Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

मनपाच सोयीचे राजकारण

$
0
0

महापालिका लोगो

कोल्हापूर टाइम्स टीम

शहराला पायाभूत सुविधा देण्याबरोबरच अर्थसंकल्पातून महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी सभागृहाचा वापर व्हावा, अशी सर्वसामान्य शहरवासियांना अपेक्षा. मात्र या अपेक्षांना तिलांजली देत राजकीय हेवेदावे आणि नेत्यांवरील निष्ठा दाखवण्यासाठी नगरसेवक महापालिकेच्या सभागृहाचा वापर अलिकडे केला जात आहे. हेच सत्तारुढ आणि विरोधी गट अर्थपूर्ण घडामोडींसाठी एकत्र येत आहेत. या सोईच्या राजकारणाचा फटका शहराच्या विकासावर होत असल्याचे पुन्हा एकदा मंगळवारच्या सभेवरून स्पष्ट झाले.

महापालिकेची सर्वसाधारण सभेत शहराच्या विकासाचे मुद्दे चर्चिले जावेत, महत्त्वाचे निर्णय घेतले जावेत अशी अपेक्षा असते. सभेत होणाऱ्या चर्चांमध्ये अनेक नगरसेवक हिरिरीने सहभागी होऊन अनेक प्रश्नांची उकल करतातही. त्याचे परिणामही नंतर शहरात दिसून आले. पण गेल्या काही वर्षांत व्यक्तीकेंद्रीत राजकारण आणि नेत्यांवरील निष्ठा दाखवण्यासाठी सभागृहाचा वापर होऊ लागला. प्रशासनाने विकासाचा प्रस्ताव तयार करावा आणि त्यावर पदाधिकाऱ्यांनी चर्चा करून जादाच्या उपाययोजना व्हावी असा जरी हेतू असला, तरी या हेतूला हरताळ फासला जात आहे. त्यामुळेच असलेली, नसलेली प्रतिष्ठा जपण्याचे एक ठिकाणच सभागृह बनत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील यांच्यावरील निष्ठा दाखवण्यासाठी सभागृहाचा वापर केला जात आहे. या नेत्यांवर शेरेबाजी झाली की सभागृहात गोंधळ घातला जात आहे. गोंधळ झाला की सभा गुंडाळायची नंतर पत्रकार बैठक घेऊन एकमेंकावर तोंडसुख घ्यायचे हा पायंडा पडला आहे. शहर विकासाच्या किती जणांनी आणि कितीवेळा योजना मांडल्या, त्या योजनांच्या निधीसाठी किती पाठपुरावा झाला, अशा योजना किती पूर्णत्वाकडे गेल्या हा एक संशोधनाचाच विषय होईल.

यापूर्वी सभेच्या आदल्या दिवसी पार्टी मिटिंग घेतली जात होती. पण गेल्या काही वर्षांत सभेदिवशी मिटिंग घेण्याचा पायंडा पडला आहे. विकास योजना मांडण्याऐवजी एखाद्या प्रस्ताव कसा प्रलंबित ठेवायचा याची रणनीती मिटिंगमध्ये ठरवली जाते. 'अर्थ' असेल तर प्रस्तावाला मंजुरी नाही तर सभा गुंडळायची असे जणू समीकरण बनले असताना त्याला आता आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीची किनार दिसू लागली आहे. त्यातूनच थेट पाइपलाइन, टोल आणि राज्य सरकारच्या साडेचार वर्षातील कारभाराची टर उडवली जाऊ लागली आहे. निवडणुकीच्या धुरळ्यामध्ये हे मुद्दे आणखी प्रकर्षाने मांडली जातील. त्यातून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतील, पण सर्वसामान्यांच्या सुविधांचे आणि शहराचे विकासाचे काय? या प्रश्नाचे उत्तर मात्र कोणाकडेच नाही.

'अर्थपूर्ण' घडामोडीसाठी एकत्र कसे?

भूमिगत विद्युत वाहिनीच्या प्रस्ताव तीन महासभेत पुढील मिटिंगसाठी ठेवण्यात आला. विरोधी गटाचा प्रस्ताव असल्याने अडवणुकीचे धोरण असल्याची चर्चा असताना १६ ऑक्टोबरच्या महासभेत प्रस्तावाला मंजुरी मिळाली. त्यावेळी सभा सुरू होण्यास तब्बल दीड तास उशीर झाला होता. अर्थपूर्ण व्यवहारासाठी सभेला उशीर झाल्याची उघड चर्चा होती. अशा घटनांसाठी एकत्र येणारे नगरसेवक नेत्यांच्या प्रतिष्ठेसाठी सर्वस्व पणाला का लावतात? अशी चर्चा मंगळवारच्या सभेवरून शहरात होत आहे. असेच अर्थपूर्ण घडामोडीत असलेले 'सेवक' विरोधातील वृत्ताची मात्र खुलेआम विचारणा करतात. अशांना आपण शहराचे सेवक असल्याचे भानही त्यावेळी राहत नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मॉरिशसची पूर्वशा मराठीच्या प्रेमात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मराठी विषयाची शिक्षिका होण्याचे स्वप्न. त्यातून ती बालपणापासून मराठीच्या प्रेमात पडली. बारावीच्या परीक्षेत तिने मराठीत देशपातळीवर प्रथम क्रमांक मिळवला. त्यामुळे मॉरिशस सरकारने तिला महाराष्ट्रात तीन वर्षे मराठी शिकण्यासाठी शिष्यवृत्ती मंजूर केली. महावीर महाविद्यालयात ती वर्षभरापासून बी. ए.च्या पहिल्या वर्षात शिकत आहे. ती आता मराठी बोलते, लिहिते आणि भाषणही करू शकते. पूर्वशा सांतराम सखू असे तिचे नाव.

पूर्वशाचे पूर्वज साताऱ्याचे. इंग्रज राजवटीत ते मॉरिशसमधील ब्लॅकरिव्हर शहरात स्थलांतरीत झाले. तिचे वडील हॉटेल मॅनेजर आहेत. आई शांताबाई गृहिणी आहेत. मॉरिशसमध्ये महाराष्ट्रातून गेलेली अनेक कुटुंबे मराठीतच बोलतात. त्यातून पूर्वशाला मराठीची गोडी लागली. पहिलीपासून पर्यायी विषयात तिने मराठीची निवड केली. ती लिहायला शिकली. पूर्वशाची मातृभाषा क्रेओल. शिक्षण इंग्रजीत. घरी कोणीही मराठी बोलत नाही. परिणामी तिला मराठी बोलता येत नव्हते. तरीही तिने मन लावून अभ्यास केल्याने बारावीच्या परीक्षेत तिने देशपातळीवर मराठी विषयात प्रथम क्रमांक मिळवला. तिची मराठीबद्दलची ओढ वाढली. मॉरिशसमध्ये शाळा, कॉलेज, महाविद्यालयांत नोकरीच्या संधी असल्याने तिने मराठी विषयातील पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. आणि तिला तीन वर्षांसाठीची शिष्यवृत्ती सरकारने मंजूर केली.

