Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

आणखी एका सावकाराला खंडणी प्रकरणी अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

किरवे (ता. गगनबावडा) येथील खासगी सावकारीतून तरुणाचे अपहरण करणाऱ्या आणखी एका सावकारास जुना राजवाडा पोलिसांनी शनिवारी अटक केली. संशयित पुष्कराज मुकुंद यादव (वय २०, रा. शिंगणापूर, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे. त्याच्यासह सूरज हणमंतराव साखरे (२८, रा. कश्यप हाईट अपार्टमेंट, देवकर पाणंद), त्याचा साथीदार ऋषभ सुनील भालकर (२१, रा. जनाई दत्तनगर, कळंबा रोड) यांना कोर्टासमोर हजर केले असता तीन दिवसांनी पोलिस कोठडी सुनावली.

सावकारांनी २५ लाखांच्या खंडणीसाठी पिस्तुलाचा धाक दाखवून ६ ते ८ मे रोजी रणजित बाबूराव पाटील याचे अपहरण करून त्याला डांबून ठेवून मारहाण केल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. साखरे याच्यावर आतापर्यंत दरोडा, चोरी, अपहरण, मारहाणीचे नऊ गुन्हे दाखल आहेत. तो सराईत असून त्याचे अन्य साथीदार महाडिक, युनूस मुजावर, धीरज, पार्थ यांचा पोलिस शोध घेत आहेत. मोबाइल बंद ठेवल्याने त्यांचे लोकेशन सापडत नाही. त्यांना लवकरच ताब्यात घेतले जाईल, असे पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विठूरायाची राऊळी बनली आमराई

$
0
0

विठूरायाची राऊळी बनली आमराई

पुण्याच्या भक्ताकडून विठ्ठल मंदिरात अकरा हजार आंब्याची आरास

सोलापूर/ पंढरपूर

सध्या आंब्याचा हंगाम सुरू आहे. भक्‍तांकडून देवालाही आंब्‍यांचा नैवेद्य आवडीने दाखवला जात आहे. लोकदैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हापूस आणि केशर आंब्याची आरास करण्यात आली. त्‍यामुळे विठ्ठल-रखुमाईचे मंदिर आमराईसारखे बहरल्‍याचे दिसत आहे. विनायक कांची या पुण्यातील विठ्ठल भक्तांनी आंब्याची आरास केली आहे.

अक्षय तृतीयेपासून आंब्याचा हंगाम सुरू होतो, असे मानले जाते. सध्या राज्यात सर्वत्र आंब्याची बाजारपेठ फुलली आहे. बाजारात ग्राहकांची आंब्याला मोठी मागणीही वाढली आहे. लोकांच्या याच आंबे प्रेमाचे प्रतिबिंब लोकदेवता विठ्ठलाच्या मंदिरातही उमटले आहे. पुणे येथील विठ्ठल भक्त आंब्याचे व्यापारी विनायक कांची यांनी तब्बल अकरा हजार अस्‍सल हापूस आंबे विठ्ठलास अर्पण केले. सध्या बाजारात हापूस आंब्याचा असणारा दर लक्षात घेता सुमारे ४ लाख ५० हजार रुपये किमतीचे हे आंबे आहेत. श्री विठ्ठल रुक्मिणीचा गाभारा, चौखांबी, सोळखांबी सभामंडप सर्व आंब्यानी सजवला आहे. पहाटे महापूजा आणि काकडा आरती झाल्यानंतर देवास गुलाबी रंगाची अंगी, पिवळया रंगाचे सोवळे, असा पोशाख केला आहे. आंब्यासोबत आंब्याचे हिरवे डहाळे बांधल्यामुळे त्‍यातचे गाभाऱ्यात मधुर आंब्‍याचा दरवळ पसरल्‍याने आमराईत आल्याचा भास भाविकांना होतो आहे. सकाळपासूनच दर्शनास आलेल्या भाविकांकडून या अभिनव आरासीचे कौतुक होत आहे. या आंब्याचा रस करून देवस्थानच्या अन्नछत्रात भाविकांना दोन, ते तीन दिवस पुरवला जाणार असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पक्षादेश मिळाल्यास विधानसभा लढवणारमहसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

$
0
0

पक्षादेश मिळाल्यास विधानसभा लढवणार

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

'मी शरद पवार यांच्याच उमेदवाराला दोन वेळा हरवून पदवीधर मतदारसंघातून निवडून आलो आहे, हे पवार विसरतात. पक्षाने आदेश दिल्यास मी विधानसभाच काय लोकसभा देखील लढवेन,' असा टोला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना लगावला. मागच्या दाराने आलेल्यांनी एकदा तरी लोकांतून निवडून यावे, अशी खोचक टीका शरद पवार यांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी पाटील बोलत होते.

पाटील म्हणाले, 'लोकसभा निकालाची तारीख जवळ येऊ लागल्याने पवारांची चलबिचल वाढली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील बारामतीसह सर्व दहा जागा आम्ही जिंकणार आहे, पवारांना याचा अंदाज आल्यानेच बारामतीतून हरलो तर इव्हीएम मशीनवर शंका उपस्थित होईल, अशी भाषा पवारांनी सुरू केली आहे. पदवीधर निवडणूक ही देखील एक निवडणूकच असते, त्यात ५ जिल्हे, ५८ विधानसभा आणि १० लोकसभेचे कार्यक्षेत्र असते. त्यातून निवडून यावे लागते, हे शरद पवार विसरलेत काय?'

