Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

चौकशीची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दसरा चौकातील लिंगायत बोर्डिंगच्या चार खोल्या पाडून त्या ठिकाणी दुकान गाळे बांधल्याच्या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी ऑल इंडिया स्टुडंटस फेडरेशनतर्फे गुरूवारी तहसीलदार गुरू बिराजदार यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे, बोर्डिंगमध्ये चांगल्या मूलभूत सुविधा नाहीत. याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. चार खोल्या पाडून त्या ठिकाणी दुकानगाळे तयार करून भाड्याने देण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना राहण्यासाठी जागा अपुरी पडणार आहे. म्हणून खोली पाडल्याच्या प्रकरणाची चौकशी करावी, नियमित स्वच्छता ठेवावी, विद्यार्थ्यांसाठी वृत्तपत्रे उपलब्ध करून द्यावीत, बोर्डिंगची फी कमी करावी. निवेदन देताना हरीश कांबळे, प्रशांत आंबी, धीरज कठारे, आरती रेडेकर, शिवप्रसाद शेवाळे, कार्तिक पाटील, राकेश देसाई आदी उपस्थित होते.

-------------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सहकारी बँकांची रविवारी परिषद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

येथील कर्नाडस बँकिंग रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट फाउंडेशनतर्फे रविवारी (ता.१६) राज्यस्तरीय सहकारी बँकांची परिषद पेटाळा येथील राम गणेश गडकरी हॉलमध्ये आयोजित केली आहे. सहकार आयुक्त सतीश सोनी यांच्या हस्ते परिषदेचे उदघाटन होईल. प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार असल्याची अशी माहिती फाउंडेशनचे संचालक किरण कर्नाड, संचालिका माधवी कर्नाड यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, 'सहकारी बँकिंगची चळवळ वाढवणे, नविन बँकिंग संकल्पना समजावून घेणे, सहकारी बँकांचे सक्षमीकरण करणे याबाबत परिषदेत चर्चा होईल. सकाळी १० वाजता उदघाटन झाल्यानंतर दोन सत्रात तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. दुपारी सर्वोत्तम बँक, अध्यक्ष, सीईओ, वसुली अधिकारी, उत्तम व्यवस्थापन असणाऱ्या बँकांचा गौरव करण्यात येईल. परिषदेमध्ये राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, राज्य सहकारी बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक प्रमोद कर्नाड, कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष निपुण कोरे, अर्थतज्ज्ञ डॉ. विजय ककडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, जिल्हा उपनिबंधक अरूण काकडे मार्गदर्शन करतील. राज्यातील ५०० बँकांचे अध्यक्ष, संचालक, अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.' पत्रकार परिषदेस अनघा परूळेकर, सुर्यकांत पाटील - बुदीहाळकर, श्रीकांत कुलकर्णी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सतीश लळीत यांच्यावर गुन्हा

$
0
0

जातीवाचक शिविगाळ प्रकरणी

सतीश लळीत यांच्यावर गुन्हा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अखत्यारितील कोल्हापूरचे विभागीय माहिती उपसंचालक सतीश रामचंद्र लळीत (वय ५७ वर्षे, रा. ताराबाई पार्क) यांच्याविरोधात जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याने गुरुवारी सायंकाळी याबाबत तक्रार नोंदवली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.

लळीत यांनी पदाचा गैरवापर करुन जातीवाचक शिवीगाळ व अपमानास्पद वागणूक देऊन मानसिक खच्चीकरण केल्याची तक्रार संबंधित महिलेने केली आहे. अनुसुचित जाती अन्याय प्रतिबंधक कायदा १९८९ मधील कलमे व महिलांचे लैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा २०१३चे कलम २६ अन्वये लळीत यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पाच जानेवारी २०१७ ते आजअखेर कामाच्या ठिकाणी लळीत यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यांनी वारंवार जातीवाचक वक्तव्ये केली आहेत. तसेच नियमबाह्य कामकाज केले नाही म्हणून केबिनमध्ये बोलावून शिवीगाळ केल्याचे म्हटले आहे. लज्जा व संकोच निर्माण होईल अशी वक्तव्ये केली आहेत. या त्रासाला कंटाळून संबधित महिला कर्मचाऱ्याने १५ जून २०१७पासून कार्यालयात जाणे बंद केले. लळीत यांच्याविरोधात वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार करुनही कसल्याही प्रकारची चौकशी झाली नाही. लेखी तक्रार करुनही दखल घेतली गेली नसल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. याप्रकरणी गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. करवीर उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज गुरव या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅपचे उद्घाटन

$
0
0

कोल्हापूर : येथील करवीर हायकर्सतर्फे तयार करण्यात आलेल्या 'भरारी'या मोबाइल अॅपचे लोकार्पण गिर्यारोहन उमेश झिरपे यांच्या हस्ते रविवारी (ता. १६) होणार आहे, अशी माहिती अध्यक्ष दीपक सावेकर यांनी गुरुवारी सांगितले. राजर्षी शाहू स्मारक भवनात सायंकाळी पाच वाजता कार्यक्रम होईल. पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख अध्यक्षस्थानी असतील. माऊंट एव्हरेस्टवीर प्रसाद जोशी, आयर्नमॅन आकाश कोरगावकर, कृष्णराज महाडिक प्रमुख पाहुणे असतील. 'असे घडतात गिर्यारोहक' या विषयावर झिरपे मार्गदर्शन करणार आहेत, असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज आजऱ्यात सन्मान

$
0
0

आज आजऱ्यात सन्मान

म. टा. वृत्तसेवा, आजरा

गावस्तरावर समाजहितासाठी कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा सन्मान कार्यक्रम शुक्रवारी (ता. १४) आयोजित करण्यात आला आहे. ग्रामविकास राज्यमंत्री दादासाहेब भुसे यांच्या हस्ते हा सन्मान होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रकाश आबिटकर असतील. येथील अण्णाभाऊ सांस्कृतिक सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, सभापती रचना होलम, नगराध्यक्षा जोत्स्ना चराटी, आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती आजरा तालुका शिवसेना अध्यक्ष राजेंद्र सावंत आणि उपजिल्हाप्रमुख संजय पाटील यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अक्षय पात्रा’ला ठेका देऊ नका

$
0
0

पोषण आहारप्रश्नी आयुक्तांना निवेदन

कोल्हापूर टाइम्स टीम

शालेय पोषण आहार पोहोचवणाऱ्या 'अक्षय पात्रा' संस्थेबाबत पालघर येथे मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल झाल्या आहेत. तसेच कर्नाटकामध्येही संस्थेला विरोध केला असताना शालेय पोषण आहार अक्षय पात्रा संस्थेला देण्याच्या हालचाली सुरू असून नित्कृष्ट दर्जाचा आहार पुरवणाऱ्या संस्थेला ठेका देऊ नये, या मागणीचे निवेदन जिल्हा शालेय पोषण आहार ठेकेदार कामागर संघटनेच्यावतीने बुधवारी महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना दिले.

