Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

'विना परवाना हॉटेल्सवर कारवाई करा'

0
0

कोल्हापूर :

विनापरवाना नववर्षाचे कार्यक्रम आयोजित केलेल्या शहरातील सयाजी, सायट्रस, पॉपीलॉन, अमृत, रेडिएन्ट, ट्वेंटीफोर के या हॉटेलवर जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. या हॉटेलवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात यावी असा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. दरम्यान विना परवाना कार्यक्रम करणाऱ्या हॉटेल व संस्थांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येईल असा इशाराही निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिला आहे.

शहरातील बड्या हॉटेल्समध्ये नववर्ष स्वागतासाठीचे कार्यक्रम विनापरवाना आयोजित केले आहे, असा अहवाल करमणूक कर विभागाच्या निरीक्षकांनी दिला आहे. त्याआधारे करमणूक विभागाने या हॉटेल्सना नोटिसा पाठविल्या असून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. शहर व जिल्ह्यातील कोणत्याही हॉटेल्स व संस्थांनी विनापरवाना नववर्ष कार्यक्रमांचे आयोजन करू नये असे आदेश दिले आहेत. मुंबई पोलिस अधिनियम, १९६१ व त्या अंतर्गत तयार करण्यात आलेल्या कायद्यानुसार दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पुरवठादाराला कारणे दाखवा नोटीस

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शालेय पोषण आहारांतर्गत उपलब्ध तांदूळ उघड्यावर ठेवल्याच्या प्रकरणाची शिक्षण संचालक विभागाने गंभीर दखल घेतली. या साऱ्या प्रकरणाचा वस्तूनिष्ठ अहवाल सादर करण्याच्या सूचना प्राथमिक शिक्षण विभागाला दिल्या आहेत. दुसरीकडे प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून तांदूळ पुरवठादाराला कारणे दाखवा नोटीस काढली आहे.

पुरवठादाराने पोषण आहारातील तांदूळ उघड्यावर ठेवल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला होता. त्यानतंर प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत व अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत तांदूळ साठ्याची तपासणी झाली. तपासणीसाठी तांदळाचे नमुने घेतले. शिवाय उघड्यावर ठेवलेला तांदळाचा साठा जप्त केला. जिल्हा प्रशासनाने या प्रकाराची माहिती शिक्षण संचालक विभागाला कळविला आहे.

दरम्यान, शिक्षण संचालक कार्यालयातील शालेय पोषण आहार स्वतंत्र कक्षामार्फत जिल्हा परिषदेला या सगळ्या प्रकरणाचा सविस्तर चौकशी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. त्यानंतर पुरवठादारावर कारवाई होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे शिक्षण विभागामार्फत पुरवठादाराला कारणे दाखवा नोटीस काढली आहे. तांदूळ उघड्यावर ठेवण्यास जिल्हा परिषद प्रशासनाची परवानगी नसताना कुणाच्या अधिकारी निर्णय घेतला, करारातील सर्व गोष्टींचे काटेकोरपणे पालन होते का? यासह विविध मुद्यांविषयी नोटीस काढली आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उघड्यावर तांदूळ ठेवल्याप्रकरणी पुरवठादारावर कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

तांदूळ खाण्यासाठी योग्य

अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत उघड्यावरील तांदळाचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. जिल्हा सार्वजिनक आरोग्य प्रयोगशाळेकडे तांदळाचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्या प्रयोगशाळेकडून अहवाल जिल्हा परिषद प्रशासनाला उपलब्ध झाला आहे. त्यामध्ये तांदूळ खाण्यास योग्य असल्याचे अहवालात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहकार, मागोवा......

0
0

सहकार

साखर, दूध उद्योगाची कोंडी

सतीश घाटगे

सहकारातील साखर व दूध या उद्योगातून ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था खेळती राहते. पण आंतरराष्ट्रीय बाजारात साखर आणि दूध भुकटीचे दर कोसळल्याने त्याचा थेट परिणाम इथल्या साखर कारखानदारी आणि दुधाच्या अर्थकारणावर झाला आहे. २०१८ मध्ये साखर व दूध उद्योगाने चांगलीच कोंडी झाली असून, त्याचा ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. कर्जमाफी, साखरेचे कोसळलेल्या दर यामुळे बँकांपुढे शॉर्ट मार्जिनचा प्रश्न निर्माण झाला आहे. उसाची एफआरपी आणि गायीच्या दुधाला दर मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रस्त्यावर उतरून आंदोलन केले. गूळ आणि कांद्याचे दर घसरल्याने बाजार समितीत आक्रमक शेतकऱ्यांनी सौदे बंद पाडून संताप व्यक्त केला. लक्ष्मीपुरी धान्य बाजाराचे विक्रमनगर येथील बाजारात स्थलांतर आणि कोल्ड स्टोअरेज उभारणीसाठी बाजार समितीने पुढाकार घेतला आहे. 'गोकुळ'ची सर्वसाधारण सभा मल्टिस्टेटच्या प्रश्नावर गाजली. त्यातून जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले. वर्षभरात साखर व दुधाचे दर कोसळले. त्या संकटातून मार्ग काढण्यासाठी सहकारी संस्था प्रयत्न करत असल्याचे चित्र वर्षभरात पाहायला मिळाले.

०००००

मल्टिस्टेटवरून रणकंदण

'गोकुळ' मल्टिस्टेट करण्याच्या ठरावावरून जिल्ह्याच्या राजकारणाला चांगलीच उकळी फुटली. गोकुळचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक, पी.एन. पाटील यांच्या विरोधात या प्रश्नावर आमदार सतेज पाटील, हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके यांनी शड्डू ठोकला. या प्रश्नावर जिल्ह्याच्या राजकारणाची दोन गटांत विभागणी झाली. शह-काटशहाचे राजकारण खेळले गेले. त्यामुळे गोकुळच्या इतिहासात प्रथमच सर्वसाधारण सभेत मल्टिस्टेटचा ठराव तीन मिनिटांत मंजूर करून सभा गुंडाळावी लागली. सत्ताधारी व विरोधकांकडून सभेत चप्पलांचा वर्षाव झाला. मल्टिस्टेट ठरावाचे पडसाद लोकसभा व विधानसभा निवडणुकीत उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संघ मल्टिस्टेटवरून सत्ताधारी नेतेमंडळी गोकुळची खासगी मालकी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा विरोधकांनी केलेला आरोप उत्पादकांपर्यंत पोहोचवण्यात यश आले. जिल्हा दूध संघ की मल्टिस्टेट यापेक्षा उत्पादकाला दुधाचा दर किती मिळणार हेच महत्त्वाचे ठरणार आहे.

एफआरपीने कारखानदार रडकुंडीला

गेल्या हंगामात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या बैठकीत एफआरपी अधिक २०० रुपये यावर तोडगा निघाला. यावेळी बाजारात साखरेचा दर प्रतिक्विंटल तीन हजार रुपये होता, पण जानेवारी २०१८ मध्ये साखरेचे दर कोसळून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रतिक्विंटल २१०० रुपये, तर देशांतर्गत बाजारपेठेत २६०० रुपये झाला. बँकांनी प्रतिक्विंटल ३१०० रुपयांप्रमाणे कर्जपुरवठा केल्याने शॉट मार्जिनचा प्रश्न निर्माण झाला. एकरकमी एफआरपी देताना कारखानदार अक्षरश: रडकुंडीला आले आहेत. यंदाही साखर हंगाम सुरू होण्यापूर्वी कारखानदारांनी ऊस दरावरून कारखाने बंद ठवले. अखेर एकरकमी एफफआरपी देण्यावर तोडगा निघून कारखानदार आणि आंदोलकांत समेट झाला. दीड महिना उलटूनही कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर एफआरपी जमा केलेली नाही. साखरेचे दर आणि बँकांकडून मिळणारे कर्ज आणि त्यातून एफआरपी देणे शक्य नसल्याने प्रादेशिक साखर सहसंचालकांनी जिल्ह्यातील सर्व कारखान्यांना नोटिसा पाठविल्या आहेत. कारखानदारांनी प्रतिक्विंटल ५०० रुपये अनुदान देण्याची राज्य सरकारकडे मागणी केली आहे. तसेच हे अनुदान थेट शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्याची मागणी केली आहे, तर दुसरीकडे खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली एक जानेवारीला प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यासाठी तयारी सुरू झाली आहे.

