Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कापड खरेदी फसवणूकप्रकरणी तीन व्यापारी ताब्यात

$
0
0

इचलकरंजी : कोट्यवधी रुपयांच्या कापड खरेदी फसवणूक प्रकरणी शिवाजीनगर पोलीसांनी सूरत येथील तीन व्यापाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य संशयित चेनसिंग चौधरी हा पथकाच्या हाती लागला नाही. सूरतमधील चौधरी याचे कार्यालय बंद झाले आहे. इचलकरंजीप्रमाणे सूरत येथील कार्यालयासाठी त्याने केलेल्या करारपत्रात खोटी माहिती दिल्याचे पथकाने केलेल्या तपासात उघडकीस आले आहे. शहरातील दोन कापड व्यापाऱ्यांनी कापड खरेदी प्रकरणात ४०हून अधिक यंत्रमागधारक व व्यापाऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत दोन कापड व्यापाऱ्यांवर गुन्हा नोंद झाला होता. याप्रकरणी चौघांना पथकाने ताब्यात घेतले. या व्यापाऱ्यांकडे रात्री उशिरापर्यंत शिवाजीनगर पोलि चौकशी करीत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हेल्मेटबाबत जनजागृती

$
0
0

हेल्मेटबाबत जनजागृती

सोलापूर :

सोलापूर शहर, जिल्ह्यात हेल्मेट वापरण्याबाबत शहर पोलिस, ग्रामीण पोलिस आणि परिवहन विभागाच्या वतीने संयुक्त मोहिम राबविण्यास बुधवारपासून सुरुवात करण्यात आली. वाहतुकीच्या नियमांची जनजागृती व्हावी, वाहतूक साक्षरता वाढीस लागावी यासाठी संयुक्त मोहिम राबवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्या होत्या. बुधवारी अनेक वाहनधारकांना अडवून पोलिसांनी हेल्मेट न घातल्या बद्धल सूचना देत दंडाच्या पावत्या ही फडल्या. तसेच हेल्मेट वापरणाऱ्या वाहनधारकांना गुलाबाचे फूल देऊन अभिनंदन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोटारसायकलची चोरी

$
0
0

कोल्हापूर : येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील लोखंडी पुलाजवळील फुटपाथवरून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरली. नऊ डिसेंबरला रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली.

पोलिसांनी सांगितले की, शाहूवाडी तालुक्यातील पणुंद्रेतील शिवाजी कृष्णात सुतार हे दुचाकीवरून कामानिमित्त आले होते. बसस्थानक परिसरात त्यांनी पार्किंग केलेली दुचाकी अज्ञाताने लंपास केली. शोधाशोध करूनही न मिळाल्याने त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीजदरवाढ मागे घ्या, अन्यथा सत्तांतर घडवू

$
0
0

उद्योजक, व्यावसायिक आक्रमक, शुक्रवारी जिल्हाधिकारी-महावितरणवर महामोर्चा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महावितरण कंपनीने २५ ते ३० टक्के इतकी अन्यायी वीज दरवाढ केली आहे. वीज दरवाढीचा फटका उद्योजक, व्यापारी, हॉस्पिटल्स, हॉटेल, थिएटर, टिंबर व्यावसायिकांसह सर्वसामान्य घटकांना बसला आहे. त्याचा कारखानदारीवर विपरित परिणाम झाला असून सरकारने वीज दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा सत्तांतर घडवू ,असा इशारा व्यापार, व्यावसायिक व उद्योजक संघटनांच्या प्रतिनिधींनी दिला.

विविध व्यावसायिक संघटनांच्या पुढाकारातून वीज दरवाढी विरोधात शुक्रवारी (ता. २१) जिल्हाधिकारी व महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याच्या नियोजनसाठी कोल्हापूर इंजिनीअरिंग असोसिएशन येथे बुधवारी पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीत काळ्या फिती लावून सरकारचा निषेधही करण्यात आला. याप्रसंगी 'स्मॅक'चे अध्यक्ष राजू पाटील यांनी 'मोर्चामध्ये जिल्ह्यातील संपूर्ण इंडस्ट्रीजचा सहभाग राहील. सरकारने, लोकभावना विचारात घेऊन वीज दरवाढ कमी करावी अन्यथा येत्या निवडणुकीत सत्तांतर घडविण्यासाठी प्रयत्न करू,' असा इशारा दिला.

इंजिनीअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष नितीन वाडीकर म्हणाले, 'वीज दरवाढीमुळे सगळेच व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. उद्योग क्षेत्रावर विपरित परिणाम होऊन उत्पादन घटले आहे. या साऱ्या प्रकाराला सरकार जबाबदार असून वीज दरवाढीचा निर्णय मागे घ्यावा.' यावेळी 'गोशिमा'चे लक्ष्मीदास पटेल, 'मॅक'चे अध्यक्ष गोरख माळी, 'आयआयएफ'चे सुरेश चौगुले, पेट्रोल डिझेल डिलर असोसिएशनचे अमोल कोरगावकर, हॉटेल मालक संघाचे उज्ज्वल नागेशकर, शिवाजीराव पोवार, धनंजय दुग्गे, सचिन शहा आदींनी मनोगत व्यक्त केले. 'सर्वच प्रकारच्या वीजदरात वाढ करुन सरकारला राज्यातील उद्योगधंदे बंद पाडायचे आहेत का ?,' असा सवाल उद्योजकांनी यावेळी केला. 'सरकारने गाफील राहू नये, अन्यथा सगळे व्यावसायिक एकत्र येऊन सरकारच्या विरोधात मतदान करण्याचा ठराव करतील,' असा इशारा सचिन शहा यांनी दिला. बैठकीला संगीता नलवडे, अशोक जाधव, अतुल आरवाडे, संजय पेंडसे, सिध्दार्थ लाटकर आदी उपस्थित होते.

