Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

जुगार अड्ड्यावर छापा, तिघे ताब्यात

$
0
0

हातकणंगले : हुपरी (ता. हातकणंगले) येथील गणेशमाळ वसाहतीत सुरू असलेल्या तीनपानी जुगारअड्ड्यावर शनिवारी हुपरी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात सहाजणांना मुद्देमालासह ताब्यात घेतले. सुनील रामचंद्र कडाकणे, अशोक अण्णा गाट, किरण श्रीकांत शिंगाडे, राहुल सुभाष शिरदवाडे (सर्व रा. गणेशमाळ, हुपरी), विलास शिवराम सुतार (रा.यशवंतनगर, हुपरी) व नरसू पांडुरंग माळी आदींचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आल्याची शंभरीकडे धाव

$
0
0

लोगो : साप्ताहिक बाजारभाव

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

फळ व पालेभाज्यांचे दर थोडे उतरले असून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आले महाग झाले आहे. आल्याच्या दरात प्रतिकिलो २० रुपयांनी वाढ झाली असून, प्रतिकिलोचा दर १०० रुपयांवर गेला आहे. कोथिंबीर, मेथीच्या दरात थोडी घसरण झाली असून वांगी, पावट्याचा दर प्रतिकिलो ८० रुपयांवर स्थिर होता.

बाकरवडीसाठी आल्याचा वापर केला जातो. त्यामुळे आल्याची आवक कमी झाली असता मागणी वाढल्याने दर प्रतिकिलो ८० रुपयांवरून १०० रुपयांवर पोहोचला आहे. रविवारी दिवाळीचा प्रारंभ वसुबारसने झाला. वसुबारसदिनी गवारीची भाजी केली जाते. त्यामुळे बाजारात गवारीची ग्राहकांकडून खरेदी झाली. गवारीचा दर प्रतिकिलो ६० ते ८० रुपये होता.

गेल्या आठवड्यात मटारचा दर १२० रुपये किलो होता. रविवारी तो १०० रुपयांपर्यंत खाली आला. मेथी आणि कोथिंबिरीची आवक झाल्याने दोन्हीचे दर आवाक्यात आहेत. मेथीच्या पेंढीचा दर २० रुपयांवरून १० रुपयांपर्यंत खाली आला. शेपू व कांदा पातीचा दर १५ रुपयांवर स्थिर आहे. पालक आणि पोकळ्याच्या पेंढीचा दर १० रुपये आहे. वांगी व पावट्याचा दर प्रतिकिलो ८० रुपये, भेंडी, दोडका, कारली यांचा दर प्रतिकिलो ४० रुपयांपर्यंत स्थिर राहिला. कांद्याची आवक वाढल्याने १५ ते २४ रुपये किलो दराने विक्री झाली. कोबी प्रतिगड्डा १०, तर फ्लॉवर १५ ते ३० रुपये होता.

फळांमध्ये संत्री, मोसंबी, बोरांचे आगमन झाले आहे. संत्री व मोसंबीचा दर ३० ते १०० रुपये किलो, तर बोरांचा ५० रुपये आहे. चिकूचा दर २० ते ६० रुपये प्रतिकिलो आहे.

००००

फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो रु.)

वांगी ८०

टोमॅटो १०

भेंडी ४०

ढबू ४०

गवार ६० ते ८०

दोडका ४०

कारली ४०

वरणा ६० ते ८०

ओली मिरची ४०

बटाटा २५ ते ३०

लसूण ३०

कांदा १५ ते २५

फ्लॉवर १५ ते ३० रुपये गड्डा

कोबी १० रुपये गड्डा

०००

पालेभाजी दर (पेंढी रु.)

मेथी १०

कांदा पात १५

कोथिंबीर १० ते २०

पोकळा १०

पालक १०

शेपू १५

०००

फळांचे दर (प्रतिकिलो रु.)

सफरंचद ६० ते २००

डाळिंब ४० ते ८०

सीताफळ ४० ते ८०

केळी २० ते ६० (डझन)

जवारी केळी ३० ते ७० (डझन)

संत्री ३० ते १००

मोसंबी ३० ते १००

०००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौर निवडीचे घड्याळ कोणाच्या हाती?

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

महानगरपालिकेच्या विद्यमान महापौर शोभा बोंद्रे यांचा सहा महिन्यांचा कार्यकाळ २५ नोव्हेंबर रोजी संपणार असल्याने राष्ट्रवादीमधील इच्छुकांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली. आगामी एक वर्षासाठी महापौरपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात राहणार असल्याने आणि इच्छुकांची संख्या जास्त असल्याने कोणाला संधी मिळणार? याबाबत उत्सुकता आहे. महापौरपदासाठी नगरसेविका अॅड. सूरमंजिरी लाटकर, सरिता मोरे, मेघा पाटील, माधवी गवंडी आणि अनुराधा खेडकर यांची नावे आघाडीवर आहेत.

महापालिकेतील आघाडीच्या सत्तेच्या फॉर्म्युल्यानुसार पुढील एक वर्ष महापौरपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहिल. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या समझोत्यानुसार महापौर बोंद्रे या २५ नोव्हेंबरपूर्वी राजीनामा देतील, असा अंदाज बांधत राष्ट्रवादी काँग्रेसमधील इच्छुकांनी नेत्यांकडे मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. पक्षात इच्छुकांची संख्या जास्त असल्याने सहा-सहा महिन्यांचा कालावधीसाठी पदाची विभागणी करायची किंवा त्यापेक्षा कमी कालावधी देऊन जास्त जणांना संधी द्यायची असा पेच पक्ष नेतृत्वापुढे निर्माण झाला आहे.