००००

शेतकऱ्यांना ३३३ कोटींची कर्जमाफी

राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर केल्यानंतर सहकार विभाग आणि जिल्हा बँकेने रात्रंदिवस कर्जमाफीसाठी पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्या बनविल्या. जिल्ह्यातील एक लाख ९५ हजार शेतकऱ्यांना ३३३ कोटी रुपयांची कर्जमाफी झाली. सहकार विभागाने कर्जमाफीच्या याद्या बनविण्यासाठी लेखा परीक्षकांना नोटिसा बजावल्या. पाच टप्प्यांत पात्र शेतकऱ्यांच्या याद्या बनविण्यात आल्या. कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांच्या याद्यांची रात्रंदिवस काम करून छाननी करताना जिल्हा बँकेचे कर्मचारी आजारी पडले. तीन कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल केले, तर एका अधिकाऱ्याला थेट अतिदक्षता विभागात दाखल करावे लागले. शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळाली, तर ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड केली त्यांना २५ हजार रुपये अनुदान देण्यात आले.

०००००

आंदोलनामुळे खरेदी दूध दरात वाढ

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दूध भुकटीचे दर उतरल्याने राज्यातील सहकारी व खासगी दूध संघांनी गायीच्या खरेदी दूध दरात कपात केली. त्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन पुकारले. गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्यावे, दुधाचा प्रतिलिटर दर २५ रुपये कायम करावा, अशा मागण्या करण्यात आल्या. जिल्ह्यातील सर्व दूध संघांनी स्वाभिमानीच्या आंदोलनाला एक दिवस दूध संकलन बंद करून पाठिंबा दिला. त्यानंतर आंदोलनकाळात पोलिस बंदोबस्त मुंबईला दुधाचे टँकर पाठविले. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन राज्य सरकारने गायीच्या दुधाचा दर लिटरला २५ रुपये कायम केला. त्यामुळे गोकुळला प्रतिलिटर दोन रुपयांनी खरेदी दरात वाढ करावी लागली. तसेच दूध भुकटी व दुग्धजन्य पदार्थांची निर्यात करणाऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली. गायीच्या दुधाला दर मिळाला असला तरी अद्याप दूध संघांना अनुदान मिळालेले नाही.

००००००

गुळाचा दर घसरल्याने शेतकरी आक्रमक

कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गूळ व कांद्याचे दर घसरल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी सौदे बंद पाडले. अखेर बाजार समितीने हस्तक्षेप केल्याने गुळाचे सौदे सध्या जरी पुन्हा सुरू झाले असले तरी दर कमी मिळत असल्याने गूळ उत्पादकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. बाजार समितीने गुळासह फळे, भाज्या कोल्ड स्टोअरेज उभारणीसाठी पावले उचलली आहेत. ३० कोटी रुपये खर्चून बीओटी तत्त्वावर कोल्ड स्टोअरेज तीन वर्षांत उभारण्यात येणार आहे. तसेच लक्ष्मीपुरीतीलील धान्य बाजार विक्रमनगर येथील नवीन बाजारात स्थलांतर करण्यात येणार आहे. त्यासाठी बाजार समितीने पायाभूत सुविधा उभारल्या आहेत. आठ जानेवारीला नवीन धान्य बाजाराचे उद्घाटन होणार आहे.

००००००००

जिल्हा बँकेला ऊर्जितावस्था

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २०१७-१८ या आर्थिक वर्षात ५७ कोटी रुपये ढोबळ नफा, तर तरतुदी करून ४४ कोटी रुपये नफा मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. राज्यातील ३१ जिल्हा बँकांच्या आर्थिक ताळेबंदाचा अभ्यास करून जिल्हा बँकेला गौरविण्यात आले. प्रशासकीय काळात बँकेवर संचित तोटा १०३ कोटी रुपये होता. २०१५ मध्ये अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने खर्चात काटकसर करून बँकेला ऊर्जितावस्था मिळवून देताना तोट्यात असलेली बँक फायद्यात आणली. बँकेकडे ४०४९ कोटी रुपयांच्या ठेवी असून २८९० कोटी रुपयांचे कर्जवाटप केले आहे. १८७ शाखा नफ्यात असून, बँकेने यावर्षी सभासदांना आठ टक्के लाभांश, तर तब्बल दहा वर्षांनी कर्मचाऱ्यांना नऊ टक्के बोनस दिला.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारची कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांच्या ऋणाची परतफेड

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'श्रम संस्कृती आणि मातीशी घट्ट नाळ जुळवत शेतकरी हा पिढ्यान् पिढ्या शेती करत आहे. सद्यस्थितीत हा वर्ग अत्यंत हालाखीच्या स्थितीत आहे. सध्याच्या कालावधीत कर्जमाफी अत्यावश्यक होती. मात्र कर्जमाफी करुन त्यांच्यावर उपकार केली अशी भावना कुणी ठेऊ नये. उलट सगळ्यांचा पोशिंदा ठरलेल्या शेतकऱ्यांचे समाज व सरकारवर अनंत उपकार आहेत. कर्जमाफी म्हणजे त्या ऋणाची परतफेड ठरावी' असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी केले. 'आम्ही कोल्हापुरी' फाऊंडेशनतर्फे शनिवारी आयोजित राज्यस्तरीय गौरव समारंभात ज्येष्ठ विचारवंत डॉ. साळुंखे यांना जीवनगौरव पुरस्कार तर महान भारत केसरी दादू चौगुले यांना कोल्हापूर भूषण पुरस्काराने सन्मानित केले. दसरा चौकातील शाहू स्मारक भवनात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर सरिता मोरे होत्या.

डॉ. साळुंखे म्हणाले, 'शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर झाल्यावर समाजातील उच्चभ्रू वर्गातून नकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या. कांद्याचा भाव किलोला एक रुपयाने वाढल्यावर महिन्याला दीड दोन लाख पगार घेणाऱ्यांनी कांद्याने डोळ्यात पाणी आणले अशा प्रतिक्रिया दिल्या. मात्र त्यांना भाव मिळत नसताना रस्त्यावर कांदा फेकणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्यथा कळत नाहीत. वास्तविक ज्यांची परिस्थिती चांगली आहे, त्यांनी संवेदनशीलता बधीर होऊ देऊ नये.'

कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार प्रमुख पाहुणे म्हणाले, 'समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तबगारांचा सत्कार हा प्रेरणादायी आहे. या कार्यक्रमातून समाजातील चांगुलपणाचे दर्शन घडते. '

यावेळी डॉ. हनुमंत भोसले यांना कृषीभूषण, प्रा. विजय कोष्टी यांना वृत्तपत्र लेखन पुरस्कार तर ज्ञानेश्वर माऊली दिंडी यांना आदर्श दिंडी पुरस्कार प्रदान करण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ. शोभा सूर्यवंशी यांना जनसेवा भूषण, आरोग्यसेवक गैबीसाब नाईक यांना सामाजिक गौरव तर पत्रकार संजीव खाडे यांना आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. फाऊंडेशनचे भारत धोंगडे यांनी स्वागत केले. सदस्य बाबूराव आयवळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. शरद गायकवाड यांनी मानपत्र वाचन केले. चंद्रकांत पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. ताज मुल्लाणी यांनी सूत्रसंचालन केले.

दादू चौगुलेंच्या कर्तबगारीला सलाम

कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. आ. ह. साळुंखे यांनी महान भारत केसरी दादू चौगुले यांना वाकून नमस्कार केला. त्यामागील भावना सांगताना डॉ. साळुंखे म्हणाले, 'दादू चौगुले यांची कुस्तीतील कर्तबगारी मोठी आहे. त्यांनी कोल्हापूरसह देशाचे नाव उंचावले. आम्ही शाब्दिक कुस्त्या केल्या. तर त्यांनी आखाड्यात देश आणि आंतरराष्ट्रीय मल्लांना खेळवले. वयाने ते माझ्यापेक्षा लहान आहेत. पण, त्यांची कर्तबगारी मोठी आहे. म्हणून मी त्यांना वाकून नमस्कार केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिरिक्त शिक्षकांचे तालुक्यातच समायोजन

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'अतिरिक्त शिक्षकाचे समायोजन ज्या-त्या तालुक्यात करावे' अशी मागणी शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवीकांत आडसूळ यांच्याकडे केली. शिक्षकांच्या मागण्या विचारात घेत संबंधित शिक्षकांचे समायोजन तालुक्यातच केले जाईल, अशी ग्वाही प्रशासनाकडून मिळाल्याची माहिती शिक्षक संघटनेचे नेते राजाराम वरुटे यांनी दिली.