छावण्यांच्या अनुदानात वाढ करणार

चार छावण्यांत शेतकऱ्यांशी चर्चा केल्यावरच जनावरांच्या चाऱ्यात तीन किलोंची वाढ केली आहे. आता पेंडही रोज एक किलो देणार आहे. चारा छावण्यांच्या अनुदानातही १५ ते २० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. छावण्यांत जनावरांच्या मागे थांबलेल्या लोकांना काय काम देता येईल, या वरही विचार करणार आहोत. सध्या रोजगार हमी योजनेतून ५ लाख मजूर कामांवर असून, अजून ५ लाख मजुरांचे काम तयार आहे. मात्र, लोक कामांवर जात नाहीत, असेही पाटील म्हणाले. दरम्यान, शनिवारी पाटील यांनी सांगोला मंगळवेढा तालुक्यातील छावण्यांची रात्री उशिरापर्यंत पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाण्यासाठी रास्ता रोको

$
0
0

थोडक्यात

पाण्यासाठी रास्ता रोको

परभणी : निम्न दुधना प्रकल्पातून नदीपात्रात तत्काळ पाणी सोडा या मागणीसाठी शनिवारी रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास मोरेगाव येथील दुधना नदी पुलावर सेलू तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे सेलू-देवगाव फाटा रस्तावरील वाहतूक ठप्प झाली होती. दुधना नदीकाठावरील अनेक गावांचा पाणी पुरवठा नदीपात्रात खोदण्यात आलेल्या विहिरीवर अवलंबून आहे. पाणी सोडले तर तालुक्यातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल व जनावरांना पाणी उपलब्ध होईल. तहसीलदार बालाजी शेवाळे यांना निवेदन देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चारचाकी गाडीलाअचानक आग

$
0
0

थोडक्यात

चारचाकीला आग

सातारा : म्हसवड एसटी बसस्थानकासमोरील शहरात जाणाऱ्या रस्त्यावरून चाललेल्या मारुती इसटीम या गाडीस अचानक आग लागली. गाडीतील पाच जण तातडीने बाहेर पडल्याने कोणतीही अघटीत घटना घडली नाही. पळशी येथील सागर भगवान सावंत मुंबई येथे रहात असून, ते गावी उन्हाळ्याच्या सुट्टी निम्मित आले होते. घरातील नातेवाईकांना घेऊन मारुती इसटीम ही गाडी घेऊन म्हसवडला आले होते. कपडे व इतर साहित्य खरेदी करून परत पळशीला निघाले असता, म्हसवड एस.टी. बसस्थानकाकडे जाताना गाडीच्या बॉनेटमधून अचानक धूर व जाळ निघू लागला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच शाळा होणार आंतरराष्ट्रीय दर्जाच्या

$
0
0

थोडक्यात

पाच शाळा होणार

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या

कराड : सरकारच्या योजनेनुसार राज्यातील २१ जिल्हा परिषद शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्यात येणार आहेत. त्यामध्ये कराड तालुक्यातील वाघेश्वर, खोडशी, तूळसण, पेंबर व कोळे या पाच शाळांचा समावेश झाला असल्याची माहिती पंचायत समितीच्या मासिक सभेत गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत निकम यांनी दिली. निकम म्हणाले, बाळेवाडी (ता. शिरूर, जि. पुणे) येथे गेल्या दोन मे रोजी जावून आम्ही तेथील आंतरराष्ट्रीय शाळेची पाहणी केली आहे. त्या धर्तीवर या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील २१ जिल्हा परिषद शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्याचे सरकारचे धोरण आहे. त्या नुसार कराड तालुक्यातील पाच शाळांचा समावेश झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांचा शोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पक्षांतरबंदी कायद्यामुळे अपात्र ठरलेल्या पद्माराजे उद्यान आणि सिद्धार्थनगर या दोन प्रभागांतील रिक्त पदांसाठी मतदार यादी दुरुस्तीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. दुरुस्ती, हरकती आणि अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होऊन जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांना तगड्या उमेदवारांचा शोध घ्यावा लागेल. आगामी विधानसभा निवडणुकीमुळे महापालिका पोटनिवडणुकीला अनन्यसाधारण महत्त्व येणार आहे.

२०१५ च्या निवडणुकीत महापालिकेच्या राजकारणामध्ये पक्षीय राजकारणाने जम बसवला. नगरसेवक फोडाफोडीच्या राजकारणाला बगल मिळाल्याने याचे शहरवासियांनी स्वागत केले. पक्षीय पातळीवर झालेल्या निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नसले, तरी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना व ताराराणी आघाडी कार्यकर्त्यांनी महापालिकेत प्रवेश केला. बहुमतासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली. त्याला शिवसेनेने आतून-बाहेरुन पाठिंबा दिला. परिणामी महापालिकेत प्रथमच भाजप-ताराराणी आघाडीच्या रुपात एक तगडी विरोधी आघाडीही अस्तित्वात आली.

मात्र काठावरील बहुमतामुळे सत्तारुढ काँग्रेस आघाडीला सुरुंग लावण्याचा सातत्याने प्रयत्न झाला. फेब्रुवारी २०१७ च्या स्थायी समितीमध्ये विरोधी आघाडीला त्यामध्ये यश आले. राष्ट्रवादीचे पद्मराजे उद्यान प्रभागातील नगरसेवक अजिंक्य चव्हाण आणि सिद्धार्थनगर प्रभागाचे नगरसेवक अफजल पिरजादे हे विरोधकांच्या गळाला लागले. पक्षाचे अधिकृत सदस्य असताना त्यांनी विरोधी पक्षाला मतदान केले. त्यामुळे त्यांच्यावर पक्षांतरबंदी कायद्यानुसार कारवाई करण्याची शिफारस पक्षाने केली. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई होऊन त्यांना विभागीय आयुक्तांनी अपात्र ठरवले. नंतर कोर्टानेही अपात्रतेचा निर्णय कायम ठेवला. मात्र, गेल्या दीड वर्षापासून दोन्ही प्रभागांतील पोटनिवडणूक लांबणीवर पडली होती. अखेर शुक्रवारी मतदार यादी दुरुस्तीचा कार्यक्रम प्रशासनाने जाहीर केला. मतदार यादी दुरुस्ती, त्यावरील हरकती होऊन अंतिम यादी प्रसिद्ध होण्यास एक ते दीड महिना लागणार असल्याने जुलैच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक होण्याची शक्यता आहे.

मात्र, जुलैमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांना तगड्या उमेदवारांचा शोध घ्यावा लागेल. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापौरपद आपल्या आघाडीला मिळविण्यासाठी दोन्ही आघाड्यांकडून जोरदार प्रयत्न केले जातील. लोकसभा निवडणुकीचे पडसाद पोटनिवडणुकीत उमटले तर काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, ताराराणी स्वतंत्रपणे लढण्याची दाट शक्यता आहे. पंचवार्षिक निवडणुकीत हे सर्व पक्ष वेगळे लढले तरी पडद्यामागे एकमेकांना मदतीची भूमिका घेतली होती. मात्र या निवडणुकीत तशी शक्यता अगदीच कमी दिसते.

