Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

४९ तक्रारी १०० मिनिटांत निकालात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणूक आचारसंहितेसंबंधी सीव्हिजील अॅपवर आलेल्या ४९ तक्रारी १०० मिनिटांत निकालात काढण्यात आल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली. मतदानाची तारीख जवळ येत असल्याने तक्रारींचा ओघ वाढत आहे. सर्वाधिक तक्रारी शहरातून येत आहेत. चंदगड, राधानगरी विधानसभा मतदारसंघातून अॅपवर आतापर्यंत एकही तक्रार दाखल झालेली नाही.

आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी आयोगाने प्रथमच ऑनलाइन तक्रारींसाठी सीव्हिजील अॅप तयार केले. या अॅपवरील तक्रारी १०० मिनिटांत निकालात काढण्याची सक्ती केली आहे. यामुळे अतिशय सतर्क राहून प्रशासनाने १२ मार्चपासून अॅपवरील तक्रारी निकालात काढण्यासाठीची यंत्रणा कार्यन्वित केली. यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा नियोजन समितीच्या इमारतीमध्ये स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षात दोन कर्मचारी तैनात आहेत. फोटो, व्हिडिओसह तक्रार करण्याची सुविधा आहे. अॅपवर उत्तर विधानसभा मतदारसंघात २६, दक्षिणमध्ये ११, चंदगड आणि राधानगरी शून्य, कागल, शाहूवाडीमध्ये प्रत्येकी एक, शिरोळमध्ये तीन, इचलकरंजीत चार तक्रारी आल्या आहेत.

अॅपवर निनावी आणि नावानिशी तक्रार करता येते. तक्रार दाखल झाल्याच्या दुसऱ्या क्षणाला कक्षातील कर्मचाऱ्याच्या लॅपटॉपवर कळते. ते कर्मचारी अॅपद्वारे जवळच्या पथकास कळवतात. तक्रारी निकालात काढण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ४ ते ५ पथके वाहनानिशी कार्यरत आहेत. आठवड्यात तक्रारींची संख्या वाढल्याने पथकाची दमछाक होत आहे. विविध पक्षाचे डिजिटल फलक, घरांच्या भिंती, दरवाजांवर काढण्यात आलेले कमळ चिन्ह, लोकप्रतिनिधींच्या नावानिशीचे उद्घाटन फलकासंबंधीच्या तक्रारी पहिल्या टप्यात येत होत्या. आता जेवणावळी, रात्री उशिरापर्यंत सुरू असलेले हॉटेल, बार, पान टपरींसंबंधी तक्रारी दाखल होत आहेत. अॅपवर दाखल झालेल्या प्रत्येक तक्रारीची गांभीर्याने दखल घेतली जात आहे. ज्या तक्रारी खोट्या आहेत, त्या पहिल्या टप्यातच निकालात काढण्यात येतात. तथ्य असलेल्या तक्रारीवर कार्यवाही करण्यासाठी पथकाकडे वर्ग केल्यानंतर नावानिशी तक्रार केलेल्या संबंधितास मेसेज जातो. कार्यवाही पूर्ण होईपर्यंतचे टप्पे कळवले जातात. अशाप्रकारे यंत्रणा कार्यरत आहे.

पैसे वाटपाच्याही तक्रारी

उमेदवार, समर्थकाकडून प्रचाराच्या शेवटच्या टप्यातील पैसे, साड्या व इतर वस्तूचे वाटप होण्याची शक्यता असते. त्याचेही चित्रीकरण, व्हिडिओ, फोटो काढून सीव्हिजीलवर तक्रार केल्यास त्वरित कारवाई होऊ शकते. त्यासाठी पथकांना अधिक सक्रिय राहण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिले आहेत. अॅपवरील प्रत्येक तक्रारीची माहिती निवडणूक आयोगाला एका क्लिकवर कळते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकऱ्यांच्या आवाजाला कष्टकऱ्यांचे पाठबळ

$
0
0

पक्षांची भूमिका

स्वाभिमानी शेतकरी पक्ष

'स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी तिसऱ्यांदा हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी रस्त्यावरचा संघर्ष करून ऊस, दूधाला भाव मिळवून दिला. देशभरातील २०९ शेतकरी संघटनांना एकत्र करून शेती आणि शेतकऱ्यांसमोरील समस्या ऐरणीवर आणले. दिल्लीपर्यंत धडक दिली. त्यामुळे मोठ्या मताधिक्याने ते तिसऱ्यांदा खासदार होतील,' असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष प्रा.जालिंदर पाटील यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलताना व्यक्त केले.

प्रा. पाटील म्हणाले, 'शेतमालास दीडपट हमी भाव द्यावा, यासह विविध मागण्यांच्या मुद्यावर गेल्यावेळी भाजपप्रणित महायुतीत सहभागी झालो होतो. मात्र महायुती सत्तेवर आल्यानंतर शेतकरी विरोधी धोरणे राबवण्यास सुरूवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने रासायनिक खतांवरील अनुदान हटवले. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा भूमी अधिग्रहणाचा घातक कायदा आणला, तूर, कांदा, साखर आयात केले. सर्वच शेतमालाचे भाव पडले. त्यातून शेतकऱ्यांसमोरची संकटे वाढली. त्यांच्यावरील कर्जाचा डोंगर वाढू लागला. त्याला कंटाळून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. आत्महत्तेची आकडेवारी दहा वर्षात साडेतीन लाखांवर पोहचली. कृषीप्रधान देश अशी ओळख असतानाही महाराष्ट्रात पूर्णवेळ कृषीमंत्र्याची निवड केलेली नाही. यावरून सरकारने शेतकऱ्यांना गृहीतच धरले नसल्याचे स्पष्ट होते. सातत्याने त्यांना उपरेपणाची वागणूक देण्यात आली. म्हणून यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीसोबत गेलो. जाताना राजकारणापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिले. बळिराजाचा सातबारा कोरा झाला पाहिजे, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, शेतमालास दीडपट हमी भाव द्यावा, या मागण्या आघाडीच्या जाहिरनाम्यात घेण्यास भाग पाडले. आघाडीचे उमेदवार शेट्टी यांना प्रचाराला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यांनी चळवळीच्या माध्यमातून सातत्याने शेतकऱ्यांना चार पैसे कसे जादा मिळतील, यासाठी लढा दिला. शोषण करणाऱ्या व्यवस्थेविरोधात वातावरण तयार केले. देशभरात भाजप विरोधी लाट तयार करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. यामुळे ते तिसऱ्यांदा विक्रमी मतांनी विजयी होतील. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमदेवार धनंजय महाडिक यांचाही विजय होईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘प्रभूंची कोल्हापूरवर कृपा रहावी’

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'कोल्हापूरात मोठा उद्योगधंदा आणून प्रभू कृपा रहावी,' अशी विनंती कोल्हापुरातील उद्योजकांनी केंद्रीय उद्योग, वाणिज्य व नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांना केली. कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्ग आणि उजळाईवाडी विमानतळाला चालना दिल्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि करवीर निवासिनी अंबाबाईची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. प्रभू नुकतेच कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यांनी कोल्हापूर बिझनेस क्लान्क्लेव्हमध्ये व्यापारी व उद्योजकांना मार्गदर्शन केले. नंतर त्यांनी अंबाबाईचे दर्शन घेऊन उद्योजक सुरेंद्र जैन यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्याठिकाणी प्रभू यांनी शहरातील व्यापारी व उद्योजकांशी चर्चा केली.

फिक्कीचे संचालक ललित गांधी, जयेश ओसवाल, हरिश्चंद्र धोत्रे, वरुण गांधी यांनी कोल्हापूरच्या प्रश्नांवर त्यांनी चर्चा केली. यावेळी जैन म्हणाले, 'गेले बरीच वर्षे कोकण रेल्वे कोल्हापूरला जोडण्यासंदर्भात फक्त चर्चाच सुरू होत्या. पण मंत्री प्रभू यांनी कोल्हापूर कोकण रेल्वेला जोडण्यासंदर्भात पुढाकार घेऊन प्रश्न मार्गी लावला. उडाण योजनेअंतर्गत उजळाईवाडी विमानतळावरुन विमान वाहतूक सुरु करण्यासाठी चालना दिली. यापुढे प्रभू यांनी कोल्हापूरात मोठा उद्योग आणण्यासाठी पुढाकार घ्यावा.'

