Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

अवतरणार अकरा लोकदैवते

0
0

फोटो आहे...

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महाराष्ट्रातील अकरा लोकदैवते, त्रिमूर्ती दत्ताची ३३ फुटी आणि पंढरीचा विठ्ठल आणि साईबाबा यांच्या २४ फुटी मूर्ती हे यंदाच्या नवउर्जा उत्सवाचे खास आकर्षण ठरणार आहे. या उत्सवाच्या माध्यमातून निर्माण चौक येथील मैदानावर उभारलेल्या भव्य मंडपात लोकदैवतांचे दर्शन होणार असून शुक्रवार ता.२१ पासून नागरिकांना हा उत्सव पाहण्यासाठी खुला होत असल्याची माहिती प्रसिध्द कलादिग्दर्शक नितीन देसाई आणि भालचंद्र चिकोडे स्मृती मोफत वाचनालयाचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी पत्रकार बैठकीत दिली. पुढील वर्षीच्या महोत्सवात देशभरातील देवस्थाने आणि २०२०च्या महोत्सवात जगभरातील प्रसिद्ध देवस्थानांच्या प्रतिकृतीचा समावेश असेल, असेही त्यांनी सांगितले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी ११ वाजून ४८ मिनिटाला उत्सवाचे उद्घाटन होणार आहे. पालकमंत्री पाटील यांच्या प्रेरणेतून २१ ते ३१ डिसेंबरदरम्यान उत्सवाचे आयोजन केले आहे. उत्सवाविषयी बोलताना देसाई म्हणाले, 'या उत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राची लोकदैवते समजल्या जाणाऱ्या विठोबा, खंडोबा, भैरोबा, जोतिबा, वेतोबा, एकवीरा, योगेश्वरी, रेणुका, यल्लम्मा, सप्तश्रृंगी आणि यमाई अशा ११ देवतांचे दर्शन घडेल. इकोफ्रेंडली मंडप, नेत्रदीपक सजावट, सोबत देवताची माहिती दर्शविणारे फलक अशी रचना केली आहे. मंडपाच्या दर्शनी भागात त्रिमूर्ती दत्त, साईबाबा आणि पंढरीच्या विठ्ठलाच्या मूर्ती उभारल्या आहेत. दत्तात्रयांची ३३ फुटी उंचीची ही एकमेव उंच मूर्ती असल्याचा दावा कलादिग्दर्शक देसाई यांनी केला. गेल्या दीड महिन्यापासून मूर्तीकाम सुरू होते. '

.. . ..

उत्सव कालावधीत विविध कार्यक्रम

राहुल चिकोडे म्हणाले, 'दत्तजयंतीचे औचित्य साधून शनिवारी, २२ रोजी सकाळी ११ वाजता महिलांसाठी मोफत अष्टगंध मार्चन सोहळा होणार आहे. उत्सव कालावधीत रोज सायंकाळी चार ते सहा या वेळेत नामवंत आणि उदयोन्मुख कलाकारांच्या भक्तिगीतांचे कार्यक्रम होतील. गायक अजित कडकडे, प्रथमेश लघाटे, सीताराम जाधव, ऋचा गावंदे, रणजित बुगले, शिवराज पाटील, प्रल्हाद पाटील यांचा समावेश आहे. सायंकाळी ६.३० ते ९.३० या वेळेत सार्थक क्रिएशन्स, 'बी ऑन इट,' संस्थेचे कलाकार लोकसंस्कृतीवर आधारित कार्यक्रम सादर करतील. रोज चौघाजणांचा नवउर्जा पुरस्कारांनी सन्मान होणार आहे.

.. .. .. ..

विद्यापीठासोबत काम करायला तयार

कलादिग्दर्शक देसाई म्हणाले, 'कोल्हापुरात प्रचंड टॅलेंट आहे. कलाक्षेत्रात करिअर करु इच्छिणाऱ्या युवक-युवतींना सिनेक्षेत्राशी निगडीत विविध कलाप्रकाराचे प्रशिक्षण देण्यासाठी शिवाजी विद्यापीठासोबत काम करायला तयार आहे. यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाली आहे. दोन दिवस कोल्हापुरात असून या प्रक्रियेला आणखी गती लाभेल. तसेच कोल्हापुरातील सिनेमा व्यवसाय, कलाकारांना प्रोत्साहित करण्यासाठी स्टुडिओच्या धर्तीवर वेगळा प्रकल्प राबविण्याचा विचार आहे. चित्रनगरी पूर्ण क्षमतेने सुरू व्हावी यासाठी प्रयत्न आहेत.'

... .. ... ... ...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘एमएससीआयटी’ वसुलीला स्थगिती

0
0

जिल्ह्यातील ४००० कर्मचाऱ्यांना दिलासा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारकडून मुदतीत एमएससीआयटी प्रमाणपत्र सादर न केलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून वसुलीचे आदेश होते. दरम्यान, या निर्णयाच्या विरोधात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल घेऊन सरकारने वेतनातील वसुलीला स्थगिती दिली. जिल्हा परिषदेचे कर्मचारी, शिक्षक, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सरकारी सेवेतील गट अ, गट ब आणि गट क मधील कर्मचाऱ्यांना २००७ पर्यंत एमएससीआयटी प्रशिक्षण प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक केले होते. मात्र वेगवेगळ्या कारणास्तव हजारो कर्मचाऱ्यांनी मुदतीत प्रमाणपत्रे सादर केली नव्हती. मुदतीत प्रमाणपत्र सादर न केलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्याचा आदेश दोन वर्षापूर्वी सरकारने घेतला होता. त्या विरोधात आरोग्य, ग्रामसेवक, शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन लढा सुरू केला होता. आमदार प्रकाश आबिटकर यांनी सरकारदरबारी कर्मचाऱ्यांच्या समस्या मांडल्या होत्या. कर्मचाऱ्यांच्या लढ्याची दखल घेत राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभाग, ग्रामविकास विभाग व जलसंधारण विभागाने वेतन वसुलीला स्थगिती देण्याचा आदेश काढला आहे. जिल्ह्यातील ३५०० शिक्षक, ३०० आरोग्य कर्मचारी, १०० च्या आसपास ग्रामसेवकांना यामुळे दिलासा मिळाला आहे.