पद्माराजे उद्यान प्रभागातून राष्ट्रवादीकडून माजी महापौर सुनीता राऊत, माजी नगरसेवक अजित राऊत किंवा कोराणे कुटुंबातील एका व्यक्तीला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसकडून विक्रम जरग मैदानात उतरू शकतात. त्याचप्रमाणे शिवसेनेकडून महेश चौगले तर शेकापच्यावतीने स्वप्नील पाटोळे यांची उमेदवारी दाखल होऊ शकते. येथे भाजप व ताराराणीला उमेदवारांचा शोध घ्यावा लागेल.

सिद्धार्थनगर या ओबीसी प्रवर्गामध्ये राष्ट्रवादीला उमेदवाराचा शोधण्याची वेळ येणार आहे. काँग्रेसकडून जय पटकारे, शिवसेनेकडून तेजस्विनी घोरपडे तर ताराराणी आघाडीकडून लईक पिरजादे पुन्हा निवडणूक रिंगणात उतरतील. धनंजय सावंत यांनीही कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशासन घेणार विधिज्ञांचा अभिप्राय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी काँग्रेसचे नगरसेवक दिलीप पोवार व सुभाष बुचडे यांच्यावर पद अपात्रतेची टांगती तलवार निर्माण झाली आहे. पद अपात्रतेची कारवाई आयुक्तांना करता येते किंवा नाही हे पडताळण्यासाठी महापालिका प्रशासनाने ज्येष्ठ विधिज्ञांचा अभिप्राय मागवला आहे. त्यांच्याकडून अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर दोन्ही नगरसेवकांच्या अपात्रेबाबतचा निर्णय होणार आहे.

बुचडे व पोवार यांच्याविरोधात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी तक्रार दाखल झाली होती. त्यानुसार राज्याच्या नगरविकास विभागाचे प्रधानसचिवांनी महापालिकेला कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्याविरोधात पोवार यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. पोवार यांच्या वकिलांनी हायकोर्टाने यापूर्वी दिलेल्या निकालाचा आधार घे‌वून अशा स्वरुपाची कारवाई आयुक्तांना करता येणार नाही, असा युक्तीवाद केला होता. त्यानुसार महापालिकेच्या नगरविकास आणि विधी विभागाने ज्येष्ठ विधिज्ञांचा अभिप्राय मागवला आहे. अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर दोन्ही नगरसेवकांच्या अपात्रतेचा निर्णय होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मोटारसायकल धडकेत तरुणाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नागाव फाटा येथे दुचाकीच्या समोरसमोर झालेल्या धडकेत महांतेश सिदराम हलकुडे (वय २७ रा. मुंदर्गी, ता. अक्कलकोट, सध्या रा. यादववाडी, पुलाची शिरोली) या तरुणाचा मृत्यू झाला. शनिवारी दुपारी हा अपघात झाला. सीपीआरमध्ये उपचार सुरू असताना महांतेश याचा दुर्देवी मृत्यू झाला.

पोलिसांनी सांगितले की, महांतेश हा शिरोली एमआयडीसी येथे एका ट्रान्स्पोर्ट कंपनीत दिवाणजी म्हणून काम करत होता. तो दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शिरोली येथील यादववाडीकडे जेवण करण्यासाठी जात होता. त्यावेळी नागाव फाटा येथे समोरुन येणाऱ्या दुचाकीची जोरदार धडक झाली. यामध्ये महांतेश याच्यासह दुचाकीस्वार प्रसाद गणेश औंधकर (वय ३५ रा. माधवनगर, सांगली) हे गंभीर जखमी झाले. महांतेशला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर हलकुडे यांचे नातेवाईक आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सीपीआरमध्ये मोठी गर्दी केली. महांतेश यांच्या पश्चात आई, पत्नी आणि पाच महिन्यांची लहान मुलगी आहे. सीपीआरच्या आवारात त्यांच्या नातेवाईकांनी केलेला आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाजाचे अर्थकारण समजून घेण्याची गरज

$
0
0

लोगो : माणगाव परिषद व्याख्यानमाला

फोटो आहे

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'आर्थिक अधिकार जातीनुसार निश्चित केल्याने सांपत्तिक विषमता निर्माण झाली. विषमतेमुळे जाती-जातीमध्ये सामाजिक संबंध प्रस्थापित होऊ शकले नाहीत. असे सामाजिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी उपेक्षित घटकांनी समाजाचे अर्थकारण समजून घेऊन प्रगतीच्या नव्या वाटा शोधाव्यात,' असे प्रतिपादन पुणे येथील सावित्री फुले विद्यापीठाचे प्रा. डॉ. नितीन तागडे यांनी केले.

माणगाव परिषद शताब्दी महोत्सव व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. राजर्षी शाहू स्मारक भवन येथे झालेल्या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष प्रा. विनय कांबळे होते. 'आर्थिक लोकशाही' हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.

डॉ. तागडे म्हणाले, 'भारतीय पारंपरिक समाजामध्ये जातीनुसार आर्थिक अधिकार निश्चित केले. त्यानुसार प्रत्येकाचे उत्पन्न होईल अशी अपेक्षा गृहित धरण्यात आली. पण त्यामुळे सांपत्तिक विषमता निर्माण झाली. परिणामी जाती-जातीमध्ये सामाजिक संबंध प्रस्थापित होऊ शकले नाहीत. हे लोकशाही बळकटीकरणास मारक ठरले. केवळ राजकीय लोकशाही बळकट झाल्यानंतर देशाची लोकशाही बळकट होईल अशी अपेक्षा व्यक्त करता येणार नाही. त्यासाठी सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीसुद्धा सुदृढ झाली पाहिजे. उपेक्षितांच्या समस्यांकडे राज्यकर्त्यांनी आणि समाजानेही डोळसपणे पाहिले नाही. त्यामुळे सर्व घटकांचा समान आर्थिक विकास होऊ शकला नाही आणि आर्थिक लोकशाहीला बळ मिळाले नाही.'

