Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

रंगणार गल्लीचे गेट टुगेदार

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

गेली १२० वर्षे धान्य अडत दुकानांची परपंरा असलेले नष्ट्यांचं घर. शेजारी नासिपुडे, अथणे, पोहेवाले भिवटे, तोडकर महाराज यांची आड्याला आडं असणारी घरं. याच गल्लीत 'लाइफबॉय'चे माणगावे, सुगंधी अत्तरवाले, कटके, स्वामी यांच्या घराबरोबर सांगावकरांचे केश कर्तनालय, तुकाराम टेलर, किराणावाले डोंगरकर, मेणबत्तीवाले तांबोळी अशी विविध जाती धर्मांची कुटुंबे शनिवार पेठेतील नष्टे गल्लीत एकत्र नांदतात. व्यवसायात गुंतलेल्या नव्या-जुन्या पिढीतील लोकांना एकत्र आणण्यासाठी तरुणांनी 'व्हॅलेंटाइन डे'च्या पूर्वसंध्येला 'गल्लीचे गेट-टुगेदर' आयोजित केले आहे. या उपक्रमातून गल्लीतील नात्यांची वीण घट्ट करण्याचा प्रयत्न आहे.

व्यवसायाच्या व्यापातून वेळ काढून गप्पा माराव्यात, ज्येष्ठांबद्दल आदर व्यक्त करावा यासाठी गल्लीतील युवकांनी बुधवारी (ता. १३ फेब्रुवारी) सायंकाळी सहा वाजता बसंत बहार रोडवरील नष्टे मंगल कार्यालयात गेट टुगेदरचे आयोजन केले आहे. गल्लीतील दिवंगत व्यक्तींना आदराजंली वाहण्यात येईल. ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठांचा सत्कार करण्यात येणार आहे. अनेक लहानथोर मंडळी अनुभवकथन करतील. गप्पागोष्टींबरोबर करमणुकीच्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

शनिवारी पेठेतील नष्टे गल्लीला वाणी गल्ली म्हटले जाते. शहरातील विविध व्यावसायिकांची घरे या गल्लीत आहेत. १२० वर्षांची धान्य दुकानांची परंपरा असलेल्या नष्टे यांची दोन जुनी घरे आजही ऋणानुबंध टिकवून आहेत. नासिपुडे, अथणे, डॉ. गाडवे, भिवटे, मुंगळे, तोडकर, कटके यांची घरे आढ्याला आढे लागून आहेत. कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढल्याने काही सदस्य अन्य ठिकाणी रहायला गेले. पण गल्लीची ओढ त्यांना गप्प बसू देत नसल्याने ते दिवसातून एखादी फेरी जुन्या घराकडे मारतात. त्याशिवाय अनेकांना चैन पडत नाही. एकमेकांच्या सुखदु:खात सर्वजण सहभागी होतात. काहींनी जुनी घरे पाडून नवीन आरसीसी घरे बांधली. पण शंभर वर्षांपूर्वीची नष्टे, भोसले, अथणे, गाडवे यांची घरे अजूनही जुना बाज टिकवून आहेत. दिवसभर सचोटीने व्यापार करुन रात्री घरी परतल्यावर शेजाऱ्यांच्या घरात काही दुखलं-खुपलं तरी सर्वजण धावून येतात. नष्टे, नासिपुडे, गाडवे यांच्या घरासमोर दगडी पारावर अजूनही गप्पांचा फड जमतो.

आम्ही सर्वजण गल्लीवाले कामाधंद्यानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहोत. पण सर्वांनाच गल्लीची ओढ कायम आहे. सर्वांनी एकत्र येण्यासाठी गल्लीचे गेट-टुगेदर आयोजित केले आहे. नव्या पिढीला ज्येष्ठांनी केलेल्या कार्याची महती कळावी ही यामागची भावना आहे.

- राहुल नष्टे, धान्य व्यापारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिवाजी पूलप्रश्नी जोरदार खडाजंगी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पंचगंगा नदीवरील पर्यायी शिवाजी पुलाच्या कामात आडकाठी आणत असल्याचा आक्षेप घेत राष्ट्रीय महामहामार्ग विभागाचे उपअभियंता संपत आबदार आणि एकाच कामाचे बिल अनेकवेळा लिहिलेले शाखा अभियंता प्रशांत मुनगाठे यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत झाला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून बंदोबस्तात दोघांनाही बाजूला केले. जोरदार खडाजंगी, गोंधळ, अधिकाऱ्यांवरील प्रश्नांच्या सरबत्तीमुळे बैठक गाजली. महापौर सरिता मोरे, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची प्रमुख उपस्थिती होती.

जनरेट्यामुळे रेंगाळलेल्या पुलाचे काम ऑक्टोबरमध्ये सुरू झाले. आसमास कंपनीचे ठेकेदार एन. डी. लाड यांनी काम अंतिम टप्प्यात आणले. मात्र अधिकाऱ्यांत समन्वय नसल्याने आतापर्यंत दमडीही न मिळाल्याने चार दिवसांपासून लाड यांनी काम बंद ठेवले. काम पूर्ववत न झाल्यास जुना पूल बंद करण्याचा इशारा सर्वपक्षीय नागरी कृती समितीतर्फे दिला होता. या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले.

'वेळच्या वेळी बिले जमा केली आहेत, माझी चूक असेल तर आताच बडतर्फ करा', असा पवित्रा आबदार यांनी जिल्हाधिकारी सुभेदार यांच्यासमोर घेतला. यावर पदधिकाऱ्यांनी आक्रमकपणे आक्षेप घेतला. आबदार दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला. त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. आबदार यांच्या सांगण्यावरूनच शाखा अभियंता मुनगाठे यांनी बिलात खाडाखोड केल्याचा आरोप करण्यात आला. जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर त्यांच्या अंगावर धावून गेले. यावेळी शहर उपअधीक्षक प्रशांत अमृतकर, पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी हस्तक्षेप केला.

