Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

भाजपच्या चार पदाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीचा प्रस्ताव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पक्षविरोधी कार्य करणाऱ्या भाजच्या चार पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करावी, अशी तक्रार प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे-पाटील यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे, असे पत्रक भाजप महानगर अध्यक्ष संदीप देसाई यांनी प्रसिद्धीस दिले आहे. पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

राजारामपुरी भाजप मंडल अध्यक्ष जयराज निंबाळकर, उत्तरेश्वर पेठ मंडल अध्यक्ष सतीश पाटील घरपणकर व शिवप्रसाद घोडके, फुलेवाडीतील महानगर चिटणीस राजू मोरे, लक्षतीर्थ वसाहत येथील गणेश खाडे हे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करत असल्याने त्यांची हकालपट्टी करावी, अशी तक्रार केली आहे. या पदाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. तरीही त्यांनी पक्षाचा आदेश डावलून विरोधी पक्षाचा प्रचार केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी प्रदेशाध्यक्षांकडे केली आहे. कोअर कमिटीच्या बैठकीत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, उपाध्यक्ष राहुल चिकोडे, सरचिटणीस विजय जाधव, अशोक देसाई, संतोष भिवटे, सुभाष रामुगडे, दिलीप मैत्राणी, अॅड. संपतराव पवार, आर. डी. पाटील, मारुती भागोजी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कार्यकर्त्यांच्या साथीने खासदार शेट्टींची प्रचार मोहीम

$
0
0

अजय जाधव, जयसिंगपूर

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आघाडीचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार राजू शेट्टी यांच्या प्रचाराची सूत्रे जयसिंगपूर येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यालयातून हलत असली तरी त्यांच्या निवासस्थानीही सकाळपासूनच कार्यकर्त्यांची रिघ लागलेली असते. खासदार शेट्टी यांच्या पत्नी, मुलगा, भाऊ या कुटुंबीयांनीही प्रचाराची जबाबदारी उचलली आहे. गुरुवारी सकाळीच त्यांचे कुटूंबीय प्रचार मोहिमेवर बाहेर पडले. तर वाळवा तालुक्यात प्रचारासाठी जाण्याची खासदार शेट्टींसह कार्यकर्त्यांची तयारी सुरू होती.

सकाळी नऊची वेळ. शिरोळ येथे अर्जुनवाड रस्त्यालगत असणाऱ्या खासदार शेट्टी यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची वर्दळ तत्पूर्वीच सुरू झाली होती. सामाजिक चळवळीत काम करणारे पंचवीस ते तीस वयोगटातील काही तरूण, तरुणी शेट्टी यांना भेटण्यासाठी पुण्याहून आले होते. निवासस्थानालगतच्या संपर्क कार्यालयात शेट्टी या कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. एव्हाना प्रचाराकरीता जाण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ठिकठिकाणचे कार्यकर्तेही जमू लागले होते. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी लढा देणाऱ्या राजू शेट्टी यांनी २००४ची विधानसभा निवडणूक शिरोळ मतदारसंघातून लढविली. यावेळी त्यांनी 'एक व्होट, एक नोट' देण्याचे आवाहन मतदारांना केले होते. शेतकऱ्यांच्या या उगवत्या नेतृत्वाने केलेल्या आवाहनास भरभरून प्रतिसादही मिळाला. अन् लोकवर्गणीतून निवडणूक लढवून शेट्टी विधानसभेत पोहोचले. नंतर शेट्टी यांनी लोकसभेच्या दोन निवडणुका लढविल्या व विजयीही झाले. आता पुन्हा तिसऱ्यांदा लोकसभेच्या निवडणुकीस सामोरे जात असतानाही त्यांच्याकडे येणारा निधीचा ओघ कायम आहे. आज सकाळीही काही कार्यकर्त्यांनी शेट्टी यांच्याकडे दहा हजारांचा निधी सुपूर्द केला.

शिरोळ तालुका हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे केंद्र. गेल्या पंधरा वर्षात स्वाभिमानी संघटनेने व्होट बँक तयार केली आहे. त्यामुळे येथे फारशी प्रचाराची गरज नसल्याने संघटनेचे पहिल्या फळीतील कार्यकर्ते हातकणंगले, वाळवा, शिराळा, शाहूवाडीसह अन्य तालुक्यांत प्रचार मोहीम राबवित आहेत. कुटूंबीयांनीही प्रचारात खारीचा वाटा उचलला आहे. त्यांच्या पत्नी संगीता या स्वाभिमानी महिला आघाडीतील सदस्यांसोबत शिरोळ, हातकणंगले व वाळवा तालुक्यात प्रचार करीत आहेत. मुलगा सौरव हा शाहूवाडी तालुक्यात अन्य कार्यकर्त्यांसमवेत घरोघरी संपर्क अभियान राबवत आहे. शेट्टी यांचे भाऊ सुभाष हेही प्रचारात सक्रीय आहेत. गुरुवारी वाळवा तालुक्यातील कृष्णाकाठच्या सुमारे पंधरा गावांत प्रचारफेरी असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. सायंकाळी बोरगाव व वाळव्यात सभा असल्याने कार्यकर्त्यांशी संवाद साधून ते प्रचार मोहीमेसाठी रवाना झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठाच्या परीक्षेत कॉपी बहाद्दरांची शंभरी

$
0
0

विद्यापीठाच्या परीक्षेत कॉपी बहाद्दरांची 'शंभरी'

परीक्षा प्रमाद समितीची शुक्रवारी बैठक

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाच्या २६ मार्चपासून सुरू झालेल्या उन्हाळी सत्रातील परीक्षांमधील कॉपी बहाद्दरांची संख्या शंभरावर पोहोचली आहे. परीक्षा सुरू झाल्यानंतरच्या १५ दिवसात भरारी पथक समितीतर्फे कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबतचा अहवाल तयार करण्यात आला आहे. १२ एप्रिल रोजी परीक्षा प्रमाद समितीची बैठक होणार असून या बैठकीत कॉपी बहाद्दरांवर कारवाई करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या अखत्यारीत येणाऱ्या कोल्हापूर, सांगली व सातारा या जिल्ह्यातील महाविद्यालये व विद्यापीठातील अधिविभागांच्या परीक्षांना २६ मार्चपासून सुरूवात झाली आहे. परीक्षाकाळात केंद्रांवर होणाऱ्या अनुचित प्रकारांवर नजर ठेवण्याबरोबरच कॉपी प्रकरणी कारवाई करण्यासाठी भरारी पथकाची नियुक्ती केली आहे. कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यांसाठी सहा भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. गेल्या १५ दिवसांमध्ये परीक्षा केंद्रांवर अचानक भेट देत भरारी पथकाच्या सदस्यांनी कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पकडले असून त्यांच्या नावाची यादी शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा प्रमाद समितीकडे पाठवली आहेत. यामध्ये छापील कागद जवळ बाळगणे, परीक्षेसाठी वापरण्यात येणाऱ्या साधनांमध्ये उत्तरे लिहिलेले कागद लपवणे, कपड्यांमध्ये उत्तर लिहिलेले कागद ठेवणे, चप्पल, घड्याळ यांचा वापर करून कॉपी करणे अशा प्रकारांचा समावेश आहे.