सत्काराला उत्तर देताना केंद्रीय मंत्री प्रभू म्हणाले, 'कोल्हापूरला अंबाबाईचा आशिर्वाद आहे. इथल्या व्यापारी व उद्योजकांचा कोल्हापूरच्या विकासात मोठा वाटा आहे. भविष्यातही कोल्हापूरच्या विकासासाठी मदत केली जाईल.'

स्मॅकचे अध्यक्ष राजू पाटील, गोशिमाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पटेल, कोल्हापूर क्रिडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, राज्य सचिव महेश यादव, केआयटी संस्थेचे अध्यक्ष भरत पाटील, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष शिवाजीराव पोवार, चंद्रकांत जाधव, सराफ संघाचे अध्यक्ष प्रदीप कापडिया, श्रीकांत दुधाणे, डॉ. सचिन कुलकर्णी उपस्थित होते. वरुण जैन आणि डॉ. प्रियदर्शनी जैन यांनी स्वागत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आलोक जत्राटकर यांना पीएच.डी.

$
0
0

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर यांना वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र विषयामध्ये शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी. जाहीर झाली आहे. त्यांनी 'दलितमुक्तीचा प्रश्न : ब्राह्मणेत्तर आणि दलित वृत्तपत्रांच्या भूमिकेचा तुलनात्मक अभ्यास' या विषयावर शोधप्रबंध सादर केला होता. त्यांना, वृत्तपत्रविद्या व संवादशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. रत्नाकर पंडित यांचे मार्गदर्शन लाभले. जत्राटकर हे नेट व सेट परीक्षाही उत्तीर्ण आहेत. त्यांना, विद्यापीठाचे कुलगुरू देवानंद शिंदे, प्र कुलगुरू डी. टी. शिर्के, विभागप्रमुख डॉ. निशा मुडे-पवार, डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. एन. डी. जत्राटकर यांचे प्रोत्साहन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२५०० झाडे लावणार

$
0
0

कोल्हापूर : भगवान महावीर स्वामी जन्म कल्याणक निमित्ताने कुंभोजगिरी येथे वर्षभरात २५०० रोपांची लागवड करण्यात येणार आहे. बुधवारी ता.१७ वृक्षारोपणाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक विशा श्रीमाळी १०८ गोळ जैन समाज संघटनेचे राज्याध्यक्ष राजेंद्र शहा यांनी केली आहे. शिवाय जैन समाजाच्या २४ तीर्थंकरांनी वेगवेगळ्या ठिकाणी साधना केली होती अशा चोवीस रोपांची लागवड करण्यात येणार असल्याचे पत्रकांत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदान हक्क बजावा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, राधानगरी

राधानगरी तालुक्यातील राई येथे होणारा धामणी प्रकल्पाचे काम गेली १९ वर्षे रखडल्याने या परिसरातील गावे, वाड्या ,वस्त्यांमधील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्यासंबंधीचा अर्ज जिल्हा अधिकारी कार्यालायात दिल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी तातडीने म्हासुर्ली येथे बैठक घेत धामणी परिसरातील नागरिकांना मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन केले. मात्र, प्रकल्पग्रस्तांनी अद्याप निर्णयाचा पुनर्विचार केला नाही.

वनविभाग, जमीन हस्तांतर आणि स्थानिक समस्या अशा गर्तेत सापडलेला धामणी प्रकल्पाची अंतिम सुधारित निविदा आमदार प्रकाश आबिटकर यांनी मजूर करून घेतली. परंतु त्यामध्येही त्रुटी आल्याने काम ठप्प झाले आहे. वारंवार मागणी, मोर्चे काढूनसुद्धा प्रशासनाने दुर्लक्ष केले. या परिसरात गगनबावडा, राधानगरी, पन्हाळा अशा तीन तालुक्यांतील सुमारे ५० गावांचा समावेश आहे. ३.८४ टी.एम.सी. क्षमतेचा प्रकल्प गेली १९ वर्षे अनेक कारणांनी रखडला आहे. या परिसरातील नागरिकांनी याचा निषेध म्हणून लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने तातडीने बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आवाहन केले, ते म्हणाले, 'धामणी परिसरातील शेतकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकू नये. पावसाळ्यानंतर प्रकल्पाचे काम मार्गी लागेल. येत्या उन्हाळ्यात किमान एक टी. एम. सी. पाणीसाठा करण्याचे नियोजन आहे. शेतकरी आणि ग्रामस्थानी मतदान हक्क बजावला पाहिजे.' बैठकीला जिल्हा पुनर्वसन अधिकारी वैभव नावडकर, एस. आर. पाटील, तहसीलदार मीना निंबाळकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चर्चासत्र, मुशायऱ्याने सुरेश भट यांना अभिवादन

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'गझल या काव्यप्रकाराला पाचशे वर्षांची फारसी, उर्दू भाषेपासूनची दीर्घ परंपरा आहे. मराठीमध्ये कविश्रेष्ठ सुरेश भट यांनी साठ वर्षांपूर्वी शास्रशुद्ध गझलेचा प्रारंभ केला. छंदोबद्धता,तंत्रशुद्धता आणि कमीतकमी शब्दात व्यापक आशयघनता आदी वैशिष्ट्यांसह गझल रसिकप्रिय ठरली.मराठी गझल लिहिणाऱ्या सलग तीन पिढ्या निर्माण करण्याची आणि पुढील सर्व पिढ्यांना गझलेची बाराखडी देण्याची मराठी कवितेच्या इतिहासातील ऐतिहासिक कामगिरी मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक कुलपती सुरेश भट यांनी केली आहे,' असे मत 'गझलसाद' समूहाच्यावतीने आयोजित 'गझल काव्य प्रकाराची वैशिष्ट्ये' या चर्चासत्रातून पुढे आले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा १२८ वा आणि सुरेश भट यांचा ८७ वा जन्मदिन आणि गझलसादचा प्रथम वर्धापनदिन यानिमित्ताने चर्चासत्र झाले.

सुभाष नागेशकर यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर व सुरेश भट यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. सुरेश भट यांची 'भीमवंदना' ही कविता आणि भटांचीच 'फसवूनही जगाला फसवायचे किती?' ही प्रा. नरहर कुलकर्णी यांनी संगीतबद्ध करून सादर केलेल्या गझलेने आदरांजली वाहण्यात आली. पहिल्या सत्रातील चर्चासत्रात डॉ. दिलीप कुलकर्णी, डॉ. संजीवनी तोफखाने, हेमंत डांगे, डॉ. स्नेहल कुलकर्णी आणि ज्येष्ठ चित्रकार विश्रांत पोवार यांनी 'गझल काव्यप्रकाराची वैशिष्ट्ये' याविषयाची विविध अंगाने मांडणी केली. चर्चासत्राचा समारोप प्रसाद कुलकर्णी यांनी केला.

दुसऱ्या सत्रामध्ये 'मुशायरा' झाला. मराठी, हिंदी गझल सादरीकरणाने त्याला मोठी बहार आली. त्यात 'तुझ्या नित सहवासाची अवीट धुंदी अजून आहे' (विश्रांत पोवार), विस्मृतीच्या ढगात विरुनी जावे म्हणतो (शंकर पाटील), कुठे चाललो मी मलाही कळेना (डॉ. दिलीप कुलकर्णी), एक दिवस मी तुलाच दिधला (हेमंत डांगे), जेवले मी कितीदा जरी पोटभर (डॉ. स्नेहल कुलकर्णी), आठवांची दीर्घ पाने चाळते मी (डॉ. संजीवनी तोफखाने), तुला भेटलो जेंव्हा जेंव्हा मग्न तळ्याच्या काठावरती (प्रा. नरहर कुलकर्णी), मी माणसांप्रमाणे जगतो खुशाल कारण (जमीर शेरखान), कधीकधी वाटे मज सारे जग विसरुनी जावे (प्रवीण पुजारी), नेमके बोलून जाती नेमक्या खाणाखुणा (प्रताप पाटील), अभंग, ओवी, दोहा, गवळण, श्लोक म्हणाले (प्रसाद कुलकर्णी) आदींनी रचना सादर केल्या. कार्यक्रमाला सनत चेंदवणकर, केशव बागला, गौरव माळी, रवी सरदार, माया कुळकर्णी, सुश्रुत कुकडे, प्रेरणा सरदार, अजित कुलकर्णी, रागेश्री कुलकर्णी, अनंत घोटजाळकर, रघू जाधव, देवबा पाटील आदींसह रसिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खर्चात तिप्पट तफावत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी, काँग्रेससह मित्र पक्षाचे उमेदवार धनंजय महाडिक, भाजप, शिवसेनेसह मित्रपक्षाचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक, हातकणंगले मतदासंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी, शिवसेना, भाजप आघाडीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या निवडणूक खर्चात तिप्पटीने तफावत असल्याचे सोमवारी स्पष्ट झाले. खर्चातील तफावतीमुळे या चौघांना दुसऱ्यांदा आणि अपक्ष उमेदवार संदीप संकपाळ यांना पहिल्यांदाच मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकारी नोटिसा काढणार आहेत.