'आबदार यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार माझ्याकडे नाही', असे जिल्हाधिकारी सुभेदार यांनी सांगताच, कार्यकर्त्यांनी आम्ही कुणाकडे जायचे असा प्रतिप्रश्न केला. आबदार यांच्याकडून कामाचा कार्यभार काढून घ्या, असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंता विजय कांडगावे यांना दिला. त्यांनीही माझ्याकडे अधिकार नसल्याचे सांगताच कार्यकर्ते पुन्हा आक्रमक झाले. प्रश्नांचा भडिमार करण्यात आला. आपत्कालीन परिस्थिती म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना काम सुरू करण्याचे आदेश देता येतात, असे अशोक पोवार यांनी सांगितले. मात्र हे देखील सुभेदार यांनी नाकारले. यामुळे गोंधळ वाढतच गेला. शेवटी कार्यकारी अभियंता कांडगावे यांनी ठेकेदारास ९० लाखांचे बिल त्वरित दिले जाईल. बंद काम उद्यापासून सुरू करावे, असे आवाहन केले. पुढील मोजमाप लिहिणे, बिल देण्याची जबाबदारी कांडगावे यांनी घेतल्यास काम सुरू करतो असे, ठेकेदार लाड यांनी सांगितले. बैठकीस अॅड. महादेवराव आडगुळे, अॅड. पंडीतराव सडोलीकर, रमेश मोरे, माणिक मंडलिक, संभाजीराव जगदाळे, अशोक भंडारे आदी उपस्थित होते.

------------------

मलिदा खायला मिळते ते

एकाच कामाचे तीन, चार वेळा बिल का केले, असा जाब अभियंता प्रशांत मुनगाठे यांना स्वप्नील पार्टे यांनी विचारला. त्यांच्याकडून उत्तर मिळत नसल्याने मलिदा खायला मिळतो, तेच काम लवकर करता का, असा प्रश्न पार्टे यांनी विचारला. याच मुद्यावरून पोवार यांनीही मुनगाठे यांना जिल्हाधिकारी कार्यालय गेटच्या बाहेर गेल्यावर चोप देण्याचा इशारा दिला. तर एका कार्यकर्त्याने मुनगाठे यांचा कान धरून झोंबाझोंबी करण्याचा प्रयत्न केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

६० तोळ्यांचे दागिने लंपास

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

अत्यंत गजबजलेल्या जोतिबा रोडवरील कोलेकर (देसाई) ज्वेलर्स आणि बाबूजमाल रोडवरील महालक्ष्मी ज्वेलर्स ही दोन सराफ दुकाने फोडून सुमारे ६० तोळे सोन्याचे दागिने आणि दहा किलो चांदीचे दागिने असा २२ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. चोरट्यांनी एका दुकानातील तिजोरीही नेली. अवघ्या पंधरा मिनिटांत दोन्ही ठिकाणी हा चोरीचा प्रकार घडला. या घटनेने सराफ व्यावसायिकांत खळबळ उडाली आहे. सकाळी दहाच्या सुमारास चोरीचा प्रकार उघडकीस आला.

जोतिबा रोडवरील लक्ष्मी मुकुंद अपार्टमेंट येथे प्रमोद कल्लाप्पा कोलेकर (देसाई) यांच्या मालकीचे कोलेकर ज्वेलर्स हे दुकान आहे. या दुकानात पहाटे सव्वा चारच्या सुमारास तीन चोरट्यांनी प्रवेश करुन ही धाडसी चोरी केली. चोरीचा सर्व प्रकार सीसीटिव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. तिघे चोरटे एका व्हॅनमधून आल्याचे फुटेजमध्ये दिसते. चेहरा झाकलेल्या चोरट्यांनी पहाटे ३ वाजून ४८ मिनिटांनी हत्याराने दुकानाचे शटर तोडले. एकाने दुकानात प्रवेश करुन स्क्रू ड्रायव्हरने लॉकर फोडला. त्यातील साहित्य लंपास केले. देसाई यांच्या दुकानातही तिजोरी उचकटण्याचा प्रयत्न केला. मात्र ती फोडता आली नाही. त्यामुळे सोन्याचे दागिने ठेवलेली दोन बाय अडीच आकाराची तिजोरीच उचलून नेली. या तिजोरीला सायरन लावलेले होते. तरीही चोरट्यांनी धाडसी चोरी केली. यामध्ये ग्राहकांसाठी तयार केलेले बारशाचे व इतर सोन्या-चांदीचे दागिने होते. त्यानंतर काउंटरवरील दागिने लंपास केले. कोलेकर यांनी यांसंबंधीची फिर्याद दिली असून, ६०० ग्रॅम सोने, अंदाजे १५ ते २० किलो चांदी, तिजोरी अशा एकूण १८ लाख रुपये मुद्देमालाची चोरी केल्याचे म्हटले आहे. या अपार्टमेंटमध्ये सुरक्षारक्षक नसल्याचे उघड झाले आहे.

दुसऱ्या घटना बाबूजमाल रोडवर संतोष दिनकरराव शेळके (रा. फुलेवाडी, तिसरा स्टॉप) यांच्या मालकीच्या महालक्ष्मी ज्वेलर्समध्ये घडली. या दुकानाचा कडीकोयंडा उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. अवघ्या पंधरा मिनिटांत ड्रॉवर उचकटून सुमारे ७० ते ८० ग्रॅम सोन्याचे दागिने, चार किलो चांदी, रोख ६६ हजार रुपये असा पाच लाखांचा मुद्देमाल लंपास केला. ४ किलो चांदी आणि १०० ग्रॅम सोने, ६६ हजारांची रोकड लांबवल्याची फिर्याद त्यांनी दिली आहे.

घटनास्थळी शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, जुना राजवाडाचे पोलिस निरीक्षक मानसिंह खोचे, शाहूपुरीचे संजय मोरे, राजरामपुरीचे संभाजी म्हेत्रे, लक्ष्मीपुरीचे वसंत बाबर यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पाहणी केली.

.. ..

बादलीतून सोने नेले

कमी वेळात नियोजनबद्ध चोरी करण्याचा कट संशयितांनी रचल्याचे दिसून आले. दुकानातील वॉटर प्युरिफायरखाली बादली ठेवली होती. चोरट्यांनी काउंटरवरील दागिने बादलीतून नेल्याचे सीसीटिव्हीत दिसते.

. . . .

पाच पथके रवाना

एकाच टोळीने या चोऱ्या केल्या असून चोरटे सराईत आहेत, असा अंदाज शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी व्यक्त केला. चोरट्यांच्या शोधासाठी पाच पथके पाठविली आहेत. चोरटे लवकरच ताब्यात मिळतील, असेही ते म्हणाले.

. .. ..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेतनासाठी सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यातील जवळपास ६०० हून अधिक संगणक परिचालकांनी थकीत पगार, चालू पगार व अन्य कामांच्या मोबदल्यासाठी गुरुवारी दुपारी जिल्हा परिषदेवर धडक दिली. सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही वेतन न झाल्यामुळे संतप्त बनलेल्या परिचालकांनी ठेकेदार कंपनी व प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणेबाजी केली. काही कर्मचाऱ्यांनी रॉकेलच्या बाटल्या सोबत आणल्या होत्या. वेतनासंदर्भात ठोस निर्णयास विलंब लागत असल्यामुळे आंदोलक सामूहिक आत्मदहन करण्याच्या पावित्र्यात उतरल्याने यंत्रणेची धावपळ उडाली. सायंकाळी पाचच्या सुमारास प्रशासनाने सात दिवसात पगार करण्याचे पत्र दिल्यानंतर आंदोलन स्थगित केल्याचे संघटनेने म्हटले आहे.

कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलिस फौजफाटा, अग्निशमन दलाची गाडी दिवसभर जि.प.परिसरात तैनात होती. परिचालकांनी तीन तासांहून अधिक काळ जिल्हा परिषदेसमोरील रस्त्यावर ठिय्या मारला. कोल्हापूर जिल्हा संगणक परिचालक संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. या आंदोलनात जिल्ह्यातील ८०० पैकी ६९७ संगणक परिचालकांनी सहभाग झाला. हे कर्मचारी सीएएस, एसपीव्ही या कंपनीकडे काम करतात. ग्रामपंचायतीकडून या कर्मचाऱ्यांचा पगार जिल्हा परिषदेकडे जमा होतो आणि जि.प.मार्फत संबंधित कंपनीच्या खात्यावर रक्कम जमा होते. त्यानंतर कर्मचाऱ्यांना वेतन उपलब्ध होते. त्यांच्यापैकी काहीजण वर्षभरापासून तर काहीजण सहा महिन्यांपासून वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. सगळ्या कर्मचाऱ्यांची मिळून तब्बल दीड कोटी रुपये वेतनाची रक्कम थकीत आहे.

'वेतन आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, कर्मचाऱ्यांचा पगार नेलाय चोरांनी' अशा घोषणा देत परिचालकांनी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ठिय्या आंदोलन सुरू केले. काही परिचालकांनी सोबत रॉकेलच्या बाटल्या घेऊन आंदोलनस्थळी ठिय्या मारला. दरम्यान, पंचायत सशक्तीकरण अभियान अंतर्गत केंद्रीय पथक जिल्हा परिषदेच्या तपासणीसाठी दाखल झाले होते. यामुळे सगळे अधिकारी पथकासोबत होते. जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांच्याशी संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा झाली, पण त्यातून समाधानकारक तोडगा निघाला नाही. दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या कालावधीत परिचालक पुन्हा आक्रमक झाले. त्यांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणेबाजी केली. दहा मिनिटात प्रशासनाने मागण्यांची दखल घेतली नाही तर सामूहिक आत्मदहन करु, असा आक्रमक पवित्रा घेत काहीजण प्रवेशद्वारासमोर एकवटले. आंदोलन चिघळत असल्याचे लक्षात आल्यानंतर यंत्रणेची धावपळ उडाली. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस आंदोलकावर लक्ष ठेवून होते. अग्निशमन दलाची गाडी प्रवेशद्वारासमोर आणून उभी केली.

दरम्यानच्या कालावधीत सीईओ अमन मित्तल यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावले. संघटनेचे अध्यक्ष प्रकाश कांबळे, पांडूरंग सावंत, प्रदीप पाटील, शहाजी पाटील, सुनील जिणगरे, प्रकाश भोसले, उत्तम मोरे, अशोक करंबळे आदींच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची उपमुख्य कार्यकारी भालेराव यांच्यासोबत चर्चा झाली. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई यांनीही शिष्टमंडळासोबत चर्चा केली. सात दिवसांत वेतन जमा करण्याचे लेखी पत्र मिळाल्याशिवाय कार्यालय सोडणार नाही, असा आक्रमक पवित्रा पदाधिकाऱ्यांनी घेतला. सायंकाळी पाच वाजता पत्र मिळाल्यानंतर त्यांनी आंदोलन स्थगित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

bank robbery: यशवंत सहकारी बँकेच्या शाखेवर १ कोटीचा दरोडा

0
0

म .टा . वृत्तसेवा, कोल्हापूर/गगनबावडा

यशवंत सहकारी बँकेच्या शाखेवर रात्री चोरट्यांनी दरोडा टाकला. यात सुमारे एक कोटी रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. खिडकीचे ग्रील तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करून बँक लुटली. सकाळी नऊच्या सुमारास ही घटना उघड झाली. पान्हाळा तालुक्यातील कळे गावातल्या शाखेत हा दरोडा पडला. एवढया मोठया प्रमाणात पडलेल्या दरोडयाने कळे परिसर हदरला आहे.

कळे येथे बाजार भोगाव मार्गावर यशवंत सहकारी बँकेची शाखा मुख्य बाजारपेठेत आहे. गुरुवारी रात्री चोरट्यांनी बँकेच्या इमारतीच्या उजव्या बाजूच्या खिडकीचे ग्रील गॅस कटरच्या साहाय्याने तोडून बँकेत प्रवेश केला. त्यांनी प्रथम सी.सी.टी.व्ही. आणि संगणकीय यंत्रणेची वायर कापून ते बंद केले. त्यानंतर त्यांनी लॉकरच्या सभोवतीची जाळी कापून बँकेच्या ताब्यातील सोन्याच्या दागिन्यांची कलमे ताब्यात घेतली. तिजोरीचे लॉक कापून त्यातील ८ लाख ५७ हजार रुपयांची रोकड लंपास केली. यानंतर घटनास्थळी कळे पोलीस दाखल झाले आहेत. पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. ठसेतज्ञ व श्वानपथक घटनास्थळी दाखल झालं आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रायगडावर सोमवारी दुर्ग परिषद

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'महाराष्ट्रातील ऐतिहासिक गडकिल्ल्यांच्या संरक्षण, संवर्धन आणि स्वच्छतेसाठी कार्यरत असलेल्या राज्यातील १९६ संस्थांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत सोमवारी (ता. ११) एकदिवसीय दुर्ग परिषदेचे आयोजन केले आहे', अशी माहिती रायगड विकास प्राधिकरणचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.

परिषदेला राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावळ, रायगडचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, भारतीय पुरातत्व विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी उषा शर्मा, सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव भूषण गगराणी, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष आदिती तटकरे आदी उपस्थित राहणार आहेत.

