Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

बाजीराव खाडे यांचा नागरी सत्कार

0
0

म. टा. वृत्तसेवा, कुडित्रे

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्याकडे उत्तर प्रदेशच्या पूर्व विभागाची जबाबदारी देण्यात आली. त्याकरिता त्यांना मदतीसाठी तीन सहकारी निवडण्यात आले, त्यापैकी एक प्रभारी सचिव कोल्हापूर जिल्ह्यातील सांगरुळ (ता. करवीर) गावच्या बाजीराव खाडे हे एक आहेत. गांधी यांच्या टीममध्ये निवड झालेले खाडे हे महाराष्ट्रातील एकमेव आहेत. या निवडीबद्दल त्यांचा सांगरुळ ग्रामस्थांच्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्ती चाबूक होते.

सत्कारप्रसंगी बाजीराव खाडे म्हणाले, 'विचारधारा पटल्यामुळेच कॉंग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम सुरू केले. श्रीपतराव बोंद्रे व पी. एन. पाटील यांच्यासारखे पक्षाशी एकनिष्ठ असे नेतृत्व लाभल्याने काम करण्याची ताकद वाढली. पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून कॉंग्रेसचे विचार पोहचविण्याचा प्रयत्न केला. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची झालेली निवड म्हणजे कॉंग्रेससाठी काम करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची निवड असून हा खऱ्या अर्थाने सांगरुळ गावचा सन्मान आहे. लोकशाही व संविधान सन्मान राखून देशात एकात्मता टिकवायची असेल तर कॉंग्रेसशिवाय पर्याय नाही.'

यावेळी प्रा. जयंत आसगावकर, यशवंत बँकेचे चेअरमन एकनाथ पाटील, संचालक उत्तम पाटील, नामदेव खाडे, भीमराव नाळे, भगवान लोंढे, निलेश सुतार, एस. एम. नाळे, एम. बी. खाडे, प्रशांत कापडे, सज्जन पाटील आदींची भाषणे झाली. गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, जिल्हा युवक कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल खंजीरे, पं. स. सदस्या अर्चना खाडे, रंगराव नाळे, एन. डी. खाडे, शिवाजी खाडे, तुकाराम नाळे, आनंदा कासोटे, रवींद्र खाडे उपस्थित होते. दत्तात्रय साळोखे यांनी स्वागत केले. आनंदा नाळे यांनी आभार मानले.

फोटो

प्रियांका गांधींच्या टीममधील निवडीबद्दल बाजीराव खाडे यांचा सांगरुळ ग्रामस्थांच्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उत्तरपत्रिकेची कार्बनलेस कॉपी मिळणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत रविवारी (ता. २४) पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिकची (इयत्ता आठवी) शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित केली आहे. या परीक्षेत प्रत्येक विद्यार्थ्याला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर कार्बनलेस कॉपीसह उत्तरपत्रिका देण्यात येणार आहे. पेपर संपल्यानंतर विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची एक प्रत (कार्बनलेस कॉपी) मिळणार आहे.

पाचवीची शिष्यवृत्ती परीक्षा १४२ केंद्रावर तर इयत्ता आठवीची शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ९५ केंद्राची सोय केली आहे. परीक्षा सुरळीपणे पार पाडण्यासाठी २३७ केंद्र संचालकांची नियुक्ती केली आहे. जिल्ह्यात मराठी, उर्दू, हिंदी, इंग्रजी, कन्नड या पाच माध्यमात परीक्षा होणार आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख यांची भरारी पथके स्थापली आहेत. तसेच जिल्हास्तरावरुन केंद्रभेटीचे आयोजन केले आहे. पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी २२,९१७ तर आठवीच्या परीक्षेसाठी १३८३६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

मात्र या परीक्षेत पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर कार्बनलेस कॉपीसह उत्तरपत्रिका देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या गुणांची आणि प्रश्नांची खातरजमा परीक्षेनंतर करता येणार आहे.

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपशिक्षणाधिकारी बी. एम. कासार, विस्तार अधिकारी ए. एम. आकुर्डेकर, एम. आय. सुतार, जे. टी. पाटील, डी. सी. कुंभार, श्रीमती जे. एस. जाधव, कनिष्ठ सहायक एस. व्ही. कदम परीक्षेचे नियोजन करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जंतनाशक मोहिम

0
0

कोल्हापूर

जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय जंतनाशक दिन अंतर्गत शुक्रवारी (ता.२२) मोहिम राबविण्यात येणार आहे. यानिमित्त एक ते १९ वयोगटातील मुलांना सरकारी, अनुदानित व खासगी शाळा, अंगणवाडी केंद्रात विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहेत. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी आरोग्य विभागाने नियोजन केले आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन मोहिम १०० टक्के यशस्वी करण्याच्या सूचना केल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुंभी धरणात पडून तीन गवे ठार

0
0

म. टा. वृतसेवा, गगनबावडा

लखमापूर येथील कुंभी मध्यम प्रकल्पाच्या सांडव्यामध्ये उंचावरून पडून तीन गव्यांचा मृत्यू झाला. वन कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या साह्याने गव्यांचे मृतदेह बाहेर काढले. त्यात एक मादी, एक नर आणि पिल्लाचा समावेश होता.