पदासाठी इच्छुक असलेल्यांमध्ये माजी नगरसेवक सरिता मोरे यांचे नाव आघाडीवर आहे. राष्ट्रवादी व जनसुराज्य शक्ती पक्षाची महापालिकेत सत्ता असल्यापासून माजी नगरसेवक नंदकुमार मोरे हे पत्नी सरिता यांच्यासाठी आग्रही आहेत. संधी असूनही त्यांना महापौरपदाने हुलकावणी दिली. आमदार हसन मुश्रीफ यांच्याशी थेट संबंध असूनही मोरे यांनी समर्थकांसह त्यांची भेट घेऊन आपली दावेदारी सिद्ध केली आहे. अॅड. सूरमंजिरी लाटकर यांची ओळख सभागृहातील अभ्यासू नगरसेविका म्हणून आहे. पक्षाचे प्रमुख नेते, आमदार मुश्रीफ यांचे शहरातील विश्वासू कार्यकर्ते म्हणून राजेश लाटकर परिचीत आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत मोरे व अॅड. लाटकर यांची नावे सर्वात आघाडीवर आहेत. तर राधानगरी विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार के. पी. पाटील आणि जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्यात समेट घडवून आणण्यासाठी ऐनवेळी ए. वाय. पाटील यांच्या स्नूषा मेघा पाटील यांचेही नाव पुढे येण्याची शक्यता आहे. 'स्थायी'मध्ये झालेल्या पराभवामुळे त्यांना नेत्यांची सहानुभूती मिळू शकते. याचबरोबर वर्षभराचा कालावधी असल्याने माधवी गवंडी आणि अनुराधा खेडकर यांनीही विविध माध्यमांतून आपले नाव नेत्यांपर्यंत पोहोचवले आहे.

कोट

विद्यमान महापौरांचा कार्यकाळ संपण्यास अद्याप अवधी आहे. पदाबाबत अद्याप पक्षीय पातळीवर चर्चा झालेली नाही. दिवाळीनंतर याबाबत निर्णय घेऊ.

- हसन मुश्रीफ, आमदार

...........................

चौकट

महापालिकेतील पक्षीय बलाबल

काँग्रेस : २९

राष्ट्रवादी : १५

ताराराणा आघाडी : १९

भाजप : १४

शिवसेना : ४

एकूण : ८१

...............................

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोग्याची जबाबदारी घ्या

$
0
0

फोटो आहे

कोल्हापूर टाइम्स टीम

शहरात दिवसेंदिवस डेंगी व स्वाइन फ्लूचा विळखा घट्ट होत आहे. महापालिकेचा आरोग्य विभाग रोगाचा फैलाव रोखण्यास अपयशी ठरत असल्याने या रोगांमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे. जिल्ह्याभरातून रुग्णांची संख्या वाढत असल्याचा परिणाम सीपीआर रुग्णालयावर पडत आहे. हा ताण कमी करण्यासाठी महापालिकेचे दवाखाने व वॉर्ड दवाखाने यंत्रसामुग्रीसह सुसज्ज ठेवा, अशी सूचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी आयुक्त डॉ. अभिजित चौधरींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आरोग्याधिकाऱ्यांना केल्या.

यावेळी बोलातना आमदार क्षीरसागर म्हणाले, 'शहरातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी महापालिकेची असताना साथीच्या रोगांना अटकाव करण्यासाठी कोणते प्रयत्न केले. अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी कोणती यंत्रणा तयार ठेवली आहे, झूम प्रकल्प बंद असताना कंपनीला प्रशासन पाठीशी का घालते. मुंबई, पुणे येथील महापालिका प्रशासनाने स्थानिक आरोग्य सेवा सुसज्ज ठेवली असताना कोल्हापूर शहरात दुर्लक्ष का केले जाते, अशी प्रश्नाची सरबत्ती केली. महापालिकेच्या पंचगंगा, सावित्रीबाई फुले, आयसोलेशन दवाखान्यामध्ये रुग्णांना उपचार मिळत नसल्याने त्यांनी सर्वच रुग्णालयांकडे पाठ फिरवली आहे. या रुग्णालयाकडून सेवा देण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये जादा तरतूद करण्याबरोबर सामाजिक संस्थांकडून निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. पण प्रशासनाचे प्रयत्न झाले पाहिजेत.

'आरोग्य विभागाच्या समस्यांबाबत कर्मचाऱ्यांच्या काही तक्रारी होत्या. यापैकी ४० कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे. आरोग्य विभागाबाबत आलेल्या सूचनाबाबत सुधारणा करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहील,' अशी ग्वाही आयुक्त डॉ. चौधरी यांनी दिली.

यावेळी माजी उपमहापौर रविकिरण इंगवले, उदय पोवार, किशोर घाटगे, विशाल देवकुळे,पद्माकर कापसे यांनी मते मांडली. बैठकीस आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील, परिवहन सभापती राहुल चव्हाण, दीपक गौड, जयवंत हारुगले, रमेश खाडे, धनाजी दळवी, तुकाराम साळोखे, अजित गायकवाड, रघुनाथ टिपुगडे, राजू पाटील, अनिल पाटील, विशाल देवकुळे, अश्विन शेळके, निलेश हंकारे, मंदार तपकिरे, गजानन भुर्के आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घराला मिळणार कलात्मक लूक

$
0
0

मटा कल्चर क्लबच्यावतीने कार्यशाळा

कोल्हापूर टाइम्स टीम

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे आयोजित कार्यशाळेत दिवाळीनिमित्त घरातील बाह्य आणि अंतर्गंत कलात्मक सजावटीच्या खास टीप्स देण्यात आल्या. प्रशिक्षिका आरती जोशी यांनी टीप्स शिकवल्या. महिलांना धडे दिल्या. राजारामपुरी दुसऱ्या गल्लीतील कलर १४ आर्ट गॅलरीत कार्यशाळा झाली.

