Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारने शालेय पोषण आहार योजनेंतर्गत स्वयंपाकी व मदतनीसांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच इंधन भाजीपाला दरामध्ये ५.३५ टक्के दरवाढ केली आहे. स्वयंपाकी व मदतनीसांच्या मानधनात वाढ करावी यासाठी 'सिटू'च्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले होते. कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेनेही आंदोलनात सहभाग घेतला होता.

राज्य सरकारच्या मानधन वाढीच्या अध्यादेशानंतर संघटनेने पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. त्यामध्ये शालेय पोषण आहार योजनेतील कामगारांसाठी संघटनेने राज्य व केंद्रस्तरावर वेळोवेळी आंदोलने केली. सरकारने, त्या आंदोलनाची दखल घेत मदतनीसाच्या मानधनात मासिक ५०० रुपयांची वाढ केली आहे. तसेच अन्न शिजवणाऱ्यांच्या इंधन भाजीपाला दरामध्ये ५.३५ टक्के वाढ केली असून त्याची अंमलबजावणी एक एप्रिल २०१८ होणार आहे. तर मदतनीसांना एक एप्रिल २०१९ पासून वाढीव मानधनाचा लाभ मिळणार आहे. दरम्यान कर्मचाऱ्यांना किमान वेतनाच्या नियमानुसार १८,००० रुपये मानधन, सरकारी सेवेचा दर्जा मिळावा यासाठी संघर्ष चालू राहील असे पत्रक संघटनेचे उपाध्यक्ष कॉम्रेड भगवान पाटील, प्राचार्य ए. बी. पाटील, अमोल नाईक, प्रा. आर. एन. पाटील, वर्षा कुलकर्णी, नंदिनी देसाई, रेखा देवलकर यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवस्वराज्य संघटनेतर्फे बुधवारी नोकरी मेळावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवस्वराज्य संघटनेच्या वतीने बुधवारी (ता. १३) दसरा चौकातील श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात नोकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संघटनचे अध्यक्ष भरत दळवी आणि नगरसेवक प्रतापसिंह जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मेळाव्याचे उद्घाटन माजी आमदार संपतराव पवार यांच्या हस्ते आणि मानसिंग बोंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी संजय मंडलिक, सावता मस्के, आदी उपस्थित राहणार आहेत. सकाळी नऊ ते दुपारी चारपर्यंत होणाऱ्या या मेळाव्यात कोल्हापूरसह मुंबई, चाकण, पुण्यासह राज्यातील औद्योगिक वसाहतीतील नामांकित २५ हून अधिक कंपन्या सहभागी होत आहेत. बारावी उत्तीर्ण, आयटीआय, पदवीधर, डिप्लोमा, इंजिनीअर, संगणक विभागातील विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहेत. पत्रकार परिषदेला संघटनेचे उपाध्यक्ष मेघराव पवार-पाटील, शहराध्यक्ष अमित देठे, समीर सय्यद, शिवाजी जाधव, विजय पिसाळ, विशाल दिघे, आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्ताधाऱ्यांकडून घटना बदलाचे षडयंत्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून देशात समता, स्वातंत्र्य आणि बंधुता आणली. मात्र, सध्याच्या भाजप सरकारने वेगवेगळ्या प्रकारे घटना बदलण्याचे षडयंत्र आखले आहे. फुले, शाहू, आंबेडकरी विचारांच्या अनुयायांनी संकल्प करून संविधान बचावाच्या लढाईत उतरले पाहिजे,' असे प्रतिपादन माजी समाजकल्याणमंत्री आणि भीमशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांनी केले.

बहुजन विकास मोर्चा, कोल्हापूर व भीमशक्ती संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान बचाव संकल्प परिषदेचे आयोजन केले होते. मुस्लिम बोर्डिंगच्या मैदानावर आयोजित परिषदेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

हंडोरे म्हणाले, 'राजकारण आणि गटातटाच्या पलीकडे जाऊन अनेक गोष्टी करता येऊ शकतात. समाजकारण, अर्थकारण, शैक्षणिक क्षेत्रात रचनात्मक कार्य घडू शकते, पण आम्ही सगळे राजकारणात गुरफटलो. यामुळे समाजासमोर अनेक प्रश्न 'आ'वासून उभे राहिले. भावनिक राजकारणाव्यतिरिक्त विधायक, सकारात्मक काम अपेक्षित आहे, पण दुर्दैवाने अशी कामे होताना दिसत नाहीत. दुसरीकडे सरकार घटनात्मक संस्था खिळखिळी करत आहेत. राज्यकर्त्यांचा आरबीआय, सीबीआय यांसारख्या स्वायत्त संस्थेत वाढता हस्तक्षेप देशासाठी घातक आहे. संविधान बचावाचा संकल्प प्रत्येकाने केला पाहिजे. महापुरुषांचे विचार कार्य अंगिकारून काम केल्यास ही लढाई जिंकू शकतो.'

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यापेक्षा माजी समाजकल्याणमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी उत्कृष्ट काम केल्याचे स्वाभिमानी रिपब्लिकन यूथचे पक्षप्रमुख मनोज संसारे यांनी नमूद केले. ते म्हणाले, 'संविधान हे केवळ आंबेडकरी लोकांसाठी नाही तर समाजातील प्रत्येक घटकासाठी ते महत्त्वपूर्ण व किमती आहे. संविधान हा देशाचा महान ग्रंथ आहे. मात्र, आरएसएस आणि भाजपचे नेते उघडपणे संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. जागरूक नागरिकांनी संविधान वाचविण्यासाठी एकत्र आले पाहिजे. प्रत्येकाने निवडणुकीत पुरोगामी विचारांची मतविभागणी होणार नाही ही भूमिका स्वीकारावी.'

बहुजन विकास मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रंगराव कामत यांनी प्रास्ताविक केले. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले. व्यासपीठावर डी. जी. भास्कर, विकास मोर्चाचे पांडुरंग बिडकर, दयानंद गालफाडे, शशी कांबळे, दीपाली आवळे, आदी उपस्थित होते.

००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषी सन्मान योजनेचेसुट्टी दिवशीही काम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत गावनिहाय पात्र खातेदार शेतकऱ्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. ग्रामपंचायतींमध्ये याद्या पाठविण्यात आल्या आहेत. रविवारी सुट्टीचा दिवस असूनही तालुका, गाव पातळीवरील महसूल प्रशासन यादीतील पात्र शेतकऱ्यांकडून बँक खाते, आयएफसी कोड आणि आधार क्रमांक भरून घेण्याच्या कामात व्यस्त राहिले.