कुंभी मध्यम प्रकल्पाजवळ विस्तीर्ण जंगल आहे. जंगलात गव्यांचा संख्या मोठी आहे. काल सकाळी येथे कळपातील गव्यांच्या झुंजी लागून त्यातील तीन गवे मोठ्या दरडीवरून सांडव्यात पडले. त्यात तिन्ही गवे जागीच ठार झाले. मात्र दुपारी हा प्रकार दुपारी निदर्शनास आला. घटनेची माहिती समजताच गगनबावडा परिक्षेत्र वनअधिकारी सुधीर सोनवले घटनास्थळी आले. सांडवा खोल असल्याने आणि रात्र झाल्याने अंधारात मृतदेह बाहेर काढणे कठीण झाले. त्यामुळे आज दिवसभर प्रयत्नपूर्व जेसीबी मशीन आणून गव्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. तालुका पशुवैद्यकीय अधिकारी वडगावे यांनी शवविच्छेदन केल्यानंतर गव्यांचे तेथेच दफन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी विद्यापीठाचा आज दीक्षान्त समारंभ

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाचा ५५ वा दीक्षान्त समारंभ शुक्रवारी (ता. २२) होत असून या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन इन्स्टिट्यूट आयआयएम, तिरुचिरापल्लीचे संचालक डॉ. भीमराया मेत्री उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थान महाराष्ट्राचे राज्यपाल तथा कुलपती सी. विद्यासागर राव भूषविणार आहेत. विद्यापीठाच्या लोककला केंद्रात दुपारी दोन वाजता हा समारंभ होईल. दीक्षान्त सोहळ्यात सर्वसाधारण गुणवत्तेसाठी देण्यात येणारे राष्ट्रपती सुवर्णपदक पदार्थविज्ञान विभागातील सत्यजित संजय पाटील याला तर कुलपतीपदक महावीर महाविद्यालयातील विद्यार्थिनी साक्षी शिवाजी गावडे हिला प्रदान करण्यात येणार आहे.

यंदा एकूण ४८५१५ स्नातकांना पदवी प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. नव्या विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठातील ३९ अधिविभागातील २७०२ विद्यार्थ्यांसह पीएच.डी., एम. फील., पदवीधर व अधिविभागातंर्गत पारितोषिक प्रदान अशा एकूण ५८ विद्यार्थ्यांना डॉ. मेत्री यांच्या हस्ते पदवीप्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहेत. पीएच.डी. पदवी प्राप्त केलेल्या स्नातकांची एकूण संख्या २५८ असून त्यापैकी ४० स्नातकांना व्यासपीठावर पदवीप्रदान करण्यात येणार आहे. अधिविभागातंर्गत गुणवंत विद्यार्थ्यांपैकी १६ विद्यार्थ्यांना व्यासपीठावर पदवी देण्यात येणार आहे. दरम्यान, दीक्षान्त कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी ८ वाजता कमला कॉलेज येथून ग्रंथदिंडीला प्रारंभ होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अहवाल तयार, शिस्तभंगाची शिफारस

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या पाच सदस्यीय समितीचा चौकशी अहवाल पूर्ण झाला आहे. अनेक प्रकरणात त्यांच्या कामात अनियमिता आणि दोष आढळला आहे. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस चौकशी समितीने अहवालात केली असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. येत्या चार दिवसात अहवाल अध्यक्षांकडे सादर होणार आहे.

शिक्षणाधिकारी लोहार यांच्या कामकाजाच्या विरोधात शिक्षकांनी मोठ्या संख्येने तक्रारी केल्या होत्या. शिक्षकमान्यता, पदोन्नती, शाळा मान्यता अशा कामात भेदभाव केल्याचा, सेवाज्येष्ठता डावलल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाल्या होत्या. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी त्यांच्यावर आर्थिक आरोप करत सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा ठराव केला होता. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी या साऱ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाच सदस्यीय समिती नेमली होती. शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे यांच्या अध्यक्षतेखालील सदस्य अरुण इंगवले, प्रसाद खोबरे, भगवान पाटील आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ या समितीने चौकशीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. प्रशासकीय पातळीवर अहवाल तयार करण्याचे काम पूर्ण झाले असून येत्या काही दिवसात अध्यक्ष व सीईओंना तो सादर होईल.

...

दोघा सदस्यांना सव्वा कोटीहून अधिक निधी

दलित वस्ती सुधारणा योजनेंतर्गत मागासवर्गीय लोकसंख्या जास्त असलेल्या मतदारसंघासाठी जादा निधी खर्च करण्याची तरतूद आहे. राज्य सरकारकडून या योजनेंतर्गत जिल्हा परिषदेला आतापर्यंत १५ कोटी ७६ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यापैकी १४ कोटी ७६ लाख रुपयांच्या निधी वाटपाचे नियोजन झाले आहे. यामध्ये समाजकल्याण सभापतीसह समिती सदस्यांनी जादा निधी घेतल्याचा इतर सदस्यांनी आक्षेप नोंदविला आहे. हातकणंगले तालुक्यातील सत्तारुढ आघाडीच्या दोघा सदस्यांनी मिळून एक कोटी ४० लाख रुपयांचा निधी घेतला आहे. यावरुन अन्य सदस्यात धुसफूस वाढली आहे. स्थायी समितीच्या शुक्रवारी होणाऱ्या सभेत निधी वाटपाचा मुद्दा गाजण्याची चिन्हे आहेत.

...

जिल्हा परिषदेत नोकर भरतीची प्रक्रिया

जिल्हा परिषदेत विविध विभागात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. प्रशासनाने कर्मचारी भरतीचा आकृतीबंध तयार केला आहे. विविध पदासाठी ५५० जागांसाठी भरती होणार आहे. येत्या दोन दिवसात त्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. पदासाठी जाहीरात, अर्ज मागविणे या प्रक्रिया होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजरा सूतगिरणीची काजू बाग खाक

0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

आजरा तालुक्यातील सूतगिरणी परिसरातील काजूच्या बागेला रात्री आकस्मिकपणे आग लागली. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत पंचनाम्याची प्रक्रिया सुरू आहे.