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांचा पट कमी झाल्यामुळे अतिरिक्त शिक्षकाचे समायोजन ज्या-त्या तालुक्यात न करता दुर्गम तालुक्यातील शाळांमध्ये करावे असे प्रकारचे आदेश जिल्हा परिषदेने काढले होते. त्याबाबत शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष वरुटे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सामान्य प्रशासन विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आडसूळ यांची भेट घेतली. अतिरिक्त शिक्षकांना तालुक्यातील त्यां शाळासह रिक्त जागा दाखवून ते मागतील त्या ठिकाणी त्यांचे समायोजन करावे अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी झालेल्या चर्चेत संभाजी बापट, उत्तम सुतार, वसंत जधव, शिक्षक बँकेचे चेअरमन साहेब शेख, अरुण पाटील,बजरंग लगारे आदींनी सहभाग घेतला. याप्रसंगी आडसूळ यांनी त्या-त्या तालुक्यांतच समायोजन केले जाईल अशी ग्वाही दिली. शिष्टमंडळात बाजीराव कांबळे, जी. एस. पाटील, प्रशांत पोतदार, राजमोहन पाटील, दिलीप पाटील, संजय पाटील, अमोल जाधव आदींचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन दिवसात कोट्यवधीची उलाढाल

0
0

सतेज कृषी प्रदर्शनात गेल्या दोन दिवसांत चार कोटी ६० लाख रुपयांची उलाढाल झाली. महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची लाखो रुपयांची विक्री झाली. याशिवाय शेती अवजारे उत्पादनांची खरेदी विक्रीची उलाढाल कोट्यवधी रुपयांत असल्याचे संयोजकांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापुरात रंगणारपुलोत्सव

0
0

सोलापुरात रंगणार

पुलोत्सव

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सोलापूरमध्ये ३ ते ६ जानेवारी दरम्यान पुलोत्सव आयोजित करण्यात आला आहे. पुलंचे साहित्य, नाटक, चित्रपट, कविता आदींवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापुरातील पुलंप्रेमींनी या कार्यक्रमात मोठ्यासंख्येने सहभागी होऊन आस्वाद घ्यावा, असे आवाहन सोलापूरचे पालकमंत्री तथा पुलोत्सवाचे स्वागताध्यक्ष विजयकुमार देशमुख यांनी केले.

मराठी मनावर आपल्या साहित्यामधून अधिराज्य गाजवणारे आणि संपूर्ण जगभरात साहित्य, नाटक, चित्रपट, कवितांच्या माध्यमातून मराठीला समृद्ध करणारे पु.ल. देशपांडे यांची जन्मशताब्दी यंदाच्या वर्षी साजरी होत आहे. त्या निमित्त पुण्यातील आशय सांस्कृतिक संस्था, सोलापुरातील नाट्य परिषद शाखा, साहित्य परिषदेच्या शाखा, हि. ने. वाचनालय, समर्थ सहकारी बॅक, प्रिसीजन फाउंडेशन, हॉटेल सूर्या , प्रभात टॉकिज, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर आकाशवाणी आणि विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, 3 ते रविवारी, 6 जानेवारी या कालावधीत पुलोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी, ३ जानेवारी रोजी सकाळी ८.४५ वाजता प्रभात टॉकिजमध्ये सबकुछ पु. लं. असलेला एकमेव चित्रपट गुळाचा गणपती दाखवून, पुलोत्सवाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. शुक्रवारी हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये दुपारी ४ वाजता दुर्वांकुर सोलापूर प्रस्तुत पु. ल. कित सारे.., हा अविट गोडीचा कार्यक्रम गुरू वठारे आणि गायक दीपक कलढोणे सादर करणार आहेत. त्या नंतर दुपारी ५.४५ वाजता पुलकित रेषा हा पुलंच्या जीवनदर्शनावरील चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन होईल. पुलोत्सव या कार्यक्रमाचे उद्घाटन सायंकाळी सहा वाजता ज्येष्ठ अभिनेत्री फैय्याज शेख यांच्या हस्ते होणार असून, या कार्यक्रमाला पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, खासदार अॅड. शरद बनसोडे, आमदार प्रणिती शिंदे, महापौर शोभा बनशेट्टी, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मनपा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालीनी फडणवीस आदी उपस्थिती राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौर निवडीत मुख्यमंत्री, पवारांकडून ‘पत्ते’

0
0

म. टा प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर महापालिकेच्या महापौर-उपमहापौर निवडीत घोडेबाजाराची उघड चर्चा होत होती. सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि विरोधी भाजप-ताराराणी आघाडीकडून शह-कटशहाचे राजकारण झाले. या राजकारणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हेही सहभागी होते, असा गौप्यस्फोट रविवारी महापौर, उपमहापौरांच्या सत्कारादरम्यान करण्यात आला. राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ व शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनीच या नेत्यांच्या माध्यमातून झालेल्या घडामोडी विस्तृतपणे मांडल्या. त्यामुळे अनेकजण अचंबित झाले.

महापालिकेच्या प्रत्येक निवडीत पडद्यामागे अनेक नाट्यमय घडामोडी घडत असतात. आशा घडामोडींची दबक्या आवाजात चर्चा होते, पण नकुत्याच झालेल्या घडामोडींची जाहीर वाच्यता व्यासपीठावरून नागरिकांसमोर करण्यात आली. आमदार क्षीरसागर यांनी सेनेच्या चार नगरसेवकांचा सत्ताधारी आघाडीला पाठिंबा जाहीर केला, पण तरीही भाजप आघाडीकडून नगरसेवकांना ५० ते ७५ लाखांची ऑफर देत असल्याचे संभाषण ऐकल्याचे सांगितले. सेनेचे कार्याध्यक्ष ठाकरे यांना निवडीतील सर्व घडामोडींची माहिती दिली. ठाकरे यांनी सत्ताधारी गटाला पाठिंबा देण्याबाबत आदेश दिले. त्यामुळे 'नंतर जरी माझा फोन आला तरी, पूर्वीचा निर्णय कायम ठेवावा' अशी सूचना केल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे यांना फोन करून 'तुमचे चार नगरसेवक द्या, आम्ही पाच नगरसेवक अपात्र ठरवतो,' असे सांगितले. पण ठाकरे यांनी त्यास नकार दिल्याचेही क्षीरसागर यांनी सांगितल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

मुख्यमंत्र्यांच्या खेळीची माहिती आमदार मुश्रीफ यांना मिळताच त्यांनी थेट पक्षाध्यक्ष शरद पवार यांनाच फोन केला. अपात्रतेच्या राजकीय खेळीमुळे राज्यातील राजकारणाला वेगळे वळण लागणार असल्याने पवार यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना फोन करून अपात्रतेचा आदेश न काढण्याचा सल्ला दिला. त्यामुळे सरिता मोरे यांच्या निवडीमध्ये जिल्ह्यातील नेत्यांबरोबर मुख्यमंत्री, पवार, ठाकरे असा सर्वांचा सहभाग होता, असे मुश्रीफ म्हणताच एकच हशा पिकला. पडद्यामागील या सर्व घडामोडी ऐकून अनेकजण अचंबित झाले. आमदार क्षीरसागर यांनी पडद्यामागून मदत केली असली, तरी काँग्रेसचीसुद्धा २९ मते होती, हे विसरू नका, असे आमदार पाटील म्हणताच पुन्हा हास्याची लकेर उमटली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पापाची तिकटीवर होणार सुशोभिकरण

0
0

फोटो आहे....

