Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पालकमंत्र्यांना भेटीस आलेल्या कोतवाल महिलेस चक्कर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना शासकीय विश्रामगृहात भेटीस आलेल्या कोतवाल्यांच्या शिष्टमंडळातील महिला कोतवाल कोमल संजय पाटील (वय ३१, रा. बांबर्डे, ता. राधानगरी) चक्कर येऊन कोसळल्या. अचानक झालेल्या घटनेने व्हरांड्यात गोंधळ उडाला. कोमल यांना '१०८' रुग्णवाहिकेतून सीपीआर रुग्णालयात उपचारास दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेले १७ दिवस कोतवालांचे धरणे आंदोलन सुरू आहे. सरकारने त्यांच्या मागण्याची दखल न घेतल्याने शनिवारी कोतवालांचे शिष्टमंडळ भेटावयास शासकीय विश्रामगृहात गेले. पालकमंत्र्यांची लवकर भेट मिळत नसल्याने शिष्टमंडळ ताटकळत होते. अचानक कोमल पाटील या चक्कर येऊन कोसळल्या. सहकारी महिलांनी त्यांना पाणी पिण्यास दिले. दरम्यान ही घटना समजताच पालकमंत्री पाटील आणि आमदार अमल महाडिक व्हरांड्यात धावले. त्यांनी पाटील यांना विश्रामगृहातील हॉलमध्ये नेले. फ्यावर झोपण्यास सांगितले. त्यानंतर पालकमंत्री पाटील यांनी कोमल पाटील यांची विचारपूस करुन शिष्टमंडळाशी चर्चा केली. दरम्यान संघटनेतील कार्यकर्त्यांनी संपर्क साधल्यानंतर १०८ रुग्णवाहिकेतून त्यांना सीपीआर रुग्णालयात उपचारास दाखल केले. दरम्यान पालकमंत्र्याची चर्चा करुनही समाधान न झाल्याने आंदोलन सुरूच राहिल कोतवाल संघटनेचे सचिव राजेंद्र पुजारी यांनी सांगितले. शिष्टमंडळात संदीप टिपुगडे, उमेश कांबळे, अतुल जगताप, योगीता पाटील, कमल पाटील आदी कोतवालांचा समावेश होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘किटी पार्टी’त युवती-महिलांची धमाल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

फनी गेम्सची धमाल, स्पॉट गेममुळे मिनिटा-मिनिटाला निर्माण होणारे हास्याचे कारंजे, प्रत्येक स्पर्धेला युवती-महिलांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सोबतीला आरोग्य व सौंदर्यविषयक टीप्स अशा वातावरणात शनिवारी सायंकाळी 'किटी पार्टी' रंगली. मनोरंजनासोबतच आरोग्यविषयक जागृती करणारा हा कार्यक्रम महिला वर्गाच्या विशेष पसंतीस उतरला. तब्बल दोन तासांहून अधिक वेळ सहभागी युवती-महिलांनी धमाल केली. 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

शिवाजी पार्क येथील हॉटेल 'के ट्री'मध्ये आयोजित कार्यक्रमात सहभागी महिलांना सहभागी महिलांना बेस्ट ऑफ पलेस आणि पिंक स्टोअरतर्फे बक्षीसे देण्यात आली. या कार्यक्रमासाठी अनघा ज्वेल्स मुख्य प्रायोजक तर अमोघा स्कीन केअर, गगन टुर्स सहप्रायोजक आहेत. हॉस्पिटॅलिटी पार्टनर म्हणून हॉटेल के ट्री यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमात भाग्यश्री शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

सौंदर्य उपचारतज्ज्ञ डॉ. वृषाली शिंदे यांनी स्कीन केअरबाबत मार्गदर्शन केले. शिंदे म्हणाल्या, 'निरोगी जीवन आणि तजेलदार चेहऱ्यासाठी संतुलित आहार आवश्यक आहे. रोज सात ते आठ ग्लास पाणी, पुरेशी झोप, दिवसातून दोन वेळेला स्वच्छता या बाबी महत्वाच्या आहेत. बाहेर जाताना उन्हापासून संरक्षण करण्यासाठी सनस्कीन क्रीमचा वापर करावा. उन्हात जात नसल्यास खूप सारे जीवनसत्व असणाऱ्या डे स्कीन क्रीम उपयुक्त ठरतात. रात्री आर्द्रता शोषून घेणाऱ्या क्रीमचा वापर करा. डोळ्याभोवती काळी वर्तुळे निर्माण झाल्यास बदाम कच्चा दुधामध्ये वगळून लावावे. तजेलदार चेहऱ्यासाठी खास चेहऱ्याचे व्यायाम केले पाहिजेत. केस हा जीवनाच्या दृष्टीने नगण्य समजला तरी शरीरात होणाऱ्या बिघाडाचा परिणाम पहिल्यांदा त्याच्यावर होतात. केस गळणे, विरळ होणे या समस्या उद्भवू लागतात. आनंदी जीवनासाठी स्वच्छ राहा, सुंदर राहा आणि स्वस्थ राहा.'

मेकअप डेमो ठरला आकर्षण

'किटी पार्टीमध्ये मेकअप डेमो खास आकर्षण ठरला. रिरा हेअर अँड ब्युटी ट्रेंड्सच्या सपना नकाते यांनी मेकअपचे प्रात्यक्षिक दाखविले. मेकअप हा सगळ्यांचा वीक पाँईंट आहे. छान दिसणे हे प्रत्येकाला आवडते. प्रसन्न व्यक्तिमत्वाचा प्रभाव राहतो असे त्यांनी नमूद केले. याप्रसंगी त्यांनी मेकअपचे प्रकार, वेगवेगळया स्कीनवर कशा पध्दतीचा मेकअप उठावदार होईल यासंबंधी मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवउर्जा उत्सवात दत्तनामाचा गजर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

श्री गणेशाचे अष्टगंधम अर्चन कार्यक्रम, दत्तात्रयावर आधारित भक्तीगीतांचा कार्यक्रम असा माहौल शनिवारी दिवसभर 'नवउर्जा उत्सव'मध्ये पाहावयास मिळाला. महाराष्ट्रातील लोकदेवता पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांसह बाहेरगावच्या पर्यटक भाविकांनी हजेरी लावली. उत्सवाच्या दर्शनी भागात उभारलेली दत्तात्रयांची ३३ फुटी मूर्ती सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले. दत्तजयंतीच्या निमित्ताने मूर्तीच्या दर्शनाचा आनंद नागरिकांच्या चेहऱ्यावर उमटला होता. निर्माण चौकात दत्तनामाचा गजर घुमत होता.

