Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

तुमची राजकीय गुलामगिरीसंपविण्यासाठी मी आलोय

$
0
0

तुमची राजकीय गुलामगिरी

संपविण्यासाठी मी आलोय

अजित पवारांचा माळशिरसमधील मेळाव्यात मोहिते-पाटलांना इशारा

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

'तुमची इतक्या वर्षांची राजकीय गुलामगिरी संपवायला मी आलो आहे. आता कोणाला घाबरायचे नाही, कधीही आवाज दिला तरी मै हुना प्रमाणे, मी मदतीला धावून येईन,' असा शब्द अजित पवार यांनी शनिवारी मोहिते-पाटील यांच्या बालेकिल्ल्यात आयोजित मेळाव्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिला.

माढा लोकसभा मतदारसंघातील संजय शिंदे यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांनी थेट माळशिरस येथे मेळावा घेतला. मोहिते-पाटलांना विरोध करणारा पारंपरिक गट देखील भाजपच्याच साथीला असल्याने या मेळाव्याला कोण येणार याकडेही सर्वांचे लक्ष होते. मात्र, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश पाटील, काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार रामहरी रुपनर यांनी मोहिते-पाटील यांचे कट्टर विरोधक असलेले पांडुरंग देशमुख, फत्तेसिंह माने-पाटील या नेत्यांच्या मदतीने मोठी गर्दी जमा केली होती.

सुरुवातीलाच उमेदवार संजय शिंदे यांनी तुफानी फटकेबाजी करीत थेट चंद्रकांत पाटलांपासून सर्वच भाजप नेत्यांना लक्ष करीत एकट्या माढ्यासाठी निम्मे मंत्रिमंडळ तयार होईल इतक्या लोकांना राज्यपालापासून आमदारकीपर्यंत आश्वासने दिल्याचा टोला लगावला. ज्यांच्या भानगडी आहेत, ते भाजपकडे जात आहेत. मी कोणत्याही भानगडीत नसल्याने कोणच्याही धमक्यांना मी भीक घालीत नसल्याचा टोला लगावला. अजित पवार यांनी मोहिते-पाटलांचा उल्लेख टाळीत तुफान टोलेबाजी केली. 'तुमच्या पतसंस्था, कारखाने अशा सर्वच संस्था अडचणीत आल्या आहेत. लोकांनी मुलीच्या लग्नासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी ठेवलेले पैसे त्यांना वेळेत मिळत नाहीत. शेतकऱ्यांना उसाचे पैसे मिळत नाहीत, असा आरोप केला. कार्यकर्त्यांना घाबरू नका, असे सांगताना ज्या गावाच्या बोरी, त्याच गावाच्या बाभळी असतात, असा इशारा दिला. अजित पवारांच्या वाक्या वाक्याला टाळ्या आणि शिट्या पडत होत्या. मोहिते-पाटील आणि उत्तम जानकर या दोन्ही विरोधी गटाची मुख्यमंत्र्यांनी मोट बांधल्याने माळशिरसमध्ये शिरकाव करायच्या तयारीत असलेल्या राष्ट्रवादीला मेळाव्याने काहीसा दिलासा मिळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राजारामपुरी रॅलीने युतीचा प्रचारप्रारंभ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचाराचा प्रारंभ खास शिवसेना स्टाइलने झाला. युतीच्या कार्यकर्त्यांनी राजारामपुरीत रॅली काढून शक्तिप्रदर्शन करत प्रचाराची सुरुवात केली.

राजर्षी शाहू मिल कोटीतीर्थ येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, प्रा. मंडलिक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजप महानगर अध्यक्ष संदीप देसाई, शिवसेना शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासह शिवसैनिक, भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आमदार क्षीरसागर यांनी कोल्हापूर लोकसभा मतदार संघात विजयाची गुढी उभारण्याचा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, 'कोल्हापूर उत्तर मतदार संघात कोपरा सभा, महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम, विभागावर मेळावे, प्रचार फेऱ्या, टू व्हीलर रॅलीचे आयोजन करुन मतदारांसाठी संपर्क साधला जाईल.'

त्यानंतर कोटीतीर्थ मंदिरातून रॅलीस सुरुवात झाली. राजारामपुरी मातंग वसाहत, पोपटराव जगदाळे हॉल, राजारामपुरी पहिली गल्ली ते बारावी गल्लीपर्यंत रॅली काढण्यात आली. रॅली मार्गावर युतीच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. प्रा. मंडलिकांनी यावेळी व्यापारी, मंडळाचे कार्यकर्ते यांच्याशी संपर्क साधला. रॅलीत भाजपचे सरचिटणीस अशोक देसाई, माजी नगरसेवक आर. डी. पाटील, महेश उत्तुरे, किशोर घाटगे, तुषार देसाई, अमर समर्थ, पूजा भोर, पूजा कामते, रुपाली कवाळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. रॅलीनंतर शिवसेना माजी शहर प्रमुख दुर्गेश लिंग्रस यांच्या घरी शिवसेना भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीत प्रचाराचे नियोजन करण्यात आले.

दिवसभर आमदार क्षीरसागर यांनी शहरातील अनेक संस्था व तालमींना भेट दिली. रविवारी सकाळी रंकाळा स्टँड परिसरात रॅली काढण्यात येणार आहे. रंकाळा टॉवर येथून प्रचार फेरीस सुरुवात होणार आहे. सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत जुना वाशी नाका, बजाप माजगावकर तालीम, उमा टॉकीज चौक, बालावधूत तरुण मंडळ शिवाजी उद्यमनगर येथे सभा होणार आहे.