पूर्वशा जून २०१७ मध्ये शिक्षक होमराजन यांच्यासोबत पहिल्यांदाच मुंबईत आली. मुंबई विमानतळावर उतरल्यावर ती गोंधळली. परत मॉरिशसला परत जावे असे तिला क्षणभर वाटले. पण कोणत्याही परिस्थितीत मराठी शिकावे ही इच्छा तीव्र असल्याने तिने शिकायचेच हे ध्येय ठरवले. कोल्हापुरात आल्यावर तिने पहिल्यांदा शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख डॉ. राजन गवस यांची भेट घेतली. त्यांनी डॉ. गोमटेश्वर पाटील यांच्याशी संपर्क साधून तिला महावीर महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिला. ती वसतीगृहात राहून बीए भाग एकमध्ये शिकत आहे.

मॉरिशसमध्ये सर्व जातीधर्माचे लोक आहेत. शिक्षण, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, आरोग्य सेवा मोफत आहेत. मराठी भाषिकही मोठ्या संख्येने आहेत. शिवजयंती, गणेशोत्सव, गुढीपाडवा असे भारतीय सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. त्यामुळे येथील संस्कृतीशी लवकर जुळवून घेता आले. महाविद्यालयातील प्राचार्य व इतर शिक्षकांनी मदत केली. चांगल्या मैत्रिणी भेटल्या. त्यामुळे महिन्यात मराठी बोलायला शिकले. एम. ए. पर्यंतचे मराठी शिक्षण घेतल्यास माझ्या देशात सरकारी नोकरी मिळू शकते. त्यासाठी प्रयत्न करणार आहे.
- पूर्वशा सखू

पूर्वशा महाविद्यालयातील मैत्रिणींसोबत रमली आहे. ती हुशार आहे. इंग्रजीसह मराठीही चांगल्या प्रकारे बोलते. केवळ मराठी शिकण्यासाठी देश सोडून ती एकटीच येथे आली आहे. वसतीगृहात राहून धडे गिरवत आहे. तिने मैत्रिणींसोबत दिवाळी साजरी केली.
- डॉ. आर. पी. लोखंडे, प्राचार्य

मॉरिशसमध्ये मराठीसाठी संधी
‘महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांत इंग्रजी विषयाची क्रेझ वाढते आहे. इंग्रजीमुळे नोकऱ्यांच्या संधी अधिक मिळतात, असा पालकांत समज आहे. याउलट पूर्वशा मराठी शिकल्याने मॉरिशसमध्ये नोकरीच्या संधी अधिक आहेत, असे सांगते. त्यामुळेच ती सातासमुद्रपार करून कोल्हापुरात मराठी शिकण्यासाठी आली आहे. नियमित अभ्यासक्रमासह डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्यासह नामवंत साहित्यिकांची पुस्तके वाचते,’ असे ती मोठ्या अभिमानाने सांगते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बांधावर अभ्यास करून गुरुजी बनला उपजिल्हाधिकारी

$
0
0

पंढरपूर (सुनील दिवाण)

स्पर्धा परीक्षा हे अलीकडच्या काळातील विद्यार्थ्यांचे स्वप्न बनत असून यासाठी अनेक वर्षे हि मुले पुणे, मुंबई, दिल्ली अशा मोठ्या शहरात राहून या परीक्षांची तयारी करतात. यासाठी भक्कम फी असलेल्या नामांकित क्लासेसमध्ये प्रवेश घेत आपले नशीब अजमवतात. काल आलेल्या राज्य स्पर्धा परीक्षेच्या निकालात एका गुरुजीने नोकरी सांभाळत शेताच्या बांधावर अभ्यास करून राज्यात पहिला येण्याचा चमत्कार करून दाखवला आहे.

महेश जमदाडे हा पंढरपूर तालुक्यातील जैनवाडी गावच्या एका छोट्याशा शेतकरी कुटुंबातील तरुण. परिस्थितीमुळे बारावीनंतर डीएड करून रयतेच्या शाळेवर नोकरीला लागला. मुलांना शिकवताना त्याला शिक्षणाची आवड शांत बसू देत नव्हती आणि यातूनच त्याने मुक्त विद्यापीठातून बीएची पदवी घेतली. गेल्यावर्षी त्याची दहिवडी वरून गावाजवळील भाळवणी येथील शाळेवर बदली झाली आणि त्याला आपण स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करावी असा विचार मनात आला. आणि त्या दृष्टीनं त्यानं प्रयत्नही सुरू केले. एका वर्षात दोन परीक्षांत तो पासही झाला आणि त्याची निवड देखील झाली.

दिवसभर शाळेत शिकवून घरी आल्यानंतर रात्री तो अभ्यासाला बसत असे. स्पर्धा परीक्षांसाठी खूप पुस्तकांचा अभ्यास लागतो यावर मात्र त्याचा विश्वास नव्हता आणि म्हणूनच मोजक्याच पुस्तकांचा व्यवस्थित अभ्यास करुन जुन्या प्रश्नपत्रिका सोडवण्यावर महेशने भर दिला. मुख्य परीक्षेसाठी शाळेतून एक महिना रजा घेऊन त्याने या काळात भरपूर अभ्यास केला. महेशचे कुटुंब त्याचा पगार आणि दोन एकर शेतातून येणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून आहे. त्यामुळे आई वडील दिवसभर शेतात काम करीत तर त्याचा लहान भाऊ शेतातच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत असे. महेशचे घर शेतातच असल्याने त्यानेही लहान भावाप्रमाणे शेताच्या बांधावर बसून अभ्यास केला. यावेळी त्याची सव्वा वर्षाची मुलगी हेच त्याचा विरंगुळा होता. या परीक्षेसाठी त्याला ना कोणती शिकवणी होती ना कोणाचे मार्गदर्शन मात्र आपल्या पास झालेल्या मित्रांशी बोलून त्याने सर्व तयारी केली आणि तो इतर मागास प्रवर्गातून राज्यात पहिला आला तर ओपन मधून दुसरा. महेशच्या यशाने मुलाने पांग फेडल्याची भावना त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. शाळेतही महेशचे कौतुक होत असून सलग तीन परीक्षा पास झालेला महेश आजही शाळेत मुलांना शिकवण्यात तेवढाच रममाण होत असतो. स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या मुलांनी कोणते क्लास लावले आणि किती पुस्तके वापरली यापेक्षा जो अभ्यास कराल तो मन लावून करा आणि जुन्या प्रश्नपत्रिकांवर भर द्या असा सल्ला महेशनं दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महसूल’मध्ये फोफावली लाचखोरी

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

जिल्ह्यात वर्षभरात कागलचे तत्कालीन तहसीलदार किशोर घाडगे यांच्यासह १३ तलाठ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच घेताना रंगेहात मिळाले. आठवड्यात दोघेजण जाळ्यात सापडले. लाच घेण्यात महसूल विभागाने इतर सर्व सरकारी विभागास मागे टाकले. यामुळे दिवसेंदिवस महसूल प्रशासनात लाचखोरी फोफावत असल्याचे पुढे आले. ही लाचखोरी थांबवून शेतकरी, सामान्यांना दिलासा देण्याचे मोठे आव्हान नूतन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासमोर आहे.

