्पट कामांची शिक्षा दिली जाईल. त्यांची खातेनिहाय चौकशीही होईल', असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळास शुक्रवारी दिले.

संघटनात्मक काम, शिक्षकांचे प्रलंबित प्रश्नासंबंधी पाठपुरावा करण्यासाठी पाटील हे येळे यांच्याकडे १६ मे रोजी गेले होते. त्यावेळी येळे यांनी त्यांना अश्लील भाषेत उत्तर देवून उध्दट वागणूक दिली. चर्चेवेळी पाटील यांना त्यांनी मारहाण केली. यामुळे येळे यांच्यावर कडक कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीतर्फे प्रसाद पाटील, सतीश बरगे, मोहन भोसले यांच्या शिष्टमंडळाने सीईओ मित्तल यांना दिले. यावेळी चर्चा करताना मित्तल म्हणाले,' येळेंना निलंबित करू शकतो. मात्र निलंबितमध्ये सहा महिन्यानंतर कामावर पुन्हा रूजू करून घ्यावे लागते. यामुळे येळेंची बदली जिल्हा परिषदेत करून त्यांच्याकडून दुप्पट काम करून घेतले जाईल.

.............

अनोखी शिक्षा

प्रशासकीय चूक, दप्तर दिरंगाईसह आदी विविध कारणांनी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यासह इतर शिक्षा यापूर्वी देण्यात आल्या आहेत. मात्र पहिल्यांदाच येळे यांना उध्दट वागणुकीसंबंधी दुप्पट काम करण्याची अनोखी शिक्षा देण्याचा निर्णय मित्तल यांनी घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षकांना प्राप्तिकरच्या नोटीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे, हातकणंगले गटशिक्षणाधिकारी गजानन उकिरडे यांच्यासह ३६० शिक्षकांना प्राप्तिकर विभागाने नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. याविरोधात जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. शुक्रवारी यासंदर्भात समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अमन मित्तल यांची भेट घेतली.

१ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१५ अखेर हातकणंगले तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या पगारातून प्राप्तिकरांपोटी कमीत कमी २ हजार ते १५ हजार रूपयांपर्यंत रक्कम कपात झाली. ती प्राप्तिकरकडे दरमहा भरण्याची जबाबदारी गटशिक्षणाधिकारी उकिरडे यांची होती. ती वेळेत भरली नसल्याने 'प्राप्तिकर'कडून उकिरडे यांना दीड कोटी आणि सुमारे ३६० शिक्षकांना सन २०१४ आर्थिक वर्षातील थकीत प्राप्तिकर दिवसाला २०० रूपयांप्रमाणे भरावे, अशा नोटिसा आल्या आहेत. यासंबंधी शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी आपल्यालाही नोटीस आल्याचे सांगितले. प्राप्तिकर भरल्याचे पुरावे देण्याबरोबरच या प्रकरणात विशेष लक्ष घालावे, अशा सूचना सीईओ मित्तल यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या.

.......

कोट

'हातकणंगले तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना प्राप्तिकरसंबंधी नोटीस आल्या आहेत. पगारातून प्राप्तिकर कपात झाल्याचे नोटीस आलेल्या शिक्षकांचे म्हणणे आहे. प्राप्तिकर आयुक्तांची भेट घेऊन हे प्रकरण मार्गी लावण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.

अमन मित्तल, सीईओ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिंगरोडचे दुखणे कायम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरात वारंवार होणारी वाहतूक कोंडी कायमची दूर करण्यासाठी अवजड वाहतूक शहराबाहेर वळवण्याबरोबरच वेळही निश्चित केली. शहर वाहतूक शाखेने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणीही सुरू झाली. मात्र अवजड वाहतुकीसाठी रिंगरोड नसल्याने वाहनधारकांसह नागरिकांना प्रचंड त्रासाला जावे लागत आहे. गेल्या वर्षभरापासून कळंबा साई मंदिर ते फुलेवाडी रिंगरोडचा रस्ता निविदा प्रक्रियेत अडकल्याने येथील रहिवाशांचा जीव मेटाकुटीला आला आहे.