योजनेतून अल्प, अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रतिकुटुंब वार्षिक सहा हजार रुपये तीन टप्यांत देण्यात येणार आहे. लोकसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन सरकारने केले आहे. या पार्श्वभूमीवर खातेदार शेतकऱ्यांची कुटुंबनिहाय वर्गीकरणाची प्रक्रिया केली जात आहे. या कामासाठी तलाठी, सर्कल, तहसीलदार, ग्रामसेवक सुट्टीच्या दिवशीही हजर राहून यादीची छाननी केली. १२ फेब्रुवारीअखेर हे काम चालेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘किफ’मध्ये रविवार ठरला शॉर्टफिल्म डे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर आंतरराष्ट्री चित्रपट महोत्सवातंर्गत (किफ) घेण्यात आलेल्या लघुपट निर्मिती स्पर्धेत अकथात्मक विभागात 'फड' या लघुपटाने तर कथात्मक विभागात 'भैरू' या लघुपटाने प्रथम क्रमांक पटकावला. ज्येष्ठ दिग्दर्शिक सुमित्रा भावे यांच्या हस्ते लघुपट स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. लक्ष्मीपुरी येथील आयनॉक्स मल्टिप्लेक्स येथे सुरू असलेल्या 'किफ'मध्ये रविवारचा दिवस रसिकांसाठी लघुपटांनी अविस्मरणीय बनवला.

'जगाचा सिनेमा आणि सिनेमांचे जग' अशी टॅगलाइन घेऊन यंदा सातव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने कमी वेळेत अभिव्यक्तीचा मोठा कॅनव्हास उलगडणाऱ्या लघुपटांचेही जग रसिकांसाठी खुले झाले आहे. महोत्सवात लघुपटांचा पडदाही रसिकांना अंतर्मुख करत आहे. तसेच सिनेमा निर्मितीमध्ये स्वारस्य असलेल्या नवोदितांसाठी लघुपट निर्मिती स्पर्धा घेण्यात आली होती. स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला होता.

अकथात्मक विभागात 'पळसंबे' या लघुपटाने द्वितीय तर 'गॉडेस' या लघुपटाने तृतीय क्रमांक मिळवला. 'ट्रान्सफॉर्मर ऑफ एनर्जी' आणि 'डॉमिनेशन ऑफ लँड' या लघुपटांनी उत्तेजनार्थ बक्षीस मिळवले. कथात्मक विभागात '९३ नॉटआउट' या लघुपटाने द्वितीय तर 'जरीवाला आसमाँ' या लघुपटाने तृतीय क्रमांक मिळवला. 'द ड्रेनेज' व 'छमछम अँड शुभम' या लघुपटांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. स्पर्धेत ३० लघुपटांचा समावेश होता. सकाळी नऊ आणि दुपारी दोन वाजता विजेते ठरलेल्या लघुपटांचा आस्वाद रसिकांनी घेतला. दरम्यान, रविवारी 'नो मॅन्स इसलँड,' 'दरमिया,' 'हाय नून स्टोरी,' 'रशियन आर्क,' 'वेलकम होम' हे सिनेमे दाखवण्यात आले.

आज महोत्सवात

सकाळी ९.१५ लिसा द फॉक्स फायरी (हंगेरियन), अंदेर कहीनी (बंगाली)

सकाळी ११.३० इरिको प्रीटेंडेड (जपानी), लीफ ऑफ लाइफ (इराणी)

दुपारी २.०० दुष्काळातला पाऊस (मराठी), पु. ल. देशपांडे (मराठी माहितीपट)

दुपारी ४.१५ अश्लील उद्योग मित्र मंडळ (मराठी)

सायं. ६.३० अ जेंटल क्रिएटर (फ्रेंच)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साखर जप्तीची कारवाई होणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

साखर आयुक्तांच्या आदेशानुसार थकीत एफआरपीप्रश्नी पाठविण्यात आलेल्या नोटिसींची मुदत संपली असून सोमवारी (ता. ११) पन्हाळा तहसीलदार कार्यालयाच्यावतीने वारणा सहकारी साखर कारखान्याला साखर जप्तीची नोटीस पाठविण्यात येणार आहे. तर जिल्ह्यातील सात कारखान्यांना आणखी सात दिवसांची मुदत आहे. त्यानंतर त्यांच्यावरही साखर जप्तीची नामुष्की ओढवणार आहे.

साखर आयुक्तांच्या आदेशानंतर जिल्हा प्रशासनाने थकीत एफआरपी वसुलीसाठी कोल्हापूर विभागातील १२ कारखान्यांच्या जंगम व स्थावर मालमत्ता जप्त करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने तहसीलदारांना कारवाईचे आदेश दिले आहेत. कारवाईचा पहिल्या टप्पा म्हणून जिल्ह्यातील दत्त शिरोळ, गुरुदत्त शुगर्स, संताजी घोरपडे, पंचगंगा, इको केन, वारणा, जवाहर कारखान्यांना नोटिसा बजावल्या आहेत. नोटिसींनंतर कारखान्यांनी प्रतिटन २३०० रुपयांप्रमाणे हप्ता जमा केला. पण शिल्लक एफआरपीची रक्कम भरली नसल्याने कारखान्यांची साखर जप्त केली जाणार आहे. साखर जप्तीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर किती एफआरपी जमा केली आहे याची विचारणा नोटिसींद्वारे तहसीलदारांनी केली आहे. या नोटिसींना उत्तर देण्यासाठी कारखान्यांना सात ते पंधरा दिवसांची मुदत दिली आहे.

नोटिसीला उत्तर देण्याची वारणा कारखान्याची सात दिवसांची मुदत शनिवारी (ता. ९) संपली. एफआरपीची किती रक्कम दिली याचा अहवाल देण्याचे आदेश कारखान्याला दिले आहेत. कारखान्याने एफआरपीचा पहिला २३०० रुपयांचा हप्ता दिला आहे. शिल्लक एफआरपीची रक्कम कारखान्याने न दिल्यास तेवढ्या रक्कमेची साखर जप्त केली जाणार आहे. जप्त साखरेची विक्री करून उर्वरीत एफआरपी दिली जाणार आहे. सोमवारी साखर जप्तीची नोटीस पन्हाळा तहसीलदार बजावणार आहेत. दरम्यान कोल्हापूर विभागातील १२ कारखान्यांना नोटिसा पाठवल्या असून शिल्लक २४ कारखान्यांना साखर जप्तीच्या नोटिसा पुढील आठवड्यात पाठवण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