.........

महावितरणमध्ये बोके बसलेत

उद्योजक चंद्रकांत जाधव म्हणाले, 'सततच्या वीज दरवाढीमुळे कारखानदारी अडचणीत आहे. एकीकडे मेक इन इंडिया, मेक इन भारतच्या घोषणा द्यायच्या आणि दुसरीकडे वीज दरवाढ लादून उद्योजकांना मेटाकुटीस आणायचे, हा प्रकार योग्य नाही. महावितरणकडे वीज दर कमी करण्यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा केला. पण उद्योजकांचे म्हणणे विचारात घेतले नाही. महावितरणमध्ये 'बोके'बसलेत त्यांना इंडस्ट्री, नागरिकांची काळजी नाही.

............

आमदार हाळवणकर गायब

कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे म्हणाले, 'ऑक्टोबर महिन्यात चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार अमल महाडिक, आमदार सुरेश हाळवणकर यांची भेट घेऊन वीज दरवाढ कमी करण्याची मागणी केली होती. त्यावेळी हाळवणकरांनी मी कोअर कमिटीवर कार्यरत आहे, निश्चित वीज दरवाढ कमी करु असे सांगितले. आता दोन महिने उलटले आमदार हाळवणकर गायब झाल्यासारखे चित्र आहे. दरवाढ मागे घेण्याचा निर्णय तर लांबच, साधी बैठकही घेतली नाही. '

..........

सासने मैदान येथून मोर्चाला प्रारंभ

सासने मैदान येथून शुक्रवारी सकाळी दहा वाजता मोर्चाला प्रारंभ होईल. सासने मैदान, दाभोळकर कॉर्नर चौक, स्टेशन रोड, बसंत बहार रोड, जिल्हाधिकारी कार्यालय व त्यानंतर महावितरण असा मोर्चा निघणार आहे. मोर्चात २० हून अधिक व्यावसायिक संघटनांचा सहभाग आहे. तर थिएटर व्यावसायिक दुपारी बारा वाजता चित्रपट शो बंद ठेवणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कापशी आरोग्य केंद्रावर कासारी ग्रामस्थांचा मोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

कागल तालुक्यातील कासारी येथील पल्लवी दिलीप जाधव या महिलेच्या मृत्यूप्रकरणी आज नातेवाईकांसह कासारीच्या ग्रामस्थांनी बुधवारी सेनापती कापशी आरोग्य केंद्रावर मोर्चा काढला. यावेळी येथील कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकारही घडला. संबंधित आरोग्यसेविका के. बी. मुल्ला यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय येथून हलणार नाही. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी येथे आली पाहिजे अशी भूमिका ग्रामस्थांनी घेऊन घोषणाबाजी करत आरोग्य केंद्राच्या समोरच ठिय्या मांडला. हातकणंगले तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची समजूत काढल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.

सकाळी दहा वाजता कासारीतील ग्रामस्थ कापशी आरोग्य केंद्रासमोर आले. त्यांनी प्रश्नांची सरबत्ती आणि कर्मचाऱ्यांच्या निषेधाच्या घोषणा देत राग व्यक्त केला. आरोग्य समितीचे सर्व सदस्यांनी, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी समोर यावे असा आग्रह धरला. आरोग्यसेविकेवर कारवाई करावी, शक्य नसताना प्रसूती का केली? संबंधीत आरोग्यसेविका मुल्ला यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशा घोषणा देत लोकांनी राग व्यक्त केला. जिल्हा आरोग्य अधिकारी येऊन त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्याशिवाय येथून हलणार नाही अशी भूमिका घेतली.

मात्र, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी हातकणंगले तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे यांना दुपारी एकच्या सुमारास तेथे पाठवले. त्यांनी 'मी जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांचा प्रतिनिधी म्हणून आलो आहे. तुमच्या भावना त्यांना कळवेन. घटनेची सखोल चौकशी सुरू आहे. जाधव कुटुंबीयांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. या घटनेत नेमकी चूक कोणाची व काय आहे याची चौकशी होईल. त्यानंतर कारवाई होईल. याशिवाय माता मृत्यूबाबत ज्या शासकीय योजना असतील, त्यांचा पाठपुरावा करून जाधव कुटुंबीयांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन.'

आरोग्य अधिकारी डॉ. विशाल शिंदे म्हणाले, 'येथे दोन आरोग्य अधिकाऱ्यांची गरज असताना एकच अधिकारी कार्यरत आहेत. त्यामुळे आरोग्य केंद्र सोडून उपकेंद्रांमध्ये जाता येत नाही. आरोग्य उपकेंद्रामध्ये प्रसूती केली जाते. तेथील आरोग्यसेविका प्रशिक्षित आहेत. मात्र कठीण परिस्थितीत त्यांनी रुग्णाला येथील आरोग्य केंद्रात आणणे आवश्यक आहे. अथवा पुढील उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात पाठविले पाहिजे. मात्र कालच्या रुग्णाबाबत तसे झाले नाही. अॅम्ब्युलन्सची मागणी झाल्याबरोबर ती उपलब्ध करून दिली होती. मात्र उपचाराला वेळ झाला होता.' मोर्चामध्ये माजी सरपंच तानाजी पाटील, दिलीप तिप्पे, सागर मोहिते, तानाजी पाटील, अशोक कुरणे, राजाराम पाटील, भिकाजी पाटील, संजय माळी, किरण माळी, उमेश देसाई आदिंचा समावेश होता.

