Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

नवीन घरफाळा आकारणी उद्यापासून

$
0
0

महापालिका लोगो...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भाडेतत्त्वावरील घरफाळा आकारणीच्या उपसूचनेसह महापालिकेच्या अर्थसंकल्पीय महासभेत घेतलेल्या निर्णयाच्या अंमलबजा‌वणीला सोमवार (१ एप्रिल) पासून सुरुवात होणार आहे. करारपद्धती रद्द करून नवी मूल्यांकन पद्धतीच्या घरफाळा आकारणीला सुरुवात होईल. नव्या पद्धतीमुळे वाणिज्य मिळकतीमधील भाडेतत्त्वावरील मिळकतींचा घरफाळा कमी करत असताना दोनशे चौरस फुटांवरील ७ हजार ३६४ वाणिज्य मिळकतदारांच्या घरफाळ्यात झालेल्या वाढीला प्रत्यक्ष सुरुवात होईल.

शहरातील वाणिज्य वापरातील भाडेकरारावरील मिळकतींना सुमारे ७० टक्के घरफाळा आकारणी केली जात होती. राज्यातील इतर कोणत्याही शहरापेक्षा जास्त आकारणी होत असल्याने त्याचा परिणाम व्यवसायावर झाला होता. परिणामी अनेक कॉर्पोरेट कार्यालयांनी शहराकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे भाडेकरारावरील वाणिज्य वापरातील मिळकतींना घरफाळा कमी करण्याची मागणी क्रिडाईसह येथील अनेक बांधकाम संबंधित संघटनांनी केली होती. याबाबत प्रशासनाने दिलेल्या प्रस्ताव उपसूचनेसह स्थायी समितीने अर्थसंकल्पीय महासभेसमोर ठेवला होता.

महासभेने उपसूचना मंजूर करताना करारपद्धती रद्द करून नवी मूल्यांकन पद्धत स्वीकारण्यास मान्यता दिली होती. या निर्णयामुळे एक लाख ८६ हजार मिळकतींच्या घरफाळ्यात कोणतीही वाढ झालेली नाही. तसेच वाणिज्य वापरातील भाडेतत्त्वावरील २७ हजार १९३ मिळकतींचा भाडेकरार पद्धत संपुष्टात आली आहे. ५०० चौरस फुटांच्या १९ हजार ८२९ मिळकतींना कोणतीही वाढ न करतात उर्वरित ७ हजार ३६४ मिळकतींना २०११ मधील रेडीरेकनरच्या १० ते ३० टक्के घरफाळा वाढ होणार आहे. महासभेतील उपसूचनेनुसार घेतलेल्या निर्णयाला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. नव्या कररचनेमुळे दहा हजार मिळकती कराच्या कक्षेत येतील, असा दावा प्रशासनाकडून केला जात आहे.

०००००

१,८६,७०७

करवाढ न झालेल्या मिळकती

२७,१९३

व्यावसायिक मिळकती

१९,८२९

रेडीरेकनरनुसार करवाढ न झालेल्या मिळकती

३,६२५

५०० चौ. फुटापर्यंतच्या मिळकती (दहा टक्के वाढ)

१,२९२

१५०० चौ. फू. मिळकती (२० टक्के वाढ)

२,४४७

१५०० चौ. फुटावरील मिळकती (३० टक्के वाढ)

०००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लोकसभेसाठी एकही अर्ज दाखल नाही

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणूकीसाठी कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघात आज शनिवारी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. पण, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी दोन अर्ज तर हातकणंगले मतदारसंघासाठी पाच व्यक्तींनी अर्ज नेले आहेत. हातकणंगले मतदारसंघासाठी संग्रामसिंह गायकवाड, बीएसपीकडून चंद्रकांत कांबळे, पिपल्स रिपब्लिकन पार्टी कवाडे गटाचे विलास कांबळे यांनी अर्ज नेले आहेत. गुरुवारपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून हातकणंगले मतदारसंघासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि शिवसेनेकडून धैर्यशील माने यांनी अर्ज दाखल केले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दौलत’साठी ‘अथर्व’कडून २० कोटी ८० लाख जमा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत सहकारी साखर कारखाना अथर्व इंटर ट्रेड प्रा. लिमिटेड कंपनी भाड्याने चालवणार असून कंपनीने करारानुसार जिल्हा बँकेत २० कोटी ८२ लाख रुपये आज जमा केले. दरम्यान, या निविदा प्रक्रियेला चंदगड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाने हायकोर्टात आव्हान दिले असून त्याची सुनावणी सोमवारी (१ एप्रिल) होणार आहे.

दौलत कारखाना भाड्याने चालविण्यासाठी जानेवारीत जिल्हा बँकेने निविदा प्रक्रिया राबविली. अथर्व कंपनीने ३९ वर्षे कालावधीसाठी निविदा भरली. सर्वांत कमी कालावधीची निविदा अथर्व कंपनीने भरल्याने बँकेने त्यांना कारखाना चालविण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने घेतला. बँकेचे संचालक मंडळ आणि कंपनी यांच्यात झालेल्या करारानुसार कंपनीने ३१ मार्चअखेर निविदेपैकी २५ टक्के रक्कम आणि व्याजाची रक्कम भरण्याची सूचना केली होती. त्यानुसार अथर्व कंपनीने निविदेपैकी २५ टक्के १६ कोटी ८२ लाख रुपयांची रक्कम बँकेत भरली. तसेच कंपनीच्या व्याजापोटी चार कोटी पाच लाख रुपयांचा धनादेशही जिल्हा बँकेला दिला.