दरम्यान परीक्षा सुरू झाल्यानंतर दर पंधरा दिवसांनी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या नेतृत्वाखाली परीक्षा प्रमाद समितीची बैठक घेण्यात येते. या त्रिसदस्यीय परीक्षा प्रमाद समितीकडे भरारी पथकाकडून येणाऱ्या अहवालानुसार कॉपी प्रकरणी सापडलेल्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्याचे अधिकार आहेत. १२ एप्रिल रोजी प्रमाद समितीच्या बैठकीत १०० कॉपी बहाद्दरांची 'शंभरी' भरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमेदवारांच्या दारी प्रचाराची लगबग

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

भल्या पहाटे घराला जाग आलेली असते. मोबाइलची रिंग वाजू लागते. कुणी प्रचाराच्या नियोजनासाठी फोन केलेला असतो तर कोणी सभा, पदयात्रा ठरविण्यासाठी वेळ विचारत असतो. सकाळी सकाळीच काही कार्यकर्ते भेटण्यासाठी निवासस्थानी पोहोचलेले असतात. मोबाइलवरुन दिवसभराच्या प्रचाराच्या सूचना द्यायच्या, समोर आलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधायचा, नेत्यांच्या संपर्कात राहायचे अशी कसरत सध्या उमेदवारांच्या निवासस्थानी पाहावयास मिळत आहे.

गुरुवारी सकाळी रुईकर कॉलनीत राष्ट्रवादीचे उमेदवार व खासदार धनंजय महाडिक, शिवसेना भाजपचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक आणि हातकणंगले मतदारसंघातील शिवसेना-भाजपचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या निवासस्थानी भेट दिली असता दिवसभराच्या प्रचारासाठीची लगबग पहायला मिळाली. उमेदवारांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य प्रचारात गुंतला आहे. प्रत्येकाची जबाबदारी वेगवेगळी. दररोज नव्या भागात प्रचार. सकाळी आठ- साडेआठ वाजता प्रचाराला एकदा बाहेर पडले की प्रचार, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, सभा आटोपून घरी परतायला मध्यरात्र होते. दिवस उजडायला सुरू झालेल्या फोनची खणखण रात्री उशिरापर्यंत सुरुच असते.

महाडिकांच्या निवासस्थानी लगबग

राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारात अख्खं कुटुंब उतरले आहे. प्रत्येकाचा दिवसभराचा प्रचाराचा कार्यक्रम निश्चित. ज्या-त्या ठिकाणी वेळेवर पोहोचून लोकांशी संपर्क साधण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील. दिवसभराचा प्रचार, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन खासदार महाडिक यांना बुधवारी घरी पोहचले तेव्हा मध्यरात्र उलटून गेली होती. मात्र, गुरुवारच्या नियोजनात किंचितही फरक पडू नये म्हणून सकाळपासूनच दिवसभरातील कार्यक्रमाचे अपडेट्स घेणे सुरू होते. नेते मंडळी, प्रमुख पदाधिकाऱ्यांचे फोन सुरुच असतात. सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास नाष्ट्याच्या निमित्ताने सगळे कुटुंब एकवटले. पत्नी अरुंधती, मुले पृथ्वीराज, विश्वराज, कृष्णराज, आई शंकुतला, माई मंगला महाडिक यांच्यासोबत नाष्टा करताना बुधवारच्या प्रचाराविषयी चर्चा झाली. मतदारसंघातील प्रतिसाद, दिवसभरातील प्रचाराविषयी प्रत्येकजण अनुभव शेअर करतात. साडेआठनंतर निवासस्थानाच्या परिसरात कार्यकर्त्यांची लगबग वाढली. साधारणपणे कुटुंबांतील सगळे सदस्य साधारणपणे एकाचवेळी प्रचाराला बाहेर पडतात. प्रत्येकाच्या मोटारीत प्रचार साहित्य, वचननामा, पक्षाच्या चिन्हाचे साहित्य ठेवलेले. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास खासदार महाडिक हे आई शंकुतला यांना नमस्कार करुन प्रचाराला बाहेर पडतात. पाठोपाठ पत्नी अरुंधती, मुलगा पृथ्वीराजसह सगळेच प्रचार दौऱ्यासाठी निघतात.

कार्यकर्त्यांशी संवाद साधत मंडलिकांचा प्रचार

शिवसेना, भाजप युतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या निवासस्थानी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कसबा सांगावमधील काही कार्यकर्ते पोहोचलेले. कोल्हापुरातील सोमवार पेठेतील काही कार्यकर्ते भागातील कार्यक्रमाची निमंत्रणपत्रिका घेऊन भेटायला आले होते. बंगल्यासमोरील लॉनवर मंडप उभारलेला. कार्यकर्त्यांची बैठक व्यवस्था तेथे केली आहे. सकाळी साडेसात वाजण्यापूर्वीच प्रा. मंडलिक यांचे पुत्र अॅड. वीरेंद्र, यशोवर्धन आणि समरजित यांनी प्रचार दौऱ्याला सुरुवात केली. तर प्रा. मंडलिक यांनी गुरुवारी करवीर तालुक्यातील गावात प्रचार दौऱ्याचे नियोजन केले होते. त्यांनी वेगवेगळ्या भागातील माहिती, प्रचाराचे अपडेट घेताना निवासस्थानी आलेल्या नागरिकांची भेट घेतली. पी. ए. अमर पाटोळे, बाजीराव पाटील यांची धावपळ सुरूच होती. कार्यकर्त्यांचे फोन स्वीकारणे, नोंदी ठेवणे, प्रचार दौऱ्याची माहिती पुरविणे सुरू असते. सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास प्रा. मंडलिक प्रचारासाठी बाहेर पडण्याच्या तयारीत असताना नव्याने काही कार्यकर्ते निवासस्थानी आले. त्यांनी काही वेळ कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला आणि ते प्रचार दौऱ्यावर निघाले. घरातील कामे आटोपून पत्नी वैशाली या सकाळी साडेनऊच्या दरम्यान प्रचाराला बाहेर पडल्या.

