Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

दहा कोटींची रस्त्याची कामे रखडली

$
0
0

जिल्हा परिषदेचा लोगो वापरावा...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेत निधी वाटपावरून सत्ताधारी आघाडीला कोंडीत पकडण्याची खेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केली आहे. अखर्चित रकमेच्या ठरावावरील सहीच्या प्रकरणावर पडदा पडण्याअगोदर जिल्हांतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीच्या दहा कोटींच्या निधीवरून सदस्य पुन्हा आक्रमक होत आहेत. 'स्थायी'त रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळूनही ठराव पाठविण्यास विलंब होत असल्याच्या निषेधार्थ विरोधी सदस्य मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची मंगळवारी भेट घेण्याच्या तयारीत आहेत.

जिल्हा परिषदेच्या ३०५४ व ५०५४ या योजनेंतर्गत रस्ता दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर आहे. जिल्हा परिषदेची स्थायी समितीची २६ डिसेंबरला आजऱ्यात बैठक झाली. या बैठकीत रस्त्यांच्या कामांना मंजुरी मिळाली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. स्थायी समिती सभापतींनी त्या सभेमधील सही झालेले ठराव अद्याप बांधकाम विभागाकडे पाठविले नाहीत असा आक्षेप काँग्रेस, राष्ट्रवादी व सत्ताधारी आघाडीतील काही सदस्यांचा आहे.

दरम्यान, जिल्हा परिषदेत भाजप आघाडीसोबत असलेल्या आवाडेप्रणित ताराराणी आघाडी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदस्यांनी अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या कामकाजाविरोधात उघडपणे भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. शिवसेनेचे काही सदस्यही विरोधकांच्या सुरात सूर मिसळत असल्याने आघाडीअंतर्गत संघर्ष उफाळला आहे. आवाडे गट एकीकडे जिल्हा परिषदेत सत्तेत आहे, त्याचवेळी अध्यक्षा महाडिक यांच्याविरोधात कुरघोडी करण्याची एकही संधी दवडत नसल्याचेही चित्र आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता नजीकच्या काळात लागण्याची चिन्हे आहेत. विकासकामांना फटका बसू नये म्हणून सर्वसाधारण सभेचे अधिकार स्थायी समितीला दिले आहेत. दुसरीकडे अध्यक्षा महाडिक यांनी अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन विकासकामांची पूर्तता करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, सत्ताधारी व विरोधी आघाडीतील राजकारणाने उचल खाल्ली आहे. यामुळे विकासकामांवर विपरित परिणाम होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.

जिल्ह्यातील बहुतांश भागातील रस्त्यांची कामे प्रस्तावित आहेत. मंजूर कामे सुरू करून बिल मार्चअखेर खर्ची पडणे आवश्यक आहे. मात्र, 'स्थायी'च्या पदाधिकाऱ्यांकडून हेतूपुरस्पर ठराव पाठविण्यास विलंब होत असल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे. रविवारी दोन्ही काँग्रेस, आवाडे गट, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदस्यांनी रस्ता दुरुस्तीचे ठराव तत्काळ बांधकाम विभागाकडे पाठवावेत यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची मंगळवारी भेट घेण्याचे ठरविले आहे. यासंदर्भात बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तुषार बुरुड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तो होऊ शकला नाही.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘भाजपसोबत न गेल्यास सेनेचे नुकसान होईल’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात शिवसेनेला केवळ दोन जागा मिळतील, असा निष्कर्ष अलीकडे झालेल्या एका सर्व्हेत आला आहे. त्यामुळे चार वर्षे जहरी टीका करणारी शिवसेना राममंदिराच्या मुद्द्यावर भाजपसोबत राहू शकते. न राहिल्यास शिवसेनेचेच अधिक राजकीय नुकसान होईल,' असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक पत्रकार हेमंत देसाई यांनी व्यक्त केले.

जगन फडणीस स्मृती ट्रस्टतर्फे लक्ष्मीपुरीतील आयुर्वेद पंचकर्म सेंटरमध्ये आयोजित वार्तालापमध्ये ते बोलत होते.

देसाई म्हणाले, 'सत्तेत राहूनही शिवसेनेच्या मंत्र्यांना नेत्रदीपक कामगिरी करता आली नाही. भाजपवर टीका करून त्यांनी विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी विरोधक म्हणून सक्रिय झाल्याने शिवसेनेत संभ्रम निर्माण झाला आहे. युती करावी की नको, या पेचात सेना सापडली आहे. याउलट भाजप बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या असे ज्वलंत प्रश्न प्रचारात येऊ नयेत यासाठी नियोजनबद्ध मोर्चेबांधणी करीत आहे.'

आपल्या सोयीसाठी भाजपने जनतेतून थेट नगराध्यक्ष, सरपंच निवडीची प्रक्रिया अमलात आणली. याप्रमाणे मुख्यमंत्री, पंतप्रधान निवड होऊ शकत नाही. भाजप अप्रत्यक्षपणे माध्यम स्वातंत्र्याची गळचेपी करीत आहे. वस्तुनिष्ठ पत्रकारिता करणाऱ्या संपादकांना राजीनामा देण्यास भाग पाडले आहे. जाहिरातींवर निर्बंध आणण्यात आले. लोकशाही बळकट, प्रगल्भ होण्यासाठी विवेकवाद जागृती ठेवून स्वयंसेवी संस्था, संघटनांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

००००

चौकट

परिणामकारकता कमी होते

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी चार वर्षांत सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवला नाही. आता लोकपाल नियुक्तीसाठी ते उपोषण करीत आहे. त्यांच्या अशा भूमिकेमुळे उपोषणाची परिणामकारक कमी झाली. केवळ लोकपालाची नियुक्ती करून भ्रष्टाचार कमी होणार नाही. व्यवस्थेत सुधारणा होणे गरजेचे आहे, असे मत देसाई यांनी व्यक्त केले.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यळगूड पोस्ट कार्यालयात चार कोटींचा अपहार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, हुपरी

यळगूड (ता. हातकणंगले) येथील पोष्ट ऑफिसमधील काही कर्मचाऱ्यांनी ५८० खातेदारांच्या 'आर. डी.' (रिकरिंग डिपॉझिट) खात्यातून बेकायदेशीररित्या परस्पर पैसे काढून सुमारे चार कोटींचा अपहार झाल्याची चर्चा आहे. संबधित खातेदारांनी तक्रार केल्यानंतर कोल्हापूर विभागीय पोष्ट कार्यालयाच्यावतीने या प्रकाराच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली आहे. या घटनेमुळे हुपरी परिसरात खळबळ उडाली असून सर्वसामान्य महिलांनी भरलेल्या पैशांचा अपहार झाल्याने खातेदार हवालदिल झाले आहेत. यासंदर्भात सोमवारी (ता. ४) फिर्याद दाखल होण्याची शक्यता आहे.