आजरा सूतगिरणीच्या व्यवस्थापनाने सुमारे शंभर एकर क्षेत्रात मोठ्या हिकमतीने आणि मेहनतीने काजू लागवड करून विस्तीर्ण बाग विकसित केली आहे. यासाठी सूतगिरणी व्यवस्थापनाने उपलब्ध पडीक जमीन, कर्मचारी वर्गाची मेहनत व पाण्याचा वापर करीत ही काजूबाग फुलविली आहे. त्यामुळे गेल्या पाच-सहा वर्षात या बागेतील उत्पन्न सूतगिरणीसाठी साहाय्यकारी ठरले आहे. बागेतून किमान १२ ते १५ लाखांचे उत्पन्न मिळू लागले आहे. मात्र काल रात्री अचानकपणे या बागेला आग लागली. आग नेमकी कशी लागली याबाबत अनभिज्ञता आहे. शॉर्टसर्किटने ही आग लागली असावी, असे सांगण्यात येते. आगीत अक्षरशः जळून खाक झाली. काही झाडे खोडापासूनच जळली आहेत. तर सर्वात जास्त काजूच्या झाडांच्या फांद्या शेंड्यापर्यंत खाक झाल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुपरी सूर्य तलावासाठी एक कोटींचा निधी

0
0

हुपरी सूर्य तलावासाठी एक कोटींचा निधी

म. टा. वृत्तसेवा, हातकणंगले

हुपरी (ता. हातकणंगले) येथील सूर्य तलाव म्हणजे जुन्या गावाची ओळख. या तलावाच्या सुशोभीकरणासाठी जेष्ठ नेते महावीर गाट यांनी केलेल्या अथक परिश्रमाने सरकारकडून सुमारे एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला.

हुपरी गावातील सूर्य तलाव म्हणजे येथील विपुल मत्स्यसंपदा, पक्ष्यांचा असलेला किलबिलाट व सभोवताली असलेला निसर्गरम्य परिसर. त्यामुळे 'सूर्य तलाव' सुसज्ज व भरगच्च वाटत होता. कालांतराने हा तलाव काळाच्या ओघात प्रदुषणाचा मोठ्या प्रमाणात बळी ठरला. परिसरातील मिसळणारे सांडपाणी, कचरा यामुळे तलावाला गटारगंगेचे रुप आले. मध्यंतरी तलावाच्या सुशोभीकरणासाठी प्रयत्न झाले. पण तेही थंडावले. तलावाच्या सुशोभीकरणाची अनेक आश्वासने हवेत विरुन श्रेयवादही उफाळून आला. मात्र आता तलावाच्या सुशोभीकरणासाठी निधी मंजूर झाला आहे. निधी मंजूरीसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, इचलकरंजीचे उपनगराध्यक्ष तानाजी पवार आणि युवा नेते अमित गाट यांचे अथक प्रयत्न कारणीभूत ठरले. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत निधी मंजूर केला. याबाबतचे पत्र नगरपरिषदेस प्राप्त झाले आहे. यासाठी नगराध्यक्षा जयश्री गाट, उपनगराध्यक्ष भरत लठ्ठे, युवा नेते अमित गाट यांनी पाठपुरावा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


युती-आघाडीने केली राधानगरीची कोंडी

0
0

मिलिंद पांगिरेकर, गारगोटी

भाजप-शिवसेनेची युती आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडीची घोषणा झाल्याने राधानगरी मतदारसंघांतील राजकीय गणितं बदलून गेली आहेत. गेल्या साडेचार वर्षातील पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार प्रकाश आबिटकर यांच्यात असलेल्या टोकाच्या संघर्षाला पूर्णविराम मिळणार असला तरी उमेदवारीच्या अपेक्षेने भाजपमध्ये प्रवेश केलेल्या युवा नेते राहुल देसाई यांची गोची झाली आहे. आघाडीत मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असल्याने माजी आमदार के. पी. पाटील प्रबळ दावेदार आहेत. येथे पक्षातील जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील हेही स्पर्धेत आहेत. कॉंग्रेसकडून इच्छूक असलेल्या अरुण डोंगळे यांचीही पंचाईत झाली आहे.

राधानगरी मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर प्रतिनिधित्व करतात. पालकमंत्री पाटील यांच्याशी आमदारांचे सख्य नाही हे मतदारसंघाने अनेकदा पाहिले आहे. विकासकामांची मंजूरी, उद्घाटने यात अनेकदा श्रेयवादाचे राजकारण झाले. राज्यात युतीची सत्ता असली तरी पालकमंत्र्यांनी आमदार आबिटकर यांची सातत्याने अडवणूक केल्याची भावना कार्यकर्त्यांत आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमातून निवडणुकीसाठी आमदार व पालकमंत्र्यांनी एकमेकांना आव्हान दिल्याने पाटील स्वतः रणांगणात उतरतात का? अशी चर्चा मध्यंतरी होती. पण, त्याला युतीमुळे पूर्णविराम मिळाला आहे. पालकमंत्री पाटील यांनी राधानगरी मतदारसंघात ५५० कोटींच्या विकासकामांची उद्घाटने झाल्याचे सांगण्यात येते. मात्र ही उद्घाटने आपल्याला विश्वासात न घेता राजकीय स्टाइलने कार्यक्रम झाल्याने पालकमंत्र्यांवर हक्कभंग दाखल करणार असल्याचे आमदार आबिटकरांनी जाहीर केले.