वाढदिवसाच्या शुभेच्छांना प्रचाराचा दरवळ

माजी खासदार निवेदिता माने यांचा गुरुवारी वाढदिवस होता. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मतदारसंघातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा द्यायला निवासस्थानी गर्दी केली होती. शुभेच्छांचा स्वीकार करत कार्यकर्त्यांशी संवादही चालू होता. उमेदवार धैर्यशील माने यांची लगबग वाढली होती. प्रमुख कार्यकर्त्यांसोबत प्रचाराच्या नियोजनाबाबत चर्चा करायची, समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकायचे, सायंकाळच्या सभेसंदर्भात सूचना करायच्या हे सारं काही एकाचवेळी. इचलकरंजी येथील भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी निवासस्थानी भेट दिली. प्रचाराच्या नियोजनाबाबत चर्चा केली. माने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. एव्हाना हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुजित मिणचेकर, जि. प. सदस्य प्रविण यादव, माजी सदस्य महेश चव्हाण, बबलू मकानदार यांच्यासह मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांची निवासस्थानी गर्दी वाढत गेली. दररोज वेगवेगळ्या भागातील कानोसा घेतला जातो. नव्याने काही सूचना केल्या जातात. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या इचलकरंजीतील सभेकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारत, दिवसभर प्रचाराच्या नियोजित ठिकाणच्या घडामोडींची माहिती घेत धैर्यशील माने, आमदार मिणचेकर हे इतर कार्यकर्ते सकाळी ९.३० वाजता मतदारसंघातील दौऱ्यासाठी बाहेर पडले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीचे नगरसेवक कुठे आहेत?

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रचारात कुठे आहेत? अशी विचारणा खुद्द खासदार शरद पवारांनी केल्याने शुक्रवारी शहराध्यक्ष आर. के. पोवारांचा चांगलाच गोंधळ उडाला. पवारांनी थेट स्थानिक पातळीवरील प्रचाराचा आढावा घेत विचारणा केल्याने उपस्थित नेत्यांमध्ये खळबळ उडाली.

खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारार्थ पवारांनी कोल्हापूरच्या फेऱ्या वाढवल्या आहेत. गेल्या आठवड्यात पवार कोल्हापूर दौऱ्यावर आले होते होते. गुरुवारी ते पुन्हा कोल्हापूर दौऱ्यावर आले. गुरुवारी कागल येथील गैबी चौकात सभा घेतली. त्यानंतर ते परत कोल्हापुरात मुक्कामाला आले. शुक्रवारी सकाळी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पवारांची भेट घेतली. यावेळी खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह शहराध्यक्ष आर. के. पोवारही उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रचाराचा आढावा घेतला. पवारांनी 'आर.के.'ना राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रचारात कुठे आहेत? असा प्रश्न केला. महानगरपालिकेत १३ नगरसेवक असून दोन ते तीन नगरसेवक वगळता बाकीचे प्रचारात आहेत, अशी माहिती आर. के. नी दिली. त्यावर पवारांनी सर्व राष्ट्रवादीचे नगरसेवक सक्रीय झाले पाहिजेत, असा आदेश त्यांनी दिला.

शहरात भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी मतभेद विसरून प्रचार सुरू केला आहे. पण राष्ट्रवादी व काँग्रेस पक्ष प्रचारात बराच पिछाडीवर पडला आहे. त्यातच राष्ट्रवादीचे नगरसेवक सक्रीय झाले नसल्याने थेट पवारांनी आर. के. पोवारांना जाब विचारल्याने उपस्थित नेत्यांमध्ये खळबळ उडाली. राष्ट्रवादीच्या प्रचारात उतरलेल्या कार्यकर्त्यांवर दबाव टाकला जात असल्याची चर्चा नेते मंडळीत सुरू होती.

१७ तारखेची सभा राष्ट्रवादीची

राष्ट्रवादी काँग्रेसची १७ एप्रिलला गांधी मैदानात शरद पवारांची सभा होणार आहे. या सभेला काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार आहेत का? असा प्रश्न पवारांना केला असता, ही सभा राष्ट्रवादीची आहे. या सभेला काँग्रेसचे कोण नेता येणारयाची माहिती माझ्याकडे आलेली नाही. मीच सभा घेणार असल्याचे पवारांनी स्पष्ट केले. पवारांनी खुलासा केल्याने कोल्हापूरात राहुल गांधी, प्रियांका गांधी, सोनिया गांधी यांची सभा होणार असल्याच्या चर्चेवर पडदा पडला आहे.

हरियाणातील पैलवान महाडिकांच्या प्रचाराला

हरियाणातील मनजित व अन्य मल्ल महाडिकांच्या प्रचार करण्यासाठी आले आहेत. त्यांनी आज पवारांची भेट घेतली. 'महाडिक हे कुस्तीला मदत करतात. त्यांचे आणि आमचे संबध चांगले असल्याने आम्ही मल्ली प्रचारासाठी आलो आहोत,' असे मल्ल मनजित याने सांगितले. कोल्हापूरात २०० हून अधिक हरियाणातील नागरिक मतदार असून त्यांच्या घरी जाऊन राष्ट्रवादीचा प्रचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन ‘सुविधा’ ऑफलाइन

$
0
0

स्वतंत्र कक्ष कार्यरत

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीसाठी आयोगाने ऑनलाइन 'सुविधा' अॅप आणले. मात्र हे अॅप ऑफलाइनच राहिले. परिणामी उमेदवार, त्यांच्या समर्थकांना अॅपमधून घर बसल्या मिळण्याऱ्या सेवा मिळत नसल्याचे चित्र आहे. त्या सेवा देण्यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालय, तालुक्याच्या ठिकाणी सुविधा कक्ष कार्यान्वित केले आहेत.

पहिल्यांदाच या निवडणुकीत अधिकाधिक ऑनलाइनचा वापर केला जात आहे. आचारसंहितेच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी सीव्हिजील अॅप आहे. अॅपवरील तक्रारींची दखल घेण्यासाठी यंत्रणा कार्यरत आहे. अशाचप्रकारे सुविधा अॅपही आहे. हे अॅप आयोगाने तयार केले आहे. अॅपवरून उमेदवारी अर्ज भरणे, प्रचार वाहन, सभा, बैठकांची परवानगी घेणे, निवडणूक चिन्ह मिळवता येते. एका क्लिकवर घर बसल्या कधीही या सेवा मिळवता येतात. पण अॅपला तांत्रिक अडचणी आहेत. अॅपवरून मिळणाऱ्या कोणत्याही सेवा ऑनलाइन मिळत नाहीत. यासंबंधी स्थानिक निवडणूक प्रशासनाकडे राजकीय पक्ष, उमेदवारांचे प्रतिनिधी विचारणा करीत आहेत. आयोगाच्या पातळीवरच अॅप कार्यान्वित करण्यात आलेले नाही, असे प्रशासन सांगत आहे. अॅप सुरू होण्याची प्रतीक्षा करण्याऐवजी निवडणूक प्रशासनाने ऑफलाइन सेवा देण्यासाठी कक्ष सुरू केले आहेत. प्रत्येक तालुका ठिकाणी आणि जिल्हास्तरावरील परवानगी देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातही कक्ष कार्यरत आहे. या कक्षातून परवाने दिले जात आहेत. ऑफलाइन असल्याने त्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी आहेत.

...............