शहरात अवजड वाहतूक बिनधिक्कतपणे सुरू असल्याने वाहतूक कोंडीचा वाहनधारकांना नित्यानेच सामोरे जावे लागत होते. यातून मार्ग काडण्यासाठी डिसेंबर २०१८ मध्ये अवजड वाहतूक शहराबाहेर वळवण्याचा निर्णय घेतला. तसेच अवजड वाहतुकीसाठी वेळही निश्चित केली. शहर वाहतूक शाखा, जिल्हा पोलिस प्रशासन आणि महापालिकेने घेतलेल्या निर्णयाचे चांगले फलीत दिसून आले. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडीचा मार्ग काहीअंशी दूर झाला.

पण या निर्णयानंतर अवजड वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग असणारा रिंगरोड करण्याची जबाबदारी महापालिकेची होती. पण गेल्या अनेक वर्षांपासून कळंबा ते फुलेवाडी रिंगरोडचे काम रखडल्याने त्याचा त्रास वाहनधारकांना होत आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने त्यातून मार्ग काढताना कसरत करावी लागते. तसेच वारंवार अवजड वाहने खराब होण्याचे प्रमाणात वाढ होत आहे. रिंगरोडवरून वाहतूक वाढल्याने आणि रस्ता खराब असल्याने धुरासह, धुळीच्या प्रमाणात चांगलीच वाढ झाली आहे. परिणामी येथील नागरिकांना श्वसनासंबंधीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.

रिंगरोड रस्ता करण्यासाठी अनेकवेळा स्थानिक नागरिकांसह विविध पक्षांनी आंदोलने केली. स्वत: महापौर सरिता मोरे यांनी जानेवारी महिन्यात झालेल्या आंदोलनावेळी एक महिन्यात रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल असे आश्वासन आंदोलकांना दिले. पण अद्याप या कामाला सुरुवात झालेली नाही.

कोट

अवजड वाहतूक वळवण्यात आल्यानंतर रस्ता चांगला देण्याची जबाबदारी महापालिकेची होती. पण गेल्या अनेकवर्षापासून रिंगरोडचे काम झालेले नाही. रुस्ता दुरुस्ती होत नसल्यास किमान पॅचवर्क तरी भरावेत.

दिलीप जाधव, वाहनधारक

रिंगरोडच्या दहा कोटी ६० लाखांच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली आहे. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. पुढील आठवड्यात काम सुरू होईल.

नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोषण आहार संघटनेचा मोर्चा

$
0
0

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सेंट्रल किचन योजनेच्या माध्यमातून बचत गटातील महिलांवर अन्याय करु नका, शालेय पोषण आहाराचा ठेका महिला बचत गटांनाच द्या, या प्रमुख मागणीसाठी जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्यावतीने शुक्रवारी महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी मोर्चातील महिलांनी महापालिका प्रवेशद्वारावर जोरदार घोषणाबाजी केली. मागण्यांचे निवेदन महापौर सरिता मोरे यांना देण्यात आले. पोषण आहाराचा ठेका महिला बचत गटांना देवून त्यांचे संरक्षण करण्याची ग्वाही त्यांनी मोर्चेकरांना दिली.

महापालिकेची महासभा होणार असल्याने सभेसमोर पोषण आहार पुरवठ्यांबाबत विषय चर्चेला येण्यासाठी कामगार संघटनांनी मोर्चाचे आयोजन केले. बिंदू चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली. 'पोषण आहाराचे व्यापारीकरण करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो', 'रोजगार हिसकावून घेणारी केंद्रीय सेंट्रल किचन पद्धती रद्द करा', 'नारीशक्ती जिंदाबाद' आदी फलक घेवून महिला मोर्चात सहभागी झाल्या होत्या. शिवाजी चौकातून मोर्चा महापालिकेच्या प्रवेशद्वारावर आल्यानंतर सुरक्षारक्षकांनी मोर्चा अडवला. यावेळी महिलांनी राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.