'मी साखर स्वीकारणार नाही' वादात

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागणीनुसार कारखान्यांनी एफआरपीच्या उर्वरीत रकमेची साखर देण्याची तयारी दाखवली आहे. जे शेतकरी साखर स्वीकारणार नाहीत, त्यांच्या खात्यावर एफआरपीची रक्कम नंतर जमा करण्यात येणार आहे. काही साखर कारखान्यांकडून 'मी साखर स्वीकारणार नाही. शिल्लक एफआरपीची रक्कम काही कालावधीनंतर स्वीकारण्यास तयार आहे', असा मजकूर असलेले अर्ज शेतकऱ्यांकडून लिहून घेतले जात आहेत. तर कारखान्यांकडून शेतकऱ्यांवर जबरदस्ती केली जात आहे, असा आरोप 'स्वाभिमानी'कडून केला आहे. त्यामुळे साखर जप्तीच्या प्रश्नावर तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठा दाखल्यासाठी पैसेघेणाऱ्या केंद्रावर कारवाई करा

$
0
0

कोल्हापूर : मराठा समाजातील तरुणांना एसइबीसीचा (मराठा) दाखला देण्यासाठी आपले सरकार आणि ई सेवा केंद्रातून मनमानी पद्धतीने पैसे घेतले जात आहेत. संबंधीत केंद्र चालकांवर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशा इशाऱ्याचे निवेदन सकल मराठा समाज, रॉयल करवीर फाउंडेशनतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे, दीर्घ संघर्ष केल्यानंतर आणि अनेक तरुणांच्या बलिदानातून मराठा समाजास सरकारने नोकरी, शिक्षणात १६ टक्के आरक्षण दिले. मराठा दाखला मिळवताना तरुणांना अडवणूक, लुटीला सामोरे जावे लागत आहे. दाखल्यांसाठी ५०० ते २ हजारांपर्यंत पैसे घेतले जात आहेत. इतके पैसे घेणारे सेवा केंद्र गावातील प्रबळ पुढारी, नेते, त्यांच्या नातेवाईकांची आहेत. त्यामुळे संबंधीत केंद्रचालक खुलेआम पैसे घेत आहेत. चार दिवसांत पैसे घेणाऱ्या केंद्रावर कारवाई करावी. अन्यथा आंदोलन केले जाईल. निवेदन देताना स्वाप्निल पार्टे, अजिंक्य पाटील, लहू शिंदे, रवींद्र कांबळे, स्वरुप शिंदे आदी उपस्थित होते. दरम्यान, अखिल भारतीय छावा युवा संघटनेने पैसे घेणारे केंद्र बंद पाडण्याचा इशारा प्रसिद्धी पत्रकातून संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राजू सावंत यांनी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गृहित धरणाऱ्यांना धडा शिकवू’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'रिपब्लिकन नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा फक्त मतांसाठी वापर करून घ्यायचा. नंतर त्यांना सोयीस्करपणे बाजूला करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू आहे. त्यामुळे त्यांना आगामी निवडणुकीत धडा शिकवला जाईल,' असा इशारा रिपाइं (गवई गट) जिल्हाध्यक्ष प्रा. विश्वास देशमुख यांनी दिला.

पक्षातर्फे आयोजित जिल्हा कार्यकर्त्यांच्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र गवई २३ फेब्रुवारीला कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. हा दौरा यशस्वी करण्याचा निर्धार मेळाव्यात झाला. पक्षाचे राष्ट्रीय चिटणीस दलितमित्र पी. एस. कांबळे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले. उद्घाटनप्रसंगी बोलताना कांबळे यांनी 'पक्षाच्या कार्यकर्त्यांना दुय्यम वागणूक देणाऱ्या युती व आघाडीच्या नेत्यांना धडा शिकवू,' असा इशारा दिला.

करवीर तालुकाध्यक्ष पांडुरंग कांबळे यांनी स्वागत केले. मेळाव्याचे संयोजन शहराध्यक्ष बाजीराव गायकवाड यांनी केले. याप्रसंगी पक्षाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष भाऊसाहेब काळे, जिल्हा चिटणीस सज्जन कांबळे, बबन शिंदे, अनिल धनवडे, आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


माता-भगिनींमुळे चारवेळा आमदारः हसन मुश्रीफ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागले

'कागल मतदारसंघातील माता-भगिनींनी मला चारवेळा आमदार केले. मुलगा, कोणी भाऊ मानून माझ्यावर प्रेम केले. त्यांच्या अनंत उपकाराची परतफेड या जन्मी तरी करू शकत नाही. माझ्या कातड्याचे जोडे तयार करून या माता-भगिनींच्या पायात घातले तरीसुद्धा त्यांचे ऋण फिटणार नाहीत,' असे उद्गार आमदार हसन मुश्रीफ यांनी काढले.

सिद्धनेर्ली (ता. कागल) येथे आयोजित महिला मेळाव्यात ते बोलत होते. युवराज पाटील, भैया माने, कागलच्या नगराध्यक्षा माणिक माळी, उपनगराध्यक्षा नूतन गाडेकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेश अध्यक्ष सक्षणा सलगर, अमरिन मुश्रीफ, आदी प्रमुख उपस्थित होते.

आमदार मुश्रीफ म्हणाले, 'केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. युवक, महिला, शेतकरी, उद्योजकांसह देशातील एकही घटक समाधानी नाही. सगळीकडे अस्वस्थता पसरली असून, नोटाबंदी करून सामान्य माणसाला वेठीस धरण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. या सरकारला घालविण्याचा निर्णय जनतेने घेतला आहे. राज्यात पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आल्यास कल्याणकारी योजना पूर्ववत सुरू केल्या जातील. शेतकऱ्यांची दोन लाखांची कर्जमाफी करू, निराधार योजनेची पेन्शन दोन हजार करू, रास्त भाव दुकानात रॉकेल, साखर, धान्यही देऊ. महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करू. सर्वसामान्य जनतेच्या बळावर मी चारवेळा आमदार झालो. माता-भगिनींच्या आशिर्वादामु‌ळेच मी राजकीय जीवनात यशस्वी झालो.'

राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर म्हणाल्या, 'भाजप सरकारने पाच वर्षांत फक्त आश्वासनेच दिली. एकही ठोस काम झालेले नाही. आता तर डान्सबारला परवानगी दिली म्हणजे 'गायीला वाचवा आणि बाईला नाचवा' असे या सरकारचे धोरण आहे. या फसव्या सरकारला चलेजाव म्हणण्याची वेळ आली आहे.'