...........

कोट

'एमएससीआयटी प्रमाणपत्रावरुन वेतनात कपात करु नये यासाठी आमचा लढा सुरू होता. एमएससीआयटीला कुठल्याच संघटनेचा विरोध नव्हता. मात्र तांत्रिक अडचणींमुळे कर्मचाऱ्यांना मुदतीत प्रमाणपत्र सादर करणे शक्य झाले नव्हते. कर्मचाऱ्यांच्या या प्रश्नासंदर्भात आमदार प्रकाश आबिटकर यांनी मोलाची साथ दिली. सरकारने आता वेतन वसुलीला स्थगिती दिल्याने कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश आले आहे.

एम. एम. पाटील, कार्याध्यक्ष राज्य आरोग्य कर्मचारी संघटना

............

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हातकणंगलेच्या सभापतीपदी जनसुराज्यच्या सरिता मोहिते

0
0

हातकणंगलेच्या सभापतीपदी जनसुराज्यच्या सरिता मोहिते

हातकणंगले : हातकणंगले पंचायत समितीच्या सभापतीपदी जनसुराज्य पक्षाच्या सरिता हंबीरराव मोहीते यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार सुधाकर भोसले यांनी काम पाहिले. निकालानंतर मोहिते समर्थकांनी फटाक्याची आतषबाजी करत गुलालाची उधळण करुन आनंदोत्सव साजरा केला. मावळत्या सभापती रेश्मा सनदी यांनी राजीनामा दिला. त्यामुळे सभापती पदासाठी गुरुवारी निवडणूक झाली. सकाळी अकरा वाजता भाजप-जनसुराज्यचे अकरा, शिवसेनेचे दोन, महाडिक गटाचा एक असे चौदा सदस्य माजी आमदार राजीव आवळे यांच्यासोबत सभागृहात आले. विरोधी आवाडे गटाचे पाच, शेतकरी संघटनेचे तीन असे आठ सदस्य सभागृहात होते. त्यांनी अर्जच दाखल केला नाही. माजी आमदार राजीव आवळे, माजी जि. प. सदस्य राजवर्धन माहीते, जि. प. सदस्य प्रसाद खोबरे, मावळत्या सभापती रेश्मा सनदी, हर्षद पाटील, प्रकाश गावडे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बॅँकेचे माजी अध्यक्ष गणी फरास यांचे निधन

0
0

गणी फरास कालवश

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे माजी अध्यक्ष गणी फरास (वय ८३, रा. लिशां हॉटेल परिसर) यांचे वृध्दापकाळाने गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास निधन झाले. जिल्हा मध्यवर्ती बँकेत त्यांनी ३४ वर्षे संचालक म्हणून काम केले. १९७५ ते २००९ या कालावधीत संचालकपदी काम करताना उपाध्यक्ष व अध्यक्षपदही भूषविले. १९९५ ते १९९६ या कालावधीत त्यांनी अध्यक्षपद भूषविले होते. कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या नाईट कॉलेजमध्ये ग्रंथपाल म्हणून त्यांनी अनेक वर्षे नोकरी केली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांचे निकटवर्ती म्हणून त्यांची ओळख होती. शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता बागल चौक कबरस्तान येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोरेवाडीत महाआरोग्य मेळावा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'रुग्णसेवा ही काळाची गरज आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आरोग्य सेवेतून समाजासाठी २४ तास कार्यरत राहावे,' असे आवाहन युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केले. करवीर तालुका शिवसेना प्रमुख विराज पाटील यांच्या पुढाकारातून मोरेवाडी येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ठाकरे बोलत होते. त्यांनी आरोग्य शिबिराच्या आयोजनाबद्दल संयोजकांचे कौतुक केले. शिबिरात २०५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, अरुण आब्दागिरी, संतोष सादळे, सागर पंतोजी, किरण भिलुगडे उपस्थित होते. विराज पाटील यांनी स्वागत केले.

............

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एफआरपीमध्ये मोडतोड केल्यास आंदोलनाचा भडका उडेल

0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

'जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उसाची पहिली उचल एकरकमी विनाकपात एफआरपी शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करावी. एफआरपीमध्ये मोडतोड करून साखर कारखान्यांनी बिले अदा केल्यास जिल्ह्यात आंदोलनाचा भडका उडेल,' असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे व माजी जि. प. सदस्य सावकर मादनाईक यांनी दिला. यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शुक्रवारी (ता. २२ डिसेंबर) कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृहामध्ये जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलविण्यात आलेली आहे. खासदार राजू शेट्टी बैठकीला उपस्थित राहतील.

'साखरेला उठाव नाही, तसेच दराचे कारण पुढे करून जिल्ह्यात बहुतांश साखर कारखान्यांनी पहिली उचल उद्यापही शेतकर्‍यांना दिलेली नाही. उसाचा हंगाम सुरू होऊन ४० दिवस झाले. उसाची पहिली उचल १४ दिवसाच्या आत बंधनकारक असते. मात्र अद्यापही बहुतांश साखर कारखान्यांनी उसाची पहिली उचल एफआरपीप्रमाणे अदा केलेली नाही. जिल्ह्यातील साखर कारखाने एफआरपीचे तुकडे करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे आम्ही कदापि सहन करणार नाही. एफआरपीमध्ये १ रुपयादेखील कमी घेणार नाही. जर यामध्ये मोडतोड करून बिले दिल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा रस्त्यावर उतरणार आहे. प्रत्येकवेळी शेतकर्‍यांवर अन्याय कशासाठी केला जात आहे', असा सवालही काटे व मादनाईक यांनी जयसिंगपूर येथील बैठकीत केला.