एक दिवसही कार्यान्वित नाही

निवडणुकीदरम्यान मिळणाऱ्या विविध सेवांत सुविधा अॅपची माहिती देण्यात आली आहे. प्रत्यक्षात एकही दिवस हे अॅप कार्यान्वित झालेले नाही. अनेकजण मोबाइलवरून अॅप डाऊनलोड करण्याचा प्रयत्न करतात, पण यश येत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुल मतदारांचा अखेर शोध

महाडिक, मानेंकडून सरकारी देणी थकीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक, हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्याकडून सरकारी येणे थकीत आहे. जिल्हा निवडणूक प्रशासनाने प्रसिध्द केलेल्या जाहिरातीवरून ही माहिती पुढे आली आहे. दोन्ही उमेदवारांनी देणी का थकीत आहेत, यासंबंधीचे कारणही प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यासोबत सरकारी देणी असतील तर ती कोणती आहेत, नसतील तर नसल्याचा संबंधित विभागांचे दाखले देणे बंधनकारक आहे. यानुसार कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून रिंगणातील १५ उमेदवारांनी माहिती दिली आहे. त्यात उमेदवार महाडिक यांचे ४४ हजार ७४४ रूपये सरकारी भाडे थकीत आहे. हातकणंगले तालुक्यातील महालक्ष्मी टेक्सटाईल्सचे २३ लाख ३३ हजार ८५० रूपयांचे वीज बिल थकीत आहे. या टेक्सटाइल्समध्ये माने यांची एक षष्टांश इतकी मालकी आहे. म्हणून एकूण थकीत वीज बिलातील १ लाख २ हजार ९०६ रूपये माने यांनी भरणे अपेक्षित आहे. त्यांनी ती भरलेली नाही.

...........

कोट

'निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या जाहिरातीमध्ये दिल्ली येथील निवासस्थानाची थकीत रक्कम थकीत असलेली दिसते. मात्र ती रक्कम २५ मार्च पर्यंतची देय होती. देय रक्कम भरून पावत्या प्रशासनाकडे दिलेल्या आहेत.

धनंजय महाडिक, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पवार-श्रीपतराव शिंदे यांच्यात चर्चा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जनता दलाचे नेते माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीचे खासदार शरद पवारांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीतील जनता दलाच्या पाठिंब्याबाबत त्यांच्यात चर्चा झाली. दरम्यान कर्नाटकातील निपाणीचे माजी आमदार काकासाहेब पाटील यांनीही पवारांची भेट घेतली आहे. मात्र, चर्चेचा तपशील समजला नाही.

भाजप शिवसेना महायुतीच्या विरोधात काँग्रेस राष्ट्रवादीसह डाव्या पक्षांची आघाडी झाली आहे. शेतकरी कामगार पक्षाने आघाडीला पाठिंबा दिला असून अद्याप जनता दलाने पाठिंबा दिलेला नाही. गेल्या आठवड्यात पवार कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळीही माजी आमदार शिंदे यांच्याशी संपर्क झालेला नव्हता. गुरुवारी पवार दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. कागलमधील सभा संपवून पवारांचा कोल्हापुरात पंचशील हॉटेलमध्ये मुक्काम होता. आज शुक्रवारी सकाळी उद्योजक व्ही. बी. पाटील यांच्यासमवेत माजी आमदार शिंदे भेटायला आले. त्यांच्यासमवेत पवारांनी चर्चा केली. यावेळी खासदार धनंजय महाडिक, व्ही. बी. पाटील, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, चंद्रकांत वाकळे उपस्थित होते.

शिंदे यांच्या भेटीबाबत पवारांना विचारले असता ते म्हणाले, 'शिंदे माझे जुने सहकारी आहेत. ते आज मला भेटायला आले होते.' पण पाठिंब्याबाबत पवारांनी कोणतेही भाष्य केले नाही. पण शिंदे यांनी आघाडीला सहकार्य करण्याची तयारी दाखवली असल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापुरी फटका

$
0
0

'आत्ता हे सोसत नाही...'

बाळासाहेब पाटील

Balasaheb.Patil@timesgroup.com

Tweet @BalpatilMT

बाहेर ऊन 'मी' म्हणत होतं. जस-जसं ऊन तापत जाईल तसं गावातल्या घराघरातलं वातावरण तापत होतं. त्यावर उपाय म्हणून रसन्याची पाकिटं फोडून गंजात सरबत केला होता, हलगीवाल्याला शेकायची गरज वाटत नव्हती. गल्ली-गल्ली तापली होती. घामाच्या धारा निघत होत्या. असल्या गरमागरम वातावरणात सगळं गाव गल्लोगल्ली फिरत होतं. या मिरवणुकीच्या पुढं एक 'तयारीचं' पोरगं जोरात घोषणा देत होतं आणि बाकीचे त्याचे अनुकरण करत किंवा वाक्य पूर्ण करत त्यात सामील होत होती. जिल्ह्याच्या पार एका टोकला आसलेल्या तालुक्यातील त्या आडवळणी गावात पदयात्रा सुरू होती. 'नेता खासदार झाल्याशिवाय पायात चप्पल घालणार नाही' असा 'पण' केलेल्या कार्यकर्त्याच्या गावात ही पदयात्रा असल्यानं जोरात तयारी झाली होती. गल्लीत गर्दी सामावत नव्हती. उमेदवाराच्या कपाळावर आत्ता कुंकू लावलायला जागा शिल्लक नव्हती तरी ते आयाबायांना नकार देत नव्हते. हात जोडून दिसेल त्याला नमस्कार करत होते. त्यातून लहान मुलंही सुटत नव्हती. सगळं गाव भारल्यासारखं झालं होतं. नाही म्हणायला विरोधक आपापल्या घरात बसून या सगळ्याचा कानोसा घेत होते. त्यांनी आपल्या पोरांना या मिरवणुकीत सोडलं होतं. कोण-कोण कुठं-कुठं कसा-कसा आहे यावर नजर ठेवायला हे नजरबाज कामी येणार होते. तेही आम्ही तुमचेच आहे म्हणून बेमालूम मिसळून गेले होते.