लोकसभा निवडणूक रिंगणातील उमेदवारांनी तीन टप्यात खर्चाचा तपशील निवडणूक आयोगाच्या खर्च निरीक्षक शेरेने जोस, शैलेश बन्सल यांच्या निदर्शनास आणून देणे बंधनकारक आहे. त्यानुसार उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून १४ एप्रिलपर्यंत केलेल्या खर्चाची सविस्तर माहिती उमेदवारांच्या प्रतिनिधींनी आणून दिली. त्याची पडताळणी येथील शाासकीय विश्रामगृहात सकाळी १० ते सायंकाळी पाचपर्यंत करण्यात आली. त्यात निवडणूक प्रशासन आणि उमेदवारांनी दिलेल्या खर्चातील तफावत आढळलेल्या उमेदवारांची यादी तयार करण्यात आली. त्यामध्ये 'कोल्हापूर'मधील महाडिक यांच्या खर्चात २८ लाख, ९६ हजार, ६१५, प्रा. मंडलिक यांच्या खर्चात १९ लाख, ८१ हजार, २५५, संदीप संकपाळ यांच्या खर्चात २१ हजार, ३२० तर 'हातकणंगले'मधील शेट्टी यांच्या खर्चात ३१ लाख, २६ हजार, ७३९, माने यांच्या ३१ हजार, ६८९ हजार, ३८६ इतकी तफावत आढळली आहे.

खर्च न दिलेल्यांनाही नोटिसा

'कोल्हापूर'मधील अपक्ष उमेदवार दयानंद कांबळे, परेश भोसले, बाजीराव नाईक यांनी खर्च सादर करण्याकडे पाठ फिरवली. या तिघांनाही नोटीस बजावण्यात येणार आहे. नोटीस मिळाल्यापासून ४८ तासांत खर्चाची माहिती यांनी न दिल्यास कारवाईची पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे.

पुरावे घेतले

पहिल्या टप्यातील खर्च पडताळणीत उमेदवार महाडिक, मंडलिक, शेट्टी, माने यांना खर्चातील तफावतीमुळे नोटीस दिली होती. यांनी त्यास उत्तर दिले. शिवाय निवडणूक प्रशासनाने कोणत्या आधारे जादा खर्च लावला त्याचे पुरावे मागितले आहेत.

नेत्यांचा हेलिकॉप्टर

प्रवास, वाहन खर्च

निवडणूक प्रशासनाने प्रचारासाठी हेलिकॉप्टरने नेते आले असतील तर त्यांचा खर्च उपस्थित असलेल्या उमेदवारांच्या नावावर टाकले आहे. हा खर्च उमेदवारांनी धरलेला नाही. वाहनांचा खर्च प्रशासनाने अधिक लावला आहे, तर उमेदवारांनी कमी खर्च दिला आहे. यामुळे खर्चात मोठी तफावत दिसत आहे.

दीड कोटींवर खर्च

'कोल्हापूर'साठी १५ आणि 'हातकणंगले'साठी १७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यांनी आतापर्यंत एक कोटी, ५५ लाख, ३६ हजार, १६३ रूपये खर्च केल्याचा प्रशासनाचा दावा आहे. याउलट स्वत: उमेदवारांनी दिलेल्या माहितीनुसार ४३ लाख, ४१ हजार, ८४८ खर्च झाला आहे.

आतापर्यंतचा खर्च

उमेदवाराचे नाव प्रशासनाने नोंदवलेला खर्च उमेदवारांनी दिलेला खर्च तफावत खर्चाची रक्कम

धनंजय महाडिक ३७८६५८० ८८९९६५ २८९६६१५

संजय मंडलिक २६३४३९८ ६५३१४३ १९८१२५५

अरुणा माळी १५९४४५ १५९४४५ ००

राजू शेट्टी ४१६२०१३ १०३५२७४ ३१२६७३९

धैर्यशील माने ३७०८३१९ ५३९९३३ ३१६८३८६

अस्लम सय्यद ४४१४५ ४४१४५ ००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाहून गेलेल्या डॉक्टरचा मृतदेह सापडला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा शिराळा

चांदोली धरणाच्या खाली वारणा नदीपात्रात शनिवारी वाहून गेलेल्या इस्लामपूर येथील डॉ. राहुल मगदूम (वय ३५) यांचा मृतदेह तिसऱ्या दिवशी शाहुवाडी तालुक्यातील उखळू जवळच्या पुलाजवळ सापडला.

डॉ. राहुल शनिवारी दुपारी आपल्या सात मित्रांसह पर्यटनासाठी चांदोली परिसरात आले होते. दुपारी जेवण आटोपून यातील तिघेजण वारणा नदीच्या पाण्यामध्ये उतरले. डॉ. राहुल पोहत असताना पाण्याच्या भोवऱ्यात अडकले. त्यांच्या इतर मित्रांनी झाडांच्या फांद्या तोडून राहुल यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा वेग प्रचंड असल्यामुळे ते पाण्यातून पुढे वाहून गेले. चांदोली धरणातून नदीपात्रात सोडण्यात आलेले पाणी रात्री बंद करून त्यांचा शोध घेण्यात आला.

रविवारी रात्री उशिरापर्यंत सांगली येथील जीवरक्षक दलामार्फत बोटीच्या साहाय्याने शोध सुरू होता, मात्र यश आले नाही. सोमवारी तिसऱ्या दिवशी सकाळपासून पुन्हा शोध सुरू करण्यात आला. कोल्हापूर येथील जीवन आधार रेस्क्यू फोर्सने चांदोली धरणापासून मराठेवाडीपर्यंत बोटीच्या साहय्याने शोध सुरू केला. यावेळी उखळू पुलाजवळ नदीपात्रात मृतदेह तरंगताना आढळून आला. गेले तीन दिवस मणदूरचे सरपंच वसंत पाटील, ग्रामस्थ आणि डॉ. राहुलचे मित्र व नातेवाईक शोध घेत होते. डॉ. राहुल हे इस्लामपूर येथील प्रकाश हॉस्पिटल येथे व्याख्याते म्हणून कार्यरत होते. सागर जगन्नाथ मुळीक यांनी कोकरूड पोलीस ठाण्यात वर्दी दिली असून अधिक तपास एच. जी. तांबेवाघ करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांवरील अन्यायाची किंमत मोजावी लागेल

$
0
0

खासदार राजू शेट्टी यांचा इशारा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'देशाला अन्नधान्य देणाऱ्या बळीराजाच्या जीवनात सुखाचे दिवस यावेत, म्हणून गेल्या वेळी सर्व शेतकरीवर्ग भाजप-सेनेच्या पाठिशी उभा राहिला. गेल्या पाच वर्षात सरकारने केवळ भांडवलदारांच्या आणि उद्योगपतींच्या तुंबड्या भरण्याचे काम केले. त्यामुळे शेतकरी उद्धवस्त झाला. तर छोटे व्यापारी आणि कष्टकरी यांचे प्रचंड हाल होत आहेत. मात्र या निवडणुकीत या जुमलेबाज सरकारचा शेवट होईल. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रूची किंमत सत्ताधाऱ्यांना मोजावी लागेल', असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिला. कोल्हापुरातील मार्केट यार्ड येथे बाजार समितीचे अडते, व्यापारी, हमाल, तोलाईदार यांची बैठक आणि 'मिसळ पे चर्चा' अशा संयुक्त कार्यक्रमात बोलत होते. माजी महापौर नंदकुमार वळंजू यावेळी प्रमुख उपस्थित होते.

आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, ' पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा भारतीय राजकारणाच्या पटलावरील खलनायकांची जोडी आहे. नोटबंदी करुन नागरिकांच्या तोंडचा घास हिरावून घेणाऱ्या भाजप सरकारचा मतदार कडेलोट करतील. पाच वर्षे केवळ आश्‍वासनांची खैरात करणारे जुमलेबाज सरकार आता सत्तेवरुन खाली खेचण्यासाठी शेतकरी, व्यापारी, अडते यांनी धनंजय महाडिक आणि राजू शेट्टी यांना विजयी करावे.'

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे म्हणाले,' महालक्ष्मी दूध संघ बंद पाडून, तो विकून खाणाऱ्यांनी खासदारकीची स्वप्ने पहावीत, हे हास्यास्पद आहे.' यावेळी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आर. के. पोवार, माजी नगरसेवक अदिल फरास, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवानराव काटे, जमीर बागवान यांची भाषणे झाली. यावेळी बाजार समितीच्या उपसभापती संगीता पाटील, संचालक उदय पाटील-धामणेकर, सुनील देसाई, माजी महापौर सुनील कदम, नगरसेवक सत्यजित कदम, कादर मलबारी, सुभाष भेंडे, हाजी यासीन बागवान, रहिम बागवान, नगरसेवक सुनील पाटील, अतुल शहा उपस्थित होते.

मत वाया घालवू नका

'वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विजयी होणार नाहीत, हे माहीत असूनही प्रकाश आंबेडकरांनी वेगळी चूल मांडली. वंचित आघाडीच्या उमेदवारांना मिळणारी मते काँग्रेस-राष्ट्रवादीचीच असल्याने आपल्या उमेदवारांच्या मतांत घट होणार आहे. याचा विचार करुन नागरिकांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मते देऊन ती वाया घालवू नयेत', असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठ साहित्यिक गो. मा. पवार यांचं निधन

$
0
0

सोलापूर:

ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे चरित्रकार प्रा. गो. मा. पवार यांचं आज सोलापूर इथं वृद्धापकाळानं निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळं एक व्यासंगी समीक्षक व उत्तम मार्गदर्शक हरपल्याची भावना साहित्यविश्वात व्यक्त होत आहे.

'गोमा'नी लिहिलेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या चरित्राचं साहित्यविश्वात प्रचंड कौतुक झालं. या पुस्तकामुळं विठ्ठल रामजी शिंदे यांचे चरित्रकार अशीच त्यांची ओळख बनली होती. या पुस्तकासाठी त्यांना २००७ सालच्या साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. मराठी समीक्षेमध्ये विनोदाची सैद्धांतिक मीमांसा करणारे गो. मा. पवार हे पहिले व एकमेव समीक्षक होते. मराठवाडा साहित्य परिषद, अखिल भारतीय साहित्य महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळावर त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केलं. त्यांनी १६ ग्रंथाचे लेखन केले असून ६० शोधनिबंध त्यांच्या नावावर आहेत. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक असलेल्या 'गोमां'च्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली १० विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पूर्ण केली आहे.

प्रा. पवार यांचा जन्म १३ मे १९३२ रोजी सोलापूर जिल्ह्यातील पानगाव येथे झाला. शालेय शिक्षण नरखेड येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण हरीभाई देवकरणमध्ये झाले. मराठी विषयातून एम. ए. चे शिक्षण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पूर्ण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून त्यांनी पीएचडी. पदवी प्राप्त केली. त्यानंतर तब्बल ३३ वर्षे ते अध्यापनाच्या क्षेत्रात होते. शासकीय महाविद्यालय अमरावती, औरंगाबाद व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे त्यांनी अध्यापन कार्य केले. १९९२ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर सोलापूर हीच कर्मभूमी मानून त्यांनी विपुल साहित्य निर्मिती केली.

साहित्य संपदा

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे: जीवन व कार्य

निवडक विठ्ठल रामजी शिंदे

भारतीय साहित्याचे निर्माते विठ्ठल रामजी शिंदे

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे – समग्र वाड्मय खंड १ व २

द लाइफ अँड वर्क्स ऑफ महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

मराठी विनोद: विविध आविष्काररूपे

निवडक मराठी समीक्षा

विनोद: तत्त्व आणि स्वरूप

साहित्यमूल्य आणि अभिरुची

सुहृद आणि संस्मरणे


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ही माझी शेवटची लोकसभा निवडणूक: सुशीलकुमार शिंदे

$
0
0

सोलापूर: २०१९ची लोकसभा निवडणूक ही आपली शेवटची निवडणूक आहे, असं जाहीर करतानाच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पुन्हा एकदा लोकसभेत जाण्याची संधी देण्याचे आवाहन मतदारांना केलं.

सुशीलकुमार शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन हे आवाहन केलं. यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि प्रतिस्पर्धी उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्यावरही टीका केली. प्रकाश आंबेडकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वांना तिलांजली दिल्याची टीका त्यांनी केली. भाजपाकडे कोणाताही विकासाचा अजेंडा नाही. जातीय कारणांमुळे भाजपाने सिद्धेश्वर स्वामींना उमेदवारी दिली, असा आरोपही त्यांनी केला.

विकासाच्या मुद्द्यावरून शिंदे यांनी भाजपवर घणाघाती टीका केली. काँग्रेसची सत्ता असताना सोलापूरसाठी विद्यापीठाची स्थापना केली. उजनीसाठी पाणी आणले. रस्ते बांधले. भाजपाने काय केले ते सांगावे? असा सवाल करतानाच मी एनटीपीसीचा टाकाऊ प्रकल्प सोलापुरात आणल्याची टीका भाजपवाले करत आहेत. पण तुम्ही सोलापूरसाठी एक तरी टिकाऊ प्रकल्प आणला का? तुम्ही आणलेले प्रकल्प पाहण्यासाठी मी दुर्बिण लावून बसलो आहे, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

मोदींना आव्हान

मागच्या लोकसभा निवडणुकीवेळी मोदींनी माझ्यावर टीका केली. मी गृहमंत्री असताना पॅरा मिलिट्री फोर्ससाठी सोलापुरातून एकही हँडलूम आणि पॉवरलूमचा कपडा खरेदी केला नाही, अशी टीका मोदींनी केली होती. मोदींनी स्वत: पाच वर्ष सत्ता उपभोगलीय, त्यांनी मिलिट्रीसाठी एक मीटर कपडा तरी खरेदी केलाय का? तसं त्यांनी दाखवून द्यावं, असं आव्हानच शिंदे यांनी मोदींना दिलं. यावेळी शिंदे यांनी हातजोडून मतदारांना मतदान करण्याचं भावनिक आवाहनही केलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपमुळे देशाची लोकशाही धोक्यात, राज यांचा हल्ला

$
0
0

इचलकरंजी: देशाच्या सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन देश धोक्यात आहे हे सांगितलं. देशाच्या इतिहासात असं प्रथमच घडलं, असं सांगतानाच भाजपनं देशाची लोकशाही धोक्यात घातलीय. बेसावध राहू नका, या देशाची एकदा फसवणूक झाली. पुन्हा फसवणूक होऊ देऊ नका, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. तसेच भाजपकडे माझ्या प्रश्नांची उत्तरच नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावाला.

इचलकरंजी येथे एका सभेला संबोधित करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा घणाघाती हल्ला केला. यावेळी राज यांनी भाषणात माजी न्यायामूर्ती लोया यांच्या हत्येचाही उल्लेख केला. एका न्यायाधीशाची हत्या झाली. त्यांच्या हत्येच्या संशयाचं बोट भाजपचे अध्यक्ष अमित शहांकडे होतं. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांवर दडपण येत होतं. त्यामुळे हे न्यायाधीश रस्त्यावर आले. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन देशाची लोकशाही धोक्यात असल्याचं सांगितलं. देशाच्या इतिहासात असा प्रकार कधीच घडला नव्हता. हे न्यायाधीश रस्त्यावर का आले? याचं उत्तर भाजपनं द्यावं, असं आव्हान देतानाच भाजपमुळे देशाची लोकशाही धोक्यात आहे, असा हल्ला राज यांनी चढवला.