प्रा. मंडलिकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

प्रा. संजय मंडलिकांचा आज वाढदिवस होता. भाजप व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वाढदिवसाबरोबर निवडणुकीत विजयाच्या शुभेच्छा दिल्या. गुढीपाडवा, वाढदिवस आणि प्रचाराचा प्रारंभ असा तिहेरी योग युतीने साधला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दही-दूधावरची पुंजीआजीकडून विठ्ठलचरणी

$
0
0

दही-दूधावरची पुंजी

आजीकडून विठ्ठलचरणी

पंढरपूर :

हातावर पोट असलेल्या माणिकबाई सखाराम गवळी, या आजीबाई मालेगाव येथील रहिवाशी. दही-दुधाचा व्यवसाय करीत नेटका संसार केला. मात्र, विठूरायाच्या कृपेने सगळे चांगले घडत गेल्याने आयुष्याच्या उतारवयात उपयोगी येईल, म्हणून जमा केलेली पुंजी याच देवाच्या पायावर अर्पण करायची त्यांची इच्छा होती आणि त्यांनी ती पूर्ण केली. माणिकबाई आजींचा मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी माणिकबाईंची मुले, सुना, नातवंडे उपस्थित होते.

म्हातारपणात चार पैसे साठविण्याकडे ज्येष्ठांचा कल असतो. मात्र, भक्ती अमूल्य असते, हेच आजींनी दाखवून दिले आहे. त्यांनी पै-पै करून जमा केलेले पैसे विठूरायाचरणी अर्पण केले. त्या नंतर आजींचा आनंद गगनात मावत नव्हता. आयुष्यात जमा केलेला पैसा देवाच्या चरणी वाहण्याचा मी निश्चय केला होता. तो आज मी पूर्ण झाल्याचे सांगताना पूर्णत्वाचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संजय शिंदे, रणजितसिंहासह ४२ उमेदवारांचे अर्ज वैध

$
0
0

संजय शिंदे, रणजितसिंहासह ४२ उमेदवारांचे अर्ज वैध

सोलापूर

माढा लोकसभा मतदारसंघात गुरुवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी १५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. आता निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादीचे उमेदवार तथा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासह एकूण ४२ उमेदवारांचे ५२ अर्ज होते. सर्व अर्जांची छाननी शुक्रवारी सकाळी अकरा वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्या दालनात झाल्यानंतर सर्व ४२ उमेदवारांचे अर्ज मंजूर झाले आहेत. सोमवारी, ८ एप्रिल रोजी अर्ज माघारीनंतरच लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात विविध राजकीय पक्षांकडून दहा तर ३१ अपक्ष रिंगणात आहेत. या शिवाय सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी भाजप उमेदवाराला पर्याय म्हणून अर्ज भरला आहे. यात राष्ट्रवादीचे संजय शिंदे, भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर, बहुजन महापार्टीचे शहाजहान शेख, हिंदुस्थान प्रजा पक्षाचे नवनाथ पाटील, भारतीय प्रजा पक्षाचे नानासाहेब यादव, वंचित बहुजन आघाडीकडून विजयराव मोरे, बहुजन मुक्ती पार्टीचे सुनील जाधव, अखिल भारतीय एकता पक्षाच्या ब्रह्माकुमारी प्रमिलाबेन, बसपचे अप्पा आबा लोकरे, बहुजन रिपब्लिकन सोशॅलिस्ट पार्टीचे रामचंद्र मायाप्पा छुटुकडे या राजकीय पक्षांच्या दहा उमेदवारांचा समावेश आहे. या शिवाय दिलीप रामचंद्र जाधव, विजयराज बाळासाहेब माने-देशमुख, विजयानंद शंकरराव शिंदे, दौलत उमाजी शितोळे, संदीप जनार्दन खरात, अजिनाथ लक्ष्मण केवटे, रामदास माने, सिद्धेश्‍वर आवारे, बापूराव रुपनवर, बशीर अहमद शेख, रोहित रामकृष्ण मोरे, दत्तात्रय भानुदास खटके, दिनकर शिवाजी देशमुख, सविता अंकुश आयवळे, सह्याद्री कदम, संतोष बिचुकले, मारुती केसकर, विश्‍वंभर काशिद, मोहन विष्णू राऊत, अजिंक्य साळुंखे, अण्णासाहेब सुखदेव मस्के, बळीराम सुखदेव मोरे, नंदू संभाजी मोरे, सचिन भास्कर गोरे, अशोक ज्ञानदेव वाघमोडे, संदीप विठ्ठल पौळ, विठ्ठल ज्ञानदेव ठावरे, रामचंद्र केशव गायकवाड, संजय बाबूराव शिंदे, संजय आंनदराव शिंदे, सचिन ज्ञानेश्‍वर पडळकर या अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. सोमवारी सायंकाळी चार वाजता उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कराड दक्षिणमध्ये शनिवारपासून प्रचार

$
0
0

कराड दक्षिणमध्ये शनिवारपासून प्रचार

कराड :

सातारा लोकसभा मतदारसंघातील कॉँग्रेस महाआघाडीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांचा कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील प्रचाराचा प्रारंभ आज, शनिवारी सायंकाळी वडगाव हवेली (ता. कराड) येथे होणार आहे. सभेसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उदयनराजे भोसले, सतेज उर्फ बंटी पाटील, मोहनराव कदम, शशिकांत शिंदे, जयकुमार गोरे, बाळासाहेब पाटील, आनंदराव पाटील, डॉ. इंद्रजित मोहिते, राजेश पाटील वाठारकर, अविनाश मोहिते, राजाभाऊ पाटील उंडाळकर, मलकापूरच्या नगराध्यक्षा निलम येडगे आदी उपस्थितीत राहणार आहेत.

.............