०००००

याचिका मागे घेण्याची विनंती

निविदा प्रक्रियेला चंदगड तालुका संघाने आव्हान दिले आहे. संघाचे अध्यक्ष राजेश पाटील जिल्हा बँकेचे संचालक आहेत. शनिवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत पाटील यांना बँकेविरोधात दाखल केलेली याचिका मागे घ्यावी अशी विनंती संचालक मंडळाने केली. कारखाना सुरू व्हावा आणि शेतकरी, कामगारांना न्याय मिळावा, असा विश्वास संचालक मंडळाने व्यक्त केला आहे.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्दिष्टपूर्तीची धडपड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अर्थसंकल्पीय वर्षामध्ये दिलेल्या उद्दिष्टाची पूर्तता करण्यासाठी आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी, शनिवारी (ता. ३०) सर्वच सरकारी कार्यालयांमध्ये धावपळ उडाली होती. कर जमा करून घेण्यासाठी अधिकाऱ्यांची तर कर भरण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू होती. नागरिकांनी अनेक कार्यालये व नागरी सुविधा केंद्रामध्ये गर्दी केली होती. शनिवारअखेर जीसीटीच्या (वस्तू व सेवा कर) रुपाने २,४०० कोटी, प्रादेशिक पहिवहन विभाग २१७ कोटी राज्य उत्पादन शुल्क २८२ कोटी तर महापालिकेने २९२ कोटींची वसूली केली. रात्री उशीरापर्यंत कर जमा करण्याची प्रक्रिया सुरू होती. अनेक नागरिकांनी ऑनलाइन कर जमा केला. रविवारी अनेक सरकारी कार्यालयांमध्ये कर वसुली सुरू राहणार असल्याने कराच्या रकमेत वाढ होणार आहे.

महापालिकेला २०१८-१९ आर्थिक वर्षामध्ये ४३६ कोटींचे उद्दिष्ट होते. शनिवारअखेर यापैकी केवळ २९२ कोटी रुपये वसूल करण्यास यश आले. यामध्ये एलबीटी १२४ कोटी ४२ लाख, घरफाळा ५९ कोटी ३४ लाख, नगररचना ३५ कोटी २४ लाख, पाणीपट्टी ४८ कोटी ८५ लाख, इस्टेट पाच कोटी २२ लाख तर परवाना विभागाने दोन कोटी ४७ लाखांची वसुली केली. शनिवारी महापालिकेच्या तिजोरीत दहा कोटींचा कर जमा झाला. रविवारी त्यात आणखी भर पडण्याची शक्यता असून सकाळी नऊ ते रात्री १२ वाजेपर्यंत नागरी सुविधा केंद्रे सुरू राहणार आहेत.

घरफाळा विभाग टॉपवर

महापालिकेच्या घरफाळा विभागाला आर्थिक वर्षामध्ये ६३ कोटींचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी शनिवारअखेर ५९ कोटी ३४ लाखाचा घरफाळा जमा झाला. शनिवारी तब्बल एक कोटी ५७ लाखांचा घरफाळा जमा झाला. तर गेल्यावर्षीपेक्षा एकूण सात कोटी ६१ लाख रुपये अधिक कर जमा झाला आहे. एक जानेवारीपासून सुरू झालेल्या सवलत योजनेंतर्गत १७ कोटी ९४ लाख जमा झाले असून तीन कोटी ५२ लाख सवलत स्वरुपात घरफाळा जमा झाला आहे. ज्या मिळकतदारांनी थकीत कर जमा केलेला नाही, एक एप्रिलपासून अशा मिळकतदारांच्या प्रॉपर्टी, सात-बारा उताऱ्यावर बोजा नोंद करण्यात येणार असल्याचे कर निर्धारक व संग्राहक दिवाकर कारंडे यांनी सांगितले.

२४०० कोटींची जीएसटी

राज्य वस्तू व सेवा कर कोल्हापूर विभागाने २४०१ कोटी रुपये जीएसटी जमा केला आहे. विभागाला २३८७ कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले होते. विभागात कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे पाच जिल्हे येतात. ७० हजार व्यापारी व उद्योजकांची जीएसटीसाठी नोंदणी झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्यानांची जबाबदारी अधिकाऱ्यांवर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेच्या मालकीची उद्याने सुस्थितीत ठेवणे, नियमित स्वच्छता राखणे, पाणी व्यवस्थापन आणि येणाऱ्या नागरिकांना सर्व सुविधा देण्यासाठी प्रत्येक उद्यानाची जबाबदारी अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. याबाबतचे आदेश आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी गुरुवार काढले. उद्यानाची पाहणी करताना त्यांनी फिटनेस राखावा, अशीही अपेक्षा आदेशात व्यक्त केली आहे.

शहरात महापालिकेच्या ५४ बागा आहेत. उपनगरांसह अनेक ठिकाणी ठेवलेल्या खुल्या जागांमुळे यामध्ये दहा बागांची भर पडली आहे. महापालिकेच्या अनेक बागा चांगल्या असल्या, तरी अनेक बागांची अवस्था दयनीय झाली आहे. काही नगरसेवकांनी स्वप्रयत्नातून बागा विकसित केल्या आहेत. अशाचप्रकारे सर्वच बागा सुस्थितीत ठेवण्यासाठी आयुक्तांनी प्रत्येक अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित केली आहे. आयुक्तांनी ताराबाई पार्क उद्यानाची स्वत:कडे जबाबदारी घेताना अतिरिक्त आयुक्तांकडे हुतात्मा पार्क, उपायुक्तांकडे स्मृतिवन, तर शहर अभियंत्यांकडे रंकाळा पदपथ उद्यान व पर्यावरण अभियंत्यांकडे जबाबदारी देताना त्यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती केली आहे.

नोडल ऑफिसरनी दररोज चालत किंवा सायकलचा वापर करून फिटनेस राखण्याबरोबर बागांची देखभालीवर लक्ष द्यावी, अशी अपेक्षा आदेशात व्यक्त केली आहे. उद्याने सुस्थितीत ठवणे, स्वच्छता, पाणी व्यवस्था, कर्मचाऱ्यांकडून झाडांना नियमित पाणी दिले जात का याची पाहणी करणे, उद्यानातील स्वच्छतागृहांची स्वच्छता होते का याची पाहणी करणे, आदी जबाबदारी नोडल ऑफिसरवर सोपविली आहे.

सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. अनेक राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते उद्यानांचा वापर करतात. या दरम्यान उद्यान किंवा उद्यान परिसरात आक्षेपार्ह फलक, होर्डिंग्ज लावून आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी दिली.