यावेळी धनश्री आगळे, डॉ. साधना पाटील, शीतल फराकटे, आदींनी मनोगत व्यक्त केले. दीपाली पाटील यांनी स्वागत केले. गोरंबेचे माजी सरपंच शिवाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले. दत्ता पाटील यांनी आभार मानले.

दु:ख गरिबालाच कळतं...


गरिबांचे दु:ख गरिबांनाच कळते, असे स्पष्ट करून आमदार मुश्रीफ यांनी समरजितसिंह घाटगे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, 'काल परवा जन्मलेले, ज्यांनी कधी शाळेची निवडणूकही लढवली नाही, ते आता निवडणूक विधानसभेची निवडणूक लढविण्याच्या गप्पा मारत आहेत.' तर सक्षणा सलगर यांनी, भावी म्हणवून घेणाऱ्यांना १५ बुक्क्या मारा. भाऊची हवा आणि नुसतेच पोस्टर लावा. जे वाड्यात बसून काड्या घालतात त्यांच्या नाड्या मोजण्याची वेळ आल्याचे म्हटले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सार्वजनिक बँकिंग क्षेत्र मोडण्याचा मोदींचा डाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'नोटाबंदीनंतर राष्ट्रीयीकृत बँका अडचणीत आल्या आहेत. त्यांना केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या भांडवलात कपात झाली आहे. अप्रत्यक्षपणे मर्यादा, संकोच आणून बँकिंग क्षेत्र मोडीत काढण्याचा डाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार करीत आहे,' असा आरोप ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ विश्वास उटगी यांनी रविवारी केला. प्रबोधन सेवा संस्थेतर्फे टेंबे रोडवरील शेकापच्या कार्यालयात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. माजी आमदार संपतराव पवार उपस्थित होते.

विश्वास उटगी म्हणाले, 'कायद्याचे संरक्षण आहे, म्हणून सार्वजनिक बँका खासगी लोकांच्या ताब्यात आतापर्यंत सहजपणे देता आल्या नाहीत. त्यांची मालकी सरकारचीच राहिली. तेथे प्रत्येक वर्षी होणारा नफा सरकारच्या तिजोरीत जमा होतो. मात्र नोटाबंदीनंतर बँकांसमोर मोठ्या प्रमाणात अडचणी उभ्या राहिल्या. ग्राहकांकडून अतिरिक्त सेवाकर आकारून तोटा भरून काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. सार्वजनिक बॅकिंग क्षेत्र हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. ३५ हजार खेड्यांत बँकांच्या शाखा आहेत. १२५ लाख कोटींच्या ठेवी आहेत. ९० लाख कोटींचे कर्जवाटप झाले आहे. एकूण गुंतवणुकीपैकी ७२ टक्के गुंतवणूक राष्ट्रीयीकृत बँकांत आहे. मात्र ही व्यवस्थाच मोडीत काढण्यासाठी भाजप सरकार बँका विलिनीकरण करीत आहे.'

उटगी म्हणाले, 'केंद्र सरकार टप्याटप्याने सर्व बँका खासगी कंपन्यांच्या ताब्यात देण्याचा धोका आहे. तोट्यातील आयडीबीआय बँकेच्या मदतीसाठी एलआयसीला पैसे गुंतवण्यास भाग पाडले गेले. परिणामी भविष्यात पॉलिसीधारकांचे पैसे मिळणार की नाही, असे प्रश्न निर्माण होत आहेत. यावर एलआयसी कर्मचारी युनियन आवाज उठवत नाही. राज्यकर्ते, राजकीय पक्ष बोलत नाहीत. केवळ बँक कर्मचारी युनियनने आवाज उठवल्याने मल्ल्या, निरव मोदी यांसारखे बडे कर्जदार चव्हाट्यावर आले. अशा बड्या कर्जदारांना संरक्षण देण्याची धोरणे रावबली जात आहेत. ती हाणून पाडली पाहिजेत.'

व्याख्यानास प्रा. डॉ. जे. बी. शिंदे, अनिल चव्हाण, बाळासाहेब बरगे, संभाजीराव जगदाळे, एस. आर. कांबळे, अशोक चौगुले आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दालन हाऊसफुल

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहकांना एकाच छताखाली आणणाऱ्या 'गृहप्रकल्प दालन २०१९'मध्ये रविवारी उच्चांकी गर्दी झाली. सुट्टीचे औचित्य साधून हजारो नागरिकांनी सहकुटुंब दालनला भेट दिली. प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवसाअखेर २० फ्लॅटसची नोंदणी झाली. शहरातील विविध भागात आपल्या हक्काचे घरकुल साकारण्यासाठी नामी संधी प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध झाल्याच्या भावना नागरिकांच्या आहेत. ग्राहकांना आकर्षित करून घेण्यासाठी खरेदीवर वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या आहेत. त्यामध्ये जीएसटी सवलत, भेटवस्तूंचा समावेश आहे.

शाहूपुरी जिमखाना मैदानावर प्रदर्शन सुरू आहे. बांधकाम व्यावसायिकांचे वेगवेगळे प्रकल्प, गृहप्रकल्पांना अर्थपुरवठा करणाऱ्या बँका, वित्तीय संस्था, गृहसजावटीच्या साहित्याचे स्टॉल्सनी 'दालन' सजले आहे. रविवार हा सुट्टीचा दिवस. अनेकांनी सुट्टी ही दालनमध्ये हक्काच्या घरकुलाच्या शोधात घालवली. बँका व वित्तीय संस्थांनी नोकरदारासह गृहकर्ज शेतकरी, दुग्धव्यावसायिकांसाठी गृहकर्ज योजना सुरू केल्या आहेत. वन बीएचके, टू बीएचके, थ्रीबीएचकेसह स्वतंत्र बंगलोज युनिट निवडण्याची संधी उपलब्ध झाली आहे. वास्तुशिल्पांची सुंदररित्या निर्मिती करताना त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली आहे.

बांधकाम व्यावसायिकांनी सर्वसामान्य ग्राहकांना परवडतील अशा दरात गृहप्रकल्पांची उभारणी सुरू केली आहे. सामान्यांच्या गरजा आणि बजेट डोळ्यासमोर ठेवून घरकुलाची रचना केली आहे. शहरातील नागाळा पार्क, ताराबाई पार्क, कदमवाडी, मार्केट यार्ड, खानविलकर पेट्रोल पंपाच्या पिछाडीस, राजारामपुरी, सम्राटनगर, शास्त्रीनगर, राजेंद्रनगर, संभाजीनगर, कळंबा परिसर, नाळे कॉलनी, सानेगुरुजी वसाहत, फुलेवाडी रिंगरोड परिसर, आपटेनगर, साळोखेनगर, जरगनगर, हनुमाननगर, कसबा बावडा, रमणमळा, फुलेवाडी, अंबाई टँक परिसरसह विविध भागात लहानमोठे गृहप्रकल्प सुरू आहेत. बांधकाम व्यावसायिकांनी या सर्व गृहप्रकल्पांची माहिती दालनमध्ये उपलब्ध केली आहे. उजळाईवाडी, कागल येथील गृहप्रकल्पांचे स्टॉल्स प्रदर्शनात आहेत.