माझ्या प्रश्नांची उत्तरं भाजपकडे नाहीत

माझ्या प्रत्येक प्रचारसभेत मी मोदी आणि शहांच्या आधीच्या आणि नंतरच्या भाषणाच्या क्लिप्स दाखवत असून त्यांचा खोटारडेपणा उघड करत आहे. माझ्या प्रश्नांची त्यांना अपेक्षाच नव्हती. त्यामुळे माझ्या प्रश्नांची काय उत्तरं द्यावी हे भाजपला समजत नाही. माझ्या प्रश्नांची उत्तरंच त्यांच्याकडे नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली. मी ज्या पद्धतीनं प्रश्न विचारतोय, त्यामुळे भविष्यात फायदाच होणार आहे. यापुढे कुठलाही राजकारणी खोटं बोलणार नाही. तुम्हाला गृहीत धरणार नाही. कारण खोटं बोलल्यास अशा क्लिप्स बाहेर येतील आणि लोक प्रश्न विचारतील ही भीती राज्यकर्त्यांच्या मनात कायम राहील, असंही त्यांनी सांगितलं.

शहा-मोदींचं संकट दूर व्हावं म्हणून...

मी निवडणूक लढवत नाही, माझा उमेदवारही नाही. तरीही भाजपवाले फडफडत आहेत. निवडणूक आयोगाला विचारत आहेत, कुठल्या खात्यात खर्च मोजायचा. कुठल्या खात्यात म्हणजे आमच्या खात्यात, असं सांगतानाच सभांचा खर्च आम्हीच करतोय. मोदी आणि शहा नावाचं देशावरील संकट दूर करण्यासाठीच मी प्रचार करतोय, असं त्यांनी सांगितलं.

आरबीआयच्या दोन गव्हर्नरवर दबाव

भाजप सरकारचा दबाव होता म्हणूनच आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन आणि उर्जित पटेल यांनी राजीनामा दिला, असा गंभीर आरोप राज यांनी केला. यावेळी त्यांनी नोटाबंदीवरूनही मोदींवर हल्ला चढवला. पंतप्रधानांना झटका आला आणि त्यांनी नोटाबंदी केली. नोटाबंदी केली त्याची कल्पनाही आरबीआयच्या गव्हर्नरलाही दिली नाही. केंद्रीय अर्थमंत्र्यांनाही त्याची माहिती नव्हती. नोटाबंदीचा निर्णय घेताना सर्वानुमते निर्णय का घेतला नाही? असा सवालही राज यांनी केला.

२०१४च्या निवडणुकीत भाजपकडे कुठून पैसा आला?

काळ्यापैशाच्या मुद्द्यावरून राज यांनी भाजपला पुरतं घेरलं. भाजपनं काळ्यापैशाच्या बाबतीत बोलूच नये. त्यांनी २०१४ ते २०१९ पर्यंतच्या काळातील निवडणुका जिंकण्यासाठी त्यांच्याकडे कुठून वरेमाप पैसा आला हे स्पष्ट करावं, असं आव्हान देतानाच ५०० ते ८०० कोटी खोट्या नोटांसाठी नोटाबंदी करून भाजप सरकारनं १६ लाख कोटी रुपये गमावले. मोदींचा नोटाबंदीचा हेतूच स्वच्छ नव्हता. नोटबंदीमुळे कोट्यवधी नोकऱ्या गेल्या. लोकं देशोधडीला लागले. इथल्या इचलकरंजीमधले यंत्रमाग कामगार देशोधडीला लागले, असा आरोपही त्यांनी केला.

शहा मोदींचं पिट्टू

देशातबाहेरचा काळा पैसा आणण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करू. गरज पडली तर कायदे बदलू आणि कसंही करून देशात काळा पैसा आणू आणि नोकरदारांना त्यांच्या प्रामाणिकतेसाठी त्यातला काही भाग देऊ, असं मोदी म्हणाले होते. मात्र निवडणुका जिंकल्यानंतर मोदींचे पिट्टू असलेल्या शहा यांनी हा तर चुनावी जुमला होता, असं सांगून देशाच्या थोबाडीत लगावली, असं हल्लाही त्यांनी चढवला.

>> पंतप्रधान नोटबंदी, जीएसटी, मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, नमामि गंगे बद्दल का बोलत नाहीयेत? जवानांच्या नावावर मतं का मागताय?

>> देशाबाहेरचा काळा पैसा देशात आणून प्रत्येकाच्या खात्यात पंधरा-पंधरा लाख रुपये जमा करेन असं पंतप्रधान म्हणाले होते, काय झालं ह्या आश्वासनाच?

>> मी इतकं खोटं बोलणारा पंतप्रधान मी आजवर पाहिला नाही. बिहारमध्ये पंतप्रधानांनी १ आठवड्यात ५० लाख शौचालय बांधल्याचं सांगितलं. कसं शक्य आहे? किती खोटे बोलतात हे?

>> प्रसारमाध्यमांना सामोरे न जाणारे नरेंद्र मोदी हे या देशाच्या इतिहासातील एकमेव पंतप्रधान आहेत

>> पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान म्हणतात की, मोदी पुन्हा भारताचे पंतप्रधान व्हावेत.. शत्रूराष्ट्राचा पंतप्रधान हा आपल्या देशात कोण निवडून यावा हे का बोलतोय? काय कटकारस्थान आहे या मागे?

>> सर्वोच्च न्यायालय, सीबीआय, रिझर्व्ह बँक ह्या सारख्या स्वायत्त संस्थाना हात घालून ह्यांनी लोकशाही धोक्यात आणली. हेच १९३० ला जर्मनीत हिटलर करत होता. प्रचारासाठी हिटलर फिल्म काढायचा आणि नेमकं हेच मोदी आज करत आहेत. 'उरी' आणि 'पॅडमन'सह अनेक चित्रपट सरकार पुरस्कृत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतदानासाठी ११ प्रकारचे पुरावे ग्राह्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळी मतदार ओळखपत्राशिवाय ११ प्रकारचे पुरावे ग्राह्य धरण्यात येणार आहे. मतदार यादीत नाव असूनही निवडणूक ओळखपत्र नसलेल्यांनी यापैकी एक पुरावा दाखविल्यास त्यांना मतदान करता येईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

पत्रकात म्हटले आहे, लोकसभेसाठी २३ एप्रिलला मतदान होणार आहे. मतदानासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्र असणे आवश्यक आहे. नसेल तर पासपोर्ट, वाहनचालक परवाना, केंद्र, राज्य सरकारचे ओळखपत्र, सरकारमान्य खासगी कंपनीचे ओळखपत्र, बँक पासबुक, पॅनकार्ड, स्मार्ट कार्ड, मनरेगा कार्यपत्रिका, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन कागदपत्र, खासदार, आमदार, विधान परिषद सदस्य ओळखपत्र, आधार कार्ड हे पुरावे मतदान केंद्रांवर ओळख पटवण्यासाठी ग्राह्य धरली जाणार आहेत. मतदार यादीत नाव आहे किंवा नाही याची पडताळणी www.nvsp.in या वेबसाइटवर करता येते. केंद्रावर केवळ छायाचित्र मतदार पावती पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाणार नाही. त्यासोबत मतदार छायाचित्र ओळखपत्र किंवा ११ पैकी एक ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे. प्रवासी भारतीय मतदारांना त्यांची ओळख पटवण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक राहील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जोतिबा यात्रेची जय्यत तयारी

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

महाराष्ट्रासह-कर्नाटकातील भाविकांचे आराध्य दैवत जोतिबा देवाच्या चैत्र पौर्णिमा यात्रेसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, पोलिस व जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी वाहतुकीचे नियोजन व पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रा काळात १४०० पोलिसांचा ताफा बंदोबस्तासाठी नेमण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव शिवाजी पूल ते जोतिबा डोंगर मार्गावर पोलिसांचा खडा पहारा राहणार आहे.

चैत्र पोर्णिमा यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यातून लाखो भाविक वाडी रत्नागिरी तथा जोतिबा डोंगरावर येत असतात. सध्या उन्हाचा कडाका वाढला आहे. तरीही भाविक बैलगाडीने सासनकाठ्या घेऊन जोतिबा डोंगराकडे निघाले आहेत. १९ एप्रिल रोजी यात्रेचा मुख्य दिवस असल्याने पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर अधीक्षक तिरुपती काकडे यांनी सोमवारी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सुरक्षेबाबत सूचना दिल्या.