दत्तजयंतीचे औचित्य साधून सकाळी ११.३० वाजता एक महिलांच्या उपस्थितीमध्ये श्री गणेशाचे अष्टगंधम अर्चन कार्यक्रम भक्तीमय वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास कलादिग्दर्शक नितीन देसाई, प्रसिगद्ध अभिनेत्री निशिगंधा वाड, त्यांचे पती दीपक देऊळकर उपस्थित होते. नवउर्जा उत्सवातील ११ लोकदेवतांच्या मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहेत. मंडपाच्या प्रवेशव्दारासमोर उभारलेल्या त्रिमूर्ती दत्त, विठ्ठल आणि साईबाबांच्या मूर्ती खास आकर्षण ठरल्या आाहेत. कोल्हापुरातील वेगवेगळ्या शाळांतील विद्यार्थ्यांनी येथे भेट दिली. शनिवारी दत्तजयंती, त्याचे औचित्य साधून रणजित बुगले व सहकलाकारांचा भक्तीरंग हा कार्यक्रम झाला. दत्तात्रयावरील आधारित गीतांच्या सादरीकरणाने सारे वातावरण भक्तीमय बनले होते. सायंकाळी सहा वाजता चंदू पाटील यांच्या 'बी ऑन इट' कलाकारांनी नवउर्जा गाण्यावर नृत्याविष्कार सादर केला. सायंकाळी सहानंतर पाहण्यासाठी गर्दी वाढली. करवीरनिवासिनी अंबाबाई दर्शनासाठी व पर्यटनासाठी कोल्हापुरात आलेल्या पर्यटक व भाविकांची पावले नवउर्जा उत्सवकडे वळली.

मान्यवरांचा सत्कार

सायंकाळी विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये डॉ. संदीप पाटील, पत्रकार उदय कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ता बंटी सावंत आणि स्वयंसिध्दा संस्थेतील तृप्ती पुरेकर यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या हस्ते व आमदार अमल महाडिक,'गोशिमा'चे अध्यक्ष लक्ष्मीदास पटेल, कार्यक्रमाचे आयेजक राहुल चिकोडे यांच्या उपस्थितीत सत्कारमूर्तींना मानचिन्ह देऊन सन्मान केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हिजड्याला मुलं होतील, पण सिंचन योजना पूर्ण होणार नाही: गडकरी

$
0
0

सांगली:

'एकवेळ हिजड्याशी लग्न केलं तर त्याला मुलं होतील, पण सिंचन योजना काही पूर्ण होणार नाहीत असं आम्हाला वाटलं होतं, पण भाजप सरकारनं सिंचन योजना पूर्ण करून दाखवली,' असं वादग्रस्त विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात केलं.

सांगलीतील शेतकरी मेळाव्यात टेंभू सिंचन योजनेसंदर्भात बोलताना गडकरी यांनी हे विधान केलं. टेंभू योजना अनेक वर्षांपासून रखडली होती. ती पूर्ण होईल असं आम्हालाही वाटलं नव्हतं. खरं तर इथे ते बोलू नये. एक वेळ हिजड्याशी लग्न केलं तर मुलं होतील, पण सिंचन प्रकल्प पूर्ण होणार नाही. भाजप सरकारच्या काळात ते पूर्ण झाले. येथील शेतकऱ्यांचं स्वप्न पूर्ण झालं. तसंच यांसारख्या अनेक योजना भाजप सरकारच्या काळात पूर्ण झाल्या,' असं गडकरी म्हणाले.

दरम्यान, वादग्रस्त वक्तव्यांमुळं गडकरी चर्चेत आहेत. त्याबाबत गडकरी यांनी स्पष्टीकरणही दिलंय. माझी वक्तव्ये तोडूनमोडून दाखवली जात आहेत. माझी आणि पक्षाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप त्यांनी विरोधी पक्ष आणि मीडियावर केला. हे स्पष्टीकरण देऊन काही तास उलटत नाहीत, तोच त्यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्धव घाटाला रामदास कदमांकडून एक कोटींचा निधी

$
0
0

सुनील दिवाण, पंढरपूर

केवळ नावामुळे पंढरपूरच्या घाटाचे भाग्य फळफळले असून, चंद्रभागेवरील पुरातन उद्धव घाटाला पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी थेट १ कोटी रुपयांचा निधी जाहीर करीत आपली उद्धव निष्ठा दाखवून दिली आहे. चंद्रभागा आरतीसाठी उद्धव ठाकरे इस्कॉन घाटावर येणार असल्याने कदम या घाटाची पाहणी करीत असताना समोरच्या घाटाचे नाव देखील उद्धव घाट आहे, असे त्यांच्या निदर्शनास आणताच कदम यांनी आपल्या विभागातून घाट सुशोभीकरणासाठी तातडीने एक कोटींचा निधी जाहीर केला. जिल्हाधिकाऱ्यांना या घाटाचे सुशोभीकरण करण्याचे आदेश दिले. गेली वर्षानुवर्षे हा उद्धव घाट चंद्रभागेच्या तीरावर असून, घाटाची अतिशय दुरावस्था झाली आहे.

श्रीकृष्णाचा सखा असलेला उद्धव याचे येथे छोटेखानी मंदिर असल्याने या घाटाला उद्धव घाट नाव पडले आहे. याच घाटाच्या परिसरातून दुर्दैवाने शहरातील ड्रेनेजचे पाणी थेट चंद्रभागेत नेहमीच मिसळत असते. आता या घाटाचे सुशोभीकरण करण्याचे आदेश रामदास कदम यांनी दिल्याने सर्वांत जास्त दुर्लक्षित असलेल्या या घाटाचे नशीब केवळ नावामुळे फळफळणार, असं म्हटल्यास वावगं ठरू नये.

चंद्रभागेच्या आरतीकडे सर्वांचं लक्ष

उद्धव ठाकरे करणार असलेल्या चंद्रभागेच्या महाआरतीकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागले आहे. आरती होणारा इस्कॉन घाट शिवसेनेकडून स्वच्छ करण्यात आला आहे. तरीदेखील आरती होणाऱ्या चंद्रभागेची दुरावस्था मात्र कायम असून, सफाई करण्याऐवजी प्रशासनाने फक्त शेंड्या लावायचे काम केल्याचे वास्तव समोर येत आहे.

उद्धव ठाकरे कुटुंबासह चंद्रभागेच्या पैलतीरावर असलेल्या इस्कॉन घाटावरून चंद्रभागेच्या महाआरती करणार आहेत. यासाठी शिवसेनेनं जोरदार तयारी केली असून, मठापर्यंत येणाऱ्या मार्गावर दुतर्फा शिवसेनेचे शेकडो झेंडे आणि बॅनर लावण्यात आले आहेत. सर्व व्यवस्था अतिशय चोख झाली असली, तरी चंद्रभागा पात्राच्या सफाईकडे प्रशासनाने साफ दुर्लक्ष केल्याने अशा अस्वच्छ पात्रातच उद्धव ठाकरे यांना आरती करावी लागणार आहे. ज्या तयारीसाठी सेनेचे सर्व मंडळी ८ दिवसापासून शहरात तळ ठोकून असूनही, त्यांच्याही नजरेत अजून ही गोष्ट न आल्याने ही मंडळी वरवरच्या स्वच्छ वातावरणावर भाळून गेल्याचे दिसून येत आहे. चंद्रभागेचे पात्र घाणच राहिले असून, प्रशासनाने हे काम नीट केले नसल्याने सकाळी येऊन मी स्वतः चंद्रभागेची सफाई करणार असल्याचं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी स्पष्ट केलं आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राधानगरीत गुरुवारपासून तालुका विज्ञान प्रदर्शन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, राधानगरी

पंचायत समिती शिक्षण विभाग आणि राधानगरी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने २७ ते २९ डिसेंबर या कालावधीत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित केले आहे. तालुक्यातील सर्व शाळांनी विज्ञान प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रदर्शनाचे संयोजक पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी डी. ए. पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. डी. कांबळे, केंद्र मुख्याध्यापक राजाराम निऊंगरे यांनी केले आहे.