वर्षातील सर्वात महत्त्वाचा समजल्या जाणाऱ्या दिवाळीत घराघरात आकर्षक, लक्षवेधी सजावट केली जाते. घर, परिसरातील वातावरण प्रसन्न, उत्साही ठेवण्यासाठी प्रत्येकांची धडपड सुरू असते. दिव्यांची आरास, रांगोळी, रंगी, बेरंगी दिवे, फुले, दीपमाळा वापरून कलात्मक लूक दिला जातो. यासंबंधी शास्त्रशुद्ध माहिती आणि मार्गदर्शन देण्यात आले. फ्लोटिंग लँप, हँगिंग पणत्या अशा विविध सजावटीच्या कलाप्रकारांचे धडे देण्यात आले. वेगवेगळे आकार, रंगांच्या पणत्या करण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. दिवाळीत प्रशिक्षण मिळाल्याने महिलांना सजावटीसाठी चांगला फायदा झाला. या कार्यशाळेत महिला, युवती मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंकाळ्याजवळ पाइपलाइन फुटली

$
0
0

ए, बी व ई वॉर्डातील पाणीपुरवठा सुरळीत

फोटो आहे

कोल्हापूर टाइम्स टीम

शहरात पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर झाला असताना, शनिवारी हरीओम नगरकडे जाणाऱ्या सहा इंच पाइपलाइनला गळती लागली. परिणामी या भागाला रात्री होणारा पाणीपुरवठा बंद झाला. रविवारी सकाळी गळती काढण्यास सुरुवात झाली. दरम्यान गेल्या आठवड्यापासून एक दिवसा आड सुरू असलेल्या ए, बी व ई वॉर्डातील पाणीपुरवठा आजपासून नियमित सुरू झाला.

शहरात गेल्या तीन महिन्यापासून पाणीपुरवठ्याचा बोजवारा उडाला आहे. जलवाहिनीला ठिकठिकाणी लागलेली गळती अन् नियोजनाअभावी पाणीपुरवठ्याचा बोजवारा उडाला. गळती काढण्याचे काम ठिकठिकाणी सुरू असताना शनिवारी सायंकाळी पुन्हा डी मार्ट समोरच्या सहा इंचाची पाइपलाइन गळती लागली. एक गळती काढत असताना दुसरीकडे गळती लागत असल्याने पाणीपुरवठा विभागाची दिवसेंदिवस डोकेदुखी वाढत आहे.

स्थानिक नागरिकांनी पाइपलाइन फुटल्याची माहिती दिल्यानंतर रात्री अधिकाऱ्यांनी फुटलेल्या पाइपलाइनची पाहणी केली. मात्र रात्री उशीर झाल्याने रविवारी सकाळपासून गळती काढण्यास सुरुवात केली. रात्रीपर्यंत गळतीचे काम पूर्ण होणार असल्याने विभागाच्यावतीने सांगण्यात आले. दरम्यान पाइपलाइन फुटल्याने हरीओमनगरचा पाणीपुरवठा शनिवारपासून बंद ठेवावा लागला.

शिंगणापूर पंपिंग स्टेशनमधील ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने गेल्या आठवड्यापासून ए, बी व ई वॉर्डाच्या निम्म्या भागाला एक दिवसा आड पाणीपुरवठा सुरू होता. गुरुवारी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवला असला, तरी जोडण्यास दोन दिवसांचा आवधी लागल्याने अनेक भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला होता. शनिवारी ट्रान्सफॉर्मर जोडण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर रविवार पहाटेपासून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धनंजय खासदार तर अमल मंत्री

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

'चांगले काम करणाऱ्यांच्या पाठिशी जनता कायम राहते. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत धनंजय महाडिकच खासदार असतील तर अमल महाडिक आमदार म्हणून निवडून आल्यावर मंत्री होतील,' असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. सदरबाजार येथे सोसायटी हॉलच्या नूतनीकरण कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, स्थायी समिती सभापती आशिष ढवळे यावेळी उपस्थित होते. 'सदर बाजार परिसरात ज्येष्ठ नागरिकांना विरुंगळा केंद्र उभारण्यात येईल,' अशी घोषणा पालकमंत्र्यांनी केली.

दरम्यान, पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम झाले. सदरबाजार येथे हॉल नूतनीकरण, अयोद्ध्या हॉटेल येथे गरीब मुलींना फराळ व नवीन कपडे वाटपाचा कार्यक्रम झाला.

यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, 'मुलींच्या शिक्षणाला अधिक महत्व देऊन त्यांना शिक्षित आणि संस्कारित बनविणे काळाची गरज आहे. आर्थिक परिस्थितीअभावी मुलगी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये, मुलींची शिक्षण घेण्याची इच्छा असेत तर त्यांना शिक्षणासाठी मदत केली जाईल. महिलांनी देश चालवण्यासाठी पुढे आले पाहिजे. पंतप्रधान इंदिरा गांधी, राजमाता विजयाराजे शिंदे, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे, माजी मुख्यमंत्री मायावती या महिलांनी कर्तृत्व सिद्ध केले आहे. कोल्हापुरातील नेमबाजपटू तेजस्विनी सावंत, कुस्ती खेळाडू रेश्मा माने आर्थिक परिस्थितीवर मात करत आंतरराष्ट्रीय स्तरावर कोल्हापूरचे नाव जगाच्या नकाशावर नेत आहेत. कर्तृत्ववान महिलांचा आदर्श घेऊन मुलींनी करिअर करावे. यापुढे दहावीनंतर शिक्षण घेणाऱ्या मुली व खेळाडूंना सर्वोतोपरी मदत केली जाईल.'