कोयनेत उडी

एकाची आत्महत्या

कराड :

कोयना नदीवरील जुन्या पुलावरून एकाने नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडली. रमेश दिनकर बोत्रे (वय ४९) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. या घटनेची नोंद शहर पोलिसात झाली आहे. मात्र, आत्महत्येचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

रमेश बोत्रे शास्त्रीनगर, मलकापूर (ता. कराड) येथील रहिवासी असून, त्यांनी गुरुवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास जुन्या कोयना पुलावरून नदीपात्रात उडी टाकून आत्महत्या केली. या प्रकरणी उमेश दिनकर बोत्रे (रा. तळमावले) यांनी येथील शहर पोलिसांत खबर दिली. त्या नंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साखरेसह कडधान्ये महागली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दुष्काळी स्थिती, पाकिस्तानहून होणारी आयात थंडावल्याने बाजारपेठेला महागाईचे चटके जाणवू लागले आहेत. बाजारात मटकी, चवळी या कडधान्यासह साखर, साबुदाणा, वेलदोडे महागले आहेत. साखर प्रतिकिलो २ तर साबुदाणा ४ रुपयांनी महागला आहे. वेलदोड्याच्या दरात प्रतिकिलो ६०० रुपयांची वाढ झाल्याने प्रतितोळा (दहा ग्रॅम) सहा रुपये जादा मोजावे लागणार आहेत.

यंदा देशभरात साखर प्रचंड उत्पादन झाले असतानही बाजारात साखरेचा दर प्रतिकिलो ३६ रुपयांवरुन ३८ रुपयांवर गेला आहे. साबुदाण्याचा दर ६८ रुपयांवरुन ७२ रुपयांवर पोहोचला आहे. उडीद डाळीचा दर प्रतिकिलो चार रुपयांनी कमी झाला असला तरी चवळीच्या दरात प्रतिकिलो २० रुपयांनी वाढ झाली. यंदा दुष्काळामुळे चवळीचे उत्पादन कमी झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. मटकीच्या दरात प्रतिकिलो १० रुपयांनी वाढ झाली आहे.

सध्या सीमेवरील युद्धसदृश्य परिस्थितीमुळे पाकिस्तानहून मटकीची आयात थंडावली असल्याने दर वाढल्याची माहिती पुढे आली आहे. मटकीचा दर प्रतिकिलो १०० रुपयांवरुन ११० रुपयांवर पोचला आहे. नवीन गहू बाजारात आल्याने प्रतिकिलो दोन रुपयांनी दर कमी झाले आहेत. वेलदोड्याच्या दरात प्रतिकिलो ६०० रुपयांनी वाढ झाली आहे. दक्षिण भारतात पाऊस व वादळाचा तडाखा बसल्याने वेलदोड्याचे उत्पादन कमी झाल्याने दरवाढ कायम राहिल असे व्यापाऱ्यांचे मत आहे. वेलदोडा प्रतितोळा खरेदी केला जात असल्याने २८ रुपयांनी ग्राहकांना खरेदी करावा लागणार आहे.

किराणा दर (प्रतिकलो रु.)

पोहे : ४४

साखर : ३८

शेंगदाणा : ९० ते १००

मैदा : ३२

आटा : ३२

रवा : ३२

गूळ : ४४ ते ५०

साबुदाणा : ७२

वरी : ७५ ते ८०

००००

डाळींचे दर (प्रतिकिलो रु.)

तूरडाळ : ८० ते ८४

मूगडाळ : ८४

उडीद डाळ : ६८ ते ७०

हरभरा डाळ : ६४

मसूर डाळ : ६० ते ६४

मसूर : ७० ते १२०

चवळी : १००

हिरवा वाटाणा : ९६

काळा वाटाणा : ६८

मूग ८०

मटकी : ८० ते ११०

छोले : ८० ते १००

००००

ज्वारी दर (प्रतिकिलो रु.)

बार्शी शाळू : ३८ ते ५०

गहू : २८ ते ३२

हायब्रीड ज्वारी : ३०

बाजरी : २८

नाचणी : ४०

००००

तेलाचे दर (प्रतिकलो रु.)

शेंगतेल : १२५

सरकी तेल : ८६ ते ९०

खोबरेल : २४० ते २२०

सूर्यफूल : ९५ ते १०५

०००

मसाले दर (प्रतिकलो रु.)

तीळ : १८०

जिरे : २४०

खसखस : ८००

खोबरे : १९० ते २००

वेलदोडे : २८००

०००००

लोगो : बाजारभाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मध्यमवर्गीय मुलांची यशाची गुढी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शेतकरी, मध्यमवर्गीय कुटुंबातील तीन विद्यार्थ्यांनी जिद्द, नियमित अभ्यास, यशासाठी कष्टाची तयारी या त्रिसुत्रीची सांगड घालत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशाची गुढी उभारली आहे. येथील प्री आयएएस ट्रेनिंग सेंटरमधील ही तीन मुले आहेत. एक, दोन प्रयत्नात यशाने हुलकावणी दिली म्हणून खचू नका, स्वतवर विश्वास ठेवून पुन्हा नव्या आशा आकांक्षेने परीक्षेला सामोरे जा, यश निश्चित मिळेल'अशा शब्दांत त्यांनी यशस्वितेचा मंत्र सांगितला.

कॉलेजमध्ये शिक्षण घेताना या विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित केले. सनदी अधिकारी म्हणून सामान्य लोकांसाठी काम करायचे हे निश्चित केले आणि यश मिळवले. गेल्या काही वर्षात यूपीएससी परीक्षा आणि कोल्हापुरातील केंद्रातील मुलांची चमकदार कामगिरी हे समीकरण यंदाही कायम राहिले. प्री-आयएएस सेंटरमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या अर्चना वानखेडे (४४७ रँक), मच्छिंद्र गळवे (६४० रँक) तर आणि चंद्रशेखर घोडके (५१६ रँक) उत्तीर्ण झाले. घोडके यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून इंजिनीअरिंगची पदवी घेतली आहे. २०१४ १५ मध्ये येथील प्रीआयएएस ट्रेनिंग सेंटरमध्ये परीक्षेची तयारी करत होते. सेंटरच्या संचालिका प्रा. डॉ. अंजली पाटील म्हणाल्या, 'प्रीआयएएस ट्रेनिंग सेंटरमध्ये यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी पोषक वातावरण आहे. ग्रुप चर्चा, २४ तास अभ्यासिका, संदर्भ ग्रंथांची सोय असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होतो'