छायाचित्र : सुकेश बाबर, कापशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दीक्षित गुरुजींचा स्मृतिदिन

$
0
0

कोल्हापूर: भक्ती सेवा विद्यापीठ शिक्षण संस्थेचे संस्थापक दिक्षीत गुरुजींचा ३८ वा स्मृतिदिन तपोवन मैदान येथे साजरा झाला. संस्थेचे चेअरमन अॅड. धनंजय पठाडे यांच्या हस्ते व सोसायटीचे अध्यक्ष विकास जोशी यांच्या उपस्थितीत दिक्षीत गुरुजींच्या समाधीस पुष्पहार अर्पण केला. यावेळी अॅड. प्रशांत चिटणीस, किरण रेडेकर, प्रदीप मगदूम आदी उपस्थित होते. दरम्यान क्रिकेट व प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट ग्राम योजनेसाठी मूल्याकंन

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागातर्फे 'स्मार्ट ग्राम'योजनेंतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे मूल्यांकन होणार आहे. लोकसहभागातून पर्यावरणाचा समतोल राखणे, समृद्ध ग्रामची निर्मिती या आधारे गावांची निवड होणार आहे. तालुका स्तरावर प्रथम येणाऱ्या गावांना दहा लाख रुपयांचे तर जिल्हास्तरावरील विजेत्यांना ४० लाख रुपयांचे बक्षीस देऊन गौरविले जाणार आहे.

योजनेत सहभागी होण्यासाठी पाच हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायती, शहरालगतच्या ग्रामपंचायती, पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती व सर्वसाधारण ग्रामपंचायती अशी विभागणी केली आहे. त्या अनुषंगाने १०० गुणांसाठी मूल्यांकन होणार आहे. प्रत्येक तालुक्यातील एक ग्रामपंचायत 'तालुका स्मार्ट ग्राम'म्हणून निवडले जाईल. जिल्हा परिषद प्रशासनातर्फे ग्रामपंचायतींना या योजनेविषयी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीरशैव स्मशानभूमीस पंधरा लाखांचा निधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

वीरशैव लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीच्या विकासाच्या पहिल्या टप्प्याच्या बांधकामाला प्रारंभ झाला. दोन कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार असून टप्प्याटप्प्याने कामे होणार आहेत. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निधीतून पंधरा लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्या निधीतून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. संरक्षक भिंतीची बांधणी, पेव्हिंग ब्लॉक, वाहनतळ उभारणी प्रस्तावित आहे. जिल्हा नियोजन विकास निधीतून आणखी पन्नास लाख रुपयांचा निधी मिळण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. भाजप महानगर अध्यक्ष संदिप देसाई, राहुल चिकोडे, अॅड. शिवप्रसाद वंदुरे पाटील, बांधकाम व्यावसायिक सुमित पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले.

वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुनील गाताडे यांनी स्वागत केले. दक्षिण महाराष्ट्र वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुहास भेंडे यांनी प्रास्ताविक केले. व्यवस्थापक बी.एस.पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सहसचिव चंद्रकांत हळदे यांनी आभार मानले. कार्यक्रमास संचालक नानासाहेब नष्टे, शंकरराव कदम, राहुल नष्टे, अॅड.सतीश खोतलांडे, माजी नगरसेवक श्रीकांत बनछोडे, भूपाल रंगमाले, शिवमूर्ती झगडे, सदाशिव माळकर आदी उपस्थित होते.

..............

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हिरण्यकेशीवर ३ जानेवारीपर्यंत उपसाबंदी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आजरा

आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यातील हिरण्यकेशी नदीतीरावरील शेतीसाठी उपसाबंदी लागू करण्यात आली असल्याचे गडहिंग्लज पाटबंधारे विभागाकडून जाहीर करण्यात आले आहे. आगामी उन्हाळा आणि शेतीसह पिण्याच्या पाण्याची नदीमधील उपलब्धता विचारात घेत टप्प्याटप्प्याने ही उपसाबंदी शिथिल करण्याचे नियोजन असेल.