यावेळी आण्णासाहेब चौगुले, आदिनाथ हेमगिरे, रामचंद्र फुलारे, विठ्ठल मोरे, राम शिंदे, सचिन शिंदे, प्रकाश गावडे, सुरेश कांबळे, सागर संभूशेटे, मिलिंद साखरपे, सागर चिपरगे, शितल कंठी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चितळे परिसरात हत्ती कळप दाखल

0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

आजरा तालुक्याच्या पश्चिम भागात धुमाकुळ घालणाऱ्या एकमेव टस्करापाठोपाठ आता नव्याने आणखी एक हत्तींचा कळप दाखल झाला आहे. तीन मोठे हत्ती आणि एक पिल्लू असणाऱ्या या कळपाची चितळे आणि पोळगाव दरम्यानच्या जंगल परिसरात वस्ती आहे. दिवसभर येथील जंगलात वास्तव्य करून सायंकाळी अथवा रात्रीच्या सुमारास शेतात उतरून पिकांचे अतोनात नुकसान करण्याचा सपाटा या कळपाने लावला आहे. गेल्या चार-पाच दिवसात या परिसरातील ऊस, मेसकाठी आणि नारळ पिकांचा फडशा या कळपाने पाडला असल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. अशातच या भागात ऊस तोडण्यासाठी आलेल्या मजुरांनीही या कळपाची धास्ती घेतली आहे.

गेली दोन-तीन वर्षे आजरा तालुक्यात एकेकटे टस्कर वावरत आहेत. त्यात गेल्या वर्षी आणखी एक हत्ती आला होता, पण तो सध्या भुदरगड, राधानगरी, गगनबावडा परिसरात नुकसान करीत आहे. उरलेल्या एकमेव टस्कराच्या नुकसानीने आजरेकर शेतकरी त्रस्त असताना आता अचानकपणे चार हत्तींचा कळप दाखल झाल्याने धास्ती आणखी वाढली आहे. हत्तींचा हा कळप येथे स्थिरस्थावर झाल्यास तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतातील पिके, अवजारे आदींच्या मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या हत्तींच्या कळपाचा तातडीने बंदोबस्त करावा, अथवा त्यांना आल्यापावली हुसकावून लावावे, अशी मागणी चितळे-पोळगाव परिसरातून केली जात आहे.

तालुक्याच्या दक्षिणेकडील परिसरात चंदगड तालुक्यातून उतरलेल्या हत्तींच्या या कळपाने चितळे, देसाई वसाहत आणि भावेवाडी दरम्यान धुडगूस घालतो आहे. चितळे-पोळगाव दरम्यानच्या जंगलानजिकच्या सचिन सरदेसाई, जयवंत सरदेसाई, यशवंत तरडेकर आदी शेतकऱ्यांच्या शेतजमिनीत कळप दररोज वावरतो आहे. या शेतकऱ्यांच्या उसपीकासह मेसकाठी आणि नारळाचे नुकसान त्यांनी आरंभले आहे. यामुळे या आठवड्यात येथील शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. साखर कारखान्यांसाठी उसाची तोडणी करण्यास येथे आलेल्या ऊस तोडकऱ्यांना सातत्याने हा कळप दिसतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह त्यांच्यातही या हत्ती कळपाची मोठी दहशत पसरली आहे. याबाबत वनविभागाने तातडीने हत्तींना प्रतिबंध करण्याबाबत उपाय योजना करावी, अशी मागणी केली जात आहे.

सोमवारी बैठक

'गेली अनेक वर्षे हत्ती समस्या आजरेकर शेतकऱ्यांनाच्या पाचवीला पुजली आहे. नुकसान सोसण्याशिवाय पर्याय नाही. पण याबाबत कृतिशील प्रतिबंधासाठी हत्ती आणि गवे नुकसानप्रवण भागातील शेतकऱ्यांनाची व्यापक बैठक दावन मलिक येथे सोमवारी (ता. २४) दुपारी १२ वाजता घेत आहोत. गवे आणि हत्तीशी आता सहजीवन नाकारता येणार नाही, पण नुकसान कसे रोखता येईल, याबाबत या बैठकीत विचार होईल' असे सामाजिक कार्यकर्ते संजय तरडेकर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

९ हजार ३३६ कोटींचावित्त पुरवठा आराखडा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

सन २०१९-२० सालासाठी जिल्ह्याचा ९ हजार ३३६ कोटी ७३ लाखांचा संभाव्य वित्त पुरवठा आराखडा गुरूवारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या हस्ते प्रसिध्द करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठकीत या आराखड्यावर चर्चा करण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी सुभेदार म्हणाले, 'संभाव्य वित्त पुरवठा आराखड्याची प्रभावी, परिणामकारक अंमलबजावणी करावी. आराखड्यात शेती, शेती पूरक क्षेत्रासाठी ४ हजार ७७६ कोटी ५९ लाखांचे नियोजन आहे. यामुळे शेती क्षेत्राच्या विकासाला चालना मिळेल.'

नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक नंदू नाईक यांनी आराखड्यातील विभागनिहाय तरतूद रकमेची माहिती दिली. ते म्हणाले, 'सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांसाठी ३३१० कोटी ३ लाख, प्राथमिक क्षेत्रासाठी १२५० कोटी ११ लाख पतपुरवठ्याचे नियोजन आहे.' यावेळी रिझर्व्ह बँकेचे सहायक महाप्रबंधक मनोज मून, जिल्हा अग्रणी प्रबंधक राहुल माने, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, कृषी उपसंचालक भाग्यश्री पवार, जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक जे. बी. करीम, बाळासाहेब झिंगाडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

------------

चौकट

विभागनिहाय पतनियोजन

पीक कर्ज २९२४ कोटी २४ लाख, सिंचन : ५३८ कोटी ४७ लाख, शेती यांत्रिकीकरण : ३९५ कोटी ६७ लाख, दुग्ध व्यवसाय : ४४७ कोटी २६ लाख, कुकुटपालन : ३३ कोटी ९१ लाख, शेळी, मेंढी पालन : ४१ कोटी ३१ लाख कोटी, गोदाम, शीतगृह : ९६ कोटी ८७ लाख, भूविकास, जमीन सुधारणा : ८० कोटी ३३ लाख, शेत माल प्रक्रिया उद्योग : ९१ कोटी, गृह कर्ज : ७३८ कोटी ४१ कोटी, शैक्षणिक कर्ज २४० कोटी, महिला बचत गट : ९३ कोटी ८ लाख.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘नवोदय’मधील प्रकार मारामारीचा

0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

'कागलच्या जवाहर नवोदय विद्यालयात चार दिवसांपूर्वी घडलेला रँगिंगचा प्रकार निंदनिय आहे. तथपि तो प्रकार रॅगिंगचा नसून मारहाणीचा आहे. या प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे. दोषींवर तत्काळ कारवाई केली जाईल' असे प्राचार्य श्रीनिवास राव यांनी सांगितले. तर 'जवाहर नवोदय विद्यालय हे शैक्षणिक व खेळाच्यादृष्टीने देशपातळीवर अग्रस्थानी आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांनी भयभीत होऊ नये. सूचना व तक्रारी असल्यास माझ्याशी संपर्क साधावा' असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले आहे.