यावर्षी पंचायत समिती शिक्षण विभाग, राधानगरी विद्यालय, गर्ल्स हायस्कूल, जागृती हायस्कूल, राजर्षी शाहू कुमार विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रदर्शन होत आहे. तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी यानिमित्ताने खुले वैज्ञानिक विचारमंच उपलब्ध करून दिले जाणार आहे. राधानगरी केंद्रांतर्गत येणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक शाळांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहू विद्यामंदिरमध्ये तीन दिवस प्रदर्शन होईल. विज्ञान स्पर्धेचे, प्रदर्शनाचे नियोजन पंचायत समिती शिक्षण विभाग व राधानगरी विद्यालयाने केले आहे. प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या विद्यार्थी, शिक्षकांसाठी वैज्ञानिक उपकरण मांडणीसाठी स्वतंत्र यंत्रणा तयार केली आहे. प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत होर्डिंगवर आज कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महापालिकेने निश्चित केलेल्या ७० जागांव्यतिरिक्त लावलेले अनधिकृत जाहिरात फलक, पोस्टर्स, होर्डिंग्ज, स्टँडी हटविण्याच्या कारवाईला सोमवारपासून (ता. २४ डिसेंबर) सुरुवात होणार आहे. महापालिकेचा अतिक्रमण, इस्टेट विभागासह अग्निशमन दलाच्या साथीने पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करणार आहे. अनधिकृत होर्डिंग्ज उभारणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

महापालिकेने अधिकृत परवाना घेऊन जाहिरात फलक, होर्डिंग्ज लावण्यासाठी शहरात ७० जागा निश्चित केल्या आहेत. तरीही इतरत्र महापालिकेच्या परवानगीशिवाय जाहिरातबाजी केली जाते. मोठ्या फलकांबरोबरच पोस्टर्स, स्टँडीमुळे अनेक ठिकाणी पादचाऱ्यांना चालणेही मुश्कील बनले आहे. अतिक्रमण विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने शहराचे विद्रुपीकरण होत आहे. बुधवारी झालेल्या महासभेत नगरसेवकांनी अतिक्रमण विभागाच्या कार्यपद्धतीवर जोरदार ताशेरे ओढले. विभागच बरखास्त करण्याची मागणी केली होती. त्यानंतर अतिक्रमण विभागाने मोहीम हाती घेतली आहे.

महापालिकेने विविध सुविधांबाबत तक्रार करण्यासाठी मोबाइल अॅप व हेल्पलाइन नंबर दिला आहे. हेल्पलाइनद्वारे अनेक नागरिक अतिक्रमणांबाबत तक्रारी दाखल करतात. हेल्पलाइनवर तक्रार करुनही दखल घेतली जात नसल्याने प्रशासनावर टिकेची झोड उठते. सभागृहात आणि सभागृहाबाहेर होत असलेल्या टिकेमुळे प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी सोमवारी मोहिमेतील कर्मचाऱ्यांना सकाळी दहा वाजता मुख्य कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. पहिल्या टप्प्यात जाहिरात फलक, होर्डिंग्ज, पोस्टर्स व स्डँडीवर कारवाई होईल. त्यानंतर दोन ते तीन दिवसांनी अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येईल.

कारवाईमध्ये शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता रमेश मस्कर, एस. के. माने, आर. के. जाधव, हर्षजित घाटगे, अतिक्रमण विभागप्रमुख पंडित पोवार यांच्या नेतृव्वाखालील अतिक्रमण विभागाच्या पथकासह चारही वॉर्ड कार्यालयांचे कर्मचारी मोहिमेत सहभागी होणार आहेत.

गुन्हेही दाखल होणार

शहरात अनेक ठिकाणी अनधिकृत फलक उभा केले आहेत. काही जाहिरातसंस्था असे फलक तयार करतात. त्यांची छपाई व्यावसायिकांकडून केली जाते. त्यामुळे अनधिकृत फलकांची संख्या वाढत आहे. त्याला अटकाव करण्यासाठी जाहिरात संस्था, छपाई व्यावसायिक व व्यक्तींवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमांतर्गत व मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायद्यानुसार थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोकुळ अध्यक्षांच्या राजीनामा मंजुरीकडे लक्ष

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

बारा संचालकांच्या बंडानंतर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) अध्यक्ष विश्वास पाटील यांनी नेत्यांकडे राजीनामा दिला आहे. पाटील यांनी दिलेला हा राजीनामा शुक्रवारी (ता. २८) होणाऱ्या संचालक मंडळाच्या सभेत मंजूर होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजीनामा मंजूर झाल्यानंतर अध्यक्षपदासाठी तीव्र चुरस निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत संचालक रवींद्र आपटे, अरुण डोंगळे, धैर्यशिल देसाई, पी. डी. धुंदरे यांची नावे आघाडीवर आहेत.

पंधरा दिवसांपूर्वी संचालक मंडळाच्या बैठकीनंतर सायंकाळी अध्यक्ष पाटील यांनी गोकुळचे नेते महादेवराव महाडिक यांच्याकडे राजीनामा दिला होता. पाटील हे अध्यक्षपदावर पावणेचार वर्षे असल्याने त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी गेले दोन महिने ज्येष्ठ संचालकांकडून केली जात होती. पण नेत्यांनी चालढकल चालविल्याने १२ ज्येष्ठ आणि नवीन संचालकांनी एकत्र येत बंडाचा पवित्रा घेतल्याने खळबळ उडाली. बंड करणाऱ्या संचालकांना माजी आमदार महादेवराव महाडिक व पी. एन. पाटील यांनी खडसावले. गोकुळमध्ये बंड चालणार नाही असे महाडिक यांनी संचालकांना सांगितले. संचालकांनी बंड करणार नसल्याचे सांगत नेते घेतील तो निर्णय मान्य असल्याचे सांगत त्यावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला. अध्यक्षपदावरुन संचालक मंडळात फूट पडू नये यासाठी नेत्यांच्या आदेशाने पाटील यांनी राजीनामा दिला. अध्यक्षांचा राजीनामा महाडिक यांच्याकडून पुढील आठवड्यात कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांना पाठविला ण्ण्याची शक्यता आहे. शुक्रवारच्या सभेत तो मंजूर होईल. गोकुळ प्रशासनाकडून दुग्ध विभागाला याची माहिती दिली गेल्यानंतर प्राधिकरणाकडून नूतन अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे.

राजीनाम्यानंतर अध्यक्षपदाच्या घडामोडींना वेग येणार आहे. महाडिक व पाटील यांच्यात पसंतीच्या संचालकाला अध्यक्षपदाची संधी मिळणार आहे. लोकसभा व विधानसभा डोळ्यासमोर ठेऊन नाव निश्चित होईल. त्यामध्ये आपटे, डोंगळे, देसाई, धुंदरे आघाडीवर आहेत. यापूर्वी कधीच पद न मिळालेल्या संचालकांच्या गळ्यात माळ पडू शकते, अशी चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाला पत्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्र ठरलेले नगरसेवक अफजल पिरजादे व अजिंक्य चव्हाण यांच्या प्रभागात पोटनिवडणूक घेण्यासाठी महापालिका प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाला शनिवारी पत्र पाठवले. निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर एक ते दीड महिन्यात सिद्धार्थनगर व पद्माराजे उद्यान या प्रभागांची पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे.