खासदार संभाजीराजे म्हणाले, 'राज्यातील सर्व संघटनांना एका छताखाली आणून त्यांच्या ज्ञानाला व बुद्धिमत्तेला वाव देण्यासाठी प्राधिकरण प्रयत्न करत आहे. सरकार व समाज यांनी हातात हात घालून शिवरायांचा अमूल्य ठेवा जपण्यासाठी परिषदेचे आयोजन केले आहे. परिषदेच्या आयोजनातून रायगड संवर्धनाचे काम प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळणार आहे. राज्यात अंदाजे ३५० किल्ले असून त्यापैकी ४५ किल्ले केंद्रीय पुरातत्व खात्याकडे आहेत. राज्य पुरातत्व खात्याने ३३ किल्ले संवर्धन केले आहेत. उर्वरित सर्व किल्ले असंरक्षित असल्याने त्याची चिंता शिवभक्तांना आहे. राज्यात शास्त्रोक्त पद्धतीने गडकोटाचे संवर्धन काम कमी झाले आहे. सर्वसामान्यांना गडकोटांच्या संवर्धनाबद्दल आस्था असते. हे संवर्धन करताना येणाऱ्या अडचणी व त्याचे निराकरण कसे करायचे यावर परिषदेत चर्चा होणार आहे. परिषदेत गडकोटाशी निगडीत सर्व विभागांचे अधिकारी सहभागी होणार आहेत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उदगाव येथे अपघातात वृद्धा ठार

0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

दूध वाहतुकीच्या टेम्पोने धडक दिल्याने पादचारी वृद्धा जागीच ठार झाली. शिरोळ-उदगाव बायपास रस्त्यावर शुक्रवारी दुपारी बारा वाजता अपघात घडला. काशीबाई बाबूराव नंदीवाले (वय ६५, रा. नंदीवाले वसाहत, उदगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. याबाबत जयसिंगपूर पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी : दुधाचे कॅन भरलेला टेम्पो उदगाव-शिरोळ बायपास रस्त्यावरून स्वाभिमानी दूध डेअरीकडे जात होता. याचवेळी काशीबाई नंदीवाले कचरा टाकून रस्ता ओलांडत असताना टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेत गंभीर दुखापत झाल्याने त्या जागीच ठार झाल्या. याबाबत आक्काताई परशुराम नंदीवाले यांनी पोलिसांत वर्दी दिली आहे. याबाबत जयसिंगपूर पोलिसात नोंद झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दातृत्वाने समाज घडतो

0
0

फोटो आहे

कोल्हापूर टाइम्स टीम

'देणगी दानापेक्षा मोठी असते आणि शैक्षणिक कार्यास देणगी देणारे खऱ्या अर्थाने दातृत्वाने आदर्श ठरतात. म्हणून स्त्री शिक्षणासाठी कार्य करताना अभ्यासाबरोबर कौशल्य विकासावर भेर देणारी ताराराणी विद्यापीठ ही संस्था जिल्ह्यात आदर्श आहे,' असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. ताराराणी विद्यापीठाच्या उषाराजे हायस्कूलमध्ये देणगीदार पारितोष वितरण प्रसंगी बोलत होते.

आपण समाजाचेच काही तरी देणे लागतो या भावनेतून भावी पिढीला शैक्षणिक हातभार लागावा म्हणून उषाराजे हायस्कूलच्या विद्यार्थिनींकरीता देणगीरांनी देऊ केलेल्या पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. यावेळी गरीब, होतकरु, हुशार विद्यार्थिंनींना स्पर्धा परीक्षा, शालांत परीक्षा व क्रीडा स्पर्धामध्ये उज्ज्वल यश मिळवलेल्या विद्यार्थिंनींना गौरवण्यात आले.

समारंभास संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. क्रांतीकुमार पाटील, उपाध्यक्ष डॉ. एस. एन. पवार, सचिव प्राजक्त पाटील, जे. एस. पाटील, मुख्याध्यापिका एम. व्ही. जाधव, ए. यू. साठे, एस. डी. चौधरी, व्ही. डी. जमेनिस यांच्यासह देणगीदार उपस्थित होते. एस. बी. गुरव यांनी सूत्रसंचालन केले. आर. बी. टिपुगडे यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धान्य बाजाराकडे जाणारे रस्ते दर्जेदार करा

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'टेंबलाईवाडी येथे नुकताच धान्य बाजार स्थलांतरित झाला. त्यामुळे येथे येणाऱ्या अवजड वाहनांची संख्या वाढली असून येथील अरुंद व खराब रस्त्यांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. अशी कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा.' अशी मागणी शिवसेना शिष्टमंडळाच्यावतीने शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्याकडे बुधवारी केली.

निवेदनात म्हटले आहे, 'लक्ष्मीपुरी येथून टेंबलाईवाडी येथे धान्य बाजार स्थलांतरित झाला आहे. धान्य बाजाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर महापालिकेच्या शाळांसह एक ज्युनिअर कॉलेज आहे. त्यामुळे येथे विशेषत: विद्यार्थ्यांची वर्दळ असते. काही ठिकाणी अरुंद रस्ते असल्याने अवजड वाहनांना वळण घेताना चालकांना कसरत कारावी लागते. तसेच कोल्हापूरकडून हपुरीकडे जाताना टेंबलाईवाडी येथे मोठा सर्कल तयार करण्याची आवश्यकता आहे. नित्कृष्ट व अरुंद रस्त्यामुळे येथे अपघात होण्यापूर्वी आवश्यक उपाययोजना करा.' यावेळी दुर्गेश लिंग्रज, राजू यादव, शिवाजी जाधव, रवी चौगुले, दिलीप देसाई, दिनेश परमार, शशी बिडकर, आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनुष्यबळ पुनर्रचनेत पदे कमी होणार नाहीत

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'ग्राहक व कर्मचाऱ्यांच्या हितासाठी महावितरण कंपनीच्या व्यवस्थापनने 'मनुष्यबळ पुनर्रचना आराखडा'तयार केला आहे. यामुळे प्रत्येकाला मर्यादित व ठराविक स्वरुपाचे काम मिळणार आहे. पुनर्रचनेमुळे कोणतेही पद कमी होणार नाही.'असे प्रतिपादन महावितरणचे प्रकल्प संचालक भालचंद्र खंडाईत यांनी केले.

महावितरणमध्ये लवकरच मनुष्यबळ पुनर्रचना होणार आहे. ही पुनर्रचना नेमकी कशा प्रकारे होणार, त्याचे फायदे याबाबतची मत मतांतरे जाणून घेण्यासाठी खंडाईत हे दोन दिवस कोल्हापूर व सांगली दौऱ्यावर होते. कर्मचारी संघटना प्रतिनिधी सोबत जिल्हानिहाय बैठका घेऊन नवीन आराखड्याची माहिती दिली.