अध्यक्षीय भाषणात प्रा. विनय कांबळे म्हणाले, 'आर्थिक विषमता दूर करण्यासाठी कररचनेमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक नागरिकाला समान कर निश्चित केल्यास आर्थिक लोकशाही बळकट होऊन देशाचा विकासाचा वेग आणखी वाढले.'

प्रा. अशोक चोकाककर यांनी स्वागत केले. राहुल ठाणेकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सिद्धार्थ पद्माकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. ए. बी. कांबळे यांनी आभार मानले.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजार समिती कर्मचाऱ्यांनाफरकाविना सातवा वेतन आयोग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्र व राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना एप्रिलपासून सातवा वेतन आयोग लागू केला. त्यामुळे कामगारांच्या पगारात ३६०० रुपयांपासून १८ हजार रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांना यापूर्वीच्या ३९ महिन्यांचा फरक न देण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला. त्यास कर्मचाऱ्यांनी सहमती दिली. त्यामुळे बाजार समितीचे तीन कोटी ९० लाख रुपये वाचले आहेत.

राज्यात कोल्हापूर बाजार समिती आर्थिकदृष्ट्या सक्षम असून समितीची वार्षिक उलाढाल १८०० कोटी रुपयांची आहे. समितीचे करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड व कागल अशा पाच तालुक्यांत कार्यक्षेत्र आहे. येथील गुळाची बाजारपेठ मोठी असून फळे, भाजीपाला, धान्याची मोठी उलाढाल होते. बाजार समितीचे वार्षिक १४ कोटी उत्पन्न आहेत. राज्य सरकारने बाजार समितीला जानेवारी २०१६पासून सातवा वेतन आयोग लागू करण्याचा आदेश दिला होता. राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू केला आहे. ३६ महिन्यांच्या वेतनवाढीचा फरक रोखीने अथवा प्रॉव्हिडंट फंडात वर्ग केला जातो. मात्र बाजार समितीने ३९ महिन्यांचा फरक न देता एप्रिलपासून सातवा वेतन आयोग लागू केला. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात ३५०० रुपयांपासून १८ हजार रुपयांपर्यंत पगारवाढ झाली आहे. फरक न देता वेतन आयोग लागू करण्यास कर्मचाऱ्यांनीही मान्यता दिल्याने समितीचे सुमारे चार कोटी रुपये वाचले आहेत. दरम्यान, सातवा वेतन आयोग लागू केल्याने बाजार समितीवर मासिक एक लाख रुपयांचा बोजा वाढणार आहे. वार्षिक एक कोटी रुपयांची पगारासाठी तरतूद करावी लागणार आहे. वेतन आयोग लागू केल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुणवत्ता दाखवून बाजार समितीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी योगदान द्यावे लागणार आहे.

राज्य सरकारच्या आदेशानुसार सातवा वेतन आयोग लागू करावा लागणार होता. जानेवारी २०१६ पासून फरक न देता एप्रिल २०१९ पासून वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांनीही सहकार्य केले असल्याने ते अभिनंदनास पात्र आहेत.

- बाबासाहेब लाड, सभापती, बाजार समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेळकेसह १५ जणांना क्लीन चिट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वाई येथील सीरियल किलर डॉ. संतोष पोळ याने कळंबा कारागृहात पिस्तूल घेऊन व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणात निलंबित केलेले कारागृहाचे तत्कालीन अधीक्षक शरद शेळके यांच्यासह पंधरा जणांना चौकशी समितीने क्लीन चिट दिली आहे. त्यांच्यावर निलंबनाची कारवाईही मागे घेण्यात आली आहे. या प्रकरणात कारागृह अधीक्षक शरद शेळके यांची विसापूर कारागृहात बदली करण्यात आली होती. त्यांची पुन्हा कळंबा कारागृहाच्या अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली असून, शेळके यांनी शनिवारी पदाचा कार्यभार स्वीकारला.

खुनाच्या गुन्ह्यात अटकेत असलेला डॉ. संतोष पोळ हा कळंबा कारागृहात शिक्षा भोगत होता. त्याने २७ नोव्हेंबर २०१८ रोजी बनावट पिस्तूल हातात घेऊन कळंबा कारागृहात मोबाइलवर क्लिप तयार केली होती. ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केली होती. या प्रकाराने कारागृहात मोठी खळबळ उडाली होती. कारागृह प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेत चौकशीसाठी पश्चिम विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी चौकशीत १५ कर्मचाऱ्यांना दोषी ठरवून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. या सर्व प्रकरणाचा ठपका कारागृह अधीक्षक शरद शेळके यांच्यावर ठेवून त्यांचीही विसापूर कारागृहात बदली करण्यात आली होती.

त्यानंतर संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी येरवडा कारागृहाचे अधीक्षक ए. टी. पवार यांची समिती नियुक्त केली होती. या समितीने चौकशी करुन अहवाल गृह विभागाला सादर केला होता. या अहवालात १५ कर्मचाऱ्यांना क्लीन चीट देण्यात आली आहे. सातारा, पुणे, मुंबई येथील कारागृहात या कर्मचाऱ्यांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले. शेळके यांची पुन्हा कळंबा कारागृहाचे अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. कारागृहाचे अधीक्षक दत्तात्रय गावडे यांनी पुन्हा विसापूर येथील खुल्या कारागृहात अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हरिश स्वामीची अलिशान कार जप्त

$
0
0

विवाहितेवर अत्याचार प्रकरण

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सावकारीच्या व्याजापोटी विवाहितेवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या मुख्य संशयित हरिश विजयकुमार स्वामी (वय २२, रा. रुईकर कॉलनी) याने गुन्ह्यात वापरलेली आलिशान कार शाहूपुरी पोलिसांनी शनिवारी जप्त केली. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असून लवकरच त्याला अटक केली जाईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी शनिवारी दिली.