Maruti.Patil@timesgroup.com

tweet: @MarutipatilMT

कोल्हापूर : शहर सौंदर्यीकरणात चौक, आयलँड, विविध महापुरुषांचे पुतळे नेहमीच भर घालतात. शहरातील पुतळ्यांचे व चौकांचे गेल्या काही वर्षांपासून सुशोभिकरण करण्यात येऊ लागले आहे. यामध्ये आता पापाची तिकटी येथील महात्मा गांधी पुतळ्याचे व छत्रपती संभाजीराजे यांच्या स्मारकाचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. सुमारे ४५ लाख रुपये खर्चाच्या आराखड्याला महापालिका प्रशासनाने शनिवारी वर्क ऑर्डरला मंजुरी दिली. लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.

देशाच्या स्वातंत्रलढ्यात महात्मा गांधींचे अनन्यसाधारण योगदान आहे. त्यांच्या अहिंसावादी तत्त्वांचे जगभर पाईक आजही दिसून येतात. या तत्त्वांचा पुरस्कार करणाऱ्या अनुयायांनी कोल्हापुरात गांधीजींचा पुतळा उभारणीसाठी पापाची तिकटी येथे जागा निश्चित केली. यासाठी करवीर नागरिक महात्मा गांधी प्रतिमा समिती स्थापन केली. समितीच्या वतीने केवळ दीड वर्षाच्या काळात संगमरवरीत पुतळ्याची उभारणी केली. पुतळ्याच्या परिसरात यापूर्वी टॅक्सी स्टँड होते. कालांतराने ते हटविल्यानंतर पुतळ्याभोवती अतिक्रमण होऊ लागले. आजही फिरत्या विक्रेत्यांमुळे पुतळा झोकाळून गेला असून, लोखंडी ग्रीलचेही मोठे नुकसान झाले आहे.

काही वर्षांपूर्वी येथील चप्पल व्यावसायिकांचे पुनर्वसन करून छत्रपती संभाजीराजांचे स्मारक बनविण्यात आले. मात्र, सद्य:स्थितीला हे स्मारकही अडगळीत पडल्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे या दोन्ही ठिकाणांचे सुशोभिकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. सुशोभिकरणासाठी महापालिकेच्या स्वनिधीतील २२ लाख व आमदार सतेज पाटील यांच्या फंडातून १० लाख असा ४० लाख फंड राखीव ठेवला आहे. आर्किटेक्ट रणजित निकम यांनी आराखडा तयार केला असून, त्याला महापालिका प्रशासनाने शनिवारी मंजुरी दिली.

महात्मा गांधींच्या पुतळ्यासोबती तटबंदीसारखे दगडी बांधकाम, झाडाभोवती दगडी पार बांधण्यात येणार आहे. सद्य:स्थितीत असलेल्या चबुतऱ्याचे दगडी बांधकाम करून उंची वाढविण्यात येणार आहे. तसेच पुतळ्याच्या मागे दगडी बांधकामामध्ये कमान उभारण्यात येणार आहे. पुतळ्यासमोर कारंजा आणि एलईडी जोडण्यात येणार आहे. दगडी संरक्षक कठड्यावर स्टेनलेस स्टीलमध्ये छोटे बल्ब बसविण्यात येणार आहेत. छत्रपती संभाजीराजेंच्या स्मारकाभोवती वॉल म्युरल उभारण्यात येणार आहे. संभाजीराजेंनी केलेल्या लढाया, आरमार उभारणी असा ऐतिहासिक काळ उभारण्यात येणार आहे. महात्मा गांधी व संभाजीराजे स्मारक परिसराचा विकास करण्यात येणार असून, संपूर्ण परिसर एलईडी व हायमॅक्स दिव्यांनी उजळून निघणार आहे.

०००

पुतळ्याची पायाभरणी १९४९ ला

करवीर नागरिक महात्मा गांधी प्रतिमा समितीच्या वतीने महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची उभारणी करण्यात आली. तत्कालीन देशभक्त अण्णासाहेब सहस्रबुद्धे यांच्या हस्ते १५ ऑगस्ट १९४९ रोजी पायाभरणी समारंभ झाला. दीड वर्षात पुतळ्याची उभारणी झाल्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या हस्ते २६ जानेवारी १९५१ रोजी पुतळ्याचे उद्घाटन झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी जलयुक्त शिवार संशोधनाची निवड

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठात झालेल्या विद्यापीठस्तरीय संशोधन महोत्सव 'आविष्कार २०१८'मध्ये इचलकरंजीतील डीकेएएससी कॉलेजच्या प्रा. सुनील भोसले यांच्या 'कोल्हापूर जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेचे मूल्यांकन' या संशोधन प्रकल्पास प्राध्यापक गटामध्ये प्रथम क्रमांक मिळाला.

या संशोधन प्रकल्पाची गडचिरोलीतील गोंडवन विद्यापीठात होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. संशोधनामध्ये जलयुक्त शिवार योजनेंतर्गत ओढ्यांवर बांधण्यात आलेले सिमेंट बंधारे गाळमुक्त कसे करता येतील?, ग्रामीण भागाच्या शाश्वत विकासासाठी योजना प्रभावीपणे कशी अंमलात आणता येईल याबाबत उपाययोजना सुचविण्यात आल्या. प्रा. भोसले यांच्या संशोधन प्रकल्पांची सलग तीन वर्षे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांनी २०१६मध्ये कोल्हापूर शहर हद्दवाढ, २०१७मध्ये पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन व २०१८मध्ये जलयुक्त शिवार अशा समाजोपयोगी विषयांवर संशोधन केले आहे. यासाठी त्यांना विवेकानंद शिक्षणसंस्थेच्या सचिवा प्राचार्य शुभांगी गावडे, अध्यक्ष अभयकुमार साळुंखे, प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, डॉ. डी. सी. कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सतेज कृषी प्रदर्शनाला गर्दी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

तपोवन मैदानावर आयोजित सतेज कृषी प्रदर्शनाला रविवार असल्याने उचांकी गर्दी झाली. रात्री उशिरापर्यंत गर्दी कायम राहिली. दरम्यान, सायंकाळी साडेपाच वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रदर्शनाला भेट देऊन आयोजक आमदार सतेज पाटील यांचे कौतुक केले. गेल्या तीन दिवसांत तब्बल साडेनऊ कोटींची उलाढाल झाली. आज (सोमवार) प्रदर्शनाची सांगता होणार आहे.

सुट्टीमुळे कुटुंबांतील सर्व सदस्य, मित्रमंडळीसह अनेकांनी हजेरी लावली. प्रदर्शनात गडहिंग्लजमधील सतीश दळवी यांचा राणा आणि भोल्या हे जाफराबादी, मुऱ्हा जातीचे रेडे खास आकर्षण ठरले. राणा हा रेडा चार वर्षांचा असून त्याचे वजन तब्बल १२८० किलो आहे. त्याला एका वेळी सहा ते सात किलो पशुखाद्य लागते. जाफराबादी जातीचा भोल्या रेडा साडेपाच वर्षांचा असून त्याचे वजन ९०० किलो आहे. प्रदर्शनात देशी-विदेशी बनावटीची औजारे, बि-बियाणे, खते, किटकनाशके, देशी-परदेशी पक्षी, कडकनाथ कोंबडी, पंढरपुरी म्हशी, गंधारी गाय, शेळ्या पाहण्यासाठी आबालवृध्दांचे पाय रेंगाळत राहिले. प्रदर्शनात रणजित मस्कर यांच्या पंजाबी बीटल जातीच्या १०५ किलोच्या बोकडाने लक्ष वेधले. शेळीपालन करून वर्षाकाठी साडेतीन ते चार लाखांचे उत्पन्न मिळवत असल्याची माहिती मस्कर शेतकऱ्यांना देत होते. संकरीत म्हशी, कुक्कुटपालन, वैशिष्ट्यपूर्ण चिनी कोंबडय़ा, हलगीच्या तालावर नाचणाऱ्या बैलासोबत सेल्फी काढण्याचा अनेकजणांनी आनंद घेतला. कडकनाथ कोंबड्या, झुंजीसाठी प्रसिद्ध असलेला, सुमारे २५ हजार रुपये किंमतीचा कोंबडा आकर्षण ठरला. दुपारी राहुरी कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. धमेंद्रकुमार फाळके यांनी 'ऊस खोडवा व्यवस्थापना'बाबत मार्गदर्शन केले. 'खोडव्याचा ऊस चांगला येण्यासाठी पाचट न जाळता कुजवावे. पाचट हे खोडव्याला वरदान आहे,' असेही त्यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांची प्रदर्शनाला भेट

सायंकाळी पालकमंत्री पाटील यांनी प्रदर्शनाला भेट दिली. उपमहापौर भूपाल शेटे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी नगसेवक शारंगधर देशमुख, ऋतुराज पाटील, माजी सभापती प्रदीप झांबरे, शशिकांत खोत आदी उपस्थित होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, 'सरकार सामूहीक शेतीला प्रोत्साहन देत आहे. गटशेती करणाऱ्या मंडळास १ कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. याशिवाय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे बिनव्याजी १० लाखांचे कर्ज दिले जाईल. शेतकऱ्यांना नविन तंत्रज्ञानाची माहिती एकाच छताखाली मिळण्यासाठी सतेज पाटील यांनी प्रदर्शनाचे आयोजन करून शेती, पूरक उद्योगांना चालना दिली आहे.