कोल्हापूरमध्ये गुंतवणुकीला प्राधान्य

मुंबई, पुणे, बेंगळुरू, गोवा या शहरांशी जोडणारे शहर म्हणून व शिक्षण, नोकरी, व्यवसाय व रोजगारासाठी शहरात स्थलांतरित होणाऱ्या लोकांची कोल्हापूरला पसंती आहे. यामुळे कोल्हापुरात वास्तव्याला प्राधान्यक्रम देणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे बांधकाम व्यावसायिकांचे म्हणणे आहे. बांधकाम व्यावसायिकांनी ग्राहकांच्या आवडीनिवडी विचारात घेऊन प्रकल्पांची निर्मिती करावयास सुरुवात केली आहे. जलतरण तलाव, क्लब हाऊस, बास्केटबॉल कोर्ट, मंदिराची उभारणी, लहान मुलांसाठी चिल्ड्रन पार्क आणि प्रशस्त पार्किंगची सुविधा उपलब्ध केल्या आहेत. ग्राहकांच्या पसंतीस प्रकल्प उतरत असल्याने कोल्हापुरात रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक होत असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, साईक्स एक्स्टेंशन, राजारामपुरी, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ या मध्यवस्तीच्या भागात वन बीएचके व टू बीएचके फ्लॅटस रेडी पझेशनमध्ये आहेत.

परवडणाऱ्या घरांचेही प्रकल्प

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 'सर्वांसाठी घर'संकल्पनेवर आधारित गृहप्रकल्पाचा लाभ घेण्याची नागरिकांना संधी लाभली आहे. परवडणाऱ्या घरांचे प्रकल्प नजीकच्या कालावधीत सुरू होणार आहेत असे व्यावसायिकांनी सांगितले. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पहिले घर खरेदी करणाऱ्यांना अडीच लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. कोल्हापुरातील चार बांधकाम व्यावसायिकांचे परवडणाऱ्या घरातील घरांची निर्मिती करण्याचे प्रकल्प सरकारकडून मंजूर आहेत. आणखी दोन प्रकल्प सरकारकडे मान्यतेसाठी सादर केले आहेत. परवडणाऱ्या घरांतील गृहप्रकल्प जे सरकारकडून मंजूर आहेत त्यामध्ये ग्राहकांना अडीच लाख रुपयांची सवलत मिळणार आहे. यासाठी वन बीएचके घरासाठी तीन लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नाची अट आहे. महापालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजना कक्ष येथे लाभार्थ्यांनी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. दरम्यान महापालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या कक्षामध्ये गेल्या तीन दिवसांत एक हजाराहून अधिक नागरिकांनी परवडणाऱ्या घरांची चौकशी केल्याची माहिती या योजनेचे सामाजिक विशेष तज्ज्ञ युवराज झबडे यांनी सांगितले.

गृहप्रकल्प विषयक संपूर्ण माहिती एकाच ठिकणी मिळत असल्याने ग्राहकांना 'दालन'प्रदर्शनाला पसंती दिली आहे. तीन दिवसांत हजारो लोकांनी प्रदर्शनस्थळी भेट दिली. घरकुलांची चौकशी केली. फ्लॅटसचे बुकिंगही झाले आहे. शहरात सध्यस्थितीला ४०० च्या आसपास फ्लॅटस रेडी पझेशनमध्ये आहेत.

महेश यादव, अध्यक्ष क्रिडाई कोल्हापूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज बैठक

$
0
0

कोल्हापूर: ओबीसी भटके विमुक्त जनजागरण मोर्चातर्फे २५ फेब्रुवारीला आझाद मैदान येथे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या नियोजनासाठी ओबीसी सेवा फाऊंडेशनतर्फे सोमवारी (ता.११) बैठक आयोजित केली आहे. दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंगमधील सभागृहात सायंकाळी सात वाजता बैठक होणार आहे. या बैठकीला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी माळकर, पी. ए. कुंभार, अॅड. रणजित गुरव, दिगंबर लोहार, सुधाकर पेडणेकर आदींनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोटाबंदीनंतरचा चलनघोटाळा राफेलपेक्षा मोठा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'केंद्र सरकारने केलेल्या नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) ५०० आणि २ हजार रुपयांच्या नोटांची छपाई केली. याच्या छपाई आणि वितरणात दीड लाख कोटींपेक्षा अधिक रक्कमेचा घोटाळा झाला आहे. राफेलपेक्षा कितीतरी पटीने हा मोठा घोटाळा आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था खिळखिळीत झाली आहे. आता सुरू असलेल्या लोकसभा अधिवेशनात यावर खुलासा व्हावा, अन्यथा हायकोर्ट आणि सुप्रिम कोर्टात आरबीआयविरोधात फौजदारी याचिका दाखल केली जाईल,' असा इशारा राज्य कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे निमंत्रक आणि ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ विश्वास उटगी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिला.

विश्वास उटगी म्हणाले, '८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदी झाली. त्यानंतर दीडशे दिवसांत ५०० आणि २ हजार रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्या. यातील अतिरिक्त दीड लाख कोटींच्या नोटांचा हिशोब लागत नाही. आरबीआयने प्रसिद्ध केलेल्या वार्षिक अहवालातून हे चित्र समोर आले आहे. त्यामुळे या नोटा छपाई, वितरण करताना कोणत्या परवानग्या घेतल्या, याचा खुलासा रिझर्व्ह बँकेने करणे आवश्यक आहे. मात्र आतापर्यंत खुलासा करण्यात आलेला नाही. म्हणून संयुक्त संसदीय समिती स्थापन करून किंवा न्यायालयातर्फे चलन घोटाळ्याची चौकशी होऊ शकते. यासाठी नजीकच्या काळात कामगार समितीतर्फे लढाई केली जाईल.