यळगूड येथील साखरपे, पाटील, जोशी नामक या तीन एजंटांनी परिसरातील अंदाजे ५८० ग्राहकांकडून आर. डी.चे पैसे गोळा करुन २०१३ पासून पोष्ट ऑफिसमध्ये भरले. या आर.डी.ची मुदत नोव्हेंबर २०१८ मध्ये संपली. त्यामुळे काही ग्राहकांनी पोष्ट ऑफिसमध्ये किती रक्कम झाली याची आणि खात्याची चौकशी केली. यावेळी तेथे गेलेल्या खातेदारांना सर्वाच्या खात्यातील आर.डी.चे पैसे अगोदरच काढून घेतले गेल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संतापलेल्या ग्राहकांत मोठा गदारोळ उडाला. काही खातेदारांनी कोल्हापूर विभागीय पोष्ट कार्यालयात तक्रार केल्यानंतर तत्काळ चौकशी समिती नेमण्यात आली आहे. समितीकडून सुरू असलेल्या चौकशीत अनेक गंभीर बाबी उघडकीस येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. ५८० खातेदारांचे सुमारे चार कोटी रुपये परस्पर उचलण्यात आल्याचे, त्यांचा अपहार झाल्याचे दिसून येत आहे. तत्कालीन सब पोष्टमास्तर व एका कर्मचाऱ्याने हा अपहार केल्याची तक्रार खातेदारांनी केली असून सोमवारी (ता. ४) याबाबत रितसर चौकशी होऊन हुपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

या घटनेमुळे हुपरी परिसरात खळबळ उडाली असून सर्वसामान्य महिलांचे पैसे यामध्ये अडकल्याने हवालदिल झाले आहेत.

एजंट शिक्षिका अडचणीत

हुपरीसह परिसरात आर.डी.चे पैसे जमा करण्यासाठी दोन महिला शिक्षिका कार्यरत होत्या. पैसे भरल्यानंतर झालेल्या अपहारामुळे 'त्या' शिक्षिका अडचणीत येण्याची चिन्हे असल्याने त्यांच्या 'पतीराजांनी' संबधित खातेदारांची भेट घेऊन नरमाईचे धोरण अवलंबण्यासाठी विनवणी केली.

पासबूकची पाने फाडली, चुकीचे शिक्के

यळगूड पोष्टात ५८० खातेदारांनी एजंटाकडे भरलेल्या कोट्यवधी रुपयांच्या अपहारास कारणीभूत असलेल्या संबंधीतांनी काही खातेदारांच्या पासबुकांची पाने फाडून टाकली आहेत. तर काहीच्या पासबुकांवर चुकीच्या तारखांचे शिक्के मारल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नेमक्या किती रक्कमेचा अपहार झाला याची निश्चिती अद्याप झालेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात अपुरा पाणीपुरवठा

$
0
0

कोल्हापूर : महापालिकेच्या शिंगणापूर उपसा केंद्राजवळ वीजपुरव‌ठा खंडीत झाल्यामुळे रविवारी शहराच्या बहुतांशी भागात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. दोन दिवसांपूर्वी शिंगणापूर येथील बटुकेश्वर मंदिराजवळ मुख्य जलवाहिनीला गळती लागल्यामुळे अपुरा पाणीपुरवठा झाला होता. रविवारी पूर्ण दाबाने पाणी येण्याची शक्यता होती. पण वीज पुरवठा खंडीत झाल्याने पुन्हा कमी दाबाने पाणी मिळाले. शुक्रवारी शिंगणापूर योजनेतील मुख्य जलवाहिनीला गळती लागली. दिवसभर गळती काढल्यानंतर शनिवारी काँक्रिटीकरण करण्यात आले. तरीही दोन दिवस पाणी कमी दाबाने येत होते. रविवारी पाणीपुरव‌ठा सुरळीत होईल, अशी अपेक्षा असताना उपसा केंद्राजवळ वीज पुरवठा खंडीत झाला. त्यामुळे पूर्ण क्षमतेने पाणी उपसा होऊ शकला नाही. परिणामी रविवारीही दिवसभर अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. सोमवारपासून पाणी पुरवठा सुरळीत होईल, असे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बचावात्मक नव्हे, आक्रमकपणे काम हवे

$
0
0

फोटो आहे...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'पक्षहितासाठी आम्ही शिरोळ, हातकणंगलेतील मतभेद मिटवून एकत्र आलो. आता परिवर्तनाला सुरुवात झाली आहे. तेव्हा प्रत्येक तालुक्यातील नेते, पदाधिकाऱ्यांनी एकसंध होण्याची आवश्यकता आहे. कारण काँग्रेस बळकटीकरणाची माझी समीकरणे पक्की आहेत. पक्षासाठी आता बचावात्मक नव्हे तर आक्रमकपणे काम करायचे आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी लागेल ती करायची हिंमत ठेवावी. प्रत्येक तालुक्यातील नेत्यांनी आपसातील मतभेद मिटवले तर संपूर्ण जिल्हा काँग्रेसमय होईल,'असा विश्वास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी तालुका पदाधिकाऱ्यांत जागविला.

जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आवाडे यांनी पहिल्यांदाच तालुकाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांसोबत काँग्रेस कमिटीत बैठक घेतली. यावेळी ते म्हणाले 'काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांचा राजकारणातील प्रवेश भाजपला मोठा झटका आहे. पक्षाचा जनाधार वाढत असल्याने सत्ताधारी भाजपची मनस्थिती बिघडली आहे. मोदी सरकारच्या कारभाराला सगळे कंटाळले आहेत. रोष मतपेटीतून उमटण्याठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्याची कामगिरी पार पडावी. काँग्रेस एकसंध करण्याची माझ्याकडे काही जादूची कांडी नाही. संघटन बांधणी, पक्ष म्हणजे हा जगन्नाथाचा रथ आहे. जे सोबत येतील त्यांना घेऊन वाटचाल करायची, जे येणार नाहीत त्यांचा विचार बाजूला ठेवा.'

राधानगरी तालुकाध्यक्ष हिंदुराव चौगुले म्हणाले, '१९९९ मध्ये राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर काँग्रेसमध्ये फूट पडली. माजी अध्यक्ष पी. एन. पाटील व प्रकाश आवाडे यांनी काँग्रेस वाचवली. निवडणुकीत काँग्रेसचा पराभव भाजपमुळे नव्हे तर पक्षांतर्गत गटबाजीमुळे झाला. प्रत्येक तालुक्यात या चुका सुधारुन अध्यक्षांनी ससर्व पदाधिकाऱ्यांना सांभाळून कामकाज करावे.' करवीर तालुकाध्यक्ष शंकर पाटील यांनी, प्रत्येक तालुक्यात भांडण, गटतट आहेत. त्या गटबाजीला मूठमाती दिल्यास जिल्हा शंभर टक्के काँग्रेसमय होईल. शिवाय जिल्ह्यात काँग्रेसचे आठ आमदार होतील.' तालुकाध्यक्ष जयसिंग हिर्डेकर, शामराव देसाई, बजरंग पाटील, युवक काँग्रेसचे बयाजी शेळके, अमर गोडसे, आदींची भाषणे झाली.

अॅड. सुरेश कुराडे यांनी प्रास्ताविक केले. शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांनी आभार मानले. याप्रसंगी माजी आमदार दिनकरराव जाधव, प्रकाश सातपुते, बंडा माने, प्रकाश मोरे, विलास गाताडे, एस. के. माळी आदी उपस्थित होते.