आमदार मुश्रीफ यांनी गुरुवारी विद्यालयास भेट दिली. घडलेल्या प्रकाराची माहिती प्राचार्य व इतर शिक्षकांकडून घेतली. पत्रकारांशी बोलताना मुश्रीफ म्हणाले, 'या विद्यालयाचे नाव देशपातळीवर आग्रस्थानी आहे. चार दिवसांपूर्वी घडलेला प्रकार रॅगिंगचा नसून मारामारीचा आहे. प्राचार्य व सर्व शिक्षकांची बैठक घेऊन सूचना केल्या आहेत. यापूर्वी या शाळेने आयएएस, आयपीएस, मिलिटरीसारखे उच्चपदस्थ अधिकारी घडविले आहेत. पालकांनीही सबुरीने घ्यावे. विद्यालयाच्या कामकाजाबाबत काही सूचना व अडचणी असतील त्यांनी माझ्याशी संपर्क करावा. हे विद्यालय कागल येथे व्हावे यासाठी दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक, उदयसिंह गायकवाड यांच्यासह माझे योगदान आहे. संस्था टिकावी ही अपेक्षा आहे.'

प्राचार्य के. श्रीनिवास राव म्हणाले, 'जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईलच. येथे शिक्षणाबरोबर खेळांना उत्तेजन देऊन इथला विद्यार्थी देशपातळीवर चमकविण्याचे आमचे प्रयत्न आहेत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ता दुरुस्तीसाठी उद्या रास्ता रोको आंदोलन

0
0

म. टा. वृत्तसेवा, हातकणंगले

हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव ते हेर्ले हा रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला असून रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्याचे त्वरीत डांबरीकरण करण्यात यावे या मागणीसाठी शनिवारी (ता. २२) बंडखोर सेना पक्षाच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करणार आहे. बंडखोर सेनेचे अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन दिले आहे.

पेठवडगाव शहर ही मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी मुख्य रस्त्यावरून नेहमी वर्दळ असते. हेर्ले, मौजे वडगाव, तासगाव व पेठवडगावमधील नागरिकांना या खराब व खड्डे पडलेल्या रस्त्यामुळे त्रास होत आहे. पावसाळ्यात या रस्त्याची खूप दयनीय अवस्था झाली आहे. संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे, असे आवळे यांनी सांगितले. बंडखोर सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख विजय लोखंडे, हातकणंगले तालुकाध्यक्ष सुरेश आवळे, सरचिटणीस नितिन कोळी, शहराध्यक्ष राहुल सोनटक्के, शहर उपाध्यक्ष विजय तडाखे, अभी माने यावेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेंडूरमध्ये स्वयंचलित सोलर ठिबक सिंचन प्रकल्प

0
0

प्रकाश कारंडे, कागल

कागल तालुक्यातील शेंडूर येथे शेतीसाठीच्या पाणी संस्थेच्या स्वयंचलित सोलर ठिबक सिंचन प्रकल्प बसविण्यात आला आहे. याचा प्रारंभ शनिवारी (ता. २२) होत आहे. सिद्धेश्वर सहकारी पाणीपुरवठ संस्थेत राज्यातील हा पहिलाच प्रयोग होत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आणि म्हाडा पुणेचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होईल. २ कोटी ५५ लाख रुपयांचा हा प्रकल्प असूनही या प्रकल्पांतर्गत प्रती शेतकरी ६८ हजार रुपये कर्ज असेल. तर शेतकऱ्यांना प्रत्येकी १ लाख २ हजार रुपये सूट मिळेल. यातून संस्थेचे ३ लाख ६० हजार रुपये वीज बिल वाचणार आहे. या बचतीसह वेळेत पाणी मिळून पिकांच्या उत्पादनातही वाढ होण्यास मदत होणार आहे.

१९९४ साली डोंगराळ भागाचा आणि पांढऱ्या पट्ट्याचा विचार करून २४० शेतकऱ्यांनी एकत्र येत शिवाजीराव इंगळे यांच्या पुढाकाराने सिद्धेश्वर सहकारी पाणीपुरवठा संस्थेची स्थापना केली. यावेळी त्यांना दिवंगत खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी मोलाचे सहकार्य केले. २००० साली प्रत्यक्षात योजनेला सुरवात झाली. २५०० एकर कमांड एरिया असणाऱ्या संस्थेची सध्या पाटाने पाणी देण्याची पद्धत असून सुमारे १५० एकर क्षेत्र भिजते. सुमारे सात किलोमीटर अंतरावरून दुधगंगा नदीतून पाणी आणताना खोराटे यांच्या शेतात एक स्टेज असून तेथून पाणी पुरवठा होतो. शेतकरी एकरी ६ टन पाणीपट्टी देतात. परंतु अनियमित वीज आणि पाटाने पाणी यामुळे शेतकऱ्यांना पाण्याचे फेर व्यवस्थित येत नाही. त्याचा फटका उत्पादनात बसतो.

याचा विचार करून विद्यमान चेअरमन धैर्यशील इंगळे यांनी राजे विक्रमसिंह घाटगे बँकेकडून दीड कोटी, चंद्रकांत पाटील यांच्याकडून ५० लाख आणि शाहू कारखान्याच्या सहकार्याने २ कोटी ५५ लाख भांडवल उभारले आहे. यातील प्रती शेतकरी १ लाख २ हजार रुपये सबसिडी वजा जाता केवळ ६८ हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याला कर्ज फेडावे लागणार आहे. सुरवातीला १५० पैकी १०० एकर क्षेत्राला सोलरवर ठिबक जोडले जाणार आहे. यासाठी जैन ठीबकनेही पुढाकार घेतला आहे.