महापालिकेकडे असणाऱ्या बागांची देखभाल करण्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या अत्यंत कमी आहे. परिणामी अनेक बागांची दुरवस्था झाली आहे. काही नगरसेवकांनी स्वप्रयत्नातून बागा सुसज्ज ठेवल्या आहेत. अनेक ठिकाणी वॉचमन नसल्याने बागांमध्ये रात्रीच्या वेळी पार्ट्या झडत असतात. अशा अवैध कारवायांना आळा घालण्याची गरज आहे.

०००००

चौकट...

६४

एकूण बागा

३६०

मंजूर पदे

१३०

कार्यरत कर्मचारी

२८

ठोक मानधनावरील माळी

१० ते १५ लाख रुपये

मागील अर्थसंकल्पातील तरतूद

०००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रमाणपत्र घोळाबाबत आज आंदोलनाची दिशा ठरणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाच्या ५४ व्या दीक्षान्त समारंभातील पदवी प्रमाणपत्रातील घोळाला जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई निश्चित करावी आणि नियमबाह्य कामकाजाच्या विरोधात आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी विविध पंधरा संघटना रविवारी (ता. ३१) एकत्र येत आहेत. बैठकीत विद्यार्थी संघटना, शिक्षक संघटना सहभागी होणार आहेत. दरम्यान प्रमाणपत्रावरील घोळाप्रश्नी कुलपती कार्यालयाकडे तक्रारी झाल्या आहेत.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे, सुटा, सुप्टा, मराठा महासंघ विद्यार्थी संघटना अशा विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची सकाळी १०.३० वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत विद्यापीठाशी निगडीत विविध प्रश्नासंदर्भात चर्चा करुन आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याचे मंदार पाटील यांनी सांगितले. गेल्या वर्षीच्या पदवी प्रमाणपत्रातील घोळाचा प्रश्न सध्या गाजत आहे. दरम्यान राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी सचिव मुबीन शौकत मुल्ला यांनी राज्यपाल यांच्याकडे पदवी प्रमाणपत्रातील घोळप्रश्नी तक्रार केली आहे. प्रमाणपत्रावरील कुलगुरुंची एकच सहीची निर्णय हा नियमबाह्य आहे. या संपूर्ण प्रकाराची सात दिवसांत चौकशी करुन कारवाई न झाल्यास आझाद मैदान येथे आंदोलन करणार असल्याचे मुल्ला यांनी राज्यपालांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.

तोपर्यंत निर्णयास संमंती नाही

दरम्यान, व्यवस्थापन परिषद सदस्य एन. बी. गायकवाड यांनी शनिवारी कुलसचिव कार्यालयास पत्र दिले. व्यवस्थापन परिषदेच्या २२ मार्च रोजी झालेल्या बैठकीस मी अनुपस्थित होतो. या दिवशी चौकशी समितीने केलेल्या शिफारसीविषयी मी अनभिज्ञ आहे. चौकशी अहवालासंदर्भात माहिती मिळत नाही, तोपर्यंत त्याला माझी संमंती असणार नाही असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधन : भालचंद्र गिरी

$
0
0

फोटो...

भालचंद्र गिरी

कागल : बामणी (ता. कागल) येथील निवृत्त ऑनररी कॅप्टन भालचंद्र श्रीपती गिरी (वय ७७) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुली, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. माती सावरणे विधी सोमवारी (ता.१) सकाळी दहा वाजता बामणी येथे होणार आहे.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारीवडेत वनरक्षकावर कोयत्याने हल्ला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गारगोटी

कारीवडे (ता. दरगड) येथे वृक्षतोड करत असताना प्रतिबंध केल्याने वनरक्षकावर कोयत्याने हल्ला करून त्यांना जखमी केले. रणजित गजानन पाटील (वय २४) असे वनरक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी आनंदा शंभू हानफोडे (रा. कारीवडे) याच्याविरोधात भुदरगड पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. रणजित पाटील कडगाव बीटअंतर्गत वनरक्षक म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी जंगलाची पाहणी करताना आनंदा हानफोडे वृक्ष तोडताना आढळला. याबाबत जाब विचारता हानफोडेने वनरक्षक पाटील यांना शिवीगाळ करून कोयत्याने वार केला. उजव्या हातावर वार झाल्याने पाटील जखमी झाले. त्यांच्यावर गारगोटी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इचलकरंजी पालिकेचे अंदाजपत्रक बेकायदेशीर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

इचलकरंजी नगरपरिषदेचे सन २०१८-१९ चे दुरुस्त व सन २०१९-२० चे अंदाजपत्रक पूर्णत: बेकायदेशीर आहे. नगरपरिषद अधिनियम दुरुस्ती २०१८ नुसार नगरपरिषदेने केलेला कोणत्याही बेकायदेशीर ठरावाची अंमलबजावणी न करता जिल्हाधिकाऱ्यांना स्थगितीसाठी शिफारस करण्याची जबाबदारी मुख्याधिकाऱ्यांची असल्याने बेकायदेशीर ठरावास स्थगिती मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे शिफारस करावी, अशी मागणी नगरसेवक विठ्ठल चोपडे यांनी मुख्याधिकारी दीपक पाटील यांना केली आहे.

दरम्यान, बेकायदेशीर ठरावाच्या अंमलबजावणीमुळे होणाऱ्या सर्व परिणामांची जबाबदारी मुख्याधिकाऱ्यांची राहील, असा इशाराही दिला आहे.