०००००

शहरातून सेनेचा आमदार हे दुर्दैव

'काँग्रेस सोन्यासारखी आहे, पण नेतेमंडळींचे कान पितळेचे अशी स्थिती आहे. पक्षात खऱ्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी. कोल्हापुरात राजर्षी शाहूंचे नाव घेतल्याशिवाय कुठलाही कार्यक्रम होत नाही. पण शहरातून शिवसेनेसारख्या जातीयवादी पक्षाचा आमदार निवडून येतो हे पुरोगामी शहरासाठी दुर्दैवी बाब आहे,' असे मत महंमदशरीफ शेख यांनी मांडले. ज्येष्ठ कार्यकर्त्या सरला पाटील यांनी प्रियांका गांधींविषयी बदनामीकारक वक्तव्ये करणाऱ्या भाजप नेत्यांचा निषेध केला.

००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंतप्रधानांनी लेहमधून केले ‘सायबर’मधील सेंटरचे उद्घाटन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

छत्रपती शाहू इन्सिस्ट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन अॅन्ड रिसर्च (सायबर) संस्थेतील इंटरप्रिटनशिप डेव्हलपमेंट सेल व स्कील हबचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, रविवारी लेह येथून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केले. 'रुसा' योजनेतून देशभरातील संस्थांना अनुदान देण्यात आले असून कोल्हापुरात 'सायबर'ची निवड झाली आहे. दरम्यान, 'सायबर'चे संस्थापक प्रा. डॉ. ए. डी. शिंदे यांच्या नवव्या पुण्यतिथीनिमित्त व्याख्यान, रक्तदान शिबिर, ग्रंथ प्रदर्शनही झाले.

रविवारी दुपारी ईडी सेल लॉचिंग कार्यक्रमावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, आमदार अमल महाडिक, प्र-कुलगुरू डी. टी. शिर्के, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे, प्रतिभा दीक्षित, डॉ. एस. जी. कुलकर्णी, कार्यकारी विश्वस्त डॉ. आर.ए. शिंदे, डॉ. व्ही. एम. हिलगे, डॉ. एम. एम. अली, विशाखा आपटे, ऋषिकेश शिंदे आदी उपस्थित होते.

ईडी सेलच्या प्रमुख डॉ. विशाखा आपटे यांनी उपक्रमाची माहिती दिली. 'केंद्र सरकारच्या स्टार्टअप योजनेतून ईडी सेल उपक्रमासाठी सायबरची निवड झाली आहे. विभागात सर्व सुविधेबरोबर मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाणार आहे. नवीन उद्योग, व्यवसाय सुरू करताना येणाऱ्या आव्हानांना तोंड कसे द्यायचे याचे शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात येणार आहे. ग्राहकांची पसंती, बाजारपेठेचा अभ्यास, आर्थिक घडामोडीचे ज्ञान दिले जाणार आहे. व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकारी, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक संस्थांकडून मदत घ्यावी लागते. ती मिळवण्यासाठी लागणारी माहिती दिली जाणार आहे. त्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, अनुभवी व्यक्तींना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.

दरम्यान शिंदे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ संस्थेच्यावतीने सकाळी डॉ. शिंदे यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. संस्थेच्या प्रागंणात आनंद ग्रंथत्सोवाचे आयोजन केले आहे. ग्रंथोत्सवाचे उद्घाटन संस्थेचे विश्वस्त डॉ. व्ही. व्ही. उपाध्ये यांच्या हस्ते झाले. त्यामध्ये पुस्तक प्रकाशकांचे २६ स्टॉल लागले आहेत. यावेळी सचिव डॉ. रणजित शिंदे, डॉ. जयसिंगराव पवार आदी उपस्थित होते.

०००००

गांधींच्या पर्यावरण धोरणाचा अभ्यास व्हायला हवा

स्थानिक नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करुन पर्यावरणाचा कमीत कमी ऱ्हास करुन विकास व्हावा, असे गांधीजीने अर्थशास्त्र मांडले. आजच्या चंगळवादी व भांडवलशाही अर्थशास्त्रात महात्मा गांधींच्या पर्यावरण धोरणाचा अभ्यास होण्याची गरज आहे, असे मत डॉ. अशोक चौसाळकर यांनी व्यक्त केले. सायबरचे संस्थापक प्रा. डॉ. ए.डी. शिंदे यांच्या नवव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. महात्मा गांधी, काल आणि आज हा व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी माजी आमदार श्रीपतराव शिंदे होते.

डॉ. चौसाळकर म्हणाले, पहिल्या गोलमेज परिषदेत महात्मा गांधी यांनी जगातील साम्राज्यावादी देशाच्या तावडीतून सुटका होण्यासाठी तिसऱ्या जगातील देशांनी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली होती. साम्राज्यावादी देश तिसऱ्या जगातील देशात भांडवलशाही रुजवताना तेथील पर्यावरण व स्थानिक रोजगाराचा नाश करतात असे त्यांचे म्हणणे होते. म्हणून गांधीजींनी स्वयंपूर्ण ग्रामविकास ही कल्पना मांडून गावातच निसर्गाचा ऱ्हास न होता रोजगार उपलब्ध होण्याची भूमिका मांडली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपचारासाठी अनुदानात वाढ हवी

$
0
0

सध्या प्रशासनातर्फे 'कॅन्सर शोध मोहिमें'तर्गत कॅन्सर रुग्णांना उपचारासाठी पंधरा हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. कॅन्सरवरील उपचार खर्च हा महागडा आहे. त्यामुळे रुग्णांच्या वैद्यकीय उपचारासाठी प्रशासनाकडून मिळणारी मदत अत्यल्प आहे. जिल्हा नियोजन समितीतून या उपचारासाठी जादा रकमेची तरतूद करायला हवी. जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद प्रशासनाने यासाठी पाठपुरावा केला तर रुग्णांना आर्थिक हातभार लागणार आहे. पालकमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घातल्यास निधीची तरतूद होवू शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार कोटी घरफाळा जमा

$
0
0

महापालिका लोगो

Maruti.Patil@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर : वाणिज्य व रहिवासी मिळकतदारांकडे थकीत घरफाळा वसुलीसाठी महापालिकेने दंडाला ५० टक्के सवलत देणारी योजना सुरू केली. योजनेचा शहरातील सात हजार ३०० मिळकतदारांनी लाभ घेतला. यामुळे महापालिकेच्या तिजोरीत चार कोटी २८ लाखांचा घरफाळा जमा झाला असून, त्यापैकी एक कोटी ८६ लाखांची थकबाकी आहे. मार्चपर्यंत सवलत योजना सुरू राहणार असल्याने थकीत घरफाळा वसुलीने मोठी भर महापालिकेच्या उत्पन्नात पडण्याची शक्यता आहे.

शहरातील मिळकतदारांकडे २००८-०९ पासून घरफाळा थकीत आहे. चालू थकीतसह एकूण ३३ कोटी रुपये थकीत रक्कम आहे. थकीत रकमेवर महापालिकेकडून दंड आकारणी सुरू केली. तरीही मिळकतदार घरफाळा जमा करण्यास फारसे इच्छुक दिसत नव्हते. थकीत रक्कम वाढत जात असल्याने त्याचा परिणाम महापालिकेच्या उत्पन्नावर दिसू लागला. तसेच विकासकामांवर परिणाम झाला. १५ लाखांपेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या मिळकतदारांची सुनावणी घेण्यात आली. थकीत रक्कम वसूल करण्यासाठी महापालिकेच्या महासभेत घरफाळा दंडावर ५० टक्के सवलत देण्याचा ठराव केला. डिसेंबरमध्ये झालेल्या ठरावाची अंमलबजावणी एक जानेवारीपासून करण्यात आली.