पालकमंत्र्यांनी युवा नेते राहुल देसाई यांना पक्षात प्रवेश देऊन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांच्या उमेदवारीचा बारही भरला. अनेकदा आमदारांना शह देण्यासाठी ते देसाई यांना घेऊन कार्यक्रमास गेले. भाजपचे उमेदवार देसाईच असतील हे त्यांनी अनेकदा जाहीर केले. देसाई हे भाजपची उमेदवारी मिळणार या अपेक्षेने मतदारसंघात गाठीभेटी घेत आहेत. युतीमुळे त्यांची पंचाईत झाली आहे. युतीचा विचार केल्यास आबिटकर रिंगणात असतीलच. मात्र युती झाली तरीही हा मतदारसंघ भाजपकडे येईल आणि आपण निवडणूक लढवूच असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला आहे. माजी आमदार दिनकरराव जाधव हे गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत आबिटकर यांच्या पाठीशी उभे राहिले. आता त्यांचे पुत्र माजी उपसभापती सत्यजितराव जाधव यांनी विधानसभा लढवायची असा निर्धार करून संपर्क सुरू ठेवला आहे. पण आघाडी धर्मानुसार मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असल्याने कॉंग्रेसकडून इच्छूक असलेल्या गोकुळचे संचालक अरुण डोंगळे, सत्यजित जाधव यांची पंचाईत झाली आहे.

इच्छुकांचे आडाखे

माजी आमदार के. पी. पाटील गेल्या निवडणुकीतील पराभवाचे उट्टे काढण्याच्या प्रयत्नात आहेत. बिद्रीतील विजयाने या मतदारसंघाच्या राजकारणात 'केपीं' नी 'कमबॅक' केल्याचे बोलले जाते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील इच्छूक असून राष्ट्रवादीची उमेदवारी आपणास मिळणार असा त्यांचा दावा आहे. काही झाले तरी निवडणूक लढवायचीच अशी त्यांची भूमिका आहे. मध्यंतरी भाजपकडून त्यांचे नाव चर्चेत होते. राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य जीवन पाटील यांनी बिद्रीच्या पराभवानंतर विधानसभा लढविण्याचा निर्धार करून कामास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र क्रांती सेनेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी त्यांची भेट घेतली तर त्यांनी आयोजित कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना बोलाविल्याने त्यांची भूमिका स्पष्ट दिसत नाही. गोकुळचे संचालक अरुण डोंगळे यांची निवडणूक लढवायचीच म्हणून संपर्क वाढवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जाधव वाचनालयतर्फे रविवारी दंत चिकित्सा शिबिर

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राजारामपुरीतील महादेव जाधव वाचनालय व इंडियन डेंटल असोसिएशन, कोल्हापूर शाखेतर्फे रविवारी (ता. २४) मोफत दंत चिकित्सा व उपचार शिबिराचे आयोजन केले आहे. राजारामपुरीतील चौथ्या गल्लीतील महादेव जाधव वाचनालय, टाकाळा परिसर येथे सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत शिबिर होणार आहे. शिबिरात क्लिनिंग, सिमेंट फिलिंग, लहान मुलांसाठी सिलरपासून यंग सिनिअर्सपर्यंत कवळी बसविणे असे उपचार मोफत केले जाणार आहेत. यासाठी वाचनालयात नावनोंदणी सुरू आहे. संबंधित नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष व मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी समन्वयक विजय जाधव यांनी केले आहे. शिबिरात असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. आदित्य उपाध्ये, सचिव डॉ. आशुतोष देशपांडे, डॉ. शलाका शहा, डॉ. मैथिली आठल्ये, डॉ. सोनल शहा, डॉ. देवेंद्र पाटील, डॉ. दीपा जोशी आदी मार्गदर्शन करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजी स्टेडियमच्या सुविधांबाबत बैठक घेवू

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवाजी स्टेडियमची दयनीय अवस्था झाली आहे. खेळाडूंना कोणत्याही प्रकारच्या सुविधा दिल्या जात नाहीत. त्यामध्ये त्वरित लक्ष घालून मैदान सुसज्ज करावे, अन्यथा लोकशाही मार्गाने जनआंदोलन केले जाईल, असे निवेदन क्रीडाप्रेमी व खेळाडूतर्फे गुरूवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देण्यात आले. मैदानाची पाहणी करून सुविधांसंबंधी स्वतंत्र बैठकीचे आयोजन केले जाईल, असे आश्वासन निवेदन स्वीकारल्यानंतर जिल्हाधिकारी देसाई यांनी दिले.

निवेदनात म्हटले आहे, शिवाजी स्टेडियम खेळाऐवजी सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय पक्षांच्या सभा, पार्किंगसाठी दिले जाते. यासाठी काढण्यात आलेले खड्डे बुजवले जात नाहीत. यामुळे खेळाडूंना दुखापत होते. प्रचंड अस्वच्छता असते. क्रिकेटची धावपट्टी अस्तित्वात राहिलेली नाही. मैदानावर हिरवळही दिसत नाही. स्टेडियमवर पाणी मारले जात नाही. दक्षिण बाजूच्या संरक्षक भिंतीच्या काही भागाची पडझड झाली आहे. यातून आत प्रवेश करून काहीजण शौचविधी, लघवी करतात. मैदानातील जलतरण तलावाची अवस्थाही वाईट आहे. पाणी फिल्टर होत नाही, फरशा फुटल्या आहेत. स्वच्छतागृहाची पडझड झाली आहे. सरकारकडून खेलो इंडिया, सीएम चषकवर लाखो रूपये खर्च केले जातात. मात्र मैदानातील सुविधांसाठी निधी दिला जात नाही.

यावेळी माणिक मंडलिक म्हणाले, 'यापूर्वी शिवाजी स्टेडियमवर अनेक राष्ट्रीय, आतंरराष्ट्रीय स्पर्धा घेण्यात आल्या. सरकारच्या नियंत्रणाखाली हे मैदान आहे. त्याच्या देखभाल दुरूस्तीसाठी सरकारने निधी खर्च केला पाहिजे.' अशोक पोवार म्हणाले, 'शिवाजी स्टेडियम समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत. म्हणून त्यांनी लक्ष घालून दर्जेदार सुविधा द्याव्यात.'