यावर्षी देखील चित्री प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. तर हिरण्यकेशी नदीवर आजरा तालुक्याच्या पश्चिम भागात साळगाव, पेरणोली, देवर्डे, शेळप, दाभिल, धनगरमोळा आदी ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरलेले आहेत. यातील पाण्याचा विसर्ग गडहिंग्लज तालुक्यासह संकेश्वर दरम्यान वाहतो. या पाण्याचा वापर शेतीसाठी तसेच नदीकाठी असणाऱ्या अनेक गावच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनांसाठी केला जातो. यामुळे या परिसरातील हजारो हेक्टर शेती केली जाते. मात्र नदीपात्रातील पाणी प्राधान्याने पिण्यासाठी व्हावा, यासाठी उपलब्ध पाण्याचे दरवर्षी नियोजन करून उपसाबंदी लागू केली जाते. यावर्षी देखील पाटबंधारे विभागाने पावसाळा सुरू होईपर्यंत उपलब्ध पाणी शेती आणि पिण्यासाठी पुरविण्याच्या दृष्टीने नियोजन केले आहे. यावर्षी २० डिसेंबर ते ३ जानेवारीअखेर उपसाबंदी जाहीर केली आहे. त्यानुसार आजरा तालुक्यातील हाजगोळी कोल्हापूर पद्धतीचा बंधारा ते गडहिंग्लज तालुक्यातील खणदाळ बंधारापर्यंत नदीतीरावरील शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या वीजेच्या पंपांचा वीजपुरवठा बंद करण्यात येणार आहे. तसे वीज वितरण कम्पनीच्या कार्यकारी अभियंत्यांना सूचित करण्यात आले आहे. या पंधरा दिवसाच्या उपसाबंदीनंतर ४ जानेवारी पासून येथील सर्व शेतीसाठी पाणी उपसा करण्यासाठी वीज पुरवठा पूर्ववत सुरू राहील. मात्र, साळगाव ते धनगरमोळा दरम्यान उपसाबंदी नसेल, असेही सांगण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवदासीच्या प्रश्नासाठी चौकटीबाहेरही प्रयत्न करू

$
0
0

म टा वृत्तसेवा ,गडहिंग्लज

'देवदासी ही प्रथा पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत खेदजनक आहे. देवदासींचे प्राचीन काळापासून शोषण होत आलेले आहे. कायदा झाला, पण सर्व प्रश्न सुटले नाहीत. त्यांचे सर्व प्रश्न मार्गी लागावेत यासाठीच्या चळवळीचे गडहिंग्लज हे केंद्र आहे. तेव्हा येथील शोषितांचे प्रश्न अत्यंत संवेदनशीलतेने आणि चौकटीबाहेर जाऊन कार्य करण्याची आमची तयारी आहे' असे प्रतिपादन गडहिंग्लज विभागाच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी केले. त्या येथील व्यापारी भवनमध्ये आयोजित देवदासी, जोगते, वाघ्या-मुरळी, शोषीत व बेघर-भूमिहिनांच्या मेळाव्यात बोलत होत्या. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी विद्रोही जेष्ठ विचारवंत राजाभाऊ शिरगुप्पे होते.

राजाभाऊ शिरगुप्पे यांनी शासकीय अधिकार्‍यांना या देवदासींच्या प्रश्नाकडे केवळ दयाबुद्धीने पाहू नये. सहानुभूतीपेक्षा निर्णायक भूमिका महत्वाची आहे. कायदा होऊनही अंमलबजावणी होत नाही ती कशी होईल याचा विचार अधिकार्‍यांनी करावा असे मत अध्यक्षीय भाषणात मांडले.

माजी आमदार अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे म्हणाले, 'देवदासीची व बेघर भूमिहिनांची लढाई ही केवळ पेन्शनसाठी अथवा घरासाठी नाही. तर ती आत्मसन्मानासाठीही आहे. तो आत्मसन्मान त्यांना मिळावा.'

तहसिलदार रामलिंग चव्हाण यांनीही शोषीत व अपेक्षितांचे प्रश्न प्राधान्याने सोडवू अशी ग्वाही दिली. प्रा. डॉ. अच्युत माने, बाळेश नाईक, एस. आर. बाईत, एम. के. सुतार, मुख्याधिकारी सुषमा शिंदे-कोल्हे यांनी मनोगत व्यक्त केले. पांगारकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन झाले. रामलिंग चव्हाण यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. पुनम म्हेत्री यांनी स्वागत केले. प्रा. सुभाष कोरे यांनी सूत्रसंचालन केले. दत्तात्रय मगदूम यांनी आभार मानले. मेळाव्यास चंदाबाई बारामती, सोनाबाई बारामती, भिमाबाई चावडे, सुरज कांबळे, संतोष भोई, महंमदअली पठाण, इकबाल सनदी, अनिल नेज्जी, कुंदन कदम, गौरव मणेर, अमर म्हेत्री उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता द्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जयसिंगपूर

लिंगायत समाजाला त्वरीत स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता द्या, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी लोकसभेत केली.

लोकसभेत नियम ३७७ अन्वये सूचना मांडताना खासदार राजू शेट्टी म्हणाले, 'लिंगायत धर्म संस्थापक धर्मगुरू महात्मा बसवेश्वर हे एक महान, द्रष्टे समाजसुधारक, संत होते. त्यांना विश्वगुरू म्हटले जाते. १२व्या शतकात जेव्हा अंधश्रद्धा, स्पृश्य-अस्पृश्य, व जातीयवादी उन्माद एका उंचीवर होता, त्यावेळी गुरू बसवेश्वररुपी सूर्याचा भारतीय क्षितिजावर उदय झाला. महात्मा बसवेश्वर हे आजही भारतीय संस्कृतीचा असे व्यक्तिमत्व आहे की, ज्याची चमक नित्य नवी असून कायमस्वरुपी म्हणजेच शाश्वत आहे. आज जवळपास ८०० वर्षांपूर्वी कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेलगत राहणाऱ्या जनतेच्या मनामध्ये गुरू बसवेश्वरांबाबत अनन्यसाधारण स्थान आहे. लिंगायत धर्माला मानणाऱ्या मतांनुसार लिंगायत हा धर्म स्वतंत्र आहे. ही केवळ एक जात नाही. आणि हा लिंगायत समाज सरकारकडून स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळावी यासाठी रस्त्यावरचा संघर्ष करीत आहे. जैन आणि बुद्ध धर्माप्रमाणे लिंगायत धर्मालाही स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्यात यावा. त्यांची ही मागणी न्यायोचित असून संविधानाला धरूनच आहे. हा समाज गेल्या अनेक वर्षापासून स्वंतत्र धर्माची मान्यता द्या. म्हणून संघर्ष करून देशभरातील लिंगायत बांधव रस्त्यावर उतरलेला आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोर्चे काढले आहेत. हे मोर्चे अतिशय शांततेच्या मार्गाने असून त्यांची मागणी रास्त आहे. त्यामुळे सदनाने या समाजाला त्वरीत स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता देऊन योग्य तो सन्मान करावा,' अशीही मागणी खासदार शेट्टी यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारू दुकानांविरोधात बांबवडेत आंदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा शाहूवाडी