ठरावानुसार जुन्या व चालू थकीत ६८ हजार मिळकतदारांना फायदा होणार होता. योजना सुरू झाल्यापासून शहरातील सात हजार ३०० मिळकतदारांनी योजनेत सहभागी होत चार कोटी २८ लाखांचा घरफाळा जमा केला आहे. त्यामध्ये एक कोटी ८६ लाख थकीत रकमेचा समावेश आहे. त्यामुळे सवलत योजनेचा चांगला परिणाम समोर आला आहे. मिळतदारांनी चालू घरफाळा, थकबाकी व दंड अशी एकत्रित रक्कम भरून योजनेचा फायदा घेतला आहे.

योजनेला सुरुवात करताना जे मिळकतदार थकबाकी भरणार नाहीत, अशांची यादी तयार करण्याचे कामही प्रशासनाने सुरू केले आहे. सवलतीच्या कालावधीत थकीत रक्कम जमा न केल्यास मिळकती जप्त करण्याची कारवाई प्रशासन करणार आहे. तसेच १५ लाखांपेक्षा जास्त घरफाळा असलेल्या २८ मिळकतदारांची सुनावणी घेतली आहे. त्यापैकी २२ मिळकतदारांनी घरफाळ्याची रक्कम जमा केली आहे. सवलत योजनेचा सर्व मिळकतदारांनी फायदा घेतल्यास महापालिकेच्या तिजोरीत सात कोटींची सवलतीची रक्कम जमा होणार आहे.

०००

चौकट....

एक लाख ४७ हजार

एकूण मिळकती

७१ कोटी ६६ लाख

एकूण घरफाळा

४१ कोटी ५ लाख

चालू घरफाळा

२९ कोटी ७४ लाख

थकीत घरफाळा

१९ कोटी १८ लाख

चालू थकीत घरफाळा

४४ कोटी २२ लाख

एप्रिल ते ३१ जानेवारी घरफाळा जमा

००००००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साखर जप्ती टाळण्यासाठी पंधरा दिवस मुदत

$
0
0

कोल्हापूर : साखर कारखान्यांकडील थकीत एफआरपीच्या वसुलीसाठी कोल्हापूर विभागातील बारा कारखान्यांना तहसीलदारांनी नोटिसा पाठवल्या आहेत. सात ते पंधरा दिवसांत कारखान्यांनी एफआरपी जमा न केल्यास साखर जप्तीची नामुष्की कारखान्यावर ओढवणार आहे.

साखर आयुक्तांच्या आदेशानंतर प्रशासनाने थकीत एफआरपी वसूल करण्यासाठी १२ कारखान्यांच्या जंगम व स्थावर मालमत्ता जप्त करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने तहसीलदारांना कारवाईचे आदेश दिले. कारवाईचा पहिल्या टप्पा म्हणून कायद्याने जिल्ह्यातील दत्त शिरोळ, गुरुदत्त शुगर्स, संताजी घोरपडे, पंचगंगा, इको केन, वारणा, जवाहर कारखान्यांना नोटिसा बजावल्या. नोटिशीनंतर कारखान्यांनी प्रतिटन २३०० रुपयांप्रमाणे हप्ता जमा केला. पण शिल्लक एफआरपीची रक्कम भरली नसल्याने कारखान्यांची साखर जप्त केली जाणार आहे. सात ते पंधरा दिवसांची मुदत दिली असल्याने १६ फेब्रुवारीपर्यंत कारखान्यांना एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ढगाळ वातारणाचा किरणोत्सवात अडथळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील किरणोत्सवात पहिल्या दिवासाचा अपवाद वगळता उर्वरीत चार दिवस ढगाळ वातारणाचा अडथळा कायम राहिला. आज अखेरच्या, पाचव्या दिवशीही किरणोत्सव झाला नाही. त्यामुळे भाविकांची निराशा झाली.

मंदिराच्या स्थापत्य रचनेनुसार वर्षातून दोनदा किरणोत्सव होतो. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या निकषानुसार पाच दिवसांच्या किरणोत्सवात येणारे मानवनिर्मित अडथळे येत आहेत. हे अडथळे महानगरपालिका आणि देवस्थान समितीने हटवले होते. पहिल्याच दिवशी किरणे देवीच्या मानेपर्यंत पोहोचली. त्यामुळे नंतर पूर्ण क्षमतेने किरणोत्सव होण्याची शक्यता होती. पण त्या दिवशी किरणांनी देवीचा चरणस्पर्श केला. नंतरचे दोन दिवस ढगाळ वातारणांचा किरणोत्सवात अडथळा आला. आज रविवारी, अखेरच्या पाचव्या दिवशी किरणोत्सव होईल या आशेने भाविकांनी गर्दी केली होती. मात्र ढगाळ वातारणामुळे सूर्यकिरणे देवीच्या पायाखालील कटांजंनापर्यंत पोहोचली आणि मूर्तीच्या डावीकडे वळली. सलग चार दिवस किरणोत्सव न झाल्याने भाविकांची निराशा झाली. देवस्थान समितीने किरणोत्सव पाहण्यासाठी मंदिराच्या आवारात चार टीव्ही स्क्रीन बसविले होते. किरणोत्सवावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, संगीता खाडे यांच्यासह पदाधिकारी, श्रीपूजक, भाविक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ओवेसींनी मराठ्यांना शहाणपणा शिकवू नये’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

'खासदार ओवेसींच्या पूर्वजांच्या छावणीचे कळस कापणाऱ्या मराठ्यांना त्यांनी शहाणपणा शिकवू नये. मराठा समाज अशांना भीक घालत नाही. त्याला महाराष्ट्रातील छत्रपतींचा मुस्लिम मावळा उत्तर देईल,' असा सज्जड इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे प्रमुख आबासाहेब पाटील यांनी दिला. नृसिंहवाडी येथे रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आबासाहेब पाटील नृसिंहवाडीत दत्त दर्शनासाठी आले होते. यावेळी मराठा समाजाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी समाजाच्या पुढील आंदोलनाविषयी दिशा स्पष्ट केली. खासदार ओवेसी यांनी मराठा समाज मोठा भाऊ नसल्याची टीका केल्याच्या पार्श्वभूमीवर आबासाहेब पाटील यांनी, ओवेसींच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. इचलकरंजी येथील सुरेश पाटील यांच्या मराठा क्रांती सेना पक्षावर टीका करीत पक्ष समाजाला विचारून काढला काय? समाजाने मान्यता दिली आहे का? असा सवाल करीत त्यांनी समाजात राजकारण करणाऱ्यांना विरोध असल्याचा निर्वाळा दिला.

६० वर्षांत १६ मुख्यमंत्री झाले. मात्र, राजकीय स्वार्थासाठी त्यांनी मराठा आरक्षण प्रश्न प्रलंबित ठेवला. सध्याच्या सरकारने प्रश्न मार्गी लावला आहे. त्यामुळे हे आरक्षण कोर्टात टिकवणे सरकारची जबाबदारी आहे. आरक्षणाला काही ओबीसी संघटनेच्या माध्यमातून छगन भुजबळ, पंकजा मुंडे विरोध करीत आहेत. त्याला ठोक मोर्चा आपल्या स्टाईने उत्तर देईल, असेही पाटील यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला अनंत धनवडे, सागर धनवडे, शशिकांत पुजारी, गुरू धनवडे, अविनाश भोसले, आदी उपस्थित होते.