नगरसेविका स्मिता माने यांनी स्वागत केले. नगरसेवक विजय सूर्यवंशी, सत्यजित कदम, नगरसेविका स्मिता माने, संदीप देसाई, मंथन फाउंडेशनचे अध्यक्ष मारुती माने, माजी महापौर सुनील कदम, 'पणन'चे विशेष लेखा परिक्षक बाळासाहेब यादव, विद्या प्रबोधिनीचे अध्यक्ष राहुल चिकोडे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक विजय जाधव आदी उपस्थित होते.

मोफत फराळ वाटप

महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टच्यावतीने शहरातील ६०० गरीब, गरजू कुटुंबांना प्रत्येकी चार किलो मोफत फराळाचे वाटप पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. महालक्ष्मी अन्नछत्राच्या सर्व उपक्रमांचे कौतुक करताना पालकमंत्र्यांनी, 'यापुढे सर्व उपक्रमांना मदत केली जाईल,' असे आश्वासन दिले. महापौर शोभा बोंद्रे, स्थायी समिती सभापती अशिष ढवळे आदी उपस्थित होते. ट्रस्टचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी स्वागत केले तर एस. के. कुलकर्णी यांनी आभार मानले. नंदकुमार मराठे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारखाने सुरू करा, अडचणी सोडवू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ऊसदरप्रश्नी जिल्ह्यातील बंद असलेले साखर कारखाने सुरू करावेत, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी साखर कारखानदारांना करतानाच एफआरपीबाबत कारखान्यांना येणाऱ्या अडचणी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालू, असे आश्वासन दिले. रविवारी दुपारी साखर कारखानदारांच्या शिष्टमंडळाने सरकारी विश्रामगृहावर पालकमंत्र्यांची भेट घेतली, यावेळी ते बोलत होते.

मात्र, मुख्यमंत्र्यांनी एफआरपी देण्याबाबत मदतीचे आश्वासन दिल्यानंतरच कारखाने सुरू करू, अन्यथा बंदच ठेवू, असा पवित्रा कारखानदारांनी घेतला आहे. त्यामुळे शनिवारपर्यंत कारखाने बंदच राहणार आहेत.

साखर कारखाने सुरू करण्यासंदर्भात शनिवारी (ता.३) कारखानदारांची बैठक झाली. बैठकीतील निर्णयांची माहिती देण्यासाठी रविवारी कारखानदारांनी पालकमंत्री पाटील यांची भेट घेतली. यावेळी एफआरपी देण्याबाबत येणाऱ्या अडचणींबाबत पालकमंत्र्यांसमवेत अर्धा तास बैठक झाली. बाजारपेठेतील साखरेच्या दरानुसार बँका कारखान्यांना कर्ज देणार आहेत. पूर्वहंगामी कर्ज, अन्य कर्जांचे हप्ते वजा करून बँका कारखान्यांना किती उचल देणार हे माहीत नाही. कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीनुसार एकरकमी दर देण्याचा कायदा केला आहे; पण बँकांकडून मिळणारी उचल आणि एफआरपीची रक्कम यामध्ये कारखानानिहाय ४०० ते ६०० रुपयांचा फरक पडत आहे. त्यामुळे एफआरपीची रक्कम कशी द्यायची, असा कारखानदारांपुढे प्रश्न उभा आहे. साखरेचे घसरलेले दर, एकरकमी एफआरपी आणि बँकांकडून मिळणारे कर्ज यामुळे एफआरपी देणे अशक्य आहे. त्यामुळे सरकारने एफआरपी देण्यासाठी मदत करावी, अशी मागणी कारखानदारांकडून करण्यात आली.

यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, 'कारखानदारांनी एफआरपीप्रमाणे एकरकमी दर देणे बंधनकारक आहे. गेली चार वर्षे सरकार मदत करत आहे. यावर्षीही कारखानदारांना मदत केली जाईल. बंद ठेवलेले कारखाने सुरू करावेत. कारखानदारांना एफआरपी देण्याबाबतच्या अडचणींची माहिती मुख्यमंत्र्यांना सांगण्यात येईल. सरकार ऊस उत्पादकांना चांगला दर मिळावा या मताचे आहे.'

कारखानदारांच्या शिष्टमंडळात आमदार हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके, शाहू कारखान्याचे अध्यक्ष समरजित घाटगे, दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, मंडलिक कारखान्याचे अध्यक्ष प्रा. संजय मंडलिक यांच्यासह कारखानदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ऊसदराचा चेंडू सरकारच्या कोर्टात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एफआरपी अधिक दोनशे रुपये देण्याची घोषणा केल्याने त्यांनी शब्द पाळावा, अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केल्याने ऊसदरावरून जिल्ह्यात मोठी कोंडी झाली आहे. एफआरपीसाठी सरकारने मदत करावी, अशी कारखानदारांनी मागणी केल्याने ऊसदराचा चेंडू सरकारच्या कोर्टात ढकलण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी एफआरपीसाठी मदतीचे आश्वासन दिल्यानंतरच कारखाने सुरू करू, असा पवित्रा कारखानदारांनी घेतला आहे. त्यामुळे येत्या शनिवारपर्यंत कारखाने बंदच राहणार आहेत.

ऊसदरप्रश्नी जिल्ह्यातील बंद असलेले साखर कारखाने सुरू करावेत, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी साखर कारखानदारांना करतानाच एफआरपीबाबत कारखान्यांना येणाऱ्या अडचणी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालू, असे आश्वासन दिले. रविवारी दुपारी साखर कारखानदारांच्या शिष्टमंडळाने सरकारी विश्रामगृहावर पालकमंत्र्यांची भेट घेतली, यावेळी ते बोलत होते.