स्वयंचलित सोलर ठिबक सिंचन असणारी ही महाराष्ट्रातील पहिलीच पाणी योजना आहे. ही सध्याची गरज आणि भविष्यासाठीची मोठी तरतूद आहे. अनियमित वीज, उशीरा येणारे पाण्याचे फेर आणि होणारे नुकसान या सर्वातून शेतकऱ्यांची कायमची सुटका होणार आहे.

- धैर्यशील इंगळे, चेअरमन, सिद्धेश्वर सहकारी पाणीपुरवठा, शेंडूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वारणानगरात पुष्प प्रदर्शन सुरू

0
0

म. टा. वृत्तसेवा, वारणानगर

वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये तात्यासाहेब कोरे यांच्या पुण्यस्मरण पंधरवड्यानिमित्त महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र आणि हॉर्टिकल्चर विभागाच्यावतीने आयोजित पुष्प प्रदर्शनाचे उद्घाटन स्नेहा कोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम उपस्थिती होत्या. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुरेखा शहापुरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.

दोन दिवस चालणाऱ्या प्रदर्शनात सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील व्यवसायिक रोपवाटिका उत्पादक आणि महाविद्यालयातील शंभरहून अधिक विद्यार्थी सहभागी आहेत. गुलाबांच्या विविध जाती, बोन्सायचे विविध प्रकार तसेच ऑर्किड, जिप्सोफीलिया, कारनेशन व इतर हंगामी फुलांबरोबरच तीनशेहून अधिक देशी व परदेशी फुले, फुलझाडे प्रदर्शनात आहेत. एम. ए. सुतार यांनी स्वागत केले. डॉ. लालासाहेब घोरपडे, डॉ. एस. वाय. जाधव, एस. व्ही. पवार, एस. आर. कुलकर्णी, एस. आर. घोडके, डॉ. प्रिती शिंदे-पाटील, वर्षा रजपूत, शिवानी लोहार, उपप्राचार्य के. जी. जाधव, डॉ. एस. पी. कुलकर्णी, दादा बच्चे, बाळासाहेब लाडगावकर, डॉ. प्रकाश चिकुर्डेकर उपस्थित होते. डॉ. एस. एस. खोत यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवीन सायबर कायदा ही आणीबाणीच: शिवसेना

0
0

पंढरपूर:

कॉम्प्युटर डेटावर पाळत ठेवण्याच्या आदेशावरून काँग्रेसनं केंद्र सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या असतानाच, राज्य आणि केंद्रात सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनंही केंद्रावर जोरदार हल्ला चढवला आहे. नव्याने लादलेला हा सायबर कायदा म्हणजे आणीबाणीचाच प्रकार असून, सर्वसामान्य नागरिकांच्या खासगी आयुष्यात घुसखोरी करून निर्माण केलेला दहशतवाद आहे, असं शिवसेना प्रवक्ते संजय राऊत म्हणाले. ते पंढरपूरमध्ये बोलत होते.

तुम्ही मोबाइल, कॉम्प्युटरमध्ये घुसताय, याचा अर्थ तुम्ही ईव्हीएममध्येही घुसला आहात; म्हणूनच तीन राज्यांतील पराभवानंतरही पुढील लोकसभा निवडणूक जिंकण्याची भाषा करत आहात, असा आरोप राऊत यांनी भाजपवर केला. 'हनुमानाची जात आणि धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्ये केली जात आहेत. कोणी त्याला मुस्लिम, तर कोणी थेट चिनी म्हणत आहे. आमच्या दैवतांचा हा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशारा राऊत यांनी दिला. हिंदुत्वाचा अपमान भाजपइतका दुसऱ्या कुणीच केला नाही, असेही ते म्हणाले.

एनडीए ही भाजपची मालमत्ता नसून, त्याच्या सात-बारावर शिवसेना आणि अकाली दलाचाही तितकाच आधिकार आहे, असं सांगून एनडीए सोडून जा असं म्हणणाऱ्या भाजपमधील काही मंडळींना त्यांनी फटकारलं. तीन राज्यांच्या निवडणुकांमध्ये जनतेने भाजपला कडू काढा दिला असून, आता देशातील मतदार त्यांना 'जमालगोटा' देतील, असा टोलाही त्यांनी लगावला. भाजपसोबतच्या युतीबाबत पसरलेल्या वृत्ताचंही त्यांनी खंडन केलं. आगामी निवडणुकीनंतर शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी युतीच्या चर्चेला पूर्णविराम दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेबसीरिजना सेन्सार आवश्यकच

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'नेटफ्लिक्समुळे अनेक वेबसीरिजच्या माध्यमातून कलाकारांना चांगली संधी मिळत आहे. या मालिकांच्या निर्मात्यांना अगोदरच पैसे मिळत असल्याने त्यांना फायदा-तोट्याची फारशी काळजी नसते, त्यामुळे अशा वेबसीरिजची संख्या वाढत आहे. पण काही निर्माते गरज नसताना अशा मालिकांतून सेक्सच्या दृश्याचा मारा करत आहेत, त्यामुळे त्यांना सेन्सॉरची कात्री आवश्यकच आहे,' असे मत प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी व्यक्त केले. 'महाराष्ट्र टाइम्स'च्या कार्यालयास दिलेल्या भेटीत त्यांनी संवाद साधला.

नेटफ्लिक्समुळे सिनेमागृहात येणाऱ्या प्रेक्षकांवर परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट करून मांजरेकर म्हणाले, 'टीव्ही आला तेव्हा अशी भीती व्यक्त झाली, पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही. उलट या वेबसीरिजमुळे टॅलेंटेड लोकांना भरपूर काम मिळत आहे. त्यांना चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे. हल्ली अनेक सिनेमांत हिरोसह अनेक किरकोळ भूमिका ठराविक अभिनेतेच करत आहेत. त्यामुळे इतरांची अवस्था घरातील कोपऱ्यात ठेवलेल्या फर्निचरसारखी झाली आहे. अशावेळी इतर दमदार कलावंतांना काम मिळत असल्याने काहीजण रातोरात स्टार होत आहेत.'