०००००००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दौलत’साठी तालुका संघाला साथ द्या’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, चंदगड

'दौलत चालवायला घेताना मला राजकारण आणायचे नाही. मला आमदारकीचे स्वप्ने पडताहेत म्हणून दौलत सुरू करण्याचा मी स्टंट करीत आहे, असा अपप्रचार सुरू आहे, हे दुर्दैवी आहे. दौलत साखर कारखाना हा शेतकरी सभासदांचाच राहीला पाहीजे हे दिवंगत माजी आमदार नरसिंगराव पाटील यांचे स्वप्न होते. वडिलांचे स्वप्न व शेतकरी सभासद व कामगारांचा विचार करून चंदगड तालुका संघामार्फत दौलत सुरू करण्याचा प्रयत्न आहे. त्याला कामगारांनी साथ द्यावी' असे आवाहन तालुका संघाचे अध्यक्ष राजेश पाटील यांनी केले.

शिनोळी (ता. चंदगड) येथे संघाच्या कार्यालयात आयोजित कामगारांच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हा बँकेने दौलत चालविण्यास देण्यासाठी निविदा प्रसिध्द केली होत्या. चंदगड तालुका संघ दौलत चालविण्यास घेण्यासाठी इच्छुक आहे. त्या पार्श्वभूमीवर कामगारांबरोबर आयोजित चर्चेत ते बोलत होते. जानबा चौगुले यांनी प्रास्ताविक केले.

राजेश पाटील म्हणाले, 'स्वतःचे भागभाडंवल नसतानाही बऱ्याच कंपन्या आल्या आणि शेतकरी, सभासद, कामगारांना आगीच्या खाईत लोटून गेल्या. त्यामुळे दौलतशी संबंधित सर्व प्रमुख घटकांशी चर्चा करणार आहे. कारखान्याच्या उभारणीत सर्व कामगारांनी साथ द्यावी.'

यावेळी तालुका संघाचे व्यवस्थापक एस. वाय. पाटील, दौलत कामगार संघटनेचे प्रदीप पवार, अर्जुन कुंभार, सुरेश भातकांडे, जे. जी. पाटील, राजेंद्र पावसकर, बाबूराव नेसरकर, नारायण तेजम, आदी उपस्थित होते. पोमानी पाटील यांनी आभार मानले.

फोटो

शिनोळी (ता. चंदगड) येथे आयोजित कामगारांच्या बैठकीत बोलताना संघाचे चेअरमन राजेश पाटील, शेजारी उपस्थीत मान्यवर.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भेंडी, गवारीच्या दरात वाढ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पालेभाज्या व फळ भाज्यांची मोठी आवक झाली आहे. मात्र, भेंडीच्या दरात प्रतिकिलो दहा रुपये तर गवारीच्या दरात २० रुपयांनी वाढ झाली. भेंडीचा दर प्रतीकिलो ६० ते ७० तर गवारीचा दर ८० ते १०० रुपये आहे. पालेभाज्या स्वस्त झाल्याने ग्राहकांकडून मागणी वाढली आहे.

वांगी, वरणा, वाटाणा, फ्लॉवर, कोबी, गाजर यांची मोठी आवक झाली आहे. वांग्याचा दर प्रतिकिलो १५ ते २० रुपये राहिला. वरणा, वाटाण्याचा दर प्रतिकिलो वीस ते तीस रुपयांवर स्थिर आहे. गाजरांची मोठी आवक झाल्याने प्रतिकिलो वीस रुपयांनी विक्री झाली. काकडीचेही बाजारात आगमन झाले असून प्रतिकिलो ४० ते ६० रुपये दर आहे. कोबी प्रतिगड्डा दहा तर फ्लॉवरचा दर २० रुपये होता. टोमॅटोचा दर २० ते ३० रुपये तर दोडका ४० ते ५० रुपयांनी विकला गेला. पालेभाजांची मोठी आवक झाल्याने मेथी, चाकवत, कांदा पात पेंढीचा दर पाच ते दहा रुपये इतका होता. कोथंबीरही स्वस्त झाली असून प्रतिपेंढी पाच ते दहा रुपये दराने विक्री झाली. द्राक्षाची आवक मोठ्या प्रमाणात झाली असून प्रतिकिलो ४० रुपयांनी विक्री सुरू आहे.

फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो रुपयांत)

वांगी : १५ ते २०

टोमॅटो : ३० ते ४०

भेंडी : ६० ते ७०

ढबू : ४०

गवार : ८० ते १००

दोडका : ४० ते ६०

कारली : ४०

वरणा : ३०

हिरवी मिरची : ४०

फ्लॉवर : १५ ते २५

कोबी : १० ते २०

बटाटा : २० ते ३०

लसूण : ४०

कांदा : १५ ते २५

पालेभाजी दर (पेंढी रुपयांत)

मेथी : ५ ते १०

कांदा पात : ५ ते १०

कोथिंबीर : ५ ते १०

पालक : ५ ते १०

शेपू :१०

चाकवत : ५ ते १०

करडा : ५ ते १०

फळांचे दर (प्रतिकिलो रुपयांत)

सफरंचद : ६० ते १४०

डाळिंब : ४० ते ६०

संत्री : ३० ते ८०

मोसंबी : ३० ते ८०

बोरे : २० ते ४०

चिकू : ४०

पेरु : ६०

द्राक्षे : ४० ते ६०

केळी : २० ते ६० (डझन)

जवारी केळी : ३० ते ७० (डझन)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘खेळ हे मानवी जीवनाचे प्रतिबिंब’

$
0
0

'खेळ हे मानवी जीवनाचे प्रतिबिंब'

चंदगड : 'मानवी जीवनात खेळाचे विशेष महत्त्व आहे. खेळामुळे माणसाच्या प्रतिभा शक्तीचा विकास होतो. न्यूनगंड कमी होऊन आत्मविश्वास वाढीस लागतो' असे प्रतिपादन तहसिलदार शिवाजीराव शिंदे यांनी केले. चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या वार्षिक क्रिडामहोत्सवाच्या उद्घाटक प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील होते. प्राचार्य डॉ. पाटील यांनी मानवी जीवनात खेळाचे महत्व अनन्यसाधारण असल्याचे सांगून सर्वस्व झोकून देऊन प्रयत्न करण्याचा मान मिळतो असे सांगितले. एम. पी. पाटील, प्रा. एस. के. सावंत, डॉ. पी. एल. भादवणकर, क्रीडा समितीचे सदस्य प्रा. एल. एन. गायकवाड, प्रा. आर. व्ही. आजरेकर आदी उपस्थित होते. क्रिडा संचालक प्रा. एस. एम. पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. आर. एन. साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. एस. डी. गोरल यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधानसभेला षटकारासाठी फिल्डींग

$
0
0

काँग्रेसची विधानसभेसाठी जमवाजमव, 'घरवापसी' चे अनेकांना वेध

Gurubal.mali@timegroup.com

gurubalmaliMT

कोल्हापूर

मोठ्या तयारीने मैदानात उतरूनही चार वर्षांपूर्वी मोदी लाटेत विधानसभा निवडणुकीत शून्यावर आऊट झालेल्या काँग्रेसने यंदा मात्र जिल्ह्यात षटकार मारण्यासाठी जमवाजमव सुरू केली आहे. नव्या जिल्हाध्यक्षांना रिझल्ट देण्याची संधी असल्याने ते कामाला लागले आहेत. याचा पहिला टप्पा म्हणून गटतट बाजूला ठेवून सर्व गट एकत्र करण्याचा विडा त्यांनी उचलला आहे. कोल्हापूर जिल्हा ताराराणी आघाडी विसर्जित करत त्यांनी घरवापसीला सुरूवात केली. आता आणखी काही नेत्यांवर काँग्रेसची नजर आहे.