आमदार सतेज पाटील म्हणाले, 'शेती उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रदर्शनाचे आयोजन केले. जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील लाखो शेतकरी भेट देत आहेत. प्रतिकूल हवामानामुळे यंदा उसाचे एकरी उत्पादन घटले आहे. पीककर्जाची वेळेत परतफेड करणे शक्य झालेले नाही. एफआरपीही मिळालेली नाही. त्यामुळे सरकारने पीक कर्जावरील व्याज भरण्याची जबाबदारी घ्यावी.'

सांगता कार्यक्रमास खासदार शेट्टी

सोमवारी सकाळी १० वाजता हिंजवडीचे कृषीतज्ज्ञ ज्ञानेश्वर बोडके हे 'अभिनव गटशेती' यावर मार्गदर्शन करतील. प्रदर्शनाची सांगता सायंकाळी ४ वाजता होईल. या कार्यक्रमास खासदार राजू शेट्टी, शिवसेना सह संपर्कप्रमुख संजय मंडलिक प्रमुख उपस्थित राहतील.

राजकीय भाष्य टाळले

पालकमंत्री पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित नवउर्जा महोत्सवाला आमदार सतेज पाटील यांनी भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी पालकमंत्र्यांना या प्रदर्शनासाठी आमंत्रण दिल्याचे सांगितले होते. त्यामुळे पालकमंत्री पाटील यांच्या सतेज कृषी प्रदर्शन भेटीवेळी राजकीय टोलेबाजीबद्दल उत्सुकता होती. मात्र पालकमंत्र्यांनी ते टाळत केवळ शेतीवरच मार्गदर्शन केले. आमदार पाटील यांनी मागणी केलेल्या पीककर्जाच्या व्याजमाफीवरही भाष्य केले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंधारलेले सांदिकोपरे प्रकाशमान व्हावेत

0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

'साहित्य आणि सांस्कृतिक भव्यता तसेच प्रगल्भता आणि आयोजनाच्या दृष्टीने मोठमोठ्या शहरांच्या तुलनेत एक छोटेखानी साहित्य संमेलन आयोजित होत असलेले उत्तूरसारखे गाव म्हणजे राज्याच्या तुलनेत सांदिकोपराच आहे. पण असे सांदिकोपरे अद्यापही अंधारलेलेच आहेत. तेथून साहित्याचा जन्म होण्यासाठी आधी ते प्रकाशमान व्हायला हवेत. त्यासाठी सूर्याची नसेल, पण एखाद्या पणतीची नितांत गरज आहे. अंधारलेल्या सांदिकोपऱ्यांना लिहिते करण्यासाठी अशा पणत्या सदोदित तेवत राहाव्यात, त्यासाठी सर्वांनीच पुढे यायला हवे,' असे प्रतिपादन ज्येष्ठ दिगदर्शक राजदत्त यांनी केले.

उत्तूर (ता. आजरा) येथील केंद्रशाळेच्या पटांगणात उभारलेल्या छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरीत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि त्रिवेणी साहित्य व सांस्कृतिक संस्था, उत्तूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या दुसऱ्या त्रिवेणी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे, ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे तसेच 'विद्रोही' साहित्यिक राजा शिरगुप्पे प्रमुख उपस्थित होते.

दरम्यान, सकाळच्या सत्रात साहित्यिकांच्या मांदियाळीत गावच्या मुख्य मार्गावरून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर साहित्य नगरीतील मुख्य मंचावर राजदत्त यांनी मान्यवरांसह साहित्य संमेलनाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने केले. संमेलनाचे संयोजक श्रीकांत नाईक यांनी प्रास्ताविक केले.

संमेलनाध्यक्ष डॉ. सुनीलकुमार लवटे म्हणाले, 'हरल्यानंतरचा आशेचा किरण दाखविण्याचे आणि न उन्मळता घात-आघात सोसण्याचे बळ साहित्य देते. पण भाषा मरू लागली तर साहित्यही मरायला लागते. म्हणून मराठी साहित्यावर अशी वेळ येऊ नये म्हणून मराठी भाषा टिकली पाहिजे आणि त्यासाठी अशी संमेलने व्हायला हवीत. साहित्यातील जागलेपण सामाजिक विकृतींचा लचका तोडत असते. समाजमनाला अस्वस्थ करते. असा अस्वस्थतेचा स्पर्श शब्दांस झाला तर शब्दांचे सौंदर्य वाढते आणि असे सौंदर्यपूर्ण शब्द वाचण्यास मन प्रवृत्त होते. म्हणूनच आता केवळ बहुजनांचीच नव्हे तर सर्वजणांची व्यथा साहित्यात प्रतिबिंबित व्हायला हवी. असे साहित्य सर्वांना आपले वाटेल आणि जीवनात सर्वांना तारेल.'

यावेळी राज्य साहित्य-संस्कृती मंडळाचे जोतिराम कदम, स्वागताध्यक्ष उमेश आपटे, सरपंच वैशाली आपटे यांचीही भाषणे झाली. यावेळी दशरथ पाटील, सुनील सुतार, डॉ. राजेंद्र कुंभार, इंद्रजित बनसोडे आदींना सन्मानित करण्यात आले, तर स्वप्नाली ठाकूर, सुनील सुतार व रसूल सोलापुरे यांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. सोनाली नवांगुळ, 'गोकुळ'चे रवींद्र आपटे, वसंतराव धुरे, 'त्रिवेणी'चे अध्यक्ष टी. के. पाटील, आदींसह मान्यवर व साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. किरण पाटील यांच्या खुमासदार निवेदनाने सोहळ्याची रंगत वाढविली.

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावर्डे दुमालात गोठ्याला आग

0
0

म. टा. वृत्तसेवा, कुडित्रे

सावर्डे दुमाला (ता. करवीर) येथील मुख्य रस्त्यावरील भराडी येथील जनावरांच्या गोठ्याला अचानक लागलेल्या आगीत गोठा भस्मसात झाला. आगीत म्हैस जागीच होरपळून ठार झाली. सर्व वैरण जळून खाक झाली. ही घटना रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. आगीत पाच कुटुंबांचे सुमारे १५ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

मुख्य मार्गालगत भराडी परिसरात निवृत्ती राजाराम कारंडे, भीमराव राजाराम कारंडे, अर्जुना सुभाना कारंडे, बाबूराव दादू कारंडे, अजित कुंडलिक कारंडे या पाच कुटुंबांचा एकत्रित मोठा गोठा आहे. या गोठ्यात सर्वांची मिळून एकूण १३ जनावरे होती. सायंकाळी सातच्या सुमारास ग्रामस्थांना अचानक गोठ्यात आग लागल्याचे दिसू लागले. गोठ्यात मोठ्या प्रमाणात गवत, पिंजर असल्यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले.