महाराष्ट्राच्या मातीत खाशाबा जाधव, व्ही. शांताराम, बाबा आमटे असे एकाहून एक हिरे जन्माला आले. पण कोणत्या तरी किरकोळ माणसावर सिनेमा तयार होतोय आणि अशा व्यक्तींवर सिनेमा का येत नाही, असा सवाल करून मांजरेकर म्हणाले, 'माझ्या मनात अशा आणखी काही व्यक्ती आहेत, त्यांच्यावर मला सिनेमा करायचा आहे. पु.ल. देशपांडेंवरील 'भाई' हा सिनेमा म्हणजे त्याची सुरुवात आहे. एका व्यक्तीवर दोन भागांमध्ये येणारा मराठीतील हा पहिलाच सिनेमा आहे. ७० पात्रांच्या माध्यमातून राज्यातील अनेक शहरांत आणि पु.लं. राहिलेल्या १४ घरांत चित्रीकरण केलेला हा सिनेमा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. मराठीतही हिंदीच्या तोडीचे अनेक सिनेमे येत आहेत. 'सैराट'ने १०० कोटींचा व्यवसाय केला. प्रेक्षकांनी मराठी सिनेमांना असा प्रतिसाद दिला तर हिंदीला टक्कर देता येईल. पण यासाठी मराठी सिनेमांना कमी लेखण्याची प्रवृत्ती कमी व्हायला हवी. मराठीतील काही सिनेमे हिंदीत यायला हवेत. मी यापुढे मराठीबरोबरच तो सिनेमा हिंदीतही काढणार आहे.'

००००

महेश मांजरेकर म्हणाले...

वेबसीरिजमुळे अनेकांना नवे व्यासपीठ

'बिग बॉस'चा अनुभव एकदम धमाल आणणारा

मराठी सिनेमांना कमी लेखण्याची वृत्ती कमी व्हायला हवी

मराठीतही हिंदीच्या तोडीचे अनेक सिनेमे

नेटफ्लिक्स मालिकांना सेन्सॉरशिपची गरज आहेच

दक्षिणेतील लोकांना भाषेचा अभिमान असल्याने त्यांचे सिनेमे जोरात

०००

२०१९ ला राजकारणात

मांजरेकर म्हणाले, 'राजकारणाची आपल्याला आवड आहे. राज ठाकरे अतिशय जवळचे मित्र असल्याने मनसे या पक्षाशी संबंधित आहे. पक्ष चालविण्यासाठी पैसा लागतो. तो नसल्याने आणि कमी आमदार निवडून आल्याने अडचणी आल्या. भाजपकडून आपल्याला फार अपेक्षा होत्या; पण त्या प्रमाणात अपेक्षापूर्ती झालेली नाही. राजकारणाच्या माध्यमातून सिनेव्यावसायिकांचे प्रश्न सोडविण्याचा आपला मानस आहे.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

... तर सत्तेतून बाहेर पडा

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'तुम्ही दोन वेळा सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला. आमच्यासोबत काम करायचे नसेल तर सत्तेतून बाहेर पडा,', अशा शब्दांत जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी घटक पक्षाचे सदस्य राहुल आवाडे आणि महिला, बालकल्याण सभापती वंदना मगदूम यांचे दीर राजू मगदूम यांना शुक्रवारी सुनावले. यावर मगदूम, आवडे यांनी योग्य वेळी बाहेर पडणारच आहे. तेही तुम्हाला सांगून, असे प्रत्युत्तर दिले. यासह यशवंत ग्रामपंचायत, सरपंच पुरस्कार निवडीवरून महाडिक आणि मगदूम, आवाडे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.

'यशवंत' पुरस्काराच्या मूल्यमापनात हत्तीवडे (ता. आजरा) आणि हातकणंगले तालुक्यातील माणगाव गावांना समान गुण पडले. यावरून मगदूम आणि पदाधिकाऱ्यांत दोन दिवसांपासून धुसफूस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या दालनात महाडिक यांनी मगदूम यांना बोलावून घेतले. मगदूम यांच्यासह सदस्य आवाडे, विलास पाटील, कल्लाप्पा भोगम, सर्जेराव पेरीडकर, सुभाष सातपुते भेटायला गेले. त्यावेळी महाडिक यांनी, 'राजू, तुम्ही काय गैरसमज पसरवत आहात, अशी विचारणा केली. त्यावर मगदूम यांनी खुर्चीवरून उठून,' मला मोठ्या आवाजात बोलायचे नाही, आवाज खाली करून बोलायचे, तुम्ही काय जिल्हा परिषदेचे मालक नाही', असे प्रत्त्युत्तर दिले. त्यावर ,'छोट्या गोष्टीवरून राजकारण करू नका, मोठ्यासाठी करा', असे महाडिक यांनी सुनावले. यावर मगदूम यांनी, तुम्ही मोठ्यावर राजकारण करा, आम्ही लहानांसाठीच करणार आहे. माणगावला डावलले तर ग्रामस्थांना घेऊन आंदोलन करू,' असे उत्तर दिले. राहुल आवाडे महाडिक यांना म्हणाले, ' तुम्ही आम्हाला कोणत्याच चर्चेत सहभागी करून घेत नाही.' शेवटी अरूण इंगवले, पेरीडकर यांनी हस्तक्षेप करून वाद मिटवला.

राजीनामा १० दिवस ठेवून घेतला

महाडिक यांनी तुम्हाला महिला, बाल कल्याण सभापतीपद दिल्याचे मगदूम यांना सांगितले. त्यावर संतप्त झालेले मगदूम यांनी, 'तुम्ही सभापती पद दिलेले नाही. आवाडे गट आणि स्वाभिमानीने तडजोडीने पद घेतले आहे. तुम्ही आधीच्या सभापतींच्या राजीनाम्यावर १० दिवस सही केली नाही', असा आरोप केला. मी बाहेर गावी होते, त्यामुळे विलंब लागल्याचे महाडिक म्हणाल्या. यावर आक्षेप घेत करवीर सभापतींचा राजीनामा दिलेल्या दिवशीच संध्याकाळी तातडीने येऊन कसा मंजूर केला, असा सवाल मगदूम यांनी केला.