निवेदनात म्हटले आहे, 'गरजू व्यक्तींच्या माध्यमातून शालेय पोषण आहार पुरवला जात असताना सेंट्रल किचन पद्धतीनुसार संस्था अथवा उद्योग समुहाकडून पोषण आहार वाटपाचे नियोजन केले आहे. पालघर येथे या पद्धतीने पुरवण्यात आलेल्या पोषण आहाराबाबत अनेक तक्रारी झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना पोषण आहारात गरम भोजन देणे बंधनकारक असताना केंद्रीय किचन पद्धतीमुळे गरम जेवण मिळत नाही. तसेच यामध्ये वापरण्यात येणाऱ्या भाजीपाला नित्कृष्ट दर्जाच्या असतात. शहरात २००३ पासून सुमारे ७०० सामान्य कुटुंबातील व्यक्ती पोषण आहार पुरवतात. त्यांना हे काम देण्याऐवजी संस्था अथवा उद्योग समुहाला काम देण्याची कार्यवाही सुरू आहे. विरोध डावलून जर अक्षय पात्राला ठेका दिल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे.' निवेदनावर जिल्हाध्यक्ष प्राचार्य ए. बी. पाटील, शहराध्यक्षा वर्षा कुलकर्णी, सेक्रेटरी अश्विनी साळोखे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रविवारी वधू-वर मेळावा

$
0
0

कोल्हापूर: सुतार लोहार-समाज उन्नती संस्थेच्यावतीने रविवारी (ता. १६) राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा आयोजित केला आहे. येथील टिंबर मार्केट परिसरातील लोळगे हॉल येथे सकाळी ११ वाजता मेळाव्याला प्रारंभ होईल.श्री विश्वकर्मा पांचाळ सुतार लोहार सामाजिक उत्कर्ष संस्थेचे पी. बी. बोराडे, इंजिनीअर अरविंद लोहार, संस्थेचे सहसचिव रवींद्र लोहार यांच्या उपस्थितीत मेळाव्याचे उद्घाटन होईल. या मेळाव्यात विविध जिल्ह्यातील समाजातील इच्छुक वधू-वर सहभागी होणार आहेत. लोळगे हॉल येथे रोज सकाळी ११ ते दुपारी चार या वेळेत नाव नोंदणी करावी, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष व्ही. डी. लोहार, अनिल लोहार, राधा मेस्त्री, रुपाली सातार्डेकर आदींनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणांना संधी दिली पाहिजे

$
0
0

स्टुडंट फेडरेशनच्या अधिवेशनात डॉ. जाधव यांचे प्रतिपादन

कोल्हापूर टाइम्स टीम

'जगातील सर्वाधिक असलेल्या तरुणांचा देश अशी भारताची ओळख आहे. मोठ्या संख्येने उपलब्ध असलेले तरुण हे आपल्या देशाचे सामर्थ्य आहे. त्यामुळे हे सामर्थ्य नीट वापरलं पाहिजे. आपल्या शिक्षण व्यवस्थेने तरुणांना अधिकाधिक संधी दिली पाहिजे. असे झाले तर तरुणांचे लाभलेले सामर्थ्य आणि त्याचा भांडवल म्हणून देशाच्या विकासासाठी सर्वाधिक वापर करता येईल,' असे प्रतिपादन एमफुक्टो राज्य उपाध्यक्ष प्रा. डॉ. सुभाष जाधव यांनी केले. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यावतीने आयोजित विसाव्या कोल्हापूर जिल्हा अधिवेशनच्या उद्घाटनप्रसंगी ते चित्रदुर्ग मठ येथे बोलत होते. अधिवेशनात प्राचार्य ए. बी पाटील, मोहन जाधव यांनी मार्गदर्शन केले.

डॉ. जाधव म्हणाले, 'तरुणांना घडवण्यासाठी शिक्षणाचा वापर ताकदीने करायला हवा. यासाठी तरुणांना विविध कौशल्ये देणे गरजेचे आहे. कौशल्य विकसित होण्याच्या दृष्टीने गुणवत्तपूर्ण उच्च शिक्षण मिळाले तर त्याचे रूपांतर मानवी भांडवलामध्ये करता येईल. देशात महाविद्यालयात जाणाऱ्या तरुणांचे प्रमाण केवळ २५ टक्के आहे यामध्ये १७ ते २३ वयोगटातील तरुणांचा समावेश आहे. महाराष्ट्रात शिक्षणाचे प्रमाण चांगले असले तरी ७५ टक्के विद्यार्थी महाविद्यालयाची पायरीही चढत नाहीत. त्यामुळे त्यांच्या बुद्धिमत्तेचा, क्षमतेचा पुरेपूर वापर होत नाही. शिक्षणात केवळ मर्यादित घटकाला संधी मिळते आहे. प्रगत राष्ट्रातील मुले उच्च शिक्षणात पुढे असल्याने त्यांच्या देशाची प्रगती वेगाने होते. त्यामुळे आपल्या शिक्षण व्यवस्थेने तरुणांना अधिकाधिक संधी दिली पाहिजे. असे झाले तर तरुणांचे लाभलेले सामर्थ्य आणि त्याचा भांडवल म्हणून देशाच्या विकासासाठी सर्वाधिक वापर करता येईल. सर्वच क्षेत्रात आपले तरुण दर्जेदार कामगिरी करत आहेत. मात्र त्यासाठी सर्वांना शिक्षण मिळायला हवे. देशातील सर्वच घटकापर्यंत शिक्षण पोचण्यासाठी एसएफआयच्या माध्यमातून प्रयत्न केला जातो आहे.'