आगीमध्ये म्हैस जागीच ठार झाली, तर दोन जनावरे गंभीर जखमी झाली आहेत. तसेच १५ हजार गंजी गवत तसेच दोन होळी पिंजर, धान्य, शेतीची अवजारे, पाण्याच्या टाक्या, जळाऊ लाकड आदींसह संपूर्ण गोठा आगीत भस्मसात झाला. या संपूर्ण नुकसानीचा विचार करता आगीमुळे सुमारे १५ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कुटुंबीयांनीकडून सांगण्यात आले.

दरम्यान, फुलेवाडी अग्निशमन दलाने तासाभराच्या कालावधीनंतर आग आटोक्यात आणली. घटनास्थळी करवीरचे पोलिस पीएसआय भरत पाटील, हवालदार रणजित देसाई आदींनी भेट दिली.

००००

फोटो : सावर्डे दुमाला ता. करवीर येथील कारंडे बंधूंच्या गोठ्याला लागलेल्या आगीचे लोळ.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काशीद

0
0

'शिवा काशीद समाधिस्थळाची

स्वच्छता करणे माझी जबाबदारी'

म. टा. वृत्तसेवा, कागल

'पन्हाळागडावर स्वामीनिष्ठ नरवीर शिवा काशीद यांचा समाधिस्थळ परिसर गवत, झाडाझुडपांनी झाकोळला आहे. याची स्वच्छता करणे काळाची गरज आहे. काशीद नाभिक समाजाचे दैवत आहे. मी शाहू महाराजांच्या जनक घराण्याचा वंशज असल्याने माझी जबाबदारी म्हणून समाधिस्थळाची स्वच्छता करण्यासाठी स्वत: श्रमदानासाठी पुढाकार घेत आहे. इतिहासप्रेमींसह नाभिक समाजबांधवांनी मोठ्या संख्येने ५ जानेवारीला सकाळी नऊ वाजता समाधिस्थळाजवळ उपस्थित राहावे,' असे आवाहन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकार बैठकीत केले.

शाहू साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर आयोजित केलेल्या पत्रकार बैठकीत ते बोलत होते. शाहूचे संचालक सचिन मगदूम, जिल्हा नाभिक महामंडळाचे कार्याध्यक्ष अनिल संकपाळ, उपाध्यक्ष कृष्णात कोरे, संवर्धन कमिटीचे अध्यक्ष नरेंद्र माने, विश्वास गंगधर, आदींसह नाभिक समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

घाटगे म्हणाले, 'हा केवळ नाभिक समाजाचा कार्यक्रम नाही. काशीद यांचे कर्तृत्व मानणाऱ्या सर्वांचा हा कार्यक्रम आहे. त्यामुळे सर्वांच्या श्रमदानातून येथील स्वच्छता व बदल करून हे क्षेत्र पर्यटनस्थळ व्हावे अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी तीन टप्प्यांत कामांचे नियोजन केले आहे. पहिल्या टप्प्यात गवत काढणे, काटेरी झुडपे काढणे, सुशोभित झाडे लावणे, डस्टबिनची सुविधा करणे, कोनशिला नूतनीकरण करणे, पिण्याच्या पाण्याची सोय, सोलरवर लाईटची सोय करणे आदी बाबींचा समावेश आहे. याशिवाय याठिकाणी असणारे एका टनाचे वजनाचे दगड वापरून रॉक गार्डन बनविण्यात येईल.यासाठी येणारा तीन लाख रुपयांचा खर्च राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.'

०००

नाभिक समाजाला स्वावलंबी बनवू

थोर महापुरुषांच्या अथवा व्यक्तींच्या कामावर कोणत्याही कारणाने पावशेर ठेवण्याची आमची संस्कृती नाही, असा टोला लगावून समरजितसिंह घाटगे म्हणाले, 'नाभिक समाज स्वत:चा छोटा व्यवसाय करणारा समाज आहे. परंतु या समाजाला शाश्वत स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टीने एका योजनेचा प्रारंभबी या दिवशी करण्यात येईल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नववर्षाची जंगी तयारी

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आकर्षक विद्युत रोषणाईने उजळलेले शहर, सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी हॉटेल्स व रिसोर्टमध्ये करण्यात आलेले ग्रँड मस्तीचे कार्यक्रम यातून नवीन वर्षाचे धमाकेदार स्वागत करण्यासाठी करवीरनगरी सज्ज झाली आहे. मात्र अनेकजणांनी रविवारीच सहकुटुंब, मित्रमंडळींसोबत मांसाहरी जेवणाचा आस्वाद घेत नवीन वर्षाच्या स्वागताचा एक दिवस अगोदरच आनंद लुटला. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत हॉटेल, रिसॉर्ट, महामार्गावरील धाब्यांवर प्रचंड गर्दी होती.

तरुणाईकडून ३१ डिसेंबरची तयारी काही दिवसांपासून सुरू आहे. त्यांचा जल्लोषाचा मूड पाहून अनेक हॉटेल्स व रिसोर्टमध्ये स्वागताच्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्याचबरोबर अनेकजण सहकुटुंब विविध प्रकारच्या जेवणाचा आस्वाद घेत असल्याने त्यादृष्टीने हॉटेल्सने विविध मेन्यूंचा अंतर्भाव केला होता. सोमवारी अनेकजण मांसाहार करत नसल्याने रविवारीच कुटंबीय व मित्रांसोबत पार्टीचे आयोजन केले होते. त्यामुळे सकाळपासूनच मटण, मासे मार्केटमध्ये गर्दी होती. ठिकठिकाणच्या मटण व चिकन विक्रीच्या दुकानांमध्ये खरेदीसाठी दिवसभर नागरिकांची गर्दी होती. महामार्गावरील धाबे तसेच हॉटेल्स रात्री उशिरापर्यंत फुललेली होती. सुट्या असल्याने शहरातील अंबाबाई मंदिरासह सर्वच पर्यटन स्थळांवर पर्यटकांची दिवसभर मोठी गर्दी राहिली. शहरातही प्रचंड गर्दी झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पाटणकर हायस्कूलचे कार्य कौतुकास्पद

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'सध्याच्या स्पर्धेच्या युगात नागोजीराव पाटणकर हायस्कूलचे कार्य कौतुकास्पद आहे' असे मत डॉ. शिवाजीराव भोई यांनी केले व्यक्त केले. नागोजीराव पाटणकर हायस्कूल मराठी शाखा व अभिनव बालक मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजित केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळ पाटणकर होते.

याप्रसंगी नागोजीराव पाटणकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त घेतलेल्या स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार व वार्षिक पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम झाला. मुख्याध्यापक एस. आर. गुरव यांनी प्रास्ताविक केले. एच. आर. सत्रे यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक पी. जे. बामणे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला सिद्धार्थ पाटणकर, नकुल पाटणकर, पर्यवेक्षक एस. डी. पुजारी, अभिनव बालक मंदिराच्या मुख्याध्यापिका ए. पी. नवाळे आदी उपस्थित होते.

कोल्हापूर टाइम्स टीम

येथील आर. के. वालावलकर प्रशालेत गणित दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या मुख्याध्यापक प्रेरणा जाधव उपस्थित होत्या. यावेळी गणिताची व्यवहाराशी सांगड घातली जावी याकरिता खाद्यपदार्थ तसेच इतर वस्तूंचे स्टॉल मांडण्यात आले होते. कार्यक्रमात राधिका सोवनी हिने 'पायथागोरस', रोहिणी कुऱ्हाडेने 'श्रीनिवास रामानुजन', सृष्टी चव्हाणने 'पायथागोरस', अथर्व कंबळकरने 'आर्यभट्ट' यांच्याविषयी माहिती दिली. राजकन्या ओक व साक्षी पोवार यांनी सूत्रसंचालन केले. सौंदर्या चव्हाण हिने आभार मानले.