' पुरस्कार निवडीत माझा कोणताही हस्तेक्षेप नाही. पुरस्कार रितसर जाहीर होण्यापूर्वीच राजू मगदूम यांनी आकांडतांडव केले. राजकारण करण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांना मेसेज पाठवून दबाव टाकला. सत्ताधाऱ्यांप्रमाणचे घटक पक्षातील सदस्यांनाही वागणूक दिली जाते. गैरसमज पसरवायचा असेल आणि आमच्यासोबत काम करायचे नसेल तर सत्तेतून बाहेर पडावे, असे सांगितले. गुणांकनात पात्र असल्यास माणगावला पुरस्कार मिळेल. आवश्यक वाटल्यास फेरमूल्यांकनही केले जाईल.

= शौमिका महाडिक, अध्यक्ष, जि. प.


'अध्यक्षांनी सव्वा अकरा वाजता भेटण्यासाठी बोलवले. मी वेळेत आलो, पण त्या उशिरा आल्या. कक्षात बोलावून त्यांनी मला मोठ्या आवाजात जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्यांना त्याच भाषेत उत्तर दिले. तुम्ही जि. प. चे मालक नाही, असे सुनावले. अध्यक्षपदाचा शेवटचा टप्पा असल्याने आम्हाला सत्तेतून बाहेर पडा, असे महाडिक म्हणत आहेत. आम्ही बाहेर पडणार आहोतच. माणगावला डावलल्यास जि. प. समोर आंदोलनही करणार आहे.

- राजू मगदूम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


खंबाटकी घाटातील वळण सरळ होणार

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातारा

गेल्या दहा वर्षांत ७६ जणांचे प्राण घेणारे व २८१ जणांना जखमी करणारे खंबाटकी घाटातील धोकादायक 'एस' वळण आता सरळ होणार आहे. दोन नवीन बोगदे व महामार्ग रुंदीकरणात हे वळण निघणार असून, धोकादायक वळणावरील अपघातांच्या मालिकेला आता पूर्णविराम मिळणार आहे.

खंबाटकी बोगद्याच्या निर्मितीनंतर घाटाच्या वळणावर 'एस' प्रकारचे वळण असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आणि जीवघेणे अपघात घडले आहेत. अपघाताचे ग्रहण लागत अपघातांची मालिका घडू लागल्याने पोलिस प्रशासनाकडून खंबाटकी घाटातील एस वळणला उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 'ब्लॅक स्पॉट' म्हणून जाहीर करण्यात आले होते. याठिकाणी होणाऱ्या अपघाताची संख्या व मृत्यूचे प्रमाण पाहता संबंधित एस वळण काढण्याची मागणी प्रवासी, वाहतूकदार व प्रशासनाकडून भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे करण्यात येत होती.

खंबाटकी घाटात दोन नवीन अत्याधुनिक सोयीसुविधांयुक्त बोगदे निर्माण करत असताना प्रामुख्याने भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने कर्दनकाळ ठरलेल्या एस वळण काढण्याला प्राधान्य दिले आहे. यामध्ये खंबाटकी घाटातील बोगद्यांमधून बाहेर पडल्यानंतर दिलेले वळण सरळ करत आताच्या महामार्गामध्ये रुंदीकरण करताना 'एस' वळण काढत 'एस' वळणाच्या काही अंतरावरून रस्ता सरळ करत खंबाटकी घाटातील जुन्या टोलनाक्यापर्यंत महामार्ग तयार करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जुन्या टोलनाक्याजवळ भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून उड्डाणपुलाची निर्मिती करणार आहे.

खंबाटकी घाटामध्ये निर्माण करण्यात येणाºया बोगद्यांमध्ये अपघात घडल्यास अत्याधुनिक सुविधांमुळे त्याचठिकाणी लगेच कार्यान्वित करण्यात येणाºया आपत्कालीन व्यवस्थेला माहिती मिळत अपघातग्रस्तांना मदत तत्काळ उपलब्ध होणार आहे. या करिता याठिकाणी दोन नियंत्रण कक्षाची निर्मिती करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नावातच असते सर्व काही

0
0

शिरीष कणेकर यांच्या 'गप्पा तुमच्याशी'

शाहू लोकशिक्षण व्याख्यानमाला ... लोगो

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'देश विदेशात विनोदी कार्यक्रम करताना परदेशातील प्रेक्षक कार्यक्रमासाठी अधिक आसुसलेला असल्याचे दिसते. तो वेळ काढून येतो. प्रचंड रसिकता त्यांच्याजवळ असते. तो अतिशय गांभीर्याने रसग्रहण करतो', असे मत ज्येष्ठ विनोदी लेखक, पत्रकार शिरीष कणेकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले.' प्रत्येकाच्या नावाची महिमा वेगळी असते. म्हणून नावात काय असते, असे विचारणे चुकीचे असून नावातच सर्व काही असते' , असेही ते म्हणाले.

येथील केशवराव भोसले नाट्यगृहात महानगरपालिकेतर्फे आयोजित राजर्षी शाहू लोकशिक्षण व्याख्यानमालेत तिसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. 'गप्पा तुमच्याशी' हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. मिलिंद अधिकारी यांनी कणेकर यांची मुलाखत घेतली. कणेकर म्हणाले, 'परदेशात मराठी कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळतो. मोठ्या संख्येने रसिक येतात. तल्लीन होऊन रसग्रहण करीत असतात. याउलट देशातील रसिक अनेकवेळा नकारात्मक मूडमध्ये असल्याचे जाणवते. काहीजण जाणीवपूर्वक व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करतात. १५ देशांचा दौरा केल्यानंतर हा फरक जाणवतो.'