गावातल्या गल्ल्याही भरभक्कम असल्यानं उमेदवाराच्या कपाळावरचा कुंकू घामाबरोबर ओघळत होता. चेहरा उन्हानं आणि कुंकवानं लालबुंद झाला होता. 'साहेब' हात जोडत होते आणि कार्यकर्ते कडे करून 'मी पुढे का तू पुढे' असं करत त्यांना संरक्षण पुरवत होते. गल्ली गल्ली करत पदयात्रा अगदी उधाणाला आली होती, त्यावेळी साहेबांच्या लक्षात आलं आपला बिनीचा शिलेदार कुठंतरी गायब झालाय. तरीही साहेबांना तिकडं लक्ष द्यायला उसंत नव्हती, कारण पदयात्रा लोकांनी 'हातात' घेतली होती. कुठल्यातरी जत्रेत गल्ली फुलावी तशी गर्दी उसळली होती. घोषणांनी घरा घराची कौले हलायला लागली. डेअरीच्या दारात आल्यावर तर घोषणेला एकच 'उकळी' आली. साहेबांना पुन्हा कार्यकर्ता आठवला, मात्र पदयात्रा लोकांनीच हातात घेतल्यानंतर त्यांच्या मनातला विचार बाजूला गेला. अखेर एक एक करत कार्यकर्त्याच्या गल्लीत पदयात्रा आली. कार्यकर्त्याच्या कार्यकर्त्यांनी आता आणखी वातावरण तापवायला सुरुवात केली. घोषणांनी परिसर दणाणला. एक एक घर करत साहेब कार्यकर्त्याच्या दारात आले तर दोघा कार्यकर्त्यांनी त्यांना हळूच कानात सांगितलं, 'साहेब इथं जरा थांबायला लागतंय.' साहेबांचे कान टवकारले. कारण त्यांच्या तालुक्यात 'साहेब, या गावात जरा रडायला लागतंय' असं म्हटलं की एक 'भाबडे साहेब' बोलता बोलता हुंदका फोडतात आणि सभा 'सजवतात' हे त्यांना माहीत होतं. मग साहेब थांबले तेवढ्यात दोन कार्यकर्त्यांनी साहेबांच्या कार्यकर्त्याला उचलूनच बाहेर आणला. साहेबांना वाटलं, हा नाराज बिराज आहे की काय? पण आल्या आल्या त्यानं 'एकदाच घुसणार...' म्हणून घोषणा दिली आणि बघता बघता पुन्हा वातावरण तापलं. कार्यकर्ता कृतकृत्य झाला, 'साहेब, कायबी करा, खरं आता हे सोसत न्हायी. तालुक्यावर अन्याय झालाय. आम्हाला जगणं नकोसं झालंय, हाल बघवत नाही.'असं म्हणत म्हणत त्याचे डोळे भरून आले. साहेबही कार्यकर्त्याचे प्रेम बघून भारावले. तेवढ्यात साहेबांना रसना आणला. साहेबांनी इतरांना घ्यायला सांगितला. मग त्यांना काहीतरी आठवलं, 'अरे हो पण तू पदयात्रेतनं कुठं गायब झालास? आणि हा असा पोरांच्या हातावर का बसलास?' यावर 'साहेब खाली पाय टेकवत नाही. आत्ता तुम्ही खासदार झाल्यावरच खाली उतरणार आणि पायाच चप्पल घालून तुम्हाला हार घालायला येणार..'मग एकच जयघोष झाला. 'एकदाच घुसणार...!'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फास्ट न्यूज

$
0
0

आर्ताचे लेणे

डॉ. सरोजिनी बाबर जन्मशताब्दी निमित्त श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी विलेपार्लेतील लोकमान्य सेवा संघाच्या सी. म. जोशी दिलासा केंद्रातर्फे गुरुवार, १८ एप्रिल रोजी विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. महाराष्ट्रातील लोकसाहित्य, आणि लोकसंस्कृतीच्या संशोधक, संग्राहक, संपादक आणि ज्येष्ठ अभ्यासक म्हणून नावलौकिक मिळविलेल्या लेखिका डॉ. बाबर यांचे जन्मशताब्दी वर्ष ७ जानेवारी २०१९ पासून सुरू झाले आहे. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी विलेपार्ले पूर्वेतील डहाणूकर कॉलेजच्या मागील बाजूस असलेल्या नाडकर्णी बाल कल्याण केंद्रात सायंकाळी ४ ते ६ या वेळेत आयोजित केला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून साहित्यप्रेमींनी त्याचा आस्वाद घेण्याचे आवाहन संस्थेने केले आहे.

विधी सीईटी परीक्षेसाठी मार्गदर्शन

महाराष्ट्र स्टुडंट्स लॉ असोसिएशन (मसला) तर्फे सोमवार, १३ एप्रिल रोजी विधी प्रवेश प्रक्रियेची (सीईटी) तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर आयोजित केले आहे. पाच वर्षे बी.एल.एस आणि तीन वर्षांच्या एल.एल.बी. सीईटी इच्छुकांसाठी शिबीर आहे. त्यात ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. सेंट्रलाइज्ड प्रवेश प्रक्रियेतील (कॅप) मार्गदर्शनासाठी सीईटी सेल प्रतिनिधी सहभागी होतील. संपर्क : ८८२८ २०० ४०९, siddharth.ingle@masla.co.in, सिद्धार्थ इंगळे-९९३० २८९ ७३२, गुरुनाथ सटाले -७९७७ ९५४ ५०३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लढाई सोपी नाही’

$
0
0

कराड :

'साताऱ्याच्या इतिहासाला कलाटणी देणारी ही निवडणूक आहे. लढाई सोपी नाही परंतु, आम्ही कठोर संघर्षाची तयारी केली आहे. जगात भारताला नंबर वन बनविण्यासाठी, मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आपली इच्छाशक्ती वाढवून रात्रीचा दिवस करून काम करावे. महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना भरघोस मताधिक्याने विजयी करावे,' असे आवाहन महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

वाई येथील औद्योगिक वसाहतीतील गुरुवारी श्रीनिवास मंगल कार्यालयात उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ वाई-खंडाळा- महाबळेश्‍वर विधानसभा मतदारससंघातील कार्यकर्त्यांच्या जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी पाटील बोलत होते. मदन भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ हा पहिलाच मोठा मेळावा आयोजित केला होता. वेळेच्या बाबतीत काटेकोर असलेले मदन भोसले शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नियोजनात सहभागी न होण्याची पद्धत पाहून व त्यांच्यातील निवांतपणा पाहून चिडले. याचा प्रत्यय त्यांच्या भाषणात जाणवला. भोसले म्हणाले, 'उमेदवार तुमचा आहे. मला गाडी आली तरच मी बाहेर पडेन, नंतर प्रचार करेन, हे चालणार नाही.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साडेतीन लाखांचा गुटखा जप्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, वारणानगर

कोडोली-काखे रोडवर शुक्रवारी दुपारी अन्न औषध प्रशासनाने छापा टाकून अंदाजे साडेतीन लाखांचा गुटखा जप्त केला. प्रशासनाला कोडोली-काखे दरम्यान अनधिकृत गुटख्याचा साठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर कोडोली पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. रात्री उशिरापर्यंत मोजदाद करण्याची कारवाई सुरू असल्यामुळे कोडोली पोलिसात या गुन्ह्याची नोंद झाली नव्हती. दरम्यान, कोल्हापूरच्या अन्न व औषध प्रशासनाने मुद्देमाल व संबंधितांना कोल्हापूरला नेल्यामुळे कोडोली पोलिसांत रात्री उशिरा गुन्हा दाखल होईल, असे कोडोली पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक संजीव झाडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुन्या कोल्हापुरात उमेदवारांच्या लीडची चर्चा

$
0
0

मटा ऑफ दी स्पॉट ... लोगो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अठरापगड जाती आणि विविध जातीधर्मांच्या मतदारांच्या संख्या असलेल्या जुन्या कोल्हापुरातील गल्लीबोळात राजकारणावर चर्चा झडू लागली आहे. शिवसेनसेचे आमदार, भाजप महानगर अध्यक्ष आणि महापौरांचे वास्तव्य असलेल्या या भागात काँग्रेस, राष्ट्रवादी, ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांचा वरचष्मा असला तरी युतीच्या कार्यकर्त्यांची भक्कम फळी प्रचारात राबत आहे.