साखर कारखाने सुरू करण्यासंदर्भात शनिवारी (ता.३) कारखानदारांची बैठक झाली. बैठकीतील निर्णयांची माहिती देण्यासाठी रविवारी कारखानदारांनी पालकमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी एफआरपी देण्याबाबत येणाऱ्या अडचणींबाबत पालकमंत्र्यांसमवेत अर्धा तास बैठक झाली. बाजारपेठेतील साखरेच्या दरानुसार बँका कारखान्यांना कर्ज देणार आहेत. पूर्वहंगामी कर्ज, अन्य कर्जांचे हप्ते वजा करून बँका कारखान्यांना किती उचल देणार हे माहीत नाही. कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीनुसार एकरकमी दर देण्याचा कायदा केला आहे; पण बँकांकडून मिळणारी उचल आणि एफआरपीची रक्कम यामध्ये कारखानानिहाय ४०० ते ६०० रुपयांचा फरक पडत आहे. त्यामुळे एफआरपीची रक्कम कशी द्यायची, असा कारखानदारांपुढे प्रश्न उभा आहे. साखरेचे घसरलेले दर, एकरकमी एफआरपी आणि बँकांकडून मिळणारे कर्ज यामुळे एफआरपी देणे अशक्य आहे. त्यामुळे सरकारने एफआरपी देण्यासाठी मदत करावी, अशी मागणी कारखानदारांनी केली.

यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, 'कारखानदारांनी एफआरपीप्रमाणे एकरकमी दर देणे बंधनकारक आहे. गेली चार वर्षे सरकार मदत करत आहे. यावर्षीही कारखानदारांना मदत केली जाईल. बंद ठेवलेले कारखाने सुरू करावेत. कारखानदारांना एफआरपी देण्याबाबतच्या अडचणींची माहिती मुख्यमंत्र्यांना सांगण्यात येईल. सरकार ऊस उत्पादकांना चांगला दर मिळावा या मताचे आहे.'

कारखानदारांच्या शिष्टमंडळात आमदार हसन मुश्रीफ, चंद्रदीप नरके, शाहू कारखान्याचे अध्यक्ष समरजित घाटगे, दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, मंडलिक कारखान्याचे अध्यक्ष प्रा. संजय मंडलिक यांच्यासह कारखानदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

०००००

फक्त जिल्ह्यात कारखाने बंद

साखर हंगाम सुरू झाला असून, देशात व राज्यात सर्वत्र साखर कारखाने सुरू आहेत, पण ऊसदरावरून शेतकरी संघटनांच्या आंदोलनामुळे फक्त कोल्हापूर जिल्ह्यातीलच कारखाने बंद आहेत, याकडे कारखानदारांनी लक्ष वेधले. एफआरपीसाठी सरकारने मदत केल्यास कारखाने सुरू होतील, असे कारखानदारांनी स्पष्ट केले.

००००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गायीच्या पूजनासाठी पांजरपोळ संस्थेत गर्दी

$
0
0

वसुबारसनिमित्त येथील पांजरपोळ संस्थेत गाय वासरुचे पूजन करण्यासाठी दिवसभर गर्दी होती. गायीचे औक्षण करून गोडपदार्थ खाऊ घालण्यात आले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने आझाद चौक परिसरातील अष्टभिक्षालिंग दत्त मंदिरात गायीचे पूजन झाले. याप्रसंगी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्यासह अन्य सदस्या उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अखेर 'त्या' दोन पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल

$
0
0

पंढरपूर:

साखर कारखान्याला ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने टेपचा आवाज वाढवल्याने दोन पोलिसांनी केलेल्या जबर मारहाणीत ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने जोरदार आंदोलन केल्याने जमावाच्या दबावासमोर झुकत अखेर या दोन्ही पोलिसांवर भादंवि कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मानेगाव येथे रविवारी ही घटना घडली. ऊसाची वाहतूक करताना ट्रॅक्टर चालक प्रदीप कल्याण कुटे याने ट्रॅक्टरमधील टेपचा आवाज वाढवला होता. यावेळी पोलिसांसोबत प्रदीपची वादावादी झाली. संतप्त पोलिसांनी प्रदीपला जबर मारहाण केल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला. मात्र पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून त्याची नोंद केली. त्यामुळे प्रदीपचे कुटुंबीय आणि ग्रामस्थ प्रचंड भडकले. रविवारी रात्रीच शेकडो ग्रामस्थ माढा पोलीस ठाण्यासमोर जमले आणि त्यांनी प्रदीपला मारहाण करणाऱ्या दोन्ही पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली. रात्री नऊच्या सुमारास पोलीस ठाण्याबाहेर प्रदीपचा मृतदेह आणून ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे वातावरण अधिकच चिघळले. अखेर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्यासह जिल्ह्यातील इतर अधिकारी रात्री उशिरा माढ्यात दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

माढा दिवाणी न्यायाधीशांच्या समक्ष पंचनामा करून या घटनेस जबाबदार असलेले हवालदार दशरथ कुंभार आणि दीपक क्षीरसागर या दोघांवर आज पहाटे हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला . यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूरकडे पाठवण्यात आला असून या प्रकरणाचा तपास राज्य गुप्तचर विभागाकडे देण्यात आला आहे. या घटनेत मृत झालेला प्रदीप हा उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील सोनगिरी येथील रहिवासी आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धनत्रयोदशी: विठुराया सजला सोन्याच्या पगडीत

$
0
0

पंढरपूर :

विठुरायाच्या पंढरीतरही दिवाळीचा उत्साह ओसंडून वाहू लागला असून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दिपोत्सवाला सुरुवात झाली आहे. आज धनत्रयोदशी दिवशी विठुरायास गर्द हिरवी मखमली आणि पिवळे सोवळे परिधान करण्यात आले होते.