पन्हाळा तालुक्यातील कणेरीतील तलाठी शिवाजी कोळी, खासगी उमेदवार सुशांत लव्हटे याला पाच हजारांची लाच घेताना बुधवारी अटक करण्यात आली. ३१ जानेवारी, २०१९ मध्ये शाहूवाडी तालुक्यातील तलाठी विनोद कांबळे यालाही पाच हजारांची लाच घेताना पकडण्यात आले. परिणामी लाचेत तलाठ्यांनी आघाडी घेतल्याचे चव्हाट्यावर आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह शाखेतील डेप्युटी चिटणीस प्रदीप कदम, नैसर्गिक आपत्ती विभागातील लिपीक अमर सुतार पैसे घेताना जाळ्यात अडकले. यावरून गाव चावडी, तहसीलदार, प्रांत आणि जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत लाचखोरीची लागण झाल्याचे स्पष्ट होते. गडहिंग्लज तालुक्यातील जरळी येथील तलाठी भीमराव मगदूम मागील वर्षी लाच घेताना मिळाले. निलंबित कालावधी संपल्यानंतर ते पुन्हा कामावर रूजू झाले. मात्र, त्यांनी लाच घेण्याचा प्रकार थांबवला नाही. दुसऱ्यांदा ते लाच घेताना सापडले. यांच्या उदाहरणावरून पैशांसाठी काहीही करण्याची प्रवृत्ती कशी रूढ झाली आहे, हेही अधोरेखित होते आहे.

बँकेतील कर्ज, विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी सातबारा, आठ अ मागण्यासाठी खातेदार शेतकरी गेल्यानंतर तलाठी खुलेआम प्रत्येक उताऱ्यास मनमानी पद्धतीने पैसे उकळले जाते. इतर महसूली कामांसाठी शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत विविध अडचणींची भीती दाखवत महसूल मंडल अधिकाऱ्यासह (सर्कल) इतर महसूल कर्मचारी पैसे गोळा करीत असल्याच्या तक्रारी आहेत. पैसे घेतल्याची तक्रार वरिष्ठांकडे केल्यानंतर त्वरित न्याय मिळत नाही. पाठपुरावा करण्यासाठी हेलपाटे मारायला लावले जाते. नेहमी चार आकड्यांवर डल्ला मारण्याची सवय असलेले अधिकारी उताऱ्यांसाठी पैसे मागितल्याची तक्रार केल्यानंतर 'इतक्या कमी पैशाची चौकशी करायची का?' असा कुत्सित प्रश्न करून तक्रारदाराला अपमानित करीत असल्याचा आरोप होत आहेत. यामुळे लाचखोरीला वरिष्ठांचे अभय आहे, का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

१९ जण महसूल विभागाचे

सन २०१८ ते फेब्रुवारी २०१९ अखेर पर्यंत विविध सरकारी विभागाचे ४५ जण लाच घेताना सापडले. पैसे घेतात मात्र तक्रार नसल्याने न सापडल्यांची संख्या मोठी आहे. महसूल प्रशासनातील २१ जण, त्यापाठोपाठ पोलिस विभागातील १३ जण वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे घेताना मिळाले. लाचखोर तलाठ्यांनी कमीशनवर नियुक्त केलेल्या पाच खासगी एंजटही सापळ्यावेळी मिळाले. त्यांनाही कारागृहात जावे लागले.

पहिल्यांदाच तहसीलदारही

वर्ग दोनच्या जमिनीचा व्यवहार करण्यासाठी व इतर कारणांसाठी परवानगी देताना तहसीलदारांचा ऑनलाईन थंब आवश्यक असतो. त्यासाठी लाच स्वीकारताना कागलचे तहसीलदार किशोर घाडगे, तलाठी शमशहाद मुल्ला, तलाठी मनोज भोजे यांना पकडण्यात आले. इतरवेळी बडे मासे नामानिराळे राहतात. मात्र पहिल्यांदाच तहसीलदार घाडगे सापडल्याने लाचखोरीचे कनेक्शन वरिष्ठापर्यंत असल्याला दुजोरा मिळाला.

लाच देण्यास नकार दिल्यास

लाच देण्यास नकार दिल्यास जबरदस्तीने ध्वजनिधीच्या नावाखाली पैसे घेतले जातात. तेही देण्यास नकार दिल्यास जाणीवपूर्वक हेलपाटे मारायला लावले जाते. सर्व्हर डाऊन आहे, मिटिंग आहे, वेळ नाही, अशी कारणे सांगून काम करण्याचे टाळले जाते.

महत्त्वाच्या कामासाठी द्यावी लागणारी लाच

सातबारा आठ, अ उतारा : ५० ते ३०० रूपये

कर्जाचा बोजा नोंद करणे, कमी करणे : ५०० ते १० हजार

विविध प्रकारचे दाखले देणे : १५० ते ५०० रूपये

वारसा नोंदीसाठी : ५००० ते २५ हजार

खरेदी केलेली जमीन नावावर लावणे : १० हजार ते ५० हजार

जातीचा दाखला देणे : ५०० ते ५० हजार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीज चोरीप्रकरणी गुन्हा

$
0
0

कोल्हापूर: एमआयडीसी शिरोली येथे विद्युत मीटरला असलेली इनकमिंगची लीड शील बेकायदेशीररित्या तोडून वीज चोरी करणाऱ्या राजन निकम यांच्या विरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यांचे निकम सेंन्टर्ड प्रॉडक्ट या नावाचे फर्म असून त्या ठिकाणी वीज चोरी होत असल्याच्या तक्रारी होत्या. मंगळवारी (ता. १२) वीज चोरीचा प्रकार उघडकीस आला. आर्थिक नफा होण्याच्या उद्देशाने वीज चोरी सुरू होती अशी फिर्याद महावितरणचे कार्यकारी अभियंता आबासाहेब परशुराम मांडके यांनी गुरुवारी रात्री पोलिसात दिली. जुना राजवाडा पोलिस पुढील तपास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठ आवारातूनसुप्टाच्या कागदपत्रांची चोरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठ आवारातील शिवाजी विद्यापीठ पदव्युत्तर शिक्षक संघटनेच्या (सुप्टा) कार्यालयातील तिजोरीतून सर्व कागदपत्रे चोरून नेल्याची लेखी तक्रार सचिव प्रा. डॉ. निखिल गायकवाड यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात केली आहे.

पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे, १३ फेब्रुवारी २०१९ रोजी कार्यालयीन वेळेत सायंकाळी साडेपाच वाजता सुप्टा संघटनेचे सदस्य डॉ. सागर डेळेकर, डॉ. जी. बी. कोळेकर, डॉ. भारती पाटील या सर्वांनी संगनमताने तिजोरीच्या चावीची मागणी माझ्याकडून केली. त्यावेळी सचिव म्हणून कागदपत्रे सांभाळण्याची जबाबदारी असल्याने चावी देऊ शकत नसल्याचे मी सांगितले. तरीही डॉ. भारती पाटील यांनी धमकी देत चावीची मागणी केली. यासंबंधीची माहिती कुलगुरूंना भेटून दिली. दरम्यान, बनावट चावीने तिजोरी उघडून महत्वाची कागदपत्रे चोरून नेण्यात आली आहेत. सन २००८ ते २०१८ पर्यंतच्या व्हाउचर फाईल्स, संघटनेची कीर्द वही, संघटनेचे बॅँक पासबुक चोरीला गेले आहे. ही बाब गंभीर आहे. डॉ. डेळेकर, डॉ. कोळेकर, डॉ. पाटील या तिघांकडून माझ्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. संघटनेच्या दस्तऐवजात काही खाडाखोड, बदल, कागदपत्रे गहाळ होणे, फेरफार करण्यासह सुप्टा संघटनेच्या आर्थिक कायदेशीर व्यवहारासंबंधी प्रश्न निर्माण झाल्यास त्यास हे तिघेजण जबाबदार असतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपशब्द वापरल्याबद्दल विविध संस्थाकडून निषेध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वंचित बहुजन आघाडीच्या सभेत शिवसेना शहर प्रमुख माजी नगरसेवक रविकिरण इंगवले यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल प्रा. सुकुमार कांबळे यांचा शहरातील विविध संघटनांनी निषेध केला. मिरजकर तिकटी येथे झालेल्या बैठकीत विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

खासदार ओवेसी यांच्याकडून धार्मिक तेढ वाढवणारी वक्तव्ये होत असल्याने इंगवले यांनी ओवोसींचा निषेध केला होता. पण प्रा. सुकुमार कांबळे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या सभेत इंगवले यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केल्याबद्दल संस्थांच्या प्रतिनिधींनी कांबळे यांचा निषेध केला. बैठकीला छावा मराठा युवा संघटन, खाटीक समाज, कोल्हापूर परिट समाज, जिल्हा परिट समाज, परीट सेवा मंडळ, कोल्हापूर सराफ व्यापारी संघ, सिटीझन फोरम, शौर्यपीठ, मराठा मावळा, मराठा क्रांती संघटना, अखिल भारतीय हिंदू महासभा, ताराराणी रिक्षा व्यावसायिक संघटना, हिंदू एकता आंदोलन, कोल्हापूर जिल्हा आदर्श टेंपो असोसिएशन, अखिल भारत हिंदू महासभा, मराठा संघटना संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी माजी उपमहापौर उदय पोवार, बाळ घाटगे, रावसाहेब इंगवले, राजू सावंत, स्वप्नील पार्टे, परेश भोसले, उमेश पोवार यांची भाषणे झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषिमंत्र्यांच्या कार्यालयासमोरून हटविले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कृषिमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कावळा नाका येथील कार्यालयासमोर परभणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी शुक्रवारी आंदोलनास सुरुवात केली. दुपारी एक वाजता किसान सभेच्या नेतृत्वाखाली त्यांनी सोयाबीन पिकाची नुकसानभरपाई मिळण्यात दिरंगाई झाल्याने ठिय्या मारला. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या नावे हेक्टरी २२ हजार रुपये नुकसानभरपाई जमा होत नाही, तोपर्यंत माघार नाही, अशी भूमिका घेतली. दरम्यान, दुपारी साडेतीन वाजता पोलिसांनी बळाचा वापर करीत शेतकऱ्यांना वाहनात कोंबून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणून सोडले. शेवटी नाइलाजास्तव त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले.

परभणी तालुक्यातील ५५ हजार हेक्टरमधील ६१ हजार शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. त्याची भरपाई मिळावी यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी विमा कंपन्या आणि सरकारकडे पाठपुरावा केला. मात्र, भरपाई मिळाली नाही. कृषिमंत्रीपदाचा कार्यभार पाटील यांच्याकडे असल्याने ३ ऑक्टोबरला नुकसानग्रस्त शेतकरी कोल्हापुरात दाखल झाले. त्यांनी मंत्री पाटील यांच्या कार्यालयासमोर उपोषण केले. त्यावेळी त्यांनी १० ऑक्टोबरला मंत्रालयात बैठक घेऊन भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात कार्यवाही झाली नाही.

सरकारने लबाडी केल्याच्या निषेधार्थ दुपारी एक वाजता महिलांसह सातशे शेतकरी परभणीहून रेल्वे आणि चारचाकी वाहनांतून कोल्हापुरात आले आणि पाटील यांच्या कार्यालयासमोर ठिय्या मारला. आता आश्वासनावर आमचा विश्वास राहिलेला नाही, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जोपर्यंत पैसे जमा होणार नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, अशी भूमिका घेऊन ठिय्या मारला. आंदोलन मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केल्याचा आरोप शेतकरी विलास बाबर यांनी केला. तीन वाजता पोलिसांनी वाहने आणून आंदोलकांना जबरदस्तीने वाहनात घालून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणून सोडले. तेथे १२ शेतकऱ्यांनी उपोषणास प्रारंभ केला. उर्वरित आंदोलकांनी प्रवेशद्वारासमोरच ठिय्या मारला. आंदोलनात किसान सभेचे सहचिव विलास बाबर, माणिक आवाड, प्रभाकर जांभळे, पंडितराव गोरे, गोपाळ कुलकर्णी, रामकिसनराव खवले यांच्यासह शेतकरी सहभागी झाले आहेत.