--------

चौकट

पार्किंगचे पैसे जातात कुठे ?

'मैदानातील सुविधासंबंधी यापूर्वी अनेकवेळा क्रीडाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र त्यांनी दखल घेतली नाही. ते परस्पर पार्किंगसाठी मैदान देऊन तासाला एका वाहनधारकांकडून तीस रूपये घेतात. ते पैसे कुठे जातात', अशी विचारणा रमेश मोरे यांनी केली.

...

थांबा, आमचा कार्यक्रम आहे

शिष्टमंडळातील पदाधिकारी, कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीची प्रतीक्षा करीत बाहेर थांबले होते. त्याचवेळी आमदार राजेश क्षीरसागर जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आले. त्यांनी शिष्टमंडळातील सदस्यांना कशासाठी आला आहात, अशी विचारणा केली. शिवाजी स्टेडियम खेळाशिवाय इतर कारणासाठी देऊ नये, अशी मागणी करण्यासाठी आल्याचे सदस्यांनी सांगितले. त्यावर आमदार क्षीरसागर यांनी आमचा भगिनी महोत्सव तेथेच घेणार आहे, तोपर्यंत थांबा, असे म्हणताच एकच हशा पिकला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधानसभेला बंडाचे निशाण

0
0

जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघात बंडखोरी होण्याची शक्यता

Gurubal.Mali@timesgroup.com

gurubalmaliMT

कोल्हापूर

युतीची घोषणा आणि आघाडीची निश्चिती यामुळे विधानसभा लढण्यासाठी अनेकांना पक्षाचे चिन्ह मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. यामुळे रिंगणात उतरायचेच म्हणून तयारी केलेल्या इच्छुकांकडून बंडखोरीचे निशाण फडकवले जाण्याची चिन्हे आहेत. समरजीत घाटगे, सत्यजित कदम, गोपाळ पाटील, संजय घाटगे, अरूण डोंगळे यांच्यासह अनेकजण विधानसभेत जाण्यासाठी इच्छूक असल्याने ते मैदानापासून दूर राहण्याची शक्यता नाही. करवीर, इचलकरंजी व कोल्हापूर दक्षिण वगळता सात मतदारसंघांत बंडाचा झेंडा उभारला जाण्याचे संकेत मिळत आहेत.

चार वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना स्वतंत्रपणे लढली. भाजपची काही मतदारसंघांत ताकद नसल्याने या जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला बहाल करण्यात आल्या होत्या. सारेच स्वतंत्र लढल्याने सर्वच पक्षांना दहा जागा लढवण्याची संधी मिळाली. बहुतांशी इच्छुकांना रिंगणात उतरण्याची संधी मिळाल्याने बंडखोरीला लगाम बसला. यंदा मात्र ती परिस्थिती राहिली नाही. कारण भाजप व शिवसेनेची युती जाहीर झाली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी निश्चित आहे. यामुळे अनेकांना लढण्यासाठी पक्षाचा झेंडा मिळण्याची शक्यता मावळली आहे.

चार वर्षे तयारी केल्यानंतर अचानक पक्षाची उमेदवारी मिळणार नसल्याने अनेकांकडून बंडखोरी होणार हे निश्चित आहे. आघाडीच्या जागा वाटपानुसार काँग्रेसला कोल्हापूर दक्षिण, उत्तर, हातकणंगले, इचलकरंजी, करवीर,पन्हाळा शाहूवाडी तर राष्ट्रवादीला कागल, राधानगरी, चंदगड, शिरोळ हे मतदारसंघ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोल्हापूर उत्तर कुणालाही मिळाले तरी येथे बंडखोरी होणार आहे. माजी नगरसेवक सचिन चव्हाण, नगरसेवक सत्यजित कदम, दौलत देसाई यांनी मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. त्यामुळे ते थांबतील असे वाटत नाही. राधानगरीतून काहीही झाले तरी आपण लढणार, अशी घोषणा अरूण डोंगळे यांनी केली आहे. ही जागा राष्ट्रवादीला जाणार असल्याने बंडखोरी करण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय राहणार नाही. शिरोळची जागा देखील राष्ट्रवादीलाच मिळणार असल्याने गणपतराव पाटील बंडखोरीचे धाडस करणार का हे पहावे लागेल.

सेना सहा तर भाजपला चार जागा असा युतीचा फॉर्म्युला होण्याची चिन्हे आहेत. विद्यमान सहा आमदारांच्या जागा सेनेला मिळतील. त्यामुळे उमेदवारीसाठी भाजपचे 'कमळ' हातात घेतलेले राहुल देसाई, अनिल यादव हे बंडखोरी करण्याची शक्यता आहे. कागल मतदारसंघ भाजपला दिल्यास संजय घाटगे आणि सेनेला दिल्यास समरजीत घाटगे नवीन चिन्ह घेऊन मैदानात उतरतील अशी चर्चा आतापासून सुरू आहे. चंदगडमध्ये अप्पी पाटील, गोपाळ पाटील, रमेश रेडेकर हे देखील पक्ष न मिळाल्यास नवीन संधी शोधतील. दोन्ही काँग्रेस आघाडीत स्वाभिमानी सहभागी झाल्यास अनिल मादनाईक, प्रा. जालिंदर पाटील हे विधानसभेच्या मैदानापासून दूर राहणे कठीण आहे. यामुळे शिरोळमध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर, मादनाईक की गणपतराव पाटील बंडखोरी करणार हे जागा वाटपानंतरच कळेल. करवीर, इचलकरंजी व कोल्हापूर दक्षिण येथे मात्र बंडखोरी होईल असे वाटत नाही. पण जिल्ह्यातील किमान सहा ते सात मतदारसंघांत बंडखोरी होणार असल्याचे संकेत आतापासूनच मिळत आहेत. त्याचा फटका बसू नये यासाठी चारही प्रमुख पक्षांनी आतापासून फिल्डींग लावण्यास सुरूवात केली आहे.