स्थायी समितीमध्ये पक्षाचा व्हीप डावलून विरोधी भाजप-ताराराणी आघाडीचे सभापतिपदाचे उमदेवार आशीष ढवळे यांना राष्ट्रवादीचे नगरसेवक पिरजादे व चव्हाण यांनी मतदान केले. निवडीपूर्वी 'स्थायी'तील सदस्यांना पक्षाने व्हीप बजावला होता. व्हीप डावलून विरोधी गटाला मतदान केल्यानंतर पक्षाचे गटनेते सुनील पाटील यांनी विभागीय आयुक्तांकडे पक्षांतरबंदी कायद्यानुसार दोघांनाही अपात्र ठरवण्याची मागणी केली होती.

दहा डिसेंबर रोजी झालेल्या महापौर निवडीपूर्वी दोन्ही नगरसेवकांना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी अपात्र ठरवले होते. आयुक्त डॉ. म्हैसेकर यांच्या निर्णयाविरोधात चव्हाण व पिरजादे यांनी अपात्रतेला स्थगिती देण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. याचिकेवर शनिवारी निर्णय होऊन हायकोर्टाने दोघांनाही अपात्र ठरविण्याचा आयुक्तांचा निर्णय कायम ठेवला. दोन्ही नगरसेवकांकडून हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात येणार आहे. मात्र तत्पूर्वीच प्रशासनाने पोटनिवडणुकीच्या कार्यक्रम जाहीर करण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. पंधरा दिवसांनंतर याबाबत आयोगाचे पत्र प्राप्त झाल्यानंतर दीड महिन्यांत पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. सिद्धार्थनगर प्रभाग इतर मागास प्रवर्गासाठी तर पद्माराजे उद्यान प्रवर्ग सर्वसाधारण गटासाठी खुला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कळंबा तलावाच्या संवर्धनासाठी निधी देऊ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'कळंबा तलावाच्या संवर्धनासाठी नियोजित आराखडा करून त्याच्या विकासासाठी निधी देऊ. तलावाचे काम पूर्ण झाल्यानंतर केएसबीपीच्या माध्यमातून तलावाची देखभाल केली जाईल', असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. कळंबा तलाव महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर सरिता मोरे होत्या.

पालकमंत्री पाटील म्हणाले, 'तलाव परिसरात पर्यटन वाढीसाठी सरकार निधीतून प्रयत्न केले जातील. तलावाचा उत्कृष्ट आराखडा तयार करून पर्यटनकेंद्र म्हणून विकसित होईल अशा पद्धतीने कामाला सुरुवात केली जाईल. जलयुक्त शिवार योजना व लोकसहभागातून तलावातील गाळ काढल्याने तीन कोटी २५ लाख लिटर अतिरिक्त पाणीसाठा झाला आहे. पाणीसाठा स्वच्छ राहावा यासाठी शासनाबरोबर लोकसहभागह महत्त्वाचा आहे.'

महापौर मोरे म्हणाल्या, 'कळंबा तलावाच्या संवर्धनासाठी महापालिका प्रशासन कटिबद्ध आहे. तलावाचे जलस्रोत कायमस्वरूपी शुद्ध रहावे. यासाठी तलावामध्ये मिसळणारे सांडपाणी बंद करण्यासाठी प्रयत्न जातील.'

स्थायी समिती सभापती ढवळे म्हणाले, 'तलावाच्या देखभालीसाठी महापालिकेची संपूर्ण यंत्रणा काम करेल. तसेच यापुढे तलावाच्या ज्या समस्या असतील, त्याची पूर्ण माहिती घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल.'

गोकुळचे संचालक बाबा देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. विरोधी पक्षनेता विलास वास्कर, नगरसेवक विजय सिंह खाडे पाटील आदी प्रमुख उपस्थितीत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्ताधाऱ्यांतील संघर्ष नव्या वळणावर

$
0
0

जिल्हा परिषदेचा लोगो वापरावा...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषदेत भाजप सत्ताधारी आघाडी घटकांतील उद्भवलेला संघर्ष नव्या वळणावर पोहोचला आहे. सत्तेत सहभागी व्हायचे आणि त्याचवेळी विरोधकाची भूमिकाही पार पाडायची, या खेळीमुळे सत्ताधारी आघाडीतील संघर्ष चिघळत आहे. विविध योजना आणि निर्णयांची अंमलबजावणी करताना सदस्यांना विश्वासात न घेणे आणि सत्ता स्थापनेवेळी ठरलेला पदाधिकारी बदलाच्या सव्वा वर्षाच्या फॉर्म्युल्याला फाटा दिल्यामुळे इच्छुक सदस्यांत वाढलेली अस्वस्थता हे संघर्षाचे मूळ कारण आहे.

स्वनिधी आणि विविध विकासकामांसाठी आवश्यक निधीप्रश्नी विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सदस्यांसोबतच सत्ताधारी भाजप आघाडीच्या सदस्यांतही रोष आहे. विरोधक फारसे प्रभावीपणे सक्रिय नसताना सत्ताधाऱ्यांतील असंतुष्टामुळे पदाधिकाऱ्यांसमोरील समस्या वाढल्या आहेत. २०१७ -१८ या वर्षातील नऊ कोटी २२ लाख रुपयांचा निधी अखर्चित आहे. या निधीचे पुन्हा नियोजन करताना पंचगंगा नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी २५ लाख रुपयांची तरतूद केली होती. अध्यक्षा शौमिक महाडिक महाडिक यांनी 'नमामि पंचगंगा' हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. त्यांनी एक कोटी २२ लाख रुपयांचा निधी राखीव निधी म्हणून ठेवला. ही रक्कम 'नमामि'साठी खर्च करण्यास सदस्यांचा विरोध आहे. सभागृहातच त्याचे पडसाद उमटले होते. मात्र, स्वनिधीच्या खर्चाला विरोध करत सर्वपक्षीय सदस्यांनी अध्यक्षांविरोधात जी सह्यांची मोहीम राबवली ते महाडिक यांच्यासाठी धक्कादायक आहे.

त्यांनी सदस्यांच्या भावना जाणून कामकाज केले तर उर्वरित कालावधीत संघर्षाची धार कमी होऊ शकते. मात्र, जिल्हा परिषद सदस्यांत गेल्या काही महिन्यांत विविध योजना, निधीचे वाटप करताना विश्वासात घेतले जात नसल्याची भावना वाढीस लागली आहे. सर्वच पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत हाच अनुभव असल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे. विकासकामांसाठी निधी, वैयक्तिक लाभार्थ्यांच्या योजना, कृषी व समाजकल्याण विभागातर्फ वितरित करावयाच्या वस्तू यामध्ये पदाधिकाऱ्यांनी सदस्यांना बाजूला ठेवल्यामुळे वादावादीचे प्रसंग उद्भवले. अध्यक्ष व सभापतींच्या दालनात खडाजंगी उडाली. सभागृहातील काही सदस्यांना सव्वा वर्षानंतर पदाधिकारी बदलाचे वेध लागले होते. मात्र, नेतेमंडळींनीच पदाधिकारी बदलाला पूर्णविराम दिल्यामुळे इच्छुक सदस्य अस्वस्थ आहेत. कधी निधी, तर कधी पुरस्काराच्या निमित्ताने नजीकच्या काळात हा संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता नाकारात येत नाही.