००००००

शेतकरी महिलेस चक्कर

पोलिसांनी दुपारी फौजफाट्यासह येऊन आंदोलनकांना वाहनात घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी आम्ही लोकशाहीच्या मार्गाने पाटील यांच्या कार्यालयासमारे आंदोलन करीत आहोत. तुम्ही का अटकाव करीत आहात? जेलमध्ये टाका, मात्र आम्ही हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतला. त्यावर पोलिसांनी कोणतेही उत्तर न देता आंदोलकांना वाहनात जबरदस्तीने घातले. यावेळी आंदोलक महिला नर्मदा चवर यांना चक्कर आल्याने कोसळल्या. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले.

००००००

बोलवून घेतले पण

सायंकाळी साडेसात वाजता निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. सरकारकडे भावना कळवू, असे आश्वासन देण्यापलीकडे ते कोणताही मार्ग काढू शकले नाहीत. त्यामुळे हताश होऊन आंदोलक पुन्हा आंदोलनस्थळी आले.

०००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘माध्यमिक’च्या चौकशीसाठी पुन्हा समिती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील माध्यमिक शिक्षण विभागातील कामकाजाच्या चौकशीसाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांच्या अध्यक्षतेखाली व्दिसदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी यासंबंधीचा आदेश दिला आहे. आदेशात कै. पंडीत खोपकर हायस्कूलचे प्रभारी मुख्याध्यापक एम. एच. कांबळे यांच्या गैरशिस्त, भ्रष्ट, अनियमितपणाची चौकशी १५ दिवसात करावी, असे म्हटले आहे. यामुळे पुन्हा एकदा ' माध्यमिक'चा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.

करवीर तालुक्यातील खोपकर हायस्कूलमध्ये संस्थांतर्गत वाद आहेत. दोन महिन्यांपूर्वी यासंबंधीच्या सुनावणीत 'माध्यमिक'च्या प्रशासनाने तयार केलेल्या टिप्पणीत सीईओ मित्तल यांना विसंगती निदर्शनास आली. यामुळे शिक्षणाधिकारी किरण लोहार, लिपिक शिवाजी खटागंळे यांना कारणे दाखवा नोटीस दिली. अधीक्षक प्रकाश नलवडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते.

दरम्यान, या प्रकरणासंबंधी हायस्कूलच्या श्री साई प्रसाद शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षांनी सीईओंकडे ११ जानेवारी २०१९ रोजी लेखी तक्रार केली. प्रभारी मुख्याध्यापक कांबळे यांच्या नियमबाह्य कामासंबंधी तक्रारी करूनही शिक्षणाधिकाऱ्यांनी काहीही कारवाई केली नाही. त्यांनी केलेल्या चौकशीत अनेक मुद्दे वगळण्यात आले आहेत. वस्तुनिष्ठ चौकशी केलेली नाही, म्हणून शिक्षणाधिकारी लोहार, लिपिक, अधीक्षकास नोटीसही देण्यात आली होती. यामुळे संपूर्ण प्रकरणाची पुन्हा एकदा चौकशी होऊन, सुनावणी घ्यावी, अशी मागणी तक्रारीतून केली. त्यानुसार सीईओ मित्तल यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी उबाळे, शिक्षण विस्तार अधिकारी बी. डी. टोणपे यांची चौकशी समिती नियुक्त केली.

---------

कोट

'खोपकर हायस्कूलच्या प्रकरणातील वस्तुनिष्ठता शोधण्यासाठी स्वतंत्र समितीची नियुक्ती केली आहे. चौकशी समिती प्रमुख समकक्ष असले तरी माझा आदेश असल्याने त्यांना सखोल चौकशी करावी लागेल.

अमन मित्तल, सीईओ

-----------

चौकट

समितीत कनिष्ठ अधिकारी

शिक्षणाधिकारी लोहार यांच्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी त्यांचे कनिष्ठ अधिकारी टोणपे यांची निवड केली आहे. यामुळे चौकशी निर्भयपणे, वस्तुनिष्ठपणे होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. लोहार यांचा दबाव राहिल्यास प्रकरणाला क्लिन चीट मिळेल, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हज यात्रेकरूंसाठी उद्या प्रशिक्षण शिबिर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

हज यात्रेकरूंसाठी कोल्हापुरातील हज फाउंडेशनच्या वतीने रविवारी (ता.१७) विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंग येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत शिबिर होणार असल्याची माहिती हज फाउंडेशनचे सचिव समीर मुजावर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. शिबिरात हज यात्रेतील सर्व धार्मिक विधी, यात्राप्रवास व निवासव्यवस्थेबाबत माहिती देण्यात येणार आहे. शिबिराचा यात्रेकरूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन हाजी इम्तियाज अमीर, हमजा बारगीर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एफआरपीतील अडसर दूर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

साखर निर्यात अनुदान, बफर स्टॉक आणि ट्रान्स्पोर्टवरील २०० ते २५० रुपयांचे अनुदान वगळून जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी उसाचा दुसरा हप्ता देण्याची घोषणा केली. त्यामुळे ३५० ते ६०० रुपये दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने साखर विक्रीची रक्कम प्रतिक्विंटल ३१०० रुपये केल्यामुळे एफआरपीची रक्कम देण्यासाठी दिलासा मिळाल्याचे मतही कारखानदारांनी व्यक्त केले आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळण्यातील अडसर दूर झाला आहे.

एकरकमी एफआरपी देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखान्यांच्या दारात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. तसेच एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांची साखर जप्त करण्याची मागणी केली असून, साखर आयुक्त कार्यालयाच्या आदेशाने जिल्हा प्रशासनाकडून कारवाई सुरू झाली आहे. कारखान्यांनी शिल्लक एफआरपीच्या रकमेएवढी साखर शेतकऱ्यांना देण्याची मागणी स्वाभिमानीने केली आहे. दुसरीकडे केंद्र सरकारने निर्यात साखरेवर अनुदान देण्याची घोषणा केली असून, साखर विक्रीचा दर प्रतिक्विंटल २९०० रुपयांवरून ३१०० रुपये केला आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जिल्ह्यातील कारखानदारांची जिल्हा मध्यवर्ती बँकेत बैठक झाली.

बैठकीला आमदार हसन मुश्रीफ, प्रकाश आवाडे, डॉ. विनय कोरे, के. पी. पाटील, प्रा. संजय मंडलिक, गणपतराव पाटील, गणपतराव घाटगे, पी. जी. मेढे यांच्यासह कारखान्यांचे कार्यकारी संचालक उपस्थित होते.