२८ फेब्रुवारी २०१९ रोजी इचलकरंजी नगरपरिषदेची अर्थसंकल्पीय सभा होऊन त्यामध्ये बहुमताने अंदाजपत्रक मंजूर केले, परंतु सर्वच ठराव बेकायदेशीर असल्याने त्याला मनपा अधिनियम १९६५ चे कलम ३०८ अन्वये स्थगिती द्यावी, यासाठी चोपडे यांनी मुख्याधिकारी पाटील यांना निवेदन दिले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी २०१८-१९ साठी १६८.२१ कोटी रुपयांच्या महसुली खर्चास मान्यता दिली आहे. मात्र, या ठरावान्वये केलेल्या चौमाही दुरुस्तीत प्रशासनाने महसुली खर्च १८८.१७ कोटी सुचविला आहे. याशिवाय या ठरावान्वये त्यामध्ये पुन्हा १०.१८ कोटी रुपयांची वाढ करून एकूण ३० कोटी रकमेची वाढ केलेली आहे. ही वाढ पूर्णत: बेकायदेशीर आहे. २०१८-१९ च्या अंजदापत्रकात महसुली प्राप्त रक्कम या शीर्षातील स्पेशल पाणीपट्टी या गौण शीर्षाखाली १.९९ कोटी रुपये उत्पन्न गृहीत धरले आहे. त्यापैकी नोव्हेंबरअखेर काहीच वसुली झाली नसून मार्चअखेरही या शीर्षाखाली वसुली होण्याची शक्यता नाही. अशा स्थितीत महसुली जमेमध्ये दाखविलेली ही वाढ अयोग्य आहे. म्हणजेच सन २०१८-१९ साठी महसुली जमा रुपये १६४.७५ कोटी, तर महसुली खर्च रुपये १८८.१७ कोटी व उपरोक्त ठरावाने वाढलेले रुपये १०.१८ कोटी धरून एकूण महसुली जमा व खर्चामध्ये रुपये ३३.६० कोटींचा फरक आहे. हा फरक भरून काढण्यासाठी नगरपरिषदेकडे कोणतेही नियोजन नसलेने ही दुरुस्ती बेकायदेशीर असल्याचे चोपडे यांनी म्हटले आहे.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विशाल यांची ‘बॅटिंग’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

सांगलीत काँग्रेस की स्वाभीमानी? असा गेले आठवडाभर सुरू असलेला तिढा अखेर शनिवारी सुटला. काँग्रेसच्या सांगली आणि कोल्हापूर जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत खासदार राजू शेट्टी यांनी सांगली लोकसभा मतदार संघातील स्वाभीमानीचे उमेदवार म्हणून विशाल पाटील यांच्या नावाची घोषणा शनिवारी केली.

काँगेस पक्षश्रेष्ठींपासून ते काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांपर्यंत सर्वांची परवानगी घेऊनच पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. २ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करुन ही निवडणूक जिंकण्यासाठीच मैदानात उतरत असल्याचा निर्धारही शेट्टी यांनी यावेळी केला.

कॉंग्रेसला सांगलीची हक्काची जागा मिळावी, म्हणून अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न करण्यात आले. केंद्रीय कमिटीसमोर विषय नेल्यानंतरही सांगलीची जागा स्वाभीमानीला देण्यात आली आहे. त्यात बदल होणार नाही, असे स्पष्ट झाल्यानंतर सर्वानुमते वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांच्या नावावर स्वाभीमानीचे उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आले. पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत असताना राष्ट्रवादीचे पदाधिकारी वगळता इतर सर्व घटक पक्ष, संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कॉंगेसचे सर्व नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. कॉंगेसचे जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम, कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष, माजी मंत्री प्रकाश आवाडे उपस्थित होते.

.. ..

जागा वाटपात सांगलीची जागा स्वाभीमानीच्या वाट्याला आल्यानंतर कॉंगेस कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता होती. परंतु, आमचा सर्वांचा उद्देश भाजपचा पराभव करणे हाच असल्याने सुवर्णमध्य काढण्यात यश आले. सर्व सहमतीने विशाल पाटील यांना स्वाभीमानीची उमेदवारी देण्यात आली. ते बॅट या चिन्हावर निवडणूक मैदानात असतील.

खासदार राजू शेट्टी, स्वाभीमानीचे नेते

.. ..

मी स्वाभीमानी कॉंग्रेसचा पाईक आहे. भाजपचा पराभव करणे हाच उद्देश असल्याने आणि मुंबईत प्रदेशपातळीवरील चर्चा होऊन परवानगी मिळाल्यानंतरच स्वाभीमानीच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आहे. खासदार राजू शेट्टी यांच्या शेतकऱ्यांविषयीच्या भूमिकेला आम्ही नेहमीच पाठबळ दिलेले आहे.

विशाल पाटील, उमेदवार

.. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘धैर्यशील मानेंना मताधिक्याने निवडून द्या’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

'भाजप सरकारने मराठा समाजाला टिकणारे आरक्षण दिले, धनगर समाजाच्या आरक्षणासाठी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिले आहे, शेतकऱ्यांची २१ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली. भाजपला आता काश्मीरमधील ३७० वे कलम रद्द करावयाचे आहे. यासाठी चारशे खासदारांची गरज असून हातकणंगले मतदारसंघातून युतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या,' असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील सेना-भाजप युतीचे उमेदवार धैर्यशील माने यांचा प्रचार प्रारंभ सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथे झाला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, उमेदवार धैर्यशील माने, माजी खासदार निवेदिता माने, आमदार उल्हास पाटील, सुजित मिणचेकर, सुरेश हाळवणकर यासह शिवसेना, भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

खासदार राजू शेट्टी यांचा नामोल्लेख टाळत मंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, 'माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर टीका करणारे आज त्यांच्याजवळ जाऊन बसले आहेत. काटा मारणारे अशी कारखानदारांवर टीका करणारे त्यांच्या गोटात गेले आहेत. आवाडेंना गाडल्याशिवाय गप्प बसणार नाही असे म्हणणारे त्यांच्या खांद्यावर बसले आहेत. त्यांनी बहुजन समाजाची फसवणूक करणे बंद करावे. भाजप सरकारने साखरेचा हमीभाव २९ रुपयांवरून ३१ रुपये केला. शिरोळ तालुक्यातील क्षारपड जमीन सुधारण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वादळी वारा आणि पावसामुळे फळबागा जमीनदोस्त

$
0
0

सोलापूर :

सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मध्यरात्री झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झालेय. ऐन काढणीला आलेल्या द्राक्ष बागा आणि डाळिंबीच्या बागांचे या वादळी वारा आणि पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याशिवाय जिल्ह्यातील शेकडो एकर जमिनीवरील फळबागांसह इतर पिकेही जमीनदोस्त झालीयेत.