ते पुढे म्हणाले, 'भगतसिंगानी समाजवादी विचारावर आधारलेली सामाजिक व्यवस्था उभा करण्याचे स्वप्न पाहिले होते. समाजाचे परिवर्तन करण्यासाठी न्यायावर आधारलेली समाज व्यवस्था मूर्तरूपात आली पाहिजे. यासाठी येणाऱ्या काळात समाजवादी विचारसरणी उपयोगी ठरेल. शिक्षणाकडे भांडवलदार व्यवसाय म्हणून पाहत आहेत. त्यामुळे शिक्षण भांडवलदारांच्या हातात जाता कामा नये. सरकारचा शिक्षणावरील खर्च अतिशय कमी आहे. जीडीपीच्या सहा टक्के खर्च शिक्षणावर व्हायला हवा मात्र तसे चित्र दिसत नाही. शिक्षणावरील होणाऱ्या खर्चाचे प्रमाण केवळ तीन ते साडेतीन टक्‍क्‍यांच्या आसपास आहे. केंद्र सरकारच्या अजेंड्यावर शिक्षणाला प्राधान्य दिले जात नाही. राज्यातही तसेच चित्र आहे. दिल्ली सरकारने शिक्षणावरील खर्च २५ टक्क्यांपर्यंत नेला आहे. सरकारी शाळांना चांगल्या सुविधा देऊन त्या आदर्शवत केल्या तर शिक्षणाचा दर्जा बदलायला वेळ लागणार नाही.' याप्रसंगी पंकज खोत, नवनाथ मोरे, मोहन जाधव, अतुल फसाले, हरी आवळे, गौरी आंबी, गुरुनाथ चौगुले, प्रभाकर व्हसकोटी, प्रशांत आंबी, हेमंत बन्ने, पंकज खोत, प्रेरणा कवठेकर आदी उपस्थित होते.

अधिवेशनातील मागण्या

शिक्षणाचे बाजारीकरण थांबवा. सरकारमार्फत दर्जेदार शिक्षण द्या .महागाईनुसार शिष्यवृत्तीत वाढ करा. थकित शिष्यवृत्ती चे त्वरित वाटप करा. शिक्षणावर जीडीपीच्या सहा टक्के खर्च करा आणि बेरोजगारी भत्ता द्या. नोकरभरतीवर बंदी उठवा व तीन लाख रिक्त पदे भरा. कर्नाटकच्या धर्तीवर एसटी पास द्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पत्की हॉस्पिटलतर्फे रविवारी बी.ओ.एच कक्षाचे उदघाटन

$
0
0

म. टा.प्रतिनिधी, कोल्हापूर

गरोदरपणामध्ये उद्भवलेल्या गुंतागुंतीमुळे निरोगी अपत्यास जन्म देण्यामध्ये वारंवार अपयश येणे ही गंभीर समस्या बनली आहे. वैद्यकीय शास्त्रामध्ये या समस्येला बी.ओ.एच (बॅड ऑबस्टेट्रिक हिस्टरी) म्हणतात. या समस्येने त्रस्त जोडप्यांवर सखोल संशोधन व अत्याधुनिक उपचार करण्यासाठी देशातील विविध संशोधन केंद्रे व तज्ज्ञांच्या सहकार्याने पत्की हॉस्पिटलमध्ये विशेष कक्ष सुरु होत असल्याची माहिती डॉ. सतीश पत्की यांनी पत्रकार बैठकीत दिली.

रविवारी (ता. १६) सकाळी ११ वाजता हॉटेल सयाजी येथे या विशेष कक्षाचे औपचारिक उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी अंत्यत क्लिष्ट परिस्थितीत पत्की हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार झालेले जोडपी व बालके उपस्थित राहणार आहेत. यामध्ये कोलकत्ता, बेळगाव, गोवासह विविध भागातील जोडपी आहेत. देशस्तरावरील हा वैशिष्ट्यपूर्ण विभाग आणि उपचार सर्वसामान्यांच्या आवाक्यातील असेल. शिवाय बी.ओ.एच समस्यांनी त्रस्त जोडप्यांना सदृढ अपत्यप्राप्तीचा आनंद मिळवून देण्यात मोलाची कामगिरी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डॉ. पत्की हे गेली ३२ वर्षे स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र क्षेत्रात विविध संशोधन प्रकल्पावर काम करत आहेत.

ते पुढे म्हणाले, 'वारंवार नैसर्गिक गर्भपात होणे, गर्भात दोष व व्यंग असणे, गतीमंद मुलांचा जन्म, गर्भाशयाऐवजी गर्भनलिकेमध्ये गर्भधारणा, गरोदरपणच्या पहिल्या दोन किंवा तीन महिन्यामध्येच गर्भ निर्जीव होणे असे सर्व प्रसंग 'बी.ओ.एच.'मध्ये गणले जातात. मातेमधील विविध दोषांप्रमाणेच गर्भामधील दोषांमुळे देखील गरोदरपण नऊ महिन्यापर्यंत यशस्वीरित्या टिकवण्यामध्ये अडथळे येऊ शकतात. पत्नी किंवा पतीच्या गुणसुत्रांमधील दोषांमध्ये गर्भामध्ये गंभीर जनुकीय आजार निर्माण होतात. परिणामी वरचेवर गर्भपात किंवा गतीमंद मूल जन्माला येण्यासारख्या घटना घडू शकतात.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेदगंगा नदीत बुडून मृत्यू

$
0
0

गारगोटी : वेदगंगा नदीच्या घाटावर तोल गेल्याने मडिलगे बुद्रुक (ता. भुदरगड) येथील गोविंद बळवंत बिरंबोळे (वय ७४) यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची वर्दी पोलिस पाटील सुनील गुरव यांनी भुदरगड पोलिसांत दिली. मडिलगे बुद्रुक येथील शेतकरी बिरंबोळे हे जनावरांना चारा आणण्यासाठी वेदगंगा नदीकाठी गेले होते. वैरण काढून हातपाय धुण्यासाठी ते जवळच असलेल्या घाटावर गेले असता त्यांचा पाय घसरून किंवा तोल जाऊन पाण्यात पडल्याने जागीच मृत्यू झाला. भुदरगड पोलिस तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘थेट पाईपलाईनचे नियोजन बदलावे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

काळम्मावाडी धरणातून कोल्हापूरपर्यंत टाकण्यात येणाऱ्या थेट पाइपलाईनचे नियोजन बदलावे, अशी मागणी राधानगरी तालुक्यातील सोळांकूर ग्रामस्थांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली.