००००

सत्तेबाहेर पडण्याची शक्यता कमीच

भाजपसोबत शिवसेना, जनसुराज्य, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आवाडे गट सहभागी आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सव्वा वर्ष सभापतिपद भूषविले आहे. सध्या आवाडे गटाच्या सदस्या महिला व बालकल्याण समिती सभापतिपदी आहेत. लोकसभेच्या निवडणुकीवरून जिल्ह्यातील राजकीय चित्र बदलत असले तर सद्य:स्थितीत आवाडे गट असो वा स्वाभिमानी, जिल्हा परिषदेतील सत्तेतून बाहेर पडतील अशी शक्यता नाही.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बावडा शिक्षण मंडळाची जागा महसूलच्या ताब्यात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भाडेकरार संपुष्टात येऊनही कसबा बावडा शिक्षण मंडळाच्या ताब्यात असलेली आठ एकर जमीन महसूल विभागाने शनिवारी ताब्यात घेतली. करार संपल्यानंतर अकरा वर्षांनी 'करवीर'चे प्रातांधिकारी व तहसिलदारांनी जमिनीचा ताबा घेतला. शहरातील अशा बेकायदेशीर वापरात असलेल्या जमिनी ताब्यात घाव्यात आशी मागणी नगरसेवक सुनील कदम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

पत्रकात म्हटले आहे, 'रमणमळा येथील शासकीय धान्य गोदामाजवळील सुमारे आठ एकर जमीन कसबा बावडा शिक्षण मंडळाला भाडेकराराने दिली होती. सात-बारा उताऱ्यावर हिंदूस्थान सरकार व मुलकीपड अशी नोंद असलेल्या या जमिनीची मालकी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. १९९७ मध्ये शिक्षण मंडळाबरोबर पाच वर्षांचा वाढीव करार केला गेला. त्यानंतर पुन्हा जमीन पाच वर्षांसाठी शिक्षण मंडळाला दिली. २००७ मध्ये कराराची मुदत संपलेली असताना जमिनीचा वापर सुरु होता. बांधकाम विभागाच्या सचिवांनी भाडेकराराला मुदतवाढ देण्यास असमर्थता दर्शवत जमीन सरकारी हक्कात समावेश करण्याची सूचना केली होती. याबाबत जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्यासमोर सुनावणी झाली. जिल्हाधिकारी सुभेदार यांनी सुनावणीनंतर जमीन ताब्यात घेण्याचे आदेश दिल्यानंतर करवीरचे प्रातांधिकारी व तहसिलदार यांनी पोलिस बंदोबस्तात जमीन संपादन केली.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आंदळकर आबा हवे होते...!

$
0
0

फोटो- अर्जुन टाकळकर

'म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

आपला सहकारी मल्ल बाला रफिक शेखने मानाची महाराष्ट्र केसरी गदा पटकावल्याचा अभिमान आणि आनंद न्यू मोतीबाग तालमीत मल्लांच्या चेहऱ्यावर झळकत होता. पण त्या आनंदाला दुःखाची किनार होती. वस्ताद दिवंगत हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांची उणीव मल्लांना यावेळी जाणवत होती. 'आबा असते तर जल्लोष झाला असता,' असे उद्गार तालमीतील मल्लांनी काढले.

बालाने महाराष्ट्र केसरीची गदा पटकावल्यानंतर हे यश आंदळकर यांना समर्पित केले. बाला हा आंदळकर यांचा शेवटचा शिष्य होता. तीन महिन्यांपूर्वी आंदळकर यांना श्रद्धांजली वाहत असताना त्याने महाराष्ट्र केसरीची गदा मिळवण्याचा निश्चय केला होता. या यशाने त्याने आंदळकर यांचे स्वप्न पूर्ण केले.

बुलडाण्याच्या बालाने अभिजित कटकेवर मात करत महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला. विजयानंतर त्याने हे यश वस्ताद गणपतराव आंदळकर यांना समर्पित केल्याचे समजताच तालमीतील वातावरण भावूक झाले. बाला २००९ पासून न्यू मोतीबाग तालमीत सराव करत आहे. आंदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची यशस्वी वाटचाल सुरू होती. बालाने महाराष्ट्र केसरीची गदा पटकवावी अशी इच्छा आंदळकर यांची होती. याप्रसंगी वस्ताद बाळूमामा पाटील, प्रशिक्षक संजय पाटील, मारुती जाधव, अभिजित आंदळकर उपस्थित होते.

०००

न्यू मोतीबागला दोनदा मान

दहा वर्षांपूर्वी न्यू मोतीबाग तालमीचा मल्ल चंद्रहार पाटीलने दोनदा महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला होता. त्यानंतर हा मान बाला रफिक शेखने पटकावला आहे. चंद्रहार पाटीलने २००७ आणि २००८ मध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेत यश मिळवले होते.

००००

कोट

न्यू मोतीबाग तालमीतील मल्लाने महाराष्ट्र केसरीची गदा पटकावल्याचा अभिमान वाटतो. हे यश पाहायला गणपतराव आंदळकर आबा असते तर आणखी बरे वाटले असते. आबांचा कुस्तीतील वारसा नव्या पिढीतील मल्ल पुढे नेतील.

बाजीराव चौगुले, वस्ताद

००

आमचा सहकारी बाला रफीक शेख याने मिळवलेल्या यशामुळे कुस्ती क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या नव्या तरुणांना प्रेरणा मिळणार आहे. बालाच्या मार्गदर्शनाखाली न्यू मोतीबाग तालमीतील मल्लांची वाटचाल सुरू आहे.

अनिल चव्हाण, नवोदित मल्ल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरपालिका-पालिसांतील वादाने मृतदेहाची हेळसांड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

मृतदेह वाहून नेण्यासाठी शववाहिका देण्यावरून नगरपालिका प्रशासन आणि पोलिस यंत्रणा यांच्यातील वादामुळे अनोळखी व्यक्तीच्या मृतदेहाची तब्बल चार तास हेळसांड झाली. भोनेमाळ येथे सकाळी ही घटना घडली. प्रशासनाच्या या अनागोंदी कारभाराने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

येथील भोनेमाळ परिसरात असलेल्या सायझिंगसमोर सकाळी साडेसातच्या सुमारास एका अनोळख्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्व सोपस्कर आटोपल्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी आयजीएम रुग्णालयाकडे नेण्यासाठी पोलिस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी नगरपालिकेकडे शववाहिकेची मागणी केली. मोफत शववाहिकेसाठी मुख्याधिकाऱ्यांच्या परवानगीची गरज असते. मात्र, रविवार सुट्टीचा दिवस असल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना दूरध्वनीवरुन माहिती देत शववाहिका देण्याबाबत विनंती केली.