अपयशाने खचायचे नाही

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवायचच असा मनाशी संकल्प करुन बुलढाणा येथील अर्चना पंढरीनाथ वानखेडेने अभ्यास सुरू केला. या परीक्षेत पाच वेळा यशाने हुलकावणी दिली. पण जिद्द न सोडता सहाव्या प्रयत्नात यश मिळवले. अर्चना ही मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. वडील एसटी महामंडळातून लिपीक पदावरुन निवृत्त झाले आहेत, आई गृहिणी आहे. संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावतीमधून कम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंगची पदवी व पुढे कम्प्युटर सायन्समधून एम.ई.पूर्ण केले. २००९ मध्ये त्यांचा विवाह झाला. पती ज्ञानेश्वर इंगळे यांनी या परीक्षेसाठी प्रोत्साहित केले. सासर आणि माहेर या दोन्ही कुटुंबीयांनी करिअरला प्रोत्साहन दिले. त्यांच्या पाठबळामुळे पूर्ण वेळ परीक्षेची तयारी करण्यासाठी २०१५ मध्ये नोकरीचा राजीनामा दिला. यशाबद्दल त्या म्हणाल्या, 'गेल्या सात आठ वर्षात घेतलेल्या कष्टाचे हे फळ आहे. ग्रुप स्टडीचा खूप फायदा झाला. या क्षेत्रात स्पर्धा भरपूर आहे, अभ्यासात नियमितता हवी. या क्षेत्रात करिअर करु ईच्छिणाऱ्यांनी अपयश आले तर खूचन जाऊ नये. स्वत:वर विश्वास ठेवावा. परीक्षेची तयारी करावी'

शेतकरी आई-वडिलांचा मुलगा साहेब झाला

सांगोला तालुक्यातील गळवेवाडी हे साधारणपणे ९०० लोकवस्तीचे गाव. या गावातील मच्छिंद्र उत्तम गळवे यांनी परीक्षेत यश मिळवले. यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर होताच, आई-वडिलांनी 'मुलगा साहेब झाला' तर चुलत्यांनी 'स्वप्न साकारलास' अशा शब्दांत कौतुक केले, तो क्षण माझ्यासाठी आनंददायी होता असे त्यांनी सांगितले. मच्छिंद दहावीत शिकत असताना चुलते महेश गळवे यांनी 'तू हुशार आहेत, तुला मोठा अधिकारी व्हायचे आहे' असे सांगत वेगळ्या क्षेत्रातील करिअरसाठी दिशा दाखवली. गावातील जिल्हा परिषदेत सातवीपर्यंत शिक्षण, डोंगरगावमध्ये आठवी ते दहावीपर्यंत शिक्षण आणि जतमधील एसआरव्हीएममध्ये ज्युनिअर कॉलेजपर्यंतचे शिक्षण घेतले. यूपीएससी करायचे हे पूर्वीच निश्चित केल्यामुळे राज्यशास्त्र विषयातून पदवी शिक्षण घेण्यासाठी कोल्हापुरातील राजाराम कॉलेजमध्ये बीएसाठी प्रवेश घेतला. पदवीनंतर मुंबई येथील एसआयएसी सरकारी संस्थेत एक वर्ष व येथील प्री आयएएस ट्रेनिंग सेंटरमध्ये एक वर्षे तयारी केली. मच्छिंद्र म्हणाला 'स्वयं अध्ययनावर भर होता. कष्टाची तयारी असल्यास यश निश्चित मिळते' अशा भावना व्यक्त केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केएसएची मंगळवारी बैटक

$
0
0

कोल्हापूर : फुटबॉल स्पर्धा सुरळीत व शिस्तबद्ध होण्यासाठी कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनने फुटबॉल संघ, तालमी, मंडळे, ज्येष्ठ खेळाडूंची मंगळवारी (ता. ९) सायंकाळी साडेपाच वाजता बैठक बोलावली आहे. बालगोपाल तालीम मंडळ आयोजित चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेतील पाटाकडील तालीम मंडळ आणि दिलबहार तालीम मंडळ यांच्यातील अंतिम सामन्यानंतर झालेल्या हुल्लडबाजी, दगडफेक व मारामारीच्या प्रकारानंतर केएसएने सर्व स्पर्धा स्थगित ठेवल्या आहेत. फुटबॉल हंगाम पूर्वतत सुरू करण्यासाठी बैठक आयोजित केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साताऱ्यात दहा उमेदवारांचे अर्ज वैध

$
0
0

साताऱ्यात दहा उमेदवारांचे अर्ज वैध

सातारा :

सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी १२ उमेदवारांनी २१ नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. छाननीमध्ये दहा उमेदवार पात्र ठरले. शशिकांत शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांचा अर्ज स्वीकृत झाल्याने अर्ज छाननीच्या दिवशी प्राची नरेंद्र पाटील यांचा अर्ज नाकारण्यात आला. साताऱ्यात उदयनराजे विरुद्ध नरेंद्र पाटील यांच्या थेट लढत होणार आहे.

............

बलिदानमासानिमित्त मूक पदयात्रा

सांगली :

छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानमासानिमित्त सांगलीतील प्रमुख मार्गावरून शुक्रवारी मूक पदयात्रा काढण्यात आली. वढू बुद्रुक येथील संभाजी महाराजांच्या समाधीस्थळावरुन प्रज्वलित करून आणलेली ज्वाला सांगलीतील मारुती चौकात ठेवण्यात आली आहे. या ज्वालेसह शुक्रवारी निघालेल्या मूक पदयात्रेला शिवप्रेमींनी गर्दी केली होती.