बांबवडे (ता. शाहूवाडी) गावच्या हद्दीत सरुड रस्त्यालगत देशी दारू अगर कोणत्याही मद्य विक्रीच्या दुकानास प्रशासनाने परवानगी देऊ नये या मागणीसाठी परिसरातील ग्रामस्थांनी गुरुवारी कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग राखून धरत निदर्शने केली. बांबवडेचे माजी सरपंच गजानन निकम यांच्या नेतृत्वाखाली शंभरहून अधिक ग्रामस्थ व महिलांचा जनसमुदाय रस्त्यावर उतरला होता. आंदोलनस्थळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलिस निरीक्षक संजय साळवी, पोलिस उपनिरीक्षक डी. एस. चव्हाण यांना ग्रामस्थांनी मागण्यांचे निवेदन दिले. आठवडा बाजार असल्याने शाहूवाडी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.

निवेदनात म्हटले आहे की, महामार्गालगत दारूविक्रीस न्यायालयीन निर्बंध आल्यानंतर बांबवडे (ता. शाहूवाडी) बाजारपेठेतील एक दारूविक्रेता व सरूड (ता. शाहूवाडी) येथील अधिकृत दारूबंदीमुळे तिथून उठाव झालेला अन्य एक दारूविक्रेता अशा दोघांनी प्रशासनाच्या मदतीने ही दारू दुकाने बांबवडे गावच्या हद्दीतील सरुड रस्त्यालगत स्थलांतरित करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. यासाठी संबंधितांनी स्थानिक ग्रामपंचायतीकडे संमतीचा ठराव मागितला असता विशेष सभेत ग्रामस्थांनी ठरावाला विरोध दर्शविला. यानंतर उत्पादन शुल्क विभागालाही वेळोवेळी भेटून हीच बाब कळवूनही ग्रामस्थांचा हा विरोध डावलून दारूविक्रीस परवानगी देण्याचा प्रशासनाने घाट घातला आहे. दडपशाहीने परिसरातील महिलांच्या सह्या घेतल्या असल्याचा आरोपही निवेदनातून ग्रामस्थांनी केला आहे.

दरम्यान परिसरातील महिला व ग्रामस्थांनी चार दिवसांपूर्वी गुरुवारी गावबंदची हाक दिली होती. त्यानुसार आज ११ वाजता बांबवडे मध्यवर्ती चौकात जमा झालेल्या शंभरभर आंदोलकांनी महामार्ग रोखून धरत निदर्शने केली.

फोटो ओळ :

बांबवडे येथील निदर्शनादरम्यान मुनीरा मणेर व इतर महिलांनी उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वंदूर सरपंचा अविश्वास ठरावाबाबत आज बैठक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कागल

वंदूर (ता. कागल) येथील सरपंच बाळासाहेब कांबळे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. याबाबत शुक्रवारी (ता. २१) तहसिलदार गणेश गोरे यांनी बैठक बोलावली आहे. तर दुसर्‍या बाजूला पाच सदस्यांनी घरफाळा न भरल्याने तसेच गैरहजर असल्याने सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी सरपंच कांबळे यांनी केली आहे. त्यामुळे गावचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

वंदूर हे ३२०० लोकसंख्याचे गाव आहे. २०१४ साली झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत घाटगे, मंडलिक आणि राजे गटाने एकत्र येवून आघाडीने आमदार मुश्रीफ गटाचा पराभव केला. संजय घाटगे यांचे ३, प्रा. संजय मंडलिक यांचे ३ आणि समरजितसिंह घाटगे गटाचे दोन असे आघाडीचे आठ सदस्य निवडून आले. आमदार हसन मुश्रीफ गटाचे ३ सदस्य निवडून आले. सरपंच संजय घाटगे गटाचा झाल्याने उपसरपंचपदासाठी रोटेशन ठेवण्यात आले. परंतु मंडलिक गटाच्या बी. जी. पाटील यांनी ठरल्याप्रमाणे अडीच वर्षांनी राजीनामा दिला नाही. त्यामुळे राजे गटाने अविश्वास ठरावाची जुळणी केली. हा वाद मिटवत असताना १५ जुलै २०१८ रोजी उपसरपंच बी. जी. पाटील यांनी राजीनामा दिला. आणि आपल्यासह घाटगे आणि राजे गटाचा एक सदस्य फोडून मुश्रीफ गटाशी संगनमत केले. त्यामुळे मुश्रीफ गटाचे पाच आणि मंडलिक गटाचे तीन सदस्य झाले. परंतु सतत गैरहजर रहाण्याचा ठपका ठेवत मुश्रीफ गटातील अलका इंगळे यांच्यावर अपात्रतेचा ठपका आला. त्यामुळे मंडलिक-मुश्रीफ गटाच्या सात जणांनी सरपंच कांबळे यांच्यावर अविश्वास ठराव आणला आहे.