काळा पैसा खणून काढणे, दहशतवाद्यांकडील खोट्या नोटा संपवणे अशी कारणे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी केली. ५०० आणि १ हजारांच्या नोटा बाद ठरवण्यात आल्या. नंतर चलनातून बाद ठरवलेल्या नोटा बॅँकेत भरण्याची मुदत देण्यात आली. त्यावेळी जिल्हा आणि नागरी बँकावर अन्यायी निर्बंध आणण्यात आले. सप्टेंबर २०१७ नंतर आरबीआयने जाहीर केलेल्या अहवालात ९९.३० टक्के चलन परत आल्याचे स्पष्ट झाले. यामुळे नोटाबंदीचा निर्णय फसल्यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले. बाजारपेठेत मंदी आली. जीडीपी पावणेदोन टक्क्यांनी घटली. आरबीआयच्या स्वायत्तेला हादर बसले. अजूनही ते कायम आहेत. सरकाचा मुखभंग झाला आहे.'

यावेळी सतिशचंद्र कांबळे, अनिल चव्हाण, बाळासाहेब बरगे, दिलदार मुजावर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालेभाज्यांची मोठी आवक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

थंडीचा कडाका वाढला असताना भाजीमंडईत पालेभाज्या, फळभाज्या स्वस्त झाल्याने ग्राहकांच्या उड्या पडल्या. भेंडीच्या दरात प्रतिकिलो दहा रुपयांनी वाढ झाली असून प्रतिकिलो ६० ते ८० रुपयांनी विक्री झाली. गवारीचा दरही प्रतिकिलो ८० ते १०० रुपयांवर टिकून होता. कारल्याच्या दरातही प्रतिकिलो दहा ते पंधरा रुपयांनी वाढ झाली आहे.

वांगी, वरणा, वाटाणा, फ्लॉवर, कोबी, गाजर यांची बाजारात मोठी आवक झाली आहे. वांग्याचा दर प्रतिकिलो १५ ते २० रुपये राहिला. मोठ्या आकाराचे फ्लॉवर मंडईत दाखल झाले असून प्रतिगड्डा १५ ते ३५ रुपयांनी विक्री सुरू होती. वरणा, वाटाण्याचा दर प्रतिकिलो वीस ते तीस रुपयांवर स्थिर होता. गाजरांची मोठी आवक झाल्याने प्रतिकिलो वीस रुपयांनी विक्री झाली. काकडीचेही बाजारात आगमन झाले असून प्रतिकिलो ४० ते ६० रुपये दर आहे. टोमॅटोचा दर ३० ते ४० रुपये तर दोडका ४० ते ५० रुपयांनी विकला गेला. पालेभाजांची मोठी आवक झाल्याने मेथी, चाकवत, कांदा पात, पोकळा, करडा,पेंढीचा दर पाच रुपये इतका होता. कोथंबीरही स्वस्त झाली असून प्रतिपेंढी पाच रुपयाने विक्री झाली.

फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो रुपयांत)

वांगी : १५ ते २०

टोमॅटो : ३० ते ४०

भेंडी : ६० ते ८०

ढबू : ४०

गवार : ८० ते १००

दोडका : ४० ते ६०

कारली : ६० ते ८०

वरणा : ३०

हिरवी मिरची : ४०

फ्लॉवर : १५ ते ४०

कोबी : १०

बटाटा : २० ते ३०

लसूण : ४०

कांदा : १५ ते २५

पालेभाजी दर (पेंढी रुपयांत)

मेथी : ५

कांदा पात : ५

कोथिंबीर : ५

पालक : ५

शेपू :१०

चाकवत : ५

करडा : ५

फळांचे दर (प्रतिकिलो रुपयांत)

सफरंचद : ६० ते १४०

डाळिंब : ४० ते ६०

मोसंबी : ३० ते ८०

चिकू : ४०

द्राक्षे : ४० ते ६०

केळी : २० ते ६० (डझन)

जवारी केळी : ३० ते ७० (डझन)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लगीन देवाचं लागलंशेकडो भाविकांच्या उपस्थितीत वसंत पंचमीला विठूरायाच्या डोक्यावर पडल्या अक्षता

$
0
0

लगीन देवाचं लागलं

शेकडो भाविकांच्या उपस्थितीत वसंत पंचमीला विठूरायाच्या डोक्यावर पडल्या अक्षता

म. टा. वृत्तसेवा, पंढरपूर

वसंत पंचमी अर्थात वसंताचा म्हणजेच निसर्गाचा उत्सव, सुंदर भासणारा निसर्ग वसंत ऋतूत सोळा कलांनी फुलून उठतो, याच मुहूर्तावर रविवारी साक्षात परब्रह्म पांडुरंग आणि जगन्माता रुक्मिणीचा विवाह सोहळा संपन्न झाला. या आगळ्या वेगळ्या विवाहाची धामधूम सकाळीपासूनच पंढरपुरात सुरू झाली होती. देवाच्या या विवाह सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी राज्यभरातून हजारो भाविकांनी पंढरीत गर्दी केली होती.

विवाह सोहळ्यासाठी पुणे जिल्ह्यातील भाविक भारत भुजबळ यांनी विविध रंगांची ट्रकभर रंगीबेरंगी फुलांनी मांडव अर्थात विठूरायाची राऊळी सजवून टाकली होती. सलग ४८ तास आणि पन्नास कलाकारांच्या मदतीने भुजबळ या भक्ताने देवाचा मांडव, विठ्ठल रुक्मिणी गाभारा, विठ्ठल सभामंडप, रुक्मिणी सभामंडपासह संपूर्ण मंदिर विविध रंगी गुलाब, ऑर्केड, जरबेरा, मोगऱ्यासह ३५ प्रकारच्या फुलांनी सजवले होते.

मंदिरात लग्नवधू अर्थात जगत्जननी रुक्मिणी मातेला हिरवी भरजरी पैठणी नेसविण्यात आली होती, तर नवरदेव विठूरायाला पांढरेशुभ्र करवतकाठी धोतर, पांढरी अंगी आणि पांढरी पगडी परिधान करून सजविण्यात आले होते. वसंत पंचमी असल्याने विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीवर गुलालाची उधळण करण्यात आली होती. वसंत पंचमी ते रंगपंचमीपर्यंत देवाला शुभ्र पोशाख करून मूर्तीवर गुलालाची उधळण करण्याची परंपरा गेली अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे.