मोहोळ तालुक्यातील राजेश जगताप या शेतकऱ्याची साडेतीन एकराची द्राक्षबाग जमीनदोस्त झाली आहे. यामुळे जगताप यांचे तब्बल २५ ते २६ लाखांचे नुकसान झालेय. येत्या आठवडाभरात या बागेतून ४० ते ५० टन द्राक्षे तर १२ टन बेदाणा अपेक्षित होता. त्यातून त्यांना तब्बल २५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळळ्याची शक्यता होती. मात्र, रात्रीच्या वादळी पावसाने सर्वकाही संपवले. त्यामुळे शासनाने पंचनामे करून किमान नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या शेतकऱ्याने केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नियमित घरफाळा भरणाऱ्या मिळकतदारांना मिळणार सूट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिका क्षेत्रातील नियमित घरफाळा भरणाऱ्या मिळकतदारांना यावर्षीही सूट देण्यात येणार आहे. गतवर्षी प्रशासनाने दिलेल्या या सवलतीमुळे पहिल्या तिमाहीत तब्बल २१ कोटींचा घरफाळा जमा झाला होता. त्यामुळे यावर्षीही ही योजना कायम ठेवली आहे. त्याप्रमाणे पहिल्या तिमाहीसाठी सहा टक्के, सहा महिन्यांसाठी चार टक्के, तर आठ महिन्यांपर्यंत घरफाळा जमा करणाऱ्या मिळकतदारांना एकूण घरफाळ्याच्या दोन टक्के सवलत देण्यात येणार आहे.

स्थानिक स्वराज संस्था किंवा सरकारकडे जमा होणारे कर जमा करण्यास अनेकजण उत्सुक नसतात. त्यामुळे अनेक प्रकारच्या करांच्या थकबाकीचा आकडा फुगत असतो. ज्याप्रमाणे कर न भरणाऱ्यांची संख्या आहे, त्याप्रमाणेच नियमित कर भरणा करणाऱ्या करदात्यांची संख्या मोठी आहे. अशा मिळकतदारांना महापालिकेच्या घरफाळा विभागाने एकूण रकमेमध्ये सूट देणारी योजना गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही कायम ठेवली आहे.

एक एप्रिलपासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात झाल्यानंतर पुन्हा कर भरणा करण्यास सुरुवात होते. त्यानुसार घरफाळा विभागाने महिल्या तीन महिन्यांत घरफाळा जमा करणाऱ्या मिळकतदारांना एकूण रकमेच्या सहा टक्के सूट देण्यात येणार आहे. गतवर्षी याचा लाभ घेत पहिल्या तीन महिन्यांत घरफाळा रूपाने महापालिकेकडे २१ कोटींचा घरफाळा जमा झाला होता. तसेच पुढील तीन महिने म्हणजेच सहा महिन्यांसाठी चार टक्के सूट देण्यात येणार आहे, तर वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांपर्यंत घरफाळा जमा करणाऱ्या मिळकतदारांना दोन टक्के सवलत देण्यात येणार आहे. घरफाळ्यात सूट देणाऱ्या योजनेमुळे महापालिकेच्या उत्पन्नात सुरुवातीच्या टप्प्यात चांगली भर पडत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसंतदादांच्या वारसांसमोर आव्हान

$
0
0

मराठी मुलखात : दक्षिण महाराष्ट्र

विजय जाधव

सांगलीत काँग्रेसचे विशाल पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार झाले खरे, पण काँग्रेसचे अन्य महत्त्वाकांक्षी नेते काय करणार? आघाडीतील महत्त्वाचा घटकपक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील त्यांना मदत करणार काय? विशाल पाटलांचे विरोधक विश्वजित कदम कोणती भूमिका घेणार, महापालिका निवडणुकीत आदळआपट करणारे आणि पाडापाडीत रंगलेले स्थानिक नेते कसे सक्रिय होणार? त्याहून दादा घराण्यातील लपून न राहिलेल्या वादातील नेते किती ताकदीने प्रचारात उतरणार यावरच ही निवडणूक किती तापणार हे ठरणार आहे.

०००

काँग्रेसमुक्त भारताचे भारतीय जनता पक्षाचे स्वप्न सांगलीत खरे ठरते की काय, असे वाटत असताना वसंतदादांच्या नातवांनी खिंड लढवत अखेर मागच्या दाराने का असेना काँग्रेसचे नाव राखण्यात यश मिळवले. सांगलीत काँग्रेस संपविण्यास विरोधकांचीच गरजच नव्हती! दादा घराण्यातील चार गट, काँग्रेसमधील चार गट, त्यात प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी काही झाले तरी पक्षाचे पानिपत करायचेच ठरवून टाकल्याने नेते जिंकले आणि काँग्रेस हरली अशीच गलितगात्र अवस्था राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची खुद्द बालेकिल्ल्यातच झाली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी करमणुकीचा आस्वाद घेत मौन धारण करत या घरातल्या कलहाला खतपाणीच घातले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे सांगलीवर विशेष प्रेम. त्यांनी शेवटी मौन सोडत नुसता इतिहास सांगून भागत नाही, त्याला कर्तृत्वाची जोड द्यावी लागते, असा टोला घराण्याचा वारसा सांगणाऱ्यांना लगावला.