बैठकीत केंद्र सरकारने साखर विक्रीचा दर प्रतिक्विंटल ३१०० रुपये वाढविल्याबद्दल समाधान व्यक्त केले. एफआरपी देण्यासाठी साखर विक्रीचा दर प्रतिक्विंटल ३५०० रुपये करावा, अशी मागणी कारखानदारांनी यापूर्वी केली होती. प्रतिक्विंटलमागे २०० रुपये जादा दर मिळणार आहे. तसेच साखरेच्या मूल्यांकनातही वाढ होणार असल्याने बँकांकडून कर्जाची रक्कम वाढवून मिळणार आहे. तरीही एकरकमी एफआरपी देण्यात अडचणी येत असल्याबद्दल चर्चा झाली. कारखान्याने साखर निर्यात केल्यास प्रतिक्विंटल १८० रुपये ८० पैसे अनुदान मिळणार आहे. तसेच साखरेचा बफर स्टॉक केल्याबद्दल साखरेच्या प्रत्येक पोत्यामागे किमतीच्या १२ टक्के अनुदान मिळणार आहे. निर्यात साखरेच्या वाहतुकीसाठी प्रतिक्विंटल ८० रुपये अनुदान मिळणार आहे. साखर निर्यात, बफर स्टॉक आणि वाहतूक अनुदानाची २०० ते २५० रुपये रक्कम मिळणार आहे. अनुदानाची ही रक्कम वगळून कारखानदारांनी दुसरा हप्ता देण्याची तयारी केली आहे. पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर दुसऱ्या हप्त्याची रक्कम मिळणार आहे. केंद्र सरकारचे अनुदान मिळल्यावर एफआरपीची शिल्लक रक्कम मिळणार आहे.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ईएसआय हॉस्पिटलच्या पाहणीसाठी पथक येणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'ईएसआय हॉस्पिटलचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला असून ईएसआय अधिकाऱ्यांचे पथक कोल्हापुरात हॉस्पिटलची पाहणी करण्यास येणार आहेत', अशी माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

केंद्र सरकारच्या कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या विभागामार्फेत देशात हॉस्पिटल उभारण्यात आली आहेत. राज्यात १३ ठिकाणी राज्य सरकारच्या अखत्यारीत रुग्णालये सुरु असून फक्त कोल्हापूर व पुणे या दोन ठिकाणी केंद्र सरकारच्यावतीने रुग्णालये सुरु आहे. कोल्हापुरात नऊ एकरात १०० बेडचे रुग्णालय बांधण्यात आले असून गेली १८ वर्षे त्याकडे दुर्लक्ष होत आहेत. विधीमंडळात लक्षवेधी मांडून आमदार क्षीरसागर यांनी सरकारचे लक्ष वेधले. सध्या बाह्यरुग्ण विभाग सुरु असून फक्त कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील कामगारांना याचा लाभ होतो. हे हॉस्पिटल केंद्राच्या अखत्यारीतून राज्याच्या अखत्यारीत घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पण निधीअभावी पूर्ण क्षमतेने हॉस्पिटल सुरु नाही. हॉस्पिटलला उर्जितावस्था देण्यासाठी नुकतीच मुंबईत आरोग्यमंत्री शिंदे यांनी बैठक घेतली. बैठकीला ईएसआयचे आयुक्त आप्पासाहेब धुळाज उपस्थित होते. पुढील काही दिवसांत ईएसआय अधिकाऱ्यांचे पथक कोल्हापुरात येऊन हॉस्पिटलची पाहणी करणार आहेत. त्यामुळे भविष्यात सुसज्ज हॉस्पिटल होण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

पत्रकार परिषदेला शहर प्रमुख रविकिरण इंगवले, जिल्हा युवा सेना अध्यक्ष चेतन शिंदे, किशोर घाटगे, अविनाश कामते, सुनील जाधव, प्रदीप जगदाळे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खावटी कर्जमाफीचे अर्ज लवकर भरावेत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सरकारच्या खावटी कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज मुदतीत भरावेत, असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी पत्रकाद्वारे केले आहे. अर्ज भरण्याची मुदत २४ फेब्रुवारीपर्यंत आहे. पत्रकात म्हटले आहे की, राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना -२०१७ अंतर्गत कापणीपश्‍चात व घरगुती गरजांसाठी पीक कर्ज मंजुरीमधून खावटी कर्ज दिले होते. थकबाकीत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची योजना जाहीर केलेली आहे. याबाबतचा सरकारी निर्णय नुकताच बँकेस मिळालेला आहे. ही योजना कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यांपुरतीच खावटी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठीच मर्यादित आहे. योजनेच्या लाभ घेण्यासाठी पूर्वीच्याच अटी, शर्ती व निकष आहेत. पात्र शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज भरून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुलाची शिरोलीत वर्चस्ववादातून मारामारी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा

पुलाची शिरोली येथील माळवाडी भागात वर्चस्ववादातून दोन गटांत मारामारी झाली. शिरोली पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवत स्वतः फिर्यादी होत दहाजणांवर गुन्हा दाखल केला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : शैलेश संजय कांबळे व अविनाश मोतीराम पवार यांच्यात एकमेकांना शिवीगाळ केल्यावरून भांडण झाले. यावेळी नीलेश शिंदे तसेच अतुल भोसले यांनी त्यात भाग घेतला. तरुणांचा मोठा जमाव जमल्याची माहिती पोलिसांना समजताच सहायक पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे तत्काळ घटनास्थळी गेले. तेथे त्यांनी भांडणतंटा न करण्याचा आदेश दिला देऊनही तरुणांनी पोलिसांसमोरच मारामारी केली. यावेळी पोलिसांनी खाक्या दाखवत सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक विजय बाबर यांनी शैलेश कांबळे, विजय गोंदणे, अतुल भोसले, निलेश शिंदे, अविनाश पवार, ओंकार चव्हाण, राजन पवार, अमर गाडेकर, उत्तम गावडे व गोविंद जाधव (सर्व रा. माळवाडी शिरोली पुलाची) यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार क्षीरसागरनालोक घरी बसवतील

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'आमदार राजेश क्षीरसागर यांनी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून खासदार असदुद्दीन ओवेसी यांना कोल्हापुरात येण्यास विरोध केला. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. गुंडगिरीने कोणी कोणास रोखू शकत नाही. क्षीरसागर यांच्या अशा राजकारणामुळे लोक त्यांना येत्या निवडणुकीत घरी बसवतील. त्यांना पराभूत करण्यासाठी कोल्हापूर उत्तरमधून वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रबळ उमेदवार देऊ,' अशी माहिती आघाडीचे राष्ट्रीय प्रवक्ते माजी आमदार लक्ष्मण माने यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

माने म्हणाले, 'राज्यभर वंचित बहुजन आघाडीच्या सभा होत आहेत. सर्व सभांना खासदार ओवेसी उपस्थित राहून मार्गदर्शन करीत आहेत. कुठेही विरोध झाला नाही. त्यांना मोदी सरकारने उत्कृष्ट संसदपटू म्हणून गौरविले आहे. घटनेबाबत त्यांचा सखोल अभ्यास आहे. अशा खासदारास केवळ राजकारणासाठी क्षीरसागर यांनी शिवसेनेचे शहराध्यक्ष रविकिरण इंगवले यांच्यातर्फे विरोध केला, ही खेदाची बाब आहे. तरीही आघाडीची सभा यशस्वी झाली. त्यानंतरही इंगवले यांनी प्रसिद्धी पत्रक, पत्रकार परिषद घेऊन आम्हाला बघून घेण्याची धमकी दिली. ज्या गावची बोरी, त्याच गावची बाभळी असतात. म्हणून त्यांच्या धमकीला आम्ही घाबरणार नाही.'