श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने वढू बुद्रुक येथून आणलेल्या ज्वालेचे सांगलीवाडीत स्वागत केल्यानंतर ती ज्वाला मारुती चौकात विसावली होती. त्या ज्वालेपासून अनेक ज्वाला प्रज्वलित करून कार्यकर्त्यांनी आपापल्या गावी नेल्या आहेत. शुक्रवारी सकाळी सांगलीत या ज्वालेसह मूक पदयात्रेस सुरुवात झाली. आनंदराव चव्हाण यांच्या हस्ते ज्वालेचे पूजन करण्यात आले. राजू शहापूरे यांनी ध्येयमंत्र म्हटल्यानंतर संभाजी सूर्य हृदय हा श्लोक सामुदायिकरीत्या म्हणण्यात आला. कापडपेठ, राजवाडा चौक, स्टेशन चौक, बदाम चौक, पंचमुखी मारुती रोड, फौजदार गल्ली, बापटबाल रोड, गावभाग या मार्गावरून निघालेली मूक पदयात्रा मारूती चौकात समाप्त झाली. त्या ठिकाणी संभाजी महाराजांच्या प्रतीकात्मक चितेला भडाग्नी देण्यात आला. बलिदान मासानिमित्त अनेकांनी उपास, गोड न खाणे, चप्पल न घालणे, गादीवर न झोपता जमिनीवर झोपणे, मुंडण करणे, चहा न पिणे असे संकल्प केले होते. बलिदानमासाचे हे ३३०वे वर्ष आहे. मूक पदयात्रेत माजी आमदार नितीन शिंदे, शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एम. डी. पवार बँकेलाएक कोटींचा नफा

$
0
0

इस्लामपूर

एम. डी. पवार पीपल्स को-ऑप. बँक लि., बँकेला संपलेल्या आर्थिक वर्षात एक कोटी एक लाख रुपये ढोबळ नफा झाला आहे. बँकेने ११० कोटी ६८ लाख रुपयांचा व्यवसाय केला असल्याची माहिती बँकेचे संचालक वैभव पवार यांनी दिली.

वैभव पवार म्हणाले, 'बँकेकडे ६९ कोटी ४७ लाख रुपयांच्या ठेवी असून, बँकेने ४१ कोटी २१ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. बँकेचा एनपीए २.३२ टक्के असून, बँकेने नेट एनपीए शून्य टक्के राखला आहे. तसेच सीआरएआर १३.७० टक्के आहे. गतवर्षाच्या तुलनेत बँकेने सर्व विभागात सकारात्मक वाढ केलेली आहे.'

बँकेच्या इस्लामपूरसह सांगली, मिरज व कोल्हापूर या चार शाखा आहेत. मुख्य व कोल्हापूर शाखा स्वमालकीच्या इमारतीत आहे. खातेदारांना आर. टी. जी. एस., एन. ई. एफ. टी., एस. एम. एस. बँकिंग, सी. टी. एस. चेक, वीज बिल भरणा, पॅनकार्ड काढणे व सर्व प्रकारच्या नवीन व जुन्या वाहनांचा इन्शुरन्स या सारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. कोणत्याही शाखेत पैसे भरून कोणत्याही शाखेत पैसे काढण्याची सुविधा आहे. या वेळी बँकेच्या अध्यक्षा अलकादेवी पवार, व्हा. चेअरमन प्रकाश चव्हाण उपस्थित होते.

...........

नोकरीच्या अमिषाने

१६ लाखांची फसवणूक

इस्लामपूर

बँकेत नोकरीला लावतो, असे सांगून दोघांची १६ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या संतोष साहेबराव जामनिक उर्फ अक्षय मिश्रा (रा. रेपाडखेडा, ता. मोरतिजापूर, जि. अमरावती) व विलास गोवर्धन जाधव (रा. मोगरा, ता. बडनेरा, जि. अमरावती) या दोघांच्या विरुद्ध शुक्रवारी इस्लामपूर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे.

या बाबत केशव उर्फ राहुल उत्तम जगताप (वय २९, रा. अक्षर कॉलनी, इस्लामपूर) यांनी फिर्याद दिली. केशव जगताप व राहुल संभाजी मगदुम (रा. पेठ) या दोघांची १६ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. संतोष जामनिक आणि विलास जाधव या दोघांनी स्टेट बँकेचे लेटरपॅड दाखवून तुम्हाला कायमस्वरूपी नोकरी लावतो म्हणून दोघांकडून प्रत्येकी ८ लाख रुपये त्यांच्या वेगवेगळ्या बँक खात्यावर जमा केली. जून २०१६पासून वाट पाहूनही नोकरीची काहीच शक्यता नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी फिर्याद दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठवडा बाजारमतदानादिवशी बंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीसाठी व्यत्यय येऊ नये, मंगळवारी (२३) रोजी मतदानादिवशी आठवडा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीने घेतला आहे. मंगळवारी ज्या गावात आठवडी बाजार आहेत, यांनी त्या दिवशी रद्द करावेत किंवा पुढे ढकलावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. राज्य पणन संचालकांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे, असे पत्रक सचिव मोहन सालपे यांनी प्रसिद्धिस दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आनंद कुलकर्णीनाट्यपरिषदेचे अध्यक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेच्या अध्यक्षपदी नाट्यवितरक आनंद कुलकर्णी, उपाध्यक्षपदी मिलिंद अष्टेकर आणि प्रमुख कार्यवाहपदी गिरीश महाजन यांची निवड झाली.

कोल्हापूर शाखेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत निवडीवर शिक्कामोर्तब झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुरेश पाटील यांनी काम पाहिले. मावळते अध्यक्ष मनोहर कुईंगडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेच्या कोषाध्यक्षपदी प्रा. शशिकांत चौधरी, सहकार्यवाहपदी जयश्री संदीप नरके यांची सर्वानुमते निवड झाली. कोल्हापूर शाखेच्या संचालकांच्या उपस्थितीत बैठक झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळा प्रवेशाची लगबग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शाळेचा सजविलेला परिसर, पालक, विद्यार्थ्यांचे गुलाबाची फुले देऊन स्वागत करणारे अधिकारी, शिक्षक आणि ग्रामीण भागात मिरवणुकीने, सजविलेल्या बैलगाड्यांतून मुलांचा प्रवेशचा थाट असे चित्र गुढीपाडव्याच्या दिनी पहावयास मिळाले. इंग्रजी माध्यमातील शाळा, खासगी शाळांतही प्रवेशाची लगबग होती. महापालिका व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या 'गुढीपाडवा, पट वाढवा' या उपक्रमाला पालकांनी प्रतिसाद दिला. महापालिकेच्या अनेक शाळांत मुलांच्या प्रवेशासाठी पालकांनी रांगा लावल्या. महापालिकेच्या विविध शाळांत पहिल्याच दिवशी ८२५ नवे प्रवेश झाले. अनेक ठिकाणी वाद्यांच्या गजरात शाळा प्रवेशाचा जागर झाला.