दरम्यान या सदस्यांमधील मंडलिक गटाचे बी. जी. पाटील व तानाजी परीट, मुश्रीफ गटाचे संगीता सुतार आणि सारिका कांबळे या सर्वांनी मिळून लाखो रुपयांचा फाळा थकवल्याचा ठपका ठेवत सरपंच कांबळे यांनी या चौघांना अपात्र करावे अशी तक्रार दिली आहे. मुश्रीफ गटाच्या सीमा चौगुले ह्या नऊ महिने गैरहजर असल्याने त्यांनाही अपात्र करावे अशी मागणी केली आहे. त्यामुळे आज होणार्‍या तहसिलदार गोरे यांच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ख्रिसमस सुवार्ता रॅली उत्साहात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येशू ख्रिस्तांचा शांततेचा संदेश देत शहरातून ख्रिसमस सुवार्ता रॅली काढण्यात आली. केशवराव भोसले नाट्यगृह येथून नगरसेवक आदिल फरास यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. ख्रिस्ती धर्मगुरू आर. आर. मोहिते यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. सुवार्ता रॅलीचा मार्ग बिंदू चौक, शिवाजी पुतळा, लुगडी ओळ, फोर्ड कॉर्नर, व्हिनस कॉर्नर, स्टेशन रोड असा होता. वायलर मेमोरियल चर्च याठिकाणी रॅलीची सांगता करण्यात आली. ख्रिस्ती युवाशक्तीच्या वतीने ख्रिसमस सणानिमित्त या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

समाजातील परस्परांमधील राग, मत्सर, द्वेष विसरून सर्वांनी आपुलकीने आणि प्रेमाने नांदावे या हेतूने येशूचा संदेश देण्यासाठी शहरातील ख्रिस्ती बांधवांकडून सुवार्ता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीमध्ये येशूच्या रूपातील पेहराव केलेली लहान मुले उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती. रॅलीत महिलांचा लक्षणीय सहभाग होता. मोठ्या संख्येने उपस्थित राहून लहान मुलांनी सांताक्लॉजच्या टोप्या परिधान करून उत्साहात भक्तीगीते गायली. यावेळी ट्रॅक्टरवर लावलेल्या मोठ्या एलइडी स्क्रीनवर येशू ख्रिस्तांवर आधारित गाणी दृश्यरूपात दाखवण्यात आली. तसेच मान्यवरांचे शुभसंदेश दाखवण्यात आले. यावेळी धर्मगुरू मोहिते यांनी येशूच्या जन्माविषयीची आणि त्याच्या कार्याविषयीची माहिती उपस्थितांना दिली. नागरिकांनी मोठ्या उत्साहात रॅलीचे स्वागत केले. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, लाला भोसले, राकेश सावंत, रोहिणी सावंत, संजय बेनाडे, के. पी. सोनावणे, प्रमिला माळी, सविता तनवाणी, ज्योती खोडवे, अनिल शिरोळकर, दयानंद लोंढे, रमेश भोसले आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दौलत ताबाप्रश्नी आज निर्णय ?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

चंदगड तालुक्यातील दौलत साखर कारखाना ताबा घेण्यास जिल्हा बँकेला मनाई करण्याच्या जिल्हा कोर्टातील याचिकेवर आज शुक्रवारी (ता. २१) निर्णय होण्याची शक्यता आहे. न्यूट्रियंट्स अॅग्रो फूड कंपनीने कोर्टात याचिका केली असून बुधवारी (ता.१९) सुनावणी पूर्ण झाली आहे.

दौलत कारखाना गोकाक येथील न्यूट्रियंटस् कंपनीला जिल्हा बँकेने ४५ वर्षे भाडे कराराने चालवण्यास दिला होता. पण कंपनीने कराराप्रमाणे आठ कोटी ६० लाख रुपयांचा पहिला हप्ता थकवल्याने बँकेने करार रद्द केला. त्यानंतर कारखान्याचा ताबा मिळवण्यासाठी कंपनीला नोटीस पाठवली होती. या कारवाईच्या विरोधात कंपनीने जिल्हा कोर्टात धाव घेतली होती. पण कंपनीची मागणी कोर्टाने फेटाळली होती. कोर्टाच्या निर्णयानुसार बँकेने पुन्हा कारखाना ताब्यात घेण्याची कारवाई सुरु केल्यावर परत दुसऱ्यावेळी कंपनीने जिल्हा कोर्टात धाव घेतली. या याचिकेवर जिल्हा बँकेकडून अॅड लुईस शहा तर कंपनीकडून अॅड. अभिजीत कापसे यांनी युक्तीवाद केला. या याचिकेवर शुक्रवारी निर्णय होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


माथाडी कामगार मजूरी वाढीवर तोडगा नाहीच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

जे ट्रान्स्पोर्टधारक लवादाने जाहीर केलेली २४ रुपयांची वाढ देतील, त्या ठिकाणीच काम सुरू करण्याचा निर्णय गुरुवारी सायंकाळी थोरात चौकात झालेल्या माथाडी कामगारांच्या बैठकीत घेण्यात आला. तर लवादाच्या मजुरीवाढीच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालय जो निर्णय देईल, त्याच्याशी बांधिल राहण्याचा पवित्रा ट्रान्स्पोर्ट असोसिएशनने घेतला आहे. त्यामुळे मजुरीवाढीचा गुंता कायम आहे.