सांगलीच्या निवडणुकीचा पट शेवटी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उसनवारीवर काँग्रेसच्या माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील आणि विशाल पाटील या बंधूंनी निसटता का असेना मांडला आहे. गेल्या आठ-दहा वर्षांपासून जिल्ह्यात बऱ्यापैकी मूळ धरलेल्या स्वाभिमानीला आपला विस्तार करण्याची आयती संधी काँग्रेसने दिली. ही वेळ इतक्या लवकर आणि अशा प्रकारे येईल, अशी कल्पना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही केली नसावी. संघटनेच्या ऊस आंदोलनात सारे कारखाने सोडून वसंतदादा कारखाना लक्ष्य असायचा. कसबे डिग्रज आंदोलनाचे केंद्र बनायचे आणि कारखान्याची कोंडी करायची, यामागे शेतकऱ्यांचा प्रश्न महत्त्वाचा होताच; पण वसंतदादा कारखान्याचा ऊस रोखला ही बातमी घडवणे, राज्यभर साखरसम्राटांना धडकी भरवणे हा त्यामागचा हेतू असे. स्वाभिमानीने अलीकडे सांगली जिल्ह्यातही संघटना जोमाने पसरवली, गावागावांत शाखा बांधल्या, पण संघटनेचा उमेदवार शेट्टींना उभा करता आला नाही. दादांसारख्या राजकीय घराण्याचा थेट वारसदार स्वाभिमानीला मिळाला आहे. आता त्याला निवडून आणण्यात शेट्टी किती ताकद पणाला लावतात, हे पाहणे सांगलीच्या राजकीय इतिहासात महत्त्वाचे ठरेल.

रडत-खडत का असेना शेवटी बॅट हातात घेतलेल्या विशाल पाटील यांना तोंड देणे भाजपचे खासदार संजय पाटील यांच्यासाठी आव्हानाचे ठरते की काय, पाहावे लागेल. माजी मंत्री प्रतीक पाटील यांनी या राजकीय घडामोडींत काँग्रेसवर आगपाखड करताना वसंतदादा, त्यांचे राजकारण आणि वारसांचा मुद्दा पुढे केला. जिल्ह्यातील मतदारांनी मनावर घेतले तर आणि तरच हा भावनेचा मुद्दा बनू शकतो. त्यावर निवडणूक जिंकता येईल, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. विधानसभा निवडणुकांची गणिते यामागे लपली आहेत. मात्र, काँग्रेस विखुरलेली आहे. सर्वच आठही विधानसभा मतदारसंघांतून काँग्रेस पाच वर्षांनंतरही काही शिकलेली नाही. जनतेच्या प्रश्नाला आवाज देण्यात पक्षाचे नेते कमी पडले आहेत. सांगली शहराचा काही अपवाद वगळता एकही विधानसभा मतदारसंघ अनुकूल दिसत नाही. या परिस्थितीत वसंतदादांच्या वारसांसमोर मोठे आव्हान आहे. गेल्या निवडणुकीचा अनुभव गाठीशी आहेच!

विशाल पाटील उमेदवार झाले खरे, पण काँग्रेसचे अन्य महत्त्वाकांक्षी नेते काय करणार? आघाडीतील महत्त्वाचा घटकपक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील त्यांना मदत करणार काय? विशाल पाटलांचे विरोधक विश्वजित कदम कोणती भूमिका घेणार, महापालिका निवडणुकीत आदळआपट करणारे आणि पाडापाडीत रंगलेले स्थानिक नेते कसे सक्रिय होणार? त्याहून दादा घराण्यातील लपून न राहिलेल्या वादातील नेते किती ताकदीने प्रचारात उतरणार यावरच ही निवडणूक किती तापणार हे ठरणार आहे. विशेष म्हणजे चारही तोंडे चारी दिशांना असणाऱ्या या नेत्यांना एका मुशीत बांधणारा नेता काँग्रेसकडे नाही. जे आहेत ते जुने हिशेब चुकते करण्यासाठीच मैदानात आल्याचे प्राथमिक चित्र आहे.

दिवंगत दादांच्या कर्मभूमीत काँग्रेसची झालेली ही अवस्था आजही दिशाहीन आहे. आता स्वाभिमानीचा टेकू किती कामाला येतो, हे महत्त्वाचे ठरणार आहे. स्वाभिमानीने या बुडत्या काँग्रेसला आधार दिला आहे, त्यामुळे नवी राजकीय समीकरणे तयार होतील. खासदार शेट्टी सांगलीच्या मैदानावर किती तळमळीने उतरतात हे आता पाहावे लागेल! वारसांचे उरले-सुरले अवसान गळणार की, जिल्ह्यातील काँग्रेसच्या उथळ नेत्यांना पक्षीय राजकारणासाठी काही धडा मिळणार, हे ठरवणारी ही निवडणूक!

००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरटीआय अंतर्गत २५ टक्के जागा राखीव

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण कायद्यानुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शिक्षण प्रवेशासाठी २५ टक्के जागा राखीव आहेत. संबंधितांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन शिक्षण विभागाने म्हटले आहे. २०१२-१३ या शैक्षणिक वर्षापासून पहिलीच्या वर्गाच्या एकूण विद्यार्थी संख्येपैकी २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील बालकांच्या प्रवेशासाठी राखीव ठेवण्यात येत आहे. यामध्ये अल्पसंख्याक शाळा वगळता राज्यातील सर्व विना अनुदानित, कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित तत्वावरील शाळेतील प्रवेशासाठी हा निर्णय लागू आहे. त्यानुसार संबंधित विद्यार्थ्यांना मोफत प्राथमिक शिक्षण देणे बंधनकारक आहे. वंचित गटामध्ये विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासव प्रवर्गातील बालकांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


घरगुती गॅस दरवाढ आजपासून

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

नव्या आर्थिक वर्षात घरगुती गॅस सिलिंडरचा दर ६० ते १०० रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहेत. त्याची अंमलबजावणी आज (सोमवार) पासून होईल. परिणामी गरीब, सामान्य कुटुंबास आर्थिक झळ सहन करावा लागेल. सुटे भागनिर्मितीचे दर वाढल्याने वाहनांच्या किमतीमध्येही वाढ होणार आहे. याउलट पाच लाखांच्या आतील उत्पन्न असणाऱ्यांना इनकम टॅक्स भरावा लागणार नाही. त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल.