निवेदन देण्यासाठी आलेल्या महिलांचे निवेदन महापौर मोरे यांनी प्रवेशद्वारावर येवून स्वीकारले. यावेळी त्यांनी 'सेंट्रल किचनला सभागृहाचा विरोध असून बचत गटातील महिलांना संरक्षण देण्यासाठी सभागृह सकारात्मक निर्णय घेईल,' अशी त्यांनी ग्वाही दिली.

राज्य सरकारने सेंट्रल किचनद्वारे पोषण आहार पुरवण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे महिला बचत गटातील महिलांवर बेरोजगार होण्याची वेळ येणार असल्याने काही नगरसेवकांनी महासभेत हा मुद्दा चर्चेला आणण्याची जोरदार तयारी केली होती. पण कोरमअभावी सभा तहकूब झाल्याने या विषयावर चर्चाच होऊ शकली नाही. मोर्चामध्ये माजी स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्ष प्राचार्य ए. बी. पाटील, अश्विनी साळोखे, वर्षा कुलकर्णी, पूनम भुकटे, लीलाताई सावंत, राणी आणुशे, महादोव फुटाणे, रेखा बेरनाळे आदी सहभागी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निकालाची घोषणा रात्री होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीच्या गुरूवारी होणाऱ्या बावीस फेऱ्यांतील ईव्हीएमच्या मतमोजणीसाठी अकरा तास तर व्हीव्हीपॅटच्या मोजणीसाठी पाच तास लागणार आहेत. एकूण सोळा तासात मतमोजणी प्रक्रिया होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. निकालाचा कल दुपारनंतर स्पष्ट होईल. मात्र अंतिम निकाल रात्री आठ ते बारा या वेळेत जाहीर होईल, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात जिल्हाधिकारी देसाई यांच्या उपस्थितीत मतमोजणीचे अंतिम प्रशिक्षण देण्यात आले. राजाराम कॉलेजच्या सभागृहात हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण देण्यात आले.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील कर्मचाऱ्यांना प्रांताधिकारी संपत खिलारी यांनी निवडणूक प्रक्रियेची सविस्तर माहिती देताना त्यांच्या शंकाचे समाधान केले. मतमोजणी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (ता. २३)पहाटे साडेपाच वाजता रमणमळा येथील शासकीय धान्य गोडावूनमध्ये उपस्थित राहण्याचा आदेश दिला. कर्मचाऱ्यांना मोबाइल आणण्यास बंदी घातली आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याचे ओळखपत्र तपासून आत सोडले जाईल. तपासणीसाठी दोन मेटल डिटेक्टर असतील.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात २२ फेऱ्यांत मतमोजणी होणार आहे. प्रत्येक फेरीत २२ टेबलांवर ईव्हीएममधील मतांची मोजणी होणार असून अर्धा तास वेळेचे नियोजन धरले असून यासाठी ११ तास लागतील असा अंदाज आहे. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांतील प्रत्येकी पाच व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांच्या मोजणीची प्रक्रिया राबवली जाणार आहे. पाच व्हीव्हीपॅट मशिन निवडण्यासाठी ड्रॉ काढण्यात येणार आहेत. त्यानंतर पाच व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची स्वतंत्रपणे मोजणी केली जाणार आहे. एका व्हीव्हीपॅटमधील मतमोजणीसाठी एक तासाचा वेळ धरला आहे. व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्या मोजणीसाठी चारही बाजूला जाळी असलेली मतमोजणी केंद्र तयार करण्यात आले आहे. व्हीव्हीपॅटमधील मोजणीनंतर अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितले.

हातकणंगले मतदारसंघात १७ फेऱ्यांसाठी साडेआठ तासांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सहाही मतदारसंघात प्रत्येकी पाच व्हीव्हीपॅटमधील मतमोजणी होणार आहे. येथे तेरा ते चौदा तासांत मतमोजणी पूर्ण होणार आहे. रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत अंतिम निकाल जाहीर होईल.