नेहरू हायस्कूलमध्ये क्रीडा महोत्सव

कोल्हापूर : नेहरू हायस्कूल ज्यु.कॉलेजमध्ये वार्षिक शालेय क्रीडा महोत्सवास सुरुवात झाली. महोत्सवाचे उदघाटन हॉकीपटू विजय साळोखे -सरदार यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन गणी आजरेकर होते. यावेळी डॉ. सुरज बागवाल यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक कादरभाई मलबारी यांनी केले. याप्रसंगी आदिलभाई फरास, लियाकत मुजावर, अल्ताफ झांझी, पापाभाई बागवान, हामजेखान शिंदी, जहांगीर अत्तार, रफिक मुल्ला, फारूक पटवेगार, एम. ए. नदाफ आदी उपस्थित होते. रफिक शेख यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक एस. एस. काझी यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलांवर दारू विक्रेत्यांचा हल्ला

0
0

महिलांवर दारू विक्रेत्यांचा हल्ला

कराड :

शहापूर (ता. कराड) येथे अनेक वेळा बैठका होऊनही व पोलिसांनी दारूबंदीचे आश्वासन देऊनही राजरोसपणे दारू धंदे सुरू आहेत. या बेकायदा दारू धंद्याचा पर्दाफाश करण्यासाठी गेलेल्या महिलांवर चक्क दारू विक्रेत्यांनी हल्ला करून महिलांना जखमी केल्याची घटना रविवारी, सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. या घटनेमुळे पोलिसांची निष्क्रियता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून, सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून येथील महिलांनी गावात सुरू असलेल्या बेकायदा दारू धंदे बंद करण्याविषयी मोहीम राबवली आहे. अवैध दारूधंदे बंद करण्यासाठी महिलांनी मुख्यमंत्री व उत्पादन शुल्क विभाग पोलिस प्रशासन वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदने पाठवली आहेत. शहापूर येथे अनेक ठिकाणी बेकायदा दारू विक्री होत असल्याने महिलांनी या पूर्वीही पोलिसांना निवेदन दिले होते, तसेच मागील काही दिवसांपूर्वी येथे बैठक ही झाली होती. त्या वेळी पोलिसांनी येथील दारू विक्रेत्यांना समोर बोलवून पूर्णपणे दारूबंदी करण्याविषयी सूचनाही केल्या होत्या. पोलिसांनी वारंवार सूचना करूनही या ठिकाणी दारू विक्री होत असल्याने संतप्त झालेल्या महिलांनी उंब्रज पोलिस ठाण्यासमोरच दारू विक्री करण्याचा इशाराही पोलिसांना दिलेला होता. त्या वेळी पोलिसांनी महिला आणि ग्रामस्थांनी दारू विक्रीची संयुक्त बैठक घेऊन दारूबंदीचे ठोस आश्वासन दिले होते. त्या नंतरही शहापूर येथे ठिकाणी अवैद्य दारू विक्री होत असल्याने संतप्त झालेल्या सुमारे दहा ते पंधरा महिलांनी रविवार सायंकाळी सहाच्या सुमारास कराड मसूर रस्त्यालगत शहापूर गावच्या हद्दीत असणाऱ्या साईप्रसाद हॉटेल-धाबा या ठिकाणी होत असलेल्या बेकायदा दारू विक्रीकडे आपला धडक मोर्चा वळविला. हॉटेलमध्ये जाऊन महिलांनी दारू विक्री करताना हॉटेल मालकासह काही महिलांना रंगेहात पकडले. या वेळी या ठिकाणी दारू विक्री करणाऱ्या महिला व पुरुषांनी चहाचे पातेले, मिक्सर आधी साहित्यांनी महिलांना मारहाण केली. गरम चहा अंगावर ओतला. महिलांचे केस ओडून लाथा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. या वेळी महिलांनी किचनच्या खाली खड्डा काढून चोरट्या विक्रीसाठी लपवून ठेवलेल्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या शोधून काढल्या. ग्रामस्थांनी पोलिसांना फोन केला, पोलिस घटनास्थळी आल्याने पुढील अनर्थ टळला. या वेळी पोलिस- महिलांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. दारूबंदीसाठी ग्रामस्थ, महिलांनी पुन्हा एकदा प्रखर भूमिका पोलिसांसमोर मांडली. रात्री उशिरापर्यंत मसूर पोलिस दूरक्षेत्रात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाभिमानीच्या मोर्चात ५० हजार शेतकरी सहभागी होणार

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'एकरकमी एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, या मागणीसाठी काढण्यात येणाऱ्या मोर्चात कोल्हापूर आणि सांगलीमधील ५० हजार शेतकरी सहभागी होतील,' असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी व्यक्त केली. मंगळवारी (ता. १ जानेवारी) कोल्हापुरातील प्रादेशिक साखर सह संचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाच्या नियोजनासाठी शासकीय विश्रामगृहात स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

'एफआरपीसाठी सरकारची तिजोरी खाली करू अशी ग्वाही देणारे मुख्यमंत्री गप्प का आहेत?' असा सवाल करत प्रा. डॉ. जालंदर पाटील म्हणाले, '१९६६च्या शुगर अॅक्टनुसार एफआरपी १४ दिवसांत देण्याचा कायदा आहे. पण सरकार आणि कारखानदार यांच्यात मिलिभगत होऊन एफआरपीचे पाडण्याचे षङयंत्र रचले असून हे कदापि सहन केले जाणार नाही. साखरेचे दर कोसळले असल्याचे कारण पुढे करुन शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. मुख्यमंत्री, पालकमंत्री, सहकारमंत्री याबाबतीत अवाक्षरही काढत नाहीत. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी स्वाभिमानी रस्त्यावर उतरणार आहे.'

'रस्त्यावरील आरपारच्या लढाईसाठी शेतकऱ्यांनी सज्ज रहावे. मोर्चासाठी रेकॉडब्रेक शेतकऱ्यांची गर्दी होईल,' असा विश्वास सावकार मादनाईक यांनी व्यक्त केला.

बैठकीला रमेश भोजकर, अदिनाथ हेमगिरे, मिलिंद साखरपे, सागर संभूशेटे, अजित पोवार, वैभव कांबळे, शैलेश आडके, सागर चिप्परगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर स्मृतिदिन

0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

'बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची गरजू ओळखून १९४५ मध्ये शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. त्यांनी शिक्षण प्रसाराचे व्रत घेऊन आयुष्यभर काम केले' असे प्रतिपादन संग्रामसिंह खर्डेकर यांनी केले. बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जागर फाऊंडेशनचे अध्यक्ष बी. जी. मांगले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

'बॅरिस्टर खर्डेकर यांनी प्राथमिक व माध्यमिक शाळा उभ्या केल्या. गोपाळ कृष्ण गोखले कॉलेज व वेंगुर्ले कॉलेजची स्थापना केली' असे संग्रामसिंह खर्डेकर म्हणाले. श्रीमंत बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर-निंबाळकर फाऊंडेशनतर्फे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अंधशाळेतील मुलांना जीवनावश्यक वस्तू आणि फळांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला विराज खर्डेकर, राहुल खर्डेकर, अमिर अरब, संजय काळे, राजू पाटील, राजू मालेकर आदी उपस्थित होते.

\Bकॉलेज ऑफ फार्मसीत वार्षिक क्रीडा स्पर्धा \B

कोल्हापूर टाइम्स टीम

कॉलेज ऑफ फार्मसी येथे वार्षिक क्रिडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एन. मोरे यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी डॉ. मोरे म्हणाले, 'भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी हे विद्यार्थ्यांच्या संपूर्ण विकासाबाबतीत कटिबद्ध आहे. यासाठी विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना निर्माण व्हावी तसेच संघामधून खेळत असताना सर्वाबरोबर एकत्रितरित्या आव्हानांना सामोरे जाण्याची कला विद्यार्थ्यांनी आत्मसात करावी या हेतूने क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.'

स्पर्धेत क्रिकेट, अँथलीटीक्स, व्हॉलीबॉल, थ्रोबॉल, बॅडमिंटन, टेबलटेनिस, चेस, कॅरम, खो-खो अशा विविध खेळाच्या स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेत तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. स्पर्धा संयोजनात महाविद्यालयाचे क्रीडाप्रमुख व्ही. टी. राजिगरे, डॉ. पी. बी चौधरी, विद्यार्थी क्रीडाप्रमुख विशाल खाडे यांनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिव्यांग मतदारांना मदतनीस

0
0

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीत दिव्यांग मतदारांना मदतनीस देण्यासाठी निवडणूक प्रशासनाने आतापासून तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या जिल्ह्यातील १५ संस्थांशी संपर्क साधण्यात आला आहे. मतदानादिवशी या संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. एकही दिव्यांग मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी विशेष जागृती मोहीम राबविली जात आहे. पहिल्या टप्यात जिल्ह्यातील १७ हजार ९२७ दिव्यागांची यादी निवडणूक प्रशासनाकडे प्राप्त झाली आहे.