मार्च महिन्यात घरगुती अनुदानित गॅस सिलिंडरचा दर ६८८ रुपये होता. त्यामध्ये १८९ रुपये अनुदान मिळत होते. एप्रिल महिन्यात हे दर बदलणार आहेत. सरासरी ६० ते १०० रुपयांपर्यंत दर वाढतील. पेट्रोलियम कंपन्यांनी सीएनजी गॅसची किंमत १८ टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सीएनजीवर चालणाऱ्या वाहनधारकांच्या खिशालाही झळ बसेल. जीएसटीमुळे सर्वच कंपन्यांच्या वाहननिर्मितीच्या सुट्या भागाचे दर वाढणार आहेत. नव्या वाहनांचे दरही वाढतील.

नवीन फ्लॅट खरेदी करताना संबंधिधांना सरकारी मुद्रांकावर १२ टक्के जीएसटी भरावा लागत होता. आता तो कमी करून पाच टक्के केला आहे. नवीन घरखरेदी करणाऱ्यांना फायदा होईल. गृहनिर्माण प्रकल्प बांधकामाला काही प्रमाणात बूस्ट मिळेल, असे बांधकाम व्यावसायिकांचे म्हणणे आहे. रिझर्व्ह बँकेचा रेपो दर घटल्याने राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्जावरील व्याजदर कमी होणार आहे. गृह, वाहन खरेदीसाठी काढलेल्या कर्जावरील व्याज पूर्वीपेक्षा कमी भरावे लागेल. खासगी कंपनी बदलल्यानंतर भविष्य निवाह निधी (पीएफ) नवीन कंपनीच्या ईपीएफओ प्रणालीद्वारे पीएफ खात्यावर वर्ग करता येणार आहे. ऑनलाइन ट्रान्सफर होणार असल्याने नोकरदारांची किचकट प्रक्रियेतून सुटका झाली. मात्र, यासाठी पॅन कार्ड, आधार कार्डमधील नावातील स्पेलिंग सारखे असणे बंधनकारक आहे.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवसभरात सात कोटी जमा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी (३१ मार्च) विविध करांच्या माध्यमातून महापालिकेच्या तिजोरीत सात कोटी रुपयांचा महसूल जमा झाला. ४३६ कोटींच्या एकूण उद्दिष्टापैकी ३०० कोटींचा टप्पा पार केला असून, सरकारी अनुदानासह एकूण वसुली ३१० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षीही १२५ कोटींची महसुली तूट येणार आहे.

२०१८-१९ च्या अर्थसंकल्पात दिलेल्या उद्दिष्टाची पूर्तता करण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून प्रशासन गतिमान झाले होते. घरफाळा, पाणीपट्टी, एलबीटी, नगररचना, परवाना व इस्टेट अशा प्रमुख विभागांकडून नियमित व थकीत वसुलीसाठी विविध प्रयत्न केले जात होते. थकीत बिलाच्या दंडामध्ये सवलत, जप्ती, आदींच्या माध्यमातून वसुलीसाठी जोरदार प्रयत्न केले. जानेवारीअखेर प्रशासनाकडे कर स्वरूपात २०७ कोटींचा महसूल जमा झाला होता. त्यानंतरच्या दोन महिन्यांत मात्र महापालिकेच्या तिजोरीत ८९ कोटींची भर पडली.

संस्था कर (एलबीटी) स्वरूपात १३० कोटी महापालिकेला मिळाले आहेत, तर ५८ कोटींचा घरफाळा जमा झाला. शहर पाणीपुरवठा विभागाने वर्षअखेरपर्यंत ५२ कोटी ८५ लाखांची वसुली केली आहे. घरफाळा, नगररचना व पाणीपट्टी विभागाने सुमारे ९० टक्क्यांपर्यंत वसुली केली. मात्र नगररचना, इस्टेट, परवाना विभागाची वसुली मात्र ५० टक्क्यांपेक्षा कमी राहिली आहे. नगररचना विभागाने ३६ कोटी, इस्टेट विभागाने पाच कोटी ६० लाख, तर परवाना विभागाने अडीच कोटींचा टप्पा पार केला.

पाणीपुरवठा विभागाने थकीत रक्क्म वसूल करण्यासाठी पाच विशेष पथकांची नियुक्ती केली होती. पथकाने १,६६४ कनेक्शन बंद करत सुमारे चार कोटींची थकीत रक्कम वसूल केली. त्यामुळे एकूण वसुलीमध्ये घरफाळा विभागापाठोपाठ पाणीपुरवठा विभागाने आघाडी घेतली आहे. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी अधिकाधिक कर जमा करून घेण्यासाठी महापालिकेची सर्व नागरी सुविधा केंद्रे रात्री १२ पर्यंत सुरू ठेवण्यात आली होती. महापालिकेने गेल्या पंधरा दिवसांपासून वसुली मोहीम तीव्र केली असली, तरी प्रशासनाला ३०० कोटींपेक्षा जास्त वसुली करता आलेली नाही. त्यामुळे गेल्या वर्षाप्रमाणे यावर्षीही १२५ कोटींची महसुली तूट येणार आहे. महापालिकेप्रमाणे जिल्हा कोषागार कार्यालयात रात्री उशिरापर्यंत ऑनलाइन कर भरण्याची सुविधा निर्माण करून दिली होती. त्याचा फायदा नागरिकांनी घेतला.

००००

पोलिस प्रशासनाची थकबाकी जमा

महापालिका शहर पाणीपुरवठा विभागाची अनेक सरकारी कार्यालयांकडे सुमारे २५ कोटींची पाणीपट्टी थकीत आहे. मार्चअखेर थकबाकी जमा करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने सर्वच सरकारी विभागांना पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार रविवारी जिल्हा पोलिस प्रशासनाने तीन कोटी पाच लाख २५ हजारांचा धनादेश सुपूर्द केला. पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पाणीपट्टी अधीक्षक प्रशांत पंडत यांच्याकडे धनादेश दिला.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१० एप्रिलपासून भीम फेस्टिव्हल

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

माजी खासदार एस. के. डिगे मेमोरियल फाउंडेशनतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त १० एप्रिलपासून 'भीम फेस्टिव्हल २०१९'चे आयोजन केले आहे. फेस्टिव्हलमधील विविध कार्यक्रम दसरा चौकातील शाहू स्मारक भवन आणि बिंदू चौकात होतील, अशी माहिती सदानंद डिगे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.