...

चौकट

विनय कोरे काय करणार ?

जनसुराज्य शक्ती पक्ष सध्या महाआघाडीत आहे. सेना आघाडीत येण्यापूर्वी जनसुराज्यला जिल्ह्यातील दोन जागा देण्याचा शब्द देण्यात आला होता. पन्हाळा शाहूवाडी व हातकणंगले या दोन जागा हा पक्ष भाजपच्या मदतीने लढण्याची शक्यता होती. पण आता सेनेच्या प्रवेशाने भाजपची कोंडी झाली आहे. या दोन्ही मतदारसंघात सेनेचे आमदार असल्याने आणि या जागा त्यांनाच मिळणार असल्याने जनसुराज्यला बंडखोरी करण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. मध्यम मार्ग म्हणून माजी आमदार विनय कोरे काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय स्वीकारणार का हे सहा महिन्यानंतरच कळणार आहे.

...

चौकट

यांची बंडखोरी शक्य

कोल्हापूर उत्तर सत्यजित कदम, सचिन चव्हाण, दौलत देसाई

चंदगड गोपाळ पाटील, रमेश रेडेकर, संग्राम कुपेकर, राजेश पाटील

कागल संजय घाटगे, समरजीत घाटगे

शिरोळ अनिल यादव, अनिल मादनाईक, गणपतराव पाटील

हातकणंगले राजू आवळे

राधानगरी अरूण डोंगळे, राहुल देसाई, जीवन पाटील, प्रा. जालिंदर पाटील

शाहूवाडी पन्हाळा विनय कोरे, करणसिंह गायकवाड, मानसिंग गायकवाड,

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बारावीच्या परीक्षेला प्रारंभ

0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या परीक्षेला गुरुवारपासून सुरूवात झाली. पहिलाच पेपर इंग्रजीचा असल्याने शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागाच्या भरारी पथकांनी विविध केंद्रांना भेटी दिल्या. प्रत्येक केंद्रावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

शहरातील गोविंदराव हायस्कूल, गंगामाई गर्ल्स हायस्कूल, व्यंकटराव हायस्कूल, कन्या महाविद्यालय, बालाजी विद्यालय, तात्यासाहेब मुसळे हायस्कूल, डीकेटीई कलावंत मळा, डॉ. बापूजी साळुंखे हायस्कूल आदी सर्वच परीक्षा केंद्रे दहा वाजल्यापासून विद्यार्थी, पालकांच्या गर्दीने फुलून गेली होती. विविध राजकीय पक्षांनी परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींने फुले देऊन त्यांचे स्वागत करीत शुभेच्छा दिल्या. परीक्षा केंद्रावर विद्यार्थी-विद्यार्थिनींना ओळखपत्र पाहूनच प्रवेश देण्यात येत होता. विविध पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधींनी महाविद्यालयांच्या परिसरात, महत्त्वाच्या चौकांमध्ये शुभेच्छांचे फलक लावले आहेत. सोशल मीडियावरही परीक्षेचे वेळापत्रक, परीक्षा कालावधीमध्ये घ्यावयाची दक्षता आदींबाबतचे संदेश पाठविण्यात येत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युतीचा फायदा शिवसेनेलाच

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर वगळता इतर पाच लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची विजयापर्यंत धडक मारण्याची ताकद नाही. पण, या भागात वाढलेल्या भाजपच्या ताकदीचा उपयोग सेनेला होणार असल्याने युतीचा फायदा याच पक्षाला जादा होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर व हातकणंगले या दोनच मतदारसंघात धनुष्यबाणाच्या चिन्हावर उमेदवार रिंगणात उतरणार असून उर्वरित चार मतदार संघात पाठिंबा देण्याचे काम करावे लागणार आहे.

साडे चार वर्षापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट होती. या लाटेत सांगली, सोलापूरात भाजपचा झेंडा फडकला. माढा व कोल्हापूर मतदार संघातील विजय थोड्या मताने हुकला. हातकणंगलेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय महायुतीमुळे आणखी सुकर झाला. फक्त सातारा मतदार संघात युतीचा फारसा उपयोग झाला नाही. या पार्श्वभूमीवर पाच वर्षांत या भागात भाजपची ताकद वाढली आहे. तरीही लाट नसल्याने या निवडणुकीत त्यांना विजयासाठी कडवी झुंज द्यावी लागणार आहे.
भाजपचे खासदार संजय पाटील-सांगली, शरद बनसोडे-सोलापूर व सहकारमंत्री सुभाष देशमुख-माढा यांची उमेदवारी जवळपास नक्की आहे. सेनेच्यावतीने प्रा. संजय मंडलिक कोल्हापुरातून तर धैर्यशील माने हातकणंगले मतदारसंघातून मैदानात उतरणार आहेत. बदललेल्या वातावरणामुळे दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना युती हवी होती. त्यांची इच्छा पूर्ण झाल्याने उमेदवारांना ताकद मिळणार आहे. जिल्ह्यात वाढलेल्या भाजपच्या ताकदीचा उपयोग सेनेला होणार आहे. कारण राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक आणि खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात लढण्याचे आव्हान सेनेपुढे आहे. भाजपमुळे ते आव्हान पेलण्यास मदत होणार आहे.