ते पुढे म्हणाले,' पत्रकारिता आणि एकपात्री प्रयोग करताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, सुपरस्टार अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, आशा भोसले, अभिनेते नाना पाटेकर, राजेश खन्ना, दादा कोंडके यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली. प्रत्येकात चांगले आणि खटकणारे गुण जाणवले. कोंडके हजरजबाबी विनोद करणारे जाणवले. बच्चन कितीही वेळा भेटले तरी ओळख विसरतात. लतादिदी साध्या आणि सरळ आहेत. त्या लवकर एखाद्यावर विश्वास ठेवत नाहीत. माझे लेखन कणेकर शैलीने प्रसिध्द आहे. यामुळे प्रत्येकाच्या नावाची महिमा वेगळी असते. म्हणून नावात काय असते, असे विचारणे चुकीचे आहे. नावातच सर्व काही असते. पूर्वीच्या नामांकित क्रिकेटपटूंवर 'फटकेबाजी' नावाने प्रयोग केले. यातून प्रेक्षकांना खिळवून ठेवले. मात्र जुने खेळाडूं सेवानिवृत्त झाल्यानंतर प्रयोग बंद केले.' उपमहापौर भूपाल शेटे यांनी प्रास्ताविक केले. शुभदा हिरेमठ यांनी ओळख करून दिली. कार्यक्रमास नगरसेवक अशोक जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

--------------

आजचे व्याख्यान

वक्ते ... प्रा. यशवंत पाटणे

विषय ... शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे जीवन व कार्य

स्थळ ... केशवराव भोसले नाट्यगृह

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अध्यक्षांच्या राखीव निधीला ४१ सदस्यांचा विरोध

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्हा परिषद अध्यक्षांनी स्वनिधीतून १ कोटी २२ लाख ५० हजार रूपये राखीव ठेवले आहेत. त्यास सभागृहातही विरोध केला आहे. इतिवृत्तात या विषयाचा ठराव मंजूर असे लिहू नये. लिहिल्यास सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या सभागृहाचा अवमान होईल, अशा आशयाचे ४१ सदस्यांच्या नावाचे निवेदन सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांना शुक्रवारी देण्यात आले.सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेचे सचिव असतात. यानुसार आडसूळ यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, २०१७ -१८ च्या अर्थसंकल्पात ९ कोटी २२ लाख ४० हजार २८९ अखर्चित राहिले. यापैकी २५ लाख पंचगंगा नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी तर उर्वरित १ कोटी २२ लाख ५० हजार अध्यक्षांच्या मान्यतेने राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यास सदस्यांचा विरोध आहे. निवेदनावर राहुल आवाडे, वंदना मगदूम, मनोज फराकटे, डॉ. पद्माराणी पाटील, महेश चौगुले, स्वाती सासने यांच्यासह सत्तेत असलेल्या सदस्यांच्याही सह्या आहेत.

------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाईन बांधकाम परवान्यांच्या शंकांचे निरसन

0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

राज्य सरकारने 'ड' वर्ग महापालिकांसाठी १,५०० मीटरवरील बांधकामासाठी निश्चित केलेल्या ऑनलाइन बांधकाम परवान्यांबाबत घेतलेल्या कार्यशाळेत परवान्यांबाबत शंकांचे निरसन झाले. रेल्वे लाईनपासून ३० मीटर अंतरावरील बांधकामासाठी आवश्यक कागदपत्रे, करागृह परिसरातील बांधकामांना एनओसी आवश्यक आहे का, हेरिटेज इमारत दुरुस्तीबाबत कोणते निकष असणार आदींविषयक बांधकाम व्यावसायिकांनी विचारलेल्या प्रश्नांना तज्ज्ञांनी समर्पक उत्तरे दिली.

महापालिकेच्यावतीने क्रिडाई, असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट अँड इंजिनियर्स व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्किटेक्ट आदी संघटना व संस्थांसाठी आयोजित एकदिवसीय कार्यशाळा शुक्रवारी पार पडली. इंजिनिअर असोसिएशनच्या रामभाई सामाणी हॉलमध्ये ही कार्यशाळा झाली. १,५०० चौरस मीटरपेक्षा मोठ्या भूखंडावर ऑनलाइन बांधकाम परवाना दिला जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर ही कार्यशाळा झाली.

महाआयटीचे श्रीकांत कुलकर्णी यांनी ऑनलाइन बांधकाम परवानगीसाठी आवश्यक रेखांकने, नवीन परवाना, परवाना नुतनीकरण आणि नकाशे याबाबत पॉवर प्रेझेंटेशनच्या माध्यमातून माहिती दिली. ऑनलाइन बांधकाम परवानगी सुलभ, पारदर्शक आणि जलद होणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर उपस्थितांनी नव्या पद्धतीतील फरक समजावून देण्याची मागणी केली. तसेच पर्यावरण व अन्य एनओसीची आवश्यकता भासल्यास त्या कशा पद्धतीने द्याव्यात असा मुद्दा उपस्थित केला.

महाआयटीचे सुजीत देशपांडे, रवींद्र धुमाळ व भरत साळोखे यांनी ऑनलाइन बांधकामाची परवानगी घेण्याबाबत प्रात्यक्षिक करुन दाखवले. महाराष्ट्र सरकारने 'महावास्तू पोर्टल' तयार केले असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यशाळेस क्रिडाईचे अध्यक्ष महेश यादव, आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे, उपशहर रचनाकार नारायण भोसले यांच्यासह बांधकाम व्यावसायिक उपस्थित होते. सहाय्यक नगररचना आर. एस. महाजन यांनी स्वागत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वर्धापनदिन उत्साहात

0
0

कोल्हापूर: विश्वकल्याण व विश्वशांती हीच जैन धर्माची मुख्य शिकवण आहे. भगवान महावीरांनी त्या उद्देशाने कार्यरत राहण्याची प्रेरणा दिली असल्याचे प्रतिपादन आचार्य नररत्नसागर यांनी केले.

हॉकी स्टेडियमसमोरील शत्रुंजय मंदिरच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भक्तीपूजानगर संघाचे अध्यक्ष ललित गांधी यांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी शत्रुंजय मंदिराचे अध्यक्ष अमृत शहा, गुजरी मंदिराचे अध्यक्ष नरेंद्र ओसवाल, लक्ष्मीपुरी मंदिराचे अध्यक्ष कांतीलाल ओसवाल, शाहूपुरी जैन संघाचे अध्यक्ष प्रवीण मणियार आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images