सोन्याची पगडी, कंठी कौस्तुभ मणी, बाजीराव कंठी, कानात मत्स्य कुंडलं घातलेलं असं विठुरायाचं सावळं रूप खूपच सुंदर दिसत होतं. रुक्मिणी मातेस निळ्या रंगाची पैठणी परिधान करण्यात आली होती. मोहराची माळ, पुतळयाची माळ, बोरमाळ, चिंचपेटी आदी अलंकारानी रुक्मिणीला सजवण्यात आले होते.

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळली चंद्रभागा

गेल्या काही वर्षांपासून चंद्रभागेच्या घाटांवर दिवाळीत दिव्यांची आरास केली जाते. वारकरी आणि पंढरपूरकर मोठ्या उत्साहाने हा दिपोत्सव साजरा करतात. आज गोरज मुहूर्तावर बाळगोपाळांसह भाविकांनी एकत्रित येत घाटांवर दिवे लावण्यास सुरुवात केली. एकाचवेळी चंद्रभागेच्या तीरावर लक्ष लक्ष दिवे लावण्यात आले. या दीपोत्सवाने चंद्रभागेचा तीर उजळून निघाला. चंद्रभागेच्या १४ घाटांवर हा दीपोत्सव साजरा करण्यात येत आहे.

दरम्यान, दिवाळीनिमित्त दर्शनासाठीही पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उसदराच्या मागणीसाठी सेनेचा रास्ता रोको

$
0
0

म. टा. वृत्तसेवा शाहूवाडी

यंदा उसाला पहिली उचल प्रती टन ३६०० तर अंतिम दर ४००० रुपये मिळावा या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग रोखून धरण्यात आला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत केलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या लांब रांगा लागल्या. सेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. उप जिल्हाप्रमुख नामदेव गिरी, तालुकाप्रमुख दत्तात्रय पवार, सभापती अश्विनी पाटील, संदीप पाटील आदींसह पदाधिकारी रास्ता रोकोमध्ये सहभागी झाले. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन प्रतिबंधक कारवाई करून सोडून दिले.

जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव म्हणाले, 'शेतीत पीक उत्पादन खर्च सतत वाढत असताना शेतकऱ्यांना न्यायासाठी झगडावे लागते. अशावेळी शिवसेनेने ठाम भूमिका घेत नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम केले आहे. यंदा उसाला प्रती टन ४००० रुपये अंतिम दर मिळायला हवा. गेल्यावर्षी गाळप झालेल्या उसाचे कारखान्यांनी प्रतीटन २०० अद्याप दिलेले नाहीत. ते आधी द्यावेत, अन्यथा शिवसेना कारखान्यांची धुराडी पेटू देणार नाही.'

उप जिल्हाप्रमुख नामदेव गिरी म्हणाले, 'साखर कारखानदार शेतकऱ्यांना वेठीस धरीत आहेत. अशावेळी मध्यस्त म्हणून केंद्र व राज्य सरकार दर निश्चित करून तोडगा काढण्यात अपयशी ठरले आहे.'

युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख अमरसिंह पाटील यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत शेतकऱ्यांना दर मिळवून दिल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नसल्याचे सांगितले. योगेश कुलकर्णी, सचिन पाटील, पांडुरंग केसरे, सचिन मुडशिंगकर, आप्पासाहेब साळुंखे, नथुराम पाटील, बाबूराव सावंत, तुषार पाटील, विजय लाटकर, निवास निकम, संजय पाटील, स्वाभिमानी संघटनेचे सुरेश म्हाऊटकर, पद्मसिंह पाटील, सुवर्णा दाभोळकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. शाहूवाडी पोलिस ठाण्याचे निरीक्षक मनोहर रानमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली बांबवडेचे उपनिरीक्षक शशिकांत गिरी, कोडोलीचे दरेकर, हिंदुराव केसरे आदींनी बंदोबस्त ठेवला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेलारपाड्यातील आदिवासींना दिवाळी भेट

$
0
0

सामाजिक संघटनेकडून पणत्या, दिवे, फराळ तेलाचे वाटप

म. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ

शहरी भागात दिवाळी सणानिमित्त रोषणाई आणि आतषबाजीने उत्सव साजरा होत असला, तरी आजही अनेक आदिवासी पाड्यांमध्ये अंधार असतो. अशाच अंबरनाथ तालुक्यातील शेलार पाड्यातील आदिवासींनी दिवाळीचा आनंद एका समाजिक संघटनेच्या माध्यमातून अनुभवला. यावेळी आदिवासींनी दिवे, रांगोळी, फराळ आणि तेल आदी साहित्य वाटप करत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे काम संस्थेकडून करण्यात आले.

अंबरनाथ तालुक्यातील शहरी भागात दिवाळीनिमित्त सर्वत्र रोषणाई आणि दिवाळीचा उत्सव आनंदात साजरा होत असताना, याच शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेले अनेक आदिवासी पाडे मात्र या आनंदापासून वंचित असतात. असाच हाजीमलंग पट्ट्यातील शेलार पाडा या आदिवासी पाड्यातही दिवाळीचा आनंद तसा दूरच, या पाड्यात अद्याप वीजपुरवठा नसल्याने सर्व आदिवासी अंधारातच दिवस काढत असतात. त्यामुळे दिवाळीची रोषणाई त्यांच्यासाठी दूरच. शहरी भागासोबत आदिवासी पाड्यांमध्येही दिवाळी सण आनंदात साजरा करता यावा, या उद्देशाने अंबरनाथ येथील भारतीय छावा संघटेनेचे मुंबई सचिव राजेश नाडकर, ठाणे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत भोईर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यंदा शेलार पाड्यातील आदिवासींसोबत दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला. शेलार पाड्यात २५ आदिवासी कुटुंब असून, या कुटुंबांना संघटनेतर्फे दारात लावण्यासाठी पणत्या, तेल, फराळ आणि रांगोळीचे वाटप यावेळी करण्यात आले होते. दिवाळीच मिळालेल्या या सर्व साहित्यामुळे आदिवासींच्या चेहऱ्यावर एकच हास्य फुलले होते. या उपक्रमात तालुका अध्यक्ष बबलू वारे आणि आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळ परिसरातील अडथळे काढण्यासंबंधी पत्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

विमानतळ परिसरातील अडथळे मार्चअखेर काढण्यासाठी आवश्यक मदतीचे पत्र जिल्हा प्रशासनाने सोमवारी विमानतळ व्यवस्थापनास दिले. यामुळे अडथळे काढण्याच्या कामाला गती येणार आहे. आमदार अमल महाडिक यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांची भेट घेऊन पत्रासंबंधी पाठपुरावा केला.