व्यवसायासाठी पतीने घेतलेले ३० हजार रुपयांचे कर्ज वसुलीसाठी सातत्याने घरी येणारा खासगी सावकार हरिश स्वामीने विवाहितेला धमकावून कर्ज माफ करण्याची आमिष दाखविले होते. त्याचे दोघे साथीदार सद्दाम मुल्ला व आशिष पाटील यांनी विवाहितेवर अत्याचार केले. विवाहितेची अश्लील चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला होता. हरिशने टाकाळा येथील एका कॅफेमध्ये विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर खासगी रुग्णालयात पंधरा दिवस उपचार सुरू आहेत. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून त्याला लवकरच ताब्यात घेतले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी स्वामीला अटक करण्यात येणार असल्याची माहिती चार दिवसांपूर्वी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल चोरी प्रकरणी अल्पवयीन चोरटा ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भाऊसिंगजी रोडवरील योगीराज मोबाइल शॉपीमध्ये खिडकीतून प्रवेश करून मोबाइल आणि रोकड लंपास करणाऱ्या एका अल्पवयीन चोरट्याला महापालिका परिसरातून लक्ष्मीपुरी पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतले. मोबाइल चोरीची त्याने कबुली दिल्याची माहिती लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक वसंत बाबर यांनी दिली. पोलिसांनी ४८ तासांत या चोरट्याला ताब्यात घेऊन त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली.

गजबजलेल्या भाऊसिंगजी रोडवरील योगीराज शॉपीमध्ये या अल्पवयीन चोरट्याने दुकानाच्या पोटमाळ्यावरुन खिडकीतून प्रवेश करुन सहा मोबाइल आणि काउंटरमधील ७२ हजारांची रोकड असा एकूण १ लाख ९ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. याप्रकरणी पोलिसांनी शॉपीमधील सीसीटीव्हीचे फुटेज पाहून तपास सुरू केला होता. शॉपीचे मालक योगेश बनछोडे यांनी फिर्याद दाखल केली होती. शॉपीमधील सीसीटीव्हीचे फुटेजमध्ये अल्पवयीन चोरट्याच्या पायात व्यंग असल्याचे असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी अशा प्रकाराच्या अल्पवयीन मुलांचा शोध दुकानाच्या परिसरात घेतला. त्या वेळी अशा प्रकारे लंगडत चालणारा एक दिव्यांग अल्पवयीन मुलगा महापालिकेजवळ राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तपास सुरू केला. पथकाला कलकुटकी गल्लीत एक मुलगा लंगडत चालल्याचे दिसले. कसून चौकशी केली असता त्याने मोबाइल शॉपीमध्ये चोरी केल्याची कबुली दिली. चोरलेला मुद्देमाल त्याने राहत्या घराच्या तिसऱ्या मजल्यावरील खोलीत ठेवल्याचे सांगितले. हा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. कारवाईत पोलिस उपनिरीक्षक अभिजित भोसले, पोलिस हेडकॉन्स्टेबल अभिजित घाटगे, अभिजित व्हरांबळे, मुन्ना कुडची, नामदेव पाटील, अजिज शेख, विनायक फराकटे आदींचा सहभाग होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निम्म्या शहराचा पाणीपुरवठा आज बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापारेषण कंपनीच्यावतीने अतिउच्चदाब सबस्टेशनकडील दुरुस्ती करण्यात येणार असल्याने सोमवारी (ता. १३) निम्म्या शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ज्याठिकाणी पाणीपुरवठा होणार नाही, तेथे महापालिकेच्यावतीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येईल.

पावसाळ्यापूर्वी महापारेषण कंपनीच्यावतीने दुरुस्तीचे कामे हाती घेतली आहेत. त्यानुसार सोमवारी सकाळी सात ते दुपारी एकपर्यंत चंबुखडी येथील अतिउच्चदाब सबस्टेशनकडील दुरुस्ती करण्यात येणार आहे. परिणामी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या शिंगणापूर, नवीन आपटेनगर व बाबडा पंपिंग स्टेशनचा जलउपसा बंद राहणार आहे. त्यामुळे शहराच्या ए, बी, व ई वॉर्डला संलग्न उपनगरे व ग्रामीण भागाला पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. ज्या भागात पाणी येणार नाही, तेथे उपलब्ध टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. बंद काळात नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महिलांना घेतला स्वच्छतेचा ध्यास

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

शहरातील उद्याने आणि छोटे-मोठे नाले श्रमदानातून स्वच्छ करण्याचा विडा महापालिका प्रशासनाने उचलला आहे. एक-दोन उद्यानांची स्वच्छता केल्यानंतर गेल्या रविवारपासून जयंती नाल्यापासून सफाई मोहीम सुरू झाली. पहिल्याच मोहिमेमध्ये शहरवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आज, रविवारी झालेल्या स्वच्छता मोहिमेत महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत आम्हीही मागे नसल्याचे दाखवून दिले. विशेष: शहर आणि परिसरातील बचत गटांतील महिलांनी हातात खराटा घेऊन शहर स्वच्छतेचा संदेश दिला. 'कचरा निर्माण होऊ देणार नाही' अशी आयुक्तांच्या उपस्थितीत प्रतीज्ञा घेतली. त्यानंतर 'स्वच्छ कोल्हापूर, सुंदर कोल्हापूर' अशा घोषणा देत करवीर पंचायत समिती कार्यालयापासून सिद्धार्थनगरपर्यंत प्रबोधन रॅलीही काढली.

सर्वच शहरांना कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. त्यामुळे कचरा निर्माण होणार नाही, याकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे. सद्यस्थितीत रोजचा कचरा शहरातून वाहणाऱ्या नाल्यांमध्ये टाकला जात असल्याने ही समस्या आणखी जटील होत आहे. पावसाळ्यात नाल्यातील कचरा पाण्याचा प्रवाह अडवून ठेवत असल्याने त्याची तीव्रता अधिक वाढते. ही समस्या टाळण्यासाठी महापालिकेने स्वयंसेवी संस्थांसह नागरिकांना स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यानुसार गेल्या आठवड्यात झालेल्या पहिल्या मोहिमेला श्रमदानाची जोड मिळाली आणि जयंती नाल्याची स्वच्छता झाली. नंतर या मुख्य नाल्यावा जोडणाऱ्या उपनाल्यांची श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली.