जुना बुधवार, शुक्रवार, शनिवार, गुरुवार, उत्तरेश्वर, सोमवार पेठेसह सिद्धार्थनगरचा समावेश जुन्या कोल्हापुरात होतो. मराठा, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, लिंगायत धर्मियांसह दलित, चर्मकार, परीट, शिंपी, तेली, गवळी, जोशी, कुंभार, लोणार, राजपूत (घिसाडी) समाजाची वस्ती या परिसरात मोठ्या प्रमाणावर आहे. आमदार क्षीरसागर यांचे घर शनिवार पेठेत असल्याने शिवसेनेच्या प्रचाराची झलक परिसरात पहायला मिळते. दिवसभर शिवसैनिकांचा तिथे राबता असतो. शनिवार पेठेतील शिवसैनिक व मंडलिकप्रेमींनी प्रचाराचा जोर धरला आहे. सिद्धार्थनगरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीची जोरदार तयारी सुरु आहे. या परिसराचा कानोसा घेतला असता आंबेडकर जयंतीनंतर समाजाची बैठक होऊन मतदान कुणाला करायचे हा निर्णय होईल, असे परिसरातील नागरिकांनी सांगितले.

जुना बुधवार पेठ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी इथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आहेत. महापौर सरिता मोरे आणि भाजप महानगर अध्यक्ष संदीप देसाई यांचे वास्तव्य याच भागात आहे. महायुतीने सामूहिक प्रचार सुरु केला असला तरी काँग्रेस व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कुठेच दिसत नाहीत. पण गल्लोगल्ली व तालमीच्या कठ्ठ्यावर खासदार धनंजय महाडिक की प्रा. संजय पाटील निवडून येणार यावर जोरदार चर्चा झडत आहेत. कोण निवडून येणार कोण पडणार यावर पैजा लागत आहेत. ख्रिश्चन वसाहत, फकीरवाडा येथील मतदान आघाडीला अनकूल राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शुक्रवार पेठ, शनिवार पेठ हा परिसर विविध जातीधर्मात विभागला असला तरी महायुतीने प्रचारात आघाडी घेतली आहे. इथे ताराराणी आघाडीचे नगरसेवक आघाडीचा किल्ला लढवत आहेत.

शिवाजी चौक, महानगरपालिका, ऋणमुक्तेश्वर, पापाची तिकटी या ठिकाणी व्यापारी वस्ती असल्याने दुकान, हॉटेल, उपहारगृहात केवळ राजकारणाचीच चर्चा सुरु आहे. कुठला उमेदवार चुकला, कोणता उमेदवार पक्षाशी एकनिष्ठ आहे, जिल्ह्यात काय हवा आहे, कोणता नेता उघड प्रचार करतोय, तर कोण छुपी मदत करतोय याच्या चर्चा झडू लागल्या आहेत. तरुणाईसह ज्येष्ठ नागरिकांच्या कट्ट्यावर चर्चेने जोर धरला आहे. जीएसटी, नोटाबंदी हे विषय मागे पडले असून महायुती, आघाडीबरोबर उमेदवाराचे चारित्र्य, देहबोली, पक्षनिष्ठेवर मतदान करणार असल्याची प्रतिक्रिया मतदारांकडून व्यक्त होऊ लागली आहे.

सोमवार पेठेत अकबर मोहल्ला, मटण मार्केट, शिवाजी चौकात नागरी वस्तीबरोबर व्यापारी वस्तीही मोठी आहे. महिला वर्गात उमेदवारांच्या पत्नींच्या समाजकार्याची चर्चा होत आहे. भेट वस्तू वाटपाला महिलांकडून विरोध होत असून चांगल्या उमेदवाराला मतदान करणार असल्याचे महिलांनी सांगितले.

......................

कोट

'उन्हामुळे प्रचारात जोर नाही. तसेच निवडणुकीत कुठलीही लाट नाही. पण स्थानिक उमेदवाराचे काम, चारित्र्य, पक्षनिष्ठा याचा विचार होत आहे. राफेल घोटाळा वृत्तपत्रात वाचतो. कोर्टाचे आदेशही होत आहेत. पण त्याचा परिणाम निवडणुकीवर होणार नाही.

जोतराम दोनवडेकर, मस्कुती तलाव

................

'नोटबंदी, जीएसटीचा फटका जरी बसला असला तरी निवडणुकीत या मुद्द्याचा परिणाम होण्याची शक्यता नाही. लोकसभेची निवडणूक असली तरी ती स्थानिक राजकारणावर पोचली आहे. मतदार जरी सुशिक्षित असला तरी स्थानिक राजकारणाचे पडसाद मतदानावर पडण्याची शक्यता आहे.

सुजीत शारबिद्रे, शनिवार पेठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाडिकांना पैलवान, वस्तादांचा पाठिंबा

$
0
0

कोल्हापूर

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांना पैलवान आणि वस्तांदानी पाठिंबा दिला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महान भारत केसरी दादू चौगुले होते.

दादू चौगुले म्हणाले, 'निरोगी युवक हा देशाचा आधारस्तंभ आहे. महाडिक यांना लहानपणापासून व्यायाम व कुस्तीची आवड असून त्यांनी शरीर कमावले आहे. मन, मनगट, मेंदू सक्षम ठेवणारे पैलवान महाडिक विरोधी उमेदवाराला लोकसभा निवडणूकीत चितपट करतील.' महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर म्हणाले, 'महाडिक हे कुस्तीपटू असून ते कुशल संघटक आहेत. सढळ हाताने मदत करुन त्यांनी कुस्तीला आश्रय दिला आहे. जिल्ह्यातील पैलवानांचे ते आधारस्तंभ असल्याने त्यांचा विजय निश्चित आहे.' खासदार महाडिक म्हणाले, 'मी नियमित व्यायाम करत असून निव्यर्सनी आहे. कोल्हापूर जिल्हाही निरोगी आणि निव्यर्सनी असला पाहिजे. त्यासाठी शालेय वयात क्रीडा संस्कार रुजवले पाहिजेत. कुस्तीबरोबर खूप वाचन, मनन चिंतन केल्याने मला संसदरत्न पुरस्कार मिळाला. यावरुनच पैलवान प्रचंड बुद्धिमान असतात हे सिद्ध होते.' यावेळी पैलवान अशोक माने, संभाजी वरुटे, राजाराम मगदूम, अमृत भोसले, यशवंत दोनवडेकर यांची भाषणे झाली. मेळाव्याला वस्ताद रसूल हनिफ, रंगा ठाणेकर, संतोष पाटील, सर्जेराव पाटील, विलास पाटील, रविंद्र पाटील, शाहू चव्हाण यांच्या जिल्ह्यातील विविध तालमींचे वस्ताद व पैलवान उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मिरची बाजाराला दरवाढीचा तडका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

उन्हाचा तडाखा वाढला असून, घरोघरी महिलावर्गाकडून मिरची खरेदीसाठी तयारी सुरू झाली आहे. वेळेत पाऊस न झाल्याने दर्जेदार मिरचीचे उत्पादन कमी झाल्याने मिरचीच्या दरात प्रतिकिलो १० पासून १०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. तसेच चटणी तयार करण्यासाठी लागणाऱ्या मसाल्यांच्या पदार्थात प्रतितोळा पाच ते दहा रुपयांची वाढ झाल्याने चटणी व मसाला बाजार 'तिखट' झाला आहे.