एकेकाळी दोन खासदार, दोन मंत्री आणि सात आमदार अशी जिल्ह्यात मजबूत स्थिती असलेल्या काँग्रेसची नंतर बिकट अवस्था झाली. दहा वर्षांपूर्वी दोन आमदार तर त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत हा पक्ष शून्यावर आला. महापालिका, जिल्हा परिषद, साखर कारखाने, नगरपालिका ताब्यात असलेल्या पक्षाची ही अवस्था झाली ती केवळ गटातटाच्या राजकारणामुळेच. आज केवळ महापालिका त्यांच्या ताब्यात आहे. आघाडी होणार असल्याने लोकसभा निवडणुकीत त्यांना मतदारसंघ मिळण्याची चिन्हे फारच कमी आहेत. यामुळे सध्या तरी काँग्रेसला लोकसभेत ताकद दाखवण्याची नव्हे तर ताकद देण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.

वीस वर्षानंतर पक्षाला प्रकाश आवाडे यांच्या रूपाने नवीन अध्यक्ष मिळाला आहे. गटातटात विभागलेला पक्ष एकसंघ करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. पंधरा दिवसात झालेल्या कार्यक्रमात गटबाजी स्पष्टपणे दिसत आहे. अशावेळी नाराजी दूर करत सर्वांना सक्रीय करण्याचे काम आवाडे यांना करावे लागणार आहे. विधानसभेच्या सहा जागा निवडून आणण्यासाठी पक्षाने आतापासूनच फिल्डींग लावली आहे. पक्षातील नेत्यांनी एकमेकांना मदत केली तर विधानसभेत हा पक्ष चौकार मारू शकतो. त्यामध्ये सतेज पाटील, पी.एन .पाटील, प्रकाश आवाडे आणि राजूबाबा आवळे यांचा नंबर लागू शकतो. शिरोळमध्ये मतविभागणीचा फायदा म्हणून पक्षाला लॉटरी लागल्यास आश्चर्य वाटायला नको. कोल्हापूर उत्तरमध्ये मधुरिमाराजे अथवा ऋतुराज पाटील यांच्यासारखा उमेदवार असेल तर हात बळकट होण्यास सहज मदत होऊ शकेल. त्यामुळे षटकार मारण्यासाठी सध्या सुरू असलेली तयारी वरवर प्रभावी दिसत असली तरी ऑक्टोबरपर्यंत अजून बऱ्याच गोष्टी घडणार आहेत. उत्तर मतदारसंघात प्रबळ उमेदवार असूनही त्यांची उमेदवारी अजून तळ्यातमळ्यात आहे. राधानगरी, चंदगड आणि शाहूवाडी पन्हाळा या मतदारसंघात फार मोठी तयारी करावी लागणार आहे. कागलच्या लढाईत बाय देण्यापलिकडे पक्षाच्या हातात सध्या तरी काही नाही. यामुळे सहा मतदारसंघ निश्चित करून त्यांच्या विजयासाठी मोट बांधण्याचा नेत्यांचा इरादा पक्का झाला आहे.

...

चौकट

घरवापसीसाठी पुन्हा प्रयत्न

गेल्या काही वर्षांत काँग्रेसवर नाराज होवून अनेकांनी पक्षाला रामराम ठोकला. भाजपने अनेकांच्या हातात 'कमळ' दिले. पण आता वारे फिरले आहे. त्यामुळे अनेकांना घरवापसीचे वेध लागले आहेत. काहींनी आवाडेंची भेटही घेतली आहे. या सर्वांना पुन्हा पक्षात घेऊन पक्ष बळकट करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. वर्षभरात रिझल्ट देण्याचे आव्हान आवाडे यांच्यासमोर आहे. त्यामुळे ते कामाला लागले आहेत. विधानसभेत षटकार मारण्यासाठी प्रथम पक्ष बळकट करणे आवश्यक असल्यानेच त्यांनी घरवापसी करून घेण्यावर भर दिला आहे.

...

षटकाराचे प्रमुख दावेदार

इचलकरंजी प्रकाश आवाडे

कोल्हापूर दक्षिण सतेज पाटील

करवीर पी.एन. पाटील

हातकणंगले राजूबाबा आवळे

शिरोळ गणपतराव पाटील

कोल्हापूर उत्तर मधुरिमाराजे, ऋतुराज पाटील

...........

काँग्रेसचे संभाव्य उमेदवार

राधानगरी अरूण डोंगळे

चंदगड भरमू पाटील, राजेश पाटील

पन्हाळा संजीवनीदेवी गायकवाड, करण गायकवाड,

कागल उमेदवार शोधावा लागणार

....

कोट

'राष्ट्रवादीबरोबर आघाडी होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे काँग्रेसच्या वाट्याला येणाऱ्या सहा जागा जिंकण्यासाठी आम्ही फिल्डींग लावली आहे. लक्ष्य अवघड आहे याची कल्पना आहे, पण आमची तयारी देखील जोरात सुरू आहे. अजून आठ महिन्यांचा कालावधी मिळणार असल्याने षटकार मारण्याची खात्री आहे.

प्रकाश आवाडे, जिल्हाध्यक्ष,काँग्रेस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सदस्यांच्या नाराजीने हलल्या २३ कोटींच्या फायली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा व स्थायी समिती सभेने मंजुरी देऊनही विकासकामांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठरावावर सह्या करण्यास विलंब होत असल्याने सदस्यांतील वाढत्या असंतोषाची दखल पदाधिकाऱ्यांनी घ्यावी लागली. सोमवारी विविध विभागाच्या प्रस्तावाच्या फायली हलल्या आणि ठरावावर स्वाक्षरीही झाली. नाराज सदस्यांना विकासकामांचे प्रस्ताव मंजूर केल्याचे निरोप देत नाराजी दूर करण्याचा प्रयत्नही झाला.

गेल्या तीन दिवसांत सत्ताधारी भाजप आघाडीतील आवाडे गट व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदस्यांनी अध्यक्ष शौमिका महाडिक यांच्या कारभारावर आक्षेप नोंदवला होता. त्या आक्षेपाला अध्यक्षांनी स्टंटबाजीसाठी काहीजण खोटी माहिती पुरवित असल्याचे प्रतिटोला लगावला होता. मात्र कुरघोडीच्या राजकारणाने आघाडी अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली होती. आज सुमारे दोन महिने रखडलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कामांच्या फायलींचा निपटारा एका दिवसात झाला. अध्यक्षांच्या केबिनमधून ठराव मंजूर केल्याचे निरोप पाठविल्याने निधीच्या प्रतिक्षेतील सदस्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. ठराव मंजुरीवरून गेले तीन दिवस जिल्हा परिषदेतील वातावरण ढवळून निघाले होते.