मतमोजणी रंगीत तालीम बुधवारी

आज अंतिम प्रशिक्षणानंतर बुधवारी (ता. २२) मतमोजणीची रंगीत तालीम रमणमळा आणि राजाराम तलाव येथील मतमोजणी केंद्रात होणार आहे. निवडणूक कर्मचाऱ्यांची ड्यूटी कोणत्या विधानसभा मतदारसंघात व कोणत्या टेबलवर आहे, याची माहिती गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता देण्यात येणार आहे. कंट्रोल युनिटमधील मतमोजणीबरोबर पोस्टल मतदानांसाठी स्वतंत्र कक्ष ठेवण्यात आला आहे.

विधानसभा मतदारसंघनिहाय फेऱ्या

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ

विधानसभा मतदारसंघ मतदान केंद्र टेबल फेऱ्या

चंदगड ३७६ २० १९

राधानगरी ४२३ २० २२

कागल ३५४ २० १८

कोल्हापूर दक्षिण ३३० २० १७

करवीर ३५२ २० १८

कोल्हापूर उत्तर ३१३ २० १६

हातकणंगले लोकसभा मतदारसंघ

शाहूवाडी ३७६ २० १७

हातकणंगले ३३० २० १७

इचलकरंजी २६७ २० १४

शिरोळ ३०१ २० १५

इस्लामपूर २९२ २० १५

शिराळा ३३४ २० १७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाइन बाजार येथे इफ्तार पार्टी

$
0
0

लाइन बाजार येथे इफ्तार पार्टी

म. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा

लाइन बाजारमधील हिंदू बांधवांनी येथील सुन्नत मुस्लिम जमात या मस्जिदमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. ऋतुराज पाटील यांच्या हस्ते फलाहार वाटप करण्यात आले.

मुस्लिम धर्मियांचा रमजानचा महिना सूरू आहे. या काळात मुस्लिम समाजातर्फे उपवास म्हणजेच (रोजा) ठेवला जातो. रात्री ७ नंतर उपवास सोडला जातो. यावेळी ऋतुराज पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी या बांधवाना उपवास सोडताना फलाहार वाटप केला. त्यांच्यासोबतच फळाचा आस्वाद घेतला.

यावेळी समाजाचे अध्यक्ष बाळ सय्यद यांनी लाइन बाजारमध्ये सर्वजण एकोप्याने राहतात. हा एकोपा इथून पुढेही असाच राहील. हिंदू बांधवानी आमच्यासाठी आयोजित केलेली इफ्तार पार्टी महत्त्वाची आहे असे सांगितले.

यावेळी असफअली मुजावर, नासिरभाई सय्यद, बालेखन पठाण, ताजुद्दिन शेख, निवास जाधव, लक्ष्मण गायकवाड, दीपक पडवळे, नाना दळवी, सतीश लाड उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पूल, रस्त्यांसाठी ३० कोटींचा निधी द्या’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा गडहिंग्लज

चंदगड विधानसभा मतदारसंघातील रस्ते अतिशय खराब झाले आहेत. दळणवळणाच्या सोयींसाठी पुलांची कामे ही जनतेच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. त्यामुळे या विभागातील पूलांचे बांधकाम व रस्त्यांच्या कामासाठी तीस कोटींच्या निधीची गरज आहे. नाबार्ड २५ कार्यक्रमांतर्गत निधीची तरतूद करावी अशी मागणी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