निवेदनात म्हटले आहे, थेट पाईपलाइन गावातील मुख्य रस्त्याखालून टाकण्यात येणार आहे. त्यासाठी रस्त्याची खोदाई केल्यास दोन्ही बाजूच्या इमारतींना मोठा धोका पोहचणार आहे. जमिनीखाली असलेली इंटरनेटची केबल तुटणार आहे. म्हणून पाईप लाइन टाकण्याचे नियोजन बदलावे.' निवेदन देताना अनंत पाटील, मसू तोरस्कर, श्रीपती चौगले, प्रकाश शेटे, श्रीनिवास पाटील, विलास पाटील, शामराव मिरजकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इचलकरंजी बसस्थानकातून ६६ हजारांचे दागिने लंपास

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

येथील मध्यवर्ती बसस्थानकातून एस. टी. मधील महिला प्रवाशाच्या पर्समधील ३३ ग्रॅम वजनाचे ६६ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. या प्रकरणी अनुप्रभा अनिल इंगळे (वय २६ रा. कागल) यांनी शिवाजीनगर पोलिसात तक्रार दाखल केली.

फिर्यादी अनुप्रभा इंगळे यांचे सासर चाँदशिरदवाड (ता. चिक्कोडी) हे आहे. नोकरीच्या निमित्ताने त्या पतीसह कागल येथे राहतात. भाड्याच्या घरात राहण्यास असल्याने त्यांनी आपल्याजवळील सोन्याचे दागिने सासू उज्वला इंगळे यांच्याकडे ठेवण्यास दिले. गुरुवारी त्या नातलगाच्या विवाहाच्या निमित्ताने चिपरी येथे जाण्यासाठी येथील मध्यवर्ती बसस्थानकात आल्या. त्यावेळी त्यांनी सासूबाईंना येथेच येण्यास सांगितले होते. त्यांनी आल्यानंतर दागिन्यांचा डबा अनुप्रभा यांच्याकडे दिला. त्यानी तो डबा पर्समध्ये ठेवला. दोघीही सांगलीला जाणार्‍या बसमध्ये (एमएच १२ सीएच ७९५५) बसल्या. त्यावेळी त्यांना पर्सची चेन अर्धवट उघडी असल्याचे निदर्शनास आले. पर्स तपासून पाहिली असता त्यांना दागिन्यांचा डबा नसल्याचे आढळून आले. ही गोष्ट त्यांनी वाहकास सांगून बस थेट शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नेली. तेथे प्रवाशांची तपासणी झाली. पण काहीच सापडले नाही. डब्यामध्ये २३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, साडेतीन ग्रॅम वजनाची अंगठी व ५ ग्रॅम वजनाची सोन्याचा जोंधळा पोत असे ६६ हजारांचे दागिने होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मराठा’ दाखल्यांसाठी प्रतीक्षाच

$
0
0

ऑनलाईन अर्ज नसल्याचा प्रशासनाचा दावा

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

जिल्ह्यात मराठा जातीचे दाखले काढण्यासाठी अजून ऑनलाइन अर्ज आलेले नाहीत. त्यामुळे अद्याप एकही दाखला देण्यात आलेला नाही, असे महसूल प्रशासनाचे म्हणणे आहे. यामुळे मोठ्या संघर्षातून १६ टक्के आरक्षण मिळवूनही जिल्ह्यातील मराठा समाज अजूनही जात दाखल्यासाठीच्या प्रतीक्षेतच आहे. सर्व प्रांताधिकाऱ्यांना दाखला देण्यासंबंधीचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

सरकारने 'एसइबीसी' स्वतंत्र कोट्यातून मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले. त्यानंतर सामाजिक न्याय विभागाने मराठा जातीचा दाखला देण्यासंबंधीचे आदेश दिले. त्यानुसार राज्यभर अंमलबजावणी सुरू आहे. विविध खात्यात नोकर भरतीची प्रक्रिया गतीने होत असल्याने मराठा तरूणांना दाखल्याची आवश्यकता भासत आहे. यामुळे तलाठी, तहसीलदार, प्रांताधिकारी कार्यालयात विचारणा होत आहे. मात्र दाखला मिळवण्यासाठी संबंधितांस महाऑनलाईन किंवा आपले सरकार केंद्रात जाऊन ऑनलाईल अर्ज भरावा लागणार आहे. असे अर्ज दाखल होत नसल्याचा प्रशासनाचा दावा आहे. याउलट सेवा केंद्रांना अर्ज भरून घेण्यासंबंधी महसूल विभागाकडून सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे केंद्रात अर्ज भरून घेत नाहीत, अशा तक्रारी आहेत. परिणामी मराठा समाजाला आरक्षणानंतर आता दाखला मिळवण्यासाठी विविध पातळ्यांवर संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र आहे.

----------

चौकट

घरबसल्या दाखला ...

इंटरनेटची सुविधा असल्यास 'आपले सरकार' पोर्टलवरून घरबसल्याही दाखला काढणे शक्य आहे. https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en या वेबसाईटवर गेल्यानंतर विहित नमुन्यातील अर्ज भरणे, आवश्यक माहिती अपलोड करता येणार आहे. ऑनलाइन अर्जानंतर पुढील कार्यवाही प्रांताधिकाऱ्यांच्या पातळीवर करण्यात येईल. प्रांताधिकाऱ्यांच्या सहीनंतर दाखला संबंधिताच्या ई मेलला येणार आहे.