रविवारच्या या मोहिमेत महिला बचत गटांनी चांगला प्रतिसाद दिला. जयंती नाला पंपिंग हाऊस, सिद्धार्थनगर, रेणुका मंदिर, हॉकी स्टेडियम, जयप्रकाश नारायण उद्यान येथील नाल्यांची स्वच्छता केली. महानगरपालिकेचे आरोग्य, बागा, पवडी, घरफाळा, अग्निशम, पाणीपुरवठा, ड्रेनेज, प्रकल्प, वर्कशॉप या विभागांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सुमारे एक हजार नागरिक सहभागी झाले होते. चार जेसीबी, आठ डंपरच्या मदतीने नाल्यातील कचरा, गाळ काढण्यात आला. सकाळी सात वाजता सुरू झालेल्या मोहिमेतून दुपारपर्यंत १३ डंपर कचरा उचलण्यात आला. 'नागरिकांनी नाल्यामध्ये कचरा न टाकता कचरा कोंडाळयात किंवा घंटा गाडी कर्मचाऱ्यांकडे द्यावा. घरामध्ये निर्माण होणार कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण करावे,' असे आवाहनही महापालिका प्रशासनाने स्वच्छता मोहिमेनंतर केले.

महापौर सरिता मोरे व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सिद्धार्थनगरातील स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग घेत उपक्रमाची पाहणी केली. जिल्हा परिषदेचे सीईओ अमन मित्तल, उपमहापौर भूपाल शेटे, नगरसेवक राजाराम गायकवाड, संजय मोहिते, अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपायुक्त मंगेश शिंदे, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, शहर अभियंता नेत्रदिपक सरनोबत, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, नगरसचिव दिवाकर कारंडे, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, उपशहर रचनाकार नारायण भोसले, इस्टेट अधिकारी प्रमोद बराले, विधी भागाचे संदीप तायडे, सुनील बिद्रे, पर्यावरणवादी कार्यकर्ते उदय गायकवाड, दिलीप देसाई, दिलीप पोवार, पर्यावरण अभियंता समीर व्याघ्रांबरे, मुख्य आरोग्याधिकारी डॉ. विजय पाटील, क्रिडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे, बांधकाम व्यावसायिक पारस ओसवाल, आशिष घेवडे, यतीश शहा आदी सहभागी झाले होते.

या संस्थांनी घेतला उत्स्फूर्त सहभाग

क्रिडाई, आर्किटेक्ट असोसिएशन ऑफ इंजिनीअरिंग, वारणा-वाठार-प्रेरणा सीएमआरके गट, माळीम महिला विकास बचत गट, असावरी महिला बचत गट, जिद्द वस्तीस्तर संस्था, प्रगती वस्तीस्तर संस्था, स्वरा फाउंडेशन, कोल्हापूर हॉटेल मालक संघ, राजाराम गायकवाड विचार मंच या स्वंयसेवी संस्थानी स्वच्छता मोहिमेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

कोट

स्वच्छता मोहीम ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. मोहिमेला लोकसहभाग मिळाल्यास त्याला वेगळे महत्त्व प्राप्त होते. स्वच्छतेची चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभागी होणे आवश्यक आहे.

- उमेशचंद्र मोरे, न्यायाधीश

थर्माकोल व प्लास्टिक वापरामुळे अति प्रदूषण होत आहे. अशा विघटन न होणाऱ्या वस्तू पावसाळ्यात नाल्याचा प्रवाह अडवतात. प्रवाह थांबल्यामुळे पाणी पात्राबाहेर जावून नागरिकांना त्रास होतो. त्यासाठी थर्माकोल, प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

- डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रमजानमध्ये मधुमेहींनी काळजी घेणे आवश्यक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

रमजान महिन्यात मधुमेही रुग्णांनी काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. जाहिर पटवेकर यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे. पत्रकात म्हटले आहे , रमजान महिन्यास सुरुवात झाली असून रोजा (उपवास) अत्यावश्यक मानला जातो. पण मधुमेह (शुगर) रुग्णांना रोजा ठेवणे अवघड जाते. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी जास्त झाले की, अशा रूग्णांना त्याचा त्रास होतो. म्हणूनच मधुमेहाच्या रूग्णांनी रोजा करायचा की नाही हे डॉक्टरांचा सल्ला घेऊनच ठरवावे. डॉक्टरांनी परवानगी दिली तर काही सावधगिरीचे उपाय योजून रोजा केला जाऊ शकतो.

रूग्णांनी रोजा ठेवताना काय करावे आणि काय करू नये याबाबत डॉक्टरांकडून स्पष्ट सल्ला घ्यावा. रमजानच्या आधी, सुरू असताना आणि रमजाननंतर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घेतला पाहिजे. रोजे सुरू असताना रुग्णांच्या औषधे आणि इन्सुलिनच्या डोसमध्ये बदल करणे आवश्यक आहे. उपवास सुरू असताना रक्तातील साखरेचे प्रमाण दुपारी एक वाजता आणि सायंकाळी चार वाजता तपासावे. विशेषत: जर रुग्ण इन्सुलिन घेत असतील तर रोज येणाऱ्या संभाव्य समस्यांबाबत माहिती करून घेतली पाहिजे.

पत्रकात पुढे म्हटले आहे, मधुमेहाच्या रूग्णांनी आपल्या आहारात सफरचंद, मोसंबी, संत्री, किवी, जांभुळ फळांचा समावेश करावा. भाज्यांचा जास्तीत जास्त समावेश करावा. जेवणात अधिक तंतुमय पदार्थ घ्यावेत. सेहरीचे भोजन पोटभरून करताना दोन चपात्या खाल्ल्या पाहिजेत. रोजा सुटल्यावर भरपूर पाणी प्यावे. इफ्तारीनंतर ते सेहरीच्या दरम्यान तीन ते चार लिटर पाणी प्यावे. साखर न घातलेले पेय किंवा ताक प्यावे. कोल्ड्रिंक्स घेऊ नयेत.