डिगे म्हणाले, १० एप्रिलला सायंकाळी ५ वाजता बिंदू चौकात प्रबोधनात्मक 'आवाज भीमाचा' कार्यक्रम होईल. त्यानंतर दिक्षाभूमी प्रतिकृतीचे उदघाटन होईल. ११ एप्रिलला शाहू स्मारक भवनात सायंकाळी ५ वाजता डॉ. नवनाथ शिंदे यांचा 'महात्मा फुले' एकपात्री प्रयोग होईल. प्रा. डॉ. शरद गायकवाड यांचे व्याख्यान होईल. १२ एप्रिलला दुपारी १२.३० वाजता बिंदू चौकात गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम होईल. १३ एप्रिरलला शाहू स्मारक भवनात दुपारी एक वाजता ज्येष्ठ साहित्यिक आ. ह. साळुंखे यांच्या हस्ते 'समाजक्रांती भीमक्रांती' पुरस्काराचे वितरण होईल. रात्री ११.३० वाजता आतषबाजी करण्यात येईल. १४ एप्रिलला लक्ष्मीपुरीतील फाउंडेशनच्या कार्यालयात सकाळी ९ वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन होईल. दुपारी १२ वाजता अंध, अपंग मुलींना जेवण दिले जाईल. सायंकाळी ५ वाजता चित्ररथ मिरवणूक काढली जाईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राथमिक शिक्षक बँकेत नोकरभरतीचा दर २० लाखांवर

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या संचालकांनी अनावश्यक नोकरभरतीचा घाट घातला असून एक कर्मचारी भरण्यासाठी काही लाख रुपये दर काढला आहे असा आरोप बँक एम्प्लॉईज युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला. नोकरभरतीच्या विरोधात बेमुदत संप केला जाईल, असा इशाराही दिला आहे. दोन एप्रिल रोजी लाक्षणिक संप केला जाणार आहे.

बँकेचे व्यवस्थापन कर्मचाऱ्यांचे चार कोटी रुपयांहून अधिक देणे देण्यास असमर्थता दाखवत आहे. तर दुसरीकडे अनावश्यक नोकरभरती करत आहेत. नोकरभरतीचा परिणाम सभासदांच्या लाभांशावर होणार आहे. संचालक स्वत:च्या स्वार्थासाठी सभासद व कर्मचाऱ्यांच्या हिताचा बळी देत आहेत. संचालक मंडळाने निवडून येताना ६५ कामगारांत बँक चालवू असे वल्गना केल्या होत्या. पण आता १३०पेक्षा अधिक नोकरभरती केली जाणार असल्याचे वृत्त आहे. युनियनने ७५ कर्मचाऱ्यांचा स्टाफिंग पॅटर्न प्रस्ताव सादर केला आहे. पण, याबाबत कोणतीही चर्चा केली नसल्याने संघटना सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडे धाव घेणार आहे.' पत्रकार परिषदेला युनियनचे अध्यक्ष कॉ. अतुल दिघे, जनरल सेक्रेटरी एन.एस. मिरजकर, सचिव प्रकाश जाधव उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनसुराज्यची भूमिका गुलदस्त्यात

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील प्रचार टिपेला पोहोचत असताना जनसुराज्य शक्ती पक्षाची भूमिका अद्याप गुलदस्त्यात राहिली आहे. भाजपचा सहयोगी पक्ष म्हणून जनसुराज्य पक्षाची वाटचाल सुरू आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-सेनेची युती झाली असली, तरी पक्षाचे प्रमुख, माजी मंत्री विनय कोरे यांनी अद्याप दोन्ही मतदारसंघातील कोणत्याच उमेदवाराला पाठिंबा जाहीर केलेला नाही. जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेऊन कोरे आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात जनसुराज्य पक्षाचे प्रभावक्षेत्र पन्हाळा पश्चिम भागासह गडहिंग्लज, आजरा व करवीर तालुक्यामध्ये आहे. तसेच शहरात दहा ते बारा आजी-माजी नगरसेवक पक्षाला मानणारे आहेत. वारणा कारखाना, दूध संघ, बँक यामुळे वडणगे, निगवे, शिये, भुये, केर्ली आदी गावात कार्यकर्त्यांचे मोठे नेटवर्क आहे. कार्यकर्त्यांबरोबर भागातील अनेकजण वारणा उद्योग समुहाशी नोकरीच्या निमित्ताने जोडले गेले आहेत. परिणामी या पक्षाची कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील भूमिका महत्त्वाची ठरेल.

राज्यात भाजप-सेनेचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर पक्षाध्यक्ष कोरे यांनी भाजपचा सहयोगी पक्ष म्हणून भूमिका जाहीर केली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप-सेनेची युती झालेली असली, तरी पक्षाध्यक्ष कोरे यांना पन्हाळा विधानसभा मतदारसंघात शिवेसनेच्या उमेदवारांशी टक्कर द्यावी लागणार आहे. अवघ्या सहा महिन्यांत विधानसभा निवडणूक होणार असल्याने हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील भूमिका कोरे यांनी स्पष्ट केलेली नाही. त्याचबरोबर कोल्हापूर मतदारसंघातील भूमिकाही संदिग्ध ठेवली आहे. जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात त्यांचा युतीच्या उमेदवारांना पाठिंबा मिळवण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी कोरे यांची भेट घेतली आहे. त्याचबरोबर काँग्रेस व राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेतेही त्यांच्या संपर्कात असल्याचे समजते.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक व युतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या जोरदार लढत होत असल्याने कोरेंच्या भूमिकेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अद्याप मतदानाला बावीस दिवसांचा अवधी असला, तरी लवकरच कोरे पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन भूमिका स्पष्ट करणार असल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images