चंदगड विधानसभा मतदारसंघातील २१ पूलांचे बांधकाम व ९ रस्त्यांच्या कामासाठी निधीची आवश्यकता असल्याचे कुपेकर यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे. गडहिंग्लज तालुक्याला १४ कोटी २५ लाख, चंदगडसाठी दहा कोटी तर आजरा तालुक्यासाठी पाच कोटीची आवश्यकता आहे. मागणी केलेल्या प्रमुख पुलांच्या कामात कानूर खुर्द, गवसे ते कुरणी, खामदळे ते गुडवळे, मोटणवाडी ते वाघोत्रे, मासेवाडी घाटाच्या सुरुवातीला, जांभुळवाडी फाट्याजवळ, भडगावच्या चोथे वसाहतीजवळ, खामदळे ते हेरे, चंदगड ते कोकरे, काळमवाडी ते यमेहट्टी, सांबरे ते काळमवाडी, हडलगे गाव, आसनगाव ते चुरणेवाडा या पुलांचा समावेश आहे. रस्त्यांच्या प्रमुख कामांत कार्वे ते बेळगाव, हंदेवाडी ते बटकणंगले, जरळी ते दुंडगे, शृंगारवाडी ते शिरसंगी, नूल ते बसर्गे फाटा, तेरणी ते राज्यमार्ग अशा रस्त्यांचा समावेश आहे. चंदगड मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या डोंगराळ व अधिक पावसाचा आहे. त्यामुळे या मतदारसंघासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा. अशी मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठ बॅरल स्पिरीट, काळा गूळ जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने दोन ठिकाणी कारवाई करून अवैधरित्या गावठी आणि देशी दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे स्पिरीट आणि काळा गूळ पकडला. उचगाव रेल्वेरुळ परिसरातून स्पिरीट आणि किणी टोल नाका परिसरातून गूळ पकडून दोन्ही ठिकाणी मिळून सुमारे ६ लाख रुपयांचा मुद्मेमाल जप्त केला. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली. अवैद्य स्पिरिट प्रकरणी आकाश मनोज पवार (वय २३ रा. शेळके गल्ली, इचलकरंजी) व ओंकार अशोक सावंत (वय २१, रा. इचलकरंजी) या दोघांना आणि काळा गूळ वाहतूक केल्याप्रकरणी सर्जेराव संपत कांबळे (रा. चोपदारवाडी ता. पाटण) आणि सुनील दिनकर जाधव (रा. पेठवडगाव) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, निरीक्षक एस. एस. साळवे यांच्या पथकाला उचगाव येथील रेल्वे रुळाजवळ स्पिरिटची अवैध वाहतूक केली जात असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. त्यांनी पथक तैनात केले. या पथकाने छापा टाकून एक संशयित वाहन ताब्यात घेतले. त्यामध्ये आठ बॅरेल स्पिरीट सापडले. याप्रकरणी चालक आकाश पवार आणि ओंकार सावंत यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी अवैध वाहतुक केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून आठ बॅरेल मधील १६०० लिटर स्पिरीटसह वाहन असा एकूण ४ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

पथकाने दुसरी कारवाई पुणे-बेंगळुरू महामार्गावरील किणी टोल नाका येथे केली. पथकाला महामार्गावर एक संशयित मालवाहू टेम्पो दिसला. त्याची कसून तपासणी केली असता त्यामध्ये दारू तयार करण्यासाठी लागणाऱ्या गुळाचा साठा सापडला. टेम्पोचा चालक सर्जेराव कांबळे आणि सुनील जाधव यांनी गुळाची चोरटी वाहतूक करीत असल्याची कबुली दिली. पथकाने टेम्पोसह १० किलो गूळ असा सुमारे दीड लाखांचा मुद्मेमाल जप्त केला. कारवाईत उपनिरीक्षक प्रवीण शेलार, माधव चव्हाण, दत्तात्रय लाडके, जवान सुहास वरुटे, जयसिंग घोटाळे, सुखदेव सिद, स्वप्नील मोहिते, मोहन पाटील, दीपक कापसे, नितीन ढेरे आदींनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लग्नाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर वारंवार बलात्कार करुन लग्न करण्यास टाळाटाळ करुन फसवणूक करणारा संशयित किशोर अशोक पाटील (रा. येलूर ता. वाळवा, सांगली) याच्यावर कुरळप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी पीडित तरुणीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. अद्याप याप्रकरणी त्याला अटक केलेली नाही.