शुक्रवारी (दि. १९) आणि शनिवारी (दि. २०) यात्रेच्या मुख्य दिवशी लाखो भाविक जमलेले असतात. सासनकाठ्या व पालखी सोहळ्यादरम्यान भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होते. मंदिर परिसर व सेंट्रल प्लाझा या दोन्ही स्थळांची पोलिसांनी पाहणी करून तबंदोबस्ताचे नियोजन केले. अशा वेळी दर्शनरांगेत चेंगराचेंगरी होऊ नये, याची खबरदारी घेण्यात आली आहे. त्यासाठी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जोतिबा परिसरात ३० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. डोंगरावर येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या हालचालींवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.

यात्रेकरूंसाठी मार्ग

यात्रेसाठी सर्व वाहने केर्ली व कुशिरे फाटामार्गे जोतिबा डोंगरावर जातील. इतर सर्व मार्ग चारचाकी वाहनांसाठी बंद करण्यात आले आहेत. केर्ली-कुशिरे गावांवरून येणारी सर्व चारचाकी वाहने सामाजिक वनीकरण फाटा येथून गायमुखमार्गे जोतिबावर जातील. सर्व एस. टी. बस व अत्यावश्यक सेवेतील वाहने सामाजिक वनीकरण येथून दानेवाडीमार्गे जोतिबावर जातील. घाट उतरताना जोतिबा डोंगरावरील सर्व वाहने दानेवाडी फाट्याकडून वाघबीळकडे न जाता गायमुखमार्गे केर्लीकडे उतरतील. जोतिबा ते जुने आंब्याचे झाड या दरम्यानची वाहतूक दोन्ही मार्गांनी सुरू राहील. देवदर्शन घेऊन परत जाणाऱ्या वाहनचालकांनी गिरोली बाजूकडील एकदिशा मार्गाचा अवलंब करावा. वाघबीळ व शाहूवाडीकडून दानेवाडीमार्गे येणारी सर्व वाहने केर्लीमार्गे जोतिबावर जातील. माले, कोडोली, गिरोली, वाघबीळ हे मार्ग बाहेर जाण्यासाठी ठेवण्यात आले आहेत. यामार्गे वाहनांना जोतिबावर येण्यासाठी प्रवेशबंदी आहे. या मार्गावर दिशादर्शक व सूचना फलक लावले आहेत.

पार्किगची ठिकाणे

केर्ली फाटामार्गे येणाऱ्या वाहनांना ट्रक पार्किंग, नवीन एस. टी. स्टॅँड, चारचाकी, जुने एसटी स्टँड, यात्री निवास समोरील जागा, तळ्याभोवती, दोनवडे क्रॉसिंग, जुने आंब्याचे झाड परिसर, शेवताई मंदिर परिसर, केर्ली हायस्कूल, गिरोली फाटा येथे केले आहे. तर गिरोली फाटा मार्गे येणाऱ्या वाहनांना यमाई मंदिर परिसर, बुणे कॉर्नर पार्किंग, प्रेम लॉजिंग, निलगिरी बाग परिसर येथे दुचाकी व चारचाकी पार्किंग करता येणार आहे.

अवजड वाहनांना नो एन्ट्री

बुधवारपासून (ता. १७ एप्रिल) जोतिबा डोंगावर जाणाऱ्या अवजड वाहने, ट्रक, तीनचाकी प्रवासी व मालवाहतूक रिक्षा तसेच ट्रॅक्टर यांना यात्रा कालावधीत बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी त्यापूर्वीच माल न्यावा असे प्रशासनाने कळवले आहे.

बंदोबस्त दृष्टीपथात

पोलिस अधीक्षक

अप्पर अधीक्षक

पोलिस उपअधीक्षक

१९

पोलिस निरीक्षक

७३

पोलिस उपनिरीक्षक

४०

वाहतूक पोलिस

८००

पोलिस शिपाई

२ तुकड्या

एसआयपीएफ

१०००

होमगार्ड

(याशिवाय डॉग स्कॉड पथक, क्रेन व्हॅन, व्हाइट आर्मी)

मदतीसाठी संपर्क

पोलिस नियंत्रण कक्ष ०२३१ २६६२३३३

पन्हाळा पोलिस ठाणे ०२३२८ २३५०२४

कोडोली पोलिस ठाणे ०२३२८ २२४११०

जोतिबा डोंगर पोलिस चौकी ०२३२८ २३९०४१

रूग्णवाहिका सेवा १०८

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पैलवान, वस्तादांचा मेळावा

$
0
0

कोल्हापूर

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांना पैलवान आणि वस्तांदानी पाठिंबा दिला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महान भारत केसरी दादू चौगुले होते.

दादू चौगुले म्हणाले, 'निरोगी युवक हा देशाचा आधारस्तंभ आहे. महाडिक यांना लहानपणापासून व्यायाम व कुस्तीची आवड असून त्यांनी शरीर कमावले आहे. मन, मनगट, मेंदू सक्षम ठेवणारे पैलवान महाडिक विरोधी उमेदवाराला लोकसभा निवडणूकीत चितपट करतील.' महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर म्हणाले, 'महाडिक हे कुस्तीपटू असून ते कुशल संघटक आहेत. सढळ हाताने मदत करुन त्यांनी कुस्तीला आश्रय दिला आहे. जिल्ह्यातील पैलवानांचे ते आधारस्तंभ असल्याने त्यांचा विजय निश्चित आहे.' खासदार महाडिक म्हणाले, 'मी नियमित व्यायाम करत असून निव्यर्सनी आहे. कोल्हापूर जिल्हाही निरोगी आणि निव्यर्सनी असला पाहिजे. त्यासाठी शालेय वयात क्रीडा संस्कार रुजवले पाहिजेत. कुस्तीबरोबर खूप वाचन, मनन चिंतन केल्याने मला संसदरत्न पुरस्कार मिळाला. यावरुनच पैलवान प्रचंड बुद्धिमान असतात हे सिद्ध होते.' यावेळी पैलवान अशोक माने, संभाजी वरुटे, राजाराम मगदूम, अमृत भोसले, यशवंत दोनवडेकर यांची भाषणे झाली. मेळाव्याला वस्ताद रसूल हनिफ, रंगा ठाणेकर, संतोष पाटील, सर्जेराव पाटील, विलास पाटील, रविंद्र पाटील, शाहू चव्हाण यांच्या जिल्ह्यातील विविध तालमींचे वस्ताद व पैलवान उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिंगणातील अपक्षांचा प्रचार थंडच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघातून मोठ्या उत्साहाने उमेदवारी अर्ज दाखल केलेले अपक्ष उमेदवार सक्रिय प्रचारापासून अजूनही लांब आहेत. अनेक उमेदवार मतदारसंघात फिरकलेलेही नाहीत. वंचित बहुजन आघाडीने निवडणुकीपूर्वी जी हवा तयार केली होती, ती प्रचारात दिसत नाही.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक, भाजप, शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक तर हातकणंगले मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे उमेदवार राजू शेट्टी आणि भाजप, शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्यातच खरी लढत आहे. हे चारही उमेदवार सर्व यंत्रणेसह प्रचारात सक्रिय आहेत. यामुळे रिंगणातील उमेदवारांची संख्या पाहून निवडणूक बहुरंगी वाटत असली तरी दोन्ही मतदारसंघात दुरंगीच लढत आहे. इतर उमेदवारांनी व्यापक प्रचार करण्याकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार डॉ. अरूणा माळी, बहुजन समाज पार्टीचे प्रा. डी. श्रीकांत, बळीराजा पार्टीचे किसन काटकर, बहुजन मुक्ती पार्टीचे सिध्दार्थ नागरत्न, अपक्ष परेश भोसले, संदीप संकपाळ यांची प्रचार वाहने फिरत आहेत. उर्वरित अपक्ष उमेदवार बाजीराव नाईक, अरविंद माने, मुश्ताक मुल्ला, युवराज देसाई, राजेंद्र कोळी यांचा प्रचार थंडच आहे. 'हातकणंगले'मधून अपक्ष उमेदवार रघुनाथ पाटील, अस्लम सय्यद, वंचित बहुजन आघाडीचे डॉ. नितीन भाट, आनंदराव सरनाईक, अजय कुरणे यांचा काही ठिकाणी प्रचार सुरू आहे. उर्वरित रिंगणातील उमेदवार विद्यासागर ऐतवडे, किशोर पन्हाळकर, संग्रामसिंह गायकवाड, डॉ. प्रशांत गंगावणे, विश्वास कांबळे, राजू मुजीकराव शेट्टी, महादेव जगदाळे यांचा प्रचार दिसत नाही. या मतदारसंघात तब्बल १७ उमेदवार रिंगणात असूनही हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच उमेदवार प्रचारात आहेत. खासदार राजू शेट्टी यांच्या नामसाधर्म्याचे मुंबईचे राजू मुजीकराव शेट्टी यांना उमेदवार अर्ज भरेपर्यंत विरोधकांनी रसद पुरवली. मात्र ते प्रचारात कुठेच दिसत नाहीत.