शहर आणि परिसरातील नामांकित शाळांत प्रवेशाची धांदल उडाली होती. पालकांसोबत प्रवेश घेण्यासाठी शाळांच्या परिसरात दाखल झालेल्या मुलांचा उत्साह काही औरच होता. पालकांनी सकाळी सात वाजल्यापासूनच रांगा लावल्या होत्या. शाळांच्या व्यवस्थापनाने मुलांच्या प्रवेशासाठी वेगळे कक्ष तयार केले होते. परिसरात शालेय वैशिष्ट्यांवर आधारित चित्रमय फलक लक्षवेधी ठरले. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेतील शाळांत उत्साही वातावरण होते. हार, फुलांनी व फुग्यांनी सजविलेल्या वाहनात मुलांना बसवून गावातून मिरवणूक काढण्यात आली. मुलांना कोल्हापुरी फेटे बांधले होते. महापुरुषांच्या वेशभूषेतील मुले साऱ्यांचे आकर्षण ठरले. जिल्हा परिषदेच्या शाळा प्रवेशाच्या प्रक्रियेंतर्गत मुलांच्या स्वागतासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची लगबग सुरू होती. उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपासून शिक्षणाधिकाऱ्यांपर्यंत अनेक अधिकारी यात सामील झाले. काही गावात लेझीम पथकात विद्यार्थी, शिक्षक व अधिकाऱ्यांनी ताल धरला. टोप येथील अंगणवाडी प्रवेशोत्सव अभियानला मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांची प्रमुख उपस्थिती होती.

जरगनगर गजबजले, पालिका शाळांत ८२५ नवीन प्रवेश

जरगनगर येथील महापालिकेच्या लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिरमध्ये पहिलीच्या सहा तुकड्यांचे प्रवेश पहिल्या दिवशी फुल्ल झाले. पालकांनी मोठ्या संख्येने गर्दी केल्यामुळे शाळा परिसर गजबजला होता. येथे पहिल्या दिवशी पहिलीच्या ३३२ प्रवेश अर्जांचे वितरण करण्यात आले. पहिलीसाठी ३०० प्रवेश क्षमता आहे. तर दुसरी ते सातवीपर्यंत ६२ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केले. सध्या शाळेचा पट १६१० आहे. तो २००० पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त नेहरुनगर विद्यामंदिरात ९०, प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर जाधववाडी येथे ५०, महात्मा फुले विद्यामंदिर फुलेवाडीत ६०, टेंबलाईवाडी विद्यामंदिर येथे ६५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. महापालिकेच्या विविध शाळांत पहिल्याच दिवशी ८२५ नवीन प्रवेश झाले आहेत. भवानी मंडप परिसरातील मेन राजाराम हायस्कूलमध्येही शाळा प्रवेशाला प्रतिसाद मिळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुहूर्ताच्या सौद्यांत गुळाला ३२०० ते ५१०० रुपये दर

$
0
0

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्यावतीने श्री शाहू मार्केट यार्ड येथे गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर गूळ सौदे काढण्यात आले. गुरुदत्त ट्रेडर्स या अडत दुकानात काढण्यात आलेल्या गुळाला प्रतिक्विंटल ३२०० ते ५१०० रुपये दर मिळाला. सभापती बाबासाहेब लाड आणि उप सभापती संगीता पाटील यांच्या हस्ते सौदे काढण्यात आले. यावेळी सदस्य कृष्णात पाटील, परशुराम खुडे, विलास साठे, अमित कांबळे, दशरथ माने यांच्यासह संचालक, शेतकरी, अडते, व्यापारी, हमाल, तोलाईदार, मदतनीस आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन मॉलसह दुकानांवर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाने शनिवारी प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमेंतर्गत शहरातील विविध भागात कारवाई केली. दिवसभराच्या कारवाईत दोन मॉलसह सात दुकानावर कारवाई करताना ३५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. राजारामपुरी रेल्वे फाटक परिसर, लक्ष्मीपुरी परिसरात मोहिम राबवली. यामध्ये डेनिम हब, स्वर्ग ज्वेलर्स, शिव ऑप्टीक्स, रिलायन्स मॉल, स्टार बाजार, निरंकारी ट्रेडर्स, बाबाजी प्लास्टिक येथे कारवाई झाली. प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड केला आहे. मुख्य आरोग्य अधिकारी दिलीप पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई झाली. मोहिमेत विभागीय आरोग्य निरीक्षक निखिल पाडळकर, मुणीर फरास, सौरभ पाटील आदींचा सहभाग होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चार पिस्तूल, आठ काडतुसे जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दोघा सराईत गुन्हेगारांकडून मॅगझिनसह चार पिस्तूल आणि आठ काडतुसे असा एकूण २ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चंदगड तालुक्यातील बोंजुर्डी फाटा बसस्टॉप परिसरात इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली. विकी धोडींबा नाईक (वय, २८ रा. आमरोळी, ता. चंदगड) आणि सुनील भिकाजी घाटगे (२६ रा. लक्षतीर्थ वसाहत, दुसरा बसस्टॉप) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

डॉ. देशमुख म्हणाले, 'पोलिस नाईक रणजित पाटील यांना बोंजुर्डी फाटा परिसरात सकाळी देशी बनावटीचे पिस्तूल दोघेजण विक्रीसाठी घेऊन येत असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. त्यानुसार सापळा रचला. विकी आणि सुनील दोघेही बसस्टॉप परिसरात आल्यानंतर पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४ पिस्तूल, मॅगझिन, काडतुसे जप्त केली. दोघांवर चंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. नाईकवर गोकुळ शिरगाव पोलिसांत तर घाटगेवर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फुलेवाडी परिसरात अनैतिक संबंधातून खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या प्रकरणातून तो निर्दोष सुटला आहे. या दोघांची ओळख कारागृहात झाली. तेथून बाहेर पडल्यानंतर त्यांनी अवैध शस्त्रविक्रीचा घाट रचला होता. कारवाईत गडहिंग्लजचे अपर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, इचलकरंजीचे पोलिस उपअधीक्षक गणेश बिरादार, गडहिंग्लजचे अनिल कदम, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई झाली.'