जिपच्या सात डिसेंबर २०१८ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत नऊ कोटी २२ लाख रुपयांच्या अखर्चित रकमेला मंजुरी देण्यात आली. यामध्ये समाजकल्याण, महिला व बालकल्याण विभाग, कृषी विभागाच्या विविध योजनेसह वैयक्तिक लाभाच्या योजनांचा समावेश होता. सत्ताधारी आघाडीतील काही सदस्य व विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादी सदस्यांनी या साऱ्या प्रकाराच्या निषेधार्थ मंगळवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेण्याचे ठरविले. या प्रकरणावरुन सत्ताधारी आघाडीतील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता होती. ते टाळण्यासाठी पदाधिकारी आणि समिती सभापतींची सोमवारी जिल्हा परिषदेत बैठक झाली. अध्यक्षा महाडिक, बांधकाम समिती सभापती सर्जेराव पाटील पेरीडकर, शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे यांनी अधिकाऱ्यासहित बैठक घेतली. शिवाय मंजूर कामे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सुरू करावीत अशा सूचना केल्याचे वृत्त आहे. विकास कामांच्या फायलींवर स्वाक्षरी होऊन विभागाकडे फायली पोहच झाल्याने मंगळवारचे आंदोलन स्थगित केल्याचे जिप सदस्यांनी सांगितले.

रस्त्याची कामे लागणार मार्गी

जिल्हा परिषदेची २६ डिसेंबर २०१८ रोजी आजरा येथे सर्वसाधारण सभा झाली होती. या सभेत दहा कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामांना मान्यता मिळाली होती. शिवाय स्थायी व सर्वसाधारण सभेत जिल्ह्यातील विविध भागात मिळून सुमारे चौदा कोटी रुपयांच्या कामांना मान्यता आहे. मात्र दीड दोन महिने उलटूनही महिना उलटूनही त्या मंजूर कामाच्या ठरावावर सह्या न झाल्यामुळे रस्त्याची कामे आचारसंहितेच्या कात्रीत सापडण्याची शक्यता होती. कागल, हातकणंगले, भुदरगड, करवीर, चंदगड, गडहिंग्लज, पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यातील सदस्यांच्या कामांचे प्रस्ताव प्रलंबित होते. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होण्यापूर्वी त्या कामांची वर्क ऑर्डर काढून कामांना सुरुवात करण्यासाठी सदस्य प्रयत्नशील होते. मात्र स्थायीच्या पदाधिकाऱ्यांकडून अंतिम मान्यतेसाठी विलंब होत असल्याने सदस्यातील नाराजी वाढली होती.

लोगो : जिल्हा परिषदेचा लोगो वापरावा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्राप्तीकरात सूट दिल्याने नोकरदारांना दिलासा

$
0
0

अर्थसंकल्पानंतर पडसाद ... लोगो

...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने मांडलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात पाच लाख उत्पन्न असलेल्या नागरिकांना प्राप्तीकरात सूट दिली आहे. ही एकमेव बाब वगळता उद्योग, व्यावसायिकांना कोणत्याही प्रकारची करात सवलत मिळालेली नाही. पाच लाखापर्यंतच्या करात सूट दिल्याने नोकरदारांना मात्र एकप्रकारे खूष केले आहे.

आर्थिक तूट न वाढवता सर्व घटकांचे समाधान करण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पात प्रयत्न केला आहे. पाच लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या नागरिकांना सवलत दिली असल्याने त्याचा फायदा देशातील तीन कोटी करदात्यांना होणार आहे. सरकारी व खासगी नोकरदार मंडळींना याचा लाभ होणार आहे. पाच लाखापर्यंत करात सूट हा निर्णय जाहीर केल्यानंतर काही काळ गोंधळ उडाला . त्यानंतर सरकारी पातळीवरुन खुलासा करण्यात आला. अडीच लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना रिटर्न भरणे आवश्क आहे. अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आहे त्यांना कर आहे. त्यांना तो कर भरावा लागणार आहे. रिटर्न भरल्यानंतर त्यांना रिबेट मिळणार आहे. त्यामुळे जे नागरिक रिटर्न भरतात त्यांनाच ही सवलत मिळणार आहे. रिबेटची साडेसाती पाठीमागे ठेवली असल्याने एका बाजूला प्राप्ती करात सवलत दिली असताना आनंदाचे वातावरण असताना दुसरीकडे रिटर्न भरण्याची अट घातली असल्याने नागरिकांना त्याची कटकट वाटत आहे.

ठेवीवरील व्याजाची दहा हजार रुपयांची मर्यादा ४० हजार रुपये केल्याने मध्यमवर्गीय, ज्येष्ठ नागरिक व व्यावसायिकांना लाभ होणार आहे. घरभाडे व जमीन भाड्यासाठी आकारल्या जाणाऱ्या करातही सूट देण्यात आली आहे.

...

कोट

'पाच लाख उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना प्राप्तीकरातून सूट देण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्याचा फायदा नोकरदार व व्यावसायिकांना होणार आहे. पण त्यासाठी नागरिकांना रिटर्न भरल्याशिवाय सवलत मिळणार नाही. रिटर्न भरल्यानंतर त्यांना सवलत मिळणार आहे. ठेवीवरील व्याजाची मर्यादाही दहा हजार रुपयांनी वाढवली असल्याने त्याचा फायदा होणार आहे.

उमेश पोवार, सी.ए.

...

'केंद्र सरकारने पाच लाखांचे उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना करमुक्त करुन दिलासा दिला आहे. रिटर्न भरणाऱ्यांनाच हा लाभ होणार आहे. प्रत्येकाने रिटर्न भरावे ही चांगली संकल्पना आहे. त्यामुळे सरकारला चांगला कर मिळतो. एक घर घेणाऱ्यांना दुसरे घर देण्याची संधी दण्यात आली आहे. भागीदार संस्था व ट्रस्टसाठी सरकारने सवलत देण्याची गरज होती. त्यामुळे कर भरणाऱ्या संस्थांमध्ये वाढ झाली असती.

प्रशांत उरुणकर, सी.ए.

...

'गेली चार वर्षे नोकरदार मंडळींकडून प्राप्तीकर सवलतीसाठी मर्यादा वाढवावी अशी मागणी होत होती. यावेळी सरकारने पाच लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना सूट दिली आहे. सर्वच सरकारी कर्मचारी आयटी रिटर्न भरत असल्याने त्याचा लाभ होणार आहे. सरकारने अतिशय चांगला निर्णय घेतला आहे. ठेवींवरील व्याजाची मुदत वाढवल्याने ज्येष्ठ नागरिकांना त्याचा लाभ होणार आहे.

अनिल लवेकर, सचिव, राज्य कर्मचारी महासंघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारशी संघर्षाची शेतकऱ्यांची तयारी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा शाहूवाडी

अभयारण्य तसेच व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या येथील कित्येक मानवी वस्त्यांना वन्यजीवांच्या वाढत्या उपद्रवामुळे आज जीव मुठीत घेऊन जीवन कंठावे लागत आहे. याचाही गंभीरतेने विचार व्हायला हवा ना. 'वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवास पोखरणारे नामानिराळे आणि मोकाट राहतात, मग त्यांनी केलेल्या दुष्कृत्याचा आम्हा बाया-बापड्यांना नाहक त्रास कशापायी?' असा उद्वेगजनक सवाल येथील स्थानिक रहिवाशी पदोपदी व्यक्त करीत आहेत.