.........

मग उद्देश काय ?

लोकसभा मतदारसंघ हा सहा विधानसभा मतदारसंघांचा असतो. नवख्या उमेदवाराला निवडणूक जाहीर झाल्यानंतर रोज एक गाव केले तरी शेवटी बहुतांशी गावे, वाड्या वस्त्या शिल्लकच राहतात. हे माहित असतानाही मोठ्या संख्येने अपक्ष उमेदवारांनी अर्ज का दाखल केले आहेत, रिंगणात राहिल्यानंतर प्रचार करीत नसलेल्या उमेदवारांचा खरा हेतू काय? कुणीतरी अखेरच्या टप्प्यात माघारीसाठी मनधरणी करावी, तडजोडीने 'मागणी' पूर्ण करून घ्यावी, मतविभागणी व्हावी, मतदान होईपर्यंत नाव चर्चेत राहावे, यासाठीच अर्ज दाखल केले होते, का असा संशय उपस्थित केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘विकासाचे मुद्दे नसल्याने दिशाभूल’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'काहीजण निवडणुकीच्या तोंडावर उगवले आहेत. त्यांना विकासाच्या मुद्यावर बोलता येत नसल्याने नागरिकांची दिशाभूल करत आहेत. आपणच पुरोगामी विचारांचे आणि शिवाजी पेठेचे असल्याचा आव आणत आहेत. अशा उमेदवारांपेक्षा, विकासकार्यातून बोलणाऱ्या खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठीशी शिवाजी पेठेतील नागरिक व मतदार आहेत,' अशी ग्वाही माजी नगरसेवक अजित राऊत यांनी दिली.

खासदार महाडिक यांच्या प्रचारासाठी शिवाजी पेठ परिसरात प्रचारफेरी काढण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप, रिपाई गट, कवाडे गट व मित्रपक्ष आघाडीतर्फे शिवाजी पेठेतून पदयात्रा काढण्यात आली. याप्रसंगी बोलताना राऊत म्हणाले, 'प्रचारफेरीला नागरिकांचा मिळालेला प्रतिसाद हा महाडिकांच्या विजयाची नांदी आहे. कोल्हापूरचा स्वाभिमान जपणाऱ्या आणि कोल्हापूरशी एकरुप झालेल्या महाडिकांना पुन्हा खासदार म्हणून निवडून देण्याचे पेठेने ठरविले आहे.'

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, माजी महापौर बाजीराव चव्हाण, नगरसेवक महेश सावंत, माजी नगरसेवक बाबा पार्टे, उत्तम कोराणे व अजित राऊत यांच्या पुढाकारातून पदयात्रा काढण्यात आली. खासदार महाडिक यांनी नागरिकांशी संवाद साधला. तसेच विकासकामांवर आधारित सचित्र माहिती पुस्तिकेचे वाटप केले. शिवाजी पेठेतील विविध भागातून फेरी निघाली. यामध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग होता. प्रचार फेरीत माजी उपमहापौर परीक्षित पन्हाळकर, सुनील देसाई, सुहास साळोखे, संजय कुराडे, संजय पडवळे, राजेंद्र चव्हाण, भानुदास इंगवले आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोदी, शहा देशाला कलंक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

'विकासाचा कोणताच मुद्दा उरला नसल्याने शहीद जवानांच्या नावावर भाजप मते मागत आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोघे देशाला कलंक आहेत. हुकूमशाही पद्धतीने देश चालविण्याचा त्यांचा डाव असून, लोकशाही संपविण्याची भाषा करणाऱ्यांपासून जनतेने सावध राहावे,' असे आवाहन करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकदा फसलात, पुन्हा फसू नका, असा सल्लाही दिला.

येथील जुन्या कोल्हापूर नाक्यामागे असलेल्या खासगी मैदानात झालेल्या सभेत ठाकरे बोलत होते. लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच राज ठाकरेंची सभा होणार असल्याने सर्वांच्या नजरा खिळून राहिल्या होत्या. ठाकरे यांचे सभास्थळी रात्री आठ वाजता आगमन झाले. तत्पूर्वी मनसेच्या संदीप देशपांडे, परशुराम उपरकर, गजानन जाधव, आदींची भाषणे झाली.

पंतप्रधान मोदी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देण्यास घाबरतात, असा आरोप करून ठाकरे म्हणाले, 'देशाला खोटी स्वप्ने दाखविणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता पुन्हा खोटे बोलून जनतेसमोर मते मागत आहेत. गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान झाल्यापासून एकही पत्रकार परिषद त्यांनी घेतली नाही. ते पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देण्यास घाबरतात.

पंडित नेहरू पंतप्रधान होते तेव्हापासून पत्रकार परिषद घेण्याची प्रथा होती, ती मोदींनी मोडीत काढली आहे. प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी करणेच त्यांनी पसंद केले आहे. भारताचा प्रधानमंत्री कोण असावा हे पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान ठरविणारा कोण? शत्रूराष्ट्राचा पंतप्रधान आपल्या देशात कोण निवडून यावा यावर भाष्य करतो, यामागे मोठे राजकीय कटकारस्थान शिजत आहे. त्याचाही जनतेने शोध घेणे गरजेचे आहे.'

ते पुढे म्हणाले, 'मोदी आणि शहा देशाचे कलंक आहेत. मोदी हिटलरच्या वाटेवर देश घेऊन जात आहेत. हिटलरनेही हीच नीती अवलंबली होती. आता पुन्हा एकदा मोदींनाही देशात हुकूमशाही राजवट आणायची आहे. गोबेल्सची नीती अवलंबली जात असून, देशात अस्थिरता निर्माण करून धर्माच्या नावावर समाजात भांडणे लावायची आणि आपला राजकीय स्वार्थ साधायचा हे या सरकारचे एकमेव धोरण आहे. मात्र, जनतेने बेसावध न राहता मोदी व शहा यांना राजकीय क्षितिजावरून कायमचे नष्ट करा.'

मोदी, शहांवर हल्लाबोल

लोकसभा निवडणूकीपूर्वीपासूनच राज ठाकरे यांच्या मनसेने भाजप सरकारवर कडाडून टीका सुरू केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात प्रत्येक सभांमध्ये टीकास्त्र सोडताना भाजपचा पराभव करा, असेच धोरण त्यांनी स्वीकारले आहे. इचलकरंजीतील विराट सभेत ठाकरे या दोघांविरोधात कोणता नवा गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. दोघेही देशाचे कलंक असल्याचे सांगत त्यांनी नेहमीच्या ठाकरे शैलीत त्यांचा खरपूस समाचार घेताना अनेक उदाहरणे दिली.


शेट्टींच्या ट्विटने खळबळ

महाआघाडीचे उमेदवार खासदार राजू शेट्टी यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून मंगळवारी सकाळी राज ठाकरे यांच्या सभेबाबत ट्विट केले होते. राज ठाकरे यांची सभा इचलकरंजीत इतिहास घडविणार असल्याचे त्यामध्ये नमूद केले होते. त्यामुळे ठाकरे हे शेट्टी यांना निवडून देण्याची घोषणा करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, त्यांनी भाषणात अशी कोणतीच घोषणा न केल्याने सभेच्या खर्चाची गणिते मांडणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांची निराशा झाली.