ते म्हणाले, 'मनुष्यबळ पुनर्रचनेमुळे पदोन्नती व सेवा ज्येष्ठतेवर परिणाम होणार नाही. यातून जिथे काम करणाऱ्या हातांची गरज आहे तिथे मनुष्यबळ देऊन प्रत्येकाच्या कामाचे वाटप निश्चित केले जाईल. पुनर्रचना करताना ज्या समस्या निर्माण होतील त्या हाताळण्यासाठी मुख्यालय स्तरावर सहा सदस्यांची समिती नेमली आहे. समिती जे बदल सुचवेल तसे अनुरुप बदल केले जातील. ग्रामीण भागासाठी पुरेसे मनुष्यबळ देता येईल. देखभाल दुरुस्ती व बिलींगसाठी स्वतंत्र रचना असेल. देखभाल दुरुस्तीकडे वेळीच लक्ष दिल्यास वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाणही कमी होईल.' यावेळी मुख्य अभियंता अनिल भोसले, अधीक्षक अभियंता ईब्राहिम मुलानी, शैलैंद्र राठोर, मनोज विश्वासे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छळप्रकरणी चौघांवर गुन्हा

0
0

आजरा : किटवडे (ता. आजरा) येथील विवाहिता नीलम अमोल कांबळे (वय २४, सध्या रा. वाटंगी, ता. आजरा ) हिने आपला मानसिक व शारीरिक छळ केल्याची तक्रार पती व नातेवाइकांविरोधात शुक्रवारी आजरा पोलिसांत दिली. सप्टेंबर ते डिसेंबर २०१८ दरम्यान अमोल नारायण कांबळे, नारायण काशिबा कांबळे, प्रभावती कांबळे व सरस्वती कांबळे (सर्व रा. किटवडे) यांनी आपल्याला लथाबुक्क्यांनी मारहाण तसेच शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार वरील चौघांवर गुन्हा नोंद झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात गणेश जयंती उत्साहात

0
0

फोटो आहे...अर्जुन टाकळकर

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

माघी गणेश जयंतीनिमित्त शहरातील गणपती मंदिरांमध्ये विविध धार्मिक उपक्रम, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. दिवसभर मंदिरांत दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली.

माघी गणेशजयंतीचे औचित्य साधून ओढ्यावरच्या गणपती मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली होती. सकाळी अभिषेक, पूजा व दुपारी प्रसादवाटप करण्यात आले. संभाजीनगर तरुण मंडळातर्फे गणेशप्रतिमा पूजन करण्यात आले. लक्ष्मीपुरी येथील स्वयंभू गणेश मंदिर, आर. के. नगर येथील गणेशमंदिर तसेच अंबाबाई मंदिरातील सिद्धिविनायक मंदिर, बिनखांबी गणेश मंदिर, जवाहरनगर, प्रतिभानगर येथील गणेश मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सकाळी पालखीसोहळा, दुपारी महाप्रसादाचा लाभ असंख्य भाविकांनी घेतला. बाप्पांच्या मूर्तीची आकर्षक पूजा बांधण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोमवारी प्रकट मुलाखत

0
0

कोल्हापूर: दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या सी.जी. कुलकर्णी वाड:मय मंडळातर्फे अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. अभिनेता, लेखक हृषिकेश जोशी हे मृणाल यांच्याशी संवाद साधणार आहेत. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विनोदकुमार लोहिया असतील. सोमवार दि. ११ फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता राम गणेश गडकरी सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सवंग लोकप्रियतेसाठीच कृषी सन्मान योजना

0
0

डॉ. बुधाजीराव मुळीक यांची टीका

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेंतर्गत दोन हेक्टरवरील शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. पण सहा हजार रुपयांची मदत तोकडी आहे. अनेक शेतकऱ्यांची खातेफोड नसल्याने योजनेपासून शेतकरी वंचित राहणार आहेत. खातेफोडीसाठी स्वतंत्र कायदा करण्याची आवश्यकता आहे. तसेच साखरेची दुहेरी किंमत निश्चित केल्यास निर्माण झालेला प्रश्न निकालात निघेल,' असा विश्वास ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी व्यक्त केला. प्रधानमंत्री कृषी सन्मान योजना सवंग लोकप्रियतेसाठीच जाहीर केल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

कोल्हापूर प्रेस क्लबच्यावतीने शुक्रवारी आयोजित वार्तालापामध्ये ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. मुळीक म्हणाले, 'कृषी सन्मान योजना जाहीर करताना सरकारने चुकीची आकडेवारी सादर केली. संपूर्ण योजनेशी मी सहमत नाही. गेल्या ४० ते ४५ वर्षांपासून शेतकऱ्यांची खातेफोड झालेली नाही. १८ वर्षानंतर सज्ञान झालेला पण शेती कसत असलेल्या युवकांची सातबारा दप्तरी नोंद नाही. परिणामी ते योजनेपासून वंचित राहतील. सवंग लोकप्रियतेसाठी योजना जाहीर केली असून त्यांना शेती कितपत कळली असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.'

ते पुढे म्हणाले,' कृषी उत्पादनाच्या किंमतीवर उत्पादन खर्च ठरता उपयोगी नाही. तर उत्पादन खर्चावर विक्रीची किंमत ठरली पाहिजे. देशातील एकूण साखरेच्या उत्पादनापैकी ६५ टक्के उद्योग तर ३५ टक्के साखरेचा उपयोग घरगुती वापरासाठी होतो. वापरल्या जाणाऱ्या साखरेचा दर वेगवेगळा ठेवल्यास डोमेस्टिक प्राईज वाढेल आणि ऊसदराचा प्रश्न निकालात निघेल. शेतकऱ्यांना अनुदान देण्यापेक्षा शेतीला आवश्यक सुविधा देऊन उत्पादन खर्चाएवढा दर मिळाला पाहिजे. त्यासाठी विमा संरक्षण देण्याची गरज आहे. उद्योगाला ज्याप्रमाणे इन्सेन्टिव्ह दिला जातो, त्याप्रमाणे शेती निर्यात मालावर इन्सेनटिव्ह दिला पाहिजे.' प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष समीर मुजावर यांनी स्वागत केले. सदानंद पाटील यांनी आभार मानले.

.......................