गेल्या ११ दिवसांपासून माथाडी कामगारांनी मजूरीवाढप्रश्नी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनामुळे वस्त्रोद्योगातील सर्वच घटक अडचणीत सापडले आहेत. याप्रश्नी तोडगा काढण्यासाठी गुरुवारी प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांच्या उपस्थितीत माथाडी कामगार प्रतिनिधींची बैठक घेतली. कामगार प्रतिनिधींनी लवादाच्या निर्णयाप्रमाणे फरकाची रक्कम द्यावी अन्यथा त्यांच्या विरोधात कायद्यानुसार जप्तीची कारवाई करण्याची मागणी केली. त्यावर कामगारांनी पूर्ववत काम सुरू करावे. कामगारांची ट्रान्स्पोर्ट चालकांकडून पगाराच्या फरकाची देय रक्कम कायद्याने वसुल करून दिली जाईल, असे आश्वासन प्रांताधिकाऱ्यांनी दिले.

शामराव कुलकर्णी, धोंडीराम जावळे, यशवंत लाखे यांनी कामगारांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेण्याचे मान्य केले होते. त्यानुसार सायंकाळी झालेल्या बैठकीत जे ट्रान्सपोर्टधारक २४ रुपये मजुरीवाढ देतील त्यांच्याकडेच काम करण्याचा निर्णय जाहीर केला.

दरम्यान, ट्रान्स्पोर्ट असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी सायंकाळी प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी ट्रान्स्पोर्ट असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी लवादाने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात असोसिएशनने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालय जो निर्णय देईल त्याप्रमाणे माथाडी कामगारांना आम्ही मजुरी देऊ, असे स्पष्ट केले. असोसिएशनचे रामचंद्र जगताप, अरविंद नेमिष्टे, प्रदीप बहिरगुंडे, बाबूराव सोनाळे, जितेंद्र जानवेकर, संजय पाटील, सर्जेराव परीट आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्नाटकच्या मंत्र्यांनी घेतली पी.एन. पाटील यांची भेट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कर्नाटकचे परिवहन मंत्री डी.सी. तमन्ना यांनी गुरुवारी सायंकाळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पी.एन. पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली.

बेळगाव येथे कर्नाटक राज्याचे विधानसभा अधिवेशन सुरु आहे. गुरुवारी सायंकाळी परिवहन मंत्री तमन्ना यांचे कोल्हापूरात आगमन झाले. त्यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी टाकाळा येथील पी.एन. पाटुल यांच्या निवासस्थानी भेट दिली. पाटील यांनी मंत्री तमन्ना यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

तमन्ना हे जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे आमदार असून पी.एन. पाटील यांच्याशी त्यांची मैत्री आहे. मंत्री तमन्ना व पी.एन. यांच्यात बंद खोलीत चर्चा झाली. सध्या कर्नाटकात जनता दल आणि काँग्रेसचे सरकार आहे. तीन राज्यात भाजप पिछाडीवर पडला असून काँग्रेसने तीन राज्यात विजय मिळवल्याने बदलत्या राजकारणावर दोघांत चर्चा झाली. सध्या भाजपविरोधी वातावरण असून काँग्रेससह धर्मनिरपेक्ष पक्षांकडे मतदारांचा ओढा वाढल्याचे मत तमन्ना यांनी व्यक्त केल्याचे समजते. यावेळी जिल्हा दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) अध्यक्ष विश्वास पाटील, संचालक पी.डी. धुंदरे, बाळासाहेब खाडे, उदय पाटील, सत्यजित पाटील, जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोलापूर विद्यापीठाचा अकाउंटचा पेपर फुटला

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सोलापूर

सोलापूर विद्यापीठामार्फत घेण्यात येत असलेल्या बी.कॉम. द्वितीय वर्षाचा अकाउंटचा पेपर अक्कलकोटमधील खेडगी महाविद्यालयात फुटल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. त्यानंतर हा पेपर व्हायरल झाला. दरम्यान, मंगळवेढा येथील संत दामाजी महाविद्यालयात दुपारी अडीच वाजता हा पेपर सुरू झाला होता. त्यानंतर दीड तासांनी विद्यार्थी पेपर सोडवत असताना हे पेपर काढून घेण्यात आले. त्यामुळे, विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. येत्या २६ तारखेस अकाउंटचा पेपर पुन्हा घेण्यात येणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक श्रीकांत कोकरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लास्टिक बंदीचा फज्जा

$
0
0

कोल्हापूर टाइम्स टीम

महानगरपालिका वगळता जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, पोलिस प्रशासनासह सर्व सरकारी कार्यालयांनी अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केल्याने प्लास्टिक बंदीचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. कॅरिबॅगसह बंदी असलेल्या सर्व प्लास्टिक वस्तूंचे उत्पादन, विक्री, वापर सुरू असल्याने बंदीचा फज्जा उडाला आहे.