फेब्रुवारी महिना संपला की शहर व ग्रामीण भागातील महिलांना मिरची खरेदीचे वेध लागतात. वर्षभरासाठी लागणाऱ्या चटणीसाठी मिरचीचा बुक्का (पूड किंवा पावडर) तयार केला जातो. कोल्हापूरकरांच्या चटणीत हमखास संकेश्वरी मिरचीचा समावेश असतो. यंदा संकेश्वरी मिरचीचा दर प्रतिकिलो ७०० ते ९०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. गतवर्षी संकेश्वरीचा दर प्रतिकिलो ८०० रुपये होता. संकेश्वरी मिरची चवीला तिखट असून, रंग व वासाला चांगली असल्याने कोल्हापूरकरांची या मिरचीला पसंती असते. मटण, मासे, मसाल्याचे पदार्थ तयार करण्यासाठी संकेश्वरी मिरची पावडरचा वापर केला जातो. खास संकेश्वरी मिरचीची खरेदी करण्यासाठी काही कुटुंबातील सदस्य थेट गडहिंग्लज बाजारपेठेला भेट देतात.

संकेश्वरीबरोबर लवंगी, ब्याडगी, कनार्टक जवारी, गुंटूर मिरचीलाही मोठी मागणी आहे. कर्नाटक मिरचीचा दर प्रतिकिलो १६० रुपये आहे. ब्याडगीचा दर १६० ते १९० रुपये आहे. काश्मिरी मिरचीचा दर प्रतिकिलो २४० रुपये आहे. मारवाडी, गुजराती समाज या मिरचीला पसंती देतात. देठ काढलेल्या ब्याडगी मिरचीचा दर २४० ते २५० रुपये आहे.

०००००

कोट...

खरीप हंगामात शेवटचा पाऊस न झाल्याने उत्तम दर्जाच्या मिरचीचे उत्पादन कमी झाले. त्यामुळे यंदा मीडियम दर्जाची मिरची बाजारात आली आहे. मिरचीच्या दरात प्रतिकिलो १० ते १०० रुपये दरवाढ झाली आहे.

अनंत सांगावकर, मिरची व्यापारी

०००००

बाजारातील मिरची दर (प्रतिकिलो)

संकेश्वरी ७०० ते ९०० रुपये

लवंगी १५० रुपये

ब्याडगी १६० ते १९० रुपये

कर्नाटक जवारी १६० रुपये

गुंटूर १२० रुपये

काश्मिरी २४० रुपये

०००

मसाल्याचे दर

धने १४० ते १६० रुपये प्रतिकिलो

हिंग ६ रुपये प्रतितोळा

नाकेश्वर १४ रुपये प्रतितोळा

वेलदोडे २४ रुपये प्रतितोळा

मसाले वेलदोडे १५ रुपये प्रतितोळा

धोंडफूल १५ रुपये प्रतितोळा

जायपत्री २४ रुपये प्रतितोळा

बडीशेप २४ रुपये १०० ग्रॅम

शहाजिरे १० रुपये प्रतितोळा

तमालपत्री २ रुपये प्रतितोळा

रामपंत्री १० रुपये प्रतितोळा

मिरे १२ रुपये प्रतितोळा

लवंग १० रुपये प्रतितोळा

डालचीन ६ रुपये प्रतितोळा

पांढरे मिरे १५ रुपये प्रतितोळा

हळकुंड १६ रुपये १०० ग्रॅम

मेथी १० रुपये प्रतितोळा

सुके खोबरे १८० ते २०० रुपये प्रतिकिलो.

00000000

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मीही ध्यानात ठेवलंय...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'आमचं ठरलंय,' असा प्रचार करणाऱ्या सतेज पाटील यांना 'तू ठरवलंस, तर मीही ध्यानात ठेवलंय,' असा थेट इशारा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पेठ वडगांव येथे बोलताना दिला. खासदार राजू शेट्टी यांच्या प्रचारार्थ पवार यांची सभा आयोजित केली होती. देशावर मोदींच्या रुपाने आलेली राष्ट्रीय आपत्ती घालवण्यासाठी मतदारांनी खासदार शेट्टी आणि खासदार धनंजय महाडिकांना विजयी करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करताना दुसरीकडे जिल्ह्यातील राजकारणाचा वेधही घेतला. आघाडी धर्माचे पालन न करणाऱ्या काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचा या सभेत त्यांनी चांगलाच समाचार घेतला.

पवार म्हणाले, 'नोटबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. शेतकरी दारिद्र्याने पिचला आहे. रोजगार नसल्याने तरुण बेकार झाले आहेत. मोदी सरकारच्या कारभारामुळे अनेक पक्ष मतभेद विसरुन आम्ही एकत्र शक्ती निर्माण करत आहेत. पण कोल्हापूर गमतीचे शहर आहे. तिथे काहीतरी वेगळेच चालले आहे. आमचे एक भावंड 'आमचं ठरलंय,' अशी जाहिरात करत आहे. जर, तू ठरवलं असशील तर मी ही ध्यान्यात ठेवलंय. छोट्यामोठ्या गोष्टी लक्षात ठेवून विरोध करणार की देशासमोर उभ्या ठाकलेल्या मोठ्या प्रश्नांसाठी हितसंबंध बाजूला ठेवून भाजपची सत्ता घालवण्यासाठी एकत्र येणार? शेतकरी, कष्टकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त होत असताना अशा भानगडी करता? पंचगंगेचे पाणी पिणारे आणि इथल्या मातीतील अन्न खाणारे असा चुकीचा संकुचित विचार स्वीकारणार नाहीत.'

पवारांनी राफेलप्रश्नी टीका करताना कागदाचे विमानही करता येत नाही अशा अनिल अंबानींना मोदी यांनी कंत्राट दिले आहे अशी टीका केली. ते म्हणाले, 'देश सरंक्षणासाठी राफेलविषयी माहिती देता येत नाही, असे मोदी सरकारने संसदेत सांगितले. पण याच प्रश्नांवर सुप्रिम कोर्टात काहीजणांनी याचिका दाखल केल्यावर कागदपत्रे चोरीस गेल्याचे सरकारच्यावतीने सांगण्यात आले. ज्या सरकारला देशाची गुप्त माहिती सांभाळता येत नाही त्यांना देशाचे संरक्षण करण्याचा अधिकार नाही. '

सभेला खासदार राजू शेट्टी, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, माजी खासदार जयवंतराव आवळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार प्रकाश आवाडे, सत्यजित देशमुख, विद्या पोळ, माजी पोलिस अधिकारी गुलाबराव पोळ यांच्यासह आघाडी पक्षांतील पदाधिकारी उपस्थित होते.