सोलापूर, सांगली आणि माढा या तीनही मतदारसंघात शिवसेनेची म्हणावी तेवढी ताकद नाही. तरीही सध्या जी परिस्थिती आहे ती पाहता सेनेची जी काही मते आहेत त्याचीही भाजपला गरज आहे. सातारा मतदारसंघातून खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात लढणे सेना आणि भाजप या दोन्ही पक्षासमोर मोठे आव्हान आहे. त्यामुळे ही जागा रिपाइंला देण्यात आली. यावेळीही ही चाल पुढे ठेवण्यात येणार असल्याचे समजते.

पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघ
भाजप : सांगली, सोलापूर, माढा
शिवसेना : कोल्हापूर, हातकणंगले
रिपाइं आठवले गट : सातारा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...नाहीतर आम्ही पडलोच नसतोः नारायण राणे

0
0

पंढरपूरः

चांगली कामे करून निवडून येता येते, यावर आता विश्वास राहिलेला नाही. तसं असतं, तर आयुष्यभर लोकांची कामे करणारे मी आणि सुशीलकुमार शिंदे निवडणुकीत कधी पराभूत झालो नसतो, अशी खंत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केली. पंढरपूर तालुक्यातील वाडीकुरोली येथील कै. वसंतदादा काळे अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात राणे बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. काँग्रेसचे दोन माजी मुख्यमंत्री मेळाव्याला उपस्थित असताना शेतकरीवर्गाने मात्र या मेळाव्याकडे पाठ फिरवल्याचे रिकाम्या खुर्च्यांवरून दिसत आले.

सध्या सुरू असलेल्या राजकीय एकटेपणामुळे डरकाळ्या फोडणाऱ्या वाघाची शेळी बनल्याचे चित्र राणे यांच्या भाषणातून जाणवत होते. आजवर ६ वेळा निवडून आलो सातव्यांदा उभा राहिलो आणि राज्यभर प्रचारासाठी फिरत राहिलो. निवडणूक निकालांनंतर पराभव झाल्याचं चित्र स्पष्ट झालं होतं. कामे करून निवडून येता येते, यावर आपला विश्वास राहिला नसल्याचे राणे यांनी सांगितले.

आयोजक काँग्रेस पक्षाचे असल्याने राणे आता सेना-भाजप युतीनंतर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, राणे यांनी दुष्काळी प्रश्नावर मुख्यमंत्र्यांना भेटून मदत देण्याचे आश्वासन दिल्याने अजूनही राणे हे भाजपच्याच प्रेमात असल्याचे दिसून आले.

स्वाभिमानी पक्षाच्यावतीने कोणाशीही आघाडी न करता आम्ही निवडणूक लढविणार असून, अजून किती जागा लढवायच्या याबाबत निर्णय झाला नसल्याचे नारायण राणे यांनी सांगितले . मात्र युती होणार नाही, या भरवश्यावर भाजप जवळ गेलेल्या नारायण राणे यांना या युतीमुळे चांगलाच झटका बसला असून, युती करणार नाही म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी लाचारी का केली, याचेच उत्तर मिळत नसल्याचे नारायण राणे यांनी सांगितले.

अजून आपली सोलापूर लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली नसल्याचे सांगत शेजारच्या मतदारसंघात उमेदवार जाहीर झाली. कारण त्यांच्या पक्षाचे ते मालकच आहेत, अशा शब्दांत शिंदे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. या निवडणुकीत नरेंद्र मोदी जिंकले तर मात्र, ही देशातील शेवटची निवडणूक असेल, असे सांगताना हुकूमशहा मोदी यांची वाटचाल त्याच दिशेने सुरू असल्याचे सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले.

या मेळाव्यात त्यांचेच पूर्वाश्रमीचे कार्यकर्ते आणि सध्याचे युतीकडे असलेले सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी भाषणातून सुशीलकुमार शिंदे यांचेवर जोरदार टोलेबाजी केली. आपण गेल्यावेळी वीजबिलमाफीची घोषणा करून विजय मिळविला आणि महिन्यानंतर पुन्हा बिले यायला सुरुवात झाली असा टोमणा त्यांनी लगावला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नेते फक्त विरोधात आल्यावरच बोलतात, सत्तेवर असताना त्यांना या गोष्टींसाठी वेळच नसतो, अशा पद्धतीने शहाजी पाटील यांनी केलेल्या टोलेबाजीला शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘चाटे’कडून शहिदांच्या मुलांना मोफत शिक्षण

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चाटे शिक्षण समूहाच्या वतीने शहीद जवानांच्या मुलांना पाचवी ते बारावीपर्यंत मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील शहीद जवानांच्या मुलांसाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाले. स्वत:च्या प्राणाची बाजी लावून यापूर्वी भारतीय जवानांनी देशाचे संरक्षण केले आहे. त्यांचे बलिदान मनाला चटका लावून जाणारे आहे. अहोरात्र देशसेवेत समर्पण देणाऱ्या आणि दहशतवाद्यांबरोबर लढताना शहीद झालेल्या जवानांच्या मुलांना पाचवी ते बारावीपर्यंत चाटे शिक्षण समूहाच्या वतीने मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. शहीद जवानांच्या कुटुंबीयांनी समूहाच्या कोल्हापूर विभागातील जवळच्या शाखेवर सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत संपर्क साधून माहिती घ्यावी, असे आवाहन चाटे समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.

या उपक्रमाबद्दल प्रा. डॉ. भारत खराटे म्हणाले, 'देशाच्या सीमेवर उत्तुंग देशप्रेमाने प्रेरित होऊन प्राणाची आहुती देणाऱ्या या जवानांच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या दु:खात भारतीय नागरिक म्हणून आम्ही सहभागी आहोत. भ्याड हल्ला करणाऱ्या अशा प्रवृत्तींचा तीव्र शब्दांत निषेध करून जवानांच्या कार्यकर्तृत्वाला आणि देशप्रेमाला सलाम करतो.'