---------------

कागदपत्रे अशी

दाखल्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे अशी : शाळेचा दाखला (१९६७ पूर्वीचा स्वत:चा, वडील, चुलते, आत्या, आजोबा), रेशन कार्ड झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स, ग्रामसेवक किंवा नगसेवकाचा रहिवासी दाखला, फोटो.

--------

नियमानुसार ३५ रूपयेच

सेवा केंद्रात ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी इतर दाखल्यांइतके म्हणजे ३५ रूपयेच नियमाप्रमाणे आकारणे आवश्यक आहे. यापेक्षा अधिक पैसे घेणाऱ्याविरोधात तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करता येते. संबंधितावर कारवाईसाठी पाठपुरावा करता येतो, असेही जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

-------------

कोट

'मराठा जातीचा दाखला देण्यासंबंधीचे आदेश तालुका महसूल प्रशासनास दिले आहेत. मात्र अजून एकही ऑनलाईन अर्ज दाखल झालेला नाही. यामुळे तो दाखला अजून एकासही देण्यात आलेला नाही.

संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी

--------

कोट

'दाखला काढताना कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. दाखल्यासाठी तालुका पातळीवर विशेष शिबिराचे आयोजन करण्याची मागणी केली आहे. आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठी विलंब होत आहे. यासंबंधी कुणाला अडचण आल्यास सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घ्यावी.

वसंतराव मुळीक, जिल्हाध्यक्ष, मराठा महासंघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन्ही सामने बरोबरीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशन आयोजित केएसए वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धत गुरुवारी दोन्ही लढती बरोबरीत सुटल्या. दिलबहार तालीम मंडळ ब विरुद्ध मंगळवार पेठ फुटबॉल संघातील लढत २-२ तर शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध फुलेवाडी क्रीडा मंडळातील सामना १-१ अशा गोलफरकाने बरोबरीत राहिला. दोन्ही सामन्यांदरम्यान प्रेक्षकांना कडवी लढत पाहावयास मिळाली. छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धा सुरू आहे.

शिवाजी तरुण मंडळ व फुलेवाडी क्रीडा मंडळातील सामना चुरशीचा झाला. प्रारंभापासूनच खेळाडूंनी उत्तम समन्वय राखत खेळ केला. 'शिवाजी' मंडळाकडून सुमित जाधव, संकेत साळोखे, सानू, सुमित घाटगे यांनी आक्रमक खेळ केला. सामन्याच्या ३२ व्या मिनिटाला करण चव्हाणच्या पासवर शुभम साळोखेने सुरेख गोल नोंदवत संघाला आघाडी मिळवून दिली. पूर्वाधात खेळावर शिवाजी तरुण मंडळाने वर्चस्व राखले. उत्तरार्धात फुलेवाडी तरुण मंडळाच्या खेळाडूंनी गोल फेडण्याच्या ईर्ष्येने खेळ केला. 'फुलेवाडी'चे खेळाडू उमेश भगत, रोहित मंडलिक, अबू बकर, रियान यादगिरी व आरबाज यांनी चढाया केल्या. सामन्याच्या ५२ व्या मिनिटाला रोहित मंडलिकच्या पासवर रियान यादगिरीने गोल करत सामन्यात १-१ अशी बरोबरी केली. नंतर दोन्ही संघानी शर्थीने प्रयत्न केले. मात्र कुठलाच संघ उर्वरित वेळेत गोल नोंदवू शकला नाही.

दुपारच्या सत्रात दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध मंगळवार पेठ फुटबॉल क्लबमधील सामना अटीतटीचा झाला. 'मंगळवार पेठ' संघाच्या विकी जाधव, अर्जुन नायक, ओंकार खोत, निलेश खापरेंचा खेळ उठावदार झाला. अक्षय माळीने ३५व्या मिनिटाला गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. मात्र ३९व्या मिनिटाला 'दिलबहार'चा खेळाडू ओंकार शिंदेने गोल करून संघाला बरोबरीत आणले. सामन्यात १-१ गोल झाल्याने रंगत वाढली. दिलबहार संघाकडून शुभम माळी, राकेश परीट, सतेज साळोखे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडविले. ऋषिकेश पाटीलने ५५ व्या मिनिटाला गोल करत दिलबहार संघाची २-१ अशी आघाडी वाढवली. गोल फेडण्यासाठी 'मंगळवार पेठ...' संघाने शर्थीचे प्रयत्न केले. संघाच्या नितीन पोवारने ६३व्या मिनिटाला गोल केल्यामुळे सामन्यात २-२ अशी बरोबरी झाली. दरम्यान शुक्रवार, शनिवारी सामन्यांना सुट्टी आहे. रविवारी (ता. १६) प्रॅक्टिस ब विरुद्ध कोल्हापूर पोलिस यांच्यामध्ये दुपारी सामना होईल.

फुटबॉल सामन्यावेळी

स्टेडियममध्ये मारामारी

कोल्हापूर : येथील छत्रपती शाहू स्टेडियमवर शिवाजी तरुण मंडळ व फुलेवाडी क्रीडा मंडळातील फुटब़ॉल संघातील सामना संपण्यास काही मिनिटांचा अवधी असताना प्रेक्षक गॅलरीतील काही हुल्लडबाजांनी गोंधळ घातला. सहा ते सात तरुणांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली. यामध्ये तो तरुण जखमी झाला. त्यामुळे काही वेळ गोंधळाचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले. जखमी अवस्थेतत्तो तरुण प्रवेशव्दाराकडे धावला. त्याला पकडण्यासाठी अन्य तरुण धावले. अचानक घडलेल्या या घटनेने प्रेक्षकांची पळापळ झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खोतवाडीत यंत्रमाग कामगाराचा खून

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी

इचलकरंजीपासून जवळच असलेल्या खोतवाडी (ता. हातकणंगले) येथे अमोल दिलीप चव्हाण (वय ३० रा. शिंदे मळा) या यंत्रमाग कामगाराचा निर्घृण खून करण्यात आला. ही घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास शिंदे मळा परिसरात घडली. अमोल याच्यावर तब्बल १० ते १५ वार केले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी खोतवाडीतील सख्ख्या भावांना ताब्यात घेतले. रागाने पाहिल्याच्या कारणावरुन अमोलचा काटा काढल्याची त्यांनी कबुली दिली. याप्रकरणी वडील दिलीप गणपती चव्हाण (वय ५२) यांनी शहापूर पोलिसात फिर्याद दिली.