विमानतळ आवारात उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीचे खांब, उंच झाडे, होर्डिंगज, पाण्याच्या टाकीचा अडथळा आहे. यामुळे विमानाच्या नाईट लँडिंगमध्ये अडचणीत येत आहेत. हे सर्व अडथळे दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची परवानगी आवश्यक होती. त्यासाठी प्रशासनाने पत्र दिले. विद्युत खांब स्थलांतर करण्यासाठीच्या निधी तरतुदीची चर्चा आमदार महाडिक यांनी केली. संभाव्य अडथळ्यांच्या पठारावर सिग्नल बसवण्यात येणार आहे. वीज वितरण कंपनी, सार्वजनिक बांधकाम आणि वनविभागाच्या मदतीने अडथळे काढण्याचे काम करण्यात येणार आहे. विमानसेवा त्वरित सुरू करण्यासाठी विमानतळ व्यवस्थापनास आवश्यक ती मदत केली जात आहे.

-----------------

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दौलतबाबत तोडगा काढा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, चंदगड

'जोपर्यंत इको केन शुगर्स साखर कारखाना मागील शेतकऱ्यांची बिले देत नाही. तोपर्यंत कारखाना सुरू करू देणार नाही. त्याचबरोबर ओलम शुगर्स (हेमरस) कारखान्याने उर्वरीत रक्कम महिनाभरात द्यावी. दौलतबाबत शिष्टमंडळ जिल्हा बँकेच्या अध्यक्षांना भेटून दौलतबाबत तोडगा काढण्याची विनंती करू असा निर्णय येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. चंदगड येथील तहसिल कार्यालयात जनआंदोलन कृती समिती, कारखानदार, ऊस उत्पादक, जिल्हा बँकेचे प्रतिनिधी, आमदार व प्रशासनाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी आमदार संध्यादेवी कुपेकर होत्या.

इको केन (नलवडे) कारखान्याचे मागील ७४० रुपये थकीत आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांची देणी मिळत नाही, तोपर्यंत कारखाना सुरू करू देणार नाही, ऊस पुरवठा करणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. हेमरस कारखान्याने काही थकीत रक्कम दिली. मात्र, उर्वरीत रक्कमेची विचारणा केल्यावर आधी इको केनकडून वसुली करा, मग आम्ही कधीही बिल द्यायला तयार आहे असे उत्तर देण्यात आले. यावेळी सभागृहात काही काळ गोंधळ उडाला. यावर कृती समितीने एक महिन्यात बिल न दिल्यास कारखाना बंद पाडू असा इशारा दिला.

साखर आयुक्तांनी दौलतची जमीन-विक्री करून शेतकऱ्यांची देणी द्यावीत असा आदेश दिला आहे. मात्र कारखाना केडीसीसी बँकेच्या ताब्यात असून तो ४५ वर्षाच्या कराराने न्युट्रीयन्स कंपनीला चालवायला दिला आहे. कारखान्याची मालमत्ता सभासदांच्या मालकीची असून जमिनी विक्रीला आमचा विरोध असल्याचे शेतकऱ्यांच्यावतीने कृती समितीने सांगितले. दौलतच्या गोदामातील साखर दोन वर्षे पडून आहे. त्या साखरेची विक्री करुन शेतकऱ्यांची देणी द्यावीत अशी भूमिका कृती समितीचे ॲड. संतोष मळविकर यांनी मांडली. न्युट्रीयन्सचे मालक, चालक कोण आहेत? त्यांनाही बैठकीला बोलवा अशी मागणी तहसीलदार शिवाजी शिंदे यांच्याकडे करण्यात आली. हुबळी येथील कारखान्याने शेतकऱ्यांची बिले अद्याप दिलेली नाहीत. त्यांच्या कार्यालयालाही टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला. कृती समितीत शेतकरी संघटनेनेही सामील होण्याचे आवाहन करण्यात आले. कृती समितीचे तानाजी गडकरी, एन. एस. पाटील, विष्णू पाटील, विलास पाटील, पांडुरंग बेनके, भरमाणा गावडा, रवी पाटील आदींनी चर्चेत भाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तेऊरवाडीत अज्ञातांनी भातासह गंजी पेटवली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, चंदगड

तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील रामू इरु पाटील यांच्या पठार नावाच्या शेतातील भाताच्या दोन गंज्यांना अज्ञात व्यक्तींनी आग लावल्याने आगीत सुमारे दीड एकरातील भात जळून खाक झाले. बुधवारी ते गुरुवारी ही घटना घडली. रामू पाटील यांची सून सरीता शिवाजी पाटील यांनी याची पोलिसांत तक्रार दिली. वर्षभरासाठी पिकवलेले धान्य जळून खाक झाल्याने धान्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न या कुटुंबासमोर निर्माण झाला आहे. पाटील यांनी भाताची कापणी करून मळणीसाठी वेळ असल्याने शेतात कापलेल्या भाताच्या दोन गंज्या रचल्या होत्या. अज्ञात व्यक्तींनी हेतुपुरस्सर दोन्ही गंज्यांना आग लावली. आगीत भात जळून खाक झाले. जाणीवपूर्वक गंजीला आग लावल्याने या प्रकरणाचा छडा लावून दोषी व्यक्तींवर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली. महसूल विभागाला याची कल्पना दिली आहे. पण अद्याप जळीत भाताचा पंचनामा झाल्या नसल्याने दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न कुटुंबियांना पडला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धाक दाखवून वृद्धेला लुटले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा शाहूवाडी