डॉ. पटवेकर यांच्या मते, रमजान सुरू होण्याच्या एक ते दोन महिने आधी शुगर कंट्रोल करायला हवी. साखर कमी होणे किंवा जास्त होणे यापैकी कोणत्याही लक्षणाकडे दुर्लक्ष न करता ताबडतोब डॉक्टरांना संपर्क करावा. शक्यतो तळलेले पदार्थ, मिठाई आणि कॅफीनयुक्त पदार्थांचे सेवन करू नये. रोजा करताना जास्त मेहनत किंवा व्यायाम करू नका आणि कोणत्याही परिस्थितीत डॉक्टरांना विचारल्याशिवाय आपली औषधे घेण्याचे बंद करू नका.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातूनदुष्काळमुक्त महाराष्ट्र शक्य

$
0
0

नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून

दुष्काळमुक्त महाराष्ट्र शक्य

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची माहिती

सोलापूर :

'मुंबई व कोकण किनारपट्टीला पडणाऱ्या पावसाचे पाणी समुद्राला जाऊन मिळते. ते पाणी अडवून पुढे मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात टप्याटप्याने आणून नद्या जोडून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणे शक्य आहे. मुख्यमंत्र्यांनी यासाठी एक्सपर्ट कमिटी नेमावी. महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी नद्याजोड प्रकल्प काळाची गरज आहे. पाण्याची व्यवस्था केल्याशिवाय आणि इरिगेशन वाढविल्याशिवाय ही परिस्थिती सुधारता येणार नाही. दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याची जबाबदारी सरकारवर आहे. नरेंद्र मोदींना संधी मिळाल्यास पुढील पाच दहा वर्षांत शिवारे हिरवीगार दिसतील यात शंका नाही,' असे मत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दिली. सोलापुरात रविवारी पत्रकार परिषदेत ते बोलते होते. दुष्काळ पाहणी दौऱ्यासाठी सोलापुरात आले होते.

महाराष्ट्रात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. निवडणुकीमुळे महाराष्ट्रातील दुष्काळाकडे फारसे लक्ष देता आले नाही. मात्र २९ रोजी महाराष्ट्रातील चौथ्या टप्यातील मतदान संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाकडून परवानगी घेतली आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पाहणी दौरे करून दुष्काळाची दाहकता जाणून घेण्यात येत आहे. यंदा विदर्भ, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला आहे. अनेक ठिकाणी पाण्याचे टँकर व चार छावण्या सुरु आहेत. सुमारे ७० वर्षांपूर्वी बाबासाहेब आंबेडकरांनी नद्याजोड प्रकल्प राबविला होता. मात्र, येथील पाणीपुरवठा विभागाचे प्लॅनिंग योग्य पद्धतीने होऊ न शकल्याने दुष्काळाची दाहकता अधिकच वाढली आहे. महाराष्ट्रात १४ ते १५ टक्केच इरिगेशन आहे. अलीकडील २५ वर्षात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. उजनी धरणाचे पाणी आवश्यकतेप्रमाणे सोलापूरला मिळते. उजनीवर कोणत्या एका नेत्याची मक्तेदारी असता कामा नये. महाराष्ट्र सरकार कोणाच्या मक्तेदारीला भीख घालत नाही, असेही आठवले म्हणाले म्हणाले.

.............

वंचित बहुजन आघाडीला एकही जागा मिळणार नाही

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा फायदा भाजप-सेनेला फायदा होणार आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला एकही जागा मिळणार नाही. प्रकाश आंबेडकर सोडले तर अन्य कोणत्याही उमेदवाराला एक लाखांपेक्षा अधिक मते मिळणार नाहीत. आघाडीमध्ये फूट पडली आहे. सत्ता मिळविण्यासाठीच वंचितांचे उमेदवार आघाडीत गेले आहेत. सत्ता माझ्याकडे असल्याने वंचितांमध्ये गेलेले लोक माझ्याकडे येतील. सत्ता मिळवायची असेल तर माझ्याकडे या, निवडणूक हरण्यासाठी लढायची असेल तर वंचितांकडे जा. प्रकाश आंबेडकर सोलापूर व अकोला, अशा दोन ठिकाणी उभे राहिले. त्यांनी एकाच ठिकाणी उभे राहिले पाहिजे होते. एका ठिकाणी उभे राहून निवडून यायला पाहिजे होते. एकट्याच्या बळावर उभे राहून प्रकाश आंबेडकर कधीच निवडून आलेले नाहीत. काँग्रेस आघाडीमुळे ते अकोल्यात निवडून आले होते. एकट्याच्या ताकदीवर आम्ही लढलो होतो. मात्र, आम्हाला अपयश आले, असेही आठवले म्हणाले.

.............

मोदी थापा मारत नाहीत

'पंतप्रधान नरेंद्र मोदी आता थापा मारणार नाहीत,' असे मी बोललो नाही. माझ्या वाक्याचा विपर्यास करण्यात आला आहे. उलट पंतप्रधान मोदी आता आपली राहिलेली आश्वासने पूर्ण करणार आहेत. पंतप्रधानांबाबत मी असे बोलू शकत नाही. उलट मोदी माझ्यावर खूष आहेत, असे ही आठवले यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्त्यामधील भेगा जीवघेण्या

$
0
0

फोटो आहेत

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहर रस्ते विकास प्रकल्पातून शहरात ४९ किमीच्या रस्त्यांची बांधणी झाली. सिमेंट काँक्रिट आणि डांबरीकरण अशा पद्धतीने केलेल्या रस्त्याच्या मध्यभागी मोठ्या भेगा पडल्या असल्याने मोटारसायकलस्वारांना रस्त्यावरुन प्रवास करणे जीवघेणे ठरत आहे. दोन्ही रस्त्याच्यामधील पडलेल्या भेगा त्वरीत न बुजवल्यास अपघातांची संख्या वाढवण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्यावतीने आयआरबी कंपनीने 'बांधा, वापरा आणि हस्तांतर करा' या नुसार सुमारे ४९ किमी रस्त्यांची बांधणी करण्यात आली. रस्ते विकास प्रकल्पातंर्गत बांधलेल्या रस्त्यांच्या देखभालीची जबाबदारी आयआरबी कंपनीची होती. मात्र प्रकल्प हाती घेतल्यापासून सुरू झालेले आंदोलन आणि त्यानंतरच्या टोलच्या आंदोलनामुळे कंपनीला येथून गाशा गुंडळावा लागला. राज्य सरकारने कंपनीला पैसे दिले असले, तरी रस्त्यांच्या देखभालीचा प्रश्न कायम राहिला.