.. .. ..

उष्ट्या तुकड्यासाठी...

संसदेत बाळासाहेब माने यांनी खासदार म्हणून ताठ मानेने काम केले, असे गौरवोद्गार काढून पवार यांनी धैर्यशील माने यांचे नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, 'माने यांची परंपरा कायम ठेवण्यासाठी निवेदिता माने यांना दहा वर्षे राष्ट्रवादीने खासदार म्हणून संधी दिली. त्यांच्या चिरंजिवांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद दिले. पण कुणाच्या उष्ट्या तुकड्यासाठी ते स्वाभिमान गहाण ठेवत आहेत? त्यांनी चुकीचा रस्ता निवडला आहे. आम्ही बळीराजाच्या प्रश्नावर काम करणाऱ्या राजू शेट्टींना संधी दिली आहे.'

.. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माणदेशातील विहिरी कोरड्या

$
0
0

माणदेशातील विहिरी कोरड्या

सातारा :

माण तालुक्यात दुष्काळाने उग्र रूप धारण केले आहे. माणदेशी जनतेसमोर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट होते आहे. ढाकणी तलाव्यातील विहिरीवरून तालुक्यातील सुमारे सत्तर गावांना साठ टॅकरद्वारे लाखो लिटर पाणीपुरवठा केला जात आहे. ती विहिर कोरडी पडू लागल्याने संबंधित गावातील जनतेवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. ढाकणी तलाव्यात उरमोडीचे पाणी तत्काळ न सोडल्यास तालुक्यातील अनेक गावांतील जनतेवर गावे सोडण्याची वेळ येईल, अशी भीती माणदेशी जनता व्यक्त करीत आहे.

......

मतदानावर बहिष्कार

सातारा :

उरमोडी प्रकल्पग्रस्त वेणेखोल गावातील ग्रामस्थांनी लोकसभेच्या २३ रोजी होणाऱ्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा घेतला निर्णय घेतला आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातील उरमोडी धरणग्रस्त वेणेखोल गाव गेली २० वर्षांपासून पुनर्वसनापासून वंचित राहिल्याने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तशी सूचना जिल्हाधिकारी व जिल्हापुनर्वसन अधिकारी कार्यालयास एक महिन्यापूर्वी दिली आहे. ग्रामस्थांनी केलेल्या मागणीसंदर्भात सरकारकडून कोणतीही कार्यवाही सुरू नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोदींनी विकासाचा वेग वाढवला : सुरेश प्रभू

$
0
0

मोदींनी विकासाचा वेग वाढवला : सुरेश प्रभू

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

'देशाला सक्षम नेतृत्व, शेतकऱ्यांना सन्मान, उद्योजक आणि उद्योजक वाढवून देशाची आर्थिक व्यवस्था सक्षम करण्यासाठी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा,' असे आवाहन केंद्रीय उद्योग, विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभु यांनी केले. भाजपा शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी शिवस्मारक सभागृहात उद्योजक, व्यापाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, प्रदेश भाजपचे चिटणीस मकरंद देशपांडे, रघुनाथ कुलकर्णी, महापौर शोभा बनशेट्टी आदी उपस्थित होते.

देशाच्या इतिहासामध्ये अनेक अमूलाग्र बदल करून देश विकासाच्या वाटेवर वेगाने नेणारे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांची संपूर्ण जगभरात चर्चा आहे. देशातील रस्ते, रेल्वे, विमान आणि जलवाहतुकीचे पर्याय सर्वसामान्यापासून ते अनेक उद्योगाला सहज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. रेल्वेच्या बजेटमध्ये सांगितलेल्या शंभर टक्के योजना पूर्ण करण्यात आल्या आहेत. देशात प्रत्येक महिन्यांला एक विमानतळ सुरू करण्याचा विक्रम मोदी सरकारने केला. उद्योग वाढला, कृषी क्षेत्रातही अनेक अमूलाग्र बदल झाले देशाची आर्थिक व्यवस्था सुदृढ करण्यासाठी अनेक चांगले निर्णय घेण्यात आले. अनेक चुकीच्या लोकांवर कडक कारवाईसाठी पावले उचलले जात आहेत. नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मिळाले हे आपले भाग्य आहे. लघु उद्योजकांना त्यांच्या वार्षिक व्यवहाराची मर्यादा वाढवण्यासाठी कर धोरणात बदल करण्यात आले. नवीन उद्योजकांना सहज सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मागील पाच वर्षांत मोदी सरकारने देशाला सक्षम नेतृत्व तर दिलेच शिवाय विकासाचा वेगही वाढवला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवविवाहितेसह आई-वडिलांची आत्महत्या

$
0
0

कराड :

सैदापूर (ता. कराड) येथे नवविवाहित मुलीसह आई-वडिलांनी आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. शिवाजी आनंदा मोहिते (वय ५९), बेबी शिवाजी मोहिते (४३) व वृषाली विकास भोईटे (२३) असे आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. दुपारी तीनच्या सुमारास विद्यानगर येथील गुरूदत्त कॉलनीत आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. मुलगी वृषाली हिने आधी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. त्या घटनेने हादरलेल्या तिच्या आई-वडिलांनी तेथेच सिलिंग फॅनला एकाच ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली.

मोहिते यांचे उंब्रज मुळगाव आहे. ते येथील एसटी आगारात नोकरीस होते, निवृत्त नंतर ते विद्यानगर भागातील गुरूकृपा कॉलनीत राहत होते. आहेत. एक मुलगा व मुलगी आहे. मुलगा नोकरीनिमित्ताने पुणे येथे असतो. मुलगी वृषाली हिचा दोन महिन्यांपूर्वी नऊ फेब्रुवारी रोजी विवाह झाला आहे. तिची वाघोली-वाठार स्टेशन सासुरवाडी आहे. ती काही दिवसांपासून माहेरीच होती. दुपारी वृषालीने अचानक विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. ती घरातील कोचवर निपचीप पडली होती. ती काहीच बोलत नाही. म्हणून तिच्या आई-वडिलांनी तिला हलवून पाहिले. मात्र, तिने काहीच प्रतिसाद दिला नाही. तिचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी त्वरीत पुणे येथील मुलास ती गोष्ट सांगितली. त्यांचा फोन कट करून मुलाने त्याच्या विद्यानगर येथील मित्रांना घरी जावून पाहण्यास सांगितले. मित्र घरी जाईपर्यंत आई-वडिलांनी सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्यांमागील कारण अद्याप समजू शकले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images