ते पुढे म्हणाले, 'दुसऱ्यांना शिव्या देऊन मोठे होता येत नाही. पक्ष वाढत नसतो. क्षीरसागर इतकी वर्षे शहराचे आमदार आहेत, त्यांना कोल्हापूरच्या पाण्याचा प्रश्न का सोडविता आला नाही‌? निवडणुका तोंडावर आल्याने बहुजनांना हाताशी धरून दंगली घडविण्याचा काहींचा डाव आहे. मतांची विभागणी करून पुन्हा निवडून येण्यासाठी असे प्रयत्न होत आहेत. त्यास आता कोणीही बळी पडणार नाहीत. पैसे आणि गुंडगिरीचे राजकारण संपले आहे.'

अनिल म्हमाणे म्हणाले, 'आमदार क्षीरसागर नेहमीच दलित, मुस्लिम अशा अल्पसंख्याकांचा द्वेष करतात. यातूनच त्यांनी खासदार ओवेसी यांना विरोध केला. ते पुन्हा निवडून येणार येऊ नये, अशी व्यवस्था करणार आहे. दलित, मुस्लिम मतदारांत जागृती करून त्यांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.'

यावेळी अस्लम मुल्ला, सुहेल शेख, प्रा. शाहिद शेख आदी उपस्थित होते.

००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पानसरे स्मृतीदिनी जावेद अख्तर यांचे व्याख्यान

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित्त पानसरे संघर्ष समितीच्यावतीने बुधवारी (ता. २०)दुपारी चार वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन येथे स्मृती जागर सभेचे आयोजन केले आहे. यावेळी माजी खासदार गीतकार जावेद अख्तर यांचे व्याख्यान होणार आहे.

ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. अभय नेवगी, मुक्ता दाभोलकर यांच्या उपस्थितीत जावेद अख्तर यांचे '२१ वे शतक: एक अंधार युग' या विषयावर व्याख्यान होणार आहे. तत्पुर्वी सकाळी आठ वाजता पानसरे यांच्या निवासस्थानापासून बिंदू चौकपर्यंत निर्भय वॉक होणार आहे.

पानसरे यांच्या हत्येस चार वर्षे पूर्ण होत असताना देशभरात निषेधाचे प्रतिध्वनी उमटत आहेत. पानसरे यांच्या खुनाला डॉ. नरेंद्र दाभोलकर, डॉ. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांच्या निघृण खुनांची पार्श्वभूमी आहे. न्यायासाठी दीर्घ लढाई करावी लागणार आहे. त्यासाठी दरवर्षी पानसरे स्मृतीदिनी चळवळीतील कार्यकर्ते अभिवादन करतात. या कार्यक्रमात संविधनाचा आदर करणाऱ्या नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन दिलीप पवार, मेघा पानसरे, बाबूराव कदम, सुरेश शिपूरकर, टी. एस. पाटील, व्यंकाप्पा भोसले, बाबूराव तारळी, अतुल दिघे, एस. बी. पाटील, सुशिला यादव यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोल्हापूरः शोकमग्न संताप...!

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

काश्मिरमधील पुलवामा येथील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात ४४ जवान शहीद झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी शहरासह जिल्हाभर शोकमग्न संताप व्यक्त झाला. विविध संस्था आणि संघटनांनी दहशतवादी संघटनांसह पाकिस्ताविरोधी घोषणा देत वीरमरण आलेल्या जवानांना साश्रूनयनांनी आदरांजली वाहिली. या घटनेचे पडसाद सोशल मीडियावरही उमटले. काँग्रेस, शिवसेना हिंदुत्ववादी संघटना मराठा मावळा संघटनासह मुस्लिम बोर्डिंगच्यावतीने पाकिस्तानचा ध्वज, आणि अतिरेक्यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन संताप व्यक्त करण्यात आला. आम आदमी पक्षाच्यावतीने जवानांना आदराजंली वाहण्यासाठी कँडल मोर्चा काढण्यात आला

पाकिस्तानला अद्दल घडवा

कोल्हापूर: शिवसेनेच्यावतीने मिरजकर तिकटी येथे हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धाजंली वाहण्यात आली. त्यानंतर पाकिस्तानच्या ध्वजाची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली. आंदोलकांनी पाकिस्तानी ध्वजाची होळी करत 'जला दो जला दो, पाकिस्तान जला दो', 'पाकिस्तान मुर्दाबाद', 'एक धक्का मार दो, पाकिस्तान को तोड दो'च्या घोषणा दिल्या. यावेळी बोलताना जिल्हा प्रमुख संजय पवार म्हणाले, 'आता चर्चा न करता केंद्र सरकारने लष्कराला मुभा द्यावी. पाकिस्तानला जन्माची अद्दल घडवा.' यावेळी जिल्हाप्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख शिवाजी जाधव, माजी शहर प्रमुख दुर्गेश लिंग्रस, जिल्हा युवा प्रमुख मनजित माने, हर्षल सुर्वे, रणजित आयरेकर, युवा सेनेच्या पदाधिकारी कादंबरी करजगार, शीतल पाटील, रोहित भोसले, अभिजित भोसले विनायक जाधव, अभिनयन कानकेकर वैभव जाधव आदी उपस्थित होते.

मुस्लिम समाजाने केले दहशतवाद्यांच्या पुतळ्याचे दहन

कोल्हापूर : दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर द मोहामेडन एज्युकेशन सोसायटी आणि समस्त मुस्लिम समाजाच्यावतीने काश्मिरमधील भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला. पाक दहशतवादाच्या पुतळ्याचे मुस्लिम युवक व कार्यकर्त्यांनी दहन केले. 'पाकिस्तान मुर्दाबाद', 'हिंदुस्थान जिंदाबाद', 'शहीद जवान अमर रहे', 'जला दो जला दो, पाकिस्तान जला दो', 'दूध मांगो खीर देंगे, काश्मिर मांगोगे तो चीर देगे', 'काश्मिर आमच्या हक्काचे, नाही कुणाचे बापाचे', 'हमसे जो टकरायेगा, मिट्टी मे मिल जायेगा' अशा घोषणा देण्यात आल्या.