प्लास्टिकमुळे सागरी, वन आणि मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होऊ लागला आहे. अविघटनशील कचरा नाले व गटरमध्ये अडकल्याने समस्या निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने सर्वप्रथम २००६ मध्ये कॅरीबॅग्ज उत्पादन व वापरावर बंदी आणली. तरीही पर्यावरण व मानवी आरोग्याचे नुकसान वाढत चालले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने प्लास्टिक व थर्माकॉल वस्तूंचे उत्पादन, त्यांचा वापर, विक्री आणि वाहतुकीवर मार्च २०१८ पासून बंदी आणली आहे. प्लास्टिक बंदीची घोषणा झाल्यानंतर ज्या व्यापाऱ्याकडे बंदी असलेल्या वस्तूंचा साठा आहे, त्याची विल्हेवाट लावण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली. पण, मुदतीनंतर बंदी असलेल्या वस्तू बाजारात पुन्हा विक्रीस आल्या आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. पण, दंड भरुन पुन्हा प्लास्टिक वस्तूंची विक्री सुरू आहे.

सध्या भाजी मंडईतील विक्रेते, फूल विक्रेते, मटण, मासे, चिकन विक्रेत्याकडून बंदी असलेल्या ५० मायक्रॉन कॅरीबॅग्जचा सर्रास वापर करत आहेत. विक्रेत्यांकडून महापालिका इमारतीसमोरील घातक काळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशव्यातून फळांची विक्री होत आहे. महापालिकेजवळील होलसेल व्यापारी कॅरीबॅग्ज, प्लास्टिक कोटेड पत्रावळ्या, द्रोण, प्लेट्स, प्लास्टिक चमचे, बाऊल, काटे चमचे या बंदी असलेल्या वस्तूंची विक्री केली जात आहे. हॉटेलमध्ये अन्नपदार्थांच्या पार्सलसाठी नॉन वोवन पॉलिप्रॉपलीन बॅग्जचा वापर केला जात आहेत. विवाह समारंभात जेवणावळी आणि बुफे पार्टीत प्लास्टिक चमचे, बाऊल, काटे-चमच्यांचा वापर केला जात आहे.

किराणा दुकानदारांकडून आणि आठवडी बाजारात विक्रेत्यांकडून कमी मायक्रॉनच्या पिशव्यांतून किराणा मालाची विक्री सुरू आहे. कापड दुकानदारांकडून हँडल असलेल्या प्लास्टिक बॅग्जचा वापर सुरू आहे. एक लिटर व त्यापेक्षा जास्त असलेल्या क्षमतेच्या पाणी, सॉफ्ट ड्रिंक, ज्यूसच्या बाटल्यांचा पुर्नवापर करण्याचा आदेश कंपन्यांनी धाब्यावर बसवला आहे. अर्धा लिटरपेक्षा मिलीलिटर पॅकबंद पाणी बाटल्यांना बंदी असतानाही त्याची विक्री केली जात आहे. दूध पिशव्यांचे पुर्नचक्रण करण्याची यंत्रणा उभारणीची कायद्यात तरतूद असताना एकाही दूध संघाने तशी यंत्रणा उभारलेली नाही.

प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिकेबरोबर सर्व सरकारी कार्यालयाना आदेश दिले आहेत. फक्त महानगरपालिका, नगरपालिकांकडून कारवाई केली जात आहे. अन्य सरकारी कार्यालयांनी प्लास्टिक बंदीच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. प्लास्टिक बंदीची योजना बासनात गुंडाळली जात आहे.

जिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष

जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उप प्रादेशिक अधिकाऱ्यांना प्लास्टिक वापरावर कारवाईचे अधिकार आहेत. या तीन प्रमुख कार्यालयांबरोबर सर्व सरकारी विभागांकडून दुर्लक्ष होत असल्याने बंदीचा कायदा फसण्याची शक्यता आहे. आरोग्य, पोलिस निरीक्षक, प्रांताधिकारी, तहसीलदार, जिल्हा पुरवठा अधिकारी, उप वनसंरक्षकांना कारवाई करण्याचे अधिकार असूनही दुर्लक्ष केले जात आहे.

प्लास्टिक बंदी असलेली ठिकाणे

शासकीय, अशासकीय संस्था, शैक्षणिक संस्था, क्रीडा संकुल, क्लब्ज, चित्रपट आणि नाट्यगृह, कारखाने, मंगल कार्यालये, वाणिज्यिक संस्था, कार्यालये, धार्मिक स्थळे, धार्मिक समारंभ व कार्यालये, दुकानदार, मॉल्स, विक्रेते, कॅटरर्स, घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, व्यापारी, फेरीवाले, वितरक, वाहतूकदार, सेल्समन, मंडई, उत्पादक, स्टॉल्स, पर्यटन स्थळे, जंगल, इको सेन्सिटिव्ह झोन, सागरी किनारे, सर्व सार्वजनिक ठिकाणे.

महापालिकेकडून प्लास्टिक बंदीसाठी आरोग्य विभागाकडून कारवाई सुरू आहे. आजअखेर प्लास्टिक वस्तूंचा वापर करणाऱ्यांकडून तीन लाख ८० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. यापुढे फौजदारी कारवाई केली जाणार आहे.

- विजय पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळ संचालकपदीकमलकुमार कटारिया रूजू

$
0
0

कोल्हापूर : येथील विमानतळ संचालकपदी कमलकुमार कटारिया रूजू झाले. संचालकपद अनेक दिवसापासून रिक्त होते. दरम्यान, रूजू झालेले कटारिया मूळचे दिल्लीचे आहेत. भारतीय विमानतळ प्राधिकरणात २३ वर्षापासून कार्यरत आहेत. इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट दिल्ली, अमृतसर, कोलकता येथे काम केले आहे. ते हजर झाल्यामुळे विमानतळ सुशोभिकरण, विस्तारीकरणाच्या कामाला गती येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images