पार्किंग व्यवस्था अपुरी

सभेला प्रचंड गर्दी होणार हे गृहीत धरून पोलिस प्रशासनाने कोल्हापूर रोडवरील मॉडर्न हायस्कूल मैदान, शिवमंदिर, जैन बोर्डिंग परिसर आणि सरकार मळा (कबनूर) येथे पार्किंगची सोय केली होती. मात्र, संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासह सीमाभागातून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने पार्किंग व्यवस्था अपुरी पडली. सभास्थळालगतच वाहने लावल्याने सभा संपल्यानंतर सुमारे तासभर या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.

भव्य व्यापपीठावर स्क्रीन

सभेसाठी मनसेच्या स्टाइलप्रमाणे भव्य व्यासपीठाची उभारणी केली होती. पंतप्रधान मोदी यांच्या जुन्या भाषणांतील दुट्टप्पीपणाचा पंचनामा करण्यासाठी व्यासपीठांवर दोन मोठे स्क्रीन लावले होते. सभेसाठी सुमारे साडेचार एकरांचे विस्तीर्ण मैदान असल्याने नागरिकांना बसण्यासाठी कारपेटची सोय केली होती, तर भव्य व्यासपीठावर मनसेचे बॅनर होते.


स्थानिक विषयांवर भर

इचलकरंजीला वस्त्रोद्योगाचे मँचेस्टर म्हणून ओळखले जाते. नोटबंदी, जीएसटी यामुळे हा व्यवसाय मोडकळीस आला आहे. वीज दरवाढीने वस्त्रोद्योगाबरोबरच इंजिनीअरिंग व्यवसाय अडचणीतून मार्गक्रमण करीत असून, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक उद्योजकांनी कर्नाटकात स्थलांतर करून सरकारवरील नाराजी व्यक्त केली होती, या पार्श्वभूमीवर ठाकरे उद्योजकांप्रश्नी काय बोलणार, याची उत्सुकता होती. वस्त्रनगरीत पहिला यंत्रमाग कधी आला त्यापासून मीरा या चारचाकी कारच्या बांधणीचा विक्रम याच गावचा असल्याची आठवण करून दिली.


चौकीदार चोर है

सभेवेळी उपस्थित जनसमुदायातून 'चौकीदार चोर है'च्या घोषणा दिल्या जात होत्या. मोदी देशातील जनतेला कसे फसवत आहेत याची चित्रफित दाखवली जात होती.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वडणगे, शिये, भुयेत भेटीगाठींवर भर

$
0
0

लोगो : मटा ऑफ दि स्पॉट

कोल्हापूर टाइम्स टीम

उन्हाबरोबरच राजकीय वातावरण तापू लागले आहे. लोकसभेच्या मतदानाला सात दिवसांचा कालावधी शिल्लक असताना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी व भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांनी वडणगे, निगवे, भुये, भुयेवाडी या गावांत दौरे, बैठकांचा सपाटा लावल्याचे चित्र आहे. मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठींवर अधिक भर देण्यात येत आहे.

महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी आमदार चंद्रदीप नरके यांच्या सोबतीने ग्रामीण भागातील संपर्क वाढवला आहे. आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांनीदेखील प्रचारात आघाडी घेतली आहे. दोन्ही उमेदवारांनी शेतकऱ्यांच्या भेटी घेत प्रचार चालविला आहे. तरुणांची टक्केवारी वाढल्याने युवा मतदारांकडे लक्ष केंद्रित केले आहे. तरुणांच्या हक्कांसाठी काम करण्याची आश्वासने दिली जात आहेत. युतीचे उमेदवार मंडलिक यांनी पडवळवाडी, केर्ले, केर्ली, रजपुतवाडी, नवीन चिखली, सोनतळी, सादळे, मादळे, जठारवाडी या भागात संयुक्त प्रचार दौरा काढून मतदारांच्या भेटी घेतल्या. गेल्या पाच वर्षांमध्ये केंद्रात आणि राज्यात एकच सरकार असल्याने कल्याणकारी योजना सुरू करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. बेरोजगारांना रोजगार उपलब्धतेसाठी 'मनेरगा'सारखी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. महिलांसाठी उज्वला गॅस आणि बचत गटाच्या माध्यमातून महिला आर्थिक सक्षमीकरण करण्यात आले आहे. शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसैनिकांनी पुढाकार घ्यावा. त्यासाठी ग्रामीण भाग पिंजून काढण्याचे आवाहन मंडलिक यांनी प्रचार दौऱ्यात केले.

आघाडीचे उमेदवार महाडिक यांनी दळणवळणाची सेवा, विमानतळ, रेल्वे प्रकल्प, मतदारसंघात नागरिकांना उत्तम दर्जाचे रस्ते, औद्योगिक क्षेत्रात दिलेल्या सोयीसुविधा, गेल्या चाळीस वर्षापासून प्रलंबित कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाचा पुढे सरकलेला प्रश्न, त्याचबरोबर ग्रामीण भागात दळणवळणाच्या सुविधा सक्षमपणे पोहोचविल्या आहेत असे मुद्दे घेऊन मतदारांना साद घातली आहे.

आयपीएलची आडकाठी

सध्या आयपीएलचा जोर असल्याने उमेदवारांना तरुणांना भेटण्यासाठी मोठा आटापिटा करावा लागत आहे. तरुण कार्यकर्ते क्रिकेट सामन्यात दंग असल्याने नेते आल्यानंतर कार्यकर्ते जमा करण्यासाठी स्थानिक गटप्रमुखांना धावाधाव करावी लागत आहे. ग्रामीण भागातही स्थानिक क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत. त्यामुळे स्थानिक नेत्यांनी प्रत्यक्ष मॅच सुरू असलेल्या ठिकाणी भेटींवर भर दिला आहे. आयपीएलचा हंगाम ऐन जोशात आहे. तरुणही गटागटाने मॅच पाहण्याचा आनंद घेत आहेत. अशावेळी नेत्यांना घेऊन तेथे भेटी देण्यावर भर देण्यात येत आहे.

उन्हाचा फटका

एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून उन्हाची तिव्रता वाढली आहे. कोल्हापूरचे तापमान चाळीस अंशांच्या वर गेले आहे. त्यामुळे निवडणूक रिंगणातील उमेदवारांना मतदारांना शोधताना अडचणी निर्माण होत आहेत. सकाळी सत्रात अकरा वाजेपर्यंत व सायंकाळी सहानंतर मतदारांच्या भेटी घेतल्या जातात. यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

सोशल मीडियावर भर

ग्रामीण भागातील तरुणांच्या हाती अँड्रॉइड मोबाइल आहेत. त्यामुळे उमेदवारांनी हायटेक प्रचार तंत्राचा वापर करण्यावर भर दिला आहे. नेत्यांनी सोशल मीडियावर अधिक वावर वाढवला आहे. ग्रामीण भागातील तरुण उमेदवारांचे समर्थन सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहेत. खास नेत्यांच्या बनवलेल्या इमेज शेअर करणे, व्हाट्सअॅप स्टेटस ठेवणे, फेसबुकसारख्या सोशल माध्यमावर नेत्यांच्या विकासकामांची मांडणी करणे, वाद-प्रतिवाद अशा माध्यमांतून प्रचारावर जोर देण्यात येत आहे.

भावकीत जोडण्या

राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागात प्रचार करत असताना नातेवाईकांच्या संपर्कावर मोठ्या प्रमाणात भर दिला आहे. कोण कोणाचे पाहुणे याची यादी काढली जात आहे. आवर्जून पाहुण्यांच्या भेटी घेण्यावर भर दिला जात आहे. त्याचबरोबर गावातील मोठा गोतावळा असलेल्या भावकीला आपल्याबरोबर जोडण्याचे आदेश नेत्यांनी दिले आहेत. त्यामुळे भावकीतील संपर्क वाढविण्यावर स्थानिक नेत्यांनी अधिक भर दिला आहे.

ग्रामीण भागातही निवडणुकीनिमित्त वातावरण तापू लागले आहे. मात्र उमेदवारांनी केलेली विकासकामे आणि त्याचा प्रत्यक्ष नागरीकांना झालेला वैयक्तिक फायदा यावरच ग्रामीण मतदार मतदान करतो. आपल्याला उपयोगी पडणारा उमेदवार कोण, याकडे अधिक लक्ष मतदार देतात. सर्वसामान्य नागरिकांशी नाळ जोडणारा नेता हवा आहे.

- विलास भोपळे, मतदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images