परंतु, अतिक्रमण हटविण्यासह अन्य कारणांसाठी आवश्यक पोलिस बंदोबस्त मागितला असता तो पोलिस प्रशासनाकडून दिला जात नाही असे कारण सांगत नगरपालिका प्रशासनाकडून शववाहिका मोफत देण्यास टाळाटाळ केली. सुमारे चार तास सुरू असलेल्या या गोंधळात मृतदेह मात्र तब्बल चार तास तेथेच पडून होता. यातून पर्याय काढूत अखेर पोलिस कर्मचारी के. एम. साबळे यांनी शववाहिकेसाठी आवश्यक दोनशे रुपयांची भाडे पावती करुन मृतदेह दवाखान्यात नेण्यात आला. पोलिस व पालिका प्रशासनातील या वादामुळे अनोळखी व्यक्तीची मृत्यूनंतरही हेळसांड झाल्याने नागरिकांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. संबंधित व्यक्तीच्या खिशातील आधारकार्डवरुन त्या व्यक्तीचे नाव तुकाराम कृष्णा मगर (अंदाजे वय ५५, रा. कोतले, जि. सांगली) असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून नातेवाइकांचा शोध घेतला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचलकरंजीतील माथाडी कामगारांचा संप मागे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

मजुरीवाढीसंदर्भात न्यायालय निर्णय अधीन राहून ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने माथाडी कामगारांना २४ रुपये दरवाढ देण्यास रविवारी मान्यता दिली. आमदार सुरेश हाळवणकर यांच्या सूचनेनुसार सहायक कामगार आयुक्त गुरव यांनी केलेली शिष्टाई अखेर यशस्वी ठरल्याने गेल्या १३ दिवसांपासून सुरू असलेले कामबंद आंदोलन राष्ट्रीय माथाडी कामगार युनियनने मागे घेतले आहे.

दर तीन वर्षांनी माथाडी कामगारांची मजुरीवाढ होते. जुलै २०१८ मध्ये मजुरीवाढीची त्रैवार्षिक कराराची मुदत संपली होती. त्यामुळे ऑगस्ट २०१८ पासून २४ रुपये मजुरीवाढ मिळावी अशी मागणी कामगार संघटनेने मागणी केली. मात्र, उद्योगातील मंदीच्या कारणावरून ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने दरवाढ देण्यास नकार दिला होता. याविषयी प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत वाहतूकदार व कामगार संघटना यांच्यात मजुरीवाढीबाबत एकवाक्यता न झाल्यास हा निर्णय सहायक कामगार आयुक्त गुरव यांनी घ्यावा, असे आमदार हाळवणकर यांनी जाहीर केले होते. त्यानंतर गुरव यांनी २४ रुपये दरवाढ जाहीर केली होती. मात्र, ही दरवाढ देण्यास ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने असमर्थता दर्शवित याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली.

दरम्यान, सहायक कामगार आयुक्तांनी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी १० डिसेंबरपासून माथाडी कामगारांनी प्रदीर्घ सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला. परिणामी सूत, कापडाची आवक-जावक ठप्प झाली होती. याचे पडसाद अन्य घटकांवर उमटून यंत्रमाग बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात होती. तेव्हा माथाडी कामगारांच्या मजुरीवाढीच्या प्रश्‍नात गुरव यांनी लक्ष घालून संप मिटवण्याची सूचना आमदार हाळवणकर यांनी केली होती. त्यानुसार गुरव यांनी रविवार सुट्टीदिवशी दोन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.

एक ऑगस्ट २०१८ पासूनचा फरक माथाडी कामगार कल्याण संघाकडे जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर संघटनेने काम बंद आंदोलन मागे घेतल्यामुळे सोमवारपासून माथाडी कामगारांचे काम सुरू होणार आहे. याप्रसंगी ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचे बाबूराव पाटील, राजाराम जगताप, जितेंद्र जानवेकर तर माथाडी कामगार युनियनचे शामराव कुलकर्णी, यशवंत लाखे, धोंडिराम जावळे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


श्रुती पाटील ‘कोल्हापूर सुपरस्टार’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कलाविष्कारांची उधळण, गीत नृत्याचा धमाका आणि प्रत्येक कलाकाराचा हटके परफॉर्मन्स अशा माहोलमध्ये उत्तरोत्तर रंगलेल्या कार्यक्रमात श्रुती सचिन पाटील हिने बहारदार गायनाचा आविष्कार घडवत 'कोल्हापूर सुपरस्टार' किताबाची मानकरी ठरली. हॉटेल सयाजी येथे रविवारी रात्री स्पर्धेची अंतिम फेरी दिमाखात झाली. अंतिम फेरीत सर्वच स्पर्धक कलाकारांनी उत्कृष्ट सादरीकरण करत स्पर्धा गाजवली. विजेत्यांनी घोषणा झाल्यावर एकच जल्लोष झाला.

अभिनय कलाप्रकारात छाप पाडणाऱ्या रोहित पोतनीसने स्पर्धेतील उपविजेतेपद पटकावले. नृत्याविष्कारात चमक दाखविणारा शुभम बिरजू लाड तृतीय क्रमाकांचा विजेता ठरला. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब, डीवायपी ग्रुप, सनशाइन इव्हेंट्स यांच्यातर्फे स्पर्धेचे आयोजन केले होते. हॉटेल सयाजी येथे ही स्पर्धा पार पडली. अंतिम फेरीत २० स्पर्धकांचा सहभाग होता. तब्बल तीन तास रंगलेल्या या सोहळ्यात कलाविष्कारांची उधळण झाली.

गीत, नृत्य, समूहनृत्य, बासरीवादन अशा कलाप्रकाराबरोबरच मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके स्पर्धेतील प्रमुख आकर्षण ठरले. स्पर्धेतील एक ते सहा क्रमांकाच्या विजेत्यांना गौरविले. चौथा क्रमांक बासरीवादक तनय कामत, पाचवा क्रमांक प्रफुल्ल घाटगे (नृत्य) तर सहाव्या क्रमांकाचे बक्षीस आदिती साळोखे (मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके) यांना मिळाले.

परीक्षक चंद्रकांत कागले, राज पाटील, वैष्णवी शानबाग, राहुल पांडे, सुलतान बारगीर आणि सनशाइन इव्हेंटस प्रिया पावसकर, स्नेहल चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस समारंभ झाला. प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांना मानचिन्ह व बक्षीस देऊन गौरविले.

अंतिम फेरीमध्ये वेगवेगळ्या कलाप्रकारांतून वीस स्पर्धक अंतिम फेरीत दाखल झाले होते. रात्री साडेसातच्या सुमारास अंतिम फेरीला सुरुवात झाली. नृत्य कलाप्रकारात समीक्षा लाड, सुशांत कुरणे,कार्टून ग्रुप, किरण सोलापुरे, प्रफुल्ल घाटगे, समुख कलमल्ले, सानिया मुजावर, केडीसी ग्रुप यांचा तर अभिनय कलाप्रकारात रोहित पोतनीस, गौरव पाटील, गायनमध्ये अथर्व गद्रे, वैभव सुतार, गौरी शिंदे, शर्वरी कुलकर्णी, सुमंत कुलकर्णी, श्रुती पाटील यांचा सहभाग होता.

रात्री दहाच्या सुमारास स्पर्धेची उत्कंठा शिगेला पोहोचली. विजेत्यांची नावे जाहीर होऊ लागताच संपूर्ण सभागृह टाळयांच्या गजरात न्हाऊन निघाला. विजेत्यांनी मानचिन्ह उंचावून आनंदोत्सव साजरा केला. सूत्रसंचालक अक्षय डोंगरे यांनी वेगवेगळे किस्से, गीत नृत्यांशी संबंधित गमतीजमती सांगत स्पर्धेत रंग भरला.