शाहूवाडीच्या निसर्ग वैभवाला जणू दृष्ट लागावी तसे येथील जंगलक्षेत्र उद्ध्वस्त झाले आहे. त्यातून वन्यप्राण्यांच्या खाण्या-पिण्याची परवड झाली आहे. यातूनच वन्य प्राणी आणि मानव यांचा संघर्ष टिपेला पोहचला आहे. शित्तूर वारुण, शिराळे वारुण, खेडे, सोंडोली, मालेवाडी, कांडवण, विरळे, रेठरे, तुरुकवाडी त्याचबरोबर कानसा खोऱ्यातील सर्वच गावे, आंबा, विशाळगड, घुंगुर आदी परिसर आज वन्य प्राण्यांच्या दहशतीखाली आहेत. येथील वन्यजीव मोठया प्रमाणात शेतात घुसत आहेत. अख्खी गावेच्या गावे रात्रंदिवस शेतीच्या राखणीत आजही व्यस्त आहेत. ऊस, मका, हरभरा, वरणा (पावटा), तूर आदी पिकांचा गवे, माकडे, रानडुकरे फडशा पाडत आहेत. अशावेळी अनेक शेतकऱ्यांच्या जीवावर बेतण्याचे प्रसंग घडले आहेत. अलिकडेच हत्तीने घातलेला धुमाकूळ सर्वज्ञात आहे.

या उद्वेगातूनच परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत आता यंत्रणेविरुद्ध मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. शेती वाचवा.. शेतकरी वाचवा जनसंघर्ष समितीच्या माध्यमातून वन आणि संबंधित विभागाला जाग आणण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे. याप्रश्नी जर शेतकऱ्यांनी आत्महत्या सत्र अवलंबले तर तर त्यास प्रशासन आणि सरकारच जबाबदार राहील, असे निवेदन शनिवारी वनप्रशासनाला बाधित शेतकऱ्यांनी दिले आहे.

'शाहूवाडी तालुक्याच्या डोंगराळ भागात वन्यप्राणी अक्षरशः धुमाकूळ घालत आहेत. शेतकऱ्यांना दरवर्षी याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. वनविभाग व सरकारला याचे कसलेही सोयरसुतक उरलेले दिसत नाही. अनेक अडथळे पार करून मिळणारी नुकसान भरपाई तुलनेत खूपच कमी आहे. नुकसानभरपाई नको, परंतु नुकसान करणाऱ्या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यास संबंधित विभागाने प्राधान्य द्यायला हवे.

- केशव मुटल, शेतकरी रा. उखळू, ता. शाहूवाडी

फोटो ओळ :

उखळू (ता. शाहूवाडी) येथे रानटी गव्यांनी मक्याच्या पिकाची अशी नासधूस केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राजर्षींच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती १३ रोजी एकत्रित करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कोल्हापूर महापालिकेतर्फे नर्सरी बागेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे समाधी स्मारक उभारण्यात येत आहे. मेघडंबरीसह संरक्षक भिंतीचे काम लवकरच पूर्णत्वाकडे जाणार आहे. मेघडंबरीच्या चौथऱ्यातील पेटीमध्ये राजर्षी शाहूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ठिकाणांवरील पवित्र माती (मृदा) संकलन सुरू आहे. राजर्षींची जन्मभूमी व कर्मभूमीतून ही पवित्र माती बुधवारी (ता. १३) दुपारी १२ वाजता ऐतिहासिक दसरा चौकात शाहूप्रेमींनी जमा करावी,' असे आवाहन राजर्षी शाहू समाधी स्मारक स्थळ विकास समितीचे सदस्य आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत आणि वसंतराव मुळीक यांनी पत्रकार परिषदेत केले.

सावंत म्हणाले, 'देशात सामाजिक समतेचा पाया राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी घातला. अशा या थोर महापुरुषांच्या समाधी स्मारकाचे बांधकाम त्यांच्या उत्तुंग कार्यालय शोभेल अशा स्वरूपात नर्सरी बागेत महापालिकेच्या स्वनिधीतून सुरू आहे. समाधीस्थळी भव्य मेघडंबरीसह सभोवतालचा परिसर विकसित करण्यात येत आहे. या ठिकाणी समाधीमध्ये दगडी पेटी ठेवण्यात येणार असून या पेटीत शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विविध ठिकाणांची पवित्र माती एकत्रित ठेवली जाणार आहे. त्यासाठी समितीने मृदा संकलनाचे काम सुरू केले आहे.'

मुळीक म्हणाले, 'शाहूप्रेमींनी शाहू जन्मस्थळ, मुंबई येथील पन्हाळा लॉज, जुना राजवाडा, मोतीबाग तालीम, माणगाव परिषद ठिकाण, अतिग्रे तलाव, राधानगरी येथील हत्तीमहाल तसेच राधानगरी धरण, पुणे येथील शिवछत्रपतींचे स्मारक आणि राजर्षी शाहूंनी शिक्षण घेतलेल्या कर्नाटकातील धारवाड या ठिकाणच्या शाळेतील तसेच ज्योती तालीम या ठिकाणाहून मृदा संकलित केली आहे. त्याचबरोबर येत्या आठवड्यात रायबाग तालुक्यातील रायबाग बंगला, पन्हाळा येथील राजवाडा आणि शिवमंदिर, जोतिबा, सोनतळी, शिरोळ मराठा तख्त, जयसिंगपूर, सिंधुदुर्ग येथील शिवमंदिर आणि कोल्हापुरातील २३ वसतीगृहे, न्यू पॅलेस, खासबाग मैदान, शिवाजी टेक्निकल स्कूल, अंबाबाई मंदिर, कोल्हापूर रेल्वे स्टेशन, नाशिक आणि खामगाव अशा विविध ठिकाणची मृदा संकलित करण्यात येणार आहे. तरी शाहूप्रेमींनी १३ फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता ऐतिहासिक दसरा चौकात ज्ञात, अज्ञात ठिकाणांवरील संकलित करण्यात येणारी मृदा जमा करावी.' पत्रकार परिषदेस इंद्रजीत माने, प्रताप नाईक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गांधीनगर येथे ट्रकच्या धडकेत एकजण ठार

$
0
0

कसबा बावडा : गांधीनगर येथे कापड खरेदी करण्यास आलेल्या नागाप्पा कृष्णाप्पा लमाने (वय ३७ रा. मुगुळकोट, ता. रायबाग, जि. बेळगाव ) यांना ट्रकने (एमएच १० झेड ११८५) धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात गांधीनगर येथील अशोक प्लास्टिक इंडस्ट्रिजच्या गोडाऊनच्या दारात झाला. ट्रकचालक राजाराम नामदेव सिद्धगणेश ( रा. वळीवडे , ता. करवीर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, श्रीपाल बावन्नकर ( रा. मुगुळकोट, ता. रायबाग, जि. बेळगाव ) आणि नागाप्पा लमाने हे कपडे खरेदीसाठी गांधीनगर बाजारपेठेत आले होते. त्यावेळी अशोक प्लास्टिकच्या गोडाऊनच्या दारासमोर चालक राजाराम सिद्धगणेश हा ट्रक मागे घेताना त्याची नागाप्पाला जोरदार धडक बसली. त्यात तो भिंत व ट्रकचे फाळके यामध्ये दाबला गेल्याने गंभीर जखमी झाला. त्यांना कोल्हापुरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यास आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला. बावन्नकर यांनी याबाबतची फिर्याद गांधीनगर पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार ट्रकचालक राजाराम सिद्धगणेशवर गुन्हा नोंद झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images