विठ्ठल मंदिरातील सभा मंडपाला लग्नस्थळाचे स्वरूप देण्यात आले होते. संपूर्ण सभामंडप फुले आणि फुग्यांनी सजविण्यात आला होता. विठ्ठल रुक्मिणी स्वयंवराची भगताचार्य अनुराधा शेटे यांचे कथा सोहळा ऐकण्यासाठी हजारो महिलांनी येथे गर्दी केली होती. संपूर्ण भक्तात आनंदोत्सव दिसून येत होता. अखेर विवाह मंडपात नवरदेव विठूराया आणि नवरी रुक्मिणी मातेला आणण्यात आले. साक्षात देवाच्या लग्नासाठी जमलेल्या शेकडो वऱ्हाडींच्या उपस्थितीत विठ्ठल-रुक्मिणीच्या लग्नाची सुरुवात झाली. विठ्ठल-रुक्मिणीच्या सजवलेल्या उत्सव मूर्तींमध्ये आंतरपाट धरण्यात आला होता. वऱ्हाडींना अक्षता वाटून मंगलाष्टकाला सुरुवात झाली. खुद्द परमेश्वराच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी विठ्ठल भक्तांनी मंदिरात अलोट गर्दी केली होती. शुभमंगल सावधान म्हणताच देवाच्या डोक्यावर हजारो भाविकांनी अक्षता टाकल्या. शेवटच्या अक्षता पडताच आंतरपाट बाजूला काढून देव आणि मातेला पुष्पहार घालून आरती करण्यात आली. लग्नाच्या पंगती बसल्या, देवाच्या लग्नाला बुंदीचे लाडू, जिलेबीसह विविध पक्वान्नाचे सुग्रास भोजन भाविकांना देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बक्षीस वितरण

$
0
0

कोल्हापूर: प्रजासत्ताक दिन व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेचा बक्षीस समारंभ संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या हस्ते झाला. स्पर्धेत सारा मुल्ला, रसिका चव्हाण, आदित्य गवळी, विश्वजित कदम यांनी आपल्या गटात प्रथम क्रमांक पटकावला. सायकल, स्टडी टेबल, स्कूल बॅग व रोख रक्कम असे बक्षिसाचे स्वरुप होते. यावेळी आण्णासाहेब पाटील मराठा आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, जिल्हाप्रमुख विजय देवणे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधी वाटपात ‘राजकारण’

$
0
0

जिल्हा परिषदेचा लोगो

कोल्हापूर टाइम्स टीम

जिल्हा परिषदेत अखर्चित रकमेच्या ठरावास मंजुरी, 'स्थायी'तील ठरावावर स्वाक्षरी प्रकरणावर पडदा पडेपर्यंत समाजकल्याण आणि जलव्यवस्थापन समितीमधील निधी वाटपाचा तिढा निर्माण झाला. निधी वाटपावरुन नाराज झालेल्या सदस्यांनी आता समितीच्या बैठकावर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा घेतला आहे. निधी वाटपात समानतेचे सूत्र न ठरविता ठराविक सदस्यांना जादा वाटपाचे सूत्र अवलंबल्यामुळे राजकारणही उचल खात आहे. यामुळे सत्ताधारी पदाधिकाऱ्यांना विरोधी सदस्यांसह सत्तारुढ गटातील सदस्यांच्या विरोधाचाही सामना करावा लागणार आहे.

जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत नळ पाणी पुरवठा योजनेच्या विविध कामासाठी सव्वा दोन कोटी रुपयांच्या निधी वाटपाचा निर्णय झाला. मात्र या निधी वाटपात समिती सदस्यांना झुकते माप मिळावे यासाठी सदस्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकले. यामध्ये सत्तारुढ गटाच्या सदस्यांचाही समावेश होता. जलव्यवस्थापन समिती सदस्य शिवाजी मोरे, हेमंत कोलेकर, स्वरुपा जाधव, राणी खमलेटी यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला. शिवाय अध्यक्षा शौमिका महाडिक यांची भेट घेतली. त्यामध्ये त्यांनी गेल्या वर्षी कमी प्रमाणात निधी मिळाला, यंदा तरी समिती सदस्यांना जादा मिळावी, अशी मागणी केली.

समाजकल्याण समितीमधील निधी वाटपावरुन गेल्या आठवड्यापासून धुसफूस सुरू आहे. दलित वस्ती सुधारणा योजनेंतर्गत पथदिवे, समाजमंदिर, गटारी, रस्ते या कामासाठी निधी उपलबब्ध होतो. राज्य सरकारकडून समाजकल्याण विभागाला २२ कोटी, ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मंजूर निधीपैकी १५ कोटी, ७५ लाख रुपये जिल्हा परिषदेकडे उपलब्ध झाले आहेत. त्यापैकी १४ कोटी ७६ लाख रुपयांच्या निधी वाटपाचे नियोजन आहे. जिल्हा परिषदेकडे २९८ कामे प्रस्तावित झाली आहेत. समाजकल्याण विभागातही 'तळे राखेल तो पाणी चाखेल' या म्हणीची प्रचिती आली. पदाधिकाली, सभापती, आणि समिती सदस्यांनी जादा निधी घेतल्याचे तर इतर सदस्यांना कमी निधी दिल्यामुळे धुसफूस वाढली. सभापती व समिती सदस्यांनी ३० लाख रुपयापर्यंतचा निधी घेतला आहे तर बाकीच्यांना दहा लाख रुपयांची तरतूद केली आहे.

'समाजकल्याण'चा निधी करवीर, हातकणंगले, शिरोळकडे

दलित वस्ती सुधारणा योजनेंतर्गत मागासवर्गीय लोकसंख्या जास्त असलेल्या मतदारसंघासाठी जादा निधी खर्च करण्याची तरतूद आहे. यंदा वाटप केलेल्या निधीमध्ये करवीर तालुक्यासाठी तीन कोटी एक लाख, हातकणंगलेसाठी दोन कोटी ५५ लाख तर शिरोळसाठी दोन कोटी २५ लाख रुपयांचा निधी वाटप झाला आहे. आजरासाठी ४१, भुदरगडला ६०, चंदगड ६८, गगनबावडा २१, कागल एक कोटी २२ लाख, राधानगरी ८५, गडहिंग्लज व शाहूवाडी तालुक्यासाठी प्रत्येकी ८१ लाख रुपयांचा निधी वाटप झाला आहे.

सत्ताधारी आणि विरोधी सदस्यामध्ये निधी वाटपात भेदभाव होऊ नये. प्रत्येक मतदारसंघाच्या विकासकामासाठी पुरेशा प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. निधी वाटपामागे ग्रामीण भागातील भौतिक विकास ही संकल्पना आहे. निवडणूक व पदाधिकारी निवडीपुरतेच राजकारण सीमित असावे. निधी वाटपात राजकारण न करता प्रगल्भता दाखवावी.