यावेळी बोलताना सोसायटी उपाध्यक्ष माजी नगरसेवक अदिल फरास म्हणाले, 'भारताकडे वाईट नजरेने बघणाऱ्यांची आम्ही खैर करणार नाही. धर्माच्या नावावर पाकिस्तान फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे, तो मुस्लिम समाज कधीच यशस्वी होऊन देणार नाही. काश्मिरमधील हल्ल्याचा निषेध कोल्हापुरातील मुस्लिम समाज करत असून आम्ही सर्व केंद्र सरकार व सैनिकांच्या पाठीशी आहोत हा संदेश राजर्षी शाहू महाराजांच्या नगरीतून संपूर्ण देशाला देत आहोत. सर्जिकल स्ट्राइक न करता पाकिस्तानातील सर्व अतिरेकी अड्डे उद्ध्वस्थ केल्याशिवाय भारत सरकारने गप्प बसू नये.

गणी आजरेकर म्हणाले, 'कोल्हापूर जिल्ह्यातील समस्त मुस्लिम समाज अतिरेकी कारवायांचा निषेध करत आहे. वीर जवानांना आम्ही श्रद्धाजंली वाहत असताना आम्हाला वेदना होत आहेत. पाकिस्तानच्या कारवाया वाढत चालल्या असून त्यांना आता धडा दाखवावा.' यावेळी प्रशासक कादर मलबारी, पापाभाई बागवान, जहाँगीर अत्तार, रफीक शेख, अल्ताफ झांजी, हमजेखान शिंदी, लियाकत मुजावर, फारुक पटवेगार, रफीक मुल्ला, मलिक बागवान, नगरसेवक तौफिक मुल्लाणी, रियाज सुभेदार, जाफर मलबारी, फिरोजखान उस्ताद यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवबांचा मावळाच्यावतीने पुतळा दहन

कोल्हापूर : शिवबांचा मावळा संघटनेच्यावतीने मिरजकर तिकटी येथे जैश ए मोहमदचा अतिरेकी मौलाना अझर मसूद अहमदच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी पाकिस्तानच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी संघटनेचे संस्थापक अमोल माने, जिल्हाध्यक्ष जयदीप सरवदे, नगरसेवक ईश्वर परमार, माजी नगरसेवक अदिल फरास, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, विनोद जाधव, किशोर माने, कपिल जाधव, मंगेश माने आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षणाधिकारी लोहारांच्या विरोधात सीईओंकडे तक्रार

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या कामकाजाविषयी गुरुवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्याकडे तक्रार दाखल झाली. शिक्षणाधिकाऱ्यांनी एकाच प्रकरणात दोन वेगवेगळे आदेश काढण्याचा प्रकार केला आहे. याप्रकरणी चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी कसबा वाळवे येथील रंगराव बापूसाहेब पाटील यांनी सीईओेकडे केली.

पाटील यांनी गुरुवारी सीईओंची भेट घेऊन तक्रार दाखल केली. त्यांनी निवेदनात म्हटले आहे, 'वाळवा एज्युकेशन सोसायटी वाळवा बुद्रुक शिक्षण संस्थेतील विश्वस्त, अध्यक्ष व सचिव यांच्यात वाद आहे. सध्या हे प्रकरण जिल्हा व सत्र न्यायालयात प्रलंबित आहे. संस्थेच्या माजी अध्यक्षांनी संस्थेचा अध्यक्ष व पदासंदर्भात कोर्टात दावा दाखल केला आहे. अध्यक्षांनी शिक्षणाधिकाऱ्यांना बदल्या करू नयेत, अशी मागणी केली आहे. त्यावर सुनावणी घेऊन त्यांनी प्रकरण कोर्टात असल्याने कोणत्याही बदलीबाबत आदेश देता येणार नाही, असा आदेश दिला.

त्यानंतर अवघ्या दीड महिन्याच्या कालावधीत शिक्षकांच्या बदल्या करण्याचे आदेश दिले. या एकाच प्रकरणात लोहारांनी दोन वेगवेगळे आदेश काढल्याने संभ्रम निर्माण झाला. या आदेशासंदर्भातील नक्कलेची मागणी करण्यासाठी अॅड. संजय सरदेसाई व अर्जदार गेले असता त्यांना माहिती देण्यात टाळाटाळ केली. यामध्ये खडाजंगी झाली. त्यानंतर या नक्कलेच्या प्रती देण्यात आल्या. सध्या हे प्रकरण कोर्टात असताना एकाच प्रकरणात दोन वेगवेगळे आदेश काढल्याप्रकरणी त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी केली. तेव्हा सीईओ मित्तल यांनी या प्रकरणी चौकशी करुन पुढील कार्यवाही करू, अशी ग्वाही दिल्याचे पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंढरपुरात पाकिस्तानचे ध्वज जाळले

$
0
0

पंढरपुरात पाकिस्तानचे ध्वज जाळले

पंढरपूर :

पंढरपुरात संतप्त शिवसैनिकानी पाकिस्तानचे ध्वज जाळून हल्ल्याचा निषेध केला. शिवसैनिकांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत. दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापुरातही पुलवामा हल्ल्याचा निषेध

$
0
0

सोलापूर :

पुलगामा येथील हल्ल्याचा सोलापुरातील विविध संघटनांकडून निषेध नोंदविण्यात आला. काही ठिकाणी पाकिस्ताचे पंतप्रधान इम्रान खान, तर काही ठिकाणी दहशतवाद्यांच्या पुतळ्याचे दहन करून पाकिस्तानचे झेंडे जाळण्यात आले. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नवी पेठेतून पाकिस्तानच्या विरोधात घोषणा देत दत्त चौकापर्यंत फेरी काढण्यात आली. त्या नंतर दत्त चौकात पाकिस्तानचा झेंडा आणि दहशतवाद्यांच्या पोस्टरची होळी करण्यात आली. या वेळी भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबाद, दहशतवादी मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. तुळजापूर वेस येथील बलिदान चौकात राजकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली इम्रान खान यांच्या पुतळ्याचे दहन करून पाकिस्तानच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सोलापूर शहर-जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने चार हुतात्मा पुतळा येथे शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यकर्त्यांनी मेणबत्ती प्रज्वलित करून शहिदांना फुले वाहून अभिवादन केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने चार हुतात्मा पुतळा चौकीत निषेध नोंदविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images