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार १८ वर्षावरील प्रत्येक व्यक्तीने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जिल्हा, तालुका, गाव पातळीवर प्रशासन जागृती करीत आहे. याअंतर्गत अपंगत्व हे मतदानात अडथळा ठरू नये यासाठी प्रशासन दिव्यांग मतदारांपर्यंत पोहोचत आहे. यापूर्वीच्या निवडणुकांत उमेदवारांचे कार्यकर्तेच दिव्यांग मतदारांना घरापासून मतदान केंद्रापर्यंत घेऊन येत आणि घरी पोहोचवत. यावर विरोधी उमेदवारांकडून आक्षेप, तक्रारी घेतल्या जातात. त्यामुळे निवडणूक प्रशासन त्त्यांना मदतनीस मिळवून देणार आहे. मदतनीसांना आवश्यकतेनुसार प्रशिक्षणही देण्यात येईल. सुधारित अपंग हक्क कायद्याच्या अंमलबजावणीनंतर अशा प्रकारे दिव्यांग मतदारांना सेवा, सुविधा दिल्या जाणार आहेत.

अंध मतदारांना ब्रेलपट्टी

पूर्णपणे अंध मतदारांनाही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान यंत्रावर ब्रेल लिपीतील पट्टी असणार आहे. मदतनिसाने संबंधित मतदारास त्या पट्टीची ओळख करून द्यायची आहे. नंतर ते स्वत: मतदान करतील. दोन्ही पायांनी अपंग मतदारांना व्हीलचेअरवर बसून मतदान करता येईल असे मतदान यंत्र बसविण्याची सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. दृष्टी कमी आणि मानसिक विकारग्रस्त मतदारांना मतदान करताना जादा वेळ देण्यात येणार आहे.

मदतीसाठी या संस्थांची मदत

हेल्पर्स ऑफ दि हँडिकॅप्ड, राष्ट्रीय अपंग विकास महासंघ, अपंग पुनर्वसन, अपंग वात्सल्य, अपंग रोजगार व स्वंयरोजगार, साद पालक संघटना, जीवनधारा अपंग, सर्वोदय बहुउद्देशीय सेवाभावी, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट पॅरालिपीक, अंधस्पर्श ज्योत फाउंडेशन, अंध शाळा (कोल्हापूर), अंध युवक मंच (हणबरवाडी), विकलांग सेवा (नांदणी, ता. शिरोळ).

लोकसभा निवडणुकीत दिव्यांग मतदारांना मदतनीस देण्यात येईल. त्यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आतापासून जागृती केली जात आहे. दिव्यांगासाठी काम कारणाऱ्या संस्थांची यासाठी मदत घेण्यात येणार आहे. पूर्णपणे अंध मतदारांनाही मतदान करता यावे यासाठी यंत्रावर ब्रेल लिपीतील पट्टी असेल. कोणत्याही प्रकारच्या दिव्यांगांना मतदान करता येईल याची दक्षता घेत आहोत.

- स्नेहल भोसले, उपजिल्हाधिकारी, निवडणूक

सर्वाधिक दिव्यांग हातकणंगले तालुक्यात

करवीर : २२४४

आजरा : १०७७

भुदरगड : १०७२

चंदगड : ११६८

गगनबावडा :१६५

गडहिंग्लज :१३८८

हातकणंगले : ३४९१

कागल : १५१२

पन्हाळा : १५४०

राधानगरी : १४५३

शाहूवाडी : ७१४

शिरोळ : २१०३

०००

(मूळ कॉपी)

निवडणूक प्रशासन जिल्ह्यातील १५ संस्थांची घेणार मदत

Bhimgonda.Desai@timesgroup.com

Tweet : @bhimgondaMT

कोल्हापूर : येत्या लोकसभा निवडणुकीत दिव्यांग मतदारांना मदतनीस देण्यासाठी निवडणूक प्रशासन आतापासून तयारी करीत आहे. यापार्श्वभूमीवर त्यांच्यासाठी काम करणाऱ्या जिल्ह्यातील १५ संस्थांशी संपर्क साधण्यात आला आहे. या संस्थांची मतदानादिवशी मदत घेण्यात येणार आहे. एकही दिव्यांग मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी जागृतीसाठी विशेष मोहिम राबवली जात आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्यात १७ हजार ९२७ दिव्यागांची यादी निवडणूक प्रशासनाकडे प्राप्त झाली आहे.

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार १८ वर्षावरील प्रत्येकांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जिल्हा, तालुका, गाव पातळीवर प्रशासन जागृती करीत आहे. यातर्गंत अपंगत्व मतदानात अडथळा ठरू नये, यासाठी प्रशासन दिव्यांग मतदारांपर्यंत पोहचत आहे. दरम्यान, यापूर्वीच्या निवडणुकांत उमेदवारांचे कार्यकर्तेच दिव्यांग मतदारांना घरापासून केंद्रापर्यंत घेऊन येत आणि सोडून जात. यावर विरोधी उमेदवाराकडून आक्षेप, तक्रारी होतात. यामुळे निवडणूक प्रशासनच मदतनीस मिळवून देणार आहे. मदतनीसना आवश्यकतेनुसार प्रशिक्षणही देण्यात येईल. सुधारित अपंग हक्क कायद्याच्या अंमलबजावणीनंतर अशाप्रकारे दिव्यांग मतदारांना सेवा, सुविधा दिल्या जाणार आहेत.

-----------------

सर्वाधिक हातकणंगले तालुक्यातील

निवडणूक प्रशासनाकडे प्राप्त दिव्यांग मतदारांची तालुकानिहाय संख्या अशी : करवीर : २२४४, आजरा : १०७७, भुदरगड : १०७२, चंदगड : ११६८, गगनबावडा :१६५, गडहिंग्लज :१३८८, हातकणंगले : ३४९१, कागल : १५१२, पन्हाळा : १५४०, राधानगरी : १४५३, शाहूवाडी : ७१४, शिरोळ : २१०३.

------

चौकट

अंध मतदारांना ब्रेलपट्टी

पूर्णपणे अंध मतदारासही मतदानाचा हक्क बजावत येण्यासाठी मतदान यंत्रावर ब्रेल लिपीतील पट्टी असणार आहे. मदतनिसाने संबंधीत मतदारास त्या पट्टीची ओळख करून द्यायची आहे. त्यानंतर ते स्वत: मतदान करतील. दोन्ही पायांनी अपंग मतदारांना व्हीलचेअरवर बसून मतदान करता येईल, असे मतदान यंत्र बसवण्याची सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. दृष्टीकमी आणि मानसिकविकारग्रस्त मतदारांना मतदान करताना जादा वेळ देण्यात येणार आहे.

------------

मदतीसाठी या संस्थांची मदत

हेल्पर्स ऑफ दि हॅन्डिकॅप्ड, राष्ट्रीय अपंग विकास महासंघ, अपंग पुनर्वसन, अपंग वात्सल्य, अपंग रोजगार व स्वंयरोजगार, साद पालक संघटना, जीवनधारा अपंग, सर्वोदय बहुउद्देशीय सेवाभावी, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट पॅरालिपीक, अंधस्पर्श ज्योत फौउंडेशन, अंध शाळा (कोल्हापूर), अंध युवक मंच (हणबरवाडी), विकलांग सेवा (नांदणी, ता. शिरोळ).

--------

कोट

लोकसभा निवडणुकीत दिव्यांग मतदारांना मदतनीस देण्यात येईल. त्यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आतापासून जागृती केली जात आहे. मदतीसाठी दिव्यांगासाठी काम कारणाऱ्या संस्थांची मदत घेण्यात येणार आहे. पूर्णपणे अंध मतदारासही मतदान करता येण्यासाठी यंत्रावर ब्रेल लिपीतील पट्टी असेल. कोणत्याही प्रकारच्या दिव्यांगांना मतदान करता येईल.

स्नेहल भोसले, उपजिल्हाधिकारी, निवडणूक

--------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images