दरम्यान, डीवायपी ग्रुपचे संजय डी. पाटील, ऋतुराज संजय पाटील, प्रतिमा सतेज पाटील, ग्रुपचे सीईओ सिद्धार्थ साळोखे यांनी स्पर्धेदरम्यान भेट दिली. राजारामपुरीत राहात असलेली श्रुती ही विबग्योर स्कूलची विद्यार्थिनी आहे.

००००

'कोल्हापूर सुपरस्टार' स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्याने खूप आनंदीत आहे. या स्पर्धेत मी दुसऱ्यांदा सहभागी झाले. स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरणावर माझा भर होता. स्पर्धेसाठी घेतलेल्या कष्टाचे चीज झाले.

श्रुती पाटील

०००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निर्णयाला कोर्टात आव्हान देणार

$
0
0

कोल्हापूर : राज्य सरकारच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने पदनामात बदल करुन वेतनश्रेणी घेतल्याप्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांची वेतनश्रेणी वसुली व मूळ पदावर आणण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला कोर्टात आव्हान देण्याचा निर्णय शिवाजी विद्यापीठ सेवक संघाने घेतला आहे. सेवक संघाचे अध्यक्ष बाबा सावंत यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे, 'शिवाजी विद्यापीठासंदर्भातील प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने या बाबत अधिक भाष्य करणार नाही. दरम्यान वेतनश्रेणी वसूल करण्याच्या निर्णयाच्या अनुषंगाने सेवक संघ राज्य सरकारच्या विरोधात अवमान याचिका दाखल करण्यासाठी कार्यवाही सुरू आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीच्या उमेदवारीचा संभ्रम वाढला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवारीवरुन पुन्हा संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीला पक्षातील काही नेत्यांनी उघडपणे केलेला विरोध, काँग्रेसमधील काही घटकांची नाराजी ताजी असताना लोकसभेसाठी सर्वमान्य उमेदवार म्हणून डी. वाय. पाटील यांच्या नावाला एकमत होऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्याचवेळी खासदार महाडिकांच्या उमेदवारीला आमदार सतेज पाटील यांचा विरोध असल्याने तो कमी करण्यासाठी राष्ट्रवादीने जाणुनबुजून ही राजकीय खेळी केली असल्याचेही जाणकारांचे म्हणणे आहे.

राजकारणातून निवृत्ती पत्करलेल्या, राज्यपालपद भूषविलेल्या डी. वाय. पाटील यांनी ८३ व्या वर्षी हाती राष्ट्रवादीचे 'घड्याळ' बांधल्याने अनेकांची धडधड वाढली आहे. 'डी. वाय.' हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून परिचित आहेत. सर्वच पक्षांतील बड्या नेत्यांशी त्यांचे निकटचे संबंध आहेत. गेली काही वर्षे ते राजकारणात सक्रिय नाहीत. सामाजिक, सांस्कृतिक समारंभात त्यांचा सहभाग असतो. राजकारणापेक्षा शिक्षण क्षेत्रात त्यांची ओळख आहे. देशभरात त्यांनी शैक्षणिक साम्राज्य निर्माण केले आहे. मात्र, राजकारणात ते धक्कातंत्र देण्यात माहीर आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात पुत्र अजिंक्य पाटील यांना मैदानात उतरविले. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांचे सतेज पाटील हे अतिशय निकटवर्ती होते. या पार्श्वभूमीवर चव्हाण यांच्याविरोधात त्यांनी उमेदवार दिला.

पाटील यांचा आजचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशही काँग्रेससह राष्ट्रवादीतील अनेकांसाठी धक्कादायक आहे. सद्यस्थितीत कोल्हापूरच्या राजकारणात खासदार महाडिक आणि आमदार पाटील यांच्यातील संघर्ष टोकाला पोहचला आहे. महाडिकांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीचे नेते, आमदार हसन मुश्रीफ यांनी विरोध केला होता. दुसरीकडे सतेज पाटील हे महाडिक विरोधकांची मूठ बांधत आहेत. काँग्रेसच्या संघर्ष यात्रेदरम्यान त्यांनी कळंबा येथील कार्यक्रमात कोल्हापूर लोकसभेच्या जागेवर काँग्रेसचा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर 'डी. वाय.' यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश म्हणजे नव्या समीकरणांचा उदय समजला जात आहे.

०००

(मूळ कॉपी)

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

डॉ. डी.वाय. पाटील यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारीने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील उमेदवारीवरुन पुन्हा एकदा संभ्रमावस्था निर्माण झाली. खासदार धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीला पक्षातील काही नेत्यांनी उघडपणे केलेला विरोध, काँग्रेसमधील काही घटकांची नाराजी ताजी असताना लोकसभेसाठी सर्वमान्य उमेदवार म्हणून डी.वाय.यांच्या नावाला एकमत होवू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय. त्याचवेळी आमदार सतेज पाटील यांचा खासदार महाडिकांच्या उमेदवारीला असलेल्या विरोधाची धार कमी करण्यासाठी राष्ट्रवादीने ही जाणूनबुजून राजकीय खेळी असल्याचेही जाणकारांचे म्हणणे आहे.

तरीही राजकारणातून निवृत्ती पत्करलेल्या, राज्यपालपद भूषविलेल्या व्यक्तींनी या वयात राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधल्याने अनेकांची धडधड वाढली. मुळात डी.वाय.हे राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून परिचित आहेत. सर्वच पक्षातील बड्या नेत्यांशी त्यांचे निकटचे संबंध आहेत. गेली काही वर्षे राजकारणात सक्रिय नाहीत, मात्र सामाजिक, सांस्कृतिक समारंभातील त्यांचा सहभाग हमखास राहिला आहे. राजकारणीपेक्षा शिक्षणसम्राट म्हणून त्यांची ओळख. देशभरात त्यांनी शैक्षणिक साम्राज्य निर्माण केले आहे. मात्र राजकारणात ते धक्कातंत्र देण्यात माहीर आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात पुत्र अजिंक्य पाटील यांना मैदानात उतरविले. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांचे सतेज पाटील हे अतिशय निकटवर्ती होते. या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात उमेदवार दिला.

त्यांचा आताचा राष्ट्रवादीचा प्रवेश सुध्दा काँग्रेससह राष्ट्रवादीतील अनेकांसाठी धक्कादायक आहे. कारण सध्य स्थितीत कोल्हापूरच्या राजकारणात खासदार महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला पोहचला आहे. महाडिकांच्या उमेदवारीला राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी विरोध केला होता. दुसरीकडे सतेज पाटील हे महाडिक विरोधकांची मूठ बांधत आहेत. शिवाय काँग्रेसच्या संघर्ष यात्रेदरम्यान त्यांनी कळंबा येथील कार्यक्रमात कोल्हापूर लोकसभेच्या जागेवर काँग्रेसचा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर डॉ. डी. वाय. पाटील यांचा राष्ट्रवादीतील प्रवेश म्हणजे नव्या समीकरणांचा उदय समजला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पेपर क्विलिंगमधून साकारला थ्रीडी सांताक्लॉज

$
0
0

फोटो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

थ्रीडी दृश्य रुपातील कलाकृती ही पाहणाऱ्याच्या डोळ्याचे पारणे फेडणारी असते. त्रिमितीय रचना असणाऱ्या या कलेला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. नाताळच्या पार्श्वभूमीवर पेपर क्विलिंगपासून थ्रीडी आकारातील सांताक्लॉज बनवण्याचा आनंद मटा कल्चर क्लबच्या सदस्यांनी रविवारी लुटला. थ्रीडी सांताक्लॉज बाहुली बनवण्याचे प्रशिक्षण राजारामपुरी येथील कलर फोर्टीन आर्ट गॅलरी येथे देण्यात आले.