००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुळाचे सौदे आजपासून सुरु होणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हंगाम संपण्यास अवघे आठ ते पंधरा दिवस शिल्लक असताना शेतकऱ्यांच्या गुळाला योग्य भाव मिळावा, यासाठी माथाडी कामगारांनी सहकार्य करावे, अशी विनंती केल्यानंतर त्यांनी काम बंद आंदोलन मागे घेतले. त्यामुळे शनिवारी (ता. २३) गुळाचे सौदे सुरु होतील, असे शेती उत्पन्न बाजार समितीने जाहीर केले.

जादा काम करण्याच्या कारणावरुन गेले दोन ते तीन दिवस व्यापारी व माथाडी कामगारांच्यात वाद धुमसत होता. गुरुवारी (ता. २१) अचानक माथाडी कामगारांनी चार दुकानात गुळाचे रवे उचलण्याचे काम न केल्याने व्यापारी व कामगारांच्यात वादावादी झाल्याने गुळाचे सौदे बंद पडले. बाजार समितीने हस्तक्षेप करुनही माथाडी कामगारांनी काम करण्यास नकार दिला. शुक्रवारी सकाळी गुळाचे सौदे झाले नाहीत. त्यामुळे ४० ते ५० हजार रवे सौद्याविना पडून होते. अखेर बाजार समितीचे अध्यक्ष बाबासो लाड यांनी व्यापारी व माथाडी कामगारांची बैठक घेतली. त्यामध्ये संचालकांनी माथाडी कामगारांनी जादा वेळ काम करावे, अशी विनंती केली. नियमानुसार काम केल्यास शेतकऱ्यांचे नुकसान होते याकडे लक्ष वेधले. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी एक तास जादा काम करावे, अशी विनंती केल्यावर माथाडी कामगारांनी काम करण्याची तयारी दर्शवली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोमवारी अर्थसंकल्प स्थायीकडे सादर होणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शहरवासियांचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर महापालिकेचा २०१९-२० चा अर्थसंकल्प सोमवारी (ता.२५) प्रशासन स्थायी समितीकडे सादर करणार आहे. अर्थसंकल्पामध्ये कोणतीही करवाढ नसली, तरी शहराच्या कोणत्या विकासात्मक योजनांचा समावेश आहे, याची उत्सुकता शहरवासियांना असेल.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता केंव्हाही लागण्याची शक्यता असल्याने अर्थसंकल्प तयार करण्याची लगबग महापालिकेत गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू आहे. विशेषत: महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी करवाढीच्या प्रस्तावांचा समावेश होण्याची अटकळ होती. पण करवाढीस सभागृहाने मान्यता न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोमवारी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे शहवासियांचे लक्ष असेल. स्थायी समितीला अर्थसंकल्प प्राप्त झाल्यानंतर त्यावर काही सूचना करुन नंतर तो सभागृहात सादर केला जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कायदेशीर सल्ल्यानंतर ‘दौलत’ भाड्याने देणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कायदेशीर सल्ला घेऊन निविदाधारकांसोबत प्रत्यक्ष चर्चा करून दौलत सहकारी साखर कारखाना भाड्याने देण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. अथर्व प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर या कंपनीने कारखाना भाड्याने चालविण्यास घेण्याबाबत पत्र दिले आहे.

न्यूट्रियंट कंपनीने कराराचे पालन न केल्याने बँकेने यापूर्वीच त्यांच्यासोबत दौलतचा करार रद्द केला आहे. त्यानंतर बँकेने कारखाना भाड्याने चालविण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली होती. त्यानंतर अथर्व कंपनी आणि चंदगड तालुका खरेदी-विक्री संघाने निविदा दिल्या आहेत. अथर्व कंपनीने कारखाना चालविण्याची तयारी दर्शवली असून त्यासाठी बँकेला पत्र दिले आहे. या पत्रावर संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली.

दौलतवर बँकेचे ६७ कोटी २७ लाख रुपयांचे कर्ज असून कराराप्रमाणे २५ टक्के रक्कम ३१ मार्चपर्यंत, तर शिल्लक २५ टक्के रक्कम ३० सप्टेंबरपर्यंत भरण्याची मुदत आहे. उर्वरित ५० टक्के रक्कम व व्याज समान पाच हप्त्यांमध्ये तसेच प्रत्येक वर्षी त्या रकमेची बँक गॅरंटी देण्याच्या अटीस अधीन राहून कंपनी कारखाना चालविण्यास तयार आहे. कंपनी कारखान्याचे संचालक मंडळ, शेतकरी, सभासद, कामगारांबरोबर बैठक घेणार आहे. तसेच एफआरपी, कामगारांना महिन्याला पगार देण्याची तयारी दर्शवली आहे. कारखान्याची आर्थिक स्थिती भक्कम असून ३९ वर्षे कारखाना सुरळीत चालविण्याची तयार दर्शवली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुले रुग्णालयाच्या नूतन इमारतीचा आज उद्घाटन

0
0

कोल्हापूर

सावित्रीबाई फुले रुग्णालय इमारतीचे नुतनीकरण, महात्मा फुले जन आरोग्य योजना व मेडा मार्फत बसवण्यात आलेल्या सौर ऊर्जेवरील विद्युत उपक्रमाचे उद्घाटन शनिवारी (ता.२३) सकाळी दहा वाजता होणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून अध्यक्षस्थान महापौर सरिता मोरे भूषवणार आहेत. सावित्रीबाई फुले रुग्णालय इमारतीचे नुकतेच नुतनीकरण केले आहे. पायाभूत सुविधांसह अद्ययावत आयसीयू युनिटमुळे रुग्णालयाचा महात्मा फुले जन आरोग्य योजनेत समावेश झाला आहे. त्याचा फायदा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images