शित्तूर वारुणपैकी राघुचावाडा (ता. शाहूवाडी) येथे पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसलेल्या तीन अनोळखी तरुणांनी वृद्धेला धाक दाखवून अंगावरील सोन्याचे दागिने लुटल्याची घटना घडली. याबाबत शाहूवाडी पोलिसांत सोमवारी सायंकाळी तीन अज्ञात तरुणांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा नोंद झाला. पोलिसांनी सांगितले की, बयाबाई कोंडीबा पाटणे (वय ६५) या शित्तूर वारुणपैकी राघुचावाडा येथे घरासमोर रविवारी दुपारी थांबल्या होत्या. लाल रंगाच्या दुचाकीवरून आलेले २०-२३ वर्षाच्या तीन अनोळखी तरुण पाणी पिण्याच्या बहाण्याने त्यांच्याजवळ थांबले. तिघेही बयाबाई यांच्या घरात शिरले. त्यांचे तोंड दाबून 'दंगा केलास तर तुला ठार मारणार' अशी धमकी देऊन त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व कानातील कुड्या जबरदस्तीने काढून घेऊन दुचाकीवरून पळून गेले. पोलिस हेड कॉन्स्टेबल बांबळे हे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वादग्रस्त शिक्षक सुनील कांबळे निलंबित

$
0
0

कोल्हापूर : बोळावी (ता. कागल) येथे विद्यार्थिनीशी गैरवर्तन करणारा शिक्षक सुनील कांबळे याला जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने सेवेतून निलंबित केले. गेल्या आठवड्यात शाळेत विद्यार्थिनींशी गैरवर्तन करण्याचा प्रकार घडला होता. ग्रामस्थांनी संबंधित शिक्षकाला मारहाण केली होती. त्या शिक्षकांवर पोलिस कारवाई झाली आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेत गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला होता. सोमवारी त्या शिक्षकाला निलंबित करण्याचा निर्णय घेतला. निलंबन प्रस्तावावर स्वाक्षरी झाल्याचे वृत्त आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नाटक कला अस्तंगत होण्याची भिती’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सांगली

' नवीन प्रवाहात नाटकाला खूपच कमी प्रतिसाद मिळत असून, प्रेक्षकांशिवाय पूर्ण न होणारी नाटक ही कला अस्तंगत होते की काय, अशी भीती वाटत आहे', असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी सोमवारी सांगलीत केले.

सांगलीतील अखिल महाराष्टÑ नाट्य विद्यामंदिर समितीच्यावतीने रंगभूमीदिनी डॉ. आगाशे यांना अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांच्या हस्ते विष्णुदास भावे गौरव पदक प्रदान करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना डॉ. आगाशे म्हणाले , 'नवीन युगात डिजिटल मीडियाचे प्रस्थ वाढत असताना, नवीन पिढी आभासी जगातच वावरत आहे. या आभासी जगाने खऱ्याखुऱ्या आयुष्यावरही मात करण्यास सुरुवात केली आहे. या पिढीत माणसाला बघायच्या आधी त्याचा फोटो काढण्यास प्राधान्य दिले जात आहे. डोळ्याने पाहून त्या व्यक्तीला डोक्यात ठेवण्याची संकल्पना कालबाह्य झाली असून, फोटोसाठी, सेल्फीसाठी माणसाला बघितले जात आहे. या आभासी जगातून नव्या पिढीला बाहेर आणण्याची जबाबदारी आता प्रत्येकावर आली आहे.'

ते पुढे म्हणाले, ' पुणे, मुंबई वगळता इतर ठिकाणी होणाऱ्या नाटकांची स्थिती गंभीर आहे. ज्येष्ठ नागरिक सोडून कोणीही नाटकाला येत नाहीत. लोक समारंभाला आवर्जून उपस्थित राहतात. मात्र, नाटकाला येत नाहीत, अशी स्थिती आहे. बहुतेक नाट्यमंदिरे नाटक सोडून इतर कार्यक्रमांसाठीच वापरली जात आहेत. नाटकाचा 'इव्हेंट' कसा करायचा, हे माहीत असलेलीच नाटके चालतात. इतर नाटकांना खूपच कमी प्रतिसाद मिळत आहे. नाटक कला प्रेक्षकांशिवाय पूर्णच होऊ शकत नसल्याने, ही कलाच अस्तंगत होते की काय, अशी भीती वाटते.'

नाट्य विद्यामंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी स्वागत केले. ऋतुजा साबणे यांनी सूत्रसंचालन केले. शुभांगी दामले यांनी डॉ. आगाशे यांची ओळख करून दिली. यावेळी विनायक केळकर, व्ही. जे. ताम्हनकर, मेधा केळकर, जगदीश कराळे, आनंदराव पाटील, प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हनकर, विलास गुप्ते, बीना साखरपे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

.............

फोटो ओळी

डॉ. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांना विष्णुदास भावे गौरव पदक प्रदान करताना अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार. यावेळी उपस्थित डावीकडून विलास गुप्ते, बलदेव गवळी, डॉ. शरद कराळे, प्रसाद कांबळी, विनायक केळकर, मेधा केळकर, प्रा.भास्कर ताम्हणकर आदी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images