चौकट

'देशावर ६९ लाख कोटींचे कर्ज आहे. सातव्या वेतन आयोगामुळे ४० टक्के बोजा वाढला आहे. शेतकऱ्यांना सवलत दिल्यामुळे त्यामध्ये पाच टक्केची भर पडली तर बिघडले कोठे? खासदारांना निवृत्तीवेतन मिळण्यासाठी कायदा केला. त्यांना तहहयात वेतन मिळणार असेल, तर साखरेच्या दरांबाबत कायदा करण्यास विरोध का केला जातो?,' असा सवाल डॉ. मुळीक यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर शेतकऱ्यांना साखर देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करणे अडचणीचे असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेडिरेकनरचे दरप्रश्नी प्रयत्न करू

0
0

खासदार धनंजय महाडिक यांचे आश्वासन, क्रिडाई दालन २०१९ चे उदघाटन

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'विमानसेवा सुरू झाली आहे, रेल्वे, रस्त्यांच्या सुविधा चांगल्या झाल्याने कोल्हापूरशी संपर्क वाढत आहे. शहराचा विस्तार वाढत असल्याने आगामी काळात कोल्हापुरात बांधकाम व्यवसायाला चांगले दिवस येतील,' असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला. यावेळी रेडीरेकनरचा दर वाढू नये यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

येथील शाहूपुरी जिमखाना मैदानावर आयोजित 'क्रिडाई दालन २०१९' उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. महापौर सरिता मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

खासदार महाडिक म्हणाले, 'ड वर्ग शहरासाठीच्या बांधकाम नियमावलीत सुधारणा केल्या जात आहेत. जीएसटी लागू झाल्यानंतर अजूनही बांधकाम व्यवसायिकांना एलबीटी भरावा लागत आहे. यातून सुटका मिळण्यासाठी केंद्रीय जीएसटी समितीच्या माध्यमातून पाठपुरावा केला जाईल. अनेक वर्षांपासून रेंगाळलेली विमासेवा सुरू केली आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवेकरिता प्रयत्न केले जात आहेत. रेल्वेच्या फेऱ्या वाढवल्या जात आहेत. सातारा- कागल रस्ता सहा पदरीकरण कामाची निविदा निघाली आहे. यामुळे कोल्हापूरशी संपर्क वाढत आहे. मुंबईला विमानसेवा नियमित झाल्यास येत्या तीन, चार महिन्यात आयटी पार्कही येथे साकारेल. शहराचा विस्तार वाढत आहे. प्राधिकरणासाठी निधीची तरतूद झाल्यानंतर विकासाला गती येईल.'

पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजीत घाटगे म्हणाले, 'म्हाडातर्फे खासगी बांधकाम व्यवसायिकांच्या सहभागातून गृहनिर्माण प्रकल्प राबवले जात आहेत. त्यातील एक प्रकल्प कोल्हापुरात होत आहे. कागल, गडहिंग्लज येथेही प्रकल्प होण्यासाठी बांधकाम व्यवसायिकांशी संपर्क करीत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून सामान्यांना परवडतील या दराने घर दिले जात आहे. या योजनेला चालना मिळण्यासाठी काही त्रुटी दूर केल्या जात आहेत. या योजनेचा स्वतंत्र विभाग तयार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष लक्ष घातले आहे.'

क्रिडाईचे राज्य उपाध्यक्ष राजीव परीख म्हणाले, 'सामान्यांना परवडतील या दरात घरे मिळण्यासाठी सरकारकडून सवलती वाढवल्या पाहिजे.'

क्रिडाईचे अध्यक्ष महेश यादव म्हणाले, 'क्रिडाईच्या दालनला प्रत्येक वर्षी चांगला प्रतिसाद मिळतो आहे. एकूण १६० स्टॉल्सधारकांनी सहभाग घेतला आहे. जागेअभावी ४० स्टॉलधारकांना सहभागी होता आले नाही. बांधकाम व्यवसायिकांना सरकारच्या काही जाचक अटींचा त्रास होत आहे. त्या सोडवणे आवश्यक आहे.'

उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष योगेश जाधव यांचेही यावेळी भाषण झाले. दालन आयोजन समितीचे अध्यक्ष सचिन ओसवाल यांनी 'दालन २०१९' मधील वैशिष्ट्यांची माहिती दिली. यावेळी आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, नगरसेवक रत्नेश शिरोळकर, सत्यजित कदम, क्रिडाईचे उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर, सचिव के. पी. खोत, रेश्मा रेवाळे, निखिल अगरवाल यांच्यासह बांधकाम व्यवसायिक उपस्थित होते. विक्रांत जाधव यांनी आभार मानले.

...

कृती समिती तयार

' रेल्वे फेऱ्या वाढविण्यासाठी रूळांच्या दुहेरीकरणाचे काम होत आहे. मात्र कोल्हापूरच्या काही शेतकऱ्यांनी दुहेरीकरणाच्या कामास विरोध केला आहे. जमीन देणार नसल्याची भूमिका घेत नेहमीप्रमाणे कृती समिती तयार केली आहे. यामुळे दुहेरीकरणाचे काम रेंगाळल्याचा टोला खासदार महाडिक यांनी लगावला. तर क्रिडाईचे परीख यांनी भाषणात खासदार महाडिक पुढच्या दालनास येताना मंत्री होवून यावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. हा संदर्भ घेत खासदार महाडिक यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची साथ असल्यास पुढच्यावेळी मंत्री म्हणून दालनास येण्याचे परीख यांचे स्वप्न साकारेल, असे सांगितले.

...

अधिकाऱ्यांना २५ हजार

'शहरातील बी टेन्यूअरचा प्रश्न बांधकाम व्यवसायिक व सामान्य कुटुंबांनाही सतावत आहे. सरकारचे उत्पन्न वाढण्यासाठी बी टेन्यूअरच्या मिळकतींचा विकास करताना महसूल प्रशासनाकडून ना हरकतचा दाखला घ्यावा लागतो. मात्र या दाखल्यासाठी अधिकाऱ्यांना २५ हजार रूपये द्यावे लागतात. त्यामुळे उत्पन्न सरकारचे नव्हे अधिकाऱ्यांचे वाढते. यामुळे बी टेन्यूअरच्या अटीतून मुक्तता मिळायला हवी, अशी मागणीही क्रिडाईचे अध्यक्ष महेश यादव यांनी यावेळी केली.

...

कोट येणार आहे...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेतकरी हित साधणारे सरकार हवे

0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

'प्रतिवर्षी दुष्काळ, अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक आपत्ती येत असतात. अशावेळी सरकारने शेतकऱ्यांच्या मागे ठामपणे उभे राहून त्यांना मदतीचा हात देणे गरजेचे असते. मात्र, गेल्या चार वर्षांत हे घडले नाही. शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या झाल्या ही बाब दुर्दैवी आहे. चार वर्षांपूर्वी विकासाचा अजेंडा घेऊन भाजप सरकार सत्तेवर आले. मात्र, विकास झाला नाही. यामुळे आता शेतकरी, युवक, महिलांसह समाजातील सर्वच घटकांचा विचार करणारे सरकार आले पाहिजे, यासाठी पाठीशी राहा,' असे आवाहन इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांनी केले.

जयसिंगपूर येथे शरद सहकारी साखर कारखाना, शरद कृषी महाविद्यालय व शुअरशॉट इव्हेंट यांच्यावतीने हेरवाडे कॉलनी शिंदे मळा येथे पाचवे शरद कृषी प्रदर्शन आयोजित केले आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शरद कारखान्याचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर होते.

यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, माजी जि.प. अध्यक्ष नानासाहेब गाट, उद्योगपती विनोद घोडावत, भवानीसिंग घोरपडे, पं. स. सभापती अर्चना चौगुले, कुरुंदवाडचे नगराध्यक्ष जयराम पाटील, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, मल्लाप्पा चौगुले आदींसह मान्यवर प्रमुख उपस्थित होते.

रोहित पवार म्हणाले, 'राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कृषिमंत्री असताना शेतकरी हिताची अनेक धोरणे राबविली. यामुळे शेतकरी समृद्ध झाला. ग्रामीण भागात सहकाराचे जाळे विणले. यामुळे युवकांना रोजगाराच्या संधी मिळाल्या. देशातील १२५ कोटी जनतेला अन्नधान्य पुरविण्याचे काम येथील शेतकरी करतो. शेतीमालाला रास्त भाव मिळाला पाहिजे, एवढीच त्यांची माफक मागणी आहे. मात्र, आज शेतकऱ्यांचा विचार सरकार दरबारी होताना दिसत नाही. यामुळेच आता परिवर्तन गरजेचे आहे.'

डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, 'शिरोळ तालुक्यात शेतीत विविध प्रयोग सुरू असतात. एकरी १४३ टन ऊस उत्पादन काढणारे शरद कारखान्याचे शेतकरी आहेत. परिसरातील सर्वच शेतकऱ्यांना नवनवे तंत्रज्ञानाची माहिती व्हावी याच उद्देशाने शरद कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. शेतकऱ्यांना उसाची एफआरपी मिळाली पाहिजे. मात्र, साखरेचे दर गडगडले आहेत. ३४०० रुपये साखरेचा विक्री दर झाला पाहिजे. राज्य व केंद्र सरकार याकडे लक्ष द्यायला तयार नाही.'

विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, नानासाहेब गाट, कुरूंदवाडचे नगराध्यक्ष जयराम पाटील, धनपाल आलासे, शरद कारखान्याचे संचालक सुभाषसिंग रजपूत यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी रोहित पवार यांनी फित कापून प्रदर्शनाचे उद्घाटन केले. प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. प्रकाश पाटील-टाकवडेकर यांनी स्वागत केले. शरदचे संचालक डी. बी. पिष्टे यांनी आभार मानले.

याप्रसंगी एम. के. पाटील, सय्यद बुखारी, सोहेब पटेल, उपनगराध्यक्ष योगेश पुजारी, कुरुदवाडचे उपनगराध्यक्ष अक्षय आलासे, जयसिंगपूरचे उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, जि.प.सदस्या परवीन पटेल, पं.स.सदस्य सुरेश कांबळे, जयपाल कुंभोजे, आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

करवाढीचे प्रस्ताव नामंजूर

0
0

महापालिका लोगो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

घरफाळा, नगररचना, इस्टेट, पाणीपुरवठा, अग्निशमन व परवाना आदी करारात महापालिकेच्या २०१९-२० च्या अर्थसंकल्पात कोणतीही वाढ केली जाणार नाही. शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासनाने करवाढीचा प्रस्ताव सादर केला. मात्र वाढीव कराराचा प्रस्ताव स्थायी समितीने नामंजूर केला. पण वाणिज्य वापरातील मिळकतींच्या भाडेतत्वाचा प्रस्ताव मंगळवारी (ता.१२) महापालिकेच्या महासभेसमोर चर्चेला ठेवण्याचा निर्णय घेतला.

नागरी वसाहतीत पायाभूत सेवासुविधा पुरविणे व देखभाल दुरुस्तीसाठी कर आकारणी केली जाते. त्यामध्ये घरफाळा, नगररचना, इस्टेट, पाणीपुरवठा, आरोग्य, अग्निशमन, परवाना आदी करांची आकारणी केली जाते. गेल्या चार वर्षांपासून महापालिकेच्या कोणत्याही विभागाची करवाढ झालेली नाही. तोच कित्ता यावर्षी पुन्हा गिरवला जाणार आहे. करवाढीचा निर्णय घेतला जात नसल्याने त्याचा परिणाम उत्पन्नावर होत आहे. उत्पन्नच मर्यादित राहत असल्याने पर्यायाने त्याचा परिणाम शहराच्या विकासावरही होत आहे.

२०१९-२० चा अर्थसंकल्प तयार करण्यासाठी प्रशासनाची लगबग सुरू आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून लागू होण्याची शक्यता असल्याने अर्थसंकल्प तयारीने वेग घेतला आहे. महसुली उद्दिष्ट पार करण्याबरोबरच पुढील वर्षाचे उद्दिष्ट निश्चित करण्यासाठी महापालिकेच्या कर संकलन होणाऱ्या विभागांनी करवाढीचे प्रस्ताव तयार केले होते. करवाढीचे प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आले, मात्र समितीने सर्व प्रस्ताव नामंजूर केले.

स्थायी समितीच्या या निर्णयामुळे शहरवासियांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा, नगररचना, आरोग्य व अग्निशमन आदी सेवा देणाऱ्या विभागांचा कर गेल्या वर्षी एवढाच राहील. मात्र अर्थसंकल्पात कररचनेत कोणतीही वाढ होणार नसल्याने, महापालिकेचे उत्पन्नही तेवढेच राहणार आहे. महापालिकेकडून २०११ पासून भांडवली मूल्यांवर आधारित घरफाळा आकारणी केली जात आहे. त्यामुळे इतर शहरांपेक्षा जास्त घरफाळा असला, तरी त्यानंतर घरफाळ्यात एकदाही वाढ झालेली नाही. परिणामी २०१८-१९ चा घरफाळा वाढीचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला. पण हा प्रस्ताव महासभेसमोर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

...

कोट

'प्रशासनाने सेवा पुरवणाऱ्या विभागांच्या करात वाढ करणारा प्रस्ताव दिला होता. पण यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये कोणत्याही करामध्ये वाढ न करण्याचा निर्णय सभेत घेतला.

शारंगधर देशमुख , सभापती, स्थायी समिती

...........................