प्रकल्प पूर्ण झाल्यापासून कधीही रस्त्यांची देखभाल झालेली नसल्यामुळे रस्त्यांची अवस्था सद्य:स्थितीत दयनीय होऊ लागली आहे. विशेषत: सिमेंट काँक्रिट आणी डांबरी रस्त्याच्यामध्ये भेगा पडल्याने मोटारसायकलस्वारांचा प्रवास जीवघेणा ठरु लागला आहे. शहराचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या तावडे हॉटेलपासून हा जीवघेणा प्रवास शहराच्या अनेक मार्गावर दिसून येतो. तावडे हॉटेल ते ताराराणी चौक असो किंवा आयटीआय ते कळंबा असो, प्रत्येक रस्त्याच्यामध्ये मोठी भेग दिसून येते. मोटारसायकलचे टायर बसू शकेल एवढी मोठी भेग असल्याने वाहन घसरण्याचे प्रकार वारंवार होता. सिमेंट रस्त्यावर चारचाकी वाहन जाण्यासाठी डांबरी रस्त्यावर वाहन घेण्याचा प्रयत्न केल्यास स्लीप होण्याची शक्यता बळावते. अशीच स्थिती शहर वाहतूक शाखा व खानविलकर पेट्रोल पंप शेजारी दिसते. रात्रीच्यावेळी अशा रस्त्यावर मोटारसायकल स्लीप होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.

रस्ते विकास प्रकल्प वादग्रस्त ठरल्यानंतर कंपनीची सर्व प्रकारची देयके राज्य सरकारने भागवली आहेत. परिणामी प्रकल्पांतर्गत तयार झालेल्या रस्त्यांची जबाबदारी महापालिकेचीच आहे. पण गेल्या दहा वर्षात महापालिका प्रशासनाने याबाबत कोणतीही उपाययोजना केलेली नाही. सरकारच्या निधीकडे डोळे लावून बसण्यापेक्षा अत्यावश्यक बाब म्हणून या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

...............

चौकट

प्रस्ताव सरकार दरबारी पडून

रस्ते विकास प्रकल्पातून बांधण्यात आलेल्या रस्त्यांची देखभाल करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून राज्य सरकारकडे दरवर्षी २५ कोटींची मागणी करण्यात आली. गेल्या चार वर्षांपासून निधीचा प्रस्ताव राज्य सरकारच्या दरबारी पडून आहे. मात्र सद्य:स्थितीत सिमेंट व डांबरी रस्त्याच्यामध्ये पडलेल्या भेगा बुजवण्यासाठी मोठ्या आर्थिक निधीची आवश्यकता नसली, तरी प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. पावसाळ्यापूर्वी या भेगा भरण्यासाठी प्रशासनाला युद्धपातळीवर नियोजन करावे लागेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

न्याय संकुलाच्या इमारतीत १०० सीसीटीव्ही कॅमेरे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा न्याय संकुलाच्या इमारतीच्या आवारात सुमारे १०० सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून त्यासाठी निधी मंजूर झाला आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत कॅमेरे बसविण्याचे काम पूर्ण होणार आहे. कोर्टाच्या कामकाजाच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी ही यंत्रणा कार्यन्वित केली जात आहे.

कसबा बावडा परिसरातील जिल्हा न्याय संकुलातील प्रशासकीय इमारतीत दिवाणी आणि फौजदारी खटल्यांचे कामकाज चालते. अनेक प्रकारच्या खटल्यांवर येथे कामकाज चालते. सद्यस्थितीत येथे ज्येष्ठ कामगार नेते, अॅड. गोविंदराव पानसरे हत्या प्रकरण, अनेक प्रकारचे घोटाळे, खून, दोन गटांतील मारामारीसह जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कामकाज चालते. काही संवेदनशील खटल्यांसाठी मोठा बंदोबस्त पोलिसांना तैनात करावा लागतो. संशयित आरोपींच्या सुरक्षेसाठी मोठी यंत्रणा पोलिसांना राबवावी लागते. काही प्रकरणांत अटक केलेले आरोपी पोलिसांच्या तावडीतून सुटून जाण्याची शक्यता असते. कोर्टाच्या आवारात सुनावणीसाठी आलेल्या पक्षकारांच्या दोन गटात मारामारीचे प्रकार घडतात. त्यासह कोर्टाच्या परिसरात विनाकारण फिरणाऱ्या काही संशयित व्यक्तीही असू शकतात. या सर्व संशयितांच्या हालचालीवर आता सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. संवेदनशील खटल्यांत आरोपींना सुनावणीसाठी आणताना पोलिसांची बंदोबस्त व्यवस्थाही कॅमेऱ्यात कैद केली जाणार आहे. संकुलाच्या मुख्य इमारत परिसर, आवारासह पार्किगमध्ये कॅमेरे बसविले जाणार आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध झाले असून ते बसविण्याचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे.

पे पार्किंगचा विचार?

कसबा बावडा रोडवरील न्यायसंकुलात दररोज तीनशे ते चारशे दुचाकींची वर्दळ असते. त्यासाठी न्यायसंकुलाच्या इमारतीच्या बेसमेंटमध्ये दुचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था केली आहे. मात्र, याठिकाणी कोर्टात काम नसलेले आणि परिसरातील काही कार्यालय, व्यावसायिकही याठिकाणी दुचाकी, चारचाकी पार्किंग करतात. त्यामुळे पे-पार्किंग करण्याचा विचार सुरू झाला आहे. पहिल्या टप्प्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पाहून संबधित वाहनधारकांना सूचना देण्यात येणार आहेत.

गेली काही वर्षे न्यायसंकुलाच्या इमारतीच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची असोसिएशनची मागणी होती. आता कॅमेरे बसविण्यात येत असल्याने सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम होण्यास मदत होणार आहे. त्यासह अन्य विभागांतील आणि परिसरातील काहीजण कोर्टाच्या आवारातील पार्किंगमध्ये वाहने पार्क करतात. त्यांच्यावरही कॅमेऱ्याची नजर राहणार आहे.

- अॅड. रणजित गावडे, अध्यक्ष जिल्हा बार असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images