खोतवाडी परिसरातील अयोध्यानगर येथील बंद राइस मिलच्या समोरील रिकाम्या जागेत गुरुवारी एका तरुणाचा रक्ताळलेल्या अवस्थेतील मृतदेह पडला असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती शहापूर पोलिसांना दिली. प्रभारी पोलिस निरीक्षक अरुण पोवार यांनी पथकासह तातडीने धाव घेऊन पाहणी केली. खूनाचे वृत्त समजताच परिसरातील नागरिकांचीही घटनास्थळी गर्दी झाली. पोलिसांनी काही नागरिकांच्या मदतीने मृतदेहाची ओळख पटविली असता तो अमोल चव्हाणचा असल्याची माहिती मिळाली. नंतर अमोलच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली असता वडिलांनी मृतदेह ओळखला. घटनास्थळी अप्पर पोलिस अधिक्षक श्रीनिवास घाडगे, पोलिस उपअधिक्षक गणेश बिरादार यांनी भेट देऊन पाहणी करत तपासाच्या सूचना केल्या. घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र ते घटनास्थळीच घुटमळले.

अमोल हा अविवाहित असून तो शिंदेमळा परिसरातील कारखान्यात यंत्रमाग कामगार होता. बुधवारी सकाळी आठ वाजता तो नेहमीप्रमाणे कामावर गेला. रात्री १० वाजेपर्यंत तो कारखान्यात कामावर असल्याचे पोलिस तपासात समोर आले. अमोल हा मूळचा कराड (जि. सातारा) येथील आहे. मात्र अनेक वर्षांपासून तो कुटुंबासह खोतवाडी येथे वास्तव्यास होता. अमोलचे वडिलही यंत्रमाग कामगार आहेत. या खुनाच्या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली.

उशीरापर्यंत तपास

याप्रकरणी शहापूर पोलिसांनी रात्री उशीरा गावातील दोन सख्ख्या भावांना ताब्यात घेतले. रागाने पाहण्याच्या कारणावरून हा खून त्यांनी केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘गोकुळ’ चा अध्यक्ष काँग्रेसचाच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'गोकुळ' चा अध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना वेग आला आहे. शुक्रवारी सकाळी संघाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक व पी.एन. पाटील हे संचालकांशी चर्चा करणार असून त्याचवेळी नव्या अध्यक्षांचे नाव निश्चित होणार आहे. या पदासाठी काँग्रेसचा शिक्का असलेला संचालक निवडण्यात येण्याची शक्यता असून रवींद्र आपटे व अरूण डोंगळे यांची नावे सध्या आघाडीवर आहेत.

साडेतीन वर्षानंतरही 'गोकुळ'चे अध्यक्ष विश्वास नारायण पाटील यांना न बदलल्याने काही संचालकांत नाराजी आहे. अनेक संचालकांनी याबाबत नेत्यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली. पाटील यांना बदलायचे आहे, पण दोन्ही नेत्यांना मान्य होईल असा संचालक नसल्याने बदल लांबणीवर पडत आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदल करण्याच्या हालचालींना ब्रेक लागत आहे. पण याबाबत संचालकांच्या भावना तीव्र आहेत. यामुळे बदल करण्याच्या मनस्थितीत नेते असल्याचे समजते.

'गोकुळ' वर काँग्रेसची सत्ता आहे. पण संचालक अनेक पक्षांचे आहेत. संघात राष्ट्रवादी, भाजप व शिवसेनेचेही संचालक असल्याने काँग्रेसचाच अध्यक्ष करण्याचा आग्रह पी. एन. यांच्याकडून होणार यात शंका नाही. सध्या डोंगळे, आपटे व रणजितसिंह पाटील इच्छुक आहेत. विद्यमान अध्यक्ष हे दोन्ही नेत्यांना मान्य होणारे होते. पण जी नावे चर्चेत आहेत, त्यांच्यात सर्वमान्य नाव नाही. तरीही रणजितसिंह पाटील भाजपचे असल्याने काँग्रेसचा अध्यक्ष या मुद्यावर आपटे अथवा डोंगळे यांचे नाव पुढे येण्याची शक्यता आहे. त्यावर एकमत न झाल्यास नव्या चेहऱ्याला देखील संधी देण्याचा निर्णय दोन्ही नेते घेऊ शकतात. यामध्ये धैर्यशील देसाई व दीपक पाटील यांची नावे चर्चेत आहेत. याबाबत शुक्रवारी सकाळी संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात दोन्ही नेते सर्व संचालकांशी चर्चा करणार आहेत. दुपारी संचालक मंडळाची बैठक होणार असल्याने तत्पूर्वी बदलाचा निर्णय जाहीर केला जाणार असल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्याचे दर्शन

$
0
0

महिपाळगड परिसरात

बिबट्याचे दर्शन

म. टा. वृत्तसेवा, चंदगड

गेल्या वीस दिवसापासून शेतकऱ्यांना सतत दर्शन देणाऱ्या बिबट्याचा निवास आता महिपाळगड (ता. चंदगड) परिसरात असल्याचे स्पष्ट झाले आहे. वनविभागाने या बिबट्याला फटाक्यांचा आवाज करून जंगलात पिटाळले असले तरीही शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण आहे.