दरम्यान, ही शस्त्रे कोठे तयारी केली जात आहेत, त्याचा शोधही घेतला जाणार असल्याचे पोलिस नाईक रणजित पाटील यांनी सांगितले.

पिस्तूलतस्करांशी संबंध?

दोघा संशयितांनी बेळगाव येथून पिस्तूल आणल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न होत आहे. मनीष नागरगोजी हा पिस्तूल तस्कर आहे. तो या दोघांचा मास्टरमाइंड आहे का? या दिशेने तपास सुरु केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिंमत असेल तर तक्रार करा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा , इचलकरंजी

'साखर सम्राटांविरोधात लढणारे खासदार राजू शेट्टी यांनी पाहिल्यांदा स्वत:ची प्रतिमा तपासावी, मग दुसऱ्यांवर टीका करावी. माझ्यावर दोन नंबरचा मंत्री म्हणून टीका, भ्रष्ट्राचाराचे आरोप करता? हिंमत असेल तर बिंदू चौकात नव्हे योग्य त्या यंत्रणेकडे पुराव्यानिशी तक्रार दाखल करा,' असे प्रतिआव्हान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासदार राजू शेट्टी यांना इचलकरंजी येथील सभेत दिले. तसेच 'गत दहा वर्षांतील पगार, भत्ता कुठे गेला? काचेत घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारायचे नसतात. माझ्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न करू नका,' असा इशाराही त्यांनी येथे दिला.

हातकणंगले लोकसभा मतदार संघातील भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ येथील नामदेव मैदानात विजय संकल्प सभा झाली. यावेळी मंत्री पाटील बोलत होते. यावेळी मंत्री सदाभाऊ खोत यांनीही खासदार शेट्टी यांच्यावर टीकास्त्र सोडले.

खासदार शेट्टी यांनी गत चार दिवसांपासून केलेल्या आरोपांना आक्रमकपणे प्रत्युत्तर देतांना पाटील म्हणाले, 'पायाखालची वाळू घसरू लागली की माणसाची जीभदेखील घसरू लागते. माझ्यावर बेताल आरोप करणाऱ्या खासदार शेट्टी यांना तक्रार कोठे करायची असते याची माहीत नाही? त्यांचे अज्ञान यातून उघड होते. बिंदू चौकात चर्चा करण्यापेक्षा त्यांनी हिंमत असेल तर पुरावे घेऊन योग्य यंत्रणेकडे तक्रार दाखल करावी. दुसऱ्याच्या प्रतिमेवर शिंतोडे उडविण्याचा प्रयत्न करू नये. विकासाचा कोणताच मुद्दा हातात उरला नाही की माणूस भ्रमिष्ट होत असतो. तशी वेळ खासदार शेट्टी यांच्यावर आली असून धैर्यशील माने हे काही लाख मतांनी त्यांचा पराभव करतील. माने यांच्या विजयासाठी काही अदृश्य शक्ती कार्यरत झाल्या आहेत, त्यातूनच दीड लाख मतांची मदत आम्हाला होणार आहे.'

इचलकरंजी शहराला शुद्ध पाणी देण्याची हमी सरकारची आहे, असे सांगून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, 'मी मंत्री झाल्यानंतर माझ्याकडे माणसे येऊ लागली. याचा पोटशूळ खासदार शेट्टी यांना उठला. बहुजन समाजातील माणूस मोठा होऊ नये, ही त्यांची नेहमीच भूमिका राहिलेली आहे. आता तर ते साखर सम्राटांसारख्या धनधाडंग्याच्या कळपात गेले आहेत. त्यांना आता निवडणूक निधीसाठी जेवणाचा डबा नव्हे तर गुऱ्हाळाची काहील घ्यावी लागेल. इतकी आर्थिक मदत त्यांच्याकडून मिळत आहे. त्यांच्या ओठात एक व पोटात एक असून आता त्यांच्या खोट्या भावनिक प्रचाराला बळी पडू नका.'

यावेळी आमदार शिवाजीराव नाईक, सुरेश हाळवणकर, धैर्यशील माने, मुरलीधर जाधव, अशोक स्वामी, हिंदुराव शेळके आदींची भाषणे झाली. काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते व्यासपीठावर उपस्थित राहून माने यांना पाठिंबा दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुटखा विकणाऱ्यास पोलिस कोठडी

$
0
0

कसबा बावडा : गांधीनगर पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी कारवाई करून सुमारे दोन लाख नऊ हजार रुपये किमतीचा गुटखा, पान मसाला पकडला. यावेळी केलेल्या कारवाईमध्ये दोन मोटारीही जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी पोलिसांनी राकेश लालचंद नागदेव (रा. गोपालधाम अपार्टमेंट, वळिवडे) याला दुपारी ताब्यात घेतले आणि रात्री उशिरा गुन्हा नोंद केला. त्याला न्यायालयात हजर केले असा दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बजेटवरुन महापालिकेत धुसफूस

$
0
0

राष्ट्रवादीला झुकते माप, काँग्रेस वंचित

udaysing.patil@timesgroup.com

udaysingpatilMT

महापालिका बजेटमधील जास्तीत जास्त निधी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना देऊन काँग्रेसच्या नगरसेवकांना वगळल्याने काही दिवसांपासून काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीत धुसफूस सुरू आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना झुकते माप व काँग्रेसचे नगरसेवक उपाशी अशी परिस्थिती असल्याने काँग्रेसकडून बजेटच्या उपसूचनेवर स्वाक्षरी करण्यात आलेली नाही. या नगरसेवकांसाठी समान निधी देण्यासाठी कारभाऱ्यांच्या पातळीवर चर्चा सुरू आहे. परिणामी बजेट अंमलबजावणीला उशीर होत आहे.

गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये भाजपचे तत्कालीन स्थायी सभापती आशिष ढवळे यांनी भाजप, ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांना जादा बजेट दिले होते. ही बाब लक्षात आल्यानंतर तत्कालीन महापौर स्वाती यवलुजे यांनी बजेटवर स्वाक्षरी केली नव्हती. यामुळे बजेट अंमलबजावणी उशिरा सुरू झाली. यंदा काँग्रेसचे शारंगधर देशमुख यांच्याकडे स्थायी सभापतीपद आहे. त्यांनी बजेट सादर केल्यानंतर ते सर्वसमावेशक व विरोधी पक्षांनाही विश्वासात घेतले असल्याने सभागृहात जसे आहे तसे बजेट मंजूर करण्याचा विचार सुरू होता. पण सभापती देशमुख यांनी महापौरांच्या शिष्टाचाराप्रमाणे त्यांच्याकडून काही विकासकामांना निधी देता यावा याकरिता उपसूचना दिली. हा निधी दिला जात असताना दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांना समान द्यावा अशी अपेक्षा होती. त्याकरिता उपसूचना देण्यात येणार होती. ती उपसूचना तयार झाल्यानंतर पक्षपातीपणा होऊन त्यामध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना झुकते माप दिल्याचे दिसून आले. काँग्रेसचे २९ नगरसेवक असून त्यापैकी केवळ नऊ नगरसेवकांना काही निधी दिला आहे. उर्वरित २० नगरसेवक महापौरांच्या हक्काच्या निधीपासून वंचित राहिले होते.

बजेटमध्ये काँग्रेसच्या ज्या नगरसेवकांना निधी दिला आहे, त्याची तुलना करता राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना दुप्पट निधी दिला असल्याचे सांगण्यात येत आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर काँग्रेसकडून या निधीमध्ये समान वाटा मिळावा असे सांगण्यात आले. त्यासाठी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी व नगरसेवकांकडून राष्ट्रवादीकडे विचारणा करण्यात आली. यामुळे काही दिवसांपासून आघाडीत धुसफूस सुरू झाली आहे. त्याबाबत कारभाऱ्यांच्या बैठकही होत आहेत. बजेटची अंमलबजावणी करण्यासाठी उपसूचनांवर गटनेत्यांच्या स्वाक्षरी होण्याची आवश्यकता आहे. काँग्रेसचे गटनेते असलेल्या देशमुख यांनी उपसूचनेवर स्वाक्षरी केलेली नाही. त्यामुळे बजेट अंमलबजावणीकरिता प्रशासनाकडे गेलेले नाही. लवकरच त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

.....

गेल्यावर्षी बजेट उशिरा

भाजपचे आशिष ढवळे स्थायी सभापती असताना त्यांनी विश्वासात न घेता केलेले निधीचे वाटप महापौर यवलुजे यांच्या अधिकारात बदलण्यात आले. त्यामुळे मंजूर बजेटची कॉपी प्रशासनाकडे पोहचण्यास जून उजाडला. त्यानंतर पावसामुळे कामे करता आली नाही. या साऱ्याचा परिणाम विकासकामांवर झाला. ही बाब विचारात घेऊन काँग्रेसकडून तातडीने चर्चा सुरू केली आहे. येत्या आठवड्यात त्यावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपुरवठ्यावर वरिष्ठांची नजर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागावर नियंत्रण व मार्गदर्शन करण्यासाठी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, उपायुक्त मंगेश शिंदे व मुख्य लेखापाल संजय सरनाईक यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. याबाबतचे आदेश त्यांनी शुक्रवारी (ता. ५) काढले. कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन, विहित वेळेत गळती दूर करणे आदी वॉर्डनिहाय वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे.

गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून शहरात पाणीपुरवठ्याचा बट्ट्याबोळ उडाला आहे. नागरिकांना नियमित व योग्य दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याने असंतोष निर्माण होत आहे. वारंवार रास्तारोको, अधिकाऱ्यांना घेराओ, निवेदने देवूनही पाण्याची समस्या अद्यापही कायम आहे. स्थायी समिती, महासभेमध्ये या विषयावर सभागृहात सूचना, उपाय सुचवले जातात. पण पाणीपुरवठ्यामध्ये कोणताही फरक पडलेला नाही. गुरुवारी झालेल्या बैठकीत तर नगरसेवकांनी जलअभियंत्यांना गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करुन पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.

त्यानंतर आयुक्तांनी शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी कोणत्या उपयायोजना करता येतील याबाबत सर्वच महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत वितरण नलिकेला वारंवार लागणारी गळती आणि एअर व्हॉल्व्हमधून वाया जाणारे पाणी यावर चर्चा झाली. बहुतांशवेळा गळती काढण्यास पाणीपुरवठा विभागाकडून दिरंगाई होत असल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे वॉर्डनिहाय अधिकाऱ्यांवर जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

अतिरिक्त आयुक्त पाटणकर यांच्याकडे विभागीय कार्यालय चार अंतर्गत 'ई' वॉर्डाची तर मुख्य लेखापाल सरनाईक यांच्याकडे विभागीय कार्यालय चार अतंर्गत 'ई' वॉर्डची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उपायुक्त शिंदे यांच्याकडे ए, बी, सी व डी वॉर्डाची जबाबदारी देण्यात आली. तीनही अधिकारी पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर नियंत्रण ठेवतील. तसेच एखाद्या ठिकाणी गळती लागल्यास दुरुस्ती विहित वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी पार पाडतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images