चित्रपटाच्या माध्यमातून थ्रीडी हा शब्द सर्वांपर्यंत पोहोचला आहे. थ्रीडी आकारातील कोणतीही वस्तू समोर असल्याचा भास होतो. त्यामुळे थ्रीडीला विशेष महत्त्व दिले जाते. कार्यशाळेत प्रशिक्षक रिचा इंगवले यांनी थ्रीडी प्रकारातील पेपर क्विलिंग ही कला प्रात्यक्षिकांसह शिकवली. पेपर क्विलिंग हा प्रकार युरोपियन आहे. गेल्या दहा वर्षांपासून कोल्हापुरात हा प्रकार रुजवण्यासाठी प्रयत्न होत आहे. नीडल आणि पेपर स्ट्रिप च्या माध्यमातून बाहुलीला थ्रीडी आकार दिला जातो. परदेशात पेपर क्विलिंग प्रकार व्यावसायिकरित्या केला जातो. यामध्ये ज्वेलरी तसेच विविध डॉल्सवर काम केले जाते. कार्यशाळेत डॉल रुपातील सांताक्लॉज बनवण्याची संधी मिळणार असल्याने लहान मुलांनी विशेष सहभाग घेतला होता. छोटी लाल टोपी असणारा सांताक्लॉज बनवताना लहान मुले देहभान हरपून गेली होती. मुलांनी स्वतः बनवलेला सांताक्लॉज पालकांना उत्साहाने दाखवला जात होता.

..............

कोट

'पेपर क्विलिंग हा युरोपियन कलाप्रकार असून तो कोल्हापुरात रुजावा यासाठी गेल्या दहा वर्षांपासून आम्ही प्रयत्न करत आहोत. अत्यंत बारकावे असलेला या कलाप्रकारात ज्वेलरी आणि डॉलसाठी सुरेख काम करता येते.

रिचा इंगवले, प्रशिक्षक

...........

कोट

'थ्रीडी रुपातील सांताक्लॉज बनवण्याची संधी मिळणार असल्याने मी या कार्यशाळेत आवडीने सहभाग घेतला. लहान आकारातील सांताक्लॉज बनवताना खूप मजा आली. तसेच वेगवेगळे बारकावे शिकता आले. शाळेतील कला प्रात्यक्षिक करताना याचा मला फायदा होईल.

कैवल्य कुलकर्णी, सहभागी विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामाजिक कार्याला ‘नवऊर्जा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

भाव व भक्ती गीतांची अखंड बरसात, कलाकारांनी सादर केलेला नृत्याविष्कार आणि सिनेगीतांनी रविवारी नवऊर्जा उत्सव मनोरंजनाच्या शिखरावर पोहोचला. भक्तीमय वातावरणाची अनुभूती देणाऱ्या कार्यक्रमात सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था, व्यक्तींचा उचित सन्मान करत त्यांच्या कार्याला नवऊर्जा प्राप्त करून देण्यात आली. दरम्यान, रविवारी सुटीची पर्वणी साधून हजारो भाविकांनी उत्सवाचा 'याची देही याची डोळा' अनुभव घेतला.

भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्यावतीने निर्माण चौकात नवऊर्जा उत्सवाचे आयोजन केले आहे. उत्सवामध्ये ११ लोकदेवतांच्या मूर्ती भाविकांच्या आकर्षण ठरत आहेत. शहराच्या सांस्कृतिक परंपरेचे जतन आणि संवर्धन करण्याबरोबरच हा उत्सव पर्यटनवाढीला आणि चैतन्यपूर्ण धार्मिक वातावरण निर्माण करण्यास चालणा देणारा ठरत आहे. रविवारच्या सुटीचा आनंद द्विगुणित करत रसिकांनी भक्तिमय वातावरणाची अनुभूती घेतली. दिवसभर उत्सवस्थळी ग्रामीण भागासह इतर जिल्ह्यांतील भाविकांनी लोकदेवतांचे दर्शन घेतले.

दुपारी भाविकांचा अखंड ओघ वाहत असताना सायंकाळी चार वाजता 'सारेगम लिटिल चॅम्प' प्रथमेश लघाटे यांच्या भाव व भक्तीगीतांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. एकपेक्षा एक सरस अभंग सादर करत त्याने रसिकांना खिळवून ठेवले. संतवाणी आणि दत्त गुरुचरणी सेवा अर्पण करत लघाटेने रसिकांना मंत्रमुग्ध केले. भक्तीगीतांनंतर सामाजिक कार्यात अग्रसेर असलेल्या सामाजिक कार्याकर्त्यांना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याला नवऊर्जा दिली. कार्यक्रमात लालासाहेब गायकवाड, निसर्गप्रेमी दिनकर चौगले, पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड, व गगनबावडा पंचायत समितीचे माजी सभापती बंकट थोडगे यांचा खासदार धनंजय महाडिक, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे, उद्योजक नितीन वाडीकर व सहजसेवा ट्रस्टचे अध्यक्ष सन्मती मिरजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी खासदार महाडिक म्हणाले, 'नवऊर्जा उत्सावातून सांस्कृतिक परंपरा जतन करण्याबरोबर नव्या कलाकारांना व्यासपीठ मिळवून दिले. इको फ्रेंडली साहित्यातून निर्माण झालेले सभागृह पर्यावरणाचा संदेश देत आहे. सरकारी निधीच्या माध्यमातून विकासकामांचा डोंगर उभा करत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पर्यटनवाढीला चालना दिली आहे.'

कुलगुरु डॉ. शिंदे म्हणाले, 'लोकदैवतांचे दर्शन उत्सवाच्या माध्यमातून घडत आहे. भक्ती परंपरा व संस्काराचा सुरेख संगम येथे घडून आला असून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही उत्सवातून दिला जात आहे.'

उद्योगपती वाडीकर यांनी मूर्तीतील भाव छटांचे विश्लेषण केले. पुरस्कार वितरणानंतर सागर बगाडे यांच्या सार्थक क्रिएशन ग्रुपच्यावतीने नृत्याविष्कार सादर केला. आयोजक राहुल चिकोडे यांनी स्वागत केले.

नवऊर्जा उत्सवात आज

नवऊर्जा उत्सवात सोमवारी (ता. २४ डिसेंबर) वृक्षमित्र श्रीकांत कदम, रघुनाथ काळेल, जैनुद्दीन पन्हाळकर यांचा गौरव करण्यात येणार आहे. तर अंगारकी संकष्टीनिमित्त अथर्व शिर्षपठणाचे आयोजन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images