विनय पाटील, सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठी भाषेची सक्ती करावी

$
0
0

कोल्हापूर: इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये अभ्यासक्रमात मराठी भाषा सक्तीची करावी, या मागणीसाठी नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडियाच्या कोल्हापूर शाखेच्यावतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्राचे राजकारण मराठी भाषेच्या अस्मितेवर सुरू असते. भाषा टिकवण्यासाठी प्रयत्न सुरू असताना शालेयस्तरावर मात्र मराठी विषयाला दुय्यम स्थान दिले जात आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुलांना प्रवेश घेण्यासाठी पालकांचा कल आहे. मात्र इंग्रजीच्या आग्रहापोटी शालेय वयात होणारे मराठीचे संस्कार मागे पडत आहेत हे वास्तव आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळेत चौथीपर्यंत मराठी विषय सक्तीचा नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना मराठी बोलता येत नाही. महाराष्ट्रात मराठी बोलता येणे आवश्यक आहे. त्यासाठी सरकारने शालेय अभ्यासक्रमात मराठी विषय सक्तीचा करण्याबाबत कायदा करावा, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनात पार्थ मुंडे, दस्तगीर शेख, अक्षय शेळके, सागर पोवार, किशोर आयरे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उरमोडीत धरणाच्या पाण्यावर तवंग

$
0
0

उरमोडीत धरणाच्या पाण्यावर तवंग

सातारा

उरमोडीत धरणाच्या पाण्यावर शुक्रवारी सकाळपासून डिझेल सदृश तवंग मोठ्या प्रमाणात पसरला आहे. मात्र, हा प्रकार नक्‍की काय आहे, या बाबत अधिकारीही संभ्रमात आहेत. हा तवंग नसून लाटा असल्याचा तर्कही अधिकाऱ्यांनी काढला आहे.

उरमोडीत धरणाच्या पाण्यावर अचानक ऑईल मिश्रित तवंग येऊ लागला. या बाबत अनेक तर्कविर्तक लढवले जात आहेत. उरमोडी धरणाच्या पाण्यामध्ये एखाद्या बोटीतून डिझेल किंवा ऑईल गळती झाली असेल, असा अंदाज रहिवासी करीत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात गळती झाली असेल, तर पाण्यातील प्राण्यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्‍त होत आहे. उरमोडी प्रकल्पाच्या भिंतीवर दोन्ही प्रवेशद्वारांवर खासगी सुरक्षा रक्षक आहेत. ते धरणाच्या सुरक्षेसाठी नव्हे, तर धरणाच्या भिंतीवरून जाणारी वाहने अडवण्यासाठी आहेत. धरणाच्या पाण्यामध्ये विना परवाना मासेमारी, बोटिंग सुरू असते. ही बाब उरमोडी धरण विभागाच्या अधिकाऱ्यांनाही माहिती असून, कारवाई मात्र होत नाही. उरमोडी प्रकल्पाच्या पाण्यात दर रोज बेसुमार मासेमारी होत असून, परिसरात बेकायदेशीर बांधकामे होत असल्याचे दिसून येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवाजीराव देशमुखलोकमान्यता लाभलेले नेते

$
0
0

शिवाजीराव देशमुख

लोकमान्यता लाभलेले नेते

म. टा. वृत्तसेवा, शिराळा

'सर्वसामान्य माणसांच्या कामाला न्याय देणारा व लोकमान्यता असणारा देव माणूस म्हणून शिवाजीराव देशमुख यांची

महाराष्ट्रामध्ये वेगळी ओळख होती,' अशा भावना शिराळा येथे विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या वतीने आयोजित सर्वपक्षीय स्मरण सभेवेळी अनेक मान्यवरांनी व्यक्त केली.

आमदार शिवाजीराव नाईक म्हणाले, 'शिवाजीराव देशमुख राजकारणातील माझे गुरू होते. संघर्षातून पुढे कसे जावे, हे देशमुख साहेबांनी शिकविले. देशमुख साहेबांनी वसंतदादा पाटील यांच्याकडे पाठपुरावा केल्याने चांदोली धरणाची निर्मिती झाली. दूरदृष्टी असणारे नेतृत्व म्हणून महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहत होता. त्यांच्यामुळेच शिराळा डोंगरी तालुका घोषित झाला. त्यांनी घालून दिलेला आदर्श आम्ही पुढे ठेऊन वाटचाल करू. त्यांच्या जाण्याने सामान्य माणसाचे नुकसान झाले आहे.'

माजी आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले, 'उत्तुंग व्यक्तीमत्त्व म्हणून देशमुख साहेबांची ओळख होती. या मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांनी

सातत्याने पाठपुरावा केला. कायम लोकांमध्ये राहत जनतेची सेवा केली.' धैर्यशील माने म्हणाले, 'देशमुख साहेबांनी राजकारणात कधीही कुणाला शत्रू मानले नाही. त्यांनी राजकारणात तत्वे जपली म्हणूनच ते इतका मोठा राजकीय प्रवास करू शकले.' रवींद्र बर्डे, रणजितसिंह नाईक, प्रतापराव पाटील, हणमंतराव पाटील, जयसिंगराव शिंदे, नगराध्यक्षा सुनंदा सोनटक्के, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष विजयराव नलवडे, भाजप तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष आनंदराव पाटील, शिराळा शहर कॉंग्रेस अध्यक्ष सम्राटसिंह शिंदे, महादेव कदम, देवेंद्र धस, सत्यजित कदम, एस. व्ही. पाटील, नगरसेविका अॅड. नेहा सूर्यवंशी, राजारामबापू साखर संचालक आनंदराव पाटील, विजय झिमुर, अजय पाटील यांची भाषणे झाली.

...........

फोटो ओळी

शिराळा येथे आयोजित सर्वपक्षीय शोकसभेत बोलताना आमदार शिवाजीराव नाईक, मानसिंगराव नाईक, सत्यजित देशमुख, रवींद्र

बर्डे, आनंदराव पाटील आदी

........

विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल

शिराळा : तडवळे (शिराळा) येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी संजय सदाशिव पाटील, विशाल सुभाष पाटील या दोन युवकांविरुद्ध शिराळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी दुपारी एकच्या दरम्यान घडली. तडवळे येथील मुलगी शिराळा बस स्थानकावरून घरी जात असताना मोटारसायकल वरून संजय पाटील व विशाल पाटील या दोघांनी पाठलाग करून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. या बाबत या मुलीने घडलेली घटना आपल्या पालकांना सांगितली. पालकांच्या तक्रारीनंतर शिराळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images