दोन दिवसांपूर्वी मांडेदुर्ग येथील शेतकरी जानबा पाटील, उषा राजू पाटील हे सुंडी मार्गावरील कुमरी या शेताकडे जात होते. यावेळी एका विहीरीजवळ मोठ्या दगडावर बसलेल्या बिबट्याचे दर्शन झाले. याच परिसरात आठ दिवसांपूर्वी तुकाराम पाटीत व गणू पाटील या शेतकऱ्यांनाही रात्री बिबट्याचे दर्शन झाले होते. ही माहिती पाटणे विभागाचे वनपाल अमोल शिंदे, वनरक्षक संग्राम जितकर, मोहन तुतारे यांनी परिसराला भेट देऊन फटाके फोडून बिबट्याला जंगलाच्या दिशेने पिटाळले. सध्या परिसरात बिबट्यासाठी योग्य खाद्य मिळत नसल्याने तो मानवी वस्तीकडे येण्याची शक्यता आहे. या बिबट्याला पकडून त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृष्णकुमारने मारले वारणेचे मैदान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा वारणानगर

सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या चोविसाव्या स्मृतिदिनी, गुरुवारी झालेल्या राष्ट्रीय कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या अत्यंत चुरशीच्या लढतीत सोनिपत आखाड्याचा पैलवान, गतविजेत्या कृष्णकुमारने अखेरच्या क्षणी पाचव्या मिनिटांना दोन गुणांची आघाडी घेत रोहतक आखाड्याचा पैलवान सोमवीर याच्यावर मात करत जनसुराज्य शक्ती श्री केसरीचा किताब पटकावला. तब्बल अर्धा तास एकमेकांवर डाव-प्रतिडावाने मैदानात रंगत आली. कृष्णकुमारला जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक, माजी मंत्री विनय कोरे यांच्या हस्ते जनसुराज्य शक्ती श्री केसरी किताब प्रदान करण्यात आला.

लक्षवेधी ठरलेल्या पहिल्या क्रमांकाच्या कुस्तीत पैलवान सोमवीर यानेही डाव-प्रतिडाव रंगला. मात्र अखेरच्या क्षणी दोन गुणांची आघाडी घेत पैलवान कृष्णकुमारने बाजी मारली. कृष्णकुमार आणि पैलवान सोमवीर यांच्यात खडाखडी झाली. सुमारे अर्धा तास डाव-प्रतिडावांची जुगलबंदी रंगली. तरीही निकालाचे चिन्ह दिसत नसल्याने पंचांनी दोघांना पाच मिनिटांचा अवधी दिला. कृष्णकुमारने गुणांची आघाडी घेत मैदान मारले. या कुस्तीसाठी पंच म्हणून संभाजी वरुटे यांनी काम पाहिले

दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत पैलवान गुरुप्रीत गौरवने एकलांगी डावावर एकेरी पट काढत दिल्लीच्या विक्रम कटियारवर विजय मिळवत वारणा साखर केसरी किताब पटकावला. वारणा शक्ती श्री कुस्ती महासंग्रामात नामवंत मल्लांच्या प्रमुख ३५ कुस्त्यांसह ३०० चटकदार कुस्त्या रंगल्या.

सायंकाळी पाचच्या सुमारास प्रमुख कुस्त्यांना सुरुवात झाली. सुरुवातीला मैदानाचे पूजन वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष भाऊसाहेब गुळवणी, वारणा कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील यांच्या हस्ते झाले. दुसऱ्या क्रमांकाची वारणा साखर शक्ती किताबाची लढत मचवाड्याचा पैलवान गुरुप्रीत गौरव आणि हनुमान आखाड्याचा पैलवान नाशिक कुरेशी यांच्यात झाली. नासिर कुरेशीने घिस्सा डावावर गुरुप्रीत गौरवला आस्मान दाखवत वारणा साखर शक्ती श्रीचा किताब पटकावला.

वारणा समूहाचे नेते विनय कोरे यांचे पुत्र ज्योतिरादित्य याने ज्युनियर राष्ट्रीय विजेता सोनिपतचा पैलवान रवींद्र कुमार याच्याशी पहिल्याच प्रयत्नात चांगलीच झुंज दिली. सुमारे अर्धा तास चाललेल्या खडाखडीत ज्योतिरादित्य यांनी हे मैदान जिंकले. दूध साखर वाहतूक संस्थेमार्फत पुरस्कृत केलेली पै. नरसिंग यादव विरुद्ध हरियाणा केसरी सोनिपतचा पैलवान अमितकुमार यांच्यात झालेल्या कुस्तीत सिंगल नेल्सन डावावर नरसिंग यादवने विजय मिळवला.

महान भारत केसरी गंगावेस पैलवान माऊली जमदाडे आणि हरियाणा केसरी पैलवान दुष्यंत दलाल यांच्यातील लढतीत माऊलीने बँक थ्रो डावावर विजय मिळवला. पुण्याचा पैलवान बाला रफिक शेख आणि पैलवान सतनाम यांच्यातील अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या लढतीत बाला रफिकने दुहेरी पटाचा डाव टाकत सतनामला चितपट केले. पैलवान समाधान पाटील आणि पैलवान बाबर यांच्यातील लढतीत समाधान पाटीलने घिस्सा डावावर विजय मिळवला. शिवछत्रपती अवॉर्ड विजेता पैलवान कौतुक डाफळे विरुद्ध रोहतकचा पैलवान आशू यांच्यात जोरदार लढत झाली. या लढतीत कौतुक डाफळे मोळी डावावर विजयी झाला. दावणगिरीचा पै. कार्तिक काटे आणि तानाजी झुंजूरके यांच्यातील लढतीत तानाजी झुंझुरकेने गुणावर विजय मिळवला.

भारत मदने आणि पैलवान रामेश्वर यांच्यात झालेल्या लढतीत भारत मदने निकाली डावावर विजयी झाला. तर विलास डोईफोडे आणि विजय गुटाळ यांच्यात झालेल्या लढतीत डोईफोडेने गुणांवर विजय मिळवला. मोहित मलिक आणि सिकंदर शेख यांच्या लढतीत सिकंदर शेखने मलिकला अस्मान दाखवले. रोहित कुमार आणि निलेश लोखंडे यांच्या लढतीत निलेश लोखंडे जखमी झाल्यामुळे रोहितकुमारला विजयी घोषित करण्यात आले. उपमहाराष्ट्र केसरी संग्राम पाटील विरुद्ध मोहित धनकट यांच्यातील लढतीत संग्राम पाटील एकचाक डावावर विजयी झाला.