पोलिसांनी सांगितले की, संशयित किशोर पाटील आणि पीडित तरुणीची २०१३ पासून ओळख होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर ते दोघे एकमेंकांना भेटत होते. पीडित तरुणी नर्सिंग कोर्स करण्यासाठी कागल येथे येऊन राहिली होती. त्या वेळी संशयित किशोर तिला भेटण्यासाठी आला. त्या वेळी त्याने लग्नाचे आमिष दाखवून शिये फाटा येथील लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर वांरवार आमिष दाखवून पीडित तरुणीवर अत्याचार केला. त्या पीडित तरुणीचा नर्सिंगचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर विवाह करण्याचे सांगून अनेकदा टाळाटाळ केली. त्यानंतर बहिणीचे लग्न झाल्यानंतर लग्न करू असे खोटे आश्वासन दिले. मात्र लग्न केले नाही. २०१३ ते २२ एप्रिल २०१९ या कालावधीत संशयित पाटील याने पीडित तरुणीच्या कुटुंबियांना ठार मारण्याची आणि तरुणीची गावात बदनामी करण्याची धमकी देऊन अत्याचार केला. अखेर त्या तरुणीने घडलेला सर्व प्रकार पालकांना सांगितला. त्यांनी त्याच्या विरोधात कुरळप पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान तो एका राजकीय नेत्याशी संबधित असल्याने त्याच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस ठाण्यात जोडप्याला मारहाण

$
0
0

वम. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

प्रेमविवाह केल्याच्या रागातून भावाने बहिणीसह तिच्या प्रियकरास शाहूपुरी पोलिस ठाण्यातच 'सैराट' स्टाइलने मारहाण केल्याचा प्रकार १६ मे रोजी घडला. भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिस कॉन्स्टेबलला धक्काबुक्की करुन गळपट्टी धरत त्यांचेही कपडे फाडले. अखेर पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी संशयित शुभम रवींद्र शिंगटे (वय २३, रा. मर्ढे, जि. सातारा) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली.

शाहूपुरी पोलिसांनी पोलिसांनी सांगितले की , शुभम चंद्रकांत कांबळे (रा. जाधववाडी) याने किर्ती रवींद्र शिंगटे हिच्याशी प्रेमविवाह केला. दोघेही १६ मे रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास शाहूपुरी पोलिस ठाण्यात हजर झाले. त्यानंतर गुन्हे शोध पथकाच्या कक्षात हवालदार रामदास बागुल यांच्यासमोर जबाब घेण्याचे काम सुरू होते. त्या वेळी किर्तीचा भाऊ संशयित शुभम शिंगटे त्या ठिकाणी आला. त्याने पोलिसांसमोरच दोघांना शिवीगाळ सुरू केली. त्याने बहिणीसह तिचा प्रियकर पती शुभम कांबळे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. सुमारे दहा मिनिटे हा प्रकार सुरू होता. अचानक झालेल्या प्रकारामुळे पोलिसही चक्रावले. कॉन्स्टेबल नारायण कोरवी यांनी संशयित शिंगटेला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतापलेल्या शिंगटे याने पोलिस कॉन्स्टेबल कोरवी यांची गळपट्टी धरून धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. कोरवी यांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने कोरवी यांचे कपडेही फाडले. 'तुला ठेवतच नाही, ठार मारून टाकतो,' अशी धमकी त्याने बहिणीसह तिच्या पतीला दिली. कोरवी यांच्यासोबतही त्याची पाच मिनिटे झटापट सुरु होती. अखेर चार ते पाच पोलिसांनी शिंगटे याला ताब्यात घेतले. त्याच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. या प्रकारानंतर शुभम आणि कीर्ती हे दोघेही घाबरले. त्याची पोलिसांनी समजूत काढली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छता मोहीम आज

$
0
0

कोल्हापूर : महापालिकेच्यावतीने शहरातील विविध नाल्यांची स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. स्वच्छता मोहिमेचा पुढील टप्पा म्हणून रविवारी (ता. १९) सकाळी साडेसहा वाजता आयसोलेशन हॉस्पीटल येथील डी वॅट्स प्रकल्पाजवळील अॅग्रिक्लचर लँड व रामानंदनगर येथून येणाऱ्या नाल्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यासाठी जेसीबी व पोकलॅनचा वापर करण्यात येणार आहे. स्वच्छता मोहिमेमध्ये सामाजिक संस्था, युवक मंडळे व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर सरिता मोरे व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालकमंत्र्यांमुळेच पाणी टंचाई

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गडहिंग्लज

'राज्यात आघाडीचे सरकार असताना अधिकचे ११ टीएमसी पाणी अडविण्याचे नियोजन केले होते. पण, युतीचे सरकार आल्यानंतर पालकमंत्री म्हणून त्याची पूर्तता करण्याची जबाबदारी चंद्रकांत पाटलांची होती. चंद्रकांत पाटील यांच्या निष्क्रिय कारभारामुळे गडहिंग्लज तालुक्यात पाणीटंचाईची झळ बसत आहे, 'अशी टीका आमदार हसन मुश्रीफ यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केली.