चौकट

घरफाळाप्रश्नी निर्णय प्रलंबित

नागरिकांना सेवा देण्यासाठी कर आकारणीला सुरुवात झाली. त्यासाठी काही निकष ठरवून अंमलबजावणी करण्यासाठी अधिनियम तयार केला. त्याचे अधिकार ज्या-त्या स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले. स्थानिक पातळीवर अधिकार दिले असले, तरी राज्य सरकारच्या उद्दिष्टापेक्षा कर आकारणी कमी करता येत नाही. तरीही आकारणी केली, तर लेखापरीक्षण अहवालात प्रशासनावर गंभीर ताशेरे ओढण्याची शक्यता असल्याने घरफाळा कमी करण्याचा निर्णय प्रलंबित राहत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्षाला १६ कोटी खड्यांत

0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : जिल्ह्यातील राज्य, जिल्हा, ग्रामीण रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी प्रत्येक वर्षी सरासरी १६ कोटी रूपये खर्च होतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी येऊनही सध्या या रस्त्यावरील खड्डे पाहिले तर हा निधी नेमका जातो कुठे असा प्रश्न पडत आहे. मात्र, नव्या नियमावलीनुसार पूर्वीपेक्षा चांगल्या प्रकारे खड्डे भरण्याचे काम होते आहे. मात्र अवजड वाहनांची वर्दळ, पावसाच्या अधिक प्रमाणामुळे वारंवार खड्डे पडत असल्याचा प्रशासनाचा हास्यास्पद युक्तिवाद आहे.

राज्य, जिल्हा मार्गावरील खड्डे सार्वजनिक बांधकाम तर ग्रामीण रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून केले जाते. पावसाळ्यात पडलेले खड्डे डिसेंबरअखेर भरणे बंधनकारक असते. प्रत्येक वर्षी सरासरी खड्डे भरण्यासाठी दोन्ही यंत्रणेकडून १६ कोटी खर्च होतात. सार्वजनिक बांधकाम प्रशासनाने आठ कोटीं खड्डे भरण्यासाठी खर्च केले. तरीही राज्य, जिल्हा मार्गावर खड्डे दिसतातच.

प्रामुख्याने राधानगरी, चंदगड, पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यातील रस्त्यांची दयनीय स्थिती आहे. जि. प. बांधकाम प्रशासनाने अजूनही ग्रामीण भागातील रस्ते भरण्याच्या कामाचा नारळही फुटलेला नाही. आठ कोटींचा निधी सरकारकडून प्राप्त झाला असूनही लालफितीत अडकले आहेत. बांधकाम प्रशासन कामाची यादी नसल्याचे सांगून निधी खर्च करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप जि. प. सदस्यांकडून होत आहे. म्हणूनच रस्ते खड्डेमय आहेत. अपघातांच्या घटना घडत आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभाग द्विवार्षिक रस्ते देखभालीचे नवे धोरण दोन वर्षांपासून राबवत आहे. यामध्ये कमीत कमी १० किलोमीटरपेक्षा अधिकचा रस्ता निविदा काढून वर्षभर देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर सोपवण्यात आली आहे. हा ठेका एका बड्या ठेकेदाराला मिळाला. त्यांचे मंत्रालयापर्यंत कनेक्शन असल्याने खड्ड्यांकडे पाहण्यास त्यांना वेळच नाही. ते काम झाले आहे ते दर्जाहीन असल्याचे धाडस उपअभियंता, अभियंता पातळीवरील अधिकाऱ्यांना होत नाही.

पावसाळ्यात पडलेले खड्डे डिसेंबर अखेर भरून पूर्ण केले आहेत. अवजड वाहतूक असलेल्या रस्त्यावर वारंवार खड्डे पडतात. ते तातडीने भरले जातात. खड्डे भरण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून वर्षभर सुरू असते.

संजय सोनवणे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

ग्रामीण रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी ८ कोटी रूपये सरकारकडून जि. प. बांधकाम विभागाकडे प्राप्त झाले आहेत. मात्र अजूनही खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही. ग्रामीण रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. वाहनधारकांना खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागत आहे.

सतीश पाटील, बांधकाम समिती सदस्य, जि. प.

जिल्ह्यातील रस्ते आणि वाहने

१०७२ किमी

राज्यमार्ग

१६०५ किमी

जिल्हामार्ग

४४६६ किमी

ग्रामीण रस्ते

१३, ६७,८६७

जिल्ह्यांतील वाहनांची संख्या

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुभाष पाटील यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

0
0

फोटो ओळ...

मंडल कृषी अधिकारी सुभाष पाटील यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित राजेंद्र साबळे, जे. के. महाडिक, डी. जी. मुलाणी, जाकीर मुलाणी, राजेंद्र कुंभार, विष्णू माने, आदी.

००००००

म. टा. वृत्तसेवा, सांगली

खानापूर (जि. सांगली) येथे कार्यरत असलेले मंडल कृषी अधिकारी सुभाष शिवाजीराव पाटील नुकतेच सेवानिवृत्त झाले. यानिमित्त त्यांचा व त्यांच्या पत्नी अलका यांचा सत्कार कृषी विभाग, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना सांगली, दि सांगली सॅलरी अॅनर्स को-ऑप सोसायटी सांगली व मित्र मंडळ यांच्यावतीने करण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साबळे होते.

सुभाष पाटील यांनी कागल, आगर, भोसे, मिरज, तासगाव, कडेगाव, विटा येथे सेवा बजावत असताना शेतकरी प्रशिक्षण, रोजगार हमी योजना, शेतीचे नवीन प्रयोग शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे. यावेळी सुभाष पाटील यांचे वडील शिवाजी पाटील, आई आक्काताई यांचाही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला राज्य कर्मचारी संघटना सांगलीचे अध्यक्ष जे. के. महाडिक, कार्याध्यक्ष डी. जी. मुलाणी, जाकीर मुलाणी, नगरसेवक राजेंद्र कुंभार, विष्णू माने, नगरसेविका कल्पना कोळेकर, बी. बी. लाड, पी. वाय. जाधव, आदी उपस्थित होते. विकास माळवदे यांनी स्वागत केले. पी. एन. काळे यांनी सूत्रसंचालन केले.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेकापतर्फे महिला मेळावा

0
0

कोल्हापूर: भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडीच्यावतीने महिला मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रम रविवारी पार पडला. शाहीर रंगराव पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी महिला सबलीकरण, स्त्रीभ्रूण हत्या व बेटी बचाव यावर प्रबोधनात्मक पोवाडा सादर करून महिलांमध्ये जनजागृती केली. अध्यक्षा माजी जिल्हा परिषद सदस्या लता कांदळकर होत्या. यावेळी आघाडीच्यावतीने संक्रातीचे वाण, हळदी-कुंकुचे वाटप करण्यात आले. यावेळी ज्योती पाटील, राधिका पाटील, इंदुताई पाटील, मीनाक्षी पाटील, रेखा पोवाळकर, वैशाली खाडे, राजश्री सावंत, गीता कदम, शीतल पोवाळकर आदी उपस्थित होत्या. जिल्हाध्यक्षा अॅड. उज्ज्वला कदम यांनी प्रास्ताविक केले. वैशाली सूर्यवंशी यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images