पन्हाळा तालुक्यातील देवठाणेचे पैलवान मारुती पाटील आणि शाहूवाडी तालुक्यातील शिवारेचे दामाजी पाटील तसेच बादेवाडीचे दिवंगत पैलवान निलेश केंदूरकर यांना मरणोत्तर कुस्तीभूषण पुरस्कार देण्यात आला. मैदानात संतोष सुतार, कौतुक डाफळे, सिकंदर शेख, समाधान पाटील, बाला रफिक, बाबर या पैलवानांची उत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड झाली. सामनावीर म्हणून भारत मदने याला एकवीस हजारांचे बक्षिस देण्यात आले. त्यांचा सत्कार विनय कोरे यांच्या हस्ते आणि युवा नेते विश्वेश कोरे यांच्या उपस्थितीत झाला. ध्यानचंद पुरस्कार विजेते पैलवान दादू चौगुले आणि शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त राष्ट्रीय पंच संभाजी वरुटे यांचा सत्कार करण्यात आला.

या कुस्ती मैदानाला प्रसिद्ध कलाकार राणादा तथा हार्दिक जोशी उपस्थित होते. समित कदम, विश्वेश कोरे, राजू आवळे, संभाजी पाटील, प्रतापराव पाटील, विशांत महापुरे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नववी पास तरीही गर्भलिंग निदान!

$
0
0

सातारा :

कोणत्याही स्वरुपाची वैद्यकीय पदवी नसताना बेकायदा गर्भलिंग तपासणी व मशीन बाळगून पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी नाथा खाडे याच्यावर न्यायालयात गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी जिल्हा वैद्यकीय अधीक्षकांना दिले आहेत.

केवळ नववी पास असूनही डॉक्टरच्या थाटात खुलेआम गर्भवती महिलांचे गर्भलिंग निदान करणाऱ्या नाथा सहदेव खाडे (रा. पिंपरी, ता. माण) याला सातारा स्थानिक गुन्हे शाखेने मुद्देमालासह पकडले. पोलीस तपासामध्ये नाथा खाडे हा मोटारसायकलवर गर्भलिंग मशीन घेऊन गावोगावी फिरत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला तक्रारदारच मिळत नव्हते. म्हणून त्याच्यावर गुन्हाच दाखल होऊ शकला नाही. त्यामुळे नाईलाजस्व त्याला सोडून देण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी पंचनाम्यासाठी तातडीने जप्त केलेली मशीन औंध ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली. त्यांनी ते मशीन घेतले; मात्र जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र पाठवून पोलिसांनी हे मशीन दबाव टाकून माझ्याकडे दिल्याचे कळवले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना अपेक्षित असलेला अहवाल दिला. मात्र, गुन्हा कोणी दाखल करायचा, यावरून पोलीस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यामध्ये तू तू-मैं मैं झाली. अखेर आरोग्यमंत्र्यांनी याप्रकरणात लक्ष घातल्यानंतर जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना नाथा खाडेवर पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

एलसीबी मशीनची माहिती कशी देणार

जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिलेल्या आदेशामध्ये म्हटले आहे की, नाथा खाडे याने मशीन कोठून आणले, ते कोणाकडून खरेदी केले, त्याअगोदर ती कोणाकडे होती, तसेच या मशीनद्वारे गर्भलिंग निदान केले आहे काय? याबाबतचा अहवाल स्थानिक गुन्हे शाखेककडून प्राप्त करून घ्यावा. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेने नाथाला अटकच न केल्याने त्याच्याकडे पुरेशी चौकशीच झाली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

rafael deal : बोफोर्सप्रमाणे राफेलचा निर्णयही जनतेच्या न्यायालयात होईल: राऊत

$
0
0

पंढरपूर ( सुनील दिवाण ):

राफेल घोटाळ्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देण्यास नकार दिला हे योग्यच केले असून बोफोर्सप्रमाणे राफेलचा निर्णय देखील जनतेच्याच न्यायालयात होईल, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली. राफेलवरून राहुल गांधी यांनी तीन राज्यात वादळ निर्माण केले होते, त्यामुळेही भाजपचा या तीन राज्यात सपाटून पराभव झाल्याचंही ते म्हणाले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यानी ही टीका केली. तीन राज्याच्या विजयानंतरही राहुल गांधी यांनी ईव्हीएम मशीनवर प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. जगभर या मशीन हद्दपार केल्या असताना आणि भाजप सोडून सर्वच पक्ष याला विरोध करीत असताना याचा वापर करायचा की नाही याचा निर्णय निवडणूक आयोगाने घ्यावा, असे आवाहन राऊत यांनी केलं.

ज्या पद्धतीने राफेलचा निर्णय देण्यात सर्वोच्च न्यायालयाने असमर्थता दाखवली. त्याच पद्धतीने राम मंदिराच्या बाबतीत न्यायालय निर्णय घेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कायदे करणारे सभागृह आहे आणि सभागृहातील कायद्यांची अमंलबजावणी करण्याचे काम न्यायालयाचे असताना प्रत्येक गोष्टीत न्यायालय टांग का आडवतंय? असा सवालही राऊत यांनी केला. राहुल गांधींनी हिंदू कार्डचा वापर करत मंदिरांना भेटी दिल्या त्यामुळे तीन राज्याच्या निवडणुकीत भाजपचा मोठा मतदार काँग्रेसकडे वळला आहे, असं सांगतानाच आम्ही राहुल यांना अयोध्येत येऊन रामलल्लाचे दर्शन घेण्याचे आवाहन केल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं. अयोध्येसाठी पंढरपूर येथून उद्धव ठाकरे २४ डिसेंबरला रणशिंग फुंकणार असून पंढरपूर हे कोट्यवधी गोरगरीब, मजूर, शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे आराध्य दैवत असल्याने पंढरपूरची निवड केल्याचे ते म्हणाले.

यावेळी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी फरार उद्योगपती विजय मल्ल्याबाबत केलेल्या वक्तव्यावर विचारण्यात आले. तेव्हा गडकरी आजारी असल्याने त्यांना मल्ल्याच्या कर्जाचे आकडे ठाऊक नसतील. त्यामुळे त्यांनी मल्ल्याला क्लीनचिट दिली असावी, असा टोला राऊत यांनी लगावला. यावेळी खासदार विनायक राऊत आणि शिवाजी सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images