आमदार मुश्रीफ म्हणाले, 'गेल्या साडेचार वर्षात एक थेंबही पाणी अडविले नाही. पुनर्वसनासंदर्भातील फाइल टेबलावर धूळ खात पडून आहे. पुनर्वसन खात्याचे मंत्री असणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे अनेक प्रकल्प अपूर्ण आहेत. जिल्ह्यात जमा होणाऱ्या बिगर सिंचनाच्या पाणीपट्टीतील चाळीस टक्के रक्कम प्रकल्पांच्या व्यवस्थापनावरच खर्च होणे अपेक्षित आहे. पण याच रकमेतून गेली तीन वर्षे विज बिल भरले जात आहे. अशा निष्क्रियतेमुळे पाणी टंचाईची झळ बसत आहे.'

आमदार मुश्रीफ म्हणाले, 'गडहिंग्लज भागात पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर आहे. चित्रीमध्ये अवघे साडेतीनशे एम सीएफटी इतकाच पाणीसाठा आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस लांबला तर गडहिंग्लज शहरासह अनेक गावांना पाणीपुरवठा कसा होणार? हा यक्षप्रश्न आहे. चित्री प्रकल्पाच्या पाणी नियोजनाबाबत पाटबंधारे विभागाने हलगर्जीपणा केला आहे. त्यामुळे नदी कोरडी पडली आहे. याला जबाबदार पाटबंधारे विभागाचे उपअभियंता सुहास नाडकर्णी यांची चौकशी झाली पाहिजे' अशीही मागणी मुश्रीफ यांनी केली.

याप्रसंगी किरण कदम, रामदास कुराडे, हारूण सय्यद व जि. प. सदस्य सतीश पाटील आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंकराचार्य पालखी सोहळा उत्साहात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात आज आद्य शंकराचार्यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी पालखी सोहळा उत्साहात झाला. शहरातील प्रमुख मार्गावरुन मिरवणूक काढण्यात आली. करवीरपीठाचे विद्यानृसिंह भारती शंकराचार्य यांच्यासह कोल्हापूरसह सांगली, सातारा, मुंबई, पुणे गोव्यातील भाविक सहभागी झाले होते.

शुक्रवार पेठेतील करवीर पीठ शंकराचार्य मठातील चौकात फुलांनी सुशोभित केलेल्या पालखीत शंकराचार्यांच्या पादुकांचे पूजन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यानृसिंह भारती, मठाचे व्यवस्थापक मंडळाचे चेअरमन प्रसाद चिकसकर, सचिव शिवस्वरुप भेंडे, सदस्य अॅड सुरेश कुलकर्णी, धनंजय मालू, रामकृष्ण देशपांडे, अरुण देसाई, नंदकुमार मराठे उपस्थित होते. त्यानंतर पारंपरिक वादयाच्या गजरात शंकराचार्याच्या जयघोषात मिरवणूकीस प्रारंभ झाला. पंचगंगा रोड, गंगावेश, रंकाळावेस, तटाकडील तालीम मार्गे अंबाबाई मंदिरात पालखी आले. तटाकडील तालमीजवळ फुलांची उधळण करुन पालखीचे स्वागत करण्यात आले. अंबाबाई मंदिरात देवस्थान समितीच्यावतीने मिलिंद घेवारी, रोशन नाईक, निवासराव चव्हाण, खजिनदार महेश खांडेकर, चोपदार प्रसाद नाडगोंडे यांनी स्वागत केले. पालखीने गरुड मंडपात काही काळ विश्राम घेतला. शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर पालखी महाद्वार रोड, पापाची तिकटी, गंगावेश, पंचगंगा रोड मार्गे शंकराचार्य मठात आली. आरती करुन पालखी सोहळ्याचा समारोप करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images